Halloween Costume ideas 2015
Articles by "news"

भाषेचा गोडवा, तिचे महत्त्व, वापर, प्रसार, प्रचार या बाबी फक्त ती भाषा बोलण्याने साध्य होत नसतात तर त्या भाषेचे साहित्य यामध्ये खुप मोठी भूमिका बजावते. भाषेला जिवंत ठेवण्यामागे तिच्या साहित्याचा मोलाचा वाटा असतो. ती भाषा बोलणाऱ्यांची संस्कृती त्यांच्या लिखाणातून झळकते. एक प्रादेशिक भाषा असुनही इंग्रजी, ऊर्दू, हिंदी या भाषांप्रमाणेच मराठी भाषा वाड़मयाच्या दृष्टीने खुप प्रगत आणि प्राचीन आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर आयोजित केले जाते. जवळपास सर्वच मराठी प्रकाशने आपल्या पुस्तकांचे प्रदर्शन या संमेलनात सादर करतात. लेखक आणि कवींसोबतच विविध अभिनेते, अभिनेत्री, राजकारणातील दिग्गज यासाठी आमंत्रित केले जातात. जगभरातील मराठी साहित्यिक, वाचक, रसिक प्रेक्षक या संमेलनाला आवर्जून भेट देतात. 

साहित्य संमेलनात राजकारण्यांचे काय काम? असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा 1965 च्या मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे शब्द आठवतात ते म्हणाले होते,

राजकारणामध्ये पुष्कळ वेळा जे घडते त्याच्या मूळ प्रेरणा साहित्यातून निर्माण होत असतात. महाराष्ट्रापुरते बोलावयाचे झाले तर संयुक्त महाराष्ट्राची प्रेरणा महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून निघाली. 

या अगोदरच्या म्हणजे 1964 च्या साहित्य संमेलनात याच विषयावर अध्यक्षपदी बोलताना वि. ना. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज म्हणतात, ’’राजकारण आणि साहित्य या परस्परांना कधीही न भेटणाऱ्या समांतर रेषा आहेत असे मानणे हे साहित्याच्या बाजूने अडाणीपणाचे आणि राजकारणाच्या बाजूने धूर्तपणाचे लक्षण आहे.’’

आजकालच्या राजकारण्यांमध्ये साहित्याची गोडी प्रत्यक्ष दिसत नसली तरी ही गोष्ट विसरता कामा नये की पुर्वीचे राजकारणी हे साहित्यिक पण होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, शिवराम महादेव परांजपे यांचे साहित्य राजकारणाभोवती फिरताना दिसते. शंकरराव देव, विनोबा भावे यांचे साहित्य महात्मा गांधींच्या प्रभावाखाली असलेले दिसते. राजकारणाचा साहित्यावर असा प्रभाव पडलेला दिसत असताना साहित्यिकांचा राजकारणाशी अथवा राजकारण्यांचा साहित्यिकांशी संबंध असणे काही वावगे ठरणार नाही. मात्र साहित्य आणि साहित्य संमेलन यांचा वापर करून चुकीचे राजकारण करणे हे धोकादायक आहे.

या वर्षीचे म्हणजे 2024 चे संमेलन हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. हे संमेलन इचलकरंजी किंवा दिल्ली या दोन ठिकाणी ठेवण्यासाठी बराच वाद झाला. शेवटी हे दिल्ली येथे आयोजित करण्याचे नुकतेच ठरले. यापुर्वी 1954 साली एकदा दिल्ली येथे हे संमेलन आयोजित केले होते. आतापर्यंत एकुण 23 वेळा संमेलन महाराष्ट्राबाहेर आयोजित केले गेले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानात सर्व धर्मीय, सर्व पंथीय मराठी साहित्याचे दर्शन होते. इस्लामला सोप्या पद्धतीने मराठी भाषेत सादर करण्यासाठी इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट गेले 35 वर्षांपासुन अशा संमेलनामध्ये पवित्र कुरआनचे मराठी भाषांतर, पैगंबरांच्या शिकवणी, पैगंबर चरित्र व इस्लामच्या विविध पैलूंवर साहित्य प्रदर्शन करत आहे, साहित्य प्रेमींबरोबर संवाद करत आहे, मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान यामधून होत आहे. नेहमीप्रमाणे याही वर्षी वाचकांसाठी एक उत्सव म्हणून हे संमेलन लाभणार आहे, त्याचा पुरेपूर फायदा प्रकाशने, साहित्यिक आणि वाचक घेतील हीच अपेक्षा.

- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. : 7507153106


कोल्हापूर (अशफाक पठाण)

विशाळगडावरील घटनेचे तथ्य जाणून घेण्यासाठी 21 आणि 22 जुलै 2024 रोजी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हील राईट्स आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम या संस्थांनी संयुक्तपणे विशाळगट, गजापूर येथे भेट दिली. यावेळी मुंबई येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे संचालक इरफान इंजिनिअर, ए.पी.सी.आरचे राज्य अध्यक्ष असलम गाझी, मुस्लिम नुमाईंदा कौन्सिल औरंगाबदचे मेराज सिद्दीकी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे अभय टक्साळ, शिक्षक प्रीतम घनघावे,  सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे प्रतिनिधी मिथिला राऊत, जमाअतचे राज्यसचिव मजहर फारुकी, जमाअते इस्लामी हिंद जालनाचे सचिव अब्दुल मुजीब, जेआयएच कोल्हापूरचे सदस्य इस्माईल शेख, एसआयओ साउथ महाराष्ट्राचे पीआर मीडिया सेक्रेट्री अशफाक पठाण यांचा सहभाग होता.

यावेळी प्रतिनिधी मंडळाने गजापूरमध्ये घटलेेल्या घटनेचे बळी पडलेल्या लोकांशी संवाद साधला. विशेष करून शिराज कासम प्रभुलकर, 300 वर्षाचा इतिहास असलेल्या रजा जामा मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष आणि इतर ग्रामस्थांची भेट घेतली. तसेच कोल्हापूर शहरातील काही मान्यवर मंडळींच्याही भेटी या शिष्टमंडळाने घेऊन त्यांच्याशी घडलेल्या घटनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  

या भेटीत खालील बाबी आढळून आल्या.

1. हा हल्ला पूर्व नियोजित हल्ला होता. गजापूर गावातील मुस्लिम लोक तेथील स्थानिक आहेत, त्यांनी जमीनी अनधिकृतरित्या बळकावलेल्या नाहीत, त्यांच्याकडे जमिनीचे, घराचे कागदपत्र आहेत, मशीदीचेही कागदपत्र आहेत. मोठ्या प्रमाणावर या गावातील मुस्लिम पुरुष मुंबई व इतर ठिकाणी नोकरी, व्यवसाय करतात. सणासुदीला कुटुंबातील व्यक्तींना भेटण्यास येतात. त्यांचा आणि विशाळगडावरील अनधिकृत स्टॉलशी काहीच संबंध नाही.

2. हल्लेखोरांच्या हातात, तलवार, हातोडे, सब्बल होती.

3. हल्ला करण्याचे कारण राजकीय आणि सांप्रदायिक दिसतं. कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना हा हल्ला झाला आणि मुस्लिम समुदायातील लोकांवर जाणून बुजून हल्ला झाला; ज्यांचा अतिक्रमणाशी काहीच संबंध नाही. गजापूर हे गाव विशाळगडापासून 5 किमी दूर आहे. त्यांच्यावर हल्ला मुस्लिम असल्यामुळेच केला गेला.

4. अतिक्रमण करणारे सगळे बाहेरचे लोक होते. स्थानिक व्यक्ती नारायण पांडुरंग वेल्हाल यांच्या घरी अगोदर रवींद्र पडवळ यांच्या पुढाकाराने काही मीटिंग झाल्या होत्या, ज्यांचे नाव एफआयआरमध्ये देखील नमूद आहे.

5. एफ.आय.आर मध्ये नारायण पांडुरंग वेल्हाल यांचे नाव दिले असता पोलिसांनी ते घेतले नसल्याचे समोर आले.

6. पोलिसांनी जो बंदोबस्त करायला पाहिजे होता तेवढा त्यांनी दक्षता घेतली नाही. पोलिसांनी त्या वेळेसच नाकाबंदी केली पाहिजे होती. पोलिसांनी दक्षतापूर्वक कर्तव्य बजावले नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे गजापूर गावातील घरे आणि दुकाने मिळून 41 आणि 300 वर्षे जुनी एक मजीद असे एकूण 42 वास्तूंची तोडफोड केली गेली. तसेच 51 वाहने त्यात 17 चार चाकी आणि 34 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. हा हल्ला काही लोकांच्या मते सकाळी 11 तर काहींच्या मते दुपारी 12.30 ते सायंकाळी 5 एवढ्या दीर्घ कालावधीत चालू होता. एका घरातील नव्वद हजार रूपये, सहा तोळे सोने लुटले. दुसऱ्या दोन घरातील प्रत्येकी 3 तोळे सोने आणि काही पैसे लुटले. धान्य, कडधान्ये फेकून टाकले. टी. व्ही, कपाटे, फ्रिज, लाईट कने्नशन असे जे मिळेल त्याची नास धुस केली गेली. कुरानच्या प्रती जाळण्यात आल्या. मशीदीची तोडफोड केली आणि कब्रस्तान चे कुंपण तोडले. ज्या घरातील लोकांनी मिरवणुकीत जाताना पाणी मागितल्यावर पाणी दिले, पाऊस होता म्हणून छत्री आणि रेनकोट दिले त्याच घरात दोन सिलिंडरचा स्फोट केला. मिरवणुकीमध्ये पंधरा हजार लोक होते पण अंदाजे पंधराशे लोकांनी हल्ला केला.

7. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्याचा निषेध न करता, विशाळगडावरून अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले आणि 15 जुलैला वर्तमानपत्रात नमूद केल्या नुसार विशाळगडावरील 35 अनधिकृत दुकाने तोडली.

8. हिंसक जमावाने पोलिसांवर देखील हल्ला केला. त्यात 11 पोलीस कर्मचारी जखमी झाले. मुस्लिम समुदायातील लोक जंगलात पळून गेले होते म्हणून वाचले. नाहीतर जीवघेणा हल्ला झाला असता. रहिवाशी याकूब मोहम्मद प्रभुलकर अपंग असल्यामुळे त्यांना पळता येत नव्हते त्यांनाही दंगेखोरांनी मारहाण केली. त्यांच्या पायाला दोन आणि हाताला एक फ्रॅक्चर झाले. जे आता मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.

9. संजय पाटील, राजू कांबळे, मंगेश कांबळे, पांडुरंग कोंडे, मारुती निबले, चंद्रकांत कोकरे असे सर्वच समाजाचे लोक संध्याकाळी गजापूर गावातील मुस्लिम लोकांना धीर देण्यासाठी आले व त्यांच्यासाठी जेवण देखील घेऊन आले होते.

प्रतिनिधी मंडळाच्या मागण्या...

01 सर्वप्रथम व्यवस्थित गजापूर गावातील लोकांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई सरकारने तातडीने दिली पाहिजे. सध्या सरकारने दिलेले रू. 25000/- चेक अगदीच अपुरे आहेत.

02. प्रत्येक नुकसानीचे वेगवेगळे एफ.आय.आर. दाखल केले पाहिजेत. 

03. एस.आय. टी नेमून उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली त्याची चौकशी व्हावी व दोषींना कडक शिक्षा व्हावी. त्यांच्यावर दहशतवादाचा गुन्हा दाखल व्हावा. 

04. ह्या हल्ल्याचा कट कोणी, कधी आणि कुठे केला, याचा मुळ सूत्रधार कोण आहे हे शोधून काढावे.

05. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी लोक व इतर काही भाजपचे आमदार यांच्याकडून बरीच द्वेषजनक भाषणे दिली गेली आहेत. आर्थिक स्थैर्यात देशात पहिल्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य आहे. 

अशा घटना जर वारंवावर घडत असल्या तरी त्याचे रूपांतर हिंसेमध्ये होणार यात शकांच नाही. द्वेषजनक भाषनांवर देखील शासनाने कठोर कार्यवाही केली पाहिजे, अशा मागण्या प्रतिनिधी मंडळाने शासनाकडे केल्या आहेत. 



मुंबई 

जमाअत-ए-इस्लामी हिंद (जेआयएच), महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी हिट अँड रन प्रकरणांवर चिंता व्यक्त केली असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी समाजाने सामूहिक आत्मशोधाचे आवाहन केले आहे.

जेआयएच महाराष्ट्र अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आपल्या लाडक्या महाराष्ट्र राज्यात हिट अँड रनच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे आम्हाला अत्यंत चिंतेने दिसून येत आहे.  अनेकदा बेदरकारपणे आणि दारुच्या नशेत भरधाव वेगाने वाहने चालवणारे हे तरुण या दुर्दैवी घटनांमध्ये आघाडीवर आहेत. यातील अनेक तरुण ड्रायव्हर श्रीमंत कुटुंबातील मुले आहेत, ज्यांना योग्य प्रकारे शिस्त लावली गेली नाही किंवा उच्चभ्रू शैक्षणिक संस्थांमधून आलेल्या आणि विशेषाधिकार आणि भौतिक संपत्तीने समृद्ध असलेल्यालोकांकडून अपेक्षित असलेल्या उदात्त नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केले गेले नाही.

मौलाना इलियास खान फलाही पुढे म्हणाले की, खेदाची बाब म्हणजे आपल्या तरुण पिढीच्या मनातून जीवनाचे पावित्र्य हळूहळू लोप पावत चालले आहे. हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे आणि आपण निर्माण केलेल्या व्यापक सामाजिक व्यवस्थेचे दु:खद प्रतिबिंब आहे. आपल्या समाजाला भेडसावणाऱ्या मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांमधूनही जीवनाच्या पावित्र्याबद्दलचा आदर कमी होत चालला आहे. आपले राजकीय चित्र द्वेष आणि विभाजनाने अधिकाधिक प्रदूषित होत चालले आहे, ज्यामुळे मानवी मूल्ये आणि मानवी जीवनाबद्दलचा आदर कमी होत चालला आहे.

हिट अँड रन प्रकरणांच्या समस्येवर भाष्य करताना मौलाना इलियास फलाही म्हणाले, ‘तरुण पिढीने हिट अँड रन केसेस आणि मद्यपान करून वाहन चालविणे या समस्येच्या नैतिक, सामाजिक-राजकीय आणि मानसशास्त्रीय पैलूंचे विश्लेषण केले तर लक्षात येते की कुठेतरी आपण आपल्या मुलांना योग्य मूल्ये आणि नैतिक चारित्र्याने वाढविण्यात अपयशी ठरलो आहोत. 

धार्मिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. अशा घटनांच्या वाढत्या संख्येमुळे आपला समाज आणि देश कोणत्या दिशेने जात आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजाने सामूहिक आत्माशोध करण्याची ही वेळ आहे. तरुणांमध्ये जीवन आणि माणुसकीबद्दल आदर निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. एकजुटीने प्रयत्न करूनच आपण भावी पिढ्यांसाठी अधिक सुरक्षित, दयाळू समाज घडवण्याची आशा करू शकतो.



मुंबई 

अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे जोरदार आवाहन केले आहे.  ज्यामुळे आपल्या समाजात, विशेषत: तरुणांमध्ये हाहाकार माजला आहे.

मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला आहे. ते म्हणाले की शिक्षण संस्थांनी अंमली पदार्थांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामध्ये व्यापक जागरूकता कार्यक्रमांचा समावेश असावा, ज्याद्वारे मुले आणि तरुणांना अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या धोक्यांबद्दल शिक्षित केले जाईल, जे व्यसन बऱ्याचदा लहान वयात सुरू होते. आपली मुले आणि तरुण लहान वयातच अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडत आहेत. हे एक संकट आहे ज्यासाठी समाजाच्या सर्व क्षेत्रांनी त्वरित आणि सातत्यपूर्ण हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.

मौलाना इलियास खान फलाही यांनी पोलिसांना अंमली पदार्थांची तस्करी आणि वितरण नेटवर्कवर कारवाई करण्यासाठी त्यांचे प्रयत्न तीव्र करण्याचे आवाहन केले. या लढाईत पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या समुदायांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे जाळे नष्ट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी सतर्क आणि सक्रिय असणे आवश्यक आहे.

अंमली पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी पालकांची अपरिहार्य भूमिकाही त्यांनी अधोरेखित केली. मौलाना फलाही म्हणाले, “पालकांनी आपल्या मुलांच्या आयुष्यात सावध आणि व्यस्त राहावे. आपल्या मुलांना व्यसनाच्या जाळ्यात अडकण्यापासून रोखण्यासाठी मुक्त संवाद, अंमली पदार्थांच्या धोक्यांविषयी शिक्षण आणि घरातील पोषक वातावरण प्रदान करणे आवश्यक आहे.”

इस्लामी विद्वान, मशिदींचे इमाम, सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी आणि प्रसारमाध्यमांनी अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सामाजिक चळवळ सक्रियपणे पुढे नेण्याचे आवाहन मौलाना इलियास फलाही यांनी केले. समाजात जनजागृती आणि प्रबोधन करण्यात इस्लामी विद्वान आणि इमामांची महत्त्वाची भूमिका आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि बुद्धिजीवी यांनी एकत्र येऊन भक्कम सपोर्ट सिस्टीम तयार केली पाहिजे आणि माध्यमांनी या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले पाहिजे आणि सकारात्मक संदेशांना प्रोत्साहन दिले पाहिजे. केवळ अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करीविरोधी आंतरराष्ट्रीय दिनासारखे दिवस पाळणे पुरेसे नाही, यावर त्यांनी भर दिला. मौलाना इलियास खान फलाही म्हणाले, “हा दिवस साजरा करणे महत्वाचे असले तरी आपल्याला सातत्यपूर्ण, ठोस कृतीची गरज आहे. अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात आपण सर्वांनी  एकत्र येऊन एक मजबूत, एकसंध आघाडी उभी केली पाहिजे. सामूहिक, सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच आपण आपल्या समाजातून हा धोका दूर करू शकतो.”



मुंबई
 

‘हमारे बारा’ या इस्लामोफोबिक चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार दि. १३ जून २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाला दिले.

मुस्लिम आणि इस्लामला अत्यंत आक्षेपार्ह असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयानेच परवानगी दिली होती. १४ जूनपासून हा चित्रपट दाखवला जाणार होता.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अजहर बाशा तांबोळी आणि असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स (एपीसीआर) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हा आदेश दिला.

नुकताच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लोकसंख्येच्या स्फोटासाठी मुस्लिम समुदायाची बदनामी करण्यात आली असली तरी या चित्रपटात पुराव्यानिशी हा आरोप कुठेही सिद्ध झालेला नाही. लोकसंख्या वाढीच्या संदर्भात भारत सरकारची आकडेवारी तशी काही सुचवत नाही. या चित्रपटात इतरही गोष्टी आहेत, ज्यावरून इस्लाम आणि त्याच्या अनुयायांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, या चित्रपटात बुरखा घातलेली एक महिला केवळ स्त्रियाच नरकात का जातील असा प्रश्न विचारताना दाखवण्यात आली आहे, हा आरोप कोणत्याही इस्लामी धर्मग्रंथात नमूद केला गेलेला नाही. 

किंबहुना इस्लामचा प्राथमिक स्रोत असलेल्या पवित्र कुरआनसह इस्लामी धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे की, स्त्री-पुरुष नरकात जातील की स्वर्गात जातील, हे त्यांच्या कर्मांवर अवलंबून असेल, इतर काही नाही. त्यामुळे हा चित्रपट मुळात कुरआन आणि हदीसची शिकवण, पैगंबर मोहम्मद (स.) यांची विधाने आणि प्रथा यांचा विपर्यास करणारा आहे, ज्यावरून मुस्लिम आणि इस्लामला बदनाम करण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचे दिसून येते. तरीही मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनाला परवानगी दिली. हा आदेश बहुसंख्य समाजातील कट्टरपंथी घटकांकडून सुरू असलेल्या इस्लामविरोधी कथेला प्रोत्साहन देण्यास प्रोत्साहन देतो.

१३ जून रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवर पाहिला असून तो आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. आज सकाळी आम्ही टीझर पाहिला आहे. त्या सर्व आक्षेपार्ह मजकुराबाबत तसे आहे. हा टीझर युट्युबवर उपलब्ध आहे,’ असे न्यायमूर्ती मेहता यांनी सुनावणीदरम्यान सांगितले.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्यानंतर अझहर बाशा आणि एपीसीआर यांनी हे प्रमाणपत्र रद्द करून चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात आदेश देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित होणार होता.

बाशा यांनी आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, हा चित्रपट इस्लामचा अत्यंत अपमान करणारा आहे आणि मुस्लिम महिलांशी लग्न करतो. कुरआनच्या सूरह बकरह, आयत २२३ च्या चुकीच्या अर्थाच्या आधारे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विवाहित मुस्लिम महिलांना व्यक्ती म्हणून कोणताही स्वतंत्र अधिकार नसल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटाचा संपूर्ण संदेश पवित्र कुरआनात दिलेले महिलांचे अधिकार आणि पैगंबरांच्या विधानांच्या विरोधात आहे.

सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि एखाद्या गुन्ह्याला चिथावणी देण्यापासून रोखण्यासाठी निर्बंध आणि निर्बंधांना परवानगी देणाऱ्या कलम १९ (२) अन्वये यावर बंदी घालण्याची मागणी बाशा यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य निरपेक्ष नसून सार्वजनिक सुव्यवस्था, आरोग्य आणि नैतिकतेच्या अधीन आहे, असे कलम २५ अन्वये बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. हा चित्रपट सिनेमॅटोग्राफिक अॅक्ट १९५२ च्या तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे, असा युक्तिवादही बाशा यांनी केला.

बाशा यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना १४ जूनपर्यंत चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई केली आणि चित्रपट पाहण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करून अहवाल देण्यास सांगितले. समिती आपला अहवाल सादर करू शकली नाही आणि वेळेची मागणी केली असता न्यायालयाने १४ जूनपासून चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आणि चित्रपट निर्मात्यांनी स्वेच्छेने आक्षेपार्ह भाग काढून टाकू, असे उच्च न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर बाशा आणि एपीसीआर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

- शाहजहान मगदुम


डॉ.अदनान : युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राची ’जुवा हटाव देश बचाव’ मोहिम


नागपूर (शोधन प्रतिनिधी)

‘युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र’ (वायएमएम) ही संस्था समाजोपयोगी काम करण्यासाठी सदैव तत्पर असते. युवकांचा सर्वांगीण विकास आणि राष्ट्रासाठी उत्तम नागरिक घडविणे हा या संघटनेचा उद्देश आहे. हा उद्देश समोर ठेवत युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राने ’जुवा हटाव देश बचाव’ ही मोहिम सुरू केली आहे. नागपूर येथे सिव्हिल लाइन्सच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत शहराध्यक्ष डॉ. अदनानुल हक म्हणाले की,  समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक तरुण आहे. देशातील युवक योग्य मार्गावर राहिला तरच देश विकासाच्या मार्गावर पुढे जाईल. तरुण पिढी दिशाहीन झाली तर देश विनाशाच्या मार्गावर जाईल. युवकांना वाममार्ग व जुगारातून बाहेर काढणे ही काळाची गरज आहे. यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक आणि युवकांचे सर्वोतोपरी सहकार्य लाभणे गरजेचे असे अदनान म्हणाले. 

पुढे ते म्हणाले, आजच्या काळात ऑनलाइन जुगार व खेळामुळे तरुणाई दिशाहीन झाली आहे. आपल्या भारत देशात ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार, भारतातील 40% तरुण रम्मी सर्कल, रम्मी ए टू थ्री, ड्रीम इलेव्हन, पबजी, लोडू इत्यादी ऑनलाइन जुगार खेळतात. महाराष्ट्रात ही टक्केवारी 50% आहे. 18 ते 30 वयोगटातील बहुतांश तरुण ऑनलाइन जुगारात गुंतलेले आहेत. दुसऱ्या एका सर्वेक्षणानुसार, भारतातील 18-30 वर्षे वयोगटातील 70% तरुण ऑनलाइन जुगार खेळण्याच्या सवयीमध्ये गुंतलेले आहेत. ऑनलाइन जुगारामुळे युवक आपल्या मौल्यवान वेळेसोबत मानसिक आणि आर्थिक नुकसान करून घेत आहेत. त्यामुळे आपल्या देशात मानसिक सामाजिक आणि आर्थिक समस्या वाढत आहेत. ऑनलाइन जुगाराच्या व्यसनामुळे नैराश्य, चिंता आणि तणावाच्या मानसिक समस्या वाढत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स न्यूरोसिस (छखचक-छड) च्या संशोधनाचा हवाला देत डॉ. अदनान म्हणाले की, या संशोधनात असे आढळून आले आहे की, ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांत आत्महत्या करण्याची प्रवृत्ती जास्त असते. ऑनलाइन जुगारामुळे फक्त काही खेळाडूंना फायदा होतो आणि अनेकांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे कर्जबाजारी होऊन लोक आत्महत्या करतात. उदाहरणार्थ, बंगळुरूमधील एक लहान व्यावसायिक दर्शन बाळूने क्रिकेट सट्टेबाजी पवर 1.5 कोटी रुपये गमावले, त्यानंतर त्याची पत्नी रंजिता व्ही ने 26 मार्च 2024 रोजी आत्महत्या केली. ऑनलाइन जुगारामुळे निद्रानाशाची समस्याही सुरू होते आणि नैतिक ऱ्हासामुळे जुगारी कुटुंब व समाजापासून दुरावत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाइन जुगारात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढत आहे.

आपल्या समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाइन गेम आणि जुगाराच्या विरोधात आणि ते रोखण्यासाठी ‘युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राने’ 7 जून ते 14 जून 2004 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे. ऑनलाईन जुगार हटवा, देशाच्या तरुणांना वाचवा या नावाने हे अभियान साजरे केले जात आहे. या अभियानाखाली सर्व प्रसिद्धी माध्यमांचा वापर केला जात आहे. बॅनर्स, ऑटो बॅनर, स्टिकर्स, हँड बिल हे देखील या मोहिमेचा भाग आहेत. अभियान, पथनाट्य आणि कॉर्नर मीटिंगच्या माध्यमातून तरुणांना ऑनलाइन जुगारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे.  त्यामुळे तरुणांमध्ये जनजागृती झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाकडून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदने देऊन त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कारण तामिळनाडू, आसाम, तेलंगणा आदींसह भारतातील अनेक राज्यांमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून ऑनलाइन गेमवर बंदी घालण्याचा प्रयत्न करू.

पत्रपरिषदेत युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्रचे शहराध्यक्ष डॉ. अदनान यांनी युवकांना आवाहन केले आहे की, या मोहिमेत आम्हाला साथ द्यावी आणि आमच्या समाजातून ऑनलाईन जुगाराचे उच्चाटन करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. या पत्रकार परिषदेला ‘युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र’चे शहर सचिव अब्दुल मतीन, नागपूर पश्चिम अध्यक्ष असीम गाझी उपस्थित होते. 



लातूर प्रतिनिधी

युथ विंग जमाअते इस्लामी हिंद ही संघटना युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 21 वर्षांपासून काम करत आहे. दरवर्षी रक्तदान शिबीरे, उद्योजकता विकास शिबीर, नोकरी मार्गदर्शन कार्यक्रम तसेच विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदविते. युवकांमध्ये नैतिक मुल्य रूजविण्याचेही काम युथ विंग करत आलेली आहे. युथ विंग देशभरात विविध नावाने कार्यरत आहे. मात्र आता युथ विंग एकाच नावाने देशभरात ओळखली जावी यासाठी या संघटनेचे नाव बदलून आता युथ मुव्हमेंट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात हे नाव युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र असे करण्यात आले असल्याची घोषणा जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेश उपाध्यक्ष जमीर काद्री यांनी लातूर येथे आयोजित कार्यक्रमात बुधवार, 29 मे रोजी खोरी गल्ली येथील मकर्ज इस्लामी येथे केली. 

यावेळी युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रफिक शेख, , सचिव मोहम्मद तहेसीन, उपसचिव इम्रान शेख, लातूर जिल्हाध्यक्ष शकील शेख, उस्मानाबाद शहराध्यक्ष सय्यद आसेफ व लातूर शहराध्यक्ष सय्यद अहमेद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास संबोधित करताना काद्री म्हणाले, युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र ही संघटना आता समाजेवा, युवकांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या मध्ये आत्मविश्वास, जबाबदारीचे भान, कुशल नागरिक, अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याचे काम करेल. देशासाठी व समाजासाठी चांगला समाज निर्माण करणे हे युथ मुव्हमेंट महाराष्ट्राचे एक ध्येय असेल. आजचा युवक अनेक समस्यामध्ये गुरफटलेला आहे. यामधून त्यांना बाहेर काढण्याचे आव्हानही ही संघटना पेलणार आहे. या युवकांना चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्वासोबतच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, नैतिक क्षेत्रात सक्षम करणे हे ही युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्राचे ध्येय असेल. महाराष्ट्रात एकात्मता, शांतता, सामाजिक सौहार्द वाढीस लावण्यासाठी ही संघटना प्रयत्नशील राहील, असे जमीर काद्री म्हणाले. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष रफिक शेख म्हणाले, आजचे युवक मोठ्या प्रमाणात वाममार्गाला लागले आहेत. त्यांना या परिस्थितून बाहेर काढण्यासाठी संघटनेमार्फत 7 जून 2024 ते 14 जून 2024 पर्यंत राज्यस्तरावर ’ऑनलाईन जुवा हटाव, देश का युवा बचाव’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी सभा, बैठका घेऊन युवकांना जागृत करण्यात येणार आहे. तसेच या अभियानांतर्गत कायदेशीर आणि सामाजिक बाबींवर सखोल मंथन होईल. यासाठी सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री यांना भेटून सर्व प्रकारच्या जुगारावर बंदी घालण्यासाठी मागणी करण्यात येणार असल्याचेही रफिक शेख म्हणाले.

युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र ही संघटना राज्यात आदर्श युवक घडविण्याचे कार्य करणार आहे. सर्व समाजघटकातील युवकांना घेऊन ही संघटना कार्य करणार असल्याने युवकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहनही रफीक शेख यांनी केले आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमास संबोधित केले. सुत्रसंचालन प्रदेश सचिव मोहम्मद तहेसीन यांनी केले.


गौस शेखने पायाच्या बोटाने बारावीचा पेपर लिहून घेतले 78 टक्के गुण, सर्वत्र कौतुक


लातूर : मंजली उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, परों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. या शेरप्रेमाणे दोन्ही हात नसलेल्या गौस शेख याने पायांच्या बोटांनी पेपर लिहिला अन् बारावीच्या परीक्षेत 78 टक्के गुण मिळविले. ही किमया साधणारा गौस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्याने आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.

लातूर तालुक्यातील वसंतनगर तांडा (महापूर) येथे रेणुकादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून, तिथेच गौस अमजद शेख याने पहिली ते बारावीपर्यंतचे विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे. जन्मत: दोन्ही हात नसलेल्या गौसने जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. कितीही संकटे आली तरी खचून न जाता त्याने मात केली आहे. त्याला आई-वडिलांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले. याच शाळेत गौसचे वडील अमजद शेख हे सेवक म्हणून कार्यरत असून, आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती जेमतेम असतानाही गौसने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. दोन्ही हात नसल्याने त्याने पायांच्या बोटांनी लेखणी धरली आणि पेपर लिहिला.

दिव्यांगांसाठीचा अतिरिक्त वेळही नाकारला

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिव्यांग मुलांसाठी बोर्ड परीक्षेत अतिरिक्त वेळ दिला होता. मात्र, गौस शेख याने पायांच्या बोटांनी पेपर लिहीत असताना अतिरिक्त मिळणारा वेळ नाकारला. इतर विद्यार्थ्यांसोबतच त्याने वेळेत पेपर सोडवत 78 टक्के गुण मिळविले. त्यास चित्रकलेचाही छंद असून, पायाने तो सुंदर चित्रकृती साकारतो. आई-वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच इथपर्यंत आलो आहे. आता स्पर्धा परीक्षेकडे वळणार असून, आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस असल्याने गौस शेख याने सांगितले.

गौस या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून, युवकांसाठी तो प्रेरणादायी व्यक्तीमत्व असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहेत. गौस शेख ने आयएएस होण्याचे जे स्वप्न उराशी बाळगले आहे, ते पूर्ण होवो, अशी कुटुंबीयांची मनिषा असल्याचे गौसच्या आईने सांगितले.


नवी दिल्ली, 13 मे: 

जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष मलिक मोतसीम खान यांनी भारतातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान मुस्लिम आणि उपेक्षित घटकांना लक्ष्य करून ’मतदार दडपशाही’च्या संतापजनक घटनांचा निषेध केला आहे.

प्रसारमाध्यमांना जारी केलेल्या निवेदनात जमातचे उपाध्यक्ष म्हणाले, मीडिया रिपोर्ट्सवरून असे सूचित होते की उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात, किमान चार मुस्लिम बहुल गावांतील लोकांनी तक्रार केली की, राज्य पोलिसांनी मतदान केंद्रांवर विनाकारण लाठीचार्ज केला. परिणामी, फर्रुखाबाद लोकसभा मतदारसंघातील अलिगंज   विधानसभा मतदारसंघात आणि कन्नौज लोकसभा - (उर्वरित पान 7 वर)

 मतदारसंघातील रसुलाबाद विधानसभा मतदारसंघातही शेकडो मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याची धक्कादायक बातमी आहे.

मलिक मोतसीम खान म्हणाले, निरपराध मतदारांवर पोलिसांची ही अनधिकृत कारवाई नागरिकांच्या निवडणूक प्रक्रियेत मुक्तपणे सहभागी होण्याच्या मूलभूत लोकशाही अधिकाराला खीळ घालते. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला, त्याची पार्श्वभूमी किंवा श्रद्धा काहीही असो, त्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आणि बिनधास्तपणे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली पाहिजे. मात्र संभज, कन्नौज येथील घटना एक त्रासदायक प्रवृत्ती दर्शवितात जिथे मुस्लिम आणि इतर उपेक्षित समुदायांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जाते आणि त्यांची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी जमात-ए-इस्लामीने निवडणूक विभागाकडे केली. 

न्यायालयाने दडपशाहीचे सज्ञान घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. भविष्यातील निवडणुकांच्या टप्प्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ सुधारात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही मलिक मोतसीम खान यांनी केली आहे. 



मुंबई (प्रतिनिधी)

मुंबई उच्च न्यायालयाने ’मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस’च्या (एम.पी.जे.) शिक्षणाचा हक्क (आरटीई) संदर्भातील याचिकेवर स्थगिती दिली आहे. हा आदेश शैक्षणिक हक्कासाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बाजूने देण्यात आला आहे. सरकारी शाळांच्या एक किलोमीटर परिघात असलेल्या खासगी शाळांना वंचित मुलांसाठी आर.टी.ई.च्या 25 टक्के आरक्षणाच्या अटीतून वगळण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.

स्थगिती आदेशामुळे या प्रकरणी न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सरकारच्या सवलतीच्या धोरणाची अंमलबजावणी थांबणार आहे. सरकारच्या धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील सध्याची विषमता वाढेल, असा युक्तिवाद करणाऱ्या एम.पी.जे. आणि शिक्षणाच्या समान प्रवेशाच्या वकिलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांनी आपल्या 25 टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ई.डब्ल्यू.एस.) आणि सामाजिकदृष्ट्या वंचित गटातील (एस.डी.जी.) मुलांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र सरकारच्या सवलतीच्या धोरणामुळे सर्वसमावेशक शिक्षणाला चालना देण्याच्या कायद्याचे उद्दिष्ट क्षीण झाले आहे, असा युक्तिवाद करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. एम.पी.जे.चे अध्यक्ष मोहम्मद सिराज म्हणाले की, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे जो सर्व मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायम ठेवतो. आम्हाला आशा आहे की न्यायालय शेवटी आमच्या बाजूने निकाल देईल आणि सर्व मुलांना, त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता, सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षण मिळेल याची खात्री करेल.

यापूर्वी महाराष्ट्र सरकारने आपल्या निर्णयाचा बचाव केला होता. मात्र, या धोरणामुळे द्विस्तरीय शिक्षण व्यवस्था निर्माण होईल, वंचित मुलांना सरकारी शाळांकडे वळवले जाईल, तर श्रीमंत कुटुंबांना चांगल्या साधनसंपत्तीच्या खासगी संस्थांमध्ये प्रवेश मिळेल, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. एम.पी.जे.च्या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, सरकारच्या सवलतीच्या धोरणामुळे आर.टी.ई.ची उद्दिष्टे कमी झाली आणि शिक्षण व्यवस्थेतील सामाजिक विषमता वाढली आहे. 

उच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या आदेशाने किमान अंतरिम काळ तरी हा युक्तिवाद कायम ठेवला आणि महाराष्ट्रात आर.टी.ई.च्या अधिक समन्यायी अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश आर.टी.ई. वकिलांसाठी सकारात्मक असून महाराष्ट्रात अधिक समन्यायी शिक्षण पद्धतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुव्हमेंटर फॉर पीस अँड जस्टीस या संघटनेने राईट टू फूड यावरही मोठे आंदोलन करून, न्यायालयात भूमिका मांडून गोरगरीबांना राशनचा अधिकार मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच आज मोठ्या प्रमाणात नागरिकांना राशन भेटत आहे. राईट टू हेल्थ असे अभियानही एमपीजेने राबविले आहे. या माध्यमातून राज्यभरातील नागरिकांना शासकीय दवाखान्यातील योजनांची माहिती दिली गेलीे. व त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी एमपीजेचा पुढाकार सतत सुरू असतो. 


जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई महिला विभागातर्फे जुम्मा मस्जिद, क्रॉफर्ड मार्केट येथे ‘ईद मिलन’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!


मुंबई (प्रतिनिधी) 

“मस्जिद हे ईश्वराच्या उपासनेचे केंद्र आहे जिथे सर्व श्रद्धावंत, मग ते मालक असोत किंवा नोकर असोत, एकत्र येतात. कोणातही भेदभाव उरत नाही. राहत नाही,” असे उद्गार क्रॉफर्ड मार्केट जुमा मस्जिदचे मुफ्ती अशफाक यांनी जुमा मशिदीच्या इतिहासावर थोडक्यात प्रकाश टाकताना काढले.

‘ईद मिलन’निमित्त जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई महिला विभागातर्फे शनिवारी, ४ मे २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जुम्मा मस्जिद, क्रॉफर्ड मार्केट येथे देशबांधवांसाठी आणि सर्वसामान्य भगिनींसाठी ‘मस्जिद परिचय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी मुफ्ती अशफाक बोलत होते. मुफ्ती अशफाक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिलांना मस्जिदीच्या आतील सर्व भाग (जलाशय व आजूबाजूचा अभ्यंग हॉल, प्रार्थना क्षेत्र, ग्रंथालय, कौटुंबिक समुपदेशन केंद्र इ.) दाखविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात रेहाना देशमुख म्हणाल्या, “मस्जिदींबाबत बंधू-भगिनींच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आणि सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरणात हृदयात प्रेमाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी एकमेकांचा आदर करणे, परस्पर संबंध दृढ करणे, एकमेकांच्या भावना समजून घेणे आणि समजावून सांगणे, या उद्देशाने मस्जिद परिचयचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.”

मस्जिद परिचयनंतर जमाअत ए इस्लामी हिंद महिला विभाग मुंबईच्या मध्य विभाग सचिव डॉ. फरीदा अख्तर यांनी उपस्थित भगिनींसमोर नमाज पठणाची संपूर्ण पद्धत सादर केली आणि सांगितले की, “नमाज आपल्याला समजूतदारपणा, आदर आणि धैर्यावर आधारित समुदाय तयार करण्यास एकत्रितपणे शिकवते.” त्यांनी प्रार्थनेत उच्चारलेला ‘सूरह फातिहा’चा अरबी मजकूरच नव्हे तर त्याचे उर्दू भाषांतरही समजावून सांगितले. लाऊडस्पीकरवर दिल्या जाणाऱ्या अजानबाबतचा गैरसमज दूर करताना त्या म्हणाल्या, “ही अजान ईश्वरला नव्हे तर भाविकांना नमाज पठण करण्यास बोलावण्यासाठी दिली जाते.” नतमस्तक होण्याच्या आणि प्रणाम करण्याच्या स्थितीबद्दल बोलतानात्या म्हणाल्या, “डॉक्टर या अवस्थेबद्दल म्हणतात की, जर कोणी दिवसातून पाच वेळा स्वतःला या स्थितीत ठेवेल तर त्याचा मेंदू चांगले कार्य करतो.”

शेवटी मुंबई मेट्रोच्या प्रमुख मुमताज नजीर यांनी सर्व उपस्थित सर्वधर्मिय भगिनींचे आभार मानले आणि म्हणाल्या की, “ईद मिलन हे घृणास्पद वातावरण संपविण्याचे निमित्त आहे. एकमेकांना ओळखणं हेच आमचं एकमेव ध्येय आहे आणि त्यासाठी आपण एकमेकांच्या जवळ यायला हवं.” 

सुरिंदर कौर म्हणाल्या, “मी यापूर्वी अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. त्याचप्रमाणे आपण एकमेकांना मोकळ्या मनाने भेटून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.”

अलका नाईक म्हणाल्या, “आपल्या तरुण पिढीसाठी असे कार्यक्रम व्हायला हवेत. हे आपण अजूनही समजून घेतो. पण या तरुणांमध्ये खूप पूर्वग्रह निर्माण झाला आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे ब्रेनवॉश करून हा पूर्वग्रह दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.”

उपस्थित सर्वधर्मिय भगिनी मशिदीने प्रभावित झाल्या आणि म्हणाल्या, अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही पहिलीच संधी आहे. आमच्यासाठी हा खूप चांगला अनुभव होता.

या मशिदीत ३० मुस्लिमेतर भगिनी उपस्थित होत्या आणि जवळपास ४५ मुस्लिम भगिनींचाही या कार्यक्रमात सहभाग होता. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भगिनींना जेवणाची पाकिटे देण्यात आली.



- नजराना दर्वेश (गोवा)

जमाअत-ए-इस्लामी हिंद, गोवा तर्फे अनुक्रमे १८, १९, २० आणि २४ एप्रिल २०२४ रोजी सांवोर्डेम, मडगाव, पणजी आणि म्हापुसा यासह राज्यातील विविध ठिकाणी ईद मिलन कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या कार्यक्रमांना हजेरी लावत त्यांच्या अंतर्दृष्टी आणि अमूल्य विचारांनी उपस्थितांना समृद्ध केले.

आदरणीय वक्त्यांमध्ये डॉ. प्रज्ञा काकोडकर, प्रदीप काकोडकर (चार्टर्ड अकाउंटंट), बिलाल अहमद शेख (प्रोप्रायटर, बिल कोचिंग कर्चोरम), फादर अॅशलिफ कोरिया (साहाय्यक पॅरीश पाद्री, गार्डियन एंजल चर्च, सांवोर्डेम), चिन्मय मिशनच्या स्वामिनी गोपिका नंदा सरस्वती, रोझरी चर्च नावेलिमचे फादर गॅब्रिएल कौटिन्हो, जेआयएचचे संचालक मौलाना इक्बाल मुल्ला, रेव्ह. संदेश प्रभुदेसाई, पत्रकार व लेखक आसिफ हुसेन, जेआयएच गोवा प्रदेशाध्यक्ष, पिलर सेमिनरीचे फादर पीटर मेलो फर्नांडिस आणि जेआयएचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सलीम इंजिनीअर उपस्थित होते.

सचिव समीउल्ला बेलवाडी, अब्दुल रहमान खान आणि मीनाज बानो यांनी प्रास्ताविकात जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या गेल्या ७७ वर्षांतील स्तुत्य कार्यांवर प्रकाश टाकला. विशेषत: मणिपूर हिंसाचार आणि कोविड-१९ महामारीसारख्या संकटाच्या काळात सामाजिक उन्नतीसाठी संघटनेच्या सक्रिय भूमिकेवर त्यांनी भर दिला. याशिवाय, फोरम फॉर डेमोक्रेसी अँड कम्युनिटी एलोसिटी आणि सद्भावना मंच यासारख्या विविध उपक्रमांद्वारे सामाजिक न्याय, मानवी हक्कांचे समर्थन आणि सांप्रदायिक सलोखा वाढविण्यासाठी जेआयएचची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली.

संदेश प्रभुदेसाई यांनी ‘द्वेष’साठी कोंकणी शब्द नसल्याची आठवण करून दिली, तर ‘मोग’ आणि ‘माया’सारखे ‘प्रेम’ या शब्दासाठी अनेक शब्द असल्याचे सांगितले. ‘द्वेष’ या शब्दाची अनुपस्थिती गोव्यातील लोकांमध्ये अंतर्निहित ऐक्य आणि द्वेषाचा अभाव दर्शविते. हे ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम सामायिक समस्या सोडविण्यासाठी एकत्र आल्याच्या ऐतिहासिक उदाहरणांवरून दिसून येते, असे त्यांनी सुचवले. प्रभुदेसाई यांनी आजच्या विभाजनकारी काळात एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि ‘गोकर्पण’ (गोव्याची अस्मिता) जपण्याची गरज अधोरेखित केली आणि समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी गोव्याच्या नागरिकांना ऐतिहासिक ऐक्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

आसिफ हुसेन यांनी मानवाची एकता ही एकमेव ईश्वराची निर्मिती आहे, यावर भर दिला आणि फुटीरतावादी आख्यानांचे अनुसरण करण्याऐवजी शांतता, सौहार्द आणि बंधुतेसाठी सर्व पैगंबरांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रज्ञा काकोडकर यांनी सामुदायिक परस्परावलंबित्वाची उदाहरणे सादर करून इतरांचे जीवन समृद्ध करण्यात प्रत्येक समाजाची अविभाज्य भूमिका असल्याचे सांगितले. प्रदीप काकोडकर यांनी भारताची अस्मिता समृद्ध करण्यासाठी ‘ईद मिलन’सारख्या कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि एकता जपण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. फादर अॅशलिफ कोरिया यांनी बायबलच्या प्रेरणेने सर्व समुदायांमध्ये एकतेवर भर दिला आणि अधिक सर्वसमावेशक समाजासाठी बंधुभाव वाढविण्याचे आवाहन केले. फादर गॅब्रिएल कौटिन्हो यांनी शिक्षणात प्रगती होऊनही गुन्हेगारी वाढत असल्याची खंत व्यक्त केली आणि शिक्षण आणि अध्यात्म यांच्यातील संबंध अधोरेखित केले. स्वामिनी गोपिका नंदा सरस्वती यांनी धर्माच्या एकात्मतेवर भर दिला. फादर व्हिक्टर फेरराव यांनी सामूहिक संवाद आणि ज्ञानप्रसाराच्या माध्यमातून विभाजनवादी शक्तींचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले. फादर पीटर यांनी प्रार्थना, उपवास आणि दान यावर लक्ष केंद्रित करून आध्यात्मिक उन्नती जोपासण्यासाठी धार्मिक परंपरांमधून शिकण्यावर भर दिला. 

सलीम इंजिनिअर यांनी करुणेच्या सार्वत्रिक संदेशावर भर देत आजच्या जगात प्रेमाने आणि सामंजस्याने जगण्याची प्रासंगिकता विशद केली. मौलाना इक्बाल मुल्ला यांनी ईद उत्सव आणि सहजीवनाविषयी इस्लामी दृष्टिकोनाची माहिती दिली. बिलाल शेख यांनी ईश्वरभान बळकट करण्यासाठी आणि मुस्लिम जीवन सुधारण्यासाठी रमजानचे महत्त्व अधोरेखित केले.

मान्यवर वक्त्यांनी सर्वसमावेशकता, परस्पर आदर आणि विविधतेचा उत्सव साजरा करण्याचा संदेश आपल्या भाषणातून दिला, ज्यात ईद मिलन सोहळ्याची व्याख्या करणारी एकता आणि परस्पर सन्मानाची भावना दर्शविली गेली. असे आंतरधर्मीय संवाद आपल्या वैविध्यपूर्ण समाजात समजूतदारपणा, सौहार्द आणि सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण मंच म्हणून काम करत असल्याचे मनोगत त्यांनी या वेळी व्यक्त केले.


 


कल्याण -

(मलिक अकबर यांजकडून)

रविवार दि. ३१ मार्च २०२४ रोजी फलाह-ए-आम सोसायटी कल्याण तर्फे रहेजा हाऊसिंग सोसायटी येथे मुस्लिमेतर बंधूभगिनींसाठी इफ्तारचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ५-४५ वा. असीम फाळके यांच्या कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मोईन डोन यांनी ट्रस्टतर्फे चालवण्यात आलेल्या वी केअर डायग्नॉस्टिक सेंटरच्या सुविधांवर थोडक्यात प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की आमच्या सेंटरमध्ये अल्प दरात अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. तसेच सेंटरमध्ये आधुनिक जागतिक दर्जाची उपकरणे आहेत. त्यांचे रिपोर्ट्सवर अनेक लहान-मोठे हॉस्पिटल्सकडून ग्राह्य धरले जातात. तसेच वी केअरमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स बसतात, त्यांची फी नाममात्र आहे.

यानंतर ट्रस्टकडून अस्पा मध्ये चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिकेचा मिशल चौधरी यांनी परिचय करून दिला.

पवित्र रमजानमधील रोजा इफ्तार कार्यक्रमासाठी आमंत्रित जळगाव जमाअत ए इस्लामी हिंदचे अमीर सोहेल यांनी रोजा इफ्तारच्या २५ मिनिट अगोदर आपल्या मृदू शैलीत भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की रमजानमध्ये मी दररोज माझ्या घरी माझ्या कुटुंबासोबत रोजा इफ्तार करतो, पण आज मी माझ्या मोठ्या परिवारासोबत रोजा इफ्तार करत आहे. कारण पवित्र कुरआननुसार आपण एकाच मातापित्याची संतान असून या कारणाने आपण सर्व भारतवर्षातील नागरिक हे भाऊ-बहीण आहोत. म्हणून आपल्याबरोबर रोजा इफ्तारचा मला मोठा आनंद होत आहे. अजून आनंदाची ही बाब आहे की रहेजा सोसायटीमध्ये अनेक विचारधारा, संप्रदाय व जातीचे लोक गुण्यागोविदाने राहतात आणि आपल्या समोर मला रोजामागचे तत्त्वज्ञान मांडण्याचा अवसर प्राप्त झाला आहे. पवित्र कुरआनमधील सूरह बकरा, आयत नं. १८३ मध्ये अल्लाहने रोजाचे उद्दिष्ट सांगितले आहे. त्यात असे म्हटले आहे की रोजाद्वारे अल्लाह आपल्या हृदयात ईशभय निर्माण करू इच्छितो. रोजा ५-१० वर्षांचे मूलही ठेवते. ते स्वयंपाकघरात जाऊन काही खाऊ शकते किंवा फ्रिजमधून थंडगार कोल्ड्रिंक पिऊ शकते. पण ते तसे करत नाही. त्याला अल्लाहचे भय असते. त्याला हे माहीत असते की मला आई-वडील पाहत नाहीत. पण माझा अल्लाह तर पाहत आहे आणि ते आपला हात माग घेतो. ज्याच्यासाठी मी रोजा ठेवला आहे तो तर मला २४ तास पाहत आहे. त्याच्या मनात ईशभय निर्माण होते. हाच उद्देश रोजाचा आहे की मला कुणी बघत नाही पण माझा अल्लाह तर बघतच आहे.

आजही आपल्या देशात उपाशीपोटी राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अएनेक राज्यांत गरिबांची परिस्थिती फार हलाखिची आहे. मला ओरिसा राज्यात जाण्याचा योग आला. तिथे झोपडपट्टीमध्ये राहणारे अनेक अशी कुटुंबे आहेत जी १५० ते २०० रुपयांसाठी पोटच्या संतानाला विकून टाकतात. कारण त्यांचे पोट भरण्याकरिता त्यांच्याकडे अन्न नाहे. ह्या अशा गरिबांची अवस्था व भुकेच्या वेदनांचा अंदाज आपल्याला ड्रायफ्रूट खाऊउन किंवा कोल्ड्रिंक पिऊन येणार नाही. रोजा आपल्याला भुकेची व तहानेची जाणीव करून देतो.

रमजानचे एक वैशिष्ट्य हे आहे की या महिन्यात कुरआन अवतरित झाले आहे. त्यात संपूर्ण जाती व मानवांसाठी शांतीचा संदेश आहे. हा ग्रंथ सगळ्यांचा आहे. या आधुनिक जगात कुरआनचे भाषांतर सहज उपलब्ध आहे. जर आपण इच्छुक असाल तर आयोजक तुम्हाला कुरआनचे भाषांतर देऊ शकतात.

सोहेल अमीर यांनी शेवटी सांगितले की ही आपल्या देशाची सुंदरता आहे की इथे अनेक भाषा बोलणारे, अनेक धर्माचे लोक मिळूनमिसळून राहतात. आपल्या या रहेजा सोसायटीमध्येही वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक राहतात आणि आज आपण एकत्र रोजा इफ्तार करणार आहोत. जर असे कार्यक्रम सतत होत राहिले तर आम्ही उज्ज्वल भारताकडे वाटचाल करू. याचे सुंदर चित्र इथे दिसत आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आज जसे आम्ही खांद्याला खांदा लावून बसलो आहोत, अल्लाह आपल्याला स्वर्गातही एकत्र करो, आमीन.

अरफा फरीद यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहील यांनी उत्तमरित्या पार पाडले. यानंतर सर्वांनी एकत्र बसून रोजा इफ्तार केला. इफ्तारनंतर या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.


सर्वसमावेशक शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी


मुंबई (शोधन प्रतिनिधी)

21 मार्च रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) या विद्यार्थी संघटनेने भारतातील शिक्षण, अल्पसंख्याक आणि सामाजिक कल्याण यांना प्रभावित करणाऱ्या गंभीर समस्यांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या जाहीरनाम्याचे अनावरण केले.  यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. रोशन मोहिद्दीन आणि एस. आई. ओ. अध्यक्ष साऊथ महाराष्ट्र ऐहतेशाम हामी खान आणि सेक्रेटरी मुसद्दीक यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि जाहीरनाम्यातील मुद्द्यांचे विश्लेषण केले.

या जाहीरनाम्यामध्ये सकल विद्यार्थी समुदायाच्या अशा मागण्यांचा समावेश आहे ज्यांना एसआयओ 2024 च्या संसदीय निवडणुकीत मुख्य मुद्दे बनवू इच्छिते.  विद्यार्थ्यांचा जाहीरनामा खालील क्षेत्रांवर प्रकाश टाकतो:

1.न्याय्य आरक्षण: सर्वांना संधी सुनिश्चित करण्यासाठी योग्य आणि न्याय्य आरक्षण प्रणाली लागू करणे.

2.सामाजिक- आर्थिक मागास जिल्ह्यांकडे विशेष लक्ष: समतोल विकासासाठी उपेक्षित प्रदेशांच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित करणे.

3.रोहित कायद्याची अंमलबजावणी:  विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे.

4. MANF  पुनःस्थापित करा आणि अल्पसंख्याकांसाठी शिष्यवृत्ती वाढवा. शिक्षणाच्या समान प्रवेशासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.

5. भेदभाव विरोधी कायदा: भेदभाव आणि पक्षपात मुक्त समाजासाठी प्रयत्न करणे.

6. कठोर वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा आणि      

7.गोपनीयता चार्टर : व्यक्तींची गोपनीयता आणि माहिती सुरक्षित करणे.

8.पर्यावरण आणि शाश्वत निधी - 1000 कोटी : पर्यावरणीय उपक्रम आणि शाश्वत पद्धतींसाठी समर्पित करणे. 

9.संपूर्ण भारतातील तरुणांसाठी आरोग्य आणि मानसिक आरोग्य केंद्रे : तरुणांच्या सर्वांगीण कल्याणाला प्राधान्य देणे. 

10.प्राथमिक ते विद्यापीठ स्तरापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुनिश्चित करणे: सर्वांसाठी सुलभ शिक्षणाची वचनबद्धता. 

11.तरुणांसाठी रोजगार हमी कायदा: देशातील तरुणांसाठी नोकरीची सुरक्षितता आणि संधींचा मार्ग मोकळा करणे. आदी प्रमुख मागण्यांचा जाहीरनाम्यामध्ये समावेश आहे. 

या पत्रकार परिषदेत, डखज चे प्रतिनिधि भारताच्या शैक्षणिक परिदृश्यातील चिंताजनक ट्रेंडबद्दल बोलताना म्हणाले की, एकूण साक्षरता दर 74.04% असूनही तो जागतिक सरासरी 86.3% च्या खाली आहे, अनेक राज्यांचे साक्षरता दर राष्ट्रीय पातळीपेक्षा कमी आहेत.

केंद्राने धार्मिक अल्पसंख्याकांसाठीच्या महत्त्वाच्या शैक्षणिक योजना बंद केल्या, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यक्रमांवरील खर्च कमी केले आणि अर्थसंकल्पातील शैक्षणिक वाटा जीडीपीच्या 2.9% पर्यंत कमी केले जो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 द्वारे निर्धारित 6% दरापेक्षा खूप कमी आहे. याबद्दल राष्ट्रीय सचिव डॉ. रोशन मोहिद्दीन यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी भारताच्या ॠऊझ वाटपाच्या 2.1% आणि जपान, कॅनडा आणि फ्रान्स सारख्या देशांमधील अंदाजे 10% वाटप यामधील स्पष्ट फरकाकडे लक्ष वेधले.

बेरोजगारी ही सध्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे.  संसदेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की 1 मार्च 2023 पर्यंत मंत्रालयांमध्ये सुमारे 10 लाख पदे रिक्त आहेत.  मात्र, विद्यापीठे आणि मंत्रालयांमधील रिक्त पदे भरण्याबाबत सरकार गंभीर नाही.  चाचण्या आणि निवड प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुस्लीम विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गळतीचे भयावह प्रमाणाला संबोधित करताना, डॉ. रोशन मोहिद्दीन यांनी यावर जोर दिला की वस्तुनिष्ठ अभ्यास संस्थेने मुस्लिम विद्यार्थ्यांच्या गळती दर 23.1% इतका नोंदवला, जो राष्ट्रीय सरासरी 18.96% पेक्षा जास्त आहे.  मुस्लिम विद्यार्थ्यांचा प्रवेश दर 2019-20 मध्ये 5.5% वरून 2020-21 शैक्षणिक वर्षात 4.6% पर्यंत घसरला.  व्ही-डेम संस्थेने तयार केलेल्या शैक्षणिक स्वातंत्र्य निर्देशांकात 179 देशांमध्ये भारताच्या तळाच्या 30% मधील स्थानाचा उल्लेख करत डॉ. रोशनने शैक्षणिक स्वातंत्र्याच्या ऱ्हासावरही प्रकाश टाकला. त्यांनी मानसिक आरोग्याच्या संकटावरही गंभीर चिंता व्यक्त केली. 15 ते 30 वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आत्महत्त्या असल्याचा राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालात समोर आले आहे. दर 42 मिनिटांनी सरासरी 34 विद्यार्थी आपला जीव घेतात. अम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ऊजढज डेटाबेसचा हवाला देऊन, द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये होणाऱ्या वाढीकडे लक्ष वेधले, जीवांचे रक्षण करण्यासाठी आणि धार्मिक भेदभावाचा सामना करण्यासाठी त्वरित लक्ष देण्याची विनंती केली.

विद्यार्थी आणि तरुण हा या देशातील सर्वात मोठा मतदारवर्ग असून राजकीय पक्षांनी मते मागताना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची हमी दिली पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.  ते पुढे म्हणाले की, हा जाहीरनामा राजकीय पक्षांना देशाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगत आहे. 

भारतीय विद्यार्थी आणि तरुण पोकळ आश्वासने किंवा फुटीरतावादी राजकीय अजेंडांमुळे विचलित होणार नाहीत त्याऐवजी ते दर्जेदार शिक्षण, रोजगार, शांतता आणि सुरक्षित वातावरणाची हमी देणाऱ्या ठोस निवडणूक जाहीरनाम्यांची जोरदार मागणी करतात.



मुंबई
 

महाराष्ट्रातील जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी प्रसारमध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू शक्ती दलाचे प्रमुख सिमरन गुप्ता यांनी ख्वाजा मोईन अजमेरी यांच्याबद्दल उद्धटपणे केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांच्याविरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र पोलिसांकडे केली आहे. कारवाईबरोबरच, सरकारनेही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.

मौलाना फलाही म्हणाले की, मुस्लिमांच्या आदरणीय व्यक्तींबद्दल अपमानास्पद भाषणे व टिप्पण्या हे देशात रोजचेच काम झाले आहे. या सरकारच्या काळात, देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष अशा प्रकारे जोपासला गेला आहे की आपल्या पवित्र व्यक्तिमत्त्वांबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि अपमानास्पद शब्द ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने किंवा ती नाममात्र होत असल्याने देशात अशा घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी अजमेरमधील हिंदू शक्ती दल नावाच्या जहाल संघटनेचा प्रमुख सिमरन गुप्ता याने बेतालपणाच्या सर्व मर्यादा मोडून मोईनुद्दीन अजमेरी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून आपला द्वेष व्यक्त करत, अजमेरची दर्गा आणि तेथील मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली. अशा घृणास्पद व अपमानास्पद वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो व पोलीस प्रशासनाकडे मागणी करतो की समाजात धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या अशा जहाल संघटने विरुद्ध एफआय नोंदवावा आणि कडक कारवाई करावी.

पुणे एपीसीआरचे स्थानिक अधिकारी अन्वर बागबान, जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे जनसंपर्क कार्यकारी शोएब असीम आणि इतरांनी या द्वेषपूर्ण विधानाविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार केली  परंतु पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्ती अभय ठिपसे म्हणाले की, पुणे पोलिसांनी एफआयआर न नोंदवणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी एफआयआर नोंदवावा व दाखवून द्यावे की राज्यात द्वेषयुक्त भाषण किंवा विधाने खपवून घेतली जाणार नाहीत.

जमात-ए-इस्लामी हिंदकडून घटनेचा निषेध : आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, देशाची प्रतीमा मलीन करण्याचा प्रकार


नवी दिल्ली (शोधन सेवा)

गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात परदेशी विद्यार्थ्यांवर 16 मार्च रोजी झालेल्या हल्ल्याचा जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष प्रोफेसर सलीम इंजिनियर यांनी निषेध केला आहे. प्रसारमाध्यमांना जारी केलेल्या निवेदनात जमातचे उपाध्यक्ष म्हणाले, गुजरात विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शनिवारी रात्री झालेल्या धक्कादायक घटनेचा जमात तीव्र शब्दात निषेध करते, ज्यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या गटावर नमाज पठण करताना क्रूरपणे हल्ला करण्यात आला. पाच विद्यार्थी जखमी झाले त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करावे लागले. नमाजाच्या वेळी काही बाहेरच्या लोकांनी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले, त्यानंतर दगडफेक आणि तोडफोड केली. 

पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसल्यानेे आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय, गुन्हेगारांना विद्यापीठ कॅम्पसमध्ये जाळपोळ करताना पोलिसांनी रोखले कसे नाही.. पोलिसांच्या निष्क्रियतेचीही चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकांना कायद्याची भीती का नाही, हे कॅम्पसमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांच्या निष्क्रियतेवरून दिसून येते.

प्राध्यापक सलीम म्हणाले, हे निंदनीय कृत्य, ज्यामध्ये परदेशी विद्यार्थ्यांवर धार्मिक कृत्यांसाठी हल्ले केले गेले, हे आपल्या देशाने स्वीकारलेल्या सहिष्णुता आणि बहुलवादाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. अशा घटनांमुळे केवळ निष्पाप विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात येत नाही तर बदनामीही होते. या हिंसाचारातील गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून दंडित करावे शिवाय, यात सहभागी असलेल्या सर्वांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या कृत्यांसाठी त्यांना जबाबदार धरून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही सलीम इंजिनियर यांनी केली. गुजरात पोलिसांनी या संदर्भात आपले प्रयत्न गतीमान करणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे, त्यांचे राष्ट्रीयत्व किंवा धर्म विचारात न घेता, या घटनेकडे एकाकीपणाने पाहिले जाऊ नये. वर्षानुवर्षे विकसित झालेल्या द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या वातावरणाचा हा परिणाम आहे. भारतातील मुस्लीम समाजाच्या विरोधात मुस्लिमांवरील लक्ष्यित हिंसाचार सामान्य झाला आहे. जोपर्यंत या द्वेषाच्या वातावरणाला संवैधानिक मार्गाने रोखले जात नाही; तोपर्यंत आपण अशा जातीय घटनांच्या मुळाशी जाण्यास सक्षम होणार नाही. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेची मूल्ये जोपासणे आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृतीशील उपाययोजना करणे ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी असल्याचे सलीम इंजिनियर म्हणाले.


गेली 25 वर्षे रमजान महिन्यासाठी किरण सरनाईक देत आहेत विनामोबदला वापरण्यास जागा: हिंदू-मुस्लिम एकोप्याची वीण करताहेत घट्ट

सरनाईक कुटुंबीय करतात रमजान ईदच्या नमाज पठनासह पार्किंगची सोय



कोल्हापूर प्रतिनिधी

एकीकडे किरकोळ कारणावरून जातीपातींमध्ये निर्माण होणारे तेढ, हिंदू-मुस्लिम मधील ऐक्याला तडा जाईल अशा पद्धतीच्या घटना घडत असताना कोल्हापुरातील राजोपाध्येनगर येथील बिडी कॉलनीत किरण पांडुरंग सरनाईक (रा. शिवाजी पेठ) व बिडी कॉलनीतील मदिना मस्जिद सुन्नत जमाअत यांनी सामाजिक सलोख्याची वीण घट्ट करण्याचा अनोखा संदेश संपूर्ण राज्यात दिला आहे. गेली 25 वर्षे पावित्र रमजान महिन्यासाठी ईदची नमाज पठन, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्कींग व मुस्लिम बांधवांच्या विविध धार्मिक कार्यक्रमासाठी महिनाभर विना मोबदला जागा वापरण्यास देऊन किरण सरनाईक यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली आहे.

हृदयापासून समानतेची व सर्वधर्मसमभावाची जाण असेल तर जातीभेद न मानता एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती मनात निर्माण होते. पवित्र रमजान महिन्यासाठी मुस्लिम बांधवांना जागा वापरण्यास देऊन किरण सरनाईक व कुटुंबीयांनी हिंदू-मुस्लिम एकोप्याची हीच वृत्ती जागृत ठेवण्याचा संदेश दिला आहे.

राजोपाध्येनगर येथील बिडी कामगार वसाहतमधील मस्जिदीं शेजारीच सरनाईक यांच्या मालकीची जागा आहे. दरवर्षी रमजान महिन्यात ही जागा स्वच्छ करून मुस्लिम बांधवांसाठी याचा वापर केला जातो. अनेक वर्षापासून रमजानमध्ये नमाज पठनासाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांची वाहने पार्कींग केली जातात. रमजानसह बकरी ईदची नमाजही याच जागेवर पठन करण्यात येते. विश्वशांती व सामाजिक एकोपा टिकून रहावा, यासाठी मुस्लिम समाजातील बांधवांकडून दुवा केली जाते. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमही याठिकाणी पार पडतात.

हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याचे नाते दृढ... 

बिडी कॉलनी सुन्नत जमाअतच्या वतीने प्रत्येक रमजान महिन्यात किरण सरनाईक व कुटुंबियांचा विशेष सत्कार केला जातो. शीरखुर्माने तोंड गोड करून आपुलकीच्या नात्यातील प्रेमाचा गोडवा वृध्दींगत केला जातो. अगदी आपुलकीने घरगुती पद्धतीने केलेल्या या सत्कारावेळी भावनिक वातावरणाने सारेच हरळून जातात व सर्वांच्या डोळ्यांच्या कडाही आपसुकच पाणावल्या जातात. यातून ’हिंदू-मुस्लिम भाईचाऱ्याचे नाते अधिक दृढ होत असुन संपुर्ण राज्याने आदर्श घ्यावा, असे सरनाईक कुटुंबीयांचे कार्य घडत आहे., बिडी कॉलनी इमदाद कमिटीच्यावतीने सर्वधर्मसमभाव जोपासत विधवा, गरजु, गरीब कुटूंबांना दत्तक घेऊन महिन्याचे राशन दिले जाते. यामध्ये साखर चहापुडसह महिनाभर पुरेल इतके साहित्य दिले जाते. जातीपातीच्या भिंती भेदून गरजूंना औषधोपचार, शैक्षणिक खर्चासाठी जमाअतकडून आर्थिक मदतही केली जाते. दहा वर्षापुर्वी चिमुकल्या ऋग्वेदच्या औषधोपचारासाठी लोकवर्गणीतून लाखोंची मदत जमा करून ’हिंदू-मुस्लिम एकतेची परंपरा जपली आहे. संपूर्ण राज्यात राजर्षी शाहूंच्या नगरीतील हा उपक्रम आदर्शवत ठरला आहे.


लातूर (प्रतिनिधी)

स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता देशात टिकून राहण्यासाठी सज्जनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जर सज्जन पुढाकार घेत नसतील तर हे देशासाठी सर्वाधिक घातक असल्याचे मत सद्भावना मंच महाराष्ट्राचे प्रमुख डॉ. रफिक पारनेरकर यांनी येथे व्यक्त केले. 

लातूर येथील जमाअते इस्लामी हिंद कार्यालयात शुक्रवारी लातूर शहरातील सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पारनेरकर बोलत होते. मंचावर प्रा सुभाष भिगे, प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा विजयकुमार शिंदे, रामराजे अत्राम, डॉ. अशोक नारनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. रफिक पारनेकर म्हणाले, आपल्या देशाचे वैशिष्ट्ये अनेकतेत एकता आहे. हे वैशिष्ट्ये जगातील एकमेव आहे. परस्पर प्रेम व सदभावना आणखीन वृद्धींगत 

करण्याच्या उदात्त हेतुने सर्वधर्मीय बांधवासह सद्भावना मंच लातूरची स्थापना करण्यात येत आहे. कुरआनमध्ये ईश्वराने समस्त मानवजातीला उद्देशून म्हटले आहे, ‘हे लोकहो ! आम्ही तुम्हाला एकच पुरूष आणि एकाच स्त्री पासुन निर्माण केलेले आहे. मग तुमच्या बिरादऱ्या व कबिले बनवीले.’ अर्थात समस्त मानवजात एकाच माता-पित्याची संतान आहे. ही पवित्र कुरआनची ठाम भूमिका आहे. महाराष्ट्रातील महान संत तुकाराम महाराज म्हणतात की,’अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्न-भिन्न.  आधुनिक विज्ञानाची सुद्धा हीच भूमिका आहे. 

समस्त मानवजातीत रक्ताचे नाते असल्याचे विज्ञानानेही सिध्द केले आहे. म्हणूनच तर आपण रक्तदान, नेत्रदान, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रांन्सप्लांट इ. अवयांचे प्रत्यारोपण करतो व ते कोणालाही जीवदान देते. अर्थात समाजात जो भेदाभेद दिसतो ते थोतांड आहे. म्हणूनच संत तुकोबारायांनी सांगितले, भेदाभेद भ्रम अमंगल. आपल्या देशाला सद्भावनेचा महान वारसा लाभला असल्याचे डॉ. रफिक पारनेकर म्हणाले. यावेळी डॉ. सुभाष भिंगे म्हणाले, सद्भावना मंचची स्थापना ही गरजेची आहे. जमाअते इस्लामी हिंद ने उचलले हे पाऊल वाखाण्या जोगे आहे. हर्षवर्धन कोल्हापुरे म्हणाले, आजची देशातील परिस्थिती पाहता सद्भावनेसाठी पुढे येणे जिकरीचे बनले आहे. समाजातील संवेदनशील आणि एकतेला प्रोत्साहन देणाऱ्यांनी या मंचमध्ये सामील होणे आणि देशातील अखंडता कायम ठेवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. रामराजे अत्राम, विजयकुमार शिंदे यांनीही राज्यभरात सद्भावना मंचची उभारणी होण्यासाठी आमचे सहकार्य असल्याचे सांगितले. 

यावेळी प्रा. घार, नरसिंग घोडके, प्रा. नरसिंगे, श्रीहरी कांबळे, रणजित जाधव, फादर सुभान रकटे सतिश यादव, उस्मान गुरूजी, सौदागर आदींसह शैक्षणिक, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. प्रास्ताविक जमाअते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष आरीफ सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन अ.रहेमान सय्यद यांनी केले. आभार एम.आय.शेख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  जमात इस्लामी हिंद लातुर शहरच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



मुंबई (अर्शद खान)

शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेश प्रक्रियेतील शासनाने केलेल्या अलीकडील सुधारणांबद्दल चिंता व्यक्त करीत जमाअते इस्लामी हिंदचे (जेआयएच) प्रदेशाध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही म्हणाले की महाराष्ट्र सरकारने आरटीईत केलेली दुरुस्ती अन्यायकारक आहे, कारण ती कलम 12(1) च्या तरतुदीविरुद्ध आहे. आरटीई कायदा सर्व मुलांसाठी समानता आणि समान संधी प्राप्त करून देणारा आहे. तसेच 25 टक्के जागा वंचित पार्श्वभूमीतील मुलांसाठी (6-14 वर्षे वयोगटातील) राखीव आहेत. याची खात्री करून शैक्षणिक असमानतेच्या समस्येचे निराकरण करण्याचे या कलमाचे उद्दिष्ट आहे. या कलमात दुरुस्ती केल्याने खाजगी शाळा यापुढे गरीब मुलांना प्रवेश देण्यास बांधील राहणार नाहीत. राज्यातील उपेक्षित घटकातील मुलांच्या पालकांनी त्यांच्या निवासस्थानापासून 1 किमीच्या आत सरकारी/सरकारी अनुदानित शाळांमध्येच प्रवेश द्यावा लागेल. जरी त्या दर्जेदार नसल्या तरी नवीन तरतुदींमुळे वंचित विद्यार्थ्यांना आसपासच्या चांगल्या खाजगी शाळेत प्रवेश घेता येणार नाही.

जेआयएच प्रदेशाध्यक्ष मौलाना फलाही यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व मुलांसाठी शैक्षणिक समानता आणि न्यायीक भूमिकेने वागणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे.

आरटीई कायद्यातील मुलभूत तत्वांना दुरूस्तीमुळे धक्का लागला आहे. आरटीई कायदा 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार देतो. मात्र नवीन दुरूस्ती वंचित मुलांना पर्यायी शैक्षणिक वातावरण निवडण्याची संधी नाकारते. जरी ती स्पष्टपणे चांगल्या गुणवत्तेची ऑफर देते किंवा त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करत असली तरी अपुर्या पायाभूत सुविधा, शिक्षकांची कमतरता अशा विविध कारणांमुळे वंचित मुलांना सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. मौलाना इलियास खान फलाही म्हणाले, आरटीई नियमांमधील अलीकडील सुधारणा त्वरित मागे घेण्यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाची पार्श्वभूमी किंवा स्थान काहीही असो त्याला दर्जेदार शिक्षण मिळायला हवे.  

शासनाने  सर्वसमावेशक आणि समान शैक्षणिक धोरणे विकसित करण्यासाठी पालक, शिक्षक, नागरी समाज आणि संघटनांसह पारदर्शकपणे चर्चा करावी. पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सरकारने सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी प्रगतीशील शैक्षणिक धोरण अवलंबविणे ही काळाची गरज असल्याचेही मौलाना इलियास खान फलाही म्हणाले.



 - नजराना दरवेश, गोवा

जमाअत-ए-इस्लामी हिंद, गोवा यांनी देशात वाढत्या धार्मिक तणावांसदर्भात नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष प्रा. मुहम्मद सलीम इंजिनियर आणि जमाअत-ए-इस्लामी हिंद गोवा चे अध्यक्ष आसिफ हुसेन ह्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

प्रा. सलीम इंजिनीयर आपल्या भाषणात म्हणाले की भारत आपल्या सांस्कृतिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. जेथे विविध धर्माचे लोक भिन्न आचार आणि विचार पद्धतीसह एकत्र राहतात. विविध श्रद्धा आणि विरोधाभासी जीवनशैली असलेल्या ह्या लोकांनी मिळून भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशाच्या स्वातंत्रासाठी त्यांनी एकमेकांबरोबर दृढ विश्वास आणि आदर दाखविला आणि हातात हात घालून ते सर्व एकत्र लढले. ही गोष्ट ह्या देशाला विशिष्ट बनवते.

सामाजिक विसंगती आणि जातीय हिंसाचारात वाढ होण्यास काही बाबी कारणीभूत आहेत. द्वेष आणि विभाजन घडवून आणण्यात काही पक्षांचा वाढता प्रभाव धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत. हे राजकीय पक्ष किंवा राजकारणी लोक देशाच्या खऱ्या मुद्यांपासून किंवा आवश्यक असलेल्या गंभीर समस्यांपासून लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांना शुल्लक मुद्द्यांवर आपापसात लढवण्यासाठी बाध्य करत आहेत आणि ह्या त्यांच्या अजेंड्यासाठी धर्माचा आधार घेतला जात आहे. हे सर्व विशेषत: निवडणुकीच्या वेळी घडते. 

जमाअत-ए-इस्लामी हिंद लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना समजाविते की धर्म हा एकमेकांमध्ये झगडण्याचा विषय नाही आहे. लोकांमध्ये विभागणी निर्माण करण्यासाठी आणि एकमेकांमध्ये भांडणे लावून देशाच्या विविधतेचे सौंदर्य दूषित करण्यासाठी धर्माचा उपयोग केला जातो. त्यामुळे लोकांना आणि धार्मिक नेत्यांना या समस्येबाबत शिक्षित व जागृत करण्याच्या उद्देशाने आमच्या संस्थेने हा पुढाकार घेतला असल्याचे प्रा. सलीम इंजिनीयर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की राजकीय फायदा मिळवण्यासाठी धर्माचा गैरवापर करू नये, हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यात आणि एकमेकांबरोबर शांततेत आणि सुसंवादाने जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यात धर्मगुरू महत्त्वाची भूमिका बजावतात, हा संदेश देण्यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद कार्यरत आहे.

प्रा. सलीम इजिनीयर पुढे म्हणाले की बंधुभावाने एकत्र काम करणे आणि फूट पाडणाऱ्या अशा प्रचाराला बळी न पडता एकमेकांचा आदर करणे हा भारताच्या लोकांमध्ये द्वेष आणि गैरसमज नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे. धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे. द्वेष आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून आपली दिशाभूल करून न घेता प्रत्येक व्यक्तीने शांतता वाढवण्यासाठी आणि एकमेकांचा आदर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget