Halloween Costume ideas 2015
Latest Post

जमाते इस्लामी हिंद च्या राज्यव्यापी नशा विरोधी अभियानाची सुरुवात दि. 02/10/2018 झाली आहे. आठवडाभर चाललेल्या या मोहीमेद्वारे विविध कार्यक्रमांद्वारे नशापान सर्व प्रकारचा व्यसनाधिनता कशी समाज विघातक आहे याबाबत चे प्रबोधन, मार्गदर्शन,समुपदेशन व उपचार केले गेले.
    सर्व प्रकारचे व्यसन हे समाजासाठी फार घातक असल्याचे आज जनसामान्यांच्या लक्षात आलेले आहे. पण नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी काही अहवाल पाहूया.
1) भारत सरकारद्वारे संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की अमली पदार्थांच्या तस्करीत तब्बल 455% ची वाढ झालेली आहे. ही अकड़े वारी फक्त 3 वर्षाची आहे म्हणजे 2011 ते 2013 या दरम्यान अधिकार्‍यांनी 105173 टन अमली पदार्थ जप्त केले आहे 64737 न्यायलयीन प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
2) इकॉनोमिक टाइम्स च्या 22 जुलाई 2016 च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्य मादक पदार्थ सेवनामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये देशात सगळ्यात अग्रेसर राज्य आहे.
3) अमली पदार्थ सेवन करून करण्यात येणार्‍या आत्महत्या पैकी जवळजवळ 40 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत असतात.
4) इंडियन एक्सप्रेस 25 जुलै 2016 नुसार दर 96 मिनिटात एक भारतीय अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू पावतो.
5) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (थकज) ची एक रिपोर्ट सांगते व्यसनाधीनतेमुळे  होणार्‍या अकाली मृत्यूमध्ये 1 ते 5 या गुणांका मध्ये भारतीय 4 क्रमांकावर येतात.
    असे अनेक धक्कादायक रिपोर्टस आपल्याला ऑनलाईन वाचता येतील.
व्यसनां बाबतीत इस्लामी धोरण :
मदिरा व कुरआन
1) हे श्रद्धावंतांनो, ही दारु आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.  (5:90)
2) शैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारु व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल?  (5:91)
3) अल्लाह व त्याच्या पैगंबराचे म्हणणे मान्य करा आणि अलिप्त राहा, परंतु जर तुम्ही अवज्ञा केली तर हे समजून असा की आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे आदेश पोहचविण्याची फक्त जबाबदारी होती.   (5:92)
मदिरा पैगंबरांच्या दृष्टीने
मदिरेबद्दल पवित्र कुरआनमध्ये जे काही सांगण्यात आले आहे, त्याचे स्पष्टीकरण पैगंबर मुहम्मद (स) यांच्या अनेक कथनांवरुनही होते. पैगंबरोनी सांगितले आहे, प्रत्येक नशा आणणारी मादक वस्तू ख़म्र (दारु) आहे , अशी प्रत्येक वस्तू निषिध्द आहे.
    पैगंबर सल्ल. यांनी आणखी म्हटले आहे, ’नशा आणणारे प्रत्येक पेय निषिध्द आहे आणि प्रत्येक मादक व अंमली वस्तू मी वर्ज्य करतो.’ मद्याचे दुष्परिणाम आणि तिच्यापासून होणार्‍या हानीबद्दल इस्लामच्या दृष्टिकोनाचे अनुमान केले जाऊ शकते, अल्लाहचे पैगम्बर (सल्ल.) यांनी सांगितले की, अल्लाहने धिक्काराचा वर्षाव केला आहे मद्यावर (दारुवर), ते पिणार्‍यावर, प्यायला देणार्‍यावर, त्याची विक्री करणार्‍यावर, ते खरेदी करणार्‍यावर त्याचे उत्पादन करणार्‍यावर, ज्यांच्याखातर त्याचे उत्पादन केले जाते त्यांच्यावर, त्याची वाहतूक करणार्‍यावर आणि ज्याच्याकडे ते आणले जाते त्याच्यावरही. दारुबद्दल इस्लामचा कडकपणा इतका आहे की एकदा एका माणसाने पैगंबर (सल्ल.) यांना प्रश्‍न केला,  औषधामध्ये आणि औषधी स्वरुपात दारुचा वापर करण्याची परवानगी आहे काय? तेव्हा पैगंबरांनी सांगितले,  दारु औषध नाही तर तो एक रोग आहे.’
    व्यसनाधीनता एक मानसिक रोग असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा मान्य केले आहे. त्या अनुषंगाने प्रबोधन मार्गदर्शन समुपदेशन व अध्यात्म या माध्यमांबरोबर वैद्यकीय शास्त्राच्या मदतीने सुद्धा या भस्मासुराचा मुकाबला करणे अनिवार्य झाले आहे. या अनुषंगाने व्यसन मुक्ती केंद्रांमार्फत हे आव्हान पेलण्याचे गतिमान काम महाराष्ट्रात माजी समाजकल्याण मंत्री शिवाजी मोघे साहेबांच्या कालखंडात महाराष्ट्रभरातील जिल्हानिहाय व्यसन मुक्ती केंद्रांनी हाती घेतले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील दर्जेदार व्यसन मुक्ती केंद्र येरमाळा येथे आहे. येडाई व्यसनमुक्ती केंद्राद्वारे डॉक्टर संदीप तांबारे व त्यांचे सहकारी अगदी तळमळीने हे सेवा कार्य करत आहेत. त्यांच्याकडून संकलित केलेल्या माहितीची काही ठळक मुद्दे आपल्या समोर मांडत आहे :
    सर्वात आधी व्यसने जडण्याची कारणे  प्रामुख्याने दोन असतात :
1)  माणसाला उत्तेजनाची (स्टीमुलेशन) पावलो-पावली गरज पडत असते अशा वेळी मादक पदार्थांनाच बळी पडण्याची शक्यता जास्त असते
2)  सामाजिक आव्हाने पेलू न शकण्याची तीव्र भावना निर्माण होणे.
    आता व्यसनमुक्तीसाठी च्या काही प्रमुख व निवडक युक्त्या पाहूया.
1) व्यसनांना विरोध असावा पण त्या व्यसनाधीन माणसाचा तिरस्कार, टेहळणी, हेळसांड होता कामा नये कारण तो एक आजारी माणूस आहे.
2) वैद्यकीय शास्त्रात शास्त्रोक्त पद्धती व्यसनांच्या पाशातून मुक्तीसाठी उपलब्ध आहेत. त्यांचा वापर नातेवाईक व मित्रांनी केला पाहिजे.
3) प्रत्येक व्यसनाधीन माणसाच्या व्यसनमुक्तीसाठी घरातील महिला अतिशय महत्त्वाचा घटक ठरतात. कारण एका स्त्री चा बाप किंवा भाऊ किंवा पती किंवा मुलगा/मुलगी या अशा जिवलग नात्यांशी जिव्हाळ्याचा संबंध असतो. यासाठी महिलांना व्यसनमुक्तीच्या अभ्यासक्रमाचा योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
4) रुग्णाला औषध उपचाराची सुद्धा गरज असते यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात ठराविक काळासाठी रुग्णाला दाखल करावे लागते.
5) व्यसनमुक्त झालेल्या इसमाचा पुनर्वसन हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे जेणेकरून पुन्हा ती व्यक्ती व्यसनाच्या वाटेवर जाऊ नये. ते पुनर्वसन तीन पातळ्यांवर करावं लागतं. सामाजिक, पारिवारिक व आर्थिक.
    पुनर्वसनाच्या कार्यक्रमाचा पूर्ण शास्त्र व्यसनमुक्ती केंद्रात उपलब्ध असतो व तज्ज्ञ मंडळी रुग्णाच्या गरजेनुसार त्याला व परिवारातील सदस्यांना समुपदेशन व योग्य मार्गदर्शन करत असतात. आजच्या घडीला दारु, अमली पदार्थ, वेगवेगळी औषधी, गुटखा, तंबाखू, सिगारेट व बिडी अशा अनेक प्रकारच्या व्यसनांनी समाजाला पछाडले आहे अशा परिस्थितीमध्ये सध्याचे सरकार या मुद्यावर कमालीचे उदासीन असल्याचे दिसते. म्हणून प्रबोधन मार्गदर्शन समुपदेशन व उपचाराचे कार्य माणुसकीला बांधील सामाजिक संस्था व व्यसनमुक्ती केंद्रांनाच करावे लागेल व ते आपण केलेच पाहिजे.
(लेखक जमाते इस्लामी हिंद उस्मानाबादचे सदस्य आहेत.)

- सलीम बशीर मनियार
उस्मानाबाद/ 9763727300

व्यभीचार हा फौजदारी गुन्हा नाही, समलैंगिकता हा पण फौजदारी गुन्हा नाही, मग कााय विवाह फौजदारी गुन्हा आहे?
6 सप्टेंबर 2018 ला सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधाला ’गुन्हेगार कृत्या’ बाहेर काढले. 27 सप्टेंबर 2018 ला, ”व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नाही” असा ऐतिहासिक निकाल दिला. या दोन्ही निकालांनी समाजासमोर असा प्रश्‍न उभा केला आहे की, जणू विवाह करणे हाच ”फौजदारी गुन्हा” आहे. ’व्यभिचाराला गुन्हा मानणारे कलम 497 भादंवि’ घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने म्हटले असून, ”स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या हक्कावर’ शिक्कामोर्तब केले आहे. आयपीसीतील कलम 497 मुळे महिलेची स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख संपुष्टात येते आणि ती नवर्‍याची मालमत्ता बनते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. कलम 497 रद्द करतानाच, गुन्हेगारी दंड संहितेतील कलम 198 ही घटनाबाह्य ठरविण्यात आले आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्या.अजय खानविलकर, न्या.आर.एफ. नरीमन, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा या पाच न्यायाधिशांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
    जोसेफ शाइन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून, विवाहबाह्य संबंधा संदर्भातील या तरतुदीला आव्हान दिले होते. यास सरकारचा विरोध होता. सरकारचे म्हणणे होते की, व्यभिचार गुन्हाच गणला जावा अन्यथा विवाहाचे पावित्र्य संपुष्टात येईल आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होईल. 497 कलमामुळे देशातील विवाहसंस्था टिकून आहे. हे कलम काढल्यास विवाहसंस्था कमकुवत होईल, असे सरकारने सांगितले होते.
    लैंगिकता - विवाह, समलैंगिकता आणि व्यभिचार या तिन्ही कृतींमध्ये लैंगिकता हा कॉमन फॅक्टर आहे. प्रेम म्हणजे यौवन प्रेम (सेक्युअल लव्ह) आहे. जे स्त्री-पुरूषांना आकर्षणाचे आरंभिक कारण बनते आणि नंतर त्यांच्यात जवळीक निर्माण करते. करूणा म्हणजे तो आध्यात्मिक संबंध आहे जो दांपत्तीक जीवनात हळूहळू घट्ट होत जातो. यामुळेच विवाहसंस्थेस बळकटी येते. पती-पत्नी एकमेकांचे जीवलग बनतात व सुख-दुःखात सामील होतात. 
    लैंगिकता ही एक सहज प्रकृती आहे. भूख, तहान लागणे, मलमूत्र विसर्जन, याप्रमाणेच मानवामध्ये लैंगिकता ही सहज प्रवृत्ती आहे. यासाठी जगातील सर्व धर्म, जातीं आणि देशांमध्ये विवाहसंस्था अस्तित्वात आहे. असे असले तरी या ठिकाणी आपण मुख्यतः इस्लामिक विचारधारेतून याचा आढावा घेऊ.
    निकाह - इस्लामी कौटुंबिक कायद्याचा पहिला उद्देश शील व चारित्र्याचे रक्षण होय. व्यभिचाराला तो हराम ठरवितो. स्त्री आणि पुरूषांना आपल्या शरीर संबंधाची प्राकृतिक गरज ’निकाह’च्या आधीन राहून पूर्ण करण्यास भाग पाडतो. निकाहमुळे माणसाचे चारित्र्य अबाधित राहते. ते नग्नता व निर्लज्जपणापासून दूर राहतात. तसेच त्यापासून माणसांचे सांस्कृतिक बिघाडापासून रक्षण होते. म्हणूनच पवित्र कुरआनमध्ये ’निकाह’ साठी ’एहसान’ शब्द योजला गेला आहे, एहसान म्हणजे किल्लाबंदी (तटबंदी) ज्या ’स्त्री’शी निकाह केला जातो, ती ’मुहसना’ असते. म्हणजे ती त्या किल्ल्याच्या रक्षणात प्रवेश करते, जो निकाहच्या स्वरूपात तिच्या व तिच्या शिलाच्या रक्षणासाठी तयार करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट होते की, निकाहचा पहिला उद्देश्य शील व चारित्र्याचे रक्षण करणे असा आहे.
निकाहसंबंधी कुरआनमध्ये म्हटले आहे की, ”मग तुम्ही त्यांच्या पालकांच्या अनुमतीने त्यांचेशी निकाह करा आणि उचित प्रकारे त्यांचा ’महर’ अदा करा. जेणेकरून त्या मुहसना बनतील आणि उघडपणे किंवा चोरून, लपून व्यभिचार कर्म करणार्‍या होणार नाहीत.” (कुरआन, सूरह निसा, आयात-25).
    पती-पत्नींना वैवाहिक बंधनात केवळ यासाठीच बांधले जाते की, अल्लाहने निर्धारित केेलेल्या ’सीमां’च्या आत राहूनच, त्यांनी आपली नैसर्गिक कामेच्छा पूर्ण करावी. तसेच त्यांचे हे संबंध प्रेम-जिव्हाळ्यावर आधारभूत असावेत, ज्यायोगे निकाह करून संस्कृती व सभ्यतेचे जे उद्देश निगडीत आहेत त्यांनी एकत्रितपणे पार पाडावेत. त्यांच्या कौटुंबिक जीवनात त्यांना आराम, संतोष, समाधान व शांती लाभावी.
    ”आणि तुम्ही त्याच्या चिन्हांपैकीच एक आहात की, त्याने तुमच्यासाठी खुद तुमच्यामधूनच जोड निर्माण केली आहे जेणेकरून तुम्हाला त्यांचेपासून शांती, समाधान लाभावे आणि त्यानेच दोघांत प्रेम, जिव्हाळा व करूणा निर्माण केली आहे. ”(कुरआन, सूर-अर-रूम 30, आयत 21).
    निर्माणकर्त्याच्या तत्वदर्शितेची क्षमता ही आहे की, त्याने मानवाच्या एकाच जातीचे रूप बनविले नाही तर त्यास दोन जाती (लिंग) मध्ये निर्माण केले, जे मानवतेत समान आहेत. त्यांच्या निर्मितीचे मूळ एकच आहे. परंतु, दोन्ही, एकमेकांपासून भिन्न शारीरिक बनावट, भिन्न मानसिक आणि मनोवैज्ञानिक वैशिष्ट्ये तसेच भिन्न भावना व इच्छा देऊन निर्माण केले गेले. त्यांच्यामध्ये आश्‍चर्यकारक अनुकूलता ठेवली की त्यांच्यापैकी प्रत्येक, एकमेकासाठी पुरक आहेत. तो तत्वदर्शी सृष्टा या दोन्ही जातींना सुरूवातीपासून एका विशेष अनुपाताने निर्माण करीत आहे. हे स्पष्टतः पुरावा आहे की, एक तत्त्वदर्शी निर्माता आणि एकमेव निर्मात्याने त्याच्या सामर्थ्याने या सर्वांचे प्रबंध करून ठेवले आहे.
    ”जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा”(दिव्य कुरआन) अर्थात हे प्रबंध पूर्ण इराद्याने केला आहे. पुरूषाने त्याच्या नैसर्गिक इच्छा व गरजा, स्त्रीजवळ आणि स्त्रीने तिच्या कामेच्छा व गरजा पुरूषांशी भागवाव्यात, ज्यास सृष्टी निर्मात्याने एकीकडे मानवी वंशाला बाकी ठेवण्याच्या आणि दूसरीकडे मानवी संस्कृती व सभ्यतेला अस्तित्वात आणण्याचे साधन बनविले आहे. जर स्त्री-पुरूषांत ते आकर्षण ठेवले नसते, जे त्यांच्या मिलनाने प्राप्त होते तर मानवी सभ्यता व संस्कृती अस्तित्वात येण्याचा प्रश्‍नच नव्हता. शांती आणि समाधानासाठी, दोघे मिळून घरोबा करण्यास विवश बनले. यामुळेच कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली आणि याचमुळे सभ्यता आणि संस्कृती विकसीत झाली. कोण बुद्धीमान व्यक्ती विचार करू शकतो की ही महान कृती, प्रकृतीच्या आंधळ्या शक्तीनिशी, संयोगवश, अॅटोमॅटिक अस्तित्वात आली आहे? किंवा अनेकाअनेक ईश्‍वराचे हे प्रबंध आहे? हे तर एका तत्वदर्शी आणि एकमेव तत्वदर्शीच्या, तत्वदर्शीतेची स्पष्ट निशाणी आहे, स्पष्ट पुरावा आहे.
    दाम्पत्य जीवनासाठी मार्गदर्शन करताना दिव्य कुरआन आदेश देतो, ” तुमची पत्नी तुमच्यासाठी शेती आहे. जेव्हा इच्छा होईल तेव्हा तिच्याकडे जा. परंतु, भविष्याची काळजी घ्या. आणि ईश्‍वरी कोपाचे भय बाळगा आणि जाणून असा की, तुमची त्याच्याशी भेट होणारच आहे. (सूरह बकरा-2, आयत - 223). याचा भावार्थ असा की, संतती उत्पादनासाठी पुरूषाने आपल्या पत्नीकडे जावे. पण एका ठिकाणी कुरआनमध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, संतोष प्राप्त करण्यासाठीही पत्नीकडे जावे. एका ठिकाणी असेही सांगितलेले आहे की, ”त्या तुमच्यासाठी पोशाख आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी पोशाख आहात. (सुरह बकरा, आयात 187).
    जसे पोशाख आणि शरीरामध्ये काही एक पडदा नसतो तसेच पती-पत्नीचे आपआपसातील संबंध आणि मिलाफ, एक अभिन्न गोष्ट आहे. पोशाख माणसाचे शरीर झाकते आणि बाह्यवातावरणातील दुष्परिणामांपासून त्याचे रक्षण करते. दाम्पत्याला पोशाखाची उपमा यासाठीच दिली आहे की, पती-पत्नीमधील वैवाहिक बंधन त्याच स्वरूपाचे असावे, जसे शरीर आणि पेहरावाचे असते. त्यांची मने व आत्मे एकरूप झालेली असावीत. दोघांनी एकमेकांच्या दोषांवर पांघरूण घालावे आणि शील व अब्रुवर दुष्प्रभाव टाकणार्‍या गोष्टींपासून त्यांनी एकमेकांचे रक्षण करावे. प्रेम, जिव्हाळा आणि करूणाची हीच मागणी आहे. इस्लामी दृष्टीेने दाम्पत्यासंबंधाचा तोच मूळ आत्मा आहे. एखाद्या दाम्पत्यामध्ये ही भावना नसेल तर जीवन मृतवत होईल.
    इस्लामने वैवाहिक जीवनामध्ये जे कायदे बनविले आहेत. त्यामध्ये हा उद्देश सतत नजरेसमोर ठेवला गेला आहे. एकमेकांतील संबंधात मनाची विशालता, औदार्य ते दाखवू शकत नसतील तर नाईलाजाने एकत्र राहण्यापेक्षा वेगळे होणे हेच अधिक उत्तम. कारण प्रेम व करूणारूपी आत्मा निघून गेल्यानंतर, दाम्पत्य संबंध एक निव्वळ ’प्रेत’च उरते. त्या प्रेताची विल्हेवाट लावली नाही तर दुर्गंधी निर्माण होईल आणि कौटुंबिक जीवनाचे संपूर्ण वातावरण ’विषमय’ होईल. म्हणून यासंबंधी कुरआन आदेश देतो, पती-पत्नींनी एकमेकांपासून फारकत (विभक्त) घेतलीच, तर अल्लाह आपल्या विशाल सामर्थ्याने, प्रत्येकाला दुसर्‍यावर अवलंबून राहण्यापासून मुक्त करील. अल्लाहचे औदार्य अतिविशाल आहे व तो बुद्धिमान व दृष्टा आहे.”(सू. निसा 4, आयत नं.130). विवाहा संबंधी अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सल्ल. म्हणतात, ह.अब्दुल्ला बिन मसऊद (रजि.) कथन करतात, ह. मुहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले, ”हे तरूणांनों! जो निकाहच्या जबाबदार्‍या उचलण्याचे सामर्थ्य राखतो. त्याने निकाह करून घेतला पाहिजे. कारण निकाह हा ’नजर’ (दृष्टी) खाली राखतो आणि लज्जास्थानाचे रक्षण करतो.” म्हणजे नजरेला इतस्तःत फिरण्यापासून आणि वासना शक्तीला बेलगाम होण्यापासून वाचवितो.
    आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्याचे सामर्थ्य राखत नाही. त्याने वासनेचा जोर तोडण्याकरिता अधुनमधून रोजा (उपवास) ठेवावा. (हदीस - बुखारी शरीफ).
    म्हणजे लज्जा हा गुण चांगूलपणा आणतो. लज्जा असा गुण आहे जो सत्कर्म आणि सदाचाराचा स्त्रोत आहे. हा गुण ज्या व्यक्तीच्या अंगी असेल तो दुष्कर्म आणि दुराचाराजवळ जाणार ही नाही उलट सत्कर्म आणि भलाईकडे प्रवृत्त होईल.
व्यभिचारासंबंधी कुरआन स्पष्ट आदेश देतो,
”व्यभिचाराच्या जवळपास फिरकू नका ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग आहे” (सुरह बनी इस्राईल, आयत 32). व्याभिचारामध्ये समलिंगी संभोग, नग्नता, अश्‍लिलतेच्या सर्व गोष्टी येतात. व्यभिचाराच्या जवळसुद्धा फिरकू नका. हा आदेश प्रत्येक मानवासाठी आणि समस्त मानवजातीसाठी सुद्धा आहे. व्यक्तीसाठी हा आदेश म्हणजे केवळ व्यभिचार कार्यापासून दूर राहू नका तर व्यभिचाराला प्रोत्साहन देणार्‍या गोष्टीपासून सुद्धा रहावे. समाजासाठी या आदेशानुसार त्याचे कर्तव्य ठरते की, सामाजिक जीवनात व्यभिचार, व्यभिचाराला प्रोत्साहन देणार्‍या गोष्टी आणि व्यभिचाराच्या करणांना, कोणत्याही स्थितीत नष्ट करावे.
    सृष्टी निर्मात्याचे वरील प्रमाणे दिलेल्या आदेशाचे अवलोकन करून त्या कसोटीवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन्ही ऐतिहासिक निकालांविषयी विचार केला तर त्यात खालील गोष्टी आढळून येतात.
    ’6 सप्टेंबर 2018 च्या निकालानुसार, ’समलिंगी संभोग’ गुन्हेगारी कृत्य ठरत नाही.’ समलिंगी संबंध निश्‍चितच निसर्गविरूद्धी आहे. सृष्टी आणि त्यातील सजीवांचा निर्माता अल्लाहने, सर्व सजीवांमध्ये नर आणि मादा निर्माण करून, वंश वाढविण्याची व्यवस्था केली आहे. स्त्री-पुरूष मिलनाने एक कुटुंब अस्तित्वात यावे व त्यायोगे एक सुसंस्कृत समाजनिर्मिती व्हावी. कुटुंब व्यवथेतच सभ्यतेचे व नैतिकतेचे बाळकडू पाजले जाते. याच उद्देशासाठी स्त्री, पुरूष असे दोन जाती बनिवल्या आणि त्यात एक दुसर्‍यासाठी आकर्षण ठेवले गेले. त्यांची शारीरिक आणि मानसिक रचना दाम्पत्य उद्देशाच्या पुर्तीसाठीच केली गेली. परंतु, मनुष्य प्रकृतीविरूद्ध कार्य, समलिंगी संभोग करून, त्यावेळी ते अनेक अपराध करणारा ठरतो.
    मानव समुहाशी असा मनुष्य उघड विश्‍वासघात करतो तो स्वतःला वंशवृद्धी आणि कुटुंब व्यवस्थेसाठी अयोग्य बनवितो. आपल्या बरोबरच दुसर्‍या एका पुरूषाचा आणि दोन स्त्रियांचे जीवन बरबाद करतो. हे कृत्य मानवी सभ्यतेच्या सीमा पार करणारे आहेत. हा उघड-उघड व्यभिचार आहे. जो अत्यंत वाईट कृत्य आहे. यासंबंधी कुरआन आणि मानसशास्त्रीय आधारांवर माननीय एम.आय. शेख यांनी शोधनमध्ये अंक 39 मध्ये एक अतिशय बोधप्रद लेख लिहिला आहे तसेच जहीर सय्यद यांनीही, समलैंगिकतेसंबंधी एक उत्कृष्ट लेख लिहिला आहे. (शोधन ंक 40) म्हणून पुनरूक्ती टाळून केवळ एवढेच म्हणतो की, मानवाने प्रकृतीविरूद्ध कोणतेही कृत्य करू नये.
    27 सप्टेंबर 2018 च्या निकालानुसार, ” व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नाही” यामध्ये अतिशय चिंतनीय बाब म्हणजे, ”महिलांना विवाहबंधनात राहूनही, लैंगिक स्वायतत्ता दिली पाहिजे. विवाह याचा अर्थ एकमेकांची स्वायतत्ता संपणे नाही, लैंगिक पर्याय निवडणे हा मानवी स्वातंत्र्याचा आवश्यक घटक आहे. अगदी खाजगी बाबतीत स्त्रीच्या पर्यायाचा विचार केला पाहिजे” असे मत निकालपत्रात नोंदविले गेले आहे.
    याचा आधार घेत एका विवाहित महिलेने, तिच्या पती-व्यतिरिक्त इतर पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवणे, आणि त्यामुळे तिला गर्भधारणा झाली तर, कोण पुरूष, दुसर्‍याच्या अपत्याला, स्वतःचे अपत्य समजून ते सर्वकाही करेल? जे तो स्वतःच्या अपत्याबाबत करील. यामुळे समाजात ’हरामी’ अपत्यांची फौज तयार होईल. मानवी स्वातंत्र्याचा अतिरेक होऊन सर्वत्र स्वैराचार फोफावेल. कुटुंबव्यवस्था नितीमान समाज, संस्कृती बनण्याचे कार्य उधळून लावले जाईल.
    भारत सरकारचे कलम 497 बद्दलचे म्हणणे अत्यंत दुरूस्त आहे पण सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळले आहे. समलैंगिकतेसंबंधी जो निकाल आला, त्यानंतर देशात जो ’उन्मादी’ वातावरण तयार झाले आता या निकालानंतर त्यात तुफानी वाढ होईल. कायद्याची कडक बंधने असतानाही  स्त्री-पुरूषांचे अनैतिक संबंध बलात्कार, विनयभंग याचे प्रमाण चिंताजनक इतके आहेत या दोन्ही निकालानंतर परिस्थिती किती वेगाने बदलेल हे येणारा काळच ठरवेल. पण.. समाज सुधारक व भारत सरकाने या दोन्ही निकाल, त्याचे दुष्परिणाम व त्यावर उपाययोजना, यासंबंधी गंभीरपणे विचार करावा. अन्यथा भारतीय सभ्यता, संस्कृतीचा र्‍हास होणार? ही मात्र काळ्या दगडावरील रेषाच ठरेल.

- वकार अहमद अलीम
9987801906

एक ही धुन है के इस रात को ढलता देखूं, अपनी आँखों से सूरज को निकलता देखूं
जमाअत-ए-इस्लामी हिंद ही एक अशी संघटना आहे की, जिचा सरळ संपर्क देशबांधवांशी आहे. कोणत्याही कार्यक्रमात सर्व समाजाला सोबत घेण्याकडे जमाअतचा कल असतो. मुस्लिम्मेतरांकडे उदार दृष्टीने पाहण्याची जमाअतची शिकवण आहे. यासंदर्भात जमाअतचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचे विचार नक्कीच उद्बोधक ठरतील. ते म्हणतात, ”मुस्लिमांमधून साधारणतः जी आंदोलने उदयास येतात ती दोनपैकी एका कारणासाठी केली जातात. 1. इस्लामच्या एखाद्या विषयाला घेऊन. किंवा 2. मुस्लिमांच्या जीवनाशी निगडित एखाद्या विषयाला घेऊन. परंतु, आम्ही जमाअतच्या माध्यमाने समग्र इस्लामला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. जमाअते इस्लामी आणि इतर मुस्लिम संघटनांमध्ये दूसरा फरक असा आहे की, दुसर्‍या कुठल्याही मुस्लिम संघटनांची आंदोलने इतर समाजाच्या संघटनांच्या आंदोलनासारखीच असतात. मात्र आम्ही ठीक त्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे, जी पद्धत प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ठरवून दिलेली आहे.
    इतर मुस्लिम संघटनांमध्ये अशा प्रत्येक व्यक्तीला सामील करून घेतले जाते जो जन्माने मुस्लिम असेल. त्यांची अशी धारणा असते की, जो मुस्लिम वंशात जन्मला तो चारित्र्यानेही मुस्लिम असणार. परिणामतः अशा संघटनांमध्ये वाईट चारित्र्यांच्या लोकांचा शिरकाव होतो. असे लोक जे विश्‍वासू नसतात, कोणतीही जबाबदारी पेलण्यास लायक नसतात. मात्र आम्ही जमाअतमध्ये अशा कोणत्याही व्यक्तीला या गृहितकावर घेत नाही की, आमुक एक जण मुस्लिम घरात जन्माला आहे म्हणून त्याचे वर्तनही इस्लामीच असेल. इस्लामचा कलमा, त्याचा अर्थ यांचा समजून उमजून स्विकार केल्यानंतर त्याच्यावर येणार्‍या जबाबदार्‍यांची चांगल्या प्रकारे जाण निर्माण झाल्यावरच आम्ही कोणत्याही व्यक्तीला जमाअतमध्ये घेतो. संघटनेत आल्यानंतरही ईमान (श्रद्धा) मध्ये टिकून राहण्यासाठी ज्या आवश्यक शर्ती आहेत त्याचे पालन त्याच्याकडून केले जाते किंवा नाही याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जाते. येणेप्रमाणे मुस्लिम समाजातील चांगल्या चारित्र्यातील लोकांनाच वेचून-वेचून जमाअतमध्ये घेतले जाते.  म्हणजे चांगल्या चारित्र्याचे लोकच जमाअतमध्ये येतील याकडे लक्ष दिले जाते.
    अन्य मुस्लिम संघटनांची दृष्टी भारत आणि भारतात राहणार्‍या मुस्लिम समाजापर्यंतच सीमित असते. कोणाची नजर गेलीच तरी जास्तीत जास्त -(उर्वरित लेख पान 2 वर)
 जागतिक मुस्लिम समाजांच्या प्रश्‍नापर्यंत जाते. या संघटनांना मुस्लिम समाजातील प्रश्‍नांमध्येच रस असतो. त्यांच्या उपक्रमांमध्ये असे काहीच नसते जे देशबांधवांना आकर्षित करेल. उलट कधी-कधी त्यांचे उपक्रम असे असतात की, बिगर मुस्लिमांना इस्लामकडे आकर्षित होण्यामध्ये बाधाच निर्माण होते. मात्र जमाअतमध्ये समग्र इस्लाम हाच उपक्रमांचा केंद्रबिंदू असल्याने याकडे कोणीही आकर्षित होऊ शकतो. इस्लाम समग्र मानवजातीसाठी आहे. म्हणून आमची दृष्टी कुठल्याही विशिष्ट अशा समाज, देश किंवा त्यांच्या तात्कालीक प्रश्‍नांमध्ये गुरफटलेली नाही. उलट आमची दृष्टी समग्र मानवजाती व जगावर पसरलेली आहे. आमची अशी धारणा आहे की, मानवजातीचे प्रश्‍न हे आमचे प्रश्‍न आहेत. कुरआन आणि हदीसमध्ये त्या प्रत्येक प्रश्‍नाचे समाधान आहे व तेच समाधान आम्ही सर्वांसमक्ष ठेवतो. त्यातच सर्वांचे यश व कल्याण नीहित आहे. आमच्या या अजेंड्यामुळे मला विश्‍वास आहे की, फक्त मुस्लिमांमधीलच नव्हे तर मुस्लिम्मेतरांमधील सद्प्रवृत्तीचे लोक सुद्धा जमाअते इस्लामीकडे आकर्षित होतील.” (संदर्भ ः रूदाद भाग 1, पान क्र. 8-9).
    जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मानवतावादी दृष्टीकोण कुरआनच्या शिकवणीवर आधारित आहे. ती शिकवण म्हणजे,
1.    ” लोकहो! आम्ही तुम्हाला एक पुरूष व एक स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले. जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकपणे अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त चारित्र्यवान (ईशपरायण) आहे. निश्‍चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.” (सुरे अलहुजरात ः आयत नं.13).
2.    ”ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही मानवजातीला मोठेपण दिले आणि त्यांना खुश्की व जलमार्गावर वाहने दिली आणि त्यांना निर्मळ पदार्थाचे अन्न दिले व आपल्या बर्‍याचशा निर्मितींवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केले.” (सुरह बनी इसराईल आयत नं. 70)
    कुरआनच्या वरील दोन्ही संदेशांमध्ये जात आणि धर्मावरून कुठलाही फरक केलेला नाही. समतेची एवढी मोठी शिकवण दुसरी असू शकत नाही. हीच शिकवण जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. हीच शिकवण परिणामकारकरित्या जगासमोर मांडण्याचे कार्य जमाअत गेल्या 77 वर्षांपासून करत आहे.
    जगण्याचा हा स्वच्छ, सरळ आणि तणावरहित मार्ग त्या लोकांना मुळीच आवडत नाही ज्यांचे व्यवसाय हरामचे आहेत. दारू, व्याज, जुगार, अश्‍लिलता म्हणजेच समाजाला नुकसान पोहोचविणार्‍या वस्तूंच्या निर्मितीत जो वर्ग गुंतलेला आहे त्याला जमाअतचे हे कार्य आवडत नाही, हे ओघानेच आले. दुर्दैवाने सत्तेत आणि मीडियात याच वर्गाचे प्राबल्य आहे.  म्हणूनच जमाअतचा संदेश खरा असूनही बहुसंख्य लोकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचत नाही. उलट माध्यमांमधून इस्लाम विरूद्धचा प्रचार सातत्याने व आक्रमक पद्धतीने होत असल्यामुळे देशबांधवांमध्ये मुख्यत्वाने इस्लाम व पर्यायाने मुस्लिमांबद्दल अनेक गैरसमज खोलवर रूजलेले आहेत.
    या दुष्प्रचाराच्या वाईट परिणामापासून देशबांधवांना वाचवून त्यांच्या समोर सत्य परिस्थिती मांडण्याचे मोठे आवाहन जमाअत समोर आहे. त्यासाठी जमाअतच्या सदस्यांना अहोरात्र कष्ट करावे लागणार आहेत.
वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान म्हणजे काय?
एक सफ मे खडे हो गए महेमूद व अयाज
न कोई बंदा रहा न कोई बंदानवाज
    जमाअते इस्लामी हिंद वहदत-ए-इलाह व वहदत-ए-इन्सान या संकल्पनेवर ठामपणे विश्‍वास ठेवते. अरबी भाषेमध्ये ’वहदत’ या शब्दाचा अर्थ ’एक’ असा आहे आणि ’इलाह’ म्हणजे पूजनीय. येणेप्रमाणे वहदत-ए-इलाह म्हणजे अल्लाह एक होय व तोच पूजनीय आहे, या विश्‍वाचा निर्माता आहे, शासक व मालक आहे. म्हणून त्याचे आदेश सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव मुकाट्याने मानतात. सूर्य, चंद्र, तारे लाखों वर्षांपासून अल्लाहने ठरवून दिलेल्या कक्षेमध्ये ठरवून दिलेले काम करत आहेत. निसर्गाची दिनचर्या ठरवून दिल्याप्रमाणे चालू आहे. कोणी अल्लाहला मानो किंवा न मानो, अल्लाहची कृपा सर्वांवर सारखीच आहे. ही संकल्पना म्हणजे वहदत-ए-इलाह.
    आता पाहूया, वहदत-ए-इन्सान म्हणजे काय? आपण आताच पाहिले आहे की, सुरह हुजरात आयत नं. 13 मध्ये अल्लाहने म्हटलेले आहे की, समस्त मानव समाज हा एकाच आई-वडिलांचा विस्तार आहे. म्हणजे पृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या जवळ-जवळ आठ अब्ज मानवांचे आई-वडिल एकच आहेत. म्हणजे समस्त मानवसमाज हा एकच आहे. या सत्याचा ठाम विश्‍वास मनाशी बाळगणे म्हणजेच वहदत-ए-इन्सान.
    सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे. सर्वांचे अवयव सारखेच आहेत. सर्वांचे रक्त सर्वांना अर्थात रक्त गटाप्रमाणे चालते. फक्त वर्ण व चेहरेपट्टी वेगवेगळी आहे व तीही या कारणाने आहे की त्यांना ओळखता यावे. थोडक्यात जगातील प्रत्येक व्यक्ती दुसर्‍या कुठल्याही व्यक्तीचा रक्ताचा नातेवाईक आहे. समस्त मानवजात रक्ताच्या नात्याने बांधलेली आहे. वहदत-ए-इन्सान या संकल्पनेबद्दल बोलताना जमाअतचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ”माणसांचे विविध गट व वंश यांची आपसातील ओढाताण, त्यांच्यातील भेदाभेद, एकमेकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठतेची भावना, स्पृश्य-अस्पृश्यतेची भावना या आधारहीन आणि कृत्रिम आहेत. या मानवनिर्मित कल्पना आहेत. यांना कुठलाही ठोस आधार नाही. आपल्या मूळ प्रवृत्तीच्या विरूद्ध जावून माणसांनी कृत्रिमरित्या आपसात हे मतभेद उभे केले आहेत.
    मतभेद कोणामध्ये होत नाहीत? एकाच वंशातील लोकांमध्ये सुद्धा होतात. एवढेच कशाला दोन सख्या भावांमध्ये सुद्धा होतात. खरे पाहता मानवा-मानवामध्ये मतभेद फक्त एकाच आधारावर होऊ शकतात ते म्हणजे श्रद्धा, नितीनियम आणि वर्तणूक. याच आधारावर एकाच आई-वडिलांची दोन मुले वेगवेगळी ठरू शकतात व याच आधारावर जगाच्या पुर्वेला राहणारा एक माणूस पश्‍चिमेला राहणारा दूसरा माणूस एक असू शकतो. राहता राहिला वर्ण, वंश, भाषा या वेगळेपणावर मैत्री किंवा शत्रुत्व ठरवणे निरर्थक आहे. असे म्हणणे कितपत तर्कपूर्ण आणि योग्य आहे की, अमूक डोंगर, नदी किंवा रेषेअलिकडे जी मूलं जन्माला येतात, अमूक एक भाषा बोलतात, त्यांच्या त्वचेचा रंग अमूक आहे तो आपला आहे आणि त्याला आमच्यावर संपूर्ण अधिकार प्राप्त आहेत. मात्र या पलिकडे जे मूल जन्माला येते, तमूक भाषा बोलते, त्याच्या त्वचेचा रंग तमूक आहे तो परका आहे. त्याच्यात आणि आमच्यात कोणताच संबंध नाही.
    आपल्याला आश्‍चर्य वाटायला हवे की, असे विचार आणि दृष्टीकोण माणसांमध्ये कसे काय उपजले? अशा विचारांना माणसाने आपल्या मनामध्ये कसा काय थारा दिला? माणसाच्या बुद्धी आणि आत्म्याने हे भेद कसे काय स्विकारले? नव्हे त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याला कशी काय मुभा दिली? साधारण बुद्धी असलेला माणूस सुद्धा समजू शकतो की, काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीयांमध्ये तशी भिन्नता तर आढळून येत नाही जशी बैल आणि घोड्यामध्ये, बकरी आणि उंटामध्ये आढळून येते व ज्या कारणांने त्यांना वेगवेगळे समजता येईल. हे काळे-गोरे, इंग्रज-जर्मन, भारतीय-अभारतीय हे सर्व एकाच हाडामांसाचे बनले आहेत. शरीर, बुद्धी, मन, अवयव व त्यांच्या क्षमता सर्व सारख्याच आहेत. या सर्वांची मानसिकता, भावना एक सारख्याच आहेत. यांची बलस्थाने व यांच्यातील त्रुटी यासुद्धा एकसारख्याच आहेत. यांच्यात अशी कोणतीही गोष्ट वेगळी नाही की ज्या आधारे आपण यांना ’वेगळे’ घोषित करू शकू. यांच्यातील सर्व गोष्टी समान आहेत. म्हणूनच ते सर्व एक आहेत. येथे कुरआनचा तो आदेश लागू होतो की, पृथ्वीवरील सर्व लोक एका आई-वडिलांची लेकरे आहेत. मग ते काळे असो का गोरे, अरबी असो का अरबेत्तर त्यांच्यातील वंश, कबिले आणि राष्ट्रीयत्वात्वर आधारित विभाजन फक्त त्यांना ओळखण्यापुरते आहे त्यापेक्षा अधिक नाही.
    या दोन मुलभूत शिकवणी वहदत-ए-इलाह आणि वहदत-ए-इन्सानचाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जगात अनेक प्रेषित आले. इस्लाम कुठलाही नवीन धर्म नाही. कुरआन हा नवीन ग्रंथ नाही की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी कुठलीही अशी नवीन शिकवण जगाला दिलेली नाही, जी की, त्यांच्या पूर्वीच्या प्रेषितांपेक्षा वेगळी आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची शिकवण ही ईतर प्रेषितांची शिकवणच आहे. फक्त त्याचे आधुनिक नाव इस्लाम आहे. आणि या शिकवणीच्या शेवटच्या ग्रंथाचे नाव कुरआन आहे. जगातील प्रत्येक बुद्धीवादी ज्याने हा ग्रंथ समजून वाचला तो या सत्यावर ठाम आहे की, हा ग्रंथ माणसां-माणसांमध्ये भेद करत नाही. समस्त मानवजात एक आहे. हाच दृष्टीकोण जमाअत-ए-इस्लामी हिंदचा मुस्लिम्मेतरांसंबंधी आहे. (संदर्भ ः रूदाद भाग क्र. 5 पान क्र. 21 - 22 वर आधारित).
 
- एम.आय. शेख - 9764000737

- मुंबई (नाजीम खान) 
देशात नशेच्या आहारी जावून लाखो लोक आपले जीवन उध्वस्त करीत आहेत. त्यामुळे नशायुक्त पदार्थांवर बंदी आणणे व लोकांचे मन परिवर्तन करून देश नशामुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहू, असे प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी केले.
    जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे ’नशेचा नाश देशाचा विकास’ या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी अंधेरी वेस्ट मधील मेअर हॉल मुंबई येथे 2 ऑक्टोबर रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर विशेष आमंत्रित म्हणून ब्रह्मकुमार तपस्विनी, नशाबंदी महाराष्ट्राचे अमोल मडामे, मौ.अतिकुर्रहमान कास्मी, अब्दुल हफिज भाटकर, मुंबई शहर जेआयएचचे सचिव हुमायूं होते. महेफूज सिद्दीकी जोगेश्‍वरी यांनी कुरआन पठण करून कार्यक्रमास सुरूवात झाली.
    पुढे बोलताना तौफिक असलम खान म्हणाले, नशा आणणार्‍या पदार्थांवर उदा. दारू, गांजा, तंबाखू इत्यादीवर शासकीय प्रतिबंध लादून काहीही साध्य होणार नाही, असे प्रयोग मागेही झालेले आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्ही याची मागणी करणार नाही. आम्ही या पदार्थाच्या विक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी करूच पण याशिवाय, लोकांनी स्वयंस्फूर्तीने या गोष्टींचा त्याग करावा, यासाठी या अभियाना दरम्यान जनजागृती करण्याचा आमचा माणस आहे व हे काम फक्त मोहिमेपुरते राहणार नसून पुढेही सुरूच राहील. नशाबंदीसाठी या क्षेत्रात काम करणार्‍या सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांचीही मदत घेण्यात येईल. आमचा खरा उद्देश लोकांचे मन परिवर्तन करणे आहे. प्रास्ताविकात मजहर फारूख म्हणाले, नशेचा नाश केल्याशिवाय देशाचा खरा विकास होणार नाही. आपला देश हा जगातील सर्वात तरूण देश आहे. युरोपमध्ये माणसे उतारवयाकडे झुकलेली आहेत. आमची अशी धारणा आहे की, केवळ विकासाचे नारे देवून विकास होणार नाही. विकास करण्यासाठी नशामुक्त असणारी, सुदृढ आरोग्य असणारी, काम करणारी युवा पिढी आवश्यक आहे. असे झाले तरच आपल्या देशाचा खरा विकास होईल, अन्यथा नाही. या मोहिमेत जमाअत महाराष्ट्रात समग्र नशाबंदी करण्याचा आग्रह शासनाकडे करेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन जमाअततर्फे देण्यात येईल. राज्यात कुठे-कुठे दारू आणि तत्सम नशा आणणार्‍या पदार्थांची विक्री किती प्रमाणात आणि कशी होते, यासंबंधीचीही माहिती आम्ही मोहिमे दरम्यान, गोळा करणार आहोत. ही माहिती महाराष्ट्र विधानसभेच्या शितकालीन अधिवेशनामध्ये शासनाला सादर करून संपूर्ण नशाबंदीची मागणी करण्यात येईल. शिवाय महाराष्ट्रात टोबॅको फ्री झोन निर्माण करण्यासाठीही सरकारकडे मागणी करण्यात येईल. आज शाळा, महाविद्यालयांच्या अगदी जवळपास तंबाखू आणि गुटख्यांच्या पुढ्या सर्रास उपलब्ध होतात. हे सगळं बंद व्हायला पाहिजेत. शाळा, महाविद्यालयांच्या आसपास तंबाखू विकणार्‍यांना परवानगी देण्यात येवू नये, तसेच खाण्याचीही परवानगी नसावी. याची मागणी जमात करणार आहे. तंबाखूला नशा आणणारा पदार्थ म्हणून आपण मान्यता देत नाही म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार अगदी सहज होत आहे आणि याला तरूण बळी पडतात.
    मंचावरील उपस्थितांची समयोचित भाषणेही झाली. आभार हुमायू यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. 

औरंगाबाद (प्रतिनिधी) 
- महाराष्ट्रातील वंचित समाज घटकांची एकत्रित मोट बांधून अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तनाची हाक मंगळवार 2 सप्टेंबर रोजी दिली. औरंगाबादच्या इतिहासातील मोठ्या सभांपैकी एक  सभा होण्याचा मानही आघाडीला मिळाला. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 7 पर्यंत रखरखत्या उन्हात नागरिकांनी 7 तास  सभास्थळी ठाण मांडून दोघांनाही शांतपणे ऐकले आणि शपथ घेतली की आम्ही मतदानही याच वंचित बहुजन आघाडीला करणार.
    यावेळी खा. असदोद्दीन ओवेसी म्हणाले, गेल्या 70 वर्षापासून जनतेची लूट सुरू आहे. अन्याय संपवायची वेळ आता आली आहे आणि ही आपली जबाबदारी आहे. जे संविधान आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले त्यांच्या अनुयांयाना आज अन्याय का सहन करावा लागत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणातून उतराई करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकरांना संसदेत पाठवायचे आहे. त्यांच्याच नेतृत्वात ही आघाडी निवडणूक लढवेल. त्यांनी डॉ.आंबेडकर यांना महात्मा गांधीपेक्षा श्रेष्ठ नेता म्हटले. राज्यातील समस्त बांधवांच्या कल्याणासाठी हे परिवर्तन करायलाच हवे, असे आवाहन करीत ओवेसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, सध्याचे सरकार दिवाळखोरांचे सरकार आहे. वंचित समाज मागच्या दोन निवडणुकांपासून प्रक्रियेतून बाहेर पडला आहे. ओबीसींना आवाहन करतो की, त्यांनी वंचित आघाडीलाच मदत करावी. द्वेषाच्या राजकारणाला मुठमाती दिली पाहिजे. नक्षलवाद्यांवर कारवाई करता मग सनातन्यांवर का कारवाई करत नाही? असा सवाल करीत त्यांनी भाजप, काँग्रेस - राष्ट्रवादीवर टिका केली. ते पुढे म्हणाले, आम्ही तुमचे सालगडी नाही. तुम्ही नीट वागला नाहीत तर तुम्हाला सालगडी केल्याशिवाय राहणार नाही. राजेशाही संपलेली आहे. राजासारखे वागण्याचा प्रयत्न करू नका. मोदी हे स्वतः खात नाहीत; पण दुसर्‍याला खायला लावतात व त्याच्याकडून वाटा घेतात. शेतकर्‍यांना हमीभाव दिला जात नाही. यासाठी त्यांना संघटितही होऊ दिले जात नाही. येत्या 8 दिवसांत हमीभाव देण्यासंबंधी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर नव्याने आंदोलने छेडले जाईल, असा इशाराही यावेळी आंबेडकर यांनी दिला. यावेळी लाखोंचा जनसमुदाय टाळ्यांनी प्रोत्साहन देत होता.

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्ही स्त्रीयांशी फक्त त्यांचे सौंदर्य पाहूनच विवाह करू नका, शक्य आहे की त्यांचे सौंदर्य त्यांचा विनाश करील. तद्वतच केवळ त्यांची संपत्ती पाहूनही  त्यांच्याशी विवाह करू नका. शक्य आहे की संपत्तीमुळे त्यांनी तुमची अवज्ञा करावी. खासकरून जेव्हा तुमच्या व तिच्या आर्थिक परिस्थितीत खूप तफावत असेल तेव्हा अवज्ञेची दाट  शक्यता असते. – तुम्ही (दीन) चारित्र्यालाच प्राधान्य देऊन त्यांच्याशी विवाह करा. एक काळीसावळी, मोलमजुरी करणारी मात्र चारित्र्यसंपन्न स्त्री (अल्लाहच्या नजरेत त्या रूपवान व  धनाढ्य स्त्रीपेक्षा) बेहतर आहे.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकदा म्हटले की, ‘‘सहसा चार बाबींचा विचार करून स्त्रीयांशी विवाह केला जातो.
(१) तिची संपत्ती पाहून,
(२) तिचे खानदान, कुळाचे श्रेष्ठत्व पाहून,
(३) तिचे सौंदर्य पाहून आणि
(४) तिची (दीनदारी) चारित्र्यसंपन्नता पाहून.
तुम्ही हे सदैव ध्यानात ठेवा की तिच्या चारित्र्यसंपन्नतेलाच प्राधान्य द्यावे.’’
(इब्ने माजा, दारमी, अबू दाऊद)

निरुपण
विवाह करताना बहुतांशी लोक फक्त सौंदर्य आणि संपत्तीलाच प्राधान्य देतात. आचारविचार, चारित्र्यसंपन्नतेला हवे तेवढे महत्त्व देत नाहीत. वैवाहिक जीवनाच्या खNया सुखसमाधानासाठी सौंदर्यापेक्षा व संपत्तीपेक्षा चारित्र्यसंपन्नताच अधिक महत्त्वाची आहे. मानवी जीवनात शीलाला जे महत्त्व आहे ते सौंदर्याला व संपत्तीला कदापि नाही. म्हणूनच आपल्या जीवनाच्या साथीदाराला निवडताना चारित्र्यसंपन्नतेला महत्त्व देण्यासंबंधी पैगंबरांनी उपदेश केला आहे. हा उपदेश केवळ मुलगी पसंत करतानाच नव्हे तर मुलगा पसंत  करतानाही महत्त्वाचा आहे. निव्वळ सौंदर्य व संपत्ती पाहून करण्यात आलेले विवाह अनेकदा मोकळीस येतात आणि पश्चात्ताप करण्याची वेळ येते.
आचारविचारांना, चारित्र्यसंपन्नतेला महत्त्व देणे हेच माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेचे लक्षण आहे. जे लोक शीलतेकडे दुर्लक्ष करून केवळ संपत्ती व सौंदर्याच्या मागे धावतात त्यांना खरे  वैवाहिक सुखसमाधान कदापि लाभू शकत नाही. सद्य अनुभव असा आहे की लोक म्हणतात आमच्या मुलाला स्थळ पाहा. ‘अट काय?’ अशी विचारणा केल्यावर त्यांची पहिली डिमांड असते की मुलगी गोरीपान, सुंदर हवी! आणि वर हुंडा भरपूर हवा. खरे पाहता, या दोन्ही गोष्टी चारित्र्यासमोर गौण आहेत. हुंडा घेणे देणे तर चक्क हराम आहे. पैगंबरांच्या उपरोक्त  उपदेशाचा सारांश हा आहे की एकाधी काळीसावळी मात्र शीलवान, चारित्र्यसंपन्न मुलगी एखाद्या रूपवान, गोऱ्यापान, धनाढ्य व चंगळवादी विचारसरणीच्या मुलीपेक्षा केव्हाही बेहतर आहे.

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

(१४६) ज्यांच्यासह मिळून असंख्य ईशभक्तांनी युद्ध केले. अल्लाहच्या मार्गात जी संकटे त्यांच्यावर कोसळली त्यामुळे ते हताश झाले नाहीत, त्यांनी दुबळेपणा दाखविला नाही. ते  (असत्यापुढे) नतमस्तक झाले नाहीत.१०७ अशाच संयमी लोकांना अल्लाह पसंत करतो.
(१४७) त्यांची प्रार्थना केवळ हीच होती, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या चुका आणि उणिवांबद्दल क्षमा कर, आमच्या कार्यात तुझ्या मर्यादांचे जे काही उल्लंघन झाले असेल ते माफ  कर, आमचे पाय स्थिर कर आणि काफिर (विरोधक)विरूद्ध आम्हाला मदत कर.’’
(१४८) सरतेशेवटी अल्लाहने त्यांना जगातील लाभदेखील दिले व त्याहून श्रेष्ठतर, परलोकांतील लाभदेखील प्रदान केले. अल्लाहला असेच सत्कर्मी लोक पसंत आहेत.
(१४९) हे ईमानधारकांनो, जर तुम्ही त्या लोकांच्या इशाऱ्यावर चालू लागला ज्यांनी कुफ्र (अधर्म)च्या मार्गाचा अवलंब केला आहे तर ते तुम्हाला परत मागे नेतील१०८ आणि तुम्ही  असफल व्हाल.
(१५०) (त्यांच्या गोष्टी चूक आहेत) सत्य असे आहे की अल्लाह तुमचा पाठीराखा व साहाय्यक आहे आणि तो सर्वोत्तम साहाय्य करणारा आहे.
(१५१) लवकरच ती वेळ येणार आहे जेव्हा आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्यांच्या मनावर दरारा बसवू यासाठी की त्यांनी अल्लाहबरोबर अशांना ईशत्वात भागीदार ठरविले आहे ज्यांच्या  भागीदार असण्यासंबंधी अल्लाहने कोणतीही सनद उतरविली नाही. त्यांचे शेवटचे ठिकाण जहन्नम (नरक) आहे आणि फारच वाईट आहे ते ठिकाण जे त्या अत्याचाऱ्यांच्या नशिबी येणार  आहे.
(१५२) अल्लाहने (समर्थन व साहाय्याचे)जे वचन तुम्हाला दिले होते ते तर त्याने पूर्ण केले. सुरवातीला त्याच्या हुकुमाने तुम्हीच त्यांना ठार करीत होता. पण जेव्हा तुम्ही दुबळेपणा  दाखविला व आपल्या कार्यात आपापसांत मतभेद दाखविले, आणि ज्या क्षणी ती वस्तू अल्लाहने तुम्हाला दाखविली जिच्या प्रेमात तुम्ही गुरफटला होता (म्हणजे युद्धातील लुटीचा माल)  तेव्हा तुम्ही आपल्या सरदाराच्या आज्ञेविरूद्ध गेला. - कारण की तुम्हापैकी काहीजण  इहलोकाचे इच्छुक होते आणि काहीजण मरणोत्तर जीवनाची इच्छा बाळगून होते. - तेव्हा  अल्लाहने तुम्हाला अधर्मियांच्या विरोधांत पराभूत केले की ज्यायोगे तुमची परीक्षा घ्यावी आणि सत्य असे आहे की असे असूनसुद्धा अल्लाहने तुम्हाला माफच केले१०९ कारण  ईमानधारकांवर अल्लाह फार कृपादृष्टी ठेवतो.
(१५३) आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही पळ काढीत होता, कोणाकडे वळून पाहण्याचे भानदेखील तुम्हाला राहिले नव्हते, आणि पैगंबर तुमच्या पाठीमागून तुम्हाला हाक मारीत होता.११०  तेव्हा तुमच्या त्या वागणुकीचा बदला अल्लाहने असा दिला की तुम्हाला दु:खापाठोपाठ दु:ख दिले१११ म्हणजे भविष्यकाळांत तुम्हाला हा धडा मिळावा की जे काही तुमच्या हातातून  निघून जाईल अथवा जे संकट तुमच्यावर कोसळेल त्याच्यामुळे निराश होऊ नये, अल्लाह तुमच्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे.


१०७) म्हणजे आपश्या संख्येतील कमी व युद्ध सामग्रीची कमतरता आणि दुसरीकडे शत्रुची अधिक संख्या आणि शक्ती पाहून यांनी असत्यवादीपुढे आपले हात टेकले नाहीत.
१०९) म्हणजे तुम्ही चुक अशी केली होती की अल्लाहने तुम्हाला क्षमा केली नसती तर तुमचे उन्मूलन निश्चित झाले असते. ही अल्लाहची कृपा व त्याचे समर्थन होते आणि त्याची  मदतच होती ज्यामुळे तुमचे शत्रू तुमच्यावर काबू प्राप्त् केल्यानंतर बेहोश बनले आणि अकारण स्वत: परास्त होऊन निघून गेले.
१०८) म्हणजे ज्या द्रोही स्थितीतून (सत्य नाकारण्याच्या) तुम्ही बाहेर निघून आलात त्याच स्थितीत हे तुम्हाला पुन्हा नेतील. दांभिक आणि यहुदी, उहुद युद्धातील पराजयानंतर मुस्लिम  लोकांत हा विचार पसरविण्याचा प्रयत्न करीत होते की मुहम्मद (स.) खरोखरच अल्लाहचे पैगंबर असते तर ते पराजित झालेच नसते. हा तर एक सर्व सामान्य आपल्यासारखा माणूस  आहे. हे सामान्य माणूसच आहेत, आज जय तर उद्या पराजय! अल्लाहच्या ज्या समर्थनाचा व मदतीचा त्यानी तुम्हाला विश्वास दाखवला आहे, ते केवळ एक ढोंग आहे.
११०) उहुद युद्धात मुस्लिमांवर अचानक जेव्हा दोन्ही बाजूने हल्ला झाला आणि ते विखुरले गेले तर काहीजण मदीनाकडे पळत सुटले आणि काही उहुद पर्वतावर चढले परंतु पैगंबर  मुहम्मद (स.) एक इंचसुद्धा आपल्या जागेवरून हलले नाहीत. शत्रुंची चोहोबाजूने गर्दी होती, दहाबारा माणसांची मूठभर जमात (समुदाय) जवळ होती; तरीसुद्धा अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) या नाजुक स्थितीत पर्वताप्रमाणे आपल्या जागी अडिग राहिले आणि पळणाऱ्यांना आवाज देत होते, ``इलैया इबादल्लाही, इलैया इबादल्लाह'' (अल्लाहच्या दासांनो माझ्याकडे या, अल्लाहच्या दासांनो, माझ्याकडे या.'')
१११) दु:ख पराजित होण्याचा, दु:ख या बातमीचे (अफवा) पसरविण्याचा की पैगंबर मुहम्मद (स.) शहीद झाले, दु:ख आपले सैन्य मोठ्या प्रमाणात ठार केले जाण्याचा आणि जखमींच!  दु:ख याचे की आता तर घरसुद्धा सुरक्षित नाही. तीन हजार शत्रू ज्यांची संख्या मदीना शहराच्या लोकसंख्येपेक्षासुद्धा जास्त आहे. शत्रुचे सैन्य पराजित सैन्याला पायदळी तुडवित वस्तीत  घुसतील आणि सर्वांना ठार मारतील.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget