Halloween Costume ideas 2015
Articles by "ramazan"


रमजान, इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना, ज्या महिन्यात जगभरातील मुस्लिम पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. ते खाण्या-पिण्यापासून दूर राहतात. संपूर्ण महिना सत्कार्य सद्वर्तन व सुसहवासात घालवतात. आपल्या शरीराबरोबरच आत्म्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जाते. साऱ्या मुस्लिम जगतात फार मोठे बदल या महिन्यात पाहायला मिळते. आध्यात्मिकतेकडे कल वाढलेला दिसतो. रमजानवर माहितीचे अनेक खंड उपलब्ध आहेत. पवित्र क़ुरआन व हदीस म्हणजेच पैगंबर वचन या आशीर्वादित महिन्याबद्दल काय म्हणते ते अधोरेखित करण्याचा या लेखचा उद्देश आहे. 

मुस्लिम उपवास का करतात?

अल्लाह (ईश्वर) क़ुरआनमध्ये म्हणतो : हे श्रद्धाधारकांनो! तुमच्यावरती उपवास अनिवार्य केले आहे जसे तुमच्या पूर्वींच्या लोकांवरती अनिवार्य होते, जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल. (क़ुरआन,अल-बकारा:183) 

या श्लोकात पवित्र क़ुरआन हे स्पष्ट करते की सर्व मुस्लिमांसाठी उपवास अनिवार्य आहे. उपवासाची ही पद्धत फक्त तुमच्याकरिताच नाही तर तुमच्या पूर्वी जितके मानवी समूह या पृथ्वीतलावर होऊन गेले, प्रत्येक मानवी समूहात हा उपवास होता. याचाच परिणाम आपण आजही पाहतो की विश्वातील जवळपास सर्व धर्मांत उपवासाची पद्धत आहे. त्यात कालानुरूप काही बदल व परिवर्तनही घडलेले आहेत. क़ुरआन त्या मूळ उपवासाची आठवण या रमजान महिन्यात करून देतो.

या उपवासाकरिता पवित्र क़ुरआनमध्ये सियाम असा शब्द आला आहे. याचा अर्थ थांबणे, रोखणे व दूर राहणे असा होतो. उर्दू भाषेत यालाच रोजा असे म्हणतात. रोजाची व्याख्या अशी आहे. पहाटे सूर्योदयापूर्वी दोन तासांपासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाणे, न पिणे व पती-पत्नीत समागम न होणे म्हणजे रोजा. आपल्याकडे उपवास किंवा रोजा म्हटल्यानंतर फक्त काहीही न खाणे अथवा न पिणे इतकाच छोटासा अर्थ घेतला जातो. हा रोजा व उपवास फक्त शरीरातील एक अवयव पोटाचा झाला. या ठिकाणी रोजा म्हणजे फक्त पोटाचा नसून, शरीराच्या प्रत्येक अवयवांचा रोजा आहे. डोळ्याने वाईट पाहू नये हा डोळ्याचा रोजा, मन व बुद्धीत मलीन विचार आणू नये हा मन व बुद्धीचा रोजा. खोटे बोलू नये, निंदा नालस्ती, तिरस्कार करू नये हा जिभेचा रोजा. निंदानालस्ती, चहाडखोरी, खोटेपणा ऐकू नये हा कानाचा रोजा. हातापायांना दुर्गुणांपासून दूर ठेवणे हा हातापायांचा रोजा. एकंदरीत रोजा हा शरीराच्या प्रत्येक अवयवांचा रोजा आहे. पैगंबर मुहम्मद(स.) यांनी त्यांच्या काळात निंदा करणाऱ्या व ऐकणाऱ्या व्यक्तींचा रोजा तुटला म्हणून रमजान महिन्यानंतर पुन्हा एकदा ते धारण करण्यास सांगितले. 

आज समाजात लोक सर्रासपणे खोटे बोलतात. निंदा, चहाडखोरी, तिरस्कार करतात. मनात मलीन विचार आणतात. परस्त्रीला वासनेच्या दृष्टीने पाहतात. या सर्व दुर्गुणांवर जालीम उपाय जर कोणता असेल तर रोजा आहे. या रोजाचा मुख्य उद्देश पवित्र क़ुरआनने स्पष्ट करताना म्हटले आहे की, यामुळे तुमच्या ईशपरायणता निर्माण व्हावी. ईशपरायणता म्हणजे साऱ्या सृष्टीचा निर्माता, पालनहार त्याच्याविषयी आपल्या मनातील भीती व प्रेम. त्याच्या प्रेमापोटी सत्कार्य करत रहावे व भीतीपोटी दुष्कृत्यांपासून दूर राहावे. यालाच ईशपरायनता म्हटले आहे. ही ईशपरायणता प्राप्त करण्यासाठीच रमजान महिन्यात रोजी ठेवणे अनिवार्य आहे. 

...पण उपवास करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर. 

(क़ुरआन,अल-बक़रा:184) 

मन शुद्धी बरोबरच शरीरशुद्धीकरिताही रोजाचे महत्त्व कमी नाही. आज विज्ञान आणि वैद्यकशास्त्राने वर्षातून एक महिना उपवास करण्याचे आरोग्य आमच्या दृष्टीने असंख्य फायद्यांची पुष्टी केली आहे. पोट साफ करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. त्याशिवाय मेंदूसाठी अनेक आरोग्य फायदे आहेत. 

रशियन शास्त्रज्ञ यूरी निकोलाइएव व टेक्सास येथील डॉ. ऐलन कॉट यांच्यानुसार पूर्ण महिन्याचे रोजे पाळल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते, पोटात विषाक्त तत्त्वे असतील तर त्यांचा निचरा होतो, प्रतिकार शक्तीत वाढ होते, बौद्धिक शक्तीचाही विकास होतो. डॉक्टर सांगतात की, सर्वसामान्य दिवसांत आहारामुळे आमाशय निरंतर सक्रीय असते, परंतु रोजा ठेवला असताना त्याला आराम मिळतो. काही लोकांचं असंही म्हणणे आहे की, रोजामुळे अशक्तपणा येतो. हा गैरसमज आहे. पाणी कमी प्याल्यामुळे असे होत असले तरीही रोजा सोडल्यानंतर भरपूर पाणी प्याले, तर सगळं काही सामान्य होऊन जातं. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले की, पूर्ण रमजान महिन्यात रोजे ठेवल्याने माणसाचा आहार पूर्णपणे संतुलित होऊन जातो. जॉर्डनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात निष्पन्न झालं की, रमजान महिन्यात दारू व धुम्रपानसारखी व्यसने सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. असे उपक्रम आता आशिया व आफ्रिकेत प्रामुख्याने राबवण्याचा प्रघात आहे.  

पवित्र कुरआन रमजानमध्ये प्रकट झाले:

रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे. (अल-बकारा 2:185) 

पवित्र महिन्याचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे पवित्र क़ुरआन या महिन्यात प्रेषित मुहम्मद (स.) वर अवतरित झाले. रमजान इतर अकरा महिन्यासारखाच एक महिना आहे. या महिन्याला इतके मोठे श्रेष्ठत्व प्राप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे या महिन्यात साऱ्या सृष्टीच्या पालनकर्त्याकडून विश्वातील सकल मानवजातीकरिता त्यांच्या कल्याणाचा, सफलतेचा मार्ग दाखविणारा वैश्विक ईशग्रंथ पवित्र क़ुरआन याच महिन्यात अवतरीत झाला. रमजानचे हे महात्म्य केवळ आणि केवळ पवित्र क़ुरआनमुळेच आहे. पवित्र क़ुरआन जीवन कसे जगावे याचे दैवी मार्गदर्शन असलेला हा ग्रंथ मानवजातीसाठी एक अमूल्य ठेवा आहे. मानव या ईश्वरी ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वीतलावरील मानवाची उत्पत्ती, पहिले मानवी जोडपे, मानवी इतिहास, ईश्वरी आज्ञेनुसार जीवन जगणारा यशस्वी समूह. अवज्ञा करणारा अयशस्वी समूह. यशस्वीतेचा योग्य मार्ग, नियोजित वेळेनुसार भविष्यात होणारा प्रलय, प्रलयादिवशी विश्वातील प्रत्येक मानवाच्या प्रत्येक कर्माचा होणारा हिशोब, ईश आज्ञेनुसार जीवन जगून नेहमीकरिता आनंदी राहणारा समूह व नेहमीकरिता दुःख व ग्लानीत खिचपत पडून राहणारा समूह या सर्वांचे वर्णन पवित्र क़ुरआनमध्ये आढळते. याशिवाय मानवाचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन तसेच भूगोल, विज्ञान, इतिहास व खगोलशास्त्र या सर्व ज्ञानशाखांवर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ आहे. वरील सर्व विषयाव्यतिरिक्त पवित्र क़ुरआनच्या मूळ शिकवणी पुढीलप्रमाणे आहेत.

1. विश्वबंधुत्व: 

लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वांत जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्व काही जाणणारा आणि खबर राखणारा आहे. (क़ुरआन, सूरह अल हुजरात:13) 

पवित्र क़ुरआन हे स्पष्ट करते की विश्वातील सर्व मानव आपापसात बंधू व भगिनी आहेत. ह. आदम व ह. हव्वा (अ.) हे विश्वातील पहिले मानवी जोडपे आहे. आज विश्वात जितके मानव आहेत आणि पुढे येतील त्या सर्वांचे मूळ हे मानवी जोडपे आहे. सकल मानवजातीचे मूळ आजोबा आणि आजी हे मानवी जोडपे आहे. आज विज्ञानाने ही सिद्ध केले आहे की कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीचा रक्त दुसऱ्या जाती-धर्माच्या व्यक्तीला चालतो. मानवी समूह भाषा, संस्कृती व राष्ट्राच्या नावाने आज विभाजित होऊन मानव मानवाचा तिरस्कार करीत आहे. पवित्र क़ुरआन हे आठवण करून देतो की, हे मानवा तुमचे आपापसात रक्ताचे नाते आहे. विश्वातील सकल मानव एकमेकांचे बांधव आहेत. विश्वबंधुत्व ही क़ुरआनची मूळ शिकवण आहे. 

2. एकेश्वरत्व:

साऱ्या सृष्टीचा निर्माता, रचयिता, शासक, पालक,मालक, धनी व स्वामी हा फक्त एक आणि एकच ईश्वर आहे. ही मूळ एकेश्वरत्वाची संकल्पना क़ुरआन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे एका शाळेचे दोन मुख्याध्यापक, एका राज्याचे दोन मुख्यमंत्री व एका देशाचे दोन प्रधानमंत्री असू शकत नाहीत, तद्वतच एवढ्या मोठ्या सृष्टीचे एकापेक्षा जास्त ईश्वर कसे असू शकतील? सद्सतविवेक बुद्धीला पटणारी ही बाब नव्हे. ईश्वर एकच आहे. त्याला जाणलं पाहिजे. त्याचं मानलं पाहिजे. यातच आपले कल्याण आहे, ही भावना क़ुरआन स्पष्ट करतो. पवित्र क़ुरआन एका ईश्वराचा परिचय करताना म्हणतो, अल्लाह एक आहे. तो स्वयंभू आहे. ती कोणाचीही संतती नाही आणि त्याचीही कोणी संतती नाही. त्यासमान कोणीही नाही (क़ुरआन, सूरह इख़लिस 1-7)

संत तुकोबारायांनीही आपल्या अभंगात म्हटले आहे, आपूला तो एकची देव करुनी घ्यावा, तेनेविना जीवा सुख नसे. 

3. प्रेषितत्त्व:

ईश्वराने पृथ्वीतलावर मानवाला निर्माण करून सोडून दिले नाही तर, मानवाने जीवन कसे जगावे याबाबतीत स्वतः आचरण करून मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी आपले दूत पाठवले. हेच दूत प्रेषित, संदेशवाहक किंवा पैगंबर म्हणून ओळखले जातात. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वचनानुसार मानवी समूहाच्या व्युत्पत्तीपासून ते आजतागायत जवळपास एक लाख चोवीस हजार संदेश वाहक विश्वातील प्रत्येक भागात येऊन गेले. प्रत्येकानी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला. या प्रेषित श्रृंखलेतील अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) आहेत. पृथ्वीच्या अंतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक मानवाचे प्रेषित मुहम्मद (स.) आहेत. याच प्रेषितांबद्दल पवित्र क़ुरआनमध्ये ईश्वर म्हणतो, हे पैगंबर मुहम्मद (स.) आम्ही तुम्हाला सर्व मानवजातीकरिता कृपा बनवून पाठविले आहे. आजही पैगंबर चरित्र व त्यांच्या शिकवणी सकल मानवांकरिता पूर्णपणे सुरक्षित व उपलब्ध आहेत. 

4. मरणोत्तर जीवन:

ही पवित्र क़ुरआनच्या मूळ शिकवणीपैकी एक महत्त्वाची श्रद्धा आहे. मानवी जीवन दोन भागात विभाजित केलेले आहे. एक इहलोकीय जीवन व दुसरे परलोकीय जीवन. इहलोकीय जीवन अशाश्वत आहे. परलोकीय जीवन शाश्वत आहे. इहलोकीय जीवन कर्म करण्यासाठी आहे आणि परलोकीय जीवन कर्माच्या मोबदल्या करिता आहे. इहलोकीय जीवनात केल्या जाणाऱ्या प्रत्येक कर्माचा जाब परलोकीय जीवनात द्यावा लागेल व त्याचे फळही भोगावे लागेल. एकंदरीत मरणोत्तर जीवनाची ही संकल्पना मानवात उत्तरदायित्वाची भावना रुजविते. प्रत्येक कर्म करताना मनुष्य विचार करतो की मला कोणी पाहो अथवा न पाहो, माझा निर्माता तरी पाहत आहे आणि उद्या त्याच्याशी गाठ आहे. ही भावना मानवाला सत्कृत्य करण्यासाठी परावृत्त करते व दुष्कर्मापासून दूर ठेवते.

याच विश्वासाला संत तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात,  तुका म्हणे काळी लावीयेले माप, जमा करी पाप पुण्याची.वरील चार श्रद्धा अंगीकारून जीवन जगणारा व्यक्ती इहलोकीय व परलोकीय दोन्ही जीवनात पूर्णपणे यशस्वी होतो अशी ग्वाही पवित्र क़ुरआन देतो. 

पवित्र क़ुरआनची वैशिष्ट्ये

पवित्र क़ुरआन सकल मानवजातीच्या कल्यानाचा मैग्नाकार्टा आहे. पृथ्वी, सूर्य, चंद्र, हवा, पाणी, प्रकाश, अन्न, वृक्ष, सृष्टी जसे सर्वांर्करिता आहेत तसेच पवित्र क़ुरआनही सर्वांकरिता आहे. साऱ्या सृष्टीचा निर्माता अल्लाह ईश्वर तसाच क़ुरआनचाही निर्माताही तोच. विश्वातील प्रत्येक मानवाचा त्यावर अधिकार आहे. प्रत्येकाने त्याला जाणले व मानले पाहिजे. हा प्रत्येकांचा हक्क आहे. 

क़ुरआनची वैशिष्ट्ये:

क़ुरआनची अनेक वैशिष्ट्ये आहेत. याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे हा विश्वातील अंतिम व सुरक्षित ईश्वरी ग्रंथ आहे. याअगोदर अनेक ईशग्रंथ अवतरित झाले. काळानुरूप त्यात परिवर्तन झाले किंवा घडवण्यात आले. मूळ रूपात मूळ शिकवणी सुरक्षित राहिल्या नाहीत. पवित्र कुरआनचा इतिहास चौदाशे पन्नास वर्षांपूर्वीचा आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ते अवतरीत झाले. एवढा मोठा कालावधी लोटूनही, आजही हा पूर्णपणे सुरक्षित आहे. यात काना, मात्रा, वेलांटीचाही फरक आढळणार नाही. पृथ्वीच्या अंतापर्यंत हा पूर्णपणे सुरक्षित राहील याची शाश्वती स्वतः याचा निर्माता अल्लाह ईश्वराने दिलेली आहे. 

याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा सकल मानवजातीकरिता आहे. यात मानव केंद्रस्थानी आहे. लोकांनो लोकहो असे संबोधन वारंवार आलेले आहे. सकल मानव जातीला उद्देशून पवित्र क़ुरआनमध्ये सृष्टिनिर्माता बोलतो.

साऱ्या विश्वात सर्वांत जास्त पठण केला जाणारा हा एकमेव ईशग्रंथ आहे. मुस्लिम बांधव सहसा दररोज याचे वाचन करतात. रमजानच्या महिन्यात पूर्णपणे वेळ काढून वाचन करत असतात. याशिवाय दिवसातून पाच वेळा नमाज पठण करत असताना त्यात पवित्र क़ुरआनचे वाचन अनिवार्य आहे.

हा जिवंत भाषेतील जिवंत ग्रंथ आहे. विश्वातील अनेक देशात अरबी भाषा बोलली व वापरली जाते. पवित्र क़ुरआन मूळ अरबी भाषेत आहे. आपल्या भारत देशातील विविध मदरशात व घरोघरी मुस्लिम बांधव ही भाषा शिकत असतात. 

पूर्णपणे मुखोद्गत केला जाणारा हा विश्वातील एकमेव ग्रंथ आहे. पवित्र क़ुरआनचे एकूण 30 खंड, 114 अध्याय व 6236 श्लोक आहेत. एवढा मोठा ग्रंथ पूर्णपणे मुखोद्गत केला जातो. मुखोद्गत करणाऱ्या व्यक्तीला हाफीज़ क़ुरआन म्हणतात. साऱ्या विश्वात हा ग्रंथ मुखोद्गत करणारे लाखोंच्या संख्येने आहेत.

मानवी समूहाला आवाहन करणारा हा ग्रंथ आहे. अल्लाह या ग्रंथात आवाहन करत म्हणतो की, तुम्ही या ग्रंथातील कृतीसारखी एक किंवा दोन श्लोक बनवून दाखवा? आज पर्यंत कोणीही अशी कृती बनवू शकली नाही.

आपल्या इलोकीय व परलोकीय जीवनाची सफलता दाखवणारी एवढी महान कृती पवित्र क़ुरआनच्या स्वरूपात मिळाल्याबद्दल त्या सृष्टीनिर्मात्याचे आभार व्यक्त करण्यासाठी विश्वातील सर्व मुस्लिम बांधव या रमजानच्या महिन्यात रोजे धारण करतात. सृष्टी निर्मात्याचे आभार व्यक्त करण्याची ही सर्वोत्तम पद्धती आहे. पवित्र क़ुरआन जसे सर्वांकरिता आहे, तेव्हा प्रत्येक मानवाने याबाबतीत विचार केला पाहिजे की, मी कमीत कमी एकदा तरी त्याचे वाचन करावे. माझ्या निर्मात्याने माझ्यासाठी काय उपदेश दिला आहे, हे जाणण्याची उत्सुकताही प्रत्येकात हवी.

आज विश्वातील प्रत्येक भाषेत पवित्र क़ुरआनचे भाषांतर उपलब्ध आहे. मी वाचकांना अतिशय नम्रपणे, अंतर्मनाने विनंती करतो की, कृपया - कृपया थोडा वेळ काढून आपल्या भाषेत या ग्रंथाचे वाचन करावे. उद्या आपल्या निर्मात्यासमोर प्रत्येकाला हजर व्हायचे आहे. आज ही संधी आपणाकडे आहे आपण या संधीचे सोनं करून घ्यावे. पुन्हा विनंती.


- अब्दुल मुजीब, उदगीर

9421378600



‘‘रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले मानव जातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी...’’(दिव्यकुरान 2:185)

रमजान एक पवित्र महिना आहे .रमजान आणि कुरआन संपूर्ण मानवजातीसाठी अल्लाहचा एक वरदान आहे. मानवाने जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन कुरआनात आहे. हा इशग्रंथ सत्य आणि असत्याची कसोटी आहे. मुस्लिम समुदाय रमजान महिन्याला पवित्र मानतो याचे मुख्य कारण असे की या महिन्यामध्ये कुरआन प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांचेवर अवतरीत झाला. अल्लाहने प्रेषितांवर हा कुरआन 23 वर्षात थोडे थोडे करून अवतरित केलेला आहे .हा कुरआन ईशवाणी आहे. याचे लेखक मुहम्मद पैगंबर (सल्ल.) नाहीत. अल्लाहने प्रेषितांची श्रृंखला बंद केलेली आहे. या भूतलावर आता कोणतेच प्रेषित येणार नाहीत. प्रेषित मुहम्मद(स. अ) हे अल्लाहचे अंतिम पैगंबर आहेत. आता कोणतेच दुसरे ग्रंथ किंवा मार्गदर्शक अल्लाहकडून येणार नाहीत. म्हणून संपूर्ण मानवजातीचा मार्गदर्शक फक्त आणि फक्त कुरआन आहे. म्हणून कुरआनचे रक्षण होणे गरजेचे होते. कुरआन सुरक्षित राहिला  पाहिजे याची जबाबदारी अल्लाहने स्वतः घेतलेली आहे. कुरआनमध्ये कुणी फेरफार करू शकत नाही कमी किंवा जास्त करू शकत नाही. अल्लाह कुरआनमध्ये घोषित करतो की, ‘‘उरले हे स्मरण (कुरआन) तर हे आम्ही अवतरले आहे आणि आम्ही स्वतः याचे संरक्षक आहोत.’’(15:9)

प्रेषितांवर कुरआन अवतरीत झाल्यापासून आज पर्यंत म्हणजेच 1445 वर्षांत कुरआन तसाच आहे जसा प्रेषितांच्या काळात होता. याचा पुरावा कुरआनचे विरोधक देखील देतात. फिलीप के हट्टी जे कुरआनचे कट्टर विरोधक मानले जातात ते कुरआनबद्दल आपले विचार असे प्रकट करतात की, ’’आधुनिक टीकाकार या गोष्टींवर सहमती दर्शवितात की सध्याच्या कुरआनच्या प्रती ठीक त्याच कुरआनच्या प्रती एकरुप  आहेत ज्याला झैद बिन हारीसने(रजी.) स्वतः आपल्या हातांनी लिहिले होते आणि हे की आजचा कुरआन तोच कुरआन आहे ज्याला प्रेषित मुहम्मद (स.) सादर केले होते’’. जैद बिन हारिस(रजी.) कातीब (कुरआन लिहिणारे) होते जेव्हा अल्लाहकडून प्रेषितांवर कुरआन अवतरीत व्हायचा तेव्हा प्रेषितांच्या सहमतीने ते कुरआनच्या आयातींना लिहून ठेवायचे. पॅरिसची एक संस्था आहे ज्याने कुरआनच्या 42 हजार प्रति जगभरातील विविध प्रांत व राष्ट्रांतून जमा केल्या आणि त्यावर बारकाईने अभ्यास केला तर त्यांना थोड्याफार व्याकरणाच्या चुकांव्यतिरिक्त कोणत्याच चुका आढळल्या नाहीत.

आठव्या शतकात एक यहुदी होता. तो काळ खलीफा मामून रशीद चा होता त्या यहुदीला शुद्ध लेखनावर प्रभुत्व होते त्याने बायबलमध्ये फेरफार करून बायबलच्या काही प्रति शुद्धलेखनाने स्वतः लिहिले आणि एका चर्चेमध्ये  त्या प्रती घेऊन गेला तिथल्या पादरींनी  लिहिलेले ते ग्रंथ स्वीकारले. याच प्रकारे तौरातदेखील लिहिला, लोकांनी त्या प्रती स्वीकारल्या. आता त्याने कुरआनच्या काही प्रती फेरफार करून स्वतः सुलेखनातून लिहिल्या व त्या प्रती त्याने काही मुसलमानांना दिल्या त्या लोकांनी जेव्हा त्या प्रतींचे वाचन केले तर त्यांना त्याच्यात बऱ्याच चुका आढळल्या तर त्या मुसलमानांनी त्या प्रती फेकून दिल्या. सांगायचे तात्पर्य असे की कुरआनात फेरबदल किंवा फेरफार झालेली नाही याचे पुरावे कुरआनचे विरोधक कट्टर विरोधक देखील देतात.

कुरआन सुरक्षित आहे कारण की,

1. अल्लाहने कुरआनचे संरक्षण करण्याचे वचन कुरानात दिलेले आहे. 

2. कुरआन अरबी भाषेत अवतारित झालेला आहेत आणि अरबी भाषा जशी आज बोलली लिहिली वाचली आणि समजली जाते त्याच तऱ्हेने जेव्हा कुरआन प्रेषितांवर अवतरित झाला होता बोलली लिहिली वाचली आणि समजली जायची. याच्या विपरीत इतर भाषांमध्ये काळानुसार बदल होत असतो. हजार वर्षात भाषेत बदल होत असतो याचे पुरावे आहेत. आज जशी उर्दू बोलली लिहिली  जाते पूर्वी तशी वाचली बोलली  जात नसे. अरबी भाषेबद्दल असं नाही अरबी भाषा प्रेषित मुहम्मद (स.) च्या काळात जशी होती तशीच आज आहे हा ईश्वराचा एक आविष्कार आहे.

3. कुरआनचे हाफीज (कुरआन स्मरण करणारे) प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळातही होते आणि आज देखील संपूर्ण विश्वात लाखोंच्या संख्येने असे हाफीज आहेत ज्यांना कुरआन तोंडपाठ आहे. जगातील इतर कोणत्या ग्रंथाला हा बहुमान प्राप्त नाही की ज्याला लाखोंच्या संख्येने  मुखोद्गत करणारे आहेत.

4. दरवर्षी मदरशांमधून कुरआनचे विद्यार्थी लाखोंच्या संख्येने कुरआन मुखोद्गत करतात. असे विद्यार्थी देखील आहेत जे पाच ते दहा वयोगटातील आहेत आणि कुरआनला स्मरण करून टाकतात.

5. रमजानमध्ये लाखो हाफीज तरावीहच्या नमाजमध्ये कुरआनची तिलावत करतात.

6. मकतबमध्ये कोटींच्या संख्येत असे विद्यार्थी शिक्षण घेत असतात जे कुरआनला तोंडपाठ करण्याचे प्रयत्न करतात व काही प्रमाणात यशस्वी देखील होतात.

7. दिवसात पाच वेळा नमाज अदा केली जाते नमाजात देखील कोटींच्या संख्येने श्रद्धावंत कुरआनचे पठण करतात.

8. किरात (कुरआनच्या सुवाचना) च्या स्पर्धा जगभरात आयोजित  केल्या जातात. ज्यामध्ये कित्येक  हाफीज कुरआनचे तोंडी पठण करतात. 

9. धार्मिक कार्यक्रमात श्रद्धावंत कुरआनच्या पठनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करतात.

10. जगात कित्येक वेबसाईट्स अशा आहेत ज्यामध्ये कुरआन सुरक्षित सेव्ह केलेला आहे याचा वापर करणारे कोटींच्या संख्येत आहेत. 

           यावरून असे सिद्ध होते की कुरआन हा ईशग्रंथ आहे. सुरक्षित आहे. त्याच्यात तिळमात्र बदल झालेला नाही आणि कुणी कुरआनात फेरफार करू शकत नाही. कुरआनवर श्रद्धा बाळगणारे या जीवनात आणि मरणोत्तर जीवनात देखील यशस्वी होणार आहेत. कुरआनाची सुरक्षितता आणि रमजानची पवित्रता संपूर्ण मानवजातीला आवाहन करते की सर्वांनी कुरआनला गांभीर्याने घ्यावे. जीवनात एकदा तरी संपूर्ण कुरआन समजून वाचावे. हे माहीत करून घ्यावे की कुरआनची शिकवण काय आहे. तर चला असे संकल्प घेऊ की या पवित्र रमजान महिन्यात कुरआनचे पठण निश्चितच करू. अल्लाह आम्हा सर्वांना कुरआनचे महत्त्व समजण्यास मदत करो हीच अल्लाह दरबारी प्रार्थना करतो.


- आसिफ खान, 

धामणगाव बढे

9405932295



इस्लामी दिनदर्शिकेच्या नवव्या महिन्याला रमजानुल मुबारक म्हणजे बरकतचा महिना म्हणतात. बरकत या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, म्हणजे भरभराट, समृध्दी, सुपीकता, सुपरिणाम, कोणत्याही कामात व व्यवहारात कल्पनेपेक्षा अधिक प्राप्ती किंवा फायदा इत्यादी. या सर्व अर्थांनी रमजानचा महिना मोठ्या बरकतीचा महिना आहे कारण या महिन्यात अल्लाहच्या बरसणाऱ्या कृपांना मर्यादा नाही. सदाचरणाचे शुभ परिणाम, अनेक पटीने मिळणारे पुण्य, बक्षिसांचा वर्षाव, क्षमायाचना व प्रायश्चित्तावर मिळणारी माफी, अशा अनेक उपलब्धींमुळे हा महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यातील प्रत्येक क्षण खजिन्याप्रमाणे आहे. या पवित्र महिन्यात कोणकोणते यश दडलेले आहेत हे लोकांना कळले असते तर त्यांनी इच्छा केली असती की संपूर्ण वर्ष या महिन्याप्रमाणेच जावे. 

प्रश्न पडतो की रमजानमध्ये प्राप्त होणाऱ्या या सर्व कृपा कशामुळे आहेत? याबाबतीत पवित्र कुरआन आपल्याला सांगतो की, शह्-रु रमजानल्लजी उन्जि-ल फीहिल्-कुरआनु हुदल्-लिन्नासि व बय्यिनातिम्-मिनल-हुदा वल्-फुरकानि

अनुवाद :- रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले, मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी (2 अल्-बकरह-185)

रमजानची शुभकारिता आणि त्यातील सर्व कृपांचे एकमेव कारण म्हणजे अल्लाहने या महिन्यात पवित्र कुरआन अवतरित केले. या आयतीमध्ये कुरआनच्या तीन विशेष गुणांचे वर्णन करण्यात आले आहे.

मानवजातीसाठी मार्गदर्शन :

कुरआनचे एक वैशिष्ट्य ’अल-हुदा’ म्हणजे मार्गदर्शन आहे. हा शब्द ज्या अनेक अर्थांनी वापरला जातो, कुरआन त्या सर्व अर्थांनी मार्गदर्शक ग्रंथ आहे.

हा ग्रंथ शिष्टाचार शिकवतो. उपासनेच्या पद्धती समजावून सांगतो. कौटुंबिक व सामाजिक जीवनात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करतो. या ग्रंथात अर्थशास्त्र व राजकारणाची तत्त्वे आहेत. स्वतंत्र, निर्भीड व निष्पक्ष न्याय व्यवस्था स्थापन करून कायम ठेवण्याची तत्वे आहेत. उत्तम जीवन जगण्यासाठी मोलाचे उपदेश आहेत. याबरोबर विविध समुदायांंच्या प्रगतीचा व विनाशाचा इतिहास आहे. त्या ऐतिहासिक कारणांची आणि परिणामांची चर्चा आहे. थोडक्यात, हा ग्रंथ प्रत्येक समस्येचे निराकरण करतो व प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करतो आणि हेच योग्य आहे व त्यामध्ये कोणतीही चूक असणे शक्यच नाही, ही खात्रीही देतो

 स्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट मार्गदर्शन : 

हा ग्रंथ केवळ मार्गदर्शनच करत नाही तर अनेक अशी तथ्ये मानवजातीसमोर मांडतो ज्यांना स्पष्टीकरणाची गरज नाही. हा ग्रंथ मानवजातीला जी दिशा देऊ इच्छितो आणि जी जीवनपद्धत स्वीकारण्याची आज्ञा देतो, त्यावर निरुत्तर करणारे जोरदार युक्तिवादही करतो, जे तर्कशुद्ध आणि नैसर्गिक आहेत. ज्यांमध्ये माणसाच्या आंतरिक आणि बाह्य जगातील संकेतांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मानवी अस्तित्वात आणि संपूर्ण विश्वात पसरलेल्या चिन्हांद्वारे विश्व-निर्मात्याचे एकेश्वरत्व आणि माणसांचे मरणोत्तर जीवन सिध्द करताना कुरआन जेव्हा हे आवाहन करतो की अल्लाहने आपल्या पैगंबरावर जे मार्गदर्शन अवतरित केले आहे ते स्वीकारा, त्यामध्ये तुमच्या सांसारिक आणि मरणोत्तर जीवनाचे कल्याण आहे, तेव्हा तो फक्त युक्तिवादच करत नाही तर ऐतिहासिक पुरावेही देतो. या ग्रंथाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो एक-एक व्यक्ती, समाजाचे चित्रण करतो. ईश-मार्गदर्शन स्वीकारून यशस्वी ठरलेल्या व्यक्तींचा, समुदायांचा इतिहास सांगतो. याबरोबर ज्या-ज्या व्यक्ती, समूह व राष्ट्रांनी ईश-मार्गदर्शन नाकारले त्यांचा विनाश कसा झाला याचाही उल्लेख करतो. या संदर्भात स्पष्ट पुरावे म्हणून हा ग्रंथ महत्त्वाच्या पैगंबरांचे जीवन-चरित्र समोर ठेवतो. ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहचवला आणि वाईट शक्तींशी संघर्ष करून ते जगले. कधी वाऱ्याची दिशा बदलण्यात ते यशस्वी ठरले, तर कधी त्यांनी या कामी येऊन, आपल्या श्रद्धा, विश्वास व भुमिकेवर अटळ राहून ’ईश्वरीय मार्गदर्शनाचा दीप’ प्रज्वलित केला, ज्यामुळे पुढच्या पिढीचा मार्ग प्रकाशमय झाला.

आदरणीय पैगंबर मूसा (त्यांच्यावर शांती असो) यांचा जन्म इजिप्तमध्ये झाला होता. फिरऔन या क्रूर राजाने आदरणीय पैगंबरांच्या समाजबांधवांना गुलामगिरीत जखडून ठेवले होते. जे अत्यंत दयनीय, असहाय व लाचारीचे जीवन जगत होते. अशा परिस्थितीत कोणतेही पाठबळ नसताना केवळ ईश्वराच्या भरवशावर आदरणीय पैगंबर (स.अ.) यांनी मोठ्या हिंमतीने राजासमोर ईशसंदेश ठेवला आणि त्याला सत्यमार्गी लागण्याचे आवाहन केले. याबरोबर त्यांनी अन्याय व अत्याचाराविरुद्ध दृढतेने संघर्ष केले. परिणामी सत्यतेच्या जोरावर व आपल्या निर्मात्या ईश्वराच्या पाठिंब्याने त्यांनी क्रांती घडवली. प्रचंड शक्ती व सामर्थ्य असूनही फिरऔन स्वतःही बुडाला आणि त्याचे साम्राज्यही नष्ट झाले. याचे कारण काय होते? विश्व-निर्मात्याविरुध्द फिरऔनची बंडखोरी, कृतघ्नता व प्रजेवर त्याने केलेले क्रूर अत्याचार व घोर अन्याय होत. दुसरीकडे ईश्वराप्रती निष्ठा व प्रेम होते. मानवजातीची चिंता आणि अन्याय व अत्याचारातून त्यांच्या सुटकेसाठी संघर्ष होता.

कुरआनमध्ये आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांच्याशिवाय इतर अनेक पैगंबर, त्यांचे सहकारी व इतर काही श्रध्दावंतांचा उल्लेख आहे. ज्यांचे चरित्र सद्गुणांनी भरलेले आहे. सर्व पैगंबरांनी धर्म-मार्गात आपल्या भूमिकेवर ठाम राहून आपली निष्ठा सिध्द केली. ईश्वराच्या प्रत्येक आज्ञेचे एकाग्रतेने पालन केले. ईश्वराच्या मर्जीसमोर नतमस्तक होताना त्यासाठी आपले सर्वस्व त्यागण्याची तयारी ठेवणाऱ्या पैगंबरांच्या विलक्षण कथा या ग्रंथात आहेत ज्यांना कुरआनने आदर्श व स्पष्ट पुरावे म्हणून मानवजातीसमोर ठेवले. लोक पैगंबरांच्या जीवनातील सत्य घटनांना भाकडकथा समजतात. असे तथाकथित विचारवंत स्वतःला   -(पान 16 वर)

कितीही पुरोगामी समजत असले तरीही त्यांचे ज्ञान त्या अजाण बालकासारखे आहे जो आपल्या गैरसमजुतीला सत्य समजतो आणि ते इतरांनीही मान्य करावे असा हट्ट धरतो. अशा लोकांना आवाहन करावेसे वाटते की जरा नीट आणि समजून कुरआन वाचा म्हणजे तथ्य काय ते कळेल.

सत्य-असत्याची कसोटी :

या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य ’अल-फुरकान’ म्हणजे सत्य आणि असत्याची कसोटी आहे. हा ग्रंथ सत्य आणि असत्य यामधील फरक स्पष्टपणे दाखवतो. चुक की बरोबर, योग्य की अयोग्य हेही स्पष्टपणे मांडतो. यश आणि अपयशाची स्पष्ट व्याख्या करतो. सत्यमार्गात यशस्वी ठरलेल्या महान व्यक्तींबरोबर अपयशी ठरलेल्या अधर्मी व सत्याविरोधी लोकांचाही उल्लेख करतो, हा ग्रंथ स्वर्गातील कृपा आणि नरकातील यातनांचे दृश्य डोळ्यांसमोर आणतो, स्वर्गास पात्र ठरणाऱ्या आणि नरकात पोहोचणाऱ्या लोकांची मनोवृत्ती दाखवतो. या ग्रंथात ईश-कृपा आणि ईश-प्रकोपाचा उल्लेख आहे. ईश्वरावर विश्वास नसल्यास बनणारी सैतानी वृत्ती आणि श्रध्दा व आज्ञापालनातून विकसित होणारे व्यक्तिमत्त्व यातील फरक हा ग्रंथ दाखवतो. अध्याय अल-फुरकान आणि अल-मुअमिनून याची स्पष्ट उदाहरणे आहेत.

पवित्र कुरआनचा प्रत्येक शब्द स्पष्ट व निर्णायक आहे. त्यामध्ये जे काही सांगितले गेले ते खरे असल्याबद्दल, आकलन व आचरण करण्यास सोपे असल्याबद्दल कोणतीच शंका नाही. अल्लाहने हा ग्रंथ जसा अवतरित केला तसाच आजही सुरक्षित आहे व पुढेही राहणार. खुद्द अल्लाहने हा ग्रंथ सुरक्षीत ठेवण्याची जबाबदारी घेतल्यामुळे मागील ग्रंथांप्रमाणे त्यात कुणीही, कोणतीही भेसळ करणे शक्यच नाही. कुरआनने जीवनाविषयी दिलेला दृष्टिकोनही स्पष्ट आहे आणि दाखवलेली दिशाही अगदी स्पष्ट आहे, कारण पवित्र कुरआन हा दिव्य प्रकाश आहे. इतकेच नव्हे तर दीपस्तंभ आहे. जो अंधारात भरकटलेल्या आणि वादळांनी वेढलेल्या मानवजातीच्या जहाजाला सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहचवू इच्छितो, पण त्यापासून लाभ घेण्याऐवजी माणसाला आपल्या कमकुवत दृष्टीने किनारा गाठायची हौस आहे. त्याला ’प्रयोग’ करण्याचा खुळा नाद जडला आहे. परिणामी, जसे समुद्रातील खडकाला धडकणारे जहाज नष्ट होते तसेच मागील काही वर्षांत जगभरात एकामागून एक अनेक विचारधारा जोरात आपटल्या. तरीही माणसं ’अब की बार’ काहीतरी वेगळं करायच्या तयारीत आहेत. एक मात्र नक्की की माणसाने कितीही डोके आपटले तरीही सरतेशेवटी त्याला आपल्या निर्मात्याचे मार्गदर्शन घ्यावेच लागणार आहे. मग सतत आपल्या हाताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याला दुर्बुद्धी नाही तर काय म्हणणार? रमजानच्या महत्त्वाचे रहस्य हेच आहे की या महिन्यात विश्व-निर्मात्या ईश्वराने मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पवित्र कुरआन अवतरित केले, जसे त्यापूर्वीही काही प्रमुख ईशग्रंथांचे अवतरण याच महिन्यात केले होते. अल्लाहने ज्या महिन्यात मार्गदर्शनासाठी ग्रंथ अवतरित केले, त्याच महिन्यात माणसांचे अंतःकरण हे मार्गदर्शनासाठी तयार व्हावे आणि माणसातील ईशभय हा गुण विकसित व्हावा या उद्देशाने रोजे ठेवण्याची आणि कुरआनचे पठण व श्रवण करण्याची योजना दिली. रोजा आणि कुरआन या दोन्हीच्या माध्यमातून भक्ताला अल्लाहशी जवळीकता साधता येते. पवित्र कुरआन हा ग्रंथ म्हणजे अल्लाहने आपल्या भक्तांच्या आत्म्यांशी केलेले संबोधन आहे. या ग्रंथाचे पठण व श्रवण आणि रोजा ठेवणाऱ्या व्यक्तीलाही अल्लाहशी विशेष जवळीकता प्राप्त होते. अशा प्रकारे रमजान आणि कुरआन हे दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरतात. कुरआनचा लाभ कुणाला होतो? जो मनात ईशभय बाळगून वाईट गोष्टींपासून सुरक्षित राहू इच्छितो आणि ईशभय हा गुण विकसित होण्यासाठी रोजा ठेवणे आवश्यक आहे.सध्याच्या चंगळवादी जीवन व्यवस्थेमध्ये माणूस एक अर्थप्राप्ती करणारा श्वापद बनलेला आहे. पैसा कमाविण्यासाठी काहीही अनैतिक करण्यात लोकांना वाईट वाटत नाही. या पार्श्वभूमीवर हा ग्रंथ लोकांना सदाचरणासाठी प्रोत्साहित तर करतोच, त्याबरोबर बौद्धिक समाधानही देतो. ज्यामुळे जीवनात सकारात्मकता वाढते आणि मानसिक स्थैर्य व शांती लाभते. ज्याची आजच्या काळात खूप गरज आहे.


 - अब्दुल कय्यूम शेख अहमद,

 औरंगाबाद. 9730254636 



रमजान हा जगभरातील सुमारे 2 अब्ज मुस्लिमांसाठी पवित्र महिना आहे. आपल्या श्रद्धेचा उत्सव साजरा करण्याचा आणि आध्यात्मिक शुद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा काळ आहे. आपल्या संस्कृतीशी आणि परंपरेशी नाळ जोडणे आणि एका श्रद्धात्मक काळाची आठवण करून देणे याचाही यामध्ये समावेश असतो.

रमजान साजरा करण्याच्या चालीरीती आणि परंपरा जगभरातील विविध देश आणि तेथील संस्कृतींमध्ये भिन्न असतात. इफ्तारच्या वेळेसाठी प्रत्येक संस्कृतीची स्वतःची चव आणि उत्कृष्ट पाककृती खास तयार केल्या जातात. पारंपरिकपणे हे विशेष पदार्थ शेजारी, नातेवाईक आणि मित्रांमध्ये वितरित केले जातात. इफ्तार हा दिवसाची एक सुंदर वेळ आहे ज्यात उत्साह, कृतज्ञता आणि विपुल आनंदाची विशेष चर्चा असते.

अनेक संस्कृतींमध्ये रमजानच्या उत्सवानुरूप सजवलेली घरे आणि ठिकाणे दिसतात. विविध देशांमध्ये रस्त्यांवर दिवे लावले जातात. काही संस्कृतींमध्ये ईदच्या उत्सवाच्या अपेक्षेने रमजानमध्ये बाजारपेठा आणि दुकानांमध्ये मेंदीचे स्टॉल लावण्यात येतात. पवित्र महिन्यासाठी स्वागताचे वातावरण तयार करण्यासाठी कुटुंबे आपली घरे छान आणि नीटनेटकी बनवतात.

इजिप्तमध्ये फानूस नावाच्या रंगीबेरंगी कंदिलांनी रस्ते सजवले जातात. हे कंदील एकता आणि आनंदाचे प्रतीक आहेत. रमजानच्या 13, 14 आणि 15 तारखेला ’हक अल लैला’ साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा बहरीनमध्ये सुरू झाली, जिथे मुले चमकदार कपडे परिधान करून पारंपरिक स्थानिक गाणे गाऊन मिठाई गोळा करत परिसरात फिरतात. इराक, कुवेत, कतार, बहरीन आणि सौदी अरेबियामधील काही शहरांमध्ये याला ‘गर्गाआन’ म्हणतात. तो ओमानमध्येही त्याच दिवशी साजरा केला जातो परंतु त्याला ‘कारनकाशो’ म्हणतात. आता ही परंपरा संपूर्ण आखाती देशांमध्ये साजरी केली जाते, यामुळे मजबूत सामाजिक बंध आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित होते. पदुसान (म्हणजे आंघोळ करणे) ही एक इंडोनेशियन परंपरा आहे जिथे मुस्लिम रमजानच्या आदल्या दिवशी स्वतःला ’शुद्ध’ करण्यासाठी वेगवेगळे विधी करतात.

इफ्तारसाठी तोफ डागणे ही ‘मिद्फा अल इफ्तार’ या नावाने ओळखली जाणारी परंपरा इजिप्तमध्ये 200 वर्षांपूर्वी सुरू झाली असे म्हटले जाते. सीरिया आणि लेबनॉनसारख्या इतर देशांसह अनेक अरब देशांनी ही परंपरा स्वीकारली.

रमजानमध्ये रोज संध्याकाळी इफ्तारनंतर विविध वयोगटातील इराकी मोठ्या संख्येने म्हेब (अंगठी) खेळण्यासाठी जमतात. या पारंपरिक, पुरुषप्रधान रमजान खेळासाठी 40 ते 250 खेळाडूंपर्यंत दोन संघांची आवश्यकता असते. खेळाच्या सुरुवातीला अंगठी घेऊन जाणाऱ्या प्रमुख खेळाडूने इतरांचे लक्ष वेधून न घेता ती दुसऱ्या खेळाडूकडे सोपवावी. विरोधी संघाला देहबोली समजून अंगठी कुठे आहे हे ठरवावे लागते.

ईद-उल-फित्रच्या आदल्या रात्री जिला उपखंडात ‘चांदरात’ म्हणून ओळखले जाते, भारतीय, बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांसाठी आनंद आणि उत्सवाची असते. कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळी पारंपरिक गोड पदार्थांची देवाणघेवाण करून रमजानचा शेवटचा दिवस साजरा करतात. दक्षिण आशियाई देशांतील महिलांमध्ये मेंदी लावण्याची परंपरा आजही कायम आहे. रमजान आणि ईद-उल-फित्र हे दोन्ही साजरे करताना मुस्लिम समुदाय एकजूट आणि रोमांचित होतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत बाजारपेठा आणि बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी असते.

जुन्या दिल्लीत पूर्वीच्या मुस्लिम मुघल साम्राज्याचा सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करणारी एक प्राचीन रमजान परंपरा म्हणजे सेहेरीवाला. मुस्लिमांना सहेरीसाठी जागे करण्यासाठी पवित्र महिन्यात रात्री अडीचच्या सुमारास परिसरात फिरताना सेहेरीवाले अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या नावाचा जयघोष करतात. ते बेत किंवा काठी वापरून घरांचे दरवाजे आणि भिंती ठोठावतात. सेहेरीवाल्यांची संख्या कमी होत असतानाही ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली आहे.

पूर्वीच्या ओटोमन साम्राज्याच्या काळापासून रोमा मुस्लिम समुदाय अल्बानियामध्ये आपापल्या खास पद्धतीने रमजान साजरा करीत आहेत आणि उपवास आणि इफ्तार दोन्ही पारंपरिक गाण्यांच्या आवाजात घोषित केले जातात. स्थानिक लोक आपले लोद्रा (शेळी किंवा मेंढ्याच्या कातडीपासून बनवलेले दुहेरी घरगुती ड्रम) वाजवताना रस्त्यावर फिरतात. काही मुस्लिम कुटुंबे ढोलवादकांना आपल्या घरात गाणी वाजवण्यासाठी आमंत्रित करून इफ्तारची सुरुवात साजरी करतात.

तुर्कस्तानमध्ये उपवास सोडण्यासाठी रमजानमध्ये गुल्लाक नावाची गोड मिठाई दिली जाते. हे फिलो पीठ, ड्रेन आणि गुलाबपाण्याच्या थरांनी बनविले जाते आणि इफ्तारनंतर खाल्ले जाते. इजिप्तमध्ये रमजानमध्ये ’फतह’ नावाचे विलक्षण सूप सर्व्ह केले जाते. हे ब्रेड, तांदूळ आणि मांसासह बनवले जाते आणि इफ्तार रात्रीच्या जेवणात सर्व्ह केले जाते.

भारतासह दक्षिण आशियाई मुस्लिमांना आपल्या इफ्तारमध्ये खजूर, फळे, समोसे, पकोडा आणि बिर्याणीचा समावेश करणे आवडते. यूएईमध्ये इफ्तारसाठी दिले जाणारे अनोखे पदार्थदेखील आहेत. त्यांचा एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे हरीस, उकडलेला गहू आणि मांस यापासून वनवला जातो.हे दलियासारखेच असते. मोरोक्कोमधील इफ्तार परंपरेचा अर्थ खजूरसह उपवास  सोडणे, त्यानंतर हरीर, उकडलेली डाळ आणि टोमॅटो सूप, गरमगरम उकडलेली अंडी, पेस्ट्री आणि तळलेले मासे हे खाद्यपदार्थ आवर्जून असतात. रमजानमध्ये चेबाकिया नावाचे गोड भाजलेले चांगले पक्वान्न देखील सामान्य आहे.

बांगलादेशात जिलापी, एक लोकप्रिय गोड स्नॅक; पियाझू, जो कांद्यापासून बनविलेला असतो आणि वांग्यापासून बनवलेली बेगुनी इफ्तारच्या वेळी कुटुंब आणि मित्रांसमवेत एन्जॉय करण्यासाठी आधीच तयार केली जाते. पाकिस्तानात रमजानमध्ये निराधारांना पोषण आणि रोख रक्कम देण्याची प्रथा आहे. असंख्य कुटुंबेही तयार होण्यासाठी एकत्र जमतात आणि या महिन्यात विलक्षण जेवण सामायिक करतात.

सौदी अरेबियात खजूर आणि पाण्याने उपवास सोडण्यासाठी कुटुंबांनी एकत्र येण्याची प्रथा आहे. रमजानदरम्यान शेजारी आणि साथीदारांबरोबर जेवण सामायिक करणे देखील सामान्य आहे. मलेशियात रमजानमध्ये ’बुबुर लंबुक’ नावाचा एक अनोखा भाताचा पदार्थ तयार केला जातो आणि तो समुदायापर्यंत पोहोचवला जातो. हे तांदूळ, मांस आणि चवीसह बनवले जाते आणि इफ्तार रात्रीच्या जेवणात सर्व्ह केले जाते.

नायजेरियामध्ये दिवसाची सुरुवात सुहूर नावाच्या मेजवानीने केली जाते जी कुटुंब आणि साथीदारांसोबत सामायिक केली जाते. रमजानमध्ये घरे आणि गल्ल्या दिव्यांनी सुशोभित करणे देखील मानक आहे. अमेरिकेत अनेक मुस्लिम लोक असामान्य प्रार्थना आणि सामुदायिक कार्यक्रमांना जाऊन रमजान साजरा करतात. या महिन्यात साथीदार आणि कुटुंबीयांसमवेत रात्रीचे जेवण सामायिक करणे आणि धर्मादाय कारणांसाठी देणे देखील सामान्य आहे.

रमजान महिन्याचा सन्मान करण्यासाठी विशेषत: इफ्तार आणि सामूहिक नमाजाच्या वेळी जगाच्या विविध भागांतील मुस्लिम पारंपरिक कपडे परिधान करतात. सामान्यपणे परिधान केलेले कपडे माफक आणि स्वच्छ असतात परंतु सरसकट अवाजवी नसतात. काही संस्कृतींमध्ये लोक रमजानमध्ये आपले नवीन कपडे परिधान करण्यासाठी ठेवतात.

बहुतेक अरब देशांमध्ये रमजान परंपरेचा अंतर्भाव म्हणजे ‘मेसहाराथी’ जो लोकांना सहरीसाठी उठवण्यासाठी रस्त्यावर फिरतो. शेजाऱ्यांची ओळख असलेला हा मेसहाराटी ढोल वाजवताना अनेकदा रहिवाशांची नावे सांगतो. या भूमिकेतील नि:स्वार्थीपणा हे रमजानचे वैशिष्ट्य असलेल्या चांगल्या मूल्यांचे आणि श्रद्धेचे उदाहरण होय. तुर्कस्तानमध्ये ते ढोल वाजवतात आणि फेझसह विशेष ऑटोमन कपडे परिधान करतात. मोरोक्कोमध्ये हे लोक रस्त्यावर प्रार्थना गातात आणि गांडोरा टोपीसह पारंपरिक मोरोक्कोचे कपडे घालतात. 

इंडोनेशियात रमजान महिना ’बग’ नावाच्या मोठ्या ढोल-ताशांच्या गजरात गाजतो. ढोल-ताशांचा आवाज लोकांना पहाटेच्या जेवणासाठी उठण्याची आठवण करून देण्यासाठी आणि उपवास सुरू करण्यासाठी अभिप्रेत आहे.

रमजान परंपरा आणि चालीरीती प्रत्येक संस्कृतीमध्ये भिन्न असतात, परंतु हे सर्व रमजानच्या पवित्र महिन्यात जगभरात पाळल्या जाणाऱ्या सुंदर जागतिक संस्कृतीचा भाग आहेत. जागतिक स्तरावर सुसंगत असलेली एक परंपरा म्हणजे दान करणे. त्यामुळे आपले धार्मिक कर्तव्य पार पाडण्यासाठी आणि गरजू लोकांचे जीवन सुधारण्यासाठी या रमजानमध्ये वंचित व गरीब अनाथांना दानधर्म केला जातो.

- शाहजहान मगदुम

मुंबई

897-653-3404



भारतीय संस्कृती ही तिच्या वैविध्यतेमुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे त्यातही देशातील सण, उत्सव ह्याचे सर्वत्र विशेष आकर्षण ठरते. राष्ट्रीय सणांसोबतच रमजान ईद हा जागतिक सण आपल्या देशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रमजान महिना संपल्यावर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र साजरी केली जाते. हा उत्सव साजरा करण्यासाठी ईदचा दिवस तर महत्त्वाचा असतोच परंतु या संपूर्ण महिन्याचे महत्त्व ही अनन्यसाधारण आहे. या महिन्याचे मर्म असे की, गर्भ श्रीमंत असो वा घरी अठराविश्व दारिद्र्य असणारा, दानशूर असो वा चैनीमध्ये जीवन जगणारा सर्वच एकाच उल्हासात असतात. रमजान महिना हा संयम, उपासना, श्रद्धा, विश्वास, दान इत्यादी गोष्टींचा साक्षात्कार घडवून देणारा आहे. या संपूर्ण महिन्यातील घडामोडी व वातावरण पाहून मुस्लिमेत्तर व्यक्तीच्या डोक्यात इस्लामबद्दल अनेक प्रश्नांना भरती येते. इस्लाममध्ये अनिवार्य असणारे पाच स्तंभ म्हणजे इमान, नमाज, रोजा, जकात, हज हे आहेत. या आधारस्तंभाचा उल्लेख हदीस ग्रंथात हदीस ए जिबराईल आणि ईशग्रंथ कुरआनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्याचे काटेकोरपणे पालन मुस्लिमांकडून केले जाते. 

मात्र याबद्दल मुस्लिमेत्तर समाज जेंव्हा ऐकतो किंवा वाचतो तेव्हा या अनिवार्य आधारस्तंभांना बोजा समजून हा धर्म त्यांना अतिशय अवघड असल्याचे भासतो. हा भासच त्यांच्या डोक्यात कुरआन व इस्लाम याबद्दल भीती निर्माण करतो. इस्लामोफोबिया वाढण्याचे हे सुद्धा एक कारण आहे. मात्र जास्तीत जास्त लोक सत्य जाणून घेण्यासाठी याचा अभ्यास करतात. आजच्या युगात अभ्यास हा अनेक माध्यमातून केला जातो. त्यातील एक म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडियाही आहे, परंतु यांच्या साह्याने मिळणारी माहिती अनेकदा तुटपुंजी, गैरसमज पसरवणारी व अफवा वाढवणारी असते.

इस्लामची जीवनपद्धती किती साधी, सोपी आणि आदर्श आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त कुरआन आणि आदरणीय पैगंबर (स.) यांच्या जीवनचरित्रातून स्पष्ट होते आणि हाच या लेखाचा मूळ उद्देश आहे. कुरआनबद्दलच्या अज्ञानामुळे कुरआन अवघड वाटणाऱ्याला ईशग्रंथ कुरआन स्वतः ग्वाही देतो. कुरआनच्या अध्याय ’तॉहा’च्या आयत 2 मध्ये म्हटले आहे, 

आम्ही हे कुरआन तुमच्यावर यासाठी अवतरले नाही की तुम्ही संकटात पडावे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात परिस्थिती अशी होती की अल्लाहचे प्रेषित हे अल्लाहने सांगितलेला धर्म आणि सत्य वचने हाडाचे पाणी करून लोकांना पटवून सांगत. परंतु खूप कमी लोक त्यावर विश्वास ठेवत आणि मोठा वर्ग या सत्य वचनांना मान्य करण्यापासून दूर होता. त्याची काळजी आणि दुःख अल्लाहच्या पैगंबरांना होत होते. त्या वेळी काळोखात चाललेल्या व भरकटलेल्या लोकांनी सत्य वचनाचा स्वीकार करून सत्य मार्गावर चालावे यासाठी पैगंबर रात्र-रात्रभर नमाजमध्ये कुरआन पठण करून अल्लाहजवळ प्रार्थना करत असत. रात्रभर नमाजसाठी उभे राहिल्यामुळे त्यांचे पाय सुद्धा सुजत होते, तेव्हा ही आयत त्यांच्यावर अवतरली. 

कुरआनचे प्रत्येक पान आणि शब्द-न-शब्द त्याच्या सुरेख, स्पष्ट आणि सरळपणाची साक्ष देतो. मानवी जीवनव्यवस्था आदर्श करण्यासाठी जे नियम दिले ते मानवाला कधीही अवघड वाटणार नाहीत. त्यामध्ये रोजा अनिवार्य असण्याचा आदेश आहे, परंतु लगेच काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये रोजा न ठेवण्यासाठी सूटही दिली आहे. त्यानंतर सुटलेला रोजा पुढील एका वर्षात कधीही पूर्ण करण्याची मुभा आहे. किंवा तेही शक्य नसेल तर त्याची जी भरपाई आहे ती सोपी आहे, जसे एका रोजाच्या बदल्यात एका दुर्बलाला जेवू घालणे. हे अध्याय अल्-बकराच्या 184 व्या आयतीमध्ये स्पष्ट आहे,

...तर तुमच्यापैकी आजारी असतील आणि प्रवासात असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकांना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल परंतु उपवास करणार नाहीत त्यांनी दुर्बलांना मोबदला म्हणून जेवू घालावे.

त्याचप्रमाणे ज्यांना कुरआनबद्दल परिपूर्ण माहिती नाही त्यांना नमाज हेही एक अवघड काम वाटते, की दिवस उजाडण्याच्या अगोदर पासून ते दिवसभरातून वेगवेगळ्या वेळेत पाच वेळा अनिवार्य नमाज पठण केली जाते. परंतु सामर्थ्य किंवा ताकद असणाऱ्या व्यतिरिक्त एखादी व्यक्ती आजारी किंवा प्रवासात असेल तर कुरआनने नमाजमध्ये सुलभता करून दिली आहे. जसे आजारी किंवा प्रवासी, आहे त्या परिस्थितीत नमाज पठण करू शकतो.

इस्लामचा मूळ आधारस्तंभ असणाऱ्या ईमानच्या बाबतीतही अल्लाहने लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपले श्रद्धा लपवून ठेवण्याची परवानगी दिली आहे. 

तसेच हजचाही आदेश कुरआनमध्ये आहे, पण ज्याची हज करण्याची ऐपत नाही त्यावर हे करणे अनिवार्य नाही. 

जकातच्या माध्यमातून अल्लाहने व्यक्तींना दानशूर बनवून त्यांचे पारडे जड केले आहे. श्रीमंतांनी आपल्या संपत्तीच्या 2.5% रक्कम गरजूंना दान करावी लागेल. ज्यांच्याजवळ एवढी संपत्ती नसेल की त्याने दान करावे त्याला या अनिवार्य स्तंभापासून सूट देण्यात आली आहे. जे व्यक्ती जकात देऊ शकत नाहीत त्यांना कुरआनने जकात अनिवार्यही केली नाही. 

या सर्व उपयोजना इस्लामच्या या पाच आधारभूत स्तंभाबद्दल अतिशय मोजक्या शब्दांत स्पष्ट केल्या आहेत, परंतु कुरआनने प्रत्येक गोष्ट एका श्रद्धावंतासाठी सोपी केली आहे. एका श्रद्धावंताला आणि ईशभय बाळगणाऱ्या व्यक्तीला याची स्पष्टोक्ती आलीच असेल, परंतु जागतिक स्तरावर पसरलेल्या आणि वेगाने वाढत जाणाऱ्या इस्लाम या सत्यधर्माची सत्यता कुरआनमध्ये पडताळून, त्याचा आदर्श नमुना अंगीकारून आपले हे जीवन सफल झाले तर आभाळाला कवेत घेतल्याची भावना जाणवेल. तसेच आपल्या संस्कृतीमध्ये असणारा इस्लाम हा सत्यधर्म अभ्यासण्याचा आणि अंगीकारण्याच्या अभिमानही वाटेल.


- प्रिया कानिंदे सरतापे 

औरंगाबाद



निसर्गकर्त्याने मानवाला हात, पाय, डोळे, कान, नाक ही सर्व इंद्रिये दिलीत. याद्वारे तो काम करू शकतो, ज्ञान मिळवू शकतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एक मेंदू दिला, जो सद्सद्विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेऊ शकतो. पण अनेक वेळा हा मेंदू काम, क्रोध, मोह, माया, मत्सर या सैतानी षडविकारांच्या आहारी जाऊन गाफील होतो. या गफलतीतून मानवाला बाहेर काढून योग्य ते मार्गदर्शन करण्याकरिता निसर्गकर्त्याने माणसांपैकीच काही माणसं निवडलीत आणि त्यांच्यावर आपल्या संदेशाचे दिव्य अवतरण करून हाच अवतरीत संदेश पुढे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. अशा महापुरूषांना प्रेषित म्हणतात. काही प्रेषितांना मिळालेले संदेश हे तात्कालिक होते, त्यांचा उद्देश त्याच काळापुरता मर्यादित होता. पण काही संदेश हे ग्रंथरूपाने संकलित करण्यासाठी होते. त्याच ग्रंथांची शिकवण पुढे येणारे काही प्रेषितही त्यांच्या समाजाला देत होते. अशाप्रकारे काही प्रेषितांना असे ग्रंथ दिले गेले तर काहींना ग्रंथ दिले गेले नाहीत. आता हे ग्रंथ दिले गेले किंवा ग्रंथांचे अवतरण झाले म्हणजे नेमकं काय झालं, ते आपण पाहू या. ...

सृष्टीकर्ता अल्लाह (ईश्वर/निर्मिक) हा मानवाच्या मार्गदर्शनासाठी आपला संदेश विविध श्लोकांचा समूह असलेल्या अध्यायांच्या स्वरूपात फरिश्ते (ईशदूत) मार्फत प्रेषितांपर्यंत पोहोचवितो. आता या फरिश्त्यांचं नेमकं स्वरूप कसं आहे, त्याचं ज्ञान अल्लाहलाच आहे, त्याविषयी फार कमी माहिती देण्यात आली आहे. पण समजून घेण्यासाठी एवढं पुरेसं आहे की, इतकी अद्भूूत सृष्टी निर्माण करणाऱ्या निर्मिकाने त्याच्या आणि प्रेषितांदरम्यान एक संपर्कयंत्रणा निर्माण केली आहे. ती यंत्रणा म्हणजे फरिश्त्यांद्वारे संदेशांचे हे दिव्य प्रगटन होय. वेगवेगळ्याप्रसंगी निसर्गकर्ता वेगवेगळ्या पद्धतीने ग्रंथाचं अवतरण करतो. कधी फरिश्ते मानवांच्या स्वरूपात येऊन प्रेषितांना अध्याय ऐकवतात तर कधी थेट अल्लाहकडून एखादा अध्याय प्रेषिताच्या मनावर अवतरित होतो. ही पद्धत प्रेषितासाठी फार यातनादायी ठरते. अशा वेळी एखादी अवजड गोष्ट आकाशातून आपल्यावर येऊन कोसळत असल्याची जाणीव प्रेषितांना होत होती. त्या वेळी प्रेषितांचा चेहरा लालसर होत होता, शरीराला घाम येत होता, कानात घंटानादासारखा आवाज जाणवत असे. अशा पद्धतीने एकूण 23 वर्षांमध्ये विविधप्रसंगी विविध अध्याय अवतरित होत गेले. या अध्यायांचा संग्रह म्हणजेच क़ुरआन. (संदर्भ: मौलाना मौदुदी यांनी लिहिलेल्या दिव्य क़ुरआनाच्या उर्दू भाषांतराच्या प्रस्तावनेत उद्धृत करण्यात आलेली माहिती.)

यावरून स्पष्ट होते की, क़ुरआनाचे लेखक पैगंबर सल्लम नसून स्वत: अल्लाह आहे. कारण अल्लाहने जे अध्याय प्रेषितांना सांगितले तेच त्यांनी लोकांना सांगितले आणि आपल्या सहकाऱ्यांकडून लिपिबद्ध करवून घेतले. प्रेषितांनी क़ुरआन स्वतःच्या मनानं लिहिलेले नाही. कारण प्रेषित तर उम्मी (म्हणजे लिहिता वाचता न येणारे) होते. ते कधीही कोणत्या शाळेत गेले नाहीत की कोणाकडूनही त्यांनी लिहिणं वाचणं शिकले नाही की क़ुरआन अवतरणापूर्वी त्यांनी कोणतेही पुस्तक किंवा कोणतेही लिहिलेले वाक्य वाचलेले नव्हते. त्यांचा कोणताही माणूस गुरू किंवा शिक्षक नव्हता. तरीही त्यांच्या तोंडून क़ुरआनाच्या स्वरूपात असे अगाध ज्ञान लोकं ऐकत होते की, ज्यात असे अनेक वैज्ञानिक व ऐतिहासिक तथ्ये बाहेर पडत होती की, जी तथ्ये एकोणीसाव्या, विसाव्या शतकात माणसाने शोधली. उदाहरणार्थ - पृथ्वी गोल असणे, ग्रहांचं त्यांच्या कक्षेतील भ्रमण, सूर्याचं स्वयं प्रकाशित तर चंद्राचं परप्रकाशित असणे, स्त्रीच्या पोटातील गर्भाच्या विविध अवस्था, प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेले प्रेषित मूसा यांच्या काळापासून इजिप्तचा राजा फेरो (फिरऔन)चे अज्ञात असलेलं प्रेत (जे 10 डिसेंबर 1911 रोजी सापडलं) याची माहिती, अशा अनेक गोष्टी क़ुरआनाच्या स्वरूपात एका अशा व्यक्तीच्या तोंडातून निघतात की, जी व्यक्ती ग्रंथ अवतरणापूर्वी एक सीरियाचा अपवाद वगळता कोणत्याच देशात मक्का सोडून गेलेली नव्हती, याचा अर्थ नक्कीच ते ज्ञान त्याचे स्वतःचे नसून निसर्गकर्त्याकडून अवतरित झालेले आहे हे सिद्ध होते. म्हणजे क़ुरआनाचे लेखक प्रेषित नसून ती अल्लाहची वाणी आहे.

जगात अनेक प्रेषित येऊन गेले. प्रेषित मुहम्मद सल्लम् हे इस्लामचे संस्थापक नसून अंतिम प्रेषित आहेत. इस्लामचे पहिले प्रेषित होते भूतलावरील पहिले मानव हजरत आदम!  त्यांची पत्नीी हव्वा यांची कबर आजही सौदी अरबमधील जेद्दाह शहरात आहे. इस्लामचे जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषित जगाच्या प्रत्येक देशात, प्रत्येक युगात आले आहेत. यासंदर्भात अल्लाह क़ुरआनात सांगतो -

‘प्रत्येक जनसमुदाय (उम्मत) साठी एक प्रेषित आहे’ - क़ुरआन (10:47)

प्रत्येक प्रेषित हा प्रादेशिक भाषाच बोलायचा. याचा संदर्भ क़ुरआनात सापडतो -

‘आम्ही (अल्लाहने) आपला संदेश देण्यासाठी जेंव्हा कधी एखादा प्रेषित पाठविला आहे, त्याने आपल्या लोकांच्याच भाषेत संदेश दिला आहे जेणेकरून त्याने त्यांना चांगले स्पष्ट करून आपले म्हणणे मांडावे.’ - क़ुरआन (14:4)

सर्व प्रेषितांनी एकच शिकवण दिली. पण त्यांची भाषा वेगवेगळी होती. म्हणून असं होऊ शकते की, धर्माशी संबंधित अनेक शब्द वेगळे असू शकतात. त्यावरून काहींचा असा गैरसमज होऊ शकतो की, त्यांचा धर्मही वेगळा असावा.

म्हणजे प्रेषित मुहम्मद सल्लम् यांनी कोणताही नवीन धर्म सांगितलेला नसून प्रेषित आदमपासून प्रेषित येशूपर्यंतचा हाच त्यांचा धर्म आहे ज्याला अरबीत इस्लाम म्हणतात आणि त्याच्या अनुयायींना मुस्लिम म्हटले जाते.

याचं एक उदाहरण म्हणून प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या जवळपास अडिच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेले त्यांचे इराकमधील पूर्वज प्रेषित इब्राहिम यांचं उदाहरण देता येईल.

याचा पुरावा म्हणून प्रेषित मुहम्मद सल्लम् यांच्यापूर्वीपासून असलेल्या मस्जिद ए हरम (मक्का), अक्सा मस्जिद (यरूशलम), कुब्बत अल सखरा (यरूशलम) या धर्मस्थळांची उदाहरणं देता येतील. इतके प्रेषित येऊनही पुन्हा लोकांत गट तट, वादावादी, कलह का निर्माण झाला? याच्या उत्तराकरिता आपल्याला मानवी इतिहासात निसर्गकर्त्याकडून मानवाच्या मार्गदर्शनाकरिता जे जे प्रेषित नियुक्त करण्यात आले, त्यांच्या इतिहासाचे अवलोकन करावे लागेल.

इस्लामचे पहिले प्रेषित आदम. हेच भूतलावरील पहिले मानवदेखील होते. त्यांच्या पत्नीचे नाव हव्वा. प्रेषित आदम यांच्यानंतर त्यांची लेकरं, लेकरांची लेकरं ही जगभर पसरत गेली. तो एकच मानवी परिवार आज जवळपास सातशे कोटी लोकांचा झाला आहे. या परिवारात प्रत्येक युगात, प्रत्येक देशात किमान एक प्रेषित आलेला आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक देशावर मुस्लिम प्रेम करत असतो. कारण प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या प्रेषिताची पुण्यभूमी राहिलेला आहे.  

प्रेषित आदम यांच्यानंतर त्यांचे तिसरे पुत्र प्रेषित इद्रिस यांना प्रेषित्व बहाल करण्यात आले. त्यांच्यानंतर प्रेषित नुह आले. अशाप्रकारे एक एक प्रेषित येत गेले. ते काही कोणती वेगळी नवीन शिकवण सांगायचा नाही. तर प्रत्येक प्रेषित पूर्वीच्या प्रेषितांचीच शिकवण स्थानिक भाषेत सांगायचे. काही लोकं मानायचे तर काही नाकारत होते. ते प्रेषित गेल्यानंतर पुन्हा त्यांचे अनुयायी त्यांची शिकवण विसरायचे किंवा काही जण त्यात हेतुपुरस्सर भेसळ करायचे. अशाने मूळ धर्माला ग्लानी व्हायची. ग्लानी झालेल्या मूळ धर्माचेच सृजन करण्यासाठी पुन्हा एक दुसरा प्रेषित येत गेला. असं करता करता लोकांनी जगभरात अनेक वेगवेगळे गट तट, संंप्रदाय तयार करून टाकले. प्रेषित आदम यांची मूळ शिकवण मात्र एकच आहे. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत एकूण जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषित येऊन गेल्याचा इतिहास हदीस ग्रंथात सापडतो. (संदर्भ: इब्ने हिब्बान, उद्धृत: इब्ने कसीर). यापैकी काही प्रेषितांची नावं क़ुरआनात आलेली आहेत, तर काहींची नावे आलेली नाहीत. खरं म्हणजे ईश्वरी ग्रंथ हे मानवाच्या मार्गदर्शनासाठी असतात. म्हणून त्यात नीतीमूल्ये सांगितली जातात, काही इतिहास सांगितला जातो की, बघा त्या नीतीमूल्यांवर आचरण करणारे कसे यशस्वी झाले अन् नाकारणाऱ्यांचे कसे हाल झाले ते दाखविण्याकरिता, याव्यतिरिक्त सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी आणखी काही ज्ञान सांगितलेले असते. आता ग्रंथात जर लाखो प्रेषितांची नुसती नावंच सांगितली गेली असती तर ते ग्रंथ कुणी वाचले असते का? अशा प्रकारे कोणतेही ग्रंथ म्हणजे काय कुणाच्याही नावांची जंत्री (डिरेक्टरी) नसते, तर ते मार्गदर्शनपर ग्रंथ असतात. अन् सर्वच प्रेषितांच्या शिकवणीची गाभा एकच असल्यामुळे त्यांची ती मूळ शिकवण सांगणे गरजेचं होतं, त्यांची फक्त नावं नव्हे, असो.

उपरोक्त सांगितल्याप्रमाणे काही प्रेषितांना ग्रंथ दिली गेली होती, तर काहींना नाही. जसे आदरणीय प्रेषित इब्राहिम यांच्यावर सृष्टिकर्त्याकडून ज्या संदेशांचे अवतरण झाले, त्यांना ‘सुहुफ ए इब्राहिम’ म्हटलं जातं. तो ग्रंथ आज कोणत्याही स्वरूपात अस्तित्वातच नाही. म्हणून अनेक इस्लामी विचारवंत चार मुख्य अस्मानी (ईश्वरी) ग्रंथांचा उल्लेख करतांना त्या ग्रंथाचा उल्लेख करत नसतात. प्रामुख्याने या अस्मानी ग्रंथांचा उल्लेख केला जातो -

1) सुहुफ ए इब्राहिमी - आदरणीय प्रेषित इब्राहिम यांच्यावर हा ग्रंथ अवतरित झाला होता.

2) तौरात - आदरणीय प्रेषित मुसा यांच्यावर हा ग्रंथ अवतरीत झाला होता.

3) ज़बुर - आदरणीय प्रेषित दाऊद यांच्यावर हा ग्रंथ अवतरीत झाला होता.

4) इंजील - आदरणीय प्रेषित इसा (येशू) मसीह यांच्यावर हा ग्रंथ अवतरित झाला होता.

5) क़ुरआन - आदरणीय प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर हा ग्रंथ अवतरीत झाला होता.

क़ुरआनाच्या अवतरणाविषयी सृष्टिकर्ता सांगतो की -

‘‘रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी.’’    -  क़ुरआन (2:185)

अशा प्रकारे रमज़ानमध्ये क़ुरआनाचे अवतरित झाल्याची माहिती स्वत: क़ुरआनाचा अवतरणकर्ता सृष्टिकर्ताच देतोय. पण फक्त क़ुरआनच नव्हे तर सृष्टिकर्त्याचे इतर अस्मानी ग्रंथही याच महिन्यात अवतरीत झाल्याची माहिती आपल्याला इतिहासात पुढीलप्रमाणे मिळते -

‘‘‘सुहुफ ए इब्राहिम’ हा (ग्रंथ) रमज़ानच्या पहिल्या रात्रीत अवतरित झाले होते, ‘तौरात’ रमज़ानच्या सहाव्या रात्रीत अवतरित झाले होते, ‘इंजिल’ हे रमजानच्या तेराव्या रात्रीत अवतरीत झाले होते आणि अल्लाहने क़ुरआनला रमज़ानच्या चोवीसाव्या रात्रीत अवतरीत केले.’’

संदर्भ: हदीस (प्रेषितवचन) ग्रंथ - ‘अहमद’, प्रकरण क्र. 4, वचन क्र. 107 ; हदीसग्रंथ - ‘मुसनद’, वचन क्र. 177025)

क़ुरआन रमज़ानच्या नेमक्या कोणत्या रात्रीत अवतरीत झाले, याबाबतीत इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मते-मतांतरे आहेत. उपरोक्त हदीस काही विचारवंत अनधिकृत असल्याचेही सांगतात. बहुसंख्य इतिहासकार क़ुरआन रमज़ानच्या शेवटच्या दहा दिवसांपैकी एका दिवसाच्या रात्री अवतरित झाल्याचं मान्य करतात. पण क़ुरआन हे रमज़ानमध्येच अवतरित झालं, यावर सर्वांचं मतैक्य आहे. क़ुरआन हाच एकमेव ईश्वरी ग्रंथ आहे, जो अवतरण काळापासून जसाच्या तसा आहे, त्यात कोणताही प्रक्षेप झालेला नाहीये. इतर ग्रंथ हे त्यांच्या अवतरणकाळानंतर शेकडो वर्षांनी लिपिबद्ध झाल्यामुळे आणि फक्त मौखिक स्वरूपातच अनेक वर्षे राहिल्याने कालौघात लोकांनी त्यात प्रक्षेप केले. त्यामुळे ते ग्रंथ आता मूळ स्वरूपात राहिलेले नाहीयेत.  पण क़ुरआन याला अपवाद आहे. कारण तो ग्रंथ त्याच्या अवतरणकाळातच लिपिबद्ध करण्यात आला होता, त्यानंतर त्याच लिपीबद्ध क़ुरआनाच्या प्रतीच्या अनेक प्रती बनवून जगभरात पाठविल्या गेल्या होत्या. त्यामुळे तो आजही शुद्ध स्वरूपात आहे. त्याच ईश्वरी ग्रंथांच्या अवतरणामुळे रमज़ान या रमज़ान-उल-मुबारक बनला, त्याला एवढं मांगल्य प्राप्त झालं आहे. अशा या मंगलमयी रमज़ानच्या सर्वांना सदिच्छा!

- नौशाद उस्मान

औरंगाबाद 9029429489 



मुस्लिमांसाठी कुरआन समजून वाचण्यासाठी एवढेच कारण पुरेसे आहे की हा इश्वरीय ग्रंथ आहेद्द ’कुरआन’ हा अरबी भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ ’वाचणे’ असा आहे. हा जगातील सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ असल्याकारणाने हे नाव या ग्रंथाला सार्थक असेचे आहे.

अवतरणाची सुरुवात

प्रेषित मुहम्मद (सल्लम) हे मक्का शहराचे रहिवासी होते. ते एक गंभीर प्रवृत्तीचे व्यक्ती होते. त्यांची सचोटी व प्रामाणिकपणा सर्व शहराला माहीत होता. वयाची 40 वर्षे संपून त्यावर काही महिने झाले आणि अचानक त्यांना खरी स्वप्नं पडू लागली. स्वप्नही इतकी स्वच्छ की जशी आपण दिवसांच्या उजेडात घटना घडतांना पाहतो तशी. रात्री ते जे स्वप्नात  पाहतं दिवसा अगदी तशाच घटना घडतं. त्यामुळे ते अंतर्मुख झाले आणि मक्का शहराच्या जवळ असलेल्या एका उंच अशा टेकडी मध्ये एका गुहेत जाऊन तासनतास बसू लागले. ती गुहा आजही अस्तित्वात असून तिचे नाव गारे हिरा असे आहे. एकांतात बसून आपल्याला पडत असलेल्या स्वप्नांबाबत चिंतन करत असतांना एके दिवशी अचानक एक देवदूत त्यांच्या समोर प्रकट झाला, ज्याच्या आगमनामुळे ती गुहा प्रकाशमान झाली. त्या देवदूताने ह. मुहम्मद (सल्लम) यांना सांगितले की वाचा त्यावर ह. मुहम्मद (सल्लम) उत्तरले की, मला वाचता येत नाही. तेव्हा त्या देवदूताने त्यांना जोरात मिठी मारली व म्हणाला वाचा तेव्हा त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिले की, मला वाचता येत नाही. तेव्हा त्या देवदूताने त्यांना पुन्हा मीठी मारली. तिसऱ्या मिठी नंतर मात्र ह. मुहम्मद सल्लम यांनी देवदूताने उच्चारलेल्या वाक्यांची पुनरूक्ती केली, त्यातील पहिली आयत होती-

‘‘वाचा, हे पैगंबर सल्लम. आपल्या पालनकर्त्याच्या नामासहित ज्याने  (सूरे अलक क्र 96: आयत क्र 1)

दुसरी आयत होती-

’निर्माण केले, गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली.’  

(सूरे अलक़ क्र 96: आयत क्र 2)

येणे प्रमाणे कुरआनच्या अवतरणाची सुरुवात झाली. या दिव्य घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की प्रेषित मुहम्मद सल्लम हे निरक्षर होते म्हणून कुरआन हा इश्वरी ग्रंथ आहे. कारण एक निरक्षर माणूस एवढ्या उच्च कोटीचा ग्रंथ निर्माण करूच शकत नाही जो ग्रंथ समस्त मानवजातीच्या कल्याणाचे मार्गदर्शन करू शकेल.  

कुरआन वाचण्यासाठीचे कारण क्रमांक 1)

माणसाला समूह जीवनात राहावे  लागते, मग तो समूह एका कुटुंबाचा छोटा समूह असो किंवा एका राष्ट्राचा मोठा समूह असो. जसे कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही नियम तयार करणे गरजेचे असते तसेच राष्ट्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या प्रगतीसाठी सुद्धा काही नियम करणे गरजेचे असते. 

आता प्रश्न हा निर्माण होतो की हे नियम कसे असावेत? तर त्याचे उत्तर असे आहेत की सर्वांना समान संधी देणारे आणि सर्वांना समान न्याय देणारे असावेत. 

मग असे नियम कोण करू शकतो? तर त्या बाबतीत आंतरराष्ट्रीय ख़्यातीप्राप्त विचारवंत सय्यद अबूल आला मौदुदींचे मत खालीलप्रमाणे आहे. म्हणतात की-

माणूस कितीही उच्च दर्जाचा असो, एक असो का त्याच्यासारखे अनेक असोत, सर्वांनी मिळून प्रयत्न केले तरी मानवी ज्ञान प्राप्त करण्याच्या स्वाभाविक मर्यादा,  त्याच्या बुद्धिमत्तेची मर्यादित झेप, त्यावर पुन्हा इच्छा आकांक्षांचा प्रभाव, इतरांच्या बाबतीत पक्षपात करण्याची त्याची सहज प्रवृत्ती या सर्व गोष्टींपासून माणसाला मुक्ती मिळविणे कदापि शक्य नाही, म्हणून या गोष्टीची शक्यता शून्य आहे की तो एक अशी व्यवस्था बनवू शकेल जी सर्वांना शंभर टक्के न्याय देऊ शकेल. (संदर्भ: तफहिमात खंड 3 पान क्रमांक 14) .   म्हणून मानवतेला न्याय देणारी व्यवस्था निर्माण करावयाची असेल तर तुम्हाला कुरआन समजून वाचावे लागेल.

कुरआन वाचण्यासाठीचे कारण  क्रमांक:2)

इस्लाम पृथ्वीतलावरील एकमात्र (खरा) सनातन धर्म आहे. कारण या पृथ्वीतलावर आलेल्या पहिल्या जोडप्यापासून आज एकविसाव्या शतकात राहणाऱ्या आधुनिक 800 कोटी लोकांपर्यंत सर्वांसाठी यात मार्गदर्शन उपलब्ध आहे. 

ईश्वरी मार्गदर्शनाशिवाय मानवी समूहाचे जीवन निश्चितपणे भरकटते. याचे पुरावे आपल्या अवतीभवती इस्तस्त विखुरलेले आहेत. आज माणसेच माणसावर वर्चस्व गाजवत आहेत. त्यांना गुलामाप्रमाणे वागणूक देत आहेत. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्यांवर अत्याचार करत आहेत. त्यातल्यात्यात महिला आणि मुलींवर तर जास्त अत्याचार करत आहेत. दारूपासून ड्रग्जपर्यंत मानवी जीवनाला उद्ध्वस्त करणारी विषारी द्रव्ये विकत आहेत. खोटं बोलत आहेत. विश्वासघात करत आहेत. व्याभिचार करत आहेत. बलात्कार करत आहेत. एक ना अनेक वाईट गोष्टी करत आहेत. यांचे दुष्परिणाम त्यांना व त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर सर्व समाजाला भोगावे लागत आहेत. 

हे वाचून साहजिकच आपल्या मनात एक प्रश्न उत्पन्न होईल की हे सर्व सामाजिक प्रश्न आहेत व हे प्रश्न हाताळण्यासाठी देशातील पोलीस व न्यायालये समर्थ आहेत, त्यांचे ते पाहून घेतील, त्यासाठी कुरआन वाचण्याची गरज काय? तर या प्रश्नाचे उत्तर असे की, शेकडो वर्षांपासून जगातील प्रत्येक देशात अनेक पोलीस स्टेशन्स अस्तित्वात आहेत, न्यायालये आहेत, कायदे आहेत, वकील आहेत, न्यायाधीश आहेत, आणि हे सर्व मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करीत आहेत. मग हे प्रश्न संपलेत का?  गुन्हेगारी थांबली का? स्पष्ट आहे, याचे उत्तर नाही असेच आहे. उलट ही खल प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि कर्करोग पसरावा तशी पसरत आहे. तिने सर्व समाजाला विळखा घातलेला आहे. त्या विळख्यात अडकलेला समाज गुदमरत चाललेला आहे. 

तर मॉरल ऑफ द स्टोरी अशी की, कायदेशीर कारवाई करून माणसाच्या खल प्रवृत्तीला लगाम लावता येत नाही तर त्याच्या अंतःकरणात दबलेल्या अवस्थेत असलेल्या सदप्रवृत्तीला चालना   दिल्यास या खल प्रवृत्तीला आपोआपच लगाम बसेल. या सद्प्रवृत्तीला खतपाणी घालण्यासाठी म्हणून कुरआनवाचणे गरजेचे आहे.

तुम्ही जोपर्यंत कुरआन वाचणार नाहीत तोपर्यंत यासंबंधी ईश्वरी मार्गदर्शन काय आहे हे तुम्हाला कळणार नाही व साहजिकच तुम्ही खलप्रवृत्ती सोडणार नाही. तुम्ही जर मन लावून मातृभाषेत कुरआन वाचला तर त्यातील आयाती तुमच्या लक्षात येतील, त्यांचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होईल व तुमच्या अंतःकरणातील सदप्रवृत्तींना चालना मिळेल, मग तुम्ही आपोआपच वाईट गोष्टींच्या जवळ देखील फिरकणार नाही. 

हा केवढा मोठा फायदा आहे? याचा डोळे बंद करून, खोल श्वास घेऊन, शांतपणे मनन करून पाहा, तुमचे अंतःकरण स्वतः तुम्हाला ग्वाही देईल की चल उठ...! आपण कुरआन वाचू या. यासाठी म्हणून तुम्हाला कुरआन समजून वाचावे लागेल.

कुरआन वाचण्यासाठीचे कारण क्रमांक 3)

मानवाला यशस्वीपणे जगण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. आपल्या या गरजेच्या पूर्ततेसाठी तो अनेक मार्ग चोखाळत असतो. त्यापैकी वाडवडिलांपासून चालत आलेल्या परंपरा हा प्रमुख मार्ग आहे.

जगातील सर्वाधिक माणसं आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या धार्मिक परंपरांमधून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करत असतात. हा प्रकार अत्यंत घातक असतो, कारण यातून चूक होत असते. वाडवडील जर चुकीच्या मार्गाने जगले असतील तर आपणही त्याच चुका करण्याची शक्यता असते. वाडवडिलांसाठी जो नैसर्गिक सन्मानाची भावना आपल्या मनात असते त्यामुळे त्यांच्या चालीरीतींची वस्तुनिष्ठ समीक्षा करण्याच्या भानगडीत न पडता त्या आहेत तशाच अवलंब करण्याकडे माणसाचा कल असतो आणि हा कलच माणसाला खऱ्या मार्गदर्शनापासून वंचित ठेवतो.

सृष्टीच्या अस्तित्वाची गरज काय?

या सृष्टीच्या अस्तित्वाची गरज काय? ती का निर्माण करण्यात आली? कोणी निर्माण केली? हे समजण्यासाठी माणसाला खरे ज्ञान असणे आवश्यक असते. शिवाय माणसाला नैतिकतेची काय गरज आहे? आपण अनैतिक वागलो तर काय फरक पडतो? संस्कृती म्हणजे काय? ती कशी आकार घेते? समाजामध्ये कसे राहावे? समाजाची उभारणी कोणत्या पायावर करावी? त्यासाठी कोणते नियम असावेत? हे सर्व जाणणे माणसासाठी आवश्यक आहे.

साहजिकच हे मार्गदर्शन ईश्वरी असायला हवे तरच ते सर्वांसाठी समान उपयोगी राहील. याच कामासाठी ईश्वराने प्रेषित पाठवले. प्रेषित कोणाला म्हणतात? या पृथ्वीतलावर किती आणि कोठे-कोठे प्रेषित आले?  त्यांचे काय झाले? त्यांनी कोणते मार्गदर्शन आणले होते? त्यांचा इन्कार करणाऱ्यांना कुठले परिणाम भोगावे लागले? त्यांचा कसा विनाश झाला? अंतिम प्रेषित कोण आहेत? त्यांचे जीवन कसे होते? त्यांचे मार्गदर्शन काय आहे? त्याचा स्वीकार केल्याने आपल्याला काय लाभ होईल? त्याचा इन्कार केल्याने आपल्याला कोणत्या नुकसानाला सामोरे जावे लागेल? या संबंधीची इत्यंभूत

 माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. कारण प्रेषितांचा इन्कार केल्यामुळे जी चंगळवादी जीवनशैली माणूस निवडतो ती त्याला एकट्यालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला सामुदायिक अपयशाच्या खोल दरीत ढकलते? हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. चंगळवादी  जीवनशैलीची निवड करणाऱ्यांचे जीवन तणावपूर्ण तर मृत्यू वेदनादायी कसा होतो? आणि मृत्युपरांत अनंत काळासाठी त्याला कोणत्या यातना सहन कराव्या लागणार आहेत? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला कुरआन समजून वाचावे लागेल. कारण दुसरा कुठलाही ग्रंथ तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही.

यासंबंधी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात-

हिदायत की अहमियत

इंसान को दुनिया मे जिंदगी बसर करने के लिए रहनुमाई (मार्गदर्शन) की ज़रूरत होती है. अपनी और अपने कायनात (सृष्टी) और अपने वजूद (अस्तित्व) की गर्ज़ो-ओ-गायत (आवश्यकतायें) समझने के लिये जो इल्म (ज्ञान) उसे दरकार (आवश्यक) है, और अपने अख़लाख़ (नैतिकता), तहेजीब (चालचलन), मुआशरत (सामाजिकता) और तमद्दुन (संस्कृती) को सही बुनियादों पर कायम करने के लिये, जिन उसूलों का वो मोहताज (विवश) है, उन सब के लिये उसे सिर्फ अल्लाह रब्बुल आलमीन को अपना रहनुमा (मार्गदर्शक) तस्लीम (स्वीकार) करना चाहिये, और सिर्फ उसी हिदायत (उपदेश) की पैरवी इख्तीयार (स्विकार) करनी चाहिये जो अल्लाहने अपने रसूलोंके ज़रिये से भेजी हैं.

अल्लाह को छोडकर किसी दुसरे रहनुमा की तरफ तरफ हिदायत के लिये रूजू करना और अपने आप को उसकी रहनुमाई के हवाले कर देना इंसान के लिये बुनियादी तौर पर एक गलत तरिका-ए-कार है. जिसका नतिजा हमेशा तबाही की सूरत मे निकला है और हमेशा तबाही की सूरत मे ही निकलेगा.

(संदर्भ : तफहिम-उल-कुरआन जिल्द दो पेज नं 7)

मानवी मार्गदर्शन

ईश्वराला सोडून कुठल्या दुसऱ्या मार्गाने मार्गदर्शन घेण्याची दुसरी एक घातक परंपरा समाजात रूढ आहे. जिचा परिणाम नेहमीच भयानक राहिलेला आहे. अनेक अंधश्रद्धांचा जन्म यातूनच झालेला आहे. अनेक महिला याच मानसिकतेतून जीवनातून उठलेल्या आहेत. याच कारणामुळे मानवता अनेकदा उद्ध्वस्त झालेली आहे. हे मार्गदर्शन मानवी मार्गदर्शन होय. 

संत, महात्मे, बूवा, बाबा, पीर, फकीर कितीही विद्वान असले तरी शेवटी माणसंच असतात आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे, हे आजपर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे व रोज होत आहे. असे कितीतरी लोक जे स्वतःला संत, महात्मे म्हणवून घेतात, अत्यंत घाणेेरड्या कारणासाठी तुरूंगात जाऊन आलेली आहेत. ते काय मार्गदर्शन करणार? त्यांच्यातील काही मंडळी खरोखरच चांगल्या प्रवृत्तीची जरी असली तरी त्यांच्या मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेवर नैसर्गिक मर्यादा असतात. म्हणून शेवटी ईश्वरी मार्गदर्शन हेच सुरक्षित मार्गदर्शन होय. आणि जगामध्ये कुरआन हे एक असे मार्गदर्शन आहे की ज्याच्या ईश्वरी आणि सुरक्षित असण्यावर कोणताही संतुलित बुद्धीचा माणूस शंका घेऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला कुरआन समजून वाचावे लागेल.

कुरआनला न समजता वाचण्याची (तिलावत करण्याची) एक परंपरा अनेक शतकापासून सुरू आहे. अशा पठणाने पुण्य जरी मिळत असले तरी मार्गदर्शन मिळत नाही आणि जोपर्यंत मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत माणूस नीट वागत नाही. जोपर्यंत माणूस नीट वागत नाही तोपर्यंत समाज नीट राहत नाही. म्हणून या रमजानमध्ये संपूर्ण कुरआन समजून वाचण्याचा दृढनिश्चय करू या. ज्यांनी हा निश्चय पूर्ण केला त्यांना स्वतःलाच रमजान संपल्यानंतर आपल्यात चमत्कारिक बदल झाल्याचे लक्षात येईल. 


-एम. आय. शेख,

लातूर



रमजान परिचय या आजच्या लेखात आपण रमजानविषयी माहिती पाहणार आहोत. कारण माझ्या सर्व धर्मीय बंधू-भगिनींच्या मनात रमजान विषयी काही प्रश्न असतात. त्यांना वाटतं की रमजान म्हणजे रोजा, उपाशी राहणे व संध्याकाळी विविध पदार्थ खाणे. तर एवढाच काय तो मर्यादित अर्थ त्यांना माहीत असतो तर त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने हा रमजानचा लेख लिहिलेला आहे.

1- रमजानचा मूळ उद्देश काय आहे? रमजानचा मूळ उद्देश आहे  ’तक़वा’. तक़वा म्हणजे काय तर ईशभय, पापभीरुता माणसांमध्ये निर्माण करणे. तकवा काय आहे याच उत्तर देताना हदीसमध्ये सांगितलं गेलं की जेव्हा तुम्ही काटेरी रस्त्यातून चालता तेव्हा आपले कपडे कसे सांभाळून-सांभाळून चालता तसेच या जगात वावरताना पापांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला असच सांभाळून चालावे लागेल. काय आहे ना मनुष्य हा कमजोर मनाचा आहे. म्हणजे या जगातील मोहमायेत गुरफटून तो पाप करतो. पाप करतो म्हणण्यापेक्षा त्याच्या हातून पाप घडते.

उदा: खोटे बोलणे... सर्वांना माहिती आहे की ही वाईट गोष्ट आहे तरी आपण खोटे बोलतो, का बोलतो? कधी नाइलाज म्हणून, कधी स्वार्थासाठी कधी वेळ मारून नेण्यासाठी इ.पण आपल्याला माहीत आहे ना की याच्यामुळे स्वतःचे आणि समोरच्याचेही नुकसान होणार आहे, तरीही आपण खोटे बोलतो. मनाला माहीत असतं की हे चुकीचं आहे. कारण मनुष्य हा फितरत वर म्हणजे निरागस जन्माला घातला गेलेला आहे. या जगात येऊन तो वाईट गोष्टी शिकतो. त्याची ही फितरत कुठेतरी दबलेली असते. होते काय तर रोजामुळे ही चांगली फितरत बाहेर येते आणि  मनातील नकारात्मकता बाहेर काढायला मदत होते. म्हणजे एखादं भांड काळवंडलं की आपण साबणाने त्याला स्वच्छ करतो. मनाचं असं नाहीये ना... मनाला स्वच्छ व निर्मळ करण्यासाठी कोणताही साबण नाही तर ते स्वच्छ करण्यासाठी आत्मशुद्धीकरण आवश्यक आहे, ते ’रोजा’ने साध्य होतं.

तर आता हे रोजांनी कसं काय शक्य आहे? कारण रोजा तर पोटाचा असतो, उपाशी राहण्याचा असतो, मग तो आत्म्याची ताकद कशी काय बरं वाढवतो? तर त्याचं उत्तर असं आहे की आपलं शरीर जे आहे ते दोन घटकांनी मिळून बनलेलं आहे, एक बाह्य शरीर - जे आपल्याला दृष्टीस पडतं ते आणि दुसरं-जो मूळ आणि महत्त्वाचा आहे तो म्हणजे आत्मा. कारण मृत्यूपश्चात हा आत्माच ईश्वराकडे जाणार आहे आणि त्याच्याशीच त्याच्या कर्माचा सवाल-जवाब होणार आहे. तर शरीराचे लाड आपण खूप पुरवतो. त्याला अन्न, पाणी, ऐश, आराम सगळं देतो, उलट आवश्यकतेपेक्षा जास्तच देतो. आणि त्याच्यामुळे काय होतं आत्म्याकडे लक्ष द्यायचं राहून जातं. आत्म्याचं खाद्य काय आहे तर त्याला ज्या ईश्वराणे निर्माण केले त्याचे आदेश पाळणं, त्याची उपासना करणे आणि ह्या गोष्टी जेव्हा आत्म्याला मिळत नाहीत तेव्हा तो तकव्यापासून दूर होत जातो.  रमजानमध्ये काय करतो तर श्रद्धावंत आत्म्याकडे जास्त लक्ष देतो, त्याला त्याचे खाद्य पुरवतो. शरीराला तीन गोष्टींची खूप आवड असते-

1-जास्त खाणे

2- जास्त शारीरिक सुख

3- जास्त झोप व आराम

रोजा या गोष्टींवर बंधन आणतो. खरे पाहता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वाईट नाहीत, ईश्वराने यांना हलाल केलेलं आहे. पण रमजानमध्ये रोजाधारकांसाठी ह्या गोष्टी वर्ज्य असतात. 

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, दिवसभर तो अन्न व पाणी घेत नाही, त्याला शारीरिक संबंध ठेवता येत नाहीत तसेच प्रार्थना जास्त असल्यामुळे आणि जेवण नसल्यामुळे त्याच्या झोपण्यावर, आरामावर आपोआपच बंधन येतं. तर काय होतं आता या गोष्टी हलाल असून सुद्धा तो त्याच्यावर संयम राखतो आणि जर हलाल गोष्टीपासून तो संयम राखण्यात सफल झाला तर हा त्याचा संयम जो आहे तो हरामपासून देखील दूर राहण्यात त्याच्या कामी येतो. म्हणजे त्याचं मनोधैर्य आपोआपच वाढतं. मग ज्या वाईट गोष्टी सोडणं व चांगल्या गोष्टी आत्मसात करणं त्याला एरवी जमत न्हवतं ते तो आता रोजाच्या मनोबलामुळे साध्य करू शकतो.

रमजान महिन्याचे महत्त्व काय आहे तर रमजान महिन्यामध्ये एक रात्र आहे जिला ’लैलतुलकद्र’ असं म्हटले जाते. या रात्रीमध्ये पवित्र कुरआनग्रंथ अल्लाहने स्वर्गातून आपले देवदूत जिब्राईलमार्फत खाली उतरवला. आणि नंतर 23 वर्षं देवदूत जिब्राईल अलै.या कुरआनचे श्लोक विविध प्रसंगी प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यापर्यंत पोहचवत गेले. तर कुरआन हा ग्रंथ रमजानमध्ये उतरल्यामुळेच या महिन्याचे खूप जास्त महत्त्व आहे. महत्त्वाचे म्हणजे कुरआन हा केवळ मुसलमानांसाठीचा ग्रंथ नव्हे तर तो सर्व मानवजातीसाठी आहे. कुरआनमध्ये प्रबोधन करताना अल्लाह संबोधतो की ’या अय्युहन्नास’ म्हणजे हे तमाम लोकहो, फक्त मुस्लिम न्हवे.

कुरआन आपल्याला जीवन जगण्याची पद्धत शिकवतो. कुरआन व हदीसमध्ये व्यवस्थित व परिपूर्ण अशी सामाजिक व्यवस्था, कौटुंबिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, आर्थिक  व्यवस्था, न्यायालयीन व्यवस्था, आध्यात्मिक व्यवस्था असे सर्वच क्षेत्रांत जीवन जगण्याचे परिपूर्ण नियम सांगितले आहेत. जर प्रत्येक माणसाने यावर आचरण केले तर जगातील सर्व समस्या दूर होतील. किंबहुना जगात समस्या आहेतच यामुळे की माणूस कुरआनच्या शिकवणीपासून दूर गेला आहे. त्यामुळे रमजान महिन्यांमध्ये प्रार्थनेद्वारे माणसाला पुन्हा कुरआनच्या जवळ केले जाते. रमजानमध्ये कुरआन पठण, कुरआन अध्ययनावर जोर दिला जातो. नेहमी असणाऱ्या ज्या पाच फर्ज (अनिवार्य) व्यतिरिक्त तरावीहची अतिरिक्त नमाज अदा केली जाते. त्यामध्ये कुरआन पठण व त्याचा खुलासा सांगितला जातो. त्यामुळे मुसलमान पुन्हा कुरआन संस्मरण करतो, अंमलात आणतो. तसेच या ’ लैलतुल कद्र’ नामक रात्रीमध्ये मुस्लिम अल्लाहकडे आपल्या कळत-नकळत झालेल्या गुन्ह्याची खूप माफी मागतो, प्रायश्चित करतो. त्याची ही विनवणी अल्लाह ऐकतो, त्याचे पाप क्षमून टाकतो, अट फक्त एकच असते की तो गुन्हा त्याने पुन्हा पुन्हा करू नये. त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत राहावे. इतर माणसांना त्रास देऊ नये.

तसेच ही रात्र रमजान महिन्यात नक्की कधी आहे हे अल्लाहने उघड केलेले नाही. हदीसींद्वारे ही शेवटच्या दहा दिवसांतील विषम रात्र असल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे मुसलमान पूर्ण रमजानभर दुआ व अस्तग़फार करतोच पण  शेवटच्या या पाच रात्रींमध्ये जागून जास्त प्रार्थना करून जास्त माफी मागतो. मन पवित्र पवित्र करत जातो.

आता आपण रमजानमधील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे जकात. एक असते आपले अल्लाहप्रति कर्तव्य व दुसरे आपले इतर माणसांप्रती कर्तव्य. म्हणजे पुण्य कर्म फक्त नमाज अदा करणे किंवा तसबीहच्या माळा जपणे इथपर्यंत मर्यादित असू शकत नाही तर ते पूर्ण मानवजातीचे भले करणारे असावे. आणि जकात हा पूर्ण मानवजातीचे भले करणारा अल्लाहचा एक फर्ज म्हणजे अनिवार्य-बंधनकारक आदेश आहे.

काय आहे हा जकातचा आदेश? तर प्रत्येक मुसलमानाने वर्षभर कमावलेल्या पैशांमधून शिल्लक राहिलेल्या वर्षभराच्या रकमेवर त्याच्याकडे असलेल्या बँक बॅलन्स, सोने नाणे, चांदी इ.वर 2.5% जकात द्यावी. म्हणजे तेवढी रक्कम कुरआनमध्ये सांगितल्याप्रमाणे दान करावी. ज्या इसमाकडे मग ती स्त्री असो की पुरुष, साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन्न तोळे चांदी असेल किंवा या वजनाच्या रकमेएवढी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असेल त्याने ही जकात देणे बंधनकारक असते. तसेच हे काम तो रमजान किंवा इतर महिन्यातही करू शकतो.

आजच्या स्थितीला आपण पाहाल की भारताची अर्थव्यवस्था खूप विषम झाली आहे. श्रीमंत जास्त श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब जास्त गरीब होत चालला आहे.शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे. त्याचे कारणही  व्याजावर आधारित कर्जपद्धती आहे. हे व्याज घेणेदेणे ही इस्लाममध्ये हराम आहे, तो वेगळा मुद्दा आहे. तो आपण नंतर इतर एखाद्या भागात पाहू. इथे महत्त्वाचे हे की आपण जे जकातबद्दल बोलतोय ती अडीच टक्के जकात जर प्रत्येकाने व्यवस्थितपणे गरजूंना दिली तर ही विषमतेची दरी भरण्यास मदत होते. गरिबांच्या अन्न, वस्त्र, निवारा, त्यांच्या मुलांचे शिक्षण किंवा त्यांना छोटेमोठे उद्योग सुरु करून देणे व इतर अनेक स्वरूपात ही ज़कात कामी येते व मानवजातीचे भले होते. गरीब श्रीमंत दरी कमी होते. पैसा एकाच वर्गाकडे जमून राहत नाही.

तसेच मुसलमानाने फक्त हे अडीच टक्के जकात देऊन थांबायचे नाही तर अल्लाह सांगतो की तुम्ही जकात व्यतिरिक्त सुद्धा इतर दान करत राहा ज्याला ’सदका’ म्हणले जाते आणि त्याच्या काही मर्यादा नसतात, ते प्रत्येक मुस्लिमाच्या स्वेच्छेने कितीही असू शकते आणि  वेगवेगळ्या स्वरूपांत असू शकते. म्हणजे एखाद्याला चांगला सल्ला देणे याला सुद्धा सदका म्हणले गेले आहे.

यानंतर आपण रोजाचे वैज्ञानिक फायदे पाहू या- वैज्ञानिक दृष्टिकोनातून रोजामुळे बरेच शारीरिक व मानसिक फायदे होतात. माणसाची पचनसंस्था ही सतत कार्यरत असते. तिला कधीच आराम मिळत नाही. आपण झोपलो तरी पचनाचे कार्य सुरूच असते. रोजामध्ये जवळपास 12 ते 14 तास अन्न व पाणी ग्रहण न केल्याने पचनसंस्था सुधारते, तिची कार्यक्षमता वाढते. चुकीची आहारपद्धती ही आजकल सर्वांचीच समस्या बनली आहे. त्यामुळे शरीरात चरबी साचू लागते. 14 तास उपाशी राहिल्याने शरीराला लागणारी ऊर्जा शरीर ही चरबी वितळवून तेथून प्राप्त करते. त्यामुळे काही अंशी वजन कमी होते जो सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. चरबीच्या गाठी ज्या बारीक गाठी असतात ज्या रक्तवाहिन्यांत चिटकून पडलेल्या असतात. उपाशी राहिल्याने ऊर्जेसाठी त्या काही प्रमाणात शोषल्या जातात व त्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. संशोधनातून हेही आढळून आले आहे की, शरीरात जर काही कॅन्सर पेशींची वाढ झालेली असेल तर उपाशी राहिल्याने त्याची वाढ थांबते आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो. या सर्व प्रक्रियांमधून एकंदरीतच शरीर डिटॉक्सिफाय होते म्हणजे विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर फेकली जातात.

रोजामध्ये भांडण, शिवीगाळ,चुगली, हेवेदावे, मत्सर, क्रोध, अश्लीलता हे सर्व निषिद्ध आहे. इथे नमूद करणे आवश्यक आहे की रोजा व्यतिरिक्त एरवी सुद्धा या गोष्टी पापच आहेत, मनाई आहे. रमजानमध्ये फायदा असा होतो की रोजा असल्याने किंवा कुरआन पठण, प्रार्थना याच्यामध्ये माणूस तल्लीन असल्याने सावधपणे त्या गोष्टी टाळल्या जातात. श्रद्धावंतांची जीभ सावरली जाते. भांडण तंटा होत नाही मग मनःशांती मिळते, मनाची ताकद वाढते. मनाची सकारात्मकता वाढते व नकारात्मकता कमी होत जाते. शरीर व मन दोन्ही सुदृढ होतात. तसेच  रमजानमध्ये नमाज व सजदे जास्त होतात, लांब होतात त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. मेंदूची कार्यक्षमता वाढते.

 जर एखाद्याला वाईट व्यसन वगैरे असेल जसे दारू, तंबाखू,सिगरेट, ड्रग्स वगैरे ज्या हराम गोष्टी आहेत, रोजामध्ये माणूस घेऊ शकत नाही. विज्ञानच्या संशोधनातून असे आढळले आहे की कोणतीही गोष्ट तीन आठवडे सलग केली की मग पुढे ती करणे सोपी होते, म्हणजे ती स्वभावात पक्की बसते. तेव्हा ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल असे व्यसनी लोक रमजाननंतर सुद्धा या व्यसनापासून दूर राहू शकतात. वाईट गोष्टी टाळू शकतात.


- मिनहाज शेख

पुणे


एखाद्याचे आगमन हे सहसा आनंददायी असते आणि त्याच्या स्वागताची तयारीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता कोण येणार आणि त्याची तयारी कशी करणार हा वेगळा विषय आहे. सध्या आपण रमजानबद्दल बोलत आहोत आणि त्याचे आगमन केवळ मुस्लिमांसाठीच नाही तर मुस्लिम समाजाव्यतिरिक्त जगातील प्रत्येकासाठी एक अतिशय चांगली आणि धन्य करणारी बातमी आहे.

अरबी कॅलेंडर प्रमाणे बारा महिन्यांच्या यादीत रमजान हा नववा महिना. रमजान महिना म्हणजे कुरआन, धर्मपरायणता, संयम, करुणा, दया, प्रेम आणि आपुलकी, परोपकार, मानवजातीची सेवा, अल्लाहच्या मार्गात स्थिरता, एकात्मता आणि एकतेच्या भावनेचा प्रकटीकरणाचा महिना. अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांचे अंतहीन गुणगान करण्याचा महिना. 

या महिन्याची बरकत प्राप्त करण्यासाठी, काही गुणांची आवश्यकता असते. ते गुण विकसित करण्यासाठी आपणा स्वतःला तयार व्हावे लागेल. आपल्याला माहीत आहे की रमजानमध्ये कुरआनचे अवतरण झाले, रोजे अनिवार्य झाले, बदरची लढाई झाली, शबे कद्र साजरी झाली, मक्का जिंकला गेला, त्यामुळे या महिन्याला विशेष महत्त्व दिले जाते. मग या महिन्यात जकात, इनफाक आणि सदका यांचे मोठ्या प्रमाणावर दान केले जाते. रमजान महिन्यात उपासनेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. या महिन्याचे आपण योग्य सन्मानाने स्वागत करणे महत्त्वाचे आहे. रमजानच्या आगमनापूर्वी, त्यासाठी आपण आंतरिक आणि बाह्यस्व तयार होऊ या. रमजान कुरआनच्या अवतरणाचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त कुरआनचे पठण करण्याचे नियोजन करावे. केवळ अरबी भाषेत कुरआनचे पठण न करता त्याचा आपल्या मातृभाषेतील अनुवाद वाचावा, तो समजून घ्यावा, तो आचरणात आणावा व इतरांनाही तो समजावून सांगावा. 

   दृढ निश्चय करावे की, खोटे बोलणार नाही, भांडण करणार नाही, कोणाला त्रास देणार नाही, शिवीगाळ करणार नाही. कोणी भांडायला आला, शिवीगाळ करू लागला तर उत्तरादाखल एवढेच म्हणावे ’बाबारे! माझा रोजा आहे!’ कोणाशी हुज्जत घालू नये. शेजाऱ्यांची काळजी घ्यावी. त्यांचे मन दुखवू नये. शेजाऱ्यांना त्रास देऊ नये. इफ्तारच्या वेळी त्यांना विसरू नये.

   रात्री तरावीहच्या नमाजनंतर विनाकारण बाहेर फिरू नये. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने पहाटे सहरीला जागे होणे कठीण जाते. रात्री वेळेवर झोपण्याचे व पहाटे लवकर जागे होण्याचे नियोजन करावे. त्यामुळे तहाज्जुदची नमाज पठण करणे सुलभ होईल. हा बरकत देणारा महिना आहे. या महिन्यात उपजीविका वाढविली जाते. चला तर मग, रमजानचे स्वागत करण्यासाठी आपण सारे सज्ज होऊ या!

-   सय्यद झाकीर अली, परभणी.

मो.9028065881


काळाचे हे चक्र आम्ही लोकांमध्ये आळीपाळीने फिरवतो. कोण अल्लाहशी एकनिष्ठ आहेत हे जाणून घेण्यासाठी. पवित्र कुरआनमधील सूरह आलिइमरान मधील आयत क्र.140मध्ये अल्लाहने ही गोष्ट सांगितली आहे. ह्या आयतीचा संदर्भ तसे उहुदच्या युद्धाशी होता, ज्यामध्ये मुस्लिमांना काही अंशी पराजय पत्करावा लागला होता. ह्या आयती अगोदरच्या आयतीत तो संदर्भ अल्लाहने वर्णन केलेला आहे की सध्या तुम्हाला दुःख पोहोचले आहे, पण तुमच्या आधीच्या लोकांनादेखील अशाच दुःखाला सामोरे जावे लागले होते. कारण अल्लाहला ही माहिती करून घ्यायची होती की कोण अल्लाहशी एकनिष्ठ आहेत आणि तसेच तुमच्यामधीन काहींना या घटनेवर साक्षीदार करायचे होते. जे लोक त्या वेळी उहुदच्या युद्धास सामोरे गेले त्यांना संबोधून अल्लाह म्हणतो की तुम्ही स्वर्गात जाणार हे तुम्ही समजत होता, पण अल्लाहला तर याची परीक्षा घ्यायची होती की तुमच्यामधील कोण धैर्य राखणारे आहेत. अल्लाह म्हणतो की तुम्हाची अजून मृत्यूशी भेट झालेली नसताना तुमची ही अभिलाशा होती. आता मृत्यू तुमच्या समोर आहे. तुमच्या डोळ्यांदेखत तुम्हाला याची जाणीव होईल की अल्लाहच्या आज्ञेशिवाय कुणाला मृत्यू येत नाही आणि तो केव्हा, कधी, कसा येईल हे सर्व एके ठिकाणी नोंदवलेले आहे.

ह्या साऱ्या गोष्टी ज्या अल्लाहने म्हटल्या आहेत याचा सारांश एकच की जे काही तुम्हाला आज दुःखातून जावे लागत आहे ते असे नाही की हे सर्व काही तुमच्याचबरोबर घडत आहे. तुमच्या आधी दुसऱ्यांना त्रास सहन करावा लागला होता. आज तुम्हाला त्या यातना सहन कराव्या लागत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हे अल्लाहने ठरवलेले होते. तो त्याचा निर्णय होता. त्याला हे पाहायचे होते की कोण त्याच्याशी एकनिष्ठ आहे आणि कोण यातनांना सामोरे जाऊनदेखील अल्लाशी एकनिष्ठ असतो. श्रद्धेवर ठाम राहतो. म्हणजे जगाचा हा सारा कारभार एका योजनाबद्ध रीतीने चालतो. उहुदच्या वेळी मुस्लिमांना जो पराभव पत्करावा लागला होता तोदेखील अल्लाहच्या योजनेचाच एक भाग होता, कारण विजय आणि पराजयदेखील आळीपाळीने लोकांना मिळत असतात. कोणत्याही एका समूहाची यावर कायम मक्तेदारी नाही. ही गोष्ट अल्लाहने ह्या आयतीमधील जो मूळ उद्देश सांगितला आहे त्याद्वारे लोकांना ठणकावून सांगितले आहे की आम्ही काळाला कुणा एका जनसमूहासाठी नव्हे तर साऱ्या मानवांसाठी निर्माण केले आहे. काळाचा उलटफेर सर्वांसाठी आहे, गोष्ट इतकीच नाही की ते साऱ्या जनसमूहांसाठी आहे. अल्लाह म्हणतो की आम्ही प्रत्येक माणसासाठी काळाचे चक्र विहित केले आहे. तेव्हा जनसमूहांनाच नाही तर प्रत्येक माणसाला त्या कालचक्रातून जावे लागणार आहे.

ह्या आयतीअगोदर ज्या आयती आल्या आहेत त्या अल्लाहच्या ह्या वक्तव्याची पार्श्वभूमी आहे. अल्लाह म्हणतो की तुमच्या पूर्वीदेखील मानवांच्या बऱ्याच काही व्यवस्था होत्या, बराच काळ माणसामध्ये लोटला आहे. ह्या धर्तीवर संचार करा आणि पाहा, ज्या लोकांनी हे मानण्यास नकाल दिला त्यांची कशी गत झाली, कोणत्या परिणामांना त्यांना तोंड द्यावे लागले. त्या आधी अल्लाहने एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की जे लोक आर्थिक टंचाईच्या काळात तसेच आर्थिक विपुलतेच्या काळात आपली संपत्ती जनकल्याणासाठी खर्च करतात म्हणजे काळाचे चक्र फिरत असताना माणसांनी लक्षात ठेवावे की त्यांना जनकल्याणासाठी खर्च करावा लागेल, मग ते आर्थिक टंचाईत असोत की भरभराटीत. याचाही हिशोब जेव्हा काळाचे चक्र बदलेल तेव्हा लोकांकडून अल्लाहला घ्यावाच लागेल. त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि लोकांना क्षमा करावी लागेल. एकदा काळाच्या ओघात माणूस सापडला की त्याला ह्या सर्व गोष्टींचा जाब द्यावा लागेल. लोकांच्या आर्थिक समस्यांच्या फायदा घ्यायचा नाही. सर्वच माणसांना कधी ना कधी एकमेकांशी कर्ज घ्यावे लागत आहे. अशा वेळी कर्जदाराकडून वाटेल ते व्याज घेऊ नये, याचा देखील हिशोब द्यावा लागणार आहे. म्हणजे जेव्हा काळाचे चक्र फिरते तेव्हा एका ठराविक काळात माणसाने काय काम केले, मानवतेसाठी कोणते भले केले, माणसावर कसे अन्याय-अत्याचार केले, आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या ह्या सर्व बाबींचा हिशोब बदलत्या काळात प्रत्येक माणसासमोर ठेवणार आहे. कारण काळाचे चक्र आळीपाळीने प्रत्येक माणसाच्या जीवनात फिरत राहते.

जेव्हा एखाद्या जनसमूहावर आपत्ती कोसळतात त्याचे कारण बाहेरील वातावरणात शोधण्याची गरज नाही. ह्या आपत्तीं माणसामध्येच दडलेल्या असतात. एखादे राष्ट्र म्हणजे त्या राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची विस्तारित ओळख तसेच माणसाचा विस्तार म्हणजे एका सभ्यतेचा उदय. म्हणजे सभ्यतांचा उदय झाल्यानंतर त्याचा ऱ्हास एका माणसाचा ऱ्हास. त्याच्या व्यक्तिमत्त्वात निर्धाराचा अभाव होतो. एका माणसाला जे लागू आहे ते साऱ्या समूहाला लागू होते. माणसापासून जे विधान सुरू होते, त्याचा प्रवास समूहापासून सभ्यतेपर्यंत असतो. याचा अर्थ असा की माणसाला बाहेरील शत्रूंची गरज नसते. त्याचा शत्रू त्याच्या अस्तित्वातच असतो. म्हणूनच काळाचे चक्र साऱ्या मानवांमध्ये फिरत असते जसे पवित्र कुरआनात अल्लाहने सांगितले आहे, माणूस स्वतःच आपल्या विघटनाला कारणीभूत असतो. त्याला बाहेरील शक्तींना दोष देण्याची गरज नाही.

कोणत्याही सभ्यतेची सुरुवात एका ठराविक कालखंडात, एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माणसांद्वारे होते, जसे माणसामधील गुण, अवगुण, क्षमता, नैतिकता, अध्यात्म. त्याचे विस्तारित रूप म्हणजे सभ्यता समूह, सभ्यतेला केंद्रस्थानी न ठेवता अल्लाहने प्रत्येक माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे. जे काही एका माणसाविषयी सत्य आहे तेच एका समूहासाठी सत्य असणार. माणसांना कोणत्या आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे त्याचा स्रोत माणसामाणसांमध्ये दडलेला असतो. जर एका देशाने दुसऱ्या देशावर हल्ला केला तर त्याचे परिणाम सैन्यालाच नाही तर प्रत्येक नागरिकाला भोगावे लागतात. म्हणून काळ प्रत्येकाची परीक्षा घेत असतो. एका जनसमूहाची नाही तर त्या समूहातील एकन् एक सदस्याची परीक्षा घेत असतो. जमिनीत बियाणे घातल्यावर ते उगवणार. एका ठराविक कालावधीत त्यांची वाढ होत राहते.  

त्यानंतर त्यांचे आयुष्य संपते. तसेच काही माणसांच्या जीवनाचे आणि माणसांनी घडवलेल्या सभ्यतेचे असते. त्याचे विघटन होणार. त्याचे कारण म्हणजे स्वनिर्धार संपुष्टात येणे. जसे त्या बियाणापासून उगवलेल्या झाडाचे झाले तसेच. या विश्वाचा आरंभ झाल्यापासून आजपर्यंत आणि एका ठराविक काळापर्यंत सदैव विस्तार होत आहे. त्याचप्रमाणे माणवजातीचे देखील आहे. कारण तोदेखील या विश्वाचाच एक अंश आहे. जसे विश्वात दर सेकंदाला फेरबदल होत असतात तसेच मानवजातीमध्ये देखील फेरबदल होत राहतात. ही दैवी योजना आहे. यालाच काळाचे उलटफेर म्हटले गेले आहे. काळाचे खाली-वर होत राहणे हीदेखील निर्मात्याने ठरवलेली योजना आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वाहनासाठी त्याची चाके अपरिहार्य असतात तशाचप्रमाणे मानवजातीच्या या धर्तीवरील प्रवासासाठी काळाचे चक्र अपरिहार्य आहे. एका आव्हानाला प्रतिसाद देताना आणखी आव्हाने समोर येतात, त्याचबरोबर त्याचा प्रतिसाद आणि याचा परिणाम म्हणजे एका नंतर दुसरे चक्र. जे काही जन्माला येते त्याचा अंत होणारच. कोणतीही आचारसंहिता त्याला वाचवू शकत नाही हा प्रकृतीचा नियम आहे. हे चक्र सर्व सजीवनिर्मिती तसेच वनस्पतींमध्ये लागू असते. काळचक्र एक प्रकारे हे कॉसमॉससारखे आहे जेथे सदैव विद्धंस आणि पुनर्वसन चालू असते. म्हणजेच मानवी जीवन एकसारखे नसते. सतत बदलत राहते. आज एखादे राष्ट्र, समूह, सभ्यता प्रगतीच्या शिखरावर असेल तर दुसरा समूह विनाशाच्या गर्तेत सापडलेला असतो. हे समूहजीवन चाकासारखे खाली-वर होत राहते. कधी एक सभ्यता इतर सभ्यतांची वाढ होऊ देत नाही, त्यांना खुंटित करून टाकते. तसे इस्लामिक सभ्येतेने साऱ्या जगातील सभ्यतांना एक प्रकारे बंदिस्त केले होते, कारण त्या वेळी जगाच्या पटलावर या सभ्यतेने एक आदर्श विचारसरणी आणि एक सर्वश्रेष्ठ आचारसंहिता सादर केली होती.

ज्या सभ्यतांना तीव्र आव्हानांना तोंड द्यावे लागते ते त्याला बळी पडतात. निरनिराळ्या शक्ती एक जाळे त्या सभ्यतांभोवती विणतात. ज्यामुळे त्यांचा कायमचा अंत निश्चित होतो. ज्या सभ्यता अशा आव्हानांना प्रत्युत्तर देतात त्या पुन्हा जीवित होऊ शकतात, पण यासाठी अल्लाहने एक नियम केलेला आहे तो असा की माणसांनी आपली परिस्थिती बदलायला स्वतः पुढे यावे, संघर्ष करावा तरच अल्लाह त्यांची दुरवस्था बदलतो. कोणत्याही जनसमूहाच्या परिस्थितीत अल्लाह तोवर बदल करत नाही जोवर ते स्वतः बदल करत नसतात. अल्लाह जेव्हा एखाद्या जनसमूहाला दाई करण्याचे ठरवतो मग त्या जनसमूहाला त्याच्याव्यतिरिक्त कुणीही मदत करू शकणार नाही. (प. कुरआन, 13:11)

दुसऱ्या ठिकाणी अल्लाहने निर्णायक घोषणा केलेली आहे की तुम्ही जर पुढे आला नाहीत तर अल्लाह तुम्हाला कठोर शिक्षा देईल आणि तुमच्याजागी इतर समूह उभे करील. तुम्ही त्याचे काहीही करू शकणार नाही, कारण अल्लाहच सर्वस्व सामर्थ्यवान आहे. (प. कुरआन, 9:39)

इस्लामी सभ्यतेचा जन्म सहजासहजी झाला नव्हता, तसेच कोणत्याही सभ्यतेचा जन्म सहज सोपा नसतो. जन्मावेळी कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. इस्लामचेही तसेच झाले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जेव्हा इस्लामचा प्रसार सुरू केला तेव्हा लोकांनी सहजासहजी प्रतिसाद देऊन तो धर्म स्वीकारला नाही. ज्या मूठभर लोकांनी स्वीकारला त्यांना अतोनात यातनांना तोंड द्यावे लागले. जेव्हा इस्लामचा प्रसार सुरु झाला तेव्हा विजय मिळाल्यावर त्या मुस्लिमांनी ज्यांनी इराकच्या सासानी सत्ताधीशांना पराभूत केले होते त्यांना हे कसे शक्य झाले असे विचारल्यावर ते लोक म्हणाले, आमच्यासारखा निराधार आणि दरिद्री त्या वेळी कुणी नव्हता. उपासमार काय असते ते आम्हालाच माहीत. दुसऱ्यांना उपासमारीची कल्पना करवत नाही. आम्ही पालापाचोळा खायचो. तसेच विंचू आणि साप खात होतो. हेच आमचा आहार. या उघड्या जमिनीशिवाय दुसरे कोणतेच आमच्या राहण्याचे ठिकाण नव्हते. उंट आणि मेंढ्यांच्या केसांनी विणलेले कपडे आमची वस्त्रे. एकमेकांची हत्या करणे, एकमेकांवर दरोडा टाकणे हाच आमचा धर्म होता. आम्ही आमच्या मुलींना जमिनीत पुरून टाकत होतो, जेणेकरून त्यांनी आमच्या आहारात सहभागी होऊ नये... आणि अशा परिस्थितीत अल्लाहने आमच्याकडे सर्वस्व परिचित माणसाला पाठवले. आम्हाला त्यांचा वंश माहीत होता. त्यांचा चेहरा आणि त्यांचे जन्मस्थान आम्हाला माहीत होते. त्यांचे घराणे आमच्या घराण्यांपैकी सर्वोत्तम होते. ते सर्वथा आमच्यामध्ये सर्वो-त्कृष्ट होते. कमालीचे सत्यवान आणि कमालीचे सहनशील. त्यांनी आम्हाला त्यांचा धर्म स्वीकार करण्याचे निमंत्रण दिले. ते बोलले आणि आम्ही बोललो. त्यांनी सत्य सांगितले, आम्ही खोटे बोलत होतो. ज्या अरबांनी त्यांचा विरोध केला होता त्यांनी स्वेच्छेने किंवा अनिच्छेने त्यांची साथ दिली. जे लोक अनिच्छेने त्यांच्यात सामील झाले त्यांचे शेवटी कल्याण झाले आणि जे स्वेच्छेने त्यांच्यात सामील झाले ते अधिकाधिक समाधानी झाले. संघर्ष आणि दारिद्र्याने भरलेल्या आपल्या पूर्वीच्या स्थितीपेक्षा त्यांच्या संदेशाची महानता आम्ही ओळखली होती. अशी गोष्ट सुरुवातीच्या मुस्लिमांची आहे. त्यांनी एका नंतर एक राष्ट्र जिंकले आणि इस्लामी सभ्यतेला जगभर सर्वदूर पोहोचविले. (संदर्भ - ‘ढहश ॠीशरीं -ीरल उेर्पिींशीीीं’ लू र्कीसह घशपपशवू, ऊर उरिे झीशीी, 2007)

वर वर्णन केलेला मजकूर म्हणजे सकारात्मक प्रतिसाद होता पहिल्यावहिल्या मुस्लिमाचा. कवी अल्लामा इकबाल यांनी सकारात्मक प्रतिसादाविषयी म्हटले आहे, अल्लाहला संबोधून ते म्हणतात---

तू रात्र आणि अंधाराची निर्मिती केली

तो अंधार दूर सारण्यासाठी त्यामध्ये

मी दिवा प्रज्वलित केला.

तू मातीची निर्मिती केली,

मी त्या मातीतून प्याला बनवला.

जंगल, डोंगर आणि कालव्याची निर्मिती केली,

मी बागा लावल्या, फुलांची शेती पिकवली.


- सय्यद इफ्तिखार अहमद 

98201 21207

- एम.आय. शेख
9764000737


ईद म्हणजे आनंदाचा सोहळा. फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईद-उल-फित्र म्हणजे दान देण्याचा सोहळा. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लाममध्ये फक्त दोन ईद आहेत. एक ईद-उल-फित्र दूसरी ईद-उल-अजहा. या दोन्ही ईदमध्ये दान देण्यासाठी इस्लामने श्रीमंत मुस्लिमांना प्रोत्साहित केलेले आहे.
    ना डी.जे.चा कर्कश आवाज, ना टुकार चित्रपट गीतांवरील विचित्र नाच. ना आतिषबाजी ना हुल्लडबाजी. ना चंदा ना पट्टी, ना ध्वनीप्रदुषण ना वायू प्रदूषण, ना दारू ना भांग. शांतपणे ईदगाहला जाणे, शिस्तीत दोन रकात नमाज अदा करणे आणि तितक्याच शांतपणे माघारी फिरणे. मग दिवसभर आप्तस्वकीय, शेजारी-पाजारी, मित्र-सहकार्‍यांबरोबर गोड शिर्खुम्याचा आस्वाद घेणे, गरीबांना फित्रा देणे, लहान मुलांना ईदी देणे, थोडक्यात ईद-उल-फित्र म्हणजे एक प्रदुषणमुक्त नित्तांत सुंदर सणाचा अनुभव असतो. ज्याची वर्षभर वाट पाहिली जाते. प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे ईदची खरेदी करतो. चप्पल, बूट, कपडे, कॉस्मॅटिक्स, ड्राय फ्रुट्स, साखर, सुगंध या सगळ्या खरेदीमुळे बाजार पेठेमध्ये चैतन्याची लाट पसरते, आर्थिक उलाढाला वाढते आणि व्यापार्‍यांना लाभ होतो. थोडक्यात ईद एक फायदे अनेक.
    महिनाभर उपवास करून थकलेल्या जीवांना ईदच्या दिवशी दिलासा मिळतो. खाण्या-पिण्यावरील सर्व बंधने उठलेली असतात, लोक मनसोक्त गोड-धोड खात असतात. एक महिन्याचे खडतर नैतिक प्रशिक्षण पूर्ण झालेले असते. प्रत्येक रोजाधारकाचा नैतिकतेचा निर्देशांक वाढलेला असतो व ह्या लोकांनी पुढील अकरा महिन्यात येणार्‍या मोह, माया, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ यांच्यावर मात करण्यासाठी सदाचाराने वागण्याचा निर्णय केलेला असतो.
ईदच्या निमित्ताने इस्लामी व्यवस्थेवर एक दृष्टीक्षेप
    आजच्या आधुनिक जगामध्ये सर्वकाही आहे मात्र नितीमत्तेची वाणवा आहे. चारित्र्यवान लोकांची भीषण टंचाई जाणवत आहे. जवळ-जवळ प्रत्येक देशात दुराचार्‍यांच्या हाती सत्तेची सुत्रे आहेत. जागतिक महासत्तेचा महानायक ट्रम्प एका पॉर्नस्टार (वेश्ये)ला लाखो रूपये डॉलर देऊन जगाला आपली लायकी दाखवून देतो. उच्चशिक्षित डॉक्टर किडनी चोरतो, मुलींचे गर्भ काढतो, अनेक उच्चशिक्षित लोक महिलांच्या आंतरराष्ट्रीय देह व्यापारामध्ये गुंतलेले आहेत. अनेक लोक दारू आणि ड्रगचा व्यवसाय करतात. बालकांची तस्करी होते, प्रगतीच्या नावखाली अधोगती इतकी झालेली आहे की, पुरूष-पुरूषांशी लग्न करीत आहेत. कोणतेच क्षेत्र असे शिल्लक नाही की, ज्यात भ्रष्ट लोकांची मांदियाळी नाही. मानवता विव्हळत आहे. लोक त्राहीमाम-त्राहीमाम करत आहेत. जगाने साम्यवादी आणि भांडवलवादी दोन्ही अर्थव्यवस्थांचा अनुभव घेतलेला आहे. दोहोंमध्ये शक्तीशाली लोक गरीब लोकांचे शोषण करतात, हे सत्य सिद्ध झालेले आहे. वाढत्या स्पर्धेने लोकांच्या जीवनामध्ये तणाव वाढवलेला आहे. आत्महत्येचा दर वाढलेला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमुळे अलिकडे कोणी विचलित होत नाही. त्यात विद्यार्थी आणि महिलांचीही भर पडत आहे. घरा-घरात मनोरूग्णांची संख्या वाढत आहे. इस्पीतळाबाहेरील वेड्यांची संख्या वाढत आहे. ट्रॅफिक सिग्नलवर 40 सेकंद थांबणेही अस्वस्थ करण्यास पुरेशी ठरत आहेत.
    समाजातून नैतिकतेचे उच्चाटन झालेले आहे. सिनेमा आणि मालिकांमधून अश्‍लिलता लोकांच्या मनामध्ये ओतल्या जात आहेत. ’भाभीजी घरपे हैं’ सारख्या मुल्यहीन मालिकेमधील पात्रांनी आता समाज मनात स्थान मिळविलेले आहे. कोर्टातून फक्त निवाडे येत आहेत. न्याय फार कमी होत आहे. कायद्याची, कोर्टाची, पोलिसांची संख्या वाढत असतानाच गुन्ह्यांचीही संख्या वाढत आहे. तुरूंग अपूरे पडत आहेत. प्रत्येक तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठासून भरलेले आहेत.
    अनेक पती-पत्नींच्या नात्यातील विश्‍वास संशयाच्या भोवर्‍यात अडकलेला आहे. वरून सुखी वाटणारी अनेक कुटुंबे आतून गृहकलहाने पार पोखरून गेलेली आहेत.
    व्याजाच्या अजगरी विळख्याने गरीबांचे कंबरडे मोडलेले आहे. वृद्धाश्रमांची वाढती संख्या समाजाचे कौटुंबिक आरोग्य ठीक नसल्याची साक्ष देत आहे. समाजातील अधिकाधिक लोक चंगळवादामुळे स्वार्थी बनत आहेत. आपल्या फायद्यासाठी, ”काय पण” करावयास लोक तयार आहेत. घराबाहेर काम करणार्‍या अनेक महिलांचे पावलोपावली शोषण होत आहे. अनेक उद्योगांमध्ये कास्टिंग काऊच (कामाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी) हे आता उघड गुपित झालेले आहे.
    वाढत्या महागाईने चांगल्या माणसांना सुद्धा भ्रष्टाचार करण्यास विवश केलेले आहे. सरकारी धोरण अशा पद्धतीने ठरविले जात आहे की, सार्वजनिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी शाळा या बकाल होत आहेत. उलट खाजगी रूग्णालये आणि खाजगी शाळा यांना प्रोत्साहन मिळत आहे. ह्या दोन्ही संस्थांनी कधीच उद्योगाचे स्वरूप घेतलेले आहे. म्हणून सामान्य माणसं यांच्या परिघाच्या बाहेर आपोआपच फेकली गेलेली आहेत. भांडवलशाहीचा नैसर्गिक परिणाम म्हणून पराकोटीची विषमता निर्माण झालेली आहे. राजकारणी लोक भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्याएवढे निबर झालेले आहेत. वेश्यांचा पॉर्नस्टार म्हणून गौरव केला जात आहे. त्यांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. त्यांच्या शुभहस्ते अनेक व्यावसायिक केंद्राची उद्घाटने ’संपन्न’ होत आहेत. नाचणार्‍या-गाणार्‍यांच्या वाट्याला धन, मान, सम्मान, प्रसिद्धी व प्रतिष्ठा येत आहे. तर लेखक, विचारवंतांना फारसे कोणी ओळखत नाही. अब्जावधी लोकांनी चुकीची जीवनपद्धती अंगिकारलेली असून, त्यातून तणाव निर्माण होत आहे.
       या आणि अशा नकारात्मक बाबींनी समस्त मानवतेसमोर एक जबरदस्त आव्हान उभे केलेले आहे. अशा ह्या भितीदायक व्यवस्थेने अमेरिकेच्या नेतृत्वात अवघ्या जगाला कवेत घेतलेले आहे. या व्यवस्थेच्या अजगरी मिठीतून अखिल मानवजातीला सोडविण्याचे मोठे आव्हान जागतिक मुस्लिम उम्माह (समुदाय) समोर उभे टाकलेले आहे. युरोप आणि अमेरिकेमधूनच आता इस्लामी व्यवस्थेला एक संधी द्यावी, हा विचार जन्म घेत आहे. त्यातूनच त्या ठिकाणी  इस्लाम सर्वात वेगाने वाढणारा धर्म बनलेला आहे, असे अमेरिकेच्याच पीयू फोरमने अगदी अलिकडे घोषित केलेले आहे.
    इस्लाम पृथ्वीवरील एकमेव अशी व्यवस्था आहे की, जिच्यावर जगातील 175 कोटी लोक प्रत्यक्ष आचरण करीत आहेत. ही एक अत्याधुनिक व्यवस्था आहे. जिला फक्त 1438 वर्षे झालेली आहेत. मदिनामध्ये सातव्या शतकात साकार झालेली ही व्यवस्था पृथ्वीवर  पुन्हा कुठेही साकार झाल्यास भांडवलशाही व्यवस्था धाराशाही होईल, या भितीने ती कुठेच आकार घेणार नाही. यासाठी पराकोटीची दक्षता भांडवलदारांकडून घेतली जात आहे.
    इस्लामी व्यवस्था ही नैतिक अर्थव्यवस्था आहे. ज्यात व्याज घेण्याला हराम केलेले आहे. या अर्थव्यवस्थेचा विरोध तेच लोक पूर्ण ताकदिनीशी करत आहेत. ज्यांचा डोलारा व्याज आणि अनैतिक व्यवसायावर आधारित आहे. इस्लाम सर्व मानवतेच्या कल्याणासाठी आलेला आहे. तो कुठल्याच जातीसमुहाच्या विरूद्ध नाही. ’क्लॅशेस ऑफ सिव्हीलायझेशन ’ सारखे कृत्रिम सिद्धांत मांडून इस्लाम हा ख्रिश्‍चनांच्या विरूद्ध आहे, अशी मांडणी केली जात आहे. मात्र ही मांडणी मुळातच चुकीची आहे. उलट इस्लाम तर ख्रिश्‍चन धर्माचा विस्तार आहे. प्रत्येक मुस्लिम येशू ख्रिस्त आणि बायबलवर श्रद्धा ठेवतो. वास्तविक पाहता ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांच्यात विवाद नाही तर अनैतिक भांडवलशाही व्यवस्था आणि इस्लामी नैतिक व्यवस्था यांच्यातील हे द्वंद्व आहे.
    भारतातही अल्पसंख्यांक मुस्लिम, बहुसंख्यांक मुस्लिमेत्तर बांधवांचा द्वेष करतात, असा चुकीचा गैरसमज माध्यमांनी सर्वदूर पसरविण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे. गेल्या 70 वर्षात मुस्लिमांनी आपल्या नेतृत्वाचा गळा दाबून बहुसंख्य बंधूंच्या हाती विश्‍वासाने आपल्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
    शेवटी एवढेच सांगतो की, मुस्लिमांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी येवून पडलेली आहे. ती ही की त्यांनी आपल्या वाणी आणि वर्तनातून इस्लामचा परिचय आपल्या देशबांधवांना करून द्यावा. कारण आता कोणताही प्रेषित येणार नाही ही जबाबदारी प्रेषितांचे वारस म्हणून आपल्यालाच स्विकारावी लागणार आहे. यासाठी मुस्लिमांनी सर्वप्रथम कुरआन समजून घ्यावा व नंतर इतरांना समजावून सांगावा. ईदनिमित्त एवढे जरी केले तरी पुरे आहे. ईद  मुबारक.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget