Halloween Costume ideas 2015
Latest Post


वर्षभरात सर्वात आनंदी, उत्साही, सुखी, त्यागी आणि नैतिकतेने भरपूर असा महिना कोणता असेल तर तो रमजानचा महिना. या महिन्याने माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल होतात. हे बदल पुढील 11 महिने जर कायम ठेवले तर मनुष्य वर्षभरही खऱ्या सुखाचा आनंद घेतल्याशिवाय राहत नाही. रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहिली. तो आला आणि महिनाभर जीवन जगण्याचे प्रशिक्षण देऊन गेला. खरं तर हा महिना प्रत्येक इमानधारकासाठी दररोज ईद असल्याचीच अनुभूती देऊन गेला.

मित्रानों! रमजान जीवनाला ईशमार्गावर चालण्याचे वळण देऊन जातो. ईश्वराच्या निर्मितीवर चिंतन, मनन, मंथन करण्यास भाग पाडतो. ईश्वर कुरआनमध्ये ईमानधारकांना उद्देशून सांगतो की, ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.  (सुरे आलेइमरान 3: आयत नं. 110) मित्रानों, या आयातीमधून अल्लाहने ईमानधारकांना किती मोठ्या उद्देशासाठी निर्माण केले आहे हे लक्षात येते. या आयातीच्या परीपेक्षात मुस्लिम बांधवांनी आपले आयुष्य कसे जगावे आणि काय करावे, हे सांगितले आहे. त्यासाठीच प्रत्येक वर्षी रमजानमध्ये आपल्या रोजेधारकांना अल्लाह याची आठवण खडतर प्रशिक्षणातून करून देत असतो.   

मित्रांनों! प्रेषित सल्ल. यांचे जीवन चालतेबोलते कुरआन होते. म्हणून त्यांची वचने अर्थात हदीसही फक्त वाचून चालत नाही तर त्यानुसार आचरण करायला सुरूवात केल्यास जीवनाला खरी दिशा मिळते. आनंद मिळतो तो वेगळाच. कुरआन वाचताना नवनवीन आणि मनाला भिडणारी आणि ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी माहिती समोर येते. कधी-कधी तर वाटते मी ईश्वराशी संवादच साधत आहे. कुरआनचे मार्गदर्शन ईश्वरीय असल्याने ते मन,मस्तीष्क आणि हृदयात खोलपर्यंत रूजते. त्यामुळे जीवन जगताना ते वारंवार समोर येते आणि माणूस नैतिकतेच्या चौकटीत आपले जीवन जगायला सुरूवात करतो आणि खऱ्या जगण्याचा आनंद घेतो.  कुरआनने सांगितले की, सत्य आणि असत्य कधीच बराबर चालू शकत नाहीत. चांगले आणि वाईट कधीच मिसळू शकत नाहीत. व्याज, भ्रष्टाचार, व्याभिचार, जुगार, निंदानालस्ती, चहाडी, चोरी, राग, भांडण-तंटे यापासून वारंवार स्वत:ला वाचविण्याची ताकीद करतो. जगताना याच गोष्टी माणसाचा घात करत असतात. अनाथ, गरीब, मजूर यांच्याशी सद्वर्तन करण्याची वारंवार ताकीद करतो, दान, धर्म करायला प्रेरित करतो. रमजानमध्ये जकात, सदका आणि फित्राच्या माध्यमातून दान करण्याच्या महत्वास अधोरेखित केले आहे.  

 रमजानची शिदोरी कायम कशी ठेवायची...

रमजानमध्ये सर्वात मोठी गोष्ट शरीराशी आणि मनाशी जडली ती म्हणजे संयम. परोकोटीचा संयम हा रोजा आपल्यात घडवून आणतो. त्यामुळे प्रत्येक काम संयमाने आणि हिकमतीने करण्याकडे आपला कल असला पाहिजे. रोजाच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या आचार, विचार आणि कृतीला नैतिक मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतो. तो प्रत्येक गरजवंत आणि सर्वांशी प्रेम आणि आपुलकीची भावना ठेवत असतो. तो हिरहिरीने समोरच्या रोजाधारकाला सहेर आणि इफ्तारसाठी आपल्याकडील खाद्यपदार्थ पुढे करत असतो. रमजाननंतरही आपण हीच पद्धत दैनंदिन जगण्यात अवलंबवण्याकडे मनाला वळवावे. हीच पद्धत आहे जी मनांना जोडते. 

मित्रानों! वाईट गोष्टींकडे वळणे हा मानवी मनाचा स्वभावगुण आहे. पण याला खरे वेसण हे कुरआनचे मार्गदर्शनच घालू शकते. मी अनेक लोकं पाहिली आहेत ज्यांचे विचार चांगले असतात मात्र आचरणात गडबड दिसून येते. पुरोगामीत्वाच्या गोष्टी करतील मात्र व्याज, व्याभिचारापासून दूर राहताना दिसत नाहीत. संधी मिळेल तिथे हात मारताना दिसतील. मित्रानों! कुरआनमध्ये ईश्वर सांगतो, माणूस तोट्यात आहे.  हे खरचं आहे. आजचं जीवन पाहिले तर माणसाला पावलोपावली वाईटाचा सामना करावा लागत आहे. त्याला परीक्षा द्यावी लागत आहे. मित्रानों! तोच खरा व्यक्ती जो पराकोटीचा संयम बाळगून आपले पाऊल चांगल्याच मार्गाकडे टाकतो. तो आपल्या आशा आणि आकांक्षा वैध ठेवतो. 

रमजानमधील खडतर प्रशिक्षणातून प्राप्त करण्यात आलेले संयम, तक्वा, धैर्य पुढच्या अकरा महिन्यापर्यंत अमलात आणण्याचा दृढ निश्चय करा. वेळ काढून दररोज कुरआनचे पठण समजून करा. निश्चितच ते तुम्हाला यशस्वीतेकडे घेऊन जाईल. अल्लाह मला, तुम्हाला आणि समस्त भारतीयांना ईश्वरीय मार्गदर्शनाप्रमाणे चालण्याची सद्बुद्धी आणि समज देओ. आमीन.

- बशीर शेख, उपसंपादक



वर्ष कोणतेही असो एप्रिल महिना आला की, अगोदर डोळ्यासमोर चित्र येते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे. भारतासोबतच जगातील अनेक देशांमध्ये भीम जयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरी केली जाते. परंतु महापुरुषांनाही सांसारिक, खाजगी जीवन असते याची समाजाला फारशी कल्पना नसते. समाजाला दिसतो तो फक्त त्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, मुक्तीसाठी रणमैदानात लढणारा योद्धा. असेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान योद्ध्याच्यामागे खंबीरपणे उभी असणारी त्यांची त्यागी पत्नी रमाबाई यांच्या कार्याला झळाळी देण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून सादर करत आहे.

रमाबाईंची स्तुती करताना कवी संजय बनसोडे म्हणतात,

जरी गरीबीचा पाठी घाव, 

तरी प्रेमळ तिचा स्वभाव

दीन दलितांची आई होती, 

रमाई तिचे नाव.

रमाबाई यांचा कौटुंबिक परिचय द्यायचा झाला तर, घरी अठराविश्व दारिद्र्य. वडीलांचे नाव भिकू वलंगकर आणि आईचे नाव रुक्मिणी होते. या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा, त्यात रमाबाई ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या. भिकू आणि रुक्मिणी हे गरीब पण स्वाभिमानी जोडपे. चांगल्या गोष्टीला दुनिया चांगलं म्हणत नाही पण तेवढ्यामुळे वाईट गोष्टी करून मान मिळवणं चांगलं नाही. दुनियेत गुणांची कदर होते पण जरा उशिरा यांसारख्या प्रेरणादायी गोष्टी रुक्मिणीबाई लहान रमाला सांगत असत. रमाबाई तशा कष्टाळू आणि सोशीक वृत्तीच्या. बालपण असं सुखात चाललं होतं. परंतु काळाने घात केला अन रमाबाईंची आई आणि त्या पाठोपाठ वडीलही काळाच्या पडद्याआड गेले. बालवयातच रमाबाई आणि भावंडे पोरकी झाली. काका मामाकडे राहणाऱ्या सोज्वळ रमाचा वयाच्या नवव्या वर्षी भीमराव आंबेडकर यांच्याशी विवाह झाला आणि एका नवीन युगाचा आणि त्यागाचा प्रवास सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यासाचा व्यासंग इतका गाढ होता की

रात्रंदिवस ते आपल्या खोलीत अभ्यास करत तेव्हा रमाबाई तास-न्-तास दाराबाहेर बसून जेवण्यासाठी त्यांची वाट पाहत. बाबासाहेब परदेशात शिकण्यासाठी गेले असता रमाबाई शेणाच्या गोवऱ्या थापून, आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांना शिक्षणासाठी पैसे पाठवत. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतांना बाबासाहेबांना मानसिक आधार देऊन खंबीरपणे त्यांना साथ दिली.

शेन गोवऱ्या थापून 

केला संसार भिमाचा, 

नाही केला हट्ट तिने 

कधी कोणत्या गोष्टीचा

एकदा बाबासाहेब विदेशातून घरी येत होते. ’बाबासाहेब एवढ्या दिवसांनी येत आहेत परंतु ठिगळाच्या लुगड्यात कशी भेटू?’ अशा विचाराने रमाबाई गोंधळून गेल्या. नविन लुगडे घ्यायला पैसे नाहीत, स्वाभिमानी रमा दुसऱ्या कुणाला मागणारी नव्हती, तेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेला जरीचा पटका लुगडे म्हणून नेसून रमाबाई बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेल्या. बाबासाहेब वंचित मुलांचे वसतिगृह चालवत. एकदा ते परदेशात गेले होते तेव्हा रमाबाई वस्तीगृहात गेल्या असता त्यांना समजले की, वस्तीगृहात मुलांना खाण्यासाठी अन्नच नाही तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून दिल्या व तिथल्या व्यवस्थापकांना मुलांसाठी अन्न आणायला सांगितले.

गरीबी आणि सामाजिक परिस्थितीने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या रमाबाई आपल्या बॅरिस्टर पतीच्या बरोबरीने उभे राहायला लाजत असत. मग अडाणी रमाबाईंनी सावित्रीचा वसा जपला आणि त्या शिक्षित झाल्या. महात्मा फुलेंचा आदर्श ठेवून डॉ. बाबासाहेब यांनी स्वतः त्यांना शिकवले. रमाबाई मुळात धार्मिक होत्या. जेव्हा बाबासाहेब हिंदुधर्मातील अनिष्ट प्रथा परंपरेमुळे त्याला त्यागण्याच्या विचारात होते तेव्हा रमाबाईंनी त्यांना संयमाने साथ दिली. याची प्रचिती त्या प्रसंगी होते जेव्हा रमाबाई पंढरपूरला जाण्यासाठी हट्ट धरतात आणि बाबासाहेब त्यांना सांगतात की, ’चोखोबासारख्या विठ्ठलाच्या सख्याला त्याच्या जातीमुळे मंदिरात जागा दिली नाही आणि तुला तेथे जाण्यासाठी कोण परवानगी देईल?’ बाबासाहेब विदेशात असतांना इकडे त्यांच्या घराची बेताची परिस्थिती पाहता अनेक उदार लोकांनी रमाबाईंना मदत देऊ केली पण या स्वाभिमानी माऊलीने ती मदत नम्रपणे नाकारून, रक्ताचे पाणी करून आपल्या संसाराचा गाडा हाकला. अशा एक ना अनेक घटना आहेत त्यामधून रमाबाईंचा नम्र स्वभाव, जिद्द, चिकाटी, बुद्धिमत्ता, आत्मसन्मान झळकतो. शेवटी क्षयरोगाने  त्यांना ग्रासले आणि वयाच्या अवघ्या अडतिसाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. बॅरिस्टर बाबासाहेब ढसाढसा रडत होते जणू काही आभाळच कोसळले.

तेव्हा रमाईचे ते शब्द आठवले जेव्हा रमाबाई म्हणायच्या, ’आपला समाज खूप वाईट अवस्थेत आहे; त्याला या अवस्थेतून बाहेर काढायची जबाबदारी आपल्यावर आहे.’ यातून समाजाच्या हालअपेष्टांची जाणीव रमालाही होती, याचा दिलासा आणि समाजाच्या काळजीपोटी बाबासाहेबांनी स्वतःला सावरले परंतु रमाच्या जाण्याने बाबासाहेबांना पाठीचा कणा मोडल्यासारखे भासत होते. त्यांच्या याच प्रेमापोटी थॉट ऑफ पाकिस्तान हा आपला जगप्रसिद्ध ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ’प्रिय रामु’ ला अर्पित केला आहे. रमाबाईंना बाबासाहेब प्रेमाने रामु म्हणत. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले, लहान वयात लग्न, पाच मुलांना जन्म, चार मुलांचा मृत्यू हे सारे आघात सहन करून रमाबाईंनी बाबासाहेबांना खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने साथ दिली. आजची आधुनिक परिस्थिती पाहता एकीकडे काही स्त्रिया आपल्या राहणीमानावर, कपड्यालत्यावर हजारो रुपये खर्च करतात. दागदागिने घालून मिरवतात, काबडकष्टापासून स्वतःला दूर ठेवतात, संयुक्त कुटुंबात राहणे पसंत करत नाहीत, अशांसाठी फाटक्या लुगड्यात हसत मुखाने नांदणाऱ्या रमाचे व्यक्तिमत्व जाणून घेणे फार गरजेचे आहे.

कवि भागवत तुरे यांनी लिहिलेल्या या ओळी बघा, तिने कधी न केली भीमरावांना, चैन सुखाची मागणी न्याय हक्कासाठी लढणारी, तिने मजबूत केली भीमलेखनी

अशा या भीम जयंतीच्या महिन्यात बाबासाहेबांच्या कीर्तीचा गाजा वाजा होतोतेव्हा या त्यागी माऊली रमाबाई यांच्या त्यागाची प्रकर्षाने जाणीव होते.


- प्रिया कानिंदे सरतापे 

(मो. 8390355163)



कुणाला शब्द देऊन तो मोडणे दुष्ट कृत्य आहे आणि खरे पाहता लबाडीचाच हा एक प्रकार आहे. कोणत्या राष्ट्र आणि जनसमुदाहाचा सन्मान व आदर या गोष्टीवर अवलंबून असतो की ते आपल्या वचनाशी किती बांधील व कटिबद्ध आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती कुणाला वचन देते तेव्हा खऱ्या अर्थाने तिने एक जबाबदारी ओढवून घेतलेली असते. पवित्र कुरआनात म्हटले आहे की “खरेच वचनबद्धतेविषयी विचारले जाईल.“ (पवित्र कुरआन, बनी इस्राईल-४)

पवित्र कुरआनात दांभिक लोकांविषयी असे म्हटले आहे की त्यांनी जे वचन मोडले त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या मनांमध्ये दांभिकपणा निर्माण झाला. (पवित्र कुरआन, ९:१०)

सहीहैन या हदीसग्रंथामध्ये दांभिकपणाचे लक्षण असे दिले आहे की तो जेव्हा काही बोलतो तेव्हा खोटे बोलतो, कुणाला आश्वासन दिले तर तो पूर्ण करत नाही. त्याच्याकडे एखादी अमानत ठेवली असेल तर तो त्याच्यात लबाडी करतो. सहीह मुस्लिम हदीसग्रंथात असेदेखील म्हटले आहे की जरी तो नमाजचे पठण करीत असेल, उपवास (रोजे) करत असेल आणि स्वतःला मुस्लिम समजत असेल तरीदेखील. सहीहैनच्या दुसऱ्या एका हदीसमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असेदेखील म्हटलेले आहे की ज्या व्यक्तीमध्ये ह्या चार गोष्टी असतील तो पक्का दांभिक आहे. आणि ज्या व्यक्तीमध्ये यापैकी एक गोष्ट असेल अशी व्यक्ती जोपर्यंत तो अवगुण सोडून देत नाही तोपर्यंत तो दांभिक राहणार. दांभिकपणाची ती चार लक्षणे ही आहेत- जेव्हा त्यावर अमानतची जबाबदारी टाकली जाते तेव्हा ती त्यात लबाडी करते. बोलण्यासाठी तोंड उघडते तेव्हा ती खोटे बोलते. कुणाला वचन दिले असल्यास त्याच्या विरुद्ध करते. आणि जेव्हा कुणाशी भांडण झाले तर अशी व्यक्ती शिवीगाळ करते.

एकदा प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की “तुम्ही मला तीन गोष्टींचे वचन दिले तर मी तुम्हाला स्वर्गाची हमी देईन. त्या गोष्टी अशा आहेत- कुणाला वचन दिले असल्यास ते पूर्ण करा, जेव्हा काही बोलता तेव्हा सत्य बोला आणि जेव्हा एखादी जबाबदारी तुमच्यावर टाकली असेल तर ती पूर्ण करा.”

एका माणसाचा दुसऱ्यावर जो हक्क आहे तो अदा न करणे म्हणजे खोटेपणा आणि लबाडी आहे. जर एका माणसाची एखादी वस्तू दुसऱ्याकडे अमानत म्हणून ठेवली असेल तर त्या वस्तूचा स्वतःसाठीच उपयोग करावा किंवा ती वस्तू त्या माणसाला परत न देणे ही उघड उघड लबाडी आहे. तसेच कुणाविषयी काही गुपित दुसऱ्याला सांगणे किंवा कुणा एका माणसाने ती वस्तू त्या माणसाला परत न देणे ही उघड उघड लबाडी आहे. तसेच कुणाविषयी काही गुपित दुसऱ्याला सांगणे किंवा कुणा माणसाने भरवसा करून आपला काही भेद त्याला सांगितला असेल आणि ते दुसऱ्याला सांगितले तर ही उघड उघड लबाडी आहे.

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(२२) तू अल्लाहबरोबर कोणी दुसरा ईश्वर बनवू नकोस नाहीतर धिक्कारलेला व अगतिक बनून राहशील. 

(२३) तुझ्या पालनकर्त्याने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही बंदगी करू नये परंतु केवळ त्याची. आईवडिलांशी सद्वर्तन करा, जर तुम्ाच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ‘ब्र’ शब्ददेखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तरदेखील देऊ नका. तर त्यांच्याशी आदरपूर्वक बोला, 

(२४) आणि नरमी व दयार्द्रतेने त्यांच्यासमोर नमून राहा. आणि प्रार्थना करीत जा की, ‘‘हे पालनकर्त्या, यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे यांनी दया व वात्सल्याने बालपणी माझे संगोपन केले.’’ 

(२५) तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो की तुमच्या मनात काय आहे. जर तुम्ही सदाचारी बनून राहाल तर तो अशा सर्व लोकांना क्षमा करणारा आहे 

(२६) जे आपल्या अपराधासंबंधी सावध होऊन बंदगीच्या वर्तनाकडे परततील. नातेवाईकाला त्याचा हक्क द्या आणि गरीब व वाटसरूला त्याचा हक्क. 

(२७) वायफळ खर्च करू नका. वायफळ खर्च करणारे सैतानाचे बंधु होत आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे.

(२८) जर त्यांच्यापैकी (अर्थात गरजू नातेवाईक, गरीब व वाटसरूंपैकी कोणास) तुम्हाला टाळावयाचे असेल या सबबीवर की अद्याप तुम्ही अल्लाहच्या त्या कृपेला जिचे तुम्ही उमेदवार आहात, शोधत आहात तर त्यांना सौम्य उत्तर द्या. 



भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. सध्याच्या पिढीतील अधिकांश लोक हे स्वातंत्र्यानंतर जन्मले आहेत. स्वातंत्र्याचा इतिहास आपल्याला माहीत आहे. यासाठी अगणित स्वातंत्र्ययोध्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, शहीद झाले. स्वातंत्र्याच्या उच्च विचारांनी प्रेरित तत्कालीन समाजधुरीनांनी जनतेची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी यथायोग्य पावले उचलली. प्रत्येक माणसाचा सन्मान व प्रतिष्ठा जपणारी लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद तसेच व्यक्तिगत विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व संस्कृती यांचे स्वातंत्र्य ज्यामुळे नवराष्ट्राचे ऐक्य व एकात्मता दृढ होईल हा मानवतावादी पायाभूत विचार देशाची राज्यघटना (संविधान) अंमलात आणून रुजवला. या तत्त्वविचारांनीच देशाची जडणघडण झाली. लोकशाहीच्या सर्व सामाजिक संस्था व सार्वजनिक साधन सुविधा या आधारानेच भरभराटीला आल्या. एक व्यक्ती व देशाचे नागरिक म्हणून दुर्बल, वंचित, शोषित, पीडित, समाजाला जगण्याचा हक्क व अधिकार मिळाला. शिक्षण, आरोग्य, उद्योगधंदे, शेती, व्यवसाय, नोकरी, बँका, दळणवळण व इतर साधन सुविधा यांचे सरकारीकरण, सार्वत्रिकरण, सार्वजनिकरण यामुळे आपण खऱ्या अर्थाने देशाचे स्वतंत्र व सार्वभौम नागरिक झालो. सातवी, मॅट्रिकपर्यंत शिकलेले अनेक जण शिक्षक, सरकारी व प्रशासकीय नोकरी, बँका, पोष्ट, रेल्वे, पोलीस व सरकारी उद्योग धंदे यांमध्ये दाखल झाले. पुढच्या आणखी एक दोन पिढ्या उच्च शिक्षण घेऊन आणखी वरच्या पदापर्यंत पोहोचल्या.

परंतु काही स्वार्थी, मतलबी, विद्वेषी व विकृत मनोवृत्तीची माणसे सातत्याने हे भारतीय सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करत होती. शेकडो वर्षापासून या देशांमध्ये सर्व जाती, धर्माची व वेगवेगळ्या संस्कृतीची एक मिली-जुली संस्कृती, गंगा-जमुनी तहजीब जपणारी माणसे गुण्यागोविंदाने राहत आलेली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वांनी मिळून बाजी लावली. वेगवेगळ्या जाती धर्माचे स्वातंत्र्यवीर हातात हात घालून फासावर चढले. एकमेकासाठी प्राणांची आहुती दिली. जे लोक या स्वातंत्र्याच्या लढाईत नव्हते व ज्यांनी इंग्रजांची नाही तर पूर्वीच्या सर्वच सत्ताधीशांची चाकरी केली असे स्वार्थी लोक सामाजिक जीवनात विष कालवण्याचे काम करीत होती. कारण सामाजिक वर्चस्वाची सारी सूत्रे यांच्या हातातून निसटली होती. उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, जाती-धर्म आणि भेदाभेदाचे हे विष हळूहळू पसरत गेले. मंडल-कमंडल, आरक्षण, मंदिर-मस्जिद अशा प्रकारच्या जाणीवपूर्वक षडयंत्रातून ही विषवल्ली वाढतच गेली. सच्चे, प्रामाणिक, पापभीरु, धर्मभीरु माणसे संभ्रमित होवून या विषाला कळत नकळत बळी पडली. याचा आता ब्रह्मराक्षस झाला आहे. आणि देशावर काळ बनून घाला घालत आहे. सर्व देशालाच गिळंकृत करायला टपलेला आहे.

ज्या स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानाच्या आधारावर हा देश उभा राहिला आहे तो आधारच उध्वस्त करायचा प्रयत्न हे सैतानी लोक करत आहेत. आज देशाचे संविधान सर्वोच्च आहे. या संविधानिक मूल्यांच्या पायावर उभारलेल्या सर्व प्रकारच्या लोकशाही संस्था, सामाजिक संस्था, सरकारी संस्था, शासन, प्रशासन नष्ट करून काही स्वार्थी, मतलबी उच्चवर्गीय लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय वर्चस्व देशावर लादून देशाला पुन्हा एकदा गुलामीच्या वाटेवर न्यायचे आहे. समाजातील समता, बंधुता व सौहार्द संपवून विषमतावादी, भेदभावपूर्ण, विकारी, संकुचित विचारधारा रुजवायची आहे. ज्यामध्ये फक्त काही ठराविक उच्च जात वर्गीय लोकांचे हित असेल.

या सर्व विषारी षडयंत्राचा सर्वात जास्त मुस्लिम समाज बळी ठरलेला आहे. धर्म संस्कृतीच्या आधारावर वेगळे ठरवून बहुजन हिंदू समाजाला त्यांचे विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात ब्राह्मणी धर्म संस्कृती बहुजनावर लादून उदोउदो मात्र बहुजन हिंदू संस्कृतीचा केला जातो. ब्राह्मणी धर्म संस्कृती ही बहुजनांच्या धर्म संस्कृती पेक्षा वेगळी आहे. परंतु बहुजनांची दिशाभूल करून ब्राह्मणी धर्म संस्कृतीचे वर्चस्व त्यांचेवर लादले जाते व त्यांना एक प्रकारे मानसिक गुलाम केले जाते. बहुजनांचे देवधर्म, पूजाअर्चा, रितीरिवाज वेगळे असून त्यामध्ये कोठेही भट, बामण, पुरोहिताची मध्यस्थी व दलाली लागत नाही. परंतु मानसिक गुलामीमुळे ते भट, बामणाकडे जातात. बहुजनांचे देव हे ‘बा’ आणि ‘आई’ च्या स्वरूपात असतात आणि त्यांची उपासना, पूजा पद्धती अतिशय साधी देवाला पाने फुले वाहून किंवा प्रसंगी कोंबडे बकरे बळी देऊन मनोभावे प्रार्थना करणे अशी असते. परंतु जन्म कुंडली, राशि भविष्य, यज्ञयाग, होम हवन, पुजापाठ, शांती, कर्मकांड अशा बामणी षडयंत्राच्या बहुजन समाज आहारी जातो. मुस्लिम व कांही इतर धर्म संस्कृती वाले मात्र या ब्राह्मणी कर्मकांडाच्या वर्चस्वाखाली येत नाहीत. त्यांची धर्म संस्कृती, उपासना पद्धती अगदी वेगळी आहे त्यामुळे त्यांना वेगळ्या धर्म संस्कृतीच्या नावाने वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जातो.

मुस्लिमांच्या बदनामी व राक्षसीकरणाचे हे षडयंत्र स्वातंत्र्यापासूनच सुरू झाले आहे. देशाच्या फाळणीला कारणीभूत ठरवून देशात अनेक ठिकाणी दंगली घडवून आणल्या. राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या घडवून त्याचा आळ व गुन्हा मुस्लिमांच्यावर घालायचा प्रयत्न केला गेला. त्यानंतरही देशात अनेक ठिकाणी काही ना काही कारणाने दंगली होतच राहिल्या. मुस्लिमांच्या पाठीमागे हे शुक्लकाष्ठ साधारण 1980 च्या दशकापासून मोठ्या प्रमाणात लागले आहे. बाबरी मस्जिद आंदोलनानंतर तर नेतेमंडळींनी मुस्लिमांवर उघड उघड शिवीगाळी, दमण, हिंसाचार सुरू केला. 1992 चे बाबरी कांड व त्यानंतरचे बॉम्बस्फोट प्रकरणाने सारा देश हादरून गेला होता हे आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे. मुस्लिमांना संशयित, दहशतवादी, देशाचे शत्रू ठरवण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. यासाठी इतिहासाचा विकृतपणे वापर केला गेला. सामान्य बहुजनांची माथी भडकावण्यात आली. अनेक निष्पाप मुस्लिमांना संशयित, दहशतवादी म्हणून सरळ सरळ वर्षांनुवर्षे तुरुंगात दाबून ठेवले. शिकल्या सवरल्या तरुणांना दहशतवादी, देशद्रोही संघटनांच्या नांवावर अक्षरशः वर्षानुवर्षी कोठडीत डांबून उध्वस्त केले. विषाची पेरणी सुरूच होती. अशातच 2002 साली गुजरात कांड घडवून आणले. देश अक्षरशः सुन्न व थिजून गेला होता. या सगळ्या अमानुष गोष्टींचा वापर पद्धतशीरपणे मुस्लिमांना शत्रू ठरवत मुस्लिमांचे हिंदुत्वाचे राजकारण उभे केले. आपण तरुण असाल तर यानंतरच्या अनेक अमानवी घटनांचे आपण साक्षीदार आहात.

अमानुषतेचा हा क्रूर खेळ दिवसेंदिवस वाढतच गेला. आजची देशाची सामाजिक, राजकीय परिस्थिती अतिशय विदारक आहे. हा सैतानी आगडोंब सगळ्या देशालाच गिळंकृत करायला टपलेला आहे. केवळ मुस्लिमच नाही तर दलित, आदिवासी, मागास व संपूर्ण बहुजन समाजाला याने वेढले आहे. अनेक ठिकाणी मंदिर-मज्जिद प्रकरणे, कब्रस्तान जमीन, अतिक्रमणे, बेकायदेशीर मदरसे, धार्मिक रितीरिवाज, लव जिहाद, लँड जिहाद, माॅबलिंचींग, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा व आदर्श, आक्षेपार्ह वर्तन, मोबाईल स्टेटस, खाणपान, पोशाख अशा अनेक गोष्टीं व व्यवहारावर आक्षेप व बंधने लावण्याचा प्रयत्न होत आहे. प्रसंगी स्थानिक वातावरण बिघडवून दंगल करून मुस्लिमांची घरे, मस्जिदीं, मदरसे, उद्योग, व्यवसायावर हल्ले केले जात आहेत. अशावेळी मुस्लिमांकडून कांही प्रतिकार झालाच तर पोलिस, प्रशासना मार्फत दडपशाही केली जाते. अशा घटनेत सामिल लोकांचे घरांवर, उद्योग, धंदे व व्यवसायांवर बुलडोझर चालवला जात आहे. अशा हिंसेतून प्रसंगी मुस्लिमांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. एखाद्या निष्पाप जीवाला हिंस्र व माथेफिरू जमावाने हल्ला करून ठार मारणे हे अमानुष व रानटीपणाचेच लक्षण आहे. रमेश बिधुडी सारखे बीजेपीचे खासदार एका मुस्लिम खासदाराला संसदेत जातीधर्माच्या नावाने उघड उघड शिवीगाळ करून देशातून हाकलून देण्याची भाषा करतात. त्याचेवर कोणतीच कारवाई होत नाही. उघड उघड मुस्लिमांची मते नाकारली जात आहेत. इतर पक्षांना देशद्रोही ठरवले जात आहे. मुस्लिमांवर एकप्रकारे सामाजिक, राजकीय अस्पृश्यताच लादली जात आहे. आज सर्वार्थाने मुस्लिम समाजाचे जीवन आणि जगणे धोक्यात आलेली आहे. हा सगळा मुस्लिमांच्या सामाजिक, राजकीय असंघटन व दुर्बलतेचा परिणाम आहे.

आज भारत एक स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान मानणारा देश म्हणून प्रत्येकाला प्रतिष्ठा, सन्मान, सुरक्षितता व विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. परंतु लोकशाहीच्या सर्व संस्था यांनी आपल्या विचारांनी भ्रष्ट केल्या आहेत. सर्व संस्थांमध्ये यांनी आपली माणसे पेरली आहेत. ही माणसे फक्त आणि फक्त स्वतःच्या हिताचेच काम करतात‌. देशाचे संविधान संपवण्याचा व्यवहार सर्वत्र दिसून येत आहे. मनमानी, हुकूमशाही, दमणकारी, फॅसिस्ट प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. ‘अब की बार ४०० पार’ च्या घोषणा देशाचे संविधान व लोकशाहीचे स्वरूप बदलण्याचे दुष्ट हेतूने केल्या जात आहेत. त्यामुळे एकंदरीतच देशाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक जीवन धोक्यात आलेले आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, लोकशाही, संविधानाचा आधार व पाया पूर्ववत मजबूत व्हावा. समता, बंधुता, सामाजिक न्याय व धर्म धर्मनिरपेक्ष मूल्ये जपली गेली पाहिजेत. हाच सामाजिक व राजकीय विचार दृढ करून अशा व्यक्ती, पक्ष, संघटना व चळवळी यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. सत्य, न्याय, नैतिकतेचा सामाजिक, राजकीय लोकशाही विचार जोपासणारा समाज निर्माण झाला तर प्रत्येकाला एक चांगले सन्मानित जीवन जगता येईल. मुस्लिमांनीही धर्मांधता व कट्टर वाद सोडून स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानाची मूल्ये जोपासणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर समाज बांधवांशी समता, बंधुता व सौहार्दाचे जीवन जगता येईल. त्यांनीही अशाच व्यक्ती, पक्ष, संस्था व संघटनांना पाठबळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे एक सशक्त, सुदृढ, निकोप, कल्याणकारक, प्रगतिशील समाज व लोकशाही देशात सर्वांचे हिताचे रक्षण होईल.

(पूर्वार्ध)

- शफीक देसाई

सामाजिक कार्यकर्ते 




शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व केले, जे इंग्रजांविरुद्ध भारतातील लोकांच्या संतापाचे प्रतीक म्हणून इतिहासात ओळखले जाते. त्यांचा जन्म २४ ऑक्टोबर १७७५ रोजी झाला. त्यांचे वडील अकबर शाह-द्वितीय हे चौदावे मोगल सम्राट होते. लालबाई त्यांची आई होती.

बहादूर शाह जफर हे केवळ विद्वान-कवी म्हणून ओळखले गेले नाहीत तर त्यांनी युद्धकलेचे प्रशिक्षणही घेतले. १८५७ मध्ये मेरठ येथे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध उठाव करणारे भारतीय सैनिक दिल्लीत पोहोचले. १ मे १८५७ रोजी जेव्हा ते लाल किल्ल्यावर दाखल झाले तेव्हा बहादूर शाह जफर यांनी १२ मे रोजी आपला दरबार चालवला आणि सम्राट म्हणून विविध नियुक्त्या केल्या आणि इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. नंतर, त्यांनी ग्रेटर प्रशासकीय कामकाज परिषद स्थापन केली आणि धार्मिक संबंधांची पर्वा न करता वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या क्षमता आणि निष्ठेनुसार वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. 

बहादूर शाह जफर यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना न दुखावता क्रांतिकारी पावले उचलली. त्यांनी आपल्या सैनिकांना आणि ‘भारतीय जनतेला’ इंग्रजांचा पराभव करण्याचे आवाहन केले. इंग्रजांच्या माघारीनंतर बहादूर शहा जफर यांनी दिल्लीबाहेर ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध बंड करणाऱ्या योद्ध्यांना निमंत्रण दिले. भारतीय योद्ध्यांनी दिल्ली गमावणार नाही असा निर्धार केला होता. पण इंग्रज दिल्ली काबीज करण्याचा कट रचून वारंवार प्रयत्न करत होते. अशा गंभीर परिस्थितीत भारतीय योद्धा आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात १४ सप्टेंबर १८५७ पर्यंत ७२ वेळा घनघोर युद्ध झाले. अखेरीस ब्रिटिश सैन्याने लाल किल्ल्यावर प्रवेश केला आणि १९ सप्टेंबर १८५७ रोजी तो पूर्णपणे ताब्यात घेतला.

बहादूर शाह जफर यांना माघार घेत आपल्या कुटुंबातील काही सदस्यांना सोबत घेऊन हुमायूनचा टोंब येथे आश्रय घ्यावा लागला, जेथे २१ सप्टेंबर १८५७ रोजी जफर यांना इंग्रजांनी अटक केली. नंतर इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार घोषित केले आणि ८ डिसेंबर १८५८ रोजी रंगून तुरुंगात हद्दपार केले. त्यांच्यासोबत त्यांची प्रिय बेगम जीनत महल आणि त्यांची दोन मुलेही होती. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रंगून तुरुंगात चार वर्षे अत्यंत हलाखीचे जीवन व्यतीत केले. नंतर शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांनी ७ नोव्हेंबर १८६२ रोजी तुरुंगातच अखेरचा श्वास घेतला.

ते स्वतःला मार्मिकपणे म्हणाले, ‘जफर तू किती दुर्दैवी आहेस! तुझ्या लाडक्या मातृभूमीत तुझ्या थडग्यासाठी किमान दोन गज जमीन असण्याचे भाग्य तुला नाही’.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


 


कल्याण -

(मलिक अकबर यांजकडून)

रविवार दि. ३१ मार्च २०२४ रोजी फलाह-ए-आम सोसायटी कल्याण तर्फे रहेजा हाऊसिंग सोसायटी येथे मुस्लिमेतर बंधूभगिनींसाठी इफ्तारचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ५-४५ वा. असीम फाळके यांच्या कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मोईन डोन यांनी ट्रस्टतर्फे चालवण्यात आलेल्या वी केअर डायग्नॉस्टिक सेंटरच्या सुविधांवर थोडक्यात प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की आमच्या सेंटरमध्ये अल्प दरात अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. तसेच सेंटरमध्ये आधुनिक जागतिक दर्जाची उपकरणे आहेत. त्यांचे रिपोर्ट्सवर अनेक लहान-मोठे हॉस्पिटल्सकडून ग्राह्य धरले जातात. तसेच वी केअरमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स बसतात, त्यांची फी नाममात्र आहे.

यानंतर ट्रस्टकडून अस्पा मध्ये चालविण्यात येणाऱ्या अभ्यासिकेचा मिशल चौधरी यांनी परिचय करून दिला.

पवित्र रमजानमधील रोजा इफ्तार कार्यक्रमासाठी आमंत्रित जळगाव जमाअत ए इस्लामी हिंदचे अमीर सोहेल यांनी रोजा इफ्तारच्या २५ मिनिट अगोदर आपल्या मृदू शैलीत भाषण केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की रमजानमध्ये मी दररोज माझ्या घरी माझ्या कुटुंबासोबत रोजा इफ्तार करतो, पण आज मी माझ्या मोठ्या परिवारासोबत रोजा इफ्तार करत आहे. कारण पवित्र कुरआननुसार आपण एकाच मातापित्याची संतान असून या कारणाने आपण सर्व भारतवर्षातील नागरिक हे भाऊ-बहीण आहोत. म्हणून आपल्याबरोबर रोजा इफ्तारचा मला मोठा आनंद होत आहे. अजून आनंदाची ही बाब आहे की रहेजा सोसायटीमध्ये अनेक विचारधारा, संप्रदाय व जातीचे लोक गुण्यागोविदाने राहतात आणि आपल्या समोर मला रोजामागचे तत्त्वज्ञान मांडण्याचा अवसर प्राप्त झाला आहे. पवित्र कुरआनमधील सूरह बकरा, आयत नं. १८३ मध्ये अल्लाहने रोजाचे उद्दिष्ट सांगितले आहे. त्यात असे म्हटले आहे की रोजाद्वारे अल्लाह आपल्या हृदयात ईशभय निर्माण करू इच्छितो. रोजा ५-१० वर्षांचे मूलही ठेवते. ते स्वयंपाकघरात जाऊन काही खाऊ शकते किंवा फ्रिजमधून थंडगार कोल्ड्रिंक पिऊ शकते. पण ते तसे करत नाही. त्याला अल्लाहचे भय असते. त्याला हे माहीत असते की मला आई-वडील पाहत नाहीत. पण माझा अल्लाह तर पाहत आहे आणि ते आपला हात माग घेतो. ज्याच्यासाठी मी रोजा ठेवला आहे तो तर मला २४ तास पाहत आहे. त्याच्या मनात ईशभय निर्माण होते. हाच उद्देश रोजाचा आहे की मला कुणी बघत नाही पण माझा अल्लाह तर बघतच आहे.

आजही आपल्या देशात उपाशीपोटी राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अएनेक राज्यांत गरिबांची परिस्थिती फार हलाखिची आहे. मला ओरिसा राज्यात जाण्याचा योग आला. तिथे झोपडपट्टीमध्ये राहणारे अनेक अशी कुटुंबे आहेत जी १५० ते २०० रुपयांसाठी पोटच्या संतानाला विकून टाकतात. कारण त्यांचे पोट भरण्याकरिता त्यांच्याकडे अन्न नाहे. ह्या अशा गरिबांची अवस्था व भुकेच्या वेदनांचा अंदाज आपल्याला ड्रायफ्रूट खाऊउन किंवा कोल्ड्रिंक पिऊन येणार नाही. रोजा आपल्याला भुकेची व तहानेची जाणीव करून देतो.

रमजानचे एक वैशिष्ट्य हे आहे की या महिन्यात कुरआन अवतरित झाले आहे. त्यात संपूर्ण जाती व मानवांसाठी शांतीचा संदेश आहे. हा ग्रंथ सगळ्यांचा आहे. या आधुनिक जगात कुरआनचे भाषांतर सहज उपलब्ध आहे. जर आपण इच्छुक असाल तर आयोजक तुम्हाला कुरआनचे भाषांतर देऊ शकतात.

सोहेल अमीर यांनी शेवटी सांगितले की ही आपल्या देशाची सुंदरता आहे की इथे अनेक भाषा बोलणारे, अनेक धर्माचे लोक मिळूनमिसळून राहतात. आपल्या या रहेजा सोसायटीमध्येही वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक राहतात आणि आज आपण एकत्र रोजा इफ्तार करणार आहोत. जर असे कार्यक्रम सतत होत राहिले तर आम्ही उज्ज्वल भारताकडे वाटचाल करू. याचे सुंदर चित्र इथे दिसत आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की आज जसे आम्ही खांद्याला खांदा लावून बसलो आहोत, अल्लाह आपल्याला स्वर्गातही एकत्र करो, आमीन.

अरफा फरीद यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहील यांनी उत्तमरित्या पार पाडले. यानंतर सर्वांनी एकत्र बसून रोजा इफ्तार केला. इफ्तारनंतर या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget