Halloween Costume ideas 2015
Articles by "कथा"

न्यायाच्या तेजस्वी घटना 



एका व्यक्तीने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडे एक पिशवी अनामत म्हणून ठेवली होती. ती पिशवी दिनारांनी (सोन्याची नाणी) भरलेली असल्याचे सांगितले. बरीच वर्षे लोटली तरी ती व्यक्ती आपली पिशवी न्यायला परत आली नाही. विश्वस्त वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने एक युक्ती खेळली. पिशवीच्या तळातून काळजीपूर्वक दोरा उस्वला आणि सर्व दिनार बाहेर काढले. त्याऐवजी पिशवीत दिरहम (चांदीची नाणी) टाकली. मग पूर्वीप्रमाणेच पिशवी शिवून ठेवून दिली. 

हा अनामतदर सुमारे पंधरा वर्षांनंतर या उच्च अधिकाऱ्याकडे आला आणि त्याने अनामत म्हणून ठेवलेली दिनारांनी भरलेली पिशवी परत मागितली. अधिकाऱ्याने ती पिशिवी अनामतदाराला परत केली. अनामतदाराने पिशवी आपलीच असल्याची खातरजमा केली आणि पिशवी उघडली. तेव्हा त्यात दिनारांऐवजी दिरहम होते. हे पाहून तो संतापला आणि म्हणाला, ही पिशवी माझी नाही. माझ्या पिशवीत दिरहम नसून दिनार होते. मला माझी दिनारांची पिशवी हवी आहे.

अधिकारी म्हणाला, ‘अरे! काळजीपूर्वक बघ. ही पिशवी तीच आहे, जी तू माझ्याकडे ठेवली होती, आजपर्यंत ती बंदच आहे. मी तुला फसवले नाही.’ अनामातदार म्हणाला, माझ्या पिशवीत दिनार होते. ही पिशवी जरी माझी असली तरी त्यात दिनार नाहीत, दिरहम आहेत.’ आपसात खूप वादविवाद झाला. प्रकरण मिटले नाही, तेव्हा अनामातदार, तत्कालीन अमीर, उमर बिन हुबेराह यांच्याकडे गेला आणि आपली तक्रार दाखल केली. उमर बिन हुबेराहने काझी इयास बिन मुआवियाकडे हे प्रकरण पाठवले.   

काझी इयास यांनी अनामातदाराला आपली बाजू मांडायला सांगितले. अनामतदार म्हणाला,’मी अनामत म्हणून या अधिकाऱ्याकडे दिनारांनी भरलेली पिशवी ठेवली होती, पण तो मला दिरहमने भरलेली पिशवी देत आहे.’ काझी इयास यांनी विचारले, ‘किती वर्षांपूर्वी ही पिशवी अनामत म्हणून ठेवली होती? अनामातदार उत्तरला,’पंधरा वर्षांपूर्वी.’

आता न्यायाधीश अधिकाऱ्याकडे वळले आणि विचारले,’तुम्ही काय म्हणता?’ अधिकारी म्हणाला, ‘त्याची पिशवी गेली पंधरा वर्षे आहे त्याच अवस्थेत माझ्याकडे सुरक्षित ठेवलेली आहे. ही पिशवी त्याचीच आहे.’ 

काझी इयास यांनी नोकरांना पिशवी उघडण्याचा आदेश दिला. नोकरांनी आदेशाचे पालन केले आणि पिशवीतील संपूर्ण दिरहम विखुरले. विखुरलेल्या दिरहमांमध्ये काही दहा वर्षे जुनी नाणी आणि काही पाच वर्षांची नाणी होती आणि काही नाणी त्यापूर्वीची आणि नंतरची नाणी होती. 

काझी इयास अधिकाऱ्याला उद्देशून म्हणाले,’तुम्ही कबूल केले आहे की, ही पिशवी तुमच्याकडे पंधरा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. याचा अर्थ या पिशवीमधील सर्वच नाणी 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जुनी असायला हवी होती, परंतु पिशवीत पाच वर्षांपूर्वीचीही नाणी आहेत. म्हणजे या पंधरा वर्षांच्या काळात कधीतरी ही पिशवी उघडली गेली असावी आणि त्या वेळी दिनारांचे रूपांतर दिरहममध्ये झाले.’

काझी इयासच्या युक्तिवादाने गुन्हेगाराला आपला गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले. शेवटी अधिकाऱ्याने आपली चूक मान्य केली. अशा प्रकारे अधिकाऱ्याचा गुन्हा उघडकीस आला. त्याचे पितळ उघडे पडले.

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, 

‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 165)

 -सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


न्यायाच्या तेजस्वी घटना



एका व्यापाऱ्याची मालमत्ता चोरीला गेली. लोकांनी संशयाच्या आधारे दोघांना पकडून काझींच्या (न्यायाधीश) सेवेत हजर केले.

त्यांनी काझींना सांगितले की, ‘व्यापाऱ्याची मालमत्ता चोरीला गेली आहे. आम्हाला या दोन व्यक्तींवर संशय आहे, परंतु दोघेही स्वतःला निरपराध सांगत आहेत. त्यांच्यापैकी नेमका कोण खरा चोर आहे हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाहीत. आता दोषी कोण आहे, ते न्यायालयाने ठरवावे.’

काझींनी लोकांना आदेश दिला की, ‘तुम्ही थोडे थांबा, मला तहान लागली आहे, मी आधी पाणी पिईन, मग निर्णय देईन.’

मग काझींनी आपल्या सेवकाला पाण्याचा पेला आणण्याची आज्ञा केली. सेवकाने आदेशाचे पालन केले.

अतिशय सुंदर आणि शोभिवंत काचेच्या पेल्यात पाणी आणले. काझीने पेला उचलला आणि पाणी पिऊ लागले. दरबारात स्तब्धता होती. अचानक काझींनी आपल्या हातातून काचेचा पेला खाली सोडून दिला. पेला जमिनीवर पडताच जोरदार आवाज झाला. पेला चकनाचूर झाला.

अचानक पेला पडल्याने झालेल्या आवाजाने शांतता भंग झाली. लोक घाबरले. अचानक हे काय झाले?

तेव्हा काझींनी त्या दोघांपैकी एकाची मान पकडली आणि त्याला जोरात हलवले आणि मोठ्याने ओरडले, “तू चोरी केलीस! तू चोर आहेस!”

लोक उघड्या डोळ्यांनी हे दृश्य पाहत होते. काय घडत आहे, हे लोकांना कळत नव्हते.

दरम्यान, ती व्यक्ती आपण चोरी केली नसल्याचे वारंवार सांगत होती.

न्यायाधीश मात्र त्याची मान पकडून जोरजोरात ओरडत होते की, “खोटे बोलू नकोस खोटे बोलून काही उपयोग नाही. तूच चोरी केली आहे! तू चोर आहेस! बऱ्या गुमानानं गुन्हा कबूल कर.”

थोड्या वादानंतर त्या व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितले की खरोखरच त्याने चोरी केली आहे.  

आता स्वतः चोर आणि दरबारातील लोकही विचार करू लागले की न्यायाधीशांनी खरा चोर कसा ओळखला.

लोक म्हणले, “काझी साहेब आमची जिज्ञासा शिगेला पोहचली आहे. आम्हाला पण सांगा की तुम्ही कसे ओळखले खरा गुन्हेगार हाच आहे! तुमच्याकडे काही पुरावा आहे का?”

काझी म्हणाले, “खरे तर मला तहान लागली नव्हती! मला माहीत आहे की चोरांची मने मजबूत असतात. मी हेतुपुरस्पर एक पेला पाण्याची मागणी केली. मी दोन्ही आरोपींच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो. जेव्हा मी पेला सोडला तेव्हा तो खाली पडताच कर्कश आवाज झाला. या आवाजाने सर्व जण काळजीत पडले. सर्वांना काय झाले असा प्रश्न पडला! पण याची अवस्था पूर्णपणे वेगळी होती. याच्या चेहऱ्यावर भीती किंवा काळजीचे चिन्ह नव्हते. चोर, दरोडेखोरांना मोठा अपघात होण्याची भीती नसते. मोठमोठ्या घटनानांचाही त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही. सर्वसामान्य नागरिक मात्र एका छोट्याशा घटनेनेही मोठ्या प्रमाणावर त्रस्त होतात. हा  दुसरा आरोपी पेला तुटण्याच्या आवाजाने हादरला. त्यावरून मी ओळखले की खरा चोर कोण आहे.”

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 164)

 -सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

न्यायाच्या तेजस्वी घटना



काझी (न्यायमूर्ती) अय्यास बिन मुआविया यांच्या बुद्धिमत्तेची आणि चाणाक्षतेची सर्वत्र चर्चा होती. दरबारात बसून ते असे आश्चर्यकारक निर्णय देत असत की लोक चकित व्हायचे. त्यांच्या निर्णयांबाबत इतिहासात अनेक घटनांची नोंद आहे.

थोर, ज्ञानी, महान लोकांचे जसे अनेक प्रशंसक आणि आदर करणारे असतात, तसेच त्यांची निंदा करणारे, त्यांना पाण्यात पाहणारे आणि त्यांच्याविषयी ईर्षा बाळगणाऱ्यांची संख्याही मोठी असते. काझी अय्यास यांच्या बाबतीतही तेच घडत होते. त्यांच्याविषयी काही लोकांच्या मनात मत्सर होता. ईर्षेने पेटून उठलेले हे लोक काझी अय्यास यांच्या जीवनात काही दोष सापडतो का? ते एखादी चूक करतात का? यावरच नजर ठेवून असायचे.

काझी अय्यास यांचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारे कलंकित होऊ शकेल, यासाठी खूप खूप धडपड केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, काझी इयास निर्णय घेण्यात खूप घाई करतात. तसे पाहिले तर खरोखरच हा एक मोठा दोष आहे. जो काझींच्या गौरवाच्या विरुद्ध आहे. निर्णय घेण्यापूर्वी आणि नंतर निर्णय देण्याआधी गांभीर्याने आणि विवेकबुद्धीने काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

ईर्षेने पेटून उठलेल्या लोकांनी त्यांच्यालबद्दल ही अफवा पसरवायला सुरुवात केली. हळूहळू लोकांमध्ये काझी साहेबांविषयी असंतोष वाढू  लागला. ते घाईगडबडीत निर्णय घेणारा काझी म्हणून चर्चिले जाऊ लागले.

दुसरीकडे, काझी अय्यास बिन मुआविया यांनाही या चर्चेची माहिती मिळाली. त्यांनीही ईर्षा बाळगणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. काझी अय्यास यांनी नम्रपणे या लोकांना आपल्या संमेलनात आमंत्रित केले. त्यांनी त्यांचा चांगलाच आदरसन्मान केला. त्यांना चांगले खाऊ घातले. मग अनौपचारिक गप्पा रंगल्या.

गप्पांच्या भरात, काझी अय्यास यांनी अचानक हात वर केला आणि म्हणाले, “मित्रांनो! मला या बोटांबद्दल सांगा, या बोटांची संख्या किती आहे?”

सर्वांनी काझी अय्यास यांच्या हाताकडे बघून क्षणाचाही विचार न करता एका सुरात म्हणाले, “पाच आहेत, श्रीमान पाच!”

काझी अय्यास बिन मुआविया यांनी त्यांच्याकडे हसतमुख नजरेने पाहिले आणि म्हणाले, “साथीदरांनो! तुम्ही उत्तर द्यायला इतकी घाई का केली? तुम्ही एक, दोन, तीन, चार, पाच असे मोजले असते आणि थोडा वेळ थांबून विचार करून नंतर उत्तर दिले असते!”

ते लोक म्हणाले, “काझी साहेब! जी बाब आम्हाला सहज समजली, आमच्या लक्षात आली तिच्यासाठी थांबण्याची आणि विचार करण्याची गरज काय आहे!”

आता काझी अय्यास त्यांना अत्यंत समाधानाने आणि शांतपणे सांगू लागले, “जेव्हा माझ्याकडे न्यायासाठी प्रकरणे येतात, मी पक्षकारांचे म्हणणे ऐकतो आणि लगेच प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचतो. मग न्याय देण्यासाठी का थांबावे?”

काझी अय्यास यांनी या उदाहरणाद्वारे उत्तर दिले. अशा प्रकारे मत्सरांचा डाव फसला आणि त्यांना समजले की काझी अय्यास घाईगडबडीत न्याय देत नाहीत; उलट, ईश्वराने दिलेल्या बुद्धिमत्तेमुळे आणि क्षमतेमुळे ते पटकन प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचतात. विलंब न करता ते खटल्याचा निकाल सुनावतात. त्यांना काझी अय्यास यांच्या बुद्धिमत्तेची खात्री पटली. सभांमध्ये जे त्यांच्याविरुद्ध बोलत होते त्यांनी ते थांबवले.

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित,

‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 162)

 -सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

न्यायाच्या तेजस्वी घटना



खलीफा मन्सूर अब्बासी (१८७१) च्या काळात एका शासकाने बेकायदेशीरपणे एका माणसाची संपत्ती जप्त केली.

तो माणूस तक्रार घेऊन खलीफाच्या दरबारात गेला आणि म्हणाला, “हे विश्वासू सेनापती, अल्लाह तुमचे रक्षण करो!  माझी एक गरज आहे. मी आधी माझी गरज प्रकट करू की त्या अगोदर एक उदाहरण देऊ?”

खलीफा म्हणाला, “प्रथम एक उदाहरण द्या.”

तो माणूस म्हणाला, “जेव्हा एखाद्या लहान मुलाला एखाद्या अप्रिय गोष्टीचा सामना करावा लागतो तेव्हा त्याला वाटते या संकटातून आपल्याला सोडविणारा आईपेक्षा जास्त शक्तिशाली कोणी नाही आणि तो आईचा धावा करतो. जेव्हा थोडा मोठा होतो तेव्हा तो आपल्या वडिलांकडे तक्रार करतो, कारण त्याला वाटते की, त्याचे वडील त्याला आपल्या आईपेक्षा जास्त मदत करू शकतात. मग तो तरुण झाल्यावर आपली तक्रार राज्यकर्त्याकडे घेऊन जातो कारण त्याला माहीत असते की, शासक आपल्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. मग जेव्हा त्याची बुद्धी वाढते तेव्हा तो राजाच्या दरबारात आपली समस्या मांडतो कारण त्याला हे माहीत असते की राजा सर्व लोकांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. पण जर त्याला राजाच्या दरबारातही न्याय मिळाला नाही तर तो अल्लाह तआलाचा दरवाजा ठोठावतो.”

या युक्तिवादानंतर त्या माणसाने पुन्हा खलीफाला उद्देशून बोलायला सुरुवात केली. “माझी एक समस्या आहे. मी तुमच्याकडे तक्रार घेऊन आलो आहे. मला माहीत आहे की, या पृथ्वीवर तुमच्यापेक्षा सामर्थ्यवान कोणीही नाही. जर तुम्ही मला न्याय दिला तर ठीक आहे, अन्यथा मी अल्लाहचे दार ठोठावेन.”

खलीफा मन्सूर म्हणाले, “आम्ही तुम्हाला न्याय देऊ. तुमची समस्या सांगा.”

तो म्हणाला, “तुमच्या एका राज अधिकाऱ्याने माझ्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. मला माझी जमीन हवी आहे.”

खलीफाने आपल्या शासकाला लगेच जमीन परत करण्याचा आदेश दिला आणि त्याला लिहिले की या माणसाला आरामाची साधने उपलब्ध करून द्या आणि त्याची आर्थिक स्थिती समृद्ध करा.

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित,

‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 160)


 -सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


न्यायाच्या तेजस्वी घटना


काही लोक एका व्यक्तीला धरून काझीच्या (न्यायाधीश) दरबारात दाखल झाले.

काझीने त्यांच्याकडे पाहून विचारले, “हे काय? या माणसाला असे धरून का आणले?”

ते लोक म्हणाले, “ह्या व्यक्तीवर आमचे कर्ज आहे. आम्ही कर्ज फेडण्यास सांगत आहोत, परंतु हा टाळाटाळ करत आहे. कर्ज फेडत नाहीये!”

न्यायमूर्तींनी कर्जदाराला कर्जाची रक्कम परत  करण्याचे आदेश दिले.

कर्जदार म्हणाला, “पालनकर्ता, न्यायाधिशांचे भले करो. ईश्वराच्या कृपेने माझ्याकडे एक इमारत आहे, जी मी भाड्याने दिली आहे. थोड्याच  दिवसांत मला भाडे मिळणार आहे. हे भाडे मिळेपर्यंत मला मुदत द्यावी. भाडे मिळाले की मी सर्वांचे कर्ज परत करीन.”

न्यायमूर्तींनी कर्जदाराला पकडून आणणाऱ्यांना विचारले की, “ते मुदत देण्यास तयार आहेत का?”

ते सर्व एका सुरात म्हणाले, “अल्लाहची शपथ! आमच्या माहितीनुसार, त्याच्याकडे कोणतीही इमारत किंवा मालमत्ता नाही. तो फक्त त्याच्यावर आलेले संकट टाळण्यासाठी खोटे बोलत आहे. तो गरीब आणि दरिद्री असून पूर्णपणे दिवाळखोर झालेला आहे.”

त्या लोकांचे म्हणणे ऐकून न्यायाधीश त्या गरीब माणसाकडे वळले आणि म्हणाले, “तुमची मुक्तता करण्यात येत आहे. आता तुम्ही जाऊ शकता. निर्णय तुमच्या बाजूने आहे, तुम्हला कर्ज फेडण्याची गरज नाही.”

हा निर्णय ऐकून ‘त्या’ लोकांना धक्काच बसला. ते म्हणाले, “हा कसला बरं न्याय! याला न्याय म्हणता येणार नाही.”

न्यायाधीश म्हणाले, “तुम्ही स्वतः कर्जदाराबद्दल साक्ष दिली आहे की त्याच्याकडे कोणतीच इमारत नाही, उलट, तो गरीब आणि दरिद्री आहे, तो दिवाळखोर झालेला आहे. तेव्हा हे स्पष्ट आहे, कोणी दिवाळखोर झाल्यावर कर्जाची रक्कम कुठून भरणार?”

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनेहरे फैसले’ पान क्र. 158)

 -सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

न्यायाच्या तेजस्वी घटना 


हजरत अली बिन अबी तालिब रजि. वर्णन करतात की, हजरत दानियाल अ. यांचे आई-वडील हयात नव्हते. ते अनाथ होते. एका महिलेने त्यांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केले. त्यावेळी बनी इस्रायलमध्ये एक राजा होता, ज्याचे दोन न्यायाधीश होते. ती बाई खूप सुंदर आणि देखणी होती. ती नियमीत राजाच्या सेवेत यायची आणि त्याला सल्ले द्यायची. 

राजाच्या दरबारात दोन काझी (न्यायाधीश) होते. दोन्ही न्यायाधीश वेळोवेळी राजाच्या सेवेत या महिलेचे येणे-जाणे पाहत असत. दोघांच्याही मनात त्या महीलेविषयी प्रेम जागृत झाले. एकदा त्यांनी आपली आंतरिक इच्छा या स्त्रीसमोर व्यक्त केली. आम्हा दोघांचेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला खात्री आहे की, तू आमच्या प्रेमाचा स्वीकार करशील. या कुलीन महिलेने साफ नकार दिला. त्यांना खडे बोल सुनावले. दोन्ही न्यायाधिशांनी तिला खोट्या प्रेमात फसवण्याचा, वेगवेगळ्या मार्गाने तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती स्त्री कोणत्याही प्रकारे त्यांच्या हाती आली नाही.

ही सुंदर स्त्री कोणत्याही किंमतीत आपल्या हाती येऊ शकत नाही हे पाहून त्या दोघा न्यायाधीशांनी संतापून राजाकडे तक्रार केली की, जी स्त्री तुझ्याकडे येऊन तुला सल्ले  देते, तिने व्यभिचार सारखे मोठे पाप केले आहे! जेव्हा राजाने आपल्या न्यायाधीशांची साक्ष ऐकली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला, तो मोठ्या विचारात पडला, कारण त्याला या बाईच्या खानदानीपणाची आणि शालीनतेची पूर्ण खात्री होती. पण न्यायाधीशांची साक्ष नाकारताही येत नव्हती. 

राजाला दोन न्यायाधीशांची साक्ष मिळाल्यानंतर अधिक तपासाची गरज पण भासली नाही. राजाने, दोघांची साक्ष मान्य केली. त्या स्त्रीला तीन दिवसांचा अवधी दिला आणि त्यानंतर तिला दगडमार करून ठार करण्याचा आदेश दिला. शहरात घोषणा झाली की, व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला अमुक दिवशी दगडमार करून मारण्यात येईल. लोकांनी ते पाहायला यावे. राजाने या महिलेला दगडमार करण्याचा आदेश दिला होता, परंतु तो आतून खूप काळजीत होता. ती स्त्री व्याभिचारिया आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने त्याच्या एका विश्वासू मंत्र्याला विचारले,”दगडमार होण्यापासून त्या स्त्रीला वाचवता येईल का?” मंत्री म्हणाला,”शहरात तिच्यावर दगडफेक करून ठार मारण्याची घोषणा झाली आहे. दोन न्यायाधीशांच्या साक्षीच्या आधारे दगडफेक करण्याचा निर्णय देण्यात आला आहे, अशा परिस्थितीत या दगडमार करण्याचा निर्णय मागे घेता येणार नाही.”

तिसरा दिवस, महिलेला दगडमार करण्याचा दिवस होता. मंत्री घरातून बाहेर आला तेव्हा त्याला काही मुले खेळताना दिसली. त्यात हजरत दानियाल अ. हे ही होते. (तो अनाथ मुलगा ज्याला त्या स्त्रीने दत्तक घेतले होते.)  तो मंत्री उभे राहून मुलांना खेळताना पाहत होता. हजरत दानियाल अ. यांनी मुलांना एकत्र केले आणि म्हणाले,”मुलांनो! आपण एक खेळ खेळूया” यात दानीयाल अ. राजा झाले. एका मुलाला कुलीन स्त्रीचे पात्र समजावून सांगितले आणि दोन मुलांना न्यायाधीशांची भूमिका दिली आणि म्हणाले, ‘तुम्ही दोघे माझ्या कोर्टात या महिलेविरुद्ध साक्ष द्या.’ 

ते स्वतः मातीचा ढीग गोळा करून त्यावर बसले आणि हातात एक लाकडी तलवार ठेवली. न्यायालयाचा देखावा निर्माण केला. समोर स्त्रीच्या वेशात आलेला मुलगा उभा होता. हजरत दानियाल अ. यांनी इतर मुलांना एका न्यायाधीशाचा हात धरून त्याला दूरवर नेण्यास सांगितले. ते निघून गेल्यावर त्यांनी दुसऱ्या न्यायाधीशाला विचारले,”मला खरे सांग, नाहीतर मी तुला मृत्यदंड देईन, या स्त्रीने व्यभिचार केला? तू साक्ष देतोस?”

न्यायाधीश म्हणला, “मी साक्ष देतो की, या महिलेने व्यभिचार केला आहे.”

हजरत दानियाल अ. “कधी?”

न्यायाधीशाने उत्तर दिले, “अमक्या दिवशी.”

हजरत दानियाल अ. “तिने कोणत्या पुरुषासोबत व्यभिचार केला आहे?”

न्यायाधीश, “अमूक-अमुक आणि तत्सम.”

हजरत दानियाल अ. “कोणत्या ठिकाणी?”

न्यायाधीश, “अमक्या ठिकाणी?”

हजरत दानियाल अ. मुलांना म्हणाले, “या न्यायाधीशाला घेऊन जा आणि दुसऱ्या न्यायाधीशाला घेऊन या.”

मुलांनी आदेशाचे पालन केले.

हजरत दानियाल अ. यांनी पहिल्या न्यायाधीशाला जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न दुसऱ्या न्यायाधीशालाही विचारले. दुसऱ्या न्यायाधीशाची उत्तरे पहिल्या न्यायाधीशापेक्षा वेगळी होती. 

हजरत दानियाल अ. म्हणाले, “खरे गुन्हेगार तर हे न्यायाधीश आहेत!”

राजाचा विश्वासू मंत्री जो हे सगळं दृश्य पाहत होता, वेळ वाया न घालवता राजाच्या सेवेत पोहोचला आणि त्याला लहान मुलांचा तो खेळ सांगितला. राजाचे डोळे उघडले. त्याने मुलांच्या खेळाप्रमाणे कृती केली. त्याला दोन्ही न्यायाधीशांचे कथन वेगळे असल्याचे आढळून आले. राजाने दोन्ही न्यायाधीशांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि त्या पवित्र स्त्रीला आदरपूर्वक तिच्या घरी पाठवले.

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनेहरे फैसले’ पान क्र. ६४) 

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


न्यायाच्या तेजस्वी घटना 


मोसुल हे इराकमधील प्रसिद्ध शहर आहे. तेथून एक व्यापारी आपली काही गुरे घेऊन अलेप्पोला निघाला. त्या वेळी सीरिया आणि इराकच्या सीमा वेगवेगळ्या झालेल्या नव्हत्या. इतिहासकारांच्या मते, अलेप्पो हे जगातील सर्वांत जुन्या शहरांपैकी एक आहे आणि आज ते सीरियामधे आहे. त्या काळी येथे गुरांचा मोठा बाजार भरत असे. व्यापाऱ्याकडे असलेली गुरे लवकरच विकली गेली आणि तो मोसूलकडे निघाला. एक डाकू सतत व्यापाऱ्यावर पाळत ठेवून होता. व्यापाऱ्याकडे खूप मोठी रक्कम आहे, हे त्याला माहीत होते.

वाटेत एका निर्जन ठिकाणी एका झाडाखाली व्यापारी विसावा घेण्यासाठी थांबला. डाकूने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेवर खंजीर लावून म्हणाला, “तुझ्याजवळ जे काही आहे ते काढ आणि माझ्या स्वाधीन कर.”

व्यापाऱ्याने आजूबाजूला पाहिले, निर्जन ठिकाणी त्याच्या मदतीला कोण येणार? त्याने शांतपणे आपली सर्व मालमत्ता डाकूच्या स्वाधीन केली. संपत्ती घेऊन डाकू त्याला मारायला उठला.

व्यापारी म्हणाला, “तू माझी सर्व संपत्ती घेतली आहेस, मला लहान मुलं आहेत. माझ्यावर दया कर, मला मारू नकोस.”

पण दरोडेखोराने  त्याच्या विनवणीकडे लक्ष दिले नाही आणि व्यापाऱ्यावर खंजिराने वार करायला सुरुवात केली. आजूबाजूला कोणीही नव्हते. अचानक व्यापाऱ्याची नजर झाडावर पडली. त्याला झाडावर दोन कबुतरे बसलेली दिसली.

व्यापाऱ्याने कबुतरांना उद्देशून म्हटले, “कबुतरांनो! साक्ष द्या. या डाकूने माझी हत्या केली.”

डाकूला त्याचे शेवटचे शब्द गमतीदार वाटले. त्याने व्यापाऱ्याच्या शेवटच्या शब्दांची पुनरावृत्ती सुरू केली, “कबुतरांनो! साक्ष द्या...” “कबुतरांनो! साक्ष द्या...”

वाटेतही दरोडेखोर व्यापाऱ्याचे मृत्युपूर्वीचे शब्द उच्चारत राहिला. त्याच्यासाठी हे एका मरणासन्न व्यापाऱ्याने सांगितलेल्या विनोदासारखे होते. दरम्यान, या व्यापाऱ्याचे कुटुंबीय त्याच्या येण्याची वाट पाहत होते. त्याची काही खबर नाही म्हणून; त्याचा मोठा मुलगा वडिलांच्या शोधात अलेप्पोला गेला. तिथे त्याला सांगण्यात आले की त्याचा बाप अलेप्पोलला आला होता, त्याने आपली गुरेढोरे विकली, त्याला पैसेही मिळाले.

तो परत मोसुलला जाण्यासाठी निघाला. काही दिवसांनी अलेप्पोपासून काही अंतरावर असलेल्या रानात त्याचा मृतदेह सापडला. एका अज्ञात व्यक्तीने खंजीर खुपसून त्याची हत्या केली आणि सर्व पैसे घेऊन पळून गेला. त्याला स्मशानभूमीत पुरण्यात आले.

व्यापाऱ्याच्या मुलाने, मारेकऱ्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी त्याने पोलीस अधिकारी, राज्यकर्ते, व्यापाऱ्याचे मित्र अशा अनेकांच्या भेटी घेतल्या त्या सर्वांनीही मारेकऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु मारेकऱ्याचा शोध लागला नाही. तो निराश होऊन मोसुलला परतला.

अनेक वर्षे निघून गेली. व्यापाऱ्याचे नातेवाईक आणि मित्र यांना हळूहळू या घटनेचा विसर पडला. परंतु ज्याने त्या व्यापाऱ्याला मारले होते, जेव्हा जेव्हा त्याला कबुतरांची जोडी दिसायची तेव्हा त्याला मरणासन्न व्यापाऱ्याचे शब्द आठवायचे... “कबुतरांनो! साक्ष द्या.”

एकदा मारेकऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम होता. तो खूप श्रीमंत व्यक्ती होता, त्यामुळे शहरातील उच्च अधिकाऱ्यांसह अनेक लोक जेवणाला आले होते. नानाविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यात आले होते. मारेकऱ्याने मोठ्या पातेल्याचे झाकण उचलले, पातेल्यात दोन मोठी भाजलेली कबुतरे होती. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या डोळ्यांसमोर ते दृष्य उभे राहिले, झाडावर दोन कबुतरे बसलेली आहेत, हा एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेत आहे आणि तो मरतांना कबुतरांना उद्देशून सांगत आहे- “काबुतरांनो! साक्ष द्या.” आणि मग तो अनैच्छिकपणे मोठ्याने हसला. लोक त्याच्याकडे बघू लागले. त्याने कबुतरांकडे बोट दाखवले आणि पुन्हा हसला. आपण कुठे आहोत हे तो विसरला.

एका अदृश्य शक्तीने त्याच्या तोंडून वदविले. तो हत्येची घटना लोकांना सांगू लागला. त्याचा प्रत्येक भाग तपशीलवार सांगितला. त्याची जीभ काही थांबत नव्हती. त्याची कहाणी ऐकून लोक थक्क झाले. त्याने स्वतःच आपले रहस्य उघड करताच माझ्याकडून काय चूक झाली हे त्याच्या लक्षात आले. ज्या घटनेला लोक वर्षानुवर्षे विसरले होते आणि या खटल्याच्या फायलीही बंद झाल्या होत्या, ती त्याने स्वत:च सार्वजनिक केली, पण आता उपयोग नव्हता, कारण बाण सुटले होते.

काही तासांत ही घटना संपूर्ण अलेप्पोमध्ये सर्वांच्याच जिभेवर होती आणि अलेप्पोच्या गव्हर्नरलाही याची माहिती देण्यात आली. त्यांनी ताबडतोब त्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस प्रमुखांनी रीतसर गुन्हा दाखल केला. या मेजवानीत सहभागी झालेल्या लोकांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले. त्यांनी आपापले म्हणणे मांडले. आरोपीला बोलावून साक्षीदारांसमक्ष त्याचा जबाब घेण्यात आला. त्याच्याकडे कबुली देण्याशिवाय पर्याय नव्हता. न्यायाधीशांनी दोषीला फाशीची शिक्षा सुनावली.

अलेप्पोचा शासक म्हणाला: “आम्ही साक्ष दिली.”

अलेप्पोचे काझी म्हणाले: “आम्हीही साक्ष दिली.”

पोलीस प्रमुख म्हणाले, “आम्हीही साक्ष दिली.”

लोक म्हणाले: “आम्हीही साक्ष दिली आहे.”

फाशीच्या एक दिवस आधी,  दोषीला त्याची पत्नी भेटायला आली. तिने विचारले की, “एवढी वर्षे तू तुझा गुन्हा झाकून ठेवला, मग आता का सार्वजनिक केला.”

त्याने उत्तर दिले, “मी या घटनेचा कधीही उल्लेख न करण्याची शपथ घेतली होती, पण एका जबरदस्त शक्तीने मला बोलण्यास भाग पाडले. मी बोलत नव्हतो, माझी जीभ आपोआप चालत होती.”

दुसऱ्या दिवशी पहाटेच त्याच्या फाशीचे दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले. मारेकरी सांगत होता, “माझ्या जिभेतून शब्द निघत नव्हते; उलट ते कबुतरांच्या जिभेतून आले. जे मेजवानीच्या दिवशी माझ्यासमोर पडले होते.”

आता जल्लादने दोरी ओढली. लोकांनी एका गुन्हेगाराला शिक्षा मिळाल्याचे पाहून सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या वेळी लोकांना अचानक दोन कबुतरे दिसली, कोणतीही हालचाल न करता मारेकऱ्याच्या डोक्यावर बसलेली! सर्व लोक परत ओरडले... “या कबुतरांनीही साक्ष दिली.”

जगाच्या कोर्टाने निःसंशयपणे हात टेकले होते. त्याला मारेकऱ्याचा माग काढता आला नाही. मारेकरी बराच काळ फरार होता. पण अल्लाहचा दरबार खुन्याच्या घातात होता. त्याचे रहस्य अखेर उघड झाले आणि निष्पाप व्यापाऱ्याला अखेर न्याय मिळाला. 

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनहरे फैसलें’, पान क्र. १०३)

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


 न्यायाच्या तेजस्वी घटना

आपल्याला चकित करणारी ही घटना; परंतु त्याचबरोबर सामान्य माणसाचा स्वाभिमान जपणारी आणि त्याला अभिमानाने जगण्याची संधी देणारी आहे.

एका राज्यपालाच्या मुलाला स्वतः राज्यपालांसमोर चाबकाने मारले!! फटके मारणारा व्यक्ती अतिशय सामान्य. फटकेही एक दोन नाही तर मारणाऱ्याचे मन समाधानी होईपर्यंत फटके देण्यात आले. 

इजिप्तमध्ये घडलेली ही सत्य घटना.

त्याचे झाले असे की इजिप्तच्या राज्यपालाच्या मुलाने एका सामान्य इजिप्शियन व्यक्तीबरोबर घोडदौडीची शर्यत लावली. चुरशीची लढत झाली. सामान्य इजिप्शियन हळूहळू आपला घोडा घेऊन राज्यपालाच्या मुलाच्या पुढे निघाला आणि शेवटी त्याने शर्यत जिंकली.

राज्यपाल अम्र बिन आस (रजि.), यांचा मुलगा शर्यत हरला. त्याला ही हार पचवता आली नाही. त्याला खूप राग आला. एका सामान्य इजिप्शियन व्यक्तीने आपल्याला हरवले ही बाब त्याला खूपत होती. त्याने सामान्य इजिप्शियन व्यक्तीला चाबकाने फटके मारायला सुरुवात केली. राज्यपालाच्या मुलाने त्या सामान्य इजिप्शियन व्यक्तीला बेदम मारले.

मारताना तो सांगत होता, ‘मी प्रतिष्ठित कुटुंबातील आहे, तू मला शर्यतीत कसे हरवलेस.’ 

तो सामान्य इजिप्शियन, खलीफा हजरत उमर (रजि.) यांच्या सेवेत हजर झाला आणि म्हणाला, “अमीरुल मोमिनीन! मी अत्याचारापासून तुमच्याकडे आश्रय घेण्यासाठी आलो आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे, अत्याचार झाला आहे. मला न्याय हवा आहे.”

आदरणीय उमर (रजि.) म्हणाले, “तुला आश्रय देणाऱ्या माणसाचा तू आश्रय घेतला आहेस. तुला निश्चितच न्याय दिला जाईल.”

इजिप्शियन म्हणाला, “मी आदरणीय अम्र बिन आस (रजि.) यांच्या मुलासोबत घोडदौडीची शर्यत लावली होती. मी त्याला मागे टाकले, यावर तो खूप रागावला. त्याने मला चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली आणि म्हणाला की मी प्रतिष्ठित कुटुंबातील आहे.”

ही तक्रार ऐकून हजरत उमर (रजि.) यांनी इजिप्तचे राज्यपाल अम्र बिन आस (रजि.) यांना पत्र पाठवून आपल्या मुलाला सोबत घेऊन येण्यास सांगितले. अम्र बिन आस (रजि.) आपल्या मुलासह हजर झाले, तेव्हा आदरणीय उमर (रजि.) म्हणाले, “सामान्य इजिप्शियन कुठे आहे?”

त्यालाही समोर हजर करण्यात आले. तो पुढे आला तेव्हा आदरणीय उमर (रजि.) म्हणाले,  “हा चाबूक घ्या आणि तुमच्यावर अत्याचार करणाराला मारा.”

आज्ञा मिळताच सामान्य इजिप्शियन व्यक्तीने राज्यपालाच्या मुलाला त्याच्या समक्ष चाबकाचे फटके मारायला सुरुवात केली. तो मारत असताना आदरणीय उमर (रजि.) म्हणत होते, “प्रतिष्ठित कुटुंबातील मुलाला मारा!”

इजिप्शियन व्यक्तीने आपले मन तृप्त होईपर्यंत फटके मारले. आदरणीय उमर (रजि.) यांनीही त्याला थांबवले नाही.

फटके मारून जेव्हा तो थांबला तेव्हा आदरणीय उमर (रजि.) म्हणाले, “आता या राज्यपालालाही चाबूक लावा.”

इजिप्शियन म्हणाला, “हे खलीफा! त्याच्या मुलाने मला मारहाण केली होती आणि मी त्याचा बदला घेतला आहे. राज्यपालाविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही.”

त्यानंतर अमीरुल मोमिनीन उमर बिन अल-खत्ताब (रजि.) राज्यपालांकडे वळले आणि म्हणाले, “प्रत्येकाच्या आईने त्याला स्वतंत्र जन्म दिला, तुम्ही कधीपासून लोकांना गुलाम केले आहे?”

अम्र बिन आस (रजि.) म्हणाले, “हे अमीरुल मोमिनीन, मला या घटनेची कसलीच कल्पना मिळाली नाही. ती व्यक्तीसुद्धा माझ्याकडे तक्रार घेऊन आली नाही. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.”

ही होती आदरणीय उमर (रजि.) यांची न्याय व्यवस्था.

( संदर्भ :- अब्दुल मालिक मुजाहिद लिखित, ‘सुनहरे फैसलें’, पान क्र. ४६)

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


प्रेरणादायी सत्यकथा


दिनांक 26 मार्चला दैनिक सकाळ मध्ये एक बातमी वाचली औसा तालुक्यात शेतीच्या वाटणीवरून सावत्र भावाचा खून करण्यात आला. ही काही नवीन बाब नाही. अशा घटना रोजच घडत असतात. या निमित्त एक ऐतिहासिक सत्य घटना आठवली. शोधनच्या वाचकांसाठी खास सादर करीत आहे.

युसुफ (अ.) आणि यामिन दोघे सख्खे भाऊ होते. त्यांना दहा सावत्र भाऊ होते. युसुफ (अ.) अतिशय देखणे आणि सुंदर होते. बापाचा जीव की प्राण होते. त्यामुळे सावत्र भावंडांना त्यांचा हेवा वाटायचा. त्यातच झाले असे की युसुफने (अ.) ने एकदा स्वप्न पाहिले. सूर्य, चंद्र आणि 11 तारे त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत. त्यांनी हे स्वप्न आपल्या वडिलांना सांगितले. स्वप्न ऐकून वडील सद्गदित झाले. ते म्हणाले, “हे स्वप्न एक शुभ वार्ता आहे. परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न आहे. भविष्यात तुला फार मोठे लौकिक प्राप्त होणार आहे. हे स्वप्न तुझ्या भावंडांना सांगू नको. ते अगोदरच तुझ्यावर चिडतात. तुला नुकसान पोहोचवतील.”

ही बाब सावत्र आईला समजली. तिने आपल्या मुलांना सांगितले की, ‘युसुफने असे स्वप्न पाहिले आहे. वडील त्याच्यावर अगोदरच प्रेम करतात हे जर असंच चाललं तर तुमच्या हाती काहीच येणार नाही. सगळं काही युसुफला मिळून जाईल. तेव्हा काहीही करा आणि युसूफचा  (अ.) काटा काढा.’

भावंड एकत्रित आली आणि त्यांनी युसुफची (अ.) हत्या करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी योजना आखली. बापाला म्हणाले, “आम्ही जंगलामध्ये जात आहोत. युसुफलाही  (अ.) सोबत घेऊन जातो. आमच्याबरोबर थोडा खेळेल, बागडेल, रानमेवा खाईन.” बाप म्हणाला, “मी तुमच्यावर विश्वास करू शकत नाही. तुम्ही माझ्या मुलाला क्षती पोहोचवणार हे निश्चित आहे.”

सर्व म्हणाले, “बाबा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तो आमचा भाऊ आहे. आम्हाला खूप प्रिय आहे.” शेवटी नाईलाजाने बापाने परवानगी दिली. सर्व भावंडे युसुफ (अ.) ला घेवून जंगलात गेले. जंगलामध्ये एका अंधाऱ्या विहिरीत त्यांनी युसुफला (अ.) ढकलून दिले. युसुफचे (अ.) शर्ट तेवढे काढून घेतले. एक बकरा कापला त्याचे रक्त त्या शर्टाला लावले. बापाला ते शर्ट देऊन म्हणाले, “आम्ही खेळण्या बागडण्यात मग्न झालो होतो. त्याच क्षणी लांडग्याने हल्ला केला आणि युसुफला (अ.) घेवून गेला. त्यांनी रक्ताने माखलेला शर्टही दाखवला. बाप म्हणाला, “हे कसे शक्य आहे लांडगा युसुफला (अ.) घेऊन गेला परंतु; त्याचे शर्ट सोडून दिले. मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू.” मुले म्हणाली, “आम्हाला माहीत होतं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणारच नाहीत परंतु; हे सत्य आहे.” बाप म्हणाला, “मी संयम ठेवण्यापलिकडे काय करू शकतो.” आणि रडायला लागला. बाप इतका रडला की, रडून रडून त्याची दृष्टी गेली.

अनेक वर्षे निघून गेली. दुष्काळ पडला. इजिप्तचा राजा लोकांना धान्य दान करीत असल्याचे यांना समजले. ही सर्व भावंडे धान्य मिळवण्यासाठी ‘कनआन’ हून निघाली. इजिप्तला पोहोचली. दरबारात हजर झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दरबार युसुफचाच (अ.) होता. त्यांनी आपल्या भावंडांना ओळखले परंतु; त्यांच्यावर जाहीर होऊ दिले नाही. त्यांना धान्य दिले आणि सांगितले की, तुम्हाला धान्य देत आहे परंतु पुढच्या खेपेला तुमच्या बापाचं आणि भावाचं धान्य तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं धान्य स्वतः येऊन घेऊन जावे. भावंडे म्हणाली आमचा बाप खूप म्हातारा झाला आहे. आजारी आहे, त्याला डोळ्यांनी दिसत सुद्धा नाही. लहान भाऊ त्यांची सेवा करतो आहे. तेंव्हा त्यांचं धान्यही तुम्ही आमच्याकडेच द्या. युसुफ (अ.) म्हणाले, एवढ्या बार मी देत आहे परंतु; काही जरी झाले तर पुढच्या वेळेस तुम्ही त्यांना सोबत घेऊन यावे.

पुढच्या वेळेस भावंडे यामिनला (युसुफचा सख्खा भाऊ) घेऊन तिथे हजर झाली. युसफने (अ.) बापाची चौकशी करताना माझा बाप कसा आहे, असे विचारले असता सर्व भावंडे चकित झाली की, हा बादशहा आमच्या बापाला आपला बाप कसा म्हणत आहे. पुढे युसुफ (अ.) म्हणाले, “तुम्ही युसुफ (अ.) सोबत काय केले होते. त्याला अंधाऱ्या विहिरीमध्ये ढकलून दिले होते ना? पुढे त्याचे काय झाले.” हे ऐकून भावंडे घाबरली क्षमा मागू लागली. युसफ (अ.) म्हणाले, भावंडांनो मी तुमचा भाऊ युसुफ (अ.) आहे. मी आजही तुमच्यावर तेवढेच प्रेम करतो. तुमच्याकडून कोणताच बदला घेणार नाही. मी तुम्हाला क्षमा केली आहे. युसुफने (अ.) त्यांना क्षमा केले.

एक भाऊ ते होते, ज्यांनी आपल्या भावाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे एक भाऊ असाही होता की, ज्याने आपल्या भावंडांना केवळ क्षमाच केले नाही तर त्यांना संकट काळी मदतही केली. खरे आहे, भाऊ असेही असतात आणि भाऊ तसेही.

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881



‘अबराहा’ हा इथियोपिया देशाचा कैसर कालीन गवर्नर होता. तो फार गर्विष्ठ आणि हेकेखोर होता. त्याने ‘येमेन’वर विजय मिळवला. येमेनवर विजयप्राप्तीनंतर त्याचा अहंकार अधिकच वाढला. अरबचे लोक दरवर्षी काबागृहाला जातात आणि हज्ज करतात. त्याची अशी इच्छा होती की, त्या लोकांनी सनाआमध्ये येऊन हज्ज करावे. त्यासाठी त्याने सनाआ या शहरामध्ये इ. स. ५७० मध्ये एक प्रार्थनगृह बांधले आणि अरबांना आवाहन केले की मक्केला जाऊन काबागृहाचे हज्ज करण्याऐवजी सनाआमध्ये येऊन या इमारतीत हज्ज करावे. एका धर्माविरुद्ध उचललेले हे टोकाचे पाऊल होते.

अरब लोक एकेश्वरवादी होते. शिवाय पवित्र काबागृह हे त्यांचा जीव की प्राण होता. त्यामुळे अरबांनी त्याचा कडाडून विरोध केला. ‘कनाना’ टोळीतील एक माणूस रागाच्या भरात येमेनला गेला. अबराहाने बांधलेल्या प्रार्थनागृहात शौचास बसला आणि त्याला अपवित्र केले. ही घटना ऐकल्यावर अबराहाला खूप राग आला. अपादमस्तक अहंकारात बुडालेला असल्याने त्याने संयम गमावला आणि पवित्र काबागृहाचा नाश करण्यासाठी हत्तींच्या सैन्यासह मक्केवर चढाई केली. त्याला आपल्या सैन्यावर खूप गर्व होता. माझ्या सैन्याचा कोणीच मुकाबला करू शकत नाही, या अविर्भावात तो वावरात असे. त्याच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर हत्तींचा समावेश होता.

त्याच्या सैन्याच्या पुढील पथकाने अब्दुल मुत्तलीबच्या दोनशे ते चारशे उंटांसह मक्केतील लोकांचे सर्व उंट आणि इतर गुरेढोरे हाकलून नेली. त्या काळी अब्दुल मुत्तलिब पवित्र काबागृहाची देखभाल करायचे.

या घटनेने अब्दुल मुत्तलिब यांना खूप दुःख झाले. ते अबराहाशी बोलायला त्याच्या सैन्यात गेले. जेव्हा अबराहाला कळले की, कुरैशचा सरदार त्याला भेटायला आला आहे, तेव्हा त्याने अब्दुल मुत्तलिबला आपल्या तंबूत बोलावले. अब्दुल मुत्तलिब अतिशय देखणा माणूस होता. त्याची ललाट प्रकाशमान होती. अबराहा, अब्दुल मुत्तलिब जवळ आला आणि विचारले, “सरदार! तुमचा इथे भेट देण्याचा उद्देश काय आहे?” अब्दुल मुत्तलिब यांनी उत्तर दिले की, “आमचे उंट आणि बकऱ्या इ. जे तुमच्या सैनिकांनी हाकलून इकडे आणले आहेत, तुम्ही ही सर्व गुरे आमच्या स्वाधीन करा.” हे ऐकून अबराहा म्हणाला, “हे सरदार! मला वाटले होते की तू खूप धाडसी आणि अद्भुत माणूस आहेस. पण तू मला, तुझ्या उंटांबद्दल विचारून माझ्या नजरेत तुझी प्रतिष्ठा कमी केलीस. उंट आणि शेळीचे वास्तव तरी काय आहे? तुझ्या काबागृहाची तोडफोड करून उद्ध्वस्त करण्यासाठी मी आलो आहे. तू त्याबद्दल बोलला नाहीस.”

अब्दुल मुत्तलिब म्हणाले, “माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की पवित्र काबागृह हे माझे घर नाही, ते तर ईश्वराचे घर आहे. तो स्वतः त्याचे घर वाचवेल. मला माझे उंट हवे आहेत?” हे ऐकून अबराहा गर्वाने म्हणाला, “हे मक्केचे सरदार! ऐका! मी काबाची, वीट न् वीट पाडून टाकीन आणि त्याचे नाव आणि निशाण पृथ्वीवरून पुसून टाकीन. कारण मक्केच्या लोकांनी माझ्या प्रार्थनागृहाचा अपमान केला आहे,  मी बदला घेण्यासाठी काबागहाचा नाश करीन. मला वाटते की हे करणे आवश्यक आहे.”

या संभाषणानंतर अबराहाने सर्व गुरेढोरे परत सोडण्याचे आदेश दिले. अब्दुल मुत्तलिब सर्व उंट आणि बकऱ्या बरोबर घेऊन त्यांच्या घरी गेले आणि मक्केच्या लोकांना म्हणाले, “तुमची संपत्ती, गुरेढोरे घ्या आणि मक्केतून निघून जा. डोंगराच्या माथ्यावर चढून, दरडींमध्ये लपून आश्रय घ्या.” नंतर ते स्वतः आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना घेऊन काबागृहामध्ये गेले. दरवाजाची कडी धरली. अत्यंत पोटतिडकीने रडत रडत अल्लाह दरबारी प्रार्थना करू लागले. ‘हे अल्लाह! खरंच, प्रत्येक जण स्वतःच्या घराचे रक्षण करतो. म्हणून आपल्या घराचे रक्षण कर. आपल्या अनुयायांना मदत कर.’’

ही दुआ करून अब्दुल मुत्तलिब, आपल्या कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन पर्वताच्या शिखरावर चढले आणि ईश्वराच्या सामर्थ्याचा गौरव करू लागले.

सकाळी जेव्हा अबराहा आपले सैन्य व हत्तींसह काबागृहावर आक्रमण करण्यासाठी निघाला आणि “मगमस” या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याचा ‘महमूद’ नामक हत्ती एकदम खाली बसला. कितीही प्रयत्न केले तरी हत्ती काबागृहाच्या दिशेने पुढे जात नव्हता. त्याला उलट दिशेला नेले तर चालायला लागायचा आणि काबागृहाकडे फिरविले की खाली बसायचा. त्याच स्थितीत ईश्वराचा क्रोध प्रकट झाला. लहान पक्ष्यांचे थवे आपल्या चोचीत आणि पंज्यांमध्ये तीन-तीन खडे घेऊन समुद्राच्या दिशेने पवित्र काबागृहाकडे येऊ लागले. त्यांना ‘अबाबिल’ म्हटले जाते. अबाबिलच्या या शूर सैन्याने अबराहाच्या सैन्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली की अबराहाचे सैन्य आणि त्याच्या हत्तींची दाणादाण उडाली.

वरून सोडलेला खडा सैन्य आणि हत्तीच्या शरीरातून पार होत होता. अबराहाच्या सैन्यातील एकही माणूस जिवंत राहिला नाही. अबराहा आणि त्याच्या हत्तींसह ते सर्व जण अशा प्रकारे मरून गेले की त्यांचे शरीर जमिनीवर विखुरले गेले. ‘सत्य आहे, पृथ्वी आणि आकाशांचे लष्कर अल्लाहच्याच अधिकारांत आहेत आणि तो जबरदस्त व बुद्धिमान आहे.’

पवित्र कुरआनच्या सूरह फीलमध्ये या घटनेचा उल्लेख आलेला आहे. तो असा आहे, “तुम्ही पाहिले नाही की तुमच्या पालनकर्त्याने हत्तीवाल्यांशी काय केले? काय त्याने त्यांची युक्ती फोल ठरविली नाही? आणि त्यांच्यावर पक्ष्यांचे थवेच्या थवे पाठविले जे त्यांच्यावर खड्यांचा मारा करीत होते. मग त्यांची अशी दशा करून टाकली जसा (जनावरांनी) खाल्लेला भुसा. (चघळलेल्या पेंढ्यासारखे केले.)

जेव्हा अबराहा आणि त्याच्या सैन्याचा अंत झाला तेव्हा अब्दुल मुत्तलिब डोंगरावरून खाली आले आणि ईश्वराचे आभार मानले. त्यांच्या या प्रतिष्ठेची चर्चा दूरदूर पसरली. सगळीकडे त्यांचे कौतुक होऊ लागले. संपूर्ण अरब जगतात या घटनेला प्रसिद्धी मिळाली. सर्व अरब लोक त्यांचा अधिकच आदर-सन्मान करू लागले. ही घटना इतकी अद्भुत होती की अरब लोक या वर्षाला हत्तींचे वर्ष म्हणू लागले. या वर्षाला यामुळेही महत्त्व प्राप्त झाले की घटनेच्या पन्नास दिवसानंतर पवित्र प्रेषित मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला.

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

प्रेरणादायी सत्यकथा


अल्लाहचे प्रेषित, मुहम्मद (स.) यांनी जेव्हा या जगात डोळे उघडले तेव्हा त्यांचे वडील हजरत अब्दुल्ला हे जग सोडून गेले होते. हजरत अब्दुल्ला, लग्नाच्या काही काळानंतर, व्यापारी काफिल्यासह सीरियाला गेले, परतीच्या प्रवासात आजारी पडले. भर तारुण्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचा 22 एप्रिल इ. स. 571 रोजी जन्म झाला. 

त्यांची आई, हजरत आमिना यांनी मुलाच्या जन्माची बातमी सासरे, अब्दुल मुत्तलिब यांना पाठवली, जे काबाची प्रदक्षिणा करण्यात मग्न होते. अब्दुल मुत्तलिब घरी आले आणि पवित्र प्रेषितांना काबागृहात घेवून गेले. तेथे त्यांनी बाल प्रेषितांचे, सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून आणि वाईट गोष्टींपासून रक्षण करण्याची अल्लाहकडे प्रार्थना केली.  अब्दुल मुत्तलिबने, बाल प्रेषितांचे नाव “मुहम्मद” ठेवले. आई आमिनाने आपल्या लाडक्या बाळाचे नाव “अहमद” ठेवले.

अरब लोक लहान मुलांना संगोपनासाठी गाव खेड्यांमध्ये पाठवत असत. खेड्यापाड्यात राहणाऱ्या अरब स्त्रिया वर्षभरात वेगवेगळ्या वेळी मक्केत येत आणि शहरातील तान्ह्या मुलांना वाढवण्यासाठी वाळवंटात घेऊन जात. बनू साद बिन बकर जमातीच्या स्त्रियांनी इतर मुले दत्तक घेतली आणि हजरत हलीमाने मुहम्मद यांना दत्तक घेतले.

पवित्र प्रेषितांनी आपल्या सुरुवातीच्या आयुष्यातील चार वर्षे बनू सादमध्ये त्यांची दूध आई हलीमाच्या देखरेखीखाली घालवलीत. चार वर्षानंतर बी हलीम यांनी बाल प्रेषितांना, आई हजरत आमिनाच्या स्वाधीन केले.

जेव्हा प्रेषित सहा वर्षांचे झाले, तेव्हा हजरत आमिना त्यांना आपल्या सोबत घेवून माहेरी गेल्या. मदिना हे त्यांचे माहेर. या प्रवासात उम्मे अयमनही त्यांच्या सोबत होत्या. हजरत आमिना एक महिना मदिनामध्ये राहिल्या. तेथे त्या आजारी पडल्या. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली.

मक्केला परत येताना ‘अबुवा’च्या ठिकाणी त्यांनी देह त्यागला. तेथेच त्यांना दफन करण्यात आले. उम्मे अयमन यांनी मुहम्मद (स.) यांना मक्केत आणले आणि त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांच्याकडे सोपवले. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांच्या सानिध्यात दोन वर्षेही उलटली नव्हती, आजोबांनी आपल्या आठ वर्षांच्या अनाथ नातवाला, आपला मुलगा अबू तालिबच्या हवाली केले आणि देह टाकला. अबू तालिबने बाल मुहम्मदची पालन पोषणाची जबाबदारी उचलली. 

जन्मापूर्वीच वडिलांचे निधन झालेले, सहाव्या वर्षी आई गेली, आठव्या वर्षी आजोबा. आयुष्यात एक नवीन युग सुरू झाले. वयाच्या आठव्या वर्षी, मुले खेळण्यात मग्न असताना, जगाच्या चढ-उतारांची माहिती नसताना, मुहम्मद (स.) दिवसभर शेळ्यांची काळजी घ्यायचे, त्यांना जंगलात चारायला घेऊन जायचे, जेवणासाठी जंगली बोरे खात आणि पोट भरत असे. घरातील छोटी-मोठी कामे करायचे. मुहम्मद (स.) यांनी आपल्या काकांना मदतीचा हात देण्यासाठी आणि आपल्या काकांच्या खांद्यावरून आपला भार कमी करण्यासाठी, वर नमूद केलेल्या कामांची मागणी केली. जरी अबू तालिबने आपला पुतण्या आणि मुलांमध्ये फरक केला नाही आणि पती-पत्नी दोघांनीही त्यांना खऱ्या मुलाप्रमाणे वाढवले, परंतु आईचे प्रेम आणि वडिलांची करुणा कोणतीही गोष्ट याचे बदल होवू शकत नाही. 

वयाच्या आठव्या वर्षी, पवित्र पैगंबर दररोज सकाळी शहराबाहेर जात असत आणि संध्याकाळपर्यंत वाळवंटात एकटे राहत असत. अनेकदा ते अमर्याद आकाश आणि अंतहीन क्षितिजाकडे डोळे लावून बसायचे आणि सूर्यास्तापूर्वी गुरांसोबत गावाकडे परतायचे. ज्याला बाप नाही, ज्याला आई नाही आणि खेळण्याच्या वयात कष्टाची कामे करणारी मुले लौकरच स्वावलंबी बनतात. 

अबू तालिब हे व्यापारी होते. ते मुहम्मदला (स.) वयाच्या बाराव्या वर्षी सीरियाला घेऊन गेले. सिरियातील बसरा शहराजवळ त्यांचा ‘कारवाँ’ थांबला. यात्रेकरू ज्या ठिकाणी थांबले होते त्याच ठिकाणी बुहिरा नावाचा साधू एका मठात राहत होता. सिरियाक भाषेत बुहिरा म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती आणि विचारवंत. 

अरबांचा हा व्यापारी काफिला जेव्हा मशिदीजवळ थांबला तेव्हा बुहीराने पाहिले की, ज्या झाडाखाली काफिला थांबला होता त्या झाडाच्या फांद्या खाली वाकल्या आहेत. त्याला काफिल्यात एक बारा वर्षांचा मुलगा दिसला. ज्यावर ढगाचा तुकडा सावली धरून आहे. 

बुहिराने त्याला शेवटचा संदेष्टा म्हणून ओळखले आणि त्याचे पालक अबू तालिबला, आपल्या पुतण्याची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला दिला. अबू तालिब म्हणाले की,”तुम्ही कसे म्हणू शकता की, हे मूल तेच आहे ज्याचा उल्लेख दैवी ग्रंथांमध्ये आहे.” बुहिराने उत्तर दिले की, “जेव्हा तुम्ही लोक घाटाच्या या बाजूला दिसलात तेव्हा तिथे एकही झाड किंवा दगड असा नव्हता जो नतमस्तक होत नव्हता.”

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


प्रेरणादायी सत्यकथा


अरबस्थानात अशी पद्धत होती की, मूल जन्माला आल्यानंतर त्याला गाव-खेड्यामध्ये राहणाऱ्या स्त्रियांकडे दूध पाजण्यासाठी पाठवून देण्यात येई. सुमारे दोन वर्षे ही मुले मरुभूमीतील त्या स्त्रियांकडे राहत असत. नंतर त्या स्त्रिया या मुलांना त्यांच्या घरी आणून सोडत असत. याकरिता त्यांना मुलांच्या पालकांकडून चांगला मोबदला मिळत असे. हीच त्यांची कमाई असायची.

आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला, त्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. या अनाथ बाळाकडून आपल्याला दूध पाजण्याचा विशेष मोबदला मिळणार नाही, या भीतीने अनेक स्त्रियांनी बालप्रेषितांना घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी मक्केमध्ये सर्वात उशिरा पोहोचणारी स्त्री, अर्थात दाई हलीमा यांना कोणतेच मूल मिळाले नव्हते, तेव्हा त्यांनी विचार केला या मुलालाच आपण सोबत घेऊन जाऊ या. त्यांनी बालप्रेषितांना सोबत घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघाल्या.

बालप्रेषितांची बरकत त्यांना जाणवायला लागली. त्यांच्या उंटिणीची मरगळ दूर झाली होती. तिची गती इतकी वाढली की, ती काफिल्यात सर्वांत पुढे चालू लागली. सर्वांना आश्चर्य वाटत होते की, या उंटिणीमध्ये एवढी शक्ती आली कुठून!

हजरत हलीमा यांची मुलगी शीमा, बालप्रेषितांचे खूप लाड करायची. प्रेमाने त्यांचा सांभाळ करायची. सायंकाळी जेव्हां स्त्रिया स्वयंपाकात लागायच्या तेव्हां बहिणी आपापल्या भावांना बाहेर घेऊन येत. त्यांना सोबत घेऊन खेळत. एकमेकांशी स्पर्धा करत. माझ्या भावासारखा कुणाचा भाऊ नाही. कोणी आपल्या भावाच्या रंगाचे गुणगान करत, कोणी सुंदरतेचे!

त्यात बनू सआदच्या कबिल्यातील मुलगी, शीमा आपला दूधभाऊ, बाल मुहम्मद (स.) यांना घेऊन यायची आणि दुरूनच म्हणायची, 'माझा भाऊही आला आहे, आता बोला.' तेंव्हा सर्वांच्या माना खाली व्हायच्या. सर्वजण म्हणत, 'तुझ्या भावाशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, आम्ही एकमेकांशी बोलत आहोत.' जेव्हा सर्व सहमत होत आणि म्हणत तुझा भाऊ सर्वांत जास्त देखणा आहे. तेव्हां शीमाचा अभिमान गगनाला भिडायचा. ती आनंदाने ही अंगाई म्हणायची,

''पालनकर्त्याचा आशीर्वाद आणि शांती तुझ्यावर असो, हे आमच्या प्रभू, माझ्या भावाला सुरक्षित ठेव, तो घरकुलातील मुलांचा सरदार आहे, उद्या तो मोठ्या झालेल्या तरुणांचा सरदार असेल'' असे म्हणून डोलून जाई.

दर सहा ते सात महिन्यांनी, आदरणीय हलीमा, प्रेषितांना मक्केत आणायची आणि आई आदरणीय आमिना व नातेवाईकांना भेट देऊन परत घेऊन जायची. प्रेषित दोन वर्षांचे झाले तेव्हा दूध सोडवण्यात आले.

आत्तापर्यंत हलीमा सादियाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते की, हे एक अद्भुत मूल आहे. त्यांचं प्रेषितांवर खूप प्रेमही होतं. वास्तविक पाहता दोन वर्षांनी दूध सोडवल्यावर बाळ आईच्या स्वाधीन करायला हवे होते, परंतु या अद्भुत बाळाला अजून काही काळ आपल्या जवळ ठेवायचे होते. म्हणून त्यांनी हजरत आमिना यांच्याशी या इच्छेची चर्चा केली. बी हलीमा म्हणाल्या, "मरूभूमीतील मोकळी हवा लहान मुहम्मदसाठी खूप आनंददायी आहे. तसेच मक्केत सध्या साथ पसरली आहे. तेंव्हा मुहम्मद (स.) यांना माझ्यासोबत वाळवंटात राहू दिले तर बरे होईल."

हा युक्तिवाद वाजवी होता. आदरणीय आमिना आपल्या लाडक्यापासून अजून काही काळ वेगळे राहण्यास तयार झाल्या. त्यामुळे प्रेषितांना आणखी काही काळ बी हलीमाच्या सान्निध्यात राहण्यासाठी परत करण्यात आले.

तेथे प्रेषित आपल्या दूध भावांसोबत बकऱ्या चारायला अनेकदा बाहेर जात असत. सुमारे चार वर्षे वय झाल्यानंतर बी हलीमाने प्रेषितांना मक्केत आणून सोडले.

शेळीपालन आणि मेंढपाळाच्या सुरुवातीच्या अनुभवाव्यतिरिक्त, पैगंबरांना त्यांच्या नंतरच्या आयुष्यात या मनोरंजक आणि उपयुक्त व्यवसायाची संधी मिळाली. त्यामुळे अनेक वर्षे ते आपल्या कुटुंबाच्या आणि मक्केतील इतर काही लोकांच्या शेळ्या चारत असत. मेंढपाळ करताना त्यांना विश्व आणि जीवनाचा विचार करण्याची संधी मिळाली. आपला हा अनुभव प्रेषित स. मोठ्या अभिमानाने सांगायचे आणि त्यासाठी अल्लाहचे आभार मानायचे.

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881



प्रेरणादायी सत्यकथा

चूक सर्वांकडूनच होत असते. लहान असो, मोठे असो, गरीब असो की श्रीमंत. कोणीही असो. असे म्हटले जाते की, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. परंतु काही लोक असे असतात की जे आपली चूक मान्य करायला तयार होत नाहीत. खरे तर आपली चूक झाली असेल तर, ती मान्य करायला काय हरकत आहे. चूक मान्य केल्याने माणूस काही लहान होत नाही. आपली चूक मान्य करून ती दुरुस्त करणे उलट यात मोठेपणाचा आहे. परंतु काही लोक असे शिरजोर असतात की चूक मान्यच करत नाहीत. माफी मागणे तर दूर.

अनेकांना असे वाटते की हा आत्म-अनादर आहे. माफी मागणे हे सूसंस्कृतपणाचे लक्षण आहे. चांगले आचरण आहे.

एक अशीच सत्य घटना. आपली चूक लक्षात येताच त्या भल्या माणसाने अशा काही पद्धतीने क्षमा मागितली की इतिहासात माफी मागणारा आणि माफी देणारा दोघेही अजरामर झालेत.

एकदा झाले असे की अबू जर गफारी (र.) यांची काहीतरी चूक झाली. आदरणीय बिलाल यांनी सहज ती निदर्शनास आणून दिली. अबू जर यांना ते खुपले नाही. त्यांना राग आला आणि ते आदरणीय बिलाल यांना म्हणाले, "हे काळ्या चेहऱ्याच्या आईच्या मुला, आता तुही माझ्या चुका बाहेर काढशील?"

आदरणीय बिलाल निग्रो वंशीय होते. साहजिकच त्यांचा रंग अतिशय काळा होता. मक्कामध्ये वास्तव्यास असताना ते गुलामीचे जीवन व्यतीत करत होते. त्या काळात उच्च जातीचे लोक कनिष्ठ जातीच्या लोकांना गुलाम बनवून ठेवायचे. जनावरांप्रमाणे या गुलामांची खरेदी-विक्री व्हायची. त्यांना कोणतेच अधिकार नव्हते. मालकाच्या मर्जीप्रमाणे राहावे लागायचे.

प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी एकेश्वरत्वाची घोषणा केली आणि इस्लामची शिकवण द्यायला सुरुवात केली. 'सर्व मानवजात समान आहे. माणूस म्हणून सर्वांना समान अधिकार आहेत. गोरा-काळा सर्व समान आहेत. कोणी उच्च नाही कोणी नीच नाही, कोणी लहान नाही कोणी मोठा नाही, मोठा तो आहे ज्याच्यात अधिक ईशभय आहे.' या शिकवणीने बिलाल प्रेषितांकडे आकर्षित झाले. त्यांनी प्रेषितांचे अनुयायित्व पत्करले.

त्यांच्या मालकाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्याने बिलाल (र.) यांच्यावर खूप अत्याचार करायला सुरुवात केली. भर उन्हात तपत्या वाळवंटात त्यांना झोपवून त्यांच्या छातीवर दगड ठेवायचा. चाबकाचे फटके द्यायचा. बिलाल (र.) सतत एकच शब्द उच्चारायचे 'अहद' अर्थात ईश्वर हा एकच आहे. त्यामुळे त्यांचा मालक अधिकच चिडायचा. आणखीन त्यांच्यावर अत्याचार करायचा. सर्व अन्याय अत्याचार सहन केले परंतु एकेश्वरत्वाची दोरी त्यांनी सोडली नाही.

जेव्हा ही बाब प्रेषितांना समजली तेव्हा त्यांनी अबू बकर (र.) यांना ही गोष्ट सांगितली. अबू बकर (र.) यांनी बिलाल (र.) यांना त्यांच्या मालकाकडून मोठी रक्कम देऊन खरेदी केले आणि मुक्त करून टाकले.

मुक्त होताच ते प्रेषितांच्या समक्ष हजर झाले. प्रेषितांच्या दरबारात त्यांना फार मानाचे स्थान होते. मोठमोठे सरदार व्यापारी आणि उच्च कुळातील लोक उपस्थित असतानादेखील इस्लामची पहिली अजान देण्याचा मान बिलाल (र.) यांनाच मिळाला होता. एवढेच नव्हे तर प्रेषितांच्या संपूर्ण जीवनात बिलाल (र.) हेच अजान द्यायचे. ते फार संयमी होते परंतु आपल्या आईचा अपमान त्यांना सहन झाला नाही.

अबू जर सहज बोलून गेले होते. त्यांना वाटले नव्हते की बिलाल (र.) एवढे मनाला लावून घेतील. अबू जर (र.) यांच्या बोलण्याने बिलाल (र.) यांचे मन दुखावले.

बिलाल (र.) म्हणाले, "पालनकर्त्याची शपथ! मी नक्कीच ही बाब अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर प्रस्तुत करीन. तुम्हाला त्यांच्यासमोर उभे करीन!"

आणि त्यांनी खरोखरच ही बाब प्रेषितांसमोर मांडली. हे ऐकून प्रेषित नाराज झाले. त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला.

प्रेषित (स.) म्हणाले, "हे अबू जर (र.), तुम्ही त्याला त्याच्या आईच्या नावाने लाजविले... तुमच्यातील अज्ञानता अजून गेलेली नाही."                                                                                                                    

प्रेषितांचे हे शब्द ऐकताच आणि ते नाराज झाल्याचे समजताच अबू जर (र.) रडायला लागले, "हे अल्लाहचे प्रेषित (स.)! माझ्यासाठी अल्लाहकडे माफीसाठी प्रार्थना करा."  

असे म्हणत, बिलाल (र.) समोर हजर झाले. आपला चेहरा मातीवर ठेवला आणि बिलाल (र.) यांना उद्देशून म्हणाले, "बिलाल (र.)! जोपर्यंत तू माझा चेहरा तुझ्या पायाने तुडवत नाहीस, तोपर्यंत मी मातीतून माझा चेहरा उचलणार नाही." हे पाहून बिलाल (र.) रडत रडत अबू जर (र.) यांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्या गालाचे चुंबन घेतले आणि उत्स्फूर्तपणे म्हटले, "अल्लाहसमोर नतमस्तक होणाऱ्या या मुखाला मी कसे तुडवू?"

नंतर दोघेही उभे राहिले आणि एकमेकांना मिठी मारून खूप रडले!!


-सय्यद झाकीर अली, 

परभणी, 

9028065881


प्रेरणादायी सत्यकथा



मक्केत राहणारा एक तरुण प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांचे अनुयायी यांचा कट्टर विरोधक होता. त्याच्या स्वतःच्या घराण्यातील जे लोक इस्लामचा स्वीकार करून प्रेषितांचे अनुयायी होत, अशा लोकांना तो अतोनात यातना देत. 

त्याच्या घराण्यात एकेश्वरत्वाचा आवाज अपरिचित राहिला नव्हता, झैदचा (र.) मुलगा सईद याने सर्वप्रथम इस्लाम धर्म स्वीकारला. हजरत सईद यांचा विवाह या तरुणाची बहीण फातिमा हिच्याशी झाला होता. परिणामी फातिमाही मुस्लिम झाली, त्याच कुटुंबातील एक प्रतिष्ठित व्यक्ती नईम बिन अब्दुल्ला यांनीही इस्लाम स्वीकारला होता, परंतु हा तरुण अजूनही इस्लामपासून दूरच होता आणि जेव्हा जेव्हा इस्लामचा आवाज त्याच्या कानावर पोहोचायचा तेव्हा तो संतापायचा. लबिना ही त्यांच्या कुटुंबाची दासी होती, जिने इस्लाम स्वीकारला होता. हा तरुण तिला खूप त्रास द्यायचा. खूप मारझोड करायचा.

जेव्हा त्याचा चुलत भाऊ सईद बिन जायद याने इस्लामचा स्वीकार केला तेव्हा त्यांना दोरीने बांधले, खूप मारले परंतु; ते त्याला बधले नाहीत. ( इस्लामची नशा अशी काही आहे की एकदा चढली की उतरत नाही.) या तरुणाच्या मनात इस्लाम आणि पवित्र प्रेषित (स.) यांच्याविषयी घृणा विकोपाला गेली. जेव्हा इतर सर्व डावपेच अयशस्वी ठरले, कितीही प्रयत्न करून तो एकाही व्यक्तीला इस्लामपासून परावृत्त करू शकला नाही, तेव्हा प्रेषित (स.) यांच्याविरूद्ध विकोपाचे पाऊल उचलले, प्रेषित (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना ठार मारण्याचे. कंबरेवर तलवार घेऊन तो थेट त्यांच्या दिशेने निघाला.

योगायोगाने, नईम बिन अब्दुल्ला त्याला वाटेत भेटले, त्याचे रौद्ररूप पाहिले आणि विचारले, "सर्व काही ठीक तर आहे ना?"

तो म्हणाला, "मी मुहम्मद (स.) यांना संपविण्यासाठी निघालो आहे."

हा तरुण खूप शूरवीर होता. एखाद्या उद्देशाने तलवार उचलली तर ते काम पूर्ण केल्याशिवाय तलवार म्यानात घालायचा नाही. हे सर्व परिचित होते. तरीही नईम बिन अब्दुल्ला, धैर्य दाखवत त्याला म्हणाले, "अगोदर आपल्या बहीण आणि मेव्हण्यांना जाऊन भेट, तेदेखील प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी झाले आहेत. त्या तरुणाने लगेचच माघार घेतली आणि सरळ बहिणीचे घर गाठले.

बहीण आणि मेव्हणा कुरआन पठण करत होते. दारावर भावाचा आवाज ऐकताच कुरआनचे भाग लपवले गेले. पण आवाज कानात पडला होता. त्याने बहिणीला विचारले, "हा कसला आवाज होता? तुम्ही काय वाचत होता? मी ऐकले आहे की तुम्ही दोघेही धर्मत्यागी झाला आहात."

असे सांगून त्याने आपल्या मेव्हण्याशी हुज्जत घातली आणि त्यांना मारायला सुरुवात केली. त्याची बहीण त्यांना वाचवायला आली तेव्हा त्याने तिलाही मारायला सुरुवात केली. दोघांचे शरीर रक्तबंबाळ झाले, परंतु त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

'काहीही होवो, प्राण गेले तरी चालेल पण इस्लाम आता मनातून जाऊ शकत नाही.' बहिणीच्या या शब्दांचा विशेष प्रभाव पडला, या शब्दांनी त्याला विचार करायला भाग पाडले. त्याने आपल्या बहिणीकडे प्रेमळ नजरेने पाहिले, तिच्या शरीरातून रक्त वाहत होते, बहिणीचे रक्त पाहून त्याला आणखीनच वाईट वाटले.

तो म्हणाला, "तुम्ही जे वाचत होता ते मलाही दाखवा."

तो वरमलेला पाहून, बहिणीने कुरआनचे काही भाग त्याच्यासमोर ठेवले. त्याने कुरआन पठण करायला सुरुवात केली. एक एक आयत पठण करत तो, "जे काही आकाश आणि पृथ्वीवर आहे ते अल्लाहची स्तवन करतात आणि तो पराक्रमी आणि सर्वज्ञानी आहे." तसेच "अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर विश्वास ठेवा."

या आयातीवर पोहोचला आणि एकदम असहायपणे ओरडला, "मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत."

नंतर नम्रपणे म्हणाला," मला प्रेषितांकडे घेऊन चला."

कुरआनच्या त्या आयती वाचून प्रेषितांचा कट्टर विरोधक कट्टर समर्थक बनला. पुढे संपूर्ण आयुष्य प्रेषितांचे एकनिष्ठ राहिला, ते तरुण होते आदरणीय उमर रजि.

आदरणीय अबूबकर रजि. शहीद झाल्यानंतर 23 ऑगस्ट इ.स. 634 रोजी खिलाफतची जबाबदारी त्यांच्यावर आली. उमर बिन खत्ताब (र.) हे मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर समाजात एक उमदे, न्यायी आणि निष्पक्ष शासक म्हणून ओळखले जातात.

त्यांचे राज्य 22 लाख 51 हजार 30 चौरस मैल भूभागावर पसरले होते.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


प्रेरणादायी सत्यकथा


जगात मित्रत्वाचे अनेक किस्से सांगितले नि ऐकले जातात. मित्राने मित्रासाठी केलेला त्याग, दिलेले बलिदान यांची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आजही अनेक असे मित्र आहेत की, जे आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण द्यायलाही तयार असतात. रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे हे नाते त्यामुळेच अधिक बळकट बनते...

अशाच दोन मित्रांची ही कथा.... प्रेषित मुहम्मद (स.) आणि अबू बकर (र.) यांची.

अबू बकर (र.) प्रेषितांचे अतिशय घनिष्ठ असे मित्र होते. वयाच्या चाळीसाव्या वर्षी जेव्हा प्रेषितांनी एकेश्वरत्व आणि स्वतः प्रेषित असल्याचे घोषित केले, तेव्हा फार थोड्या लोकांनी त्यांना साथ दिली. त्यापैकी त्यांचे घनिष्ठ मित्र अबू बकर (र.) हे होते...

सुमारे तेरा वर्षे मक्केत प्रेषित (स.) एकेश्र्वरत्वाची, पारलौकिक जीवनात योग्य मोबदला मिळावा यासाठी इहलोकात सत्कर्म करण्याची तसेच कुरआन व प्रेषितांच्या आचरणानुसार अनुसरण करण्याची शिकवण देत राहिले.

प्रस्थापितांना ही बाब खुपत होती. हे लोक प्रेषितांचे शत्रू बनले. त्यांना त्रास दिला. अनेक वेळा जिवे मारण्याचे प्रयत्न केले, परंतु प्रत्येक वेळेस अबू बकर (र.) हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यांनी कधीच प्रेषित (स.) यांना एकटे पडू दिले नाही. मक्कावासियांकडून होणारा जाच आणि त्रास इतका वाढला की, अल्लाहने मक्का सोडून मदीनाकडे हिजरत करण्याचे आदेश प्रेषितांना दिले. 

मक्का सोडणे एवढे सोपे नव्हते. शत्रू त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी तयार बसले होते. अशा वेळेस प्रेषितांनी अबू बकर (र.) यांना हिजरतची कल्पना दिली. अबूबकर खूश झाले की, या प्रवासात मी प्रेषितांचा सोबती राहणार आहे. एका रात्री त्यांनी मक्का सोडले आणि मक्केपासून 3 मैल अंतरावर असणाऱ्या एका पर्वतावर असलेल्या 'सोर' नावाच्या गुहेत आश्रय घेतला.

अबू बकर सिद्दीक (र.) हे प्रथम गुहेत गेले. त्यांनी गुहा स्वच्छ केली. गुहेमध्ये अनेक छिद्रे होती. या छिद्रांमध्ये एखाददुसरा हानिकारक जीव-जंतू असू शकतो, या शंकेने त्यांनी आपली चादर फाडली आणि त्या चादरीद्वारे सर्व छिद्रे बंद केली. एक छिद्र मात्र शिल्लक राहिले. नंतर त्यांनी प्रेषितांना आत बोलावले.

गुहेत आल्यानंतर प्रेषित (स.) हे अबू बकर (र.) यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपी गेले. प्रेषितांना झोप लागल्यावर अबू बकर (र.) यांच्या लक्षात आले की एक छिद्र शिल्लक आहे. त्यांनी त्या छिद्रावर आपल्या पायाचा अंगठा ठेवला. नेमकं त्याच छिद्रात कोणतातरी विषारी जीव होता. त्याने अबू बकर (र.) यांच्या अंगठ्याचा चावा घेतला. त्यामुळे अबू बकर (र.) यांना खूप वेदना होऊ लागल्या, परंतु त्यांनी हालचाल केली नाही. जर हालचाल केली तर प्रेषितांची झोपमोड होईल, या उद्देशाने ते वेदना सहन करीत राहिले.

आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल परंतु प्रिय प्रेषित (स.) यांची, आपल्या लाडक्या मित्राची झोपमोड होता कामा नये ही त्यांची भावना!

वेदना इतक्या असह्य झाल्या की त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. त्यांचे अश्रू प्रेषितांच्या पवित्र गालावर पडले. प्रेषित (स.) जागे झाले आणि अबू बकर (र.) यांना कारण विचारले असता त्यांनी हकीगत सांगितली. प्रेषितांनी आपली लाळ त्या जागेवर लावली ज्या ठिकाणी दंश झाला होता. त्यामुळे त्यांच्या वेदना नाहीशा झाल्या.

या प्रसंगानंतर अबू बकर (र.) यांना 'यार-ए-गार' अर्थात गुफेतील साथीदार अशी उपाधी देण्यात आली.

खरोखरच असा मित्र होणे नाही!

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


प्रेरणादायी सत्यकथा


आदरातिथ्य हा मानवी गुणांपैकी एक आहे. अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदरातिथ्य या बाबीवर विशेष जोर दिला आहे. 'घरात पाहुणे येणे हे अल्लाहच्या कृपेचे लक्षण आहे.' असे पवित्र प्रेषित (स.) यांनी म्हटले आहे.

हेच कारण आहे की, पाहुणचार हा प्रेषितांच्या साथीदारांच्या जीवनाचा एक विशेष भाग होता. जरी त्यापैकी बहुतेक जण गरीब आणि बाह्य कारणांच्या बाबतीत पूर्णपणे निराधार होते, परंतु त्यांची गरिबी आणि निराधारता त्यांना आदरातिथ्यापासून व त्यापासून मिळणाऱ्या आनंद व बरकातीपासून वंचित ठेवू शकली नाही.

त्या काळात आजच्यासारख्या हॉटेल किंवा खानावळी नव्हत्या, त्यामुळे येणारे लोक स्वतः आपल्या जेवणाची व्यवस्था स्वतःच करत. हाताने स्वयंपाक करून खात. परंतु वाळवंटी प्रदेश, अनेक दिवसांचा प्रवास त्यामुळे त्यांच्यासोबत असलेली उपजीविका संपून जायची. अशावेळी मग कोणीतरी त्यांना आपल्या घरी पाहुणा म्हणून घेऊन जायचे आणि त्यांचे आदरातिथ्य करायचे. प्रसंगी स्वतः उपाशी राहायचे परंतु पाहुण्याला खाऊ घालायचे. इस्लामच्या इतिहासात याची अनेक उदाहरणे आली आहेत. पैकी एक उदाहरण खालीलप्रमाणे आहे.

एकदा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत पाहुणा आला. एक वेळेसाठीही त्या व्यक्तीचा आदरातिथ्य सोपा नव्हता. पवित्र प्रेषित (स.) यांनी साथीदारांना प्रोत्साहित केले आणि सांगितले, ''जो कोणी अल्लाहसाठी म्हणून, त्याचे आदरातिथ्य करेल, पालनकर्ता त्याच्यावर दया करेल.''

आपल्या पलनकर्त्याच्या दयेच्या आशेने, हजरत अबू तलहा (र.) म्हणाले, "हे अल्लाहचे प्रेषित, मी या पाहुण्याला माझ्यासोबत घरी घेऊन जातो."

आपल्या घरातील खाद्यपदार्थांची तपासणी न करता, त्यांनी त्याला सोबत घेतले. घरी पोहोचल्यावर त्यांना पत्नीकडून कळले की खायला काही नाही. मुलांसाठी जेमतेम अन्न पुरेल इतकेच अन्न आहे.

बायकोकडून निराशाजनक बाब समजली, तरीही पाहुणचाराच्या भावनेत काही फरक पडला नाही. ते आपल्या पत्नीला म्हणाले, ''तू मुलांची समजूत घाल. त्यांना सांत्वन देऊन उपाशीपोटी झोपव.''

पत्नीने तसेच केले. मुले उपाशीपोटी झोपली. आता आणखी एक अडचण होती, त्या वेळच्या रितीरिवाजानुसार यजमान पाहुण्याला एकटे जेवण वाढत नसत, पाहुण्यासोबत यजमानही जेवण करत. पत्नीने मार्ग असा काढला की, नवरा-बायको पाहुण्यासोबत जेवायला बसले की, बायकोने दिवा दुरुस्त करायच्या निमित्ताने दिवा बंद केला आणि मग दोघंही पाहुण्यासोबत एकत्र बसून अशी हालचाल करत राहिले, जणू ते जेवत आहेत. परंतु प्रत्यक्षात काहीही खाल्ले नाही. अशा प्रकारे पाहुणा पोटभर जेवला.

अशा प्रकारे घरातील सर्व लोक उपाशी राहिले आणि पाहुणे पोटभर जेवले. ईश्वराला त्यांचा हा त्याग इतका आवडला की, प्रेषित (स.) यांना अल्लाहने प्रकटीकरणाद्वारे ही बाब कळवली.

सकाळी प्रेषितांनी हजरत अबू तलहा (र.) यांना बोलावले आणि प्रसन्न होऊन विचारले, "काल रात्री तुम्ही पाहुण्याचे आदरातिथ्य कसे केले?"

हजरत अबू तलहा (र.) यांनी घडलेला किस्सा सांगितला.

प्रेषित (स.) म्हणाले, ''तुम्ही जे केले ते पाहून आपला पालनकर्ता प्रसन्न झाला आणि म्हणून मीदेखील प्रसन्न झालो.''

मित्रांनो, या घटनेचा विचार करा आणि पाहा हा पाहुणचार किती कठीण आणि त्यागाचा आहे. आपल्याकडे खूप काही असताना आणि आपल्या गरजा पूर्ण झाल्या असताना त्यातून इतरांना काही देणे अवघड नाही. त्यातही लोक अनाकानी करतात, परंतु स्वतः उपाशी राहून मुलाबाळांना उपाशी ठेवून इतरांना खाऊ घालणे ही बाब सामान्य नाही.

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

प्रेरणादायी सत्यकथा

ही कथा एका अशा मुलाची आहे जो लहान वयातच अनाथ झाला होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई व आजोबांनी त्याचा सांभाळ केला. त्याने खूप शिकावे, ज्ञानी व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. बालपणापासूनच आईने त्याला चांगले शिक्षण द्यायचे ठरवले. मुलगाही फार हुशार होता. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण मिळवण्यासाठी परदेशात निघाला.

त्या काळात बगदाद हे ज्ञानाचे माहेरघर समजले जायचे. उच्च शिक्षण मिळवण्यासाठी दूरदूरून विद्यार्थी तेथे येत असत. वाळवंटी प्रदेश, पायी प्रवास करण्याच्या तयारीने, हा नवतरुणही बगदादला जायला निघाला. तेव्हा त्याच्या आईने त्याला चाळीस दिनार दिले. दिनार सुरक्षित राहावेत म्हणून आईने शर्टाच्या बगलेत आतल्या बाजूने ठेवून शिवून घेतले. दिनार इतके सुरक्षित होते की बाहेरून कोणालाही त्याचा पत्ता लागत नव्हता.

प्रवासाला निघताना आई म्हणाली, "हे बघ बेटा, मी तुला नेहमी सत्य बोलण्याचा सल्ला देते. कितीही कठीण प्रसंग आला तरी कधीही खोटे बोलू नकोस. खोटे बोलणे हे मोठे पाप आहे."

आईचा निरोप घेऊन नवतरुण काफिल्यासोबत बगदादकडे रवाना झाला. हा ताफा 'हमदान' येथून पुढे निघाला असता अचानक दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी काफिल्याची सर्व मालमत्ता लुटली; पण त्या मुलाकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही.

थोड्या वेळाने एक दरोडेखोर मुलाकडे आला आणि सहज त्याला विचारले, "तुझ्याकडे काय आहे?"

मुलाने सांगितले,  "माझ्याकडे चाळीस दिनार आहेत."

सर्व जण आपली मालमत्ता वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हा मुलगा सहज सांगतोय 'माझ्याकडे चाळीस दिनार आहेत!' तेव्हा दरोडेखोराला वाटले, हा उगाचच मस्करी करतो आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष न देता तो पुढे निघून गेला.

त्यानंतर दुसरा दरोडेखोर आला, त्यानेही तोच प्रश्न केला. त्यालाही मुलाने सत्य सांगितले; पण त्यालाही वाटले हा मुलगा विनोद करतोय आणि तो निघून गेला. दोघांनी जाऊन ही घटना त्यांच्या प्रमुखाला सांगितली. सरदाराने त्यांना मुलाकडे पाठवले आणि ते मुलाला सरदाराकडे घेऊन गेले.

दरोडेखोर एका टेकडीवर बसून लुटलेल्या मालाची वाटणी करत होते. सरदाराने मुलाकडे पाहिले आणि विचारले, "खरे सांग, तुझ्याकडे काय आहे?"

मुलगा म्हणाला, "चाळीस दिनार आहेत."

सरदारने विचारले, "ते कुठे आहेत?"

मुलगा म्हणाला, "ते काखेखाली शर्टाच्या आत शिवलेले आहेत."

सरदारने मुलाचे शर्ट काढून उसवून पाहिले. खरोखरच त्यात चाळीस दिनार होते. आश्चर्यचकित होऊन सरदार म्हणाला, "आम्ही दरोडेखोर आहोत आणि जी काही संपत्ती मिळेल ती लुटतो. हे तुला माहीत आहे ना? मग तू आमच्यापासून हे लपवून का ठेवले नाहीस?"

मुलगा म्हणाला,"माझ्या आईने मला निरोप देताना मला सल्ला दिला होता की, नेहमी खरे बोलले पाहिजे. वाईट प्रसंग आला तरी खोटे बोलू नये. मग मी या चाळीस दिनारांसाठी खोटे कसे बोलू शकेन?"

हे ऐकून सरदार अंतर्मुख झाला. तो इतका भारावला की त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याने एक थंड उसासा टाकला आणि म्हणाला, "अरे! तू तुझ्या आईचे शब्द पूर्ण केलेस आणि मी.... इतके दिवस अल्लाहला दिलेले वचन मोडत आहे. त्याच्या भक्तांना लुटत आहे."

असे म्हणत त्याने मान खाली घातली. आपल्या पापांचा प्रायश्चित्त करू लागला. दरोडेखोरीचा त्याग करण्याची घोषणा केली. तो आपल्या साथीदारांना म्हणाला, "तुम्ही स्वतंत्र आहात. मी हा मार्ग सोडला"

त्याच्या साथीदारांनी ही परिस्थिती पाहिली आणि त्याला म्हणाले, "तू दरोडेखोरीत आमचा नेता होता, आता तू बदललास, प्रायश्चित करून सत्मार्गाला लागलास. या मार्गातही तू आमचा सर्वांचा नेता आहेस. आम्हीदेखील हा मार्ग सोडतो."

सर्व दरोडेखोरांनी पश्चात्ताप केला आणि काफिल्याची सर्व मालमत्ता परत केली.

हे नवतरुण होते अब्दुल कादर रह. इराक मधील 'जीलान' या शहरात त्यांचा जन्म झाला होता. त्यावरून त्यांचे नाव अब्दुल कादर जीलानी (रह.) असे पडले. त्यांच्या एका सत्य बोलण्याने दरोडेखोरांनी सत्मार्ग स्वीकारला. खरोखरच सत्याची शक्ती अपरंपार आहे.

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget