Halloween Costume ideas 2015
Latest Post


गेली 18 महिने कोरोनामुळे संसदेचे अधिवेशन होऊ शकले नव्हते ते आता 13 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत होत आहे. सुरूवातीचे 11 दिवस दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेतील अधिवेशनात गदारोळ माजला. विरोधक यावेळी खूपच आक्रमक होते म्हणून पंतप्रधानांना नवीन मंत्र्याचा परिचय सुद्धा करून देता आला नाही. कोरोना व्यतिरिक्त कोणत्याही विषयावर चर्चेत विरोधक सहभागी झाले नाहीत. विरोधी पक्षांना सध्या देशात उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीतवर चर्चा करायची होती. त्यात पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती, देशात पसरलेली गोंधळाची परिस्थिती, जीवनावश्यक वस्तूंची महागाई, शेतकऱ्यांचे आंदोलन, कोरोना लसींचा तुटवडा वगैरे देशासमोरील आव्हाने आणि त्याच बरोबर पेगाससद्वारा हेरगिरी या विषयावर चर्चा करायची होती. दूसरीकडे सरकारला अशा कायद्यांवर चर्चा करायची होती जे फारसे महत्त्वाचे नव्हते.

सरकार पक्षाला घेरण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांमधील 13 पक्षांनी संसद भवनात एका सभेचे आयोजन केले होते. या बैठकीत शेतकऱ्यांपुढील समस्या तसेच पेगासस आणि इतर समस्यांविषयी भविष्यातील रणनितीवर चर्चा केली. या बैठकीत असे ठरले गेले की राहूल गांधी संसदेत समविचारी पक्षांसोबत मिळून लोकसभेत स्थगन प्रस्ताव सादर करतील. या बैठकीत काँग्रेस बरोबरच डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, भाकप, आम आदमी पार्टी, मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फ्रेस, राष्ट्रीय लोकदल, माकप या पक्षांचे नेते सहभागी झाले होते. 

या बैठकीत बऱ्याच प्रादेशिक पक्षांचा सहभाग होता. यात बरेच पक्ष अनुपस्थित देखील होते. तृणमुल काँग्रेस पक्ष नव्हता पण त्याच्या नेत्या ममता बॅनर्जी हजर होत्या. त्याचबरोबर पीडीपी आणि अकाली दलाचे नेते देखील अनुपस्थित होते. त्याचबरोबर अडचणीच्या प्रसंगी एनडीएला मदत करणारे बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएस देखील अनुपस्थित होते. मायावतीच भाजपाशी नाते जगजाहीर झाले असल्याने मायावती सुद्धा या बैठकीत उपस्थित नव्हत्या. पण सर्वांना धक्का बसला या गोष्टीचा की असदोद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्षाने देखील हजेरी लावली नाही. माध्यमांमध्ये यावर बरीच चर्चा सुरू होती.

असदोद्दीन ओवेसी यांची मुस्लिमांमध्येच लौकिकता नसून हिंदू बांधवांमध्ये देखील ते बरेच प्रसिद्ध आहेत. तसे माध्यमांमध्ये पॉप्युलर असल्यामुळेच कोणते नेते सक्षम आणि राष्ट्राच्या हिताचे असणे हे आवश्यक नाही. एमआयएमचे विरोधक त्या पक्षावर असा आरोप लावत असतात की ते भाजपाला अनुकूल आहेत. असे असताना देखील बॅ. असदोद्दीन ओवेसी लोकसभेत आणि बाहेर सुद्धा फॉसिस्टवादींचा कडाडून विरोध करतात. एमआयएमच्या विरोधकाचें असे देखील म्हणणे आहे की मुस्लिमांचा विरोध करणारे योगी, ओवेसी यांचा इतका आदर कसे करतात ते म्हणतात की, ओवेसी साहेबांना लोकनेता म्हणतात. एमआयएमच्या विरोधकांना याचे देखील आश्चर्य वाटते की भाजपाने आपल्या विरोधकांमध्ये ईडीला लावून त्यांना धमकावले जाते पण एमआयएमच्या मागे कधी ईडीची कारवाई का झाली नाही? अशा विरोधांचा बिमोड करण्यासाठी असदोद्दीन यांनी विरोधी पक्षाबरोबर सहभागी व्हायचे होते पण तसे झाले नाही.

पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या पराभवाने तो पक्ष हादरून गेला आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये चार मुख्यमंत्र्यांची त्यांनी उचलबांगडी केली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांचे मनोबल वाढले आहे. ममता बॅनर्जीच्या दिल्लीवारीने हे सिद्ध केले आहे. बंगालमध्ये आपला दरारा कायम करीत त्यांनी असा आरोप केला आहे की, केंद्राने त्यांच्या सहित अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोरवर देखील पाळत ठेवली आहे. माध्यमे स्वतंत्र राहिली नाहीत. पेगासिस नावाच्या धोकादायक वायरसने देशाच्या सुरक्षेला देखील आव्हान उभे केले आहेत. देशाची सुरक्षा धोकादायक वळणावर आली आहे. विरोधी पक्षांचे ऐक्य त्यांच्या स्वतःवर अवलंबून आहे. बऱ्याच राज्यामध्ये निवडणुका होणार असून, सदनाच्या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर त्या सर्वांशी चर्चा करणार आहेत. 

ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली की, ’’अच्छे दिन’’ची प्रतीक्षा नसून सच्चे दिनाची प्रतीक्षा आहे. खेला होबेची धमक आता साऱ्या देशात पाहायला मिळते. देशात राजकीय वादळ उठले तर त्याला कोणी रोखू शकणार नाही. विरोधी पक्षांनी जर एकजुटीने आपले कर्तव्य पार पाडले तर त्याचे चांगले परिणाम उमटणार आहेत. पंतप्रधानांना भेटल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. त्यांनी हे सुद्धा जाहीर केले की, लालू यादवांशी सुद्धा विचार विनिमय झाला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी भेटीत त्यांनी पेगासिसवर देखील विचार विनिमय केला. सोनिया गांधी यांनी त्यांना आश्वासन दिले की, काँग्रेसचा प्रांतीय पक्षावर विश्वास आहे आणि यावर काँग्रेस पक्षाला देखील विश्वास आहे. 

पेगासिस प्रकरणामुळे विरोधी पक्षांची एकजुटता निर्माण करण्यात यश मिळाले? काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी अशी मागणी केली की पेगासिस प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांद्वारे केली जावी. पंतप्रधानांनी या प्रकरणाबाबत सदनामध्ये भाष्य करावे आणि पेगासिसद्वारे हेरगिरी केली गेली की नाही हे सिद्ध करावे. सरकारने संयुक्त संसदीय समितीद्वारे ह्या प्रकरणाची चौकशी करावी. आयटी विभागाद्वारे नाही असे देखील चिदंबरम यांनी सांगितले आहे. फ्रान्स आणि इस्राईल या देशांनी पेगासिसची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत पण केंद्र सरकार याची चौकशी का म्हणून टाळत आहे ही मोठ्या आश्चर्याची बाब आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की कुठे तरी पाणी मुरत आहे. शिवसेना नेते व राज्यसभा सांसद संजय राऊत यांनी हा प्रश्न उपस्थित केला. पेगासिस हेरगिरीसाठी कुणी निधी पुरविला? ह्या प्रकरणाची हिरोशिमा नागासकीशी तुलना करत ते पुढे म्हणाले की, यामुळे नागरिकांचे स्वातंत्र्य मरण पावले आहे. 

ममता बॅनर्जींनी यांनी पेगासस प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी कायद्याखाली एका चौकशी समितीचे गठण केले आहे. ही समिती फोन हॅकिंग, ट्राकींग आणि फोन रेकॉर्डिंगची चौकशी करणार आहे. या समितीद्वारे हे तथ्य समोर आणले जाणार आहे की नागरिकांच्या स्वातंत्र्याला का लक्ष्य केले गेले. त्यांना असा आरोप देखील केला की पेगासिसद्वारे न्यायव्यवस्था आणि सिव्हिल सोसायटीसहित प्रत्येकावर पाळत ठेवली जात आहे. त्यांना अशी अपेक्षा होती की लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत या प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय घेेईल. पण केंद्र सरकार चौकशी नाकारण्याच्या आपल्या भूमीकेशी ठाम आहे पण विरोधी पक्षांनी असे ठरविले आहे की जोवर चौकशीचा निर्णय होत नाही तोवर सदनाचे अधिवेशन चालू देणार नाही.

- डॉ. सलीम खान

 (उर्दूतून अनुवाद : सय्यद इफ्तखोर अहेमद)



या आठवड्यात सहारनपूर आणि दिल्लीच्या दरम्यान असलेल्या महामार्गावर एक 32 वर्षीय युवक ज्याचे नाव प्रवीणकुमार होते व त्याने स्वतःच्या मर्जीने इस्लामचा स्वीकार करून स्वतःचे नाव अब्दुस्स समद असे धारण केले आहे, हातात एक तिरंगा झेंडा घेऊन पदयात्रा करत होता. त्याची पदयात्रा नुकतीच संपलेली आहे. 

प्रेसमध्ये आलेल्या रिपोर्टींगनुसार प्रविणकुमार यांनी स्वतःच्या मर्जीने इस्लाम स्विकारल्यामुळे त्यांच्यासोबत अन्याय सुरू झालेला आहे. त्यांच्या घराच्या भींतीवर पेंटने ते आतंकवादी असून पाकिस्तानला निघून जा, असे लिहिलेले आहे. सहारनपूर पोलीस आणि साक्षात एनआयए ने त्यांची सविस्तर चौकशी करून त्यांना्निलनचिट दिलेली आहे, असे असतानाही त्यांच्याविरूद्ध अत्याचार सुरू आहेत. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जेव्हा दिल्ली येथील उमर गौतम आणि जहांगीर आलम यांच्या द्वारे चाललेल्या दावा सेंटरवर छापा मारला होता तेव्हा त्या ठिकाणी एक धर्मांतराचे प्रमाणपत्र सापडले होते, जे की प्रविणकुमार यांचे होते. त्यावर प्रविणकुमारचे छायाचित्रसुद्धा लावलेले होते. त्यावरून एटीएसने प्रविणकुमार यांना उचलले. सविस्तर चौकशी दरम्यान प्रविणकुमार याने स्पष्ट शब्दात सांगितले की, 2019 मध्ये मी अत्यंत डिप्रेशनमध्ये जगत होतो. मला मनःशांती हवी होती. त्यामुळे आई-वडिल आणि पत्नी कोणालाही न सांगता 19 नोव्हेंबर 2019 रोजी घर सोडून निघून गेलो होतो. मी माझे मोबाईलसुद्धा बंद केले होते. इंटरनेट सर्च करत असतांना मला दिल्लीच्या इस्लामीक दावा सेंटरचा पत्ता मिळाला. मी त्या ठिकाणी स्वतःच्या मर्जीने गेलो व उमर गौतम यांच्याशी संपर्क साधला. त्या ठिकाणी राहिलो. त्या ठिकाणी कुरआन आणि वेदसहीत अनेक पुस्तके होती. उमर गौतम आणि जहांगीर आलम यांनी भेटीमध्ये मला काही पुस्तकं दिली. त्या पुस्तकांच्या वाचनाने मला मनःशांती मिळाली आणि मी स्वतःच्या मर्जीने मुस्लिम झालो. मला कुठल्याही प्रकारची कोणी लालूच दिलेली नसून कुठल्याही प्रकारचा दबाव सुद्धा टाकलेला नाही. 

व्यवसायाने शिक्षक आणि युजीसीची नेट परीक्षा उत्तीर्ण असलेले प्रविणकुमार यांनी सुप्रिम कोर्टासमोर आपल्या पदयात्रेची सांगता करतांना 27 जुलै रोजी मागणी केली की, कोर्टाने त्यांना न्याय मिळवून द्यावा. ते म्हणाले की, एटीएसने 21 जूनला माझ्या राहत्या घरीच चौकशी केली होती. 29 जूनला मला लखनऊला बोलावून चौकशी केली त्या दरम्यान कित्येक तास विदेशी फंडींग, आतंकवादी कारवायांमध्ये माझा काही सहभाग आहे का, या विषयीची सखोल चौकशी केली. पण मी सर्व प्रश्नांची ठामपणे उत्तरे दिली. खरे पाहता या धर्मांतराच्या मागे कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने नाविलाजाने त्यांना मला्निलनचिट दिली. मी एक शिक्षक, कवी आणि लेखक असून, राष्ट्रवादी विचारांचा माणूस आहे. 12 जुलैला जेव्हा माझ्या घराच्या भिंतीवर आतंकवादी लिहून मला पाकिस्तानला जाण्याची धमकी देणाऱ्या चिठ्या फेकल्या गेल्या. तेव्हा मी खूप रडलो. माझ्या मनात आत्महत्येचासुद्धा विचार आला. पण मी खूप विचारपूर्वक निर्णय केला की मी न्याय प्राप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हाच विचार करून 27 जुलैपासून मी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना देवून दुपारी 12.30 वाजता 200 किलोमीटर लांबीची सर्वोच्च न्यायालयापर्यंतची पदयात्रा सुरू केली व संपविली. त्यांनी आपल्या धर्मांतराचा निर्णय कोणाशी लपविला नाही. धर्मांतराच्या पूर्वी ते जेव्हा घरून निघाले तेव्हा अत्यंत व्याकूळ होते. त्यांनी काही दिवस काशीमध्येही वास्तव्य केलं. शेवटी त्यांना इस्लामी दावासेंटरमध्ये मनःशांती मिळाल्याने त्यांनी इस्लाम स्विकारल्याचे घरच्यांना स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तरीही त्याची पर्वा न करता त्यांनी सांगितले की, इस्लाममध्ये मला मनःशांती मिळते आहे. नसता मी आतापर्यंत तुम्हाला जीवंत दिसलो नसतो. मला माझ्या निर्णयापासून फिरण्याची कोणी सक्ती करू शकत नाही. कारण मला जेव्हाही व्याकूळता वाटते तेव्हा इस्लामी इबादतींमधून मला शांती प्राप्त होते. त्यांच्या गावातील काही लोकांनी त्यांच्या भावावरही संशय केला. त्यांच्या कुटुंबाचे रेशनकार्डही प्रशासनाने रद्द करून टाकले. एवढेच नव्हे तर त्यांचे आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात रिपोर्टसुद्धा दाखल करण्यात आली. 

प्रविणकुमार उर्फ अब्दुस्स समद यांनी सांगितले की, 2015 साली त्यांच्या भावाची सरकारी राशनची दुकान होती. सरकारतर्फे अपात्र लोकांचे राशनकार्ड रद्द केले जात होते. गावातील लोकांनी माझ्या भावावर रेशन कमी तोलण्याचा खोटा आरोप लावला. चौकशी अधिकाऱ्यासमोर माझ्या भावाचे आणि गावातील लोकांचे भांडण झाले. त्या दरम्यान, मी हरिद्वारमध्ये एका स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये होतो. एवढे असतानासुद्धा माझ्याविरूद्ध तक्रार करण्यात आली. नेट्नवालिफाय झाल्यावरसुद्धा ती तक्रार माझ्यावर असल्यामुळे मला कुठलीही नोकरी मिळत नाहीये. नरेंद्र तारांचद नावाच्या व्यक्तीने तक्रार देण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्या खोट्या आरोपानंतरच माझी मनःस्थिती बिघडली व मला वाटले की, मी कितीही परिश्रम केले तरी मला नोकरी लागणार नाही आणि मी जीवनात यशस्वी होणार नाही. तेव्हापासून माझा जीव कासावीस होत होता आणि मनःस्थिती बिघडत होती. 2020 साली नेटची परीक्षा पास केल्यानंतर सध्या ते पीएचडीची तयारी करत आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्या रक्तात राष्ट्रीयता ठासून भरलेली आहे. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीमध्ये 2016 मध्ये ’’ नमो गाथा मोदी’’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती दोन्ही पुस्तकं प्रकाशित सुद्धा झालेली आहेत आणि आणखी दोन पुस्तकं लिहिली आहेत मात्र ती प्रकाशित झाली नाहीत. सद्यस्थिती प्रविणकुमार उर्फ अब्दुस्स समद एका साखर कारखान्यात विकास अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या गावातील अनेक लोक आणि त्यांचे मित्र त्यांच्याबद्दल अत्यंत चांगली भावना ठेवतात आणि त्यांच्या पदयात्रेला उचित ठरवितात. आता कोर्ट आणि सरकार त्यांना कशा प्रकारे न्याय देते याकडे त्या भागातील लोकांचे लक्ष आहे. या सामाजिक प्रताडनेविरूद्ध न्याय मिळविण्यासाठी लवकरच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून असाच निर्णय घेणाऱ्यांना सामाजिक प्रताडनेपासून कोर्टाचे संरक्षण प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. 

 (साभार : बीबीसी हिंदी, 4 ऑगस्ट 2021)



मुस्लिम समाज वेगाने कुटुंब नियोजन करत असून, त्यांच्या जनसंख्येचा दशकीय वृद्धीदर हिंदूंच्या तुलनेने जास्त वेगाने कमी होत आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर त्या दराने 2050 पर्यंत मुस्लिमांची जनसंख्या 18 टक्क्यांवर स्थिर होऊन जाईल. जे लोक या संदर्भात भीती उत्पन्न करत आहेत आणि भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याची शक्यता व्यक्त करत आहेत मुळात ते हिदूंना भीती घालून आपली राजकीय स्थिती मजबूत करीत आहेत. 

अलिकडेच आसाम सरकारने जनसंख्या नियंत्रणाच्या अंतर्गत दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या दाम्पत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढण्याला प्रतिबंध करणारे आणि ते जर सरकारी नोकर असतील तर त्यांची पदोन्नती रोखणारे निर्णय घेतले. यानंतर असेच एक विधेयक ज्याचे नाव उत्तर प्रदेश जनसंख्या (नियंत्रण स्थिरीकरण आणि कल्याण) विधेयक 2021 आणून त्याद्वारे राज्याची जनसंख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे घोषित केले आहे. हे दोन्ही राज्य बळजबरीने जनसंख्या नियंत्रण करू पाहत आहेत. या कामासाठी ते प्रोत्साहन देण्यापेक्षा दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खरे आहे की, कुटुंब नियोजन कुठल्याही देशाच्या आरोग्य योजनेचा एक भाग असायला हवा. परंतु या दोन्ही राज्यातील सरकारांना पूर्वग्रहाने पछाडलेले असल्यामुळे हे राज्य एककल्ली विचारांनी प्रेरित झालेले आहेत. जिथपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाचा प्रश्न आहे भारतात 1952 मध्येच जनसंख्या नियंत्रण कार्यक्रम लागू करण्यात आला होता. त्या काळात जगातील फार कमी राष्ट्र या दिशेने विचार करत होते. सुरूवातीला या परिवाराला कुटुंब नियोजन असे म्हटले गेले. नंतर याचे नामांतरण परिवार कल्याण असे झाले. या कार्यक्रमाचा उद्देश केवळ जनसंख्या कमी करणे हाच होता. 

या कार्यक्रमाचा परिणाम अलिकडे दिसू लागलेला आहे. एकूण प्रजनन दर इ.स. 1980 मध्ये 4.97 होता. तो आता कमी होऊन 2.1 राहिलेला आहे. हे परिवर्तन कुटुंब नियोजन कार्यक्रमाचाच परिणाम आहे. एस.वाय. कुरेशी यांचे अलिकडेच बाजारात आलेले   पुस्तक ’द पॉप्युलेशन मिथ : इस्लाम, फॅमिली प्लानिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया’ मध्ये या मुद्यावर विस्तृत प्रकाश टाकण्यात आलेला आहे. त्यानुसार देशातील 29 पैकी 24 राज्यांमध्ये जन्मदर 2.179 च्या जवळ येत आहे. हे प्रजनन दर जनसंख्या स्थिर होण्याची सूचना देत आहे. एन.एफ.एच.एस. 5 अनुसार आसामचा प्रजनन दर 1.9 एवढा आहे. संघ परिवारातील हिंदू राष्ट्रवाद्यांना लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत एक अडचण दिसून येते. ती अडचण ही की देशातील मुसलमान हे जाणून बुजून आपली जनसंख्या वाढवत आहेत. जेणेकरून ते या देशावर कब्जा करू शकतील. परंतु आकडे वेगळ्या दिशेनेच इशारा करत आहेत. भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे अतिशय चांगले परिणाम पुढे आलेले आहेत. शिवाय, आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी चालविलेल्या जबरी नसबंदी कार्यक्रमाचाही जनसंख्या स्थिर करण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे. परंतु, हे सत्य त्या लोकांना दिसत नाही ज्यांच्या डोळ्यावर पूर्वग्रहाची पट्टी बांधलेली आहे. भाजपची जुनी आवृत्ती जनसंघ ही कुटुंब नियोजनाच्या सक्त विरोधी होती. आजही विश्वहिंदू परिषदेसारखे भाजपाचे सह्योगी या नीतिच्या विरूद्ध आहेत. अनेक साधू आणि साध्वी (साक्षी महाराज, प्राची) हिंदू महिलांना जास्त प्रमाणात मुलं जन्माला घालण्याचे अधून मधून आवाहन करत असतात. एवढेच नव्हे तर एकेकाळचे संघप्रमुख के. सुदर्शन यांनीही हिंदू महिलांना जास्त मुलं जन्माला घालण्याचा आग्रह केला होता. 

कोणतेही जोडपे किती मुलांना जन्माला घालील हा त्यांचा खाजगी निर्णय असायला हवा का? याचे उत्तर स्पष्ट आहे. आणीबाणीनंतर पुरूष नसबंदी जे एक अत्यंत साधी शस्त्रक्रिया असते करवून घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये जबरदस्त घट झाली होती. 1975 पूर्वी भारत पुरूष नसबंदीच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर होता. देशात लाखो पुरूष नसबंदी करत होते. परंतु, आणीबाणीमध्ये जी बळजबरी केली गेली त्याचा परिणाम म्हणून पुरूष नसबंदीचा दर जो कमी झाला तो आजही कमीच आहे. 

एक काळ होता जेव्हा लोक चीनमध्ये बळजबरीने राबविल्या जाणाऱ्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाचे समर्थक होते. त्या चीनमध्ये प्रती जोडपे फक्त एक मूल जन्माला घालण्याची सक्ती होती. परंतु, दीर्घावधीमध्ये हा कार्यक्रम अयशस्वी ठरला. आता याला गुंडाळण्याची तयारी सुरू असून, जोडप्यांना एकापेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्याबद्दल प्रेरित करण्यात येत आहे. चीनच्या या अनुभवावरून स्पष्ट आहे की, लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत जोरजबरदस्ती कामाला येत नाही. भारताने आतापर्यंत या संदर्भात मानवीय दृष्टीकोण अवलंबिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की, असे समजणे की मुलं जन्म घालण्याचा दर आई- वडिलांच्या धर्माऐवजी या गोष्टीवर अवलंबून आहे की, त्यांची आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती कशी आहे आणि त्यांना कशाप्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. भारताचा कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांना चांगल्या करण्यावर व त्या आधारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर आधारित आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. आकडे याचीच पुष्टी करतात की, प्रत्येक दाम्पत्याच्या मुलं जन्माला घाणल्याचा संबंध त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावर अवलंबून आहे. केरळ, कर्नाटक आणि आंध प्रदेशात राहणाऱ्या मुस्लिम महिलांचा प्रजनन दर उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानच्या हिंदू महिलांपेक्षा कमी आहे. 

संयुक्त राष्ट्र संघाचा एक मंत्र आहे की, शिक्षण सर्वात उपयुक्त गर्भनिरोधक आहे. याची प्रचिती भारतात स्पष्टपणे जाणवते. कुटुंब कल्याणाचा कार्यक्रम सर्वात जास्त त्याच राज्यात यशस्वी झालेला आहे जिथे साक्षरता दर त्यातही महिला साक्षरता दर अधिक आहे. भाजपा सरकारांद्वारे जनसंख्या नियंत्रणाच्या नीतिमध्ये कायदा आणि धर्म याची जरी कुठली चर्चा नसली तरी स्पष्ट आहे की याच्या निशाण्यावर मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत. जेव्हा खरी गरज शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेला सुधारण्याची आहे आणि गरीबी उन्मूलन कार्यक्रम जोरकसपणे चालविण्याची आहे तेव्हा ते न करता मुख्यमंत्री जोरजबरदस्तीने जनसंख्या नियंत्रण करण्याचा का प्रयत्न करत आहेत. आसाममध्ये तर अलिकडेच निवडणुका झालेल्या आहेत. आणि तेथील मुख्यमंत्री लोकसंख्या नियंत्रणाच्या नावावर सामाजिक धु्रवीकरण करू पाहत आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, मुस्लिमांनी कुटुंब नियोजन करायलाच हवे. जूनमध्ये एका ठिकाणी त्यांनी सांगितले की, जर राज्यात येणारे मुस्लिम परिवार कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला स्वीकारतील तर आम्ही आसाममधील अनेक सामाजिक समस्या सोडवू शकतो. 

हिंदूत्वाच्या खेम्यामधील अनेक महान विभूतींनी या प्रकरणी मुस्लिमांना निशाणा बनविण्यामध्ये कधीच कसर उचलून ठेवली नाही. माझी केंद्रीय गृहमंत्री गिरीराजसिंह यांनी म्हटले होते की, ’’वाढती लोकसंख्या त्यातही मुस्लिम लोकांची वाढती लोकसंख्या देशाच्या सामाजिक संतुलन, सौहार्द आणि विकासासाठी एक संकट आहे.’’

राजस्थान येथील एक भाजपा विधायक भंवरलाल यांचे म्हणणे होते की, ’’मुसलमानांना एकच चिंता आहे की, आपली संख्या कशी वाढेल आणि देशावर कसा कब्जा करता येईल’’ मात्र सत्य हे आहे की, मुस्लिम समाज वेगाने कुटुंब नियोजन करत असून, त्यांच्या जनसंख्येचा दशकीय वृद्धीदर हिंदूंच्या तुलनेने जास्त वेगाने कमी होत आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर त्या दराने 2050 पर्यंत मुस्लिमांची जनसंख्या 18 टक्क्यांवर स्थिर होऊन जाईल. जे लोक या संदर्भात भीती उत्पन्न करत आहेत आणि भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याची शक्यता व्यक्त करत आहेत मुळात ते हिदूंना भीती घालून आपली राजकीय स्थिती मजबूत करीत आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कायद्यासंबधी मत व्यक्त करताना म्हटले की, या कायद्याचा उद्देश विभिन्न समुदायातील जनसंख्येमध्ये संतुलन प्रस्थापित करणे आहे. त्यांना हे ही माहित असावे की, उत्तर प्रदेशाच्या भाजपाच्या आमदारांमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त आमदारांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत. या मुद्यावरून समाज माध्यमात मुस्लिमांच्या विरूद्ध अपमानजनक कॉमेंट्सचा पूर आलेला आहे. अशा परिस्थितीत आपण अशी आशा करू शकतो काय आपली राज्य सरकारे नागरिकांचे स्वास्थ्य आणि गरीबी उन्मूलनासारख्या मुद्यांकडे लक्ष देतील?

- राम पुनियानी

 (मूळ इंग्रजी लेखाचा हिंदी अनुवाद अमरिश हरदेनिया, हिंदीतून मराठीत एम.आय. शेख, बशीर शेख)



1908 मध्ये बॉम्बे हायकोर्टाने लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला होता. इंग्रज शासनाद्वारे देशद्रोहाचा हा पहिलाच खटला होता. टिळकांना शिक्षा झाल्याची बातमी येताच मुंबईत दंगली सुरू झाल्या. त्यांच्या शिक्षेविरूद्ध बॉम्बे हायकोर्टात दाद मागण्यात आली. या घटनेसंबंधी आपल्या आत्मकथेमध्ये (रोजेस इन डिसेंबर)मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश एन.सी. छागला यांनी लिहिले आहे की, ज्या दिवशी हायकोर्टात या खटल्याचा निर्णय होणार होता त्या दिवशी मी केवळ टिळकांना पाहण्याच्या इराद्याने कोर्टात गेलो होतो. या खटल्यात टिळकांकडून वकीलपत्र बॅ. मोहम्मद अली जिन्ना यांनी घतले होते. त्या काळी जिन्नांचा समावेश देशातील मोजक्याच मोठ्या वकीलांमध्ये होत होता. थोड्याच वेळात टिळक कोर्टरूममध्ये आले आणि दुसऱ्या लाईनमध्ये बसले. त्यानंतर जिन्ना आले आणि पहिल्या लाईनमध्ये बसले. टिळकांचे वकील असल्यामुळे त्यांच्यासाठी आसन आरक्षित होते. काही वेळानंतर निर्णय आला. टिळकांना दिलेली शिक्षा रद्द करण्यात आली. याचे श्रेय जिन्नांच्या जोरदार युक्तीवादाला दिले गेले. निर्णय झाल्या झाल्या बॅ. जिन्ना उठले आणि त्यांनी टिळकांशी हस्तांदोलन केले. जिन्नांशी अनेक वर्षांचा संपर्क असल्यामुळे मला या गोष्टीची जाणीव होती की जिन्नांच्या मनामध्ये टिळकांविषयी मोठा सन्मान होता. तसेच ते गोखल्यांचाही फार आदर करत. विशेष म्हणजे हा सन्मान तेव्हाही कायम होता जेव्हा जिन्ना हे मुस्लिम लीगचे नेते झाले. (एल.एस. हरदेनिया)


 


(११४) इब्राहीम (अ.) ने आपल्या वडिलांकरिता जी क्षमेची प्रार्थना केली होती ती तर त्या वचनामुळे होती जे त्याने आपल्या वडिलांना दिलेले होते,११२ पण जेव्हा ही गोष्ट त्याच्यावर उघड झाली की त्याचा पिता अल्लाहचा शत्रू आहे तेव्हा तो त्याच्यापासून अलिप्त राहिला. सत्य असे आहे की इब्राहीम (अ.) मोठा कोमलहृदयी ईशपरायण आणि सहिष्णू माणूस होता.११३

(११५) अल्लाहची ही रीत नव्हे की लोकांना मार्गदर्शन दिल्यानंतर पुन्हा मार्र्गभ्रष्ट करावे - जोपर्यंत की त्यांना स्पष्टपणे हे दाखविले जात नाही की त्यांनी कोणत्या गोष्टीपासून अलिप्त राहिले पाहिजे.११४ वास्तविक पाहता अल्लाह सर्वज्ञ आहे.

(११६) आणि हीदेखील वस्तुस्थिती आहे की अल्लाहच्याच ताब्यात पृथ्वी व आकाशांचे राज्य आहे, त्याच्याच अधिकारांत जीवन व मरण आहे आणि तुमचा कोणीही समर्थक व सहाय्यक असा नाही जो तुम्हाला त्यापासून वाचवू शकेल.

(११७) अल्लाहने क्षमा केली नबीला व त्या मुहाजिरीन व अन्सार लोकांना (देशांतर करणाऱ्या व त्यांची मदत करणाऱ्या लोकांना) ज्यांनी मोठ्या विपत्तीच्या प्रसंगी नबीला साथ दिली.११५ यद्यपि त्यांच्यापैकी काही लोकांची हृदये डळमळू लागली होती.११६ (परंतु जेव्हा त्यांनी नबीला साथ दिली तेव्हा) अल्लाहने त्यांना क्षमा केली.११७ नि:संशय त्याचा व्यवहार या लोकांशी अत्यंत प्रेमळ व कृपेचा आहे.

(११८) आणि त्या तिघांनादेखील त्याने माफ केले ज्यांचे प्रकरण पुढे ढकलले गेले होते.११८ जेव्हा जमीन सर्वथैव विस्तीर्ण असूनदेखील त्यांच्यावर तंग झाली आणि त्यांच्या स्वत:चे जीवदेखील त्यांना भारी वाटू लागले आणि त्यांनी जाणून घेतले की अल्लाहपासून वाचण्यासाठी कोणतेही आश्रयस्थान खुद्द अल्लाहच्या कृपाछत्राशिवाय नाही; तेव्हा अल्लाह आपल्या कृपेने त्यांच्याकडे वळला जेणेकरून त्यांनी त्याच्याकडे परत यावे. नि:संशय अल्लाह अत्यंत क्षमाशील व परम दयाळू आहे.११९

(११९) हे श्रद्धावंतांनो! अल्लाहचे भय बाळगा आणि सत्यवादी लोकांना साथ द्या.

(१२०) मदीनानिवासी व सभोवतालच्या बदावींना हे मुळीच शोभले नाही की अल्लाहच्या पैगंबराला सोडून घरी बसून राहावे आणि त्यांच्यापासून बेपर्वा होऊन आपापल्या जीवाचीच काळजी घेण्यात लागले असावे. कारण असे कधीही घडणार नाही की अल्लाहच्या मार्गात भूक, तहान आणि शारीरिक कष्टाचा एखादा त्रास त्यांनी सोसावा आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांना जो मार्ग अप्रिय आहे, त्यावर एखादे पाऊल त्यांनी टाकावे आणि एखाद्या शत्रूवर त्यांनी (सत्याशी शत्रुत्वाचा) सूड उगवावा. आणि याच्या मोबदल्यात त्यांच्या हिशेबी एखादे सत्कृत्य लिहिले जाऊ नये. नि:संशय अल्लाहजवळ परोपकारींच्या सेवेचा हक्क हिरावला जात नाही.

(१२१) अशाचप्रकारे हेदेखील कधी घडणार नाही की (अल्लाहच्या मार्गात) त्यांनी थोडा किंवा फार खर्च सोसावा आणि (जिहाद व प्रयत्न करताना) त्यांनी एखादी दरी पार करावी आणि त्यांच्या हिशेबी त्याची नोंद होऊ नये, जेणेकरून अल्लाह त्यांच्या या उत्त्तम कामगिरीचे फळ त्यांना प्रदान करील.



११२) संकेत त्या गोष्टीकडे आहे जेव्हा आपल्या अनेकेश्वरवादी बापाशी संबंध विच्छेद करताना आदरणीय इब्राहीम (अ.) यांनी सांगितले होते, ``आपणास सलाम असो! मी आपणासाठी माझ्या पालनकर्त्यांशी प्रार्थना करील की आपणास क्षमा करावी. तो माझ्यावर अत्यंत दयावान आहे.'' (कुरआन १९:४७) म्हणून याच वचनाच्या आधारावर इब्राहीम (अ.) यांनी आपल्या बापासाठी प्रार्थना केली होती, ``माझ्या बापाला क्षमा कर, नि:संदेह तो मार्गभ्रष्ट लोकांपैकी होता आणि त्या दिवशी मला अपमानित करू नकोस जेव्हा सर्व मानव उठविले जातील. जेव्हा संपत्ती कुणाच्या कामी येणार नाही, न संतती, मुक्ती केवळ त्यालाच मिळेल जो आपल्या अल्लाहसमोर विद्रोहविरहित मन घेऊन येईल.'' (कुरआन २६ : ८६-८९) ही प्रार्थना संतुलित शैलीमध्ये मागितली गेली होती. परंतु यानंतर जेव्हा आदरणीय इब्राहीम (अ.) यांचे लक्ष याकडे गेले की ज्या माणसासाठी प्रार्थना केली जात आहे, तो अल्लाहचा तर उघड उघड विद्रोही होता. तेव्हा इब्राहीम (अ.) यांनी असे करणे सोडून दिले आणि एका सच्च ईमानधारकाप्रमाणे विद्रोहींशी सहानुभूती दाखविण्यापासून स्वत:ला दूर ठेवले. 

११३) अरबीमध्ये `अव्वाह' आणि `हलीम' शब्द आले आहेत. अव्वाह म्हणजे अति हाय हाय करणारा, रडका, भित्रा आणि आकांक्षा बाळगणारा. `हलीम'  त्या माणसाला म्हणतात जो आपल्या स्वभावाला काबूत ठेवतो. क्रोध, शत्रुत्व आणि विरोधात अतिशयोक्ति  करीत नाही. तसेच प्रेम, मैत्री आणि संबंध ठेवण्यात संतुलन ठेवतो. हे दोन्ही शब्द येथे दोन दोन अर्थाने वापरले गेले आहेत. आदरणीय इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पित्यासाठी मुक्तीची प्रार्थना केली कारण ते अत्यंत दयाळू होते. माझा हा बाप नरकाग्निचे इंधन बनेल या विचाराने ते घाबरले. ते हलीम होते. त्या अत्याचारानंतर सुद्धा जे त्यांच्या बापाने त्यांना इस्लाम पासून रोखण्यासाठी केले होते तरी पण इब्राहीम (अ.) यांनी आपल्या पित्यासाठी मुक्तीची प्रार्थना केली. नंतर त्यांना जाणवले की माझा बाप तर अल्लाहचा वैरी आहे. म्हणून स्वत:ला त्यापासून वेगळे केले. कारण ते अल्लाहच्या कोपाचे भय बाळगणारे होते आणि एखाद्याच्या प्रेमात सीमोल्लंघन करणारे नव्हते. 

११४) म्हणजे अल्लाह प्रथम हे दाखवून देतो की लोकांना कोणत्या विचारांपासून, कामांपासून आणि कार्यपद्धतीपासून वाचले पाहिजे. लोकांनी जेव्हा ऐकले नाही तर अल्लाह त्यांना मार्गदर्शन करण्यापासून दूर होतो आणि त्यांना मार्गभ्रष्ट होण्यासाठी मोकळे सोडतो ज्याच्यासाठी ते प्रयत्न करतात.

हे कथन एक सर्वसामान्य सिद्धान्त वर्णन करतो. याद्वारा कुरआनचे अनेक ठिकाणी आलेले वर्णन चांगल्या प्रकारे समजू शकते. या ठिकाणी अल्लाहने मार्गदर्शन करणे किंवा मार्गभ्रष्ट करणे हे आपले कार्य म्हटले आहे. वर्णनशैलीच्या या विशेष क्रमातही एक प्रकारे चेतावनी आहे. याला मागील वर्णनाचे समापन आणि पुढील येणाऱ्या वर्णनाची प्रस्तावनासुद्धा म्हटले जाईल.

११५) म्हणजे तबुकच्या युद्धासंबंधी ज्या लहान लहान चुका पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या साथीदारांकडून झाल्या होत्या, त्या सर्वांना अल्लाहने त्यांची श्रेष्ठ सेवा लक्षात घेऊन माफ केले. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून त्यांच्या सहकाऱ्यांना दिलेली सवलत उल्लेख आयत नं. ४३ मध्ये आला आहे.

११६) म्हणजे काही निष्ठावान सहाबासुद्धा त्या कठीण समयी युद्धावर जाण्यासाठी तयार नव्हते. परंतु त्यांच्या मनात ईमान होते आणि मनापासून ते सत्य धर्माशी जुडलेले होते म्हणून शेवटी त्यांनी आपल्या विवशतेवर मात केली.

११७) म्हणजे अल्लाह या गोष्टीवर त्यांची पकड करणार नाही की त्यांच्या मनात असे विचार का आले आणि त्याकडे मन का वळले. कारण अल्लाह त्या विवशतेवर पकड करीत नाही ज्याला मनुष्याने स्वत: सुधारून घेतले आहे.

११८) पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा तबुकहून मदीना येथे आले तेव्हा ते लोक विवशता सांगू लागले जे घरी बसून होते. त्यांच्यापैकी ८० पेक्षाजास्त दांभिक होते आणि तीन सच्च्े ईमानधारकसुद्धा होते. मुनाफिक (दांभिक) खोटे बहाणे सांगत गेेले आणि प्रेमळ पैगंबर मुहम्मद (स.) त्यांच्या विवशतेला स्वीकारत गेले. नंतर या तिन्ही ईमानधारकांची पाळी आली आणि त्यांनी स्पष्टपणे आपली चूक मान्य केली. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या तिघांविषयीच्या निर्णयाला स्थगित केले आणि सर्व मुस्लिमांना आदेश दिला की जोपर्यंत  अल्लाहचा आदेश येत नाही तोपर्यंत यांच्याशी कोणत्याही प्रकारचा सामाजिक संबंध ठेवला जाऊ नये. याच विषयासंबंधी निर्णय देण्यासाठी ही आयत अवतरित झाली. (येथे हे स्पष्ट डोळयांसमोर ठेवावे की या तीनही सहाबींचा (साथीदार) मामला त्या सात सहाबींपेक्षा वेगळा आहे ज्यांचा उल्लेख टीप नं. ९९ मध्ये आलेला आहे. ज्यांनी चौकशीपूर्वीच स्वत: आपल्याला शिक्षा दिली होती.)

११९) हे तिघेजण म्हणजे काब बिन मलिक (रजि.) हिलाल बिन उमैया (रजि.) आणि मुरारा बिन रूबैया (रजि.) होते. हे तिघेही सच्च्े ईमानधारक होते. यापूर्वी त्यांनी आपल्या निष्ठेचा अनेकदा पुरावा दिला होता आणि त्याग केला होता. शेवटचे दोन साथीदार तर बदर युद्धात सामील झाले होते. त्यांच्या ईमानविषयी शंका घेण्यास अजिबात वाव नव्हता. पहिले साथी जरी बदर युद्धात सामील नव्हते तरी बदरच्या  युद्धा  ऐवजी  इतर  सर्व  युद्धांत  पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्याबरोबर  राहिलेले  होते. परंतु या सेवाव्यतिरिक्त त्यांनी तबुक युद्धाच्या गंभीर समयी सुस्ती दाखविली. ईमानधारकांना युद्धात सामील होण्याचा आदेश होता तरी त्यांनी सुस्ती दाखविली म्हणून त्यांची सक्त पकड केली गेली.  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तबुकहून परतल्यानंतर मुस्लिमांना आदेश दिला की कोणीही त्यांच्याशी सलाम कलाम करू नये. ४० दिवासनंतर त्यांच्या पत्नींनासुद्धा त्यांच्यापासून वेगळे राहाण्याची ताकीद करण्यात आली. खरे तर समाजात त्यांची तशीच दशा झाली होती ज्यांचे चित्र या आयतमध्ये रेखाटले गेले आहे. शेवटी जेव्हा त्यांच्या बहिष्काराला ५० दिवस झाले तेव्हा क्षमा करण्याचा आदेश आला. या तिघांपैकी माननीय काब बिन मलिक (रजि.) यांनी आपली करूण कहानी अतिविस्ताराने वर्णन केली आहे जी अत्यंत बोधप्रद आहे.


         ओनामा कुठून करावं हे कळतच नव्हतं ? पण करावं तर लागणार हे मात्र कळून चुकलं. आपण कोणत्याही गोष्टीची जेव्हा कल्पना करतो, तेव्हा आपल्याला खूपकाही सुचत असतं. पण जेव्हा ती कल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यास सुरुवात करतो, तेव्हा काहीच सुचत नसतं. हे माझ्याच बाबतीत नाही, तर प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. हे का बरं घडतं याचा विचार करू नका ? तर आपल्याला काय घडविता येतं याचा नेमका विचार करा. म्हणजे जीवनात काहीतरी केल्याचं समाधान तरी मिळेल. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. कधीही अति समाधानी होऊ नका ? कारण ज्याप्रमाणे आपल्या जीवनात सुख हे क्षणिक असत, तसंच समाधान पण...

              मला माझ्या मित्राकरवी एक संदेश प्राप्त झाला. त्यात स्वामी विवेकानंद यांचं आत्मबोल होतं. ते आत्मबोल त्यांनी कुणा एकालाच उद्देशून नाही, तर जगातील प्रत्येक व्यक्तीला उद्देशून म्हटलं आहे. "जिंदगी मे अच्छे लोगों की तलाश मत करो, खुद अच्छे बन जाओ...शायद किसी की तलाश पुरी हो जाए..." या विचाराने जेवढी माझ्या चिंतनाला चालना मिळाली, तेवढाच माझ्या मनाचा गोंधळ उडाला. तुम्ही म्हणाल, 'यात गोंधळ उडण्यासारखं काय आहे ?' प्रत्येक गोष्ट सुरुवातीला सहज शक्य वाटत असतं. पण जेव्हा ती गोष्ट प्रत्यक्षात उतरविण्यास सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला त्यातील गहनता लक्षात येत असतं.

बरं! आता तुम्हीच सांगा, "खुद अच्छे बन जाओ" म्हणजे नेमकं काय करायचं ? आजचा प्रत्येक मानव हा दुस-याच्या उणिवा शोधण्यातच धन्यता मानत असतो; पण त्याला स्वत:तील उणिवा(दोष) कधी आढळतच नाही. दुस-यांकडे अंगुलीसंकेत करीत असतांना त्याला दुस-यातील एकच दोष दिसत असतं. परंतु उलट परिस्थिती बघता स्वत:कडे तीन बोटं वळली आहेत. म्हणजे तो स्वत:तील त्रिदोष मुठीबंद करून ठेवत, झाकत आहेत. याचं त्याला का बरं विसर पडतं ? दुस-यांच्या उणिवांवर बोट ठेवतांना आपण किती अंधारात आहोत ? याचा तो कधी विचारच करत नाही.

काही व्यक्ती तर निरर्थक बडबड करीत असते. न मागता दुस-याला उपदेश करणे आणि आपली इमेज बनविण्यासाठी दुस-याचे गा-हाणे कथन करून दुस-यातील दोष काढणे हे तर उंटावरून शेळ्या हाकण्यासारखंच आहे. या कृतीमुळे त्याला वाटत असावं की, आपल्याला मोठेपण मिळतं, पण समजदार व्यक्तीच्या दृष्टीत तर तो मुर्खातील मुर्ख असतो. स्वआत्म परीक्षणापेक्षा तो परआत्म परीक्षणातच जास्त रमत असतो. 'मी कसा लायक नि तो कसा नालायक' हे त्याला स्वत:ला आणि इतरांनाही सांगावसं वाटत असतं. हे सिध्द करण्यासाठी तो प्रयत्नशीलही असतो. स्वत:मध्ये प्रचंड दोष असूनही तो दुस-यांवर दोषारोपण करीत असतो. इतरांच्या अंगप्रत्यंगावर टीका करीत असतांना तो स्वत:च्या अंतरंगात चुकूनही डोकावत नसतो. नर असूनही स्वत:ला नारायण समजत असतो.

सरतेशेवटी स्वामी विवेकानंद यांच्या आत्मबोलावर गांभीर्याने चिंतन करून 'पहिले स्वत:त परिवर्तन केलं, तर इतरही स्वत:त आपोआप परिवर्तन करतील.' "खुद अच्छे बन जाओ" म्हणजे साजशृंगार करून, चांगले कपडे परिधान करून नटणे-थटणे नव्हे ? तर आपल्या आचरणात म्हणजेच वर्तनात क्रांती घडविणे होय. सांगायचं तात्पर्य म्हणजे दुस-यांविषयी वाईट चिंतनाचा (विचारांचा) त्याग करणे. जर तुम्ही असे कराल तर इतरांचे मनं जिंकाल. हे जग जिंकण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आणि तितकेच खडतर पण असतं. मग बघा तुमच्या मुखातून आपसुकच शब्द बाहेर पडतील. "आनंदाचे डोही आनंद तरंग."


प्रेमात मैत्रीचा पवित्र धागा असावा...

             सध्याच्या खडतर जीवनात माणसाला सर्वप्रथम कशाची गरज असेल? तर ती प्रेमाची. प्रेम हेच जीवन आहे. जीवनाच्या या प्रवासात कितीही संकटे, अडथळे आली तरी आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते दूर करू शकतो. पण एखाद्या व्यक्तीच्या तिरस्काराने मात्र आपण पूर्णत: हतबल होतो. प्रेम ही जीवनाला परिपूर्ण करणारी भावना असून ती एक अलौकिक शक्ती आहे. म्हणून प्रत्येकाने आयुष्यभर मनमोकळे प्रेम करावे. एकदा का तुम्ही प्रेमाचे शिखर सर केले तर खरं प्रेम काय असतं ते तुम्हाला कळेल. पण ते प्रेम पवित्र असावे. त्या प्रेमात पवित्र मैत्रीचा धागा गुंफलेला असावा. प्रेम हे एक असं नातं आहे की, प्रत्येक व्यक्ती ते मनापासून निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. स्वेच्छेने एखाद्यास मानतो आणि दु:खाचे क्षण, अपयशाचे प्रसंग, सुखाच्या आठवणी हक्काने त्यांच्यासोबत वाटून घेतो. परस्परातील मतभेद असं सारं काही बाजूला ठेवून दोन ह्रदय एकमेकांच्या जवळ येतात. 

             प्रेम ही मनुष्याला मिळालेली नैसर्गिक व अनमोल देणगी आहे. खरं प्रेम विनाअपेक्षेने आपोआपच होवून जातं. दोन मन केव्हा, कशी व कोणत्या परिस्थितीत जुळतात हे उमजतच नाही. प्रेमामध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की, माणूस असाध्य गोष्टही साध्य करू शकतो. त्यासाठी फक्त त्याला प्रेमाची साथ हवी असते. माणूस एका यशोशिखरावर प्रगतीनं तेव्हाच झगमगू शकतो, जेव्हा त्याच्या पाठीशी एक प्रेरणात्मक शक्ती उभी असते. ती शक्ती म्हणजे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती...पण प्रेमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याग व विश्वास...कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचे सुख कशात आहे हे शोधून त्याच्या सुखासाठी आपल्या सुखाची होळी करावी लागते. प्रेम शेवटपर्यंत यशस्वी होतंच असं नाही. काहींना त्यात रडावंही लागते. यासाठी प्रचंड विश्वासाची साथ व विचारांची जुळवणूक असावी लागते.

             कारण प्रेम ही एक भाषा असते. फक्त प्रथम दोघांचे डोळेच प्रेमाची भाषा बनत असते. डोळ्यात प्रेमाची खोली आणि मनात प्रेमाचा सागर असतो. पण आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याला आपण त्याच्यावर प्रेम करत असल्याचं पटवून द्यावं लागतं. ही आजची सर्वात मोठी शोकांतिका आहे. प्रेमाच्या वाटेत सुखरुपी फुले आणि दु:खरुपी काटे असते. यासाठी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक व जपून टाकावं लागते. आपले पाऊल काट्यावर पडले तरी चालेल. कारण यामुळे फक्त आपल्याला वेदना होतील. परंतु जर आपले पाऊल त्या फुलावर पडले तर त्या फुलाचे सौंदर्य, जीवनच नष्ट होईल. म्हणून आपल्या मनाच्या कोप-यात एखाद्याला जागा द्यायची असल्यास ती आयुष्यभरासाठी द्यावी. अन्यथा त्या गोष्टीचा विचारच मनात आणू नये.पण वास्तविक जीवनाचं स्वरूप थोडं वेगळं आहे. कुणीतरी आपल्या जीवनात डोकावतं, आपल्या भावनेशी खेळतं. हा खेळ सुरू असताना आपण उज्ज्वल संसाराचे स्वप्न रंगवीत असतो. पण ते आपल्याला स्वप्नांच्या सोनेरी क्षितिजावर स्वप्न दाखवून दुराव्याच्या आगीत ढकलून जीवनाच्या अर्ध्या वाटेवरच सोडून जातात. मग आपल्याला त्याच्या विरहात काय करावे, काय नाही असं वाटते? पण काही करता येत नाही.

             कारण आपल्याला आपल्यासाठी जगायचं नसलं तरी आपल्याकरीता जगणा-यांसाठी जगावं लागतं. प्रत्येकालाच प्रेम करणारं कुणीतरी आपलं हवं असतं. जीवन जगायला नव्हे तर फुलवायला...तारुण्यात तर असं विश्वासाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं नातं, नकळत जुळून येणारं नातं प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवंहवंसं वाटतं आणि हे तेवढंच सत्य आहे की, प्रेमामध्ये मिळणा-या एकूण उदासीनतेमुळे एका दिवसाच्या प्रकाशाचं एका क्षणाच्या अंधारात रूपांतर होतं.

             प्रेम ही ईश्वराची अशी देण आहे की जी अंत:करणातून निर्माण होवून आयुष्यातील क्षणांना सोनेरी करते. यामुळे मनावरील दडपण थोडाफार का होईना कमी होवून मनाला प्रसन्नता प्राप्त होते. खरं तर माणसाचे माणूसपण सगळ्यात जास्त त्याच्या डोळ्यातून झरणा-या आसवातून प्रकट होते. ज्या माणसांना जीवनातल्या या आसवांचे महत्त्व कळलेले नाही, त्या माणसांना आणखी दोन पाय नाहीत म्हणून माणूस म्हणायचे यापलीकडे काय अर्थ?

- सुनील शिरपुरे

कमळवेल्ली, यवतमाळ,

भ्रमणध्वनी-7057185479



सध्या काही लोकप्रिय आणि निर्विवाद सकारात्मक शब्द नवीन आणि कधीकधी घातक अर्थ घेत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षा, देशभक्ती वगैरे असे काही शब्द आहेत ज्यांचा वापर बहुसंख्यांक वर्चस्व प्रस्थापित करणे, बहुलवाद नाकारणे आणि विरोधकांविरुद्ध हिंसक सूड उगवणे यांचे औचित्य साधण्यासाठी केला जात आहे. पेगासस हेरगिरीच्या प्रकरणाला न्याय देण्यासाठी हे शब्द पुन्हा वापरले जाऊ शकतात. इतिहासात निरनिराळ्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये हुकूमशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या राज्यकर्त्यांनी या शब्दांना अयोग्य आणि मनमानी अर्थ वारंवार दिले आहेत. तात्त्विक सत्य हे आहे की सत्ता स्वतःला नागरिकांच्या हक्कांवर दडपशाही आणि नियंत्रणाने सुरक्षित समजते, जरी हे फक्त एक भ्रम आहे. गेल्या काही वर्षांत मानवी हक्क, नागरी स्वातंत्र्य आणि वृत्तपत्रस्वातंत्र्य यांचे मूल्यमापन करणाऱ्या जागतिक निर्देशांकांच्या आपण चिंताजनक तळाशी आहोत. नागरी स्वातंत्र्याचे अपहरण आणि बहुलवाद नाकारणे ही राष्ट्रीय सुरक्षा आणि जलद विकासासाठी पहिली अट मानण्यासाठी हळूहळू आम्हाला प्रशिक्षण दिले जात आहे. जेव्हा जेव्हा राजकीय, व्यावसायिक, धार्मिक सत्तेचे केंद्र असुरक्षित आणि भयभीत होते, तेव्हा ते आपल्या विरोधकांवर (ज्यांना ते शत्रू म्हणून पाहते) हेरगिरीचे अस्त्र सोडते. सध्या लोकशाहीच्या युगात जनतेला माध्यमांद्वारे याचे प्रशिक्षण दिले जाते. अनैतिक, प्रतिशोधक आणि हिंसक धोरणांमध्ये अडकलेला लोकशाही समाज अधिक घातक ठरत आहे, कारण दडपशाहीविरोधात बंड करण्याचे हे ठिकाण आहे मात्र येथे आता दडपशाहीला स्वातंत्र्य संबोधले जाते. तंत्रज्ञानाच्या क्रांतीच्या या युगात राजकीय पक्षांचा लोकांशी थेट संपर्क हळूहळू कमी होत आहे. सुख-दु:खात लोकांच्या पाठीशी उभे असलेले, दारिद्र्य आणि वंचितता दूर करणारे राजकीय पक्ष, लोकनेते आता दिसत नाहीत. आता लोकांच्या मनाचा वेध घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. यासाठी डिजिटल माध्यमांना शस्त्रसज्ज केले जात आहे. हे राजकीय पक्षांचे आयटी सेल्स तेच काम करत आहेत जे जाहिरात एजन्सी करतात. लोकांमध्ये त्यांच्या उत्पादनांची गरज निर्माण करतात, ज्यामुळे जनतेला त्यांच्या उत्पादनांचे व्यसन लागते. जेव्हा देशातील कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी आणि त्यांचे भविष्य ठरविणारी राजकीय विचारसरणी हिंसक, दिशाभूल करणारी आणि विभाजनकारी विपणन रणनीतीद्वारे बदलली जाते तेव्हा राजकीय पक्षाला फायदा होतो आणि मग हे संकट चव्हाट्यावर येते. आता काही विशिष्ट मुद्द्यांवर जनमत चाचणीसारख्या निवडणुकीसाठी जनतेला प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. आधुनिक लोकशाही समाजांना कंडिशनिंग करण्याचे आणि त्यांना प्रत्यक्ष संघर्षापासून दूर नेण्याचे काम तंत्रज्ञानाने केले आहे. आज सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष, या तांत्रिक युद्धात अडकले आहेत. तळागाळातील जनआंदोलने दिवसेंदिवस कमी होत आहेत. सत्तासंघर्ष असो किंवा जनविरोध, तांत्रिक वर्चस्व सर्वांमध्ये यशासाठी आवश्यक झाले आहे. यामुळेच पेगासससारखे स्पायवेअर अत्यावश्यक बनले आहे आणि त्यांच्यावर अवलंबून राहणे भाग पडत आहे. आता अशा तंत्रज्ञानाचा शोध लावला जात आहे जे केवळ लोकांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ते सर्वांसाठी समान आहे असा भ्रम निर्माण झाला असला तरी ते त्याच्या निर्मात्याच्या हितासाठी एकतर्फी कार्य करते. म्हणूच पेगासससारख्या तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाविरुद्धचा लढा लोकशाहीप्रणित स्वातंत्र्य वाचवण्यासाठीचा संघर्ष ठरू पाहात आहे. निःसंशयपणे, आपल्या देशात राजकीय वर्गाला त्यांच्या कृतींच्या नैतिकतेची पर्वा नाही. त्यांच्यासाठी कसेही करून निवडणूक जिंकणे हे एकमेव उद्दीष्ट आहे. राजकीय वर्ग, काही अपवाद वगळता, कोणत्याही पातळीवर खाली उतरू शकतो. राजकीय वर्ग गुन्हेगारी घटक, काळा पैसा, जात, धर्म, प्रादेशिकता, भाषा यांचा वापर करून लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीत निवडणुका जिंकण्यास मागेपुढे पाहत नाही. अनेक दशकांपासून ही आपल्या देशाची प्रबळ राजकीय संस्कृती आहे. सर्व राजकीय पक्ष, कोणताही अपवाद न करता भ्रष्टाचार, अनैतिकता, असत्य आणि खोटेपणा या संस्कृतीत खोलवर बुडालेले आहेत. जेव्हा राज्यकर्ते अप्रामाणिक, अनैतिक, असत्य बनतात आणि आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी बेईमान पद्धती आणि साधनांचा वापर करण्यास सुरवात करतात, तेव्हा संपूर्ण देश मागे पडतो आणि जनता दारिद्र्य, अन्याय, प्रत्येक प्रकारच्या विषमतेने घेरली जाते आणि असंख्य मार्गांनी त्रास सहन करावा लागतो. लोकशाही व्यवस्थेत राजकीय प्रणाली अनैतिक मार्गाने चालायला सुरुवात करते, तेव्हा संपूर्ण प्रशासन व्यवस्था, नोकरशाही आणि सामान्य जनता आपला मार्ग भटकते. या पेचप्रसंगातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपली सडलेली राजकीय व्यवस्था शुद्ध करण्यासाठी व्यापक सार्वजनिक मोहीम आणि दृढ कृती. जोपर्यंत राजकारण त्याच्या सर्व घाणीपासून शुद्ध करण्यासाठी प्रामाणिक आणि एकत्रित प्रयत्न केले जात नाहीत, तोपर्यंत भारताचे उज्ज्वल भविष्य आणि भरभराट होऊ शकत नाही. कृती करण्याची वेळ आली आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget