Halloween Costume ideas 2015
Latest Post

 


(५०) तुमचे भले झाले तर यांना दु:ख होते व तुम्हांवर एखादे संकट येते तेव्हा हे तोंड फिरवून खूश होऊन परततात व म्हणत जातात की बरे झाले, आम्ही अगोदरच आमचा मामला ठीकठाक केला होता. 

(५१) यांना सांगा, ‘‘आम्हाला कदापि काहीही (चांगले-वाईट) पोहचत नाही परंतु ते जे अल्लाहने आमच्यासाठी लिहिले आहे. अल्लाहच आमचा वाली आहे. आणि श्रद्धावंतांनी त्याच्यावरच भिस्त ठेवली पाहिजे.’’५१ 

(५२) यांना सांगा, ‘‘तुम्ही आमच्या बाबतीत ज्या गोष्टीची वाट पाहात आहात ती याशिवाय अन्य काय आहे की दोन चांगल्या गोष्टींपैकी एक चांगली गोष्ट आहे.५२ आणि आम्ही तुमच्या बाबतीत ज्या गोष्टीची प्रतीक्षा करीत आहोत ती अशी की अल्लाह स्वत:च तुम्हाला शिक्षा करतो की आमच्या हस्ते करवितो? बरे तर आता तुम्हीही वाट पाहा आणि आम्हीदेखील तुमच्याबरोबर प्रतीक्षेत आहोत.’’ 

(५३) यांना सांगा, ‘‘तुम्ही आपली संपत्ती राजीखुशीने खर्च करा किंवा नाराजीने५३ ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही कारण तुम्ही अवज्ञाकारी (फासिक) लोक आहात. 

(५४) यांनी दिलेली संपत्ती स्वीकृत न होण्याचे कारण याशिवाय दुसरे काही नाही की यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा इन्कार (कुफ्र) केला आहे. नमाजकरिता येतात तर मरगळत येतात आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करतात तेही अनिच्छापूर्वक खर्च करतात, 

(५५) यांची धनदौलत आणि यांची संतती - विपुलता पाहून फसू नका. अल्लाह तर असे इच्छितो की याच वस्तूद्वारे यांना ऐहिक जीवनातदेखील कोपग्रस्त करावे५४ आणि यांना मृत्यू आला तरी तो सत्याच्या इन्काराच्या स्थितीतच यावा.५५ 

(५६) ते अल्लाहची शपथ वारंवार घेऊन सांगतात की आम्ही तुमच्यापैकीच आहोत, वास्तविक पाहाता ते मुळीच तुमच्यापैकी नाहीत. खरेतर ते असे लोक आहेत जे तुम्हापासून भयभीत आहेत. 

(५७) जर त्यांना एखादे आश्रयस्थान मिळाले अथवा एखादी गुहा किंवा लपून बसण्यासाठी एखादी जागा, तर पळत जाऊन त्यात लपतील.५६ 



५१) येथे दुनियेचा पुजारी आणि ईश्वराचा भक्त यांच्या मनोवृत्तीतील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. दुनियेचा पुजारी जे काही करतो ते सर्व आपल्या मनाच्या खुशीसाठी करतो. त्याच्या मनाची प्रसन्नता जगातील काही लाभप्राप्तीवर अवलंबून असते. त्याचे हे ध्येय प्राप्त् झाले तर त्याला अत्यानंद होतो आणि ध्येय प्राप्त् झाले नाही तर मृतप्राय होतो. अशा माणसाची भिस्त पूर्णत: भौतिक साधनांवर अवलंबून असते. भौतिक साधनं त्याला अनुकूल राहिली तर त्याला आनंद होतो आणि प्रतिकूल झाली तर हिंमत खचते. याविरुद्ध ईशपरायण मनुष्य (ईश्वराचा भक्त) जगात जे काही करतो ते अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी करतो. या कामात त्याचा भरोसा पूर्णत: अल्लाहवर असतो, भौतिक साधनांवर मुळीच नाही. सत्य मार्गात काम करतांना त्याला संकटांना सामोरे जावे लागले तरी तो संकटाने डळमळत नाही किंवा सफलतेचा त्याच्यावर वर्षाव झाला तरी सफलतेमुळे तो नखरेल होत नाही. असा मनुष्य दोन्ही स्थितींना अल्लाहकडूनच समजतो. या माणसाला सतत चिंता लागून असते की अल्लाहने टाकलेल्या परीक्षेतून सकुशल बाहेर पडावे. याच्या डोळयांपुढे जगातील कोणतेच भौतिक ध्येय नसते ज्यावरून आपल्या सफलतेचा आणि असफलतेचा हिशेब त्याने घ्यावा. त्याच्यासमोर तर एकमात्र उद्देश अल्लाहची प्रसन्नता प्राप्त् करणे असते. या उद्देशापासून जवळ असणे अथवा दूर असण्याची कसोटी जगातील सफलता अथवा असफलतेवर नाही. अल्लाहच्या मार्गात तन, मन, धन अर्पण करण्याचे दायित्व त्याच्यावर आहे. त्या दायित्वाला मनुष्य जगात कुठवर निभावतो यावर त्याच्या उद्देशप्राप्तीचे स्वरुप अवलंबून आहे. हे दायित्व त्याने पूर्ण केले आणि जगात मात्र तो असफल ठरला तरी त्याला पूर्ण विश्वास असतो की ज्या अल्लाहसाठी त्याने आपले तन-मन-धन अर्पण केले, तो मोबदला निश्चितच देणार आहे. भौतिक साधनांपासून तो कदापि आशा करीत नाही की त्यांची अनुकूलता आणि प्रतिकूलता त्याला प्रसन्न किंवा दु:खी करेल. त्याचा पूर्ण भरोसा अल्लाहवर असतो जो या सृष्टीचा निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि शासनकर्ता स्वामी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तो अल्लाहच्या भरोशावरच साहसाने पुढे काम करत जातो. भौतिकवादी मात्र साहस आणि संकल्पाचे प्रदर्शन अनुकूल परिस्थितीतच करतात. अल्लाह सांगतो की या भौतिकवादी दांभिकांना सांगून टाका की आमचा मामला तुमच्या मामल्याशी मूळताच भिन्न आहे. तुमच्या प्रसन्नतेचे आणि दु:खाचे नियम वेगळे आहेत आणि आमचे तुमच्यापासून वेगळे मापदंड आहेत. तुम्ही संतोष आणि असंतोष वेगळया स्त्रोतापासून घेता आणि यासाठी आमचा स्त्रोत तुमच्याशी पूर्ण भिन्न आहे.

५२) दांभिक त्यांच्या सवयीनुसार यावेळीसुद्धा कुफ्र आणि इस्लामच्या या संघर्षात भाग घेण्याऐवजी अकलेचे कांदे सोलू पाहात होते की या संघर्षाचा कोणता परिणाम निघतो. पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांचे साथीदार जिंकून येतात की रोमन सैन्याशी सामना करताना धारातिर्थी पडतात. याचे उत्तर त्यांना दिले गेले की ज्या दोन परिणामांपैकी एकाचे प्रकट होण्यासाठी तुम्ही वाट पाहात आहात, त्या दोन्ही परिणामांत ईमानधारकासाठी भलाई आहे. ते जर विजयी झाले तर त्यांची भलाई होणे स्पष्ट आहे. युद्धात त्यांना वीरगती प्राप्त् झाली तर तीसुध्दा एक सफलताच आहे. जगाच्या नजरेत ते असफल जरी ठरले तरी ईमानधारकांची सफलता व विफलता यात नाही की त्यांनी एखादा देश जिंकला किंवा नाही, काही राज्य स्थापन केले किंवा नाही. त्यांची कसोटी म्हणजे अल्लाहच्या वचनाला उच्च्तम करण्यासाठी त्यांनी आपले तन-मन-धन अर्पण केले आहे किंवा नाही. हे काम ईमानधारकाने केले तर तो सफल आहे. मग जगाच्या दृष्टिकोनातून त्याच्या प्रयत्नांचा परिणाम शून्य का होईना.

५३) काही दांभिक असे ही होते जे स्वत: ला धोक्यात टाकण्यास तयार नव्हते. हेसुद्धा इच्छित नव्हते की या जिहाद आणि त्याच्या प्रयत्नांपासून अजिबात संबंध न ठेवता मुस्लिमांच्या दृष्टीतून स्वत:ची पत संपवून दांभिकतेला जाहीर करावे. म्हणून ते म्हणत होते की आम्ही सैन्य सेवेपासून या वेळी सूट मागतो परंतु संपत्तीरूपात सहाय्यता करण्यास तयार आहोत.

५४) म्हणजे संपत्तीच्या आणि संततीच्या मोहात पडून जे कपटतापूर्ण वर्तन तुम्ही स्वीकारले आहे, त्यामुळे मुस्लिम समाजात हे अतिअपमानित होऊन राहतील. शासनाची ती सर्व शान, इज्जत आणि नावलौकिक, श्रेष्ठत्व इ. जे आजतागायत त्यांना अरब समाजात प्राप्त् होते; सर्व इस्लामी जीवनव्यवस्थेत मातीमोल होईल. साधारण ते साधारण दास आणि दासपूत्र आणि सामान्य शेतकरी व गुराखी यानी ईमान व निष्ठेचे प्रमाण दिले आणि या नव्या जीवनव्यवस्थेत ते सन्मानित होतील. परंतु खानदानी सरदार व चौधरी लोक आपल्या भौतिक प्रेमापोटी अपमानित बनून राहतील. या स्थितीचे उत्तम उदाहरण ती घटना आहे जी एकदा माननीय उमर (रजि.) यांच्या सभेत घडली होती. कुरैशचे मोठमोठे सरदार ज्यात सुहैल बिन अम्र आणि हारिस बिन हिशामसारखे लोक होते, ते माननीय उमर (रजि.) यांना भेटण्यासाठी गेले. तेथे त्या वेळी अशी स्थिती होती की मुहाजरीन किंवा अन्सारपैकी एखादा साधारण मनुष्य जरी आत आला तर उमर (रजि.) त्यास आपल्याजवळ बोलावून बसवित होते आणि त्या सरदारांना सांगत की यांच्यासाठी जागा खाली करा. थोड्याच वेळात असे घडले की हे सरदार लोक मागे सरकत सरकत सभागृहाच्या मागच्या भागात गेले. बाहेर निघून हारीस बिन हिशाम यांनी साथीदारांना कशी वागणूक मिळाली याविषयी सांगितले. त्यावर सुहैल बिन अम्र यांनी सांगितले, ``यात उमर (रजि.) यांची काही एक चूक नाही. चूक आमची आहे की जेव्हा आम्हाला या जीवनव्यवस्थेचा स्वीकार करण्यास सांगितले गेले तेव्हा आम्ही मात्र तोंड फिरविले आणि हे लोक धावत जावून या व्यवस्थेचा स्वीकार करते झाले.'' नंतर हे दोन्ही सरदार माननीय उमर (रजि.) यांच्याजवळ पुन्हा गेले आणि म्हणाले, `आज आम्ही तुमचा व्यवहार अनुभवला आम्हाला माहीत आहे की आमची चूक आहे. काय आम्हाला याची तूट भरून काढता येईल? माननीय उमर (रजि.) या प्रश्नाचे काहीच उत्तर न देता केवळ रोमन सीमेकडे बोट दाखविले. म्हणजेच आता जिहादच्या मैदानात जीव व वित्तानिशी त्याग करून पाहा, शक्य आहे तुम्हाला ते स्थान प्राप्त् होईल. 

५५) म्हणजेच या अपमान आणि अनादरापेक्षा जास्त त्रासदायक त्यांच्यासाठी त्यांनी आपल्या मनात पाळलेली दांभिकता आहे. यामुळे त्यांना मरेपर्यंत खऱ्या ईमानचे सौभाग्य प्राप्त् होणार नाही. आपले जग खराब करून घेतल्यानंतर हे आपले परलोकजीवन नष्ट करून अशा स्थितीत जगातून जातील की तिथे त्यांची स्थिती बिकटतर असेल.

५६) मदीनेतील हे मुनाफिक (दांभिक) अधिकतर किंवा सर्वजण धनवान आणि बुजुर्ग मंडळी होती. इब्ने कसीर यांनी `अल् बिदाया वन् निहाया'मध्ये यांची सूची दिली आहे त्यात केवळ एकाच युवक दांभिकाचा उल्लेख सापडतो. यांच्यापैकी निर्धन कोणीच नाही. हे सर्वजण मदीना शहरात आपले व्यापार-उदीम थाटून होते आणि संपत्तीधारक होते. ते भौतिकतेचे पुजारी आणि संधीसाधू व  स्वार्थाचे पुजारी होते. इस्लाम जेव्हा मदीना शहरात पोहचला आणि अधिकतर लोकांनी इस्लामी जीवनपद्धतीचा निष्ठापूर्वक स्वीकार केला तेव्हा या दांभिकांनी स्वत:लाही स्थिती त्रासदायक समजून घेतली. एकीकडे त्यांच्या कबिल्यातील अधिकतर लोकांनी इस्लामी जीवनपद्धतीचा केलेला स्वीकार आणि त्यांच्या मुलाबाळांनीसुद्धा इस्लामचा स्वीकार केलेला, अशा स्थितीत ते अनेकेश्वरत्व आणि ईशद्रोहावर अडून बसले असते तर त्यांची सत्ता, सन्मान, प्रसिद्धी सर्व नष्ट झाले असते. मुलेबाळे व पत्नीशी संबंध विच्छेद होतो तसेच त्यांच्या घरात त्यांच्याविरुद्ध विद्रोह झाला असता. दुसरीकडे या जीवनपद्धतीला (दीन) साथ देण्याचा अर्थ म्हणजे साऱ्या अरब आणि आसपासच्या देशांशी शत्रुत्व विकत घेण्यासारखे होते. त्यांच्या मनोकामनांच्या दासत्वामुळे सत्य आणि यथार्थ एक मौल्यवान वस्तू आहे याचे भान त्यांना राहिले नव्हते. या सत्य आणि यथार्थासाठी मनुष्य आपले तन, मन, धन अर्पण करू शकतो, अशाप्रकारे विचार करण्याची क्षमता त्यांच्यात शिल्लक राहिली नव्हती. ते जगातील सर्व मामल्यांवर आणि समस्यांवर केवळ स्वार्थ आणि आपल्या फायद्याच्याच दृष्टीने पाहात असत. म्हणून त्यांना स्वत: च्या हितरक्षणासाठी ईमानचा दावा करावा हेच योग्य वाटले जेणेकरून समाजात आपले सन्मान, सत्ता आणि प्रसिद्धी बाकी राहील. ईमानचा दावा करताना निष्ठापूर्ण ईमान ग्रहण केल्यानंतर ज्या संकटांना तोंड द्यावे लागणार होते, त्यापासून त्यांची सुटका अशा रीतीने होणार होती. त्यांच्या याच मानसिकतेचा आणि विचारसरणीचा येथे उल्लेख करून स्पष्ट केले की वास्तवत: हे लोक (दांभिक) तुमच्याबरोबर नाहीत तर आपत्तींच्या भयाने या लोकांना तुमच्याबरोबर जबरदस्तीने बांधले आहे. स्वत:ची मुस्लिम म्हणून ओळख त्यांनी यासाठी केली की मदीना येथे स्पष्टत: मुस्लिमेतर बनून राहिले तर प्रतिष्ठाहीन बनण्याचा धोका होता आणि त्यामुळे बायकामुलांशीसुद्धा संबंध तुटले असते. मदीना शहराला सोडले तर संपत्तीला आणि व्यापार-उदीम गमवावे लागणार होते. त्यांच्या मनात अनेकेश्वरत्वाशीसुद्धा इतकी निष्ठा नव्हती की त्यासाठी संकटावर संकटे झेलत जावे. या द्विधा मन:स्थितीमुळे ते मजबुरीने मदीना येथे राहात होते आणि मनात नसताना नमाज अदा करत होते. तसेच जकात `दंड' म्हणून भरत होते. सतत जिहाद आणि तन, मन, धन अर्पण करण्याची सततच्या मागणीची `मुसीबत' त्यांच्यावर होती, त्यापासून सुटका मिळविण्यासाठी ते अतिआतुर होते. यासाठी एखादे छिद्र किंवा बीळ दिसले तर  ते त्याच्यात घुसण्यासाठी तयार होते जेणेकरून त्यांना शांती मिळेल.


पवित्र कुरआनात अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना उद्देशून असे म्हटले आहे की “दिवसाच्या तेजाची आणि शांत अंधार पसरत असलेल्या रात्रीची शपथ, तुझ्या विधात्याने तुला अधांतरी सोडलेले नाही. तुमच्यासाठी पहिल्या परिस्थितीपेक्षा नंतरची स्थिती चांगलीच असणार आहे.” याचा अर्थ असा की रात्र आणि िदवस एकामागोमाग परतत असतात. त्याचप्रमाणे माणसाची स्थितीदेखील बदलत असते. बदल हा सृष्टीचा नियम आहे. एकच परिस्थिती कधीच राहात नसते. जर हे नियम निसर्गाला लावून दिले नसते आणि फक्त दिवसच दिवस किंवा नेहमीच रात्र असती तर कालचक्रदेखील स्थिरावले असते. स्थिरता म्हणजे ज्यात जीवन नसते. बदल होत राहाणे हे जीवन आहे. या जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात. ते येत राहाणार, कारण हाच जीवंत असल्याचा पुरावा आहे.

माणसाने या बदलांना घाबरून जाण्याचे कारण नाही. उलट एकच परिस्थिती असती तर विचलित अवस्था निर्माण होते. रात्रंदिवसाचे हे कालचक्र सबंध मानवजातीमध्ये फिरत असते. आज जे लोक श्रीमंत आहेत, ते काल गरीब होते. आज जे गरीब आहेत, जर सृष्टीच्या नियमात बदल झाला नसता तर हे सदैव गरीबच राहातील. हा अल्लाहचा न्याय नाही. श्रीमंती आणि वंचितावस्था माणसामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये बदलत असते. कठीण प्रसंग जसे येतात तसे ते निघूनही जातात, कारण त्यांनासुद्धा बदलांचा नियम लागू आहे. पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की “तुमच्यावर कोसळणारी अनिष्ठ आपदा हे पूर्वीपासूनच नोंदवून ठेवलेली घटना आहे. त्यानुसारच मानवजातीला आपत्तींना सामोरे जावे लागते.” 

प्रेषितांना संबोधून याच अध्यायात अल्लाहने पुढे सांगिलते आहे की “तुम्ही अनाथ असताना तुम्हाला आश्रय दिला. तुम्हाला स्वावलंबी केले. एकाच परिस्थितीशी तोंड द्यावे लागत नाही, जसे तुम्ही गरीब होता तेव्हा तुम्हाला त्याने श्रीमंत केले. तसेच तुम्हीदेखील गरजूंची काळजी घ्या. कुणी मागिलत्यास झिडकारू नका. तुमच्या विधात्याने जी तुम्हाला देणगी दिली ती जाहीर करा.”

अनाथांची मालमत्ता हडप करू नका

समाजामध्ये आणि आपसात नातेसंबंधांमध्ये सर्वांत असहाय घटक म्हणजे ‘अनाथ’. पवित्र कुरआनने त्यांची दखल घेत म्हटले आहे की “अनाथांची मालमत्ता त्यांच्या हवाली करा. त्यांच्या चांगल्या वस्तूंची (संपत्ती इ.) अदलाबदल आपल्या वाईट वस्तूंशी करू नका. हा मोठा अपराध आहे. जे लोक अन्यायी मार्गाने अनाथांची मालमत्ता हडप करतात ते खऱ्या अर्थाने आपले पोट आगीने भरतात.” (पवित्र कुरआन- ४:२,१०) अनाथ असहाय असतात म्हणून कुणीही त्यांची फसवणूक करू नये. तुम्ही इतरांच्या डोळ्यांत धूळफेक करू शकता, पण अल्लाहच्या नजरेतून तुम्ही वाचणार नाही. त्याच्या तावडीतून तुम्ही सुटणार नाही. माणसाला अल्लाहने दिलेल्या देणगीने माणसाने संतुष्ट राहावे. त्याच्याकडे कुणी अनाथ मुले-मुली असतील तर त्यांचा आणि त्यांच्या मालमत्तेचा सांभाळ करावा. असे असू शकते की ज्या अनाथांचा सांभाळ त्याला करावा लागत आले त्यांना तर मालमत्ता लाभलेली असावी आणि स्वतः सांभाळ करणाऱ्याकडे कुठली मालमत्ता नसेल, असलीच तर ती निकृष्ट दर्जाची असेल अथवा कमी असेल. अशा स्थितीत त्या अनाथांशी न्याय्य व्यवहार करणे अवघड असेल तर अल्लाहने ताकीद दिलेली आहे की अनाथांच्या मालमत्तेजवळ फिरकू सुद्धा नका. अल्लाह कुणाला कुणा दुसऱ्यापेक्षा अधिक दिले असेल तर त्याची अभिलाषा बाळगू नये. पुरुष व स्त्रिया जे काही कमवतात त्यावर त्यांचा स्वतःचा अधिकार आहे. पुरुष आणि स्त्रियांना काही इतर पुरुष व स्त्रियांपेक्षा कमी मिळाले असेल तर त्यामागे अल्लाहची काही योजना असेल; जगातील इतर वैभव देखील. जसे धन, इभ्रत, सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि मानमरातब. या जगात सर्वांना सारखे मिळत नसते. कुणाला धन देतो, कुणाला बुद्धिमत्ता तर कुणास इतर काही वैभव. ज्या जे दिले गेले त्याचे समाधान मानावे लागेल.

- सय्यद इफ्तिखार अहमद



मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे. पण यावर कोणताही तोडगा आजवर निघाला नाही. कारण इंदिरा साहनी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची उच्चतम मर्यादा ५० टक्के निश्चित केली होती. हा इतका मोठा अडथळा आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न असो की राजस्थानमधील गुर्जर समाजासाठीचा प्रश्न असो अथवा मुस्लिमांची आरक्षणाची मागणी; कोणालाही आरक्षण देता येत नाही. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता त्याच वेळेला भारतातील इतर जाती-जमातींनी त्यास आव्हान दिले असते. संसदेद्वारे हा निकाल रद्दबातल ठरवण्याचा प्रयत्न केला असता तर आज कोणत्याही समाज असो आज त्यांना या समस्येला तोंड द्यावे लागले नसते. खरेच आर्थिक आणि राजकीय पातळीवर मराठा समाज जितका प्रगत आहे, तसा दुसरा या राज्यातला कोणताही समाज प्रगत नाही. अणि म्हणूनच जेव्हा मराठा आरक्षणाची गोष्ट करतात तेव्हा इतर जाती-जमातींच्या लोकांच्या भुवया उंचावतात. कृषी क्षेत्र असो की सहकार क्षेत्र, साखर कारखानदारी, राजकीय आणि आर्थिक लाभाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि याच बरोबर शिक्षण संस्थांमध्ये मराठ्यांचेच वर्चस्व आहे. तरीदेखील त्यांनी स्वतःसाठी आरक्षणाची मागणी करावी, ही गोष्ट इतरांना पटत नाही. त्यांना जरी हे पटत नसेल तर दुसरी वास्तविकता अशी की सरकारी नोकऱ्यांत खासकरून प्रथम आणि उच्चतम श्रेणीच्या शासकीय व्यवस्थेत जिथे सरकारचे धोरण ठरविले जाते अशा ब्यूरोक्रेसीमध्ये मराठ्यांचे स्थान नगण्यच आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा आपल्या लोकसंख्येनुसार भाग घेत नाहीत. म्हणून ब्यूरोक्रसीमधील उच्च पदांवर त्यांच्या नियुक्त्या होत नाहीत. यावर शाहू महाराजांनी दीडशे वर्षे आधी आरक्षणाचे धोरण आपल्या संस्थानात लागू केले होते. मराठा राजकारण्यांनी महाराष्ट्राची स्थापना होतानाच जर शाहू महाराजांचे धोरण राज्यात लागू केले असते तर आज ही परिस्थिती त्यांच्यावर आली नसती. मराठा समाजाने त्यांच्या अधिकारातील शिक्षण संस्था आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी ‘आरक्षित’ केल्या असत्या तर मराठा तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन ब्यूरोक्रसीतील उच्च पदांवर पोचले असते. पण असे न करता आपल्या शिक्षण संस्था आपल्या समाजातील मुलांच्या विकासासाठी लाभदायी न बनवता पैसे कमवण्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले. आणि म्हणून खुद्द मराठा समाजाला या शिक्षण संस्थांचा कसलाच उपयोग करून घेता आला नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक राज्याने स्वतःच्या राज्यात कोणते आरक्षणाचे धोरण लागू करावे याचा अधिकार त्या त्या राज्याला दिला जावा अशी मागणीही कुठल्या राज्यांनी हे धोरण ठरवत असताना आणि सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षण ठरवताना केली नाही. केंद्रशासित प्रदेश असोत की शिक्षण संस्था आणि केंद्रीय नोकऱ्यांमध्ये जे काही आरक्षणाचे धोरण असावे ते केंद्राने ठरवायला हवे आणि आपल्या राज्यात प्रत्येक राज्याने स्वतःचे धोरण ठरवावे, यासाठीही कोणत्या राज्याने काही केले नाही. किंबहुना तसा विचारदेखील त्यांनी केला नाही. याचे परिणाम आज सर्व राज्यांना भोगावे लागत आहेत. तामिळनाडूने ही मर्यादा कशी ओलांडली आणि त्यांचे ६९ टक्के आरक्षण आजवर कसे टिकले असा प्रश्न बरेच पत्रकार उपस्थित करतात. याचे साधे उत्तर हे की त्यांनी त्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले. ते राज्य आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी वाहून घेतलेले आहे. तिथल्या अभिजनवर्गाने स्वतःसाठी कधी आरक्षणाची मागणी केली नाही जशी मागणी मराठा अभिजनवर्ग करत आहे. म्हणून त्यांना कुठूनही आव्हान दिले गेले नाही. जेव्हा केव्हा मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले जातात महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग त्यांच्याकडे संशयाने पाहात असतात. यासाठी कोण जबाबदार, हे मराठा समाजानेच आंतरमुख होऊन विचार करावा. मराठा समाजाला आजही राजकीय क्षेत्रात वर्चस्व आहे. विधानसभा आणि विधानपरिषद असो की इतर संस्था सगळीकडे मराठा समाजाचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाचा काहीतरी उपयोग आपल्यासाठी तरी करावा आणि म्हणूनच सांस्कृतिक पातळीवर मराठा खरेच मागास आहेत म्हणून त्यांना आरक्षण मिळायला हवे. कारण आर्थिक दुर्बलता किंवा सुबत्ता हे आरक्षणाचे निकष नाहीत. सांस्कृतिक निकषांवर आरक्षणाची तरतूद केलेली आहे, हे मराठा समाजाने समजून घ्यावे आणि केंद्राला व न्यायव्यवस्थेला समजावून सांगावे तरच त्यांना आपल्या उद्दिष्टामध्ये यश मिळेल. आरक्षणाने ग्रस्त मानसिकता असलेल्यांना ही गोष्ट कळणार की नाही माहीत नाही. राज्याच्या विधानसभेत कितींदाही आरक्षणाचा ठराव पास करून कायदा पारित केला तरी त्याचा भविष्यात फारसा उपयोग होणार नाही हे मात्र निश्चित! तसेच कितीही मोठे मोर्चे काढले तरी त्याचा उपयोग होणार नाही. ही लढाई दिल्लीत लढावी लागणार.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



चांगल्या चारित्र्याशिवाय मुस्लिमांची कल्पनाच करता येत नाही. जगात 1 लाख 24 हजार प्रेषितांना पाठविण्याचा उद्देशच हा होता की, लोकांचे चारित्र्य चांगले व्हावे. जगामध्ये शांती रहावी, लोकांनी एकमेकांशी सद्भावनेने वागावे, त्यांच्यात दया, करूणा आणि विश्वासाचे वातावरण रहावे, लोकांना त्रास होऊ नये, कोणी कोणावर अत्याचार करू नये, प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार विनासायास मिळावेत, जगामध्ये सदाचारी लोकांची संख्या जास्त असावी. थोडक्यात जागतिक मानवकल्याण ही ईश्वरीय इच्छा असल्याचा बोध आपल्याला प्रत्येक ईशग्रंथातून मिळतो. परंतु आपण पाहतो की, जगामध्ये नेमकी या उलट स्थिती आहे. लोक एकमेकांचे शत्रू झालेले आहेत. एकमेकांना संपविण्यासाठी चाकू-सुऱ्यापासून ते अणुबॉम्बचा वापर करत आहेत. जगात दुराचाऱ्यांची संख्या जास्त आहे सदाचाऱ्यांची संख्या कमी आहे व दिवसेंदिवस ती अधिक कमी होत आहे. 

प्रेषित पूर्व काळामध्ये जेव्हा समाजामध्ये अनाचार माजत होता, वाईट चारित्र्याच्या लोकांची संख्या जास्त होत होती, तेव्हा ईश्वर प्रेषित पाठवून समाजसुधारणेचे कार्य त्यांच्याकडून घेत असे. परंतु प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नंतर प्रेषित पाठविण्याची ईश्वरीय पद्धत बंद झाली; आता समाजसुधारणेची जबाबदारी ईश्वराने त्यांच्या वारसांवर टाकलेली आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठी मुस्लिमांमध्ये चांगल्या चारित्र्यांच्या लोकांची संख्या जास्त असणे गरजेचे आहे.  या पार्श्वभूमीवर सध्याच्या मुस्लिम समाजाच्या चारित्र्याचा वेध घेणे काळाची गरज आहे. म्हणून हा लेखन प्रपंच. 

भारतीय मुस्लिमांमध्ये स्वतःला प्रेषितांचे वारस म्हणवून घेण्यामध्ये गर्व करणाऱ्यांची संख्या कमी नाही मात्र प्रेषितांच्या  शिकवणीनुसार आचरण करणाऱ्याची संख्या अतिशय कमी आहे. भौतिक शिक्षण आणि पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे बहुसंख्य मुस्लिम समाज इस्लामच्या मुलभूत शिकवणीपासून दूर गेलेला आहे. त्यामुळे त्यांच्या चारित्र्याचा ऱ्हास झालेला असून त्यांच्यात इस्लामी चारित्र्याच्या खुणा अभावानेच आढळून येतात. 

भारतीय मुस्लिमांना कायम संकटात टाकून ज्या मुस्लिम लीगने इस्लामच्या नावाखाली, 1947 साली जो वेगळा पाकिस्तान तोडून घेतला आणि ज्याला आदर्श इस्लामी राष्ट्र बनविण्याचा प्रण केला, त्या मुस्लिम लीगच्या नेत्या व कार्यकर्त्यांचे चारित्र्य कसे होते, याचे वर्णन फारच उद्बोधक असे आहे. मौलाना अबुल आला मौदूदी लिहितात, ’’जे कालपर्यंत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होते, त्यांच्यापेक्षा जास्त मुस्लिमांचा कैवार घेणारा दूसरा कोणीच दिसत नव्हता, जे आजही स्वतःला फार मोठे ’मुजाहिदे मिल्लत’ (मुस्लिमांच्या हितासाठी प्रयत्नरत असणारे) समजतात, त्यांच्यातील बहुसंख्य लोक आपल्याला असे दिसून येतील की पाकिस्तान बनल्यानंतर त्याच्या नावेमध्ये हे लोक प्रत्येक बाजूने छिद्र हेच लोक पाडत आहेत. हे भ्रष्टाचारी, हे विश्वासघातकी, लोकांचे माल हडपणारे, हे सरकारी खर्चावर आपल्या नातेवाईक आणि मित्रांचे फायदे करून देणारे, हे कर्तव्यापासून दूर जाणारे, हे शिस्तीपासून लांब राहणारे, हे गरीबांसाठीच्या सार्वजनिक फंडावर ऐश करणाऱ्यांचे एक वादळ आजच्या शासकीय व्यवस्थेच्या प्रत्येक ठिकाणी आलेले आहे आणि ज्यात मोठ्या प्रमाणावर खालच्या कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत एवढेच नव्हे तर मंत्र्यापर्यंतचे लोक सहभागी आहेत, हे काय देशाला मजबूत करणाऱ्या गोष्टी आहेत? 

हे दुकाने आणि कारखान्यांचे अवैध वाटप, ज्यामुळे देशाच्या उद्योग आणि व्यापाराचा एक मोठा हिस्सा अअनुभवी आणि नालायक  लोकांच्या हातात गेलेला आहे. ही काय देशाला शक्तीशाली करणारी गोष्ट आहे? आणि ही  जनतेची सरकारला कर अदा करण्यामध्ये केली जाणारी कुचराई अशी गोष्ट आहे का की ज्यामुळे देश मजबूत होतो? देशातील लोकांची नैतिक पातळी इतकी वाईट झालेली आहे की, भारतातून आलेल्या मुहाजीरांची प्रेतं जेव्हा वाघा आणि लाहोरच्या दरम्यान पडून सडत होती आणि शिबीरामध्येही मृत्यूचे तांडव सुरू होते, त्यावेळेस 12 ते 13 लाख मुस्लिम लोकसंख्या असलेल्या लाहोर शहरांमधून काही हजार नव्हे तर काही शेकडा लोकही असे मिळाले नाहीत जे मृत मुस्लिमांना सन्मानाने दफन करण्याची तसदी घेतील. अशी अनेक उदाहरणं आम्हाला माहीत आहेत की, जेथे एखादा मुहाजीर मरण पावला तेव्हा त्याची नमाजे जनाजा अदा करण्यासाठी पैसे देऊन लोकांना बोलवावे लागले. एवढेच नव्हे तर परिस्थिती एवढी बिकट होती की, भारत-पाक सीमेजवळील पाकिस्तानच्या एखाद्या गावामध्ये सरकारतर्फे मुहाजीरांना जमीन दिली गेली तेव्हा स्थानिक मुस्लिमांनी सीमेपलीकडून शिखांना बोलावून त्यांच्यावर हल्ले करविले जेणेकरून ते पळून जातील आणि त्यांना मिळालेली जमीन यांच्या ताब्यात येईल. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा भारतातून आलेल्या महिला/ मुली या स्थानिक पाकिस्तान्यांच्या अत्याचारांपासून सुरक्षित राहू शकल्या नाहीत. विशेष म्हणजे हे लाजीरवाणी कृत्ये करणारी माणसेफक्त अभ्यस्त गुंड नव्हते. एवढ्या नैतिक ऱ्हासानंतर आपण कशी आशा करू शकतो की एखाद्या अंतर्गत किंवा बाहेरच्या संकट काळामध्ये आपण एकत्रितपणे मजबूतीने उभे राहू? आणि हे नैतिक स्खलन झालेले लोक देशाच्या उन्नतीमध्ये आणल्या गेलेल्या योजनांना यशस्वी होऊ देतील.’’ (संदर्भ : तहरीके आजादी ए हिंद और मुसलमान, पान क्र. 320-321. सन 1947)

मुस्लिमांच्या वाईट चारित्र्याचे दूसरे उदाहरण मौलाना मौदूदी यांच्याच शब्दात खालीलप्रमाणे सादर आहे -

’’ मुसलमानांच्या एका मोठ्या आणि लोकप्रिय नेत्याला अशी तक्रार करतांना ऐकलं गेलं की, मुंबई आणि कलकत्ता येथील श्रीमंत मुसलमान अँग्लो इंडियन वेश्यांकडे का जातात? खरं तर मुस्लिम वेश्या ह्या त्यांच्या कृपेसाठी जास्त पात्र आहेत.’’ (संदर्भ : साप्ताहिक तर्जुमानुल कुरआन, फेब्रुवारी 1941).

मौलाना मौदूदी पुढे म्हणतात, ’’येणेप्रमाणे मुस्लिम हा शब्द किती खालच्या पातळीवर या लोकांनी आणून ठेवला आणि कोण-कोणत्या अवगुणांसाठी तो वापरला जात आहे? मुसलमान आणि व्याभिचारी? मुसलमान आणि चोर? मुसलमान आणि दारूड्या? मुसलमान आणि नशेडी? मुसलमान आणि भ्रष्टाचारी? मुसलमान जर हे सर्व कृत्य करून मुसलमान राहत असतील तर त्यांच्यात आणि बिगर मुस्लिमांमध्ये काय फरक राहणार? मग मुस्लिमांच्या वेगळ्या अस्तित्वाची गरजच काय? इस्लाम तर नावच त्या आंदोलनाचे आहे ज्याने जगाला सगळ्या वाईट गोष्टींपासून मुक्त करण्याचे प्रयत्न केले. या आंदोलनाने अशा चारित्र्यवान मुस्लिमांना वेचून व संगठित करून एक जमात बनवली होती ज्यांचे चारित्र्य उच्च दर्जाचे होते.  जे चांगल्या चारित्र्याचे ध्वजवाहक होते. मुस्लिमांच्या या आंदोलनाने आपल्यातील वाईट वृत्तीच्या लोकांचे हात कापणे, दगडाने ठेचून मारणे, सार्वजनिक ठिकाणी फटके मारून वाईट प्रवृत्तीच्या माणसाची पाठ सोलून काढणे एवढेच नव्हे तर गुन्हेगारांना सार्वजनिकरित्या फाशीवर लटकवण्यासारख्या कडक शिक्षा लागू केल्या होत्या. मुस्लिमांची ही जमात तर जगातून व्याभीचार नष्ट करण्यासाठी उठली होती. म्हणून त्यांची अपेक्षा होती की त्यांच्यामध्ये कोणी व्याभिचारी नसावा. त्यांचे काम दारूबंदी करणे होते म्हणून त्यांच्यात कोणी दारू पिणारा नसावा, जे चोरी आणि डाक्यासारखे गुन्हे मिटविण्यासाठी उठले होते स्वतः त्यांच्यामध्ये कोणी चोर आणि डाकू नसावा.’’ (संदर्भ : साप्ताहिक तर्जुमानुल कुरआन, नोव्हेंबर 1939)

वरील उदात्त उद्देशांना बहुसंख्य मुस्लिम हे साफ विसरून गेलेले आहेत. कठोर शरई शिक्षांना जगात ’’रानटी शिक्षा’’ म्हणून हिनविल्या जात असतांनासुद्धा त्या शिक्षा कशा उपकारक आहेत? हे जगाला समजून सांगण्याची पात्रता सुद्धा बहुतेक मुस्लिम हरवून बसले आहेत. प्रत्येक ठिकाणी बोटावर मोजता येतील असे मुस्लिम लोक इस्लामी चारित्र्याचे मिळून येतात. अनेकांना तर स्वतःला इस्लामी चारित्र्याचे म्हणून घेण्यामध्येच कमीपणा वाटतो.म्हणून तर ते स्वतःची ओळख लपविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. इथपर्यंत अधोगती आपण साध्य केलेली आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या मुस्लिमांच्या नैतिक परिस्थितीचे आकलन केल्यावर आता आपण वर्तमान काळातील मुस्लिमांच्या चारित्र्यांचे अवलोकन करूया. 

आज प्रगतीच्या नावाखाली  बहुतेक मुस्लिमांनी फाटक्या जीन्स आणि टी-शर्ट पासून ते केक कापून/ मेनबत्या विझवून जन्मदिवस साजरा करण्यापर्यंत मजल मारलेली आहे. त्यात त्यांना वाईट काहीच वाटत नाही. आता बहुसंख्य मुस्लिमांना बँकेकडून व्याज घेतांना वाईट वाटत नाही, अश्लील टिकटॉक व्हिडीओ बनविताना वाईट वाटत नाही, ईदच्या दिवशी नमाज अदा केल्यानंतर सरळ थिएटरमध्ये जावून सलमान खानचा तदन् फालतू चित्रपट पाहतांना वाईट वाटत नाही, टीव्हीमध्ये अश्लील सिरीयल पाहतांना वाईट वाटत नाही, तंबाखूपासून ते दारू किंबहुना ड्रग्ज वापरतांना वाईट वाटत नाही, तरूणींना बुरखा न घालता समाजात वावरतांना वाईट वाटत नाही, लग्नापूर्वी प्रेमसंंबंध स्थापन करण्यामध्ये वाईट वाटत नाही, कुरआनपासून दूर गेल्याचे त्यांना वाईट वाटत नाही, भौतिक शिक्षण सुद्धा नीटपणे घेण्याची त्यांना गरज वाटत नाही, नमाजसाठी जाणे त्यांच्या जीवावर येते, मोबाईलमध्ये त्यांचा जीव गुंतून असतो, अभ्यासामध्ये मन रमत नाही. एकंदरित मुस्लिम समाजाच्या बहुसंख्य लोकांच्या चारित्र्यामध्ये त्या सर्व वाईट गोष्टींचा समावेश झालेला आहे ज्या इस्लामला मान्य नाहीत, अशा लोकांसंबंधी मौलाना मौदूदी भाकीत करताना म्हणतात की, ’’ एक कौम दुसरी कौम की नक्काली उस वक्त करती है जब वो अपनी जिल्लत और कमतरी तस्लीम कर लेती है. ये गुलामी की बदतरीन किस्म है. अपनी शिकस्त खुला हुआ एलान है. और इसका आखरी नतीजा ये है के नक्काल्ली करने वाली कौम की तहेजीब फना हो जाती है. ( दीनीयात पेज नं. 118)’’

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटले आहे, वाईट गोष्टी ज्या ठिकाणी पहाल तर तीन गोष्टीपैंकी एक गोष्ट करा-   1. जर शक्ती असेल तर त्या नष्ट करा. 2. जर शक्ती नसेल तर त्यावर टिका करा. 3. ते ही करणे शक्य नसेल तर किमान मनामध्ये त्याबद्दल घृणा निर्माण करा आणि हा ईमान (इस्लामी श्रद्धा) चा सर्वात खालचा दर्जा आहे. चारित्र्याची ही कसोटी जरी गृहित धरली तर पहिल्या, दुसऱ्या तर सोडा तिसऱ्या दर्जातही बहुसंख्य मुस्लिम बसत नाही. किंबहुना वाईट गोष्टींच्या प्रचार आणि प्रसारामध्ये बहुसंख्य मुस्लिम रात्रंदिवस व्यस्त असल्याचे गल्लीतील उन्हाड टोळक्यापासून ते बॉलीवुडच्या उन्हाड मुस्लिम अभिनेत्यापर्यंत समानता दिसून येते. स्वातंत्र्याच्या वेळेस मुस्लिमांच्या चारित्र्याचा जो ऱ्हास झाला होता व ज्याचे वर्णन मौलाना मौदूदी यांच्या लेखनीतून आपण वाचले आज 74 वर्षानंतरही मुस्लिमांच्या चारत्र्याची तीच अवस्था आहे. किंबहुना त्यात आणखीन ऱ्हास झाला आहे. हे असेच सुरू राहिले तर आणखीन 74 वर्षानंतरही हीच परिस्थिती राहील यात शंका नाही. मुस्लिमांनी कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांच्या जीवनचारित्र्यापासून काहीच बोध घेतला तरच यात फरक पडेल.  

कुरआन हा जरी अज्ञानी आणि रानटी प्रवृत्तीच्या अरब कबिल्यांतील एका आदर्श चारित्र्याच्या व्यक्तीवर अवतरित झाला असला तरी त्याच्या अवतरणाने उख्खड प्रवृत्तीचे अरब लोक कसे जगाचे इमाम बनले, याचा इतिहास सुद्धा बहुसंख्य मुस्लिमांना माहित नाही. त्यांच्या जीवनांमध्ये कुरआनने कशी किमया घडवून आणली हे जाणून घेण्याची बहुसंख्य मुस्लिमांना गरज वाटत नाही. सर्वात दुर्दैवी गोष्ट अशी की ज्या प्रेषित मुहम्मद सल्ल.चे व्यंगचित्र काढल्यामुळे मुस्लिम तरूण मरण्या आणि मारण्यासाठी एका पायावर तयार असतात त्यांना प्रेषितांचे चरित्र गंभीरपणे वाचण्याची गरज वाटत नाही. इस्लाम हा इतर धर्मांसारखा फक्त काही रितीरिवाजांपुरता मर्यादित नसून ती एक परिपूर्ण जीवन पद्धती आहे हे यांच्या गावीच नाही. इस्लामला फक्त इबादतींपुरता सीमित करून संतुष्ट राहण्यामध्ये एका मोठ्या समाजगटाचा सहभाग होता आणि आहे. त्यांनासुद्धा संपूर्ण इस्लाम लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज वाटत नाही, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. 

जगातील सर्वोत्कृष्ट नेतृत्व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिले होते. याबाबतीत प्रसिद्ध अमेरिकी लेखक मायकल एच. हार्टपासून ते सानेगुरूजीपर्यंत सर्वच बुद्धीजीवींचे एकमत का आहे? हे तपासून पाहण्याची सुद्धा गरज बहुसंख्य मुस्लिमांना वाटत नाही. ही खरी शोकांतिका आहे.

अशा परिस्थितीत असणाऱ्या लोकांसाठी कुरआनमध्ये खालील चेतावनी देण्यात आलेली आहे. ’’वस्तुस्थिती अशी  आहे की ज्या लोकांनी दावते हक (इस्लाम/ सत्य)  स्वीकारण्यास नकार दिला आहे त्यांच्यासाठी त्यांच्या कुटिलतांनाच सुंदर बनवून टाकण्यात आलेले आहे आणि ते सरळ मार्गापासून रोखले गेलेले आहेत. मग ज्याला अल्लाह पथभ्रष्टतेत राहू देतो त्याला कोणी मार्ग दाखविणारा नाही’’ (संदर्भ : कुरआन : सुरे अर्रअद आयत नं. 33) 

बहुसंख्य मुस्लिमांनी इस्लामी चारित्र्याचा त्याग केल्यामुळे जगात अन्याय आणि अत्याचारापासून अश्लीलता आणि अनाचारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. याला बिगर मुस्लिमांपेक्षा मुस्लिम जास्त जबाबदार आहेत. अशा परिस्थितीबाबत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’जेव्हा जगात बेहयाई (निर्लज्जपणा) वाढेल तेव्हा ईश्वर असे साथीचे रोग अवतरित करेल ज्यांचे नाव सुद्धा तुमच्या वाडवडिलांनी ऐकलेले नसेल.’’ (इब्ने माजा हदीस नं. 4019). 

आज आपण नेमक्या याच परिस्थितीतून जात आहोत. या परिस्थितीतून जगाला काढण्याची जबाबदारी प्रेषितांचे वारस म्हणून मुस्लिमांची आहे.  

सरशार हूं तामीरे नशेमन के जुनूं से

सय्याद का डर है ना बिजली का खतर है

पुरख्वार है राहें मेरी इसकी मुझको खबर है

बस अज्मे सफर, अज्मे सफर, अज्मे सफर है

खरे पाहता सध्या मुस्लिमांना या शेरमध्ये म्हटल्याप्रमाणे बेभान होऊन काम करण्याची गरज कोरोनामुळे निर्माण झालेली आहे आणि ही गरज भागविण्यासाठी मुस्लिमांना स्वतःमध्ये इस्लामी चारित्र्याची निर्मिती करण्याचे आव्हान पेलण्यासाठी तात्काळ तयार होण्याची गरज आहे. शेवटी ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना इस्लामी चारित्र्याप्रमाणे वागण्याची व आपला प्रिय देश आणि मानवता यांना नैतिक दिशा देण्याची समज, धैर्य, धाडस आणि शक्ती दे.’’ आमीन.

-एम.आय.शेख



शेवटी साऱ्या पाश्चिमात्य राष्ट्रांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात एकच भूमिका घेतली आहे. ती म्हणजे ह्या विषाणूचा उगम नैसर्गिकरित्या झालेला आहे अथवा चायनाने या विषाणुला लॅबमध्ये तयार केले आहे. जाणूनबुजून जैविक हत्यार बनविण्यासाठी ह्या विषाणूची निर्मिती केली गेली, की लॅबमधील काही चूक झाल्याने तो विषाणू बाहेर पडला आणि साऱ्या जगाला मृत्यूच्या दाढेत ढकलले. आजवर जी चर्चा झाली आणि होते आहे यावरून हे स्पष्ट झाले आहे की जगाच्या कित्येक राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुखांनी हे विषाणू नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित आहे, असे मत व्यक्त केलेले आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जेव्हा स्वतः आपला संशय व्यक्त करीत ह्या विषाणूचा उगम कुठून आणि कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी निश्चित केला. तपासाचे स्पष्ट संकेत असे आहेत की हा विषाणू मानव निर्मितीच आहे. यावर त्यांना काही संदेह नाही. 

चायनाची भूमिका अधिकच संशय निर्माण करणारी आहे. त्याने बाईडेनला प्रत्युत्तर देताना थेट अमेरिकेवर न्यू्नलीयर हल्ल्याची धमकी दिली. कोणत्याही राष्ट्राने असे म्हटले नसताना की चायनाने जाणून बुजून हे विषाणू निर्माण केले आहे. तेव्हा त्याने स्वतःच चौकशीसाठी पुढे यायचे होते. अंतीम युद्धाची धमकी कशाला? जेव्हा आपण काहीच केले नसेल तर चौकशीची चिंता कशाला? खुद्द त्या राष्ट्राचे हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. 80 हजाराच्या पुढे लोकांना कोविडचा संसर्ग झाला. असे असतांना त्या राष्ट्राने स्वतःच ह्या विषाणूच्या निर्मितीबद्दल वुहान लॅब जिथून हा विषाणू बाहेर पडला होता त्याची त्यातील काम करणाऱ्या वैज्ञानिक विषाणू तज्ज्ञांची चौकशी करायला हवी होती. त्यांनी तसे काही केले नाही. सुरूवातीपासूनच त्याचे म्हणणे असे आहे की, हा विषाणू वटवाघळाद्वारे माणसांत पोहोचला. याचा पुरावा त्याने जगासमोर आजवर आणलेला नाही. त्याने जे सांगितले तेख खरे आणि बाकी सारे जग खोटे असे होत नसते. सुरूवातीला जेव्हा जगभराच्या नागरिकांकडून राष्ट्रप्रमुखांकडून चायनाच्या वुहान लॅबकडे बोट दाखवण्यात येत होते तेव्हा अमेरिकी वैज्ञानिक याचा नकार करत म्हणत होते की, ह्या विषाणूबद्दल असे म्हणणे चुकीचे आहे. माणसांनी हे निर्माण केले नसेल. पण नंतर एका वर्षांनी जगातल्या बऱ्याच राष्ट्रांनी ह्या विषाणूच्या निर्मितीवर संशय घेण्याची सुरूवात केली तेव्हा प्रथम ऑस्ट्रेलिया आणि नंतर इतर राष्ट्रांचे वैज्ञानिकांचे वुहान लॅबमधून हा विषाणू बाहेर कसा पडला यावर प्रश्न उपस्थित करू लागले. 

वुहान शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वुहान शहराकडे बोट दाखवले गेले हे सत्य असले तरी थेट वुहान लॅबलाच का लक्ष्य केले गेले? हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. 

या प्रश्नाचे उत्तर अमेरिकी तज्ञांना माहित असणार आहे. कारण वुहान लॅबमध्ये सर्रास कोरोना वायरस या विषाणूचा अभ्यास केला जात होता. गेन ऑफ फं्नशनिंग या सुुत्राचा अभ्यास करीत कोणत्याही विषाणूची प्रक्रियाच आधी अभ्यास करून त्या प्रक्रियेत बदल केल्यास विषाणूदर याचा काय परिणाम होतो हा अभ्यास कोरोनावर वुहान लॅबमध्ये चालू होता. या अभ्यासाला अमेरिकेतील तज्ञ पीटर डेस्साक यांनी स्वतः निधी पुरवला होता. आणि नंतर आलेल्या बातम्यानुसार त्यांनी एकट्यानेेच नाही तर अमेरिकेचे विषाणू तज्ज्ञ डॉ. फौची यांनी देखील या प्रोजे्नटसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले होते. म्हणजे वुहान लॅबमधील घडामोडीत या दोघांचाच नव्हे तर अमेरिकेतील इतर तज्ञांचाही सहभाग होता.

सुरूवातीला जेव्हा जगाच्या इतर राष्ट्रपती प्रथम आस्ट्रेलियानंतर इटली, ब्राझील यांनी मानवनिर्मित विषाणूची भूमिका घेतली तेव्हा अमेरिकेतील तज्ञांनी लॅन्स्टेया महत्त्वाच्या नियत कालिकेत एक लेख प्रकाशित केला ज्याद्वारे हा विषाणू पशुमधून आधी वटवागुळे आणि नंतर एक वन्य प्राण्यांच्या माध्यमातून माणसांपर्यंत असे म्हटले गेले. अमेरिकेने या विषाणूच्या जगभर प्रसारात चीनद्वारे मदत केली असे म्हटले गेले तर ते चुकीच ठरणार नाही. जेव्हा सगळीकडून मानवनिर्मित विषाणूला पाठिंबा मिळू लागला तेव्हा स्वतः डॉ. फौची यांनी देखील आपली भूमिका  बदलली आता ते म्हणतात की ह्या विषाणूची लागण माणसाला पशुंच्या साह्याने झाली असेल याच्याशी ते सहमत नाहीत.

अमेरिका आणि पाश्चात्य वंशवादी राष्ट्रांना मानवजातीच्या नरसंहाराची सुरूवातीपासूनच सवय पडलेली आहे. आपल्या सभ्यतेच्या प्रसर प्रचारासाठी या राष्ट्रांना आजवर एक अब्जावर नागरिकांना ठार केले आहेत. कोरोनामुळे 40-50 लाख मारले गेले असतील तर त्यांच्याकडे काहीच नाही. या साऱ्याचा सारांश असा की अमेरिकन आणि युरोपियन वैज्ञानिकांनीच कोरोना विषाणूची निर्मिती केली पण यासाठी चायनाच्या वुहान लॅबचा वापर करून घेतला. चायनाला हा सगळा खटाटोप माहित नसेल असे नाही. त्याचेही उद्दीष्ट मानव जातीची सर्रास कत्तल करणे हाच असल्याने त्यांनी जाणून बुजून वुहान लॅबमध्ये अमेरीकी तज्ज्ञांच्या सहाय्याने जे काही चालले आहे त्यांच्याकडून डोळेझाक केली. 

आज न उद्या ह्या कारस्थानांचे सत्य बाहेर येणारच आणि त्यासाठी जे राष्ट्र जबाबदारी असतील त्यांनी त्याची किंमत मोजावी लागणार हे मात्र नक्की. 



महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय समित्यांचे नुकतेच गठण करण्यात आले आणि प्रा सदानंद मोरे यांची दुसऱ्यांदा  महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मंडळात सर्वसमावेशक मराठी भाषिकांच्या निवडी करणे अपेक्षित होते मात्र जाणून बुजून मुस्लिम समाजातील साहित्यिकांना डावलल्यावरून मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. समित्यांच्या निवडीवरून साहित्यिक क्षेत्रातून उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. 

12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अंदाजे 2 कोटी मुस्लिम समाज आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, जैन, शीख, पारसी , बौद्धधर्मीय अल्पसंख्यांकही आहेत. दोन्ही संस्थाच्या कार्यकाळी मंडळात एकही मुस्लिम, ख्रिस्ती वा जैन धर्मीय सदस्य नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य मंत्रालया अंतर्गत या नियुक्त्या होतात. महाराष्ट्राच्या  सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला फक्त हिंदूधर्मीय संस्कृती आणि साहित्य अभिप्रेत आहे काय? 

महाराष्ट्रातील मराठी भाषेवर फक्त एका धर्म विशेषाचीच मक्तेदारी आहे काय? इतर धर्मीयही साहित्यिक आहेत आणि तेही तितक्याच तन्मयतेने आणि अभिरुचीने मराठी साहित्य निर्मिती करीत आहेत. इतकेच नव्हे तर मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीद्वारे गेल्या 30 वर्षांपासून महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले जाते. विशेष म्हणजे या साहित्य संमेलनांना शासनामार्फत कोणताही निधी दिला जात नाही. मुस्लिम मराठी साहित्यिक पदरमोड करून ही साहित्य संमेलने भरवतात. 

      आज महाराष्ट्रात 1000 च्यावर मुस्लिम मराठी साहित्यिक मराठी साहित्यात मोलाची भर घालत आहेत. मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाने कथा, कविता, कादंबरी, आत्मकथन, गज़ल, बालसाहित्य, नाटक, वैचारिक लेखन अशा विविध ललित प्रकारात आपला ठसा उमटवला आहे. यात प्रामुख्याने खलील मोमीन, डॉ अब्दुल आझम, प्रा फकरुद्दीन बेन्नूर,  डॉ शेख इक्बाल मिन्ने, ए के शेख, फ म शहाजिंदे,डॉ जुल्फि शेख, डॉ अजीज नदाफ, बशीर मुजावर, रफीक सुरज, डॉ अक्रम पठाण, प्रा फातिमा मुजावर, डॉ अलीम वकील, मुबारक शेख, डी के शेख, जावेदपाशा कुरेशी, सरफराज शेख,असिफ अन्सारी, फर्जाना डांगे,साबीर सोलापुरी, इरफान शेख, शफी बोल्डेकर, हशम पटेल, रफीक काझी, कलीम अझीम, आय जी शेख, साहिल कबीर, मुहिब कादरी, हबीब भंडारी, शब्बीर मुलाणी , इक्बाल मुकादम, सय्यद मुजफ्फर या सारख्या साहित्यिकांचा सिंहाचा वाटा आहे.

असे असताना महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या शासकीय समित्यांचे गाठण होत असताना एकाही मुस्लिम साहित्यिकाची आठवण होऊ नये याचे नवल वाटते. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आहे आणि त्यांनाही याचा विसर पडावा ही शोकांतिका आहे. खरेतर ही मंडळे सर्वसमावेशक आणि भौगोलिकदृष्ट्याही समतोल राखणारी असावीत. 

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ याबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त करीत असून अशी मागणी करीत आहे की मुस्लिम मराठी साहित्यिकांपैकी किमान 4 साहित्यिकांचा समावेश या दोन्ही मंडळात करावा आणि समान संधी उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे ख्रिस्ती, जैन, आदिवासी साहित्यिकांचाही समावेश व्हावा अशी मागणी मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आणि विख्यात गजलकार डॉ इक्बाल मिन्ने, ए के शेख, प्रा लियाकत अली पटेल, शेख अन्वर जावेद, आसिफ अन्सारी, प्रा डॉ आरिफ शेख,मोहसीन खान, हबीब भंडारी, मोहसीन सय्यद, मोहसीन सय्यद, युनूस आलम सिद्दीकी, शब्बीर मुलाणी, फरजाना डांगे,आमिर इक्बाल, इंतेखाब फराश यांनी केली आहे.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget