Halloween Costume ideas 2015
Latest Post


वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे जेव्हा नैतिक मूल्यांमध्ये शिकवले जाते तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या गफलतीत माणूस गोंधळून जातो. तो या गोंधळात विज्ञानाच्या प्रत्येक प्रयोगाला आपल्या अधीन असल्याचे समजतो. वनस्पतींच्या अविकसित गटापासून ते अतिविकसित गटातील गुणधर्मांना फक्त विज्ञानाची किमया समजतो. ओसाड मातीच्या ढिगारातून आवृत्तबिजी वनस्पतींसारखे सजीव निर्माण होणे आणि त्याला केवळ विज्ञान समजणे हे नैतिक मूल्य असू शकते का?

वनस्पतींच्या वर्गीकरणात सर्वोत्कृष्ट गट हा सपुष्प आवृत्तबिजी (Angiosperms) वनस्पतींचा आहे. त्यांच्या फुलांचा अभ्यास करताना आपण पाहतो की रंगीबेरंगी पाकळ्यांच्या मध्ये स्त्रीकेशर आणि पुंकेशर असतात. सजीवांची उत्पत्ती होण्यासाठी नर आणि मादांचे मिलन होते, त्यातून बीज फलित होते आणि हे बिज ज्या आवरणात स्थित असते त्या आवरणाचे म्हणजे बीजकोषाचे फळात रूपांतर होणे, हा गुणधर्म या आवृत्तबिजी गटाचा असतो. फळातील स्त्रीकेशरावर पुंकेशरातील परागकण सहजासहजी हस्तांतरित होत नाहीत. त्यासाठी विविध घटक काम करत असतात. बऱ्याच वनस्पतींमध्ये नर आणि मादा फूल किंवा झाड हे वेगवेगळे असते. त्यांचे मिलन होण्यासाठी हवा, पाणी यासारखे अजैविक घटक मदत करत असतात. तसेच कीटक, मुंग्या, फुलपाखरे, मधमाशा, वटवाघळे, पक्षी इ. जैविक घटक सुद्धा सहभागी असतात. पुंकेशरातील परागकण स्त्रीकेशरापर्यंत पोहोचण्याच्या या प्रक्रियेला परागीभवन असे म्हणतात. हे परागीभवन होणे केवळ योगायोगाने असू शकते का? मादा वनस्पती आणि नर वनस्पतींना सोबतच फुले येणे, त्यांची अशी रचना जेणेकरून त्याच वेळी अजैविक किंवा जैविक घटक उपलब्ध होणे, हा चमत्कारच नाही का? यामागे एक शक्ती कार्यरत आहे, यासाठी त्याचे निरीक्षण करणे आवश्यक नाही का?

कुरआनची प्रशिक्षणप्रणाली ही एक विशेष पद्धत आहे ती म्हणजे कुरआन मानवी बुद्धी आणि मनाला या विश्वाच्या निरीक्षणावर विचार करण्यासाठी भर देतो. कुरआन कोमेजलेल्या संवेदनांना जागृत करतो, बुरसटलेल्या मनाला तीक्ष्ण करतो आणि बंदिस्त शक्तींना मुक्त करतो आणि त्यांना या विश्वात पसरलेल्या चमत्कारांकडे ओढून नेतो जे टप्प्याटप्प्यात विखुरले गेले आहेत.

या विश्वाकडे निरीक्षणाच्या दृष्टीने पाहिल्यास अल्लाहच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि अल्लाहच्या अद्भुत सृष्टीतून माणसाला बऱ्याच अज्ञात गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते. जेव्हा माणूस अल्लाहच्या अस्तित्वाला विसरतो तेव्हा सृष्टीत असलेल्या संकेतांना पाहून ज्या गोष्टीचा विसर पडत चालला आहे त्याची आठवण कुरआन करून देतो. अध्याय अश्-शुराच्या ७ व्या आयतीमध्ये म्हटले आहे,

"आणि काय यांनी पृथ्वीतलावर कधी दृष्टीक्षेप टाकला नाही की आम्ही किती विपुल प्रमाणात सर्व प्रकारची उत्कृष्ट वनस्पती निर्माण केली आहे?"

खरोखर त्यांच्यामध्ये अनेक संकेत दडलेले आहेत. नर आणि मादा फुलांच्या या संरचनेतून मिळालेले हे संकेत पाहण्यासाठी सांगताना कुरआनमध्ये 'जवजं करिम' शब्दाचा जो उल्लेख केला आहे तो आवृत्तबिजी वनस्पती या उत्कृष्ट असल्याचे दर्शविते. यांच्या उत्कृष्टतेत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच निसर्गकर्त्याचे संकेत समजून घेणारे  खऱ्या अर्थाने सफल वैज्ञानिक आहेत.                                             

...... क्रमशः


- हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६


प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका वृद्ध माणसाला पाहिले, तो आपल्या दोन मुलांच्या दरम्यान त्यांच्या खांद्यावर हात पकडून चालत होता. प्रेषितांनी विचारले, “त्याला काय झाले आहे?” लोकांनी सांगितले की त्याने पायी काबागृहाला जाण्याचे ठरवले आहे. प्रेषित (स.) म्हणाले, “त्याने अशा प्रकारे स्वतःला कष्टात टाकू नये. आल्लाहला त्याची काहीएक आवश्यकता नाही. आणि त्याला आदेश दिला की त्याने स्वारीने जावे. (ह. अनस (र.), बुखारी, मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की, “तुमच्यापैकी कुणीही काळाला वाईट म्हणता कामा नये. कारण अल्लाहच काळ आहे.” (ह. अबू हुरैरा, मुस्लिम) प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की ज्या माणसाने लोखंडाच्या शस्त्राने आत्महत्या केली तो नरकात त्याच शस्त्राने आपल्या शरीरावर आघात करत राहणार आणि ज्या माणसाने विष पिऊन आत्महत्या केली असेल तो नरकात सदैव विषाचे घोट घेत राहील आणि जर एखाद्या माणसाने स्वतःचा एखाद्या डोंगरावरून (वा उंच स्थानावरून) उडी मारून जीव घेतला तो नरकात नेहमी अशाच उंच ठिकाणावरून खाली उडी मारत राहील. (मुस्लिम)

ह. अबू हुरैरा (र.) यांनी प्रेषितांचे एक वक्तव्य सांगितले की रहम (दया) हा शब्द रहमान (दयावंत) पासून निघाला आहे जो कुणी त्याला वेगळे करेल म्हणजे दयेच्या नात्याला तोडेल, तर मीही त्याला तोडून टाकणार. (म्हणजे अशा माणसावर मीही दया करणार नाही) आणि जर कुणी ह्या दयेच्या नात्याला जोडून ठेवील, तर मीही त्याला दयेशी जोडून ठेवीन (अशा माणसावर दया करत राहीन). (बुखारी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात अल्लाह म्हणतो की खऱ्या अर्थानं दया करणारी व्यक्ती ती नाही जी कुणाशी दयेच्या बदल्यात दया दाखवतो, तर दयेचा व्यवहार करणारी व्यक्ती ती आहे जिच्याशी जर कुणी त्याचाशी जवळीक संपुष्टात आणली असेल तर अशा माणसाशी त्याने जवळीक साधावी. (ह. इब्ने उमर (र.), बुखारी)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


(१) पवित्र आहे तो जो घेऊन गेला एका रात्री आपल्या दासाला मस्जिदेहराम (काबा मस्जिद) पासून दूरच्या त्या मस्जिदपर्यंत (मस्जिदे अक्सा) जिच्या वातावरणाला त्याने समृद्धी दिली आहे जेणेकरून त्याला आपल्या काही निशाण्यांचे निरीक्षण घडवावे. वास्तविकपणे तोच आहे सर्व काही ऐकणारा व पाहणारा. 


१) इस्लामी पारिभाषिक शब्दात ‘मेराज’ या नावाने प्रसिद्ध असलेली तीच ही घटना आहे. बऱ्याचशा व विश्वासार्ह अशा निवेदनांनुसार हिजरतच्या एक वर्ष अगोदर सदरहू घटना घडली. हदीस आणि पैगंबर (स.) यांच्या चरित्रपर ग्रंथात या घटनेचा तपशील सहाबा (रजि.) यांच्या एका मोठ्या संख्येद्वारे निवेदित झाला आहे. अशा निवेदनांची संख्या २५ पयं&त गेली आहे. दिव्य कुरआन केवळ मस्जिदे हराम (काबा मस्जिद) ते मस्जिदे अक्सा (बैतुलमक्दिस- जेरूसलेम) येथपर्यंतच पैगंबर (स.) यांच्या प्रवासाचे वर्णन करतो. ‘पवित्र आहे तो ज्याने नेले.’ अर्थात सर्वोच्च अल्लाहच्या असामान्य अशा सामर्थ्याने साकार झालेली ही एखादी अत्यंत महान अशी असामान्य घटना होती. ते अस्तित्व ज्याने आपल्या दासाला हे स्वप्न दाखविले अथवा आंतरिक दृष्टाव्यात हे सर्व दाखविले असते तर अशा प्रस्तावनेची गरज का भासावी? हे अगदी स्पष्ट आहे. तसेच हे शब्ददेखील ‘एका रात्री आपल्या दासाला नेले’ सदेह प्रवास घडल्याचे द्योतक आहेत. स्वप्नावस्थेतील प्रवास अथवा आंतरिक दृष्टाव्यातील प्रवासासाठी हे शब्द कोणत्याही प्रकारे यथार्थ ठरू शकत नाहीत. म्हणून ही केवळ एक आध्यात्मिक अनुभूती नव्हती तर सर्वोच्च अल्लाहने अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांना घडविलेला एक सदेह प्रवास आणि साक्षात निरीक्षण होते, हे मान्य केल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही.


मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या निमित्ताने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातील मनोज जरांगे पाटील यांचे नाव महाराष्ट्रातील गावागावांत आणि वाड्यावस्त्यांत पोहोचले आहे. या त्यांच्या लढ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि यशही मिळाले, या यशाबद्दल पुढारी न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात आलेल्या असंख्य संकटांना तोंड देत मी इथपर्यंत पोचलो असल्याची भावना व्यक्त केली. सुखाची व्याख्या करताना त्यांनी असंख्य संकटांना आणि दुःखाना केवळ धैर्याने मुकाबला करण्यासाठी सकारात्मक विचारांची कास धरल्याने हे साध्य झाले आहे असे आवर्जून सांगितले.

सुख नेमके कशात आहे किंवा सुख कशाला म्हणावे, असे प्रश्न यच्चयावत सर्वच मानवी मनाला नेहमीच पडत असतात, त्यातूनच आपल्या स्वतःच्या जीवनात चांगला सकारात्मक बदल घडावा, असे प्रत्येकाला वाटत असते; प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेले जीवन, संघर्षमय, कष्टमय असलेतरी  त्यातही सुखासाठी प्रत्येक जण धडपडत असतोच. जीवनाच्या खडतर वाटचालीत अपार कष्ट, अविश्रांत परिश्रम आणि प्रचंड चिकाटी या जोरावर सुखाचा ज्यांनी ज्यांनी शोध घेतला त्यांच्या जीवनात सुखाचा सुर्य उगवला असल्याचे आपल्याला दिसून येते.           

खरं तर प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या जीवनात चांगला सकारात्मक, आनंददायी बदल व्हावा, असे मनापासून  वाटत असते; अर्थात तशी अत्यंतिक जरुरी व मनापासून तळमळ मात्र त्याच्याठिकाणी असली पाहिजे, मनातल्या मनात अर्थात अंतर्मनात आपल्या मनाजोगं व्हावं असं सत्य त्याला वाटलं पाहिजे; तशी तळमळ त्याच्या कृतीतूनही दिसली पाहिजे; अर्थात अंतर्मन हे  प्रत्येकाच्या जीवनात सुपरिणाम घडवून आणत असते; एखाद्या गहन परिस्थितीला तोंड देत असताना देखील मनातून केवळ सकारात्मक विचारांमुळे नेहमी तुम्ही आनंदी होऊ शकता. प्रतिकुल परिस्थितीतून मी सहीसलामत बाहेर पडणार आहे, माझी तशी कुवतच आहे, माझ्या समोर उभ्या राहिलेल्या गहन परिस्थितीशी मी अत्यंत सहजपणे लढणार आहे; त्यातून मी आनंदाच्या, यशस्वी वाटेकडे निश्चित अगदी नजीकच्या काळात मार्गत्क्रमण करणार आहे, असा आत्मविश्वास जागृत केला तरी अर्धी लढाई जिंकली म्हणून समजा.

तुमचं कुणाशी बिनसलं असेल, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून बचाव करायचा असेल आणि त्याच्यापासून दूर जाणे कठीण होत असेल, किंवा ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी मनाची भावना झाली असेल तर अशा गंभीर अवस्थांतून सुटण्यासाठी एक सहज सुलभ उपाय आपण अवलंबायला हवा, तो म्हणजे  स्वतःचा स्वाभिमान जागृत करून “ मी कुठे ही चुकत नाही; माझा हेतू पूर्ण प्रामाणिक आहे. समोरच्याच्या मनात वाईट असेल, त्याची नियत खराब असेल किंवा त्याला आपण जे करतो आहे ते चुकीचे आहे याची जाणीव होत नसेल तर आपल्या स्वतःचा आत्मसन्मान जागृत करून, सकारात्मक दृष्टिकोनातून त्याचा त्याग करा; आपल्यामुळे होणाऱ्या लाभाला आजपासून तोच खऱ्या अर्थाने मुकला आहे, असे आपल्या मनाला समजवा. आपण मनातून चांगले वागत असताना मी त्रास सहन  का करू ? असा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला तर अशा गंभीर परिस्थितीतून सहज मार्ग काढू शकता. यानंतर मात्र आपली गाडी सुसाट वेगाने अपेक्षित ध्येयाकडे नेता येते.

सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे संगीत साधनेतील तंबोरा. तंबोऱ्यावरच्या तारा जुळवून घेणे जसे महत्त्वाचे असते किंवा तबला डग्गा यांचे आणि हार्मोनियमचे सूर लावून घेणे जसे महत्त्वाचे असते तसेच जीवनात सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन महत्वाचा असतो, तंबोरा व तबला डग्गा हार्मोनियमच्या  स्वरांच्या पट्टी बरोबर जमला की गायकाचे सूरही जमून जातात आणि उत्तरोत्तर मैफल  रंगत जाते, तसेच आपल्या जीवनाचा हा सूर एकदा का सकारात्मक सुरांशी जुळला की, जीवन आनंदमय आणि सुखमय झालेच म्हणून समजा. त्यात ही थोडीशी विनोद बुद्धी व  हजरजबाबीपणा असला की, मानवाच्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतोच.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेकांना आपले काही खरे नाही, हे माझ्याच वाट्यालाच का आले, मी यातून लवकरात लवकर बरे होईल का, अशा प्रकारचे असंख्य प्रश्न मनाला घेरून टाकतात; या सर्व प्रश्नांना पुरून उरणार उत्तर नक्कीच आहे, ते म्हणजे ‘आत्मविश्वास’. माझ्या जवळच्या परिचयातील  एका व्यक्तीला जीबीएस सारखी जीवघेणी व्याधी वाट्याला आली.अत्यंत उमेदीच्या काळात त्याला या रोगाने पछाडले, सुरुवातीला तो खचून गेला, शरीरातील ताकद पूर्णपणे नष्ट होत आली. त्यामुळे तो पुरता हतबल झाला, त्याच्या मनाला असंख्य प्रश्नांनी जेरबंद केले. पण थोड्याच दिवसात वैद्यकीय उपचारांबरोबरच त्याने आपला आत्मविश्वास वाढवला. आपल्या अंतर्मनाला "मी पूर्णपणे पहिल्यासारखा बरा होऊ शकतो, ह्या आजारातून मला लवकरात लवकर मुक्त व्हायचे आहे.'' अशा प्रकारच्या स्वंयसूचना देऊन त्याने अत्यंत आत्मविश्वासाने हळूहळू या आजारातून बाहेर पडून, फिजिओथेरपीच्या साहाय्याने शारीरिक व्यायामाला  सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे काही महिन्यातच तो या जीवघेण्या आजारातून सहीसलामत बाहेर पडला.

जगातील  मानसशास्त्र, ऋषी मुनी यांनी स्वतःच्या मनाच्या ताकदीबद्दल बरेच काही सांगितले आहे. “जे जे म्हणून अंतर्मनात किंवा सुप्त मनात, ते ते अनुभवायला मिळते" हाच मानवी जीवनातील मोठा नियम सांगितला आहे. मानवी जीवनातील अंतर्मनातील अथवा सुप्त मनातील ताकद प्रभावीपणे काम करते ते स्पष्टपणे सांगितले आहे. तुमच्या अंतर्मनात अर्थात सुप्त मनात आनंदी विचार व भावना याची पेरणी करीत राहा. आणि मग फरक पाहा, तुमच्या मनातील सर्व नकारार्थी विचार कुठल्या कुठे लुप्त होतात.

चौथी पास शिकलेल्या कोल्हापुरातील एका प्रचंड यशस्वी उद्योगपतींची मुलाखत घेताना मी सहज विचारले, “तुमचे शिक्षण नसताना ही यशस्वी होण्याचे रहस्य काय?"  त्यावर ते  गालातल्या गालात हसले आणि मला म्हणाले, "मला एखादी गोष्ट करता येणार नाही असे मला माझ्या मनाला माहितीच नव्हतं किंवा तसं कधी वाटलंच नाही." या त्यांच्या उत्तरातच त्यांचे यशाचे रहस्य लपलेले आहे, या अल्पशिक्षित उद्योगपतींना अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशात पाचारण केले जायचे, तिथेही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले होते. औद्योगिक विश्वात ते प्रचंड यशस्वी झाले. तात्पर्य काय तर आपण मनात आणले तर मोठमोठी कामं लिलया हाताळू शकतो. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांनी म्हटल्याप्रमाणे “अशक्य ते शक्य करता सायास...”  हा मंत्र अनेकांच्या बाबतीत प्रत्यक्षात उतरलेला  दिसून येतो.

अंतर्मनाला दिलेल्या सूचना निश्चितपणे कृतीत उतरतात, असे अनुभवायला येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनेक यशस्वी व्यक्तींचा जवळून अभ्यास केला तर आपणास अंतर्मनाच्या ताकदीचा प्रत्यय दिसून येतो, शिवाय प्रचंड आत्मविश्वास निर्माण करायचे फार मोठे काम हे अंतर्मनच करीत असते. तेव्हा तुम्ही एखाद्या गहन परिस्थितीला तोंड देत असला? तुमचं कुणाशी वैर असेल? तुम्हाला सतत अपयश येत असेल? एखादी कला साधत नसेल? प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्ही त्रस्त असाल, अनेक गंभीर प्रश्नांनी तुमचे दैनंदिन जीवन व्यापून उरले असेल तर त्यावर एकच सहज सोपा उपाय म्हणजे “या समस्येतून मी मला सहजपणे सोडवणार आहे, आजच्या क्षणापासून माझ्या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होत आहे, माझा इथून पुढचा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस आनंददायी जाणार आहे”  अशा सकारात्मक सूचना अंतर्मनाला दिल्यातर बघता बघता तुमचे अंतर्मनच तुमच्या प्रश्नापासून तुमची सुटका करीत आहे; असे तुमच्या निदर्शनास येईल.

सकारात्मक दृष्टिकोन व्यक्तीला नेभळट, बावळट किंवा भित्रा करत नाही हे निश्चित लक्षात ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन असेल तर व्यक्ती कधीच परिस्थितीला घाबरून पळून जात नाही. तिला मनापासून वाटत असते की, आपण सगळं यशस्वीपणे सांभाळून यातून पार पडू. प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे अशा व्यक्ती अपयशाकडून यशाकडे झेप घेतात, अर्थात इतरांना ही अशा व्यक्ती प्रेरणादायी ठरतात..!


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण' पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)


प्रेरणादायी सत्यकथा



मक्केत राहणारा एक तरुण प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांचे अनुयायी यांचा कट्टर विरोधक होता. त्याच्या स्वतःच्या घराण्यातील जे लोक इस्लामचा स्वीकार करून प्रेषितांचे अनुयायी होत, अशा लोकांना तो अतोनात यातना देत. 

त्याच्या घराण्यात एकेश्वरत्वाचा आवाज अपरिचित राहिला नव्हता, झैदचा (र.) मुलगा सईद याने सर्वप्रथम इस्लाम धर्म स्वीकारला. हजरत सईद यांचा विवाह या तरुणाची बहीण फातिमा हिच्याशी झाला होता. परिणामी फातिमाही मुस्लिम झाली, त्याच कुटुंबातील एक प्रतिष्ठित व्यक्ती नईम बिन अब्दुल्ला यांनीही इस्लाम स्वीकारला होता, परंतु हा तरुण अजूनही इस्लामपासून दूरच होता आणि जेव्हा जेव्हा इस्लामचा आवाज त्याच्या कानावर पोहोचायचा तेव्हा तो संतापायचा. लबिना ही त्यांच्या कुटुंबाची दासी होती, जिने इस्लाम स्वीकारला होता. हा तरुण तिला खूप त्रास द्यायचा. खूप मारझोड करायचा.

जेव्हा त्याचा चुलत भाऊ सईद बिन जायद याने इस्लामचा स्वीकार केला तेव्हा त्यांना दोरीने बांधले, खूप मारले परंतु; ते त्याला बधले नाहीत. ( इस्लामची नशा अशी काही आहे की एकदा चढली की उतरत नाही.) या तरुणाच्या मनात इस्लाम आणि पवित्र प्रेषित (स.) यांच्याविषयी घृणा विकोपाला गेली. जेव्हा इतर सर्व डावपेच अयशस्वी ठरले, कितीही प्रयत्न करून तो एकाही व्यक्तीला इस्लामपासून परावृत्त करू शकला नाही, तेव्हा प्रेषित (स.) यांच्याविरूद्ध विकोपाचे पाऊल उचलले, प्रेषित (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना ठार मारण्याचे. कंबरेवर तलवार घेऊन तो थेट त्यांच्या दिशेने निघाला.

योगायोगाने, नईम बिन अब्दुल्ला त्याला वाटेत भेटले, त्याचे रौद्ररूप पाहिले आणि विचारले, "सर्व काही ठीक तर आहे ना?"

तो म्हणाला, "मी मुहम्मद (स.) यांना संपविण्यासाठी निघालो आहे."

हा तरुण खूप शूरवीर होता. एखाद्या उद्देशाने तलवार उचलली तर ते काम पूर्ण केल्याशिवाय तलवार म्यानात घालायचा नाही. हे सर्व परिचित होते. तरीही नईम बिन अब्दुल्ला, धैर्य दाखवत त्याला म्हणाले, "अगोदर आपल्या बहीण आणि मेव्हण्यांना जाऊन भेट, तेदेखील प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायी झाले आहेत. त्या तरुणाने लगेचच माघार घेतली आणि सरळ बहिणीचे घर गाठले.

बहीण आणि मेव्हणा कुरआन पठण करत होते. दारावर भावाचा आवाज ऐकताच कुरआनचे भाग लपवले गेले. पण आवाज कानात पडला होता. त्याने बहिणीला विचारले, "हा कसला आवाज होता? तुम्ही काय वाचत होता? मी ऐकले आहे की तुम्ही दोघेही धर्मत्यागी झाला आहात."

असे सांगून त्याने आपल्या मेव्हण्याशी हुज्जत घातली आणि त्यांना मारायला सुरुवात केली. त्याची बहीण त्यांना वाचवायला आली तेव्हा त्याने तिलाही मारायला सुरुवात केली. दोघांचे शरीर रक्तबंबाळ झाले, परंतु त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

'काहीही होवो, प्राण गेले तरी चालेल पण इस्लाम आता मनातून जाऊ शकत नाही.' बहिणीच्या या शब्दांचा विशेष प्रभाव पडला, या शब्दांनी त्याला विचार करायला भाग पाडले. त्याने आपल्या बहिणीकडे प्रेमळ नजरेने पाहिले, तिच्या शरीरातून रक्त वाहत होते, बहिणीचे रक्त पाहून त्याला आणखीनच वाईट वाटले.

तो म्हणाला, "तुम्ही जे वाचत होता ते मलाही दाखवा."

तो वरमलेला पाहून, बहिणीने कुरआनचे काही भाग त्याच्यासमोर ठेवले. त्याने कुरआन पठण करायला सुरुवात केली. एक एक आयत पठण करत तो, "जे काही आकाश आणि पृथ्वीवर आहे ते अल्लाहची स्तवन करतात आणि तो पराक्रमी आणि सर्वज्ञानी आहे." तसेच "अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर विश्वास ठेवा."

या आयातीवर पोहोचला आणि एकदम असहायपणे ओरडला, "मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय कोणीही पूजनीय नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे पैगंबर आहेत."

नंतर नम्रपणे म्हणाला," मला प्रेषितांकडे घेऊन चला."

कुरआनच्या त्या आयती वाचून प्रेषितांचा कट्टर विरोधक कट्टर समर्थक बनला. पुढे संपूर्ण आयुष्य प्रेषितांचे एकनिष्ठ राहिला, ते तरुण होते आदरणीय उमर रजि.

आदरणीय अबूबकर रजि. शहीद झाल्यानंतर 23 ऑगस्ट इ.स. 634 रोजी खिलाफतची जबाबदारी त्यांच्यावर आली. उमर बिन खत्ताब (र.) हे मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर समाजात एक उमदे, न्यायी आणि निष्पक्ष शासक म्हणून ओळखले जातात.

त्यांचे राज्य 22 लाख 51 हजार 30 चौरस मैल भूभागावर पसरले होते.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881



भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांतर्गत देशात समान नागरी कायदा करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार भाजप शासनाने कमीत कमी एका राज्यापासून त्याची सुरुपात केली आणि त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या शुभ मूहुर्त निवडला. उत्तराखंड या राज्यात समान नागरी कायदा पारित करन घेतला. भाजपच्या अजेंड्यात भारतातील कोट्यवधी नागरिकांच्या कल्याणासाठी कोणत्याच उपाययोजना नव्हत्या, नाहीत आणि नसणार. मात्र मुस्लिमांविषयी त्यांच्या अजेंड्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्या पक्षाला अंमलात आणायच्या आहेत. त्यातील समान नागरी कायदा सर्वतोपर. नंतर कलम ३७० बाकीच्या गोष्टी ज्यापासून मुस्लिम समाजाला भविष्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अडचणीचे जाणार आहे. त्यात नागरिकत्व कायदा, एनआरसी आहेत जे लागू होत आहेत. सर्वप्रथम मुस्लिमांना देशातील राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि आज मुस्लिम नागरिकांना देशाच्या राजकारणातून हद्दपार करण्यात आले. समान नागरी कायदा लागू करण्याची तरतूद जरी घटनेत असली तरी इतकी वर्षे ते करता आले नाही, कारण भाजपची आजच्यासारखी देशात सत्ता नव्हती. मुळात ही तरतूद घटनेत का करण्यात आली होती असाही प्रश्न उपस्थित होतो. संविधानाची रचना होताना भाजप तर देशाच्या राजकारणात नव्हता. त्या वेळी काँग्रेसी होते आणि या काँग्रेसवाल्यांची सुद्धा मुस्लिमांविषयी तीच उपाययोजना होती जी सध्या भाजपवाल्यांची आहे. त्या वेळी त्यांनी आपला मनोदय जाहीर केला नव्हता. मात्र भविष्यात हे कार्य करायचे आहे यासाठी त्यांनी घटनेत कलम ४४ (मार्गदर्शक तत्त्वे) समाविष्ट केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या कलमाविषयी असे विचार व्यक्त केले होते की समान नागरी कायदा ऐच्छिक असावा. कोणत्याही अल्पसंख्याक, धार्मिक, सामाजिक घटकांवर तो अनिवार्य केला जाऊ नये.

ज्या वेळी संविधान बनवण्यात आले आणि ते संसदेद्वारा पारित करण्यात आले, त्या वेळी मुस्लिम राजकारणी, नेते होते, पण त्यांना भारतातील नागरिकांची मानसिकता समजली नसणार. म्हणून त्यांनी विरोध केला नाही. ह्या गोष्टी भूतकाळातील आहेत, सध्याच्या स्थितीबद्दल सांगायचे झाल्यास मागच्या लॉ कमिशनने स्पष्ट पण असा अहवाल दिला होता की समान नागरी कायदा लागू करण्यास कुणी इच्छुक नाही की कुणाला त्याची आवश्यकता आहे. सरकारने ते लॉ कमिशन बदलून टाकले आणि दुसरे गठित केले. मग जसा पायंडा सरकारने देशाच्या सर्व संस्थांसाठी घातला आहे तोच धागा धरून सध्याच्या लॉ कमिशनने भाजप सरकारला हवा तसा अहवाल दिला आणि मग देशात समान नागरी कायद्याची सुरुवात उत्तराखंड या राज्यातून होत आहे.

मुस्लिमांशी द्वेष याच एका आधारावर भाजपचे सर्व कार्यक्रम ठरवले जातात. इतर वंचित, गरीब, मागासवर्गीयांचा इथे उल्लेख नाही, तो एक वेगळा विषय आहे, ज्यांची स्थिती मुस्लिमांपेक्षाही खालावलेली आहे आणि ज्यांच्या बाबतीत भाजपचे धोरण किती घातक आहे ते म्हणजे त्यांना जन्मोजन्मी वंचित ठेवायचे आहे. हा आजचा विषय नाही, त्यावर कधी दुसऱ्या प्रसंगी लिहू.

समान नागरी कायद्यामागचा खरा हेतू मुस्लिम संस्कृती आणि सभ्यतेला संपुष्टात आणणे आहे का, असा एख प्रश्न पडतो. प्रत्येक गोष्टीचे उत्तर नसते. मुस्लिम स्त्रियांना समान अधिकार म्हणजे पुरुषांसारखे, अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात केल्या जातात. पण आधी इतर धर्मियांना, स्वधर्मियांना तरी हे अधिकार दिलेले आहेत का ते त्यांनी आपल्या आंतरात्म्याल्या न विचारता हा कायदा केलेला आहे.

सांस्कृतिक एकता नव्हे सांस्कृतिक विविधता ह्या सृष्टीचा नियम आहे. आपल्या कौटुंबिक जीवनासाठी कोणते कायदे, नियम असावेत हे त्या त्या संस्कृतीने ठरवलेले असते आणि संस्कृती देखील प्रत्येक समूहाची भिन्न भिन्न असते. ह्या विविधतेमुळेच मानवजातीला पशु-प्राण्यांपेक्षा वेगळे स्थान आहे. ज्या त्या संस्कृतीचे नियम त्या त्या धर्माच्या शिकवणींनी ठरवलेले असतात. म्हणून त्यांना पावित्र्य प्राप्त होते. त्यात कोणताही समूह ढवळाढळ करू इच्छित नाही. कारण ती संस्कृती त्यांची ओळख असते. मुस्लिमांच्या सामाजिक, कौटुंबिक जीवनाचे नियमन अल्लाहने पवित्र कुरआद्वारे दिलेल्या आदेशांवर आधारित आहे. मुस्लिम एक वेळ आपले प्राण, अस्तित्व पणाला लावू शकतो, पण अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन करू शकत नाही. त्यासाठी हवी ती किंमत मोजायला मुस्लिम तयार असतात.

भाजपला आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेहमीच मुस्लिमद्वेषाची आवश्यकता असते. आणि यासाठी त्यांना जनतेचा कौल प्प्त करण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याच्या त्यांच्या मानसिकतेत मुस्लिमांशी वैर निर्माण करण्याची आवश्यकता असते. त्यानुसार मुस्लिमांविरुद्ध असा प्रचार केला जातो की हे लोक चार-चार विवाह करतात, चार विवाहांतून जन्माला येणारी मुले किती, हा विचार कुणीही करू शकतो आणि इतर धर्मियांवर अशी भीती घातली जाते की एक वेळ अशी येईल की जेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या इतर सर्व धर्मियांपेक्षा जास्त होईल. आणि मग ते आमच्यावर राज्य करतील. वस्तुस्थिती अशी की बहुपत्नित्ववाद मुस्लिमांपेक्षा इतर धर्मियांमध्ये जास्त आहे. पण त्यांची कुठे नोंद नसते. मुस्लिमांना हे अनिवार्य असते की त्यांनी विवाहाची कायद्यात्मक नोंदणी करावी. आणि जर तशी नोंदणी सुरू केली तर लक्षात येईल की बहुपत्नित्वात मुस्लिम हिंदू, बौद्ध, शिख आणि ख्रिस्तींपेक्षा मागे आहेत. पण सामान्य माणूस इतका अभ्यास करत नाही. निवडणुकीच्या, धर्माच्या मंचावरून ज्या काही खोट्या गोष्टी जाहीर केल्या जातात त्यावर त्यांचा विश्वास असतो आणि मग ते भाजपने पसवलेल्या भीतीच्या आहारी जातात. त्यांची मते मिळाली की भाजपचे श्रमसाफल्य.

ज्या मानवी समूहात एकरुपता नसते त्यामध्ये खऱ्या अर्थाने समानता नसते. समानत नसणे म्हणजे जात, रंग, वंश यासारखे वेगवेगळे भेद असतात. ही सारी असमानता आमच्या नागरिकांमध्ये असताना युनिपाइड (एकरुप) सिव्हिल कोड लागू करण्यात अर्थ काय?

खरे पाहता समान नागरी कायदा मुस्लिमांना लक्ष्य बनवण्यासाठी केलेला आहे. ज्याचे उद्दिष्ट त्यांचे वैवाहिक कायदा आणि वारसा कायदा रद्द करून त्यांचाही इतर नागरिकांप्रमाणे छळ करता यावा. हा समान नागरी कायदा खरेच भारतीय नागरिकांसाठी इतका लाभकारक ठरणार असेल तर मग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना का वगळण्यात आले, त्यांना समानता नकोच का? भाजपच्या ह्या धोरणाची बरीच उदाहरणे आहेत. जसे राष्ट्रपतींना नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी निमंत्रण दिले गेले नाही आणि बरेच काही.

उत्तराखंडच्या समान नागरी कायद्याच्या धर्तीवर साऱ्या देशात हा कायदा केला जाईल असे भाजपचे म्हणणे आहे. पण वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या लोकसमूहांच्या कौटुंबिक परंपरा, पद्धती, संस्कृती एकमान कशा करता येतील? कौटुंबिक वैवाहिक रीतीरिवाज परंपरागत असतात. य. रीतीरिवाजांना संपवून कायदा लागू करता येत नाही. केलाच तर कोणताही जनसमूह त्याला स्वीकारत नाही. कारण ह्या रीतीरिवाज, परंपरांमागे सांस्कृतिक अधिष्ठान आणि इतिहास असतो. त्यांना कायदा बनवून संपवता येत नाही. न्यायालयीन प्रकरणांत अनेक वेळा परंपरांना कायद्याचे स्थान दिले जाते, पण कोणत्याही कायद्याला परंपरा म्हणून संस्कृती स्वीकार करत नाही.

परंपरा, संस्कृती, सभ्यतेच्या ऐतिहासिक खुणा पुसून टाकणे, खोडून टाकणे म्हणजे इतिहास रचणे होत नाही. शहरांची नावे बदलणे किंवा पारंपरिक कायदा संपुष्टात आणणे म्हणजे इतिहास रचणे होत नाही. वास्तवात हे इतिहासाला पुसून टाकणे होय. इतिहास इतिहास असतो. तो आपल्याला मान्य नसला तरी वारसा म्हणून त्याचे जतन केले गेले तर राष्ट्राची प्रामाणिकता आणि उदारता लक्षात येते. येणाऱ्या पिढ्यांना त्याचा गर्व वाटतो. जर प्रत्येक राजकारण्याने, सत्ताधाऱ्यांनी राष्ट्राच्या ऐतिहासिक पाऊलखुणा पुसून टाकल्या तर येत्या पिढ्यांना स्वतः आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचा पराक्रम समजणार कसा?

शहरांची नावे बदलणे असो की धर्मस्थळांची अथवा पारंपरिक कौटुंबिक, सामूहिक कायदे वदलणे – ज्यामुळे इतर जातीधर्माच्या भावना दुखावल्या जात नसतील तर याला बदल्याची मानसिकता म्हटले जाईल आणि ही मानसिकता सध्याच्या व पुढे येणाऱ्या पिढीसाठी, जसा यामागचा उद्देश असेल तसा, त्याचा परिणाम होणार नाही, तर उलट त्यांची मानसिकता अणखीन बदलण्याची भावना निर्माण होईल आणि कोणत्याही राष्ट्राच्या भावी जडणघडणीसाठी याचा काही सकारात्मक लाभ होणार नाही.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक

मो.: 9820121207


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget