Halloween Costume ideas 2015
Latest Post

Family

समाजाचा पाया मजबुत कुटुंब व्यवस्थेवर अवलंबून आहे. स्वस्थ समाजासाठी कुटुंबामध्ये सशक्तता, स्थिरता, आवश्यक असते. व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीबरोबर प्रेमाने, जिवाभावाने, आनंदी जीवन व्यतीत करतो. तेव्हाच समाजात शांतता प्रस्थापित होते. घर आनंंदी तर समाज समाधानी ! कुटुंबातच सामाजिक मुल्ये रुजतात. नैतिक मुल्ये विकसीत होतात.

कुटुंब म्हणजे पती-पत्न्नी, आई-वडिल, मुले, बहिण, भाऊ, इतर नातलग मिळून सशक्त परिवार बनतो. कुटुंबासाठी विवाह पवित्र बंधन, जीवन व्यतीत करण्याचा मार्ग, भावभावनांचा समन्वय. अशा कुटुंबात जन्मलेले बालक आत्मविश्वासाने जीवन व्यतीत करणारे, भविष्यातील एक जागरूक नागरिक बनते. आई बालकांची प्राथमिक ज्ञानपीठ, प्राथमिक ज्ञानाचे भंडार, आयुष्याची शिदोरी मिळण्याचे ठिकाण. याच ठिकाणी प्रेम, माया, त्यागावर आधारीत जीवन जगण्याचा धडा मिळतो. व्यक्तिमत्व विकसित करण्यास समर्थता येते. तेच कुटुंब, तोच समाज सुरक्षित, सुखी, समाधानी असू शकतो. पण जर का कुटुंबातील प्रमुख आधारस्तंभ पती-पत्नीच जर मजबूत नसतील तर समाजाची इमारत भक्कम उभी राहणार का? 

आज माणवाने तांत्रिक युगात प्रगतीपथावर पाऊल टाकले असले तरी अनेक सामाजिक कलह पहावयास मिळतात. कुटुंबातील पती-पत्नीमधील तणाव, इतर नात्यातील कलह, भेदभाव, आपसातील अंतर, द्वेषाची भावना पहावयास मिळत आहे. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालल्याची अनेक उदाहरणे पहावयास मिळतात. निर्मळ, प्रेमळ नाती दूरावली जात आहेत. खानदानी कलाहांनी समाज अनेक समस्यांनी पोखरला जात आहे. सुदृढ कुटुंबच सुदृढ समाज निर्मिती करु शकते. म्हणूनच कौटुंबिक कलह, सामाजिक अस्थिरतेला कारण काय याचा विचार करावा लागेल.

एखाद्या रोगाचे निदान झाल्याशिवाय डॉक्टर उपचाराला सुरुवातच करत नाही. तिच स्थिती आज आमच्या परिवाराची, खानदानाची होत आहे. आज विवाहासारख्या पवित्र बंधनाचे खेळणे केले आहे. विवाहात दोन व्यक्ती स्त्री-पुरुष पवित्र बंधनात बांधले जातात. नवीन जीवनाची सुरुवात वेगवेगळ्या घराण्यात जन्न्मलेले, वाढलेले, संस्कारीत झालेले, स्वभाव निराळे, अनोळखी परिचयात येणे व आपल्याला एका नवीन वातावरणात समाविष्ट करुन घेतात. पसंती-नापसंती गुंडाळून नवीन नात्याला जोडली जातात. पण आज नवीन जोडपी सामंजस्याची भूमिका निभावण्यासाठी कोठे तरी कमी पडत असल्याचे पहावयास मिळते. कुटुंब विस्तारित करण्याच्या आधीच त्यांच्यात ताण-तणाव पहावयास मिळत आहे आणि अशातच कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. एकमेकांना समजून घेण्याची शक्तीच नसल्यामुळे ती कुटुंबे रोगट बनतात. मानसिक खच्चीकरणामुळे कौटुंबिक स्वास्थ्य पार ढासळते. नाती विखुरली जातात. कुटुंबाचा आधारस्तंभ पती-पत्न्नीच जर घरात शांतता, समाधान, प्रेम स्थापित करु शकत नाहीत तर संसार रूपी गाड्याची चाके रूतली तर प्रवास थांबणारच ! 

आज घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. हजारो कौटुंबिक कलहाची प्रकरणे न्यायालयात चालू आहेत. अनेक फायली जीवनाची वाट पाहत आहेत. जीवनात अंध:कार घेऊन जगणाऱ्या महिलांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कुटुंबे विखुरली जात आहेत. घरात, समाजात वृध्दांना मान-सन्मान दिला जात नाही. ज्येष्ठ नकोसे झाले आहेत. ज्येष्ठ घरात अडगळ वाटू लागले आहेत. त्यामुळे वृध्दाश्रमात त्यांची रवानगी होत आहे. वृध्दाश्रमात वृध्द स्त्री असो की पुरुष संख्या वाढत आहे.

खरे पाहिले तर तरूणपिढीला ज्ञानाचे धडे देणारे, संस्कारीत करणारी ज्येष्ठ मंडळीच महान. पण त्यांचा या आधुनिक म्हणून घेणाऱ्या कुटुंबाला विसर पडत आहे. खरे तर ज्या घरात वयस्क आजी-आजोबा वृध्द मंडळींच्या ज्ञानाचा लाभ घरातील मुलांना होतो ते घर एखाद्या विद्यापीठापेक्षा कमी नाही.

आजही वृध्दाश्रमातील भावी पिढी घडविणारी मंडळी प्रेमाला आसुसलेली आहेत, याचा विसर पडता कामा नये. आईचे प्रेम, वात्सल्यसिंधु, तिच्या चरणाखाली स्वर्ग आहे, पण मुले तिच्या प्रेमाला वंचित होत आहेत. पती-पत्नीच्या तणावात मुलांचा वनवास पहावयास मिळतो. जे घर व आई ही मुलांची पहिली शाळा असते, तेथेच जर ती मुले अस्वस्थ असतील तर ते कुटुंब, तो समाज कसा विकसीत होईल. मुलांच्या या तणावाचा वाईट परिणाम होतो व  मुले बाहेरख्याली बनतात. खोटे बोलण्याचे धाडस करतात. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडच्या शोधात चूकीच्या मार्गाचा अवलंब करतात. पावले वाकडी पडतात. स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचाराला ऊत येतो.  श्रशर्रींश ळप ठशश्ररींळेपीहळि वासना तृप्ती एकमेव उद्देश बनतो आणि परिणाम वाईटच ! वेळ निघून गेलेली असते, दु:ख ऐकणारे कोणी शिल्लक राहात नाही आणि जीवनाचा अंत करण्याइतपत पावले उचलली जातात. आत्महत्येला मीठी मारली जाते.

मुलींना वडिलांच्या वारसा हक्कात तिचा वाटा दिला जात नाही. त्यामुळे तंटे-भांडणे न्यायासाठी कोर्ट, कचेरीमुळे मानसिक संतुलन संपत जाते. फेसबुकवर मैत्री करणे व जीवनाच्या अंताला तयार होणे, परिणाम अंध:कारमय पहावयास मिळतात. माणसाच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती संपली तर त्या व्यक्तीच्या शरीरात रोगांचे जंतू ठाण मांडून बसतात तसेच मानसिक, शारीरिक रोगाने शरीर ग्रासले जाते. मग कुटुंबं व त्यानंतर समाज कुचकामी होत जातात.

आज कुटुंबातील रक्ताच्या नात्यात जवळीक राहिलेली नाही. आपसातील संवाद होत नाही. त्यामुळे पण दूरावा वाढतो. घराच्या सभ्यतेची आधारशिला स्त्री विवाहाचे आवश्यक अंग, जीवनाच्या गाड्याचे एक चक्र, विवाह पवित्र बंधन, स्त्रीला मानाचे स्थान देणे आवश्यक. पण हुड्याची मागणी यामुळे समाजातील वातावरण दूषित झाले आहे.

प्रेमाने मुलांचे संगोपन करण्यासाठी माता-पित्यास वेळच नाही. आज जस जशा गाड्या किरायाने मिळतात तसे पालक पाल्याच्या संगोपनाला मिळतील का ? अशी जाहिरात आम्हा आदर्श सुसंस्कारीत भारतीयांना म्हणण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. पाश्चिमात्यांप्रमाणे एका रात्रीसाठी पती-पत्नीचे नाते ठेवायचे व सकाळी विभक्त व्हायचे, अशी रीत आहे. पशुपेक्षाही हीन वृत्ती कुटुंबाला पोखरून समाजातील नीतिमत्तेला धक्का देणारी आहे.

विवाह म्हणजे पुण्यकर्म, तो अतिशय सोप्या पध्दतीने व्हावा, विवाहाला मुलीची संमती असलीच पाहिजे. पती-पत्नीचे नाते इतके जवळचे की ईश ग्रंथ कुरआनात म्हटले आहे,’’ त्या तुमच्यासाठी पोशाख आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी पोशाख आहात.’’ (सुरह अलबकरा-02-187)

जसे पोशाख आणि शरीराच्या दरम्यान काही एक पडदा नसतो. किंबहुना दोघांचे परस्पर संबंध अभिन्न आहे. त्याचप्रमाणे तुमचा आणि तुमच्या पत्नीचा संबंध सुध्दा अभिन्न आहे.

विवाह पवित्र बंधन, सुनही घरची मालकीन म्हणून येते. मान-सन्मानासह वागणूक मिळविणारी ती घरची एक सदस्य आहे, याची आठवण ठेवणे गरजेचे असते.

पैगंबर मुहम्मद (सल्ल) म्हणतात, ’’पतीचे पत्नीवर हक्क आहेत. तसेच पत्न्नीचेही पतीवर हक्क आहेत. आपल्या पत्न्नीला प्रेमाने व सहानुभूतीने वागवा, कठोर होऊ नका, दयाळू राहा. तुम्ही ईश्वराच्या जामिनीवर आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला असतो. ईश्वराच्या शब्दाने त्या तुमच्या कायदेशीर सहभागी झालेल्या असतात, हे विसरु नका.’’

स्त्रीशी चांगली वर्तणूक ठेवण्याची ताकीद दिली आहे. इमारत किती मोठी आहे त्यापेक्षा त्या घरातील वृध्दाच्या चेहऱ्यावरील हास्यावर सुखी कुटुंबाची ओळख होते. ज्येष्ठांना कुटुंबाचा भाग बनविण्याचे आदेश आहेत. आपुलकीच्या बळावर सशक्त कुटुंब बनविणे अत्यंत आवश्यक आहे.

घरातील व्यक्ती एकमेकांशी मिळून-मिसळून राहतील तर तोच समाज, तोच देश एकोप्याने राहणार. जग एक परीक्षा गृह आहे. सत्याच्या कसोटीवर मानवता टिकवता येते. आदर्श कुटुंब, समाज, देश बनवायचा असेल तर सहानुभूती, प्रेम, समता, बंधुता इत्यादी मुल्यांना जोपासावेच लागेल.

पवित्र ईश ग्रंथात म्हटले आहे, ’’लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी  बनविली आणि एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एकमेकांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. (पवित्र कुरआन सुरह अन्नीसा आयत नं.1)

जीवनातील प्रत्येक क्षणी आपण ईशभय मनात ठेवावे. इथपावेतो की त्याच परिस्थितीमध्ये त्याला पारलौकिक जीवन प्राप्त व्हावे.


- डॉ. आयेशा पठाण, 

नांदेड 

9665366489


आयेशाच्या आत्महत्येने इस्लामी नैतिक शिक्षणाचे महत्व अधोरेखित केलेले आहे


या आठवड्यात 23 वर्षीय आयेशा मकरानी या गुजराती महिलेच्या आत्महत्येने भारतीय जनमानस ढवळून निघाले. विशेषतः मुस्लिम समाजामध्ये या आत्महत्येमुळे प्रचंड सामाजिक उलथापालथ झाली. समाजमाध्यमांवर उलट-सुलट प्रतिक्रियांचा महापूर आला. मौलाना सय्यद सलमान नदवी यांनी तर स्पष्ट शब्दात सांगितले की, ’’ही फक्त एक घटना उघडकीस आलेली आहे, अशा हजारो घटना होत आहेत ज्या उघडकीस आलेल्या नाहीत.आयेशाच्या आत्महत्येच्या गुन्ह्याचा भार समस्त भारतीय मुस्लिमांच्या शिरावर आहे.’’ 

या घटनेचा तपशील एव्हाना सर्वांनाच कळून चुकलेला आहे. त्यातून या घटनेसाठी कारणीभूत असलेली दोन कारणं ठळकपणे पुढे आलेली आहेत. एक - आयेशाचा पती आरीफ खान याचे दुसऱ्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध. दोन - सासरवाडीकडून सातत्याने होत असलेली पैशाची मागणी. मुस्लिम तरूण-तरूणींमध्ये लग्नापूर्वी प्रेमसंबंध प्रस्थापित करणे ही जरी सामान्य बाब नसली तरी अशा प्रकरणांची संख्या दुर्लक्ष करण्याएवढी नक्कीच नाही; याचाही स्वीकार करावा लागेल. या दोन्ही कारणासाठी जबाबदार एक कारण आहे, ते म्हणजे मुस्लिम समाजाची इस्लामच्या नैतिक शिक्षणापासून दूर राहण्याची प्रवृत्ती. कुरआनपासून संपर्क तुटल्यामुळे भारतीय मुस्लिमांतील मोठा घटक इस्लामी शिष्टाचारापासून लांब झालेला आहे. स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटने त्यांना दिवसेंदिवस कुरआनपासून दूर नेण्याचे काम केलेले आहे. जोपर्यंत मुस्लिम समाज या समस्येवर नियंत्रण मिळविणार नाही तोपर्यंत त्यांची तरूणाई अशीच भटकत राहील आणि त्याची किंमत समाजाला मोजावी लागेल. नवीन पिढिचे समुपदेशन त्यांना समजेल अशा भाषेतून आणि माध्यमातूनच करावे लागेल, असे माझे वैयक्तिक मत आहे. चांगले चारित्र्य हीच इस्लामची निर्णायक शक्ती राहिलेली आहे, याचा विसर अलिकडे बहुतेक मुस्लिमांना पडलेला आहे. पाश्चिमात्यांच्या चमकदार जीवन शैलीने बहुतेक मुस्लिमांचे डोळे दिपवून टाकलेले आहेत. त्यामुळे त्यांना पवित्र, सौम्य आणि सौहार्दपूर्ण इस्लामी जीवनशैलीचा विसर पडलेला आहे. दुसरे कारण सासरवाडीकडील मंडळीकडून वधूच्या मात्या-पित्याकडून लग्नात आणि लग्नानंतर सातत्याने पैशाची मागणी करणे ही सुद्धा इस्लामी नैतिक शिक्षणाच्या अभावामुळेच निर्माण झालेली समस्या आहे. 

विज्ञानाची जसजशी प्रगती होत जाते तसा-तसा धर्माचा प्रभाव कमी होत जातो. या आणि याचसम अनेक कारणांमुळे भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा अलिकडे लग्न करण्यासाठी अनेक विघ्न पार करण्याची पाळी आलेली आहे. 

भारतीय मुस्लिम समाज हा धर्मांतरीत मुस्लिम असल्याने व सातत्याने बहुसंख्य बांधवांसोबत राहत असल्याने त्यांच्या चालीरितींचा नाही म्हटलं तरी नकळत मुस्लिम जनमानसावर परिणाम होत असतो. हा परिणाम इतका सुक्ष्म असतो की तो लवकर जाणवत नाही. 

निकाहाच्या बाबतीतही वर्षानुवर्षे होत असलेले सूक्ष्म बदल आता इतके ठळक झालेले आहेत की, त्यांनी एका विक्राळ समस्येचे रूप धारण केलेले आहे. ’जोडे की रकम’ या नावाखाली अनेकजण हुंडा आणि ’दहेज-ए-फातमी’ या नावाखाली दहेजमध्ये उंची फर्निचर, फ्लॅट पासून ते कार वगैरे देण्या-घेण्याचे प्रकार  वाढलेले आहेत. तसेच सम्राट अकबरच्या नावाखाली हलदी, मेहंदी, जुलवा इत्यादी रीतिरिवाज हे मुस्लिमांच्या निकाहमध्ये एव्हाना प्रस्थापित झालेले आहेत. आणि यामुळेच ’निकाह को आसान करो’ या प्रेषित सल्ल. यांच्या फर्मानाला उघडपणे हरताळ फासण्याचे काम मोठ्या प्रमाणात मुस्लिमांकडून होत आहे. हेच मूळ कारण आहे आयेशाच्या आत्महत्येचे. ज्या धाडशीपणे तिने खळखळून हसत मृत्यूला कवटाळले ते धाडस सर्वांनाच चकित करून गेले. आयशाने जरी हसत-हसत मृत्यूला कवटाळले असेल तरी तिच्या हास्यामागील वेदना सर्वांच्या मनाला हेलावून टाकणाऱ्या होत्या. 

मुस्लिमांचे लग्नसोहळे

इस्लामी लग्न किती साधे असते याचे एक उदाहरण येथे नमूद करण्याचा मोह आवरत नाहीये. एकदा प्रेषित सल्लम. यांचे एक जवळचे सहकारी ह. अब्दुर रहमान बिन औफ रजि. यांच्या सदऱ्यावर अत्तराचा डाग पाहून प्रेषित सल्ल. यांनी त्याबद्दल चौकशी केली असता ते लाजून म्हणाले, ’’या रसुलल्लाह (सल्ल.) कल मेरा निकाह हुआ है’’ याचा अर्थ पहा! प्रेषित सल्ल. हजर आहेत मात्र त्यांच्या एका विश्वासू साथीदाराला (रजि.) त्यांना स्वतःच्या निकाह समारंभात बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही. मुस्लिमांचा निकाह इतका सोपा असतो. 

लग्न संस्कार की सोहळा

इस्लाममध्ये लग्न संस्कार आहे ना सोहळा. ती फक्त एक इबादत आहे. प्रेषित सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. एक सामाजिक करार आहे, यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. करार आहे म्हणून तो न पाळला गेल्यास, करार भंग  करण्याचे अधिकार दोन्ही पक्षांना प्राप्त आहेत.

भारतीय मुस्लिमांमध्ये गरीबांंची संख्या जास्त आहे. निकाह महाग झाल्यामुळे लाखो मुली लग्नाची वाट पाहत आहेत, माझ्या दृष्टीने आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिम मुलांच्या अटकेनंतरची ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.  

मोठ्या लग्नांमध्ये साहजीकच बडेजावपणा असतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी उंची वस्त्रे आणि दाग दागिने घालून मिरविण्याची स्त्री-पुरूषांना नैसर्गिक इच्छा निर्माण होते. त्यातून स्त्री-पुरूषांना एकत्रित वावरण्याची संधी मिळते. त्यातूनही अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. 

मस्जिदीमध्ये सहज होऊ शकणाऱ्या साध्या शरई निकाहचे सोहळ्यात रूपांतरण करून आपण वरील सर्व वाईट गोष्टींची जोखीम स्विकारलेली आहे.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’बरकतवाला निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’ आपण नेमके याच्या उलट करीत आहोत व तसे करून आपल्याला काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे.  

 अल-मारूफ वल-मशरूत

एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल -मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ म्हणजे अनिवार्य रीती मध्ये होऊन जाते. आपल्या समाजात सुद्धा हेच झालेले आहे. अनेक कुरितींची सुरूवात मारूफ पद्धतीने झाली होती आता तिचे रूपांतर मशरूत पद्धतीमध्ये झालेले आहे. महागडे लग्नसोहळे त्यापैकी एक आहे. 

इस्लाममध्ये निकाह

लग्नास इच्छुक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून निकाहचा प्रस्ताव म्हणजेच ’इजाब’, निकाह इच्छुक मुलगी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्या प्रस्तावाचा स्वीकार म्हणजे ’कुबूल’, दोन साक्षीदार, एक वकील, काझी, महेर, छूआरे (खजूर) एवढे झाले के निकाह होवून जातो. एवढी साधी ही प्रक्रिया आहे. मात्र आजच्या मुस्लिम समाजातील निकाह अनेक रितीरिवाजांनी नटलेले म्हणूनच क्लिष्ट झालेले आहेत. .

  इस्लामपूर्व काळामध्ये या सर्व कुरीती तत्कालीन अरबी समाजामध्ये प्रचलित होत्या. त्या सर्व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी आपल्या बुटाच्या टाचेखाली रगडून नष्ट केल्या. परंतु कालौघात त्या पुनर्जिवीत होवून आजमितीला नव्याने समाजाला आव्हान देत आहेत. लाखो रूपये हुंड्यात, लाखोंचा खर्च जेवणात, लाखो रूपये मंगल कार्यालयात, लाखो रूपयांची उंची वस्त्र-प्रवणे आणि दागदागिन्यांत खर्च केले जात आहेत. 

काही ठिकाणी लोक-लाजेखातर या सर्व गोष्टी तोंडाने मागितल्या जात नसल्या तरी मुशास्ता (मध्यस्थ) च्या माध्यमातून त्या न मागता मिळतील अशीच स्थळे शोधली जात आहेत. अलिकडे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांना सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. त्यामुळे निकाह मध्ये अनाठायी खर्च अनिवार्य झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की, एखाद्याला पहिली मुलगी झाली तर तो कशीबशी आपली समजूत घालून घेतो. योगायोगाने दूसरीही झाली तर त्याचे काळीज धस्स करते. तीसरी झाली तर त्याच्या पोटात भितीचा गोळा उठतो आणि चौथीही झाली तर मात्र तो हसणे विसरून जातो. खाली मान घालून पाठीचा कना मोडेपर्यंत काम करतो, कारण चारी मुलींच्या निकाहासाठी भविष्यात लागणारी प्रचंड रक्कम त्याच्या ऐपतीबाहेरची असते. काहीही करून ती गोळा करणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनते. त्याची तरतूद करण्यासाठी तो स्वतः व कुटुंबावरील आवश्यक खर्चाला सुद्धा कात्री लावतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पौष्टीक अन्न, मनोरंजन, पर्यटन इत्यादी गोष्टींचा तर विचारच करत नाही. आपल्या मुलींचे निकाह योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य त्या खर्चाची तरतूद करण्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. एक पोलीस अधिकार या नात्याने मला आलेल्या अनुभवातून मी हे विदारक सत्य वाचकांसमोर ठामपणे मांडू शकतो की, मुस्लिम समाजातील दोन पेक्षा जास्त मुली असणारा प्रत्येक बाप आपल्या मुलींचे निकाह व्यवस्थीत व्हावेत, यासाठीच जगत आहे.

केवळ निकाह प्रसंगी देण्यात येणारे भारी जेवण पद्धत जरी बंद केले तरी निकाह समारंभामध्ये होणारा अर्ध्यापेक्षा अधिक वायफळ खर्च वाचू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे करणे सहज शक्य आहे. ज्या प्रेषित सल्ल. यांचे गोडवे गाताना आपली जीभ थकत नाही त्याच प्रेषित सल्ल. यांच्या 11 निकाह पैकी एकाही निकाह प्रसंगी उपस्थितांना जेवण देण्यात आलेले नव्हते, मग तेच जेवण आपण कोणत्या तोंडाने देतो? हे एकच उदाहरण लाखोंचे महागडे जेवण देण्याच्या पद्धतीला रोखण्यासाठी पुरेसे आहे. 

एका मध्यमवर्गीय मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या निकाहला होणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीमधील मोठी संख्या त्या व्यक्तीसाठी, त्या सोहळ्यासाठी नव्हे तर निकाहनंतर मिळणाऱ्या बिर्याणीसाठी गोळा झालेली असते हे वास्तव आहे. निकाहमध्ये मुस्लिमांनी जेवणाची ही पद्धत बंद पाडली तर 5-50 पेक्षा जास्त लोक मोठ्या लग्नाला सुद्धा येणार नाहीत, याची मला खात्री वाटते. 

  असे झाले तर निकाह मस्जिदीमध्ये सहज करता येतील व मुलीच्या बापाचे शादीखान्याच्या भाड्याचे लाखभर रूपये व जेवणाचे चार-दोन लाख रूपये सहज वाचतील. 

रस्मे तआम जबसे निकाह में आयी है

यकीन किजिए बडी तबाही मचाई है

ये जो बिरयाणी सबने दबाके खाई है

दुल्हन के बाप की उम्रभर की कमाई है

आज ऐपत नसतांनासुद्धा प्लॉट, घरदार किंवा शेती विकून प्रसंगी व्याजी कर्ज काढून अनेक लोक या खर्चिक निकाहचा खर्च भागवित आहेत. त्यांच्या या हलाखीच्या परिस्थितीवर दया दाखवून आपण एका वेळेसच्या बिर्याणीचा त्याग करू शकत नसू तर मात्र समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे चित्र ’याची देही याची डोळा’ आपल्या सर्वांनाच पहावे लागेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही. मी पुन्हा सांगतो हा माझा व्यक्तीगत विचार आहे. 

 1. - प्रत्येकाने स्वतः निश्चय करून टाकावा की, काही झाले तरी मी स्थानिक निकाह समारंभामध्ये जेवण करणार नाही. 

2- आपल्या मुलाच्या निकाहच्या वेळी मुलीच्या वडिलांना स्थानिकांना जेवणाची व्यवस्था करू देणार नाही. आपुले पाहूणे मुलींच्या वडिलांच्या माथी मारणार नाही.

काही लोकांचा माझ्या या म्हणण्याला विरोध असू शकतो. अनेकजण ही पळवाट शोधू शकतात की जर मुलींच्या वडिलांची परिस्थिती चांगली असेल व ते स्वेच्छेने जेवण देत असतील तर जेवण्यात काय हरकत आहे? हे म्हणणे जरी वरकरनी बरोबर वाटत असले तरी अशा प्रकारातून ऐपत नसलेल्यांवर सुद्धा सामाजिक दबाव आपोआप येतो व त्यातून ते लोक जेवण देण्यास बाध्य होवून जातात. कारण की, ऐपत ही एक नित्तांत खाजगी बाब असते. वरकनी कोणाकडे पाहून त्याच्या ऐपतीचा अंदाज करता येत नाही. वरून ऐपतदार दिसणारे अनेक लोक आतून पोकळ असतात. लोकलाजेखातर ऐपत नसतांनाही वायफळ खर्च करत असतात. मी अशा काही लोकांना ओळखतो की, जे सकृतदर्शनी ऐपतदार दिसत होते व ज्यांनी आपल्या खोट्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलींचे शानदार निकाह करून दिले आणि नंतर कळाले की, घरदार विकून हैद्राबादला जावून मजूरी करत आहे. 

ज्या समाजातील श्रीमंत लोक आपल्या समाजातील गरीब लोकांवर दया दाखवत नाहीत तो समाज फार काळ एकसंघ राहू शकत नाही. 

मित्रांनों! एक खूनगाठ उराशी बांधून घ्या की, लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट, कुरूप आणि टिकाऊ नसेल तर तो समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही.

मुस्लिम मॅरेज सिस्टम इज द मोस्ट मॅथेमॅटिकल सिस्टम इन द वर्ल्ड असे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे बोलताना एकदा म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांना निकाहमध्ये घुसडून निकाहचे गणितच बिघडवून टाकलेले आहे. ते पूर्ववत शुद्ध स्वरूपात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी निकाहला सोपे करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही.

लक्षात ठेवा मित्रानों ! महागड्या निकाहचे खालील सामाजिक दुष्परिणाम नक्कीच होतील. 

एक - वर्गकलह वाढेल.

दोन- कन्या भ्रुणहत्या सुरू होतील. (कोण जाणो सुरूही झाल्या असतील). 

1. हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ’निकाह ला सोपे बनवावेच लागेल’. 

2. लग्नापूर्वीच नियोजित वधू-वर तसेच दोन्हीकडील सासू-सासरे यांचे शरियतच्या प्रकाशमध्ये सुपदेशन करून दोंघाच्या जबाबदाऱ्या दोघानां स्पष्टपणे सांगाव्या लागतील. 

3. एवढे करूनही काही कुरबूर सुरू झालीच असेल तर स्थानिक शरई पंचायतीकडे प्रकरण सामोपचाराने मिटविण्याकडे लक्ष द्यावे लागेल. कारण नियमित कोर्टांकडे आधीच खटल्यांचा एवढा बोझा आहे की, ही घरेलू प्रकरणे ही तेथेच नेली तर न्याय मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागेल आणि तोपर्यंत दोन्ही पक्षाची प्रचंड मोठी हानी होईल, आर्थिक खर्च वेगळा. 

4. महागड्या लग्न सोहळ्याचा पूर्णपणे बहिष्कार करावा लागेल. 

5. निकाहमध्ये वधू पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या भोजनाची कुठलीच शरई हैसियत नसल्यामुळे त्याचाही पूर्ण बहिष्कार करावा लागेल. 

6. घरामध्ये कुरआन आणि हदीसचे शिक्षण देणारे फॅमिली इज्तेमा नियमितपणे सुरू करावे लागतील. 

7. आपल्या पाल्यांच्या भौतिक शिक्षणासोबतच नैतिक शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष द्यावे लागेल. 

8. रोजगाराची चिंता न करता वयात येताच मुला-मुलींचे लग्न ईश्वरावर विश्वास ठेवून करावे लागतील. 

9. घरातील टीव्हीला पॅरंटल लॉक लावावा लागेल. 

10. मुलांच्या हातात स्मार्ट फोन देणे अलिकडे गरजेचे झालेले आहे. मात्र ते देतांना त्याचा वापर कसा करावा, याची आचार संहिता मुलांना समजावून सांगावी लागेल. तसेच ते मोबाईलचा पॅड लॉक करणार नाहीत, याच शर्थीवर त्यांना मोबाईल द्यावा. तसेच अधुन-मधून अचानक त्यांचा मोबाईल तपासावा लागेल. 

11. स्वतः पालकांनीही आपल्या वर्तणुकीचे सातत्याने आत्मपरीक्षण करावे लागेल. तसेच ईश्वराकडे सद्वर्तनाची प्रार्थना करावी लागेल.  

प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीची बूज राखावी लागेल. मला विश्वास आहे आपण वर नमूद सर्व उपाय केले तर आपण निश्चित एक चारित्र्यवान तरूणाई घडवू शकू जी फक्त मुस्लिम समाजासाठीच नाही तर देशासाठीही उपयोगी होउ शकेल. 

शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना तुझ्या आणि तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करून शरई जीवन जगण्याची समज दे. (आमीन.)

- एम. आय.शेख



पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. गेल्या आठवड्यात जेव्हा श्रीगंगानगर आणि अनूप पुरात 100 रूपये लिटरहून अधिक पेट्रोल आणि डिझेलचे दर गेले तेव्हा मीडियात मोठा गोंगाट सुरू झाला. मात्र काही वेळातच तो सोड्याच्या फेसासारखा लागलीच शांत झाला. सरकार विरोधकांनी भाजपाला त्यांच्या जुन्या घोषणेची ’’बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’’ आठवण करून देत टिकास्त्र सोडले. काही लोकांनी तर मोदींच्या जुन्या व्हिडीओज शेअर केले ज्यात त्यांनी मनमोहन सिंग यांच्या सरकारवर पेट्रोल दरवाढीवर धारेवर धरत दरवाढ मागे घेण्याचे निवेदन केले होते. तसेच काहींनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे जुने ट्विट हुडकून काढले ज्यामध्ये मागील सरकारने केलेल्या दरवाढीवर फेरविचार करून मागे घेण्याचे आवाहन केले गेले होते. या सेलेब्रेटिंच्या आताच्या गप्प राहण्याच्या भूमीकेवर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवित रोष व्यक्त केला. तसेच त्या काळात सरकारवर टिका करण्यास स्वातंत्र्य होते. त्यामुळे त्यांनी सरकारला आरसा दाखविला होता. मात्र आता ते स्वातंत्र्य नसल्यासारखे घाबरून गप्प असल्याचे बोलले जात आहे. 

सद्याची परिस्थिती अशी आहे की, जर कोणी प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या सरकावर टिका करतो त्यास देशद्रोही समजून तुरूंगात डांबले (उर्वरित पान 7 वर)

जाते किंवा त्याला परेशान करून टाकले जाते. तसेच पेट्रोल आणि डीझेलच्या सततचे वाढते दर सहन करणारे देशप्रेमी म्हणून संबोधले जातात. महागाईच्या विरूद्ध बोलणाऱ्यांना हरामखोर किंवा देशद्रोही अशा शब्दांनी नावाजले जाते. त्यासाठीच सामान्य माणसं गप्प राहण्यात धन्यता मानत आहेत. यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी त्या अभिनेत्यांना शुटिंगस्थळी जावून काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेतला जो स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेण्यासारखा आहे. नाना पटोले यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, ज्या पद्धतीने भाजपा काहीही करून काँग्रेस बनू शकत नाही त्यापद्धतीने काँग्रेसलाही भाजपासारखे बनने अशक्य आहे. एक प्रसिद्ध वाक्य आहे की, ’’कव्वा चला हंस की चाल, अपनी चाल भी भूल गया’’ त्यामुळे आम्ही कोणापेक्षा कमी नाही, हे दर्शविण्याच्या फंद्यात न पडलेलेच बरे आणि अश्या बोलण्यापासून थांबले पाहिजे. सत्ताधाऱ्यांचा द्वेष आणि विरोधकांचा द्वेष यामधील फर्क मिटला तर यात भाजपाचाच फायदा आहे. जनता ज्यावेळी सरकारपासून बेजार होते तेव्हा वेगवेगळ्या नव्हे तर एक मजबूत विरोधी पक्षाची गरज वाटते. दोन्ही पक्ष जर एकसारखे दिसू लागले तर परिवर्तनाला काहीएक अर्थ उरत नाही. 

इंधनाची दरात वाढ होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र सद्याची दरवाढ ही चिंताजनक आहे. या वर्षीच्या पहिल्या 48 दिवसात 22 वेळा दरवाढ झाली. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या दिवशी दरवाढ होत राहिली. यामुळे पेट्रोलच्या दरात यंदा 5.83 आणि डीझेलमध्ये यापेक्षा अधिक म्हणजे 6.18 रूपयांनी वाढ पहायला मिळाली. याची तुलना गेल्या महिन्याशी केली तर ती 14 दिवसात 12 वेळा म्हणजे प्रत्येक दुसऱ्या दिवशी पेट्रोल दरवाढ झाली. जानेवारीच्या महिन्यात 10 वेळा दरात वाढ झाली होती. पेट्रोल 2.59 रूपयांनी तर डिझेलची किंमत 6.5 रूपयांनी वाढली होती. वर्षभरापूर्वी म्हणजेच 18 फेब्रुवारी 2020 ला पेट्रोलचा दर 71.89 रूपये होता. म्हणजे एका वर्षात 17.99 रूपये लिटरमागे यंदा वाढ झाली आहे. या काळात डिझेलचा दर 16.62 रूपये लिटरने वधारला आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या किमतीत आश्चर्यकारक वाढ झालेली आहे. असे फार कमी वेळेस होते. डिझेलचा दरवाढ महागाई वाढविण्याला अधिक हातभार लावतो. कारण अवजड टक्र, टॅम्पो या वाहनातून गरजेच्या वस्तूंची अधिक वाहतूक होते जी की डिझेलवर चालत असतात. यामुळे असा संदेश जातो की, शासनाला कार आणि दुचाकी चालविणाऱ्यांची अधिक काळजी आहे मात्र सरकारचा गरीबांच्या समस्यांकडे कानडोळा आहे. 

पेट्रोलच्या किमतीत वाढ होण्याचे मुलभूत कारण आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या कच्चा तेलाच्या किमती प्रतीडॉलर 64 रूपये झाले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र काँग्रेसच्या काळाता 148 डॉलर प्रती बैरल किमतीपेक्षा आता कमी किंमत आहे.  दूसरा प्रश्न असा आहे की, जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट होवून 42 डॉलर प्रती बैरलवर आली होती तेव्हा आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर त्या मानाने कमी का झाले नाहीत. 2013-2014 मध्ये कच्चा तेलाच्या किमती 52-105 डॉलर प्रती बैरल होती. तेव्हा पेट्रोल 68-73 रूपये आणि डिझेल 48-55 रूपये प्रती लिटर विक्री होत होते. मात्र जेव्हा 2016-2017 मध्ये कच्चे तेल 50-51 वर आले तेव्हा पेट्रोल 73-80 रूपये आणि डिझेल 59-63 रूपयांपर्यत प्रती लिटर विक्री होत होते. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या किंमतीवरून रडणाऱ्यांना असे विचारावे लागेल की असे का झाले? त्यावेळेस प्रधानमंत्री म्हणत होते की, मी भाग्यवंत आहे म्हणून मला मतदान करा. मात्र आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, आता मी अभाग्यवंत प्रधानमंत्री आहे म्हणून मला मतदान करा? जणू की देशाच्या जनतेचे नशीबच फुटलेले आहे.

महागाईचे जाळे असे विस्तारले जात आहे कारण की केंद्र सरकार याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. लोकसभेच्या अधिवेशनात खासदारांनी हा मुद्दा ऐरणीवर घेतला तेव्हा लोकसभाध्यक्ष रमेश भदौरी यांनी राज्य सरकारांवर याचे खापर फोडले. मात्र देशाच्या अर्ध्यापेक्षा अधिक राज्यात भाजपाची सरकारे आहेत. यात ते सहभागी नाहीत का? भदौरी यांनी ज्याप्रमाणे वर्तन केले त्यांनी ते का करू नये जेव्हा प्रधानमंत्रीच असे म्हणत आहेत. त्यांनी एका बेजबाबदार वक्तव्यात म्हटले की, आमच्या पहिल्यांच्या सरकारांनी देशात तेल आयातीवर नियंत्रण ठेवले असते तर  आज नागरिकांना दरवाढीचा सामना करावा लागला नसता. 

प्रधानमंत्र्याच्या या बेजबाबदार बोलण्यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनाने म्हटले की प्रधानमंत्र्यांनी आपली मान शरमेने झुकवावी. याच्या आधीच्या सरकारांनी इंडियन ऑईल, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, हिन्दुस्तान पेट्रोलियम आणि मुंबई हाई जेसीपी, एसयूएस ची सुरूवात केली होती. समुद्रातील तेलाच्या विहिरी शोधल्या होत्या. मात्र मोदी सरकारने या सर्व पीएसयुएसची विक्री करण्याची योजना बनविली आहे. मोदी आता इथेनॉलला पेट्रोलचा पर्याय म्हणून सादर करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. परंतु त्यांना माहित असायला हवे की, आपल्या देश इथेनॉलच्या विहिरींनी समृद्ध नाही. इथेनॉल बनविण्यामध्येही मोठा खर्च होतो. तो फुकटात बनत नाही. आणि त्याच्यावरही अवाजवी कर लावून टाकला तर तोही महाग होवून जाईल. मागच्या काळात सत्तेत असलेल्या पंतप्रधानांना प्रश्न विचारणाऱ्या मोदींना हा प्रश्न विचारला जावू शकतो की, गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी जामनगरमध्ये रिलायन्स रीफाइनरीला का मंजूरी दिली. आपले मित्र धीरूभाई अंबानी यांना इथेनॉलचा कारखाना काढण्याचा सल्ला का दिला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचे पहिले कारण एक्साईज ड्युटीमध्ये अवाजवी वाढ आहे. मागील 1 वर्षापासून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या नागरिकांवर केंद्र सरकारने पेट्रोलवरील करामध्ये 19.98 वरून 32.90 रूपये एवढी वाढ केली. त्याचप्रमाणे डिझेलवर 15.83 रूपयांहून 31.80 रूपये कर वाढविला आणि हा कर मागच्या सरकारांनी नव्हे तर वर्तमान सरकारने वाढविला. येणेप्रमाणे 2019 ते 2020 या एका वर्षात केंद्र सरकारने जनतेच्या खिशातून 3.34 लाख कोटी रूपये काढून घेतले. मे 2014 मध्ये जेव्हा हे सरकार अस्तित्वात आले होते तेव्हा 2014 ते 2015 दरम्यान, यातून मिळणारे उत्पन्न फक्त 1.72 लाख कोटी एवढे होते. जे पाच वर्षात दुप्पट झाले. राज्य सरकारेसुद्धा याबाबतीत मागे नाहीत. मागील पाच वर्षात यातून त्यांची होणारी कमाई 43 टक्क्यांनी वाढलेली आहे. 

कराच्या या दुहेरी ओझ्याने 31.82 रूपये लिटरमध्ये बनणारे पेट्रोल 33.46 रूपयाला तयार होत आहे. पेट्रोलपंप वाल्यांना लिटरमागे 3 रूपये कमिशन मिळते. अशावेळेस राहुल गांधीचे म्हणणे योग्य वाटते की, मोदी हे जनतेचे खिसे रिकामे करून मित्रांचे खिसे भरत आहेत. त्यांनी ट्विट करतांना म्हटलेले आहे की, तुम्ही जेव्हा गाडीमध्ये इंधन टाकता तेव्हा वाढत्या मिटरकडे पाहतांना एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की, बाजारामध्ये कच्चा तेलाच्या किमतीमध्ये फारशी वाढ झालेली नाही. उलट किमती कमी झालेल्या आहेत. सध्या पेट्रोल 100 रूपये लिटर आहे. 

डोळेझाकून पंतप्रधानांच्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आपले शेजारी देशसुद्धा तेल उत्पादक देश नाहीत. तरीसुद्धा भुटानमध्ये पेट्रोल 49.56 रूपये, पाकिस्तानमध्ये 51.44, श्रीलंकेमध्ये 60.26, नेपाळमध्ये 68.98 आणि बांग्लादेशमध्ये 76.41 रूपये लिटर आहे. पाच मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांची तुलना केली असता फक्त जर्मनीमध्ये पेट्रोल 119 रूपये म्हणजे आपल्यापेक्षा 22 रूपये जास्त आहे. याशिवाय, जापान 94.76, चीन 74.74, अमरिका 54.65, रशिया 47.40 लिटरवर आहेत. अमेरिका आणि रशियामध्ये तेल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही तेथील सरकारे जनतेची लूट करत आहेत. याउलट वैनेन्जुलामध्ये 1.45 रूपये तर इरानमध्ये 4.56 रूपये लिटर पेट्रोल तेथील सरकारे जनतेला देत आहेत. 

म्हणजे हे दोन्ही तुलनेले गरीब देश महासत्तेपेक्षा कमी किमतीत आपल्या जनतेला इंधन पुरवित आहेत. इंधनाच्या किमतीच्या बाबतीत शिवसेनेने केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे की, राम मंदिरच्या बांधकामासाठी फंड गोळा करण्यापेक्षा आभाळाला टेकणाऱ्या इंधनाच्या किमती सरकारने कमी कराव्यात. ज्यामुळे कमीत कमी भक्तांच्या घराच्या चुलीतरी पेटतील आणि श्रीरामही खुश होतील. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे एक दिवस त्यांना गाड्या रस्त्यावर सोडून घरी जावे लागेल. एक राम भक्ताचा दुसऱ्या राम भक्ताला दिलेला हा सल्ला यापेक्षा चांगला असू शकणार नाही. 

- डॉ. सलीम खान


ayesha

‘‘माझी आयेशा तर गेली. तिच्या नवऱ्याला फाशी झाली तरी ती परत येणार नाही. माझी देशाला विनंती आहे, हिंदू-मुस्लिम सोडा, अशाच अनेक मनिषा आणि आएशांना वाचवून घ्या.’’ 

- लियाकत मकरानी. (आयेशाचे वडील)

फेब्रुवारी रोजी आयेशा नावाच्या तरूणीने साबरमती रिव्हर फ्रंटवरून बसून जो व्हीडीओ तयार केला तो सुरूवातीला माझ्या लक्षातच आला नाही. पण जेव्हा लक्षात आला तेव्हा मी स्तब्ध झाले. त्या तरूणीने मृत्यूपूर्वी ज्या पद्धतीने तो व्हिडीओ तयार केला तो आश्चर्य चकीत करणारा होता. तिच्याकडे पाहून ती काही सेकंदात आत्महत्या करेल असे चुकूनसुद्धा वाटत नव्हते. ती म्हणाली, ’’ हॅलो! अस्सलामुअलैकुम! माझे नाव आयेशा आरीफ खान. मी तेच करणार आहे जे मला करावयाचे आहे. माझ्यावर कोणाचा दबाव नाही. जर त्याला माझ्यापासून स्वातंत्र्य हवे असेल तर ते त्याला मिळाले पाहिजे. माझे जीवन येथपर्यंतच आहे. मी आनंदी आहे की मी माझ्या अल्लाहला भेटणार आहे. मी अल्लाहला विचारणार आहे की मी कुठे चुकले? मला चांगले आई-वडिल मिळाले,  चांगल्या मैत्रीणी मिळाल्या. असेही असू शकेल की कदाचित माझे नशीबच वेगळे असेल. असो ! मी आनंदी आहे. मी अतिशय संतुष्ट मनाने सगळ्यांना गुडबाय म्हणत आहे. मी प्रार्थना करते की ही प्रेमळ नदी मला आपल्या प्रवाहासोबत गळाभेट घेईल. मी अल्लाहकडे प्रार्थना करेन की पुन्हा मला कधीही मानवाचा चेहरासुद्धा दाखवू नको.’’ 

वरील शब्द हे कुठल्याही संवेदनशील माणसाचे काळीज कापण्यासाठी पुरेसे आहेत. मी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कित्येक तास अस्वस्थ होते. ज्या पद्धतीने आणि ज्या कारणाने तीने आत्महत्या केली ती पद्धत आणि ते कारण मला सारखे बेचैन करत आहे. साबरमती रिव्हर फ्रंट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व्ही.एम. देसाई यांनी या संदर्भात म्हटले आहे की, ’’आम्हाला आएशाचा फोन मिळाला आहे. ती 25 फेब्रुवारी रोजी 70 मिनिटे आपल्या पतीशी बोलत होती. तिचे बोलणे तिने रेकॉर्ड करून ठेवले आहे. बोलताना तिच्या पतीने तिला सांगितले आहे की, मी तुला घेवून जाणार नाही. तुला नक्कीच मरायला पाहिजे. आणि मरतानाचा व्हिडीओ तयार करून मला पाठव. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मला तुझ्या मृत्यूचा विश्वास होईल. आयेशाने सासरवाडीच्या लोकांकडून झालेल्या असह्य त्रासामुळे आत्महत्या केलेली आहे.’’ 

मी कितीही भावनिक झाली असली तरी ही गोष्ट विसरू शकत नाही की आयेशाने चूक केली. आत्महत्या ही कुठल्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. इस्लामने तर आत्महत्येला हराम केलेले आहे. तिचे निकाह आणि तलाक संबंधीचे ज्ञान शुन्य होते. असाच माझा अंदाज आहे. कारण सासुरवाडीकडून असहनीय छळ होत असेल तर ती सरळ खुला घेऊन मोकळी होवू शकली असती. ती उच्चशिक्षित होती. नोकरीही करत होती. तरूण होती. मूलबाळ नव्हते म्हणून तिला दुसरे लग्न करण्यामध्ये फारशी अडचण आली नसती. आत्महत्या करून तिने चुकीचे उदाहरण समाजासमोर ठेवले आहे आणि ज्या पद्धतीने तिला मृत्यूनंतर सहानुभूती मिळत आहे त्यामुळे मला भीती आहे की, याच अवस्थेत असलेल्या इतर मुलीसुद्धा असेच टोकाचे पाऊल उचलण्याचे धाडस करतील. ईश्वर करो माझी ही भीती खोटी ठरो.

जीवन हे अनंत शक्यतांनी ओतप्रोत भरलेले आहे. कुठलेही एक नाते अयशस्वी झाले तर सर्वकाही संपलं असं होत नाही. मुस्लिम समाजामध्ये तलाक झालेल्या महिलांचे पुनर्विवाह होणे कठीण झालेले आहे हे मान्य करावे लागेल. कदाचित आपलाही पुनर्विवाह होणार नाही. झाला तरी असाच पती पुन्हा मिळाला तर काय होईल? कदाचित अशा प्रश्नांनी तिच्या मनामध्ये काहूर माजवले असेल. म्हणून तीने हे टोकाचे पाऊल उचललेले असावे. आयेशाचे पती आरीफ खान यांना अटक करण्यात आलेली आहे. लवकरच त्याच्या आई-वडिलांनाही अटक होईल. म्हणजे आयेशा जीवानीशी गेली आणि आरीफचे कुटुंब आपल्या उद्धट आणि अज्ञानी स्वभावामुळे देशोधडीला लागणार, ही फार मोठी सामाजिक हानी आहे.  

आरीफ एक उच्चशिक्षित तरूण असून, राजस्थानच्या जालोरमध्ये एका ग्रेनाईट मॅन्युफॅ्नचरिंग कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. शिवाय तो स्वतःही ग्रेनाईट विकत होता. महिना 60 हजारांपेक्षा जास्त त्याची कमाई होती. एवढे असूनही त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना समाधान नव्हते. या उलट आयेशाचे वडील राजस्थानमधून रोजगारासाठी म्हणून गुजरातमध्ये आले. ते टेलरिंगचा व्यवसाय करायचे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोन्ही मुलं शिकू शकली नाहीत. परंतु आपल्या अंगभूत गुणांमुळे आयेशाने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते व पीएचडीची तयारी करत होती. ती अतिशय समजदार होती, सुंदर होती, सुशील होती म्हणूनच आरीफ खानच्या कुटुंबांनी सून म्हणून तिला निवडले होते. आयेशाच्या आईने प्रेसला सांगितले की, आरीफने लग्नाच्या वेळेस बोलणी सुरू असताना सांगितले होते की, ते आयेशाचे शिक्षण पुढे चालू ठेवतील. तिला नोकरी करायची इच्छा झाल्यास तीही करू देतील. मुलगा उच्चशिक्षित असल्याने आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. ते लोक आमच्यापेक्षा संपन्न होते. म्हणून कर्ज घेऊन आम्ही आयेशाचे लग्न केले. ते कर्ज फेडण्यासाठी आयेशाच्या छोट्या भावाला शाळा सोडून खाजगी बँकेत लोन एजंट म्हणून काम करावे लागले. 

वास्तविक पाहता आत्महत्येच्या अशा अनेक घटना अलिकडे होत आहेत. अनेकजण फेसबुक लाईव्ह करत जीव देत आहेत. खरे तर अशा घटनांची मुळीच दखल घ्यायला नको, असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु आयेशाची आत्महत्या दोन कारणांमुळे दखलपात्र झाली आहे. एक तर तिने हसत-हसत मृत्युला कवटाळले. दूसरे तिने आत्महत्या करून भारतीय मुस्लिम समाज व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह लावले.

या प्रश्नचिन्हाचा विचार भारतीय समाजाला विशेषतः मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, उलेमा, बुद्धिजीवी आणि इतर सामाजिक संघटनावाल्यांना करावा लागेल. एक सभ्य समाज म्हणून आपल्या तरूण पिढिला इस्लामी संस्कार देण्यामध्ये कमी पडत आहोत, हे या आत्महत्येवरून सिद्ध झालेले आहे. या सत्याचा स्विकार करून आपली चूक दुरूस्त करावी लागेल. एवढे जरी केले तरी आयेशाची आत्महत्या वाया जाणार नाही. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देओ. (आमीन.)

- मिनाज शेख, पुणे

लेखिकेचा संपर्क :  98902 45550


खलीफा हारुन रशीद यांनी फ्रान्सचा राजा शर्लिमन (Charlemage) यांना मेकॅनिकलचा उत्कृष्ठ नमुना असलेले स्वयंचलित घड्याळ पाठविले.

पाण्याच्या दाबाने चालविल्या जाणाऱ्या चार मीटर उंचीचे या शुद्ध पितळेच्या घड्याळातून जेव्हा एक तास होतो तेव्हा १ चेंडू बाहेर येत असे आणि दोन तासांत २ चेंडू बाहेर येत असत. अशा प्रकारे १२ तासांनंतर १२ चेंडू बाहेर येत आणि एका मधुर आवाजाने प्रत्येक चेंडूच्या मागे घोडेस्वार फिरत असे आणि परत घड्याळात जात असे.

घड्याळाची ही कृती पाहून फ्रान्सचा राजा फारच अस्वस्थ झाला आणि त्याने पादरींना, ज्योतिषांना बोलावले. प्रत्येकाने हे पाहिले आणि म्हणाले की घड्याळाच्या आत एक भूत आहे.

जेव्हा रात्री भूत झोपला असेल तेव्हा आपण घड्याळ पाहू, असा सर्वांनी सल्ला दिला.

आणि जेव्हा रात्री घड्याळ उघडून पाहिले तेव्हा त्याच्या भागांशिवाय काहीच दिसले नाही, परंतु घड्याळ बिघडले होते...

त्यावेळी संपूर्ण फ्रान्समधील एकाही व्यक्तीला ते घड्याळ दुरुस्त करता आले नाही.

आणि राजा आपल्या  लाजिरवाण्या कृतीमुळे खलीफा हारून यांनादेखील मुस्लिम कारागीर पाठवण्यास सांगू शकला नाही...

मानवी इतिहासाच्या या युगात मुस्लिम सभ्यता मेकॅनिकल ऑटोमॅटिक मशिनरी युगाची   जनक मानली जाते.

इब्न अल हैथम यांची कादंबरी 'water clock' मधील या उदाहरणाव्यतिरिक्त अल-मुरादी (इस्लामिक स्पेन), अल-जजारी आणि तकी अल दिन (तुर्की), रिजवान अल साती (सीरिया) अशी मोठी सूची आहे.

या कथेवरून असा बोध होतो की आज स्वत:चा द्वेष करणारे मुसलमान जे युरोपियन लोकांच्या देशद्रोही आणि अश्लील परंपरेचे पालन करण्यास उत्क्रांतीवादी प्रवृत्ती समजतात. त्यांना माहीत नाही की जेव्हा आम्हा मुस्लिमांची विज्ञानावर मक्तेदारी होती तेव्हा यूरोपियन लोक विज्ञानाला जादू समजत होते.

तेव्हा मुस्लिमांना ज्ञान आवश्यक वाटत होते. आता फक्त दाढी आणि सजद्यांवर जोर देतात.

-तसनीम नाझीम गा़जी.



पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आघाडी केली आणि त्याचबरोबर इंडियन सेक्युलर फ्रंट नामक एका संघटनेशीही आघाडी केली. पण काँग्रेस नेत्यांना म्हणजे आनंद शर्मा यांनी एका मुस्लिम संघटनेशी काँग्रेसने युती केली ती आवडली नाही. आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असून तो महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या धर्मनिरपेक्षतेचे पालन करणारा आहे. असे असताना प. बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन इंडियन सेक्युलर फ्रंटचे अध्यक्ष अब्बास सिद्दीकी यांच्याबरोबर कसे बसले होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आंनद शर्मा म्हणतात, म. गांधी आणि नेहरूंचे विचार काँग्रेस पक्षाचा आत्मा आहे. इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवालांशी हातमिळवणी केली होती. त्या वेळेस हा आत्मा कुठे लोप पावला होता. याचे उत्तर आनंद शर्मा यांना द्यावे लागेल. त्याच मैत्रीतून शेवटी इंदिरा गांधी यांची हत्या झाली हा इतिहास काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांना माहीत आहे की नाही? बरे! अब्बास सिद्दीकी यांनी आपल्या संघटनेचे नाव इंडियन सेक्युर फ्रंट असे ठेवलेले असताना त्याची धर्मनिरपेक्षता काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळी कशी? त्यांच्या संघटनेचे नाव जर इंडियन इस्लामिक संघटना असते तर मग आनंद शर्मा यांचे काय झाले असते? कदाचित हार्ट अटॅक आला असता! या काँग्रेस पक्षाची केरळ राज्यात मुस्लिम लीगशी युती असतानादेखील तिथे त्यांनी कधी धर्मनिरपेक्षतेचा प्रश्न का उपस्थित केला नाही? प. बंगालच्या राजकारणात आणि निवडणुकीतच आनंद शर्मा यांना एक धर्मनिरपेक्ष संघटनेचा संस्थापक मुस्लिम असल्यामुङे इतका त्रास का होतो, ही कळण्यासारखी गोष्ट नाही. इंडियन सेक्युलर फ्रंटने प. बंगालच्या निवडणुकीत येऊच नये, कारण त्याचे अफाट कार्यकर्ते असून माणसांची गर्दी खेचणारा नेता आहे. म्हणून वरून म्हणजे शहांकडून तर आनंद शर्मांवर दबाव वगैरे आला नसावा का, असा प्रश्न उपस्थित होतो. शर्मा यांच्या आक्षेप घेण्यामागे कोणती वस्तुस्थिती असावी, ते इतके चलविचल का झाले, असे कितीतरी प्रश्न त्यांना जनतेकडून विचारले जाऊ शकतात. खरी गोष्ट दुसरीच आहे. काँग्रेस पक्षाला आता मुस्लिमांची गरज नाही. त्याला हिंदुत्वाशी लढा द्यायचा आहे म्हणून भाजपपेक्षाही आपण कसे जास्त हिंदुत्ववादी आहोत हे त्यांना सिद्ध करायचे आहे. तसे नसते तर एका स्थानिक मुस्लिम नेत्याच्या आणि त्याच्या सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष संघटनेचा त्यांनी विरोध केला नसता. या निवडणुका काँग्रेसला भाजपच्या पदरात घालायच्या असतील, असेही कुणी म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्या संघटनेच्या नावाला त्यांचा विरोध नाही. त्याच्या मुस्लिम संस्थापकास त्यांचा विरोध आहे. अहमद पटेल यांचे निधन झाले. गोरगरीब, म्हातारे कसेबसे कोरोनाशी लढा देत बाहेर आले. पण पटेल यांनाच कोरोनामुळे का मृत्यू आला असेल, असा प्रश्न लोकांच्या मनात आहे, कुणी विचारत नसेल. त्यांच्यानंतर अणखीन एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षासाठी आपले सबंध जीवन अर्पण केलेले गुलाम नबी आझाद यांनाही काँग्रेसने मोठमोठे आरोप करत इतका त्यांना मानसिक त्रास दिला, इतकी बदनामी केली की त्यांनी काँग्रेस पक्षाचा आतापर्यंत तरी राजीनामा दिलेला नाही, पण लवकरच तसे करण्यासही त्यांना विवश केले जाईल. गुलाम नबी आझाद यांनी भाजपला छुपी मदत केली आणि करत आहेत, असा त्यांच्यावर आरोप झाला. आता उघडपणे गुलाम नबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करीत आहेत. याचे परिणाम काय होतील, ते आझाद यांना माहीत आहे. एक एक करून ज्येष्ठ मुस्लिम नेत्यांना काग्रेस पक्षातून काढले जात आहे. मुस्लिममुक्त काँग्रेस, मग भाजपला साजेसा विरोधी पक्ष होणार आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी जेव्हा वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवण्याची घोषणा करतात तेव्हा लगेच त्यांना भाजपधार्जिणे म्हटले जाते. वोटकटवा म्हटले जाते. अमीत शहा यांच्या इशाऱ्यावर ते निवडणुका लढवतात असे त्यांच्यावर आरोप केले जातात. त्याच वेळी अरविंद केजरीवाल जेव्हा वेगवेगळ्या राज्यंमध्ये निवडणुका लढवतात तेव्हा त्यांना कुणी काहीच कसे म्हणत नाही? कारण ते हिंदू आहेत आणि ओवैसी मुस्लिम आहेत म्हणून ओवैसींवर विश्वास ठेवू नये. ओवैसी यांच्या पक्षाला भाजपची बी टीम म्हणतात. खरे पाहता गांधी परिवार सोडून उर्वरित काँग्रेस पक्षच भाजपची बी टीम आहे, ही गोष्ट लोकांना नसेल माहीत, पण भाजपवाल्यांना ती माहीत आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकांना डाव्या आणि सेक्युलरवाद्यांची सत्ता नको आहे. त्यांना असे वाटते की आजवरच्या डाव्या पक्षांनी आणि नंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या धार्मिक भावना दाबून ठेवल्या होत्या. भाजपमुळे त्यांना धर्माकडे परतण्याचे आकर्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या दहा वर्षांच्या सत्तेमुळे तिथल्या जनतेमध्ये सत्ताविरोधी भावना आहेत. यामुळे कदाचित ममता बॅनर्जी यांना यंदा निवडणुकीत पराभव पत्करावा लागेल का असे लोकांच्या मनात आहे. काँग्रेसला त्याचे काय सांगावे त्याचे त्यालाच माहीत नाही. ज्या राज्यात ३० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे त्या राज्यात एक मुस्लिम नेता त्यांना नको आहे, हा काँग्रेसचा अस्सल धर्मनिरपेक्षपणा आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक

मो.: ९८२०१२१२०७



नुकतेच धुळे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने वाढदिवसाचे प्रक्षोभक, भीतीदायक, भडक  बॅनर शहरभर लावण्याचा प्रकार डीएसपी चिन्मय पंडित यांनी स्वतः रस्त्यावर उतरून उधळून लावला आणि विविध पोस्टरवरील तथाकथित शुभेच्छूक कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले. सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे १४ फेब्रुवारी रोजी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या व रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यावर पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी आर्म अ‍ॅक्ट ४/२५, महा.पो.का. कलम३७ (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व संबंधितांना अटक करण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्याच्या आतच पुणे पोलिसांनीही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जेलमधून बाहेर पडताच पाचशे गाड्यांची रॅली काढणाऱ्या गजानन मारणे या गुंडाच्या व त्याच्या साथीदारांच्या विरोधात पाऊल टाकत विविध मार्गांनी मुसक्या आवळणे सुरु केले आहे. त्याबाबतच्या वेगवेगळ्या बातम्या राज्यभरातील वृत्तपत्र व समाज माध्यमातून दररोज समोर येत आहेत.

धुळ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध शहरांत वाढदिवसाचे भयावह पोस्टर बॅनर लावणारे, चौकात डिजे लावून, धिंगाणा करीत तलवारीने केक कापणारे गुंड मोठ्या संख्येने निर्माण झाले आहेत. अशा वाढदिवसाच्या प्रकाराने मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करून राजकारणात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

धुळ्यानंतर नागपूर व अन्यत्र काही ठिकाणी या प्रकारे दहशतीच्या फुकट्या बॅनरबाजीवर कारवाई झाली. गुंडाच्या श्रद्धांजलीचेही बॅनर एका शहरात पोलिसांनी उतरविले. हा धुळे पॅटर्न आता राज्यातल्या प्रत्येक शहरात राबविला गेला पाहिजे, अशी सामान्य जनतेची मनापासून इच्छा आहे. कारण या सगळ्या भाई, दादा, तात्या, अण्णांचे, चेहरे त्यांच्या स्वतःच्या घरातल्या लोकांनाही पहावेसे वाटत नाहीत, मात्र चौकाचौकात लावलेल्या भल्या मोठ्या डिजिटल फलकावर झळकणारे यांचे चेहरे नाईलाजाने सर्व सामान्यांना पहावे लागत आहेत. यासारख्या डिजिटल फलकावर बंदी आणली पाहिजे आणि 'शेर की झलक सबसे अलग'वाल्यांचे, फायटरांचे, बुलेटवाल्यांचे, चौकात तलवारीने केक कापणाऱ्यांचे दहशतयुक्त वाढदिवस बंद झाले पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची सरकारकडे कळकळीची मागणी आहे.

अक्षरश:या भाई, दादा, तात्या, आण्णांनी समाजकारण आणि राजकारण नासवले आहे. समाजाच्या सर्व थरांतील लोक यांच्या या कारनाम्याने हैराण झालेली आहे, यासाठी केवळ धुळ्यात किंवा पुण्यात कारवाई होवून उपयोग नाही. संपूर्ण राज्यभरासाठी याबाबत गृह खात्याने एक धोरण ठरविणे आवश्यक आहे. संपूर्ण शहर दहशतीखाली ठेवणाऱ्या गुंडांना त्यांच्याच भाषेत ‘पुलिस से बडा कोई गुंडा नही होता है' हे गृहखात्यानेच दाखवून दिले तर खऱ्या अर्थाने ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रिदवाक्यास शोभेलसे होईल. ही वास्तविकता आहे, की पुरेसा पुरावा, साक्षीदारातली दहशत, कायद्यातील पळवाटा याचा लाभ असे गुंड घेतच राहतात. पूण्यात गुंड मारणेचे निर्दोष सुटणे, जामिनवर सुटणे हे प्रकार त्याचाच एक भाग आहेत. म्हणून पोलिस डिपार्टमेंट हातावर हात धरून बसू शकते काय? पुण्यात पोलिस अधिकारी अमिताभ गुप्ता व कृष्ण प्रकाश यांनी यावर जी भूमिका घेतली आहे, ती खरोखर स्वागतार्ह व अभिनंदनीय आहे. प्रत्येक जिल्ह्यात व शहरात याच भूमिकेची अंमलबजावणी पोलिस डिपार्टमेंटने केली पाहिजे. पुण्यात गुंड मारणे कोर्टातून सुटला, जामीनावर सुटला. हरकत नाही. पोलिसांनी विना टोल गाडी प्रकरणी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. मारणे सोबतच्या रॅलीतल्या बड्याबड्या गाड्या जप्त केल्या. उत्तर प्रदेशात गुंडगिरी निपटून काढण्यासाठी याच प्रकारे चौफेर कारवाईची छडी लावली जाते. सुदैवाने पुण्यात आता तेच सुरु आहे. गुंडांना मोकळे रान सोडले तर वैतागलेली जनताच त्यांचा भर चौकात खात्मा करते, याची लागोपाठची उदाहरणे राज्याची क्राईम सिटी नागपूरमध्ये मौजुद आहेत. जनतेने ही कारवाई करण्याआधी पोलिसांनीच या गुंडगिरीचा व दहशतीचा बंदोबस्त केला पाहिजे. पुण्यात पोलिसांनी गुंडाच्या मालमत्तेवर कारवाई केली. तलवारीने चौकात केक कापणाऱ्या त्याच्या माणसावर गुन्हा दाखल केला. अशी मोहीम राज्यभर झाली पाहिजे. एखादा गुंड, डॉन कारागृहातून बाहेर आला, की याच प्रकारे त्याचे शेकडो समर्थक कारागृहाबाहेर गर्दी करीत असतात. त्यानंतर एखाद्या विजयी वीराच्या आविर्भावात डिजेवर दहशतयुक्त गाण्यांच्या तालावर नाचत त्या गुंडाची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक  फेसबुक वर लाईव्ह केली जाते. हे सामान्यांना मुकाट्याने सहन करावे लागते. अशा दहशतवादी मिरवणूकांवर बंदी आणली पाहिजे, एकदा दोनदा कारवाई ही होते. पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे कारागृहातून गुंड बाहेर आला, की त्याची दहशतवाढीसाठी मोठी मिरवणूक काढण्याची पध्दतच या सुरू झाल्याचे चित्र दिसते. पुण्यातला गुंड कारागृहातून सुटल्यावर पाचशे गाड्यांची रॅली काढतो, हा प्रकार इथून पुढे सर्वत्र पहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, कारण गुन्हेगार वृत्तीचे लोक त्याचेच अनुकरण करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाहीत. पुणे पोलिसांनी जसे याप्रकरणी गुंडगिरीचे पुरेपूर पोस्टमार्टम सुरू केले आहे. तसे राज्यभरात सर्वत्र असे पोस्टमार्टम सुरू झाले पाहिजे. राज्यभरातील सर्व सामान्य माणसाला दहशतमुक्त वातावरण मिळवून देण्यासाठी राज्याचे गृहखात्याने याबाबत कंबर कसली पाहिजे आणि काही धोरणात्मक निर्णय घेऊन गुंडगिरीला मुळातून उखडून टाकली पाहिजे. 


सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे ग्राहक संरक्षण विषयक राष्ट्रीय पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget