Halloween Costume ideas 2015
Articles by "विशेष"


पावसाळा आला की सर्वत्र तारांबळ उडते. एक तर मुलांच्या शाळा सुरू होतात, शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरू होतात, वारकऱ्यांच्या दिंड्या आणि पर्यटकांच्या सहली निघतात. या सर्वात केंद्रस्थानी असतो पाऊस. उन्हाळा भर सुट्ट्यांचा आनंद घेणारे विद्यार्थी पावसाळ्यात आपल्या वह्या-पुस्तकांबरोबरच छत्र्या आणि रेनकोटच्या बाजारांची शोभा बनतात. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या तयारीसाठी कृषी केंद्रे आणि शेत-अवजारांची दुकाने गजबजून जातात; कारण पहिला पाऊसच पेरणीच्या तयारीची सूचना देत असतो. आषाढी एकादशी आणि मृग नक्षत्राच्या सरी वारकऱ्यांच्या पायी जाणाऱ्या दिंड्यांना भिजवून त्यांचा आनंद द्विगुणित करत असतो. दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा ओंढा वाहत नदी-नाल्यांचे पात्र भरायला वेळ लागत नाही आणि त्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक पाणथळ्यांच्या दिशेने गर्दी जमवत असतात. 

या पावसाच्या आनंदात आणि उल्हासात लोक हे अगदी विसरून जातात की या सुखद पावसाळ्यापूर्वी एक कडक उन्हाळा आपण असा अनुभवलाय की एखाद्या दिवशी पिण्याच्या पाण्याचे वांधे तर कधी बिना आंघोळीचा एखादा दिवस आपण घालवलाय. पावसाळ्यात जेव्हा या दिवसांची आठवण होते तेव्हा ’गेले ते दिवस’ म्हणून आपण सुटकेचा श्वास घेतो. मात्र तेच दिवस परत पुढच्या उन्हाळ्यात येतील आणि आपल्याला आज पडणाऱ्या पावसाचे व्यवस्थापन करावे हा विचार फार कमी लोकांच्या मनात येतो. यासाठी योग्य विचार आणि चिरकाल तोडगा काढण्यासाठी शाश्वत जल व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आली.

शाश्वत जल व्यवस्थापन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक समता सुनिश्चित करत, वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जलसंपत्तीचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर करणे. शाश्वत जल व्यवस्थापन करण्यासाठी पहिला पैलू म्हणजे जलसंवर्धन; यामध्ये आपण कार्यक्षम पद्धतींद्वारे पाण्याचा अपव्यय टाळून आणि वापर कमी करून पाण्याचे संवर्धन म्हणजे बचत करू शकतो. दुसरा पैलू वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकतो ज्यामध्ये आपण पिण्यायोग्य वापरासाठी पावसाचे पाणी गोळा करून साठवून ठेवतो. पाण्याचा पुनर्वापर हा तिसरा पैलू आहे. कृषी किंवा औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. आणखी एक पैलू म्हणजे पाणलोट व्यवस्थापन. यात नैसर्गिक जलचक्र आणि वेगवेगळ्या अधिवासांचे संरक्षण करून त्यांचे पुनर्संचयन केल्यास पाण्याचे व्यवस्थापन होते. पाणी आणि उर्जेचा वापर यांच्यातील परस्परावलंबन सुद्धा जल व्यवस्थापनात मदत करू शकते. कृषी जल व्यवस्थापन हा पैलूही उल्लेखनीय आहे; कार्यक्षम सिंचन प्रणाली आणि पद्धतींची अंमलबजावणी केल्यास फायदेशीर ठरेल. जल-कार्यक्षम पायाभूत सुविधा आणि पद्धतींसह शहरांची रचना करून देखील शाश्वत जल व्यवस्थापनास हातभार लागेल. विविध जल धोरणे आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम यात उपयोगी ठरतील. जलशिक्षण आणि जागरूकता; वापरकर्त्यांना पाणी टंचाई आणि संवर्धनाबद्दल वेळीच जागरूक केले जावे. जल तंत्रज्ञान आणि नवकल्पना हाही एक पैलू होऊ शकतो ज्यामध्ये शाश्वत जल व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणे आणि लागू करणे जेणेकरून जास्तीत जास्त पाण्याची बचत होईल. शाश्वत जल व्यवस्थापन केल्यास जीवन अधिक सुखकर होईल यात शंका नाही. याशिवाय अन्न सुरक्षा सुनिश्चित होईल, आर्थिक पाठिंबा, परिसंस्थांचे संरक्षण, हवामान बदलाचे परिणाम कमी होतील, सामाजिक समता आणि न्याय यांना प्रोत्साहन मिळेल. शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी पाणी-सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू शकतो ज्यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, वारकरी आणि पर्यटक तितक्याच उल्हासात पावसाळ्याची सुरूवात करतील.

- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. : 7507153106



मधमाशी दिसायला अगदी  लहान असते पण तिची कामे फार मोठी असतात. आपण तिच्या कामाचे विचार केले तर आपल्याला तिची योग्यता आश्चर्यचकित करते. तिचे खास काम मध तयार करणे होय, जे खूप गोड असते, आणि ज्यामध्ये औषधी चे गुण असतात. चला तर मग चिंतन करूया. आणि मध बनवण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या प्रक्रियेमध्ये बहुतेक माशा असतात, ज्यामध्ये राणीमाशीला सर्वाधिक स्थान असते. ती पूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. असे समजा की ती इतर माशांची नेता आणि मार्गदर्शक असते. राणीमाशी इतर कामगार माशांपेक्षा वेगळी असते. तिचा शरीर इतर माशांपेक्षा मोठा असतो. इतर माशा राणीमाशीसाठी अन्न तयार करण्याचे काम (आतील पान 7 वर)

करतात. त्याशिवाय, विविध माशांच्या वेगवेगळे काम असतात, जो राणीमाशीने त्यांना दिलेली असतात. राणीमाशीचे खरे कार्य हे आहे की ती तीन आठवड्यांमध्ये सुमारे 11 ते 12 हजार अंडे घालते. या अंड्यांचे संरक्षण करण्याचे काम इतर माशांचा एक गट करतो. आणि एक समूह तो असतो, जो अंड्यांमधून  - बाहेर पडलेल्या बाळांची देखभाल आणि प्रशिक्षण करतो. काही माशा पोळा बनवतात, तर काही संरक्षणाची कामे करतात. रक्षक माशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पोळयात येऊ देत नाहीत. काही माशांचा समूह तो असतो जो सैनिकाची भूमिका बजावतो. त्याचे काम शत्रूंशी सामना करणे असते आणि पोळयाचे  रक्षण करणे हेसुद्धा त्याच गटाची जबाबदारी असते. काही माशा रस ओढून आणतात, काही मध आणि मोमचा पोळा बनवण्याचे काम करतात.

या माशांमध्ये नकाशा बनवण्याची क्षमता असते, जशी गूगल मॅपमध्ये असते. या माशा सूर्यप्रकाश आणि पृथ्वीच्या चुंबकीय ताकतचे  वापर करून कठीण नकाशा बनवू शकतात. आणि आपल्या पोळयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करतात. एखादी दुसरी माशी राणीमाशी बनण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला मारले जाते. या माशा स्वच्छ असतात, स्वच्छ वस्तूंपासून अन्न बनवतात, अस्वच्छ वस्तूंवर बसत नाहीत, आणि कोणालाही हानी पोहोचवत नाहीत.

एक हदीस आहे ज्यामध्ये मानवाचे  उदाहरण मधमाशी सारखे दिले आहे. हदीस हे आहे की,      ‘माणसाचे उदाहरण त्या मधमाशीप्रमाणे आहे, जी पवित्र वस्तू खाते आणि पवित्र वस्तू उत्पन्न करते. ती जेथे बसते तेथे ती ना तोडते, ना बिघडवते (मुस्नद अहमद)’.

खरोखरच, माणसाचे उदाहरण त्या मधमाशीप्रमाणे आहे जे माणूस स्वच्छता आणि पवित्रता पसंत करतो, मेहनती  असतो, आणि स्वतःचा मार्ग शोधतो. अल्लाहने दिलेल्या बुद्धीचा वापर करून, आपले ध्येय गाठतो, मग ते या जगाचे ध्येय असो किंवा परलोकाचे.

तो माणूस नफा देणारा असतो, लोकांच्या भल्यासाठी कार्य करीत असतो, आणि लोकांना नफा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो, अगदी त्या मधमाशीप्रमाणे जी मेहनत करून रस ओढून आणते. तो संघटनेत राहतो, संघटनेशी जोडलेला राहतो, एकटे भरकटत नाही, आपल्या प्रमुखांच्या(अमीर) आज्ञेचे पालन करतो. 

जर  संघटनेच्या संरचनेत काही त्रुटी दिसली तर तो ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. जर कोणी त्रुटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर त्याला योग्य मार्गावर आणतो. जर कोणी शत्रू संघटनेच्या संरचनेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर त्याला आपला शत्रू समजून त्याचा नाश करतो.

खरोखर, एका माणसाची आणि खऱ्या व्यक्तीची अशी गुणधर्म असावी की तो प्रमुखाचे आज्ञा पालन करतो, कारण प्रमुखाचे आज्ञापालन हे रसूलल्लाह (सल्ल.) चे आज्ञापालन आहे, आणि रसूलल्लाह (सल्ल.) चे आज्ञापालन करणे हे अल्लाहचे आज्ञापालन आहे.

आणि जो कोणी अल्लाहचे आज्ञा पालन करतो, तो खरेच या जगात आणि परलोकात यशस्वी होतो, कारण जीवनाचा खरा उद्देश अल्लाहचे आज्ञा पालन आहे, त्याची बंदगी आहे, त्याच्यासमोर नतमस्तक होणे आहे, त्याच्याशी प्रेम करणे आहे, त्याच्याशी मागणे आहे, त्याच्यासाठी जगणे आहे, आणि त्याच्यासाठीच मरणे आहे.

ज्याप्रमाणे मधमाशी मध बनवण्याचे कार्य करते, फुलांचा रस ओढते, ज्यामध्ये उपजिविका आहे आणि औषध देखील आहे, तसाच एक माणूसही लोकांची भूक आणि तहान मिटवण्याचे कार्य करतो,लोकांच्या दुःखांची वेदना कमी करणारा बनतो.

अगदी त्याचप्रमाणे एक नेक व्यक्ती आणि इमानवंत बंधू, कुरआनावर विचार करतो व बुद्धीचा वापर करतो, कानांनी ऐकतो, कुरआणाच्या गोष्टी समजुन घेतो,  ज्यामुळे त्याला सत्य प्राप्त होते, कुरआन ऐकून, समजून, बुद्धीचा वापर करून, कुरआनावर विचार करुन आणि अल्लाहशी  जवळीक साधून. त्याला अल्लाह मिळतो, तो अल्लाहशी प्रेम करतो, त्यांचे जीवन पवित्र होते. तो लोकांना भल्याचा आदेश देतो आणि वाईटापासून दूर ठेवतो. एक शिस्तबद्ध जीवन जगतो आणि खोटे आणि वाईट कामांपासून दूर राहतो.

पवित्र कुरआनमध्ये आहे की,’’  आणि पहा, तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये आणि मांडवावर चढविलेल्या वेलीत आपले मोहळ बनव.व प्रत्येक प्रकारच्या फळांचे रस शोषून घे आणि आपल्या पालनकर्त्याच्या सुरळीत केलेल्या मार्गावर चालत राहा. या माशीमधून रंगीबेरंगी एक सरबत निघते जे लोकांकरिता आरोग्यदायी आहे, निश्चितपणे यातदेखील संकेत आहे त्या लोकांकरिता जे गांभिर्याने विचार करतात.(दिव्य कुरआन सुरह: अन नहल: आयत:68,69)

मधमाशीला ही बुद्धी कोणी दिली? स्पष्टच आहे की तिच्या निर्माणकर्ता ने दिली. ही मधमाशी, बुद्धीचा योग्य वापर करून, अल्लाहच्या आज्ञेनुसार लाभदायक काम करते. 

अखिल मानवजाती साठी यात खूप मोठा धडा आहे. मानवाला पाहिजे की त्याने या छोट्या मधमाशीपासून धडा घ्यावा, आपल्या बुद्धीचा योग्य वापर करावे, आपल्या क्षमतांचे ओळख करून घ्यावे, आणि त्यांचा अधिकाधिक चांगला वापर करून घ्यावा. एक नीतिमान आणि पवित्र जीवन जगावे, अल्लाहचा दास बनून राहावे, आणि त्याचीच आज्ञा पाळावी. जसे, अल्लाहचे दास बनून मधमाशी अल्लाहच्या आज्ञेचे पालन करते आणि एक पवित्र जीवन जगते. तुमच्या पैकी श्रेष्ठ तो आहे जो लोकांना फायदा पोहचवत असतो. (हदिस) 


- आसिफ खान, धामणगाव बढे

9405932295


मृत्यूपासून शिक्षेची सुरूवात


मृत्यूनंतर कयामतचा दिवस येईपर्यंतच्या काळाला बरज़ख़ी जीवन म्हणतात. मुस्लिम समाजात मृतदेह कबरमध्ये दफन करतात म्हणून या जीवनाला ’कबर की जिन्दगी’ असेही म्हणतात. या जीवनात नास्तिक, अनेकेश्वरवादी व इतर पापी लोक दु:ख भोगतात, तर एकमेव ईश्वर, अल्लाहवर श्रध्दा ठेवणाऱ्या सदाचारी लोकांना दिलासा मिळतो. हे मात्र नक्की की मृत्यू ते कयामत या काळात सुख किंवा दुःख यांपैकी कोणत्याही एका परिस्थितीतून प्रत्येक माणसाला जावेच लागते. मग मृत व्यक्ती दफन केला गेला असो, जाळला गेला असो किंवा ते प्राण्यांचे अन्न बनलेले असो. मृत व्यक्तीची अवस्था सांसारिक जीवनातील लोकांना दिसत नाही. आदरणीय अंतिम पैगंबर मुहम्मद (त्यांच्यावर अल्लाहची कृपा व शांती असो) यांनी म्हटले आहे की, 

मला ही भीती वाटते की तुम्ही तुमच्या मृतांना दफन करणे थांबवाल, अन्यथा मी अल्लाहकडे प्रार्थना केली असती की मी ऐकत असलेल्या कबरीतील यातनांचा आवाज तुम्हालाही ऐकू यावा. (हदीस संग्रह मुस्लिम - 7213 खपीं.. 2867 - इस्लाम 360 )बरज़ख़ी जीवनात मिळणारी शिक्षा जिन्न आणि मानवांपासून लपवून ठेवली गेली आहे. त्यांना ती अजिबात दिसत नाही, पण त्यांच्याशिवाय इतर प्राण्यांना त्याची थोडीफार जाणीव होत असते. जर ती परिस्थिती उघड केली गेली आणि लोकांनी मृतांचे रडणे, ओरडणे ऐकले तर त्यांना मृत्यूची इतकी भीती वाटेल की ते कुणाच्याही अंत्यसंस्काराला जाऊ शकणार नाहीत, कोणतेही काम करू शकणार नाहीत आणि जगाची व्यवस्था विस्कळीत होईल. कबरमध्ये मिळणाऱ्या यातना अल्लाहच्या अदृश्य व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ही प्रार्थना नेहमी केली पाहिजे, अल्लाहुम्-म इन्नी अऊज़ुबि-क मिन् अज़ाबिल्-कब्-रि हे अल्लाह! कबरीच्या यातनापासून मी तुझा आश्रय घेतो.( हदीस संग्रह - बुख़ारी 1377 - इस्लाम 360 )

याशिवाय शिक्षेकडे नेणाऱ्या सर्व कृती टाळण्याची काळजी घेतली पाहिजे. कबरीच्या शिक्षेस कारणीभूत ठरणारे काही गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत. अल्लाहच्या अस्तित्वात, गुण सामर्थ्यात, हक्क व अधिकारात कुणाला सामील करणे, दांभिकपणा, ढोंगीपणा करणे, अल्लाहचे कायदे बदलणे, लघवीच्या थेंबापासून स्वतःचे रक्षण न करणे, एखाद्याच्या पाठीमागे त्याच्या बद्दलच्या वाईट गोष्टी दुसर्यास सांगणे, लावालावी करणे, खोटे बोलणे, कुरआन शिकल्यानंतर त्याकडे लक्ष न देणे, अनिवार्य नमाज़ झोपेत घालविणे, व्याज खाणे, व्यभिचार करणे, लोकांना चांगले शिकवणे पण स्वतःला विसरणे, रमजानमधील उपवास विनाकारण तोडणे, पुरुषांनी घोट्याच्या खालपर्यंत असलेले कपडे घालणे, एखाद्या प्राण्याला कैद करून त्याचा छळ करणे व कर्ज न फेडणे इत्यादी. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पाहा,

इस्लाम सवाल व जवाब

अज़ाबे कब्र के तफ्सिली असबाब.


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.



भारतीय स्वातंत्र्य लढा हा केवळ पुरुषांचाच नव्हे तर स्त्रियांचाही मोठा संघर्ष होता. समाजाच्या बंधनांना आणि रूढींना आव्हान देत, अनेक स्त्रिया या लढ्यात सहभागी झाल्या आणि त्यांनी देशासाठी मोठे बलिदान दिले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार केला तर भारतातील महिला स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बेगम हजरत महल या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील १८५७ च्या उठावात सक्रिय सहभाग घेतला. स्वतंत्र भारताच्या लढ्यात महिलांचे योगदान दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. अनेक धाडसी महिलांनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध आवाज उठवला. अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून मिरवणुका काढल्या आणि व्याख्याने आणि निदर्शने केली. या महिलांमध्ये प्रचंड धाडस आणि प्रखर देशभक्ती होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्त्रियांच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे. भारतातील स्त्रियांनी केलेल्या बलिदानाला भारतीय इतिहासाच्या इतिहासात प्राथमिक स्थान आहे. त्यांनी खर्‍या आत्म्याने आणि निःसंकोच शौर्याने लढा दिला आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वेदना, शोषण आणि दुःखांचा सामना केला.

१८५७ च्या सैनिक बंडात, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल आणि झाशीची राणी यांसारख्या स्त्रियांनी आपले शौर्य आणि पराक्रम दाखवून ब्रिटिश सैन्याला कडवी लढाई दिली. सामाजिक सुधारकांनी शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि बालविवाह सारख्या मुद्द्यांवर लढा दिला. यात रमाबाई, ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांचा समावेश होता.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसोबतच स्त्रियांचा सक्रिय सहभाग वाढू लागला. या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली, आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या स्त्रियांनी भाषणे, निषेध मोर्चे आणि बहिष्कार चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील अहिंसक सत्याग्रहात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा सहभाग हा चळवळीचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली पैलू होता. स्त्रियांच्या स्वातंत्र्य युद्धातील कामगिरीकडे सतत दुर्लक्ष झाले आहे.

अनेक महिला काँग्रेस पदाधिकाऱ्या बनल्या आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी रणनीती तयार करण्यात आणि अंमलात आणण्यात सहभागी झाल्या. महिलांनी समाज सुधारणे आणि शिक्षण, आरोग्य आणि कल्याण यासारख्या क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक संस्था आणि आंदोलने सुरू केली. अनेक महिलांनी स्वदेशी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी निधी उभारण्यासाठी दान केले. काही महिलांनी क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला आणि ब्रिटिश सरकारविरोधात लढा दिला.

स्त्रियांच्या सहभागाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोठी गती मिळाली. या लढ्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण झाली. स्वातंत्र्यानंतर, महिलांना समान अधिकार आणि संधी मिळण्यासाठी लढण्यास प्रेरणा मिळाली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचे योगदान अमूल्य होते. त्यांच्या धैर्य, त्याग आणि बलिदानाने भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात मोठी भूमिका बजावली. आजही, त्यांची प्रेरणादायी कथा आपल्याला समानता आणि न्यायासाठी लढण्यास प्रेरित करते. राणी लक्ष्मीभाई देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या. १८१७ च्या सुरुवातीला भीमाबाई होळकर यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिल्यापासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग सुरू झाला. मादाम भिकाजी कामा, १८५७ च्या उठावानंतर आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पहिल्या भारतीय महिला समाजवादी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्रातील अनेक गांधीवादी महिलांचे योगदान आहे. डॉ. अॅनी बेझंट यांचेही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महत्वाचे आहे. स्वातंत्र्यासाठी व्यापक, सर्वसमावेशक आणि शाश्वत चळवळ उभारण्यात या महिलांचे योगदान मोलाचे होते. स्वराज्यासाठीच्या चळवळीत जशा अहिंसक सत्याग्रहात हजारो स्त्रिया सामील झाल्या, तशा अनेक स्त्रिया सशस्त्र क्रांतिकारक बनल्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटिश राजवट संपवणे हा होता. 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांना सहभागी करुन गांधींनी स्त्रीयांना नागरीक म्हणून आपले कर्तव्ये पार पाडण्याची संधी दिली. बेगम साफिया अब्दुल वाजिद यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनासाठी अलाहाबाद विद्यापीठातली आपली प्राध्यापकीची नोकरी सोडली, मादाम भिकाजी कामा यांनी देशाबाहेर भारताला स्वातंत्र्य मिळावे, या विचारांचा प्रसार केला. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं सर्वांत मोठं आंदोलन म्हणून ‘चले जाव’ची नोंद होते. या आंदोलनात असंख्य भारतीयांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर अनेक सुधारणावादी चळवळी सुरु झाल्या. स्त्रियांच्या दर्जात सुधारणा घडविण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी मोठे आणि  महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांचे बलिदान आहे. त्यात वेगवेगळया धर्माचे, समाजातील व्यक्तींचा सहभाग आहे. देशातल्या अनेक राज्यांतील नेत्यांच्या योगदानानं देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. हे आपल्याला माहिती आहे. मात्र यासगळ्या लढ्यात महिलांच्या संघर्षाकडं फारसं लक्ष देण्यात आलं नाही. त्यांच्या योगदानाची म्हणावी अशी दखल घेण्यात आली नाही. 

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात महिलांचे योगदान महत्वाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्याचा उल्लेखही आहे. त्या महिलांनी स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. मात्र आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. याचा विचार आपण करायला हवा. त्या महिला शूर आणि निडर होत्या. मात्र यासगळ्यात आपल्याला त्यांच्या त्या संघर्षाचा विसर पडला की काय असे वाटते, आपण त्यांच्या त्या योगदानाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही. ज्या महिलांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या योगदानाची नोंद आपण घ्यायला हवी. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही महिलांच्या योगदानाच्या उल्लेखाअभावी अपूर्ण आहे. असे आपल्याला वाटते. हे मानसीनं म्हटलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यानं आपण त्या महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा द्यायला हवा.

चले जाव आंदोलनाच्या नायिका म्हणून अरुणा असफ अलींकडे पाहिलं जातं. भूमीगत राहून स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या अरुणाबाईंच्या क्रांतीच्या निर्धाराला स्वत: महात्मा गांधीही बदलू शकले नाहीत. मात्र, गांधींची भेट घेण्यासाठी अरुणाबाईंनी केलेलं अद्वितीय धाडस इतिहासात नोंदवलं गेलंय. अरुणाबाई विचारानं समाजवादी. चले जाव आंदोलनातील त्यांचे समाजवादी साथी एक एक करून गजाआड होत होते. त्यात जयप्रकाश नारायण यांना गुन्हा मान्य करण्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपवल्याची बातमी फुटली. संपूर्ण देश हादरला. यावेळी अरुणाबाईंची तर सरकारला खाऊ की गिळू अशी अवस्था झाली होती. पायाला भिंगरी लावून अरुणाबाई तरुणांना चळवळीत आणण्यासाठी फिरत होत्या. हे सर्व भूमीगत कार्य असल्यानं त्यांची तब्येतही ढासळत जात होती. अरुणाबाईंच्या तब्येतीच काळजी वाटत असल्याचं म्हणत गांधीजींनी त्यांना भेटण्यास बोलावले. या भेटीची जबाबदारी ग. प्र. प्रधान यांच्यावर होती. पुण्याच्या पारसी सॅनिटोरियमच्या मागील बाजूस गांधीजींच्या निवासाची कुटी होती. सॅनिटोरियमचा भाग असल्यानं तिथं फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. याचाच फायदा घेत अरुणाबाई तिथं पोहोचल्या.

अरुणाबाई वेशांतर करून तिथं पोहोचल्या होत्या. पारशी महिलेचं वेशांतर अरुणाबाईंनी केलं होतं. गांधींना त्यांची ओळख पटावी म्हणून अरुणाबाईंनी गांधींना भेटल्यावर ‘कापडिया’ हा सांकेतिक शब्द उचारण्याचं ठरलं होतं. अरुणाबाईंना पाहताच गांधींनी त्यांना घातपाती चळवळ बंद करून पोलिसांच्या स्वाधीन होण्याची विनंती केली. मात्र, त्यावर अरुणाबाई म्हणाल्या, “मी तुमचा अत्यंत आदर करते. पण आपले विचार जुळणारे नाहीत. मी क्रांतीवादी आहे आणि क्रांतीवादी म्हणूनच काम करणार. आपल्याला शक्य असल्यास मला आशीर्वाद द्यावा.”  आपले रस्ते वेगळे आहेत, हे सांगण्याचे धाडस अरुणाबाईंमध्ये होतं आणि गांधींनी भेटीसाठी बोलावलंय म्हटल्यावर जीवावर बेतणार असल्याचं कळूनही त्यांना भेटण्यासाठी जाण्याचं धाडसही त्यांच्यात होतं. अरुणा असफअली मात्र अखेरपर्यंत इंग्रजांच्या हातात सापडल्या नाहीत. त्यांना पकडून देणाऱ्यास पाच हजारांचं बक्षीस इंग्रजांनी जाहीर केलं होतं. युसुफ मेहरअलींनी अरुणाबाईंबद्दल म्हटलं होतं की, ‘झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनंतर अरुणाताई याच स्वातंत्र्ययुद्धाच्या नायिका होत्या.’

- डॉ. सुनील दादा पाटील

कवितासागर फिचर्स, जयसिंगपूर जि.कोल्हापूर, मो.-9975873569



"परम दयाळू व परम कृपाळू अल्लाहच्या नावाने", कुरआनची सुरुवात ज्या आयतीने केली आहे ती जवळजवळ सर्व अध्यायांच्या सुरुवातीलाच ईश्वरी दयेचे महत्त्व अधोरेखित करते. करुणा  आणि सहानुभूती ही तत्त्वे कुरआन आणि सुन्नतने निर्धारित केलेल्या आमच्या श्रद्धेचा आधार म्हणून उभी आहेत. "परम दयाळू" आणि "परम कृपाळू" ही अल्लाहची वैशिष्ट्ये आहेत. हे आवाहन केवळ एक वाक्य नाही तर श्रद्धावंतांना आत्मसात करणे बंधनकारक असलेल्या करुणेच्या आंतरिक मूल्याची आठवण करून देणारे आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी यावर अधिक प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात, "दयाळू लोकांवर सर्व दयाळू लोक दया करतात. पृथ्वीवरील लोकांवर दया करा आणि आकाशातील ईश्वर तुमच्यावर दया करेल". ही हदीस ईशदया आणि मानवी करुणा यांच्यात परस्पर आणि सहजीवी संबंध प्रस्थापित करते आणि मुस्लिमांसाठी नैतिक, परस्परावलंबी संबंध निर्माण करते.

करुणेचे नैतिक दायित्व येथे संपत नाही, तर गरिबांना मदत करणे आणि अनाथांचे रक्षण करणे यासारख्या सामाजिक निर्देशांपर्यंतही ते विस्तारते. दुर्बल लोकांबद्दल करुणा आणि दया नसेल तर कर्मकांड आणि प्रार्थना निष्फळ ठरतात.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एक आदर्श घालून दिला. मुस्लिम बांधवांना आवाहन केले की, त्यांनी ही मूल्ये आत्मसात करावीत, आत्मपरीक्षण करावे आणि त्यांच्या आध्यात्मिक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि इस्लामचे खरे मर्म जगासमोर दाखवावे. मुस्लिमांवर त्यांच्या धर्माचे दूत म्हणून काम करण्याची जबाबदारी आहे.

मुस्लिमांना सर्वोच्च नैतिक मानकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उठण्याची शिकवण द्या. आपण हे ओळखले पाहिजे की आपल्या कृती आणि वर्तनातूनच तपासणी केली जाते आणि बऱ्याचदा अविश्वासी लोकांच्या मनातील धारणांना आकार दिला जातो. करुणा आणि सहानुभूतीच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनातूनच आपण इस्लामबद्दलच्या नकारात्मक रूढी आणि गैरसमजांचा प्रभावीपणे प्रतिकार करू शकतो.

आज आपण ज्या समाजात टिकून आहोत, त्या समाजात इस्लामोफोबिया अनेकदा गैरसमज आणि इस्लामच्या मूलभूत तत्त्वांच्या आकलनाच्या अभावामुळे वाढतो. या गैरसमजांचे निराकरण करणे महत्वाचे आहे, कारण ते केवळ सुधारत नाही तर करुणा आणि सहानुभूतीमध्ये रुजलेल्या इस्लामी शिकवणुकीचे खरे सार देखील दर्शविते. इस्लाम हिंसेचे समर्थन करतो आणि त्याला प्रोत्साहन देतो या खोट्या-कथनाचा प्रतिकार करून केवळ प्रत्येक आत्म्याचे महत्त्वच नव्हे, तर त्याचे जतन करण्याची नैतिक जबाबदारीही या कुरआनद्वारे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आली आहे.

इस्लामोफोबियाची घटना बऱ्याचदा इस्लामी शिकवणुकीच्या निवडक आणि विषम चित्रणातून उद्भवते, विशेषत: त्याच्या खऱ्या सिद्धान्तांशी अपरिचित असलेल्या लोकांकडून. कुरआन मुस्लिमांना आंतरधर्मीय चर्चेत सहभागी होण्याचा आणि समजूतदारपणाची पावले तयार करण्याची सूचना देते. कुरआनमध्ये इतर धर्मांच्या अनुयायांशी आदरपूर्वक आणि रचनात्मक संबंध ठेवण्याचा, परस्पर आदर निर्माण करण्याचा आणि इस्लामबद्दलच्या मिथकांचे खंडन करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

आपल्या परस्पर संवादात आणि सामाजिक योगदानात या मूल्यांचे सातत्याने प्रदर्शन करून, मुस्लिम इस्लामोफोबियाच्या पायाला प्रभावीपणे आव्हान देऊ शकतात आणि नष्ट करू शकतात. कुरआन आणि हदीस या आपल्या नियमावलीत नमूद केलेला नैतिक आधार, जन्माला आलेल्या गैरसमजुतींना एक सशक्त प्रतिकथन म्हणून काम करतो. या कृतींद्वारे, मुस्लिम इस्लामची खरी ठिणगी भडकवू शकतात, अविश्वासी लोकांमध्ये अधिक अचूक समज वाढवू शकतात आणि अधिक सामंजस्यपूर्ण जागतिक समाजाला हातभार लावू शकतात.

अल्लाहचे शेवटचे प्रेषित मुहम्मद (स.) त्यांचे जीवन, त्यांची शिकवण, जसे की "तो श्रद्धावंत नाही ज्याचे पोट भरते आणि शेजारी उपाशी राहतो", इतरांची काळजी घेण्याच्या नैतिक कर्तव्यावर जोर देते, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा पार्श्वभूमीचे असोत. सहानुभूतीच्या सखोल भावनेने प्रेरित असलेली प्रेषित मुहम्मद (स.) यांची कृती आपल्याला शिकवते की खरी ताकद इतरांची काळजी घेण्यातच आहे.

कृतीवर विश्वास ठेवून, करुणा आणि सहानुभूतीने मानवतेची सेवा करून, आपण खऱ्या अर्थाने आपल्या निर्मात्याचे दयाळू सार प्रतिबिंबित करू शकतो आणि समजूतदारपणा आणि शांततेचे जग तयार करू शकतो. आपण स्वतःला विचारले पाहिजे: आपण आपल्या दैनंदिन जीवनात करुणा आणि सहानुभूती या तत्त्वांसह चरित्र कसे तयार करू शकतो? व्यक्ती म्हणून आणि एक समुदाय म्हणून इस्लामचे खरे मर्म आपल्या कृतीतून मांडण्याचे आव्हान आपण कसे पेलू शकतो? 

याची उत्तरे आपल्यातच दडलेली आहेत!

- शाहजहान मगदुम



असंख्य क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन आपल्या भारतमातेला ब्रिटीशांसारख्या बलदंड अशा परकीयांच्या जोखडातून मुक्त केले. भारतीय उपखंडातील ब्रिटिश सरकारचा ‘युनियन जॅक’ खाली उतरविला गेला, आणि लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला, तो सुवर्णदिन होता...१५ ऑगस्ट १९४७. या दिवशी भारत हे स्वतंत्र राष्ट्र जगाच्या नकाशावर आले.  पुढे घटना समितीने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान अर्थात राज्यघटना तयार केली व  भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असे भारतीय राज्यघटनेने लिखित स्वरूपात सांगितले.      

राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व तऱ्हेच्या स्वातंत्र्याचा लाभ भारतीय जनतेला मिळावा, यासाठी भारतीय राज्यघटना पारित करण्यात आली. याचा लाभ गेल्या ७६ वर्षांत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील लक्षावधी भारतीय नागरिकांनी घेतला; आजही ते घेत आहेत आणि पुढेही घेत राहतील, याची ग्वाही दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त दिली जाते. स्वातंत्र्याचे पाऊनशतक उलटून शतकाकडे वाटचाल सुरू असताना आसपासच्या घटना-घडामोडी पाहून अनेकांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजते. आपल्याला जे स्वातंत्र्य हवे होते ते हेच का?असाच जाहीर प्रश्न सद्यपरिस्थितीत अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि देशप्रेमींनी केला आहे.

लोकशाहीत ज्यांचा गजर केला जातो, त्या ‘स्वातंत्र्य, समता, बंधुता’ या शब्दांचा व्यावहारिक इतिहास अभ्यासण्यासारखा आहे. फ्रेंच तत्त्ववेत्यांनी ही अनमोल शब्दरत्ने लोकप्रिय केली व या शब्दरत्नांच्या गजरात मध्यमवर्ग सत्तेच्या दारापर्यंत पोहोचला, हे वास्तव आहे. तथापि आपण काय करीत आहोत, जे करीत आहोत, ते कोणासाठी व कशासाठी याचा विचार या शब्दांच्या प्रभावाखाली येणारा कधीच करीत नाही.

या त्रिसूत्रातला ‘स्वातंत्र्य’ हा शब्द सरंजामशाहीतला जुलूम व भरावा लागणारा सक्तीचा कर एवढ्यापुरता मर्यादित होता. या दोन दडपणांपासून मध्यमवर्गाला सुटका हवी होती. ‘दुसरा शब्द ‘समता’ ही समता जगातल्या सगळ्या लोकांसाठी नव्हती, तर उमरावांचा वर्ग आणि गर्भश्रीमंत व‌ धर्माधिकाऱ्यांचा वर्ग, या दोघांना जो मान व प्रतिष्ठा मिळत होती, तिच्यात मध्यमवर्गाला वाटा हवा होता. हा वाटा मिळताच तेथे समता येणार होती. आपल्यास मिळणारे हक्क गोरगरीबांना देण्यास मध्यमवर्ग तयार नव्हता. तिसरा ‘बंधुता’ या संज्ञेचा अर्थ  सर्व सामान्य धंदे करणाऱ्यांना उमराव व धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीतला मुक्त प्रवेश एवढाच फक्त होता. या संज्ञांचा अर्थ कधी काळी संपूर्णपणे विकृत बनेल व संसारी स्त्रिया आणि कामगार वर्गातील बाया सोडून सगळा प्रौढ पुरुषवर्ग या हक्कांवर आपला दावा सांगेल, अशी सुतराम कल्पना ते शब्द बनविणाऱ्यांना नव्हती. या हक्कांमध्ये आपणास वाटा नाही, हे संसारी स्त्रिया व कामगार स्त्रिया यांना मात्र अवगत होते.

इतिहासाच्या वाटचालीत या तीन तत्त्वांचे काय होते हेही पहाण्यासारखे आहे. कुवत आणि पॉवर या दोन बाबतीत लोक समपातळीत असतात, तेव्हा ती स्वतंत्र असतात हे खरे. परंतु ही समपातळी ढळली की, समानताही नाहीशी होते. नैसर्गिक गुण, शक्ती, कौशल्य यात व्यक्तिगणिक तफावत असते. ही तफावत जन्मतः असते. ही वैशिष्ट्ये मुक्तपणे वापरण्याची मुभा म्हणजे विषमतेला आमंत्रणच होय. प्रत्येक नव्या शोधाबरोबर सबळ अधिक बलवान, तर दुर्बल अधिक दुर्बल होत असतात. समतेचा तोल मुळातच डळमळीत असतो. समाज अधिक गुंतागुंतीचा बनला की, व्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये घट येते. उत्क्रांतीची बेरीज ही त्याच वेळी स्वातंत्र्य व समतेची वजाबाकी असते. निवडणुकांचे निकाल पैशाच्या गाठोड्याच्या वजनावर ठरणार असतील, तर समान मताधिकाराच्या तत्त्वामध्ये काय शिल्लक राहिले ?

सगळ्या गोष्टींचे राजकारण केले जात आहे व गुंड शिरजोर अधिकाधिक बनत आहेत. तुरुंगाची भीती कुणालाच राहिलेली नाही, आपण किती ही गुन्हे केले तरी राजकीय आश्रय असला की, आपणास कुठलीही यंत्रणा आपल्यावर कारवाई करु शकत नाही, असा एक दंभ किंवा खात्री असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागला आहे. राजकीय नेते सुध्दा बिनदिक्कतपणे तुरुंगवास भोगून बाहेर येतात. आणि त्यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊन आपल्या तुरुंगवासाचे समर्थन करतात. इतकेच नव्हे तर राजकीय नेत्यांच्या बरोबर गुंडापुंडाची लाॅबी आपले नेते किंवा टोळीप्रमुख तुरुंगातून बाहेर आले की, त्यांच्या भव्यदिव्य मिरवणुकी काढतात, हे कशाचे लक्षण आहे, याबाबत विचारवंतांसह समाजपुरुष ही गप्प आहेत, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊनही भ्रष्टाचारी नेत्यांना सत्तेत सन्मानाने बसवले जाते, त्यातून सामान्य लोकांना कोणता संदेश जाईल किंवा जातोय, याबद्दल ही राज्यकर्ते हम करे सो या वृत्तीने वागतात, समाज सुध्दा या गोष्टींना प्रतिष्ठा देतोय, त्यामुळे 

देश ज्या दिव्यातून स्वतंत्र झाला, त्यांच्याबद्दलची जाणीव अस्पष्ट होत आहे, महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, घुसखोरी, भ्रष्ट यंत्रणेकडून होणारे वाढते आर्थिक घोटाळे , राजकारणातील बजबजपुरी व बेदीली, देशाची सार्वजनिक संपत्ती बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न, अर्थव्यवस्थेतील काळा पैशाचा वापर, आरक्षणाचा वाढलेला तिढा, यांसारख्या असंख्य प्रश्नांची मालिका पाहून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतीवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले ते व्यर्थ गेले का, असा प्रश्न पडतो. इतकेच नव्हे तर पाऊण शतक ओलांडलेल्या भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय?, असा प्रश्न आ वासून समोर उभा रहातो, स्वतंत्र भारताच्या ७६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यांवर शिक्षित समाजाकडून विचारमंथन तर व्हायला पाहिजे, शिवाय सज्जनांची शक्ती संघटीत झाली पाहिजे,व कृतीशील विधायक विचार पुढे आला पाहिजे,असे वाटते.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)



वरील शीर्षक हे आजघडीला किती सूचक, समर्पक व पूरक आहे - हे सहजी सप्रमाण व उघडपणे दिसून येते. राजकारणात उच्च व नीच या स्तरावर कार्य आधीही व्हायचे, पण मागील काही काळापासून राजकारणाच्या पटलावर जनसेवा हा प्रकार अगदी बोलण्यापुरता मर्यादित ठेवून नसती खटपट व कटकट यात जनतेसह राज्य व देशाचे प्रचंड नुकसान होत आहे. याला मूळ कारण हे जनतेची पसंती/निवड आहे, जी निवडणुकीतून व्यक्त केली जाते आणि अकार्यक्षम व्यक्ती निवडून स्वतःच्या आयुष्याला स्वतःच शाप देण्याचे अर्थात उतरती कळा लावून घेण्याचे कार्य कथित सुजाण नागरिक करतात.

राजकारणीच नव्हे तर जनतेचाही स्वार्थ इतका पराकोटीला पोहोचला आहे की त्यांना राज्य किंवा राष्ट्राचा विचारही करावासा वाटत नाही. ही विभागाची राज्याची आणि राष्ट्राची शोकांतिकाच म्हणावी की, आजघडीला आपल्या राष्ट्राच्या सुजाण नागरिकांना राष्ट्राचे अस्तित्व व प्रगतीचा अधिकार भार पेलवत नाही आणि “बोलाची कढी व बोलाचाच भात” अहोरात्र पंगतरूपाने कल्पनेत मांडून निव्वळ भूलथापा वाढणाऱ्यांच्या  मैफिलीत कथित सामान्य पण संधीसाधू  लोक अकार्यक्षम, भ्रष्टाचारी, दुराचारी व धर्मांध व्यक्तीच्या मागे आपल्या आयुष्यासह राष्ट्राच्या भविष्याची राखरांगोळी करत आहेत.

अतिशयोक्ती करणं हा राजकारण्यांचा जुना खेळ व छंद, तर या बावळटपणाच्या घातकी खेळत डुंबून जाणे आणि त्यातच स्वतःचे मनोरंजन करून घेत राजकारण्यांचे कोडकौतुक करणाऱ्या जनतेने अनादी काळापासून अनादी कालपर्यंत स्वतःसाठी कल्या पाण्याच्या शिक्षेची अर्थात यातनामयी जीवनाची  तडजोड करूनच ठेवली आहे. जनतेने  काळात नकळतपणे स्वतःसाठी स्वतःच  निर्माण केलेल्या व वाढवून घेतलेल्या समस्यांच्या निराकारणाकरिता ते स्वतः जबाबदार घेऊन बिकट समस्यांचे परिमार्जन करणे हे स्वातंत्र्यासाठी तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. पेराल ते उगवेल (म्हणजेच राजकारणी, गुंड, अधिकारी, इत्यादींना अती महत्त्व देऊन लोकशाहीचा पाया किलकिल्या करणाऱ्या जनतेच्या वागणुकीने) या म्हणीचा प्रत्यय जनतेने वेळोवेळी घेऊनही या बाबीची गांभीर्याने दखल घेतली नाही. पण आता आधुनिक प्रणालीच्या संगतीने या वास्तव लोकशाहीच्या तथ्यपूर्ण सत्य अर्थात वास्तवाला संघटित करून स्वतःची, स्वतःच्या विभागाची व राष्ट्राची प्रगती साधणे अत्यावश्यकच आहे.

राजकारणात पक्षांतर एवढे सहज व सोपे आहे की, त्यापेक्षा जास्त कठीण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी वाटते. या व अश्या अनेक कारणांमुळे राजकारणाचा स्तर फार जास्त खालावला आहे - ज्यामुळे नीतिमत्ता, नैतिकता, तत्व, जाहीरनामा, वचन, इत्यादी मूलभूत घटकांना औपचारिकतेपेक्षा जास्त महत्व उरलेच नाही आणि मागील कित्येक वर्षापासून तर सत्तेचा माज व उन्माद असा काही वाढला आहे की, ज्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांना तर दमडीची किंमत राहिली नाही. जनतेला पूर्वापार गुलामीगिरीची सवय जडल्याने त्यांनी राजकारण्यांना अति महत्व देत राजशाही जीवनाचा साज असलेले मुक्त जीवन देऊ केले, त्यामुळे जनसेवा व राष्ट्रसेवा ही राजकारण्यांची प्राथमिक कर्तव्ये खितपत पडली आणि राजकारणी वर्ग स्वार्थ, पक्षहित, पक्षपात, षडयंत्र, भ्रष्टाचार, दुराचारी, धर्मांधता, घराणेशाही या व्यापात अडकून गुन्हेगारीकडे वळत यातच आयुष्य व्यतीत करण्यास धन्यता मानून प्राधान्य देत वाटचाल करताहेत.

जनतेला त्यांच्या अस्तित्वाची व अधिकारांची आणि राजकारण्यांना (शैक्षणिक गुणवत्ता व पदाची पात्रता नसतानाही मिळत असलेल्या राजेशाही थाटाच्या कर्यकलापेक्षा मोलाचे असलेल्या) त्यांच्या कर्तव्याची अर्थात जनसेवा व राष्ट्रसेवेची जाणीव होणे फार जास्त आवश्यक आहे. त्याशिवाय ही बेबंदशाही अशीच चालू राहील आणि फार कमी काळात याचा उद्रेक होऊन सबंध राष्ट्राला भयानक व भयावह असे परिणाम भोगावे लागतील.

नेतृत्वाची अर्थात सत्तेची संधी मिळवऱ्याला त्याच्या जाहीरनाम्यापासून ते सत्तेच्या काळात न जमलेल्या यशाची कारणमीमांसा देणे तितकेच सोपे ठरते, जितके सोपे विरोधी पक्षाला जनतेने साथ दिली नाही म्हणून आलेले अप्याश! अर्थात सत्ताधारी असो की विरोधक, दोष तो जनतेचाच आणि कारण ही जनताच! दुधारी तलवार आणि अवसानघातकी पर्यायांपेक्षा बिकट संकटात जनतेला देशद्रोही तर त्याच जनतेला वेळप्रसंगी (निवडणूक, इत्यादी काळात) सर्वश्रेष्ठ देशप्रेमी ठरविणारे असेही बरेच कथित मुत्सद्दी आहेत, ज्यांना देशाची नाममात्र माहितीही उसने घेऊन स्वतःचे देशप्रेम व्यक्त करताना बाकी नऊ येतात.

यांनाही आम्ही अर्थात कथित जनता नानाविध बिरुदावली व मानसन्मान देऊन त्याचे जीवन सार्थकी तर स्वतःचे जीवन नाटकी ठरवितो.

या लेखातून कोण्या एका व्यक्तीला, समूहाला, पक्षाला, धर्माला, गटाला, समाजाला, वा तत्सम बाबीला उद्देशून काहीबाही लिहिणे किंवा टीका/उपहास/व्यंग करणे असा मुळीच उद्देश नाही. वर्तमान स्थितीचे वास्तव विश्लेषण करून जनजागृती करून लोकहित साध्य करण्याप्रती आपले योगदान देण्याचा उदात्त हेतू मांडण्याचा छोटासा प्रयत्न आहे, जे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. फक्त आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठी आणि संपूर्ण जगासाठी एक सबळ राष्ट्राचे परिपूर्ण उदाहरण आपले महान राष्ट्र आहे, ही जाणीव स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांना अभिमानाने अधोरेखित करणारी आहे.


- इकबाल सईद काझी

(विश्लेषण/लेखक)



एखाद्याच्या मृत्यूची बातमी देताना अमुक व्यक्तीचा ’इन्तिकाल हो गया है’ असे म्हटले जाते. इन्तिकाल म्हणजे एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे जाणे. मृत्यूनंतर माणूस एका जगातून दुसऱ्या जगात स्थानांतरित होतो, म्हणून ’इन्तिकाल हुवा’ असे म्हणतात. ’फना हुवा’ म्हणजे नष्ट झाला असे म्हणत नाही. मृत्यू म्हणजे सांसारिक जीवनाचा शेवट आणि मरणोत्तर जीवनाची सुरुवात आहे. मृत्यूनंतरही जीवनाचे सातत्य कायम राहते आणि त्याचे फक्त स्वरूप बदलते. मृत्यू म्हणजे भक्ताचे आपल्या निर्मात्या अल्लाहकडे परत जाणे होय, म्हणूनच कुणी मरण पावल्यावर ‘इन्ना लिल्लाही व इन्ना इलयही राज़िऊन’ म्हणण्याची प्रथा आहे. अर्थात ’’निसंशय आपण अल्लाहचेच आहोत आणि अल्लाहकडेच परत जाणारे आहोत’’. मृत्यूनंतर माणूस ज्या जगात प्रवेश करतो त्याला ’आलमे बरजख’ म्हणजे मृत्यू ते कयामत या दरम्यानचे जग म्हणतात. मृत्यू होताना आत्मा हा फक्त शरीरापासून वेगळा होतो. नष्ट होत नाही. शरीरापासून विभक्त झाल्यानंतरही आत्मा संपूर्ण व्यक्तिमत्त्वासह जगतो. ते व्यक्तिमत्त्व जे सांसारिक जीवनातील योग्य किंवा अयोग्य दृष्टिकोनातून आणि चांगल्या-वाईट आचरणातून बनलेले असते. मृत्यूनंतरही आत्मा हा चेतना, भावना, निरीक्षणे आणि अनुभवांच्या अवस्थेतून जात असतो. चांगला माणूस मृत्यूनंतर कयामतच्या दिवसापर्यंत ईश्वराचा पाहुणा म्हणून राहतो आणि दुष्ट माणूस अटकेत असलेल्या आरोपीप्रमाणे कैदेत राहतो. आदरणीय अब्दुल्लाह इब्ने उमर (र) यांनी वर्णन केले आहे की अल्लाहचे पैगंबर (स) म्हणाले, जेव्हा तुमच्यापैकी एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्याला सकाळी आणि संध्याकाळी त्याचे स्थान दाखवले जाते. जर तो स्वर्गातील लोकांपैकी एक असेल तर त्याला त्याचे तेथील स्थान दाखवले जाते आणि जर तो नरकवासीयांपैकी असेल तर तेथील त्याचे स्थान दाखवले जाते. मग त्याला म्हटले जाते, कयामतच्या दिवशी हे तुझे स्थान राहणार आहे. (हदीस संग्रह बुखारी:1379- इस्लाम 360 )

या हदीसमध्ये सांगितल्याप्रमाणे मृत्यूनंतर माणूस अजिबात संपत नाही तर त्याचा आत्मा त्याच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांसह बाकी राहतो. सकाळ-संध्याकाळ त्याला त्याचे खरे निवासस्थान दाखवले जाते. स्वर्गाचे दृश्य पाहिल्यानंतर स्वर्गवासीयांना किती आनंद होईल याची कल्पना करणे आपल्यासाठी अवघड आहे. त्याचप्रमाणे नरक पाहिल्यानंतर नरकवासीयांची जी अवस्था होईल, जो पश्चात्ताप होईल, जे दु:ख त्यांना भोगावे लागतील, त्याचीही आपण कल्पना करू शकत नाही. 

यावरून हे ज्ञात होते की मृत्यूनंतर माणूस अजिबात नष्ट होत नाही. तर फक्त त्याच्या वर्तमान शरीरापासून त्याचा आत्मा काढून घेतला जातो. माणसाचे व्यक्तिमत्व मृत्यूनंतरही कायम राहते आणि त्याला सुख-दुःखही जाणवते. कयामतच्या दिवशी याच आत्म्याला शरीर देऊन अल्लाहच्या न्यायालयात उभे केले जाईल आणि सांसारिक जीवनातील कर्मांची पडताळणी करून बक्षीस किंवा शिक्षा दिली जाईल. 

 ..................... क्रमशः 


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


२०२४ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक टप्प्यातील सध्याची परिस्थिती रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय वंशाच्या विद्यमान उराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांच्यात सामना होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयोवृद्ध ८१ वर्षांचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर देश परत घेण्याची शपथ घेणारे ट्रम्प ७७ वर्षांचे असून त्यांचे प्रतिस्पर्धी कमला हॅरीस या ५९ वर्षांच्या आहेत आणि सिनेटमधील बहुमताचे नेते चक शूमर (वय ७२ वर्षे) यांसारख्या इतर प्रमुख अमेरिकी राजकारण्यांचा विचार केल्यास अमेरिकन राजकीय नेत्यांचे वय हा चर्चेचा विषय बनला आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने डेमोक्रॅटिक पक्षात दुसऱ्या महायुद्धानंतर तरुण राजकीय उच्चभ्रूंना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश देण्याची परंपरा होती. जॉन एफ केनेडी, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा हे तिघेही वयाच्या चाळीशीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. १९६० च्या दशकात जन्मलेले ओबामा २००८ च्या निवडणुकीत ४७ वर्षांचे होते. आर्थिक संकट, मध्यपूर्वेतील दोन युद्धे आणि रिपब्लिकन पक्ष याबद्दल अमेरिकन मतदारांचा तीव्र असंतोष लक्षात घेता त्यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर घवघवीत यश मिळविले.

२०१६ आणि २०२४ या दोन्ही निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षात काही तरुण स्पर्धक उदयास आले, पण त्यांना ट्रम्प यांच्याशी स्पर्धा करता आली नाही. चीनविरोधी असलेले फेडरल सिनेटर टेड क्रूझ आणि मार्को रुबिओ अजूनही “पुरेसे लोकप्रिय” मानले जात नाहीत. विवेक रामास्वामी या ३८ वर्षीय भारतीय-अमेरिकन उद्योगपतीला पुरेसा अनुभव नाही. ट्रम्प यांनी प्रचंड दडपून टाकलेले फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसॅन्टिस यांनी त्यांच्याशी फारकत घेण्याचे धाडस केले नाही. माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि न्यू जर्सीचे माजी गव्हर्नर ख्रिस क्रिस्टी हे आस्थापना गटाचे प्रतिनिधित्व करतात आणि ‘ट्रम्पविरोधी’ भूमिका घेतात, त्यांना जिंकण्याची संधी नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांच्या तरुण राजकारण्यांची झालेली घसरण ही अमेरिकन राजकारणाच्या ध्रुवीकरणाशी आणि प्राथमिक व्यवस्थेच्या रचनेशीही निगडित आहे. दोन्ही पक्षांमधील जोरदार मतभेद आणि जनमताच्या फेरफारात तळरेषा नसल्यामुळे दोन्ही बाजूंचे आधार मतदार एकमेकांकडे शत्रू म्हणून पाहतात आणि त्यांना पराभूत होणे परवडणारे नाही, असे वाटू लागले आहे. पक्षाचे सदस्य आणि मतदार या दोघांनाही पुरेसा प्रभाव आणि प्रतीकात्मकता असलेल्या उमेदवारांची गरज आहे.

अमेरिकेत व्यापक राजकीय पातळीवर जुन्या आणि नव्या पिढ्यांमध्ये सत्तांतरासाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक निवडणुकीत तरुणांचे गट कॉंग्रेसचे सदस्य, राज्यपाल आणि राज्याचे आमदार म्हणून निवडले जातात. राजकारणातील महत्त्वाकांक्षी श्रीमंत नवोदितांमध्ये अनेक तरुण चेहरेही आहेत.

अमेरिकेतील नवीन पिढीमध्ये अधिक वांशिक विविधता, वैविध्यपूर्ण मूल्ये, महिला प्रतिनिधित्वात वाढ आणि स्थलांतरितांचे लक्षणीय प्रमाण आहे. हे बदल एकूणच डेमोक्रॅटिक पक्षाला आपला मतदारआधार वाढविण्यात अनुकूल आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला अधिक वांशिक अल्पसंख्याक आणि महिलांना सक्रियपणे शोधण्यास आणि आकर्षित करण्यास भाग पाडतात. १९७० नंतरच्या आणि १९८० नंतरच्या पिढ्यांचे अध्यक्ष, एक महिला राष्ट्राध्यक्ष आणि दुसरा वांशिक अल्पसंख्याक अध्यक्ष होण्याची शक्यता भविष्यात वाढेल. आज तरुणांमध्ये अधिक एकमत झाल्यास ध्रुवीकरण कमी होऊ शकते. 

युक्रेनच्या मदतीला इस्रायलच्या पाठिंब्याशी जोडणारा कायदा नुकताच मंजूर झाला असून त्याचे वर्णन “पक्षांमधील दुर्मिळ सहकार्य” असे करण्यात आले आहे. या ध्रुवीकरणाची अनेक कारणे आहेत, ज्यात लोकप्रतिनिधी आणि पक्षांवर विशेष व्याजाच्या पैशाचा प्रभाव आणि समाजातील वाढती आर्थिक विषमता यांचा समावेश आहे. आज पिढीगत दृष्टिकोनातील बदलांमुळे ध्रुवीकरणाची सध्याची पातळी कमी होण्याची क्षमता आहे.

गेल्या ५० वर्षांत अमेरिकेतील राजकीय ध्रुवीकरणात झपाट्याने झालेली वाढ ही वेगवेगळ्या पिढ्यांचे राजकारणाविषयीचे धोरण यामुळेच झाली आहे. पण तरुण पिढीचा राजकीय सत्तेत उदय झाल्यास ध्रुवीकरणाशी निगडित खोल सामाजिक विभागणी पुसली जाऊ शकते. या तरुण पिढीतील सदस्यांमध्ये राजकीय विचारांवर एकमत होणे आणि गाझामधील इस्रायलच्या हल्ल्यावरून कॅम्पसमधील निदर्शनांसारख्या घटनांमुळे ध्रुवीकरण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या राजकारणातील हा महत्त्वाचा बदल असेल.

सप्टेंबर २०२२ मधील सीबीएस न्यूजच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की अमेरिकन लोक राजकारणात तरुणांच्या कमतरतेबद्दल चिंता व्यक्त करतात. ४७ टक्के लोकांनी म्हटले आहे की, अधिक तरुण पदावर राहिल्यास राजकारण चांगले होईल. शिवाय, नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या रॉयटर्स/इप्सोसच्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की दहापैकी नऊ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी ७५ वर्षांच्या कटऑफचे समर्थन करतात.

‘हार्वर्ड केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’मधील ‘सेंटर फॉर पब्लिक लीडरशिप’चे संस्थापक आणि विद्यमान संचालक डेव्हिड गर्जेन यांनी “हार्ट्स टच विथ फायर : हाऊ ग्रेट लीडर्स आर मेड” या त्यांच्या नवीन पुस्तकात, नेते कसे बनवले जातात आणि अनेक प्रकारचे नेते - विद्यार्थी, अध्यक्ष आणि कार्यकर्ते - जे देशाचे नेतृत्व करू शकतात याबद्दल चर्चा केली आहे. ते म्हणतात की “तरुण पिढीला येणाऱ्या गोष्टींसाठी तयार करण्याच्या दृष्टीने - त्यांना प्रशिक्षण देणे आणि आघाडी करणे या दृष्टीने जुन्या पिढीने वास्तविक, महत्त्वपूर्ण आधार देणे महत्वाचे आहे. तरुण पिढीने हा कार्यक्रम चालवायला हवा; त्यांनी संस्था चालवायला हव्यात. आणि त्यात अध्यक्षपदाचाही समावेश आहे. पण जुन्या पिढ्या शहाणपण आणू शकतात; ते अनुभव टेबलवर आणू शकतात. तरुण पिढीला बदल घडवायचा आहे. आपल्याला काही तरुण नेतृत्वाची गरज आहे. जगातील सर्वांत गुंतागुंतीची संस्था असलेल्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे वयाच्या ७०-८० वर्षांच्या व्यक्तीकडे सोपविणे चूक आहे.”

‘युथ विदाऊट रिप्रेझेंटेशन’ या आपल्या नव्या पुस्तकात डॅनियल स्टॉकमेर आणि अक्सेल सुंडस्ट्रोम यांनी संसद आणि कॅबिनेटमध्ये तरुण प्रौढांच्या कमी प्रतिनिधित्वाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते तरुण प्रौढ - ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयोगटातील - निर्णयकर्त्यांमध्ये दुर्मिळ असतात. जागतिक स्तरावर १८ ते ३५ वयोगटातील लोकांना लोकसंख्येतील त्यांच्या वाट्याच्या तुलनेत (मतदारांचा वाटा आमदारांपेक्षा तिप्पट मोठा आहे).

न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलन क्लार्क यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, “आमदारांचे म्हातारपण ही समस्या आहे. आपल्याकडे तरुणांची जगातील सर्वात मोठी पिढी आहे. त्यामुळे त्यापेक्षा कित्येक दशकांवर असलेल्या आणि त्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत नसलेल्या वयोगटाकडून निर्णय घेतले जात असतील तर ती एक गंभीर लोकशाही कमतरता आहे. संसद ही अशी जागा आहे जिथे नवीन दृष्टिकोन असलेले तरुण असायला हवेत. आणि मला वाटते की आपल्या राजकीय व्यवस्थेने त्यांना सामावून घेतले पाहिजे.”

निर्णय प्रक्रियेत तरुण प्रौढांचे कमी प्रतिनिधित्व याचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांच्यासाठी महत्वाचे मुद्दे अजेंड्याबाहेर पडतात आणि त्यांची सापेक्ष अनुपस्थिती अलिप्ततेच्या दुष्टचक्रास कारणीभूत ठरू शकते, ज्यात कमी मतदान आणि तरुणांमधील राजकीय स्वारस्य देखील समाविष्ट आहे.

जुन्या उमेदवारांच्या तुलनेत तरुण उमेदवार निवडणूक प्रक्रियेत यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. याचे अंशतः कारण असे आहे की त्यांना बर्याचदा अशा शर्यतींमध्ये नामांकित केले जाते जिथे त्यांना जिंकण्याची शक्यता कमी असते किंवा पक्षाच्या यादीत कमी प्लेसमेंटसाठी नियुक्त केले जाते. पण हे तोटे अनेक पक्षांना लागू पडत असले, तरी त्यात भिन्नताही आहे. युवा उमेदवारांसाठी मोठा अडथळा म्हणजे त्यांचा अनुभवाचा अभाव. परंतु, सत्ताधाऱ्यांना अनुकूल अशी निवडप्रक्रिया असल्याने संसदीय उलाढालीसाठी अनेकदा फारसा वाव नसतो. शिवाय, जगभरातील अनेक विधानसभांमध्ये ज्येष्ठतेची संस्कृती आहे, ज्यात तरुणांची दखल घेतली जात नाही.

एका सर्वेक्षणानुसार, जगभरातील अनेक देश केवळ २१, २५ किंवा ३० वर्षांवरील लोकांनाच निवडणूक लढवण्याची परवानगी देतात (उदाहरणार्थ अमेरिकन सिनेटमध्ये उमेदवार किमान ३० वर्षे असणे आवश्यक आहे). या नियमांमुळे तरुणांना कायदेशीर अडथळा तर येतोच, शिवाय राजकारण कोणासाठी आहे, याचेही संकेत मिळतात. स्कॅंडिनेव्हियासह त्यांच्या निवडणूक प्रणालीत आनुपातिक प्रतिनिधित्व असलेले देश तरुण प्रौढांचा जास्त वाटा निवडतात. तरुण नेत्यांचा कल कॅबिनेटला तरुण बनवण्याकडे असतो. तरुण संसद तरुण मंत्रिमंडळाला चालना देते - आणि कॅबिनेट सदस्य खासदार म्हणून निवडले गेले पाहिजेत की नाही याची पर्वा न करता हे घडते.

टर्म लिमिट हा सत्ताधाऱ्यांचा फायदा मोडून काढण्यासाठी आणि तरुणांना उमेदवारीचा दावा करण्याची संधी देण्याचा एक मार्ग असू शकतो. वयाच्या १८ व्या वर्षी निवडणूक लढवण्यासाठी वयाची अट घातल्यास तरुणांना पुढाकार घेणे शक्य होईल आणि राजकारणात आपले स्वागत आहे, असा संदेश जाईल. संघटनात्मक पातळीवर राजकीय पक्षांनी ज्येष्ठतेची (त्याचबरोबर काही देशांतील घराणेशाहीची) संस्कृती मोडून काढण्याचे काम केले पाहिजे - गांभीर्याने अंमलबजावणी केल्यास हा एक कार्यक्षम पर्याय ठरू शकतो.

सध्याच्या जगात जिथे रशिया-युक्रेन संघर्ष, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष, गटराजकारण आणि महासत्ता स्पर्धा वाढत आहे आणि जिथे “वियोग” आणि “भिंती आणि अडथळे बांधणे” प्रचलित आहे, तेथे एकमेव महासत्ता म्हणून अमेरिकेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. २०२४ च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजेत्याची रणनीती आणि धोरणांबाबत निवड केल्यास जग अधिक संघर्ष आणि व्यापक शीतयुद्धाच्या दिशेने वाटचाल करीत आहे की युद्धविराम आणि संयमाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, यावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहेत. अमेरिकेच्या भावी पिढ्यांना दिलेली मशाल ही पुढचा मार्ग प्रज्वलित करणारी असेल की जगात पावडर केग पेटवणारी असेल, हे या निवडीवरून ठरते. त्याचा परिणाम केवळ अमेरिकेवरच होणार नाही तर जगभरातील शांतता आणि स्थैर्यावर होणार आहे.


- शाहजहान मगदुम

(कार्यकारी संपादक)

भ्रमणध्वनी : ८९७६५३३४०४



भारत हा कृषीप्रधान देश आहे, आजही या देशातील ७० ते ८० टक्के लोकांचा व्यवसाय शेती  आणि पशुपालन हा आहे, मात्र यंदा राज्यात पडलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी नदीनाल्यांना महापुर आले आहेत. त्यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना उभ्या पिकांची नासाडी, फळफळावळ बागांचे नुकसान डोळ्यांदेखत पाहून हताश व निराश व्हावे लागले आहे. संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी या फळपीकांचे तर मोठे नुकसान झाले आहे. शिवाय भात, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू,या सारख्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरवर्षी विक्रमी उत्पादन देणाऱ्या कांदा व लसूण या पिकांची ही मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. जगाच्या पाठीवर भारतीय शेती अत्यंत सुपीक आहे. अगदी प्राचीन काळापासून कृषी संस्कृतीच्या पाऊलखुणा या देशात टिकून आहेत.आज एकविसाव्या शतकात सुध्दा कृषी उद्योग जगभरात सर्वश्रेष्ठ मानला जातो, भारतात आज पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो, शेतीतून उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते, भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून भारतीय अन्नधान्याच्या निर्यातीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.मात्र यंदा प्रचंड पावसामुळे रब्बी पिकांची, फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. पशुधन,पक्षी व मानवी जीवनावरही त्याचा दुष्परिणाम झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने एक दोन वर्षे झाली की महाभयंकर नैसर्गिक आपत्तीला बळीराजाला तोंड द्यावे लागते आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हताश, हतबल व निराश होऊ लागला आहे. शेतकरी आत्मविश्वास व हिंमत गमावून बसला आहे. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. त्यातूनच शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी होऊन आत्महत्येला प्रवृत्त होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,ही परिस्थिती बदलण्यासाठी मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांच्या बाजूने कंबर कसली पाहिजे.

कोसळणाऱ्या प्रचंड पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीला कोणीही थोपवू शकत नाही, हे वास्तव आहे. अतीप्रमाणात पडलेल्या पावसामुळे अल्प कालावधीत शेतकऱ्यांच्या पीकांचे होत्याचे नव्हते करून जाते. यंदा पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली. फळबागां उध्वस्त झाल्या. पशूधन गतप्राण झाले. काही शेतकऱ्यांच्या घरादारांचे नुकसान झाले. काही दुर्दैवी शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. डोळ्यांदेखत होणारे नुकसान असह्य झाले झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. संपूर्ण महाराष्ट्राला यांचा जोराचा फटका बसला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई याला तोंड द्यावे लागते,मात्र यावर्षी तापमानात झालेली वाढ, अती प्रमाणात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे.

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे रहायला हवे...

नैसर्गिक आपत्तीशी सामुदायिकपणे, परस्पर सहकार्य व समन्वयाने सामना करावा लागतो. अतीप्रमाणात पडलेल्या पावसामुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी, फळबागांचे नुकसान, पशूधनाची दूरावस्था पाहता ही नैसर्गिक आपत्ती सहनशीलतेच्या पलिकडची आहे. अशावेळी आपत्तीग्रस्त शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीन दुबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी मायबाप सरकारची असते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा. 

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित व योग्य पंचनामे व्हावेत...

राज्यातील महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित, योग्य व वास्तव पंचनामे करायला हवेत. अर्थात आजवरच्या अनुभवावरून तलाठी, ग्रामसेवक व मंडल अधिकारी , तसेच कृषी खात्याचे अधिकारी पंचनामे करतांना कामचुकारपणा व भेदभाव तसेच आर्थिक बेव्यवहार करतात. त्यांची मिलीभगत असल्याने वास्तवतेप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळत नाही. व त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते, गरीब व असाह्य शेतकरी याविरोधात दाद मागू शकत नाही. तरी सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्यवस्थित व योग्य ते सर्वेक्षण व्हावे आणि कोणत्याही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. यात अडथळा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

शासनाने प्रांतभेद करू नये...

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब व योग्य ते आर्थिक सहाय्य करावे, हे करताना शासनाने प्रांतभेद करू नये. राज्यात ज्या ज्या प्रांतात शेतकऱ्यांच्या पिकांची, फळबागांची, व पशूधनाची नासाडी, दूरावस्था व नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना समान न्यायाने आर्थिक साहाय्य व्हावे, अन्यथा राजकीय हस्तक्षेपामुळे एखाद्या भागात तसेच ठराविक शेतकऱ्यांना झुकते माप दिले जाते, असे होऊ नये.

आपत्तीग्रस्त शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे....

शासनाने शेतकऱ्यांना तटपूंजी मदत करून त्याची मानसिकता खचू देऊ नये. त्यांच्या नुकसानीचा पुरेपूर मोबदला त्याला मिळू द्यावा. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी प्रवृत्ती प्रत्येक आपत्तीच्या वेळी दिसून येते, शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखात शेतकरी खचला जात असताना सुध्दा त्याच्या कडे चिरीमिरी अर्थात आर्थिक स्वरूपात मागणी केली जाते, अशांवर लक्ष ठेवून त्यावर कडक कारवाई करावी, आपत्तीग्रस्त शेतकरी पुन्हा या अस्मानी संकटातून बाहेर पडून ताठ मनाने उभा राहिला पाहिजे, यासाठी मायबाप सरकारने मोठ्या दिलदार मनाने मदत केली पाहिजे.

शासकीय मदत शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा देणारी ठरेल...

यंदाच्या वर्षी अतीवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक,व मानसिक नुकसान झाले आहे. शेतकरी पुर्णपणे खचला आहे, अशा वेळी शासनाची मदत ही शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा व उभारी देणारी ठरणार आहे.तरी विनाविलंब मदत मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

केंद्र सरकारच्या आपत्तीग्रस्त निधीची मागणी करून तात्काळ पाठपुरावा करावा....

केंद्र सरकारकडे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने तात्काळ निधीची मागणी करून त्याचा पाठपुरावा करावा,  केंद्र सरकारकडे आपत्तीग्रस्त निधीची मागणी केल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांच्या नुकसानीची पुरेपूर भरपाई करून देऊ शकते.

शेतकऱ्यांच्या वीजेच्या बिलात व इतर करात सूट देण्यात यावी....

यंदाच्या अतीवृष्टीमुळे शेतकरी आत्मविश्वास गमावून बसला आहे. अशावेळी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या वीजेची बीले माफ करावीत. तसेच इतर महसुली कर ही माफ करण्यात यावेत.

अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोठे संकट आले आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मायबाप सरकारने धावून जावून त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, आवश्यक आहे.सरकारमध्ये व विरोधी पक्षात शेतकऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आलेल्या संकटाची जाणीव सध्याच्या राजकारण्यांना असणे स्वाभाविक आहे, तेव्हा मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हलाखीची परिस्थिती पाहून मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)



खरे तर आपल्या गावाचं, शहराचं, राज्याचं, देशाच्या विकासाचं भविष्य आपण निवडणुकीच्या माध्यमातून ठरवत असतो. मात्र हल्ली निवडणुका आल्या की, उत्साहाच्या जागी आता चिंता वाटायला लागली आहे. देशातील अनेक पक्ष आता जातीयवाद आणि धर्मवादाच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत. सोबतच त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेलाही आपलसं बनवलं असल्याचे पहायला मिळत आहे. हल्ली आता कुठल्याही निवडणुका असोत राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी विकासाऐवजी विनाशाचीच भाषा बोलताना पहावयास मिळत आहेत. त्यामुळे निवडणुका आल्या की संवदेनशील व्यक्ती चिंताग्रस्त होताना पहायला मिळत आहेत. 

आपण क्वचितच पहायले असेल की, अतिक्रमणामुळे दंगल घडली असेल. मात्र असे झाले आहे. नुकतेच विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावावरून काही धर्मांधानी दंगल घडवून आणली. मुस्लिम समाजाला टार्गेट केले. दंगेखोरांचा आणि गजापूर येथील नागरिकांचा कधी साधा व्यवहारही झालेला नसेल अथवा त्यांनी एकमेकांना पाहिलेही नसेल. तरी परंतु, मुस्लिम वस्त्यांवर दंगेखोरांनी हल्ला चढविला. तेथील मस्जिदीची तोडफोड केली. वाहने जाळली, असे का बरे केले असेल. तर चिंतनाअंती आणि समाजमाध्यमांवर होत असलेल्या चर्चेअंती असे निदर्शनास येते की, निवडणूक जवळ आली आहे. नागरिकांनी जागल करायला हवी. निवडणुकीच्या तोंडावर  दंगे करून मतांची विभागणी करावी, असा उद्देश काहींचा असू शकतो. दंगेखोरांनी छत्रपती शाहूंच्या शांततेच्या नगरीला टार्गेट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जागल करायला हवी, चांगल्या विचारांची गावोगावी पेरणी करायला हवी. महापुरूषांचा विचार अंगी बाळगायला हवा आणि निवडणुका व्यवस्थित पार पाडायला हव्यात.

- बशीर शेख.



हदीस संग्रह बुखारी आणि मुस्लिममध्ये एक हदीस आलेली आहे. ज्यात प्रेषित वचन खालीलप्रमाणे उधृत करण्यात आलेले आहे, ’’ ज्या व्यक्तीने माझा संदर्भ सांगून कोणाला एखादी चुकीची गोष्ट सांगितली तर त्याने स्वतःचे ठिकाण नरकात आहे, एवढे समजून घ्यावे’’ एवढी कडक चेतावनी मिळाल्यानंतरही इस्लामच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यक्ती होवून गेल्या ज्यांनी चुकीची प्रेषित वचने तयार करून समाजात प्रस्तुत केली. यामागे त्यांचे राजकीय समर्थन किंवा विरोध हे कारण होते. सत्ताधाऱ्यांकडून भौतिक मदत मिळावी म्हणून किंवा मुसलमानांच्या दुसऱ्या गटाशी असलेले मतभेद वाढावेत म्हणून अशी प्रेषित वचने पेरली गेली. हा प्रकार इस्लामच्या सुरूवाती काळापासूनच सुरू झालेला आहे. शेकडो लोकांनी हे घृणित काम केलेले आहे आणि हजारो खोटी प्रेषित वचने तयार केली गेली आहेत. ईश्वराची कृपा हो त्या हदीसच्या विद्वानांवर ज्यांनी वेळीच अशा खोट्या प्रेषित वचनांना ओळखून त्यांना खऱ्या प्रेषित वचनांपासून वेगळे करून टाकले आहे. असे करण्याच्या कृतीला अस्माउल रिजाल पद्धत असे म्हणतात. या पद्धतीतून हजारो लोकांच्या जीवनाचे अहवाल गोळा केले गेले. त्यावर संशोधन केले गेले आणि त्याच्यापैकी जे खरे वाटले त्यांना सन्माननीय हदीसचे संदर्भकार म्हणून नोंदविले गेले. ज्यांच्याव्यक्तिमत्वाविषयी संशय किंवा ते खोटे असल्याविषयीची खात्री होती त्यांना वेगळे करण्यात आले. त्यांची ओळख पटविण्यात आली. जेणेकरून समाज त्यांच्यापासून सावध राहील. 

हदीसच्या अभ्यासामध्ये अनेक महिलांनी मोठी जबाबदारी पेललेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खोट्या हदीस तयार करण्यामध्ये एकाही महिलेचे नाव नाही. ही मुस्लिम महिलांसाठी गर्व करण्यासारखी गोष्ट आहे. ईमाम अल जरह वल तआदील, अल्लाम्मा शम्सुद्दीन जहबी यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेले आहे की, आम्हाला माहित नाही की हदीसच्या संदर्भात एकाही स्त्रीने चुकीची हदीस संदर्भित केलेली आहे. महिलांची ही गोष्ट खरोखर स्तुतीपात्र आहे. 

- डॉ. रजिउल इस्लाम नदवी

दिल्ली


पुस्तक : मेमारे जहाँ तू है

भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे


अल्लाहच्या हजारो पैगंबरांनी कयामत म्हणजे न्यायाचा दिवस येणार असल्याची खात्री दिली, पण विरोधकांनी नेहमीच ते अमान्य केले. माणसाला न्यायाच्या दिवसावर विश्वास ठेवण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु वस्तुस्थिती ही आहे की मृत्यू येताच माणसाला त्या सत्याची जाणीव होऊ लागते जी तो नाकारत होता.’’व जा’अत् सक्-रतुल्-मवति बिल्-हक्कि, ज़ालि-क मा कुन्-त मिन्हु तहीदु.’’ अनुवाद :- आणि मृत्यूकळा सत्यासह प्रकट होईल, हेच ते ज्यापासून तू पळ काढत होतास.  ( 50 कॉफ : 19 ) मृत्यूसमयी जीव निघण्याची वेळ तो प्रारंभ बिंदू आहे जिथून मरणोत्तर जीवनातील वास्तविकता समोर येण्यास सुरुवात होते. ज्याच्यावर सांसारिक जीवनात पडदा पडलेला असतो. त्या क्षणापासून माणसाला ते दुसरे जग स्पष्टपणे दिसू लागते, ज्याची खबर पैगंबरांनी दिली होती. इथूनच माणसाला परलोक पूर्णत: सत्य असल्याचे कळते. मृत्यूचे देवदूत समोर दिसतात. आत्तापर्यंत अदृश्य असलेल्या त्या गोष्टी दिसू लागतात, ज्यांवर विश्वास ठेवायला माणसाने नकार दिला होता. त्या गोष्टी वास्तव म्हणून समोर आहेत हे त्याला चांगलेच कळते आणि मरणोत्तर जीवन आणि कयामतचा दिवस, ज्यांना तो अशक्य समजत होता तेही सत्य असल्याचा विश्वास आता बसतो. याबरोबर जीवनाच्या या दुसऱ्या टप्प्यात तो भाग्यवान म्हणून दाखल होत आहे की अभागी हेही त्याला कळते. माणूस मृत्यूपासून दूर पळतो किंवा या विषयावर बोलणे टाळतो. हे संपूर्ण मानवजातीत नैसर्गिकरित्या आढळते. माणसाला जीवन प्रिय असते आणि तो मृत्यूला आपत्ती मानतो, म्हणून ते टाळण्याचा प्रयत्न करतो पण हा विषय कितीही टाळला, यापासून कितीही पळून जावेसे वाटले तरीही एक ना एक दिवस मृत्यू येणारच आहे. त्यामुळे शहाणा माणूस तोच आहे जो मृत्यू येण्यापूर्वीच त्याची तयारी करतो. 

 ..... क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.


नानाविध प्रकारचा भाजीपाला



भारतासारख्या कृषीप्रधान देशात अन्न आणि आहार हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा असतो. तसेच शाकाहार आणि मांसाहार हाही वादाचा विषय बनलेला असतो. वैज्ञानिकदृष्ट्या अंडी, दूध, मांस आणि भाजीपाला यांचे आपल्या शरीरात आपापले वेगळे महत्त्व आहे. माणसाच्या इतिहासातही माणूस मांसाहारी असल्याचे पुरावे आढळतात. मात्र शेतीच्या विकासासोबत जिभेचे चोचले सुद्धा विकसित झाले. ती तृष्णा मिटविण्यासाठी भाजीपाला आणि मसाल्यांची शेती सुरू झाली आणि स्वयंपाकघरात भाजीपाल्याने आपले स्थान मिळवले.

मराठी विश्वकोशानुसार अल्पायू व नरम देठाच्या, औषधीय वनस्पतीच्या ताज्या व खाद्य भागांना भाजीपाला असे म्हटले जाते. हे खाद्य भाग म्हणजे मूळ, खोड, पाने, फुले व फळे असतात. हे खाद्य भाग ताज्या स्थितीत अगर त्यांवर प्रक्रिया करून खाण्यासाठी वापरण्यात येतात. निरनिराळ्या खाद्य भागांच्या आधारावर भाजीपाला पुढीलप्रमाणे विभागला जाऊ शकतो.

१) मूळ : जमिनीखाली पाणी शोषणाऱ्या भागात वनस्पती जेव्हा अन्न साठवून ठेवतात तेव्हा ते मूळ भाजी म्हणून वापरल्या जाते. उदा. बीट, गाजर, रताळे, मुळा.

२) खोड : जमिनीखाली किंवा जमिनीच्या तळाशी अन्नाचा साठा करून एक फुगीर खाद्य भाग काही वनस्पती तयार करतात. तो सुद्धा भाजी म्हणून वापरल्या जातो. उदा. बटाटा, सुरण, नवलकोल, आर्वी किंवा अळूचे गड्डे, गोराडू.

३) कंद : कांदा, लसूण या वनस्पती आपल्या पानांच्या तळाशी अन्नाचा साठा करून कंद तयार करतात, तोच खाद्य भाग असतो.

४) पाने : कोबी, पालक, घोळ, अळू, मेथी, चाकवत इत्यादींसमवेत भारतात २०० पेक्षा जास्त वनस्पतींच्या पानांचा भाजीसाठी वापर केला जातो.

५) फुले : फुलकोबी, अगस्ता किंवा हदगा, केळफूल, शेवगा यांच्या तर फुलांचीच भाजी केली जाते.

६) अपक्व फळे : वांगी, काकडी, शेवगा, मिरची, गवार, भेंडी, पडवळ, कारले वगैरे वनस्पतींची फळे किंवा शेंगा कच्च्या अवस्थेत म्हणजे अपक्व अवस्थेत तोडून भाजीसाठी वापरल्या जातात.

७) पक्व फळे : टोमॅटो, लाल भोपळा या फळभाज्या पूर्णपणे पिकलेल्या अवस्थेत भाजी म्हणून वापरतात.

८) बिया : वाटाणा, घेवडा, वाल यांसारख्या वनस्पतींच्या कोवळ्या किंवा परिपक्व बियांचा वापर भाजी म्हणून केला जातो.

९) यांशिवाय बांबूच्या झाडांचे कोवळे अंकूरही काही लोक भाजीसाठी वापरतात.

या सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांनी आधुनिक शेतीला योगदान मिळत आहे. एकीकडे शेतीतले अत्यल्प उत्पन्न, तोकडा नफा, जमीन धारणेतली घट या कारणांस्तव ग्रामीण भागातले तरुण उदरनिर्वाहासाठी बिगरशेती व्यवसायांकडे वळत आहेत किंवा रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करत आहेत, तर दुसरीकडे काही तरुण चांगली नोकरी सोडून शेती करत असल्याचं चित्र दिसत आहे. हे तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भरपूर उत्पादन घेत वर्षाला भरपूर पैसे कमावत आहेत.

कुरआनमध्ये भाजीपाल्याबद्दल माहिती शोधताना बनी इस्राईल समुदायाचा एक प्रसंग अध्याय अल्-बकराच्या आयत ६१ मध्ये आढळतो.

"आठवण करा जेव्हा, तुम्ही सांगितले होते की, 'हे मूसा, आम्ही एकाच प्रकारच्या अन्नाचा उपभोग घेऊन संयम करू शकत नाही. आपल्या पालनकर्त्याकडे याचना करा की आमच्यासाठी जमिनीमधून पिके, भाजीपाला, गहू, लसूण, कांदा, डाळी वगैरे उत्पन्न करावे.' तेव्हा मूसा (अ.) ने सांगितले, 'एका उत्तम प्रकारच्या वस्तूऐवजी तुम्ही कनिष्ठ दर्जाच्या वस्तू घेऊ इच्छिता?'......"

या आयतीची पार्श्वभूमी जरी वेगळी असली तरी या प्रसंगावरून हे लक्षात येते की भाजीपाल्याचे महत्त्व मानवी जीवनात वर्षानुवर्षांपासून होते आणि आज त्यांचे स्थान स्वयंपाकघरात पक्के झाले आहे. पण आपल्या जीवनाचा मूळ उद्देश फक्त खाणे-पिणे तसेच शेतीच्या माध्यमातून विरंगुळा करणे हा तर नक्कीच नाही.

(क्रमशः)


- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६



मंडलनामा’ हे मुस्लिम ओबीसी संघटनेचे संस्थापक शब्बीर अहमद अन्सारी यांच्या स्वतःच्या आणि मुस्लिम ओबीसी संघटनेच्या प्रवासावर आधारित ग्रंथ आहे. मराठी भाषेत हे पुस्तक लिहिले दिलीप वाघमारे यांनी आणि त्याचे उर्दू भाषेतील भाषांतर मलिक अकबर यांनी केले आहे. मराठी ग्रंथाचे विमोचन राज्याचे मंत्री मा. छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले आणि उर्दू भाषांतराचे विमोचन पद्मश्री जहीर काझी यांच्या हस्ते नुकतेच खिलाफत हाऊस मुंबई येथे झाले. पुस्तकाच्या सुरुवातीला शब्बीर अन्सारी आपल्या भावना प्रस्तुत करताना म्हणतात, तरुण वयात बरेच प्रश्न उभे होते. ग्रंथाच्या मागील भागावर माजी खासदार तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी शब्बीर अन्सारी यांना विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. डॉ. मुणगेकर त्यांना विचारतात की इस्लाम धर्मात जातीव्यवस्था नसताना १९६७ साली प्रकाशित होणाऱ्या मंडल आयोगाच्या अहवालात ओबीसींच्या यादीत काही मुस्लिम जातींना का सामील केले आहे? या प्रश्नाला उत्तर देताना शब्बीर अन्सारी म्हणाले की ओबीसी चळवळीचा भाग बनताना त्यानंतर जे काही घडले तो इतिहासाचा भाग आहे. शब्बीर अन्सारी म्हणतात, या प्रश्नांशी झुंज देत असताना मी ओबीसी चळवळीत कशी उडी घेतली याचे मला भान नव्हते. पण डॉ. मुणगेकरांनी सांगितल्याप्रमाणे मंडल आयोगाच्या अहवालात मुंस्लिमांच्या उल्लेखाने त्यांना चौधरी ब्रह्मप्रकाश करपुरी ठाकूर, रामविसाल पासवान, शरद यादव, कांशीराम, वीरमणी, शांती नाईक आणि एडहोकेट जनार्धन पाटील यांच्या नेतृत्वात मंडल अहवालाच्या शिफारशी लागू करण्याच्या संघर्षात एक प्रकारे मी गुंतूनच गेलो. त्यांनी मोठ्या आपुलकीने ग्रंथाच्या पहिल्याच पानावर आपले गुरु जनार्दन पाटील यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. जात आणि वर्ग यामधील फरक सहसा सामान्य जनांना समजत नाही. शब्बीर अन्सारींनी मात्र ते अचूक समजून घेतले आणि याच आधारावर त्यांनी मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची मोहीम हाती घेतली. जेव्हा महाराष्ट्र सरकारने मुस्लिम ओबीसींच्या संदर्भात आदेश काढले तेव्हा त्यामध्ये मराठी भाषेत जात ऐवजी वर्ग असे म्हटहे गेले होते.

भारतीय जनता पक्ष धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास संविधानाच्या विरुद्ध असल्याचे म्हणतो. जर भारतीय घटनेनुसार जातीपातीच्या आधारावर आरक्षण दिले जात नसेल तर केंद्र सरकारचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णयदेखील घटनाबाह्य ठरतो. पण जर गरीबीच्याच मापदंडावर इतरांना आरक्षण दिले जात असेल तर मुस्लिम समाजाच्या गरीबीला दूर करण्यासाठी त्यांनाही आरक्षणाची तरतूद का असू नये? भारतात आरक्षणाच्या महत्त्वाला समजून घेण्यासाठी त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला समजणे आवश्यक आहे. भारत भूमीत मध्य आशियामधून काही लोक स्वतःला उच्चवर्णीय समजणारे दाखल झाले. त्यांनी भारतातील मुस्लिमांना देशाच्या दक्षिण भागात ढकलून दिले. त्यांच्या सुपीक जमिनीची नासधूस केली. ज्या लोकांनी दक्षिणेकडे पलायन करणे स्वीकारले नाही त्यांना अस्पृश्य घोषित केले. जातीव्यवस्थेवर आधारित धर्मव्यवस्था रुजवली. भारत जगातला एकमेव असा देश आहे जिथे याच देशाच्या काही जातींवर धर्मस्थळांचे दार बंद केले. शिक्षणाची दारे बंद केली गेली आणि जगात दुसरे उदाहरण नाही अशी व्यवस्था रुजवली. नंतर जेव्हा मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माचे लोक या देशात आले तेव्हा त्यांनी त्यांचे स्वागत केले.

पुण्यात पेशवाई काळात दलित समाजावर तीच जुलमी व्यवस्था लागू होती. त्यांना आपल्या गळ्यात एक भांडे लटकवावे लागे जेणेकरून थुंकी जमिनीवर पडू नये. पाठीवर झाडू लटकवलेली असे ज्यामुळे त्यांनी चालून आलेल्या रस्त्यावरील त्यांच्या पाऊलखुणा पुसल्या जाव्यात. ब्रिटीशकाळात महार रेजिमेंटने भीमा-कोरेगाव नजीक युद्ध केले होते. आजही देशात बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक विहिरीतून पाणी घेऊ दिले जात नाही. तसेच सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्या मयतांचे दहन केले जाऊ शकत नाही. त्यांना मिशा ठेवता येत नाहीत.

ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गाच्या मागासलेपणाचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यासाठी (घटनेत) आरक्षणाची तरतूद केली. नंतर मंडल आयोगाचे गठन झाल्यावर त्याद्वारे व्यवसायाच्या आधारावर मुस्लिमांसाठी ओबीसीच्या आरक्षणाविषयी सुचविले. त्या वेळी मुस्लिम नेते आणि बुद्धिजीवीवर्गाला जात आणि वर्ग यातले अंतर समजत नव्हते. म्हणून त्यांनी शब्बीर अन्सारींचा विरोध केला आणि जेव्हा इतर लोक कुणाचा विरोध करत असतात त्याच वेळी अल्लाह नेक लोकांसाठी “आहे” या पवित्र कुरआनातील आयतीचा अर्थ समजतो. अल्लाहचे बंदे साथ सोडून देतात त्या वेळी अल्लाहच्या मदतीचे मोल समजते. ह्या वास्तवतेची जाण फार कमी लोकांना असते. विरोधाचे एकमेव कारण कुणाशी शत्रुत्व किंवा स्वतःचे हित नसते. शब्बीर अन्सारी यांना हे चांगल्या प्रकारे कळले होते. म्हणून लोकांनी जेव्हा विरोध सुरू केला तेव्हा रागावले नाहीत, तर त्यांचा गैरसमज दूर करू लागले आणि या कठीण परीक्षेत ते यशस्वी झाले.

विरोधाचा सामना करणे कठीण असते, म्हणून अशा वेळी अल्लाहचे प्रेषित ह्या शब्दांचा उच्चार करतात की “आम्ही अल्लाहवर का विश्वास ठेवू नये. त्यानेच तर आमच्या जगण्याचा मार्गात आमचे मार्गदर्शन केले आहे. तुम्ही ज्या यातना आम्हाला देत आहात त्यावर आम्ही संयम बाळगू, विश्वास करणाऱ्यांचा विश्वास अल्लाहवरच असायला हवा.” अशा प्रकारे शब्बीर अन्सारी यांचा मंडलनामा केवळ एक आत्मकथाच नसून ती जगबीती देखील आहे. हे महाराष्ट्र राज्यातील त्या काळचे वर्णन आहे ज्या काळी केवळ दिवंगत विलासराव देशमुख आणि शरद पवार या नेत्यांचीच साहायता घेतली गेली नव्हती तर राज्याचे हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील साहाय्यक करून घेतले. या चळवळीच्या वैभवाचे महत्त्व इतके महान होते की दिलीपकुमारपासून जॉनी वॉकरपर्यंतचे सिनेकलाकार या संघर्षात सामील झाले.

कोणत्याही चळवळीच्या नेत्याच्या दृष्टीसाठी कोणाची गरज यासाठी असते की त्याने दुःख पाहावे. जात आणि वर्गामधील अंतर काय हे लोकांना समजावून सांगावे. अशा निरंतर संघर्षाच्या वेळी जर त्याचे बोल मनाला मोहक वाटणार नसले तरी त्याच्या मनातली गोष्ट ऐकणाऱ्यांच्या मनात उतरते, नेत्याच्या  उद्दिष्टाला वाहून जाते. त्याला हे स्वतःलाच नव्हे तर त्याच्या अनुयायांना देखील बलिदानाची प्रेरणा देते. या ग्रंथाच्या सुरुवातीला शब्बीर अन्सारी यांचे मनोगत दिले आहे. त्यानंतरच्या ओळीत ते म्हणतात की आपल्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास समाधान वाटते. कारण आरक्षणासाठीच्या लढ्यात थोडेफार योगदान देऊन मुस्लिम ओबीसींच्या जीवनात आनंदाच्या काही क्षणांची भर घालू शकलो. त्यांच्यासाठी काही करण्याची सुवर्णसंधी मिळाली.


- डॉ. सलीम खान

मुंबई

(भाषांतर : इफ्तेखार अहमद)



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांड पंडित होते. विविध विषयांवरील त्यांचा व्यासंग अदभूत व दांडगा होता. राजकारण,समाजकारण, धर्म व अर्थशास्त्र, उद्योग, नगरविकास कामगार,शेती व शेतकरी, जलनीती ,यांच्या विषयी त्यांनी मांडलेले विचार आजही पथदर्शक ठरलेले आहेत. तथापि मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर घटनेचा मसुदा तयार करण्यात त्यांनी दिवसरात्र एक करून जे अखंड परीश्रम घेतलेत, त्याला तोड नाही. अत्यंत परिश्रमपूर्वक केलेल्या त्यांच्या या कार्याची दखल म्हणून ‘ भारतीय घटनेचे शिल्पकार ‘ अशा शब्दांत त्यांचा जगभरात गौरव केला जातो, आणि तो सार्थच आहे.

१५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या देशाला  स्वातंत्र्य मिळाले आणि ‘घटनेचे शिल्पकार ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वतापूर्ण अध्ययन आणि भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करून  तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्यातून भारतीय संविधान जन्माला घातले. २६ जानेवारी १९५० रोजी भारतातील जनतेला अर्थात भारतीय नागरिकांना हे संविधान समर्पित करून पारीत करण्यात आले. त्या एकमेव घटनेमुळे आपल्या देशाला प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली. जगातील सर्वोत्कृष्ठ आणि विशाल असे संविधान म्हणून भारतीय संविधानाची ख्याती जगभर आहे. इतकेच नाही तर सर्व कायदे, कलम आणि परीशिष्टांची विस्तृत मांडणी हेही भारतीय संविधानाचे जागतिक वैशिष्ट्य आहे. जगात इतके विस्तृत आणि स्पष्ट उल्लेखित संविधान कोणत्याही देशाजवळ नाही. हे कौशल्य आणि कौतुकास्पद काम केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच झाले आहे. या संविधानाची समीक्षा अनेक नामवंत तज्ञांनी केली आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्वान संविधानकार  जगात अजून पर्यंत झाला नाही.” असा आजवर स्पष्ट उल्लेख अनेकदा देश विदेशातील घटनातज्ञांनी तसेच कायद्याच्या अभ्यासकांनी केला आहे.

भारतातील समाज व्यवस्थेचा व सर्वांगीण परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व भारतीयांना भारतीय संविधानात न्याय देण्यात आला आहे. आजपर्यंत संविधानाची वाटचाल दीपस्तंभासारखी राहिली आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला भारतीय संविधानाचा गौरव वाटतो. भारतीयांनाही त्याचा गौरवच आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेला भारतीय संविधान सुपूर्द करतांना म्हणतात की, “संविधान कितीही चांगले असले तरी त्या संविधानाचे यश हे ते संविधान चालविणाऱ्यांवर आणि त्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे.” बाबासाहेबांचा संदेश आजही तितकाच भविष्यासाठी  मार्गदर्शक आहे.  भारतीय संविधानाची महती यापेक्षा जास्त सांगण्याची गरज भासू नये. परंतु भारतीय संविधानाच्या इतक्या वर्षाच्या वाटचालीनंतर आज देशात संविधान बदलण्याचे वारे वाहू लागले आहेत. तसे ते दर १० वर्षांनी वाहतच असतात. अगदी संविधान निर्मितीच्या काही वर्षातच भारतीय संविधानाला बदलविण्याची भाषा सुरु झाली होती. माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयींच्या कालखंडात तर “संविधान समीक्षा आयोग २००२,” गठीतही करण्यात आला होता. मात्र इथल्या परिवर्तनवादी, समाजवादी आणि मानवतावादी लोकांचा  त्याला कडवा विरोध  झाला. आतापर्यंत भारतीय संविधानात सुमारे ११३ घटना दुरुस्त्या  झाल्या आहेत. संविधानातील कायदे बदलत्या परिस्थितीनुसार बदलविण्यात आले आहेत. तरीही संविधान बदलाची भाषा दर पाच दहा वर्षांनी चर्चेली जाते. यंदाच्या १८व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत “अगली बार चारसो पार” चा नारा दिला गेला होता,तो यशस्वी झाला असता तर नक्कीच बाबासाहेबांच्या संविधानाला बदलून टाकण्याचे धाडस सत्ताधाऱ्यांनी केलें असते, पण भारतीय जनता चाणाक्ष व हुशार आहे, त्यांनी संविधान बदलविण्याचा मनसुबा मतपेटीतून उधळून लावला, हे वास्तव आहे.

खरे तर प्रत्येक गोष्टींचे, समस्यांचे व प्रश्नांचे उत्तर भारतीय संविधानात देण्यात आले आहे. काय बदलता येईल आणि काय बदलता येणार नाही. हेही स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. संविधान बदलण्याची प्रक्रिया कशी असेल हे संविधानाच्या भाग २० कलम ३६८ मध्ये नमूद करण्यात आली आहे. संसदेतील कायदा निर्मितीची प्रक्रियाही संविधानाच्या भाग ५ मध्ये कलम १०५ ते कलम १२२ मध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे. या संविधानाने मागासवर्गीयांना, अनुसूचित जाती, जमातींना, अल्पसंख्याकांना दिलेले अधिकार महत्त्वाचे आहेत. परिस्थितीला समर्पक नाही अश्या गोष्ठी  संविधानातून काढू शकता येतात किंवा त्यात सुधारणा करू शकता येतात किंवा संविधानात नवीन तत्वे अंतर्भूत करू शकता येतात, त्यासाठी संपूर्ण संविधान बदलण्याची गरज नाही.

या देशाचे संविधान निश्चितच श्रेष्ठ आहे. त्याला राबविणाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. ही जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. आपली कर्तव्य आणि जबाबदारी या भारतीयांनी नीटपणे सांभाळली तर देशाचे चित्र बदलू शकेल.  काय करायचे ? आणि काय करायचे नाही ? याचा विचार करून संविधानाकडे विकासाचा दस्ताऐवज म्हणून पहायला हवे! संविधानातील तरतुदी कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करायला हवा! राजकीय नैतिकता आणण्याचा आग्रह धरायला हवा ! वैज्ञानिक दृष्टी बाळगणे आणि त्या वैज्ञानिक दृष्टीचा प्रचार आणि प्रसार करणे हे संविधानानुसार (कलम ५१-क नुसार) प्रत्येक भारतीयांचे मुलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी अंधश्रद्धा, देव, चमत्कार, बाबा, बुवा यांना मुळापासून उपटून फेकायला हवे ! संपत्तीचे समान वितरण करण्यासाठी संपत्तीची सीमा निर्धारित करायला हवी ! निर्धारित सीमेपेक्षा जास्त संपत्ती ही सरकारी खजिन्यात जमा करायला हवी ! मग ती उद्योगपतींची असो, राजकारण्यांची असो, की मंदिर ट्रस्ट ची असो ! ही संपत्ती जरी सीमित करण्याचा कायदा केला. तरी या देशातली गरिबी, बेरोजगारी, कुपोषण चुटकीसरशी संपुष्टात येतील. देश विज्ञानाच्या बळावर महासत्ता बनेल. जपान, जर्मनी याची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या देशांना संविधान बदलण्याची गरज पडली नाही. त्यांनी फ़क़्त देशाची मानसिकता बदलली. देशाचा विकास झाला. भारतातही मानसिकता बदलण्याची गरज आहे. माणूस बदलला तर देशही बदलेल. देशाचा विकास होईल. भारतीय संविधानातील कायदे आजच्याही परिस्थितीशी साधर्म्य साधणारे आहेत. आजच्या निर्माण झालेल्या परिस्थितीला बदलण्याची ताकत त्यांच्यात आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ही ताकद प्रत्येक भारतीयाला प्रदान केली आहे.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)



इस्लाममध्ये कुरआन हा मुलभूत ग्रंथ मानला जातो आणि याचे पठण करण्याचीही एक शास्त्रोक्त पद्धत आहे जिला ’किरआत’असे म्हणतात. यामध्ये प्राविण्य फार कमी लोकांच्या नशिबात येते. इस्लामच्या इतिहासामध्ये या क्षेत्रातही अनेक महिलांनी सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदविलेले आहे. 

1. हजरत उम्मूल दर्दा अल सगरा ज्यांना हाजीमा बिन्ते हय्यील वसाबिया ही म्हटले जात. कुरआन पठणाच्या क्षेत्रामध्ये यांनी मोठे नाव कमावले. 

2. फातमा निशापुरिया. चौथ्या शतकातील कुरआन मुखोद्गत असलेल्या आणि कुरआनच्या भाष्य लिहिणाऱ्या इस्लामी दंडशास्त्रावर प्रभूत्व असणाऱ्या अशा एकमेव महिला होत्या ज्यांना किराअतवरही प्रभूत्व प्राप्त होते. एकदा त्या हजसाठी म्हणून मक्का शहरात गेल्या आणि तेथेच लोकांना कुरआन शिकवू लागल्या. हळूहळू त्यांचे प्रभावक्षेत्र वाढत गेले. आणि त्यांना लोक मुफ्फस्सराह फातेमा निशापुरियाह या नावाने ओळखत होते. 

3. उम्मूल अज्ज बिन्ते मुहम्मद बिन अली बिन अबी गालीम अलअबदरी अद्दीनी (हि. 610) याही कुरआन पठणाच्या तज्ञ महिला होत्या. 

4. खतिजा बिन्ते हारून : 695 हि. कुरआन पठणामध्ये प्रविण होत्या. शास्त्रीय कुरआन पठणाचे पुस्तक अलशातबिया हे त्यांना मुखोतद्गत होते. 

5. खतिजा बिन्ते कय्यीन बगदादी (699 हि.). खिरआतची तज्ञ विदुशी होती. अनेकांनी त्यांच्याकडून ही विद्या शिकली. त्या इस्लामी विषयावर वादविवादचे समारंभ आयोजित करत होत्या. ज्यात मोठ्या प्रमाणात लोक सामील होत होते. 6. सलमान बिन्ते मोहम्मद अलजजरी : (9 हि.) आपल्या काळातील प्रसिद्ध कारी होत्या. दहा पद्धतीने किरआत करण्यावर त्यांचे प्रभूत्व होते. 7. फातेमा बिन्ते मोहम्मद बिन युसूफ बिन अहेमद बिन मुहम्मद अलदिर्वती (9 हिजरी)ः मोठ्या विदुशी होत्या. त्यांनी किरआतच्या क्षेत्राम्ये प्राविण्य मिळविले होते. त्यांनी अनेक स्त्री- पुरूषांना आपले हे ज्ञान दिले होते. 8. शेख जमालोद्दीन मज्जी (हि.742) : यांच्या सुविद्य पत्नी उम्मे फातेमा आएशा उत्कृष्ट कारिया होत्या. हजारो स्त्री-पुरूषांनी त्यांच्याकडून किरआतचे धडे घेतले होते. 

- डॉ. रजिउल इस्लाम नदवी

दिल्ली



पुस्तक : मेमारे जहाँ तू है

भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे


आकाशात अनेक तारे झगमग करतात पण ध्रुवताऱ्याची गोष्टच निराळी आहे. आकाशातील सर्व तारे भ्रमण करतात, पण हा एकमेव असा तारा आहे जो एकाच ठिकाणी राहतो. तो आकाशाच्या उत्तर अर्धगोलात उत्तरेकडील ध्रुवाजवळ स्थित आहे. म्हणूनच याला ध्रुवतारा म्हणतात. हा तारा पृथ्वीपासून सुमारे 433 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ध्रुवताऱ्याच्या या वैशिष्ट्यामुळे खगोलशास्त्रात आणि दिशा शोधण्यासाठी तो अतिमहत्त्वाचा मानला जातो. पूर्वीच्या काळात ध्रुवताऱ्याला खूप महत्त्व होते कारण हा तारा नेहमी एकाच ठिकाणी असतो.

पूर्वीच्या काळात प्रवासाची सोय आजच्यासारखी नव्हती. अनेक दिवस आणि महिने लागत होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला. रस्ते खडतर होते आणि रात्री सूर्यास्त झाल्यावर दिशेचा अंदाज येत नसे. तेव्हा प्रवाशांना ध्रुवतारा मार्गदर्शन करीत असे. आजच्या युगातही ध्रुवताऱ्याला महत्त्व आहे आणि खगोलशास्त्रज्ञ त्याचे संशोधन करत आहेत.

आजच्या प्रगत युगात पूर्वीसारखी समस्या राहिलेली नाही. महामार्ग बनले आहेत, रस्ते व्यवस्थित आहेत. कोणते ठिकाण किती लांब आहे हे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बोर्डावर लिहिलेले असते. तुम्हाला जिथे पोहोचायचे आहे त्या ठिकाणाचे नावापुढे खूण दिलेली असते की तुमची दिशा याकडे आहे. आज तर गुगल मॅप तुमच्या हातात आहे. तुम्ही कुठे चालले आहात ते सर्व पाहता येते आणि तोंडी मार्गदर्शन देखील होते.

पूर्वीच्या काळाचा ध्रुवतारा आणि आजचा लोकेशन मॅप किंवा गुगल मॅप तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. मानवाची शारीरिक व मानसिक रचना अशी आहे की त्याला यशस्वी जीवन जगण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. गुरुविना शिष्य अपुरा असतो. गुरु नसते तर शिष्याला योग्य मार्गदर्शन कोण केले असते? आई नसती तर मुलाचे संगोपन कसे झाले असते? त्याची शारीरिक व मानसिक वाढ कोण केली असती? आई आणि इतर कुटुंबीयांच्या सहकार्याने लहान मुले मोठी होत असतात आणि मोठी होऊन मोठमोठी कामे करतात.

मनुष्य बुद्धीचा योग्य वापर करून प्रगती करतो. बुद्धीला साथ मिळते हातांची. या बुद्धीचा वापर करून मनुष्य हातांचा योग्य वापर करून निरनिराळे प्रकल्प उभे करतो. मानवाच्या प्रत्येक अवयवाचा योग्य वापर करून तो प्रगती करत असतो आणि आपले जीवन सहजतेने व्यतीत करत असतो. म्हणजे सफल जीवनामागे मानवी शरीररचना, कुटुंब, समाज, आणि निसर्गाची प्रत्येक वस्तू मानवाला साथ देते व मार्गदर्शन करते जेणेकरून मानवाने हे जीवन आनंदाने सहजतेने जगावे.

पण हा विचार करणे सुद्धा योग्य आहे की, हे जीवन जे आम्ही जगत आहोत तेच सर्वकाही आहे काय? हे जीवन मानवाचे अंतिम जीवन आहे काय? मृत्यूनंतर सर्वकाही संपणार आहे का? हे प्रश्न गंभीर आहेत. ’खाओ पिओ मजा करो और मर जाओ’ इतकाच हा जीवन मर्यादित आहे का? की याच्या पलीकडे देखिल जीवन आहे? यावर गांभीर्याने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्ही या प्रश्नांना गंभीरतेने घेतले असेल तर तुम्हाला कळेल की हे जीवन अंतिम जीवन नाही. याच्या पलीकडे एक जीवन आहे, मरणोत्तर जीवन. खरी यशस्वीता मरणोत्तर जीवनाची आहे. अनेक बुद्धिजीवी या जगात होऊन गेले आणि त्यांच्या सर्वांचे हेच म्हणणे होते की या जीवनापलीकडे एक जीवन आहे - मरणोत्तर जीवन. त्या जीवनाची यशस्वीता या सद्यस्थितीत जीवनावर अवलंबून आहे. बीज बोये बबुल के आम कहा से पाये समान, या जीवनात बाभूळ पेराल तर मरणोत्तर जीवनात बाभळीचे काटे भेटतील, आंबे भेटणार नाहीत. जो बोओगे वही पाओगे.

या जीवनात जे कर्म आम्ही करत आहोत त्या कर्मांची फळे -(आतील पान 7 वर)

मरणोत्तर जीवनात आम्हाला चाखायला मिळतील. सांगायचे तात्पर्य असे की हा जीवन जे आपण जगत आहोत अति महत्त्वाचे आहे आणि जीवन जगण्याची संधी एकदाच प्राप्त झालेली आहे. पुन्हा हे जीवन भेटणार नाही. जसे विद्यार्थ्यांचे उदाहरण घेऊया, एक विद्यार्थी खूप अभ्यास करतो आपले टार्गेट प्राप्त करण्यासाठी पण परीक्षेचा निकाल लागल्यावर त्याला कळते की एक मार्कने तो मागे राहिला आहे, टार्गेट पूर्ण झालेला नाही. पण तो धीर सोडत नाही आणि पुन्हा प्रयत्न करतो. चिकाटीने जिद्दीने अभ्यास करतो आणि टार्गेट प्राप्त करूनच समाधानाचा श्वास घेतो. या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी प्राप्त आहे पण हे जीवन असे नाही आहे. एकच इनिंग खेळायची आहे, दुसरी संधी नाही.

सद्यस्थितीत जीवनाच्या यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक आहेत आणि कायमस्वरूपी जीवनाच्या सफलतेसाठी मानवाला कोणतेच मार्गदर्शक अस्तित्वात नाही असे शक्य आहे का? नाही! मुळीच नाही. अशक्य आहे. या जीवनाच्या सफलतेसाठी आणि मरणोत्तर जीवनाच्या सफलतेसाठी देखील ध्रुवतारा समान मार्गदर्शक आहेत. कुरआन मध्ये आहे की: मूसा (अ.) ने उत्तर दिले, आमचा पालकर्ता तो आहे ज्याने प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान केले मग तिला मार्ग दाखविला. (सूरा तहा, आयत: 50).      मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांच्या तफ्सीरानुसार सूरह ता-हा, आयत चे स्पष्टीकरण असे आहे की, जेव्हा फिरऔनने हजरत मूसा (अ.) ला विचारले की, तुझा पालनकर्ता कोण आहे? त्यावर मूसा (अ.) उत्तर देतात की, आमचा पालनकर्ता तो आहे ज्याने प्रत्येक वस्तूला तिचे स्वरूप प्रदान केले आणि मग तिला मार्ग दाखविला.

मौलाना मौदूदी या आयतीचे स्पष्टीकरण असे देतात आणि त्याचे सारांश असे आहे की, अल्लाहने प्रत्येक वस्तूची निर्मितीच केली नाही तर तिला योग्य प्रकारे जीवन व्यतीत करण्यासाठी मार्गदर्शनही केले आहे. हे मार्गदर्शन विविध स्वरूपात दिसते, जसे की प्राण्यांची नैसर्गिक प्रवृत्ती, सृष्टीचे भौतिक नियम आणि मनुष्यासाठी नैतिक व आध्यात्मिक मार्गदर्शन. प्रत्येक जीव आणि वस्तूचे निर्माण एका विशिष्ट उद्दिष्टाने केले गेले आहे आणि त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी अल्लाहने आवश्यक साधनं प्रदान केलेली आहेत.

मानवाचे हे जीवन आणि मरणोत्तर जीवन सफल होण्यासाठी अल्लाहने मानव मार्गदर्शनासाठी प्रेषितांमार्फत सत्य मार्गदर्शन केले आहे. म्हणूनच, मानवाला योग्य मार्गदर्शन मिळावे आणि मरणोत्तर जीवनात सफलता प्राप्त व्हावी यासाठी अल्लाहने या धरतीवर प्रत्येक राष्ट्रात प्रेषित पाठविले आहेत. याचा पुरावा आम्हाला कुराणमध्ये मिळतो. प्रत्येक जनसमुदाया (उम्मत) साठी एक प्रेषित आहे. मग जेव्हा एखाद्या लोकसमूहाजवळ त्याचा प्रेषित येतो, तेव्हा पूर्ण न्यायानिशी त्यांचा निर्णय लावला जातो आणि त्यांच्यावर तिळमात्र देखील अत्याचार केला जात नाही. (सूरह युनूस, आयत: 47). याचा अर्थ असा की या धर्तीवर मानव भरकटू नये आणि सत्य मार्गावर चालावे म्हणून अल्लाहने प्रत्येक भूखंडात अनेक प्रेषित पाठविले आहेत. सर्व प्रेषितांनी मानवाचे नाते अल्लाहशी जोडले. अल्लाह एक आहे, त्याचा कोणीही भागीदार नाही, तो रब आहे, पालनहार आहे, उपजीविका देणारा आहे, सार्वभौम आहे, आणि मालक आहे. गुलामी अल्लाहाचीच केली जावी. पूजा अर्चना अल्लाहसाठीच आहे. त्याच्या समोरच नतमस्तक होण्यात सफलता आहे या जीवनातही आणि मरणोत्तर जीवनातही. अशी शिकवण प्रत्येक प्रेषित देत असे आणि जीवन जगण्याचा सरळ मार्ग सिराते मुस्तकीम दाखवत असे. जेव्हा जेव्हा मानवाला अल्लाहचा विसर पडला आणि ते सैतानी मार्गावर चालू लागले तेव्हा-तेव्हा अल्लाहने मानवाला सरळ मार्ग दाखवण्यासाठी प्रेषित पाठविले आहे, आणि अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांना पाठविले आहे. जो कुणी मोहम्मद (स.अ) दाखवलेल्या मार्गावर चालेल त्याला या जीवनात सफलता प्राप्त होईल आणि मरणोत्तर जीवनात देखील तो सफल होणार आहे. आणि (हे पैगंबर (स.)), आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा आणि सावधान करणारा बनवून पाठविले आहे, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. (सूरा सबा, आयत: 28). याचा अर्थ असा की प्रेषित सर्व मानव जातीचे मार्गदर्शक आहेत. एका दुसऱ्या ठिकाणी आहे की, हे मुहम्मद (स.), सांगा की, हे मानवांनो, मी तुम्हा सर्वांकडे त्या अल्लाहचा प्रेषित आहे जो पृथ्वी व आकाशांच्या राज्यांचा स्वामी आहे, त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही, तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. म्हणून श्रद्धा ठेवा अल्लाहवर आणि त्याने पाठविलेल्या निरक्षर नबी (स.) वर जो अल्लाह व त्याच्या आदेशांना मानतो, आणि अनुसरण करा त्याचे, जेणेकरून तुम्ही सरळ मार्ग प्राप्त कराल. (सूरा अल आराफ, आयत: 158). म्हणून प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की त्याने योग्य मार्गदर्शक शोधावेत. जर या शोधकार्यत त्याने चूक केली तर मरणोत्तर जीवन असफल होणे निश्चित आहे.

 - आसिफ खान, धामणगाव बढे

9405932295


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget