Halloween Costume ideas 2015
Latest Post

औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबे जळगाव येथे पार पडलेल्या मुस्लिम बांधवांच्या इज्तेमा या राष्ट्रीय धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन व शिस्त बघून डोळे थक्क झालेत! तुम्हाला विचार पडेल की ‘मी जैन धर्मीय असून’ का इतवंâ कौतुक करतोय मुस्लिम धर्मीय कार्यक्रमचें...! मी ‘जैन होण्याआधी भारतीय’ नागरिक आहे आणि एक माणूस आहे... सुमारे ८० लाख लोकांचे ३ दिवसांचे नियोजन म्हणजे सोपे काम नाही... आपल्याकडे साधी यात्रा असो व घरगुती कार्यक्रम ८००-१००० लोकांचे नियोजन करायचे तर नाकीनऊ येत. ९० लाख चौ. फुटांचा मंडप एकाच वेळी एकाच ठिकाणी हे पहिल्यांदाच घडत असेल. ५ किलोमीटरपर्यंत मंडप किमान ३५०० ते ४००० एकर जागेत होते, (त्यासाठी ‘मोठया संख्येने हिंदू बांधवांनी आपले उभे पीक स्वत:च्या हाताने नष्ट केले.) नियोजनबद्ध पार्किंग तेपण जिल्यानिहाय, कुठलाही गोंधळ नाही, ‘२५००० पाण्याचे नळ,’  ‘१५,००० शौचालये.’ किमान ‘५०,००० शिस्तबद्ध स्वयंसेवक’ स्वयंशिस्तीने १२ तासाच्या सेवा देतात. नंतर १२ तास दुसरे स्वयंसेवक... सर्वांच्या आंघोळीचे, जेवणाचे, मुक्कामाचे अप्रतिम नियोजन... तेथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी रस्त्यात जागोजागी जेवणाची, पाण्याची, थांबण्याची व्यवस्था, स्पष्ट दिशादर्शक फलक, रस्त्यात गाडी खराब झाली पंचर झाली तरी सर्व व्यवस्था, त्यांचे मोबाइल नंबर, पार्किंग झोन प्रत्येकाजवळ आधीच उपलब्ध. हे सगळं नियोजन गेले ६ महिन्यांपासून चाललेलं... २५,००० समाजबांधव गेले कित्येक महिने येथे राबत आहेत... हा मास्टर प्लॅन ज्याने कोणी आखला त्या महान व्यक्तीला व त्याला सुंदर शांत पद्धतीने साथ देणाऱ्या धर्म अनुयायी ना माझा सलाम... विशेष म्हणजे जेव्हा मी तिथं पोहचलो सगळं बघितलं, बऱ्याच लोकांशी चर्चा केली, कुणाच्याही बोलण्यात चर्चेत कुणावर उपकार करत असल्याचा अविर्भाव नव्हता. सगळ्यांत महत्त्वाचे कुठंही कुणाचेही हार्दिक शुभेच्छा किंवा स्वागताचे फोटो बॅनर लावलेल दिसले नाही... मला मिळालेल्या माहितीनुसार शासनाचा कुठलाही निधी, पैसे, यंत्रणेवर अधिभार न देता... इतर वाहतुकीला त्रास होणार नाही, इतर समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेत पार पडणाऱ्या कार्यक्रमाचे कौतुक करावे तितके थोडेच! प्रत्येक धर्म आपल्या आपल्या परीने आपल्या धर्माचे कार्यक्रम पार पाडत असतात पण या कार्यक्रमाचे नियोजन अफलातून आहे. जे योग्य असतं आणि मनाला आवडतं त्याचं कौतुक मी नेहमीच भरभरून करत असतो. शिस्त आणि नियोजन मनापासून आवडलं... इतका मोठा कार्यक्रम आजवर मी कधीही पाहिला नाही. म्हणून हे कौतुक... नियोजनाची आवड आहे म्हणून बघायला गेलो होतो....               -अलकेश कासलीवाल, येवला.

-शाहजहान मगदुम
मराठी भाषेविषयी सतत चिंता व्यक्त केली जाते आणि त्यासाठी आवश्यक ते प्रयत्नही केले जातात, पण ज्यांच्यावर मायमराठीच्या जतन-संवर्धनाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडूनच मराठीची हेळसांड पाहायला मिळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विधिमंडळात गाजलेला यंदाचा ‘मराठी दिन’ होय. ‘मराठी दिन’ अगदी आदल्या दिवसापासूनच गाजायला सुरुवात झाली होती. विधिमंडळाच्या पायरीवरच मराठी अनुवादकाला सुरक्षा रक्षकांनी अडविले आणि राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवादच होऊ शकला नाही. मंत्रालयात माणसे आत्महत्या करायला येऊ लागली म्हणून विधिमंडळाचीही सिक्युरिटी टाईट केली असावी, हे समजू शकते; पण अनुवादकालाही अडवावे? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे धाडसच म्हटले पाहिजे. पहिल्याच दिवशी मराठीवरून एवढा गोंधळ झालेला. दुसरा दिवस तर ‘मराठी दिन’. कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेले मराठी अभिमान गीत विधिमंडळात लावले गेले, त्यातले सातवे कडवे गाळले! ‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी’ ही खंत नेमकी सातव्या कडव्यात ‘आणि हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी’ हा दुर्दम्य आशावादही याच कडव्यात. नेमका मराठी दिनाचा मुहूर्त साधून एरव्ही मराठीचा आग्रह धरणाऱ्यांवर घसे कोरडे न करताच केवळ बघ्याची भूमिका बजावली. राज्याच्या विधिमंडळात जे काही घडले, ते मायमराठीची या महाराष्ट्रात अजूनही उपेक्षा होत असल्याचे दर्शविणारे होते. प्रथेप्रमाणे राज्यपालांचे संयुक्त सभागृहासमोर अभिभाषण सुरू झाले असता राज्यपालांच्या इंग्रजी भाषणाचा मराठीत अनुवाद करण्याची व्यवस्था नसल्याचे लक्षात आल्याने विरोधकांनी गदारोळ केला. ज्या राज्याची भाषा मराठी आहे, त्या राज्याच्या विधिमंडळात मराठीची अशी उपेक्षा व्हावी, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. छत्रपती शिवरायांचा सदैव वारसा सांगणारी आणि मराठीचा, मराठी माणसांचा कधीही अवमान होऊ देणार नाही, अशा घोषणा करणारी जी मंडळी आज सत्तेत आहेत, त्यांच्याच राजवटीत असे घडावे? राज्याच्या विधिमंडळातच समस्त लोकप्रतिनिधींच्या देखत आपली अशी अवहेलना झालेली पाहून मराठी भाषा धायमोकलून रडली असेल! मराठीची हेळसांड झाल्याने जी नाचक्की झाली ती कशी भरून काढणार? विधिमंडळ परिसरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी विधिमंडळ सचिवालयावर असते, हे लक्षात आणून देतानाच झाला प्रकार निषेधार्ह असल्याने त्याबद्दल सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. असे असले तरी या घटनेद्वारे अत्यंत गलथानपणाचे दर्शन जनतेला झाले. हा जो राडा झाला ते पाहून मायमराठीनेही शिमग्याच्या आधीच झालेला हा शिमगा पाहून शरमेने मान खाली घातली असेल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘उच्च न्यायालयांमधील निकालपत्र नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत उपलब्ध करून द्यायला हवे, जेणेकरून न्याय तळागाळापर्यंत योग्य रीतीने पोहोचेल’, असे वक्तव्य २८ ऑक्टोबर या दिवशी केले. १९९८ मध्ये राज्य शासनाने कनिष्ठ न्यायालयात मराठी भाषेचा वापर करावा, यासाठी अधिसूचना काढली आहे, तर मुंबई उच्च न्यायालयानेही किमान ५० प्रतिशत निकालपत्र, लहान आदेश आणि प्रशासकीय कामकाज मराठीत करण्याचा निर्देश कनिष्ठ न्यायालयांना दिला आहे. प्रत्यक्षात मात्र शासनाचा अध्यादेश आणि राज्य शासनाचा निर्देश धाब्यावर बसवून कनिष्ठ न्यायालयांतील बहुतांश कामकाज इंग्रजी भाषेत चालू आहे. यामुळे मराठी राज्यभाषा असलेल्या राज्यातच मराठीची हेळसांड होत आहे. १ मे १९६४ ला मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा ठरवण्यात आली. तेव्हापासून शासकीय कामकाज मराठीमध्ये करण्याचे ठरले. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता कायद्याचे कलम २७२ आणि दिवाणी प्रक्रिया संहिता कायद्याचे कलम १३७(२) अन्वये राज्य सरकारने २१ जुलै १९९८ या दिवशी अधिसूचना काढून राज्यातील कनिष्ठ न्यायालयांतील कामकाजासाठी मराठी भाषा निश्चित केली. प्रत्यक्षात १९ वर्षांनंतरही राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांमध्ये मराठीचा भाषेचा वापर अल्प प्रमाणात होत आहे. निकालपत्रेही मराठी भाषेत उपलब्ध केले जात नाहीत. अशा प्रकारे राजभाषा असलेल्या महाराष्ट्रातच मराठी भाषेची हेळसांड झाली, तर मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी राज्य शासन आणि उच्च न्यायालय यांनी मराठी भाषेच्या वापराविषयी गांभीर्याने पाहाणे आवश्यक आहे. इतिहासाचार्य राजवाड्यांनी जी ‘मुमुर्षू' होऊ घातली आहे, अशी भीती व्यक्त केली होती किंवा कुसुमाग्रजांनी हातात कटोरा घेऊन फाटक्या वस्त्रात मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे म्हणत जिच्या दीनवाण्या अवस्थेचे वर्णन केले होते, त्याच अभिजात मराठी भाषेसाठी ‘राजकीय लढाया सुरू असल्या, तरी महाराष्ट्रातल्या प्रशासकीय व्यवहारात तिला मानाचे स्थान आहे का, याचे उत्तर दुर्दैवाने ‘नाही' असेच द्यावे लागत आहे!

-अब्दुल कय्यूम शेख अहमद
असंवेदनशीलता
       आत्महत्येचे प्रयत्न रोखले जाऊ शकतात, गरज आहे आपापल्या परीने प्रयत्न करणाऱ्यांची. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाही हे सर्वमान्य असूनही वारंवार घडणाऱ्या अशा दु:खद घटनांवर योग्य विचार केला जात नाही. शेजारी लागलेली आग आपल्या घरापर्यंत पोहोचणार नाही या भ्रमात राहून प्रत्येक माणूस यंत्राप्रमाणे धावत आहे. म्हणूनच आज जगभरातील प्रत्येक वयोगटात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. नैसर्गिक मृत्यू येण्यापूर्वीच एका मागोमाग एक जीवन संपविण्याचे निर्णय घेतले जात असताना ठोस उपाययोजना अंमलात न येणे हे समाजमन असंवेदनशील बनत चालल्याचे दर्शविते.
व्यक्ति आणि समाजव्यवस्था दोन्हीही दोषी
आर्थिक चणचण, बेरोजगारी, नातेसंबंधातील तणाव, शैक्षणिक प्रश्न इ. कारणांची चर्चा करून सर्वच मोकळे होतात आणि घटनेला जबाबदार असणाऱ्या दुसऱ्या बाजूकडे डोळेझाक होते.
व्याजावर आधारित निर्दयी कर्जव्यवस्था व्यसनांना चालना देणारे उद्योगधंदे, बाजारपेठ बनलेली शिक्षण व्यवस्था, घर किंवा घराबाहेरील कार्यक्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या व्यवस्थापनातील त्रुटी, लग्नकार्यात बाधा बनलेल्या वाईट प्रथा, जागोजागी होणारे अन्याय व अत्याचार आणि वैध मार्गाने रोजगार शोधण्यात दारोदारी वाया जाणारी युवाशक्ती. ही सर्व बोलकी उदाहरणे आहेत आणि ही सर्व प्रगतीची चिन्हे नाहीतच तर समाजाला अधोगतीकडे नेणारी आहेत.
हे मुद्दे माणसांचे जीवन सुलभ व्हावेत या हेतूने येथे प्रस्तुत केले आहेत अन्यथा आपले जीवन सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी प्रथमत: व्यक्तीचीच आहे. गंभीर किंवा दीर्घकालीन आजारामुळे धैर्य सुटणे, जीवनव्यवहारात मिळालेल्या अपयशामुळे निराश होणे, अवास्तव चिंता, निरनिराळ्या प्रकारचे काल्पनिक भय, राग, लोभ इ. सर्वांना मनात जागा देऊन आपण स्वत:च आपले मन कमकुवत करतो.
सत्य हेच आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाच्या आवाक्याबाहेर नसते. सृष्टीच्या निर्माणकत्र्याने कोणत्याही जीवावर त्याच्या शक्तीपेक्षा जास्त जबाबदारीचा भार ठेवला नाही. प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता व प्रत्येक दु:ख झेलण्याची शक्ती माणसामध्ये आहे. पण तो जरा विसराळूसुद्धा आहे. रात्र आली तर भयभीत होतो. पहाट होईपर्यंत धीर धरत नाही. रात्र ही ठराविक काळापुरतीच असते. कुणी संयम ठेवो अथवा न ठेवो दिवस उजाडण्यासाठी वेळ लागतो. पण एकदा सूर्य उगवला की कृतज्ञ राहणे आपले कर्तव्य आहे हे माणूस विसरतो. 
ही वेळ आहे ‘आपली माणसं' जपण्याची
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर निराशा व्यक्त करते. आपले अपयश, आपल्यावर असलेला दबाव, होणाऱ्या छळाबद्दल काही बोलून दाखवते, आपली भावनिक व मानसिक अस्थिरता दर्शविते, तेव्हा कृपया तिला वेळ द्या. तिला गंभीर न घेणे हा आपला दोष ठरू शकतो. तिला मार्गदर्शन देणे, तिच्या समस्येवर योग्य उपाययोजना करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. एकमेकांना धीर देणे, एकमेकांशी सहानुभूती बाळगणे यामध्ये मिळणाऱ्या आनंदाला व सुखाला शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. भौतिक सुख व साधनसंपत्तीला आपला देव मानून जगणाऱ्या चंगळवाद्यांनी हा अनुभव जरूर घ्यावा.
अनुचित घडू नये यासाठी काय करावे?
एखादी व्यक्ती आत्महत्या करणार असल्याचे कळले तर करण्यासारखी बऱ्याच गोष्टी असतात, पण सर्व त्यामध्ये प्रशिक्षित नसतात. मुळात त्या क्षणी व्यक्तीला बोलते करणे आणि तिच्या भावनांचा निचरा होऊ देणे गरजेचे असते. नाजुक अवस्था असेल, व्यक्ती चिडलेली, भावनाविवशतेत असेल तर प्रतिक्रिया देणे टाळावे. हेल्पलाइनची मदद घ्यावी.
सरकारी हेल्पलाईन १०४ आहे. या नंबरवर फोन लावून तेथील समूपदेशक व प्रशिक्षित व्यक्तींशी संपर्वâ साधून मदद घेता येते. इंटरनेटच्या माध्यमातून स्प्ूाम्प्.ग्ह च्या मदतीने इतर हेल्पलाईनशी संपर्वâ होऊ शकतो.
आपणा सर्वांना एक विनंती आहे, माणसांच्या कल्याणासाठी कुरआनमध्ये सांगितलेल्या आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणींचा एकदा आपल्या बुद्धी विवेकाने आढावा घ्यावा. एक खरा एकेश्वरवादी जो आपले आचरण आपल्या विचारांच्या अधीन ठेवतो तो दु:खांना, संकटांना कसे सामोरे जातो हे जरूर तपासून पाहा.
एकेश्वरवादीचे मन आत्महत्येच्या विचाराला धुडकावून लावते
कुरआनमध्ये ( सूरह बलद -९०/४) नुसार हे स्पष्ट करण्यात आले आहे की वर्तमान जीवन हे मनोरंजन किंवा ऐश व आरामासाठी नसून काबाडकष्ट करण्याचे व यातना सहन करण्याचे ठिकाण आहे आणि यातच माणसाची परीक्षा आहे. याचा भक्कम पुरावा माणसाची जन्माची वेळ आणि ती परिस्थिती आहे. ती घटना व ती वेळ आईसाठी किती कठीण व यातनामय असते आणि रडत येणारे बाळसुद्धा अडचणीत वेढलेला असते. यावरून स्पष्ट होते की पुढेही अडचणी व कष्टांना तोंड देत जीवनाची परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच परीक्षेचा निकालही लागेल आणि त्यामध्ये यश किंवा अपयश मिळणे हेही निश्चित आहे. 
दुसरे कष्ट आणि यातनामय परिस्थितीतच माणसाचे कर्तृत्व व मोठेपण कसाला लागते. बिकट परिस्थितीतच माणसाचे सद्गुण बहरतात आणि तो मानवतेच्या उच्च शिखरावर पोहोचतो. कष्ट व यातना माणसाला त्रास देण्यासाठी नव्हे तर त्याचे स्थान उंचावण्यासाठी असतात.
माणसाचे धैर्य सोडण्याचे कारण हेच आहे की तो वर्तमान जीवनालाच सुखसमृद्धी व मौजमजा किंवा ऐश व आराम करण्याचे स्थान समजतो व हीच अपेक्षा बाळगतो.
एकेश्वरवादी हा विचार करतो की जीवन अमानत आहे. जीवन देणारा मालक सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. या सृष्टीमध्ये माझे स्थान केवळ एखाद्या टृस्टीसारखे आहे. मालकाच्या इच्छेविरुद्ध कारभारात आपल्या मर्जीने मी ढवळाढवळ करु शकत नाही. मृत्यूची वेळ ठरलेली आहे. ठरलेल्या वेळी नैसर्गिक मृत्यूने न मरता आत्महत्येच्या प्रयत्नात मेलो तर अधिकार नसलेल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्याची शिक्षा मिळेल. संसारातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न मरणोत्तर जीवनात महाग पडेल आणि स्वत:च्या उणिवा, दोष व कमतरतेची शिक्षा त्यांना का द्यावी ज्यांनी माझ्यासाठी कित्येक बलिदान दिले. माझ्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. जे माझ्या सुखदु:खात सहभागी बनले. इतरांनी घेतलेल्या एवूâण कष्टापुढे माझ्या कष्टाची किंमत काय? मी आत्महत्येची पळवाट का स्वीकारावी?
एकमेव ईश्वरावर विश्वास ठेवणारा हेच मानतो की जे संकट येऊन कोसळले आहे त्याचे निवारण ईश्वराखेरीज अन्य कोणीही करूच शकत नाही. म्हणून तो संकट आणि त्रासासमोर एखाद्या मजबूत पाषाणासारखा उभा राहतो. 
एकेश्वरवादी केवळ अल्लाहचेच भय बाळगतो. त्यामुळेच त्याच्या मनातील सर्व प्रकारचे भय लोप पावतात. तोच एकमेव ईश्वर सर्वाचा रक्षणकर्ता आहे म्हणून फक्त त्यालाच संकट व अडचणीत हाक मारतो. तोच सर्वशक्तिशाली आहे म्हणून फक्त त्याच्या समोर आपली गाऱ्हाणी ठेवून प्रार्थना करतो.
लाभ व हानीचा स्वामी फक्त एकच ईश्वर आहे व सर्व काही त्याच्याच हाती आहे. म्हणून मी इतर कोणाचीही अपेक्षा बाळगणार नाही. कितीही संकटे आली तरी मला विश्वास आहे की त्या एकमेव ईश्वराची साथ मला सोडणार नाही.
भाग्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा एकेश्वरवादी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. परंतु अपयश आल्यास तो हा विचार करतो की जे काही घडले ते अल्लाहने निर्धारीत केलेल्या भाग्यानुसार घडले. अल्लाहचा प्रत्येक निर्णय उद्देशपूर्ण असतो. निश्चितच यामध्ये कोणता तरी भलाईचा पैलू असेल आणि भविष्यकाळातही अल्लाहचा प्रत्येक निर्णय माझ्या भलाईसाठीच असेल. मी पुन्हा प्रयत्न करणार, हातपाय हलविणार पण खचून जाणार नाही आणि नाउमेद होणार नाही.
एकेश्वरवादीचा हा विश्वास, अल्लाहशी असलेली त्याची श्रद्धा त्याला मानसिक समाधान देते. मोठमोठ्या संकटातून, दु:खांच्या आघातातून, कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्याला सापडतात. हेच मार्गदर्शन प्रत्येक काळात प्रत्येक समाजात प्रेषितांनी केले. एकेश्वरवादाकडे लोकांना बोलविले.
माणसाला जीवन का देण्यात आले? सृष्टी का निर्माण करण्यात आली? सृष्टीमध्ये माणसाचे स्थान काय आहे? माणसाने आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात कसे वागावे? याचा अभ्यास करण्यासाठी कुरआन आणि  आदरणीय मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणींचा जरूर अभ्यास करावा. कारण आज मार्गदर्शनाचे विश्वसनीय, प्रामाणिक आणि परिपूर्ण साधन हेच आहे.

सोलापूर-
‘खादिमाने उर्दू फोरम’ व मिल्लत वेलफेअर असोसिएशन’च्या संयुक्त विद्यमाने ‘कवी इक्बाल यांच्या कवितेतून समाज एकोप्याचा संदेश’ या विषयावर कार्यक्रम अल हसनात एज्युकेशन ट्रस्ट मुंबईचे रऊफ खान यांच्या अध्यक्षतेखाली व शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी, जमियत उलमा-ए-हिंदचे मौलाना हारीस, रहमानीया मशिदीचे प्रमुख वक्ते मौलाना ताहेर बेग या प्रमुख वक्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ. शफी चोबदार यांनी फोरमच्या वतीने झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. मिल्लत असोसिएशनचे जब्बार शेख यांनी मिल्लतचा अहवाल सादर केला. सचिव कुतबोद्दीन शेख, विकारअहमद शेख, अय्युब नल्लामंदू, मजहर अल्लोळी, मन्नान शेख,अन्वर कमिशनर, नासर आळंदकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. व्यासपीठावर जमियत अहले हदीसचे अध्यक्ष मुखतार हुमनाबादकर, जमियत अहले कुरेशचे हाजी अय्युब कुरेशी, शहर काझी अमजदअली काझी, एस. ए. जब्बार, फोरमचे अध्यक्ष विकार शेख, उपाध्यक्ष अय्युब नल्लामंदू, सचिव डॉ. शफी चोबदार इ. उपस्थित होते.
मौलाना ताहेर बेग यांनी उर्दू ज्येष्ठ विद्वान कवी यांच्या अनेक कवितांच्या आधारे समाजात एकोपा कसा व कशासाठी जरुरी आहे हे सिध्द केले आणि आम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आमची उन्नती व प्रगती होणार नाही आणि समाजाला योग्य दिशा मिळणार नाही.
मौलाना हारीस म्हणाले, अल्लामा इक्बाल हे उर्दूचे थोर कवी होते .त्यांनी आपल्या अनेक कविता मुस्लिम समाजाला उद्देशून लिहिल्या आणि झोपल्याचे सोंग करत असलेल्या समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कवितेतून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सुधाराचा संदेश मिळत असतो, त्यासाठी आपण स्वत: प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपसातातील भेदभाव हे माणसांना माणुसकीपासून दूर नेणारे असतात, असा संदेश कवी इक्बाल यांनी अनेक वेळा अनेक कवितेतून दिलेला आहे. आज आम्ही इक्बाल यांच्या शायरीचे वाचन करतो परंतु ती समजून घेत नाही, म्हणूनच आज आम्ही आपसात भांडत बसलो आहोत.
शहर काझी सय्यद अमजदअली म्हणाले, अल्लामा इक्बाल यांच्या शायरीतून आपल्याला सामाजिक संदेश मिळतो हे जगजाहीर आहे, ‘एकही सफमें खडे होगये महेमूद व आयाज, न कोई बंदा रहा न बंदानवाज’ हा शेर आम्ही अनेकदा ऐकतो. परंतु त्या दोन ओळीमध्ये एक मोठा संदेश सर्व जातीजमातींसाठी लपलेला आहे. त्याला आम्ही समजू शकलो नाही, हे आमचे दुर्देव म्हणावे लागेल. राजा व रंक यांच्यातले अंतर या दोन ओळींमधून मिटवून दिलेले आहे. परंतु आजसुध्दा आम्ही गरीब श्रीमंत, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करीत बसलो आहोत. जोपर्यंत समाजात बंधुभावाची भावाना वाढत नाही तोपर्यंत समाजात सामाजिक परिवर्तन होणार नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रऊफ खान म्हणाले, उर्दू भाषा ही मातृभाषा आहे. यातूनच आम्ही आमच्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, कारण उर्दूतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत. भाषेला रोजी, रोटी किंवा नोकरीशी जोडणे ही चुकीची धारणा आहे. मराठीतून किंवा इंग्रजीतून शिकले तर नोकरी लवकर लागते हा विचार चुकीचे आहे. प्रत्येकाने आपआपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. आमची मातृभाष उर्दू आहे तर आम्ही आमचे संपूर्ण शिक्षण उर्दूतून घेतले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शफी चोबदार यांनी केले. आभार फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी मानले.

येवला (शकील शेख)-
शहरातील ‘अंजुमन फरोग ए तालीम’ संचालित एँग्लो उर्दू हायस्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज’ येथे सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष निसार शेख निंबूवाले यांच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी मुशायरा (रोमांचित करणाऱ्या कविता) सादर केल्या.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. माणिकराव शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे प्रांताधिकारी भिमराज दराडे, येवला न. पा. मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, उषाताई शिंदे, गोल्डमॅन पंकज पारख, बंडू क्षीरसागर, शहर काझी हाजी राफीउद्दीन होते. परवीन शेख, प्रशांत शिंदे, रि़जवान शेख आदि उपस्थित होते.
आलेल्या सर्व मान्यवरांचा ‘ग्रीन कॅंडेल ग्रुप’चे अध्यक्ष अंसारभाई शेख व रायगड ग्रुपचे शाहू शिंदे तसेच मनमाडचे फुले-शाहू मंचचे कार्याध्यक्ष फिरोजभाई शेख व इनायत भाई आदिंच्या हस्ते पुष्प व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अब्दुल वाहिद यांनी दिवसेंदिवस उर्दू भाषा लोप पावत चालली असून लहान मुलांमध्ये उर्दूविषयी आकर्षण व आवड निर्माण व्हावी या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
आपण केलेल्या सामाजिक कार्यात आपल्या कुटुंबाचा मोठा वाटा असून त्यांनी वेळोवेळी मला सहकार्य आणि प्रोत्साहान दिल्यानेच आपण हे कार्य करू शकलो असल्याची प्रतिक्रिया निसार शेख यांनी सत्काराला उत्तर देतांना दिली.
विद्याथ्र्यांनी अतिशय सुरेख शैलीत कविता सादर केल्या तर उपस्थित रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमास आलमगीर शेख, अतीक गाजी, एजाज शेख, हारून शेख, असद गाजी, सनाउल्ला फारुकी, अजीज शेख, सद्दाम शेख, मोबीन शेख, शकील शेख, सलीम मुकादम व अफजल सर, सहशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँग्लो उर्दू हायस्कूलचे सर्व अध्यापक, सद्दाम शेख, अनीस शेख, रिजवान शेख, उबैद अंसारी यांनी विशेष परिश्रम घेतले आणि आभार शाळेचे मुख्याध्यापक जावेद अंसारी यांनी मानले.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget