Halloween Costume ideas 2015
Articles by "विशेषांक"

जगाची निर्मिती झाल्यापासून हजारो प्रेषित आणि सुधारक येवून गेले. सर्वांनीच समाज सुधारणेचे कार्य केले. पण अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांच्याद्वारे जी क्रांती अल्पकाळात घडली त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी प्रस्तुत केलेला ‘इस्लाम’ हा धर्म जीवनाचे सर्वांग सुंदर मार्गदर्शन करणारी समता, बंधुता आणि एकता प्रदान करणारी समाज व्यवस्था देतो. तसेच अल्लाहाने समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी या धर्तीवर ईश ग्रंथाचे नियोजन केले. पवित्र कुरआन हा ईश ग्रंथाच्या मालिकेतील अंतिम ईशग्रंथ आहे. हा पवित्र ग्रंथ कुरआन मुहम्मद (स.अ.) यांच्यावर अवतरीत झाला. जो मानव जातीच्या समस्त समस्यांचे निराकरण करू शकतो. या पवित्र कुरआनचे मार्गदर्शनच ‘इस्लाम’ची शक्ती आहे, जी मनुष्याला विचार आणि आचाराच्या उच्चतम शिखरावर विराजमान करते. शांती व सुरक्षिततेचा मार्ग दाखविते. कुरआनच्या शिकवणीने विचार, मन आणि बुध्दी यांना चालना मिळते, वैचारिक शक्ती प्राप्त होते, असत्याविरूध्द आणि रूढीवादाविरूध्द प्रत्यक्ष आवाज उठवते आणि प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांनी सादर केलेल्या इस्लामच्या शिकवणुकीचा माणूस स्वीकार करतो. सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मुल्यांना उराशी कवटाळतो. प्रेषित मुहम्मद (स.अ.) इतिहासातील एकमात्र व्यक्तिमत्व आहेत जे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष दोन्ही मैदानात एकाच वेळी सर्वाधिक यशस्वी ठरले आहे. एक विख्यात गणिततज्ञ अंतराळ शास्त्रज्ञ आणि इतिहासकार मायकेल एच. हार्टने जगाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली ठरलेल्या 100 (शंभर) व्यक्तीमत्वाची अभ्यासपूर्ण यादी ‘द हंड्रेड’  च्या नावाने प्रसिध्द केले आहे.  त्यात पहिले स्थान प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांना देण्यात आले आहे. प्रेषित मुहम्मद (स.अ.) यांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून केला जातो. ‘इस्लाम’ म्हणजे शांति, नम्रता आणि अल्लाहच्या इच्छेपुढे शरणागती. अल्लाहने मानवाच्या कल्याणासाठी आणि मार्गदर्शनासाठी या जगात पाठविलेला हा धर्म आहे. इस्लामचा अर्थ लक्षात घेतला तर या धर्माने विश्वशांती व विश्वकल्याणाचा संदेश या जगाला दिला आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात आणि ‘हजयात्रा’ ही इस्लाम धर्माचे आधारस्तंभ आहेत.
    इस्लामचे पहिले मुलभूत तत्व - “कलमा-ए- तयब्बा” चा अर्थ आहे अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही व मुहम्मद (स.अ.) अल्लाहचे प्रेषित आहेत.
इस्लामचे दुसरे मूलभूत तत्व - ‘रिसालत’ म्हणजे प्रेषितत्व हे आहे. अल्लाह एकमेव एक आहे व ईशभक्तीच्या श्रध्देला एक संकृती, एक सभ्यता आणि एक जीवनपध्दतीचे स्वरूप देण्याचे काम पैगंबराचे वैचारिक व व्यवहारीक मार्गदर्शन करीत असते. त्यांच्याचद्वारे आम्हांला कायदा प्राप्त होतो. या कायद्याला अभिप्रेत असलेली जीवन व्यवस्था प्रस्थापित होते आणि म्हणून (तौहीद) एकेश्वर वादानंतर रिसालतवर ईमान आणते. इस्लामची समाजरचना या तत्वावर आधारलेली आहे. मूर्ती पुजा इस्लाममध्ये निषिध्द मानली जाते. इस्लाम सामाजिक वृत्तीच्या विकासाला जास्त महत्व देतो हे नमाज, रोजा, जकात, हज यासारख्या मूलभुत धार्मिक कार्याने समजते. इस्लाम माणसाची ईश्वर विषयक जी कर्तव्य आहेत त्यापेक्षा त्याची आपल्या बांधवांसंबंधी जी कर्तव्य आहेत त्याला अग्रक्रम देतो व जगात शांति प्रस्थापित करतो.
नमाज :- उदाहरणार्थ अजान झाली तर सर्व नमाजसाठी मशिदीत जातात. नमाज आदा करतांना मशिदीत गरीब, श्रीमंत, काळे-गोरे एकत्र जमा होतात, राव असो वा रंक असो, खांद्याला खांदा लावून, गुडघे टेकवून परमेश्वराची आराधना (इबादत) करतात. दुसऱ्याला कमी लेखण्याची, तुच्छ समजण्याची प्रवृत्ती इस्लाम धर्मात आढळत नाही. अहंकाराला मुळापासून नष्ट केले जाते. इस्लाम हा पहिला धर्म आहे कि ज्या धर्माने लोकशाही म्हणजे काय हे शिकविले. इस्लामची लोकशाही पाचवेळा दृष्य स्वरूप धारण करते.
    आम्ही सर्व भारतीय. भारतात हिंदू-मंदिरात परमेश्वर आळवतो, मुसलमान - मशीदीमध्ये संभाषण करतो, ख्रिस्त - चर्चमध्ये परमेश्वराला हाक मारतो, शीख - गुरूद्वारामध्ये प्रार्थना करतो. पण हे सर्व संपल्यावर मंदिरातून मशिदीतून गुरूद्वारातून किंवा चर्चमधुन जो माणूस बाहेर पडतो तो हिंदू नाही, मुसलमान नाही, ख्रिस्त नाही, शीख नाही तो फक्त भारतीय आहे, माणुस आहे हे इस्लाम शिकवतो.  धर्म हा व्यक्ती आणि अल्लाहास जोडण्याचा प्रयत्न करतो हे प्रेषित मुहम्मद (स.अ.) ची शिकवण कुणीही विसरता कामा नये जी जगात शांती निर्माण करते.
    प्रेषित मुहम्मद (स.अ.) जगातले पहिले व्यक्तीमत्व आहेत ज्यांनी इतिहासात पहिल्यांदा समतेचा व्यवहारीक संदेश दिला. केवळ 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी या समतेवर आधारित समाज स्थापन केला. जैद नावाच्या काळया  गुलामाला आपली आत्या बहिण देवून काळया गोऱ्याचा भेद प्रेषितांनी नष्ट केला. हरिसा नावाच्या गुलामाच्या घटस्फोटीतेशी विवाह करून तुच्छ समजल्या जाणाऱ्या  घस्फोटीतेला प्रेषितांची पत्नी बनण्याचा बहुमान दिला. बिलाल नावाच्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या गुलामाला काबागृहावर चढून अजान देण्याचा आदेश देवून कोणताच माणूस अपवित्र नसल्याचा संदेश प्रेषितांनी दिला आणि स्पष्ट केले कि, “आजपासून रानटीपणाच्या सर्व प्रथा आणि परंपरा मी माझ्या पायदळी तुडवीत आहे. कोणाला कोणावर कसलेही प्रभुत्व नसून सर्व समान आहेत. एकाच मानवाची संतान आहेत. सर्वांना एकाच मानवाची संतान मानणे इस्लामच्या मुलभूत सिध्दांतापैकी एक सिध्दांत आहे. समता, बंधुत्व निरंतर नांदावयास हवे. जातीचा, मताचा, लिंगाचा आणि वर्णाचा भेद समाजात कदापी शिरणार नाही अशी इस्लामची तत्वे आहेत जी माणसाच्या वैचारिक प्रगतीची द्योतक आहेत.
    इस्लामचे आगमन भारतात भक्तीमार्गाने इ.स. (629) मध्ये पैगंबराच्या हयातीत झाले. केरळमधील चेरामन पेरूमल मस्जिद भारतामधील पहिली मस्जिद. केरळातील चेरानंद साम्राज्याचा शेवटचा राजाला इस्लामची ओळख झाली आणि त्यांनी मक्काकडे प्रस्थान केले. प्रेषित मुहम्मद (स.अ.) याच्या सान्निध्यात राहून त्यांना इस्लाम धर्म स्विकारला आणि स्वत:चे नांव ताजुद्दीन (रजि.) असे ठेवले. जेद्दातील राजाच्या बहीणीशी त्यांनी विवाह केला आणि तेथेच स्थायिक झाले. जीवनातील अंतिम काळात त्यांनी केरळमधील आपल्या नातेवाईकांना पत्र लिहून इस्लाम धर्माचा प्रसार केला.
    इस्लाममधील एक महत्वपूर्ण असलेला स्तंभ जकात आहे. जकात इस्लाम धर्मात गोरगरिबांसाठी आहेत. प्रत्येकी मुस्लीम जो जकात देण्यास पात्र आहे त्यांने आपल्या कमाईच्या प्रतिशेकडा अडीच रूपये प्रमाणे जकात गोरगरिब, अनाथ विधवा अथवा गरजवंतांना द्यावी. गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदतीसाठी प्रेषितांनी जकातची योजना इस्लाममध्ये केली. ईश्वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरीता जकात आहे. दिव्य कुराणच्या सुरह-9:60 मध्ये नमूद केले गेले आहे, जगातील सर्व लोकांनी जर या तत्वावर अनुकरण केले तर भूकबळी, कुपोषण अशा खूपच समस्या दूर होतील.
    इस्लाममध्ये सावकारी निषिध्द आहे. कर्ज दिलेल्या पैशांवर व्याज घेणे निषिध्द (हराम) आहे. अल्लाहने (व्यापाराला वैध केला आहे आणि व्याजाला निषिध्द केले आहे) दिव्य कुरआन (सुरह 2: 275)
    व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ 10 वर्षांच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. गरीब व गरजवंताना पैसे उधार मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येवू दिली नाही. अरब प्रदेश पाहता पाहतां आर्थिकदृष्टया इतका सधन-संपन्न झाला कि ज्याच्या आधारे अरब समाजातून दारिद्रयाचा नाश झाला; जनता दान देण्यासाठी हातात रक्कम घेवून फिरू लागली. मुस्लीम साम्राज्याने (इस्लामी नव्हे) जगावर 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता गाजविली. या 1000 वर्षांत एकाही व्याजाच्या व्यवहाराची नोंद इतिहासात आढळत नाही. मुस्लीम शासनाला कधी कर्ज घ्यावे लागल्याची नोंद इतिहासात सापडत नाही. या उलट इतर शासनांना केलेल्या भरमसाठ मदतीच्या नोंदी आढळतात. आज जगाला व्याजमुक्त अर्थव्यवस्थेची ओढ लागली आहे.  व्याजाच्या पाशातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी आज श्रमिक वर्ग व्याजमुक्तीची मागणी करू लागला आहे.
    भारतात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मुख्य कारण गरिबी नसून चक्रवाढ व्याजाचा बोजा आहे. कारण शेतकरी पूर्वीही गरीब होते परंतु गरिबीमुळे त्यांनी आत्महत्या केली नाही. इस्लामचे हे धोरण स्विकारल्यास आज भारताच्या प्रगतीस पोषक ठरणार आहे. मानवी इतिहासात या नवीन समाजास उच्च स्थान प्राप्त होणार आहे. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्व प्राप्त होते. अर्थात मानवतेच्या विकासाचा प्रगतीचा मार्ग याने मोकळा होतो.
    रोजा :- प्रेमाने व सहानुभूतीने वागा, कठोर होवू नका, दयाळू राहा. तुम्ही सदाचरणी बनावे, तुमच्यातील वाईटपणा तुमच्यापासून दूर व्हावा म्हणुन उपवास (रोजे) तुमच्यावर अनिवार्य केले आहेत. खोटे बोलू नये, दुसऱ्यांची निंदा करू नये, व्याभिचार करू नये, रक्तपात करू नये, एका व्यक्तीचे प्राण वाचविणे म्हणजे सर्व मानव जातीचे प्राण वाचविणे आणि एका व्यक्तीची हत्या म्हणजे मानव जातीची हत्या, तसेच दिला शब्द पाळा, पाप टाळा, विश्वासघात करू नका ही इस्लामची शिकवण व तत्वप्रणाली वाखाणण्याजोगी आहे. दारूमुळे मनुष्याचे जीवन यातनामय बनते. उपवास दारूबंदीस जालीम उपाय आहे. एके दिवशी सर्वांना ईश्वराच्या न्यायासमोर उभे राहावयाचे आहे हे विसरू नका. वृध्दापकाळात आपल्या मातापित्याकडे लक्ष देण्यासंबंधी विसरू नका. तहानलेल्यांना पाणी देणे, आंधळयांना मदत करणे, रोजा ठेवा, ज्ञानार्जन करा, त्यामुळे काय निषिध्द आहे आणि काय नाही हे लक्षात येईल.
    हज :- जर ऐपत असेल तर मक्केची हज यात्रा करा. येथे जगातील लोक एकत्र येतात. जगभरातील मुस्लिम संस्कृतीची तोंडओळख होते.
-: मुस्लिमांचे स्त्रियांसाठी योगदान :-
    ज्याकाळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही? सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देवून टाकले. प्रसिध्द मार्क्सवादी भारतीय विचारवंत एम.एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ 13 वर्षाच्या कालखंडात प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील 1400 वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही.
    जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापिका अ‍ॅनीमेरी स्किमेल म्हणतात की, तुलनात्मक दृष्टीने पाहिले असतां असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांच्या मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आईला हा दर्जा दिला कि धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला कि ‘तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.’ मुलीला हे स्थान दिले कि “ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पध्दतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल” अशी शिकवण प्रेषितांनी दिली. इस्लामच्या शिकवणीत अत्यंत संतुलन आहे तो प्रगतीचा एक मार्ग आहे.
: इस्लाम मुक्तीचा मार्ग :
    मानवी  समाजाला सर्वार्थाने सुखी होण्यासाठी दोन प्रकारच्या मुक्ती आवश्यक असते. एक म्हणजे आध्यात्मिक मुक्ती आणि दुसरी भौतिक मुक्ती. इस्लामच्या अभ्यासाने, शिकवणीने, आचरणाने आध्यात्मिक मुक्ती म्हणजे स्वचित्ताची शुध्दी करणे व विकार मुक्त होणे सहज शक्य आहे. नमाज, रोजा याचे उत्तम उपाय आहेत. भौतिक जगाचे प्रश्‍न व त्यातून उद्भवणारे राग, लोभ हे विकार यापासून तो दूर राहू शकतो. इस्लाम कोणत्याही जाती धर्माच्या माणसाशी भांडण, युध्दापासून दूर राहण्याची शिकवण देतो. अध्यात्माचा खरा अर्थ राग, लोभादी विकारापासून मुक्ती मिळविणे हा आहे. भौतिक मुक्ती मिळवून देण्यासाठी इस्लामने महत्वाची भुमिका निभावली आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमानाचा दर्जा, जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा प्रसार, प्रचार इस्लाम नेहमीच करत असतो. प्रचलित काळ भौतिक मुक्तीचा असल्याने दिशा ओळखून सर्व जाती-धर्मीय देशप्रेमींनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास भौतिक मुक्ती मिळावयास वेळ लागणार नाही.  (लेखिका : अध्यक्षा 11 व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल)

प्रा. हाजी फातिमा मुजावर
पनवेल, 8691837086


***
जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांची ‘इस्लाम  : शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग’ या मोहिमेच्या अनुषंगाने शोधनचे उपसंपादक बशीर शेख यांनी मुलाखत घेतली. त्यांनी मोहिमेच्या अनुषंगाने विविध विषयांवर परखड मते व्यक्त केले. ते वाचकांच्या सेवेत सादर. - संपादक
***
प्रश्न : जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र, ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ चा मार्ग ही मोहिम राज्यभर राबवित आहे. याचा उद्देश्य काय?

- बिस्मील्लाह अर्रहमान निर्रहीम. होय बरोबर आहे. 12 ते 21 जानेवारी 2018 या कालावधीत राज्यभर ही मोहिम राबविण्याचा जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने निर्णय केलेला आहे. जमाअते इस्लामी हिंद एक अशी संघटना आहे की, जी एका अशा भारताची कल्पना करते जिथे कोणी भिकारी नसावा, कोणी वेश्या नसावी, महिलांना, वृद्धांना आणि मुलांना त्यांचे अधिकार मिळावेत, सर्वांना समानतेने वागविण्यात यावे, सगळ्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात. त्यांना सर्व सुख सुविधा मिळाव्यात. याशिवाय, सर्व देशवासियांचे अध्यात्मिक जीवन ही समृद्ध व्हावे. सर्व लोकांनी सुखाने रहावे. कोणावरही अत्याचार होऊ नयेत. महिलांविरूद्ध लैंगिक अत्याचार होणार नाहीत, कोणी कोणाची हत्या करणार नाही.
        जमाअत-ए-इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, ज्या अल्लाहने सर्व सृष्टीची निर्मिती केलेली आहे. एका आई-वडिलांपासून सर्वांना जन्माला घातलेले आहे, त्याचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय वरिल गोष्टी साध्य होणार नाहीत. शिवाय मरणोप्रांत जीवनही सफल होणार नाही. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र या मोहिमेद्वारे प्रयत्नशील आहे की, सर्वजण यशस्वी होऊन अंतिमतः जन्नतमध्ये जावेत.
        जमाअतच्या ध्येय धोरणानुसार नेहमीच चार वर्षाची योजना तयार असते. या मोहिमेची आखणी सुद्धा चार वर्षांपुर्वीच करण्यात आलेली होती. ही मोहिम कुठल्याही घटनेची प्रतिक्रिया नाही. आमचा दावा आहे की, इस्लाम मुळात शांती, प्रगती आणि मुक्ती साठीच आहे. हा संदेश सर्वापर्यंत पोहोचविणे ही आम्ही आपली जबाबदारी समजतो. म्हणून ही मोहिम सुरू करण्यात आलेली आहे.

प्रश्न : अल्लाहच्या मार्गाकडे बोलाविणे म्हणजे नेमके काय?
-  अल्लाह हे काही एखाद्या व्यक्तीचे नाव नाही. ती अशी शक्ती आहे जी संपूर्ण विश्वांची मालक आहे. ज्याला सर्व अधिकार प्राप्त आहेत. मानव ही त्याची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. ज्यासाठीच या विश्वाच्या सर्व गोष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत. सर्वांचा मृत्यू त्याच्याच हातात आहे. तो अंतिम निवाड्याच्या दिवसाचा मालक आहे. त्या शक्तीला मुस्लिम अल्लाह म्हणतात. कोणी ईश्वर म्हणतात तर कोणी गॉड म्हणतात. त्याचे मार्गदर्शन सर्वांसाठी आहे. त्याने मानवकल्याणासाठी या पृथ्वीवर वेळोवेळी प्रेषित पाठविले. अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. होत. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय जगात शांतता नांदणे शक्य नाही. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे म्हणजे अल्लाहच्या मार्गाकडे बोलाविणे आहे. 
प्रश्न - देशाच्या सद्यःपरिस्थितीवर आपण काय भाष्य कराल?
- हे पहा ! आपल्या देशाने प्रगती केलेली आहे, यात काही वाद नाही. स्वातंत्र्यानंतर घोर गरिबी होती. लोक ठिगळ लावलेले कपडे घालत होते. शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या. मात्र वेगाने प्रगती करीत देशात शाळा, महाविद्यालये आणि अनेक विद्यापीठे स्थापन झाली. त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात नव-नवीन अभ्यासक्रम सुरू झाले की, आज विद्यार्थ्यांना हवे त्या शाखेमध्ये इच्छेप्रमाणे शिक्षण घेता येते. शिवाय, बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम झालेले असून, रेल्वेचे जगातील सर्वात मोठे जाळे आपल्याकडे आहे. विमान प्रवासही सहज शक्य झालेला आहे. भुपृष्ठ मार्गही विस्तारलेले आहेत. ही सर्व प्रगती झालेली आहे. हे मान्य आहे. मात्र यासोबत विषमता ही वाढलेली आहे, याचाही इन्कार करता येणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की, कोणाला मोठ-मोठ्या इमारती मिळत आहेत तर कोणाला फुटपाथवर झोपावे लागत आहे. महिलांविरूद्ध हिंसेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या सुरक्षित नाहीत. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे अशक्य झालेले आहे. मोठ-मोठ्या शाळा, महाविद्यालये प्रत्येक गावात उभी आहेत. मात्र त्यांचे शैक्षणिक शुल्क इतके जास्त आहे की, गरीबांची मुले त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकत नाहीत.
मोठ्या प्रमाणात जातीयवाद वाढत आहे, जो समाजाच्या अनेक घटकांमध्ये  फूट पाडत आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर भारत महासत्ता होवू शकणार नाही. भारताला महासत्ता करावयाचे असेल तर विकासासोबत समता, न्याय, एकात्मता आणि अध्यात्मिकता या क्षेत्रातही प्रगती करावी लागेल. त्यासाठी जमात आपल्या परीने आपली भूमिका बजावत आहे.

प्रश्न : आपल्याला देशात कुठल्या प्रकारचा बदल अपेक्षित आहे?
-  सगळ्यांना समान अधिकार मिळावेत. आज दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना त्यांचे अधिकार पूर्णतः मिळत नाहीत. शिक्षण आणि शासकीय नौकऱ्यांमध्ये या लोकांचे प्रमाण किती आहे? याचा विचार झाला पाहिजे. समाजाचा एक भाग दाबला जात असेल तर त्याला सर्वांगीण प्रगती म्हणता येणार नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी जेव्हा वाढत जाते तेव्हा वर्गसंघर्षाचा जन्म होतो. गरीब लोक श्रीमंतांवर हल्ले करायला सुरूवात करतात. आज जरी ते दबलेले असतील तरी उद्या ते उठून क्रांती करू शकतात. म्हणून सर्वांसाठी प्रगतीची दारे खुली असणे, सर्वांसाठी समान अधिकार उपलब्ध असणे म्हणजे खरी प्रगती होय. आम्हाला हेच बदल अपेक्षित आहेत. जमाअत या सर्वांसाठी प्रयत्नशील आहे.
प्रश्न - देशात कशा प्रकारची शांती आपल्याला अपेक्षित आहे?
- न्यायाच्या स्थापने शिवाय शांतीची स्थापना होऊ शकत नाही. मी स्वतःला गोरा आणि तुम्हाला काळा समजत असेन, स्वतःला उच्च जातीचा आणि तुम्हाला हलक्या जातीचा समजत असेन, स्वतःला श्रीमंत आणि तुम्ही गरीब आहात हे डोक्यात ठेऊन जर मी तुमच्याशी वर्तन करत असेन तर मी कधीही तुमच्याशी न्याय करू शकणार नाही. जमातचे असे मत आहे की, इस्लामी श्रद्धा ही समाजामध्ये समानता आणते. सबका मालिक एक, हम सब उसके बंदे, मग कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, कोणी श्रीमंत असेल कोणी गरीब असेल, सगळे एकसमान आहेत. हे उद्देश्य साध्य करण्यासाठी इस्लामने पाच वेळेसची नमाज अनिवार्य केली, मस्जिदमध्ये सर्व खांद्याला खांदा लावून नमाज अदा करतात, प्रेषितांच्या काळात अरबी समाजामध्ये उच्च-नीचतेची भावना अतिशय प्रबळ होती. त्यांनी नमाजमध्ये सर्वांना एकत्र उभे करण्याची तरतूद करून ही विषमता मोडून काढली. आज मस्जिदीमध्ये कोट्याधीश जावो, मंत्री जाओ का गरीब भिकारी जाओ सर्व एका रांगेत उभे राहून नमाज अदा करतात. कोणी कोणाला मागे पुढे करू शकत नाहीत. ती समानता आजही जशीच्या तशी पाळली जाते. अशी समानता जेव्हा प्रत्येक समाजात येईल तेव्हा शांती येईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. रंग, जात, धर्म हे वेगवेगळे असू शकतात मात्र माणूस म्हणून सर्व समान आहेत. हा विचार जोपर्यंत प्रबळ होणार नाही तोपर्यंत देशात शांती व प्रगती दोन्हीही साध्य होणार नाहीत. यासाठी ईश्वरावर श्रद्धा ठेवणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपण सर्व ईश्वराचे बंदे असल्याची भावना प्रबळ होते.
        शांती आणि प्रगतीसाठी दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, सर्वांना हे मान्य करणे आवश्यक आहे की, आपण सर्व एका आई-वडिलांची लेकरे आहोत. इस्लामच्या मुलभूत शिकवणीपैकी ही एक शिकवण आहे. जगातील सर्व माणसे हे आमचे भाऊ-बहीण आहेत. मग ते ऑस्ट्रेलियाचे असोत की पंजाबचे. मलेशियाचे असोत की अमेरिकेचे. काळे असोत की गोरे असोत. श्रीमंत असोत का गरीब असोत. या प्रकारची उदात्त विचारसरणी जोपर्यंत आपल्या समाजामध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत शांती स्थापित होणार नाही. जात, रंग, भाषा व प्रादेशिक अस्मिता कुरवाळत बसल्यास कधीच न्यायाची स्थापना होवू शकत नाही. आज 70 वर्षानंतरही आपल्या देशात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटक-तामिलनाडू जलवाद कायमच आहे. अरे ! आपण सर्व भारतवासी आहोत. देश सर्वांचा आहे, पाणी सर्वांचे आहे, मग हे भांडणं कशासाठी? आपण एकमेकांना एका-आई वडिलांची लेकरे समजत नसल्यामुळे हे सगळे विवाद एका देशाचे नागरिक असून सुद्धा वाढत आहेत. एक आई-वडिलाची लेकरे असल्याची मनापासून श्रद्धा असेल तर माणसाचे मन मोठे होते. परिणामी, देशच काय जगभरातील मानवजातीच्या कल्याणाचा विचार आपल्या मनात येतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात हा विचार प्रबळ होणे, शांती स्थापण्याच्या दृष्टिकोणातून अत्यावश्यक असे आम्हाला वाटते.

प्रश्न - इस्लामला कशी प्रगती अपेक्षित आहे?
-  इस्लाम प्रगतीच्या अगोदर डिग्नीटी (सन्मान) चा विचार करतो. आता हेच पहा! प्रेषित सल्ल. यांच्या पूर्वीच्या काळात महिलांना, गुलामांना कुठलेच अधिकार नव्हते. जेव्हा प्रेषितांनी स्त्री-पुरूष दोन्ही समान असल्याची घोषणा केली तेव्हा पुरूषांना धक्काच बसला. स्त्रिया मात्र आनंदी झाल्या. त्यांना इस्लामने वडिलांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क दिला. त्यांना शिक्षणाचा, व्यापार करण्याचा, लग्न  आपल्या पसंतीने करण्याचा, एवढेच नव्हे तर त्यांना युद्धातसुद्धा जाण्याचा अधिकार दिला. जेव्हा गुलामांना सुद्धा त्यांच्या मालकाएवढेच महत्व इस्लामने दिले तेव्हा गुलामांच्या मध्येही एका नव्या शक्तीचा संचार झाला. याच नव्या विचार सरणीतून हळूहळू  गुलामीच्या पद्धतीचेही उच्चाटन झाले. याला समानता आणि प्रगती म्हणतात.
प्रश्न - मुक्ती संबंधी इस्लामची संकल्पना काय आहे?
- अल्लाहने स्पष्ट सांगितले आहे की, मी जगातील सगळ्या गोष्टी तुमच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या आहेत. एवढ्या माझ्या सुविधांचा उपयोग घेवूनही तुम्ही
भक्ती मात्र दुसऱ्यांची करणार? हे मी खपवून घेणार नाही. माझ्या अवाज्ञांची तुम्हाला मी शिक्षा देईन. यावर विश्वास ठेवणे प्रत्येकाला आवश्यक आहे. या जीवनामध्ये आपण जे काही करतो त्याचा आपल्याला एक दिवस हिशोब द्यावा लागणार आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवल्यास मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. हे असेच उदाहरण आहे जसे,  एका देशाचा नागरिक असतांनासुद्धा जो कोणी त्या  देशाशी एकनिष्ठ न राहता दुसऱ्या देशासाठी हेरगिरी करतो. अशा देशद्रोह्याला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही? त्याला मुक्ती कशी मिळेल? जो अल्लाहला सोडून दुसऱ्याची भक्ती करेल त्याला मुक्ती कशी मिळेल? त्याला नक्कीच शिक्षा मिळेल. मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे माणसाने त्याचीच भक्ती करावी, त्याचेच ऐकून रहावे ज्याने त्याला जन्माला घातले. ही तर झाली मुक्तीची व्यापक संकल्पना. व्यक्तिगत स्तरावरसुद्धा भुकेपासून मुक्ती, अपमानापासून मुक्ती, मानसिक तणावापासून मुक्ती मिळविणे सुद्धा यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. इस्लामी जीवन व्यवस्थेमध्ये मानवाच्या या सर्व दुःखापासून मुक्ती देण्याची शक्ती आहे. शेवटची मुक्ती ही नरकापासूनची मुक्ती होय. कुरआनने स्पष्ट म्हटलेले आहे, अल्लाहची आज्ञा मानणारे लोक नेहमीसाठी जन्नतमध्ये मुक्तपणे राहू शकतील. त्या ठिकाणी अनंतकालीन सर्व सुख, सुविधा त्यांंना मिळतील. आज जगात कितीही हुशारी केली तरी अंतिम निवाड्याच्या दिवशी प्रत्येक माणूस ईश्वरासमोर अडकून पडेल. तिथे त्यांची हुशारी चालणार नाही.

प्रश्न : आपल्या देशाने भांडवल आणि समाजवादी व्यवस्था अंगीकारली आहे, यासंबंधी आपले मत काय?
- या व्यवस्थेचा एक दोष असा आहे की, श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो तर गरीब अधिक गरीब. इस्लाम सर्वांना समान आर्थिक संधी देतो. प्रत्येकाची आर्थिक उन्नती होईल, यासाठीही उपाययोजना करतो. कारण समाजामध्ये सगळे समान नसतात. काही दिव्यांग, निराधार असतात. काही लोक काही कारणांमुळे अर्थाजन करू शकत नाहीत. अशा लोकांनाही सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद इस्लाम करतो. त्यासाठी तो श्रीमंतांना आपल्या कमाईतील एक विशिष्ट असा हिस्सा अशा लोकांसाठी दान करण्यासाठी प्रेरित करतो. श्रीमंताच्या बचतीवर किमान अडीच टक्के वर्षाला गरीबांसाठी दान करणे अनिवार्य केलेले आहे. गरीबांना जे काही दान दिले जाते ते अल्लाहला पोहोचते अशी इस्लामची भूमिका आहे. बंदा खुश तो खुदा खुश. माझ्या शेजाऱ्याच्या घरात खायला अन्न नाही आणि मी पुन्हा-पुन्हा हज आणि उमऱ्याला जाण्यासाठी लाखो रूपये खर्च करीत असेल तर माझी ही इबादत स्वीकार केली जाणार नाही.

प्रश्न - संसदेने तीन तलाक देणाऱ्या मुस्लिम व्यक्तींना शिक्षा देण्याचा कायदा करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे यावर आपले काय मत आहे?
- हा प्रश्न फिकाह (इस्लामी न्यायशास्त्र) चा आहे. यासंबंधी सरकारने देशातील उलेमा व मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विश्वासात घेतले पाहिजे, कारण ते त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, असे आमचे मत आहे.

प्रश्न - सध्या देशात हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दरी निर्माण होत आहे. यासंबंधी आपण काय म्हणाल?
- मला तर वाटत नाही की आम्हा देशबांधवात दरी निर्माण झाली आहे. एवढे निश्चित आहे की, काही लोक दरी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण मोठ्या संख्येने देशबांधव सहिष्णु, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष आहेत. जे थोडे लोक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या संदर्भात मुस्लिमांची भूमिका कशी असावी, याबद्दल कुरआनमध्ये स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे. जे तुमच्याशी वाईट वागतात तुम्ही त्यांच्याशी चांगले वागा आणि पहा जे तुमचे कट्टर शत्रु आहेत ते तुमचे जिवलग मित्र झाल्याशिवाय राहणार नाहीत. या शिकवणीची मुस्लिमांनी आठवणीने अंमलबजावणी केली तर परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही.

प्रश्न - अनेक मुस्लिमांना इस्लामच्या तरतुंदीची जाणीव आहे परंतु, ते आपल्या जीवनात त्यांची अमलबजावणी करीत नाहीत, त्यासंबंधी आपण काय म्हणाल?
- इस्लामच्या शिकवणीं योग्यरित्या न समजल्यामुळे त्यांच्या ज्ञान आणि वर्तनामध्ये तफावत दिसून येते. किती लोकांनी कुरआन समजून घेतलेले आहे? किती लोकांनी कुरआनचे भाषांतर वाचलेले आहे? किती लोकांनी कुरआनची व्याख्या (तफसीर) समजून घेतलेली आहे? किती लोक कुरआनच्या शिकवणीनुसार आपल्या मुलां-मुलींचे विवाह करीत आहेत? जोपर्यंत कुरआन आणि हदीसच्या शिकवणी मुस्लिम लोक आत्मसात करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या वर्तनामधील विरोधाभास संपणार नाही.
प्रश्न - शोधनच्या माध्यमाने आपण मुस्लिम तरूणांना काय संदेश द्याल?
- त्यांनी अल्लाहचे आभार मानायला हवेत की, अल्लाहने त्यांना मुस्लिम केले. भारतासारख्या श्रेष्ठ देशात जन्माला घातले. जी संवैधानिक व्यवस्था आपल्या देशात आहे, कदाचित ती जगात दुसरीकडे नसेल. इस्लामच्या शिकवणीच्या पायावर या व्यवस्थेचा लाभ उठवित मुस्लिम युवकांनी सर्वाधिक लक्ष आपल्या शिक्षणावर केंद्रित केले पाहिजे. तसेच देशात शिक्षणाच्या अनुरूप काम करण्याची संधीपण उपलब्ध आहे. तिचा लाभ उठविला पाहिजे. इस्लामचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला पाहिजे. तसेच आपली सर्व ऊर्जा ही सकारात्मक पद्धतीने देशाच्या व स्वतःच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे, हाच माझा संदेश आहे.

बशीर शेख
उपसंपादक
9923715373

 

ज्या प्रकारे मनःशांतीशिवाय अभ्यास, अध्ययन शक्य नाही, परिक्षेत पास होणे शक्य नाही, त्याचप्रकारे कुटूंबात शांतीशिवाय कुटूंबियांची प्रगती शक्य नाही. तसेच गावात, शहरात संचारबंदी, तणाव असेल, तरीही गावात उद्योगधंदे, शिक्षण वगैरे हे सुरळीत चालणे शक्य नाही. यामुळे देशाची प्रगती शक्य नाही. शांती नांदावी यासाठी अशांती पसरविणारी तत्वे कोण व त्यांची मानसिकता कोणती आहे, त्याचे निदान होणे आवश्यक आहे. जाऊ द्या, उगीच कशाला नकारात्मक गोष्टींची घुसळण कशाला? असं म्हणून जर आपण याकडे दुर्लक्ष करत गेलो तर हा रोग आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. म्हणून काही कटू सत्ये पचवणेदेखील आवश्यक आहेत. त्याला फाटा देऊन प्रगती करणे शक्य नाही.
    समाजात अफवा, गैरसमज पसरवून, तेढ निर्माण करून, ध्रुवीकरण आणि विषमता पसरवून आपली पोळी भाजवून घेणारी एक मानसिकता जोपासणारा फॅसिस्ट गट नेहमी राहिला आहे. हा गट समाजात कालांतराने एक एक टूम सोडत असतो. त्यासाठी तो गट फक्त निमित्त शोधत असतो. समाजात तेढ निर्माण करण्याची जी निमित्ते वापरली जातात, त्यापैकी एक म्हणजे आंतर धर्मीय किंवा आंतरजातीय विवाह.  उदाहरणार्थ अशीच एक टूम नुकतीच या गटाने सोडली होती, ती म्हणजे हादिया प्रकरण.
    लव जिहाद हा शब्द सर्वात आधी हिंदू जनजागृतीच्या वेब साइटवर आलाय. तथाकथित ’लव जिहाद’ अपराध आहे, असा कोणताही कायदा घटनेत नाही. धर्मांतरासाठी जबरदस्ती ही कोणीही करो, तो अपराधच असतो, पण त्याला विशिष्ट धार्मिक विशेषण लावणे, हा अपराध आहे. पूर्वोत्तर राज्यात ख्रिश्चन लोकं हे ’गन पॉइंट’वर धर्मांतर करत असल्याचाही आरोप होतो, त्याला काय म्हणाल? वस्तुस्थिती अशी आहे की, कोर्टात लग्न करण्यापूर्वी एक महिना अगोदर रजिस्ट्री कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यामुळे पालकांची मर्जी नसेल तर दोघांच्याही पालकांना याचा सुगावा लागतो आणि ते आपल्या पाल्यांना यापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. कधी-कधी यातून नितीन आगे सारखे प्रकार घडतात, तर कधी सैराट सारखे ऑनर किलींगचेही प्रकरण समोर येतात. हे टाळण्यासाठी वकील लोकं दोघांना ’वन डे मॅरेज’चा सल्ला देतात. वन डे मॅरेज म्हणजे कोणत्याही एका धर्म संस्कृतीनुसार लग्न करायचं आणि त्याच लग्नाची नोंदणी रजिस्ट्री कार्यालयात करून टाकायची. यासाठी दोघेही एका धर्माचे असणे आवश्यक असते. म्हणून दोघांपैकी एक जण दुसर्‍याचा धर्म स्वीकारून टाकतो. यात नेहमी इस्लामच स्वीकारला जातो असं नाही. धर्मयुग मासिकात दर महिन्याला काही मुस्लिम मुली हिंदू बनून हिंदू युवकांशी लग्न केल्याच्या बातम्या देणारं एक नियमित स्तंभच आहे. त्यात त्या धर्माशी काही घेणं देणं नसते. फक्त ती एक कायदेशीर पळवाट असते. यात कोणतंही षडयंत्र, योजना वगैरे नसते. हे केरळ न्यायालयानेही मान्य केलंय की, हिंदू मुली इस्लाम स्वीकारून मुस्लिम युवकांशी लग्न करण्याचे प्रमाण जास्त आहे, मात्र त्यामागे कोणतीही देशविरोधी अशी योजना नाही.
    परंतु मुस्लिम युवकांशी लग्न केल्यानंतर त्यांना जेंव्हा इस्लाम कळतो, तेंव्हा ते इस्लामच्या प्रेमात पडतात. मग त्या मुस्लिम युवकाने काही वर्षांनंतर तीला सोडूनही दिलं, तरी त्या इस्लाम सोडत नाहीत. कारण एक कायदेशीर गरज म्हणून स्वीकारलेला समतावादी इस्लाम त्यांना आता मूक्तीचा एकमेव मार्ग वाटतो. म्हणून त्या दुसरं लग्न करतात तेही मुस्लिम युवकांशीच. अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, अशा लोकांशी प्रत्यक्ष भेट करवून देऊ शकतो. मात्र स्वधर्म अहंकारापायी या गोष्टी अनेक जण मान्य करत नाही. हे कटू सत्त्य पचविण्यासाठी विवेक असावा लागतो. फक्त माझंच किंवा फक्त माझ्याच समाजाचं योग्य, याशिवाय सर्वकाही खोटं, कारण ते दुसर्‍यांचं आहे म्हणून, ही अविवेकी भुमिका सोडली पाहिजे. जे-जे माझं तेच चांगलं म्हणण्यापेक्षा जे-जे चांगलं तेच माझं म्हणून चांगुलपणा आत्मसात करण्याचा सामाजिक विवेक जोपासला गेला पाहिजे. याचे एक उदाहरण अमेरिकेत पाहायला मिळते.
    एक ज्यू महिला दोन वेगळे स्वयंपाक करत होती. तीला कारण विचारले तर म्हणाली की, माझ्या एका मुलाने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर दुसर्‍याने इस्लाम स्वीकारलाय. माझ्या मुस्लिम मुलाला वराहाचे मांस चालत नाही, म्हणून मी त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक करतेय.
    असे उदार स्वातंत्र्य आपले भारतीय संविधानदेखील प्रत्येकाला देते. ती उदारता प्रत्येक भारतीयात असली पाहिजे. याचा अर्थ सगळेच अविवेकी आहेत, असं नाही. विशेषकरून काही अपवाद वगळता हिंदू समाज हा नक्कीच विवेकी, सहिष्णु आहे. आनो भद्राय कांता क्रतवो यन्तु विश्‍वतः म्हणजे विश्‍वभरातून चांगले विचार आमच्याकडे येऊ द्या असे उदात्त विचार हिंदूंचा यजुर्वेद देतो. म्हणूनच भारतात सर्वात जास्त उदात्त इस्लाम, उदात्त अशा हिंदूंनीच स्वीकारला आहे. पण हळूहळू आता वातावरण बदलत आहे. देशाची ओळख असलेली ही उदात्त अशी सहिष्णुता कमी कमी होत चालली आहे, पण संपलेली नाही. आजही या देशातले बहुसंख्य लोकं शांतीवादी, सहिष्णु आहेत. फॅसिस्ट लोकांना मिळालेल्या मतांची टक्केवारी याचा पुरावा आहे. पण देशातली ही शांती, सहिष्णुता टिकवून ठेवण्याची, त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन सामुहिक प्रयत्न करण्याची जबाबदारीही याच उदारवादी लोकांची आहे.

नौशाद उस्मान, औरंगाबाद
9029429489



मानवी जीवनातील सर्वांत महत्त्वाचा शक्तीस्रोत : एकेश्वारवाद आहे.
अल्लाह हा या संपूर्ण विश्वाचा, विश्वातील चराचर सृष्टीचा पालनकर्ता, शासक, मालक, व्यवस्थापक, सार्वभौम, सत्तेचा स्वामी , स्वयंपूर्ण, सर्वज्ञ, एकमेवाद्वितीय व अविभाज्य असल्याचे इस्लाम मानतो.
    हे चंद्र, सूर्य, तारे व धरती अब्जो वर्षांपासून भ्रमण करताहेत. सर्व अल्लाहच्या आदेशाला बांधलेले आहेत. आकाशाला त्याने छत बनविले. जीवितासाठी हवा, पाणी, वर्षा, अन्नधान्य, फलोपहार व इतर सर्व जीवनावश्यक वस्तू निर्मिल्या. जगातील प्रत्येक वस्तू त्या अल्लाहवर विसंबून आहेत. परंतु तो कोणावर विसंबून नाही. म्हणून पवित्र कुरआनमध्ये असा उल्लेख आहे की या सृष्टीमध्ये एकापेक्षा जास्त ईश्वर असते तर साम्राज्य विस्तारासाठी त्यांच्यात भांडणे झाली असती व ही प्रचलित व्यवस्था केव्हाची कोलमडून पडली असती.
    मानवाने ईश्वरी व्यवस्थेला बाजूला ठेवून जी धोरणे व व्यवस्था अमलात आणल्या त्या सर्व निरर्थक, निष्प्रभ व असफल ठरल्या. मग ती व्यवस्था सेक्युलर असो, जातीयवादी फासिस्ट असो, कम्युनिस्ट असो कोणतीही असो. केवळ पोकळ नारेबाजी आणि आंधळ्या-बहिऱ्या इच्छेतून लोकांना भाषणांच्या आहारी नेऊन सत्तेचा लाभ घेत राहण्यापलीकडे यांच्याजवळ दुसरे कोणतेही उपाय नाहीत, हे कटु सत्य आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी साडेचौदाशे वर्षांपूर्वी अस्पृश्यता, श्रेष्ठ-कनिष्ठ व सर्व प्रकारच्या विषमतेची सर्व भिंताडे पाडली. प्राचीन इतिहास आरंभापासून लाखो दासदासींनी भरलेला आहे. त्या प्रथेला संपुष्टात आणून जगभर प्रेम, दया करुणा व सहिष्णुतेचा संदेश पोहचविला व त्याला प्रत्यक्षात प्रस्थापित केले.’इस्लाम’ हा अरबी शब्द आहे व त्याचा अर्थ होतो- शांती. आत्मसमर्पण, आज्ञापालन, शिर नमविणे. ’मुस्लिम’चा अर्थ होतो- आज्ञाधारक, आत्मसमर्पण करणारा, शिर नमविणारा व शांतीचा मार्ग प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणारा. पवित्र कुरआनच्या अनुसार मर्यादा सांभाळून वागणारा म्हणजे विशिष्ट प्रकारे वागण्याची प्रक्रिया अवलंबविणारा म्हणजेच कर्तव्यदक्ष व्यक्तिलाच मुस्लिम म्हटले गेले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ”लोकांच्या कामी येऊन मनाला आनंद मिळत असेल व दुसऱ्याला आपणाकडून त्रास झाला तर मनात वेदना उठत असतील तर तुम्ही मुस्लिम आहात.” ज्याच्या छळापासून त्याचा शेजारी सुरक्षित नसेल, जो पोट भरून जेवत असेल व शेजारी उपाशी झोपला असेल तर तो मुस्लिम नाही.”असे शेकडो आदेश आहेत की ज्यांचे पालन प्रत्येक मुस्लिमाला अत्यावश्यक आहेत. 

अता महंमद, 
कन्नड

आज आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाव्दारे खूप भौतिक प्रगती केलेली आहे आणि पुष्कळशा सवलती प्राप्त केलेल्या आहेत. परंतु या सर्व भौतिक प्राप्तीनंतर आमच्या मनाला शांती प्राप्त झालेली आहे काय? आमच्या समाजात शांती आहे काय? जर गांभीर्याने विचार केला तर आज सर्वत्र असुरक्षितता, अविश्वास आणि अराजकतेचे वातावरण पसरलेले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, स्त्रीभ्रुणहत्या होत आहे. गरीब आणि दुर्बलांवर सतत अत्याचार होत आहेत. राजकारणात नैतिक विचारधारेची जागा भ्रष्टाचार आणि स्वार्थाने घेतलेली आहे. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजावर अत्याचाराची एक साखळी निर्माण झाली आहे. त्यांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले जात आहेत.
सुख, समाधान आणि शांती यांच्या शोधात माणूस वणवण फिरत आहे, असे एक विचित्र दृष्य पाहायला मिळत आहे. याचे कारण नैतिक र्हास आणि अठराविश्व दारिद्य्र. ऐहिक प्रगती पूर्ण करूनही मानव अठराविश्व दारिद्य्रामध्ये राहिला आहे. अठराविश्व दारिद्य्र म्हणजे ’काम-क्रोध-मद-मत्सर-लोभ-दंभ-संशय-चिंता’यांनी गांजलेली स्थिती. यामध्ये कामाचा अतिरेक झाला म्हणजे स्त्रियांवर अत्याचार होतो, क्रोधाचा अतिरेक झाला म्हणजे हिंसा-खून-दंगल होते. मदाचा अतिरेक झाला म्हणजे अनीती-अन्याय, छळ होतो. मत्सराचा अतिरिके झाला म्हणजे चांगल्या गोष्टीला दूषण देणे, सद्गुण, सत्प्रवृत्तींना विरोध करणे सुरू होते, सर्वांचा तो द्वेष करू लागतो, हेवा-तिरस्कार जन्माला येतात. लोभाचा अतिरेक झाला म्हणजे भ्रष्टाचार होतो. दंभाचा अतिरेक झाला म्हणजे मनुष्य फसवणूक, लबाडी, ढोंग करायला लागतो. संशय आणि चिंतेचा अतिरेक झाला की चित्त, वित्त-स्वास्थ्य गमावून आत्मघात, कुटुंबघात करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे या दारिद्य्रामध्ये सामाजिक स्वास्थ्य, कौटुंबिक स्वास्थ्य, गावाचे-शहराचे-देशाचे आणि संपूर्ण विश्वाचे स्वास्थ्य बिघडल्याने एकूण मानवी जीवनच उद्ध्वस्त होते. पर्यायाने समाजाची, राष्ट्राची हानी होते. सुख-समाधान-समृद्धी-विश्रांती नष्ट होते. अशीच परिस्थिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
”अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातुहु.” (अर्थात- तुम्हावर ईश्वराची शांती आणि दया असो.)
हे आहे एका मुस्लिम व्यक्तीचे सर्वप्रथम अभिवादन! जी व्यक्ती इस्लामची अनुयायी आहे तिला ’मुस्लिम’ म्हणतात आणि ’इस्लाम’ म्हणजेच ’शांती’ होय. म्हणजेच दुसर्या व्यक्तीला अभिवादन करूनच त्याच्याशी सुसंवाद अथवा व्यवहार करावा अशी इस्लामची शिकवण आहे आणि हेच सद्वर्तनाचे द्योतक ठरते. बंधु आणि अनोळखींशी, मित्र आणि शत्रूशी सद्वर्तनातच बाह्य शांती आहे.
समाजात शांती, प्रगती आणि मुक्ती प्रस्थापित करायची तर आम्हाला ज्ञानात्मक बौद्धिक प्रगती, आध्यात्मिक व नैतिकतेची जाण आधी असावी लागेल. सरकारे येतात आणि जातात, पण मानवी समाज मात्र अखंड प्रवाही असतो. व्यक्ती आणि समाज यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असले पाहिजेत? हा जटिल प्रश्न माणूस जगात संस्कृतीच्या आरंभापासून सोडवू शकलेला नाही. कधी व्यक्तीला समाजाच्या अंकित करून ठेवले, तर कधी समाजाला व्यक्तीच्या अंकित ठेवले. घृणा, तिरस्कार असहनशीलता आणि दूषित पूर्वग्रह इ. विभक्तपणावर अधिकार गाजवणार्या गोष्टींपेक्षा दया, स्नेह, फ्रेम आणि संयम इ.चा घट्ट द्रव आम्हाला बांधून ठेवतो. जगाच्या मर्यादित साधनसंपत्तीसाठी, हेवा असूया स्पर्धा-चुरस, चढाओढ इ. गोष्टींपेक्षा शांती, न्याय, समता यांचे ध्येय प्रगती वाटचाल करण्यास अधिक प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतील. भरभराटीपेक्षा संतोष-समाधान, मक्तेदारीपेक्षा सहभागित्व आणि साधनसम्पत्तीच्या भक्षणापेक्षा तिचे संरक्षण आमच्या पुढे जाण्याच्या मार्गाला प्रकाशमान करील. हे जग अशा लोकांच्या हाती सुरक्षित आहे जे विविधतेला आनंदाने साजरी करतात, जे परकेपणाचा आदरसन्मान करतात आणि एकमेकांची काळजी घेतात. परस्परांच्या सुखदु:खात सहभागी होतात.
इस्लामी संस्कृतीचे काही विशिष्ट तत्त्वे आहेत. इस्लामी संस्कृती आणि इतर संस्कृतींमधील काही गोष्टींमध्ये साम्य आढळून येत असले तरी इतर संस्कृतींच्या तुलनेत ती आपल्या लक्ष्य, नियम आणि सिद्धान्तांमध्ये फार वरचढ असल्याचे दिसून येते. ग्रीक व रोमनांचा आधुनिक बुद्धिवाद, शासन व शक्ती, पारसींची भौतिक रुची, सैन्यबल व राजकारण, चीनची आध्यात्मिक शक्ती, साधूसंतांचे मिथक व दंतकथा आणि पाश्चिमात्यांचा भौतिकवाद यांचा इस्लामी संस्कृतीच्या सिद्धान्तावर कसलाही प्रभाव आढळून येत नाही.
शांती, प्रगती आणि मुक्तीवर इस्लामी संस्कृतीचा सिद्धान्त आधारित आहे. म्हणजेच त्या सर्व विषयांवर जे मानवी जीवनाचे भाग आहेत. म्हणूनच इस्लामी संस्कृतीचा सिद्धान्त संपूर्ण संविधानाचे रूप धारण करतो. संपूर्ण मानवजातीत शांती प्रस्थापित करणे, मानवजातीला प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर नेणे आणि हर प्रकारच्या समस्येपासून मानवजातीला मुक्ती मिळवून देणे ही इस्लामी संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. या स्थिर तत्त्वांमुळे इस्लामी संस्कृतीला मानवतेवर शासन करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ईश्वराने मानवाला धरतीवर उत्तराधिकार आणि पुनर्निर्माणाद्वारे प्रगतीसाठी जन्माला घातले आहे.
इस्लामचा सिद्धान्त स्थितीतील परिवर्तनामुळे बदलत नाही आणि न्याय, सत्य आणि सद्भावावर आधारित असलेले त्याचे नियम (शरियत) प्रत्येक स्थळकाळी मानवी स्वभावानुसारच आहेत. अशा प्रकारे इस्लाम धर्म लोकांच्या विशिष्ट जात, वर्ण अथवा समुदायासाठी नाही. तो गोरे, काळे, लाल, पिवळे सर्वांसाठी आहे. तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील लोकांसाठी आहे. इस्लाममध्ये क्षेत्रिय चरित्र अथवा सांप्रदायिक व जातिवाद आढळून येत नाही. तो कोणत्याही विशिष्ट समुदाय अथवा मानवी गटाशी पक्षपात करीत नाही कारण इस्लामचे उपदेश, संस्कार आणि आचार सर्व काही कोणत्याही काळातील प्रत्येक मानवासाठी उपयुक्त आहेत. न्याय वा चरित्र एखाद्या समूह अथवा काळासाठी उपयुक्त नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. हेच इस्लाम धर्माचे वैशिष्ट्य आहे.
इस्लामनुसार मानवतेसाठी लाभदायक आणि धरतीच्या पुनर्निर्माणाद्वारे प्रगतीचे ज्ञान प्राप्त न करणारा प्रत्येक व्यक्ती पापी आहे. निश्चितच जेव्हा मानवता सांस्कृतिक व वैज्ञानिकदृष्ट्या मंदावलेल्या स्थिती जीवन व्यतीत करीत होती, तेव्हा अल्लाहकडून पैगंबर मुहम्मद (स.) यांना या जगात पाठविण्यात आले. मुहम्मद (स.) यांनी मानवतेला मुक्ती प्रदान केली, इस्लाम धर्म (ज्ञान, पुनर्निर्माण आणि सभ्यतेवर आधारित धर्म) द्वारे तिला सन्मानित केले. ज्यात जागतिक प्रगती आणि आध्यात्मिक विचारांदरम्यान कसलाही विवाद नाही. मुस्लिम व्यक्तीच्या अंतरंगात प्रार्थना, पुनर्निर्माणाच्या दरम्यान आणि आध्यात्मिक जीवन, आपल्या ईश्वराच्या इच्छेनुसार अनुसरण करण्याच्या दरम्यान कसलाही फरक नाही. हे सर्व ईश्वरासाठी आणि त्याच्या मार्गात आहे.
आंतरिक शांती म्हणजे मानवाची आंतरिक प्रसन्नता आणि आधुनिक संस्कृतीमध्ये अधिकांश लोकांना भ्रमात टाकणार्या आंतरिक संघर्षापासून मुक्ती मिळवून देण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून मानवाचे या जगातील आणि परलोकातील जीवन शांततेसह व्यतीत व्हावे, प्रार्थना, कार्य आणि पुनर्निर्माणाद्वारे प्रगतीच्या कार्यान्मुख असावे. आध्यात्मिक व भौतिक जीवनाचा संबंध असावा, ज्ञान आणि धर्माचा संगम व्हावा. निश्चितच इस्लामी संस्कृतीमध्ये आंतरिक शांती एकीकरणाच्या सिद्धान्तातून मिळणारा उघड संकेत आहे, जो मुस्लिमाच्या मनात निर्माण होणार्या प्रत्येक गोष्टीला सहजतेने एकत्रित करतो. इस्लाम धर्मात हे जग स्वत: कसलेही लक्ष्य नसून परलोकासाठी शेती आणि माध्यमासमान आहे आणि हीच खरी मुक्ती आहे.
इस्लामी संस्कृतीत आध्यात्मिक विचार आढळतात. त्याचबरोबर इस्लामने भौतिकवादाला कधीही तिलांजली दिलेली नाही. ईश्वराने मानवाला आत्मा आणि भौतिक सामुग्रीपासून निर्माण केले. मानवी जीवनाच्या आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही भागांसाठी प्रत्येक प्रकारच्या साधनांनी सहाय्य केले. शरीरासाठी उपयुक्त वातावरण बनविले. त्यामुळे तो पृथ्वीवर राहतो. अशा प्रकारे मानवाच्या आध्यात्मिक भागासाठी पैगंबरांद्वारे दिव्य वाणी अवतरित केली. आत्मा आणि शरीर दोन्ही एकमेकांना पूरक बाबी आहेत. त्या मानवाच्या मृत्यूपर्यंत एकमेकांपासून अलिप्त होत नाहीत. शरीराला अन्न, पाणी व वस्त्राची आवश्यकात असते. आत्म्याच्याही काही आवश्यकता असतात. आत्मा प्रेम, दया, त्यागाशिवाय जीवित राहू शकत नाही. दुर्भाग्यत: पाश्चिमात्य सभ्यतेला विसर पडल्यामुळे सर्व प्रकारच्या सुविधा असूनदेखील संसारसुखापासून वंचित आहे.
इस्लामी संस्कृतीने मानवाधिकारांप्रती वास्तविकपणे एक अप्रतिम नमूना सादर केला आहे. काळ बदलल्याने आणि परिस्थितीमध्ये परिवर्तन झाल्याने हे अधिकार बदलत नाहीत. हे अधिकार प्राप्त करण्यासाठी इस्लाममध्ये आजपर्यंत बौद्धिक संघर्ष वा क्रांती झालेली नाही. ज्याप्रमाणे लोकशाही आणि तिच्या विकासासाठी मानवी अधिकारांचा इतिहास आपणास आढळून येतो. मानवी अधिकाराचे नियम आणि आदेश ईश्वराद्वारे प्रकाशित झाले आहेत. हे अधिकार वास्तविक आहेत, जीवनाशी संबंधित आहेत आणि मानवी गरजांची पूर्तता करणारे आहेत. या सर्वांत सर्वश्रेष्ठ अधिकार असे आहे- मातापितांचे आणि बांधवांचे अधिकार, संततीवर नातेवाईकांचे अधिकार, भ्रूणाचे अधिकार, धार्मिक व सांसारिक प्रशिक्षणात प्रत्येक व्यक्तीचे अधिकार. वैध मिळकत आणि व्याजापासून अलिप्त राहण्याचे अधिकार. दुराचार थांबविण्याचे अधिकार.
या जगात आल्यापासून जाण्यापर्यंत मानवाचे जीवन इतरांवर अवलंबून आहे. म्हणून सामूहिक व्यवस्था अगदी महत्त्वाची आहे. या व्यवस्थेला सन्मार्गानुसार स्थापित केल्याशिवाय ऐहिक शांती व मृत्युपश्चात जीवनात मुक्ती शक्य नाही. या जगात एका लहानशा उद्दिष्टप्राप्तीसाठी सुद्धा संघटन व सहकार आवश्यक असतो. मग संपूर्ण जगातून अन्याय व अत्याचाराच्या जागी शांती व प्रगती स्थापित करण्यासाठी याचे महत्त्व किती असेल हे समजणे कठीण नाही. सध्या दुष्ट संघटित होत आहेत, परंतु शिष्ट संघटित नाहीत. म्हणूनच दुराचार सतत वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी सदाचारी लोकांना संघटित होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी त्यांनी त्याग व समर्पण करण्याची आवश्यकता आहे. हा त्याग सामूहिकरित्या प्रत्येक व्यक्तीने करणे अनिवार्य आहे आणि त्यावरच खरी मुक्ती अवलंबून आहे. जे लोक जगात शांतता व प्रगती प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांबरोबर कार्यरत असतात त्यांच्यासाठीच मुक्ती निश्चित आहे!
माणसाच्या सुधारणा व प्रगतीची भाषा जेव्हा आम्ही करतो, तेव्हा आम्हाला माणसांचा एक विशिष्ट गट अभिप्रेत असत नाही, तर अखिल मानवजातीची सुधारणा व त्यांची यथोचित प्रगतीच आम्हाला अभिप्रेत असते. माणसांना माणूस समजले जावे आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात अखिल मानवजातीने आपल्या जीवनाचा प्रवास करावा अशी इच्छा असते.
माणूस जेव्हा आपल्या अंतर्गत त्रुटींवर काबू मिळवील आणि मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे अन्याय व अत्याचार करणारे लोक त्यांच्या दर्जापासून हटविले जातील, तेव्हाच मानवतेच्या सुधारणेची दारे मोकळी होतात आणि माणूस प्रगतीकडे वाटचाल करू लागतो. मानवतेच्या सुधारणेसाठी न्याय व सत्याची स्थापना होणे नितांत गरजेचे आहे. भूमीतील साधनसंपत्तीवर काही ठराविक माणसांचा कब्जा, राजकीय सत्ता काही थोडक्या माणसांच्या हातात एकवटणे, विद्या आणि तंत्रज्ञान एका ठराविक वर्गाच्या हातात ्सणे आणि बाकी सर्व माणसे त्यापासून वंचित राहणे, ही सर्व अन्यायाची वेगवेगळी रूपे आहेत. ते सर्व अन्याय जारी असताना मानवतेची सुधारणा घडविणे शक्य नाही. मग विज्ञान व तंत्रज्ञनाची प्रगती कितीही होवो.
देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांना आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी समता व न्यायावर आधारित व्यवस्थानिर्मितीसाठी सामाजिक परिवर्तनातून एका सकारात्मक अशा क्रांतीसाठी झटणार्या, उदारवादी जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश तर्फे राज्यभरात ’शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ ही दहादिवसीय मोहीम राबविण्यात येत आहे. दि. 12 ते 21 जानेवारी 2018 पर्यंत चालणार्या या मोहिमेत राज्यभरातील सर्व जातीधर्माच्या, जवळपास चार कोटी लोकांपर्यंत पोहोचून जनजागरण करण्याचा जमाअतचा संकल्प आहे. देशातील वर्तमान सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशी जनजागृती मोेहीम राबविण्याची सध्या नितांत गरज भासत होती ती जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश तर्फे पूर्ण करण्याचा एक भरीव प्रयत्न होय. अशा या अभिनव मोहिमेला आपण सर्व जण तळागाळातून प्रतिसाद देऊन ही मानवतावादी मोहीम यशस्वी करू या. चला मनं जिंकू या!

- शाहजहान मगदुम
कार्यकारी संपादक - (8976533404)

अल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधिश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले - वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ वसीला घेतो. परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा किंवा वशीला चालणार नाही.

कुरआन आणि नबी सल्ल. यांची सुन्नत म्हणजे इस्लाम होय. इस्लाम या शब्दाचा अर्थच शांती आहे. म्हणजेच इस्लाम शांतीपूर्ण धर्म आहे. या धर्मामध्ये अल्लाहने एक लाख चोविस हजार प्रेषित पाठविले़ त्यामध्ये अंतिम प्रेषित म्हणून मुहम्मद सल्ल़ यांना पाठविले. ते समस्त मानवजातीसाठी. सर्व जगाला सत्याचा मार्ग दाखविण्यामध्येच मानवाची सुख, शांती सामावलेली आहे़ कुरआन या ईश्‍वरीय ग्रंथामध्ये शांतीचे सर्व मार्ग दाखविलेले आहेत. ते कसे? जर आपल्या घरात आपण एक शिकली सवरलेली सून जर का आणली आणि त्या मुलीने आपल्या नवीन झालेल्या वंशाला जर चांगली शिकवण दिली आणि त्याचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने केले तर ते एक कुटुंब, कुटुंबापासून एक समाज या दोन्ही गोष्टीमध्ये शांती दिसून येईल़ आपण आपल्यापासून दुसऱ्याचा फायदा जर होत असेल तर तो करावा़  उदा़ एखाद्या गरीब घराण्यात फार हुशार मुलगा आहे़ तो गरीबीमुळे शिकू शकत नाही तर त्याला मदत देणे़  म्हाताऱ्या माणसांना मदत करणे, शेजाऱ्यांच्या सुख-दु:खात सामिल होणे. हे सर्व तत्व कुरआनमध्ये शांती म्हणून सांगितले आहेत. आजच्या काळामध्ये लोक सगळं काही विसरले. कारण हे जग फक्त पैशाच्या मागे धावत आहे. लोकांना मूल, बाळ, आई-वडिल, नातेवाईक, समाज हे काहीच दिसत नाही. परंतु, माझ्या बंधू आणि भगिनीनों! जगामध्ये पैसाच सर्व काही नाही़ तर नबी सल्ल़ सांगतात आणि कुरआनच्या अनेक आयातींमध्ये सुद्धा सांगितले आहे की, माणसामध्ये माणुसकी प्रेमभाव आणि बंधुत्व असायला पाहिजे. हा आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश आहे़
    1. माणुसकी म्हणजे प्रेम 2. माणुसकी म्हणजे एकमेकांना समजून घेणे 3. माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणा 4. माणुसकी म्हणजे एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येणारे हात. या नंतर आपण प्रगतीसंबंधी चर्चा करूया.
    प्रगती : आपण सर्व लोक फक्त जगाची प्रगती बघतो़ जगाची प्रगती म्हणजे हेच एक घर आहे तर दुसरे घर असलं पाहिजे़ साध घर असेल तर बंगला असला पाहिजे, त्या बंगल्यामध्ये दुचाकी असली तर चारचाकी गाडी असली पाहिजे, पाच मुलं आहेत तर पाच बंगले असले पाहिजे़ या सर्व जगाला फक्त इथल्या प्रगतीची पडली आहे़  परंतु ही प्रगती मिळवून आपल्याला काही फायदा होणार नाही़  कारण हा प्रगतीचा प्रवास इथेच थांबणार आहे़  आपल्या प्रगतीचा खरा प्रवास म्हणजे पारलौकिक जीवन आहे़  आपण या जगामधून निघून गेल्यावर त्या जगाच्या प्रगतीसाठी आम्हाला काय करावे लागेल याचा विचार आज करणे गरजेचे आहे. तो प्रगतीचा प्रवास हाच खरा प्रवास आहे़ आपल्याला प्रेषित मुहम्मद सल्ल़ यांनी सांगितलेल्या मार्गावर चलावे लागेल़ वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवावा लागेल़ मुला-बाळांना चांगले संस्कार द्यावे लागतील़ कधी खोटे बोलू नये, चोरी करू नये, कोणाची निंदा करू नये़ कारण अल्लाहतआलाने कुरआनमध्ये म्हंटलेले आहे की, ”हे लोकहो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे. पुरूषांनी दुसऱ्या पुरूषांची टिंगल उडवू नये, शक्य आहे की ते त्यांच्यापेक्षा उत्तम असतील, आणि स्त्रियांनीसुद्धा दुसऱ्या स्त्रियांची टिंगल उडवू नये. शक्य आहे की त्या त्यांच्यापेक्षा उत्तम असतील. आपापसांत एकमेकांना टोमणे मारू नका आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावानेही करू नका. श्रद्धा ठेवल्यानंतर दुराचारात नाव मिळविणे फार वाईट गोष्ट आहे. जे लोक या वर्तनापासून परावृत्त होत नसतील ते अत्याचारी होत”(सुरःअलहुजरात आयत नं. 11).
    मुक्ती : मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला चांगली कामे करावी लागतील़ म्हणजे आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा अल्लाहने जगात मानवाला आचार व विचार स्वातंत्र्य देवून पाठविलेले आहे़ जेणेकरून पहावे की कोण सर्वोत्कृष्ट कर्म करतो? सदाचार म्हणजे काय हे अल्लाहने प्रत्येक युगात पैगंबरांद्वारे मनुष्यास शिकवले आहे़ आणि सर्वात अंतिम पैगंबर मुहम्मद सल्ल़ यांच्यावर पवित्र कुरआन हा ग्रंथ अवतरित करून सर्व काही विस्ताराने जगापुढे मांडले आहे़ मग आता जो कोणी कुरआनच्या मार्गदर्शनाचे पालन करील तो मरणोत्तर जीवनात स्वर्गप्राप्ती करेल आणि जो कोणी नकार देईल त्यास नरकामध्ये नेहमीसाठी फेकून दिले जाईल. आणि मग आपल्या शेवटच्या निर्णयापूर्वी या जगात जन्माला आलेल्या सर्वांच्या कर्माचा हिशोब घेण्यासाठी या सृष्टीच्या राजाचे न्यायालय स्थापित होईल़ ज्याने कणभर सुद्धा पुण्यकर्म केले असेल तो त्यास पाहील़ आणि ज्याने कणभर पापकर्म केले असेल ते सुद्धा तो पाहील.
    अल्लाह सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे़ म्हणून तो आपल्या दासांना स्वर्गात किंवा नरकात पूर्ण निवाड्यानंतरच पाठविणार. कारण की आम्ही जगामध्ये जरी काही चांगले आणि वाईट काम केले तरी एकमेकांचा पुरावा घेतो़ परंतु, अल्लाहच्या समोर कोणताच पुरावा किंवा वशीला चालणार नाही तिथे तर आम्हाला हा प्रश्‍न विचारला जाईल की, मी तुम्हाला जगात एवढे वर्ष ठेवले तेव्हा तुम्ही काय केले? म्हणून कुरआन आणि नबी सल्ल. यांनी सांगितले की, तुम्ही सत्याच्या मार्गावर चला तुमचा फार मोठा फायदा आहे आणी हीच खरी मुक्ती आहे़
    यानंतर थोर पुरूष आणि संतांची नबी सल्ल़ यांच्या विषयीची व्यक्तव्य पाहू.
1. शंकराचार्य सांगतात, इस्लाम आतंक नव्हे तर आदर्श आहे़
2. डॉ़ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इस्लाम शांती देणारा एक धर्म आहे़

मोहम्मदी बेगम, अकोला

इस्लाम हा शब्दच मुळी ’सलाम’ या पासून आला आहे. या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. त्यामुळे इस्लाम धर्मियांच्या मनात शांतताही आपसुकच रूजलेली असते. इस्लामचा मूळ गाभा ’तौहिद’ आहे. तौहिद म्हणजेच एकेश्वरवाद. याचा अर्थ असो आहे की, ”अल्लाहच या जगाचा आणि जगातील सार्‍यांचा निर्माता आहे. तोच पालनकर्ता आणि सार्‍यांचा स्वामी आहे. त्याचेच शासन आणि त्याचाच अधिकार आहे. आज्ञा देण्याचा आणि मनाई करण्याचा अधिकारही फक्त त्याचाच आहे. त्यामुळे त्याच्या आज्ञांचे पालन आणि गुलामीही फक्त त्याचीच. तोच या विश्वांचा खालीक, मालीक आहे. त्याचा कोणीही भागीदार नाही. सार्‍यांवर फक्त त्यांचीच हुकूमत चालते. जी व्यक्ती अल्लाहचे हे सारे अधिकार मानते ती सहिष्णू, शांतताप्रिय, समंजस आणि पापभीरू असतेच. समाजात शांतता नांदण्यासाठी एक विचार आणि सिद्धांत हवा. इस्लामची सामाजिक व्यवस्था पवित्र कुरआनच्या एका आयातीवर आधारित आहे. ज्यात म्हंटले आहे की, जगातील सारे लोक हे एका वंशापासून आहेत. इस्लाम जगातील सार्‍या लोकांना सांगतो की तुम्ही सर्व एका आई-बापाची संतती आहात. एकमेकांचे भाऊ-बहिण आहात म्हणून माणसाच्या नात्याने समान आहात. मानवतेचा हा विचार, हे तत्त्व स्वीकारल्यानंतर घृणा, असुया, द्वेष आपोआप गळून पडतात. त्यामुळे शांतता नांदण्यास मदत होते. समाजात शांतता नांदणे आग्रहाचे असते कारण शांततेचा मार्ग हा एकमेव मार्ग यशाकडे आणि मुक्तीकडे नेतो.
    प्रगती : प्रगती ही सापेक्ष संज्ञा आहे. परंतु, आजच्या युगात प्रत्येकजण आपली वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. यातही आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी जो तो झटताना दिसतो. पण ही प्रगती करीत असतांना आपण कोणाचा हक्क मारीत नाही का? कोणाला वंचित करीत नाही ना? याचेही भान रहात नाही. इस्लामने सामुहिक जीवनामध्ये आर्थिक स्पर्धा खुली आणि निरंकुश असावी अशी व्यवस्था केलेली आहे. माणसांनी एकमेकांशी निर्दयीपणे आणि निष्ठुरपणे वागू नये यासाठी इस्लामने माणसांना नैतिकतेचे धडे गिरवायला सांगितले आहेत. एकमेकांना सहाय्य करण्याचे, एकमेकांबद्दल सहानुभूती आणि बंधुभाव बाळगण्याची शिकवण इस्लाम जगाला देतो. एकदा नैतिकतेचे बळ आणि अधिष्ठान प्राप्त झाले की वैयक्तिक आणि आर्थिक प्रगती होणारच. पण समाजातील निराधार, लाचार, दीन, दुबळ्या बांधवांना आश्रय, मदत आणि पाठबळ द्यायला हवे. आपण एकटे प्रगती पथावर असलो तरी आपल्या बरोबरीचा समाज ही आपल्या सोबत प्रगती पथावर आल्याशिवाय प्रगती साधणे अशक्य आहे. वैयक्तिक वैचारिक प्रगल्भता आणि दृष्टी आली की प्रगतीपथ दृष्टीपथात येतो. आर्थिक प्रगतीसाठीही योग्य आणि कायदेशीर मार्गाने अर्थाजन करण्याची शिकवण इस्लामने दिल्यामुळे स्वतःच्या उन्नतीबरोबर सार्वजनिक हित ही साधले जाते. व्यक्तिमत्वाच्या विकासामुळे आचरण आणि वैचारिक ठेवण सुदृढ होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. वैध मार्गाने कमविलेल्या धनदौलतीवर इस्लाम माणसाचे हक्क मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर वैधमार्गाने कमविलेल्या संपत्तीला उचित आणि रास्त मार्गातच खर्च करण्याचे बंधनही इस्लाम घालते.
    त्याचप्रमाणे माणूस जेव्हा जबाबदारी, कर्तव्यपालन, आज्ञापालन, भक्ती आणि ईश्वराची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करील तेवढा तो ईश्वराच्या निकट होईल. इस्लाममध्ये ईश्वराशी जवळीक करणे म्हणजेच आध्यात्मिक प्रगती समजली जाते.
    मुक्ती : पवित्र कुरआननुसार मरणोपरांत जीवन हे खर्‍या अर्थाने खरे जीवन आहे. या जीवनात केलेले कृत्य, कर्मावरून जन्नत आणि जहन्नम कायमस्वरूपी प्राप्त होणार आहे. पण पूर्वानुअट अल्लाहवरच्या ईमानची आहे. माणसाच्या मनात आणि बुद्धीत हाच विचार कायम असणे आवश्यक आहे. की, ” अल्लाहच त्याचा स्वामी, त्याचा शासक, त्याचा निर्माता आणि त्याचा ईश आहे” अल्लाहची प्रसन्नता कमावणे हे त्याच्या सर्व प्रयत्नांचे उद्दीष्ट आहे आणि अल्लाहची आज्ञा हाच त्याच जीवनाचा कायदा असतो. मुक्तीचा मार्ग तसा कठीण आहे. कारण ईमानबरोबरच माणसाने जाणीवपूर्वक आपली स्वच्छंदता सोडायला हवी. पण त्याचबरोबर संयम आणि विवेकही असायला हवा. यालाच कर्तव्यपरायणता आणि जबाबदारीची जाणीव म्हटले जाते. याच गोष्टीला ’तक्वा’ म्हणतात. ही कर्तव्यपरायणता आणि जबाबदारीची जाणीव पराकोटीला गेली की ईश्वराची इच्छा माणसाची इच्छा होते. ईश्वराची आवड दासाची आवड बनते आणि ईश्वराला ज्या गोष्टी नापसंत आहेत ते दासालाही नापसंत वाटते. या गोष्टीलाच ’एहसान’ (समर्पन) असे म्हटले जाते. या स्थानावर पोहोचल्यावर माणसास ईश्वराची अत्यंत जवळची निकटता प्राप्त होते आणि हे माणसाच्या उच्चतम आध्यात्मिक विकासाचे स्थान आहे.

डॉ. शेख इक्बाल मिन्ने
7040791137



आज अवघे जग या विचारसरणीने व्यापलेले आहे. मुस्लिमांची ही एक मोठी संख्या याच मार्गान जात आहे. अल्लाहची एक सुन्नत (सवय) अशी आहे की, जो ज्या दिशेने प्रयत्न करतो अल्लाह त्याला त्या दिशेत यशस्वी करतो. जो  दाऊद इब्राहीम बनण्याच्या दिशेने प्रयत्न करत असेल तर त्याला फरिश्ते बळजबरीने ओढून एपीजे कलाम बनवित नाहीत किंवा जो एपीजे कलाम बनण्याच्या दिशेने प्रयत्न करत असेल त्याला बळजबरीने दाऊद बनवित नाहीत. अल्लाहने या जगात प्रत्येकाला आचरण स्वातंत्र्य दिलेले आहे. त्या अनुसार कमी अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्ती प्रगती करीत असते.
    कल्पना करा की, दोन अशा व्यक्ती आहेत, ज्यांना अशा एका देशात जावयाचे आहे की, ज्या देशांशी भारत सरकारशी आरोपी संबंधी देवाण-घेवाण करार झालेला नाही.  एकाला कायम त्याच देशात रहावयाचे आहे तर दुसर्याला 60-70 दिवसात परत यावयाचे आहे. या दोघांच्या विदेश प्रयाणापूर्वीच्या आचरणात ’जमीन-आसमान’ एवढे अंतर  असेल. ज्याला परत यावयाचे आहे तो जवाब दारीने वागेल. कारण त्याला माहित आहे. 60 दिवसांनी परत येऊन याच देशात कायमचे रहावयाचे आहे. मात्र ज्याला परत यावयाचे नाही त्याचे प्रस्थानापूर्वीचे वर्तन बेजबाबदारपणाचे असेल कारण त्याला माहिती आहे की पुन्हा या ठिकाणी आपल्याला परत यावयाचे नाही. ठीक हाच फरक मरणोत्तर जीवनावर ज्यांचा विश्वास आहे व ज्यांचा नाही त्यांच्याबाबतीत आहे. ज्याला मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास नाही तो या जीवनात बेदरकारपणे वागेल  मात्र ज्याला मृत्यूपश्चातही जीवन आहे यावर विश्वास असेल तो या जीवनात जबाबदारीने वागेल.
    पश्चिमेचे वैचारिक संक्रमण संपूर्ण जगावर झालेले आहे. मुस्लिमांमधील काही लोक सोडता बहुसंख्य मुस्लिमांसह संपूर्ण जगाने या वैचारिक संक्रमणासमोर शरणागती पत्करलेली आहे. ‘आम्ही बांधू ते तोरण, आम्ही ठरवू ते धोरण’ या पद्धतीने पश्चिम वागत आहे. त्यांनी गुडघ्यावर फाटलेल्या जीन्सला फॅशन ठरवले की आपण फाटक्या जीन्स घालून फिरणार. त्यांनी दारू पिण्याला प्रतिष्ठा दिली की आपण ही दारू पिण्यात प्रतिष्ठा मानणार. त्यांनी पिझ्झा, बर्गर खाणे व कोल्ड्रींक्स पीने याला स्टाईल म्हंटले की आम्ही अभिमानाने तेच खाणार व पीनार. त्यांनी मुक्त लैंगिक संबंधांना, समलैंगिक संबंधांना मान्यता दिली की आपण ही देणार. एवढेच नव्हे तर ते पॉर्नला प्रोत्साहन देणार तर आपण त्याचा ही डोळे मिटून स्विकार करणार?     जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्यांची कॉपी करण्यात स्वतःचा सम्मान समजणार.
     पश्चिमेचे हे वैचारिक संक्रमण अधिक धारदार बनविण्यासाठी चार गोष्टी कारणीभूत आहेत. एक-त्यांची प्रचंड लष्करी ताकत, दोन- व्याजावर आधारित आंतरराष्ट्रीय आर्थिक वित्तीय संस्था (वर्ल्ड बँक/आयएमएफ) मधील व्यवहारातून मिळविलेली प्रचंड माया, तीन - राक्षसी आकाराच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी कंपन्या व चार-प्रभावशाली मीडिया. थोडक्यात वैचारिक, सैनिक, आर्थिक आणि माध्यमांच्या आक्रमणापुढे कोणताच देश त्यांना आव्हान देऊ शकत नाही. जे आव्हान देतात त्यांचा सद्दाम हुसैन किंवा कर्नल गद्दाफी केला जातो. म्हणून अवघे जग पश्चिमेच्या तालावर नाचत आहे. या जीवनशैलीच्या फैलावाचे मुख्य कारण म्हणून पश्चिमेने मरणोत्तर जीवनाच्या संकल्पनेचा केलेला त्याग होय. अवघे जग त्यांचे अनुसरण करत आहे. या जीवनशैलीचा सर्वाधिक फटका महिला, मुलं आणि गरिबांना बसतो आहे. हे तिन्ही घटक स्वतःच्याच समाजाने केलेल्या अत्याचारांनी खचून गेलेले आहेत. त्यांची प्रगती अवरूद्ध झालेली आहे. या भांडवलशाही व्यवस्थेला आव्हान फक्त इस्लामी व्यवस्थेकडूनच मिळत असल्याने पश्चिमेतील झाडून सर्व देश इस्लामचा द्वेश करतात. त्यांना चांगले माहित आहे की आपल्या अनैतिक जीवन पद्धतीला इस्लामी नैतिक जीवन पद्धतीच उध्वस्त करू शकते. म्हणून हाती असलेल्या मीडियाचा उपयोग करून इस्लामी जीवनशैलीला बदनाम करण्याचे काम अखंडपणे चालू आहे.
    माणसाची रचना करतांना अल्लाहने त्याच्या मध्ये दोन प्रवृत्ती समसमान ठेवलेल्या आहेत. एक सद्प्रवृत्ती दूसरी खलप्रवृत्ती. आता हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे की तो कोणत्या प्रवृत्तीकडे झुकतो. साधारणपणे ज्याप्रमाणे सायकल उतारावर विनासायास पळते तसेच मानसाचे नफ्स (मन) वाईट मार्गाकडे विनासायास पळते. परंतु त्याला वाईट मार्गाकडून चांगल्या मार्गाकडे खेचून आणणे गरजेचे आहे. अन्यथा काही शतकात पृथ्वीवरील जीवन नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम कठीण आहे म्हणूनच करण्याजोगे आहे. ही कठिण जबाबदारी अल्लाहने मुस्लिम उम्मत (समाज)वर टाकलेली आहे. कुरआनमध्ये आदेश दिलेला आहे की,
    “आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.” (कुरआन : सुरे आलेइमरान आयत नं. 110)
    या आयातींद्वारे जी जबाबदारी मुस्लिम उम्मतवर टाकलेली आहे ती जबाबदारी ही उम्मत योग्य पद्धतीने पार पाडत नाहीये. म्हणून ती ज्या ठिकाणी अल्पसंख्येत आहे त्या ठिकाणी ही अपयशी आहे व ज्या ठिकाणी बहुसंख्येत आहे त्या ठिकाणी ही अपयशी आहे. प्रेषित सल्ल. पूर्वी जी उम्मत आपल्या उद्देशापासून दूर जात असे तिला नष्ट केल्या जात असे, उम्मते आद, समूद व लूत अलै. यांच्यासह अनेक कौमांना त्यांच्या अनैतिक आचरणासाठी विध्वंसित करण्यात आल्याचे अनेक दाखले कुरआनमध्ये दिलेले आहेत. कुणावर दगडांचा वर्षाव झाला तर कुणाला पाण्यात बुडवून मारण्यात आले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची उम्मत ही अंतिम उम्मत असल्यामुळे तिच्यावर मागील उम्मतींना जसे नष्ट करणारे अजाब (प्रकोप) आले तसे या उम्मतवर येणार नाहीत, मात्र ही उम्मत जेव्हा-जेव्हा व जेथे-जेथे आपल्या कर्तव्यापासून दूर जाईल तेव्हा-तेव्हा तेथे-तेथे निलंबित केली जाईल एवढे मात्र निश्चित. पश्चिमेच्या अनैतिक जीवन शैलीचा यल्गार होत असतांना त्याचा सामना करण्याचे आपले अवतार कार्य करण्याऐवजी जेंव्हा ही उम्मत जीन्स, टी-शर्ट घालून, अश्लिल चित्रफिती पाहून स्वतः त्यांच्यापेक्षा पुढे पळत असेल तर हे अल्लाहचे नातेवाईक नाहीत की यांच्यावर दया दाखविली जाईल.
    कुरआनने मानवावर खालील प्रतिबंध लादलेले आहेत. कुरआन म्हणतो, ‘हे पैगंबर (स.) यांना सांगा की माझ्या पालनकर्त्याने ज्या वस्तू निषिद्ध (हराम) केल्या आहेत. ती ही आहेत, निर्लज्जपणाची (अश्लिल) कामे - मग ती उघड असोत अथवा गुप्त - आणि पाप आणि सत्याच्या विरोधात अतिरेक आणि अल्लाहबरोबर तुम्ही एखाद्या अशाला भागीदार (शरीक) कराल ज्याच्या संबंधात त्याने कोणतेही प्रमाण उतरविले नाही, आणि असे की अल्लाहच्या नावाने तुम्ही एखादी अशी गोष्ट सांगावी जिच्यासंबंधी तुम्हाला ज्ञान नसेल (कि ती  खरोखर त्याने फर्माविली आहे.)’(संदर्भ : सुरे एराफ आ.क्र. 33).
    याशिवाय कुरआनने अनेक ठिकाणी वाम मार्गापासून दूर राहण्याची चेतावणी दिलेली आहे. जे लोक या चेतावणीला जुमानणार नाही त्यांच्यासाठी आखिरत (द डे ऑफ जज्मेंट) च्या दिवशी कसा व्यवहार केला जाईल? “तेंव्हा काहींचे चेहरे तेजःपुंज असतील तर काहींचे चेहरे काळवंडलेले असतील. ज्यांचे चेहरे काळवंडतील (त्यांना सांगण्यात येईल की) श्रद्धेची देणगी मिळाल्यानंतर अश्रद्धावंतांप्रमाणे वर्तन करता? बरे तर आता कृतघ्नतेच्या मोबदल्यात प्रकोपाचा आस्वाद घ्या”
(संदर्भ : कुरआन - आले इमरान आ.क्र. 106.)
    या आयतींना मुस्लिम त्यांच्या श्रद्धेमुळे खऱ्या मानतील परंतु, मुस्लिमेत्तरांनी यांना खरे का बरे मानावे? या प्रश्नावर मौलाना अबुल आला मौदूदी यांचे उत्तर असे आहे की -
    ”जेव्हा बुद्धीजीवी माणसे या ब्रह्मांडाच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, ही रचना अतिशय चिकित्सीय पद्धतीने केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की, ज्या अल्लाहने मानवाला बुद्धी देऊन वैचारिक शक्ती दिली, त्या बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती दिली, त्याला तमीज (शिष्टाचार) ने वागण्याची उर्मी दिली, त्याने त्या सगळ्या शक्तींचा वापर कसा केला? यासंबंधी त्याला विचारपूसही केली जाणार नाही. त्याला पुण्य केल्यावर पुरस्कार व पाप केल्यावर शिक्षा दिली जाणार नाही, हे कसे शक्य आहे? ब्रह्मांडाच्या रचनेवर अशा प्रकारे जे विचार करतात त्यांचा आखिरतवर विश्वास बसतो व ते अल्लाहने तजवीज (प्रस्तावित) केलेल्या शिक्षेपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करतात.” (अर्थात आपल्या जीवनात चांगुलपणा आणण्याचा प्रयत्न करतात.) (संदर्भ : तफहिमल कुरआन खंड-1, पान क्र. 311).
    तसे पाहता आपण भारतीय मुस्लिम श्रद्धावान आहोत. आपल्यामध्ये नास्तिकांची संख्या फार कमी आहे. मात्र पूर्ण आस्तिक ही नाही व पूर्ण नास्तिकही नाही अशा फक्त नावाचे मुस्लिम असलेल्या लोकांची संख्या मागील काही वर्षापासून वेगाने वाढत आहे. त्यांना धार्मिक प्रतिकांचा उदो-उदो करण्यामध्ये मोठा रस आहे. पैगम्बर (सल्ल.) जयंतीमध्ये डीजे लावून नाचण्यात त्यांना आनंद येतो. मात्र प्रत्यक्ष प्रेषित (सल्ल.) यांनी  आदेशित केलेले धार्मिक (नैतिक) आचरण करतांना मात्र अवती भोवतीच्या वातावरणातून मिळालेले संस्कार त्यांना आडवे येतात. पश्चिमेकडून आलेल्या सर्वच गोष्टी स्विकार्य नाहीत. याची साधी जाण यांना नाही.
    प्रत्येक माणसाचे खरे यश आखिरतमध्ये मिळणारे यश आहे. याची जाणीव निर्माण झाल्याशिवाय आपल्या मधून ’दाई ’ निर्माण होणार नाहीत व अन्य धार्मिक समुहांना खरे मार्गदर्शन मिळणार नाही. ही जाणीव निर्माण व्हावी यासाठी कुरआनचे शिक्षण प्रत्येक मुस्लिमाने आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही. आज अस्तित्वात असलेल्या कुरआन पठणाच्या पद्धतीत अमुलाग्र असा बदल करून त्याचे फक्त ’वाचन’ न करता ते ’आत्मसात’ करण्याकडे बुद्धीजीवी लोकांना लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. एकदा का कुरआन आत्मसात करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली की मला उद्याच्या सूर्य उगवण्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक विश्वास या गोष्टीवर आहे की आत्मसात केलेल्या कुरआनचा प्रभाव एवढा जबरदस्त असेल की आत्मसात करणार्यांचे जीवन आंतरबाह्य बदलून जाईल व हा बदल सकारात्मक बदल असेल, अशा लोकांच्या जीवनातून अंधार नष्ट होईल. नैतिकतेचा सूर्य प्रकाशमान होईल, त्यांच्या हातून गुन्हा तर सोडा अनैतिक काम सुद्धा होणार नाही. ते इतरांच्या मानवाधिकारांची पायमल्ली करणार नाहीत. त्यांच्यातून सकारात्मक उर्जेचा संचार होईल व त्या उर्जेतून सर्व समाजाच्या प्रगतीचे मार्ग प्रशस्त होईल.     मुस्लिम उम्माहला ’उम्मत-ए-वस्त’ असे म्हणतात. याचा अर्थ या उम्मतच्या पाठिमागे 1 लाख 24 हजार प्रेषित आहेत तर पुढे कयामत (प्रलयाचा दिवस) पर्यंत जगात जन्मणारे लोक आहेत. दोघांच्या मधोमध मुस्लिम उम्मत उभी आहे. म्हणून त्यांना उम्मते वस्त म्हणजेच दरम्यानमधील उम्मत असे म्हणतात.
    या पार्श्वभूमीवर इस्लामच्या संदर्भात माझे वैयक्तिक मत असे आहे की, मुस्लिम समाजाची स्थिती रेल्वे इंजिनसारखी आहे. इंजीन जसे अनेक डब्यांना आपल्या अंगभूत ताकतीने ओढत इच्छीत स्टेशनपर्यंत घेऊन जाते, तसेच मुस्लिमांनी इतर लोकांना ओढत स्वर्गा (जन्नत) च्या स्टेशनपर्यंत घेऊन जाणे इस्लामला अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे डब्यांना खेचण्यासाठी इंजीनाला दोन रूळावर असणे आवश्यक आहे. इंजिन जर रूळावरून घसरले तर बाकीच्या डब्यांना ओढणे तर सोडा ते स्वतःच जमिनीत रूतून बसते. ठीक याचप्रमाणे प्रत्येक मुस्लिम (दाई) ला इस्लामच्या नैतिक शिकवणीच्या रूळावर राहणे आवश्यक आहे. असे असेल तरच ते स्वतःसह इतर समाजाची प्रगती सुनिश्चित करू शकतील अन्यथा ते स्वतःही इतरांसोबत वाहवत वाम मार्गाला जातील. अशामुळे वाईट गोष्टींची सुरूवात करण्याची पावती जरी त्यांच्या नावावर फाडली गेलेली नाही तरी वाईट गोष्टींना विरोध न केल्याचा ठपका मात्र त्यांच्यावर अल्लाहच्या न्यायालयात लागल्याशिवाय राहणार नाही.
    प्रत्येक मुस्लिमाने जर व्यक्तिगत नैतिक आचरणाची काळजी घेतली तर त्यातूनच सामुहिक चारित्र्याची निर्मिती होते व अशाच समाजात शांती आणि प्रगती शक्य होते. महिला सुरक्षित होतात. मुलांना निकोप वातावरणात वाढण्याची संधी मिळते. आज ज्या वातावरणात मुले वाढत आहेत ते वातावरण निकोप आहे म्हणणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेण्यासारखे आहे. या अवस्थेतून बाहेर काढून दुसर्यांना आपल्या सोबत चांगल्या व्यवस्थेत घेण्याची मोठी जबाबदारी मुस्लिमांवर आहे. याची जाणीव सर्वांना असणे ही काळाची गरज आहे. 
    जुगनूओं को साथ लेकर रात रौशन कीजिए
    रास्ता सूरज का देखा तो सहर हो जाएगी
    जमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक अशीच जाणीव असणारी संस्था आहे. ही संस्था मुस्लिम व मुस्लिमेत्तर दोन्ही समाजाच्या नैतिक उन्नतीसाठी कटिबद्ध आहेत. कुरआन व हदीसची शिकवण सर्वांपर्यंत पोहचावी व त्यातून त्यांची नैतिक व भौतिक प्रगती व्हावी व सर्वांना मुक्ती मिळावी यासाठीची काळजी घेते. जमाअते इस्लामी हिंदच्या महाराष्ट्र विभागाने या काळजीतूनच 12 ते 21 जानेवारी 2018 या कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात राहणार्या सर्व धर्मीय लोकांपर्यंत इस्लामच्या नैतिकतेचा संदेश पोहोचवावा म्हणून ’इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ या शिर्षकाखाली एक विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. तरी सामान्यतः प्रत्येकांनी व विशेषतः मुस्लिमांनी या मोहिमेत सामील होऊन आपले सक्रीय योगदान द्यावे. ही आपली दुहेरी जबाबदारी आहे. एक नैतिक दूसरी राष्ट्रीय. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की,” ऐ ! अल्लाह आम्हाला इस्लामी आचरण किती महत्वाचे आहे व त्या आचरणापासून दूर झाल्याने आज आपल्या प्रिय देशात जो अनैतिक हाहाकार माजला आहे. जनता त्राहीमाम-त्राहीमाम करीत आहे त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आम्हा सर्वांना समज दे.” (आमीन.)

एम.आय.शेख
9764000737



इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती, शरण असा होतो. मनुष्याला वास्तविक शांती त्याच वेळी प्राप्त होते जेव्हा तो स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करून त्याच्याच आदेशानुसार जीवन व्यतीत करतो. अशाच जीवनाने मनःशांती प्राप्त होते आणि समाजात शांती नांदू लागते. अल्लाहच्या आज्ञांचे पालन व त्यानुसारच आचरण हीच खरी शांती आहे आणि म्हणून या धर्माचे नाव ’इस्लाम’ (शांती) असे अल्लाहने ठेवले आहे. इस्लामने शांततेला अधिक महत्त्व दिले आहे. कुरआनात म्हटले आहे की, ”त्यांच्या पालनकर्त्याजवळ त्याच्याकरिता शांतीचे निवासस्थान आहे. आणि तो त्याचा वाली आहे, त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगिकारली”(कुरआन, 6 :127) मानवी समस्यांवर एकमेव उपाय इस्लामी जीवनव्यवस्था आहे. जगात सुखशांती तेव्हाच नांदू शकते जेव्हा मानव आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनाची पायाभरणी इस्लामच्या तत्त्वानुसार करेल. हे मत फक्त यामुळे नाही की आम्ही मुस्लिम आहोत आणि इस्लाम आमच्या ईमानाचा अनिवार्य भाग आहे. वास्तविक पाहता हीच वस्तुस्थिती आहे.
    मनुष्य एक सामाजिक अस्तित्व आहे. तो जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेकानेक संबंधामध्ये जखडलेला असतो. तो या जगात डोळे उघडताच आईवडील, आजी, सगेसंबंधींशी संबंध ठेवण्यास बाध्य होतो.  त्याचे संबंध कौटुंबिक, शेजारीपाजारी, आपल्या गावाशी, आपल्या देशाशी आणि समस्त मानवतेशी अनेकानेक प्रकारांनी जोडले जातात. हे सर्व संबंध जर सत्य आणि नैसर्गिक, स्वाभाविक पायावर उभारले गेले तरच ही आशा धरली जाऊ शकते की जगात मानवी हक्कांची पायमल्ली कधीही होणार नाही आणि जगात शांती, समृद्धी नांदू शकेल. या मानवी संबंधांना संतुलित, स्वाभाविक व शाश्वत करण्यासाठी एक अशा वैश्विक परिपूर्ण जीवनव्यवस्थेची आवश्यकता आहे जी अत्यंत संतुलित आहे. सुखसमृद्धी व विश्वशांतीची हमी देणारी आहे. अशा व्यवस्थेत उच्चनीचता नसते, त्यात श्रीमंत-गरीब, काळा-गोरा असा अस्वाभाविक भेद नसतो. अल्लाहने (ईश्वराने) या परिपूर्ण जीवनव्यवस्थेची सोय केली आहे. अल्लाह एक असे महान अस्तित्व आहे जो समस्त मानवजातीचा आणि सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता, शासनकर्ता, मालक असल्याने प्रत्येक माणसाशी तो न्याय करू शकतो. मनुष्याच्या फक्त भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्याची सोय अल्लाहने केली आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे.
    प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आजपासून साडेचौदाशे वर्षांपूर्वी जीवनव्यवस्थेला व्यावहारिक रूप दिले. असे करून प्रेषितांनी इस्लामला मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व जीवनव्यवहारात कार्यान्वित करून जगापुढे समस्त मानवतेच्या कल्याणासाठी एक आदर्श ठेवला आहे.
    अल्लाहला तो इस्लाम अपेक्षित नाही ज्याचे प्रदर्शन मुस्लिम लोक शतकानुशतके आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात करत आहेत. तो इस्लाम नव्हे जो मुस्लिमांंना त्यांच्या वारसाहक्कात प्राप्त झाला आहे. खरा इस्लाम कुरआन आणि सुन्नत (हदीस) मध्ये सुरक्षित आहे. आदर्श खलीफांच्या राज्यकाळात जी चालतीफिरती जीवनव्यवस्था प्रचलित होती तो खरा इस्लाम आहे, ज्यामुळे सुखसमृद्धी आणि मानवी कल्याणाचा समुद्र उफाळून आला होता. खरा इस्लाम एकमेव अल्लाहच्या आज्ञापालनाची शिकवण देतो. समस्त मानवतेसाठी एक आदर्श, संतुलित जीवनव्यवस्था म्हणजे इस्लाम होय. मानवतेला त्या इस्लामपासून लाभ घेण्याचा तसाच अधिकार आहे ज्या प्रकारे मानव ईश्वराच्या देणग्यांचा लाभ दररोज घेत आहे. मानवतेचे वैश्विक कल्याण, वैश्विक मुक्तीची हमी आणि परिपूर्ण व्यवस्था पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्रात (सुन्नत) सुरक्षित आहे.
    आजसुद्धा जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील समस्त समस्यांची उकल इस्लाम आणि फक्त इस्लाममध्येच आहे. कुरआन स्पष्ट करतो की, ”आज आम्ही तुमची जीवनपद्धती (दीन) परिपूर्ण केली. तुमच्यावर आपल्या देणग्यांचा वर्षाव पूर्ण केला आणि इस्लामला तुमच्यासाठी आदर्श जीवनव्यवस्था म्हणून निश्‍चित केले.”
    अशाच प्रकारे पवित्र कुरआनमध्ये दुसऱ्या ठिकाणी सृष्टीनिर्माता अल्लाहने स्पष्ट केले आहे, ”अल्लाहजवळ तर परिपूर्ण जीवनव्यवस्था फक्त इस्लाम आहे.”
    इस्लामच्या शिकवणी आणि आदेश जगातील दुसऱ्या सर्व जीवनव्यवस्थांपेक्षा आणि शिकवणींपेक्षा पूर्णत: स्वाभाविक, समस्त मानवजातीसाठी स्वीकृत असे प्रत्येक देशासाठी आणि काळासाठी उपयुक्त सिद्ध झाले आहेत.


नाजिम खान, बार्शीटाकळी
9763869830


मित्रानों ! जगाचं एक मुलभूत सत्य आहे़ ज्याच्या आधारे जगाची संपूर्ण व्यवस्था चालत आहे़ आपण (मनुष्य) सुद्धा या जगापासून वेगळे नाही तर या जगात त्याचा एक अंश म्हणून राहत आहोत़ म्हणून सर्वांसाठी हे सत्य ज्याप्रमाणे मुलभूत आहे त्याच प्रमाणे आपल्यासाठी सुद्धा मुलभूत सत्य आहे़
    सध्या हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तिसाठी आणि जगातील सर्व माणसांसाठी एक बिकट समस्या बनली आहे की, आम्हा माणसांच्या जीवनातून शांती व समाधान लोप का पावले आहे? आमच्यावर संकटे सदैव का कोसळत असतात? आमच्या जीवनाची घडी का विस्कटली आहे? राष्ट्रा-राष्ट्रामध्ये संघर्ष का निर्माण झाला आहे? त्यांच्यात ओढातान का होत आहे? माणूस माणसाचा शत्रू का बनला आहे? जगात लक्षावधी माणसे मरत आहेत़ जगाचे अब्जावधीचे नुकसान होत आहे़ वस्तीच्या वस्ती बेचिराख होत आहेत़ बलवान आणि श्रीमंत लोक दुर्बलांना गीळंकृत करीत आहेत़ राज्यकारभारात अत्याचार होत आहेत. न्यायालयामध्ये अन्याय होत आहे, संपत्तीमध्ये अतिरेक, सत्तेमध्ये उन्माद आहे, मैत्रीत लबाडी आहे़ नितीमत्तेत सचोटी राहिली नाही़ माणसावरून माणसाचा विश्वास उडाला आहे़  धर्माच्या रूपात अधर्म होत आहे. मानवजात अनेक गटामध्ये विभागली गेली आहे़  प्रत्येक गट दुसऱ्या गटास दग्या-फटक्याने जुलूम अत्याचाराने बेईमानी व लबाडीने हानी पोहोचविण्यास पुण्यकार्य समजत आहे़ या सर्व वाईटाचे कारण काय आहे? अल्लाहच्या सृष्टीत आपण पाहतो सर्वत्र शांती पसरलेली दिसते़ ताऱ्यांमध्ये शांतता आहे़, हवेत शांतता, पाण्यात शांतता, झाडे झुडपे आणि जनावरांमध्ये शांतता आहे. संपूर्ण सृष्टीचा कारभार पूर्णपणे शांततेत चालू आहे़ कोठेही उपद्रव आणि अव्यवस्थेचा लवलेशही आढळत नाही़ परंतु, केवळ मानवी जीवनच शांततेपासून वंचित आहे?
    हा एक अवघड प्रश्न आहे, जो सोडविण्यासाठी नाकीनऊ येत आहेत़ याचे थोडक्यात उत्तर असे आहे की, माणसाने आपले जीवन सत्य आणि वास्तवतेच्या विरोधी शक्तींना सोपवले आहे़ म्हणून मानवास कष्ट भोगावे लागत आहे़ जोपर्यंत मानव स्वत:ला सत्य आणि वास्तविकेतच्या सुपूर्द करीत नाही तोपर्यंत त्यास कधीही शांतता प्राप्त होणार नाही़ उदा़ तुम्ही चालत्या आगगाडीच्या दारास आपल्या घरचे दार समजलात आणि ते उघडून बिनधास्त बाहेर पडलात जणू आपल्या घरच्या दालनात पाय टाकत आहात़ तर तुमच्या गैरसमजुतीमुळे रेल्वेचे दार घरचे दार बनणार नाही आणि ते मैदान सुद्धा की, ज्यावर आपण फेकले जाऊ घराचे दालन ठरणार नाही़ तुम्ही आपल्या ठायी काहीही समजले तरी वास्तविकतेमध्ये किंचितही बदल होणार नाही़ भरधाव चाललेल्या आगगाडीच्या दारातून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल त्याचा जो परिणाम होणार तो झाल्याशिवाय राहणार नाही मग पाय मोडल्यानंतर, डोके फुटल्यानंतर सुद्धा आपण हे मान्य करू नये की, आपण जे कांही समजले होतो ते चुकीचे होते? अगदी त्याचप्रमाणे आपण समजलो की या जगाचा कोणीही पालनकर्ता नाही किंवा आपण स्वत:च आपले ईश्वर बणून रहाल अथवा ईश्वराशिवाय अन्य एखाद्याचे ईशत्व मान्य कराल तर आपल्या अशा समजुतीमुळे वस्तुस्थिती कदापी बदलणार नाही़ ईश्वर हा ईश्वरच राहणाऱ त्याचे जबरदस्त साम्राज्य ज्यामध्ये आपण केवळ प्रजा म्हणून राहत आहोत़ सर्वाधिकारानिशी त्याच्याच अखत्यारित राहणार आहे. उलट आपल्या अशा चुकीच्या समजुतीमुळे जी जीवन पद्धती स्विकारली त्याची कटू फळे आपणास चाखावी लागतील मग यातना भोगल्यानंतर सुद्धा अशा चुकीच्या जीवनास आपल्या ठायी अचूक का समजावे?
    सकल जगाचा ईश्वर कोणाच्या केल्याने सर्वव्यापी ईश्वर बनलेला नाही तो काही लाचार नाही, आपण त्याचे इशत्व मान्य करू तेव्हाच तो ईश्वर ठरेल़ आपण मान्य करा अथवा न करा तो तर स्वत: ईश्वर आहे़ त्याचे ईशत्व स्वबळावर उभे आहे़ त्याने स्वत: आम्हाला या संपूर्ण ब्रम्हांडाला बनविले आहे़  ही पृथ्वी, हा सूर्य आणि संपूर्ण सृष्टी त्याच्या आदेशाच्या आधिन आहे़ या सृष्टीमध्ये जितक्या शक्ती कार्यरत आहेत़ त्याच्या आदेशाखाली आहेत. त्या सर्व वस्तू ज्यांच्या बळावर आपण जीवंत आहोत त्याच्या अधिकाराधीन आहेत़ स्वत: आपले अस्तित्व त्याच्या अधिकारात आहे़ आपण हे मान्य केले अथवा नाही तरी वस्तू स्थिती हीच आहे. या सर्व अवस्थेत सत्याचे तर काहीच वाईट होत नाही़ परंतु, फरक असा होतो की, आपण जर वस्तुस्थिती मान्य करून आपले तेच स्थान मान्य केले़ जे या सृष्टीमध्ये आपले वास्तविक स्थान आहे तर आपले जीवन योग्य राहील. आपल्याला सुख, शांती, समाधान लाभेल़  आपल्या जीवनाची घडी व्यवस्थित बसेल. परंतु, जर आपण व्यवस्थेविरूद्ध अन्य कोणतेही स्थान स्विकारले तर परिणाम तेच निघेल जो भरधाव चाललेल्या रेल्वेच्या दारास आपल्या घराचे दार समजून बाहेर पडण्याने निघतो. आघात आपल्या स्वत:ला सोसावा लागेल, पाय आपले मोडणाऱ, डोके आपले फुटणार, यातना आपल्या स्वत:ला भोगाव्या लागतील़ परिस्थिती जशी होती तशीच राहणार. आपण प्रश्न कराल की परिस्थितीनुसार आमचे उचीत स्थान कोणते आहे? त्याचे उत्तर असे आहे की, जर एखाद्या नोकरास आपण पगार देऊन नोकरीस ठेवले असेल़  तर त्या नोकराचे वास्तविक स्थान काय आहे? हेच की त्याने आपली़ नोकरी करावी, आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करावे़ मालकाच्या मर्जीनुसार काम करावे आणि नोकरीची मर्यादा ओलांडू नये़ नोकराचे काम नोेकरी करण्याशिवाय अन्य काय असू शकते? आपण जर अधिकारी आहात आणि एखाद्या हाताखाली असेल तर हाताखालच्या व्यक्तिचे काय काम असेल? हेच की त्याने ताबेदारी करावी़ अधिकाऱ्याच्या ऐटीत राहू नये.          
    जर आपण एखाद्या इस्टेटीचे मालक असाल तर त्या इस्टेटीमध्ये आपली इच्छा काय राहील? अशीच की तिच्यावर आपली मर्जी चालावी़ आपल्याला काही हवे असेल तेच तिच्यात घडावे, आपल्या इच्छेविरूद्ध तिथले पानसुद्धा हलू नये़ आपल्यावर जर एखादी सत्ता काबीज असेल आणि सर्व अधिकार तिच्या ताब्यात असतील तर अशी राजेशाही असताना तेथे आपले काय स्थान असते? हेच की आपण सरळ प्रजा बणूून रहावे आणि शाही कायद्याच्या बाहेर पाउल टाकू नये़ बादशाहाच्या राज्यात राहत असताना जर आपण स्वत:च बादशाहीचा दावा किंवा अन्य एखाद्याची बादशाही मान्य करून त्याच्या आदेशानुसार वागत असाल तर आपलं बंड खोट ठरेल़  बंड खोराशी जो व्यवहार केला जातो तो आपल्याला माहीत आहे़
    या उदाहरणावरून आपण समजू शकतो की अल्लाहच्या या राज्यात आपले स्थान काय आहे? अल्लाहने आपल्याला बनविले आहे़ स्वाभाविकपणे आपले काम याशिवाय अन्य कोणतेही नाही की आपण आपल्या बनविणाऱ्याच्या मर्जीनुसार चालावे. अल्लाह आपले पालन करीत आहे़ त्याच्या खजिन्यातून आपण पगार घेत आहोत़  याशिवाय, आपले अन्य कोणतेही स्थान नाही की, आपण त्याचे नोकर आहोत़ आपला आणि सर्व जगाचा तो मालक आहे़ त्याच्या अधिकारात आपले स्थान दासाशिवाय अन्य काय असू शकते? ही पृथ्वी आणि हे आकाश सर्व त्याचीच इस्टेट आहे़ या इस्टेटीमध्ये त्याचीच मर्जी चालेल आणि त्याचीच मर्जी चालली पाहिजे. आपणास येथे स्वत:ची मर्जी चालविण्याचा कोणताच हक्क नाही़  जर आपण आपली मर्जी चालविण्याचा प्रयत्न कराल तर तोंडघशी पडाल. या राज्यात त्याची सत्ता त्याच्या ताब्यात आहे़ या राज्यात ईश्वराची सत्ता त्याच्या स्वत:च्या बळावर उभी आहे़ पृथ्वी आणि आकाशाची सर्व सत्ता त्याच्या ताब्यात आहे. आपण यावर राजी असो किंवा नाराज असो, कोणत्याही परिस्थितीत आपण त्याचे रयत (गुलाम) आहोत़ आपला अथवा अन्य कोणत्याही माणसाचा दर्जा मग तो लहान असो की मोठा, गुलाम असण्याखेरीज अन्य कोणताही नाही. त्याचाच कायदा साम्राज्यात आहे आणि त्याचाच हुकूम हा हुकूम आहे़ गुलामापैकी कोणासही असा दावा करण्याचा हक्क नाही की मी ’हिज मॅजिस्टी’ आहे किंवा ’हिज हायनेस’ आहे अथवा हुकूमशाह किंवा सर्व सत्ताधिकारी आहे. कोणत्याही व्यक्तिस अथवा लोकसभेस किंवा विधानसभेस अथवा मंडळास हा अधिकार प्राप्त नाही, की या साम्राज्यात अल्लाहच्या कायद्याशिवाय आपल्या स्वत:चा कायदा लागू करावा आणि अल्लाहच्या रयतेला सांगावे की, आमच्या कायद्याचे पालन करा. कोणत्याही मानवीय सत्तेस हा अधिकार पोहचत नाही की, अल्लाहच्या आदेशाची उपेक्षा करून अल्लाहच्या दासावर आपला हुकूम चालवावा हे उचीत नाही अशा सर्व अवस्था बंडाच्या आहेत़ याची शिक्षा बंड करणारे व त्यांचे आदेश स्विकारणारे दोघांनाही मिळणे निश्‍चित आहे. मग ती शिघ्र मिळो अथवा उशीरा. आपले आणि जगातील प्रत्येक मुनष्याच्या डोक्यावरील केस अल्लाहच्या मुठीत आहेत. हवे तेव्हा धरून त्याने ओढावे़  त्याच्या या पृथ्वी आणि आकाशाच्या राज्यातून पळून जाण्याची ताकद कोणातही नाही़ त्याच्यापासून पळ काढून आपण कोठेही आश्रय मिळवू शकत नाही़ मातीत मिसळून आपला कण न् कण जरी विखूरला गेला, आगीत जळून आपली राख हवेत पसरली, पाण्यात वाहून आपण माशाचे भक्ष बनलो किंवा समुद्राच्या पाण्यात विरघळून गेलो़ तरी अल्लाह प्रत्येक ठिकाणाहून आपणास पकडून बोलावील़ वारा त्याचा दास आहे, पृथ्वी त्याची दास आहे, मासे आणि पाणी सर्व त्याच्या आदेशाच्या आधीन आहेत़ एका इशाऱ्यासरशी चोहोकडून आपण पकडीत सापडू मग तो आपल्यापैकी प्रत्येकाला बोलावून विचारेल की माझी रयत असूनही सत्ताधिशाचा दावा करण्याचा हक्क तुम्हाला कोठून प्राप्त झाला होता? माझ्या राज्यात आपले आदेश चालविण्याचे अधिकार तुम्ही कोठून आणले होते़ ? माझ्या सत्तेमध्ये आपला कायदा चालविणारे तुम्ही कोण? माझे दास असूनही इतरांचे दास्यत्व पत्करण्यावर तुम्ही राजी कसे झालात? माझे दास असूनही तुम्ही इतरांच्या आज्ञा कशा पाळल्यात? माझ्याकडून पगार घेऊन इतरांना तुम्ही अन्नदाता आणि पालनकर्ता मानलेत़ माझे गुलाम असूनही इतरांची गुलामी केलीत, माझ्या राज्यात राहून सुद्धा इतरांची सत्ता तुम्ही मान्य केली व इतरांच्या कायद्यांना कायदा समजलात आणि इतरांच्या हुकूमाचे पालन केले़ ही बंडखोरी तुमच्यासाठी वैध कशी ठरली होती? आपणापैकी कोणापाशी या आरोपाचे उत्तर आहे सांगा बघू? कोणते वकील तेथे आपल्या युक्त्या लावून बचावाचा मार्ग काढू शकतील? या बंडखोरीच्या अपराधाची शिक्षा भोगण्यापासून तुम्हास कोण वाचविणार आहे?
    ही माणसाची वास्तविकता आहे़ त्या वास्तविकतेशी जुळवून घेऊन, त्या एकमेव सत्ताधिशाच्या आज्ञांचे पालन केल्यास अर्थात त्याने सांगीतल्याप्रमाणे जीवन जगल्यास माणसाच्या आणि संपूर्ण जगताच्या जीवनात शांतता नांदवून तो विकासाच्या मार्गावर अग्रेसर होईल़ वास्तविक मालकाच्या कायद्याचे पालन करणे म्हणजे त्याची आराधना करणे होय. हेच मानवाच्या मुक्तीचे गमक आहे आणि हाच इस्लाम आणि हीच वास्तविकता आहे़

अब्दुल मजीद खान, नांदेड
9403004232

- फेरोजा तस्बीह, चिपळून
यात मुळीच शंका नाही की इस्लाम एक यशस्वी जीवन जगण्याची व मुक्ती मिळविण्याची एकमेव पद्धत आहे. याचा आधार पवित्र ग्रंथ कुरआन आहे. अल्लाह एकमेव सत्ताधीश आहे. जमीन आणि आकाश या दरम्यान जे काही आहे, सर्व त्याचेच आहे. एकदा का या तत्वावर विश्‍वास बसला की, माणसाचे जीवन योग्य दिशेने मार्गक्रमण सुरू करते. अल्लाहने जेव्हा पहिल्या मानवाची म्हणजेच आदम आणि हव्वा अलै. यांना पृथ्वीवर पाठविले, त्यांना मुस्लिम म्हणून पाठविले. त्यांच्यापासून वंश वाढला, तो वंश म्हणजेच पृथ्वीतलावरील सर्व मानवजात होय. वेगवेगळे रंग, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या संस्कृती या तर फक्त एकमेकांची ओळख पटविण्यासाठी आहे. बाकी सर्व आदम आणि हव्वा अलै. यांचीच लेकरे आहेत. त्यामुळे त्यांचा धर्म एक, त्यांची जीवन व्यवस्था एक आणि त्यांच्या मुक्तीचा मार्गही एक, म्हणजेच इस्लाम होय. या तत्त्वाचा ज्यांनी अव्हेर केला त्यांनी पृथ्वीवर आपली मर्जी गाजविली, आपले स्वतःचे कायदे बनिवले, गरीबांना पिळले, महिलांवर अत्याचार केले. माणसाच्या या पतभ्रष्ट जीवन क्रमाला मूळ पदावर म्हणजे इस्लामवर आणण्यासाठी अल्लाहने 1 लाख 24 हजार प्रेषित पाठविले. जेव्हा अरबस्थानामध्ये सामाजिक अनागोंदीची परिसिमा झाली तेव्हा अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना पाठविण्यात आले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला योग्य म्हणजे इस्लामी दिशा दिली. व 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी समग्र अरबस्थानाचे सामाजिक वातावरणच बदलून टाकले. वाईट लोक चांगले झाले. प्रेषितांनी हे सगळे त्यांच्यावर अवतरित झालेल्या कुरआनच्या आदेशानुसार केले. हेच आदेश राहत्या जगापर्यंत अंतिम आदेश आहेत. या प्रमाणे जो समाज जीवन जगेल तोच मुक्ती मिळवेल.
    पृथ्वीवर अनेक व्यवस्था अस्तित्वात असून, त्यांचा अन्याय आणि अत्याचार टिपेला पोहोचलेला आहे. सहाव्या शतकात प्रेषित सल्ल. यांच्या पूर्वी जी जहालत होती तीच आज अस्तित्वात आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. कन्याभ्रुणहत्या होत आहेत. दारू आणि ड्रग्स यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. विश्‍वासघात, खोटारडेपणा, अश्‍लीलता, अनैतिकता इत्यादी अवगुणांनी अवघी पृथ्वी व्यापून राहिली आहे. हीच परिस्थिती सहाव्या शतकात असतांना प्रेषितांनी अल्लाहचा संदेश कळविला की, ”हे इमानधारकांनो तुमच्यासाठी योग्य नाही की तुम्ही महिलांचे मालक बनाल” (संदर्भ : सुरे निसा आयत नं. 19). ही आयत अवतरित झाल्यानंतर अरबांमध्ये महिलांची परिस्थिती एकदम बदलली. जे अरब मुलींना जीवंत पुरत होते ते आपल्या मुलींना आपल्या संपत्तीमधून त्यांना वाटा द्यायला लागले. याशिवाय, दारूच्या विरूद्ध जेव्हा आयत नाजील झाली तेव्हा न भुतो न भविष्यती असा बदल अरबस्थानात झाला. जुन्या दारूचे शौकीन अरबांनी दारूचा असा नायनाट केला की आजपर्यंत मक्का मदिना आणि आसपासच्या क्षेत्रात दारूचा लवलेशसुद्धा मिळत नाही. एकंदरित असाच बदल आजही शक्य आहे, फक्त इस्लामची वाट चोखाळावी लागेल.

तौहीद अर्थात एकेश्वरवाद हा इस्लामचा प्रथम आधारस्थंब आहे ज्याचा संपूर्ण विश्वामध्ये प्रचार व प्रसार करणे हे समस्त मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे. हे महत्कार्य तडीस नेण्यासाठी अल्लाहने जगात विविध भागांत आणि समाजात आपले प्रेषित धाडले होते. प्रेषित आगमनाचा क्रम महान अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर समाप्त झाला. इस्लामच्या तौहीदच्या धारणेनुसार संपूर्ण जगाचा पालनहार, निर्माता आणि नियंता अल्लाहतआला आहे आणि संपूर्ण विश्व अल्लाहचे कुटुंब आहे. म्हणून तार्किकदृष्ट्या धर्मभेद, जातपात, रंगभेत, वंशभेद, भाषाभेद आणि देशप्रदेशामध्ये भेदाभेद करणे समाप्त होऊन जाते आणि संपूर्ण जगाने एकजुटीने राहणे आवश्यक होऊन जाते. याचे कारण हे की संपूर्ण मानवजातीचे आई-वडील एकच म्हणजे आई हव्वा आणि बाप आदम (अ.) आहेत. अशा वेळी तिरस्कार आणि शत्रुत्वाच्या सर्व सीमा तुटून जातात. भेदभावाशिवाय सर्वधर्मीय व सर्वजातीय आणि सर्व प्रकारचे जनसमूह आपापसात बांधव होऊन जातात. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहचे फरमान आहे की, ”हे लोकहो, आम्ही तुम्हा सर्वांना एकाच पुरुष व एकाच स्त्रीपासून जन्माला घातले आणि यासाठी की तुम्ही आपापसात एक दुसऱ्याला ओळखावे म्हणून तुमचे कबिले, जाती आणि समूह निर्माण केले, अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वाधिक प्रतिष्ठित तो आहे जो ईशभीरूता आणि सत्कर्म अंगीकारील. नि:संशय अल्लाह बुद्धिमान आणि सर्व खबर राखणारा सर्वज्ञ आहे.”
    तौहीदप्रमाणेच प्रेषित्व हे इस्लामचे एक अत्यंत महत्वपूर्ण आधारस्थंभ आहे. अल्लाहचा दैवी संदेश पोहोचविणाऱ्या सन्माननीय पैगंबरांवर ईमान राखल्याशिवाय कुठलाही मनुष्य मुस्लिम होऊ शकत नाही. अल्लाहची ही पैगंबरी परंपरा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनानंतर संपुष्टात आली, या श्रद्धेवर जो ईमान राखणार नाही तो निश्‍चितच व निर्विवादपणे मुस्लिम वा मोमीन वा मुसलमान नाही. हे कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या वचनाने सिद्ध झाले आहे. ही मूलभूत धारणासुद्धा आमच्याकडून अपेक्षा बाळगते की एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याबरोबर प्रेम, बंधुभाव, दया आणि सांप्रदायिक ऐक्याची वागणूक ठेवावी. धर्म व जातीपाती अथवा वंश वा प्रदेशापायी मत्सर बाळगू नये. याचे कारण हे की प्रेषित मुहम्मद (स.) यांना संपूर्ण मानवजातीसाठी भलाई, शांती, कल्याण आणि उद्धारासाठी अल्लाहतर्फे पाठविण्यात आले आहे. ते एखाद्या विशेष प्रदेशासाठी वा जातीसाठी पाठविण्यात आले नाहीत, तर अखंड मानवतेसाठी धाडण्यात आले आहेत. त्यांचे हे प्रेषित्व समस्त मानवकल्याणासाठी आहे.
    प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचार (सुन्नत) विचारां(हदीस)मध्ये मानवतावाद, सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक सलोख्यावर आधारित आदेशांची कमतरता नाही. त्यांनी फरमावले आहे की ”सर्वात उत्तम लोक ते आहेत जे समाजासाठी लाभदायक आहेत.” राष्ट्रीय सद्भावनेसाठी याहून उत्तम उपदेश कोणता असू शकतो बरे! सांप्रदायिक एकता आणि राष्ट्रीय सद्भावनेचे सर्वोत्कृष्ठ उदाहरण पवित्र कुरआनमध्ये सांगितल्याचे आढळून येते.
    महान प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या मदीनेतील आयुष्यात फरमाविले की, ”बनू जदआनच्या घरात जी समिती गठीत झाली होती, अशा प्रकारे सद्भावना आणि शांतीकरिता एखादी समिती स्थापन होत नसेल तर त्याचा सदस्य बनने माझ्याकरिता लाल रंगाचा उंट प्राप्त करण्यापेक्षाही बेहतर आहे.” ही शांती-सद्भावना समिती ’हिलफूल फजूल कमिटी’ म्हणून इस्लामी इतिहासात प्रसिद्ध आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका अमुस्लिम व्यक्तीच्या घरी बनलेल्या कमिटीचे सरदार नव्हे तर सदस्य होण्याची इच्छा व्यक्त केली. मानवता, सौहार्द आणि एकतेचे असे उदाहरण आपणास कुठेच सापडणार नाही. हा आदर्श जगवासियांसमोर ठेवण्यासाठीच अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना जगात पाठविले होते. आणि त्यांच्या सोबत्यांनी (सहाबा) तो आदर्श व्यावहारिक रूपात सादर करून दाखविला.
    अशाच प्रकारे दुसरे उदाहरण म्हणजे जेव्हा इस्लामी शासन प्रस्थापित झाले तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी यहुदी, इसाई आणि इतर बहुदेववाद्यांबरोबर शांती-सलोखा राखण्यासाठी सुप्रसिद्ध हुदैबियाचा करार केला होता. राष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने प्रेषितांचा हा प्रयास एक ठोस पुरावा आहे की सामाजिक सलोखा राखण्याकरिता प्रेषितांनी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही.
    इस्लाम धर्मावर सतत शिंतोडे उडविले जातात की, हा दहशतवादी, आक्रमणकारी, हिंस्र, कठोर आणि कपटनीतीची शिकवण देणारा अमानवी धर्म आहे. कुरआन आणि हदीसचे अध्ययन केल्यानंतर हे आरोप किती थोतांड आहेत हे आपल्याला कळून चुकते. इस्लामने आणि इस्लामच्या खऱ्या अनुयायांनी दहशतीचे व हिंसेचे कधीच समर्थन केले नाही आणि आजपावेतो करीत नाहीत.
इस्लामने सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी जी काही मानवतापूर्ण व दूरगामी पावले उचलली आहेत त्याबद्दल आम्ही अगदी थोडीशी माहिती देऊ इच्छितो.
(1) प्राणाची सुरक्षा-
इस्लाम अमुस्लिमांसमवेत सर्व मानवजातीच्या प्राणाची रक्षा करण्याची शाश्वती देतो. धरतीवर वसणाऱ्या कोणत्याही निरपराध व्यक्तीची हत्या करणे म्हणजे संपूर्ण मानवजातीची हत्या करणे, असे इस्लामचे कठोर मत आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांची आज्ञा आहे की, ”अमुस्लिमांना ठार मारणारा स्वर्गाचा सुगंध प्राप्त करू शकणार नाही.” (सही बुखारी हदीसग्रंथ)
(2) न्यायपूर्ण व्यवहार-
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फरमावले की, ”अल्लाह स्वत: आज्ञा देतो की, हे अल्लाहच्या दासांनो! मी माझ्यावर अत्याचाराला निषिद्ध केले आहे. आणि तुमच्यादरम्यानदेखील अत्याचाराला निषिद्ध केलेले आहे. म्हणून तुम्ही आपापसात एकमेकांची पिळवणूक करू नका.” (मुस्लिम हदीसग्रंथ) इथे सर्व मुस्लिम-अमुस्लिम अल्लाहचे दास आहेत. त्या सर्वांना संबोधून अल्लाहचा हा सामाजिक सलोखा राखणारा उपदेश आहे.
(3) धार्मिक स्वातंत्र्य-
राष्ट्रीय एकात्मता राखण्यासाठी सर्व धर्मांच्या लोकांच्या धर्माचा आदर करणे आणि त्यांना स्वातंत्र्य बहाल करणे अनिवार्य आहे, त्याशिवाय कोणतेही राष्ट्र एकजिनसी कधीच होणार नाही.” ज्या मुस्लिम राष्ट्रात विविध धर्मियांचे लोक राहतात अशा सर्व धार्मिक समूहांना धर्मस्वातंत्र्य बहाल करणे इस्लामच्या शिकवणीनुसारच आहे. पवित्र कुरआनमध्ये अल्लाह प्रेषित मुहम्मद (स.) यांना आदेश देतो की, ”तुम्ही सांगा की, तुमचा धर्म तुमच्यासाठी आणि माझा धर्म माझ्यासाठी आहे.” (कुरआन, सूरह काफिरून-6)
    पवित्र कुरआनमध्ये एक आयत आहे, ”धर्माच्या बाबतीत कोणतीच जोरजबरदस्ती नाही.” (कुरआन, सूरह बकरा-256)
या धार्मिक स्वातंत्र्याला आणखीन मजबूत बनविण्यासाठी इस्लामने अमुस्लिमांच्या श्रद्धास्थानांना आणि त्यांच्या उपास्यांना वाईट बोलण्यापासून मनाई केली आहे. कुरआनमध्ये अल्लाहची आज्ञा आहे, ”शिव्याशाप देऊ नका त्यांना, ज्यांची हे लोक अल्लाहशिवाय इतराची उपासना करतात. कारण की अशाने ते सुद्धा मर्यादेच्या पलीकडे जाऊन अल्लाहला उलटसुलट बोलू लागतील.”(कुरआन,सूरह अन्आम-108)
- पवित्र स्थळांचा आदर-
इस्लाम सर्व धर्मियांच्या पवित्र स्थळांचा आदरसन्मान राखतो, कारण श्रद्धाळूची आपल्या धर्मस्थळावर प्रचंड श्रद्धा असते, याची जाणीव इस्लामला आहे. कुणाचे श्रद्धास्थळ उद्ध्वस्त केल्याने धार्मिक भावना इतक्या दुखावल्या जातात की एक समाज दुसऱ्या समाजाचा कट्टर वैरी होऊन जातो आणि काळानुसार या वैरभावात अधिक वाढ होत जाते. त्यामुळे समरसता, एकता, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेम लयास जाऊ लागते. त्या दृष्टिकोनातून इस्लामचे प्रथम खलीफा अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांनी अमुस्लिमांच्या धार्मिक बाबींसंबंधी एक करार सादर केला होता. त्या कराराचे असे शब्द आहेत- ”त्यांची पूजास्थळे, चर्च, त्यांचे महाल, इमारती आणि किल्ले ज्यांना त्यांनी शत्रूंपासून बचाव करण्यासाठी निर्माण केले होते, त्यांना अजिबात उद्ध्वस्त केले जाणार नाही. त्यांना त्यांची धार्मिक वाद्ये वाजविण्यापासून रोखले जाणार नाही, तसेच त्यांच्या उत्सवात क्रूस घेऊन मिरवणूक काढण्यास मनाई केली जाणार नाही. (तबकात इब्ने सआद, पृ. 357)        (4)    क्षमादान-
सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेखातर क्षमादान देणारा इस्लामसारखा शांतीप्रेमी धर्म या पृथ्वीपृष्ठावर दुसरा कदापि आढळणार नाही.
पवित्र कुरआनमध्ये अल्लाहचे फर्मान आहे,
”सत्कर्म आणि दुष्कर्म एकसमान असू शकत नाही. दुष्कर्माला तुम्ही सत्मार्गाने समाप्त करून टाका, मग तो, ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व आहे असा होऊन जाईल जसे अत्यंत घनिष्ठ मित्र.” (कुरआन, सूरह हा मीम अस्सजदा-34)
    प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का शहरात आपल्या आयुष्याची 13 वर्षे अशा लोकांत व्यतीत केली जे प्रेषितांच्या रक्ताला आसुसलेले होते, त्यांची हत्या करण्यासाठी नाना प्रकारची षङ्यंत्रे रचित होते, प्रेषितांच्या नातेवाईकांना, हितचिंतकांना, सोबत्यांना ठार मारीत होते, त्यांच्यावर जादूगार, वेडा, बहकलेला, खोटा अशी दुषणे लावित होते. अशा लोकांनादेखील प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्वत: सत्ताधीश, सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली झाल्यानंतर क्षमा केली.

त्याच्या सूक्ष्म कणांच्या बारीक बारीक स्फटिकांमधून
माझ्या शरीरात ईमान घटकांचे सबलीकरण होत जावे!
 - निसार मोमीन, पुणे.
9763810609

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget