Halloween Costume ideas 2015
Latest Post


अवधचे नवाब आणि बेगम हजरत महल यांचा मुलगा मिर्झा बिर्जिस कादिर बहादूर यांचा जन्म १८४५ मध्ये झाला. त्याचे मूळ नाव मोहम्मद रमजान अली बहादूर होते. 

इंग्रजांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेले अवध त्यांनी परत मिळवले आणि ७ जुलै १८५७ रोजी त्यांची आई बेगम हजरत महल यांच्या पालकत्वाखाली अगदी लहान वयात अवधचे शासक बनले. बेगम हजरत महल यांच्या सक्षम नेतृत्वाखाली स्थानिक योद्धा, स्थानिक राज्यकर्त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे ब्रिटिशांनी लखनौमधून माघार घेतली. 

पुढे मिर्झा बिर्जीस कादिर यांना अवधचा नवाब घोषित करण्यात आले. त्यांनी अवध राज्यावर सुमारे १० महिने राज्य केले. जेव्हा राणी व्हिक्टोरियाचा जाहिरनामा एक नोव्हेंबर, १८५८ रोजी प्रसिद्ध झाला, तेव्हा ३१ डिसेंबर, १८५८ रोजी बिर्जिस कादिरच्या नावाने प्रतिजाहिरनामा जारी करण्यात आला. 

ब्रिटीश सेनापती बिर्जिस कादिरचे आव्हान सहन करू शकले नाहीत. परिणामी ब्रिटिश सेनापती कॉलिन कॅम्पबेल, हॅवलॉक, जेम्स आउटराम आणि इतरांनी मोठ्या सैन्यासह लखनौला वेढा घातला. 

शीख आणि गुरखा ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने लढले. लखनौ आणि अवधच्या सैनिकांनी त्यांच्या स्तरावर सर्वोत्तम लढा दिला असला तरी ते युद्ध जिंकू शकले नाहीत. 

दुसरा कोणताही पर्याय नसताना बिरजीस कादिर आणि बेगम हजरत महल यांना नेपाळच्या जंगलात आश्रय घ्यावा लागला. बेगम १८७९ मध्ये नेपाळमध्ये मरण पावल्या आणि नंतर नवाब वाजिद अली शाह यांचाही कलकत्ता येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या तुरुंगात मृत्यू झाला.

वाजिद अली शाहच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी बिरजीस कादिर आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. त्यांनी त्यांना चर्चेसाठी कलकत्त्याला बोलावले. इंग्रजांच्या धूर्त इराद्यांनुसार नकळत बिरजीस कादिर आपल्या कुटुंबासह कलकत्ता येथे पोहोचले.

त्यांचा मुलगा खुर्शीद कादिर आणि मुलगी जमाल आरा बेगम यांच्यासमवेत ते १३ ऑगस्ट १८९३ रोजी ब्रिटीशांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनाला उपस्थित होते; त्यांना विषयुक्त अन्न देण्यात आले. 

तथापि, मोहब्बत आरा बेगम, बिरजीस कादिरची पत्नी आणि धाकटी मुलगी हुस्ना अदा बेगम जिवंत राहू शकल्या, कारण ते रात्रीच्या जेवणात सामील झाले नाहीत. अशा प्रकारे १४ ऑगस्ट १८९२ रोजी मिर्झा बिर्जीस कादिर बहादूर इंग्रजांच्या कपटी कारस्थानाला बळी पडले.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


न्यायाच्या तेजस्वी घटना 


हजरत अली बिन अबी तालिब रजि. वर्णन करतात की, हजरत दानियाल अ. यांचे आई-वडील हयात नव्हते. ते अनाथ होते. एका महिलेने त्यांना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण केले. त्यावेळी बनी इस्रायलमध्ये एक राजा होता, ज्याचे दोन न्यायाधीश होते. ती बाई खूप सुंदर आणि देखणी होती. ती नियमीत राजाच्या सेवेत यायची आणि त्याला सल्ले द्यायची. 

राजाच्या दरबारात दोन काझी (न्यायाधीश) होते. दोन्ही न्यायाधीश वेळोवेळी राजाच्या सेवेत या महिलेचे येणे-जाणे पाहत असत. दोघांच्याही मनात त्या महीलेविषयी प्रेम जागृत झाले. एकदा त्यांनी आपली आंतरिक इच्छा या स्त्रीसमोर व्यक्त केली. आम्हा दोघांचेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला खात्री आहे की, तू आमच्या प्रेमाचा स्वीकार करशील. या कुलीन महिलेने साफ नकार दिला. त्यांना खडे बोल सुनावले. दोन्ही न्यायाधिशांनी तिला खोट्या प्रेमात फसवण्याचा, वेगवेगळ्या मार्गाने तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती स्त्री कोणत्याही प्रकारे त्यांच्या हाती आली नाही.

ही सुंदर स्त्री कोणत्याही किंमतीत आपल्या हाती येऊ शकत नाही हे पाहून त्या दोघा न्यायाधीशांनी संतापून राजाकडे तक्रार केली की, जी स्त्री तुझ्याकडे येऊन तुला सल्ले  देते, तिने व्यभिचार सारखे मोठे पाप केले आहे! जेव्हा राजाने आपल्या न्यायाधीशांची साक्ष ऐकली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला, तो मोठ्या विचारात पडला, कारण त्याला या बाईच्या खानदानीपणाची आणि शालीनतेची पूर्ण खात्री होती. पण न्यायाधीशांची साक्ष नाकारताही येत नव्हती. 

राजाला दोन न्यायाधीशांची साक्ष मिळाल्यानंतर अधिक तपासाची गरज पण भासली नाही. राजाने, दोघांची साक्ष मान्य केली. त्या स्त्रीला तीन दिवसांचा अवधी दिला आणि त्यानंतर तिला दगडमार करून ठार करण्याचा आदेश दिला. शहरात घोषणा झाली की, व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला अमुक दिवशी दगडमार करून मारण्यात येईल. लोकांनी ते पाहायला यावे. राजाने या महिलेला दगडमार करण्याचा आदेश दिला होता, परंतु तो आतून खूप काळजीत होता. ती स्त्री व्याभिचारिया आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याने त्याच्या एका विश्वासू मंत्र्याला विचारले,”दगडमार होण्यापासून त्या स्त्रीला वाचवता येईल का?” मंत्री म्हणाला,”शहरात तिच्यावर दगडफेक करून ठार मारण्याची घोषणा झाली आहे. दोन न्यायाधीशांच्या साक्षीच्या आधारे दगडफेक करण्याचा निर्णय देण्यात आला आहे, अशा परिस्थितीत या दगडमार करण्याचा निर्णय मागे घेता येणार नाही.”

तिसरा दिवस, महिलेला दगडमार करण्याचा दिवस होता. मंत्री घरातून बाहेर आला तेव्हा त्याला काही मुले खेळताना दिसली. त्यात हजरत दानियाल अ. हे ही होते. (तो अनाथ मुलगा ज्याला त्या स्त्रीने दत्तक घेतले होते.)  तो मंत्री उभे राहून मुलांना खेळताना पाहत होता. हजरत दानियाल अ. यांनी मुलांना एकत्र केले आणि म्हणाले,”मुलांनो! आपण एक खेळ खेळूया” यात दानीयाल अ. राजा झाले. एका मुलाला कुलीन स्त्रीचे पात्र समजावून सांगितले आणि दोन मुलांना न्यायाधीशांची भूमिका दिली आणि म्हणाले, ‘तुम्ही दोघे माझ्या कोर्टात या महिलेविरुद्ध साक्ष द्या.’ 

ते स्वतः मातीचा ढीग गोळा करून त्यावर बसले आणि हातात एक लाकडी तलवार ठेवली. न्यायालयाचा देखावा निर्माण केला. समोर स्त्रीच्या वेशात आलेला मुलगा उभा होता. हजरत दानियाल अ. यांनी इतर मुलांना एका न्यायाधीशाचा हात धरून त्याला दूरवर नेण्यास सांगितले. ते निघून गेल्यावर त्यांनी दुसऱ्या न्यायाधीशाला विचारले,”मला खरे सांग, नाहीतर मी तुला मृत्यदंड देईन, या स्त्रीने व्यभिचार केला? तू साक्ष देतोस?”

न्यायाधीश म्हणला, “मी साक्ष देतो की, या महिलेने व्यभिचार केला आहे.”

हजरत दानियाल अ. “कधी?”

न्यायाधीशाने उत्तर दिले, “अमक्या दिवशी.”

हजरत दानियाल अ. “तिने कोणत्या पुरुषासोबत व्यभिचार केला आहे?”

न्यायाधीश, “अमूक-अमुक आणि तत्सम.”

हजरत दानियाल अ. “कोणत्या ठिकाणी?”

न्यायाधीश, “अमक्या ठिकाणी?”

हजरत दानियाल अ. मुलांना म्हणाले, “या न्यायाधीशाला घेऊन जा आणि दुसऱ्या न्यायाधीशाला घेऊन या.”

मुलांनी आदेशाचे पालन केले.

हजरत दानियाल अ. यांनी पहिल्या न्यायाधीशाला जे प्रश्न विचारले होते तेच प्रश्न दुसऱ्या न्यायाधीशालाही विचारले. दुसऱ्या न्यायाधीशाची उत्तरे पहिल्या न्यायाधीशापेक्षा वेगळी होती. 

हजरत दानियाल अ. म्हणाले, “खरे गुन्हेगार तर हे न्यायाधीश आहेत!”

राजाचा विश्वासू मंत्री जो हे सगळं दृश्य पाहत होता, वेळ वाया न घालवता राजाच्या सेवेत पोहोचला आणि त्याला लहान मुलांचा तो खेळ सांगितला. राजाचे डोळे उघडले. त्याने मुलांच्या खेळाप्रमाणे कृती केली. त्याला दोन्ही न्यायाधीशांचे कथन वेगळे असल्याचे आढळून आले. राजाने दोन्ही न्यायाधीशांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आणि त्या पवित्र स्त्रीला आदरपूर्वक तिच्या घरी पाठवले.

( संदर्भ :- अब्दुल मालीक मुजाहिद लिखित, ‘सुनेहरे फैसले’ पान क्र. ६४) 

-सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881



इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताची राजधानी तबरीझ येथे इराणचे ६३ वर्षीय राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि ६० वर्षीय परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहिया यांचा गेल्या रविवारी (१९ मे) हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आता नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी मुदतपुर्व निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. इराणी सरकारच्या ३ शाखांच्या प्रमुखांनी २८ जून रोजी अध्यक्षांची निवडणूक घेण्याला अनुमती दिली आहे. राजधानी तेहरानमध्ये अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला इराणच्या कार्यकारी शाखेचे प्रमुख मोहम्मद मोखबर, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ आणि न्यायपालिका प्रमुख घोलाम-होसेन मोहसेनी-इजेई उपस्थित होते. इराणच्या सरकारी प्रसिद्धी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. इराणच्या राज्यघटनेनुसार इराणला आता ५० दिवसांच्या आत निवडणुका घेऊन नवा राष्ट्राध्यक्ष निवडावा लागणार आहे.

इब्राहिम रईसी यांचा जन्म १४ डिसेंबर १९६० रोजी मशहाद येथे झाला. हे शहर इराणचे दुसरे सर्वात मोठे शहर मानले जाते. याच शहरात शिया इस्लामचे इमाम अली रझा यांची दरगाह आहे. इथे इराणची एक समृद्ध सामाजिक संस्थाही आहे. रईसी यांचे वडील मौलवी होते, त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्या वेळी ते पाच वर्षांचे होते. इब्राहिम रईसी नेहमीच शिया परंपरेनुसार काळी पगडी परीधान करत होते. सैय्यद असण्याचे आणि पैगंबर मोहम्मद यांचे वंशज असल्याचे प्रतीक मानले जाते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या १५ व्या वर्षांपासून त्यांनी कोम शहरातील धर्मशिक्षण देणार्‍या संस्थेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थी जीवनात त्यांनी पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेले इराणचे शाह मोहम्मद रेझा पहलवी यांच्याविरोधात निदर्शने केली होती. १९७९ मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या नेतृत्वातील इस्लामी क्रांतीमध्ये शहा रेझा पहलवींना सत्तेवरून बेदखल टाकण्यात आले होते.

इस्लामिक क्रांतीनंतर रईसी यांनी न्यायपालिकेत काम करण्यास सुरुवात केली आणि अनेक शहरांमध्ये वकील म्हणून काम केले. हे करत असताना त्यांना इराणच्या प्रजासत्ताकाचे संस्थापक आणि १९८१ मध्ये इराणचे अध्यक्ष झालेल्या अयातुल्ला खोमेनींकडून प्रशिक्षण मिळत होते. वयाच्या २५ व्या वर्षी रायसी इराण सरकारचे दुसर्‍या क्रमांकाचे वकील झाले. त्यानंतर ते न्यायाधीश झाले आणि ’डेथ कमिटी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गुप्त समितीमध्ये (ट्रायब्युनल) १९८८ साली त्यांचा समावेश झाला. आपल्या राजकीय कारवायांसाठी आधीपासूनच तुरुंगात असलेल्या हजारो राजकीय कैद्यांवर या ट्रायब्युनलच्या मार्फत पुन्हा खटला चालवला जात असे. या राजकीय कैद्यांपैकी बहुतेक जण इराणमधील डाव्या विचारसरणीच्या आणि विरोधी पक्ष असणार्‍या मुजाहिदीन-ए-खल्का किंवा ‘पीपल्स मुजाहिदीन ऑर्गनायझेशन ऑफ इराण’चे सदस्य होते. या ट्रायब्युनलने एकूण किती राजकीय कैद्यांना मृत्यूदंड दिला, याबद्दल माहिती नाही. यात जवळपास पाच हजार स्त्री-पुरुषांचा समावेश असल्याचे मानवाधिकार संघटनांकडून सांगण्यात येत आहे. १९८८ मधली एक ध्वनीफित पाच वर्षांपूर्वी समोर आली. यात इब्राहिम रईसी, न्यायालयाचे इतर सदस्य आणि तत्कालीन दुसर्‍या क्रमांकाचे धार्मिक नेते अयातुल्ला हुसैन अली मोतांजेरी यांच्यात संभाषण होते. राजकीय कैद्यांना फाशी देण्याची घटना हा ’इराणच्या इतिहासातला सगळ्यांत मोठा गुन्हा’ असल्याचे मोतांजेरी म्हणत असल्याचे या ध्वनीफितीमध्ये ऐकू येत होते. यानंतर वर्षभरातच अयातुल्ला खोमेनींचे उत्तराधिकारी म्हणून मोतांजेरी यांची करण्यात आलेली नेमणूक रद्द झाली. यानंतरही रईसी इराणच्या प्रॉसिक्युटर पदावर कायम राहिले. इतकेच नाही तर यानंतर ते स्टेट इंस्पेक्टरेट ऑर्गनाझेशनचे प्रमुख आणि न्यायपालिकेतले पहिले उपप्रमुख बनले. २०१४ साली त्यांची इराणचे प्रॉसिक्युटर जनरल (सरकारचे प्रमुख वकील) या पदावर नियुक्ती झाली. यानंतर २ वर्षांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी रईसी यांची इराणच्या सर्वात महत्त्वाच्या आणि समृद्ध धार्मिक संस्थापैकी एक असणार्‍या अस्तन-कुद्स-ए-रजावीचे संरक्षक म्हणून नेमणूक केली. ही संस्था मशहद शहराक शिया मुस्लिमांच्या मशिदी आणि त्यांच्याशी संबंधित असणार्‍या इतर संस्थांची जबाबदारी सांभाळते.

२०१९ मध्ये रईसी यांना अयातुल्ल्ा अली खोमेनी यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदी नेमले. यानंतर काही आठवड्यातच रईसी यांनी पुढचा सर्वोच्च धार्मिक नेता निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या ८८ मौलवींच्या समितीचे उपाध्यक्ष बनवले. न्यायपालिकेचे प्रमुख म्हणून रईसी यांनी काही धोरणात्मक सुधारणा केल्या. रईसींच्या काळात विरोधी मतांच्या बऱ्याच नागरिकांना गुप्तहेर ठरवून शिक्षा देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करणे चालू ठेवले. २०२१ च्या निवडणुकीत रईसी यांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरताना ’इराणला गरिबी, भ्रष्टाचार, भेदभाव आणि अपमानाच्या वागणुकीतून मुक्त करणारा स्वतंत्र उमेदवार’ अशी आपली प्रतिमा बनवली.

- शाहजहान मगदुम 

कार्यकारी संपादक



सत्ताधारीवर्गाची अविरत सत्ता गाजवण्याची इच्छा कशा प्रकारची नवनवीन रुपं धारण करते याची कल्पना करवत नाही. ज्या दोन देशांत साधी लोकशाही म्हणजे विविध विचारधारांच्या पक्षांना निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही. फक्त सत्ताधारीवर्गाचा एकच पक्ष आणि त्याच पक्षाद्वारे निवडणूक लढवणारेच पात्र उमेदवार असतात. त्यांनाच नागरिकांना निवडून द्यावे लागते. त्यांच्या इच्छेला, त्यांच्या आवडीनिवडीला काहीच अर्थ नसतो. असे देश जगात रशिया आणि चीन आहेत. दुसरेही असतील.

रशिया आणि चीन या दोन राष्ट्रांनी असे जाहीर केले की ते अमेरिकेच्या आक्रमक व्यवहाराला विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. त्या दोन्ही राष्ट्रांचे यूक्रेनसहित अनेक विषयांवर एकमत आहे. आणि उभय देशांमधील संबंधांमध्ये पाश्चात्य देशांकडून हस्तक्षेप सहन करणार नाहीत. त्यांनी असेही जाहीर केले की हे दोन्ही देश मिळून जगभर न्याय आणि प्रामाणिकपणाला उत्तेजन देतील. त्या दोघांनी म्हणजे रशिया आणि चीन यांनी एक गंमतीची गोष्टदेखील सांगितली ती अशी की आंतरराष्ट्रीय नियमांनुसार आम्ही जगभर न्याय आणि लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करू. इथे नमूद करावेसे वाटते की या दोन्ही देशांचे सत्ताधारी लोकशाहीच्या प्रचलित पद्धतीने निवडून आलेले नाहीत. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी स्वतःला २०३० पर्यंत सत्तेत राहण्याची व्यवस्था पूर्वीच करून ठेवलेली आहे, तर जवळजवळ आजीवन चीनचे राष्ट्राध्यक्ष राहण्याची सोय शी जिनपिंग यांनीदेखील करून ठेवली आहे. म्हणजे हे आजीवन सत्ताधारी तर प्रजा आजीवन गुलाम! ज्यांनी ७५ वर्षांपूर्वी सोव्हियत संघाला मान्यता दिली त्या चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष माओझे डाँग यांच्या कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत.

या दोन देशांचे मानवतेच्या संहारात किती मोठे योगदान आहे ते पाहू या. माओझे डाँग ज्यांनी १९४९ मध्येआधुनिक चीनची स्थापना केली होती,  ते आपल्या शासनकाळात झालेल्या जवळपास ८ कोटी लोकांची हत्या/मृत्यूस जबाबदार आहेत. त्यांनी १९६६ ते १९७६ च्या काळात सांस्कृतिक क्रांतीची घोषणा केली होती. या मोहिमेचा उद्देश भांडवलदारी व्यवस्थेला संपवणे हा होता. पण याची वास्तविकता अशी होती की त्यांनी या काळात २.५ लाख मस्जिदी उद्ध्वस्त केल्या. काही मस्जिदींची इस्लामी ओळक नष्ट करून टाकली. रेड गार्ड्स नावाची संस्था स्थापन केली. यात विद्यार्थी सहभागी झाले. ही एक सामाजिक चळवळ होती. याचा उद्देश जुने विचार, जुनी संस्कृती, जुन्या परंपरा आणि जुन्या सवयी संपवणे हा होता. या मोहिमेस ‘गँग ऑफ फोर’ म्हणून ओळखले जाणारे माओझे डाँग यांचे समर्थक होते. यात माओ यांच्या पत्नी जिआंग किन तसेच झान्य. युंग याओ वेन यान वान्य हान्य यांचा समावेश होता. त्यांनी जी सांस्कृतिक हिंसा पसरवली यात दीड-दोन कोटी लोक मारले गेले. त्यांनी जे अत्याचार मानवांवर केले यामध्ये मानवांची हत्या करून ते खात होते. (Cannibalism) रास्त ज्या लोकांची कत्तल केली त्यांची मोठी संख्या वगळता दुष्काळ आणि महामारी यात लक्षावधी लोक मृत्युमुखी पडले. एक योजना माओ यांनी चालवली होती ती म्हणजे छोट्यामोठ्या खेड्यापाड्यांतील शेतजमिनी त्यांच्या मालकांकडून हिसकावून घेऊन त्या जमिनी औद्योगिक कार्यक्रमांसाठी वापरण्यात याव्यात या मोहिमेत लाखोच्या जमिनी गेल्यामुळे ते अन्नधान्याअभावी मरण पावले. गंमत म्हणजे ही योजना एकदा बंद करण्यात आली होती, पण सध्या पुन्हा ह्या योजनेची पुनरावृत्ती होत आहे. १९४९ सालीच जे तैवानच्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा झाले. त्यात अंदाजे ५० लाख सैन्य आणि इतर नागरिक मिळून १५० लाख लोक मरण पावले. यात उपासमार आणि महामारीमुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी होती. भूसुधार मोहिमेत ४० लाख चीनी नागरिक मरण पावले तर ३ वर्षांच्या दुष्काळात माओ यांनी केवळ माणसेच मारली नाहीत तर आकाशात उडणाऱ्या गौरेयावरही त्यांचा राग होता. का तर त्या चिमण्या शेतातील पिकांसाठी मोठा धोका आहेत. म्हणून चीनमच्या आकाशातील एकन् एक गौरेया आणि लहान पक्ष्यांना मारण्याचे नागरिकांना आदेश दिले. आणि सर्व नागरिकांनी सर्व पक्ष्यांचा खात्मा केला. याच्या परिणामस्वरुप तिथल्या नागरिकांना दुष्काळाला सामोरे जावे लागले, ज्यामध्ये ४.५ कोटी लोक मरण पावले. यात जवळपास ८ कोटी लोकांचे चीनमध्ये माओझे डाँग यांच्या रानटीपणामुळे प्राण गेले. अगदी अलीकडच्या काळात १९८९ मध्ये तियानमन स्केअर मध्ये चीनच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. त्यांची मागणी होती की पर्यावरण सुधारणा, कायद्याचे राज्य, लोकशाही वगैरे आधुनिक विचार. पण ज्या सत्ताधारीवर्गाने जुन्या परंपरा व इतिहास संपवण्यासाठी लोकांची कत्तल केली त्यांनीच ह्या आधुनिक विचारांची मागणी करणाऱ्या १०००० विद्यार्थ्यांना रणगाड्यांखाली चिरडून हत्या केली. त्या देशाचे आताचे राष्ट्रपती शी जिनपिंग जगात न्या आणि लोकशाही स्थापनेसाठी दुसरे हुकुमशाह ब्लादिमिर पुतीन यांच्याशी हातमिळवणी करत आहेत. स्वतः रशियन क्रांतीमध्ये पाच कम्युनिस्टांनी ७०-७२ लाख लोकांचे प्राण घेतले. १८१७-२३ या काळात या मोहिमेला ‘रेड टेर्रर’ नाव देण्या आले होते. त्यामध्ये ५-६ लाख लोकांची कत्तल झाली. इतकेच नव्हे तर सार्वजनिक बलात्कार, सर्रास हत्या, ज्यू लोकांविरुद्ध अभियान हे सर्व चालू होते. तसेच गावेच्या गावे जाळून नष्ट करण्यात आली. पिके नष्ट केली गेली.

अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी चालवलेल्या मानवांच्या कत्तलीची मोहीम थांबेली नसताना ही दुसरी दोन राष्ट्रे आंतरराष्ट्रीय कृती दाखवून देण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांनाही नरसंहारात भाग घ्यायला हवा की नाही! अमेरिका आणि यूरोपच नेहमी का? लोकशाही आणि न्यायाच्या वाटणीत  त्यांचा सहभाग नको का?

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: 9820121207



मुंबईमध्ये होर्डिंग पडल्याने त्याखाली 16 जणांचा चेंगरून मृत्यू झाल्याची बातमी विस्मरणात जाण्याच्या आधीच मागच्या आठवड्यात पुण्यात मस्तीत घडवून आणल्या गेलेल्या अपघातामध्ये दोघांच्या करूण अंताची बातमी येवून ठेपली. या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे दोन्हीमध्ये प्रशासकीय व्यवस्थेचे धिंदवडे निघालेले आहे. मुंबईत लावलेला होर्डिंग सगळ्यांना दिसत होता. तो विनापरवानगी लावण्यात आलेला होता. सरकारमान्य आकाराच्या 9 पट मोठा होता तरी सर्व गप्प होते. हे मुंबईतील प्रशासकीय व्यवस्थेचे पाप होते. पुण्यातील अपघात 17 वर्षे 8 महिन्याच्या वेदांत अग्रवाल या तरूणाने केला. या घटनेनंतर पुण्याच्या प्रशासकीय व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. वेदांत हा विशाल अग्रवाल, (मालक ब्रह्म रिअ‍ॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर) या बड्या कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे. 12 वीची परीक्षा संपल्यानंतर वेदांतने आपल्या मित्रांबरोबर पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका पबमध्ये परीक्षेचा क्षीण घालविण्यासाठी पार्टी आयोजित केली होती. त्या ठिकाणी त्यांनी 90 मिनीटात 80 हजार रुपयांची दारू ढोसली. ऑनलाईन पेमेंट केले आणि बापाने नुकत्याच घेतलेल्या पोर्शे कंपनीच्या दोन कोटी रूपये किंमतीच्या कारमध्ये ड्रायव्हरला हटवून स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसून ताशी 200 किलोमीटर वेगाने गाडी चालविली आणि स्कूटवर जाणार्या 24 वर्षीय इंजिनिअर अनिश अवधीया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोष्ठा दोघांना एवढी जबरदस्त धडक दिली की दोघांचाही मृत्यू झाला. या गाडीचे पुण्यात रजिस्ट्रेशन झालेले नव्हते. याचा अर्थ वाटसरूंनी वेदांतला डायव्हिंग सीटवरून ओढून पोलिसांच्या स्वाधीन केले नसते तर वेदांत कधीच पोलिसांच्या हाती लागला नसता. अपघात ड्रायव्हरच्या नावावर खपवला गेला असता हे सांगण्याची कुठल्या तज्ज्ञाची गरज नाही. वेदांतला पोलिस स्टेशनमध्ये मिळालेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटचे सुरस किस्से एव्हाना समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने पोलिसांनी आता कुठे कडक भूमिका घेतली आणि या प्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यात विशाल अग्रवाल यांचा सुद्धा समावेश आहे. 

या घटनेचे विश्लेषण

या घटनेची दखल घेऊन आघाडीच्या अनेक वर्तमानपत्रांनी संपादकीय लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात अनेक व्हिडीओज युट्यूबवर आले आणि प्रश्न विचारू लागले. सर्वांनी पोलिस, न्याय आणि आरटीओ विभागावर मनसोक्त शाब्दीक प्रहार केले. भ्रष्ट व्यवस्थेवर टिका केली. परंतु, एकानेही अशा अपघातांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना सुचविलेली नाही. कारण तशी योजनाच कोणाकडे उपलब्ध नाही. ती फक्त इस्लामकडे उपलब्ध आहे ती कशी? हे आपण पाहूया. 

या घटनेचे इस्लामी दृष्टिकोणातून विश्लेषण

मुंबईचा होर्डिंग अपघात असो की पुण्याचा पोर्शेकारद्वारे झालेला अपघात असो ह्या घटना सिंगलआऊट करून पाहता येण्यासारख्या नाहीत. कारण ह्या काही एकदोन घटना नाहीत. तर मुंबईमध्ये होर्डिंग तुटण्यापासून रेल्वेचे पूल  कोसळण्यापर्यंतच्या अनेक घटना झालेल्या आहेत आणि भविष्यात होणार आहेत. केवळ भ्रष्ट व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडून अशा घटना थांबणार नाहीत. पुण्याचा अपघात सुद्धा बेदरकार प्रवृत्तीनी केलेला एकुलता एक अपघात नसून सलमानखान पासून संजीव नंदा पर्यंत मस्तीत केलेल्या अशा अपघाताची एक न संपणारी शृंखलाच आपल्या देशात आहे. या घटना करणाऱ्या लोकांना किंवा प्रशासनाला दोष देऊन यावर उपाय करता येणार नाही. या घटना घडविण्यामागे जी प्रवृत्ती लपलेली आहे तिच्यावर उपाय करावे लागतील. ते कसे ते आपण पाहूया.

अलिकडे जेवढ्या वेगाने संपत्ती निर्मितीची नवनवीन साधने निर्माण झालेली आहेत आणि जेवढ्या गतीने संपत्ती निर्माण होत आहेत इतिहासात एवढ्या प्रमाणात आणि गतीने कधीच संपत्ती निर्माण झालेली नव्हती. मात्र या ठिकाणी एक गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नाही ती म्हणजे संपत्तीच्या निर्मितीबरोबर समाजाची नैतिक अधोगती वाढत आहे. याकडे लक्ष देणे गरजेेचे आहे. हा फक्त अपघाताचा विषय नाही तर काहीही करून पैसा कमावण्याचा, नशा करण्याचा, आर्थिक विषमतेचा, असंतुलित विकासाचा, पाल्यावर संस्कार करण्याचा आणि स्वतःच्या इच्छा-आकांक्षावर नैतिक बंधने लादण्याचा विषय आहे. भांडवलशाही समाज व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची नैतिक बंधने लादण्याला विरोध आहे. या ठिकाणी असिमित  स्पर्धा करून कुठल्याही परिस्थितीत संपत्ती गोळा करण्याला मान्यता आहे. म्हणूनच या व्यवस्थेमध्ये मद्य तयार करणारे, विक्री करणारे आणि पिणारे. या सगळ्यांनाच समाजमान्यता आहे. सरकारलाही यात काही वाईट वाटत नाही. उलट सरकार अनैतिक धंद्यांवर कर लावून त्यांच्याकडून महसूल गोळा करण्यातच समाधानी आहे. म्हणूनच बार, पब, लॉटरी ,(खरे तर जुगाराचे अड्डे), डान्सबार इत्यादींवर सरकार कर लादते. या सर्वातून समाजाची किती हानी होते याशी सरकारचे काही देणेघेणे नाही. 

प्रसिद्ध इस्लामी विद्वान सय्यद अबुल आला मौदुदी म्हणतात,  सामाजिक व्यवस्थेची सुत्रे जेव्हा अभद्र लोकांच्या हाती एकवटतात  तेव्हा समाज ईश्वर विरोधी मार्गावर चालू लागतो. यामुळे व्यक्ती आणि समुह दोघांनाही चुकीच्या मार्गावर चालणे इतके सोपवे होऊन जाते की, त्या मार्गावर चालण्यासाठी त्यांना स्वतःला काही शक्ती लावावी लागत नाही. व्यवस्था त्यांना वाममार्गावर चालण्यासाठी स्वतः मदत करत असते. हां मात्र ! नैतिक मार्गावर चालण्यासाठी कोणी आपली सर्वशक्ती जरी लावत असेल तरी वाममार्गाला लागलेल्या लोकांचा रेटा इतका प्रचंड असतो की नैतिक लोाकंच्या शक्तीचा विरोध तो इतक्या जोरदार पदधतीने मोडून काढतात की असे नैतिक लोक मैलोगणिक मागेे ढकलले जातात. संदर्भ : इस्लामी निजामे जिंदगी और उसके बुनियादी तसव्वुरात. (पेज नं. 1470

जेव्हा मानवतेचा वास्तविक सार नैतिकता असते तेव्हा हे मान्य केले पाहिजे की मानवी जीवनाच्या निर्मिती आणि विनाशाचा निर्णय नैतिक आधारावरच घेतला जावू शकतो. आणि नैतिक नियमानुसारच मनुष्य जातीचे उदय आणि पतन ठरत असते. माणसाला इतर जीवांपासून वेगळे करणारे वैशिष्ट्य म्हणजे त्याला नीति आणि अनीति, चांगले-वाईट याच्यातील फरक समजतो. इतर जीवांना तो समाजत नाही. म्हशीला कळत नाही नैतिक काय आहे अनैतिक काय आहे. अशा परिस्थितीत मानव जर जनावरांसारखा वागायला लागला तर असे अपघात होतच राहणार. त्यांना रोखण्याची क्षमता सध्याच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये नाही. कारण ज्या दर्जाची नैतिकता अशा अपराधांना रोखण्यासाठी लागते त्याचा लवलेशसुद्धा राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बसलेल्या लोकांमध्ये नाही. मुख्य गोष्ट जी माणसाला खाली खेचते किंवा वर आणते आणि समाजाचे भविष्य घडविण्यात किंवा नष्ट करण्यात सर्वात मोठी भूमिका निभावते ती म्हणजे नैतिक शक्ती होय. हीच शक्ती भारतीय समाज हरवून बसलेला आहे. दुःख या गोष्टीचे आहे की, यामध्ये कुरआनसारखा दिव्य ग्रंथ ज्यांच्याकडे आहे तो मुस्लिम समाजही यात सामील आहे. 

आपला देश एक असा अजब देश आहे की तो जगात एकीकडे संपत्तीच्या निर्मितीमध्ये अग्रगण्य आहे तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक गरीब लोक आपल्याच देशात राहतात. चमकदार, टोलेजंग इमारतींना खेटूनच लाखोंची झोपडपट्टी असल्याचे चित्र कोणत्याही महानगरात पहावयास मिळते. ही प्रचंड विषमता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि याची परवा सरकारसह कोणालाच नाही. ज्या समाजात श्रीमंतांना गरीबांची परवा नसते तो समाज प्रगती करू शकत नाही. आपल्या देशात हीच दुर्दैवाची बाब आहे. विशेष म्हणजे राजे रजवाडे, नवाब आणि संस्थानिकांच्या काळात सुद्धा देशात जेवढी विषमता नव्हती तेवढी आज लोकशाहीत आहे. 

आपल्या बहुसंख्य नागरिक आणि राजकीय लोकांची समज सुद्धा एवढ्या शालेय स्तराची आहे की, ही गोष्ट आर्थिकदृष्ट्या लाजीरवाणी आहे तीचा सुद्धा त्यांना उपलब्धी म्हणून मिरवण्यामध्ये काही वावगे वाटत नाही. याचे ताजे उदाहरण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाद्वारे केला जाणारा प्रचार आहे. ते अतिशय अभिमानाने सरकार 80 कोटी लोकांना दर महिन्याला 5 किलो धान्य मोफत देते. म्हणून प्रचार करत आहे. या गोष्टीची लाज पक्षालाही वाटत नाही आणि जनतेलाही वाटत नाही की गेल्या 76 वर्षाच्या लोकशाहीमध्ये सर्व सरकारांनी मिळून 80 कोटी लोकांना एवढेही आत्मनिर्भर केले नाही की, त्यांना स्वतःचे धान्य सन्मानाने स्वतः विकत घेता यावे. मोफत धान्य घेणार्यांच्या आत्मसन्मानाचे काय? हा प्रश्न कोणी विचारत नाही यातच सर्वकाही आले. 

देशाच्या अर्ध्या म्हणजे 70 कोटी लोकसंख्येकडे राष्ट्रीय संपत्तीचा केवळ 13 टक्के वाटा आहे. जो की इतिहासातील आजपावेतो सर्वात निच्चांक आहे. 1820 साली देशाच्या तत्कालीन लोकसंख्येच्या 70 टक्के लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा 16 टक्के वाटा होता. (संदर्भ : लुकास काऊन्सेलेट एएल 2022, वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2022. तसेच वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅब युएनडीपी पान क्र. 197).

आपल्या देशात अब्जावधी मुल्याची संपत्ती निर्माण होते. मात्र ती 20 ते 22 किंवा फार तर शे-दोनशे लोकांच्या हातातच गोळा होते. हे चित्र भयावह आणि भविष्यात वर्गकलहाला आमंत्रण देणारे ठरेल, यात शंका नाही. अशा अमाप संपत्तीचा काही फायदा जर गरीबी निर्मुलनासाठी होत नसेल तर अशा वांझोट्या आर्थिक प्रगतीला देशाची सर्वांगीण प्रगती समजणे मुर्खपणाचे लक्षण आहे. हे नैसर्गिकरित्या होत नाही तर भांडवलशाहीमध्ये ठरवून केले जाते. ठरवून अशी विषमता निर्माण केली जाते. समाजामध्ये मजुरांचा एक समुह कायम अस्तित्वात राहायला हवा ज्यामुळे कारखानदारी चालू रहावी. या हेतूने काही विशिष्ट समाजघटकांना भांडवलशाही व्यवस्थेत ठरवून मागे ठेवले जाते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारी शाळा आणि रूग्णालये मुद्दामहून बकाल करून ठेवली जातात. त्यामुळे गरीब अधिकच गरीब होत जातो. भांडवलशाहीचा हा पैलू फक्त लोकशाही विरोधीच नसून अमानवीय सुद्धा आहे. या उलट इस्लामची अशी मान्यता आहे की, श्रीमंत आणि गरीब दोघांच्याही मुलांना आयुष्याची सुरूवात एकाच बेसलाईनवरून करण्याची समान संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पुढे आपापले अंगभूत गुण आणि अवगुणामुळे कोणी श्रीमंत होईल कोणी गरीब राहील ती गोष्ट अलाहिदा. या शिवाय इस्लामने संपत्ती कमाविण्यावर हराम आणि हलालची अट घातलेली आहे. या व्यवस्थेमध्ये मनाला येईल त्या प्रमाणे येईल तो व्यवसाय करून संपत्ती कमावता येत नाही. सिनेमा, दारू, अश्लील साहित्य, बीअरबार, पॉर्न, डान्सबार, कसीनो आणि यासारखेच अन्य समाजविघातक व्यवसाय करता येत नाहीत. त्यामुळे समाजात आर्थिक पावित्र्याचे वातावरण प्रस्थापित होते. या उलट भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा आधारच व्याज असतो. जो की, गरीबांचे शोषण आणि श्रीमंतांचे पोषण करत असतो. यात हराम व्यवसायांना प्रोत्साहित केले जाते आणि कृषी सारखे पवित्र क्षेत्र इतके दुर्लक्षित ठेवले जाते की, हजारो शेतकर्यांच्या आत्महत्यांमुळे सुद्धा गेंड्याच्या कातडीची सरकारांना आणि श्रीमंत लोकांना पाझर फुटत नाही. 

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,  मग जेव्हा नमाज पूर्ण होईल तेव्हा भूतलावर पसरून जा आणि अल्लाहच्या कृपाप्रसादा (रोजी-रोटी)चा शोध घ्या. आणि अल्लाहचे मोठ्या प्रमाणात स्मरण करीत रहा. कदाचित तुम्हाला यश प्राप्त होईल(संदर्भ : सूरह जुमा 62, आयत नं.10).

मुंबईचा होर्डिंग अपघात असो की, पुण्याचा पोर्शे कारचा अपघात, यासंबंधी व्यक्त होताना सर्वांनी संबंधितांवर कठोर कारवाईची शिफारस केलेली आहे. परंतु, कठोर कारवाई करून समाजातून गुन्हेगारी नष्ट होत नाही हे सिद्ध झालेले तत्व आहे. शिक्षा ही शेवटचा उपाय असते. गुन्हे होवू नये साठी सामुहिक तयारी नैतिकतेच्या पायावर समाजाने करावयाची असते. त्यानंतर सरकारने त्या नैतिक रचनेचे संरक्षण करायचे असते. एवढे करूनही जर एखादी व्यक्ती ऐकत नसते आणि गुन्हे करते तेव्हा कुठे शेवटचा उपाय म्हणून कठोर शिक्षा व ती ही सार्वजनिक ठिकाणी केली पाहिजे, असा इस्लामचा सिद्धांत आहे. इस्लाम विषयी मीडियाच्या दुष्प्रचाराला बळी न पडता स्वतः इस्लामचा अभ्यास केल्यास वाचकांच्या लक्षात येईल की, आदर्श समाज नैतिकतेशिवाय उभा राहू शकत नाही. अशा घटना रोखण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. पीयू रिसर्च सेंटरच्या अहवालात म्हटलेले आहे की, 2060 पर्यंत जगातील 70 टक्के लोक इस्लाम धर्मावलंबी असतील. 34  टक्के ख्रिश्चन, 27 टक्के हिंदू तर ज्यू 15 टक्के बाकी इतर असतील. म्हणून भविष्यात घडणार्या अशा घटनांकडे केवळ एक घटना म्हणून न पाहता त्याकडे इस्लामघ्या व्यापक दृष्टीने पाहून योग्य उपाय योजना केली तरच अशा घटना रोखल्या जावू शकतात आणि अन्यथा नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे लक्षात असू द्या.


- एम. आय. शेख

लातूर



इस्लामिक स्कॉलर सय्यद अबुल आला मौदीदी रहे. यांनी 10 मे 1947 रोजी पठाणकोट येथे हिंदू, मुस्लीम आणि शीख समुदायाच्या दरम्यान ’रचना आणि बिघाड’ या विषयावर दिलेल्या एका महत्वपूर्ण भाषणाचा सारांश आजही समर्पक असल्याने खाली देत आहे.

ईश्वर आपल्या पृथ्वीच्या दावेदारांचे आणि इच्छुकांचे वडिलोपार्जीत अथवा जन्मजात हक्क पाहत नसतो तो हे पाहत असतो की यांच्या पैकी कोण सकारात्मक कार्यासाठी जास्तीत जास्त योग्यता आणि बिघाडाची सर्वांपेक्षा कमी प्रवृत्ती राखणारा आहे. एकाच वेळेतील एकूण उमेदवारांपैकी जे या दृष्टिने सर्वाधिक योग्यतेचे दिसतात त्यांचीच निवड होते तो पर्यंत त्यांच्या बिघाडापेक्षा त्यांची रचना जास्त असते किंवा त्यांच्या तुलनेत जास्त चांगली रचना करणारा व कमी उपद्रवी इतर कोणीही मैदानात येत नाही तोपर्यंत व्यवस्था त्यांच्याच हाती राहू दिली जाते. हे जे काही मी सांगत आहे ईश्वराने सदैव आपल्या पृथ्वीची व्यवस्था याच नियमानुसार राखली आहे. इतिहास याची साक्ष देतो खुद्द आपल्या देशाचाच इतिहास पहा या ठिकाणी जे लोक वसले होते त्यांचे रचनात्मक गुण जेव्हा संपुष्टात आले तेव्हा ईश्वराने येथील व्यवस्थापनाची संधी आर्य लोकांना दिली. त्यांनी बिघाडापेक्षा अधिक प्रमाणात रचनात्मक कामे करून दाखविली परंतू आर्य जेव्हा उपद्रवी बनले, त्यांनी रचनात्मक कामे कमी आणि बिघाडाची कामे जास्त करण्यात सुरूवात केली. आर्यांर्नी मानव जातीची विभागणी करून खुद्द आपल्याच समाजाला जाती व वर्णभेद भाषांद्वारे विभागून टाकले तेव्हा सरते शेवटी ईश्वराने त्यांच्याकडून देशाची व्यवस्था हिरावून घेतली आणि मध्य आशिया खंडामध्ये त्या लोकांना येथे काम करण्यास संधी दिली जे त्यावेळी इस्लामी चळवळीने प्रभावित झाले होते. मध्य आशियातून आलेले हे मुस्लीम लोक शतकानुशतके या देशाच्या व्यवस्थेवर विराजमान राहीले या देशातील बहुतेक लोकांनी इस्लाम धर्म स्विकार केला व त्यांच्यात ते सामील झाले मुस्लीम राजकर्त्यांनी बरीच रचनात्मक कामे केली परंतू रचनात्मक कामाच्या तुलनेत जेव्हा बिघाडांच्या कामांचे प्रमाण वाढले तेव्हा ईश्वराने त्यांच्याकडून देशाची व्यवस्था हिरावून घेतली व ती इंग्रजांच्या सुपूर्द केली. इंग्रजांनी जी काही रचनात्मक कार्य केली तशी.. इतर कोणी केली नाहीत परंतू जेव्हा त्यांचे कडूनही रचनात्मक कामाच्या तुलनेत बिघाडाच्या कामांची संख्येत वाढ होऊ लागलीत तेव्हा 18 व्या शतकाच्या काळामध्ये ईश्वराने जो निर्णय घेतला तो चुकीचा नव्हता. इंग्रज स्वतःच सरळपणे येथून जाण्यास तयार झाले आहे हा प्रसंग की, ज्यांच्या अगदी टोकावर आपण सर्वजण उभे आहोत इतिहासाच्या अशा महत्वपूर्ण प्रसंगापैकी आहे अधिकार सुत्राच्या हस्तांतरणाची बाब पुर्ण होत असल्याचे दिसत आहे. देशाची व्यवस्था देशवासीयांच्या स्वाधिन केले जाण्याचे हे निर्णायक पाउल आहे. परकीय लोक जे बाहेरून राज्य करीत आहे ते परत जात आहेत. पुर्वीसुध्दा केवळ लहर म्हणून त्याने आपल्या हातातून व्यवस्था हिरावून घेतली नव्हती व आताही त्याला लहर आली म्हणून तो व्यवस्था आपल्या हातात देईल असे मुळीच नाही आता जरा हे तपासून पाहूया की, हिंदूस्तानचे हिंदू मुस्लीम शिख हे लोक सदरहू परिक्षणात ईश्वरासमोर अशा कोणत्या योग्यता व क्षमता प्रस्तूत करीत आहेत की जेणेकरून ईश्वर आपल्या मुलखाची व्यवस्था पुन्हा त्यांच्याच स्वाधीन करेल. आपल्या देशबांधवाचे दोष बोलून दाखविण्यात मला आनंद होतो अशातली गोष्ट नाही. कोणाचाही हक्क मारणे नैतिक दृष्टिने वाईट आहे. आमच्या व्यापारी वर्गात जे फसवेगिरी, लबाडी, खोटेपणा आणि काळ्या नफेबाजीपासून अलिप्त असतील आमच्या उद्योगपती पैकी जे आपल्या फायद्यांबरोबरच ग्राहकांचा लाभ आणि आपले राष्ट्र आपल्या देशाच्या हिताचाही काही विचार करीत असतील अशी किती टक्के लोक आहेत आमच्या जमीनदारांपैकी जे धान्यसाठा करतांना आणि नंतर अत्यंत महाग किंमतीमध्ये ते विकतात. आपल्या नफेबाजीमुळे कोट्यावधी माणसांना उपासमाराची यातना देतात. शिवाय असा विचार करणारे किती टक्के लोक आहेत. आमच्या सरकारी नौकरवर्गापैकी जे लाच लुचपत आणि अपहारांपासून अन्याय आणि सामान्य जणाला त्रास देण्यापासून कामचुकारपणा व आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करण्यापासून अलिप्त आहेत. किती लोक आहेत मी जर असे म्हटले की, केवळ 5 टक्के काय ते लोक या अनैतिकतेच्या महारोगापासून कदाचित अलिप्त असतील, उरलेले 95 टक्के लोक या संसर्गजन्य महारोगाने भयंकरपणे ग्रासलेले आहेत तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वाईट गोष्टीपासून रोखणे आणि चांगल्या गोष्टीचा उपदेश करणे समाजात एक असहनीय गोष्ट बनली आहे. प्रत्येक लोकसमुहाला केवळ असेच लोक पसंत आहेत जे त्यांच्या इच्छा- आकांशा व उद्दीष्ठांसाठी वकीली करीत असतात आपण स्वतः व स्वदेशाच्या भविष्यासंबंधी निराश व्हावे म्हणून मी या गोष्टी सांगत आहे असे मुळीच नाही मी स्वतः हि निराश नाही व इतरांनाही निराश करू इच्छित नाही. 5 टक्के लोक जरूर असे आहेत जे सर्वत्र माजलेल्या अनैतिकतेपासून सुरक्षीत आहेत हेच ते भांडवले आहे ज्याला सुधारण्याच्या प्रारंभासाठी उपयोगात आणले जाऊ शकते आपल्या इथे दुराचारी संघटित असून पध्दशीरपणे आपले कार्य करीत आहेत परंतू सदाचारी मात्र संघटित नाहीत. खरे तर हेच आमच्या दुर्देवाचे मोठे कारण आहे. मौलाना म्हणतात, आमच्या सत्तानिष्ठ लोकांची एक अशी संघटना विद्यमान असणे आवश्यक आहे जेणेकरून बिघाडण्याच्या कारणांना प्रतिबंध आणि रचनेच्या सदरहू गोष्टींना अंमलात आणण्यासाठी निरंतरपणे प्रयत्नांची पराकाष्टा होईल, यातच आम्हा सर्वांचे भले आहे. या देशाच्या रहीवाशांना सरळ मार्गावर आणलात अशा प्रकारचे प्रयत्न यशस्वी ठरले तरी विनाकारणच आपल्या भुमीची व्यवस्था भूमीपुत्राकडून हिरावून अन्य कोणाला सुपूर्द करण्याइतपत ईश्वर अन्यायी नाही. परंतू ईश्वर न करो जर प्रयत्नांची पराकाष्टा अयशस्वी ठरली तर आपण सर्वांचा तसेच भारतीयांच्या सर्व रहीवाशांचा शेवट काय होइल हे आम्ही सांगू शकत नाही. इंग्रज गेले देशाचे व्यवस्थापन देशवासीयांच्या एका पक्षाकडे सोपविण्यात आले. परत ईश्वराने दर पाच वर्षानी रचनात्मक व बिघाडाच्या कामानुसार देश चालविण्याची संधी कार्यक्षम असलेल्या संबंधितांच्या स्वाधीन केली. मौलाना मौदुदी यांच्या म्हणण्यानुसार एकूण उमेदवारांपैकी जे या दृष्टिने सर्वाधिक योग्यतेचे दिसतात त्यांचीच निवड होते. जोपर्यंत त्यांच्या बिघाडापेक्षा त्यांची रचना जास्त असते किंवा त्यांच्या तुलनेत जास्त चांगली रचना करणारा व कमी उपद्रवी इतर कोणी मैदानात येत नाही तोपर्यत व्यवस्था त्यांच्याच हाती राहू दिली जाते. ईश्वराच्या मर्जीनुसार पुढची व्यवस्था कोणाकडे जात आहे याकडे सर्व देशवासीयांच्या नजरा उत्सूकतेने वाट पाहत आहेत.

- इद्रीस खान

पुसद


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget