Halloween Costume ideas 2015
Articles by "दर्पण"

प्रेरणादायी सत्यकथा

हातिम तायीचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. हातिम हे काही काल्पनिक व्यक्तिमत्त्व नसून एक सत्य आणि खरेखुरे व्यक्तिमत्त्व आहे. सिनेमात दाखवल्याप्रमाणे हातिम हा काही प्रश्नांची उत्तरे शोधत फिरला नाही, तर हातिम हा तायी नावाच्या एका कबिल्याचा सरदार होता. तो फार दानशूर होता. त्याचे दानत्व फार प्रसिद्ध होते. त्याचा एक मुलगा होता त्याचे नाव आदि होते. हातिम तायीच्या मृत्यूनंतर आदि हा कबिल्याचा सरदार बनला.

आपल्या वडिलांप्रमाणेच तो कबिल्याचा कारभार चालवू लागला. परंतु त्याच काळात एक नवीन शत्रू निर्माण झाला. त्या शत्रूने आदि ज्या भूभागावर राहत होता, त्याच्या आजूबाजूला असलेल्या अनेक कबिल्यांशी युद्ध करून ते आपल्या ताब्यात घेतले होते. अनेक कबिले त्या शत्रूच्या ताब्यात गेलेले पाहून आदिला फार चिंता वाटत होती. त्याला असे वाटत होते की निश्चितच पुढचा नंबर आपला आहे. एक गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आली होती की, आपले सैन्य, आपल्याकडे असलेली ताकद ही फार कमी आहे आणि आपण त्या शत्रूचा मुकाबला करू शकणार नाहीत. या नवीन शत्रूपासून कसा बचाव करावा, याविषयी तो सतत विचार करत होता. त्यासाठी त्याने सीरिया येथील आपल्या मित्राची मदत घ्यायचे ठरविले.

शत्रूविषयी त्याच्या मनात फार चिड होती. त्याने शत्रू पाहिला तर नव्हता फक्त त्याच्याविषयी ऐकले होते. हा शत्रू फार शक्तिशाली असून क्रूर आहे. आजपर्यंत कोणीही त्याला पराभूत करू शकला नाही. आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला नेस्तनाबूत करून टाकतो. अशी त्याची धारणा बनली होती तेव्हा. शत्रूविषयी लोकांना तो जागृत करत होता.

एके दिवशी अचानक त्याला समजले की शत्रूसैन्याने त्याच्या कबिल्यावर हल्ला केला आहे. आपण या शत्रूचा मुकाबला करू शकत नाही. आपण मित्रांची मदत मिळवावी या हेतूने त्याने तेथून पलायन केले आणि सीरियाला जाऊन पोहोचला. या घाईगडबडीत त्याने फक्त आपली पत्नी-मुले यांना सोबत घेतले. स्वतःची बहीण देखील कबिल्यामध्ये सोडून तो निघून गेला होता. शत्रू सैन्याला जेव्हा कळाले की आदि हा कबिला सोडून पळून गेला आहे आणि त्याची बहीण मात्र कबिल्यातच राहिली आहे. शत्रूंनी तिला अटक केली आणि आपल्या सरदाराकडे घेऊन गेले.

आदिला जेव्हा हे कळले की, त्याची बहीण कैद करण्यात आलेली आहे; तेव्हा त्याला बहिणीची खूप चिंता वाटत होती. आपल्या बहिणीला कसे सोडवावे याविषयी तो विचार करत होता. एके दिवशी मात्र असे झाले की, आदिची बहीण एका काफिल्यासह सुरक्षित सीरियाला येऊन पोहोचली. आपल्या बहिणीला सुरक्षित पाहून आदिला फार आनंद झाला. परंतु आश्चर्यही वाटत होतं की कोणताही मोबदला न घेता किंवा कोणत्याही अटी शरती न लावता कशी काय मुक्तता केली? याविषयी जाणून घेण्याची त्याची उत्सुकता वाढली होती.

शत्रूविषयी बहिणीने मात्र जी हकीगत सांगितली ती ऐकून आदिला आश्चर्याचा धक्काच बसला. बहीण अगोदर आपल्या भावावर रागावली की, तू मला सोडून पळून आलास. नंतर मग राग कमी झाल्यावर तिने सांगितले की ज्या शत्रूला तू वाईट समजून पळून आला होता, ज्याच्याविषयी तू नानाविध गोष्टी सांगत होता आणि त्याची बदनामी करत होता, तो सरदार तर फारच दयाळू नि कृपाळू निघाला. त्याने मला फार सन्मानपूर्वक आपल्या घरी ठेवले आणि एका सुरक्षित काफिल्यासोबत मला इथे परत पाठवून दिले. तू एकदा त्या सरदाराशी भेट. निश्चितच तुझे मत बदलेल आणि त्यांच्याशी शत्रुत्व ठेवण्याऐवजी तू त्याच्याशी मैत्री करशील, असा माझा विश्वास आहे. बहिणीच्या बोलण्याने आदिला विचार करायला भाग पाडले. अशा माणसाला भेटण्याची, स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली.

खूप विचार करून आदि शत्रूच्या सरदाराला भेटण्यासाठी निघाला. काही दिवसांनी सरदार आदि आपल्या साथीदारांसह शत्रू सरदाराच्या हद्दीत पोहोचला. तिथल्या लोकांनी आदिला ओळखले आणि आश्चर्याने ओरडले: अहो, हा आदि बिन हातिम आहे. पण कोणीही त्याला अडवले नाही की त्याला छेडले नाही.

आदिला, सरदाराला भेटण्यासाठी सांगण्यात आले. आदि विचार करत राहिला की, माझ्यासोबत कसा व्यवहार केला जाईल. पराभूत सरदाराप्रमाणे अपमानित केले जाईल की टोळीचा प्रमुख म्हणून सन्मान केला जाईल. विचारात हरवून तो मशिदीत पोहोचला. त्याने सरदाराला अभिवादन केले. सरदाराने त्याच्या अभिवादनाला चांगल्या पद्धतीने उत्तर दिले आणि विचारले, "तू कोण आहेस?"

तो घाबरून म्हणाला,  "आदि बिन हातिम तायी".

"अच्छा तर, तू आदि बिन हातिम तायी आहेस!"

त्याचे नाव ऐकून आनंद व्यक्त करत आदिचा हात आपल्या हातात घेऊन सरदार घराकडे निघाला.

या वागण्याने आदिला धक्काच बसला. पराभूत सरदाराला इतकी सन्मानजनक वागणूक! वाटेत एका गरीब वृद्ध महिलेने त्यांचा रस्ता अडवला, तिच्यासोबत एक लहान मूल होते. तिने आर्थिक मदत मागितली. सरदाराने लगेच आपल्या खिशात हात घातला, जे काही रक्कम खिश्यात होती ती त्या महिलेला देऊन टाकली. हे दृश्यही आदिसाठी उल्लेखनीय होते. तो विचार करू लागला की, ही व्यक्ती राजा होऊ शकत नाही, अन्यथा सामान्य माणसाने इतके धाडस केले नसते. घरी पोहोचल्यावर आदिचे आश्चर्य आणखी वाढले, हे घर एक साधारण घर होते ज्यात बसण्यासाठी एकच जागा होती, त्यावर उशी होती. त्यावर आदिला बसायला सांगितल्यावर तो म्हणाला, "मी नाही बसणार, आपण बसावे." पण हुकूम आल्यावर त्याला बसावे लागले. यजमान त्याच्यासमोर जमिनीवर बसले. आदिची खात्री पटली की हे अस्तित्व सामान्य अस्तित्व नाही, या अस्तित्वाशी द्वेष नाही तर प्रेम केले पाहिजे. ते अस्तित्व होते प्रेषित मुहम्मद (स.) यांचे! आदि म्हणाला, "हे मुहम्मद (स.), मी हे मान्य करतो की आपण अल्लाहचे दूत आहात." प्रेषित आदिवर खूप खूश झाले आणि त्यांनी आदिला त्याच्या काबिल्याचा अमीर घोषित केले.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065851


प्रेरणादायी सत्यकथा

हजरत जैद (र.) हे बनू कलब जमातीतील, हारेसा बिन शरजीलचे पुत्र होते. ते फक्त आठ वर्षांचे असताना, आपल्या आईसोबत प्रवासाला निघाले होते, तेव्हा वाटेत बनी खैन जमातीच्या लोकांनी हल्ला करून लूटमार केली आणि हजरत जैद (र.) सह काही लोकांना ताब्यात घेतले. हजरत जैद (र.) यांना अकाजच्या बाजारात गुलाम म्हणून, हकीम बिन हिजामच्या हाती विकण्यात आले.

त्याने या गुलामाला मक्केत आणले आणि आपली आत्या हजरत खदीजा (र.) यांच्या स्वाधीन केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांना हजरत जैद (र.) यांच्या सवयी आणि वागणूक इतकी आवडली की त्यांनी त्याला हजरत खदीजाकडून मागून घेतले. अशा प्रकारे हजरत जैद प्रेषितांच्या सानिध्यात आले.

दुसरीकडे, हजरत जैद (र.) यांचे कुटुंबीय त्यांच्या अपहरणाचा शोक करीत होते. त्यांच्या शोधात त्यांच्या वडिलांनी जंग-जंग पछाडले परंतु, त्यांचा पत्ता लागत नव्हता. त्यातच बनी कलबचे काही लोक हजच्या उद्देशाने मक्केत आले आणि त्यांनी हजरत जैदला ओळखले. अशा प्रकारे हजरत जैद यांच्या कुटुंबीयांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली.

माहिती मिळताच हजरत जैद (र.) यांचे वडील हारेसा, काका कआब आणि भाऊ यांनी मक्का शहर गाठले. जैेद (र.), पवित्र प्रेषितांचे सेवेकरी म्हणून त्यांच्या सान्निध्यात असल्याचे त्यांना समजले. ते सर्व प्रेषितांच्या समोर हजर झाले आणि हवी ती रक्कम घेऊन जैेदला आमच्या स्वाधीन करावे अशी विनंती केली. प्रेषित (स.) म्हणाले: 'मी मुलाला बोलावतो आणि त्याच्या इच्छेवर सोडतो की त्याला माझ्याबरोबर राहणे आवडते की तुमच्यासोबत जायचे आहे. जर त्याला तुम्हा लोकांसोबत जायचे असेल तर मी त्याला कोणत्याही मोबदल्याशिवाय तुमच्या स्वाधीन करीन.'

हे ऐकून त्या लोकांना खूप आनंद झाला. हजरत जैद (र.) यांना बोलावले गेले. त्यांचे वडील व काका यांच्यासमोर त्यांना विचारण्यात आले की, वडिलांसोबत जायचे की प्रेषितांकडे राहायचे?

हजरत जैद यांनी उत्तर दिले, "मी प्रेषितांपेक्षा कोणालाही प्राधान्य देऊ शकत नाही, मग ते कोणीही असो, माझे वडील का असेनात."

हे ऐकून हारेसा खूप व्यथित झाले आणि म्हणाले, "जैद, हे किती खेदजनक आहे की, तू स्वातंत्र्यापेक्षा गुलामगिरीला प्राधान्य देतोस आणि आपल्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला सोडून परक्यांसोबत राहायला पसंत करतोस."

हजरत जैदने उत्तर दिले की, "माझ्या डोळ्यांनी प्रेषितांच्या व्यक्तित्त्वात जे पाहिले आहे, त्यानंतर माझ्यासाठी हे जग आणि जगातली प्रत्येक गोष्ट अगदी तुच्छ आहे. मला यांची गुलामी पसंत आहे!"

आठ-दहा वर्षांचा मुलगा आपल्या कुटुंबाला सोडून एका परक्या व्यक्तीबरोबर राहायला प्राधान्य देत आहे, हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. आपल्या मुलाला प्रेषितांसोबत समाधानी पाहून हजरत जैदचे वडील आणि काका आनंदाने राजी झाले.

त्याच वेळी प्रेषित (स.) हजरत जैदला घेऊन काबागृहात गेले आणि घोषणा केली की सर्व जण साक्षी राहा, आजपासून जैद माझा मुलगा आहे. त्याला माझ्याकडून वारसा मिळेल.

हे ऐकून हारेसाला आणखीनच आनंद झाला. हारेस आणि काका दोघेही तृप्त होऊन परत गेले.

पुढे जेव्हा प्रेषितांनी इस्लामची घोषणा केली, त्या वेळी पैगंबराच्या घोषणेने पैगंबरांची पत्नी हजरत खदीजा (र.), हजरत अली (र.) ( प्रेषितांचे चुलत भाऊ) प्रेषितांचे मित्र हजरत अबू बकर सिद्दीक (र.) आणि त्यांच्यासोबत हजरत जैद (र.) यांनीही इस्लामचा स्वीकार केला आणि ते चार प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक झाले ज्यांनी प्रथम इस्लामचा स्वीकार केला.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

(प्रेरणादायी सत्यकथा)

इराणमधील 'अस्फहान' शहराजवळ असलेल्या 'रोजबा' या गावात 'माबा'चा जन्म झाला. माबा दिसायला खूपच सुंदर होता. त्याचे वडील त्याचा खूपच लाड करायचे. मुलींप्रमाणे त्याला नटवायचे, मुलीसारखं जपायचे. घराबाहेरही जास्त पडू द्यायचे नाहीत. 

माबा, हा अग्निपूजक होता पण त्याच्या हृदयात एक चेतना होती, जी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याला वाटायचे की आपण स्वतःच पेटवलेला हा अग्नी कधीच आपला देव होऊ शकत नाही. त्याचे वडील बोजख्शान हेदेखील एक महान अग्निपूजक होते.

एके दिवशी ते माबाला म्हणाले, "आज मी शेतात जाऊ शकणार नाही, त्यामुळे आज शेताची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी आहे."

त्या वेळेस माबा दहा बरा वर्षांचा होता. शेतात जाताना तो ख्रिश्चनांच्या चर्चमधे गेला. ख्रिश्चनांच्या उपासनेच्या पद्धतीमुळे प्रभावित झाला आणि त्याच दिवशी त्याने आपला मूळ धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ही बाब त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी त्याला घरात कैद केले. काही दिवसांनी बापाच्या कैदेतून कसातरी बाहेर पडून माबा सीरियाला जाणाऱ्या ताफ्यात सामील झाला. इथून सत्याच्या शोधाचा त्याचा प्रवास सुरू झाला. तो गावोगावी, देशोदेशी भरकटत राहिला. सीरियापासून मोसुल (इराक), तिथून नुसयबिन (तुर्की) आणि नंतर 'अमुरिया'पर्यंत भटकला.

अमुरियाला पोहोचल्यावर तो तिथल्या धर्मगुरूच्या सेवेत राहू लागला. जेव्हा या धर्मगुरूच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा त्यांनी माबाला बोलावले आणि म्हणाले, "माझ्या मुला! आता मी, हे जग सोडत आहे. आता शेवटच्या काळातील पैगंबराच्या उदयाची वेळ जवळ आली आहे, जो अरेबियाच्या वाळवंटातून उठेल. तो सत्यधर्म पुनरुज्जीवित करेल आणि अशा भूमीत स्थलांतर करेल जिथे भरपूर खजूर असतील. त्याच्या दोन खांद्यांच्या मधोमध पाठीवर प्रेषित्वाची मोहोर असेल. तो त्याला अर्पण केलेल्या बाबींचा स्वीकार करेल पण दानधर्म म्हणून दिलेल्या गोष्टी इतरांना देईन, स्वतःसाठी अवैध मानेल. जेव्हा तुला या पवित्र पैगंबराचे दर्शन होतील, तेव्हा तू त्यांच्या सेवेत अवश्य उपस्थित राहावे."

या धर्मगुरूंच्या मृत्यूनंतर माबा हिजाजला जाण्यासाठी काफिला शोधू लागला. शोध पूर्ण झाला आणि बनू कलब जमातीचा एक काफिला अमुरियामधून निघाला. माबा या काफिल्यात सामील झाला, पण वाटेत काफिल्यावाल्यांचे इरादे बदलले आणि जेव्हा हा काफिला 'वादी-अल-कुरी'ला पोहोचला तेव्हा त्यांनी माबाला ज्यू लोकांच्या हाती विकले. कदाचित हेच आपले भाग्य म्हणून, माबा त्या ज्यू माणसाचा गुलाम म्हणून राहू लागला.

पण असे असतानाही त्याच्यातील सत्याच्या शोधाची चेतना छातीत तेवत राहिली. एके दिवशी, ज्यूचा एक नातेवाईक जो यसरब (मदीनाचा रहिवासी) होता. त्याला भेटायला आला. त्याला एका गुलामाची गरज होती. त्याने माबाला मालकाकडून विकत घेतले आणि यसरबला आणले. माबाने इथे खजुराची झाडे पाहिली. उंटांचे कळप पाहिले तेव्हा त्याला समजले की, आता आपला शोध संपणार.

एके दिवशी माबा झाडावर काम करत असताना, शहरातून एक ज्यू धावत आला आणि म्हणाला, "मी ऐकले की, खुबा वस्ती मध्ये एक व्यक्ती आला आहे, तो स्वतःला प्रेषित संबोधित आहे, सर्व लोक त्याच्या भोवती गोळा होत आहेत."

हे ऐकून माबा अस्वस्थ मन:स्थितीत झाडावरून खाली आला आणि त्या व्यक्तीला म्हणाला, "तू काय म्हणालास? पुन्हा सांग."

त्याच्या मालकाला खूप राग आला आणि त्याने माबाला थप्पड मारली आणि सांगितले की, "तू जा आणि तुझे काम कर."

त्यावेळी माबा गप्प बसला, पण एके दिवशी तो काही खाद्यपदार्थ घेऊन प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे आला आणि त्यांना त्या वस्तू दान म्हणून दिल्या. प्रेषित (स.) यांनी त्या गोष्टी आपल्या साथीदरांमध्ये वाटून टाकल्या. स्वतः काहीच घेतले नाही.

दुसऱ्या दिवशी माबा पुन्हा काही खाद्यपदार्थ घेऊन आला आणि पैगंबरांच्या सेवेत भेट म्हणून अर्पण केले. पैगंबरांनी स्वतःही ते खाद्यपदार्थ खाल्ले आणि साथीदारांमध्येही वाटले. माबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता, कारण शेवटच्या पैगंबरांविषयी सांगितलेली दोन चिन्हे पूर्ण झाली होती, आता शेवटचे चिन्ह म्हणजे पैगंबराची मोहोर पाहणे बाकी होते.

काही दिवसांनी माबाला कळाले की, पवित्र प्रेषित (स.) एक अंत्ययात्रा घेऊन बकी गरखद येथे गेले आहेत. माबाही तेथे पोहोचला. प्रेषितांना अभिवादन करून त्यांच्या मागे उभे राहिला. प्रेशितत्वाची मोहोर पाहण्याचा प्रयत्न करू लागला. पैगंबरांनी त्याची अवस्था ओळखून पाठीवरून कापड सरकवले. तिसरी खूणही दिसली. माबाचा सत्याचा शोध आता संपला होता.

माबा हा प्रेषितांचा अनुयायी बनला. आता तो माबा न राहता सलमान फारसी (र.) म्हणून ओळखला जाऊ लागला. पैगंबरांनी त्यांना ज्यूच्या गुलामगिरीतून मुक्त केले. ते पैगंबरांसोबत राहू लागले. ते एक उत्तम साथीदार बनले.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

 (खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)

मुल्ला नसरुद्दीनचे असंख्य किस्से, आपण वाचले असतील पण बहुत्तेक लोकांना हे माहित नसेल की, मुल्ला नसरुद्दीन हे काल्पनिक पात्र नसून खरे पात्र होते. त्यांचा जन्म 1208 साली तुर्कस्तानच्या 'हशार' प्रांतात असलेल्या "हुरतू" नावाच्या गावात झाला.

मुल्ला नसरुद्दीन हे त्यांच्या विनोदी प्रतिवादासाठी आणि हजरजबाबीसाठी प्रसिद्ध होते. आज मुल्लाचे विनोद जगाच्या विविध भागांमध्ये पोहचले आहेत. त्यांची कीर्ती तुर्कीपासून जगातील विविध देशांमध्ये पसरली.

त्यांच्याशी संबंधित काही रंजक आणि मजेशीर घटना खाली देत ​​आहे.

----------

"तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार की गाढवावर?"

एकदा मुल्ला नसरुद्दीनआपल्या घराच्या अंगणात बसले होते. त्यांचा एक मित्र आला आणि त्याने विचारले की, 'मुल्ला, मला काही महत्त्वाच्या कामासाठी जवळच्या गावात जायचे आहे, काही सामानही घेऊन जायचे आहे, कृपया मला गाढव द्या, मी जाऊन संध्याकाळी परत येईन.' 

मुल्लाला आपल्या मित्राला गाढव द्यायचे नसल्याने, गाढव घरी नाही कोणीतरी गाढव घेवून गेल्याचे सांगितले. इतक्यात घराच्या मागून गाढवाच्या ओरडण्याचा आवाज आला. मित्र म्हणाला, "गाढव तर इथेच दिसतोय!"

मुल्लाने उत्तरात विचारले की, "तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार की, गाढवावर?"

-------------

मुल्ला नसरुद्दीनचा सल्ला

एकदा मुल्ला नसरुद्दीनला एका मेळाव्यात जबरदस्तीने स्टेजवर बोलावले आणि काही सल्ला देण्यास सांगितले गेले. मुल्ला नसरुद्दीन स्टेजवर आले आणि श्रोत्यांना विचारले, "तुम्हाला माहित आहे का मी काय बोलणार आहे?"

लोक म्हणाले, "नाही."

मुल्ला म्हणाले, "तुम्हाला माहीत नसताना सांगून काय उपयोग."

काही दिवसांनी मुल्लाला पुन्हा एका मेळाव्यात पकडण्यात आले आणि त्यांना सल्ला देण्याची विनवणी करण्यात आली. मुल्लाने तोच जुना प्रश्‍न पुन्हा विचारला, "तुम्हाला माहित आहे का मी काय बोलणार आहे?"

मागच्या वेळचा अनुभव लक्षात घेवून सर्वांनी उत्तर दिले, “हो.” 

मुल्ला म्हणाले, “जेव्हा तुम्हाला माहीत आहे की, मी काय सांगणार आहे तर सांगायची गरज काय?"

तिसर्‍यांदा पुन्हा मुल्लाला, सल्ला द्यायला सांगितले. मुल्लाने त्यांच्या प्रश्नाची पुनरावृत्ती केली. सुज्ञपणे, निम्म्या श्रोत्यांनी नकारात्मक आणि निम्म्या श्रोत्यांनी होकारार्थी प्रतिसाद दिला. मुल्ला म्हणाले, "ज्यांना मी काय सांगणार आहे हे माहीत आहे, त्यांनी ज्यांना माहीत नाही त्यांना ते सांगावे."

एवढे बोलून ते स्टेजवरून खाली उतरले.

----------------

पत्र वाचा

एक अशिक्षित जमीनदार पत्र घेऊन 

मुल्ला नसरुद्दीन यांच्याकडे आला. मुल्लाने मोठी पगडी घातली होती. त्याकाळी पगडी हे विद्वानांचे लक्षण मानले जात असे. जमीनदाराने मुल्लाला पत्र वाचायला सांगितले.

मुल्ला म्हणाले, "मी ते पत्र वाचू शकत नाही."

जमीनदार म्हणाला, "आपण एवढी मोठी पगडी घातली आहे आणि आपल्याला पत्र वाचता येत नाही!" 

मुल्लाने ताबडतोब डोक्यावरून पगडी काढून जमीनदाराच्या डोक्यावर ठेवली आणि म्हणाले, "आता पगडी तुमच्या डोक्यावर आहे, तुमचे पत्र स्वतः वाचा."

-----------------

बकरीचे मांस

एके दिवशी मुल्ला नसरुद्दीनने बकरीचे मांस आणले आणि आपल्या पत्नीला ते लवकर शिजवण्यास सांगून बाहेर गेले. त्याच दरम्यान पत्नीच्या दोन मैत्रिणी आल्या. मुलाच्या पत्नीने त्यांना जेवू घातले आणि स्वतः तिनेही मांस खाल्ले. त्यात सर्व मांस संपले.

मुल्लाजी परत आल्यावर पत्नीने त्यांच्यासमोर डाळ आणून ठेवली. मुल्लाजीने विचारले, "मी आणलेल्या मांसाचे काय झाले?"

पत्नीने उत्तर दिले, "ते मांस मांजरीने खाल्ले." मुल्लाजींनी लगेच स्वयंपाकघरातून तराजू आणून मांजर पकडले. मांजरीचे वजन केले. मांजरीचे वजन अर्धा किलो भरले. 

मुल्लाजी म्हणाले, "हे विचित्रच आहे, मांस अर्धा किलो होते. जर हे मांजर अर्धा किलो आहे तर मग मांसाचे काय झाले? आणि जर हे मांस असेल तर मग मांजरीचे काय झाले."

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)

समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय सांगण्यात चार इमाम खूप प्रसिद्ध आहेत. इमाम मालिक रह., इमाम अल-अबू हनीफा रह., इमाम शाफी रह. आणि इमाम अहमद बिन हंबल रह..

या इमामांपैकी इमाम अबू हनीफा न्यायशास्त्रात फार पारंगत होते. तो काळ खलीफा मन्सूरचा काळ होता. इमाम अबू हनीफा रह. खलीफाशी खूश नव्हते.

खलीफा मन्सूरने इमाम साहेबांची कीर्ती ऐकली होती. ते खूप ज्ञानी आणि धर्मनिष्ठ आहेत हेही त्याला समजले. त्याने इमाम साहेबांना देशभरातील काझींचा अधिकारी बनवायचे ठरवले. (जसे आजकाल सरन्यायाधीश आहेत) त्याने इमाम साहेबांना बोलावले आणि सांगितले की, "माझी इच्छा आहे की, तुम्हाला सरन्यायाधीश बनवावे." 

इमाम साहेब त्याच्यावर नाराज होते. त्यांना भीतीही वाटत होती की, जर मी नकार दिला तर हा खलीफा मला देहदंड देईल. ते खलीफाला म्हणाले, "मी न्यायाधीश होण्यास योग्य नाही."

हे उत्तर ऐकून खलीफा म्हणाला, "मला माहीत आहे की तुम्ही न्यायाधीश होण्यास योग्य आहात. मग खोटं का बोलत आहात?"

इमाम साहेब पटकन म्हणाले, "मी खोटं बोललो, याचा अर्थ मी खोटारडा आहे आणि खोटं बोलणाऱ्याला न्यायाधीश बनवता येत नाही." इमाम साहेबांचे बोलणे ऐकून खलीफा मन्सूर शांत झाला आणि इमाम साहेब त्याच्या तावडीतून निसटले.

----------------------

टोपी

एकदा हजरत अली (र.) वुजू करत असताना, हजरत उमर (र.) यांनी गंमत म्हणून त्यांच्या डोक्यावरून टोपी काढून एका उंच जागी टांगली.

वुजू केल्यानंतर हजरत अली (र.) गेले आणि टोपी काढण्याचा प्रयत्न केला आदरणीय अली (र.), आदरणीय उमर (र.) पेक्षा उंचीला तुलनेने कमी होते, त्यामुळे टोपीपर्यंत त्यांचे हात पोहोचू शकले नाहीत. खूप प्रयत्न केले पण निष्फळ ठरले. 

त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली. हजरत उमर (र.) जेव्हा वुजू करायला बसले तेव्हा त्यांनी उमर (र.) यांच्या डोक्यावरून टोपी काढून टाकली आणि एका झाडाचं जड खोड होतं त्याखाली टोपी ठेवली.

हजरत उमरने वुजू केला आणि जाऊन खोडाखालची टोपी काढण्याचा प्रयत्न केला. पुरेशी ताकद लावली पण खोड काही हलले नाही. हजरत उमर (र.) हे हजरत अली पेक्षा ताकदीच्या बाबतीत तुलनेने कमी होते. त्यामुळे जे खोड अली यांनी सहज उचलून त्याखाली टोपी ठेवली ते खोड उमर (र.) यांना उचलता आले नाही.

शेवटी आदरणीय उमर (र.), हजरत अली यांना (र.) म्हणाले, "ठीक आहे भाऊ मी तुझी टोपी काढून देतो, तू माझी टोपी काढून दे!"

---------------------------


खजुराच्या बिया

एक प्रसिद्ध आणि गमतीदार घटना आहे. अनेक साथीदार पवित्र प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासोबत फलाहार घेत बसले होते. खजूर खाल्ल्यानंतर प्रेषित (स.) यांनी बी हजरत अली यांच्यासमोर फेकली.

सर्वच साथीदार खजूर खाल्ल्यानंतर बिया अली (र.) समोर फेकू लागले. मग झालं असं की, थोड्याच वेळात हजरत अली (र.) यांच्यासमोर बियांचा ढीग जमा झाला. जेव्हा खाणे संपले तेव्हा एक साथीदार गंमतीने हजरत अली (र.) यांना म्हणाला, "अली (र.), तुम्हाला जास्त भूक लागली होती. तुम्ही सर्वांत जास्त खजूर खाल्ल्या. बघा तुमच्यासमोर बियांचा किती ढीग जमा झालाय."

अली (र.) यांच्या लक्षात आले. ते हसले आणि म्हणाले, "कदाचित तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त भूक लागली असेल, कारण मी िबया सोडल्या आणि तुम्ही बियांसमवेत खजूर खाल्ले असावेत!"

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)

हजरत इमाम हुसैन (र.) हे पैगंबर  मुहम्मद (स.) यांचे लाडके नातू होते. त्यांच्या वडिलांचे नाव हजरत अली (र.) आणि आईचे नाव हजरत फातिमा (र.) होते. एके दिवशी हजरत हुसैन (र.) जेवत असताना त्यांचा दास, सरीद घेऊन आला. भाकरीचे तुकडे करून भाजीच्या रस्स्यमध्ये भिजवतात यालाच अरबीमध्ये सरीद म्हणतात.

दास सरीद वाढत होता, तेव्हा काही सरीद हजरत हुसैन (र.) यांच्यावर पडला. त्यांनी दासाकडे पाहिले, दास घाबरला पण तो फार ज्ञानी होता. त्याला या गोष्टीची जाणीव होती की, या वेळी जर मी अल्लाह आणि त्याचे प्रेषित यांचा उल्लेख केला तर इमाम साहेब काहीही बोलणार नाहीत. तो लगेच म्हणाला, "कुरआनात असे आहे की, अल्लाहचे चांगले सेवक तेच आहेत जे राग गिळून टाकतात."

हजरत इमाम हुसैन (र.) यांनी उत्तर दिले, "मी माझा राग गिळून घेतला." दास म्हणाला, "यानंतर असे आहे की, अल्लाहचे भय बाळगणारे सद्वर्तनी लोक, लोकांना क्षमा करतात." हजरत इमाम हुसैन (र.) म्हणाले, "मी तुला क्षमा केली." तेव्हा दास म्हणाला, "त्यानंतर आहे, अल्लाह परोपकारी लोकांवर प्रेम करतो." हजरत इमाम हुसैन (र.) म्हणाले, "जा, मी तुला मुक्त केले आहे." दास खूप खूश झाला आणि अल्लाह दरबारी इमाम हुसैन (र.) यांच्यासाठी प्रार्थना करू लागला.


उपकारकर्ते

हज्जाज एक अतिशय शक्तिशाली शासक होऊन गेला. तो क्रूर म्हणून प्रसिद्ध होता. खूप रागीट आणि हट्टीही होता. परंतु जेव्हा केंव्हा कोणी त्याला काहीतरी सभ्य आणि मजेदार बोलले तेंव्हा त्याचा हट्टही गेला आणि त्याचा रागही निघून गेला आणि त्याने क्रूरता सोडली.

एकदा असे घडले की, एका व्यक्तीला त्याच्यासमोर देहदंड देण्यासाठी आणले गेले. त्या वेळी हज्जाज जेवण करत होता.

तो त्या माणसाला म्हणाला, "पालनकर्त्याची शपथ, तुला मारल्याशिवाय मी हे अन्न खाणार नाही." असे म्हणत मारायला उठला.

हज्जाजचा स्वभाव सर्वांना माहीत होता. त्याने जे ठरवले ते करूनच दम घ्यायचा. सर्वांना वाटले आता क्षणातच हज्जाज या माणसाचे डोके शरीरापासून वेगळे करणार. परंतु घडले दुसरेच.ज्या माणसला शिक्षा दिली जाणार होती, त्याला मृत्यू डोळ्यांसमोर दिसत होता. तरी पण हिंमत करून तो हज्जाजला म्हणाला, "यापेक्षा, हे अन्न मला खाऊ घालणे आणि मला न मारणे हे सर्वात चांगले आहे. माझ्यावर उपकार होतील आणि पालनकर्त्यासमोर तुम्ही माझे खुनी बनून हजर होण्यापेक्षा उपकारकर्ते म्हणून हजर व्हाल." हज्जाजला त्याचे बोलणे खूप आवडले. हज्जाजने त्याला केवळ खायलाच दिले नाही तर शिक्षाही रद्द केली आणि त्याला सोडून दिले.

त्याचप्रमाणे एकदा आणखी एक बंडखोर पकडला गेला. हज्जाजने त्याच्या हत्येचा आदेश दिला.बंडखोर म्हणाला, "मला एका दिवसाची मुदत द्या,"हज्जाजने  विचारले, "याचा तुला काय फायदा होईल?" त्याने उत्तर दिले, "मी माझ्या फायद्यासाठी नाही तर तुमच्या फायद्यासाठी मुदत मागत आहे." हज्जाजने विचारले की, "तू माझ्यासाठी मुदत का मागत आहे? यात माझा काय फायदा?" बंडखोर म्हणाला, "यासाठी की, लोक म्हणतील हज्जाज सवलत देण्यात उदार होता." या उत्तराने खूश होऊन हज्जाजने त्याला माफ केले. माफी मंजूर झाल्यावर बंडखोर म्हणाला, "सुभान अल्लाह! आता तू क्षमाशील म्हणून प्रसिद्ध होशील." हज्जाज अधिकच खूश झाला आणि त्याला बक्षीस देऊन निरोप दिला.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)

हजरत मुआविया (र.) हे प्रिय पैगंबर (स.) यांचे सहकारी होते. ते खूप हुशार आणि समजूतदार होते. कुणी कितीही धूर्त नि चलाक असला तरी तो हजरत मुआवियाला फसवू किंवा ठगू शकत नाही हे प्रसिद्ध होते. पुढे जाऊन हजरत मुआविया  (र.) मुस्लिमांचे खलिफा झाले. ते खूप उदार होते आणि राग आला तर गिळून घ्यायचे.

आता त्यांची एक मजेदार गोष्ट पाहू. एक माणूस होता, जो खूप हुशार नि धूर्त होता. त्याने ऐकले की हजरत मुआविया (र.) खूप उदार आहेत. त्यांच्या समोर कोणी काही मागितले तर रिकाम्या हाताने कधीच परत पाठवत नाहीत.  चांगलं भरभरून दान देतात. मगणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक देतात. हे ऐकून या माणसाला वाटलं, जर आपण त्यांच्याशी आपले नाते संबंध सांगितले तर, मुआविया (र.) आपल्याला खूप काही देतील. इतरांच्या तुलनेत आपल्याला अधिक संपत्ती मिळेल. या लालसेने त्याने मुआवियाशी (र.) एक नातं शोधून काढलं. तो  मुआवियाकडे (र.) गेला आणि म्हणाला, "मी तुमचा भाऊ आहे. तुम्ही आणि मी एकाच आईबापाची मुले आहोत."

हजरत मुआविया (र.) यांनी त्याला ओळखले नाही. म्हणाले, "भावा मी तुला ओळखले नाही, काही खूण तरी सांगा." तो म्हणाला, "हे पाहा, सर्व मानव आदम आणि हव्वा ( जगात आलेले पाहिले स्त्री आणि पुरुष ) यांची संतती आहेत. या नात्याने मी तुमचा भाऊ आहे की नाही?"

त्याचा धूर्तपणा पाहून हजरत मुआविया (र.) म्हणाले, "खरंच तू माझा भाऊ आहेस, ठीक आहे. बस."

तो माणूस खाली बसला आणि म्हणाला, "हे मुआविया, भावाचा हक्क भावाला दे. मी खूप गरीब माणूस आहे."

हजरत मुआविया  (र.) हसले आणि समजले की, या व्यक्तीला धूर्तपणे काहीतरी मिळवायचे आहे. त्याचा धूर्तपणा लक्षात आल्यावर मुआविया (र.) यांनी मोठ्या गमतीदार पद्धतीने त्याच्या धूर्तपणाला उत्तर दिले. मुआविया यांनी आदेश दिला की, "माझा हा भाऊ आहे. त्याला एक दिरहम (सुमारे पंचवीस नवीन नाणी) द्या."

ही आज्ञा ऐकल्यावर तो धूर्त माणूस म्हणाला, "भावाचा हक्क एवढाच!"

हजरत मुआवियाने (र.) उत्तर दिले, ''भाऊ! एक दिरहम सुद्धा खूप जास्त आहे, घेऊन टाक, ज्या नात्यातून तू माझा भाऊ बनला आहेस, त्या नातेसंबंधाने सर्व जगाचे लोक माझे भाऊ आहेत. मी जर माझी संपत्ती सर्वांमध्ये समान वाटली तर करोडो लोकांमध्ये एक एक पैसाही बरोबर मिळणार नाही."

हे ऐकून तो माणूस तोंड बंद करून आणि एक दिरहम घेऊन निघून गेला. सगळीकडे असे सांगत फिरला की खरोखर, कोणीही मुआवियाला (र.) फसवू शकत नाही किंवा ठगू शकत नाही.

'आपण सर्वजण वजू करू या'

ही गोष्ट वाचण्यापूर्वी आपण वुजू काय आहे हे समजून घेऊया. वुजू ही थोडक्यात हात पाय धुण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. मुस्लिम बांधव नमाज पठण करावयाची असल्यास किंवा कुरआन पठण करावयाचे असल्यास त्यापूर्वी एका विशिष्ट पद्धतीने हात, पाय, चेहरा स्वच्छ धुऊन घेतात. त्याला वुजू असे म्हणतात. वुजू केल्याशिवाय कोणी नमाज किंवा कुरआन पठण करत नाही. मस्जिदमध्ये प्रवेश करावयाचे असल्यास देखील वुजू करणे उचित असते.

एकदा वुजू केलेला असताना जर एखादी व्यक्ती प्रातर्विधी किंवा लघुशंकेसाठी जाऊन आली तर त्याला पुन्हा वुजू करावे लागते. एवढेच नव्हे तर, एखाद्याचे आपान वायू (पाद) निघाले असेल तरी देखील वुजू करणे आवश्यक असते.

एकदाची गोष्ट आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसले होते. प्रिय साथीदार त्यांच्या शेजारी बसले होते. हजरत अब्बास यांचाही त्यात समावेश होता. गप्पा चालू असताना पैगंबर (स.) यांना दुर्गंधी जाणवली. त्यांच्या लक्षात आले की, कोणीतरी आपान वायू (पाद) सोडले.

प्रेषित म्हणाले, "ज्याने कोणी आपान वायू सोडला आहे त्याने उठून जाऊन वुजू करावे."

त्यांच्या आज्ञेने कोणीच उठले नाही. मुद्दा असा होता की, ज्यांचा आपान वायू सुटला होता ते शरमेने उठले नाहीत. प्रिय पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) पुन्हा तेच बोलले. पुन्हा कोणीच उठले नाहीत.

हजरत अब्बास (र.) यांना समजले की, ते जे कोणी असेल ते लाजेने उठत नाहीत, मी पादले हे लोकांना कळेल. याची त्यांना लाज वाटत असावी. बरं, आता पाहा हजरत अब्बास इतके युक्तीपूर्ण आणि विनम्रपणे म्हणाले, की  प्रेषितांच्या आदेशाचे पालनही झाले आणि पादणारी व्यक्ती कोण हेही कोणाला समजले नाही.

हजरत अब्बास (र.) पैगंबरांना म्हणाले: 'जर तुम्ही असे म्हणत असाल तर आम्ही सर्वजण वुज़ू करून घ्यावे का?"

प्रेषित मुहम्मद (स.) आणि सर्व सोबती यावर आनंदी झाले.  प्रेषित मुहम्मद (स.) यांना हजरत अब्बास (र.) यांचे युक्तिशिर बोलणे आवडले. सर्वांना त्याचा आनंद झाला.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881

(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)

इमाम शाफई (रह.) हे न्यायशास्त्रातील एक विश्वासू नाव. लोक त्यांच्याकडे जात असत. महिला आणि पुरुष दोघेही त्यांच्याकडे आपल्या समस्या आणत असत. ते इतक्या सहजतेने लोकांच्या समस्यांचे निराकरण करत की, लोक खूश होऊन जात. खटल्यांचा निवाडा अशा पद्धतीने करत की न्याय निवाड्यावर कोणालाच आक्षेप नसायचा.

एकदा त्यांच्याकडे  एक बाई आली. ती खूप घाबरलेली होती. ती इमाम साहेबांना म्हणाली, "हे बघा, माझ्याकडे एक खजूर आहे, हे माझ्या पतीने मला दिले आणि म्हणाले की, जर तू हे खजूर खाल्ले तर तुला घटस्फोट आणि फेकून दिले तरी तुला घटस्फोट. माझे वैवाहिक जीवन संकटात सापडले आहे. मला काही तरी मार्ग सांगा. मी काय करू?"

मामला गंभीर होता. जर योग्य मार्ग दाखवला गेला नाही तर बिचारीचे वैवाहिक जीवन संपुष्टात येण्याची दाट शक्यता होती. पत्नीला या गोष्टीची जाणीव होती की, या संकटातून आपल्याला इमाम साहेबच वाचवू शकतात. तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि याच अपेक्षेने ती इमाम साहेबांकडे आली होती.

इमाम साहेबांनी थोडा वेळ विचार केला आणि मग तिला म्हणाले, "अर्धे खा, अर्धे फेकून दे."

अर्थात अर्धी खजूर खा आणि अर्धी फेकून दे. ती स्त्री आनंदाने तिच्या नवऱ्याकडे गेली. तिने त्याच्यासमोर अर्धी खजूर खाल्ली आणि अर्धी फेकून दिली.

हे पाहून नवरा स्तब्ध झाला. एवढं चातुर्य पत्नीकडे आले कोठून याचाच तो विचार करू लागला. नंतर त्याला समजले की, पत्नीने इमाम साहेबांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले. तेंव्हा त्याला इमाम साहेबांच्या चातुर्याचे कौतुक वाटले आणि त्यांनी सांगितलेला उपाय देखील गंमतीदार वाटला.

मोठा कोण?

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे एक लाडके काका होते. त्यांचे नाव हजरत अब्बास (र.) होते. हजरत अब्बास, अतिशय सभ्य होते. कोणाचेही मन दुखावले जाणार नाही आणि समोरील व्यक्तीच्या मोठेपणात फरक पडणार नाही अशा पद्धतीने बोलत. आपल्या पुतण्यावर जीवापाड प्रेम करायचे.

एकदा खूप मजा आली. हजरत अब्बास (रजि.) यांना एका गृहस्थाने विचारले, "तुम्ही मोठे आहात की प्रिय प्रेषित मुहम्मद (स.)?"

प्रश्न ऐकून हजरत अब्बास हसले. ते का हसले असतील बरं. मुद्दा असा होता की हजरत अब्बास हे पैगंबर (स.) यांच्यापेक्षा वयाने मोठे होते, परंतु पैगंबर (स.) दर्जाच्या बाबतीत सर्व लोकांपेक्षा मोठे आहेत. प्रश्न विचारणाऱ्यालाही वयाच्या बाबतीतच जाणून घ्यायचे होते की वयाने कोण मोठा आहे. परंतु आदरणीय अब्बास (रजि.) यांनी वेगळा विचार केला. पैगंबरांपेक्षा मी मोठा आहे असे म्हणणे, हजरत अब्बास (रजि.) यांना योग्य वाटले नाही. प्रेषितांचा आदर सन्मानही बाधित होणार नाही याची काळजी ते घेत.

तेंव्हा त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर अशा काही पद्धतीने दिले की, पैगंबरांचा आदर सन्मानही अबाधित राहिला आणि ऐकणाऱ्यांनाही त्यांच्या उत्तराने आनंद मिळाला. सर्व लोक आनंदी झाले आणि सर्वांना खूप गंमत वाटली. हजरत अब्बास (र.) यांनी उत्तर दिले की, "ऐका बंधुंनो, मोठे तर पैगंबरच (स.) आहेत पण, मी आधी जन्माला आलो!"

किती छान उत्तर दिलं. मजेशीर आणि तितकंच खरं.

- सय्यद झाकीर अली

परभणी,

9028065881

(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)

एके दिवशी एक स्त्री प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आली. प्रेषित तिला म्हणाले, "घरी जा लवकर आणि बघ! तुझ्या नवऱ्याच्या डोळ्यांचा बराचसा भाग पांढरा शुभ्र झाला आहे."

हे ऐकून ती बाई घाबरली. प्रेषित अगदी सहज बोलून गेले. त्या इस्त्रीला काय वाटले कुणास ठाऊक. प्रेषितांनी अचानक असे का सांगितले असावे याची कोणतीच शहानिशा न करता किंवा त्यावर काहीही विचार न करता ती सरळ धावतच घरी आली आणि नवऱ्याच्या डोळ्यात बघू लागली.

नवऱ्याने विचारले, "काय बघतेस?"

बाई म्हणाली, "प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले की तुझ्या पतीच्या डोळ्यांचा बराचसा भाग पांढरा झाला आहे."

हे ऐकून तिचा पती हसू लागला. पतीला हसतांना पाहून ती अधिकच बुचकळ्यात पडली. तिला काहीच सुचत नव्हते.

पती म्हणाला, "अल्लाहचे प्रिय प्रेषित खरे म्हणाले, माझ्या डोळ्यातील काळ्या बुबुळाभोवतीचा भाग पांढराच आहे आणि ही काही नवीन गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्तीचे डोळे असेच असतात."

असे सांगून पती पुन्हा हसू लागला.

आता तिला समजले की, प्रेषितांनी आपली गंमत केली. या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला. ही मजेशीर गोष्ट ती इतरांना मोठ्या अभिमानाने सांगायची.

--------------------------

दौलत

तैमूर लंग राजा झाला. तो खूप शक्तिशाली आणि क्रूर राजा होता. तो एका पायाने लंगडा होता. त्याने भारतावर आक्रमण करून हजारो निष्पाप लोकांची हत्या केली. भारताचा राजा त्याच्याकडून हरला. शेवटी शांतीसाठी खूप दबावात त्याने तैमूर लंगशी तह केला.

समेटानंतर, तैमूर लंगला भारतीय नृत्य दाखवण्यात आले आणि एक गाणे ऐकविले गेले. तैमूरसमोर एक नृत्यांगना (वेश्या) नाचत होती. ती आंधळी होती. तैमूरला तिचं नृत्य आणि गाणं खूप आवडलं.

त्याने नृत्यांगणाला तिचे नाव विचाराले.

नृत्यांगणा म्हणाली, "दौलत!"

तैमूर हसला आणि म्हणाला, "दौलत (संपत्ती) कुठे आंधळी असते?"

नृत्यांगणाने लगेच उत्तर दिले, "हुजूर! दौलत (संपत्ती) आंधळी नसती तर लंगड्याकडे आली नसती."

या उत्तराने तैमूर खूप खूश झाला आणि त्याने नृत्यांगणाला भरपूर बक्षीस दिले. 

संपत्तीला आंधळी म्हणतात कारण, ज्याला संपत्ती मिळते तो खूप गर्विष्ठ होतो, मनमानी करतो आणि अनेक प्रकारच्या पापांमध्ये अडकतो. जणू तो आंधळा होतो.

मात्र, जर अल्लाहचे भय हृदयात राहिले तर असे होत नाही. निश्चितच माणसाने मोठ्या प्रमाणावर संपत्ती मिळवावी त्याला काही हरकत नाही आणि खर्चही करावे परंतु संपत्ती मिळवण्याचा मार्ग आणि खर्च करण्याचा मार्ग दोन्हीही वैध असणे आवश्यक आहे. निवाड्याच्या दिवशी जेव्हा माणूस अल्लाहच्या समक्ष उभा राहील तेव्हा त्याने संपत्ती कुठून मिळवली आणि कुठे खर्च केली या प्रश्नांची उत्तरे त्याला द्यावी लागणार आहेत. तेव्हा संपत्ती मिळवण्यासाठी वाम मार्गाचा अवलंब करू नये किंवा वाम मार्गात संपत्ती खर्चही करू नये.

- सय्यद झाकीर अली

परभणी,

9028065881


खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी

हजरत उमर फारुख (र.) यांच्या काळात एक अतिशय प्रसिद्ध सैनिक होते. उमरव बिन मआदी कर्ब (र.) असं त्यांचं नाव. ते खूप शूर होते. त्यांना हजार घोडेस्वारांच्या बरोबरीचे मानले जायचे. त्यांचा एक मजेशीर किस्सा नमूद करत आहे. आपल्याला वाचून निश्चितच आनंद मिळेल.

एके दिवशी उमरव बिन मआदी कर्ब (र.), एका शत्रू सैनिकाशी लढत होते. उमरव बिन मआदी कर्ब (र.) शत्रू सैनिकावर भारी पडू लागले, म्हणून तो स्वतःला वाचवण्याच्या योजनेचा विचार करू लागला. त्याने स्वतःला खड्ड्यात झोकून दिले. हे पाहून उमरव बिन मआदी कर्ब यांनी आपला हात थांबवला. कुणी अडचणीत सापडल्यास त्याच्यावर हल्ला करायचा नाही. त्याचा गैर फायदा घ्यायचा नाही. अशी त्यांना सवय होती.

ते शत्रू सैनिकाला म्हणाले, "खड्ड्यातून बाहेर पड, घोड्यावर स्वार होऊन माझ्याशी लढ."

शत्रू सैनिक म्हणाला, "मी एका अटीवर खड्ड्यातून बाहेर येईन."

त्यांनी अट विचारली.

तो सैनिक म्हणाला, "अट अशी आहे की, मी घोड्यावर बसून लगाम हातात घेईपर्यंत तू माझ्यावर हल्ला करणार नाहीस."

उमरव बिन मआदी कर्बने वचन दिले.

आता तो खड्ड्यातून बाहेर आला, आपली शस्त्रे खाली टाकली, घोड्याची लगाम हातात धरली आणि पायी निघाला. हे पाहून उमरव बिन मआदी कर्ब म्हणाले कुठे निघालास?

त्याने उत्तर दिले, "घरी."

पुन्हा विचारले, "का?"

उत्तर दिले, "जीव वाचवण्यासाठी. तू आता मला मारू शकत नाहीस. मी शस्त्र उचलणार नाही आणि घोड्यावर स्वार होणार नाही.”

शत्रू सैनिक स्मितहास्य करत निघून गेला. उमरव बिन मआदी कर्ब त्याच्याकडे पाहतच राहिले. वचन दिले होते! मग आता काय करायचं? वचन पूर्ण करावेच लागणार होते. तो गेल्यावर उमरव बिन मआदी कर्ब स्वतःशीच हसले.


उंटाचे पिल्लू

एकदा एका माणसाने प्रेषित मुहम्मद (स.) यांना उंट मागितला. 

प्रेषित म्हणाले, 'उंटाचे पिल्लू देईन.'

ती व्यक्ती म्हणाली, "हे अल्लाहचे प्रेषित, मी उंटाच्या पिल्लाचे काय करू? मला त्याच्यावर ओझे लादायचे आहे."

प्रेषित म्हणाले, 'आम्ही तर तुम्हाला उंटाचे पिल्लुच देऊ.'

मग प्रेषितांनी आपल्या एका साथीदाराला इशारा केला. साथीदार एक दणकट उंट घेऊन आला.

प्रेषित, उंट त्या व्यक्तीच्या स्वाधीन करत म्हणाले, "उंट लहान असो की मोठे, पिल्लू तर उंटाचेच आहे ना!"

हे ऐकून सर्वांना गंमत वाटली आणि हसू आले.

गोष्ट खरी आहे. उंट कितीही मोठा झाला तरी पिल्लू उंटाचेच!

- सय्यद झाकीर अली

परभणी.

9028065881


खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी

आदरणीय मुआविया (र.), हजरत अब्दुल्ला बिन आमेर (र.) यांचे मित्र होते. एके दिवशी हजरत मुआविया  (र.) इब्न अमेरला (र.)  म्हणाले, "मला तुम्हाला काही विचारायचे आहे. मी म्हणेन, तुम्ही ते स्वीकाराल का?"

इब्ने आमेर (र.) म्हणाले, "मी नक्कीच सहमत आहे, परंतु मी तुम्हाला काही सांगेन, तुम्ही देखील सहमत व्हाल?"

हजरत मुआवीजा यांनीही कबुली दिली.

एकमेकांना शब्द दिल्यानंतर, हजरत मुआविया (र.) इब्ने आमेरला (र.) म्हणाले: "मला तुमची सर्व घरे, सर्व जमीन आणि सर्व मालमत्ता द्या." इब्न आमेर (र.) शब्द दिल्याप्रमाणे म्हणाले, " मी, तुम्ही मागितलेल्या साऱ्या गोष्टी तुम्हाला दिल्या." 

आता मुआवियाने (र.) विचारले,"आता तुम्ही तुमचं बोला." इब्ने आमेर म्हणाले, "मी तुम्हाला जे काही दिलं, ते परत करा." हे ऐकून मुआविया हसले आणि त्यांना सर्व काही परत करावं लागलं.

हुर्मुजानची चलाकी

हजरत उमर (र.) च्या काळात इराणींशी अत्यंत खडतर युद्ध करावे लागले. तिथे एक इराणी होता. खूपच दुष्ट होता. हजरत उमर (र.) यांनी मनाशी ठरवले होते की, हुर्मुजान कधीही कैदी होऊन आला तर त्याला देहदंड देईन.

आता पहा अल्लाहची करणी. हुर्मुजान कैद केला गेला आणि त्याला खलिफा उमर (र.) यांच्या समोर हजर करण्यात आले. हुर्मुजान अतिशय हुशार आणि धूर्त होता. त्याला विश्वास होता की, हजरत उमर (र.), मला माझ्या कुकर्मासाठी नक्कीच देहदंड देतील. आपला जीव कसा वाचेल आणि आपली सुटका कशी होईल याचाच तो विचार करत राहिला.  शेवटी त्याला एक युक्ती सुचली. ही युक्ती सूचताच तो मनोमनी आनंदी झाला.

हजरत उमर (र.) यांच्यासमोर हजर होताच अपेक्षे प्रमाणे त्यांनी हुर्मुजानला देहदंडाची शिक्षा ठोठावली. 

हुर्मुजान म्हणाला, "मला तहान लागली आहे, मारण्यापूर्वी मला पाणी द्या."

हजरत उमर (र.) यांनी त्याच्यासाठी पाणी मागविले. प्याला भरून त्याला पाणी दिले. त्याने पाणी घेतले आणि वचन मागितले की, 'मी हे पाणी पिईपर्यंत मला मारणार नाहीत.' हजरत उमर यांनी तसे वचन दिले.

वचन देताच त्याने ते पाणी जमिनीवर फेकले आणि म्हणाला, "आता तुम्ही मला मारू शकत नाहीत, कारण ज्या पाण्यासाठी वचन दिले ते पाणी कुठे आहे?"

हे ऐकून हजरत अनस (र.), हजरत जुबेरा (र.) आणि अबू सईद (र.) इत्यादी अनेक साथीदारांनी त्याची बाजू घेतली आणि सांगितले की, हे उमर (र.) तुम्ही वचन दिले आहे.  वचनाविरुद्ध जाऊ शकत नाहीत. हुर्मुजानचा धूर्तपणा पाहून हजरत उमर (र.) दंग झाले परंतु वचन दिल्याने त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यांनी हुर्मुजानला सोडून दिले.

त्यानंतर मात्र हुर्मुजानने आपल्या पापांचे प्रायश्चित केले आणि आदरणीय उमर (र.) यांचा अनुयायी बनला.

- सय्यद झाकीर अली, परभणी.

9028065881


केरळच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही भीषण घटना रविवारी सकाळी ९.४० वाजता एर्नाकुलम येथील कलामासेरी येथील सामरा सभागृहात यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रार्थना सभेदरम्यान घडली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आयईडी स्फोटात तीन लोक भाजले जाऊन मृत्युमुखी पडले. या स्फोटामुळे महिला, मुले आणि वृद्धांसह 2000 हून अधिक भाविकांना घाबरवले आणि त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी पळून जाण्यास भाग पाडले, तर सुमारे पन्नास जखमी लोकांवर उपचार सुरू आहेत.

केंद्र आणि राज्य एजन्सींनी काही तासांत सुरू केलेली व्यापक तपासणी हाय अलर्टसह सुरू आहे. तपास पथकाने सुरुवातीला आरोपी डॉमिनिक मार्टिनने बॉम्ब तयार करून स्फोट घडवून आणल्याचा खुलासा लपविण्यास टाळाटाळ केली, परंतु तपास आणि स्फोटकांच्या अवशेषांच्या उपलब्धतेमुळे त्याच्यावर गुन्हा घडला.

पुरेशा नियोजन आणि तयारीनंतर आपण हा जघन्य गुन्हा केल्याची कबुली देणारा संशयित म्हणतो की त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत दीर्घकाळ काम केले आहे आणि त्यांच्या 'देशद्रोही' कृत्यांच्या रागाने तो प्रेरित झाला होता. आरोपीच्या वक्तव्यावर समाधान न झाल्याने, त्याच्यामागे आणखी कोणी आहे का, त्याचे दहशतवादी संबंध आहेत का, अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे शोधण्यासाठी एनआयए, एनएसजी आणि केरळ पोलिसांचे विशेष तपास पथक एकाच वेळी सर्वसमावेशक तपास करत आहेत. या घटनेचे गूढ उकलून लवकरच वस्तुस्थिती समोर येईल, अशी आशा सरकार आणि जनता व्यक्त करत आहे.

त्याच वेळी, देशात आणि केरळमध्ये अधिक स्फोटक राजकीय आणि सामाजिक विवाद आणि आक्रमक प्रतिआक्रमण केले जात आहेत. घटनेच्या काही तासांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत असलेले केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना फोन करून त्यांची चिंता व्यक्त केली आणि त्यांना काळजीपूर्वक तपासाची आठवण करून दिली. तथापि,  तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असतानाच केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी राष्ट्राला त्यांचे निष्कर्ष आणि प्रतिसाद स्पष्टपणे सांगितले होते. ‘गृहखात्याची जबाबदारी असतानाही भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले गेलेले मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या लाजिरवाण्या तुष्टीकरणाच्या धोरणाचे कलामसेरी हे उदाहरण आहे. मुख्यमंत्री दिल्लीत इस्रायलचा निषेध करत आहेत, तर केरळमध्ये निर्दोष ख्रिश्चनांवर जिहाद, हल्ले आणि बॉम्बस्फोट घडवण्याचे दहशतवादी हमासचे खुले आवाहन आहे,' असे ते म्हणाले. याचेच मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना 'विषारी' असे वर्णन करावे लागले. कट्टर हिंदुत्व ब्रिगेडचे केंद्रीय मंत्री संधीचा वापर करून आपल्या मनात आधीच घर करून असलेले कटू जातीय विष लवकरात लवकर बाहेर काढत होते हे स्पष्ट झाले आहे.

ज्या क्षणी बॉम्बस्फोटाची बातमी फुटली, त्याच क्षणी संघ परिवार जिहादी आणि त्यांच्या बाजूच्या दृश्य आणि सोशल मीडियाने 'जिहादीं'विरुद्ध युद्ध सुरू केले होते. केरळमधील दानशूर लोक गाझा आणि पॅलेस्टाईनमध्ये झिओनिस्ट राजवटीद्वारे मारल्या जात असलेल्या महिला, मुले आणि सामान्य लोकांसोबत आपली एकजूट व्यक्त करत आहेत याबद्दल ते सुरुवातीपासूनच नाराज होते. म्हणूनच, हमासच्या दहशतवाद्यांची बाजू घेणाऱ्या 'जिहादीं' आणि इस्रायलच्या रक्तहीन मानवी कत्तलीला उघडपणे विरोध करणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या विरोधात रंगीत खोटे आणि हिरवे खोटे कोण, केव्हा आणि कोठे पसरले हे स्पष्ट होण्याआधीच सत्याचा सूर्य असूनही त्यांच्या डोळ्यातील अंधार बदलत नाही.

गाझा आणि पॅलेस्टाईनमध्ये अस्तित्वासाठी लढा देणाऱ्या हमासला देशातील जनतेने निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आणले आहे. हमासला संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेले नाही. भारत सरकारनेही तसे केलेले नाही. जगातील बहुसंख्य देशांनी हमासने ७ ऑक्टोबरला केलेला हल्ला हा दहशतवादी कृत्य असल्याचे जाहीर केलेले नाही.

अशा परिस्थितीत हमासला दहशतवादी न ठरवणाऱ्यांना अतिरेकी म्हणण्याची परवानगी अतिहिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना कोणी दिली? हमासचे माजी नेते खालिद मिशाल यांच्या भाषणाचा गाझामधील निरपराध लोकांवर होत असलेल्या भीषण अत्याचाराकडे जनतेचे लक्ष वेधणाऱ्या व्हिडिओ लावणाऱ्या मलप्पुरममधील श्रोत्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, असा पोलिस अहवाल दिल्यानंतरही अंधजातीय द्वेष पसरविणाऱ्यांची खरोखरच चौकशी व्हायला हवी.

अखेर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने 'एखाद्या समाजाकडे संशयाने पाहणारेच देशाचे सामायिक शत्रू आहेत', असे जाहीर केले. सर्व पातळ्यांवर शांतता आणि जातीय सलोखा दृढ होईल आणि केरळ या संदर्भात एकजूट आहे, या सर्वपक्षीय बैठकीच्या स्पष्ट विधानाचे स्वागत करता येईल आण त्यामुळे द्वेषाचे व्यापारी एकटे पडू शकतात.

- शाहजहान मगदुम

आपल्या समाजात एक म्हण आहे, "मुले ही मातीचा गोळा असतात." कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला घडविण्याचा विचार करतो त्याप्रमाणे तो त्याला घडवितो. त्याचप्रमाणे मुलांना आपण लहानपणापासूनच सुसभ्य, सुसंस्कृत, मोठ्यांचा आदर करणारे लहानांवर प्रेम करणारे आणि प्राणीमात्रांवर प्रेम करणारे बनवायचे प्रयत्न केले तर ते तसे घडतात. कारण बालपणापासूनच दिलेले संस्कार मुलांच्या अंगी असतात आणि लहानपणापासूनच मूल आपल्या सभोवतालील घटकांना पाहूनच शिकत असते. या घटकांमध्ये दृश्य घटक म्हणजे आई, वडील, कुटुंब, नातेवाईक, शिक्षक, मित्र व समाज आहे. या घटकांचा प्रभाव त्या वाढणाऱ्या मुलांवर पडत असतो.

आपली मुले नेहमी खूश आणि आनंदी राहावीत असे प्रत्येक पालकास वाटत असते आणि त्यासाठी पालक नेहमी धडपडत असतात. मुलांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट आणून देतात. त्यांचे हट्ट व लाड पुरवतात पण खरंच मुले याची भुकेली असतात का? ते सुद्धा आपला आनंद या भौतिक सुखात शोधतात का? तर असं नाही. पालक म्हणून तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्व  गरजा व हट्ट पुरवितात आणि तुमची मुले खूश वा आनंदी आहेत तर तुम्ही चुकताय!.... मुलांना सुद्धा केवळ आणि केवळ आपल्या आई-वडिलांचे प्रेम आणि माया मिळाली तरी सुद्धा ते खूश राहू शकतात. त्यांना फक्त पालकांच्या हक्काचा वेळ आणि लक्ष हवे.

काही पालक तर मुलांना एवढा अटेन्शन देतात की मुलं फार हट्टी होतात आणि त्यांना वाटते की आपण हट्ट केला किंवा रडून आरडाओरडा केला तर पालक आपले सर्व हट्ट पूर्ण करतात, तर इथे पालकांना समतोल साधावा लागेल. मुलांचे कोणते हट्ट पुरवायचे व कोणते नाही यावर पालकांना लक्ष द्यावे लागेल. व्हिडिओ गेम, संगणक वापर आणि टीव्हीवर वेळमर्यादा ठेवावी लागेल. शारीरिक खेळ, पुरेशी झोप आणि कौटुंबिक संवादाच्या वेळेत कमी होत नाही याची खात्री करा. शाळेच्या जबाबदाऱ्या आणि दिनचर्या स्थापित करण्यात त्यांची मदत करा. इस्लाम धर्मात प्रेषित मोहम्मद (सल्ल.) म्हणतात की, "वडील आपल्या मुलांना जे काही देतात त्यात सर्वात उच्च भेट म्हणजे त्याला दिलेले शिक्षण व संस्कार आहेत." (हदीस मिश्कात)

मी अगोदरच इथे नमूद केले आहे की मुलं ही कच्च्या मातीप्रमाणे असतात. त्यांना कसं घडवायचं आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. मुलं मोठी झाल्यावर चांगले नाव करावे, त्यांची प्रगती व्हावी असे प्रत्येक पालकांची इच्छा असते. चांगल्या संगोपनात काही अशा गोष्टी असतात ज्यांच्याकडे पालक दुर्लक्षित करतात आणि ते आहे मुलांचा आदर करणे. मुलांना तुच्छ लेखू नका. कोणासमोरही त्यांना रागवू नका. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. जर त्यांच्या हातून काही नुकसान झाले तर माफ करण्याची वृत्ती ठेवा. त्यांना चार चौघांत अपमानित करू नका. त्यांना त्यांचे दोष वारंवार दाखवू नका. त्यांच्या उणिवा त्यांना दाखवाल तर ते चुकीच्या मार्गावर जातील. असे केल्याने त्यांच्यात नकारात्मक विचार निर्माण होतात. त्यांच्या इच्छांना मान द्या. मुलांना जे कार्य करण्याची आवड आहे ते त्यांना करू द्या. मुलांना टोचून किंवा उद्धटपणे बोलू नये. त्यांच्यावर देखील तसेच संस्कार होतात. त्यांच्याशी आदराने बोलावे.

आदर का महत्त्वाचा आहे याचे एक मुख्य कारण म्हणजे ते मुलांना सहानुभूती शिकविते. सहानुभूती ही एक शिकलेली वागणूक आहे. आदर शिकविल्याने मुलांच्या सहानुभूतीच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होतो. मुलांच्या समोर कधी खोटं बोलू नये व त्यांना खोटं बोलण्यास सांगू नये. जर आपण त्यांच्यासमोर खोटं बोललं तर त्यांच्या मनात ते घर करून जातं आणि मग ते पण खोटं बोलायला शिकतात.

यावरून एक किस्सा आठवला अब्दुल कादिर जिलानी (रह.) लहान होते. ते शिक्षण घेण्यासाठी परदेशी जात होते. त्या वाटेवर दरोडेखोर खूप होते म्हणून त्यांच्या आईने त्यांच्या शर्टच्या बाहीमध्ये पैसे शिवून ठेवले होते  आणि आईचीच शिकवण होती की कधी खोटं बोलू नये. मग ते प्रवासाला गेले तर मार्गात दरोडेखोर भेटले. त्यांनी सर्वांची चौकशी केली आणि सर्व धन गोळा केले. यांच्याजवळ त्यांना काहीही मिळाले नाही. पण दरोडेखोरांनी त्यांना विचारले की, "तुझ्याजवळ पैसे आहे काय?" तर त्यांनी उत्तर दिले, "हो आहेत." आणि त्यांनी आपली बाही खोलून दाखविली, त्यात पैसे निघाले. दरोडेखोराने आश्चर्यचकीत  होऊन विचारले, "तू का बरं पैसे दाखविले?" ते म्हणाले, "माझ्या आईने मला खोटं बोलण्यास मनाई केली आहे." मुलाच्या या वर्तनावरूनच नंतर दरोडेखोराने इस्लाम धर्म स्वीकारला. तर असे असतात बालकांवर केलेले संस्कार. अशा प्रकारे आपल्या मुलांना नेहमी याची जाणीव करून द्या की तुम्ही त्यांच्या सोबत सदैव आहात. आपल्या पालकांचा सहवास मुलांसाठी सर्व काही असतो. त्यांच्या सहवासात मुलांना आनंद मिळतो. यामुळे मुले सुद्धा मोकळेपणाने पालकांशी संवाद साधतात. लहान मुलांचे मन खूप नाजूक असते आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांना दुखवू शकतात. त्यामुळे एक पालक म्हणून त्यांना शक्य तितके प्रेम द्या आणि त्यांच्यावर माया करा.

तर मंडळी एक पालक म्हणून या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या मुलांना भौतिकच नाही तर मानसिक आनंद देखील द्या म्हणजे एक सुखी व्यक्ती म्हणून त्याचीही जडणघडण होईल.

-परविन खान

पुसद


अनेक वेळा असे होते, एखाद्या व्यक्तीने, आपली चूक निदर्शनास आणून दिली तर आपण सहसा आपली चूक मान्य करत नाही, उलट त्या व्यक्तीवर नाराज होतो. त्यातल्यात्यात जर चूक दाखवून देणारा वयाने, पदाने लहान असेल तर अधिकच राग येतो. खरे तर आपण त्या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे आणि आपली चूक दुरुस्त केली पाहिजे. चूक निदर्शनास आणून देणाऱ्या व्यक्तीनेही अशा पद्धतीने चूक निदर्शनास आणून द्यावी की, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही. या ठिकाणी एक प्रेरणादायी कथा आपल्या वाचनासाठी प्रस्तुत करीत आहे.

एकदा 'फुरात' नदीच्या काठावर एक वृद्ध व्यक्ती वुजू करीत होता. वुजू अर्थात इस्लाममध्ये इबादत करण्यापूर्वी हात पाय धुण्याची विशिष्ट पद्धत. वुजू करून त्याने नमाज पठण करायला सुरुवात केली. आदरणीय हसन (र) आणि हुसैन (र) यांनी त्या वृद्धाला वुजू करताना आणि नमाज पठण करतांना पाहिले. त्यांच्या असे लक्षात आले की, खेडेगावातील या वृद्धाचे वुजू आणि नमाजच्या योग्य पद्धतीकडे दुर्लक्ष होत आहे. आदरणीय हसनैन (हसन आणि हुसैन) (र.) यांना त्या वृद्धाला समजावून सांगायचे होते, पण तो म्हातारा आणि खेडेगावचा माणूस आहे, आपण अजून वयाने लहान आहोत. लहान लहान पोरे आपली चूक दाखवून देत आहेत, हे कदाचित त्याला खपणार नाही. ही आपली निंदा आहे, असे समजून त्याला राग येऊ नये आणि सुधारण्याऐवजी तो तसाच राहील, अशी भीतीही त्यांना वाटत होती. 

काय मार्ग काढावा याविषयी दोघे भावंडे विचार करू लागले. त्यांना एक युक्ती सुचली. दोन्ही भावंडे वृद्ध ग्रामस्थाकडे जाऊन म्हणाले, "बाबाजी, आम्ही अजून किशोर आहोत आणि तुम्ही आम्हाला अनुभवी वाटत आहात. तुम्हाला नक्कीच आमच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे वुजूची आणि नमाजची पद्धत माहीत आहे. आम्ही दोघे भाऊ वुजू करून नमाज पठण करतो. तुम्ही आमचे निरीक्षण करा."

त्यानंतर हजरत हसनैन (र) यांनी सुन्नतनुसार वुजू केला आणि नंतर नमाज अदा केली. जेव्हा म्हाताऱ्या गावकऱ्याने ते पाहिले तेव्हा त्याला समजले की, त्याची पद्धत चुकीची होती, 'आपणच चूक करत होतो' हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या चुकीचा पश्चात्ताप केला आणि हजरत हसनैन (र) यांचे आभार मानले.

-सय्यद झाकीर अली

परभणी,

मोबाइल : 9028065881

प्रेम, दया, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, करुणा हे सर्व आपले गुण आहेत. हे आपले खरे व्यक्तिमत्त्व आहे, हेच खरे आपले वैशिष्ट्य आहे आणि हीच माणुसकी आहे! म्हणजे फक्त स्वतःच्या बाबतीत विचार न करता इतरांच्या बाबतची विचार करणे. परंतु आज चिंताही होत आहे, आपण मनुष्यच माणुसकीला संपवतोय. जगातील आपण ज्या घडामोडी बघत आहोत आणि जे चालले आहे आणि समोर असे दिसते की, माणुसकी संपत चाललेली आहे आणि आपल्या मनुष्याचे

कॅरेक्टर इतके अधोगतीला पोहोचले आहे की कधी तर खरंच असे वाटते जनावर आपल्या पेक्षा बऱ्याच पटीनी चांगले आहेत.

आपण कधी सेल्फ रीयलायझेशन केले आहे? जर तुम्ही सेल्फ रीयलायझेशन केले तर, नक्कीच एक गोष्ट जाणवेल की, आपण, मी, तुम्ही सर्व मनुष्य आहे आणि आपण सर्व माणुसकीने भरलेले आहोत.

प्रेम, दया, प्रामाणिक पणा, चांगुलपणा, करुणा हे सर्व आपले गुण आहेत. हे आपले खरे व्यक्तिमत्व आहे हेच खरे आपले वैशिष्ट्य आहे आणि हीच माणुसकी आहे! म्हणजे फक्त स्वतःच्या बाबतीत विचार न करता इतरांच्या बाबतची विचार करणे. परंतु, आज चिंता ही होत आहे आपण मनुष्यच माणुसकी ला संपवतोय. जगातील आपण ज्या घडामोडी बघत आहोत आणि जे चालले आहे आणि समोर असे दिसते की, माणुसकी संपत चाललेली आहे आणि आपल्या मनुष्याचे कॅरेक्टर इतके तळाला चालले कधी तर खरंच असे वाटते जनावर आपल्या पेक्षा बऱ्याच पटीनी चांगले आहेत.

कधी आपण हे ऐकले आहे का की, वाघाने वाघाची शिकार केली? वाघ वाघापासूनच घाबरत आहे? तर, नाही! शिकार करायला जनावर निघतो परंतु, त्यांच्याकडे बुद्धी आहे की, तो वेगवेगळ्या प्रजातींवर हल्ला करतो स्वतःच्या प्रजातीवर हल्ला करत नाही. तो जनावर आहे तरी त्याच्यात बुद्धी आहे तर, मनुष्याच्या बुद्धीला काय झाले हे खरंच कधी कधी कळत नाही.

एका मनुष्याला सर्वात जास्त भीती कशाची आहे? जर आपण रात्री एकटे घरी जातो तेव्हा ही भीती असते का की, वाघ येईल मला खाऊन जाईल? साप किंवा विंचू येतील आणि आपल्याला चावतील? नाही! आपल्याला भीती याची वाटते की, कुणी दुसरा मनुष्य येऊन आपल्याला नुकसान नको करायला. मनुष्याची शिकारच मनुष्य करतो मनुष्याची सर्वात मोठी भीतीच मनुष्य आहे. खोटे मनुष्यच बोलतो, एकमेकांना दुःख मनुष्यच करतो, मन मनुष्यच दुखावते, चोरी ही मनुष्यच करतो, दरोडा ही मनुष्यच टाकतो, मर्डर करतो, रेप करतो, आतंकवादी ही मनुष्यच बनतो तर, अश्या गोष्टी असलेल्या व्यक्तीला आपण मनुष्य म्हणतो? की, कदाचित जनावर ही आपल्यापेक्षा अधिक उत्तम जगतोय.

जर वरती ईश्वर, देव, अल्लाह, जीजस जे नाव आपण देवाला देतो तो खरंच असेल आणि तो आपल्याला ह्या परिस्थितीत बघत असेल तर, तुम्हाला काय वाटते ते आनंदी होतील ते गर्व करतील? त्यांना किती दुःख होत असेल त्यांनी किती प्रेमाने या जगाला बनवले असेल आणि जगातील सर्वश्रेष्ठ जीव मनुष्य जेव्हा त्यांनी बनवले असेल तेव्हा त्यांनी किती स्वप्न पाहिले असतील आणि आज आपण काय करत आहोत?

बऱ्याच वेळा अश्या बातम्या आपण ऐकतो की, आपली झोप उडून जाते कधी बातमी येते छोटीशी ८ वर्षाच्या मुलीवर रेप केला कधी बातमी येते मुलाने आईचा खून केला अश्या बातम्या ऐकून तर खरंच वाटते जगाला माणुसकीची खूप आवश्यकता आहे. देवाने आपल्याला ज्या स्वरूपात आपल्या बनवून पाठवले होते ना तेच स्वरूप परत निर्माण झाले तर, असे वाटते जगातील सर्व दुःख आणि समस्या दूर होतील.

माणुसकी [1]ही या जगासाठी सगळ्यात मोठी गरज आणि आवश्यकता आहे आणि मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही….

- डॉ. समीना अन्सारी

खामगाव


कालपरवापर्यंत भारतातील लोकांची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागत होती. मात्र आता ती परिस्थिती बदलली आहे. अन्नधान्याच्या बाबतीत भारत  स्वयंपूर्ण झाला आहे. हे परिवर्तन करण्यात व प्रगती घडवून आणण्यात‌ ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली , त्यात स्वामीनाथन  यांनी प्रमुख भुमिका बजावली आहे.शेतीक्षेत्रात हरितक्रांती घडवून आणणाऱ्यांमध्ये स्वामीनाथन यांच्या नावाचा उल्लेख अग्रक्रमाने व आदराने केला. नुकतेच त्यांचे दुःखद  निधन झाले. 

स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोठा अहवाल दिला होता. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली होती. ही शिफारस अंमलात आणण्याची आश्वासने प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दिली. त्यावर निवडणुका जिंकल्या. सत्तेवर आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांनाच वाऱ्यावर सोडले. सर्वोच्च न्यायालयात स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करता येणार नाहीत, असा अहवाल दिला. शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे दिवस आणण्यासाठी सातत्याने झ़टणाऱ्यामध्ये स्वामीनाथन होते. त्यांची ओळख जागतिक कीर्तीचे महान कृषी शास्त्रज्ञ अशी होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि लोकांना सशक्त करण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पादन  वाढविणे हा होय, त्यासाठी उच्च प्रतीचे आणि भरघोस पीक कसे घेता येईल, तसेच त्यामुळे देशातील शेतकरी समृद्ध कसा होईल, याचा सतत ध्यास घेऊन स्वामीनाथन यांनी महत्वाचे संशोधन केले होते. भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटाच्या काळात कायम शेती क्षेत्राने आधार दिला;हे अलिकडच्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या काळात ही पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.परंतु संकट काळातील तारणहार असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना सोयिस्करपणे विसर पडला आहे, हे या देशाचे दुर्दैव आहे. स्वामीनाथन एकदा म्हणाले होते, की ‌‘अशक्य‌’ हा शब्द प्रामुख्याने आपल्या मनात असतो आणि आवश्यक इच्छाशक्ती आणि परिश्रम केल्यास महान कार्ये ही शक्य होतात. "अशक्य ते शक्य करिता सायास," या संत तुकोक्तीप्रमाणे त्यांनी  ‌‘अशक्य‌’ काहीही नसते. इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर अशक्य ते शक्य करता येते.असे त्यांनी नेहमीच प्रतिपादन केले.

स्वामीनाथन यांनी गव्हाचे उत्कृष्ट उत्पादन देणारे वाण विकसित केले. त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळाली. कृषीप्रधान देशात शतकानुशतके पिकांच्या वाढीसाठी औजारे आणि बियाण्यांमध्ये सुधारणा झाली नव्हती. स्वामिनाथन हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी गव्हाचे उत्कृष्ट वाण ओळखले आणि शेतकऱ्यांना त्याची जाणीव करून दिली. त्यांना 'शेतकऱ्यांचा मसिहा' म्हटले जाते. १९६० च्या दशकात भारत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता. त्या वेळी स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांसोबत गव्हाचे एचवायव्ही बियाणे विकसित केले. १९४३ मधील बंगालचा दुष्काळ आणि देशातील अन्नटंचाई अनुभवल्यानंतर स्वामीनाथन यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्यासाठी आजीवन काम करण्याचा निर्णय घेतला. बटाटा, तांदूळ, गहू, ताग आदी बाबतीतही त्यांचे संशोधन शेतकऱ्यांला उच्चांकी उत्पादन देणारे ठरले आहे. त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून काम केले. १९७९ मध्ये ते कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव होते. त्या वेळी आण्णासाहेब शिंदे हे कृषिमंत्री होते. १९८८ मध्ये स्वामिनाथन हे निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्ष झाले. १९९९ मध्ये टाईम मासिकाने त्यांचा विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीत समावेश केला. शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा होण्यासाठी उच्च दर्जाच्या वाणांसह शेती करणे किती गरजेचे व किफायतशीर आहे, हे त्यांनी पटवून दिले. त्यांनी  भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या शेतात झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. हरितक्रांती प्रकल्पाद्वारे त्यांनी भारतातील कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणला आणि संपूर्ण देशात त्याचा विस्तार केला. त्यांच्या योगदानामुळे त्यांनी अवघ्या २५ वर्षात भारतीय शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवले. भारतीय कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल स्वामिनाथन यांना अनेकदा सन्मान करुन गौरविण्यात आले. त्यांच्या अपार कष्ट व चिकाटीने त्यांनी भारतीय शेतीला नवी उज्वल दिशा दिली.

स्वामिनाथन यांनी त्यांना मिळालेल्या निधीचा चांगला उपयोग केला. १९९० मध्ये चेन्नई येथे ‌‘स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन‌’ची स्थापना केली. त्यांनी कृषी संशोधन क्षेत्रात नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या प्रेरणेने मोठे प्रकल्प पुढे नेले. त्यांच्या समर्पित योगदानामुळे त्यांनी भारतीय कृषी क्षेत्रात विकासाचे नवीन मापदंड प्रस्थापित केले आणि देशाची अन्न सुरक्षा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धोरणामुळे भारताने अन्नधान्याच्या तीव्र टंचाईतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली. तांदूळ आणि गव्हाच्या चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांच्या शोधात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. स्वामीनाथन यांच्या सांगण्यावरून भारत सरकारने बोरलॉग यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. गहू पिकवणाऱ्या काही राज्यांना भेटी दिल्यानंतर त्यांनी मेक्सिकन जातींचे शंभर  किलो बियाणे भारताला दिले. काही चाचणीनंतर या बियांची प्रथम दिल्लीत पेरणी करण्यात आली आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. पूर्वीच्या हेक्टरी एक ते दीड टनाऐवजी आता हेक्टरी चार ते साडेचार टन गहू उत्पादन घ्यायला सुरुवात झाली आहे. भारतात १९६५-६६ आणि १९६६-६७ अशी सलग दोन वर्षे दुष्काळ पडला होता. धान्याचे उत्पादन घटले आणि भारताला अमेरिकेच्या आयातीवर अवलंबून रहावे लागले. या अस्मानी संकट काळात स्वामीनाथन यांचे प्रयत्न भारतासाठी उपयुक्त ठरले आणि त्यांच्या देखरेखीखाली उच्च उत्पन्न देणाऱ्या अन्नधान्याच्या जाती व वाणांचे संशोधन झाले. त्यामुळे भारतातील धान्याचे उत्पादन वाढले. भारताच्या हरितक्रांतीच्या मागे इतरही लोक होते; पण तज्ज्ञांच्या मते स्वामीनाथन यांची भूमिका केंद्रस्थानी होती. देशाच्या इतिहासातील संकटाच्या काळात स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील कार्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले आणि देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली. 

सन २००४ मध्ये, भारतातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या, आत्महत्यांच्या वाढत्या घटनांमुळे ते खूप व्याकुळ झाले, कृषी क्षेत्र सुधारण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष स्वामीनाथन होते. या आयोगाने किमान आधारभूत किंमतीचा दिलेला फॉर्म्युला 'स्वामिनाथन फॉर्म्युला' या नावाने प्रसिद्ध आहे.  पिकावरील किमान हमी भाव त्याच्या पिकाच्या सरासरी किमतीपेक्षा किमान ५० टक्के जास्त असावा असे त्यांनी सुचवले होते. शेतकरी हिताच्या दृष्टीने हे क्रांतिकारी पाऊल निश्चितच मोलाचे ठरले आहे; परंतु आजपर्यंत सरकार नावाच्या व्यवस्थेने या सूत्राची अद्यापही अंमलबजावणी केलेली नाही. १९८७ मध्ये त्यांना कृषी क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मानले जाणारे पहिले जागतिक अन्न पारितोषिक देण्यात आले.

शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक वसंत फुलवणारा हा  'शेतकऱ्यांचा मसिहा' गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी काळाच्या पडद्याआड गेला. शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी यावी, व याकरिता त्यांच्या उत्पादित मालाला सरकारने हमीभाव द्यावा, हीच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल.

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

लेखक आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून सा.करवीर काशी चे संपादक आहेत.


गेल्या आठवड्यात भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी संसदेच्या सभागृहात वापरलेली भाषा कुठल्या गल्लीबोळातली किंवा रस्त्यावरच्या भांडणातली नाही, तर ही लोकशाहीच्या मंदिरातील आहे. रमेश बिधुरी यांनी बसप खासदार दानिश अली यांना उद्देशून असभ्यतेचा कळस करणारी ही भाषा वापरली आहे. वास्तविक संसदेत संयम आणि शिष्टाचार पाळण्याची शपथ घेतली जाते, पण अलीकडे संसदेत आणि संसदेबाहेरही राजकारणी व्यक्ती जी भाषा वापरतात, ती नक्कीच आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश केला, तेंव्हा त्यांनी संसदेच्या प्रवेश पायऱ्यांवर साष्टांग नमस्कार घातला होता. शिवाय संसद म्हणजे लोकशाहीचे अत्युच्च व पवित्र मंदिर आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. त्याच संसदेत अर्थात लोकशाहीच्या मंदिरात मोदी यांच्याच पक्षाच्या एका खासदाराने या शिष्टाचाराला पायदळी तुडवले आहे. मात्र लोकसभा अध्यक्षांनी समज देण्यापलीकडे काहीही केलेले नाही. भाजपच्या अध्यक्षांनी आता मात्र बिधुरी यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे ऐकायचे ठरवले आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अशी भाषा वापरली तर मात्र अशी सवलत देण्यात आलेली नव्हती. हे प्रकर्षाने या ठिकाणी लक्षात घेण्याजोगे आहे, संसदेतील सत्ताधारी आणि विरोधी खासदारांबाबतही आता असाच आपपरभाव केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपचा हा खासदार लोकसभेत शिवराळ भाषा वापरत असताना त्याला समजावून थांबवण्याऐवजी एकेकाळी संसदीय कार्यमंत्री राहिलेल्या रवीशंकार प्रसाद आणि ज्येष्ठ नेते हर्षवर्धन हे दोघे बिनदिक्कतपणे हास्यकल्लोळात रमले होते. शिवाय आणखी गंभीर बाब म्हणजे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्या बिधुरी यांचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अली यांनी टीका केली होती, म्हणून त्या टीकेला उत्तर देण्यासाठीच बिधुरी यांनी अशी भाषा वापरली असे सांगितले जाते. खरं तर भाजप अली यांच्या टीकेला समर्पक उत्तर देऊ शकला असता; परंतु गल्लीतल्या भांडणासारखी भाषा सत्ताधारी पक्षाच्या एका खासदारांनी विरोधी पक्षांच्या दुसऱ्या खासदाराविषयी वापरावी, तेही संसदेत. हा लोकशाहीच्या मंदिराला हा कलंक आहे. यापूर्वी द्वेषमूलक वक्तव्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा असे प्रकार थांबवण्याच्या सूचना ही दिल्या आहेत; मात्र अलिकडच्या काळातील राजकारण्यांनी ते कधीच गांभीर्याने घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अलिकडे सार्वजनिक व्यासपीठांवर सुध्दा भाषेची शोभा राखणे आवश्यक मानले जात नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची भाषा आता संसदेपर्यंत पोहोचली आहे. रमेश बिधुरी यांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जी भाषा वापरली, तशी यापूर्वी कधी कुणी वापरल्याचे ऐकिवात नाही. यावरून साहजिकच विरोधी पक्षाने सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या राहूल गांधी, जयराम रमेश यांनी याबद्दल खेद व्यक्त केला आहे. संसदेचे आजवरचे पावित्र्य जपले जाणार आहे की नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. बिधुरी यांच्या भाषणाचा तो भाग आता सोशल मीडिया वरून मोठ्या प्रमाणावर प्रसारित केला जात आहे. संसदेची स्वतःची प्रतिष्ठा आहे, तिचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. संसदेची भाषाही ठरलेली असते. अनेक निषिद्ध शब्द आहेत. असा उठसूठ कोणताही शब्द तेथे वापरता येणार नाही, की जो असंसदीय घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाचे खासदार बोलण्यासाठी  पूर्वतयारी करून तिथे येतात. बिधुरी यांना याची माहिती नसेल का, असाही एक प्रश्न उपस्थित होतो. साधनसुचितेचा आणि सुसंस्कृतपणाचा ढोल बजावणाऱ्या भाजप सरकारने याबाबत कडक कारवाई करायला हवी होती, असे खुद्द विरोधी पक्षांसह भाजपमधील काही जणांचे मत आहे, मात्र सोयिस्करपणे मौन बाळगून भाजपने आपला एकाधिकारशाही व हडेलहप्पीपणा दाखवला आहे. विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा अध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र केवळ कारणे दाखवा नोटीस बजावणे म्हणजे सरकारचा वेळकाढूपणा व बोटचेपेपणा आहे.

सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आणि त्यामुळे लोकशाहीची प्रतिष्ठा आणखी बळकट होईल, असे सांगितले जात होते; परंतु संसदेच्या नव्या इमारतीतील विशेष अधिवेशनात मानसिकता मात्र जुनीच राहिलेली आहे. संसदेच्या नव्या इमारतीतील पहिल्याच अधिवेशनाला रमेश बिधुरी यांच्या आक्षेपार्ह वर्तनाने गालबोट लागले आहे. इतर पक्षांच्या नेत्यांनी सभागृहात किरकोळ चुका जरी केल्या, तरी त्यांना संसदेतून निलंबित केले जाते आणि बिधुरी यांनी सभागृहात सहकारी खासदाराला शिवीगाळ केली, तरीही त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, या  प्रश्नाचे उत्तर साळसूदपणे दिले जात नाही., याला काय म्हणावे! काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी रमेश बिधुरी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. पण याकडे लोकसभा अध्यक्षांनी दुर्लक्ष केले आहे, या प्रकाराने लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. शिवाय भाजपला तर सर्वाधिक नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. वास्तविक, भाजपच्या नेत्याने विशिष्ट समाजाच्या लोकांसाठी असे आक्षेपार्ह शब्द वापरण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही खासदार आणि अनेक नेते मोठ्या गर्दीच्या सभांच्या मंचांवरून अशी द्वेषपूर्ण भाषणे देताना अनेकदा देशाने पाहिले आणि ऐकले आहे. काही लोक उघडपणे एका विशिष्ट समुदायाप्रती हिंसक वर्तन प्रवृत्त करताना आणि त्यांचे व्यवसायही बंद करताना दिसतात. त्यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पक्ष आणि सरकारला कडक निर्देश दिले आहेत; मात्र तरीही अशी द्वेषयुक्त भाषणे थांबत नाहीत, त्यामुळे एका विशिष्ट समुदायाप्रती द्वेषाचे वातावरण निर्माण करून नेहमीप्रमाणे राजकीय फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी बिधुरी यांच्या या असभ्य कृत्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. खासदार दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून बिधुरी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. संसदेत अशी शिवराळ भाषा वापरणे हा मोठा गुन्हा मानला जातो, यापूर्वीही भाजप नेते गिरिराज सिंह यांच्या विधानावरुन गदारोळ झाला होता. काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांच्यावरची त्यांची असभ्य टिप्पणी व्हायरल झाली होती; मात्र ती घटना संसदेबाहेरची होती. काही दिवसांपूर्वी काँग्रेसनेते अधीररंजन चौधरी यांनी मोदी यांच्यावर भाष्य केले होते आणि त्यांना निलंबित करण्यात आले होते.

२०१८ मध्ये राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरिप्रसाद यांचे नाव फिरवून त्यांची खिल्ली उडवली. सभापतींना ते रेकॉर्डमधून काढून टाकावे लागले होते. २०२० मध्येही अशीच घटना घडली होती. २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजप नेते अरुण जेटली यांच्याबाबत केलेली काही विधाने रेकॉर्डमधून काढून टाकावी लागली होती. संसदीय आणि असंसदीय भाषेसाठी राजकीय जीवनात आता लक्ष्मणरेखा उरलेलीच नाही. असा या घटनेनंतर राजकीय वर्तुळात सूर निघतो आहे. भाषेतील संयम आणि शिष्टाचार पाळणं हे सर्वच लोकप्रतिनिधींचं‌ कर्तव्य आहे, आणि संसदेचे पावित्र्य जपण्यासाठी शपथ ही दिली जाते, मग या शपथेला काय अर्थ राहिला आहे?, अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ यानिमित्ताने सुज्ञांच्या मनात उठलेले आहे.

- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

(लेखक आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून सा.करवीर काशी चे संपादक आहेत.)

सध्या ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साउथ या दोन संकल्पना वेळोवेळी ऐकू येत आहेत. विशेष करून G ट्वेंटी शिखर परिषदेमध्ये त्या परिषदेचे निमंत्रक किंवा शेरपा अमिताभ कांत यांनी असे उद्गार काढले की, ही परिषद ग्लोबल साउथ चा आवाज असेल. त्याचबरोबर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत हा ग्लोबल साउथ चा आवाज बुलंद करत आहे, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. आता  हे ग्लोबल साऊथ म्हणजे नेमकं काय आहे? याचं महत्त्व काय आहे?

ग्लोबल साउथ ही काही भौगोलिक संकल्पना नाही. यामध्ये साउथ या शब्दाचा समावेश असला, तरी दक्षिण गोलार्धातील सर्वच देश या संकल्पनेमध्ये येत नाहीत. यामध्ये समाविष्ट असलेले अनेक देश उत्तर गोलार्धामधीलच आहेत. उदाहरणार्थ  भारत आहे, चीन आहे आणि उत्तर आफ्रिकेमधील सर्व देश आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे जरी दक्षिण गोलार्धातील असले तरी त्यांचा समावेश मात्र ग्लोबल साउथ मध्ये होत नाही तर ग्लोबल नॉर्थ मध्ये होतो.  ज्याला आपण सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा जीडीपी म्हणतो, त्याच्यावर आधारित दोन्ही गोलार्धातील तफावत दर्शविण्याकरता 1980 च्या सुमारास जर्मनीचे माजी कॅन्सलर  विली ब्रांट यांनी ही संकल्पना मांडली होती. ही एक भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक आणि विकासात्मक संकल्पना आहे.  तसेच गरीब आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांचा या संकल्पनेमधून फायदा होऊ शकतो असे हॅपिमन जेकब यांचे मत आहे. जेकब हे आपल्या दिल्ली येथील धोरणात्मक आणि संरक्षण संशोधन परिषदेचे संस्थापक आहेत.  सध्या तरी ग्लोबल साऊथ या संकल्पने मध्ये दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील देश आहेत, आफ्रिकेतील देश आहेत, आसीयान देश आहेत, तसेच भारतीय उपखंडातील देश आहेत, आखाती प्रदेशात देश आणि ओशियान बेटवरील राष्ट्रे आहेत. ग्लोबल साऊथ हा शब्द अक्षरशः एक वेगळी वर्गवारी किंवा अलगपणा  दाखवणारा हा  शब्द आहे. कारण युरोपमधील एकाही प्रदेशाचा यामध्ये समावेश नाहीये. आणि हा शब्द संयुक्त राष्ट्रसंघ मधील 77 देशांच्या गटाला संदर्भित करतो. पण हे देखील काहीसं गोंधळात टाकणारे असतो, कारण प्रत्यक्षात युनो मध्ये त्या 134 देशाची उपस्थिती आहे, जे प्रामुख्याने विकसनशील मानले जातात. परंतु यामध्ये चीनचा समावेश असल्यामुळे त्याबाबत मतभेद आहेत. आखाती देशातील काही अति श्रीमंत राष्ट्र यामध्ये आहेत, पण त्यांचा देखील ग्लोबल साउथ मध्ये समावेश करण्यात आल्यामुळे  जरा चमत्कारिकच जाणवते.

आता  G77 हा संयुक्त राष्ट्रसंघामधील एक गट असला, तरी संयुक्त राष्ट्र मात्र आपल्या कामकाजामध्ये ग्लोबल साउथ हे संबोधन कधीच वापरत नाही. ग्लोबल साउथ ही बहुदा विकसनशील राष्ट्रांसाठी वापरली जाणारी व्याख्या आहे. या जानेवारीमध्ये नवी दिल्लीमध्ये 'व्हाईस ऑफ द ग्लोबल साऊथ' ही परिषद झाली होती. त्यामध्ये 125 देश सहभागी झाले होते. पण तेव्हां चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही मात्र गैरहजर राहिले होते.

1960 च्या दशकामध्ये ग्लोबल साऊथ हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला, पण तो त्यावेळी जास्त प्रसिद्ध झाला नाही. शीतयुद्धाच्या वेळेला जगाचे तीन भाग होते. प्रथम जग, द्वितीय जग आणि तृतीय जग म्हणून संबोधले जात होतं. प्रथम जग म्हणजे जे अमेरिकेच्या बाजूला होते, द्वितीय जग म्हणजे जे सोव्हिएत रशियाच्या बाजूला होते, आणि तृतीय जग यांच्यापैकी कोणाबरोबर नव्हते. पण एक तर ही राष्ट्रे अविकसित होती किंवा विकसनशील होती. पण सोवियत युनियनच्या पत नानंतर शीतयुद्ध संपुष्टात आले. आणि तिसरे जग हा शब्द जास्त प्रचलित व्हायला लागला. पण जगातील बहुतांशी विकसनशील राष्ट्रे अवमानास्पद शब्द म्हणूनच त्याकडे बघत होते.

आता ग्लोबल साउथ ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा अभ्यास केला, तर लक्षात येते की, जगातील बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या आणि विस्तृत अशा प्रदेशां चा यामध्ये समावेश आहे. तसे बघितले तर हा शब्द एक दिशाभूल करणारा आहे. कारण यामध्ये चीन आणि भारत यांच्यासारखे ते देश आहेत, ज्यांची लोकसंख्या जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. लोकसंख्या प्रत्येकी जवळपास दीडशे कोटींच्या आसपास आहे. पण चीनचा जीपिडी 19 लाख कोटी आहे आणि भारताचा मात्र पावणेचार लाख कोटी. म्हणजे हे दोन देश ज्यांची लोकसंख्या जवळपास समान आहे त्यांच्या जीडीपी मध्ये एवढे जास्त अंतर आहे. आणि त्याचबरोबर  पॅसिफिक महासागरातील एक छोट्याशा वानुऑटो या देशाची लोकसंख्या 30,000 पेक्षा कमी आहे पण जीडीपी मात्र साडे 98 कोटी डॉलर आहे. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील झांबिया या देशाची लोकसंख्या जवळपास दोन कोटी असून जीडीपी मात्र तीस लाख कोटी रुपये आहे. म्हणजे आता अशा वेगवेगळ्या प्रकारची सर्व राष्ट्रे, यांच्या जीडीपी वेगळ्या, यांच्या संस्कृती वेगळ्या आणि त्यांच्या लोकसंख्या भिन्न आहेत- हे सर्व एकत्र राहू शकतील का? तसेच त्यानंतर त्यांचा कितपत असर जागतिक राजकारणावर पडेल?

सध्या G20 च्या निमित्ताने एवढं मात्र लक्षात येत आहे की  चीन या  संघटनेला नाटोक्या किंवा यूएसएसआरच्या धर्तीवर आपल्या अजेंड्या नुसार वापरू इच्छितो की, जेणेकरून त्याची एक वेगळी आघाडी उभी राहावी आणि सद्यस्थितीमध्ये ज्या ज्या जागतिक शक्ती आहेत त्यांना शह देता यावे. आता भारताचा जी ट्वेंटी च्या अध्यक्षपदाचा कालावधी संपत आलेला आहे. कदाचित त्यामुळे असेल पण नुकत्याच झालेल्या G7 देशांच्या परीषदे मध्ये 'ग्लोबल साउथ' हा शब्दप्रयोग वापरण्यापासून सर्व राष्ट्रांना आणि विशेष करून विकसीत देशांना परावृत्त्त करण्याविषयी चर्चा झाली. कारण हा धोका जाणवला की, ग्लोबल साउथ ही संघटना चीनसारख्या राष्ट्राच्या हातामधील आयुध बनु शकते. आणि याचा उपयोग चीन आपल्या हितसंबंधांना चालना देण्यासाठी करू शकतो.

सध्या तरी आम्ही फक्त याबाबत विचारविनिमय करू शकतो, पण विषाची परीक्षा कशाला पहायची? पुन्हा एकदा हिंदी चिनी भाईभाई चे हलाहल पुन्हा एकदा पचविण्याची वेळ येऊ नये आम्हाला  सावधच राहायला हवं हे नक्की!!!

- डॉ. इकराम खान काटेवाला

9423733338


जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी हे गाव आणि या गावातील मनोज जरांगे पाटील या शेतकरी तरुणाचं नाव आता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात, गावागावात, वाड्यावस्त्यांत अल्पावधीतच पोहचलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व त्यासाठी सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी त्यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकारलाच अक्षरशः घाम फोडला आहे.

मनोज जरांगे-पाटील हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते नाहीत, राज्यात मराठा समाजाच्या अनेक संघटना आहेत. मात्र अशा कुठल्याही संघटनेचे ते पुढारी नाहीत, एवढेंच नव्हे तर साधे सरपंच-उपसरपंचही नाहीत. एका सर्वसामान्य खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले मनोज जरांदे पाटील हे तरुण शेतकरी आहेत. शेती पण फार आहे असे नाही, जेमतेम दोन ते तीन एकर वडिलोपार्जित शेतीत ते वर्षभर राबतात, शिवाय ज्या समाजात आपण जन्माला आलो, त्या समाजासाठी कर्तव्य भावनेने समाजकार्य करतात. मराठा समाजातील हलाखीची आर्थिक व सामाजिक परिस्थिती पाहून ते व्याकूळ झाले आणि गेली वीस वर्षे ते मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी  सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजासाठी कार्य करीत आहेत.

तसं पहायला गेलं तर त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत सामान्य व साधं आहे. प्रकृतीने सडपातळ, खुरटलेली दाढी, अंगावर मॅनेला व साधी विजार, दिसायला फाटका पण अंतःकरणाने समाजासाठी काही करण्याची पुरेपूर उर्मी भरलेला असा प्रामाणिक कार्यकर्ता आहे.

त्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शासकीय जीआर, अध्यादेश मधील भाषा चांगलीच समजते. सरकारशी किंवा सरकारच्या प्रतिनिधीपाशी अटी घालताना त्या कोणाला व कशा घालाव्यात, हेही चांगलेच कळते.

पंधरा दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी या आपल्या गावात त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि बघता बघता त्यांना पहिल्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला, हे पाहून पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. इतकेच नव्हे तर गोळीबार केला‌ असल्याचे ही समोर आले. त्यामुळे त्यांच्या उपोषणाला मोठी प्रसिद्धी मिळाली. अंतरवाली सराटी या गावाचं नाव राज्याच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील नेत्यांची त्यांना भेटण्यासाठी रिघ लागली. शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले, राज ठाकरे, संजय राऊत, प्रकाश आंबेडकर आदी विरोधी नेत्यांनी त्यांची भेट घेतली. गिरीश महाजन, अर्जुन खोतकर, नितेश राणे आदी सत्ताधारी नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला. पण ते आपल्या मागण्यांशी ठामच राहिले आहेत. खरं तर सरकारकडे बलाढ्य यंत्रणा असते. पण मनोज जरांदे-पाटील यांनी अत्यंत मुत्सद्दीपणा व धैर्य दाखवून सरकारला आपल्या मागण्यांसाठी विचार करायला भाग पाडले आहे. मराठा समाजावरील होणाऱ्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी निकराचा व अतितटीचा लढा पुकारला आहे. मराठा समाजाला पाहिजे तसा जी.आर. मनोज जरांगे पाटील यांनी काढायला लावलाच, पण नंतर नव्या अटी लादून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी न्याय्य मागणी सुध्दा केली आहे.

मनोज जरांदे पाटील यांनी अत्यंत सनदशीर मार्गाने व आत्मविश्वासाने तसेच शांततेत सुरू केलेल्या या आंदोलनाला सर्व थरांतील जनतेने मोठ्या प्रमाणात पाठींबा दिलेला दिसून येत आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा व हिंसाचाराचा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून लाठीमाराचे आदेश आले, शांततेत चाललेल्या आंदोलनात बेछूट लाठीमार केला गेला, असा विरोधी पक्षांनी आरोप केला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशीही जोरदार मागणी केली आहे. मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनातून शिंदे फडणवीस पवार सरकारविरुद्ध मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे शिंदे फडणवीस पवार सरकारने जाहीर केले, शिवाय पोलिसांनी लाठीमार केला ही चूक केली, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी जखमी झालेल्या लोकांची माफी मागितली आहे. खरं तर  गृहमंत्र्यांनी आपल्या चुकीची कबुली दिल्यामुळे पोलिस अधिकारी निर्दोष आहेत असा अर्थ होतो, त्यामुळे सरकारने पोलिस अधिकारी यांच्यावर केलेली कारवाई निरर्थक ठरते, हे लक्षात घेतले पाहिजे.

जालन्यातील लाठीमाराच्या घटनेनंतर मराठा समाजाच्या विविध संघटनांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. अनेक ठिकाणी रस्ता रोको, बंद पाळले गेले. रस्त्यावर येऊन निषेध प्रकट झाले. जाळपोळ झाली. एसटीच्या बसेस व खासगी वाहने जाळली गेली. बारामती सारख्या अजित पवार यांच्या मतदारसंघात फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा किंवा अजितदादांनी सरकारमधून बाहेर पडावे अशीही मागणी होत आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करून राज्य सरकारने मंत्रिमंडळाची तातडीने बैठक घेऊन एक दिवसात जीआर काढला. त्यात म्हटले आहे, मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली आहे, अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामशाहीतील महसुली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख कुणबी असा असेल, तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्याची काटेकोर तपासणी करून त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यास शासन मान्यता देत आहे.

या जीआरच्या आधारे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, म्हणून त्यांनी म्हटले आहे की, "केवळ मराठवाड्यातील मराठ्यांना नव्हे तर महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण देता येईल, एवढे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. हैदराबादपासून मुंबईपर्यंत आम्ही पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे, दस्तऐवज आम्ही सरकारला द्यायला तयार आहोत, केवळ वटहुकूम काढण्याची गरज आहे." निजामाच्या दस्तऐवजात कुणबी असल्याचा उल्लेख असलेल्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र सरकार देणार आहे. पण असे दस्तऐवजच मराठा समाजाकडे नाहीत. कुणबी म्हणून निजामकालीन नोंदी असलेले १९४८ पूर्वीचे कागद सापडणे कठीणच आहे आणि जात प्रमाणपत्रासाठी तोच मोठा अडथळा आहे. मुळात मराठा समाजाचा अशिक्षितपणा व अनास्था यामुळे वंशावळीचे दस्तऐवज व नोंदच मिळत नाही, तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही हाच त्याचा अर्थ आहे. म्हणूनच जीआरमधून वंशावळीचा उल्लेख काढून टाका, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली आहे. त्यामुळे उपोषण थांबवा म्हणून त्यांची समजूत काढण्यात सरकार अपयशी ठरले आहेत. जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा आरक्षणासाठीची लागणारी कागदपत्रे व दस्तऐवज आहेत, या  विषयावर त्यांचा प्रचंड व्यासंग आहे, त्यामुळे त्यांच्या तोंडाला पाणी पुसणे हे सरकारला शक्य होणार नाही.

-डॉ. सुनीलकुमार सरनाईक

कोल्हापूर, भ्रमणध्वनी: ९४२०३५१३५२

(लेखक आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात जुन, जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने पुर्णपणे दडी मारल्याने शेतीत दुबार पेरणीचे संकट घोंघावू लागले आहे. सप्टेंबर महिन्याचे आगमन झाले असलेतरी महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्हे कोरडे ठणठणीत पडले आहेत., खरं तर राज्यभरात  प्रतिवर्षी १५ ते २० जून पर्यंत मृगाच्या सरी बरसून धरणीमाता चिंब न्हात असते. याआधीच खरीप हंगामातील पेरण्या करून बळिराजा पावसाची प्रतीक्षा करीत असतो. पण यंदा पावसाळ्याचा ऋतू संपत आला तरी पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पूर्वमोसमी पावसाबरोबर पुढे चार महिने आपल्याकडे मुबलक वर्षाऋतू बरसत असतो. मात्र यंदा महाराष्ट्र राज्यामध्ये ऐन पावसाळ्यात कडकडीत उन्हाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी बळिराजा मोठ्या चिंतेत पडला आहे. बिपरजाॅय चक्रीवादळ आणि अलनिनोचा परिणाम मान्सून लांबणीवर झाला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे, अर्थात या सर्व हवामानातील बदलामुळे राज्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली आहे.

दुष्काळ ही निसर्गनिर्मित आपत्ती आहे. दुष्काळाचा परिणाम सर्व प्राणीमात्रांवर व नैसर्गिक साधनसंपत्तीवर होतोच, शिवाय ही एक भयानक आपत्ती आहे. दुष्काळात अनेक प्रश्न निर्माण होतात. मानवी जीवनात अत्यंत आवश्यक असणाऱ्या पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवू लागते. पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. मोठ्या प्रमाणात पाणीप्रश्न, तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न,  शेतकऱ्यांच्या व शेतमजूरांच्या रोजगाराच्या समस्या, पशुधन जगविण्यासाठीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या कर्जफेडीसाठीचा प्रश्न, याबरोबरच आरोग्य, शिक्षण, वीजनिर्मिती, धान्याची उपलब्धता यांसारख्या अनेक प्रश्न व समस्या आ वासून उभ्या राहतात. अर्थात या सर्व प्रश्नांना व समस्यांना शेतकरी व सरकार सामुहिकपणे व सहकार्य तसेच समन्वयाने सामोरे जावे लागते. दुष्काळासारख्या भयानक नैसर्गिक आपत्तीशी सामना करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही. त्यासाठी लोकांनी ध्येर्याने व धाडसाने तसेच संयम व सामंजस्याने, एकजुटीने सक्षमपणे संघटीत होऊन या परिस्थितीवर मात करणे गरजेचे असते. अशा आपत्तीच्या काळात हिंमत व विश्वास या दोन गुणांचा कस लागतो.  दुष्काळाला तोंड देण्यासाठी परस्परांविषयी सहानुभूती, समन्वय, सहकार्य, संमजसपणा आवश्यक आहे.

दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठी शासनाचे सहकार्य व पाठबळ यांची नितांत गरज असते.  शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता, दीनदुबळे यांच्यात संकटाला तोंड देण्यासाठी निर्भयता व ध्येर्य निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची असते. शासनाची सकारात्मक सहकार्यांची भूमिका व शासनाचे सर्व प्रकारचें साहाय्य अशा संकटाच्या काळात अत्यंत महत्त्वाचे असते.

महाराष्ट्र राज्यात पावसाने दिलेल्या हुलकावणीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन शासनाने सर्व प्रथम दुष्काळ जाहीर करून सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे. तसेच अशा संकटाच्या वेळी शासन आपल्या पाठीशी आहे, यांची जाणीव सर्वसामान्य जनतेला करून दिली पाहिजे.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने कंबर कसली पाहिजे.अशा बिकट परिस्थितीत जनतेच्या गरजेच्या वस्तू पुरवण्याची जबाबदारी मायबाप सरकारची असते. यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे असते. पर्जन्यमान पुरेसे झाले नसल्याने किंवा पावसाळा कोरडा गेला असल्याने पुढचे ७ ते ८ महिने एवढ्या मोठ्या कालावधीकरिता शासनाने सहानुभूती व समन्वयाने नियोजन करून व नियोजनावर हुकूम अंमलबजावणी केल्यास दुष्काळाची तीव्रता कमी होऊन राज्यातील जनतेला दिलासा मिळेल.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी शासनाची असते.ज्या ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असेल तेथे तेथे उपलब्ध पाणीसाठ्यातील पाणी नियोजनबद्ध रीतीने पुरविले पाहिजे. सर्वसामान्य जनतेने पाणी जपून वापरले पाहिजे. पाणी जपून वापरले जाते की नाही, यावर कटाक्षाने प्रशासन यंत्रणेने लक्ष ठेवले पाहिजे. अनेक शहरांमध्ये पाइपलाइन गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असते. अशा गळणाऱ्या पाईप ताबडतोब दुरूस्ती करणे आवश्यक आहे. अनेक शहरांमध्ये पाण्याचे टॅंकर रस्त्यावर पाणी सांडत जातांना दिसतात. त्यामुळे हजारो- लाखो लिटर पाणी वाया जात असते, शासनाच्या पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी अशा पाईपगळती व टॅंकर गळतीकडे लक्ष देऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी, तरच पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवणार नाही.

दुष्काळात रब्बीचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येऊ शकत नाही. त्यामुळे जनावरांना लागणारा चारा मिळू शकत नाही. चाऱ्याअभावी शेतकऱ्यांच्या जनावरांचे हाल होतात, त्यांना जगविण्याची जबाबदारी मायबाप शासनाची असते. यासाठी शासनाने गावागावात चारा छावण्या उभारल्या पाहिजेत. शेतकरी व शेतमजूर यांच्या जनावरांना लागणारा चारा आत्ताच बाहेरच्या राज्यातून मागवून त्यांची साठवणूक नियोजनबद्ध रीतीने करायला हवी. दुष्काळात त्याचे वाटप सूत्रबद्ध पद्धतीने करणे गरजेचे असते. यातही भ्रष्टाचार होणार नाही,हे कटाक्षाने पहावे. दुष्काळाच्या काळात सर्व जनावरे पोसण्याची जबाबदारी शासनाची असते, शासनाने हे पशूधन जपले तर शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा व आधार होईल.

राज्यातील उपलब्ध पाणी साठे जपून ठेवणे व  त्याचा गैरवापर होणार नाही, याकडे शासनाने कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.पाणी दोनतीन दिवसांआड सोडण्याची वेळ आल्यास तसे ही नियोजन करणे गरजेचे असते, मात्र उपलब्ध पाण्याचा थेंब नि थेंब जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. धरणातील पाणी सुध्दा जपून ठेवणे आवश्यक असते.उपलब्ध पाण्याचे नियोजन करूनच पिकांसाठी धरणांतून पाणी सोडण्याचा विचार केला पाहिजे. दुष्काळासारख्या अत्यंत भयावह परिस्थितीला तोंड देताना शेतकरी मेटाकुटीला येतो, तो दूहेरी संकटात सापडलेला असतो.एकीकडे दुष्काळामुळे त्यांचे कृषी उत्पादनावर परिणाम होतो व तो आर्थिक संकटात सापडतो, तर दुसरीकडे त्यांने काढलेल्या विविध बॅंका, सोसायटीच्या पीक कर्जाची परतफेड आता कशी करायची याची  त्याला काळजी लागून राहिलेली असते, अशा संकटांत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीजबिल, पाणीबिल माफ करून, तसेच कर्जाच्या हप्त्यात सूट देऊन शासनाने शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा. निसर्गाच्या लहरीपणामुळे व पावसाच्या हुलकावणीमुळे दुष्काळासारख्या अस्मानी संकटाला शेतकऱ्यांनी धीरोदात्तपणे तोंड देण्यासाठी सतर्क व सावध राहावे. परस्पर सहकार्य, समन्वय, सामंजस्याने, एकजुटीने सक्षमपणे संघटीत होऊन राज्यातील दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीशी सामना करावयाचा असतो. तरच नैसर्गिक आपत्तीच्या काळात हिंमत न मारता अशा संकटांवर मात करता येते.

-डॉ. सुनीलकुमार सरनाईक 

कोल्हापूर, भ्रमणध्वनी: ९४२०३५१३५२

(लेखक आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget