भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलि यात प्राप्त केलेल्या मालिका विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांमध्ये नवोदित मोहम्मद सिराजचा समावेश होता. शमी जखमी झाल्यामुळे मेलबर्नमध्ये पदार्पणाची संधी मिळालेला सिराज ब्रिस्बेन कसोटीपर्यंत संघाचा प्रमुख गोलंदाज झाला होता.
मात्र, सिराजने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष जसे वेधून घेतले, तसेच सिडनी कसोटी दरम्यान झालेल्या वांशिक टिप्पणीविरोध्-ाात ठाम भूमिका घेतल्यामुळेही तो सगळ्यांच्या कौतुकाला पात्र ठरला. या घटनेवर ऑस्ट्रेलि यातील आणि भारतातील माध्यमांनी सडकून टीका केली. शिवीगाळ ऐकून घेण्यास सिराजने दिल ेल्या नकारामुळे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याची प्रशंसा केली. सिराजच्या भूमिकेचे कौतुक करणाऱ्यांमध्ये भारताचा तसेच मुंबईचा माजी सलामीवीर वसीम जाफरचाही समावेश होता. भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अख्यायिकेचे स्थान प्राप्त केलेला जाफरला अलीकडील काळात सोशल मीडियावरील विनोदी पोस्ट्समुळे नवीन चाहतावर्ग लाभला आहे. सिराजवर झाल ेल्या वांशिक टिप्पणीवर प्रतिक्रिया म्हणून जाफरने शाहरुख खानच्या एका चित्रपटातील लोकप्रिय संवादाची टेम्प्लेट वापरणारे मिम ट्विट केले होते. जाफरचा उद्देश वंशवाद व त्यावरून होणाऱ्या टिप्पणीवर टीका करण्याचाच असला, तरी सध्या जागतिक समस्या म्हणून स्वीकारल्या गेलेल्या बाबीतून भारतीय समाजाला वगळण्याचा संदेशही यातून जात होता. भारतीय समाजाला वंश, वर्ण, जात आणि समुदायावरून केलेल्या भेदाची सवय झालेली आहे असा अर्थ यातून निघत होता. जाफरने कदाचित अजाणतेपणी एका चुकीच्या समजाला उत्तेजन दिले होते.
यातील काहीच फार स्मरणात ठेवावे असे नाही. जाफर स्वत:च ‘नवभारता‘चे वैशिष्ट्य होऊ बघणाऱ्या विद्रुप कट्टरतेचा बळी ठरला आहे. उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाचा राजीनामा त्याने दिला आणि नंतर लगेचच तो संघाच्या संस्कृतीला धार्मिक रंग देत होता, असा दावा करणाऱ्या बातम्या येण्यास सुरुवात झाली. जाफर संघनिवडीत धार्मिक निकषांवर पक्षपात करत असल्यापासून त्याने ड्रेसिंग रूममध्ये नमाज पढण्यासाठी मौलवींना निमंत्रण दिल्यापर्यंत अनेक प्रकारचे आरोप उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिव महीम वर्मा आणि संघ व्यवस्थापक नवनीत मिश्रा यांनी केले.
संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या घोषणांचे ‘सेक्युलरायझेशन’ करण्याचा आग्रह जाफरने धरल्याचा दावाही अनेक बातम्यांमध्ये करण्यात आला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाफरने प्रत्येक आरोप ठामपणे फेटाळला आणि त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही स्पष्टीकरण दिले.
भारतासाठी ३१ कसोटी सामने खेळलेल्या जाफरसारख्या क्रिकेटपटूला अशा खोडसाळ आरोपांपासून स्वत:चा बचाव करावा लागतो या प्रकरणातून त्याचा धर्म वेगळा करताच येणार नाही. हे आरोप केवळ त्याच्या व्यावसायिक निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे नाहीत, तर इस्लामचे आचरण करणारी व्यक्ती कधीच आपल्या कर्तव्याला धर्माहून अधिक महत्त्व देऊ शकत नाही असा अर्थ या आरोपांतून निघत आहे.
राजकारण आणि चित्रपटसृष्टीतील मुस्लिमांवर असे वार आत्तापर्यंत कोणत्या ना कोणत्या कारणाने होत आले आहेत पण क्रिकेटविश्वाला आत्तापर्यंत या विचारसरणीची झळ फारशी बसली नव्हती. मात्र, भारताचे प्रतिनिधित्व करणारे मुस्लिम क्रिकेटपटू बहुसंख्याकांनी घालून दिलेल्या ‘चांगल्या मुस्लिमां’च्या साच्यात बसण्याचा प्रयत्न करत होते हे वास्तव यात नाकारता येणार नाही. प्रसिद्ध मुस्लिमांनी राष्ट्रीय विचाराला अधीन राहावे आणि आपला धर्म खासगीत पाळावा, मग आम्ही त्यांचे कौतुक करू, अन्य मुस्लिमांना त्यांचे उदाहरण देऊ, हा बहुसंख्य हिंदूंनी घाल ून दिलेला साचा. मग यात हिंदू परंपरा आम्हाला कशा आवडतात याचे सार्वजनिक प्रदर्शन करणे आले, हिंदू धर्माच्या सहिष्णुतेचा लाभ मुस्लिमांना कसा होतो हे स्वीकारणे आले आणि अधूनमधून पाकिस्तानवर तोंडसुख घेणे आल े. या मागण्या पूर्ण करणाऱ्यांना आदर्श मुस्लिम म्हणून प्रमाणपत्र दिले जाते. एपीजे अब्दुल कलाम यांच्या साच्यात बसणारे ते आदर्श मुस्लिम. भारतातील मुस्लिम क्रिकेटपटू या अपेक्षांची पूर्तता करत आले आहेत. मुस्लिम समाजाच्या सामाजिक-राजकीय समस्यांवर यातील एकानेही सार्वजनिक व्यासपीठावर भाष्य केलेले नाही. आपली धार्मिक ओळख फार ठळक असू नये हे बहुतेकांनी स्वीकारले आहे. लिंचिंग असो, संघटित हिंसाचार असो किंवा मुस्लिमांना लक्ष्य करून संमत करवून घेण्यात आलेले कायदे असोत, मुस्लिम क्रिकेटपटूंनी त्यावर मुस्लिमधर्मीय म्हणून टिप्पणी करणे टाळले आहे. त्यांनी फार तर काय केले, भारतीयांच्या विवेकबुद्धीला पटेल, राष्ट्रवादी भूमिका दिसेल या बेताने ते व्यक्त झाले. भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने याचा अनुभव घेतला आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना पठाण सर्वांत वलंयाकित क्रिकेटपटूंमध्ये होता. २०१२ साल ी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचारामध्ये त्याला सहभागी करून घेण्यात आले होते. अर्थात पठाणने तेव्हापासून मोठा प्रवास केला आहे. आज तो वाढत्या कट्टरतेवर सार्वजनिक व्यासपीठांवरून टीका करायला अजिबात कचरत नाही. आपली टिप्पणी ‘अराजकीय’ राहील याबाबत तो बरीच काळजी घेत असला तरी ही काळजी त्याला अत्यंत वाईट अशा इस्लामविरोधी ट्रोलिंगपासून वाचवू शकलेली नाही. पठाण आता बहुसंख्याकांच्या निकषांनुसार ‘चांगला मुस्लिम’ राहिलेला नाही.
भारताच्या सर्वोत्तम वेगवान गोल ंदाजांपैकी एक झहीर खान मात्र त्याच्या समुदायाच्या अवस्थेकडे अनेक वर्षांपासून काणाडोळा करत आला आहे. २००४ सालातील भारताच्या पाकिस्तान दौऱ्यात तर त्याने एक पाऊल पुढे टाकत शिवसेनेचे तत्कालीन प्रमुख आणि धार्मिक कट्टरतावादाचे पुरस्कर्ते बाळ ठाकरे हे ‘मिसअंडरस्टूड’ नेते आहेत असे विधानही केले. बहुसंख्याकांना सुखावण्यासाठी केलेल्या खुशामतीचे याहून मोठे उदाहरण सापडणे कठीण आहे. आणि तरीही त्यानंतर अनेक वर्षांनी झहीर खान अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्न करणार हे नक्की झाल्यानंतर हिंदुत्ववाद्यांच्या परिसंस्थेने ‘लव्ह जिहाद’चा आरोप त्याच्यावर करण्यास मागेपुढे पाहिले नाही.
तरीही जाफरला जे काही भोगावे लागत आहे ते झहीर आणि पठाणच्या तुलनेत अधिक अवमानकारक आहे, कारण, भारतीय मुस्लिमांना समाजात वावरण्यासाठी जो काही साचा बहुसंख्याकांनी घालून दिला आहे, त्या साच्याबाहेर जाफर एकदाही कृती किंवा शब्दांद्वारे पडला नव्हता. मात्र, जेव्हा धक्का देण्याची वेळ आली तेव्हा त्याची ओळख ही पुरेशी होती, कदाचित त्याहूनही अधिक होती. झहीर-पठाणवर खोडसाळ टिप्पण्या किंवा धार्मिक विद्वेषाचा सूर उमटवणारे नाव किंवा चेहरा नसलेले ट्रोल्स होते, जाफरच्या बाबतीत हे काम महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी केले आहे. आत्तापर्यंत व्हॉ ट्सअॅप ग्रुप्सपर्यंत मर्यादित असलेली कट्टरता आता सार्वजनिक झाली आहे आणि कल्पनातीत वेगाने ती सामान्य म्हणून स्वीकारली जाऊ लागली आहे.
‘भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी रचलेल्या आंतरराष्ट्रीय कटा‘विरोधात सरकारचे रक्षण करण्यासाठी भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांनी एकाच मजकुराचे ट्विट्स पोस्ट केल्याच्या लज्जास्पद घटनेला जेमतेम आठवडा उलटला आहे. त्यावेळी या दिग्गजांनी भारत सरकारची पाठराखण करण्यात जी लगबग दाखवली होती, ती खऱ्या अर्थाने त्यांच्यातील एका क्रिकेटपटूला पाठिंबा देण्यासाठी नक्कीच दाखवली गेलेली नाही. या दिग्गजांपैकी केवळ अनिल कुंबळेने जाफरच्या ट्विटला नाममात्र प्रतिसाद दिला, तोही या मुद्दयाच्या खोलात न शिरता. इरफान पठाण आणि दोड्डा गणेश व मनोज तिवारी या देशांतर्गत क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटूंनीही जाफरला पाठिंबा दिला. मात्र, स्टार क्रिकेटपटूंनी बाळगलेले मौन पुरेसे बोलके आहे. बीसीआयआयने या प्रकरणाची अद्याप दखल घेतलेली नाही. आणि अडचणीत आणणाऱ्या वास्तवांना सामोरे जाण्याचा त्यांचा इतिहास बघता, जाफरला एकट्यानेच लढावे लागणार हे नक्की.
मुस्लिमधर्मीयाने बहुसंख्याकांची मान्यता मिळवण्यासाठी पूर्ण करणे आवश्यक असलेला प्रत्येक सांस्कृतिक निकष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नुकत्यात झालेल्या राज्यसभेतील निरोपाच्या भाषणातून, दृढ झाला आहे. त्यांनी भारतात जन्मल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, भारत अल्पसंख्याकांसाठी सर्वांत सुरक्षित जागा आहे असे जाहीर केले, धार्मिक वैविध्य भारतात स्वाभाविक बाब आहे असे ते म्हणाले, आणि अर्थातच पाकिस्तानचे तोंड बघावे लागले नाही याबद्दल स्वत:ला नशीबवान समजत असल्याचे सांगितले. मुस्लिम धर्मामुळे खुद्द काँग्रेस सहकाऱ्यांकडून वाळीत टाकल्याची वागणूक मिळते अशी खंत आझाद यांनी दोनेक वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. ती केली नसती तर कदाचित त्यांनी भारताचे रंगवलेले हे देखणे चित्र खरे भासले असते. आझाद यांचे पक्षसहकारी आणि भारताचे माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी नवभारतात मुस्लिमांना वाटणाऱ्या भीतीबद्दल भाष्य केल्यानंतर माध्यमांनी त्यांना कसे झोडपले होते हे आठवून बघा.
कारण, एका मर्यादेपलीकडे जेव्हा बहुसंख्याक आपले वर्चस्व दाखवण्यास सुरुवात करतात, तेव्हा अल्पसंख्याकांचे यश, योगदान हे सगळे पुसले जाते. ‘चांगला मुस्लिम’ म्हणवले जाण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केले तरी बहुसंख्याकवादापुढे ते व्यर्थ असतात.
कारण, एका मर्यादेपलीकडे ‘चांगले‘ असणे पुरेसे ठरूच शकत नाही.
(सौजन्य : द वायर)

Post a Comment