Halloween Costume ideas 2015
Latest Post

Taliban US
ज्या तालीबानला गेल्या 19 वर्षांपासून आतंकवाद्यांच्या यादीमध्ये क्रमांक एकवर ठेवले होते त्यांना त्या यादीतून बाहेर काढून 29 फेब्रुवारी 2020 रोजी करार करून अमेरिकेने हे सिद्ध केलेले आहे की त्यांच्या एवढा स्वार्थी आणि तत्वशुन्य देश जगात दूसरा नाही. या कराराचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये हे की, ज्या अमेरिकेच्या पाठिंब्यावर अफगानिस्तानमध्ये अश्रफ गणी यांचे सरकार अस्तित्वात आहे तेच मुळात या करारामध्ये सामिल नाही. करार झालेला आहे तो सरळ अमेरिका आणि तालीबान यांच्यामध्ये. या कराराला शांती करार म्हणावे का युद्ध विराम करार? हे सुद्धा स्पष्ट होत नाही, एवढ्या विचित्र पद्धतीने हा करार करण्यात आला आहे. हा करार कसाही झालेला असो त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम नक्कीच होणार आहेत. म्हणून हा करार समजून घेणे प्रत्येक सुजाण नागरिकाला आवश्यक आहे. म्हणून हा लेखन प्रपंच.
पार्श्‍वभूमी
    इ.स. पूर्व 330 व्या वर्षी अलेक्झांडर द ग्रेट उर्फ सिकंदर याने भारत जिंकण्याचा इरादा करून कूच केली होती. त्या अगोदर त्याने सीरिया, लेबनान, तुर्कस्थान, इजिप्त, इराक व इराण जिंकलेले होते. त्याची सेना त्या काळातली जगातील सर्वात प्रबळ सेना मानली जात होती. आपण भारत सहज जिंकू या आत्मविश्‍वासाने तो भारताकडे निघाला होता, परंतु रस्त्यात अफगानिस्तान नावाचा एक प्रदेश पडतो व तेथे राहणारे लोक त्याला दिल्लीपर्यंत जावू देणार नाहीत याची त्याला कदाचित जाणीव नसावी. तीन वर्षे या अफगानी कबिल्याच्या चिवट लोकांनी सिकंदरच्या फौजांना एवढे थकवले होते की, त्याची सेना भारत जिंकू शकली नाही.
    यानंतर 1919 मध्ये ब्रिटिशांनी ही अफगानिस्तानवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला तो देखील फलद्रुप झाला नाही. त्यांनाही भरपूर नुकसान सहन करून मायदेशी परतावे लागले.        
त्यानंतर 1979 ते 1989 पर्यंत सातत्याने 10 वर्षे प्रयत्न करूनही त्या काळातील महासत्ता असलेल्या सोव्हिएट रशियाला आपली शस्त्र सामुग्री तशीच टाकून आपल्या सैनिकांना एअरलिफ्ट करावे लागले. येणेप्रमाणे अफगानिस्तानवर सत्ता स्थापन करण्याचे सोव्हिएट रशियाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकले नाही. पुढे 7 ऑक्टोबर 2001 रोजी अमेरिकेने अफगानिस्तानवर पहिला हवाई हल्ला केला. त्याला 6 ऑक्टोबर 2020 रोजी 19 वर्षे पूर्ण झाली. तत्कालीन राष्ट्रपती बुश ज्युनियर यांनी हा हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेच्या संसदेमध्ये या युद्धाला ’ऑपरेशन इन्ड्युरिंग फ्रिडम’ हे नाव देऊन हे युद्ध फार तर एक आठवडा चालेल अशी घोषणा केली होती. कदाचित त्यांनाही कल्पना नसावी की त्यांनी सुरू केलेले हे युद्ध 19 वर्षेचालेल व त्यांना ते बंद करण्यासाठी ज्यांच्याशी युद्ध केले त्यांचेच सहकार्य मागण्याची नामुष्की पत्करावी लागेल. परंतु 19 वर्षे युद्ध करून, दोन ट्रिलियन डॉलर खर्च करून, 2 हजार 300 अमेरिकी सैनिकांचा बळी देऊन, 48 देशांची मदत घेऊन, त्यांचे 1200 सैनिकांचा बळी देऊन सुद्धा त्यांना हे युद्ध जिंकता आले नाही. उलट त्या देशातून सुरक्षित परत जाण्यासाठी ज्यांना आतंकवादी म्हटले त्यांच्याशीच करार करण्याची पाळी अमेरिकेवर आली. यामुळे अफगानिस्तान साम्राज्यवाद्यांचे कब्रस्तान आहे, हे म्हणणे खरे ठरत आहे. असे का घडले? चला तर हे समजून घेऊया.
करारापूर्वीची शांतता
    अफगानिस्तानमध्ये जन्मलेले आणि अमेरिकेमध्ये वाढलेले सिनेटर जल्मे खलीलजाद हे या कराराचे शिल्पकार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डोनाल्ड ट्रम्प यांचे अफगानिस्तानमधून सैन्य परत काढण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नांची परिणीती 29 फेब्रुवारीच्या करारामध्ये झाली. अनेक देशांच्या प्रतिनिधीं समोर कतरची राजधानी दोहा येथील एका शानदार हॉटेलमध्ये झालेल्या या कराराचे साक्षीदार भारताचे कतर येथील राजदूत कुमारन हे ही ठरले. त्यांची उपस्थिती ही भविष्यातील अफगानिस्तानामधील बदलणार्‍या परिस्थितीच्या दृष्टीने चांगल्या मुस्तदिपणाचे लक्षण आहे. जल्मे खलीलजाद यांच्या आणि तालीबान यांच्यात चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या व 10 मार्च 2020 रोजी नॉर्वेमध्ये झालेल्या तालीबान-अमेरिका वार्ताकारांच्या शेवटच्या फेरीत असे ठरले होते की करारापूर्वी एक आठवडा कुठलीही हिंसा होणार नाही याची तालीबान यांनी हमी द्यावी. त्याप्रमाणे तालीबान नेतृत्वाने अमेरिकेला हमी दिली व 21 ते 29 फेब्रुवारी दरम्यान गेल्या 19 वर्षात पहिल्यांदाच तालीबानने एक आठवडा कुठेही हल्ला केला नाही. नसता गेली 19 वर्षे सातत्याने दर दिवशी एक या सरासरीने तालीबानने अफगानिस्तानमध्ये कुठे ना कुठे हल्ला केलेला आहे.
प्रत्यक्ष करार -     आजमितीला अफगानिस्तानमध्ये अमेरिकेचे 14 हजार सैनिक असून, नाटोचे 17 हजार सैनिक आहेत. या कराराप्रमाणे येत्या 14 महिन्यात अमेरिका आणि नाटोचे सैनिक टप्प्या टप्प्याने मागे घेण्यात येणार आहेत. करारातील पहिलीच अट जगाला चकीत करणारी आहे ती अशी की - ”पार्टीसिपन्टस् ऑफ दोहा कॉन्फ्रन्स अ‍ॅग्रीज फॉर द रोड मॅप फॉर पीस बेस्ड ऑन फॉलोईंग कंडिशन्स. इन्स्टिट्यूटशनलायझिंग इस्लामिक सिस्टम इन द कन्ट्री फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉम्प्रेहेन्सिव पीस.” याचा अर्थ असा की, भविष्यात अफगानिस्तानमध्ये तालीबानच्याच विचाराचे इस्लामी अमिरातीचे सरकार अस्तित्वात येईल.
    साडेसात लाख प्रशिक्षित रिपब्लिकन गार्डस्चे बळ असतांनासुद्धा अमेरिकेने इराकमध्ये सद्दाम हुसैन यांचा पाडाव केला होता. पाच लाखाचे प्रशिक्षित सैन्य पाठीशी असतांनासुद्धा लिबियाच्या गद्दाफीला अमेरिकेने नष्ट केले होते. हा इतिहास फारसा जुना नाही. परंतु ज्यांना पायाच्या बुटांचे लेस नशिबी नाहीत, कुठलेही प्रशिक्षित सैन्य पाठिशी नाही, कुठलेही आधुनिक हत्यार सोबत नाही अशा परिस्थितीतही 48 देशांच्या आधुनिक शस्त्रसामुग्रीने लैस सैनिकांविरूद्ध 19 वर्षे लढून त्यांना चर्चेच्या टेबलपर्यंत आणण्याची किमया तालीबाननी कशी साध्य केली, याचेच आश्‍चर्य वाटते.
इतर महत्त्वाचे मुद्दे
    तसे पाहता डिसेंबर 2014 मध्येच ऑपरेशन इन्ड्युरिंग फ्रिडम समाप्त केल्याची अधिकृत घोषणा अमेरिकन प्रशासनाने केली होती व आता आमचे सैनिक फक्त अफगान सैनिकांना प्रशिक्षण देण्याचेच काम करतील असे सांगितले होते. पण ते नेहमीप्रमाणे खोटं बोलत होते. 2014 नंतरही त्यांनी नियमितपणे तालीबानच्या ठिकाण्यावर हल्ले सुरूच ठेवले होते.
    एवढे हल्ले होऊनही काबूल वगळता 70 टक्के भूभागावर तालीबानचे नियंत्रण आहे. याचे कारण म्हणजे तालीबान हे स्थानिक असून, स्थानिक जनतेचे त्यांना समर्थन आहे. जगातील 90 टक्के हेरॉईन अफगानिस्तानमधून होत असलेल्या अफू तून तयार केले जाते व हे हेरॉईन युरोप आणि अमेरिकेच्या तरूणांची इतकी हानी करीत आहे की जितकी हानी अमेरिकेच्या हल्यात अफगानि नागरिकांची झाली नसेल. युरोप आणि अमेरिकेची तरूणाई हेरॉईनच्या नशेच्या आधीन झालेली आहे. अनेक अफगानी लोकसुद्धा अफूच्या आहारी गेलेले आहेत. शिवाय या 19 वर्षाच्या युद्धात 43 हजार नागरिक आणि 45 हजार अफगानी सैनिक तालीबान्यांच्या हल्ल्यात मारले गेलेले आहेत. एकंदरित या 19 वर्षाच्या युद्धाने सर्वांनाच नुकसान पोहोचवलेले आहे. वॉटसअप आणि रेडिओ वॉकीटॉकी ही तालीबानची संचार माध्यमे होत.
    सत्तेमध्ये येण्यापूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना तीन मोठी आश्‍वासने दिली होती. एक - देशातील अर्थव्यवस्था पूर्ववत करू. दोन - मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये भींत बांधू आणि तीन - अफगानिस्तानमधून सैन्य माघारी बोलावू. अफगानिस्तानमधील अमेरिकन सैन्याच्या उपस्थितीला अमेरिकन नागरिकांचे समर्थन नाही. वरील तिन्ही आश्‍वासनांपैकी पहिली दोन आश्‍वासने ट्रम्प यांना शंभर टक्के पूर्ण करता आलेली नाहीत. म्हणून येत्या नोव्हेंबर मध्ये होणार्‍या पुढील अध्यक्षपदाच्या निवडणुकीपर्यंत एक मोठा करार करून अमेरिकन सैन्याच्या घरवापसीची प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी ट्रम्प हे उतावळले झाले आहेत. त्यामुळे दक्षीण एशियातील इतर देशांवर त्यांच्या या कृतीचा काय परिणाम होईल, याची परवा न करता त्यांनी हा करार घडवून आणलेला आहे.
    या 19 वर्षामध्ये अमेरिकेने आपली सर्व आयुध्ये वापरून पाहिली. हजारो टन बॉम्ब अफगानिस्तानच्या भूमीवर टाकले. एवढेच नव्हे तर मदर बॉम्ब नावाचा जगातील सर्वात मोठा बॉम्ब सुद्धा अफगान भूमीवर टाकला. एवढे सर्व करूनही अमेरिकेला अफगानमध्ये यश तर प्राप्त झालेच नाही उलट सन्मानाने बाहेर पडण्यासाठी ज्यांच्याबरोबर युद्ध केले त्यांनाच विनविन्या करण्याची पाळी अमेरिकेवर आली.
करारानंतरची परिस्थिती
    या करारामध्ये सत्ताधारी अश्रफ गणी सरकारला सामील न करून घेतल्यामुळे त्यांनी हा करार योग्य प्रमाणे लागू होऊ नये यासाठी पहिल्या दिवसापासूनच सुरू केलेले आहेत. 29 फेब्रुवारीला करार झाला आणि 2 मार्चला अश्रफ गणी यांनी जाहीर केले आहे की, त्यांच्या ताब्यात असलेल्या 7 हजार तालीबान कैद्यांपैकी 5 हजार कैदी सोडण्याची तालीबानची मागणी ते पूर्ण करणार नाहीत. ही घोषणा होताच तालीबानने अफगान सरकारच्या सैन्य ठिकाण्यावर हल्ला केलेला आहे. त्याचे उत्तर म्हणून अमेरिकेने 5 मार्चला तालीबानच्या आश्रय स्थानावर विमानाने बॉम्ब हल्ला केलेला आहे.
सध्याचे सरकार  - सध्या सरकारमध्ये असलेले राष्ट्रपती अश्रफ गणी हे सप्टेंबर 2019 मध्ये 50.64 टक्के मते घेऊन निवडून आलेले आहे. परंतु, त्यांची निवडणूक निष्पक्ष नाही, असे त्यांचे प्रतिस्पर्धी अब्दुल्लाह अब्दुल्लाह यांचा दावा आहे.
अंतरराष्ट्रीय परिणाम
    हा करार यशस्वी झाला तर त्याचे दक्षीण एशियातील सर्वच देशांवर काही ना काही परिणाम नक्कीच होईल. भारताने अफगानिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. तेथील संसद भवन बांधून दिलेले आहे. शिवाय अनेक पूल, रस्ते बांधून दिलेले आहेत. दूरचा विचार करून मोठी गुंतवणूक केलेली आहे. अशा परिस्थितीत तालीबानचे सरकार जर भविष्यात आले तर त्यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी आपल्याला मोठी कसरत करावी लागणार आहे. हा करार घडवून आणण्यामध्ये पडद्याआडून पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. म्हणून कालपर्यंत पाकिस्तानचे जे महत्त्व कस्पटासमान होते, ते अमेरिकेच्या लेखी वाढणार आहे. 1996 ते 2001 या काळामध्ये तालीबानने आपल्या शासन काळामध्ये मनमानीपणे इस्लामी शरियतची व्याख्या करून जो कारभार केला तो अनेक देशांना रूचला नाही. विशेषत: त्यांचे महिलांविषयी धोरण, मुलींना शिक्षणाचा हक्क नाकारणे आणि झटपट न्याय देण्याच्या प्रयत्नात त्यांनी लोकांना दिलेल्या शिक्षा जगाला रूचल्या नाहीत. अर्थात 19 वर्षाच्या संघर्षानंतर तालीबानमध्ये सकारात्मक बदल झाला, असेल असे गृहित धरूनच त्यांच्याबरेाबर वाटाघाटी केलेल्या असाव्यात. ते स्वतंत्ररित्या किंवा सध्या असलेल्या सरकारमध्ये सामील होऊन सत्तेपर्यंत पोहोचल्यानंतर आपल्या वर्तनात सुधारणा करतील, अशी आशा करूया. एकीकडे अमेरिकेची निघण्याची घाई दूसरीकडे तालीबानची चिवट झूंज देण्याची वृत्ती आणि तिसरीकडे अस्थिर अफगान सरकार यामुळे आजमितीला कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की तालीबान आणि अमेरिकेमध्ये झालेल्या या कराराचे भविष्यात काय होईल?

- एम.आय. शेख
9764000737

चुकीच्या धोरणाविरूद्ध आंदोलन करण्याचा मुलभूत अधिकार : अब्दुर रहमान

Shahin Baag
दिल्ली येथील शाहीन बागेच्या धर्तीवर  एका अंदाजाप्रमाणे 300 ठिकाणी देशात शांतपणे आंदोलने सुरूच आहेत. जोपर्यंत सीएए, एनसीआर आणि एनपीआर रद्द होत नाही तोपर्यंत ही आंदोलने सुरूच राहतील, असा निश्‍चय आंदोलनकर्त्यांचा आहे.
    मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, जालनासह राज्यातील सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी सीएए, एनआरसी, एनपीआरविरूद्ध आंदोलने सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित शाहीन बाग आंदोलनात पूर्व आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान म्हणाले, शासनाने जनतेच्या मर्जीविरूद्ध तयार केलेल्या कोणत्याही नियम व कायद्याविरूद्ध शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा नागरिकांना संवैधानिक अधिकार आहे. या अधिकारावर प्रशासन दबाव टाकून रोखू शकत नाही. सध्याचे केंद्रातील सरकार हे मनुवादी व अहंकारी सरकार आहे. मागील 70 दिवसांपासून दिल्ली येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनस्थळी दूत पाठवून साधी चर्चाही सरकारला करावीसी वाटली नाही. हेच राज्यकर्ते संसदेमध्ये मुस्लिम महिलांच्या ट्रिपल तलाकच्या वेळी मात्र ढोंग आणून भाषण करीत होते. सरकार देशात जातीय अस्थिरता निर्माण करून नागरिकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकत्व दुरूस्ती कायदा व भविष्यात येणारा एनआरसी व एनपीआर कायद्याची  अंमलबजावणी सुरू होईल. जनता जेव्हा कागदपत्रे घेऊन रांगेत थांबेल तेव्हा याच आंदोलनाला ’भव्य जनआंदोलन’चे रूप येईल. ज्याप्रमाणे सरकारचा नोटाबंदीचा निर्णय फसला त्याच प्रमाणे हा कायदा सुद्धा सरकारचा चुकीचा ठरणार आहे. या कायद्यानुसार कागदपत्रे दाखविण्यापेक्षा या कायद्याचा विरोध करून प्रसंगी दंड भरू किंवा तुरूंगात जाऊ अशी ठाम भूमिका स्विकारणे हे आपल्यासाठी हितकारक आहे. सध्या सुरू असलेल्या आंदोलनाची इतिहासात नोंद होईल. शासनाने आंदोलकांचा अंत पाहू नये. नागरिकांचा एवढा विरोध लक्षात घेता तात्काळ कायदा मागे घ्यावा, अशी मागणीही अब्दुर रहमान यांनी केली.
देशात 40 टक्के लोक गरीब
देशात 40 टक्के लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांच्या शिक्षणाचा, रोजगाराचा व आरोग्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यात अपयशी ठरलेल्या शासनाने जाणीवर्वूक सीएए, एनआरसी, एनपीआर आणला आहे. हा कायदा देशातील नागरिकांना अस्थिर करणारा आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तात्काळ हा कायदा परत घेणे गरजेचे आहे. देशात कोट्यावधी तरूण हातात पदव्या घेऊन फिरत आहेत. त्यांना रोजगार नाही. जाती-धर्माच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करून सरकार मूळ मुद्दयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. सीएए कायदा लागू करण्यात आला आहे. यात सर्वच जाती धर्मातील लोक भरडले जातील. सामाजिक सलोखा ही आपली परंपरा आहे. यासाठीच मानवतावादी लोकांनी एकत्रित येऊन या कायद्याला कडाडून विरोध करावा असे आवाहनही अब्दुर रहमान यांनी लातूर येथील सभेत केले.

Delhi
शेवटी विद्वेषाची होळी पेटलीच. ही होळी पेटली असे म्हणणे अयोग्य ठरेल, ती पेटवली गेली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. यावेळी थेट देशाची राजधानीच यासाठी निवडण्यात आली.  होळी पेटवण्याचा दिवसही अगदी विशेष निवडण्यात आला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताच्या भेटीवर येण्याचा! होळी पेटवण्याची तयारी दिल्ली निवडणुकीच्या वेळीच सुरू करण्यात  आली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री, हिमाचल प्रदेशातील खासदार अनुराग ठाकूर ने ‘देश के गद्दारोन्को गोली मारो सालोंको’ ही जाहीर घोषणा निवडणुकीच्या काळात देऊन इंधनाची तयारी  करून ठेवली होती. त्याला अभिप्रेत असणारे गद्दार कोण हे सांगण्याची गरज नाही. अमित शहा यांनी पण अनेक भडकावू भाषणे केली. गिरीराज सिंग, आदित्यनाथ, संबित पात्रा यांचे  विषारी गरळ ओकण्याचे काम चालूच होते. याच काळात राजधानी दिल्लीतील शाहीन बागेत सी.ए.ए. विरोधात शेकडो लोग सत्याग्रह करीत होते. यात तहान-भूक, ऊन-थंडी यांची पर्वा न  करता रस्त्यावर ठाण मांडलेले आबाल वृद्ध मुस्लिमच नव्हते तर अनेकहिंदू अल्पसंख्याक, दलित, बहुजन आणि सुशिक्षित युवक युवती होते. बघता बघता ‘शाहीन बाग’ हा  सी.ए.ए.विरोधी आंदोलनाचा एक अहिंसक आणि प्रतिकात्मक चेहरा बनला.
देशाच्या कानाकोपऱ्यात‘शाहीन बाग’ आंदोलन उभे राहू लागले. फक्तआपल्या भवितव्यासाठी किंवा स्वत:च्या असुरक्षिततेच्या भीतीपोटी एखाद्या समाज समुहाने उभे केलेले हे आंदोलन  नव्हते. हे आंदोलन भारताचा आत्मा नष्ट करू पाहणाऱ्या संविधान विरोधी कायद्याच्या विरोधात उभे राहिले होते. देशाचे विभाजन आणि मतांचे ध्रुवीकरण करण्याचे षड्यंत्र भारतीय   जनता हाणून पाडीत होती. या आंदोलनाचा संयमी, राष्ट्रप्रेी, अहिंसात्मक, अराजकीय आणि धर्मनिरपेक्ष चेहरा हिंदुत्ववाद्यांना सलणारा होता. शाहीन बागेचा जालियानवाला बाग होणार  की काय अशी भीती त्याचवेळी वाटू लागली.
22 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्ली येथील जाफराबाद येथे 500 मुस्लिम महिला सी.ए.ए. विरोधात धरणे धरण्यासाठी तेथील मेट्रोच्या पुलाखाली बसल्या. भाजपाच्या कपिल मिश्रा नामक  नेत्याने आधीच ठासून भरलेल्या इंधनाला काडी लावण्याचे कार्य थंड डोक्याने केले. 39 वर्षीय हे महाभाग आपच्या उमेदवाराकडून गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. पण  मुळात त्यांची आई भाजपची नगरसेवक असताना आपचे बोटधरून ते राजकारणात आले. मोदी यांची थट्टा करीत आमदार म्हणून निवडून आले आणि केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात   कॅबिनेटमंत्री म्हणून स्थानापन्न झाले. पुढे त्यांनी केजरीवाल यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले. ‘आप’चे आमदार असताना भाजपाच्या व्यासपीठावर जायला सुरुवात केली, लोकसभा  निवडणुकीत भाजपचा प्रचार केला. यामुळे दिल्ली विधान सभेच्या सभापतींनी त्याचे सदस्यत्व रद्द केले. यानंतर त्याने भाजपामध्ये प्रवेश करून गेली विधानसभा निवडणूक लढवली  आणि पराभूत झाले. अशा या नेत्याने दिल्लीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 23 फेब्रुवारी 2020 रोजी पोलिसांनाच दम भरला की जाफराबाद आणि चांद बाग येथील आंदोलकांना  एकतर हाकला नाहीतर डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावरून परत जाताच आम्ही ते काम करू. आपल्या या भाषणाचा व्हिडिओ त्यांनी स्वत: ‘ट्विटर’वर टाकला. प्रत्यक्षात ट्रम्प जाण्याची  वाट न पाहताच या कामाची सुरुवात करण्यात आली. जाफराबाद मोकळे करण्यात येत आहे आणि आता पुन्हा दुसरी शाहीन बाग घडणार नाही असे ट्वीट त्याने टाकले. बघता बघता  दिल्ली पेटली. 48 माणसे गेली, त्यात एक पोलिस आणि एक आय.बी. अधिकारीही गेला. पोलिसावर तर गोळी झाडण्यात आली. अद्यापही हा गोळी झाडणारा आंदोलक सापडलेला नाही  (आणि तो सापडण्याची शक्यता नाही). शेकडो जखमी झाले, हजारो घरे आणि दुकाने जाळली गेली. पूर्व दिल्लीचे भाजपा खासदार गौतम गंभीर यांनाही कपिल मिश्राच्या भडक भाषणाचा  निषेध करावा लागला आणि अशा सर्व लोकांच्या अटकेची मागणी करावी लागली. दिल्ली जळत होती, माणसे मरत होती, पोलीस मूक आणि निष्क्रिय होते. काही ठिकाणी तर हिंदुत्ववादी गुंडांना मदत करीत होते. पोलीस दलाचे हिंदुत्वीकरण होत चालले आहे ही बाब अत्यंत घातक आहे.
हे घडत असताना ट्रम्प आणि परिवाराचे भव्य स्वागत करण्यात देशाचे पंतप्रधान मशगुल होते. मोदी यांनी सर्व राजनैतिक संकेत आणि सभ्यता झुगारून ह्युस्टन येथे ट्रम्प यांच्या  प्रचाराची सभा घेऊन ‘अब की बार ट्रम्प सरकार’असा  नारा काही महिन्यांपूर्वी दिला होता. भारतात येणाऱ्या राष्ट्र प्रमुख दर्जाच्या पाहुण्याचे स्वागत प्रथम देशाच्या राजधानीत करण्याचा  राज शिष्टाचार आणि संकेत असतो. तो झुगारून मोदी यांनी शेकडो कोटी रुपये खर्चून ट्रम्प यांचे अहमदाबादमध्ये भव्य स्वागत केले. अहमदाबाद नटवले, गरिबी झाकण्यासाठी उंच भिंती उभ्या केल्या. सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, उपाध्याय, मुखर्जी आणि अगदी सरदार पटेलही बाजूला सारून ट्रम्प पती पत्नींना सर्व प्रथम महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात  सुत कताईसाठी नेले. शेरे पुस्तकात बहुतेक गांधी नावाचे स्पेलिंग चुकण्याच्या भीतीने ट्रम्प यांनी मोदींचे नाव लिहिले. तेथून दोघेही ट्रम्प यांच्या अमेरिकेतील निवडणुकीच्या प्रचारासाठी  अहमदाबाद येथे आयोजित सभेसाठी जगातील सर्वात मोठे मोंतेरो क्रिकेट स्टेडीयमवर गेले. सव्वालाख मोदी-ट्रम्प प्रेमी तेथे जल्लोष करीत होते. अमेरिकेतील भारतीयांसाठी हा संदेश  होता. तेथून ट्रम्प सहपरिवार आग्रा येथील शाहजहान राजाने बांधलेला ताज बघण्यासाठी रवाना झाले. दिल्ली पेटू लागली होती. रात्री ट्रम्प दिल्लीत पोहोचले. दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी  राजघाटावरील गांधी समाधीला भेट दिली. अहिंसेच्या पुजाऱ्यावर ट्रम्प फुले वाहत होते आणि उत्तर-पूर्व दिल्ली हिंसेत होरपळत होती. ट्रम्प यांनी 70 बिलियन डॉलरचे करार पदरात  पाडून घेतले. हिंसेच्या आगीत माणसे मरत असताना राष्ट्रपती भवनात त्यांचे भव्य स्वागत झाले. राजेशाही थाटात त्यांना मेजवानी दिली गेली. राष्ट्रपती हा भारतीय प्रजासत्ताकाचा  घटनात्मक प्रमुख. भारतीय जनतेने त्यांना आपल्या घामातून दिलेल्या राजमहालात ही मेजवानी चालू असताना काही किलोमीटर अंतरावर आपल्या प्रजासत्ताकाचा आणि त्यातील  नागरिकांचा गळा घोटला जात असल्याचा त्यांना पत्ता लागला नव्हता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जगातील सर्वात बलाढ्य आणि धनाढ्य लोकशाहीचे प्रमुख. भारत हा जगातील सर्वात  मोठा लोकशाही देश. ही मेजवानी भारताच्या राजधानीत झोडत असताना भारतातील लोकशाहीचा गळा काही अंतरावर घोटला जात आहे याचे त्यांना वैषम्य नव्हते. हा भारताचा अंतर्गत  मामला होता. अमेरिकेतील भारतीय ‘बनिये’ आणि हिंदुत्ववादी यांची मते आणि व्यापारी करार पदरात पाडून घेणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. देशाचे गृहमंत्री दंगलग्रस्त भागाच्या  दिशेलाही फिरकले नाहीत. प्रचंड हिंसा आणि जाळपोळ झाल्यावर चार दिवसांनी पंतप्रधान मोदी जागे झाले.
हे सर्व घडत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, त्यांचे मंत्रीगण आणि 62 आमदार जनतेला, ‘आम्ही तुमच्या इतकेच असहाय्य आहोत असे सांगत होते.’ त्यांची असहाय्यता हेलावून टाकणारी होती. काँग्रेस सरकारला हटवायला आणि भाजपा सरकारला आणायला कारणीभूत ठरणारे त्यांचे लोकपाल आंदोलन आम्हाला आठवले. वास्तविक जनलोकपालाची त्यांची कल्पना ही एक फसवी लोकशाहीवादी आणि हुकुमशाही राजवटीच्या कल्पनेचे दुसरे रूप होती. या आंदोलनात संघ परिवार अत्यंत संशयास्पदरीत्या प्रचंड प्रमाणावर सामील झाला  होता. आंदोलनाच्या व्यासपीठावर अखंड भारताचा भारत मातेच्या रूपातील नकाशा झळकला होता. तिरंगा नाचवला जात होता. व्यासपीठावर वावरणारे अनेक नेते आंदोलन संपताच  भाजपात मोठी पदे पटकावून स्वगृही परतले. आंदोलनाचे अध्वर्यू ‘प्रति महात्मा गांधी’ अण्णा हजारे मौनीबाबा बनले. संघाला मदत होईल अशावेळी मौन सोडत राहिले. अयोध्या  निकालावर, सी.ए.ए., एन.आर.सी., एन.पी.आर.वर केजरीवाल यांनी मौन स्वीकारले. जे.एन.यु., जामिया मिलियामधील विद्यार्थ्यांच्या दिशेलाही ते फिरकले नाहीत. आपच्या  सुरुवातीच्या काळात ते उठल्यासुटल्या आंदोलने करीत. मुख्यमंत्री बनूनही रस्त्यावर येत. आपली जनता होरपळत असताना ते किमान आपले मंत्रिमंडळ आणि आमदार घेऊन दंगलग्रस्त  भागात घुसून शांततेचे आवाहन करीत हिंडू शकले असते. हे शक्य नाही तर केंद्राकडे तातडीने लष्कराला पाचारण करण्याचा आग्रह धरू शकले असते त्यांच्याच पक्षाचा माजी आमदार,  मंत्री आणि विद्यमान भाजपा नेता कपिल मिश्राच्या अटकेची मागणी करू शकले असते. कदाचित त्यांनी जनतेच्या रक्षणासाठी हनुमान चालिसाचे पठण केले असावे. आता ते  दंगलग्रस्तांवर मदतीचा वर्षाव करतील. इतर विरोधी पक्षांचे नेतेही जनतेला वाचविण्यासाठी पुढे आले नाहीत. गेलेले निष्पाप जीव परत येणार नाहीत, जळलेले संसार पुन्हा उभे राहणार   नाहीत आणि दिल्लीच्या सहिष्णूतेवर लागलेला डाग कधी पुसला जाणार नाही. 1984 साली दिल्ली मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेले ‘शिखांचे हत्याकांड’ हा डाग कधीच पुसला  गेला नाही.2002 सालच्या गुजरात दंगलीचा मोदी-शहा यांच्यावरील कलंक कधीच पुसला जाणार नाही. काँग्रेसच्या महापातकाच्या आड दडून भाजपाने या दंगलीचे समर्थन करून चालणार नाही.
भूतकाळात एखाद्या राजकीय पक्षाने केलेले हत्याकांड हे वर्तानातील एखाद्या राजकीय पक्षाच्या हत्याकांडाचा नैतिक आधार बनू शकत नाही. अर्थात दिल्ली ही ‘ये तो सिर्फ झांकी है,  काशी मथुरा बांकी है’ असे ठरणार नाही ना, अशी भीती आम्हाला वाटत आहे. भविष्यातील वंशछेदाची, हॉलोकास्टची ही नांदी ठरू नये. भाजपच्या एक नेत्याने कालच म्हटले आहे की,  देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत नाहीसे करू.
23 कोटी जनतेच्या शिरकाणाची ही भाषा व्यवहार्य आहे की नाही यापेक्षा अत्यंत घातक आहे हे विसरून चालणार नाही. एन.पी.आर. आणि एन.आर.सी. ही यासाठीची प्राथमिक फेरी  ठरू शकते. देशभर आंदोलने पेटून आणि बिहारासहित अनेकराज्यांनी नकार देऊनही मग्रूर अमित शहा अद्यापही मागे हटण्याची भाषा करीत नाहीत. फक्त मुस्लिम नाही तर कोट्यवधी अल्पसंख्याक हिंदूंच्या मनातही आपल्या भवितव्याची चिंता निमार्ण करणारी ही पावले आहेत. भारतीय राजकारणाला सत्ताधारी ज्या दिशेने नेत आहेत ती दिशा त्यांच्या मातृसंघटनेला,  संघाला जरी अभिप्रेत असली तरी ती राष्ट्रविघातक आहे, देशातील कोट्यवधी जनतेला ‘डिटेन्शन कँप’मध्ये सडायला लावणारी किंवा त्यांना दुय्यम नागरिकत्व देणारी आहे. जय श्री राम  किंवा भारत माता की जय किंवा जय भवानी जय शिवाजी या घोषणा अल्पसंख्याक जनतेच्या मनात हिंसेची भीती निर्माण करणाऱ्या ठरणे हा भारत नावाच्या विशाल हृदयी राष्ट्र  कल्पनेचा अंत आहे. क्रौर्य हा भारतीय प्रजासत्ताकाचा चेहरा बनू शकत नाही. भारतीय लोकशाहीचे सर्व स्तंभ ढासळत आहेत. न्यायव्यवस्थाही आता सत्ता धार्जिणी बनत आहे. द्वेषमूलक भाषणे करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांवर कारवाईचे आदेश देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुरलीधर या न्यायाधीशांची तातडीने बदली करण्यात आली. आता एकच मार्ग  शिल्लक आहे. या देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी धर्म बाजूला ठेवून एक व्हायला हवे. उघडी कृश छाती घेऊन अनवाणी पायांनी नौखालीचा ज्वालामुखी विझवणारा निधडा महात्मा गांधी  आज आपल्यात नाही. पण आपल्यातील प्रत्येक जण त्याचा अंश बनू शकतो आणि ज्वालामुखीची एक-एक ज्वाळा विझवू शकतो.
दिल्लीतील दंगल विझत आहे. ही दंगल पोलिसांनी विझवली नाही. लष्कर येण्याच्या आत ती विझली. जनतेने आपली सदसद्वविवेकबुद्धी चेतवून ती विझवली. अनेक हिंदूंनी मुस्लिमांचे  रक्षण केले, त्यांना आसरा दिला. काही मुस्लिमांनी देवळे वाचवली. मानवतेची हत्या करणे जमले नाही. पण ही मानवता हिंदू मुस्लिमांची एकी घडवेल आणि ही एकी हिंदू राष्ट्राच्या आड येणारी असेल. सर्व धर्मीय एकी भारत उभा करेल पण हिंदू राष्ट्र नाही. ज्यांना भारत नको आहे आणि हिंदुस्थान हवा आहे त्यांना दंगली हव्या आहेत. दिल्लीतील ही दंगल एका  भयानक वाटचालीची सुरुवात ठरू नये !

- डॉ.अभिजित वैद्य
puja.monthly@gmail.com

माननीय सौबान (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर प्रवासात होतो. इतक्यात पैगंबरांवर ‘‘वल्ल़जीना यकनि़जूऩज़्जहबा वल-फ़िज़्ज़ता.’’ ही आयत   अवतरित झाली, तेव्हा आमच्यापैकी काहींनी म्हटले, ‘‘सोन्या-चांदीचा साठा करण्याच्या बाबतीत ही आयत अवतरित झाली. यावरून ज्ञात होते की ते गोळा करणे चांगली गोष्ट नाही.  कोणती साधन-संपत्ती गोळा करणे योग्य आहे हे जर आम्हाला माहीत पडले असते तर आम्ही ती गोळा करून ठेवली असती.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘सर्वांत उत्तम खजिना अल्लाहचे  नामस्मरण करणारी जिव्हा आणि अल्लाहच्या कृतज्ञतेने भरलेले हृदय आणि सदाचारी पत्नी आहे जी ‘दीन’च्या मार्गावर चालण्यात पतीची साहाय्यक बनते.’’ (तिर्मिजी)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारे माहीत होते की मुखाने अल्लाहचे नामस्मरण करणे आणि नामस्मरण म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेसह केले जाणारे ईशनामस्मरण आणि हेदेखील माहीत झाले की आपल्या  धर्मश्रद्धाळू (दीनदार) पतीच्या संकटे व अडचणींमध्ये संयमाने राहणारी पत्नी धर्माच्या मार्गात आधार बनते. मार्गातील अडथळा बनत नाही, म्हणून खरोखरच अशी पत्नी अल्लाहची फार  मोठी कृपा आहे.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुमच्यापैकी प्रत्येकजण निरीक्षक व संरक्षक आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला विचारले जाईल  त्या लोकांच्या बाबतीत जे तुमच्या देखरेखीखाली असतील. शासकदेखील संरक्षक आहे आणि त्यालाही त्याच्या प्रजेलाविषयी विचारणा होईल आणि पती आपल्या कुटुंबियांचा संरक्षक आहे  आणि पत्नी आपल्या पतीचे घर आणि त्याच्या मुलांची संरक्षक आहे आणि सेवक आपल्या मालकाच्या संपत्तीचा संरक्षक आहे, तर मग तुमच्यापैकी प्रत्येकजण संरक्षक आहे आणि  तुमच्यापैकी प्रत्येकाला त्या लोकांच्या बाबतीत विचारले जाईल जे त्याच्या संरक्षणात होते.’’ (मुत्तफक अलैहि)

स्पष्टीकरण
या हदीसचा हा भाग विशेष लक्ष देण्यायोग्य आहे कारण स्त्री आपल्या पतीचे घर आणि त्याच्या मुलांची संरक्षक आहे. या हदीसवरून स्पष्ट होते की पती आपल्या पत्नीला फक्त  खाऊपिऊ घालण्यापुरताच जबाबदार नाही तर तिचा धर्म व नैतिकतेचे रक्षण व संरक्षण करणे त्याचीच जबाबदारी आहे. पत्नीची जबाबदारी दुप्पट आहे. ती पतीचे घर व संपत्तीची  संरक्षक असण्याबरोबरच त्याच्या मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची विशिष्ट जबाबदारीदेखील तिच्यावर आहे, कारण पती उपजीविका प्राप्त करण्यासाठी अधिकांश घराबाहेर राहतो आणि  घरात मुले आपल्या मातांकडेच असतात, म्हणून मुलांचे संरक्षण आणि शिक्षण-प्रशिक्षणाची आणखी एक जबाबदारी त्यांच्या आईवर पडते.

मुलाबाळांचे अधिकार
सईद बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘पिता आपल्या मुलाबाळांना जे काही देतो त्यापैकी सर्वोत्तम भेट म्हणजे त्याचे चांगले शिक्षण   व प्रशिक्षण होय.’’ (हदीस : जामिउल उसूल, मिश्कात) पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपली मुलेबाळे सात वर्षांची झाल्यास त्यांना नमाज अदा करण्याचा आदेश द्या आणि  जेव्हा ते दहा वर्षांचे होतील तेव्हा त्यांना नमाजकरिता मार द्या आणि या वयाचे झाल्यानंतर त्यांचे अंथरुण वेगळे करा.’’ (हदीस)

स्पष्टीकरण
या हदीसवरून स्पष्ट होते की मुले जेव्हा सात वर्षांची होतात तेव्हा त्यांना नमाजची पद्धत शिकविले आणि नमाज अदा करण्यास सांगितले पाहिजे आणि जेव्हा ते दहा वर्षांची होतील  आणि नमाज अदा करीत नसतील तर त्यांना मारदेखील दिला जाऊ शकतो. त्यांना हे समजाविले पाहिजे की तुमचे नमाज अदा न करणे आमच्या नाराजीचे कारण बनेल. या वयाला  पोहोचल्यानंतर मुलांचे अंथरुण वेगळे केले पाहिजे, अनेक मुलांनी एकाच बेडवर झोपू नये.

(९) आणि आम्ही दूत जरी अवतरला असता तरीदेखील त्याला मानवी रूपातच अवतरला असता आणि अशाप्रकारे यांना त्याच शंकेत गुरफटविले असते, ज्यात सध्या हे गुरफटलेले आहेत.७
(१०) हे पैगंबर (स.)! तुमच्या अगोदरदेखील कित्येक पैगंबरांचा उपहास केला गेला आहे, परंतु त्या  टवाळकी करणाऱ्या लोकांवर सरतेशेवटी तेच सत्य उलटल्याविना राहिले नाही ज्याचा  उपहास ते करीत होते.
(११) यांना सांगा, जरा पृथ्वीतलावर फेरफटका मारून पाहा, खोटे ठरविणाऱ्यांचा शेवट कसा झाला आहे.८
(१२) यांना विचारा, आकाशांत व पृथ्वीतलावर जे काही आहे ते कोणाचे आहे? - सांगून टाका, सर्वकाही अल्लाहचेच आहे,९ त्याने दया व कृपेची नीती स्वत:साठी अनिवार्य करून घेतली  आहे. (म्हणूनच तो अवज्ञा व उद्धटपणावर तुम्हाला लगेच पकडीत नाही.) पुनरुत्थानाच्या दिवशी तो तुम्हा सर्वांना अवश्य जमा करील. हे एक सर्वस्वी नि:संदिग्ध सत्य आहे. परंतु ज्या  लोकांनी आपणहून स्वत:ला विनाशाच्या धोक्यात टाकले आहे ते त्याला मानीत नाहीत.
(१३) रात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडात जे काही स्थिरावले आहे, सर्व अल्लाहचे आहे आणि तो सर्वकाही ऐकतो व जाणतो.
(१४) सांगा, अल्लाहला सोडून काय मी इतर कोणाला आपला पालक बनवू? त्या अल्लाहला सोडून जो आकाश व पृथ्वीचा निर्माता आहे. आणि तो उपजीविका देतो, उपजीविका घेत  नाही?१० सांगून टाका, मला तर हाच आदेश दिला गेला आहे की सर्वप्रथम मी त्याच्यापुढे आज्ञापालनार्थ मान तुकवावी, (आणि  ताकीद करण्यात आली आहे की कोणी अनेकेश्वरवादी  होत असेल तर होवो) तू कोणत्याही परिस्थितीत अनेकेश्वरवाद्यांत सामील होऊ नकोस.
(१५) सांगा, जर मी आपल्या पालनकत्र्याची अवज्ञा केली तर मला भय वाटते की एका मोठ्या (भयंकर) दिवशी मला शिक्षा भोगावी लागेल.
(१६) त्यादिवशी जो शिक्षेपासून वाचेल त्यावर अल्लाहने मोठीच दया केली. आणि हेच (उघड) स्पष्ट यश आहे.
(१७) जर अल्लाहने तुम्हाला एखाद्या प्रकारची हानी पोहोचवली तर त्याच्याशिवाय इतर असा कोणीच नाही जो तुम्हाला त्या हानीपासून वाचवू शकेल. आणि जर त्याने तुम्हाला एखाद्या  चांगल्या गोष्टीने उपकृत केले तर त्याला प्रत्येक गोष्टीचे सामथ्र्य प्राप्त आहे.
(१८) त्याला आपल्या दासांवर सर्वाधिकार प्राप्त आहे आणि तो बुद्धिमान व जाणकार आहे.


७) त्यांच्या आक्षेपांचे हे दुसरे उत्तर आहे. देवदूतांच्या प्रकट होण्याची प्रथम स्थिती ही असू शकत होती की तो लोकांसमोर आपल्या वास्तविक अनुभूतीरूपात प्रकट झाला असता परंतु  वर सांगितले गेले आहे की आता ती वेळ आलेली नाही. आता दुसरी स्थिती ही शिल्लक आहे की देवदूत मानवी रूपात यावा. याविषयी सांगितले गेले आहे की, जर देवदूत मानवी रूपात  आला तर त्याला अल्लाहने नियुक्त केले याबद्दल तुम्हाला तीच शंका येईल; जशी शंका तुम्हाला पैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाहने पाठविण्याविषयी येत आहे.
८) म्हणजे गतकालीन लोकसमुदायाच्या पुरातत्व आणि ऐतिहासिक कथानक साक्षी देतील की सत्य आणि वास्तविकतेला झुगारून दिल्याने आणि असत्यावरच ठाम राहिल्यामुळे यांना कशाप्रकारच्या भयानक परिणामांना सामोरे जावे लागले.
९) ही एक सूक्ष्म वर्णनशैली आहे. प्रथम आदेश झाला की यांना विचारा जमिनीवरील व आकाशातील वस्तू कोणाच्या आहेत? विचारणाऱ्याने त्यांना विचारले आणि उत्तरासाठी थांबून  राहिला. संबोधित माणसे या मताशी सहमत आहेत. ते स्वत:हून सांगतील की सर्वकाही अल्लाहचेच आहे. त्यांच्यात चुकीचे उत्तर देण्याचे साहस नाही की खरे उत्तरसुद्धा ते देऊ इच्छित   नाही. कारण सत्य उत्तर दिले तर त्यांना भीती आहे की प्रतिपक्ष याचा अनेकेश्वरत्व विचारसरणीविरुद्ध पुरावा म्हणून उपयोग करतील. म्हणून ते या कारणाने कोणतेच उत्तर देऊ इच्छितच नाहीत. तेव्हा आदेश होतो की तुम्ही स्वत: हून म्हणा की सर्वकाही अल्लाहचे आहे.
१०) यात एक सूक्ष्म व्यंग आला आहे. अनेकेश्वरवादी लोकांनी अल्लाहशिवाय ज्यांना ज्यांना आपला ईश्वर बनवून ठेवले आहे ते सर्व ईश्वर आपल्या दासांना उपजीविका पूरविण्याऐवजी  उलटी त्यांच्याकडूनच उपजीविका प्राप्त् करण्यास बाध्य आहेत. एखादा फिरऔन ईशत्वाचा थाठ तोपर्यंत जमवू शकत नाही जोपर्यंत त्याला त्याचे दास कर आणि नजराणे देत नाहीत.  एखादे थडगे पूजनिय तेव्हाच बनते जेव्हा त्याचे उपासक त्या थडग्यावर भव्य घुमट बांधतात. एखाद्या देवीदेवतेचा दैवी थाट तोपर्यंत सजू शकत नाही जोपर्यंत त्याचे पुजारी त्याची मूर्ती   बनवून एखाद्या भव्य मंदिरात ठेवत नाहीत आणि तिला चांगल्या प्रकारे साजसज्जेच्या सामग्रीने सजविले जात नाही. अशाप्रकारचे सर्व बनावटी (नकली) ईश्वर स्वत: आपल्या दासांचे  (भक्तांचे) मुहताज (आश्रित) आहेत. परंतु विश्वात एकमात्र विश्वात्मक अल्लाह असा वास्तविक ईश्वर आहे ज्याचे ईशत्व (खुदाई) स्वयंभू आहे. तो कोणाच्याही मदतीचा मुहताज नाही उलट सर्व त्याचेच आश्रित (मुहताज) आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौरा गेल्या आठवड्यात दिल्लीतील हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीत पार पडला. अमेरिकेने भारतासोबत संरक्षण व सुरक्षा, व्यापार  व ऊर्जा क्षेत्रासंदर्भात तीन करार केले आहेत. संरक्षणाचा सुमारे तीन अब्ज डॉलरचा करार घोषित करण्यात आला तर व्यापाराबाबत चर्चा सुरू असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार   आहे, असे म्हटले जाते. आता ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आहेत. भारतातून अमेरिकेत जाऊन मतदार झालेल्यांची संख्या जास्त आहे. ट्रम्प यांना त्यांच्या मतांची  गरज आहे. त्यासाठीही ते भारतात येऊन गेले. खरे तर कोणत्याही देशाचा राष्ट्रप्रमुख भारतात आला तर तो एक तर दिल्लीत जायचा किंवा मुंबईत पायधूळ झाडायचा. पंतप्रधान  झाल्यापासून मात्र मोदी यांनी भारत भेटीवर येणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना अहमदाबादला नेण्याचा सपाटा लावला आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान सप्टेंबर २०१९ मध्ये स्थगित झालेला  व्यापारविषयक संवाद पुन्हा सुरू होणे ही एक स्वागतार्ह बाब आहे. दोन्ही देशांमध्ये स्वदेशी वस्तूंसाठीचा आग्रह वाढत असल्यामुळे तणाव आणखी वाढत आहे. भारत सरकार किंमत   नियंत्रणाचे नियम थोडे शिथिल करू शकते; परंतु किमतींवरचे नियंत्रण पूर्णपणे सोडू शकत नाही. भारतासाठी अमेरिका हा एक महत्त्वाचा गुंतवणूकदार आणि थेट परकीय गुंतवणुकीचा  मुख्य स्रोत आहे. व्यापार करार पक्का झाला तर आपण गुंतवणूक कराराकडे वळू शकतो. भारताने जपान आणि अन्य काही देशांबरोबरचे अंशत: व्यवहार रुपयांत करण्याचा निर्णय  घेतला आहे. अशाच प्रकारे आपल्या चलनाला प्रोत्साहन देत राहिल्यास डॉलरच्या मक्तेदारीला शह दिला जाईल आणि रुपयाचे अवमूल्यन थांबण्यास मदत होईल. परिणामी, अमेरिकेच्या  दबावाचा सामना करणे सोपे जाईल. जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारी अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा चीन यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून  व्यापारयुद्ध सुरू आहे. हे युद्ध लवकर संपण्याच्या शक्यता दिसत नाही. अर्थात या युद्धाला सामरीक, भूराजकीय कोनही आहेत. या युद्धामुळे चीनकडून अमेरिकेला होणारी निर्यात कमी  होणार असल्याने भारताला एक प्रकारे संधीही आहे; पण भारताबाबतही ट्रम्प असा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीन-अमेरिका यांच्यामध्ये जशी व्यापार तूट आहे तशीच  ती अमेरिका आणि भारत यांच्या व्यापारातही आहे. भारत आणि अमेरिकेचा एकूण व्यापार सुमारे १०० अब्ज डॉलर असून त्यामध्ये व्यापार तूट २० अब्ज डॉलर्स इतकी आहे. चीनशी  असलेले व्यापार युद्ध संपल्यावर ट्रम्प भारताकडेही वक्रदृष्टी टाकतील का? भारतावरही असा दबाव टाकतील का? तशी शक्यता मात्र कमी आहे. कारण चीनशी असलेल्या व्यापारयुद्धाला  सामरिक आणि आर्थिक आधार आहे तसा भारताबरोबरच्या व्यापाराला नाही. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारातील तुटीइतकी भारताबरोबरच्या व्यापारातील तूट मोठी नाही. दुसरी गोष्ट  म्हणजे चीनचा आर्थिक विकास आणि लष्करी विकास हा अमेरिकेच्या हितसंबंधांच्या विरोधात जाणारा आहे. भारताच्या बाबतीत असा प्रकार नाही. भारत अमेरिकेकडून शस्त्रास्रांची मोठी  आयात करतो. अलीकडेच भारताने ५ अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांचे करार केले आहेत. यामागे व्यापारतूट कमी करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे चीनवर ज्या तीव्रतेने दबाव टाकला जात  आहे तितका भारतावर पडण्याच्या शक्यता कमी आहेत. असे असले तरी डोनाल्ड ट्रम्प हे अचानक धक्कादायक निर्णय घेणारे असे राष्ट्राध्यक्ष म्हणून जगभरात ओळखले जातात.  त्यामुळे भारताने याबाबत तयारी ठेवणे गरजेचे आहे. इराणवर निर्बंध आणल्यानंतर भारताने अमेरिकेच्या आग्रहाखातर इराणकडून तेलआयात पूर्ण थांबवली. यानंतर भारताने इतर देशांकडून तेलाची आयात करण्याची सुरूवात केली आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपल्याला सर्वाधिक वाटा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या अमेरिकेच्या पारंपरिक राष्ट्रवादी परराष्ट्र  धोरणाला चालना देणाऱ्याच आहेत. या ठाम अर्थानेच ट्रम्प या सगळ्या घडामोडींकडे पाहात आहेत. एकीकडे ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येण्यासाठीची मोहीम  अगदी धारधारपणे सुरू केली आहे. अशा रितीने रुढीवादी राष्ट्रीयत्वाच्या धोरणातून जी अमेरिका चीनसोबतच्या आजवरच्या व्यापारी धोरणांमुळे, तसेच चीनच्या व्यापार पद्धतींमुळे  अमेरिकेला नुकसान झाले आहे असा दावा करत आहे. पण, दुसरीकडे भारताचे विकसनशील देशाचे स्थान नाकारून, भारताला त्यापासून मिळणारे लाभ मिळू नयेत यासाठीचे प्रयत्न मात्र करते आहे. ट्रम्प यांचे प्रशासन अमेरिका-चीन व्यापार युद्धाची भीती दाखवू लागले आहेत. यातून ते पुन्हा पारंपरिक राष्ट्रवादाचा वापर करून आजवर चीन अमेरिका व्यापारात निर्माण  झालेली तफावत दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजुला भारतासारख्या नव्या भागिदारासोबत, ‘अमेरिका फस्र्ट’ हे धोरण राबवण्याचा अर्थ म्हणजे,  जागितक व्यापारविषयक व्यवस्थेत चीनसोबतचे व्यवहार करताना कोणत्याही आर्थिक सुधारणांची आवश्यकता न वाटून घेता, अमेरिकेच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न  केला जात असल्याचे म्हणावे लागेल.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget