Halloween Costume ideas 2015
Latest Post

अशफाक अहेमद यांना मी लहानपणापासून ओळखत होतो. ते अतिशय मुल्याधिष्ठित व्यक्तीमत्व होते. इस्लामी मुल्यांमध्ये त्यांची गाढ श्रद्धा होती व ही मुल्य विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून रूजविण्याकडे त्यांचा कल होता. म्हणून त्यांनी स्वत: महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांनाच लहान मुलांसाठी ’नूरी महेफिल’ नावाची चळवळ सुरू केली होती. त्यात ते दर आठवड्याला जवळपासच्या बालकांना एकत्रित करून जीवनाचा उद्देश काय असावा? नैतिकतेचे जीवनामध्ये स्थान काय?, इस्लामी नितीमत्ता जीवन जगण्यासाठी किती महत्वपूर्ण आहे? चांगली वर्तणूक कशी असावी? या बाबतीत ते अतिशय तळमळीने मुलांना मार्गदर्शन करीत असत. त्यासाठी ते कुरआन आणि हदीसमधून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांच्या बालमनावर चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असत. आपल्या महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी मौलाना आझाद कॉलेजमध्ये सर्वप्रथम एसआयओची स्थापना केली होती. एसआयओच्या माध्यमातून त्यांनी अनेक सहपाठ्यांना आणि महाविद्यालयातील इतर शाखेतील विद्यार्थ्यांना जोडण्याचे मोलाचे कार्य केले. एवढेच नव्हे तर औरंगाबादच्या आझाद कॉलेजमध्ये आजूबाजूच्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या छोट्यामोठ्या गरजा पुरविण्याकडेही त्यांचे कटाक्षाने लक्ष असे. कोणाला पुस्तकं हवीत, कोणाला वह्या हव्यात, कोणाला पेन हवा, कोणाला राहण्यासाठी अडचण असेल, कोणाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल, या सगळ्या बाबींकडे ते अतिशय कनवाळूपणे लक्ष देत. शिवाय, ते राहत असलेल्या मोहल्ल्यात आणि आजूबाजूच्या मोहल्ल्यातसुद्धा फिरून लोकांना नमाजसाठी बोलावत व इस्लामी शिक्षणाकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
    जेव्हा त्यांनी एम.ए.एमएड केले. तेव्हा त्यांनी मौलाना जाकीर हुसेन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती मिळाली तेथे त्यांनी 5 वर्षे कार्य केले. दरम्यान, शिक्षक आणि प्राध्यापकांना त्यांनी त्यांच्या जीवनाचा उद्देश्य काय असावा? त्यांच्या व्यवसायाचा उद्देश्य काय असावा? व विद्यार्थ्यांप्रती त्यांची जबाबदारी काय असावी? त्यांची स्वत:ची वर्तणूक कशी असावी? यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी त्यांचा वैयक्तिक संपर्क होता. प्रत्येकाशी ते बोलायचे, त्यांच्या काही समस्या आहेत का त्या समजून घ्यायचेे. प्रत्येकाची आस्थेवाईकपणे विचारणा करणे व प्रत्येकाची शक्य तेवढी मदत करणे हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा गुण होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर अभ्यासाचे महत्व बिंबविण्यामध्ये त्यांचा हतकंडा होता.

- प्रा.वाजीद अली खान
(अध्यक्ष, जेआएच औरंगाबाद साउथ)

मौलाना  अशफाक अहमद  यांचे 20 ऑक्टोबरला  औरंगाबाद येथील राहत्या घरी वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे बीएससी बी.एड., एम.ए.,एम.एड. पर्यंत शिक्षण झाले होते. इस्लामिक साहित्यावरही त्यांची मजबूत पकड होती. सुरूवातीला त्यांनी एका सुपरिचित शाळेत मुख्याध्यापकाची जबाबदारी स्वीकारली. एका खरेदी न केलेल्या फर्निचरच्या वाऊचरवर सही न करण्याचा पुरस्कार म्हणून व स्वत:च्या तत्वनिष्ठेमुळे त्यांना त्या नौकरीचा त्याग करावा लागला. नंतर त्यांनी जमीएत-उल-हुदा, मालेगांव या ठिकाणी मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडत असताना अचानक त्यांच्यावर जमाअत-ए-इस्लामी हिंदने आपली विद्यार्थी शाखा एस.आय.ओ (डखज) च्या राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी सोपविली. म्हणून त्यांना जमियतुल हुदाची नौकरी सोडून दिल्ली ला स्थलांतर करणे भाग पडले. आपल्या नौकरी व भविष्याची कसलीच तमा न बाळगता अश्फाक अहेमद यांंनी दिल्लीला जाऊन लोककल्याणार्थ शिक्षणाच्या जागृतीच्या कामाला वाहून घेवून जगण्यास पसंती दिली. एस.आय.ओ. मध्ये आपला सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर मागे वळून आपले जीवनमान उंचवण्याचे काम करण्याची संधी असतानाच जमात ए इस्लामी हिंद ने त्यांना त्यांच्या गुणवत्तेचा विचार करून मुख्यालयातच शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी सहाय्यक सचिव शिक्षण विभाग म्हणून नियुक्ती केली. कुठलीही सबब न सांगता त्यांनी जमात च्या शैक्षणिक विभागात मौलाना अफजल हुसैन यांचे सहायक म्हणून करण्यास सुरुवात केली व तब्बल 26 वर्षे हे सेवाकार्य करत राहिले. त्यानंतर त्यांना या विभागाचे सचिव पद बहाल करण्यात आले तेही त्यांनी अतिशय कार्यक्षमपणे सांभाळले.  दरम्यान या काळात त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनासाठी देशपातळीवर अनेक शिबिरांचे आयोजन केले. त्यांच्या सेवेची ग्वाही देशभरातील असंख्य शिक्षक, मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्थाने देत असतात व देत राहतील. दिल्ली व आजमगडच्या अनेक शैक्षणिक संस्थांशी ते संलग्न होते.
    औरंगाबाद च्या हीरा एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक अध्यक्षपदही मुहम्मद अश्फाक अहेमद यांनी भूषवीले. पन्नास (50) च्या वर दर्जेदार शैक्षणिक ग्रंथांच्या मांडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवाय, 120 पेक्षा अधिक शैक्षणिक डीव्हीडी त्यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आल्या होत्या. शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सामाजिक संस्था  दरसगाहे शहेंशाह बहाददूर शाह जफर  तर्फे बहाददूर शाह जफर यांच्या 154 व्या जयंती निमित्त अशफाक अहेमद यांना उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशंसा प्रमाणपत्राने गौरविण्यात आले होते.
    ते अतिशय तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत कमालीच्या ध्येयनिष्ठेने आपली सेवा पार पाडीत राहिले. गेली चाळीस (40) वर्षे इंसुलिन दररोज गरजेचे होते. तरी त्यांनी आपल्या परिस्थितिची कधीच तक्रार केली नाही. अल्लाह ने मानवतेच्या सेवेसाठी जी जबाबदारी आपल्या निवडक लोकांवर टाकलेली असते मौलाना अश्फाक अहेमद साहब त्यांच्या पैकीच एक होते.    

-  अब्दुल समी अन्सारी,
माजी सदस्य एसआयओ, उस्मानाबाद

अशफाक अहेमद साहेबांबद्दल माझी अशी धारणा आहे की, त्यांच्या जाण्याने माझ्यासहीत अनेक लोकांना एका डेरेदार वृक्षाची सावली हरवल्याचा अनुभव येत आहे. मी 9 वर्षाचा असतांना अकोल्यामध्ये त्यांना पहिल्यांदा ऐकलं होतं. त्यावेळेस बोलतांना त्यांनी कुरआनची एक आयत ’खदअफलाहा मन जक्काहा व मनखाबा मनदस्साहा’ (यशस्वी झाला तो ज्याने अंत:करणाची शुद्धी केली आणि अयशस्वी झाला तो ज्याने त्याला दाबून टाकले.) वाचून त्याचा अर्थ समजावून सांगितला होता. तेव्हापासून मी त्यांच्यापासून प्रभावित झालो होतो. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट माझ्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची ठरली. ते उच्चविद्याविभूषित होते. त्यांना अनेक ठिकाणी मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून मोठ्या पगाराची नोकरी करता आली असती परंतु, अतिशय कमी मानधनावर त्यांनी आपले आयुष्य जमाअते इस्लामीच्या शिक्षण विभागामार्फत समाजासाठी वाहिले. माझ्या दृष्टीने त्यांचा हा त्याग त्यांनी समाजासाठी दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. ते एक फार मोठे स्कॉलर होते. केंद्र सरकारच्या अभ्यास क्रमामध्ये इस्लामविषयी काही त्रुटीपूर्ण किंवा चुकीचा उल्लेख कुठल्या पुस्तकामध्ये अज्ञानामुळे करण्यात आला असेल अशा प्रत्येकवेळेस त्यांनी त्या त्रुटीला दूर करण्यासाठी सरकारशी संपर्क साधलेला होता आणि सरकारनेही त्यांच्या म्हणण्याला महत्व देवून अभ्यासक्रमामध्ये संबंधित ठिकाणी दुरूस्त्या केलेल्या होत्या. दिल्ली विद्यापीठामध्ये त्यांचे शिक्षणशास्त्रावर अनेक लेक्चर्स होत असत. ते एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या देखरेखीखाली देशातील शेकडो शाळा आणि महाविद्यालयात शिकविले जाणारे अभ्यासक्रम दुरूस्त करण्यात आले होते. हजारो शिक्षकांची  फळी त्यांनी आपल्या देखरेखीखाली तयार केलेली आहे जी देशभर कार्य करत आहे.  देशभरात चालणाऱ्या दीनी मक्तबसाठी त्यांनी अभ्यासक्रम तयार केला होता व तोच आज अनेक मक्तबमधून देशभर शिकविला जातो. दारूल उलूममधील शिक्षकांना त्यांनी मदरश्यामध्ये कसे शिकवावे (टेक्निक ऑफ एज्युकेशन) यावर मार्गदर्शन केलेले होते. औरंगाबादमध्ये त्यांनी अल-हिरा नावाने फार मोठी शिक्षणसंस्था उभी केली. ही संस्था म्हणजे एक शैक्षणिक चळवळ आहे. त्यांनी देशभरातील अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी एक पद्धत विकसित केली होती. त्यासाठी त्यांनी चार्टस् तयार केले होते. त्या चार्टस्मधून सहजपणे लक्षात येत होते की, कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्या गोष्टींची उणीव आहे व कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत. एका दृष्टीक्षेपातच शैक्षणिक संस्थेचा दर्जा लक्षात येऊन त्याला ग्रेड देता येणे शक्य होते. 50 पेक्षा अधिक पुस्तकांमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणल्या.
    जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या एस.टी. कॉलनीमध्ये त्यांचे घर आहे. याच घरामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला.  त्यांची कधीही नमाज कजा होत नव्हती. फजरमध्ये ते सर्वात अगोदर यायचे. शेवट्या दिवशी ही ते सर्वात अगोदर आले होते आणि नमाज झाल्यानंतरही उशीरापर्यंत एकांतात अल्लाहच्या हुजूरमध्ये शांतपणे बसून होते. त्यांची नमाजे जनाजा औरंगाबादच्या जामा मस्जिदमध्ये जी की देशातील मोठ्या मस्जिदींपैकी एक मस्जीद आहे अदा करण्यात आली व  काली मस्जिद कब्रस्तानमध्ये त्यांच्यावर दफनविधी पार पडला. त्यांच्या जनाजामध्ये सर्वस्तरातील मोठ्या प्रमाणात लोक सामील होते. औरंगाबादमध्ये आतापर्यंत मी पाहिलेल्या जनाज्यांपैकी हा एक मोठा जनाजा होता. विशेषमध्ये म्हणजे त्यात इस्लामच्या प्रत्येक शाखेतील लोक सामील होते.
 
- मौलाना इलियास फलाही
शहर संघटक जमाअते इस्लामी हिंद, औरंगाबाद

आज एका वेगळ्या आणि रोचक अशा विषयावर आपल्याला चर्चा करावयाची आहे. विषय पृथ्वीवर मनुष्याच्या अस्तित्वाचा आहे. तर चला पाहूया पृथ्वीवर मनुष्याची निर्मिती कशी झाली? खरे तर या प्रश्नाचे उत्तर आजपावेतो विज्ञानालाही आत्मविश्वासाने देता आले नाही. याबाबतीत विज्ञानाकडे दोन मतप्रवाह प्रचलित आहेत. पहिला मतप्रवाह असा की, लाखो वर्षापूर्वी अवकाशात एक आगीचा गोळा होता तो इतका उष्ण झाला की कालांतराने त्यात एक महाविस्फोट झाला व त्याचे अनेक तुकडे झाले व ते अवकाशात, ग्रह-ताऱ्यांच्या रूपात सूर्याभोवती तरंगू लागले. पृथ्वीसुद्धा त्या तुकड्यांपैकी एक तुकडा आहे. कालांतराने ती थंड झाली व त्यावर अस्तित्वात असलेल्या पाण्यातून सुरूवातीला एक पेशी व त्यानंतर अनेक पेशींच्या जीवांची निर्मिती झाली. मनुष्यही त्यांच्याचपैकी एक होय. याला ’बिगबँग थेअरी’ असे म्हणतात. दूसरा मतप्रवाह डार्विनला माणणाऱ्यांचा आहे. डार्विणचा उत्क्रांतीचा सिद्धांत आज 21 व्या शतकातही बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय आहे. डार्विणच्या मते माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली.मात्र हा मतप्रवाह माणणाऱ्यांना दोन प्रश्नाची उत्तरे आजपावेतो देता आलेली नाहीत. 1. माकडांमध्ये उत्क्रांती होवून त्यांचा मनुष्य झाला तर सर्व माकडांमध्ये ही प्रक्रिया का झाली नाही? आज जी कोट्यावधी माकडे पृथ्वीवर माकड म्हणून जन्माला येतात व माकड म्हणूनच मरतात ते कसे काय? 2. फक्त माकडांमध्येच उत्क्रांती का झाली? त्या काळात अस्तित्वात असलेल्या गाढ, हत्ती, घोडे वगैरे प्राण्यांमध्ये उत्क्रांती का झाली नाही?
    अलिकडे अमेरिकेमध्ये एका तिसऱ्या मतप्रवाहाचा जन्म झालेला आहे. तो काय हे आपण पुढे पाहूच. अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इकॉलॉजीस्ट (पर्यावरणतज्ज्ञ) डॉ. अॅलिस सिल्व्हर यांनी एक आश्चर्यजनक दावा केलेला आहे की, ’ मनुष्य हा पृथ्वीवरचा मूळ निवासी नाहीच. इथे तो एलियन (परग्रही जीव) आहे. वास्तविक पाहता त्याची निर्मिती दुसरीकडे कुठेतरी झालेली आहे व कालांतराने, काही कारणाने त्याला पृथ्वीवर पाठविण्यात आले असावे आणि मग येथे माणसांचा विस्तार झाला असावा. हा दावा त्यांनी आपले प्रसिद्ध पुस्तक ’ह्युमन्स आर नॉट फ्रॉम अर्थ’ अर्थात ’मनुष्य हा पृथ्वीचा रहिवाशी नाही’ या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक अॅमेझॉनवर उपलब्ध असून, त्याला पाच पैकी चार स्टार मिळालेले आहेत. हे पुस्तक बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. या पुस्तकामध्ये केलेले दावे खालीलप्रमाणे -
    1. मणुष्य ज्या ठिकाणी जन्माला आला त्या ठिकाणची गुरूत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षण शक्ती यामध्ये फार फरक आहे. ज्या ग्रहावरून तो आला आहे त्या ग्रहावरची गुरूत्वाकर्षण शक्ती ही फार कमी असावी. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला चालणे, फिरणे व वजन उचलणे यामध्ये फारसा त्रास होत नसावा. मात्र पृथ्वीवर त्याला हा त्रास होतो. पाठीच्या कण्याचे जेवढे विकार माणसाला होतात त्या पाठिमागे पृथ्वीवरचे गुरूत्वाकर्षण हेच प्रमुख कारण आहे. कारण की, पृथ्वीवरचे मूळ रहिवाशी (जनावरे) जे आहेत त्यांचा पाठीचा कणा हा आडवा (हॉरिझाँटल) म्हणजे पृथ्वीला समांतर असा आहे, मात्र माणसाच्या पाठीचा कणा उर्ध्वगामी (उभा) म्हणजे व्हर्टीकल आहे, म्हणून त्याला पृथ्वीवरील मूळ प्राण्यांच्या तुलनेत जास्त त्रास होतो.
    2. मनुष्यामध्ये जेवढे काही स्थायी आजार आढळतात तसे आजार पृथ्वीवरील मूळ रहिवाशी असलेल्या जनावरांमध्ये आढळत नाहीत. डॉ. अॅलीसच्या मते पृथ्वीवर एकही असा मनुष्य नाही ज्याला काही ना काही आजार होत नाही. या उलट जनावरांना तात्पुरते काही आजार होतात व नैसर्गिकरित्या आपोआप कमी होतात. त्यांना कुठल्याही इस्पीतळात जावे लागत नाही. काही कारणाने गुरांच्या रूग्णालयात नेले तरी आजार तात्पुरते असतात.
    3. मनुष्य हा सूर्यप्रकाशात फार काळ राहू शकत नाही. राहिल्यास त्याला उष्माघाताचा त्रास होतो. याउलट पृथ्वीच्या मूळ रहिवाश्यांना सूर्य प्रकाशाचा कधीही त्रास होत नाही. सतत सूर्यप्रकाशात राहूनसुद्धा त्यांना उष्माघात तर सोडा साधा त्वचेचा रोग होत नाही.
    4. प्रत्येक माणूस कधी ना कधी आयुष्यामध्ये अशा पद्धतीने उदास होवून जातो की जसा आपल्या गावापासून लांब गेलेला प्रवासी उदास होवून जातो. जनावरांमध्ये अशी प्रक्रिया होत नाही.
    5. जमिनीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक प्राण्याचे तापमान बाहेरील वातावरणाप्रमाणे आपोआप रेग्युलेट (नियमित) होत असते. उदा. कडक उन्हामध्ये त्यांच्या शरीराचे तापमान जे असते ते चटकन ऊन जावून सावली आल्याक्षणी बदलून जाते. याउलट माणसाचे असते. त्याच्या शरीराचे तापमान स्वयंचलितरित्या नियमित होऊ शकत नाही. उलट वातावरणाच्या बदलामुळे तो आजारी पडतो. त्यासाठी वैद्यकीय शास्त्रात ’व्हायरल डिसीज’ हा शब्दच प्रचलित आहे.
    6. माणसाचा डीएनए पृथ्वीवरील इतर जीवांपेक्षा उच्च दर्जाचा आहे.
    7 पृथ्वीच्या मूळ रहिवाशांना अन्न शिजवून खावे लागत नाही ते सरळ निसर्गातून अन्न प्राप्त करतात आणि कुठलीही प्रक्रिया न करता खातात. या उलट माणसाला अगोदर अन्न शिजवून मऊ करून आपल्या पाचन शक्तीच्या अनुकूल बनवावे लागते. तरच ते खाता येते. पाचनशक्तीतील हा फरक मनुष्य हा या पृथ्वीवरचा रहिवाशी नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. जेव्हा मनुष्य हा आपल्या मूळ ग्रहावर होता तेव्हा त्याला अतिशय उच्च दर्जाचे अन्न मिळत असावे. जे की, तो कुठल्याही प्रक्रियेशिवाय ग्रहण करीत असावा.
    8. पृथ्वीच्या मूळ रहिवाशांचे वर्गीकरण दोन प्रकारात करता येते. एक शिकार तर दूसरा शिकारी. दररोज उगवत्या सूर्याबरोबर प्राणी अन्नाच्या शोधात निघतात. काही शिकार करतात तर काही शिकार होऊन जातात. माणसाचे असे नसते.
    9. माणसाला वातावरणापासून स्वतःची रक्षा करण्यासाठी ठोस अशा घरांची आवश्यकता असते. माणसाव्यतिरिक्त पृथ्वीवरील इतर मूळ रहिवाशांना अशी गरज भासत नाही. ते बिळामध्ये, पाण्यामध्ये किंवा झाडाच्या फांदीवर कुठेही सहज राहू शकतात.
    10. माणसाला झोपण्यासाठी अतिशय सुरक्षित आणि मऊ असे अंथरून लागते. जे की, पृथ्वीच्या मूळ रहिवाशांना लागत नाही. यावरून सिद्ध होते की, मनुष्य ज्या मूळ ठिकाणाहून आलेला आहे त्याठिकाणी त्याच्या राहण्याची आरामदायी (लक्झरीयस) व्यवस्था होती. जी त्याच्या शरीराच्या नाजूकपणाच्या अनुकूल अशी होती. पृथ्वीवर हजारो वर्षांपासून राहूनसुद्धा त्याच्या प्रकृतीत आणि नजाकतीमध्ये फरक पडलेला नाही, याचा अर्थ त्याला पृथ्वीशी कधीच एकरूप होता येणार नाही म्हणून त्याला कधी ना कधी आपल्या मूळ ग्रहावर परत जावेच लागेल.
    11. पृथ्वीच्या मूळ रहिवाश्यांच्या डोक्यामध्ये जरी मेंदू असला तरी त्याला समज माणसाएवढी देण्यात आलेली नाही. 40 किलोचा माणूससुद्धा चारशे टन वजणाच्या हत्तीला त्याच्या मस्तकावर बसून लिलया हाताळू शकतो. माणसाला अफाट विचार शक्ती दिली गेलेली आहे. डॉ. अॅलिस सिल्व्हर इथपर्यंत म्हणतात की मनुष्य हा कुठल्यातरी अपराधाची शिक्षा भोगण्यासाठी कदाचित या ’क’ दर्जाच्या तुरूंग रूपी पृथ्वीवर पाठविण्यात आलेला असावा. येथील शिक्षा भोगून त्याला परत आपल्या मूळ ग्रहावर जावयाचे आहे.
    12. ते पुढे म्हणतात, माणसाने केलेल्या भौतिक प्रगतीवरून एक गोष्ट लक्षात येते की, त्याला पृथ्वीवर येवून काही हजार वर्षे झाली असावीत व आल्यापासून तो या पृथ्वीला आपल्या मूळ ग्रहासारखे आलीशान रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे. याच घटनाक्रमामध्ये तो कधी चाकेचा शोध लावतो तर कधी टेलीफोनचा, कधी पेनचा शोध लावतो तर कधी विमानाचा. एकंदरित आपल्याला सुसंगत अशा सोयी सुविधा त्याने अगदी अलिकडच्या काळात मिळविलेल्या आहेत. तो जर का लाखो वर्षाचा इथला रहिवाशी असता तर हे संशोधन कधीचेच करून मोकळा झाला असता. शेकडो वर्षापासून त्याचा उपभोग मनुष्य घेतांना आढळून आला असता.
    या आणि यासारखे अनेक तर्क डॉ. अॅलीस यांनी आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून आजपर्यंत कोणीही त्यांच्या या तर्कांना छेद देण्याचे धाडस करू शकलेला नाही.
    या संबंधी ज्युडाईजम, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम या तिन्ही एक ईश्‍वर माणणाऱ्या धर्माममध्ये माणसाच्या उत्पत्तीचा एकच सिद्धांत मांडलेला आहे, तो म्हणजे माणसाची रचना अल्लाहने स्वतः करून त्यांची जन्नतमध्ये राहण्याची सोय केली. यात एक स्त्री आणि एक पुरूष होते. त्यांचे नाव बायबलमध्ये अॅडम आणि ईव्ह तर कुरआनमध्ये आदम आणि हव्वा असे नमूद आहे. त्यांना जन्नतमध्ये एक विशिष्ट अशा झाडाचे फळ खाण्यापासून प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र सैतानाने शपथा घेऊन-घेऊन त्या दोघांना फसविले आणि ते फळ खाण्यास प्रेरित केले. त्यांनी ते फळ खाल्ले आणि अल्लाहच्या कोपाचे पात्र झाले. तेव्हा त्यांना पृथ्वीवर पाठवून देण्यात आले. या संदर्भात कुरआनमधील सुरह ’ताहा’च्या आयत क्र. 116 ते 124 मध्ये या संबंधीचा घटनाक्रम खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला आहे - आम्ही जेव्हा दुतांस (फरिश्ते) यांना आदमसमोर नतमस्तक होण्यास सांगितले तेव्हा ते सारे नतमस्तक झाले पण इब्लिस (सैतान) ने नतमस्तक होण्यास नकार दिला. - म्हणून आम्ही आदमला सांगितले हा तुझा आणि तुझ्या पत्नीचा वैरी आहे. त्याने तुम्हा दोघांना जन्नतबाहेर घालवू देऊ नये (असे झाल्यास) तुम्ही संकटात सापडाल. - इथे तुम्हाला उपाशी रहावे लागत नाही की उघडे रहावे लागत नाही. - तसेच इथे तुम्हाला ना तहान लागते ना उन्हाची झळ पोहोचते. - पण सैतानने त्यांना भुलविले आणि म्हणाला, ”आदम ! मी तुला शाश्‍वत जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला वृक्ष दाखवू? आणि असे राज्य ज्याला अंतच नाही? मग त्या उभयंतांनी त्या झाडाचं फळ खाल्ल आणि त्यांची गुप्तांग उघडी पडली. मग ते स्वर्गातील झाडांच्या पाणांनी आपले शरीर झाकू लागले. त्यांनी आपल्या विधात्याशी दगा केला. ते भरकटून गेले. - पण त्यांच्या विधात्याने मात्र त्यांचा स्विकार केला. त्यांच्याकडे वळला आणि त्यांना मार्ग दाखविला. - आणि म्हणाला, ”तुम्ही सर्व इथून जा, तुम्ही एकमेकांचे वैरी ठराल, मात्र माझ्याकडून तुमच्याकडे मार्गदर्शन आल्यास जे माझ्या मार्गदर्शनाचे पालन करतील ते कधीच भरकटणार नाहीत अथवा अभागी ठरणार नाहीत. - जर माझ्या आठवणीकडे पाठ फिरविली तर त्यांचे जगणे अडचणीचे होईल आणि पुनरूत्थानाच्या दिवशी (द डे ऑफ जजमेंट) आम्ही त्यांना आंधळे उभे करू.
    वाचकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की डॉ. अॅलीस सिल्व्हर हे नास्तीक असून एक वैज्ञानिक आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकात जो युक्तीवाद केलेला आहे तो कुठल्या धर्मगुरूने केलेला नाही. म्हणून प्रत्येक बुद्धीजीवी व्यक्तीसमोर यापुढे फक्त दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक - तर डॉ. अॅलीस यांचा युक्तीवाद खोडून काढणे किंवा दोन - त्यांचा युक्तीवाद मान्य करणे. म्हणजेच पर्यायाने कुरआनच्या सुरे ताहामध्ये आलेल्या वर नमूद आयातींवर विश्वास ठेवणे. आपण बुद्धिवादी आहात आता निर्णय आपल्या हाती आहे.


- एम.आय. शेख
9764000737

जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या शिक्षणविभागाचे माजी सचिव अशफाक अहेमद यांचे निधन

अशफाक अहेमद हे एक अतिशय प्रामाणिक आणि गंभीर प्रवृत्तीचे व्यक्ती होते. शिक्षण व प्रशिक्षण घेण्यात व देण्यात त्यांचा हतकंडा होता. माझा त्यांच्याशी संबंध मी एसआयओमध्ये असतांनापासूनचा होता. प्रत्यक्ष संबंध येण्यापूर्वीसुद्धा मी त्यांना जमाअते इस्लामी हिंदचे एक आदरणीय सदस्य म्हणून ओळखत होतो. मात्र ज्यावेळेस ते एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हा मी महाराष्ट्र जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत होतो. जेव्हा मी दिल्ली मुख्यालयात गेलो तेव्हा मी त्यांच्या शेजारच्याच खोलीत राहत होतो. तेव्हा माझा त्यांच्याशी रास्त संबंध आला. त्यांनी आणि मी दोघांनी ताबीश मेहदी साहेबांकडून कुरआनचे उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त केले आहे. त्यासाठी ताबीश साहेब आम्हाला त्यांच्या सवडीनुसार कधी उशीरा रात्री तर कधी भल्या पहाटे फजरपूर्वी बोलवून घेत. अशफाक साहेब मला घेऊन बरोबर वेळेवर जात होते. हे शिक्षण तब्बल दोन वर्षे चालले आणि आम्ही कुरआनच्या सखोल ज्ञानापर्यंत पोहोचलो.
    सेवानिवृत्तीनंतर औरंगाबादला परत आल्यावर या वयात सुद्धा त्यांनी जामियतुल सुफ्फामध्ये अरबी भाषेच्या कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. सतत शिकत राहण्याचा त्यांचा गुण वाखाण्याजोगा होता. औरंगाबाद येथील अल हिरा या प्रथितयश शिक्षण संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांचा कल इस्लामी मुल्यांना शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमामध्ये सामील करण्याकडे होता. त्यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलेले अनेक शिक्षक आणि जमाअतचे सदस्य हे भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले असून, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते आपली सेवा बजावत आहेत. शिक्षणामध्ये त्यांची विलक्षण रूची पाहून जमाअतनेही त्यांना शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून नेमले होते. त्यांच्यापूर्वी अफजल हुसैन यांना जमाअतमध्ये शिक्षणतज्ज्ञ मानले जाई. सुरूवातीला अशफाक साहेबांनी त्यांचे सहाय्यक म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम सुरू केले. त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम मर्कजी मक्तबा तर्फे प्रकाशित करण्यात आला असून, त्यामध्ये त्यांनी अनेक सुधारणा केल्या. शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे कामही त्यांनी खूबीने केले. अमीरे जमाअत यांच्या अनुपस्थितीत मुख्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांचे आदरातिथ्य करून त्यांची कामे ते हिरहिरीने करीत. एक मोठा काळ त्यांनी मर्कजमध्ये घालविला. ते एक त्यागी व्यक्तीमत्व होते. कसलीही कौटुंबिक अडचण आली तरी ते कार्यालयातूनच हाताळत. कोणतेही दिलेले काम ते जबाबदारीने पार पडत.
    त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे वैशिष्ट्ये हे ही होते की, त्यांच्यासमोर कोणाविषयी वाईट बोलल्याचे त्यांना खपत नसे. त्यांच्या मनामध्ये इतरांबद्दल प्रेमच होते. त्याचा अनुभव मला त्यांच्यासोबत राहतांना आला. त्यांच्यासारखा मेहमान नवाज व्यक्ती मी पाहिला नाही. भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांचे आतिथ्य ते आवर्जुन करत. त्यामुळे दिल्लीत बाहेरून येणाऱ्या लोकांना त्यांचा मोठा आधार होता. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरातून मला भ्रमणध्वनी येत आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. मला तर ते मोठ्या भावासारखे होते. त्यांनी मानसशास्त्रामध्ये एम.ए. केले होते. त्यामुळे त्यांना लोकांची मानसिकता चांगल्या प्रकारे समजत होती. दुर्देवाने त्यांना एसआयओमध्ये असतानाच मधुमेह झाला होता. त्यांना इन्सुलीन घ्यावे लागत होते. मध्ये त्यांना पक्षाघातही झाला होता. एवढ्या व्याधी असतांनासुद्धा ते सतत शैक्षणिककार्यात व्यस्त राहत. शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले त्या दिवशीसुद्धा ते सकाळी रूग्णालयात जावून स्वतःची टू-डी चाचणी करून आले होते. शुक्रवारची नमाज अदा केली आणि तीन वाजेपासून शैक्षणिक संस्थेची बैठक घेत होते. घरी गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांचे निधन झाले. इन्नालिल्लाहि व इन्ना इलैहि व राजेऊन.
    हजला गेलेल्या एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर स्मितहास्य असलेला चेहरा मी व्हॉटस ऍपवर पाहिला होता. अशफाक अहेमद साहेबांच्या अंत्यविधीमध्ये मी सामील होतो. यावेळी त्यांच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य होते. हे पाहून माझ्या मनाला समाधान वाटले.
    मी त्यांच्यासाठी दुआ करतो की, अल्लाहने त्यांनी केलेल्या सेवेचा स्विकार करावा आणि त्यांना जन्नतमध्ये उच्च सन्मान अता करावा. आमीन.

- तौफिक असलम खान
प्रदेशाध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र

केरळमधील साबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयामधील महिलांना प्रवेश देण्याचा प्रश्न खुद्द या राज्याच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहे. साबरीमाला मंदिरासंदर्भातील वादामध्ये न्यायव्यवस्था,  वेळोवेळी सत्तेत असलेली राज्य सरकारे, पुरोहित वर्ग, सामाजिक-धार्मिक संघटना आणि सर्व वयाचे व लिंगांचे भक्त यांचा सहभाग आहे. सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निर्णय सप्टेंबर २०१८ मध्ये जाहीर झाला आणि या दृष्टिकोनांमधील मतभिन्नतांनी राजकीय चिरफळ्याही आणखी रुंदावल्या आहेत. एका सुट्या गटाने या बंदीला २००६ साली सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.  तेव्हापासून राज्य सरकारने या प्रश्नावरील आपली भूमिका न्यायालयासमोर वारंवार बदलली आहे. २००६ साली व आता २०१८ सालीही सत्तेत असलेल्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारने या  बंदीला विरोध केला आहे, तर संयुक्त लोकशाही आघाडीने या बंदीला पाठिंबा दिला होता. न्यायालयीन निवाड्यामुळे या वादाला पूर्णविराम मिळाला आहे, परंतु राजकीय पक्षांनी आता रस्त्यावर  उतरून यासंबंधीचा वाद पुढे न्यायचा निर्धार केला दिसतो. (मार्क्सवादी) भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपली भूमिका कायम ठेवली असून त्रावणकोर देवास्वम मंडळाला त्यानुसार कार्यवाही करायला  भाग पाडायचे ठरवले आहे, तर प्रभुत्वशाली नायर जातीच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष (भाजप) यांनी या याचिकेच्या पुनर्विचाराची मागणी केली आहे.  भारतातील मुख्य राजकीय अंतर्विरोधच धर्माच्या भोवती तयार झालेला दिसतो. याला मुख्यत्वे राजकीय पक्षांनी व त्यांच्या साथीदारांनी अधिकाधिक खतपाणी घातले. पूर्वीपासून विविध प्रकरणे  प्रमाणाबाहेर उचलण्यात आली, त्यातून मतांचे व त्यानंतरच्या निकालांचे ध्रूवीकरण साधण्यात आले. तिहेरी तलाक व साबरीमाला या दोन खटल्यांमध्ये संपूर्णत: परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या  राजकीय पक्षांची द्विभाजन वृत्ती व संधिसाधूपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. मतपेढीचे राजकारण आणि धार्मिक/सामुदायिक सुधारणांच्या व्यापक मागण्या यांच्या गदारोळात लिंगभावात्मक न्यायाला दुय्यम स्थान दिले जाते. ज्या प्रकारे तेथे स्त्री – पुरुषांचे शबरीमाला संदर्भात आंदोलन चालले आहे, ते पाहिले तर बाबरी मस्जिद आंदोलनाची पुनरावृत्ती घडवण्याचा आणि त्याचा  राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न तर नाही ना असा प्रश्न पडल्याविना राहात नाही. सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिरात महिलांवरील प्रवेशबंदी उठविल्यानंतर मस्जिदप्रवेशाच्या अज्ञानापोटी  केरळमधीलच मुस्लिम महिलांच्या फोरमने (एनआयएसए) मुस्लिम महिलांना मस्जिदप्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. खरे तर इस्लाम आणि भारतीय उपखंडातील  मुस्लिम यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे. महात्मा जोतिबा फुले, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयावर चर्चा केली आहे. भारतीय समाजव्यवस्था जातीवर्ग  वर्चस्व मानणारी समाजव्यवस्था आहे. उपखंडात विविध कारणांमुळे लोकांनी इस्लाम स्वीकारला जरूर परंतु परिपूर्ण इस्लामी तत्त्वज्ञान आत्मसात न करता भारतीय रूढीपरंपरांचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला. भारतीय मुस्लिम समाजात आढळणाऱ्या अनिष्ठ रूढी किंवा परंपरा या परिप्रेक्षातच पाहाव्या लागतील.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी  मदीना येथे पहिल्या मस्जिदीची स्थापना केली तेव्हा ती मस्जिद सर्वांसाठी खुली होती. मुस्लिम स्त्री-पुरुषांसह खिस्ती आणि यहुदी लोकांनाही मस्जिदीत प्रवेश होता.  इस्लाम स्त्री आणि पुरुषांना मस्जिद प्रवेशाचा समान अधिकार देतो. प्रेषितांच्या काळी महिला मस्जिदीत जाऊन प्रार्थना करायच्या आणि त्यांना प्रवेशास कसलाही मज्जाव केला जात नसे. स्त्रिया  आपल्या सोयीनुसार मस्जिदीत जायच्या, नमाज अदा करायच्या. प्रेषितांच्या काळापासून आजपर्यंत भारतीय उपखंड वगळता जगातील कोणत्याच देशात मस्जिदीत स्त्रियांना प्रवेशबंदी नाही. आजदेखील जगातील सर्वोच्च मस्जिद महिलांसाठी २४ तास खुली आहे. मस्जिदीत जाऊन दिवसातून पाच वेळेस सामूहिकरित्या नमाज अदा करणे मुस्लिम पुरुषांसाठी बंधनकारक आहे तर  स्त्रियांसाठी तो ऐच्छिक आहे. पुरुषाने दिवसातून ५ वेळेस सामूहिकरीत्या मस्जिदीत नमाज अदा करावी, असा दंडक आहे. परंतु जर तो कामाच्या ठिकाणी असेल, त्याच्या जवळपास मस्जिद नसेल  तर तो एकटाच नमाज अदा करू शकतो. स्त्रीला याबाबतीत मात्र सवलत देण्यात आली आहे. सामूहिक नमाज तिच्यासाठी अनिवार्य नाही. ती जेथे आहे तिथेच एकट्याने दिवसांतून पाच वेळची  अनिवार्य नमाज अदा करू शकते. मस्जिद प्रवेश तिचा धार्मिक हक्क आहे खरा, परंतु तिची इच्छा असेल तरच! तिला मस्जिदीत जाण्यापासून थांबविण्याचा अधिकार कोणालाच नाही. सध्या  देशभरात अनेक ठिकाणच्या मस्जिदी महिलांसाठी खुल्या आहेत. केरळ हे साम्यवाद्यांच्या प्रभावाखालील राज्य. परंतु तेथे धार्मिक भावनाही तितक्याच तीव्र आहेत. अशा वेळी शबरीमाला आणि  मस्जिद प्रवेश यासारख्या विषयामध्ये धार्मिक उन्माद माजवणे म्हणजे मतांच्या गणितांना समोर ठेवून खेळलेली खेळी असू शकते. अशा संवेदनशील विषयांचा राजकीय लाभासाठी वापर  करण्यासाठी अशा विषयांना चिथावणी दिल्याने काही साध्य होणार नाही. समाजामध्ये सकारात्मक रीतीने अशा प्रथांबाबत जागृती करण्याची खरी आवश्यकता आहे.

-शाहजहान मगदुम
( मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget