Halloween Costume ideas 2015
Articles by "हसरे फटके"


प्राणप्रिय उधोजीराजे यांचे चरण'कमळी' कमळा नागपूरकरीण हीचा मानाचा मुजरा. खरं म्हणजे साष्टांग नमस्कारच घालणार होते, पण हल्ली साष्टांग नमस्कार घालण्याच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो, पोटात गोळा उठतो. खरं म्हणजे आजचा दिवस प्रत्यक्ष भेटून प्रेमाच्या 'मिनिमम कॉमन प्रोग्रॅम'वर युती करण्याचा! मीसुध्दा स्वतःच येणार होते 'मातोश्री'वर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून 'कमळा'चं फुल द्यायला आणि परत एकदा 'प्रपोज' करायला. पण हल्ली काय एक माणूस फार मोठ्ठा झाला आहे बुवा! पूर्वी तुमच्या गळ्यात कॅमेरा असायचा, आता तर जिथे जाता तिथे तुमच्यावरच कॅमेरे रोखलेले असतात! (तरी शेवटी लोणारला मोबाईलनेच फोटो काढावा लागला ना?) त्यात आपला ब्रेकअप झाल्यापासून तुम्ही म्हणे गेटवरच्या गुरख्याला मला आत न सोडण्याची सक्त ताकीदच देऊन ठेवली आहे. मागे मी त्या रस्त्याने सहजच पायी फिरत होते तर मेला मागची ओळख विसरून, माझ्याकडे मारक्या म्हशीसारखा पाहत काठी आपटत होता. उगाच नको बाई अपमान म्हणूनच समक्ष आले नाही. आणि येऊन तरी काय करणार? तुमच्या तोंडावर मास्क, माझ्या तोंडावर मास्क. मी तुम्हाला प्रेमाने कमळाचं फूल देणार, तुम्ही निरसपणे त्याच्यावर सॅनिटायझर मारणार, मग हळूच ते नाकाला लावणार आणि मग त्या सॅनिटायझरच्या वासाने - - - नको ग बाई. असो.

हे गुलाबी कागदावरचं प्रेमपत्र (बघणाऱ्याला सरकारी वाटावं म्हणून) मुद्दामच खाकी पाकिटात टाकून पाठवतेय. आज आपल्या ब्रेकअप नंतरचा हा पहिलाच व्हॅलेन्टाईन डे ना! म्हणजे तसा दुसरा, पण पहिला आपल्या ब्रेकअपनंतर लगेच आला होता ना. मी तर धड त्या धक्क्यातून सावरलेसुद्धा नव्हते. त्या 'लॉ ऑफ ऍट्रैक्शन'वाल्यांचं ऐकून सारखं 'मी परत येईन. मी परत येईन.' घोकत बसले होते. काहीच उपयोग झाला नाही. मिसगाईड करतात मेले. बारामतीला राहतात की काय? जाऊ द्या. झालं गेलं 'मिठी'ला मिळालं! ('मिठी' म्हणजे 'ती'  मिठी नाही काही. आपल्या गावातल्या नदीचं नाव आहे ते!) आता विसरा ना गडे मागचा राग. मी थोडीशी गंमत करायला गेले तर तुम्ही लगेच डोक्यात राख घालून दुसरा घरोबा केलात. किती ओढाताण होतेय तुमची त्या नवीन (नवीन कसले मेले, सगळ्यांचाच दुसरा घरोबा आहे!) संसारात! मला नाही बाई बघवत. बाहेर पडा बघू त्या त्रांगड्यातून. आपण आपला मोडलेला संसार परत सुरू करू. हा व्हॅलेन्टाईन डेचा मुहूर्त चुकवू नका. मला आठवतं ना तुम्हाला आणि मामंजीना या व्हॅलेन्टाईन डेची किती चीड यायची ते! पण आता मामंजी नाहीत आणि बाळराजेही वयात आलेत! आता नाईट लाईफ काय की व्हॅलेन्टाईन डे काय तुम्हाला चालवून घ्यावेच लागतील! जाऊ द्या. माणसाला थोडं बदलावंच लागत, थोडी तडजोड करावीच लागते. आपणही थोडं बदलू या, थोडी तडजोड करू या, व्हॅलेन्टाईन डेचा मुहूर्त साधून.

ता. क. - पाकिटात किनई एक कमळाचं फुल ठेवलं आहे. तुमच्यासाठी.

फूल तुम्हे भेजा है खत में

फूल नहीं मेरा दिल है।

तुमचीच

कमळा नागपूरकरीण

*********

कमळे, 

तुझं पत्र आम्ही केराच्या टोपलीत फेकलं आहे (दोनदा वाचून). असं गुलाबी कागदावर दुसऱ्याची उचललेली गाणी लिहून मला परत नादी लावायचा प्रयत्न करू नको. ते असू देत, पण लक्षात ठेव संकट (कोव्हीडचं, आमच्या संसारावरचं नाही!) कमी झालं आहे पण अजून पूर्ण गेलेलं नाही. हात धुवत जा. तोंडावर मास्क लावत जा आणि अंतर राखत जा. तुझ्याशी परत संसार थाटण्याची मला (सध्यातरी) गरज नाही. किंबहुना मी तर म्हणेन की, (सध्यातरी) तो विषय नकोच.

उधोजीराजे


-मुकुंद परदेशी

धुळे, मुक्त लेखक,

संपर्क-७८७५०७७७२८



आज जवळपास वर्ष सव्वावर्षानंतर सकाळी लवकर उठून तयार झालो. (मागे वर्ष सव्वावर्षाआधी अशाच एका बंडखोर पहाटे उठून गनिमी कावा खेळलो होतो, पण - - - जाऊ द्या. नको त्या आठवणी.) मोठ्या साहेबांना भेटायला जायचं तर सक्काळी सक्काळीच जायला हवं की नको? याचक म्हणून कोणाच्या दारात जायचं असेल तर सक्काळी सक्काळीच जावं म्हणतात. तेव्हा माणसाचा मूड चांगला असतो, रिकाम्या हाती नाही यावं लागत म्हणे. ईश्वराला नमस्कार केला. आमच्या साहेबांना सद्बुद्धी द्या म्हणून विनंती केली. तसे आमचे साहेब मागचं विसरून पुढे जाणारे आहेत. (देवा नानांसोबत केलेली बोलणी विसरून ते उधोजीराजेंसोबत पुढे गेलेच की नाही?) माझ्याबाबतीतही ते मागचं विसरलेच असतील. केली असेल मी बंडखोरीला मदत, पण साहेबांची नाराजी कळल्याबरोबर आलो की नाही हातात पांढरे निशाण फडकवत छावणीत परत? आणि आताचीही माझी चूक कबूल करून मी चुकीची दोन्ही फळंही पदरात घेतली आहेत. मग कशाला दाखवतील ते मला 'कात्रजचा घाट'?

मला सांगा, अंगवस्त्र बाळगायची आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे की नाही? पूर्वीच्या राजामहाराजांना सारखी भटकंती करावी लागत असे, मग श्रमपरिहार करण्यासाठी, विरंगुळ्यासाठी ते आपल्या पदरी अंगवस्त्रे बाळगत. समाजाचीही त्याला मुकसंमती असे. आणि महत्वाचं म्हणजे तेव्हाही बोरूबहाद्दरांची आणि दांडकेधारकांची जमात उदयाला आली नव्हती, म्हणून तेव्हा नको त्या गोष्टींचा बोभाटा होत नव्हता. आता आम्हालाही लोकांना 'सामाजिक न्याय' देण्यासाठी गावोगावी फिरावं लागतं. जीव नुसता शिणून जातो. मग थोडा विरंगुळा म्हणून समजा आम्ही एखादं अंगवस्त्र बाळगलं तर त्यात गैर काय? लोकांना 'सामाजिक न्याय' देणाऱ्याने स्वतःला न्याय देऊच नये का? हा कुठला न्याय झाला? आणि आम्ही कोणावर अन्याय केलेला नाही. जे झालं ते दोघांच्याही संमतीने झालं आहे! शिवाय जे दोघांच्या संमतीने झालं त्याची दोन्ही फळं आम्हीच सांभाळतोय!

मग अजून काय हवंय? आणि या आधी अशाच प्रकरणात आमच्याच पूर्वसूरींना 'जब …… किया तो डरना क्या?' म्हणून पाठीशी घालण्यात आल्याचा इतिहास काही फार जुना झालेला नाही. म्हणजे '- - - - मैं करू तो साला कॅरेक्टर ढिला है!' असं का?

मोठ्या साहेबांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते अस्वस्थपणे दिवाणखान्यात येरझारा घालत होते. त्यांना तसे अस्वस्थपणे येरझारा घालतांना पाहून त्या एसी हॉलमध्येही मला दरदरून घाम फुटला. त्यांनी मला हातानेच बसायचा इशारा केला. त्यांची ती उग्र मुद्रा पाहून मी उभाच राहिलो. साहेबांच्या डोळ्यांतून, 'मार दिया जाय के छोड दिया जाय - - - - ?'चे सूर बाहेर पडत असल्याचा भास झाला!

'बोला, काही बोलण्यासारखं असेल तर बोला.' साहेबांचा धीरगंभीर आवाज उमटला.

'चूक झाली साहेब. पदरात घ्या.'

'तुम्ही घरचा पदर सोडून बाहेरचे पदर ओढायचे आणि वर आम्हाला सांगायचं की पदरात घ्या म्हणून!'

'चुकलो साहेब. माफी असावी.' शाळेतला मास्तरही असाच एका चुकीसाठी दहावेळा कान धरायला लावायचा.

'अरे, असे कसे चुकलात? लोक असलेली बायको लपवता आणि तुम्ही जिला लपवायची तिला लोकांसमोर आणता? मोठ्या लोकांकडून काही शिकत चला जरा.'

'तो पक्ष केव्हाच सोडला साहेब. चुकलो, पण दोन्ही मुलांची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे, साहेब.' 

'आधी अनैतिक कृत्यं करायची आणि मग नैतिक जबाबदारी स्वीकारायची! हे म्हणजे आधी सत्तेसाठी सेक्युलर पक्षांसमोर खांदे पाडायचे आणि नंतर मात्र खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा मिरवायचा अशातला प्रकार झाला. ते एक असू देत, पण आसपासचे सगळेच अणू-'रेणू' प्रेमाने भरून टाकण्याचा तुम्हाला कोणी कॉन्ट्रॅक्ट दिला होता का? प्रत्येक खुर्चीवर आपणच बसायला हवं का? दुसऱ्यांसाठी नको सोडायला काही जागा?'

साहेबांनी उठता उठता प्रश्न केला. उठतांना साहेबांचा उजवा हात आशीर्वाद दिल्यासारखा वर उठला होता आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होते. मी प्रसन्न मुद्रेने बाहेर पडलो.

जाता जाता - आपला पॉली (टिकल) वूडमध्ये एकदम वट आहे. कोणाला ब्रेक हवा असेल तर द्या पाठवून. 'काम' पक्कंच करून टाकतो.

-मुकुंद परदेशी

धुळे, मुक्त लेखक,

संपर्क-७८७५०७७७२८



मुळातच आम्ही मराठी. मराठी म्हणजे पक्के मराठी ! इतके पक्के की आम्ही मराठी मराठीतच बोलतो आणि मराठीतच लिहितो.( काहींना तर आपलं हिंदी भाषण इंग्रजीत लिहून घ्यावं लागतं तेव्हा कुठे ते हिंदीतून वाचता येतं ! जाऊ द्या, आता दोस्ताना आहे. जास्त बोलता येत नाही.) शाळेत असतांना तर आम्ही काही वर्षांपर्यंत इंग्रजी विषयाची उत्तर पत्रिकाही मराठीतूनच लिहीत होतो, पण आमचे मास्तर बहुदा मराठी द्वेष्टे असावेत, आमचं मराठी प्रेम त्यांना आमचा मुर्खपणा वाटायचा आणि ते दरवर्षी आम्हाला त्याच वर्गात ठेवत असत. शेवटी हेडमास्तरांनी आम्हाला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिल्यामुळे मग आम्ही इंग्रजीची उत्तर पत्रिका इंग्रजीतच लिहिण्याचा कटू निर्णय आपल्या मर्जी विरुद्ध घेतला. (आपल्या मर्जी विरुद्ध दुसऱ्याच्या मर्जीने निर्णय घेण्याची ती सवय आता चांगलीच कामाला येतेय.) आम्हाला मराठी सोडून दुसऱ्या भाषांची इतकी चीड होती की एखाद्या दुकानावर गुजराथी पाटी दिसली की आमचे अंटरपंटर ती ताबडतोब फोडून टाकत असत. तसे आम्ही आमच्या बाळराजेंना इंग्रजी माध्यमात शिकविले, (सौभाग्यवतींच्या मर्जीने घेतलेला निर्णय ! मागे लागलेली सवय आली की नाही कामाला ?) पण त्यांना कडक समज दिली होती, की आमच्या समोर घरचा अभ्यास करायचा नाही. किंबहुना तुमची ती इंग्रजी भाषेतली वह्यापुस्तकंसुद्धा आमच्या नजरेसमोर नको यायला. मुळातच आम्ही मराठी असल्यामुळे आमचा स्वभाव तसा कडकच आहे, पण सत्तेसाठी कोणासोबत राहायचं किंवा कोणाला सोबत घ्यायचं असलं की स्वभावाला थोडी मुरड घालावीच लागते ना ? मागची पाच वर्षे आम्ही अशीच आमच्या मराठी बाण्याला मुरड घातली होती. आता गेल्या वर्षभरापासून परत तेच करतोय. मित्र चांगले नसले की असंच होतं ! असो.

मुळातच आम्ही मराठी. मराठी म्हणजे पक्के मराठी. इतके पक्के की आमच्या घरात फक्त मराठी पदार्थच बनवले जायचे, आणले जायचे आणि अर्थातच खाल्ले- खिलवलेही जायचे. पण मागे एक गुजराथी गृहस्थ आमच्या पिताश्रींशी त्यांंचे घरोब्याचे संबंध होते असं सांगून आमच्या घरी येऊ जाऊ लागले. त्यांच्या आदरातिथ्यासाठी मागवलेला खमण ढोकळा आम्हालाही आवडू लागला. किंबहुना मी तर म्हणेन की, तो हळूहळू आमच्या घरात स्थिरावला ते थेट पाच वर्षे ! आता  कुठे वर्षभरापूर्वी त्याला ( म्हणजे खमण ढोकळ्याला !) घराबाहेर काढला तर आता 'जलेबी ने फाफडा' घरात घुसू पाहतोय. काय करावं काही कळत नाहीये. आता मला सांगा आपण कोणाला 'आपडा' वाटू लागलो तर त्याचा ' जलेबी ने फाफडा' खायला काय हरकत आहे ?  मी तर म्हणेन की त्याचा 'जलेबी ने फाफडा' आपण खायलाच हवा ! का खाऊ नये ? किंबहुना मी तर म्हणेन की आजच्या तारखेला वारंवार हात धुणे आणि मुखपट्टी वापरणे हे जीव वाचविण्यासाठी जितकं गरजेचं आहे त्याहूनही जास्त गरजेचं आहे (मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी) ' जलेबी ने फाफडा' खाणं ! पुढे मागे मुंबई महानगरपालिकेपुढे 'जलेबी ने फाफडा'चे स्टॉल टाकण्यासाठी प्रोत्साहनपर योजना सुरू करण्याचा विचार आहे. हे ही असो.

जाता जाता -  नेहमीप्रमाणेच जर  आपल्या मर्जी विरुद्ध दुसऱ्याच्या मर्जीने निर्णय घ्यावा लागला आणि औरंगाबादचं संभाजीनगर करता आलं नाही, (मित्र चांगले नसले की असंच होतं !) तर औरंगाबाद फक्त मराठीतच (किंवा सद्य परिस्थिती पाहता फार फारतर गुजराथीत) लिहावं, इंग्रजी अजिबात लिहू नये असा अध्यादेश काढावा असा विचार करतोय. मराठी बाण्याला किती दिवस मुरड घालणार ? आपण का सत्तेसाठी लाचार आहोत की काय ? पुन्हा हे ही असो.

- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक, 

संपर्क-७८७५०७७७२८


अपार प्रिय, पहाट स्मरणीय, आदरणीय दादासाहेब बारामतीकर  यांच्या --------कमली 'बारामतीकर (धाकटे) नमः' हा मंत्र अपार प्रेमाने अर्पण करतो. तुम्ही कधीतरी परत 'कमळा'वर कृपादृष्टी टाकाल या आशेने तुमच्याशी 'कमळ' हा शब्द जोडला आहे. रुजू करून घ्यावा. यंदाचे दोन दिवसांचे प्रदीर्घ हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आपल्याकडून फोन नाही, पत्र नाही. म्हटलं आपल्याला राग तर आला नाही ना? राज्याच्या राजकारणात बारामतीकरांना दुखावून कसं चालेल? आमचे (आणि तुमचेही बरं का!) देवा नाना नागपूरकर  तुमच्या नावाने गायत्री मंत्र तयार करीत आहेत. हल्ली ते ज्याही गोष्टीसाठी प्रयत्न करतात, ती सारखीसारखी लांबणीवरच पडत जाते. नुसतीच तारीख पे तारीख, तारीख पे तारीख!  तुमच्या वरचा गायत्री मंत्र ही असाच लांबणीवर पडत चालला आहे. तयार झाला की 'मी परत येईन' तुमच्या ----------कमली अर्पण करायला. असो.

तर काय सांगत होतो, की मी तुम्हाला पत्र लिहितोय हे कळल्याबरोबर आमच्या (आणि तुमच्याही बरं का!) देवा नानांनी सांगितले, की दादांनी सभागृहात चुकून झाला असं दाखवून, पण मुद्दामच माझा उल्लेख 'मुख्यमंत्री' म्हणून करून उधोजीराजे मातोश्रीकरांना चिडविल्याबद्दल माझ्यातर्फे त्यांचे अपार आभार माना. ( हो, हल्ली आमचं तुमच्यावर अपार प्रेम आहे, म्हणून आभारही अपारच मानावे लागतील ना?) हल्ली उधोजीराजेंना चिडवणे हा आमचा एकमेव आणि सयुक्तिक (म्हणजे पक्षातर्फेही आणि वैयक्तिक पातळीवरही) कार्यक्रम आहे. आम्ही ठरवलंय आता डिवचायचं नाही (कशाला उगाच परत विषाची परीक्षा?) आता चिडवायचं. आमच्या चंद्रपूरच्या गल्लीत एक भाडेकरू घरच खाली करत नव्हता. मालकाने वाट पाहिली. आज करेल रिकामं, उद्या करेल रिकामं, सहा महिन्यांत करेल, वर्षभरात करेल, पण कसचं काय? बाप तर राहतच होता रुबाबात, पण आता त्याचा मुलगाही मालकीहक्काने त्याच घरात कायमचा राहतो की काय असं वाटू लागलं. शेवटी मालकाने त्याला येताजाता चिडवायला सुरुवात केली; आणि त्या चिडवण्याला वैतागून त्या भाडेकरूने घर सोडले! प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. अहिंसक आहे म्हणून करून पहायला काय हरकत आहे असे आमच्या (आणि तुमच्याही बरं का!) देवा नानांच मत आहे. तुमचं काय मत आहे ते कळवावं. (गुप्तता पाळू. 'त्या पहाटे'सारखी.) हेही असो.

तर काय सांगत होतो, की माझ्या भाषणात अडथळा आणणारा पुढच्या वेळी निवडून येत नाही हे माझं परवाचं सभागृहातलं बोलणं तुम्ही असं अंगावर घ्यायला नको होतं आणि त्यासाठी मला आव्हान दयायला नको होतं. दादा, आमचं तुमच्यावर अपार प्रेम आहे. ('वरून' तसा आदेशच आहे!) कोणाचे कणभर जरी उपकार असले तरी त्याचे मणभर आभार मानावेत, अशी आमच्या पक्षाची संस्कृती आहे. आपले तर आमच्यावर ८० तासापुरते का होईना पण मणभर उपकार आहेत. त्यामुळे आम्ही आपले टनभर आभारी आहोत. यात कणभरही शंका ठेवू नका. (मागच्या उपकराबद्दल आभार मानतांना पुढच्या उपकारासाठी बीज पेरणी करून ठेवावी, ही आमची पद्धत आहे.) खरं तर आपण आजच्या राजकारणातले श्रीकृष्णच आहात. श्रीकृष्ण ज्यांच्या बाजूने असतो ते संख्येने कमी असले तरी जिंकतात. महाभारतात श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने उभा राहिला होता. पांडव जिंकले होते. आता  कालियुगातला श्रीकृष्ण कौरवांच्या बाजूने उभा राहिला. आता कौरव जिंकलेत! तुम्ही जरी तुमच्या आमदारांचा विश्वास ८० तासांपेक्षा जास्त टिकवून ठेवू शकला नाही, तरी आमचा तुमच्यावर अपार विश्वास आहे. देव कोणाला कोणत्या रुपात दर्शन देईल काही सांगता येतं का? आम्हाला 'रणछोडदास' भेटला. पुन्हा हेही असो.

तर काय सांगत होतो, की जेमतेम दोन दिवसांचं अधिवेशन आणि त्यातही आपण एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसलो. हे काही योग्य झालं नाही. पुढचे अधिवेशन आपण (म्हणजे तुम्ही आणि आम्ही मिळून बरं का!) चांगले महिनाभराचे घेऊ. घ्यायचं ना? तुमचं मत कळवा. फार घाई नका करू. आमचे (आणि तुमचेही बरं का!) देवा नाना दिल्लीला शिफ्ट होईपर्यंत थांबलात तर बरं होईल. कसं? पुन्हा हे ही असोच असो.

आपला

               सुधीरभाऊ चंद्रपूरकर

सुधीर भाऊ,

तुमचे 'बटर टोस्ट के साथ चाय' छाप पत्र मिळाले. वऱ्हाडी माणसं बोलण्यात आणि खाण्यात अघळपघळ असतात हे नुसते ऐकूनच नाही तर पाहूनही माहीत होते, (आता नावं सांगायला नका लावू त्या ठिकाणी.) पण त्या ठिकाणी ती पत्र लिहिण्यातही अघळपघळ असतात हे तुमचं पत्र वाचून कळलं. कशाला उगीच म्हागं पडता? आरं आपलं वय काय? आपण करतो काय? थोडा तर त्या ठिकाणी विचार करायचा. अशी पत्रं लिहून सत्ता मिळते का कुठं? उगाच आपलं कायतरी करायचं. तुम्हचा, काय तो गायत्री मंत्रही तिकडंच ऱ्हावू द्या म्हणावं तुमच्या (आणि तुमच्याच बरं का!) देवा नानांना. मी ज्या गोष्टी कम्प्लिट विसरलो आहे त्या गोष्टींची परत परत आठवण का म्हणून देता, त्या ठिकाणी?

मी पत्र संपवतो, तुम्ही विषय संपवा.

दादा बारामतीकर


- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक, 

संपर्क-७८७५०७७७२८


विक्रमने नेहमीप्रमाणेच आपला हट्ट सोडला नाही. आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्याने बेतालला शोधून काढला आणि त्याला आपल्या गाडीत बसवून तो परत पक्ष कार्यालयाकडे निघाला.गाडीच्या मागच्या सीटवरून आपलं तोंड वेताळच्या कानाजवळ नेत बेताल बोलला, 'विक्रमा, कृषी कायदा काय आहे ते मला माहीत नाही. फक्त टाईमपास करण्यासाठी मी तिथे जाऊन बसलो होतो. मी तिथे जाऊन बसलो याचा अर्थ मी विरोधकांना सामील झालो असा होत नाही, तरी तुला माझा संशय आला आणि तू मला शोधत तिथे आलास. आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐक आणि मी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं दे. तुझ्या उत्तरांनी माझं समाधान झालं नाही तर मी तुझ्या गाडीतून उतरून परत आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन बसेन. समजलास?'

विक्रमने समोरच्या आरशातून बेतालकडे पाहत काही न बोलता फक्त संमतीदर्शक मान डोलावली.

'ऐक विक्रमा, आटपाट एक राज्य होतं. त्या राज्यात सर्वच 'महा' होत असे. जसे की सत्ता प्राप्तीसाठी महातडजोड आघाडी, राज्यकारभारात  महागोंधळ, एकमेकांचा महाअपमान, महाभ्रष्टाचार, महाप्रगती (रिक्षावाला ते थेट करोडपती!) महाउत्पादन (साडेतीन एकरांत चक्क ११० कोटी रुपयांची वांगी!) इत्यादी इत्यादी, त्यामुळे त्या राज्याचं नाव महाराज्य पडलं होतं. त्या महाराज्यात एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या तीन पक्षांनी सत्तेसाठी महातडजोड करीत तयार केलेली आघाडी सत्तेवर होती. त्या महातडजोड आघाडी सरकारमध्ये असलेले आणि सरकारमध्ये नसलेले, पण  बाहेर राहून सरकारच्या तंबूच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवणारेही, या तंबूच्या दोऱ्या आम्ही पुढची पंचवीस वर्षे ओढून धरू, हे सरकार पुढील पंचवीस वर्ष चालेल असे सांगत असतांना आणि सरकारला जेमतेम एकच वर्ष झालेलं असतांना, सरकारमध्ये मंत्री असलेल्या यशोमती मैय्यांंनी दुसऱ्या पक्षाच्या 'जाणत्या सरदारा'स, 'सरकार स्थिर ठेवायचे असेल तर आमच्या नेत्यावर टीका करू नका. आघाडी धर्म पाळा.' असा दम का दिला असावा? दुसऱ्या एका मंत्र्याने, ''जाणता सरदार'ची समज आमच्या सरदाराला समजून घेण्यासाठी कमी पडली.' असा टोला का लगावला असावा? त्या भडीमारातून 'जाणत्या सरदार'ला वाचविण्यासाठी वाचाळतेच्या एका स्पर्धेत 'सामना'वीर ठरलेल्या संपादकाने फुकटची वकिली का केली असावी? 'डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं.' असे अकलेचे तारे तोडणाऱ्या एका विद्वानाने आपली शस्त्रक्रिया कंपाऊंडरकडून न करवून घेता डॉक्टरांकडून का करवून घेतली असावी?  राज्यावर कितीही संकटे येवोत, कोव्हीडने हजारो माणसं पटापट मरोत की बळीराजा झाडाला लटको, पण आपल्या तब्बेतीचा बाऊ करून घरातच बसून राहणारे महातडजोड आघाडीचे महामुख्यमंत्री एका महामार्गाच्या पाहणीसाठी जीवावर उदार होऊन घरातून बाहेर का पडले असावेत? माझ्या या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दे विक्रमा.'

'बेताला, तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे अनेकांच्या आधीच जीर्ण झालेल्या इज्जतीच्या अजूनही चिंध्या करण्यासारखं आहे, पण तू विचारतोस म्हणून मी सांगतो. ऐक. सत्ताप्राप्तीसाठी आपण ज्यांच्या मिनतवाऱ्या केल्या, ज्यांच्या पाठिंब्यावर आपले बुड सत्तेच्या गादीवर टेकलेले आहे; त्यांच्यावरच टीका करणाऱ्याच्या बुद्धीत आणि ज्या फांदीवर आपण बसलेले आहोत त्याच फांदीवर कुऱ्हाड चालवणाऱ्या शेख चिल्लीच्या बुद्धीत काय फरक असावा? मग अशा तथाकथित 'जाणत्या सरदारा'ला यशोमती मैय्यांंनी दम दिला किंवा आपल्याच पंखांखाली राजकारणात वावरणाऱ्या आपल्याच पुतण्याला जे नीट समजू शकले नाही त्यांच्या 'समज'ची मापं  कोणा मंत्र्याने जाहीररीत्या काढली तर त्यात गैर ते काय? आता  'सामना'विराने फुकटची वकिली का केली, हे काय विचारणं झालं? 'ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी.' ही म्हण तू ऐकली नाहीस का? दुसऱ्यांंच्या मुलाखती घेण्याची नोकरी करणाऱ्याची मुलाखत कोणी घेऊ लागला तर तो आपली नसलेली विद्वत्ता पाजळणार नाही का? मग त्यासाठी तो वाट्टेल ती पोरकट विधानं करणार नाही का? पण जेव्हा स्वतःच्या जीवाचा प्रश्न असतो तेव्हा माणसाची अक्कल बरोबर काम करते, मग शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरच आठवतो. भंगोडी, गंजडी नशेत वाट्टेल ते बडबडतात ,पण नशेत त्यांनी स्वतःच्याच मानेवर चाकू फिरविल्याचं तू कधी ऐकलं आहेस का? आता राहिला तुझा शेवटचा प्रश्न. महामुख्यमंत्री घराबाहेर का पडले? मला सांग, राज्यावर येणारी संकटं असोत, की कोव्हीडने मरणारी हजारो माणसं असोत,  की झाडाला लटकणारा बळीराजा असो ,यांच्याशी महामुख्यमंत्र्यांचा काय संबंध? यांनी बनवला का त्यांना महामुख्यमंत्री? महामुर्ख कुठला? अरे, बेताला, त्या महामार्गाला महामुख्यमंत्र्यांच्या पिताश्रींच नाव दिलं जाणार आहे! मग आपल्याला पिताश्रींच्या नावासाठी कोणी घरातून बाहेर पडत असेल तर काय बिघडलं?'

'विक्रमा, जसं बारा आमदारांच्या नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाने दिलेल्या यादीने राज्यपालांचं समाधान झालेलं नाही ,तसंच तू दिलेल्या उत्तरांनी माझं समाधान झालेलं नाही.' असे बोलून बेताल गाडीतून उतरून परत आंदोलनाच्या जागेकडे चालू लागला.

आंदोलनाच्या जागी गर्दी वाढत असल्याची दृश्ये माध्यमांवर झळकू लागली होती.

- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक,  संपर्क-७८७५०७७७२८



'साधू संत येति घरा । तोचि दिवाळी दसरा ।।' हे कोणाचं वचन असेल ते असो, पण या वचनाने आम्हाला लहानपणापासून फार म्हणजे फारच छळलं आहे आणि आताही छळतंच आहे. वचनांचं आणि आमचं काय वैर आहे ते आम्हाला माहीत नाही, ( कदाचित वचनं नागपूरकर असतील ! हो, असूही शकतात !) पण वचन मग ते एखाद्या संताचं असू देत की कोणातरी असंताने आम्हाला बंद दाराआड दिलेलं असू देत, त्याने कायमच आम्हाला छळलं आहे. तुम्हाला सांगतो, शाळेत गुरुजींनी हे वचन कोणाचं म्हणून विचारल्यावर आम्ही शिवाजी महाराजांपासून ते थेट जवाहरलाल नेहरूंपर्यंत आम्हाला माहीत असलेली कमीतकमी पंचवीस तरी नावं सांगितली, पण गुरुजींचं समाधान काही होईना. प्रत्येक चुकीच्या नावावर एक छडी मारून बहुतेक गुरुजींचेच हात दुखून आले असावेत, कारण शेवटी जेव्हा आम्ही 'आईन्स्टाईन !' असं उत्तर दिलं तेव्हा गुरुजींनी हातातली वेताची छडी फेकून आमच्या पाठीत जोरदार धपाटा हाणला. तेव्हापासून या वचनाचा आम्ही भयंकर म्हणजे भयंकरच धसका घेतला होता, ( आमच्या त्या गुरुजींनीही त्या प्रसंगानंतर आमच्या अगाध ज्ञानाचा इतका भयंकर धसका घेतला की नंतर त्यांनी आम्हाला कधीच कोणताच प्रश्न विचारला नाही. अगदी शाळेत जायला उशीर झाला तरी उशीर का झाला म्हणूनही विचारलं नाही !) इतका भयंकर की, नंतर आम्ही आयुष्यात कधी दिवाळी साजरी केली नाही, की कधी कोणा साधूच्या दर्शनालाही गेलो नाही. असो.

तर हे सर्व आठवण्याचं कारण असं की, मागच्याच आठवड्यात कानी एक वार्ता आली, की उत्तरप्रदेशातून एक साधू आमच्या मुंबापुरीत येतोयं. आम्ही हादरलो. शाळेतला तो मार आठवला. साधूला आमच्या मुंबापुरीत येण्यापासून थांबवणं गरजेचं होतं. आम्हाला आमच्या दारात साधू संतही नको होते, दिवाळीही नको होती आणि त्या शाळेतल्या आठवणीही नको होत्या ! नंतर आमच्या गुप्तचर यंत्रणेने वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून आणि पाहून सांगितले की तो साधू नाही तर संधीसाधू आहे आणि दिवाळी विसरा, तो तर आपलं दिवाळं काढायला येतोयं ! आम्ही सावध झालो. (हल्ली आम्ही फार लवकर सावध व्हायला लागलो आहोत. याचे सर्व श्रेय आमच्या नागपूरकर मित्राला जाते. राजकारण असो की आयुष्य, गाफील राहून चालत नाही, हे त्यानेच आम्हाला शिकविले ! अजूनही एक नाव आहे, पण ते नंतर कधीतरी सांगीन.) आम्ही ताबडतोब आमच्या चिरंजीवांना पाचारण केलं. येणाऱ्या संकटाची त्यांना कल्पना दिली. बॉलीवूड गेलं तर आपल्या 'नाईट लाईफ'च काय, या विचाराने चिरंजीव हादरले.मागे एकदा एका मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांचा जीव गुदमरला होता, तसाच आता गुदमरतोय असं त्यांच्याकडे पाहून वाटू लागलं. त्यांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून त्यांची रवानगी ताबडतोब एका 'नाईट क्लब'मध्ये केली. संपादकांना बोलवून या साधुच्या येण्यावर ताबडतोब एक 'रोखठोक' अग्रलेख लिहिण्याची आज्ञा केली. यदाकदाचित तो साधू न बोलावताही आपल्याला भेटण्यासाठी आलाच तर आपले भगवे कपडे त्याच्या भगव्या कफनीपेक्षा मळके वाटू नयेत म्हणून नवे कोरे भगवे कपडे मागवून घेतले. तो बाहेरगावाहून आला आहे म्हणून त्याला होम क्वारंटाईन करता येईल का याचा अंदाज घेतला , पण असं करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच अंगाला कापरं भरल्यामुळे तो विचार मनातून कापरासारखा उडून गेला. कोणीतरी मजुरांचे लोंढेच्या लोंढे ट्रकांमध्ये भरून माझ्या मुंबापुरीत आणून सोडतोयं आणि विमानात बसवून सर्व फिल्मी सिताऱ्यांना दूर कुठेतरी घेऊन चाललायं असं दृश्य डोळ्यांंसमोर येऊ लागलं. माझ्या मुंबापुरीची अवस्था आता ' नाव सोनुबाई ----' अशी होणार या कल्पनेने जीव 'त्या' पहाटे झाला होता तसा घाबराघुबरा होऊ लागला.  शेवटी जे व्हायचे ते होवो असा विचार करून झोपी गेलो. सकाळी उठलो.वर्तमानपत्रात बातमी होती, ' बॉलीवूड म्हणजे काय पर्स आहे का की उचलून नेईन - योगी आदित्यनाथ ' पट्टदिशी खिडकीपाशी गेलो. उगवत्या सूर्याला नमस्कार करून एकशे आठ वेळा 'ओम आदित्याय नमः'चा जप केला. डोक्यात नवीनच वचन घोळत होतं, 

'साधू संत परतति त्यांच्या घरा। तोचि दिवाळी दसरा ।।'

-मुकुंद परदेशी

मुक्त लेखक,  संपर्क-७८७५०७७७२८



मा. प्रातःस्मरणीय (आपले नाव घेतले की 'ती पहाट' आठवते आणि दरदरून घाम फुटतो, या अर्थाने. सावधगिरीचा उपाय म्हणून आम्ही 'साहेबांना' सांगून 'दादांच्या' मोबाईलमध्ये पहाटेचा गजर वाजणार नाही अशी सेटिंग करून घेतली आहे! असो.) देवानाना नागपूरकर यांसी साष्टांग दंडवत. पत्रास कारण की, बऱ्याच दिवसांपासून आपली भेट नाही. (आपली भेट बरीच महागडी ठरते म्हणून मीच मुद्दाम टाळतो. असो.) आपली मागची भेट आठवते ना? एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटलो होतो आपण! (बिल मीच भरलं होतं. स्मरण असू द्यावे.) ते असू देत. आता मुद्द्याचं सांगतो. ते काय आहे ना आमच्या 'दै. विटी- दांडू'च्या 'ठोकाठोक' सदरात मला मुद्दे सोडून भरकटायची सवय आहे, त्यामुळे लिहितांना असं होतं. जाऊ द्या. तर मुद्द्याचं काय सांगत होतो की, कधीकाळी आपण भाऊ-भाऊ होतो. मोठ्या भावाने छोट्या भावाला असा त्रास देणं चांगलं आहे का? आम्ही तुम्हाला 'सख्खे' मानतो. 'चुलत' असले आणि त्रास दिलात तर एकवेळ समजू शकते, (आणि आम्हाला त्याची सवयही झाली आहे.) पण सख्खांनी त्रास द्यावा? आमचे 'प्रताप' उघडे पाडून जनतेसमोर मांडावेत, याला काय म्हणावे? जुन्या संबंधांची, जुन्या भेटीची (बिल मीच भरलं होतं! स्मरण असू द्यावे.) थोडीफार जाणीव ठेवावी. वास्तविक शिवरायांच्या 'गनिमी काव्या'वर वारसाहक्काने आमचाच हक्क आहे, (जरी त्यांचे वारस तुम्हाला फितूर झाले असले तरी!) पण तुम्ही त्याचा गैरवापर केलात आणि डाव साधून आमच्या गोटात हलकल्लोळ माजविलात. त्यात ते तुमचे कोकणातले शिलेदार भुयार आमच्या राजेंच्या महालापर्यंत पोहचेल अशी जाहीर वाच्यता करतात, हे बरं नाही. आज महालात आम्ही आहोत. उद्या कदाचित तुम्ही असाल, (आमचा तसा विचार चालला आहे.) मग भुयारं तुमच्या महालापर्यंत पोहचतील त्याचं काय? आवरा त्यांना. ( वागळेंचा सल्ला ऐकून आम्ही त्यांच्या फार नादी लागत नाही. असो.) खरं म्हणजे ही ओसाड गावची पाटीलकी. त्यात तीन भागीदार. एक कायम कुरकुर करणार. दुसरा सर्व सूत्र हातात ठेवणार आणि आम्ही मात्र दिल्लीश्वरांच्या दारात हातात कटोरा घेऊन उभं राहायचं! त्यांनी कटोऱ्यात भीक तर घालायची नाही पण कुत्रं मात्र अंगावर घालायचं! नुसतं 'भीक नको पण कुत्रं आवर असं झालंय.' मला वाटतं तुम्ही समजदार आहात, ( म्हणून तर तुम्ही इतक्या सहजासहजी ओसाड गावची पाटीलकी आमच्या राजेंना मिळू दिली. यात तुमचा  नक्कीच काहीतरी डाव असणार, हे मी आमच्या राजेंना आधीच सांगितलं होतं, पण ते हट्टालाच पेटले होते.) मला काय सांगायचं आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. आपले भूतकाळातले (आणि भविष्यकाळातलेसुद्धा!) संबंध लक्षात घेऊन दिल्लीश्वरांकडेस आमची रदबदली करावी. बोलतांना ते दांडकेवाले समोर असले म्हणजे माझं माझ्या जिभेवर नियंत्रणच राहत नाही. ती जरा जास्तच सैल सुटते. काही कमी जास्त (कमीची शक्यता कमीच, जास्तीची शक्यताच जास्त!) बोलले गेले असल्यास माफ करावे. (बिल मीच भरलं होतं. स्मरण असू द्यावे.)

आपला नम्र

संपादक दै. विटी दांडू

ता.क. :- आमचे राजे 'हात धुवून मागे लागेन' असं जे बोलले ते जास्त मनावर घेऊ नका. ते फक्त वारंवार हातच धुवू शकतात. (आठवा खिशातले राजीनामे!)

*******

संपादक, दै.विटी दांडू,

वास्तविक या नावाचा एखादा पेपर कुठूनतरी निघतो हेही मला माहित नाही. तो मी कधी पहिला नाही. कधी पाहिलाच नसल्यामुळे कधी वाचलाच नाही, पण तुम्ही पत्राखाली स्वतःचा तसा उल्लेख केल्यामुळे मी तसा उल्लेख केला.

आधी माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा घेतो. हे नेहमी नेहमी 'बिल मीच भरलं होतं. स्मरण असू द्यावे.' असं लिहिण्याची काही गरज आहे का? आणि वेटर टीप मागायला आला तेव्हा (वेटर समोर असतांना सुद्धा) तुम्ही उठून माझ्या कानात, 'मालक जेवणाचं बिल मंजूर करतील, पण 'टीप'चे पैसे देणार नाहीत. टीप तुम्ही देता का?' असं बोलून मला टीप देणं भाग पाडलंत, ते विसरलात का? (स्मरण असू द्यावे.) तुम्ही तुमच्या कार्यालयाबाहेरच्या टपरीवर चहा घेतला तरी तुमचा हात खिशात जात नाही, बिल सोबतच्यालाच द्यावे लागते असे तुमच्याच कार्यालयातला उपसंपादक कम कारकून कम शिपाई कम सफाई कामगार सांगत होता. बोलताना लिहिताना तुम्ही मर्यादा पाळत नाही हे तर जगजाहीर आहे, पण निदान खासगी पत्र लिहिताना तरी काही मर्यादा पाळत चला. असो.

राहिला प्रश्न तुमचे 'प्रताप' चव्हाट्यावर आणण्याचा, तर तुम्ही तर तुमच्या कार्यकर्त्यांना   'वडा पाव', 'झुणका भाकर', ' ५ रुपयांत थाळी' असले शानदार धंदे करायला सांगता, मग तुमचे शिलेदार 'पंचतारांकित हॉटेल', 'रियल इस्टेट' असले भिकार धंदे करून स्वतःला  आणि तुम्हालाही का अडचणीत आणतात? आणि तुमची भेट किंवा तुमचं पत्र नेहमी 'याला वाचवा, याला आवरा.' असं सांगायलाच असते का? राहिला प्रश्न ओसाड गावच्या पाटीलकीचा तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आम्ही लहान असताना (म्हणजे आमच्या लहानपणी. आम्ही लहान भाऊ कधीच नसतो, सांगून ठेवतो.) एक दिवटा त्याच्या मोठ्या भावाच्या घरात राहून आयतं गिळायचा. मोठ्या भावाकडे आयतं गिळायला मिळतंय याचं त्याला कधीच कौतुक वाटलं नाही. सारखी 'माझ्या नावावर काही नाही. माझ्या नावावर काही नाही.' अशी कुरकुर करायचा. वेगळं निघायची स्वप्नं बघायचा. एके दिवशी एका भानामतीकर काकांनी त्याला, 'तुला माझ्या दुकानाचा मालक करून टाकतो. भावाच्या घरातून बाहेर पड.' असं गाजर दाखवलं. दिवटा हुरळला. भावाचं घर सोडून भानामतीकर काकाच्या दुकानाचा मालक बनला. नंतर लक्षात आलं की, दुकान दिवाळखोरीत आहे. दुकानावर करोडो रुपयांचं कर्ज आहे. असो. राहिला प्रश्न तुमच्या आणि तुमच्या राजेंच्या वाट्टेल ते बरळण्याचा तर मला सांगा, ' ये चाबी अपनी जेब में रख ले पीटर. अब ये ताला मैं तेरी जेब से चाबी निकाल कर ही खोलूंगा.' हा अभिताभचा डॉयलॉग मुक्रीने किंवा 'पेट सफा'वाल्या राजू श्रीवास्तवने म्हटला तर कसा वाटेल? पुन्हा असो.

परावलंबी नसलेला

देवानाना नागपूरकर.

ता.क.:- तुमचे राजे घरातच असतात. त्यांना म्हणावं ईसापनीती आणि जातक कथा वाचत चला. माणसात थोडीफार हुशारी येते.

-मुकुंद परदेशी

मुक्त लेखक, 

संपर्क-७८७५०७७७२८


प्रिय मित्र उधोजीराजे यांसी सप्रेम नमस्कार. दोन दिवसांपासून तुम्हाला सारखा फोन करतोय, पण तुम्ही काही माझा फोन ( नेहमीप्रमाणे) उचलत नाही. (नोटापेक्षा कमी मतांच्या धक्क्यातून तुम्ही अजूनही सावरले नसाल असं तुमच्या अमृता वहिनी सांगत होत्या.) माझा फोन न उचलण्याची तुमची जुनी सवय अजून गेलेली दिसत नाही. तुम्ही चुकून 'वर्षा'वर गेला असाल म्हणून तिथेही फोन लावून पहिला, पण तोही कोणी उचलला नाही. अगदी परवा परवापर्यंत आपलाच असलेला आणि परत लवकरच आपलाच होणार असलेला फोनही कोणी उचलू नये याच्यासारखं दुःख दुसरं नाही. असो.

खरं म्हणजे बिहारचं सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्हांला जंगी पार्टी द्यावी असा विचार करत होतो, पण तुम्ही घरातून बाहेरच पडत नाही म्हटल्यावर पार्टी कशी देणार? तशी तुमच्या बाळराजेंना पार्ट्यांची चांगलीच सवय आहे असे ऐकून आहे. खरं आहे का? खरं असलं तरी 'अभी बच्चा है वो.'. त्यांना पार्टी कशी देणार? म्हणून मग पार्टीचा बेतच रद्द करून टाकला. वास्तविक तुम्हीच माझं अभिनंदन करून मला पार्टी दयायला हवी होती. आपलंच दुःख उगाळत बसण्यापेक्षा माणसाने दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हावं, म्हणजे तेवढंच आपलं दुःख हलकं होतं. ( हवं तर नितीसबाबूंना विचारा.) तशा माझ्याशी वागतांना तुमच्या बऱ्याच गोष्टी चुकत असतात, पण तुम्हाला लहान भाऊ समजून मी त्या सर्व पोटात घालत आलो आहे. परिणामी माझ्या पोटाचा आकार बिघडला आणि वर तुमचेच 'ट्रोल भैरव' माझ्या पोटावर वाट्टेल त्या कॉमेंट्स करतात! आवरा त्यांना अर्णवला आवरला तसं. (की बारामतीकरांना सांगायला लावू?)

आता बिहारमधून मोकळा होतो न होतो तोच पक्षश्रेष्ठींनी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी अंगावर टाकली. वास्तविक मुंबई महानगरपालिका तुमच्या हातातून हिसकावून घेणं म्हणजे तुमच्या तोंडातला घास काढून घेण्यासारखं आहे. भविष्यात घडणाऱ्या उपवासाच्या भीतीने तुमच्या संपादकांच्या पोटात आतापासूनच चांगलाच गोळा उठलेला दिसतो! कोणाच्या तोंडातला घास हिरावून घेणं ही काही आम्हां नागपूरकरांची संस्कृती नाही. आम्ही तर दुसऱ्यांना खिलवून खिलवून तृप्त करणारी माणसं आहोत. (काही लोकांना 25 - 25 वर्ष खिलवूनही ती बेईमानी करतात तो वेगळा भाग झाला.) हवं तर गडकरी साहेबांना विचारा. मी मुंबई महानगरपालिकेत तुमच्या मार्गात आलोही नसतो, पण पक्षशिस्त पाळावीच लागते ना? आपली इच्छा असो की नसो, पण पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश मानावच लागतो. (नाहीतर मागच्या वेळेस तुम्हाला मुख्यमंत्री बनवून तुमच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची माझी मनापासून इच्छा होती. (आमच्या शुद्ध भगव्या झेंड्याची शप्पथ! ) एकदा का माणूस पक्षश्रेष्ठींच्या मनातून उतरला की त्याचा 'नाथाभाऊ' व्हायला वेळ लागत नाही. कशाला उगाच आपल्याच हाताने आपल्याच पायावर दगड पाडून घ्या? आपण काय नाथाभाऊ आहोत? तुम्ही अजिबात काळजी करू नका. चुकून माझ्या हातून तुमचं काही नुकसान झालंच तर पुढच्या विधानसभेत भरपाई करून देईन. आम्ही दिल्या शब्दाला जागणारी माणसं आहोत. हवं तर नितीसबाबूंना विचारा.

ते जाऊ द्या. ते आपलं रोजचंच आहे. वाहिनींचा रिअल इस्टेटचा व्यवसाय काय म्हणतो? आमचा राग आहे बरं तुमच्यावर. इतकी वर्ष आपण सोबत राहिलो, पण तुम्ही काही आम्हांला वहिनींच्या व्यवसायाची खबर लागू दिली नाही. आम्हांलाही सांगितले असतं तर हिने कशाला बँकेत नोकरी केली असती? दोघींची पार्टनरशिप छान झाली असती. किरकीऱ्यांना मी सांभाळून घेतलं असतं. बाकी वहिनींच्या दूरदृष्टीला दाद द्यायलाच हवी हं. उद्या जर राजकारण सोडावं लागलं तर दुसरं उत्पन्नाचं साधन आधीच तयार ठेवायलाच हवं. असो.

आपला मित्र आणि शुभचिंतक

देवानाना नागपूरकर

ता. क. - पुढच्या वेळी तुम्हाला 'महाराष्ट्राचा नितीसबाबू' बनविण्याचा विचार आहे. विचार करून कळवावे.


********** 

देवा नाना,

मुद्दामच प्रिय मित्र वगैरे काही लिहिलं नाही. बाहेर काही वेगळं आणि आत काही वेगळं असलं काही मला जमत नाही. माझं जे काही असतं ते उघड उघड असतं. तुमचा बिहारचा विजय तुम्हालाच लखलाभ होवो. कोणाला तरी 'वोट कटवा' बनवून तुम्ही नितीसबाबूंना फसवलं. अशा विजयाची पार्टी मला अजिबात नको. तुमच्या पत्रातला इतर मजकूर अदखलपात्र आहे त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही. मी सद्या जबाबदारीच्या पदावर काम करीत असल्यामुळे फालतू गोष्टींवर बोलण्यास मला वेळ नसतो. तुमची गोष्ट वेगळी आहे.

उधोजीराजे बांद्रेकर (सरकारप्रमुख) 


-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक,

संपर्क -७८७५०७७७२८



विक्रमने नेहमीप्रमाणेच आपला हट्ट सोडला नाही. आपला बेताल कार्यकर्ता बसलेल्या हॉटेलरमध्ये जाऊन त्याने त्याला उचलले आणि आपल्या गाडीत बसवून तो त्याला मतमोजणीच्या मंडपाकडे नेऊ लागला.

'इ का करत हे बा?' बेताल कार्यकर्त्याने शुध्दीवर येण्याचा प्रयत्न करीत विचारले.

'अरे बेताला, अजून मतमोजणी संपली नाही आणि तू इकडे कसा येऊन बसलास?'

'अरे, जबार आय सी यु मा पेसंट मरन की तैयारी करत हैं तबार रिस्तेदार चाय नाही तो का लस्सी पिवत हैं?'

'अरे, बेताला, आपण मराठी माणसं आहोत. जरा मराठीत बोल ना. हे काय भोजपुरी बोलतोय?'

' विक्रमा, आता तू म्हणतोस म्हणून बोलतो मराठी पर बिहार मा आई के भोजपुरी हमार अच्छी लगन लगी बा.'

'खबरदार जर परत भोजपुरी बोललास तर. आता निमूटपणे माझ्यासोबत चल.'

'विक्रमा, तू म्हणतोस म्हणून येतो मी तुझ्यासोबत मतमोजणीच्या ठिकाणी, पण हे म्हणजे आपलं वस्त्रहरण होणार आहे हे माहीत असतांनाही द्रौपदीने स्वतःहून दुर्योधनाच्या दरबारात जाण्यासारखं झालं! पण तिथे पोहचण्याआधी तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तू दिलेल्या उत्तरांनी माझं समाधान झालं नाही तर तात्काळ मी तुझ्या गाडीतून उतरून परत हॉटेलमध्ये जाऊन बसेन. समझे बा?'

विक्रमने पक्षाच्या विचारविनिमय बैठकीत बसल्याप्रमाणे फक्त होकारार्थी मान डोलवली.

'जरा ध्यान देईके सून बा. मला सांग आधीच महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला नाकारल्यानंतरही आपण जनतेचा कौल धुडकावून सत्तेसाठी असंगाशी संग केला आणि जी काही थोडीफार किंमत आपल्याला मोठ्या साहेबांच्या नावामुळे होती तीसुद्धा गमावून बसलो. मग आता परत इथे बिहारमध्ये हात दाखवून अवलक्षण करून घ्यायची काही गरज होती का? जे बिहारी रोजगारासाठी आपल्या राज्यात आलेले आपल्याला चालत नाहीत; त्यांची मतं आपण कोणत्या तोंडाने मागितली? आपल्या उमेदवारांना मिळणारी मते ही 'नोटा'ला मिळालेल्या  मतांपेक्षाही कमी असतील असा रंग दिसतोय. म्हणजेच मतं मिळविण्याच्या बाबतीत आपण दारिद्र्य रेषेच्याही खाली आहोत. इ बोलन वा मा हमे सरम आवत हैं बा, पर सच बोलन वा मा काहे की सरम बा? हूं?  बारामतीकर काकांनी काही केलं की आपणही ते करायलाच हवं का? बारामती पुढे आपली 'मती' अशी कुंठीत का होते? कधी 'बारामती'च्या कलाने तर कधी 'बालमती'च्या बालबुद्धीने सरकार का चालतं?'

'बेताला, पोटात गेलेल्या सोमरसाने तुझा तुझ्या मेंदूवरचा आणि जिभेवरचा ताबा सुटलेला दिसतो. त्यामुळेच तू अशी बेताल बडबड करतोय, पण हळूहळू येशील शुध्दीवर. काही गोष्टी एकदमच सगळ्यांना लक्षात येत नसतात. हळूहळू येतील लक्षात. आपल्याला घाई करायची नाहीये. अजिबात घाई करायची नाहीये. किंबहुना मी तर म्हणीन की घाई नकोच. आपले साहेब आपले कुटुंबप्रमुख आहेत आणि एखाद्या कुटुंबप्रमुखाने कुटुंबाच्या हितासाठी जे आणि जसे निर्णय घ्यायचे असतात तसे ते घेत आहेत. हळूहळू घेतायेत, पण घेतायेत ना? घरात बसून घेत असतील, पण त्याच्याने काय फरक पडतो?  आपल्या निवडणूक वचननाम्यात त्यांनी असं कुठे वचन दिलं होतं की,  मी रोज घराबाहेर पडीन, म्हणून? कदाचित आज आपले साहेब परबुध्दीने वागतायेत असं कोणाला वाटत असेल तर वाटू दे. खुशाल वाटू दे. आपल्या साहेबांचं लपूनछपून काही नसतं. जे असतं ते खुल्लमखुल्ला असतं.  आपल्या साहेबांची बिहारींबद्दलची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आपल्याला आपल्या राज्यात बिहारी नकोतच. आपल्या राज्यात कुठे आपण त्यांची मतं मागतोय? आपण तर त्यांच्या बिहारसाठीच त्यांची मतं मागतोय ना? आता त्यांना तितकीही अक्कल नसेल तर त्याला आपले साहेब काय करणार? माणसाने आपल्या बुद्धीने चालू नये. आपल्याच बुद्धीने चालणाऱ्या त्या चुलत राजेंची काय हालत झाली पाहतो आहेस ना? मग थोडी परबुद्धी वापरली तर बिघडलं कुठे?'

'विक्रमा, एखादी गोष्ट जर आपल्याला एखाद्याला दान करावीशी वाटली तर ती आपल्या जवळ नसतांनाही आपण ती दान करू शकतो का? आणि मनातल्या मनात आपण आपल्या जवळ नसलेली गोष्ट दान केल्याबद्दल  आपल्याला माफी मागावी लागते का? असे असेल तर ऐश्वर्या राय अभिषेकला दान दिल्याबद्दल मला बच्चन कुटुंबियांची माफी मागावी लागेल का?'

'बेताला, अरे तू डोक्यावर पडला होतास की काय?'

'विक्रमा, प्रश्नाचं उत्तर प्रश्नाने देतोस? हा निघालो मी परत हॉटेलमध्ये.'

असे बोलून बेताल गाडीतून उतरून परत हॉटेलकडे निघाला.

-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक,

संपर्क-७८७५०७७७२८



ज्या अर्थी आम्ही नारदवंशीय आहोत आणि आमचा जन्म सर्वपित्नी अमावस्येच्या मध्यरात्री मुळ नक्षत्रात झालेला आहे आणि या पृथ्वीतळावरील तमाम मनुष्यप्राणी आम्हाला पत्रकार म्हणून ओळखतात,( काही जळाऊ प्रवृत्तीचे नतद्रष्ट आम्हाला पत्रावळीकार म्हणतात. असो.) त्या अर्थी कोणत्याही घटनेच्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी आम्ही केव्हाही, कोणत्याही ठिकाणी जाऊन, कोणालाही हवे ते किंवा नको ते प्रश्न विचारून त्याच्याकडून हवी ती माहिती काढून घेऊन, ती हव्या त्या प्रकारे किंवा नको त्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचवून कोणाच्याही मुळावर उठू शकतो. हा आमचा जन्मसिद्ध आणि घटनादत्त अधिकार आहे आणि आम्ही कोणत्याही घटनात्मक पदावर आरूढ नसल्यामुळे वागण्याबोलण्याचे तारतम्य बाळगून तो आम्ही बिनदिक्कतपणे बजावत असतो. (याला आमचे काही मित्र निर्लज्जपणा म्हणतात. म्हणोत बापडे.)

आज रामप्रहरी (काही धर्मनिरपेक्ष लोक याला सकाळ म्हणतात, पण पुढेमागे आम्हाला आमचे हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी कोणाकडून प्रमाणपत्र घेण्याची गरज पडू नये म्हणून आम्ही अशीच भाषा वापरतो. असो.) बायकोने समोर आदळलेला कपभर चहा पोटात ढकलून, (दिवसभरात स्वखर्चाने आम्ही फक्त एवढंच पोटात ढकलतो. बाकी सर्व आमची पत्रकारिता सांभाळून घेते! असो.) खांद्यावर झोला अडकवून आम्ही घराबाहेर पडलो. फिरता फिरता आम्ही 'मातोश्री' महालाजवळ पोहोचलो. तिथल्या द्वारपालांच्या हातात बिस्किटांचे पुडे होते. ते बिस्किटं खाण्यात दंग होते. एका कोपऱ्यात बिस्किटांची ५०-६० खोकी पडलेली होती. चौकशीअंती ती बिहारला पाठविण्यासाठी मागवलेली आणि आता काहीच कामाची नसलेली बिस्किटं असल्याचं कळलं. तिकडे जाऊन आम्ही हळूच पाच सहा पुडे आमच्या झोळीत टाकून घेतले. (झोळीत असलं फुकटचं काही पडल्याशिवाय पत्रकार असल्याचा फिलच येत नाही! अर्धी सोय तर झाली. आता फक्त कोणीतरी चहा पाजणारा शोधायला हवा.असो.) अंगणातच एका बाजूला दोन चार मावळे तुतारी कुंकण्याचा सराव करीत होते. त्यांना टाळून आम्ही हळूच दिवाणखान्याच्या दारापाशी पोहचलो. सरळ आत जाऊन मिळवलेल्या बातमीपेक्षा दाराआड लपून मिळविलेली बातमी जास्त खरी आणि खुसखुशीत असते याचं बाळकडू आमची पत्रकारिता बाल्यावस्थेत असतांनाच आम्हाला आमच्या ज्येष्ठांनी पाजलेलं असल्यामुळे आम्ही दाराच्या आडोश्याला थांबणंच पसंत केलं. आतमध्ये सामानाची बांधाबांध सुरू होती. प्रत्यक्ष उधोजीराजे आणि बाळराजे समोर उभे राहून कामावर देखरेख ठेऊन होते. 'वर्षा'वर जाण्यासाठी सामानाची बांधाबांध सुरू असावी असा आम्ही अंदाज बांधला आणि आमचे डोळे भरून आले.'कशाला उगीच थोड्या दिवसांसाठी धावपळ करता ? उगाच जा जा अन् ये ये.' असं उधोजीराजेंना समजवावं असं क्षणभर वाटलं, पण आम्ही दाराबाहेर असल्यामुळे तो मोह आवरला. आम्ही तसे आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे आमची विचारसरणी अशीच आहे, की माणूस इकडे आपली स्वप्ने रंगवत असतो आणि तिकडे देवाजीच्या ( इथे देवानाना नागपूरकरांचा दुरान्वये ही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी.) मनात वेगळेच काहीतरी असतं. नंतरचा आतला संवाद ऐकून ती तयारी 'वर्षा'वर जाण्यासाठी नाही तर 'बिहार'ला जाण्यासाठी सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं आणि आमच्या मनावरचं मणभर दडपण कमी झालं! आत उधोजीराजे आणि बाळराजेंचा संवाद सुरू होता. बाळराजे :- डॅड, मी जायलाच हवं का बिहारला, प्रचारासाठी ? उधोजीराजे :- जायलाच हवं का म्हणजे ? अरे जायलाच हवं. किंबहुना मी तर म्हणीन की तिथे तू जाणं अत्यंत गरजेचं आहे. बाळराजे :- पण डॅड, संजय अंकल तर सांगतात की, तिथे आपली तितकी ताकद नाही म्हणून. मग ज्या परीक्षेत आपल्याला भोपळाच मिळणार आहे ती परीक्षा आपण द्यायचीच कशाला ? राज अंकल कसा कधी कधी गॅप घेतात तसा आपल्याला नाही का घेता येणार ? उधोजीराजे :- अरे, गॅप घ्यायला ती काय बारावीची परीक्षा आहे की काय आणि असा घाबरतोस कशासाठी, मी आहे ना तुझ्या पाठीशी, ऑनलाइन! बाळराजे :- डॅड, मी काय महाराष्ट्र आहे का, माझ्या पाठीशी तुम्ही ऑनलाइन राहायला ? आणि तो चिन्हांचा काय गोंधळ आहे हो, डॅड. कधी बिस्कीट तर कधी ती तुतारी की काय ती ? उधोजीराजे :- अरे बाबा, आपल्याला बिस्कीट नको होतं म्हणून त्यांनी आपल्याला तुतारी दिली. समजलं? बाळराजे :- मला समजलं हो डॅड, पण त्या अमृता आंटींना नाही ना समजलं . त्या फोन करून मला विचारत होत्या. उधोजीराजे :- (वैतागून) काय विचारात होत्या त्या ? बाळराजे:- त्या विचारात होत्या की इतकी वर्षे आम्ही चॉकलेट देत होतो ते चाललं तुम्हाला आणि आता निवडणूक आयोगानं बिस्कीट दिलं तर का नाही चाललं?


-मुकुंद परदेशी

_मुक्त लेखक,

भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८


- १ -

संपादकांची गाडी हॉटेल ग्रँड हयातकडे निघालेली आहे. मागच्या सिटवर बसलेले संपादक (नेहमीप्रमाणेच)

स्वतःवरच खुश आहेत.

संपादक :- (मनातल्या मनात) चला, देवा नाना आपल्याला भेटायला तयार झालेत यातच आपण अर्धा डाव जिंकला ! आपली भेट आटोपली की चॅनलवाल्यांना ब्रेकींग न्युज आणि पेपरवाल्यांना उद्याची हेडलाईन मिळणार. खरं म्हणजे देवा नानांची अशी भेट घेऊन बारामतीकरांना आणि दिल्लीच्या बाईला गुगली टाकावी अशी कधीपासून इच्छा होती. असं करायला मोठे मालक परवानगी देता की देत नाही अशी धाकधूक होती, पण देव मदतीला धावला. छोट्या मालकांनी नाईट लाईफच्या नादी लागून करून ठेवलेले पराक्रम निस्तरता निस्तरता मोठया मालकांना फुल्ल एसीतही घामाच्या धारा लागल्या. आता हे सर्व आवरायला देवा नानाच लागतील हे लक्षात आल्यावर त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली. झालं ! जे मला हवं होतं तेच मी करावं म्हणून मालकांनी मला आग्रह धरला, म्हणून मग आता देवा नानांना घेऊन फाईव्ह स्टारमध्ये जेवावं लागणार आहे. स्वतःच्या पैश्यांनी फाईव्ह स्टारमध्ये जेवायला नाही परवडत आणि दुसऱ्याला न्यायचं म्हटलं तर अंगावर काटाच येतो ! अर्थात पक्षाच्या कामाने जेवलो म्हणून बिल मागून घेता येईल. आता देवा नानांना छोट्या मालकांना वाचवा म्हणून गळ घालतांनाच भविष्यात आपल्याला परत जुळवून घेता येईल का याचा अंदाज घ्यावा लागेल. थोडा समजूतदारपणा दाखवावा लागेल, थोडे सूचक इशारे करावे लागतील. घटस्फोटित नवरा बायको वर्षभरानंतर भेटले तर ते असंच वागत असतील का ?


-२-

देवा नानांची गाडी हॉटेल ग्रँड हयातकडे निघालेली आहे. मागच्या सिटवर बसलेले देवा नाना बऱ्याच दिवसांनंतर खुश दिसतायेत.

देवा नाना :- (मनातल्या मनात)  हे असं असतं बघा. आंधळा मागतो एक आणि - - - असं झालं आहे. कधीपासून विचार करत होतो, की संपादकांची जाहीरपणे गुप्त भेट घ्यावी आणि तिची ब्रेकिंग न्युज करून बारामतीकर दादांना गुगली टाकावी. नुसतंच येतो येतो करतायेत कधीपासून. त्यांना दाखवायलाच हवं की जुने मित्रसुद्धा वेटिंगला आहेत म्हणून. मी काहीतरी हालचाल करण्याच्या बेतातच होतो तोपर्यंत संपादकांचाच फोन आला, की आपण एकत्र जेवण घेऊयात म्हणून. मला माहीत आहे, नाईट लाईफचा खेळ छोटूच्या अंगाशी आलायं. त्याला वाचवा म्हणून गळ घालतील आणि दुसरा घरोबा मानवत नसेल म्हणून परत पहिल्या घरात घुसता येईल का याचा अंदाज घेतील. जाऊ द्या. बारामतीकर दादांना गुगली तर टाकली जाईल ना ? आपल्याला काय, आम के आम गुठलीयोंके दाम !


-३-

हॉटेल ग्रँड हयातमध्ये संपादक आणि देवा नाना समोरासमोर बसलेले आहेत. संपादक मेनूकार्ड देवा नानांकडे सरकवतात.

देवा नाना :- तुम्हीच मागवा जे मागवायचं ते. माझ्या तर तोंडाची चवच गेली आहे वर्षभरापासून.

संपादक :- अहो, चवीचं काय घेऊन बसलात नाना, आमच्या तर प्रत्येक घासात खडा निघतोय वर्षभरापासून.

देवा नाना :- घाईगडबडीत खिचडी बनवायच्या नादात डाळ तांदूळ नीट पाहून नाही घेतलेत ना की असं होणारच.

संपादक :- हो ना. खिचडी पचायला हलकी असते म्हणे. आम्हांला तर जड जातेय पचायला.

देवा नाना :- हसत करावे कर्म, भोगावे मग रडत तेचि, यालाच तर म्हणतात ! बरं, ते असू देत. मुख्य विषय काय आहे ते बोला. कसं काय भेटावंस वाटलं एकदम ?

संपादक :- नानासाहेब, छोट्या मालकांना त्रास होईल असं वाटतंय. आपण मदत करावी अशी मोठ्या मालकांची विनंती आहे.

देवा नाना :- तसे आपण जुने मित्र आहोत. मदत तर करायलाच हवी, पण त्याचं काय आहे की, तुम्ही मला टांग मारल्यापासून दिल्लीतलं माझं वजन थोडं कमीच झालेलं आहे, तरी हे बिहारचं आटोपलं की बघतो प्रयत्न करून.

संपादक :- बिहारचं आटोपेपर्यंत तर आमचे छोटे मालकच आटोपलेले असतील नानासाहेब. ताबडतोब काहीतरी करायला हवं, नाहीतर बैल गेला आणि झोपा केला असं होईल ते.

देवा नाना :- (मिश्कीलपणे) एक दुरुस्ती सुचवू का, छोटीशी ?

संपादक :- सुचवा की.

देवा नाना :- बछडा गेला आणि झोपा केला असं म्हणा.

संपादक :- नाना साहेब, हे तुम्ही बोलू शकता. आम्ही कसं बोलणार ? बरं, ते असू द्या. म्हणजे काहीही बोला, पण काहीतरी करा.आपली जुनी मैत्री आहे. परत केव्हाही चॅनलाईज होऊ शकते. काय ?

देवा नाना :- संपादक, कोणाचा बंद पडलेला पेपर चालवायला घेण्यापेक्षा स्वतःचा नवा पेपर काढलेला कधीही चांगला असतो. काय ?

संपादक :- (नेहमीप्रमाणे कोडगेपणा स्वीकारत) आता पेपरचा विषय काढलात म्हणून विचारतो. आमच्या पेपरसाठी मुलाखत केव्हा देता ?

देवा नाना :- मी कुठे वाचतो तुमचा पेपर ? मी कशासाठी मुलाखत देऊ ?

संपादक :-  पत्रकारांना या आपल्या भेटीचं कारण सांगण्यापूरतं तरी हो म्हणा. आणि हो, मला खरंच माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घ्यायची इच्छा आहे.

देवा नाना :- अस्स? मग अजून सहा महिने थांबा आणि तुमच्या मालकांचीच मुलाखत घ्या की !


-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक,

भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८


कोणतीही जबाबदारी अंगावर घेणं हे मर्दाचं लक्षण असतं असं म्हणतात. याबाबतीत आम्हांला मराठी माणसाचा भलता म्हणजे भलताच अभिमान आहे. (या ठिकाणी 'भलताच'चा अर्थ  'फार' असा घ्यावा, उगाच 'भलताच' घेऊ नये.) सेना-भाजपची युती तुटली असं जाहीर करून शिवसेनेची शिकार करण्याची जबाबदारी अंगावर घेणारा शिकारी कोण होता, तर तो होता  आमचा मराठी माणूस, आमचे नाथाभाऊ! मिठाशिवाय जेवणाला चव नसते. स्वयंपाक करतांना मीठ वापरावंच लागतं. अर्थात जिथे जे वापरायचं ते वापरावंच लागतं आणि जिथे जे  टाळायचं तिथे ते टाळावंच लागतं! मिठाशिवाय जेवणाला चव नाही हे जरी खरं असलं तरी बासुंदीत कोणी  मीठ घालतं का? यशस्वी राजकारणी होण्यासाठी माणूस पाककलेतही  निष्णात असावा लागतो की काय? (बिहारहून परतल्यावर देवानाना नागपूरकरांना विचारायला हवं.) 'युती तुटल्याची घोषणा करण्याची हिम्मत फक्त या नाथाभाऊमध्येच होती!' असं  'वाघाची शिकार करण्याची हिम्मत या नाथाभाऊ मध्येच होती!' असं एखाद्या शिकारीच्या आवेशात सांगणारे नाथाभाऊ आता, 'शिकारी खुद यहां शिकार हो गया.' या शीर्षकाचं  आत्मचरित्र लिहिताहेत म्हणे! असो.
तसा आम्हांला नाथाभाऊंचा अभिमान आहे, पण त्यांच्यासारखी अशी कोणतीही जबाबदारी अंगावर घेणं आम्हांला कधीच जमलं नाही. आम्ही तसे अगदीच बेजबाबदार. (कोणासारखे काय  सांगणार, इकडे बायका-पोरं तरी नाराज होणार नाहीतर तिकडे राजकारणी तरी नाराज होणार!) आमच्या जन्मापासून ते थेट लग्नापर्यंतची जबाबदारी आमच्या आई-बापांनी पार पाडली.  नाव पूनम असलेलं, पण अमावास्येला पृथ्वीतलावर अवतरीत झालेलं आणि आपल्या अवतरण दिनाच्या सर्व खुणा आपल्या अंगावर बाळगणारं आपलं सहावं कन्यारत्न आमच्या गळी  मारण्यासाठी आमच्या सासरेबुवांनी एका संस्थाचालकाशी ओळख काढून आम्हांला प्राथमिक शाळा मास्तर बनविण्याची जबाबदारी पार पाडली. अर्थात अगदी पहिल्या महिन्यापासूनच  आम्हांला पगार देण्याची जबाबदारी तो संस्थाचालक पार पाडू न शकल्यामुळे मग आमच्या कुटुंबाची सगळी आर्थिक जबाबदारी आमच्या सासरेबुवांनाच पार पाडावी लागली. जावयाची  दुहेरी फसवणूक केल्यावर त्याची फळं भोगावीच लागणार ना? हसत करावे कर्म भोगावे मग रडत तेचि, यालाच म्हणत असावे का? तरी मनात कोणताही किंतु न ठेवता आम्ही त्या  आमच्या सासरेबुवांना पाच वर्षात पाच नातवंड देण्याची जबाबदारी न कुरकुरता पार पाडली! तसं आमच्यासारख्या स्वाभिमानी माणसाला आयुष्यभर त्यांच्यावर अवलंबून राहणं कुठे  आवडणार आहे? (आणि त्यांचं आयुष्य तरी किती उरलंय आता?) म्हणतात ना की एक दरवाजा बंद झाला की देव दुसरा दरवाजा उघडतो म्हणून! मुलगा लागेल की दोन चार वर्षात  नोकरीला! हेही असो. असं जबाबदारी झटकत जगण्याची आम्हांला अजिबात लाज वाटत नाही. का, म्हणजे काय? 'यथा राजा तथा प्रजा!' माहीत नाही का? माणसाने कोणाकोणाची  जबाबदारी अंगावर घ्यावी? राजा असला म्हणून काय झालं? त्याला त्याची काही कामं आहेत की नाही? तो दिवसरात्र जनतेचीच कामं करायला लागला तर त्याने आपलं खासगी आयुष्य  केंव्हा जगायचं? आणि राजा असं दिवसरात्र जनतेच्याच कामात गुंतुन राहिला आणि बाळराजे जर रात्र रात्र भर बाहेर ''धुवांधार' पार्ट्या झोडू लागले तर? कोणाच्या कुळाची 'दीपिका'  वाया जात असेल तर जाऊ देत, पण राजाचा कुलदीपक कसा वाया जाऊ द्यायचा? त्यासाठी मग 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' चा नारा देऊन जनतेला कामाला लावण्यात काय चुकीचं  आहे? याला बेजबाबदार म्हणणार का? असा बेजबाबदार माणूस कधी राजा होऊ शकतो का? असे असते तर आम्ही नसतो का राजा झालो? पुन्हा असो.
अर्थात, सगळेच काही असे बेजबाबदार असतात असं नाही. 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' काहींच्या रक्तातच भिनलेली असते. परवा अशाच एका पठ्ठ्याच्या 'मालामाल' बायकोला  चौकशीसाठी एका सरकारी कार्यालयातून बोलावणं आलं. लगेच या महाशयांनी 'मलाही तिच्यासोबत येऊ द्या. ती बिचारी घाबरून जाईल, अस्वस्थ होईल' असा अर्जच त्या कार्या लयाकडे  केला. त्यालाही तिच्यासोबत चौकशी सुरू असतांना थांबायचं होतं म्हणे. म्हणजे उद्या तिला जर मुक्कामाला 'येरवड्यात' पाठवली तर तिथे यांच्यासाठी देखील सोय करावी लागेल की  काय? 'तुम्ही स्वतःला काय 'बाजीराव' समजता की काय?' असं म्हणून त्याचा अर्ज फेटाळला गेला म्हणे! या 'बाजीराव'ला त्याच्या 'मस्तानी' सोबत चौकशीच्या ठिकाणी हजर राहण्याची  परवानगी नाकारल्यानंतर त्याने म्हणे राजा बुद्धिगुप्तला फोन केला. 'हॅलो, राजासाब मैं बाजीराव बोल रहा हुं.' 'बोला बाजीराव.' 'सर, वो क्या है ना, के मैं मेरी वाईफ के साथ वो  इन्कवायरी की जगह जाना चाहता हूं सर. वो बडी मासुम है सर. घबरा जायेंगी सर. आपको क्या लगता है सर?' 'खरं आहे रे बाबा. जशी तुझी बायको मासुम आहे ना, तसाच माझा  बाळसुध्दा मासुम आहे रे. मी तर म्हणेन की त्याच्या इतकं मासुम कोणीच असू शकत नाही. किंबहुना मासुम हा शब्दच मुळी त्याच्यासाठीच बनला आहे. त्यांनी तुला तुझ्या बायकोसोबत जाऊ द्यायलाच हवं, म्हणजे मग उद्या मलासुद्धा माझ्या बाळासोबत जाता येईल ना?'

- मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८ 


रात्रीचा समय आहे. राजा बुद्धिगुप्त आपल्या महालातल्या मंचकावर पहुडले आहेत. सकाळपासून पंधरा पंधरा मिनिटांच्या तीन व्ही सी करून त्यांना प्रचंड थकवा आला आहे. चोवीस तासातला तब्बल पाऊण तास आपण राज्यासाठी दिल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. त्या समाधानात राजे डोळे मिटून पडले असतांनाच मोबाईलची बेल वाजते. राजे सहसा कोणाचा फोन उचलत नसतात, पण त्या स्वांतसुखाय अवस्थेत अनावधानाने त्यांच्याकडून फोन उचलला जातो.
राजा बुद्धिगुप्त (डोळे मिटलेल्या अवस्थेत) - हॅलो, कोण बोलतंय ?
दुबईचा भाई - दुबई से भाई बोलता भिडू.
राजा बुद्धिगुप्त - अरे, ही काय चेष्टा करण्याची वेळ आहे का ? तू तर शिवाजी नगरला राहतोस ना, तिकडे दुबईला काय शॉपिंगला गेलास की काय ?
दुबईचा भाई - मजाक मत कर भिडू. हम दुबईवाला भाई बोल रयला है. वो तेरा शिवाजीनगरवाला भाई नही.
राजा बुद्धिगुप्त - बरं. बरं. तुम्ही जे कोणी असाल ते असाल, पण जरा मातृभाषेत बोला आणि असं एकेरीत काय बोलता, राजे आहोत आम्ही इथले. जरा मानपान देत चला.काही संस्कार वगैरे केलेत की नाही आई-बापांनी ? तुम्ही काय टी व्ही अँकर आहात की सिनेमातली नटी आहात ?
दुबईचा भाई - भिडू, मातृभाषा बोले तो यईच तो आपुन की मातृभाषा है. एक बात पुछु ? तुम्हारा बेटा मातृभाषा में पढा क्या ? और माफ करना भिडू, वो क्या है ना के आजकल सब तुमरेकू ऐसाची बोलते ना, तो आपुन भी बोल गया.
राजा बुद्धिगुप्त - बरं. बरं. आता तुमचं काय जे काम असेल ते आमच्या प्रवक्त्याला सांगा. मी असा फोन उचलत नसतो कोणाचा. आज चुकून उचलला गेला. हवं तर त्या बिहारी नागपूरकरांना विचारा.
दुबईचा भाई - प्रवक्ता ? ये क्या होता है ?
राजा बुद्धिगुप्त - प्रवक्ता माहीत नाही तुम्हांला ? अरे, प्रवक्ता म्हणजे जो आमचे निरोप दुसऱ्यांपर्यंत पोहचवतो, आमच्या वतीने बोलतो, आमच्यासाठी कोणाच्याही अंगावर धावून जातो, कोणालाही अंगावर घेतो, आमच्यावतीने सेटलमेंट करतो, तो.
दुबईचा भाई - अच्छा. अच्छा. बोले तो पंटर. हम लोग ऐसे आदमी को पंटर बोलते है.पर हम तुम्हारे पंटर से क्यू बात करे ? हम को तो तुमको धमकी देनी है.
राजा बुद्धिगुप्त - अरे, वेडा की खुळा तू ? आता तर मागच्या आठवड्यात धमकी दिली होतीस ना ? अशी परत परत काय धमकी देतोस, असं करायला तू नागपूरकर आहेस का रे ? आणि हे बघ तू मागच्या वेळेस धमकी दिलीस ना, तेंव्हाच आमच्या मोठ्या साहेबांनी सांगितलं होतं की त्यांनाही अशा धमक्या येत असतात,पण ते घाबरत नाही कधी.
दुबईचा भाई - राजा बुद्धिगुप्त, भाई की बातोंको मजाक में मत लेना. हम तुम्हारा राजमहल बमसे उडा देनेवाले है.
राजा बुद्धिगुप्त - अरे, जोपर्यंत माझे तुंबई पोलीस आहेत ना, तोपर्यंत तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस . माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या तुंबई पोलिसांवर. हवं तर त्या नटमोगरी अंगणाला विचार. किती लोकांनी तिला धमक्या दिल्या होत्या तुंबईला येऊ नकोस म्हणून, तिचं थोबाड फोडणार होते, शिवाय ती माझ्या तुंबई पोलिसांवर खारसुद्धा खात होती ; तरीसुध्दा त्यांनी तिला खारपर्यंत सुखरूप पोहचवली !
दुबईचा भाई - तुमको सचमुच डर नही लगता ?
राजा बुद्धिगुप्त - अरे, मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे. मी तर म्हणीन की, मी असा लढाऊ असणार होतो म्हणूनच आमचे पिताश्री लढाऊ होते ! तुला मी अजिबात घाबरत नाही. नाहीच घाबरत मुळी. आणि घाबरणार तरी कसा तुला ? तू दुबईला राहतोस ना, दिल्लीला नाही ना राहत ?
तिकडून फोन कट केला जातो.

- मुकुंद परदेशी,
मुक्त लेखक,
संपर्क -७८७५०७७७२८



देवा शपथ खरं सांगतो, अगदी आता आतापर्यंत म्हणजे गेल्या आठवड्यापर्यंत आम्ही पार नैराश्यात जगत होतो. सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं तर पार डिप्रेशनमध्ये ( हा शब्द आम्हांला आता आताच समजला. ऍक्ट ऑफ बॉलीवूड ! दुसरं काय ?) गेलो होतो. परत जिया असा बेचैन असतांना कोणतीच रिया जवळ नव्हती , पण देव थोडाफार का होईना दयाळू आहे हो. तो आला आमच्या मदतीला. निर्मला काकूंच्या रूपाने आला. त्यांच्या मुखातून त्याने आमच्या कानात ज्ञानामृत ओतले आणि आमचे डोळे खाडकन उघडले. आमचं नैराश्य कुठल्याकुठे पळालं.त्या ज्ञानामृतामुळे आम्हांला साक्षात्कार झाला की, भलेच आमच्या यशाला आम्हीच जबाबदार असू,( असू म्हणजे काय ? आहोतच आम्ही आमच्या यशाला जबाबदार. तितके बुद्धिमान आहोतच मुळी आम्ही. तितके कर्तृत्ववान आहोतच मुळी आम्ही !) पण आमच्या अपयशाला आम्हीच जबाबदार असू असे काही नाही. आमचे अपयश म्हणजे ऍक्ट ऑफ दुसरेच कोणीतरी असू शकते ! ते दुसरेच कोणीतरी कोण ते फक्त ओळखता आलं पाहिजे !                                             

आता हे दुसरेच कोणीतरी म्हणजे कोणीही असू शकतं ; अगदी आपल्या जन्मदात्या आई- बापांपासून, शाळेतल्या मारकुट्या मास्तरड्यांपासून ते थेट देवापर्यंत कोणीही. आता हेच पहा ना, आम्ही मूलखाचे भित्रे आहोत, धांदरट आहोत, याला जबाबदार कोण ? अर्थातच आमचे आई -बाप ! लहानपणी कधी गल्लीत मारामारी करू दिली नाही, गल्लीतल्या वात्रट, टारगट मुलांसोबत राहू दिलं नाही. राहिलो आम्ही भित्रे ! सारखे सारखे आमच्या अंगावर खेकसत राहिले. आमच्या हातून कपबशी फुटली, खेकस अंगावर. शाळा बुडवून सिनेमाला गेलेलो कळलं, खेकस अंगावर. चार विषयात नापास झालो, खेकस अंगावर. असं नेहमी नेहमी खेकसून पार धांदरट करून टाकला की हो आम्हांला. एकदा तर कमालच केली की हो आमच्या आई-बापांनी, यत्ता सहावीत असतांना, म्हणजे तसे आम्ही चांगलेच जाणते झालेलो असतांना, (प्रति यत्ता दोन वर्षे याप्रमाणे हिशेब करावा.)  मित्रांच्या आग्रहाखातर आम्ही धुम्रनळी तोंडात घेतली. आता आयुष्यातला पहिलाच झुरका तो, लागला जोरदार ठसका. जळती धुम्रनळी शर्टावर पडल्यामुळे तो जळाला. झालं ! त्यादिवशी घरी आम्हांला बदड बदड बदडलं. बाळ, तुला फार जोरात ठसका लागला का रे, तुला चटका लागला का रे, काही म्हणजे काही विचारलं नाही. मायेचा एक शब्द नाही. बदडलं मात्र व्यवस्थित. आता शर्ट जळणे हा ऍक्ट ऑफ धुम्रनळी होता, इतकी साधी गोष्ट आमच्या आई- बापांना कळू नये ? त्याची शिक्षा आम्हांला का ? आमच्या आई-बापांच्या अशा विचित्र स्वभावामुळे आम्ही भित्रे झालो, धांदरट झालो. (जिज्ञासूंनी बालमानसशास्त्राचा अभ्यास करावा.) ऍक्ट ऑफ आई-बाप ! दुसरे काय ?
 

जो प्रकार घरात तोच प्रकार शाळेत. एकजात सगळे मास्तरडे ( या शब्दाचा टीचर्स-डेशी काहीही संबंध नाही.) आमच्यावर टपून बसलेले असायचे. वर्गात चांगले अर्धा शेकडा विद्यार्थी असतांना या सगळ्या मास्तरड्यांचा डोळा मात्र आमच्यावरच असायचा. सगळे जसे महाभारतातले अर्जुनच. त्याला कसा फक्त त्या पक्ष्याचा डोळाच दिसत होता, तसे या मास्तरड्यांना वर्गात फक्त आम्हीच दिसायचो. अक्षर चांगलं नाही, गृहपाठ केला नाही, नापास झालो, सगळ्या विषयांसाठी एकच वही केली, मास्तर शिकवीत असतांना खिडकीतून झाडावरच्या चिमण्यांकडे पाहत होतो अशा किरकोळ कारणांसाठी बदडणारे मास्तर असतांना शिक्षणात मन कसं रमेल ? नाहीच रमलं. यत्ता नववीत असतांना तर कहरच झाला. झाडावरच्या चिमण्या पाहत पाहत आम्हाला शेजारच्या बाकावरची चिमणी आवडू लागली. मन भलतंच तळमळू लागलं. काय करावं काही कळेना. त्यात एके दिवशी मास्तरांनी शिकवलं, ' आळस हा माणसाचा शत्रू आहे.आजचं काम उद्यावर ढकलू नये, आजच करावं. कल करे सो आज कर. आज करे सो अभी कर.' झालं ! गुरू आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही आमच्या मनीच्या भावना शेजारच्या बाकावरच्या चिमणीला चिट्ठीवर लिहून तात्काळ कळविल्या ! त्या मूर्ख चिमणीने चिट्ठी वाचताच आमच्याकडे एकदाही न पाहता तात्काळ ती मास्तरांना नेऊन दिली ! यात आमचा काय दोष ? चिट्ठी तर आम्ही त्या चिमणीला दिली होती. तिने मूर्खासारखी ती मास्तरांना का द्यावी ? तर या ऍक्ट ऑफ चिमणीमुळे मास्तरांनी भर वर्गातआम्हांला बदड बदड बदडला आणि पुढच्या दहा मिनिटात हेडमास्तरांसमोर आमचं कोर्टमार्शल करून, ' असभ्य वर्तनामुळे शाळेतून काढला.' असं लाल शाईने लिहिलेला दाखला आमच्या हातात कोंबून आमची घरी पाठवणी करण्यात आली. तेव्हापासून आमचा शिक्षणाशी संबंध तुटला तो कायमचाच. ऍक्ट ऑफ बिनडोक, निरस मास्तर ! दुसरे काय ? तरी त्या शाळेत नववीपर्यंत पोहचता पोहचता आम्ही तब्बल अठरा वर्ष घालवली होती, पण इतक्या जुन्या संबंधांची जाणीव काही त्या मास्तर-हेडमास्तरांनी ठेवली नाही. घरी गेल्यावर आमच्या निर्दयी, निष्ठुर आई-बापांनी आमचं काय केलं ते सांगण्यात काही अर्थ नाही. ऍक्ट ऑफ माझं दुर्दैव ! दुसरं काय?
-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक, संपर्क- ७८७५०७७७२८

उधोजीराजे दिल्ली सोबतची व्हिडिओ कॉन्फरन्स संपवून आपल्या दिवाणखान्यात व्याघ्रसनावर आज जरा जास्तच रुबाबात बसलेले आहेत. पारनेरचे पाच नगरसेवक जितक्या नकळतपणे दादांनी पळवावेत तितक्याच नकळतपणे त्यांचा एक हात मिशांवर ताव देत आहे. तेव्हढ्यात बाळराजे प्रवेश करतात आणि त्यांच्यासमोर उभे राहतात. उधोजीराजे त्यांच्याकडे प्रश्‍नार्थक नजरेने पाहतात .
बारा - आप की ईजाजत हो तो मैं बोलू पापा दी ग्रेट ?
उरा - हा काय वात्रटपणा लावला आहेस ? रात्री-अपरात्री इकडे तिकडे उंडारतांना घेतोस का कधी माझी परवानगी ? आता बोलण्यासाठी काय माझी परवानगी मागतोस आणि तीही हिंदीतून?
बारा - यात कसला आलायं वात्रटपणा ? मी अनुकरण करतोय तुमचं ! काल तुम्ही नाही का बोलण्याआधी दिदींची ’ईजाजत’ मागितली हिंदीतून ? आणि मी हिंदीतून बोलतोय म्हणजे मला इंग्रजी येत नाही असं समजू नका. काही लोकांची होते इंग्रजी बोलतांना पंचाईत, पण आपलं नाही बुवा तसं. फक्त समोरच्याला समजेल अशा भाषेत बोलावं म्हणून हिंदी मराठीत बोलावं लागतं. समजलं पापा दी ग्रेट ?
उधा - कळलं. कळलं. जास्त अक्कल नका पाजळू. काय बोलायचं आहे ते बोला आणि निघा. कामं खोळंबली आहेत माझी.
बारा - काही विशेष नाही. शेवटी काय ठरलं ते विचारायला आलो होतो. पापा दी ग्रेट!
उरा - कसलं काय ठरलं ?
बारा - तेच ते, डरना है के लढना है ? पापा दी ग्रेट !
उरा - अरे, मी तर आहेच लढणार्‍या बापाचा लढणारा मुलगा ! मी तर नेहमीच लढायला तयार असतो, अर्थात घरात बसून. आता पुढे काय करायचं ते बाकीच्यांना ठरवू दे.
बारा - हो ना. त्यांना म्हणावं काय ते लवकर ठरवा म्हणावं. नाहीतर असं ऑनलाईन भेटत राहायचं आणि ऑनलाईनच चहा पीत राहायचा, आपापल्या पैश्यांनी, याला काय अर्थ आहे ?
उरा - माझी तर तयारी आहे त्यांना माझ्या सारखं बनवायची, पण त्यांची तयारी आहे का माझ्यासारखं बनण्याची ?
बारा - सगळे कसे तुमच्यासारखे बनतील डॅड ? वाघ हा जन्मावाच लागतो. असं कोणी कितीही ठरवलं तरी वाघ होऊ शकत नाही. यू आर सिम्पली ग्रेट डॅडी. तुम्हाला जे जमतं ते दुसर्‍या कोणाला जमूच शकत नाही. काल त्या मिटींगला जे कोणी होते त्यांच्या पैकी एकाला तरी  निवडुन न येता मुख्यमंत्री बनता आलं का, सांगा ना ? यू आर रिअली ग्रेट पापा !

उधोजीराजे थोडेशे लाजतात. परत त्यांचा हात नकळतपणे  मिशांकडे जातो.
उरा - अरे, माणूस काही असाच लढवय्या होत नाही. ते सगळं रक्तातूनच यावं लागतं. आमचे पिताश्रीच लढवय्ये होते ना, म्हणून तर आम्ही लढवय्ये आहोत ना ! बाळराजे एकदम काहीतरी आठवल्यासारखं करत खिशातून एक चिट्ठी काढून उधोजीराजेंना देतात.
बारा - (चिट्ठी देत) डॅड, रस्त्यात देवा अंकल भेटले होते. त्यांनी तुमच्यासाठी ही चिट्ठी दिली होती. तू अजिबात वाचू नकोस, तुझ्या बाल मनावर वाईट परिणाम होईल, डायरेक्ट तुझ्या पप्पांनाच दे म्हणत होते.

उधोजीराजे घाईघाईने चिट्ठी आपल्या हातात घेतात आणि अधीरतेने वाचतात. चिट्ठीत लिहिलेलं असतं -

    आपली आपण करी स्तुती ! स्वदेशी भोगी विपत्ती !
    सांगे वडिलांची कीर्ती ! तो एक मूर्ख !!             - रामदास स्वामी.

 
उधोजीराजे घाईघाईने चिट्ठी चुरगळुन खिशात टाकतात.
बारा - (उत्सुकतेने) डॅड, काय लिहिलं होतं देवा अंकलांनी ?
उरा - तुला नाही कळणार ते. अजून काय सांगत होते तुझे देवा अंकल ?
बारा - अंकल सांगत होते की, 2000 साली एक मूव्ही आली होती, ’ पापा दी ग्रेट ’ ती पाहून ये तुझ्या पप्पांसोबत. असं काय आहे हो पप्पा त्या मूव्हीत ?
बाळराजेंच वाक्य पूर्ण होण्याआधीच उधोजीराजे दिवाणखान्यातून बाहेर पडलेले असतात !
       
- मुकुंद परदेशी,
मुक्त लेखक,
संपर्क -7875077728

रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेकानेक चांगले वाईट प्रसंग घडत असतात. चांगल्या प्रसंगांमुळे आपण आनंदित होणे जसे स्वाभाविक म्हणावे लागेल, तसेच वाईट प्रसंगांमुळे आपल्याला नैराश्य येणेही स्वाभाविकच म्हणावे लागेल. आपल्या या आनंदित मनःस्थितीचे, निराश मनःस्थितीचे चांगले वाईट परिणाम फक्त आपल्यावरच होत नसतात तर ते आपल्या कुटुंबियांवर, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांवर म्हणजेच एकंदरीत सर्व समाजावरच होत असतात. माणूस आनंदित असला की त्याची शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिक क्षमता वाढते आणि तो नैराश्याने घेरलेला असला की त्याच्या या सर्व क्षमतांवर विपरीत परिणाम होतो हे आता तर मानसशास्त्रीय प्रयोगांनीसुद्धा सिद्ध झालेले आहे. म्हणूनच प्रत्येक माणूस जर प्रसन्न मनाने वावरू लागला तर त्याच्या वाढलेल्या कार्यक्षमतेचा त्याला, समाजाला आणि पर्यायाने संपूर्ण देशाला किती फायदा होईल याचा एकदा गांभीर्याने अभ्यास व विचार झाला पाहिजे.
असे असले तरी समाजातला प्रत्येक माणूस प्रसन्न कसा राहू शकतो? त्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरुवात केली तर? अशी स्वतःपासूनच सुरुवात करण्यासाठी आम्हांला थोडा आमच्या बुद्धीचा वापर करावा लागेल आणि थोडा संत वचनांचा आधार घ्यावा लागेल.आपण आयुष्यात कोणतंही काम हे आपलं आयुष्य सुखात जावं निदान सुसह्य तरी व्हावं म्हणूनच करीत असतो, मग ती नोकरी असो, व्यवसाय असो की लग्न असो! असे असले तरी अनेकदा आपली काही एक चूक नसतांना (असे प्रत्येकालाच वाटत असते!) माणसं आपल्याशी चुकीचं वागतात आणि आपल्याला मनःस्ताप सहन करावाच लागतो. असं बऱ्याचदा होतं. रस्त्याने जातांना कधीतरी आपल्या पायात काटा मोडत नाही का, अगदी आपल्या पायात चप्पल असली तरी? त्या वेळी आपण काय करतो? अलगदपणे काटा बाजूला काढून आपल्या कामाला लागतो की, त्या काट्यावर संतापून, त्याचा राग आपल्या कुटुंबातील माणसांवर, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांवर काढून वातावरण बिघडवून टाकतो? मग निष्कारण आपल्याला मनःस्ताप देणाऱ्या माणसांना असेच काट्यासारखं बाजूला काढून टाकलं तर आयुष्यातले अर्धेअधिक मनस्ताप टळू शकतात. असे असले तरी मनःस्ताप देणाऱ्या काही गोष्टी, काही प्रसंग कोणालाच टाळता येत नाहीत. आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपण कितीही शिस्तबद्ध असलो, निर्व्यसनी असलो तरी या धावपळीच्या जीवनात काही आजारांना तोंड द्यावेच लागते. आपला स्वभाव, आपले वागणे कितीही चांगले असले तरीही निष्कारण मनःस्ताप देणारी काही माणसं आपल्या आयुष्यात येतातच. ते सहजपणे दुर्लक्षित करणेच शहाणपणाचे असते. राष्ट्रीय महामार्गावरून भरमसाठ टोल देऊन वाहन चालवितांनाही काही खड्डे, चुकीच्या पद्धतीने बनविलेले गतिरोधक लागतातच ना? तसलाच हा न टाळता येणारा प्रकार असतो.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगी, कटू प्रसंगी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे महान संत तर अवघ्या मानव जातीचे कल्याण करणारे आईन्स्टाईन, ग्यालिलीओ यांच्यासारखे शास्त्रज्ञ, सॉक्रेटिससारखे तत्त्वज्ञ यांना आयुष्यात किती अपमान, किती त्रास सहन करावा लागला, याचा थोडा विचार करावा म्हणजे मग किरकोळ गोष्टींचा मनःस्ताप होत नाही. आता काही गोष्टी जसे की, आजारपण, नोकरी -धंद्यातले त्रास, भाऊबंधकीतले वाद, सतत येणारे अपयश हे सर्व माझ्याच वाट्याला का येते असा प्रश्न पडल्यास, त्याचे उत्तर, 'जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर.' हे आहे, हे लक्षात असू द्यावे. आपलीच कर्मे भोग बनून (चांगले किंवा वाईट सुद्धा!) आपल्या समोर येतात आणि ती आपल्याला भोगावीच लागतात, हे मान्य करावे, म्हणजे सर्व सहन करण्याची ताकद येते. शुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून, 'पेरावे तेच उगवते.' हे मान्य करून समोर आलेल्या प्रसंगाला, माणसांना तोंड द्यायलाच हवे. थोडक्यात, कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी आपल्या आजच्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत हे मान्य करावेच लागेल. असे जर आहे तर निष्कारण मनःस्ताप करून घेण्यापेक्षा दररोज सकाळी प्रसन्न मनाने जागे होऊन, प्रसन्न मनानेच दिवस घालवणे कधीही चांगलेच. प्रसन्न मनाने रोजची कामे केली तर त्याचा आपल्या शरीरावर, आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो, हे मानसशास्त्रीय परीक्षणातूनही सिद्ध झालेले आहे. आपण सकारात्मक राहिलो तर सर्व सकारात्मक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात आणि आपले संपूर्ण जीवनच सकारात्मकतेने भरून जाते, म्हणून तर तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की,
'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.'

- मुकुंद परदेशी, धुळे
मुक्त लेखक,
१९/दत्त कॉलनी,
विद्यानगरी, देवपूर,
धुळे ४२४००५
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

गावातल्या जत्रेत मुलांची पाळण्यात बसणे, छोट्या आगगाडीत बसणे, जादूचे प्रयोग बघणे यासाठी जशी लगबग सुरू असते, तशीच लगबग काही गोष्टींच्या खरेदीसाठीही सुरू असते. अशा खरेदीत प्रत्येक मुलाची आवडनिवड वेगवेगळी असू शकते; पण मुखवटा मात्र प्रत्येकालाच हवा असतो. वानराचा, राक्षसाचा, विदूषकाचा असे अनेक प्रकारचे मुखवटे मुलांना आकर्षित करीत असतात. आपला खरा चेहरा लपवून, थोडा वेळ का होईना, पण गम्मत म्हणून दुसरा चेहरा लावून मुलांना होणारा आनंद बघण्यासारखा असतो.
हा झाला छोट्या मुलांच्या मुखवट्यांचा विषय. त्यांचे मुखवटे हे त्यांच्यासारखेच निरागस असतात, मनोरंजनासाठी असतात; पण मोठ्या माणसांच्या मुखवट्यांचे काय? मोठया माणसांना तर समाजात वावरताना अनेकानेक मुखवटे धारण करावे लागतात. दिवसभरात माणूस इतके मुखवटे बदलतो की कधी कधी तर तो स्वतःचा मूळ चेहराच विसरून जातो! सुरुवातीला वारंवार असे मुखवटे बदलणे थोडे अवघड वाटते, पण रोजच्या सरावाने माणूस या कलेत असा काही पारंगत होतो की जणू काही पाण्यात पोहणारा मासाच! अशा वारंवार मुखवटे बदलणाऱ्या माणसांचा वेध घेणेही मनोरंजक ठरावे.
सकाळी माणूस झोपेतून उठतो तो आपल्या मूळ चेहऱ्यानेच, मात्र कामासाठी बाहेर जातांना मूळ चेहरा आपोआपच झाकला जातो आणि आपल्या नोकरी-व्यवसायाला साजेसा मुखवटा नकळतपणे चढवला जातो. या मुखवट्यावर मग्रुरी, लाचारी, समाधान यापैकी कोणता भाव असेल हे कामाच्या ठिकाणी माणूस कोणत्या हुद्द्यावर आहे यावर ठरत असते. एखादा फार मोठ्या हुद्द्यावर असलेला 'बॉस' अगदी कपड्यांच्या इस्त्रीपेक्षाही जास्त कडक इस्त्रीचा मुखवटा धारण करून कामावर जात असतांना अचानक मागून, 'ये पक्या!' अशी बालमित्राची हाक कानावर पडताक्षणी तो कडक इस्त्रीचा मुखवटा क्षणार्धात गळून पडतो आणि समोर येतो तो बालपणीचा निरागस चेहरा! मग आपले वय, पद सर्व विसरून कोपऱ्यावरच्या हॉटेलमध्ये मस्तपैकी पाव-मिसळ, चहा हादडला जातो. हा कार्यक्रम सुरू असतांना जर कार्यालयातला एखादा कर्मचारी अचानक समोर आला तर क्षणार्धात परत तोच कडक इस्त्रीचा मुखवटा चेहऱ्यावर चढतो! तो कर्मचारी नजरेआड झाला की परत आपला मूळ चेहरा! कार्यालयात पोहचल्यावर खुर्चीवर बसताक्षणी एक रुबाबदार, बेदरकारपणाचा भाव असलेला मुखवटा चेहेऱ्यावर चढलेला असतो. हाताखालच्या कर्मचाऱ्यांनी व कामासाठी आलेल्या लोकांनी वचकून असावे म्हणून धारण केलेला हा मुखवटा, 'मोठ्या साहेबांनी तुम्हाला बोलावलं आहे.' अशी वर्दी शिपायाने दिली की आपोआपच वितळू लागतो. मोठया साहेबांच्या केबिनमध्ये घुसेपर्यंत चेहऱ्यावर लाचारी आणि निरागसता यांचे मिश्रण असलेला मुखवटा चेहऱ्यावर चढलेला असतो! कार्यालयात तुमचा हुद्दा काय आहे यावरूनसुद्धा तुम्हाला कोणता मुखवटा धारण करावा लागेल हे ठरत असते. तुम्ही जर मोठे साहेब असाल तर मग्रुरी आणि बेदरकरपणा यांचे मिश्रण असलेला मुखवटा कायमस्वरूपी घालता येतो. तुम्ही जर दोन नंबरचे साहेब असाल तर मात्र दोन वेगवेगळे मुखवटे लागतील. हाताखालच्या कर्मचाऱ्यांसमोर मग्रुरी आणि बेदरकारपणा यांचे मिश्रण असलेला तर मोठ्या साहेबांसमोर जाण्यासाठी निरागसता आणि लाचारीचे मिश्रण असलेला मुखवटा घालावा लागतो. तुम्ही जर कारकून असाल तर थोडी बेदरकारी आणि थोडी नम्रता यांचे मिश्रण असलेला मुखवटा, पण कारकून असाल आणि सर्वसामान्य लोकांशी जर तुमचा संबंध येत असेल तर मात्र कायमस्वरूपी बेदरकारपणाचे भाव असलेला मुखवटा घालावा लागतो. अर्थात साहेबांसमोर जातांना तो बदलावाच लागतो!
उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचेही तसेच. नोकरांशी वागतांनाचा मुखवटा गिऱ्हाईक किंवा घेणेकरी समोर आला की ताबडतोब बदलला जातो. घरात बायकापोरांसमोर वेगळा तर पाहुण्यांसमोर वेगळाच! आपल्या मुलीला बघायला येतात तेव्हा एक, तर आपण आपल्या मुलासाठी मुलगी बघायला जातो तेव्हा दुसराच मुखवटा धारण करावा लागतो. या सर्वांपेक्षाही जास्त मुखवटे बदलावे लागतात ते मुलींना आणि स्त्रियांना. शाळा, कॉलेजमध्ये, नोकरीच्या ठिकाणी थोडा करारी भाव असलेला मुखवटा लागतो. (आजूबाजूला वावरणाऱ्या द्विपाद श्वापदांपासून रक्षणासाठी तो मुखवटा फार उपयोगी पडतो.). लग्नानंतर सासु-सासऱ्यांसमोर आज्ञाधारक भाव असलेला, नवऱ्यासमोर प्रेमळ भाव असलेला तर माहेरी आल्यानंतर सासरचे दुःख, त्रास लपवणारा आनंदी, समाधानी भाव असणारा मुखवटा लीलया धारण करण्याची कला फक्त स्त्रियांनाच अवगत असते!
अनेक राजकारण्यांनी निवडणुकीसाठी आश्वासन देताना धारण केलेले लोकसेवकांचे मुखवटे निवडणूक निकालानंतर गळून पडतात. निवडून आलेले पुढील पाच वर्षे मग्रुरी, बेदरकारपणा यांचे मिश्रण असलेला आपला मूळ चेहरा घेऊन लोकशासक म्हणून वावरतात, तर पडलेले मात्र परत लोकसेवकाचा मुखवटा घालून पुढच्या निवडणुकीची वाट पाहतात! आपण मात्र आनंद आणि समाधानी भाव असलेला मुखवटा घालून जिंकलेल्यांचे सत्कार समारंभ घडवून आणायचे. लोकशाहीचा मुखवटा घालून फिरणाऱ्या हुकूमशाहीलाच लोकशाही समजून तिचे गुणगान करायचे.
जाता जाता - हल्ली जो तो पत्रकारांसमोर अश्रू ढाळतोय. जनतेला बावळट समजणाऱ्या अशा बावळटांसाठी या चार ओळी….
आता सगळीच मनं, डोळे
इतके आटलेत
म्हणून तर, अश्रूंचे मुखवटे
आम्ही बनवलेत.
घेता का घेता?
पाहिजे तो मिळेल
प्रसंगानुरूप, हवे तेवढेच,
अश्रू तो ढाळेल. -कवी सुधीर

मुकुंद परदेशी,
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र.७८७५०७७७२८

नको त्याच्या हाती आपला मोबाईल नंबर लागणे म्हणजे जणू ‘माकडाच्या हाती कोलीत’च लागणे! कोण केंव्हा फोन करून छळेल, आपल्या नसलेल्या अकलेचं प्रदर्शन मांडून हैराण करेल ते सांगताच येत नाही. मोबाईलवर जसे रोजचे तापमान दिसते  तसे जर समोरून बोलणाऱ्याची बौद्धिक पातळी दाखवणारा मोबाईल बाजारात आला ना तर तो कितीही महागडा असला ना तरी मी तो नक्कीच घेईन, कितीही महागडा असला तरी, त्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागलं तरी! कारण-
‘हॅलो, कोण हवंय?’ मी फोन कानाला लावत अत्यंत नम्रपणे विचारणा केली. एकतर वृत्तपत्रीय स्तंभलेखक त्यात विवाहित म्हणजे आवाजात नम्रता असणारच. संपादकांशी काय किंवा बायकोशी काय नम्रपणेच वागावं, बोलावं लागतं. टिकून राहायचं  असतं ना, वृत्तपत्रातही आणि घरातही!
‘तुमचा लेख वाचला. त्याच्या खाली तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला फोन केला. तुम्हीच बोलताय ना?’ तिकडून एका भसाड्या आवाजाच्या स्त्रीने विचारणा केली.
माझ्या नंबरवर फोन केल्यावर काय तुमच्याशी अमिताभ बच्चन बोलणार आहे का, असे विचारावे असे मनात आले होते, पण राग आवरला. ‘हो बोला ना मॅडम, मीच बोलतोय. कुठे वाचला आपण माझा लेख?’ नम्रता न सोडता मी बोललो.
आम्हा स्तंभलेखकांना नम्रता सोडून चालत नाही. समोर एखादा स्तुती करणारा वाचक असला तर? एखाद्या वर्तमानपत्राचे किंवा साप्ताहिकाचे संपादक असले आणि त्यांनी स्तंभलेखनासाठी फोन केला असला तर?
‘आमच्या ग्रुपवर टाकला होता कोणीतरी तिथे वाचला. मी नाही वाचत ती पांचट वर्तमानपत्रं. पण काहो, तुम्ही काय लिहिता ते तुम्हाला तरी कळतं का?’ भसाडा आवाज माझ्या नम्रतेचा खून पाडत माझ्या कानात घुसला.
‘नाही म्हणजे लिहितांना नाही कळलं ना तरी मेल टाईप करतांना कळतं थोडंफार की काय लिहिलं आहे आणि संपादकांनाही कळत असावं थोडंफार की काय लिहिलं आहे, त्याशिवाय का ते छापतात? शिवाय मानधन देतात ते मला लिहिण्याचं,  बदामाचा दाम मोजून कोणी चणे-फुटाणे घेतं का?’ मी आपली अल्प- स्वल्प विनोदबुद्धी वापरून वातावरणातला ताण थोडा हलका करण्याचा प्रयत्न केला.
‘उगाच स्वतःच्या आणि संपादकांच्या बुद्धीचं कौतुक सांगू नका. काय कळतं त्या संपादकांना? त्यांनाही रोज ८-१० पानं छापायची असतात मग छापतात तुमच्यासारख्यांचं काहीबाही.’ भसाड्या आवाजाचा रोष माझ्यावर होता की माझा लेख छापणाऱ्या  संपादकांवर होता याचा काही अंदाज येत नव्हता.
‘बाई,’ आता त्या आपल्या कर्मानेच मॅडमच्या बाई झाल्या होत्या आणि आपणच्या तुम्ही झाल्या होत्या. ‘तुम्ही माझ्यापेक्षा आणि माझा लेख छापणाऱ्या त्या संपादकांपेक्षाही जास्त बुद्धिमान आहात हे मी मान्य करतो.’ मी सपशेल शरणागती पत्करली. ‘अहो, मान्य करता म्हणजे काय, करावंच लागेल. तुम्ही आठवड्यातून एखादा लेख लिहिता म्हणून स्वतःला फार बुद्धिवान समजता का? आणि तो पेपराचा संपादक याचे त्याचे लेख छापतो म्हणजे तो फार हुशार झाला का?’ भसाड्या आवाजाने आता  मर्यादा सोडली होती.
‘ते असू द्या, पण तुम्ही काय करता हे सांगाल का मला?’ मला बाईंच्या बौद्धिक पातळीचा अंदाज घ्यायचा होता.
‘मी किनई आमच्या व्हाट्सएपच्या गृप मधली सगळ्यात ऍक्टिव्ह मेंबर आहे. दिवसभरात २०-२५ पोस्ट्स नक्की असतात माझ्या गृपवर.’ बाईंच्या बौद्धिक पातळीचा अंदाज आल्यामुळे मी सरळच विचारून घेतलं, ‘अच्छा, पण त्या लेखात माझं काय चुकलं ते सांगाल का?’
‘काय चुकलं म्हणून काय विचारता तोंड वर करून? आमच्या नेत्याला तुम्ही अपयशी कसं ठरवलं? बोला.’
‘बाई, तुमचे नेते अपयशी आहेत हे कळण्यासाठी वर्तमानपत्रं वाचावी लागतात. ती मी नियमितपणे वाचतो. नुसतं व्हाट्सएपच्या गृपवर दिवसभर चॅटींग करून नाही कळत ते आणि जर तुम्हाला माझा लेख चुकीचा वाटत असेल तर त्याचा प्रतिवाद  करणारा लेख तुम्ही त्याच वर्तमानपत्राकडे पाठवा. छापतील ते संपादक.’ ‘आहा, वर्तमानपत्र वाचून लिहिता म्हणजे दुसऱ्याच्या बुद्धीने चालता म्हणायचे. मी माझी बुद्धी वापरते. समजलं?’ माझा घाव बाईंच्या वर्मी लागला होता.
‘जगात काय चाललं आहे ते वर्तमानपत्र वाचल्याशिवाय कळण्यासाठी मला तर कोणतीही सिद्धी प्राप्त झालेली नाही. तुम्हाला झाली असल्यास माहीत नाही. असे असेल तर तुमच्या स्वयंभू बुद्धीला मी साष्टांग दंडवत घालतो. नाव कळेल का तुमचं?’  तिकडून फोन कट झाला. माझ्या फोनचा ट्रूकॉलर सुरू होता. मी सहज नाव पाहिलं. नाव होतं ‘सौ. गर्जना पोकळ, वैतागवाडी.’
* * *
 
- मुकुंद परदेशी, 
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८  

उधोजी राजे आपल्या महालात भिंतीवरील  घड्याळीकडे पाहत अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत आहेत. थोडा थकवा आला की मध्येच व्याघ्रासनावर बसून थोडी विश्रांती घेत आहेत. जरा वेळाने दारावरचा रोबोट येऊन दै. हमरीतुमरीचे संपादक  भेटायला आल्याची वर्दी देतो. पाठोपाठ संपादक महालात प्रवेश करतात. प्रवेश करताच ते उधोजीराजेंना कमरेत वाकून मुजरा करतात.
उ.रा. - (वैतागून दरडावत) एवढे लाचारासारखे काय वाकतायं आमच्या समोर? आम्ही काय राज्यपाल आहोत की काय?
संपादक - (मनातल्या मनात) सालं त्या बारामतीकरांसमोर तोंडातून शब्द फुटत नाही आणि आमच्यावर मात्र खेकसणार! (उघडपणे) त्यांच्या समोर नाईलाजाने वाकावं लागतं. आपल्या समोर कोणीही आदराने वाकतो. आपण देशातले सर्वोत्कृ ष्ट  मुख्यमंत्री आहात! ते कुठे सर्वोत्कृ ष्ट राज्यपाल आहेत? उधोजी राजे खांदे उडवत हसतात.
संपादक - (आश्चर्याने) आणि हे काय राजे, दारावरचा सेवक कुठे गेला? आणि हा रोबोट कसा आला?
उ.रा.- (संपादकांकडे जळजळीत कटाक्ष टाकत) तुम्ही आमच्याकडे घोड्यावर बसून आलात की कारने?
संपादक - (गोंधळून) मला लक्षात आलं नाही राजे.
उ.रा. - (चिडून) तुम्ही त्या तुमच्या ‘ठोकाठोक’ सदरात काय लिहिता ते लोकांना कळत नाही आणि आम्ही काय बोलतो ते तुम्हाला कळत नाही. अहो, इतकी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, तिचा वापर नको का करायला? अवश्य करायला हवा. का नको  करायला? आम्ही आता दारावरचा सेवक काढून तिथे रोबोट उभा केला आहे. हळूहळू सगळंच बदलून टाकणार आहोत आम्ही. 
संपादक - आपण खरंच ग्रेट आहात राजे.
उ.रा. - ते असू द्या, पण इतका उशीर कसा केला? त्या भिंतीवरच्या घड्याळीकडे बघून बघून मान दुखायला लागली आमची.
संपादक - राजे, आता भिंतीवरच्या घड्याळीकडे कशाला बघायचं? आता तर आपल्या हातावरच घड्याळ बांधलं गेलं आहे ना? आता त्याच्याकडेच पाहायचं. एकवेळ हाताकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण घड्याळीच्या शिस्तीने वागायचं म्हणजे सगळं  कसं व्यवस्थित पार पडेल.
उ.रा. - पुरे, पुरे. आम्हांला अक्कल शिकवू नका. त्या आमच्या मुलाखतीचं काय करता ते सांगा आधी?
संपादक - पूर्ण तयारी झाली आहे. मी प्रश्नोत्तरे लिहूनसुद्धा आणली आहेत. आपण एकदा वाचून घ्या म्हणजे आपण सुरुवात करू.
संपादक खिशातून एक कागद काढून उधोजीराजेंना देतात. उधोजीराजे त्या कागदावर नजर फिरवत असतांना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलू लागतात.
उ.रा. - आता तुमच्या जागेवरसुद्धा एखादा रोबोटच बसवावा लागेल असं वाटायला लागलं आहे.
संपादक - (ओशाळून) काही चुकलं का माझं?
उ.रा. - नाही तुमचं कसं चुकणार? आमचंच चुकलं तुम्हाला मुलाखत तयार करायला सांगून. अहो, हे काय लिहून आणलं आहे? काय विचारणार आहात तुम्ही? राज्याच्या अर्थव्य वस्थेची स्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योगक्षेत्राची परिस्थिती, छोट्या  व्यापाऱ्यांच्या अडचणी, बेरोजगारी, कोविडबाबतचे नियोजन? या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील ना तर त्या अजोय मेहतांची मुलाखत घ्या. मी काय सांगणार? सांगूच शकत नाही. किंबहुना मी तर म्हणीन की तुम्ही असलं काही मला  विचारायलाच  नको. हे सगळं तर रोज टीव्हीवर पाहतात ना लोक? आपणही परत तेच सांगायचं?
संपादक - (ओशाळून) खरंच चुकलं माझं. काय विचारू ते सांगाल का जरा?
उ.रा. - असं बघा, माझ्या अंगी किती गुण आहेत, माझा होमिओपॅथीचा किती अभ्यास आहे, मी किती नशीबवान आहे, मला भाषण देता येत नसलं तरी मी किती छान भाषण देतो आणि लोक टाळ्या वाजवतात, मी घरात बसून आधुनिक तंत्रज्ञानाचा  वापर करून कसा राज्यकारभार संभाळतोय, मी घरातच असतो तरी देशातला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री झालोय, उद्या जर मी खरोखरच काम करायला लागलो तर कदाचित जगातलासुद्धा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री बनेल! तीन महिन्यांनंतर मी पहिल्यांदाच केसं  कापलीत ना त्यामुळे समोरचे थोडे कमी झाल्यासारखे दिसतात. तीनचाकी रिक्षाचं स्टेअरिंग माझ्याच हातात आहे. अशा सर्व गोष्टी लोकांना नको का कळायला? कळायलाच हव्यात. किंबहुना त्यासाठीच तर आपल्याला मुलाखत घ्यायची आहे. उद्या या.  मी सर्व उत्तरं लिहून ठेवतो, मग तुम्ही प्रश्न तयार करून घ्या. समजलं? तसा माझ्यात भरपूर आत्मविश्वास आहे. तुम्ही ऐन वेळी काहीही विचारलं, माझ्यातल्या गुणांबद्दल तरी मी उत्तर देऊ शकतो.
संपादक - (मनातल्या मनात) तुमचा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात केव्हा दिसेल? 
उ.रा. - अरेच्चा, अजून ते एक राहिलंच की, मी कुठेही गेलो तरी माझ्या आई-वडिलांचा मुलगा म्हणून माझं स्वागतच होतं.
संपादक - (मनातल्या मनात) सांगे वडिलांची कीर्ती --- (उघडपणे) आलं लक्षात. येतो मी उद्या.
उ.रा. - (काहीतरी आठवून) अरे हो, आपल्या बारामतीकर साहेबांना विचारलं होतं का माझ्या मुलाखतीबद्दल?
संपादक - हो, ते म्हटले की, मुख्यमंत्र्यांची मुलाखत  तल्यामुळे जर करोना जाणार असेल तर घ्यायला
हरकत नाही.

-मकुंद परदेशी, मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

प्रति,
माननीय, आदरणीय, प्रातःस्मरणीय (हे आपलं लिहिण्यापूरतं झालं, तसं तर २४ तास तुमचंच स्मरण सुरू असतं.), तारणहार! (काही नतद्रष्ट म्हणतात की आम्ही सत्तेसाठी आमचा स्वाभिमान तुमच्याकडे तारण ठेवला आहे आणि तुम्ही त्याचं हरण केलं आहे. जाऊ द्या. आपण दुर्लक्ष करावं, त्या काँग्रेसवाल्यांकडे करतो तसं.)
तिर्थस्वरूप काकासाहेब बारामतीकर यांच्या चरणांशी
(खरं म्हणजे चरणकमळांशी असं लिहिणार होतो, पण उगाच आपला गैरसमज नको म्हणून टाळलं.) बालक उधोजीचा शिरसाष्टांग नमस्कार. पत्रास कारणे अनेक आहेत, पण थोडक्यात कैफियत मांडतो. खरं म्हणजे मी स्वतःच आपल्याला भेटून सर्व सांगणार होतो, पण लगेच त्याची ‘ब्रेकींग न्युज' झाली असती. आता मी घरातच बसतो हे सर्वांनाच माहिती आहे. एकदा त्याची बातमीही झाली आहे. परत परत ती बातमी होऊ शकत नाही. उगाच आपण घरातून बाहेर पडा आणि त्यांना आयती बातमी द्या, असं होऊ नये म्हणून हा पत्र प्रपंच.
परवा ती राजा मानसिंग बनावट चकमक प्रकरणी अकरा पोलिसांना जन्मठेप झाल्याची बातमी वाचली आणि अंगाचा थरकाप उडाला. पोलीस राजाचाही फेक एन्काऊंटर करू शकतात? ताबडतोब आमच्या दैनिक हमरीतुमरीच्या संपादकांना बोलावून घेतलं. ते पूर्वी कुठेशी तरी क्राइम रिपोर्टर होते ना, त्यामुळे त्यांना पोलीस डिपार्टमेंटची बरीचशी माहिती आहे. त्यांनीही  सांगितलं की गृहमंत्र्यांनी इशारा केला की डिपार्टमेंटवाले कोणाचाही गेम करू शकतात! ते बदल्या रद्द प्रकरण फार सिरियसली घेऊ नये असं आपण आपल्या गृहमंत्र्यांना सांगाल का? हवं तर आपण त्यांना आयएएसच्या बदल्यांचेसुद्धा अधिकार देऊन टाकू. बाळासाहेब तसे आपल्या (म्हणजे माझ्या नव्हे, तुमच्या) ऐकण्यातले आहेत. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
परवा देवा नानांचा वाढदिवस होता. मी ट्विटरवर मुद्दामच ते मुख्यमंत्री असतांनाचा आमचा दोघांचा जुना फोटो टाकून शुभेच्छा दिल्या. त्यामागे त्यांना
अप्रत्यक्षपणे ते आता फक्त फोटोतलेच मुख्यमंत्री राहिले आहेत हे दाखविण्याचा उद्देश होता, पण त्यांनी ताबडतोब उत्तर पाठविले की तुम्ही टाकलेल्या फोटोतली परिस्थिती लवकरच प्रत्यक्षात येणार आहे म्हणून. हा माणूस असा नेहमी मला का घाबरवत असतो काय माहीत?मला तर या माणसाचा अजिबात भरवसा वाटत नाही. आपण दादांवर लक्ष असू द्यावे. दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असावा हा योगायोग कसा वाटतो? दादांशी सलगी करण्यासाठी देवा नानांनी आपली जन्म तारीख तर बदलून घेतली नसावी? आमच्या संपादकांना तपास करायला सांगतो. बाकी आपण समर्थ आहातच. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
शेवटला आणि थोडा नाजूक मुद्दा म्हणजे येत्या पाच ऑगस्टला अयोध्येला जावं म्हणतोय. तुमच्या सूनबाईंनी तर बॅगाही भरून
ठेवल्या आहेत. आपण मोठ्या मनाने परवानगी द्याल याची खात्री आहे. सुरवातीपासूनच आमच्या पिताश्रींनी राम मंदिराचा प्रश्न लावून धरला होता हे आपण जाणताच. मी जर त्या
कार्यक्रमाला गेलो नाही तर त्यांचा आत्मा नक्कीच दुखावेल. आता सहा आठ महिन्यांपूर्वीच असंगाशी संग करून त्यांचा आत्मा दुखावला होता. आता परत परत त्यांच्या आत्म्याला क्लेश नको म्हणून जावं म्हणतोय. श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो की तिथला कार्यक्रम आटोपला की कोणालाही भेटणार नाही. सरळ घरी परत येईन. आपल्याशी दगाफटका करणार नाही.
लपवाछपवी आपल्याला आवडत नाही. आपलं जे असतं ते उघड उघड असतं. हवं तर बाळ राजेंना आपल्यापाशी ठेऊन जातो. समय कठीण आला आहे. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
आपला आज्ञाधारक
उधोजी बांद्रेकर

-मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र.: ७८७५०७७७२८

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget