Halloween Costume ideas 2015
Latest Post


प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की तुमच्यातील जे लोक अल्लाह आणि परलोकावर श्रद्धा ठेवतात त्यांनी पाहुण्यांचा आदर करावा. पाहुणचाराची मुदत एक दिवस आणि एक रात्र इतकी आहे. आणि सामान्यतः ही मुदत तीन दिवस आहे. त्यानंतर बाकी सर्व दान दिल्यासारखे असणार. पाहुण्याने इतके दिवस थांबू नये ज्यामुळे ज्यांच्या घरी तो थांबला असेल त्यांना त्रास व्हावा. (ह. अबू शुरैह र., अदबुल मुकर्रद)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की तुमच्याकडील गुलाम आणि सेविका तुमचे भाऊ-बहिणींसारखे आहेत ज्यांना अल्लाहने तुमचे साहाय्यक बनवले आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे गुलाम, सेविका असतील त्यांनी स्वतः जे खातात तेच अन्न त्यांना द्यावे, जी वस्त्रे तुम्ही परिधान करता तसेच कपडे त्यांना द्यावेत आणि त्यांच्याकडून असे कोणते काम करून घेऊ नये जे त्यांच्या सामर्थ्यापलिकडचे असेल. गरज पडली तर स्वतःदेखील त्यांना मदत करावी. (ह. अबू जर र., बुखारी, मुस्लिम, मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या तोंडातून त्यांच्या मृत्यूसमयी शेवटचे शब्द हे होते. "नमाज, नमाज आणि जे तुमचे साहाय्यक आहेत त्यांच्या बाबतीत अललाहची भीती बाळगा." (ह. अली र., अदबुल मुकर्रद)

ह. मसअब बिन उमैर यांचे बंधू अजीज बिन उमैर म्हणतात की, मी बदरच्या युद्धातील कैदींमधला एक कैदी होतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ताकीद दिली की कैद्यांशी चांगला व्यवहार करा. मी अन्सार लोकांच्या अधीन होतो. ते लोक सकाळचे आणि रात्रीचे जेवण मला देत होते. ते स्वतः खजुरीवर गुजरान करायचे आणि मला भाकरी वगैरे खायला देत. (तिबरानी)

प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की अल्लाह अशा समूहाला पावित्र्य प्रदान करत नाही ज्या समूहातील दुर्बल घटकांना त्यांचे अधिकार दिले जात नसतील. (मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की सारी निर्मिती अल्लाहची संतती आहे आणि मानवांमधील अशी व्यक्ती अल्लाहला सर्वांत जास्त आवडते जो दुर्बल, निराधार आणि वंचितांशी उत्तम प्रकारे व्यवहार करतो. त्यांच्याशी भलाईने वागतो. (ह. अनस र. आणि ह. अब्दुल्लाह र., बैहकी, मिश्कात)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की भाग्यवान मुस्लिमाची ओळख अशी की- (१) ज्याच्याकडे प्रशस्त घर असावे, (२) त्याचा शेजारी चांगला असावा आणि त्याच्याकडे स्वारीसाठी वाहन असावे. (ह.. राफे र., अदबुल मुफर्रद)

संकलन 

- सय्यद इफ्तिखार अहमद



(३३) मग काय तो जो एक एक जीवाच्या कमाईवर नजर ठेवतो५० (त्याच्या विरोधात हे दु:साहस केले जात आहे की५१ लोकांनी त्याचे काही भागीदार ठरविले आहेत? हे पैगंबर (स.)! यांना सांगा, (जर खरोखर ते अल्लाहने स्वत: बनविलेले भागीदार आहेत तर) जरा त्यांची नावे घ्या की ते कोण आहेत? काय तुम्ही अल्लाहला एका नव्या गोष्टीची माहिती देत आहात जिला तो आपल्या पृथ्वीत जाणत नाही? अथवा तुम्ही लोक असेच तोंडात जे काही येते ते सांगता?५२ वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांनी सत्य आवाहन स्वीकारण्यास नकार दिला आहे, त्यांच्याकरिता त्यांच्या कुटिलतांना५३ आकर्षक बनविले गेले आहे आणि ते सरळमार्गापासून रोखले गेले आहेत.५४ मग ज्याला अल्लाह पथभ्रष्टतेत राहू देतो त्याला कोणी मार्ग दाखविणारा नाही.

(३४) असल्या लोकांसाठी जगातील जीवनातच यातना आहेत आणि परलोकातील यातना याहूनही कठोर आहेत. कोणीही असा नाही की जो त्यांना अल्लाहपासून वाचविणारा असेल.

(३५) ईशपरायण माणसांसाठी ज्या स्वर्गाचे वचन दिले गेले आहे त्याचे वैभव असे आहे की त्याच्या खालून कालवे वाहत आहेत, त्याची फळे चिरंतन आहेत, आणि त्याची सावली अनश्वर. हा शेवट आहे पापभीरु लोकांचा आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांचा शेवट असा आहे की त्यांच्याकरिता नरकाग्नी आहे.


५०)म्हणजे जो एक एक व्यक्तीच्या स्थितीला पूर्ण जाणून आहे आणि त्याच्या नजरेतून सदाचारी माणसाचा एकही सदाचार लपलेला नाही की दुराचारीचा दुराचार.

५१)दुस्साहस हे आहे की त्याच्या समकक्ष बनविले जात आहे. त्याच्या अस्तित्वात, गुणात आणि अधिकारात त्याने निर्मित केलेल्या वस्तूंना भागीदार ठरविले जात आहे. याच्या ईशत्वात राहून लोक समजतात की आम्हाला जसे वाटेल तसे आम्ही करू, आम्हाला विचारणारा कोणीही नाही.

५२)म्हणजे त्याचे भागीदार जे तुम्ही बनविले आहेत, त्यांच्याविषयी तीन मार्ग शक्य आहेत. 

एक म्हणजे तुमच्याजवळ एखादी प्रामाणिक सुचना आली असेल की अल्लाहने अमुक अमुक अस्तित्वांना आपल्या गुणांत, अधिकारात किंवा हक्कांमध्ये भागीदार बनविले आहेत. ही जर स्थिती आहे तर कृपया आम्हालाही दाखवावे की ते कोणते लोक आहेत जे अल्लाहचे भागीदार आहेत आणि याची सूचना आपणास कोणत्या माध्यमाद्वारे पोहचली? 

दुसरी स्थिती म्हणजे अल्लाहला स्वत: खबर नाही की पृथ्वीवर काहीजन त्याचे भागीदार बनलेले आहेत. आता आपण ही खबर अल्लाहला देण्यास निघाले आहात! जर हे असे आहे तर स्पष्टपणे आपल्या स्थितीचा स्वीकार करा. मग आम्हीसुद्धा पाहून घेऊ की जगात असे किती मूर्ख निघतात जे तुमच्या या अगदी निरर्थक पद्धतीवर टिकून राहतात. 

जर या दोन्ही स्थिती शक्य नाहीत तर तिसराच प्रकार शिलल्क राहातो. तो म्हणजे तुम्ही विनाप्रमाण आणि विनातर्काचे ज्याला इच्छिता त्याला अल्लाहचा नातलग ठरविता, अल्लाहचा नातेवाईक ठरविता. ज्याला इच्छिता त्याला दाता आणि दु:खहर्ता ठरविता. तुम्ही एखाद्याला अल्लाहच्या जवळचा ठरवून त्याच्या प्रशस्तीपत्रावर तुमचे काम फत्ते होते असे समजू लागता.

५३)या अनेकेश्वरत्वाला `कुटिलता' (मक्कारी) म्हणण्याचे कारण म्हणजे ज्या ग्रहांना, फरिश्त्यांना, आत्म्यांना किंवा बुजुर्ग माणसांना ईशगुणांत आणि अधिकारांचे धारक ठरविण्यात आले आहे आणि ज्यांना अल्लाहच्या विशेष हक्कांत भागीदार बनविले गेले आहे, त्यांच्यापैकी कोणीही या गुणांचा आणि अधिकारांचा दावा केलेला नाही. तसेच त्या हक्कांची मागणीसुद्धा केली नाही आणि लोकांना अशी शिकवण दिली नाही की तुम्ही आमच्यापुढे उपासनांचे विधी पार पाडीत राहावे, आम्ही तुमचे काम पूर्ण करीत जाऊ व तुमच्या प्रार्थना ऐकत जाऊ. हे सर्व धूर्त आणि चालाक माणसांचे काम आहे ज्यांनी सर्वसामान्यांवर आपल्या प्रभुत्वाचा शिक्का उमटविण्यासाठी आणि आपली कमाई वाढविण्यासाठी काही बनावटी ईश्वर बनवून टाकले. तसेच लोकांना त्या बनावटी ईश्वरांचे अनुयायी बनवून टाकले आणि स्वत:ला त्या बनावटी ईश्वरांचा प्रतिनिधी ठरवून आपले उखळ पांढरे करू लागले. अनेकेश्वरत्वाला धोकेबाजी म्हणण्याचे दुसरे कारण आहे की हा खरे तर मनाचा एक धोका आहे. तो एक चोरदरवाजा आहे ज्याद्वारे मनुष्य भौतिकतेसाठी, नैतिक बंधनापासून मुक्त आणि अनुत्तरदायित्वपूर्ण जीवन जगण्यासाठी पळवाट काढतो. तसेच अनेकेश्वरत्वाला धोका (मक्कारी) म्हणण्याचे तिसरे कारण पुढील आयतीमध्ये स्पष्ट होत आहे.

५४)ही मानवप्रकृती आहे की जेव्हा मनुष्य एका वस्तूऐवजी दुसरी वस्तू त्याच्या मुकाबल्यात स्वीकारतो तेव्हा आपल्या मनाला संतुष्ट करण्यासाठी तसेच लोकांना आपले सत्यच आहे हे पटविण्यासाठी तो प्रमाण पुढे करतो आणि स्वत: रद्द केलेल्या वस्तूविरुद्ध अनेकानेक गोष्टी रचतो. याच कारणाने सांगितले गेले की जेव्हा त्यांनी सत्यसंदेश स्वीकारण्यास नाकारले तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्यासाठी त्यांची मार्गभ्रष्टता आणि त्या मार्गभ्रष्टतेवर कायम राहाण्यासाठी त्यांची मक्कारी (धोका) शोभनिय बनविली गेली. तसेच स्वाभाविकपणे त्यांना सरळमार्गावर येण्यास रोखले गेले.



नाशिक (शकील शेख, येवला)

दिनांक 29/01/2023 रोजी मुंबई येथे काढण्यात आलेल्या हिंदू जागर मोर्चा मध्ये सामील असलेले अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मुस्लिम धर्माच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न केला तसेच सर्व धर्मीयांचे आदरस्थान असलेले अजमेर येथील सुफी संतख्वाजा गरीब नवाज यांच्याविषयी अपमानजनक शब्दांचा वापर केला तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुखी मुस्लिम द्वेष शब्द टाकून संविधानाचे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सुद्धा अपमान करण्याचा धार्मिक द्वेष मनात ठेवून हिंदू मुस्लिम दंगल लावण्याचे हेतूने विकृत मानसिकेतून द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

जवळच्याच काळात माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे हेट स्पीच देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहे. तसेच भारतीय संविधानानुसार धार्मिक द्वेष निर्माण करणे महापुरुषांचा अपमान करणे अशा प्रकारचा गुन्हा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दाखल करण्यात यावा असे निवेदन मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र यांच्या मार्फत भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक यांना देण्यात आले.

त्या वेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अजीज पठाण, रशीद चांद, मुखतार शेख, इब्राहिम अत्तार, ईमरान तांबोळी, अकील खान, रफिक साबीर, फिरोज मंसुरी व सकल मुस्लिम युवक महाराष्ट्राचे नाशिक शहर संघटक फहिम शेख हे उपस्थित होते.



"मन चिंती ते वैरी न चिंती" यांसारखे वाक्प्रचार ही आपण नेहमीच वापरतो.

"Worry is the most subtle & destructive of all human diseases." -Norman Vincet Peale.

"चिंता ही सर्व मानवी रोगांपैकी सर्वांत सूक्ष्म आणि विनाशकारी आहे." -नॉर्मन विन्सेंट पील

सकारात्मक मानसिकता ही संकल्पना लोकप्रिय करणारे अमेरिकन लेखक  व उत्तम वक्ते असणाऱ्या नाॅर्मन विन्सेंट पील यांचे The Power of Positive Thinking हे पुस्तक प्रचंड वाचकप्रिय झाले आहे.

प्रत्येक व्यक्ती कसली ना कसली चिंता करतोच. चिंता नाही असा माणूस सापडणे कठीणच. वाळवीप्रमाणे ही चिंता मानवी आरोग्याला कुरतडत असते. ही चिंता म्हणजे काय हे सांगताना नाॅर्मन विन्सेंट पील म्हणतात, "चिंता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपली रोगट आणि विनाशकारी मनोवृत्तीच आहे. आपण चिंता करण्याची सवय घेऊन जन्माला आलो नाही. तर ही सवय आपण नंतर शिकलो. म्हणून आपण योग्य पद्धतीने प्रयत्न केले तर या सवयीपासून मुक्ती मिळवू शकतो. तिला पराभूत करू शकतो".

चिंतेच्या नकारात्मक  सवयीला लवकरात लवकर सोडून देणे हे सुखी आणि यशस्वी जीवनासाठी गरजेचे असल्याचे नॉर्मल पील यांनी सांगितले आहे.

चिंता किंवा काळजी ही माणसाला आतून पोखरून काढते. सतत चिंता किंवा काळजी करणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. चिंता किंवा काळजी करणारी व्यक्ती सतत दुर्मुखलेली असते. तीला नेहमीच या समस्येला तोंड द्यावे लागते.त्याच्या ठायी नकारात्मकता व नैराश्याची भयानक मानसिक स्थिती निर्माण होते. अनेकदा या नैराश्यामुळे आत्महत्येचा विचार ही यांच्या मनात डोकावत असतो. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींची काळजी किंवा चिंता करणे हा एक असाध्य रोग आहे. तथापि यातून अत्यंत कष्टाने व प्रयत्नपूर्वक बाहेर पडणे आवश्यक असते.  प्रत्यक्षाहूनी कल्पना भयानक अशी सुध्दा काहींच्या बाबतीत परिस्थिती निर्माण झालेली असते. अलीकडच्या एका मानसिक आरोग्याच्या चाचणीत असे पुढे आले आहे की, पाचापैकी चार रोगी हे प्रत्यक्ष घटनेपेक्षा  चिंता व काळजी यामुळेच अधिक त्रस्त असतात. न्यूयॉर्कमधील मेयो हॉस्पिटलमध्ये ३५ टक्के रुग्णांच्या आजारांचे कारण चिंता व काळजी हे असते, असे दिसून आलेले आहे. चिंता व काळजीमुळे अनेक दुष्परिणाम ही होतात. रक्तदाब, मधुमेह यासारख्या व्याधी केवळ चिंता व काळजी मुळे होतात, हे आता सिद्ध झाले आहे.चिंता किंवा काळजी मुळे सतत मनावर ताणतणाव निर्माण होतात. त्यातूनच हृदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण, निरनिराळ्या ग्रंथीतून वाहणारा स्त्राव व एकूण केंद्रीय मज्जासंस्था यांच्यावर परिणाम होतो. शारिरीक व मानसिक आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होते.

काळजी ही एक भावनिक अवस्था आहे. ती दूर करण्यासाठी गोळ्या इंजेक्शन यांसारख्या बाह्य उपायांचा फारसा उपयोग होत नाही. स्वतःच्या मनोवृत्तीत, वैचारिक धारणेत प्रयत्न पूर्वक बदल करायला पाहिजे. ज्या गोष्टीची चिंता किंवा काळजी लागून राहिली आहे, त्या गोष्टींना धाडसाने सामोरे जाऊन तीचा सुक्ष्मपणे सखोल अभ्यास केला पाहिजे.. त्यातून त्या व्यक्तीला आपणांस वाटणारी आणि सतत घाबरून टाकणारी चिंता किंवा काळजी म्हणजे आपल्यात असणारे अज्ञान आहे आणि या अज्ञानाच्या भीतीमुळेच आपल्या मनात चिंता व काळजीने घर केले आहे, हे कालांतराने लक्षात येते. एकदा का चिंता किंवा काळजीचे कारण समजले तर त्याच्यावर योग्य त्या उपाययोजना करता येतात. यातील बहुतेक माणसे किरकोळ व क्षुल्लक गोष्टींनी सुध्दा घाबरून जातात. यामुळे अनेक व्यक्ती सतत नकारात्मक व निराशावादाच्या गर्तेत अडकतात. त्यामुळे ते या सुंदर जीवनापासून वंचित रहातात.

यासंदर्भात एका शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की,....

१) मानवी जीवनात ज्या दुर्घटना प्रत्यक्षात कधीच घडत नाहीत अशा संभाव्य दुर्घटनांची काळजी करणाऱ्यांची संख्या ४० टक्के आहे.

२) जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराला किंवा रोगाला तोंड द्यावे लागते,या आजाराची किंवा रोगाची चिंता किंवा काळजी करणाऱ्यांची संख्या २० टक्के आहे.

३) भूतकाळात आपल्या हातून कळत नकळत बऱ्याच चुका होतात, असा निघून गेलेला काळ पुन्हा येणार नसतो, हे माहित असूनही ज्यांच्याबद्दल आता काहीच करणे शक्य नाही अशा भूतकाळात घडलेल्या गोष्टींची चिंता किंवा काळजी करणाऱ्यांची संख्या  ३० टक्के आहे.

४) प्रत्यक्षात खरंच ज्या गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत अशांची संख्या केवळ १० टक्के आहे. अर्थात यांसारख्या गोष्टींतून चिंतामुक्त किंवा काळजीमुक्त होण्यासाठी केवळ वेळ द्यावा लागतो. वेळ देणे हाच रामबाण उपाय असतो.

या सर्व गोष्टींचा विचार केला तर खरोखरची चिंता किंवा काळजी नगण्य असते, 

याचाच दुसरा अर्थ आपली काळजी आपणच निर्माण करतो. रस्त्याने जाताना आपणास कुठल्यातरी वाहनांची धडक बसणार तर नाही, किंवा किरकोळ सर्दी पडसे खोकला झाला की, मला कोविडसारखा भयानक आजार तर झालेला नाही ना ...! अशा आपल्या बहुतेक विवंचना निराधार असतात. ज्या थोड्या खऱ्या असतात,त्याचे निराकरण करणे सहज संभव आहे. त्या करिता चिंता व काळजी या विरोधात समर्थपणे दोन हात करायला हवेत आणि त्यासाठी आपणच आपल्या मनात आत्मविश्वास जागवायला हवा. आपल्या मनात घर करून राहिलेली चिंता किंवा काळजी आपणच बाहेर काढू शकतो, हा प्रचंड आत्मविश्वास व मनोधैर्य निर्माण झाले की, आपल्या मनातील चिंता किंवा काळजीचा मागमूस ही रहाणार नाही, यांत संदेह नाही.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२



सरकारच्या नव्या हज धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. सरकारी कोट्यातून जाणाऱ्यांसाठी हज कोटा ७० टक्के आणि  खाजगी गटांसाठी २० टक्के असा पुन्हा निश्चित करण्यात आला आहे. मागील वर्षांत तो अनुक्रमे ७०टक्के आणि ३०टक्के  होता. सौदी  सरकारने  या वर्षी भारतीयांना दिलेल्या १,७०,०२५ लोकांपैकी १,४०,००० हून अधिक लोक सरकारच्या माध्यमातून हज करू शकतात.

हज कमिटी ऑफ इंडिया (HCOI) चे सदस्य एजाज हुसैन म्हणाले की, 'भारत सरकारने हज २०२३ साठी सौदी अरेबियासोबत द्विपक्षीय करार केला आहे. यावर्षी भारतातून १,७०,०२५ यात्रेकरु हज करणार आहेत. कोरोना महामारीमुळे (Corona Epidemic) गेल्या दोन वर्षांपासून हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या संख्येत घट झाली होती.'

आणखी एक बदल म्हणजे व्हीआयपी कोटा वगळण्यात आला आहे. यात्रेकरूंना बॅग, सूटकेस आणि छत्री सारख्या वस्तूंसाठी शुल्क आकारले जाणार नाही. हज धोरणात बदल करून प्रत्येक यात्रेकरूला ५०,००० रुपये मिळणार आहेत.  त्यात १० हजाररुपयांची कपात होईल, असा दावा अल्पसंख्याक मंत्रालयाने केला आहे. या धोरणातील उदारता सार्वत्रिक निवडणुकांसाठी असली तरी यात्रेकरूंसाठी एक मोठे वरदान आहे. इतकेच नाही तर ४५‎ वर्षांपेक्षा जास्त वयाची‎ कोणतीही महिला आता एकटी‎ हजसाठी अर्ज करू शकते.‎ पूर्वीचे नियम मागे घेतले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहेत.‎ दरम्यान, केंद्र सरकारच्या या‎ नवीन धोरणाचे सर्वत्र स्वागत‎ करण्यात येत आहे. तसेच‎ यासाठी प्रयत्न करणाऱ्या‎ लोकप्रतिनिधींवर अभिनंदनाचा‎ वर्षाव होत आहे.‎

केंद्र सरकारने हज  यात्रेकरूंसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हज धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. नव्या  हज पॉलिसीनुसार यावर्षी हजला जाणारे लोक मोफत अर्ज करू शकतात. म्हणजे अर्ज करण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. यापूर्वी अर्जसाठी ४०० रुपये दर आकारला जात होता. त्याचबरोबर यंदा हज यात्रेकरूंना जवळपास ५० हजारांपर्यंत सूट दिली जाईल. 

केंद्रीय हज समितीचे अध्यक्ष ए. पी. अब्दुल्लाकुट्टी यांनी सोमवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्ज मोफत करण्यात आल्याचे सांगितले असले तरी हज समितीने जारी केलेल्या धोरणात त्याबाबत काहीही नमूद केलेले नाही. राज्य हज समितीच्या केंद्रांनीही असे कोणतेही निर्देश मिळाले नसल्याचे म्हटले आहे.  केंद्रीय हज समिती आणि राज्य हज समितीच्या कामकाजासाठी चा निधी हा प्रामुख्याने हज अर्ज शुल्क आहे. तो बंद केल्यास ऑपरेशनचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारला करावा लागणार आहे. आर्थिक अडचणींशी झगडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारकडून ही अपेक्षा करता येणार नाही. अशा परिस्थितीत अर्ज शुल्क माफ होण्याची शक्यता नसल्याचे हज समितीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अर्ज शुल्क माफ न केल्यास प्रत्येक वेळी अनेकवेळा अर्ज केल्यावर शुल्क भरावे लागते, हा नियम रद्द करण्याची जोरदार मागणी होत आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यात अर्जदारांची संख्या एवढी जास्त आहे की, हजयात्रेसाठी अर्ज करण्यासाठी तीन, चार किंवा पाच वर्षे लागतात. अशा लोकांच्या पहिल्या वर्षाच्या अर्जांचा पुढील वर्षासाठी विचार केला जाणार नाही. दरवर्षी नवीन अर्ज सादर करावा लागतो व प्रत्येक वेळी रु. ४००/- अर्ज शुल्क भरावे लागते.हा पूर्णपणे अन्यायकारक नियम आहे.अर्जदारांच्या पहिल्या वर्षाच्या अर्जात परवानगी न मिळाल्यास पुढील अर्जांसाठी शुल्क माफ करावे किंवा ज्यांना मान्यता मिळाली नाही त्यांना शुल्क परत करण्याची तरतूद करावी.

व्हीआयपी कोटा रद्द करणे कौतुकास्पद आहे. हा निर्णय व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या केंद्राच्या धोरणाचा एक भाग असून त्याला राज्यहज समित्यांचा पाठिंबा असल्याचे अल्पसंख्याक राज्यमंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले. व्हीआयपी कोटा उच्च घटनात्मक दर्जा असलेल्या, अल्पसंख्याक मंत्रालयातील आणि हज समितीशी संबंधित लोकांसाठी राखीव आहे. या प्रवर्गासाठी एकूण ५०० जागा देण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती कोट्यात १०० जागा, उपराष्ट्रपती व पंतप्रधान  कोट्यात प्रत्येकी ७५ जागा आणि हज समितीमार्फत २०० जागा  होत्या. यूपीए सरकारच्या काळात हे लागू झाले. विशेष कोटा रद्द झाल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आता अर्ज करून स्वखर्चाने हज यात्रा करावी लागणार आहे.

सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने यापूर्वीच जाहीर केले आहे की हज यात्रेकरूंची संख्या आणि वय निर्बंध हटवले जाणार आहेत. आता हज यात्रेकरूंना कोरोना महामारीच्या आधीप्रमाणेच हज यात्रा करता येणार आहे. २०१९ मध्ये सुमारे २.५ दशलक्ष लोकांनी तीर्थयात्रेत भाग घेतला होता. कोविड-१९ साथीच्या आजाराच्या प्रसारामुळे दोन वर्षांसाठी यात्रेकरूंची संख्या कमी करण्यात आली होती.

सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री तौफिक अल-रबियाह म्हणाले, यावर्षी हज यात्रेकरूंची संख्या कोरोनाव्हायरसच्या पूर्वीसारखीच असेल. हज यात्रा ही दरवर्षी होणारा इस्लामिक धार्मिक कार्यक्रम आहे, जो यावर्षी जून महिन्यात होणार आहे. ज्यांनी यापूर्वी तीर्थयात्रा केली नाही त्यांना यावर्षी नोंदणीसाठी प्राधान्य दिले जाईल. 

२०१९ मध्ये सुमारे २.५ दशलक्ष लोकांनी हज यात्रा केली. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे गेल्या दोन वर्षांत ही संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. २०२२ मध्ये, सौदी अरेबियाने १८ ते ६५ वयोगटातील सुमारे १० लाख परदेशी यात्रेकरूंना प्रवेश प्रतिबंधित केला. २०१९ मध्ये सुमारे २५ लाख लोकांनी हज यात्रा केली होती. पुढील दोन वर्षांत, कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे हज यात्रेकरूंची संख्या मर्यादित होती. यादरम्यान केवळ ६५ वर्षांपर्यंतचे लोकच हज यात्रेला जाऊ शकत होते. तर २०२२ मध्ये सुमारे ९ लाख यात्रेकरू हज करण्यासाठी पोहोचले होते, त्यापैकी ७ लाख ८० हजार परदेशी होते.

अलीकडेच अल-राबियाह यांनी सांगितले की आता लोक ऑनलाइन हजसाठी अर्ज करू शकतील. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी जुलैच्या मध्यापर्यंत प्रवाशांकडे वैध राष्ट्रीय किंवा रहिवासी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच धार्मिक स्थळी पोहोचण्याच्या १० दिवस आधी कोरोना आणि फ्लूचे लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हज यात्रेकरू हज मंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन थेट अर्ज करू शकतात. एकच मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त अर्जासाठी वापरू नये असे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत यावर्षी राज्यातून जवळपास ११ हजार भाविक हजला जाणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील भाविक हजला रवाना होण्याची शक्यता असून भाविकांसाठी मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथून थेट विमानाची सुविधा आहे.

महाराष्ट्र राज्य हज समितीकडे इच्छुक भाविकांचे अर्ज आल्यानंतर त्यांची सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर ११ हजारांपेक्षा जास्त भाविक महाराष्ट्रातून हजला जाणार आहेत. हजला जाणाऱ्या भाविकांसाठी आता कोणत्या एअरपोर्टवरून जायचे यासाठी पर्याय देण्यात आलेले आहेत. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांतील भाविकांना हैदराबाद आणि मुंबई विमानतळ, तर जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि नगर येथील भाविकांसाठी औरंगाबाद आणि मुंबई अशा दोन विमानतळांचे पर्याय आहेत. यामध्ये बहुतांश जण हे मुंबई विमानतळाचा पर्याय निवडताना दिसत आहेत.

- शाहजहान मगदुम



भांडवलदारी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य असे की ती निरंतर विनाअंकुश विस्तारासाठी २४ तास झटत असते. भांडवलदारी अर्थव्यवस्थेला कोणत्याही राज्यात वा देशात नागरिकांच्या आर्थिक समस्यांशी काही देणे घेणे नसते. आर्थिक एवढ्यासाठी की या व्यवस्थेचे कार्यक्षेत्र फक्त आर्थिक आहे. कोणत्याही देशाच्या नागरिकांशी, प्रजेशी ही व्यवस्था राबवणाऱ्या भांडवलदारांचा कोणताही संबंध नसतो. फक्त एक संबंध असा की हे सर्वच्या सर्व त्यांचे ग्राहक आहेत. ग्राहकापहीकडे त्यांची कोणतीच किंमत किंवा लायकी नाही. जितके श्रीमंत नागरिक तितके या भांडवलदारांना आपल्या जवळचे, बाकी नागरिक ज्यांच्याकडे फक्त स्वतःचे पोट भरण्याचाच तेवढा खटाटोप करावा लागतो अशांशी त्यांचा काडीमात्र संबंध नसतो.

भांडवलदार नेहमी राज्यकर्ते शासन दरबार यांच्या सान्निध्यासाठी झटत असतात. राज्यकर्त्यांना लोकशाही पद्धतीत भांडवलदारांची गरज असते. या दोन्ही वर्गांचे हितसंबंध जरी वेगवेगळे असले तरी त्या दोघांना एकमेकांशी जवळीक साधायची असते. भांडवलदारांना आपला उद्योग  विस्तारासाठी शासनाच्या कोणत्याही मार्गात साहाय्य हवे असते. वाममार्ग की रास्त मार्ग अशा त्रोटक गोष्टींशी भांडवलदार वर्गाला काही देणे घेणे नसते. परोपकार, सामाजिक बांधिलकी या गोष्टी त्यांच्यासाठी अवगुण असतात. त्यांना फक्त पैसा कमवायचा असतो.म्हणून त्यांना संवेदनशून्य वातावरण हवे असते. संवेदना एकच आपल्या उद्योगधंद्यात त्यांना तोटा होता कामा नये.

लोकशाही राज्यव्यवस्थेत त्यांचे कल्याण आणि त्यांच्या हरप्रकारच्या हितांचे रक्षण हे सर्वपरी असतात. भांडवलदारांना या सगळ्या गोष्टींशी कोणता संबंध नसतो. उलट त्यांच्या धंद्यासाठी हे सगळे मोठे अडसर असतात. राज्यकर्त्यांना आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच यासाठी अर्थकारणाचीही गरज असते आणि या गरजेतून भांडवलदार आणि राज्यकर्त्यांचा तालमेल होतो. हे दोन्ही जवळ आले की भांडवलदार सगळ्यात अगोदर राज्यकर्त्यांचे प्रशिक्षण करतात. त्यांच्या विचारांना नवी दिशा देतात ती दिशा म्हणजे जसे त्यांचे स्वतःचे एकमेव उद्दिष्ट संपत्ती एकवटणे तसे राज्यकर्त्यांनाही ते हे पटवून देतात की त्यांचे अंतिम उद्दिष्ट एकच ते म्हणजे निरंतर, अबाधित सत्ता. जर त्यांना हे उद्दिष्ट साकार करायचे असेल तर सर्व नैतिक मूल्ये, चारित्र्याच्या गोष्टी, संवेदना, सामाजिक बांधिलकी अशा सर्व गोष्टींना बाजूला सारावे. एकदा राज्यकर्त्यांचे या अंगाने प्रशिक्षण झाले की मग दोघे एकमेकांचे हितचिंतक. राज्यकर्त्यांना राजकारणासाठी पैसा लागतो. धनवान ती गरज पूर्ण करतात. पण बदल्यात ते आपल्या अटी समोर ठेवतात. म्हणजे त्यांच्या संपत्तीत निरंतर वाढ कशी व्हावी याची चिंता राजकर्त्यांनी करावी. त्यासाठी भांडवलदार जे मागतील ते द्यावे. कोणता धंदा त्यांना आवडतो तो त्यांच्या स्वाधीन करावा, त्यांनी मांडलेल्या अटींनुसार त्यांनी शासन करावे. राज्यकर्ते प्रजेला उत्तरदायी नसून त्यांचे उच्चरदायित्व आता भांडवलदारांकडे वळते. हे सगळे करत असताना राज्यकर्त्यांनी आपल्या अधिकारांचा, प्रजेशी असलेल्या नात्याचा कधी विसर पडतो ते त्यांना समजतदेखील नाही. अशात भांडवलदारांनी जर देशाचे अन्नधान्य परदेशात निर्यात करण्याची मागणी केली किंवा त्याचा साठा करून नंतर चढत्या भावाने विकण्याची योजना केली तर त्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यायचे नाही. मग परदेशातून आयात केलेले अन्नधान्य, डाळी (आपल्याकडे त्यांचा मुबलक साठा असतानादेखील) ५० रु. प्रति किलो दराने आणून गोरगरीब कोट्यवधी नागरिकांना २०० रु. प्रति किलो दराने विकले तरी शासनाची त्यांना जाब विचारण्याची हिंमत नसते. कारण त्यांनी आपला आत्मा भांडवलदारांकडे गहाण ठेवलेला असतो. त्यांना जाब विचारणार कोण? ही परिस्थिती ज्या देशावर ओढवते त्याचे भवितव्य काय असेल हे सर्वांना माहीत असते. पण सगळ्यांना गुलाम केलेले असल्यामुळे कोणी बोलायची हिंमत करत नाही. सत्ताधारीवर्गाला भांडवलदारांनी आधीच गुलाम बनवलेले असते.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget