Halloween Costume ideas 2015
Latest Post

Protest

लोकशाही व्यवस्थेत एकदा बहुमत मिळाले की त्या बहुमताच्या जोरावर हवे तसे निर्णय घेता येतात हे मोदी सरकारच्या संपूर्ण कार्यपध्दतीकडे डोळसपणे पाहिल्यानंतर आपसूकच लक्षात येते. बहुमत आणि व्यक्तीपुजा ह्या दोन गोष्टी लोकशाहीसाठी मारक आहेत.आणि या दोन्हीचा संगम नरेंद्र मोदींच्या ठायी ठसठसून भरला आहे. केवळ आपली धोरणे आणि निर्णय वगळता अन्य कोणत्याही गोष्टी अहितकारकच आहेत असे ठामपणे ठसवून त्याद्वारे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा एककलमी कार्यक्रम मोदी आणि भाजपा यांनी चालविला आहे. केवळ एका विशिष्ट विचारधारेच्या समूहाला नजरेसमोर ठेवून त्यांच्या अनुकूल धोरणे आखण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. काँग्रेसच्या गत सहा दशकातील चुकांचे भांडवलीकरण, धार्मिक धुर्वीकरण आणि आक्रमक हिंदूत्वाची फेरमांडणी हे भाजपाच्या प्रचारनितीची प्रमुख सुत्रे राहिलेली आहेत.याउलट काँग्रेस पक्ष घराणेशाहीत अडकून पडल्यामुळे त्या पक्षात आता घराणेशाही विरूध्द इतर असे छूपे शितयुध्द सुरू आहे.प्रादेशिक नेत्यांची पंखे छाटण्याच्या काँग्रेसी कार्यपध्दतीमुळे शरद पवार, ममता बँनर्जी यासारख्या नेत्यांनी प्रादेशिक पक्ष स्थापन करून त्या त्या राज्यातून काँग्रेसचे समूळ उच्चाटन केले.त्यानंतर काहि काळ आघाड्यांच्या जोरावर काँग्रेस सत्तेत राहिली.

शाहबानो प्रकरणात काँग्रेसने खालेली कच आणि त्यापोटी ओढवलेली हिदूंची नाराजी घालवण्यासाठी अयोध्येतील वादग्रस्त मशीदीचे दरवाजे उघडण्याचा घेतलेला निर्णय त्यातून उभे राहिलेले राम मंदीर आंदोलन यामुळे भाजपाला मोठी राजकीय स्पेस मिळाली.राम मंदीर आंदोलनाआधी ठाण्यात शिवसेनेने केलेली हिंंदुत्ववादी राजकारणाची मांडणी आणि त्याला मिळालेले यश प्रमोद महाजनांच्या नजरेत भरले आणि त्यांंनी ते प्रयोग उत्तरभारतात राम मंदीर आंदोलनाद्वारे करून भाजपाच्या यशाची पायाभरणी केली.त्यानंतर अडवाणींची रथयात्रा, गोध्रा हत्याकांड, गुजरातमधील हिंदुत्वाचा प्रयोग ते २०१४ मधील अभूतपूर्व यश याकडे डोळसपणे पाहिल्यास कशा रितीने भाजपाने आपले पाय हळूहळू का होईना पसरले हे आपल्या लक्षात येते.याचदरम्यान मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे तयार झालेला इतर मागास प्रवर्ग सोयीसवलतीसाठी मागास होता परंतू त्याची राजकीय मतपेटी मात्र भाजपाच्या पारड्यात जमा होत होती.

याच प्रवर्गाने भाजपाचे राजकारण यशस्वी केले.आजही इतर मागास प्रवर्ग ही भाजपाची व्होटबँक आहे जशी एकेकाळी मुस्लीम, दलीत, धार्मिक अल्पसंख्य ही काँग्रेसची व्होटबँक होती.धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेसने ते प्रत्यक्षात न राबवता केवळ त्याचे ढोंग केले त्यामुळे दलीत आणि मुस्लीमांची मोठी शिरकाण झाली.आणि कालौघात हे गट ओवेसी , मायावती,प्रकाश आंबेडकर यासारख्या नेत्यांकडे वळाले आणि त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला. तशीच गत समाजवादाच्या नावाखाली निर्माण झालेल्या ढोंगी नेत्यांची. या नेत्यांनी ना समाजवाद रुजवला न वाढवला वेळेप्रमाणे आपापल्या राजकीय हितासाठी वेगवेगळ्या चुली मांडून  कधी स्वतः ,तर कधी काँग्रसेच्या वलयाने सत्ताधारी झाले.यामुळे गैरभाजपा मताचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले याचा फायदा भाजपाला मिळाला.  भाजपाला आपली मतपेढी एकसंध राखण्यात यश आले आणि तो पक्ष बहुमताने २०१९ साली पुन्हा सलग दुसऱ्यांंदा सत्तेत आला. सत्तेत येताना भाजपानेही पुरेपूर काँग्रेसी हातखंडे राबवीले.आजही सरकार भाजपाचे असले तरी संपूर्ण कार्यपध्दती काँग्रेसचीच आहे. यादरम्यान पक्षात आणि पक्षाबाहेर आपल्याला कुणी स्पर्धक तयार होऊ नये याची पूरेपूर काळजी मोदी- शहा या जोडीनी घेतली आहे. भाजपातही मोदींना विरोध करणारा मोठा वर्ग आहे परंतू तो सध्याला सुप्तावस्थेत आहे.अडवाणी, सुषमा स्वराज,गडकरी ही त्याच पक्तिंतली मंडळी आहेत.याउलट पक्षाबाहेरही आता हळूहळू का होईना भाजपाला आव्हान निर्माण होत आहे.

अगदी महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे झाल्यास शिवसेनेला संपवण्याचे पुरेपूर प्रयत्न भाजपाकडून झाले आणि शिवसेना राष्ट्रीय लोकशाही दलातून बाहेर पडत अनपेक्षितपणे काँग्रेसच्या गोटात सहभागी झाली. पंजाबमध्येही अकाली दल शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बाहेर पडले. काश्मिरात पीडीपी एनडीएतून बाहेर पडली.बिहारमध्ये भाजपाला मिळालेले यश आणि नितिशकुमारांचा झालेला सपाटून पराभव पहाता आगामी काळात नितीशकुमार भाजपाला सोडचिठ्ठी देऊ शकतात.तसे संकेत जरी नसले तरी नितीशकुमार बिनभरवश्याचे आहेत.त्यामुळे एकूणच देशभरातील चित्र पहाता काँग्रेस जरी पराभवाच्या छायेतून बाहेर पडली नसली तरी हळूहळू का होईना भाजपाविरूध्द छोट्या प्रादेशीक पक्षांची आघाडी तयार होत आहे ही भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.

भाजपाच्या धोरणनितीने देशातील मोठा वर्ग असंतोषीत आहे.अशा वर्गाला आता मोदीविरोधी सक्षम पर्याय उपलब्ध झाल्यास भाजपाचे पतन होण्यास वेळ लागणार नाही.काश्मीर प्रश्न, नागरिकत्व विधेयक, नोटाबंदी,वस्तु व सेवा कर प्रणाली,देशद्रोहाच्या आरोपाखाली निष्पाप कार्यकर्त्यांवर होत असलेली कार्यवाही आणि त्याचा उगवला जात असलेला सूड, गोहत्याच्या नावाखाली होणारी मुस्लीमांची हत्या, दलीतांवर महिलांवर वाढलेले अत्याचार, लव्ह जिहादच्या नावाखाली होणारी धुळफेक ते ताज्या तीन कुषी कायद्यामुळे निर्माण झालेले आंदोलन ही भाजपाच्या पायउताराची नांदी आहे.शेतकरी असंतोष बळाच्या बळावर निपटण्याचा पुरेपूर प्रयत्न केंन्द्र सरकारने केला. त्यासाठी दिल्ली सिमेची नाकाबंदी, रस्त्यावर खंदक खोदणे, आंदोलकावर पाण्याचा ऐन थंडीत फवारा करणे, त्यांना समाजमाध्यमावर देशद्रोही पाकिस्तानधार्जीणे ठरवणे हे सर्व करून पाहिले मात्र यामुळे शेतकरी तसभरूनही मागे हटले नाहीत.शेतकरी आणि सत्ताधारी संघर्ष नवा नाही.गांधीजींच्या राजकारणाची पायाभरणी आणि भारतीय स्वातंत्र्याचे बीज चंपारण्याच्या सत्याग्रहातून रोवले गेले.

ब्रिटिश सत्तेला नमवण्यात शेतकरी आंदोलनाचा मोठा वाटा होता.स्वातंत्र्यानंतरही अनेक शेतकरी आंदोलनांवर गोळीबार झाला , सरकारे पडली शेतकरी संघर्ष थांबला नाही.मोदी सरकारलाही तो थांबवता येणार नाही.सरकार या तीन कायद्याद्वारे शेतकऱ्यांंना काँर्पारेटच्या हवाली करून जमीनमालकी हिरावून भूमीहिन करण्याचा प्रयत्न करत आहे.किमान हमीभाव , बाजार समीत्या ह्या वरवरच्या सुधारणा आहेत.त्याआडून शेतीक्षेत्र भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा मनसुबा शेतकरी ओळखून आहेत.शेतकऱ्यांना माल कुठेही विकता येईल, भाव जास्त मिळेल यात शेतकरीहित आहे हे कितीही गळा काढून सरकार सांगत असले तरी सरकारवर शेतकऱ्यांचा भरवसा राहिला नाही.याचे कारण नोटाबंदीने काळा पैसा संपुष्ठात येईल ,काळा पैसा बाळगणाऱ्याचे हाल होतील असे म्हटले होते प्रत्यक्षात ना काळा पैसा संपला ना दहशतवाद याउलट त्याचे चटके गरीबांना बँकाच्या रांगेत थांबून, रोजगार गमवण्यात, प्राण गमवण्यात झाले.वस्तू सेवा कराचेही तसेच परताव्याअभावी राज्ये परेशान आणि जाचक अटीमुळे ग्राहक आणि व्यापारी दोघेही संकटात तरीही अपेक्षित करसंकलन नाही म्हणत केन्द्रांचीच उलटी बोंंब हीच गत काश्मीर प्रश्नांची. आजही काश्मिरातील जनजीवन सुरळीत झालेले नाही.इंटरनेट ,संचारबंदी आणि नेत्यांना नजरकैदेत ठेवून सरकार काश्मीर प्रश्न सोडवल्याचा खोटा आव आणत आहे.काहीशी अशीच भूमीका कामगार कायद्याबाबतही सरकारने नवीन कामगार कायद्यात घेतली आहे.मालकांना पोषक होतील अशाच तरतुदी नवीन  कामगार कायद्यात आहेत.त्याला भाजपच्याच मजदूर किसान युनीयनने विरोध केला तरी ते कायदे मागे घेण्यात आले नाहीत.आम्ही म्हणतो तीच पूर्वदिशा अशा अहंमगंडाच्या हुकुमशाही भूमिकेत सरकार वावरत आहे.केवळ भांडवलदारांना पोषक धोरणे राबवली जात आहेत.सरकार नेमके कुणाच्या हितसबंधाचे रक्षण करणार आहे ज्यांनी सरकारला निवडून दिले त्या जनतेचे की पैशाच्या थैल्या पुरवणाऱ्या भांडवलदाराचे हे एकदा सरकारने स्पष्ट करावे.

आजपर्यंतच्या मोदी सरकारच्या एकाही धोरणनिर्मीतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही याउलट पूर्वीपेक्षाही वाईट स्थिती निर्माण होत आहे.शेती क्षेत्राची वाट लावण्याचा जणू चंगच सरकारने बांधला आहे. शेतकरी अक्षरशः इंग्रजकाळात कराच्या जाचामुळे भुमीहीन होऊन देशोधडीला लागला होता नेमकी तीच गत या नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची होणार आहे हे शेतकरी पुरते जाणून आहेत.

शेतकरी हिताची एवढी कणव सरकारला होती तर शेतकऱ्यांशी चर्चा करायला सरकार इतके दिवस का घाबरत होते.हे कायदे लागू करण्याआधी सरकारला शेतकरी संघटनांशी किमान वार्तालाप करावा का वाटला नाही.कोणालाच विश्वासात न घेता कायदेनिर्मितीची संसदीय पध्दत नाकारून अध्यादेशाद्वारे लगीनघाईने कायदे संमत करून असे कोणते हित सरकार साधू पहात होते हे कळायला मार्ग नाही.आधी दडपायचे ते यशस्वी न झाल्यास  विरोधी विचाराला देशद्रोही ठरवायचे तेही जमले नाही तर चर्चा करायची आणि आपली भूमीका पुढे रेटायची हे धोरण देशहितासाठी मारक आहे हे सरकारने लक्षात घ्यावे.

शेतकरी संघर्ष सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यास पुढेमागे पाहणार नाही.त्यामुळे अन्नदात्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या गारठ्यात सकारात्मक चर्चच्या नावाखाली न दडपता त्यांच्या मागण्यांना योग्य तो न्याय द्यावा आणि दोन पावले मागे सरकण्याची भूमीका सरकारने घ्यावी यातच देशहित आहे.याचे कारण शेतकरी कधी नव्हेेइतका संघटीत झालेला आहे. २०१४ साली अण्णा हजारेच्या ऐतिहासिक उपोषणामुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती. त्यातूनच सत्ताधारी झालेल्या भाजपावरही पुन्हा तीच वेळ येऊ नये याची काळजी भाजपा धुरीणांनी घेणे यानिमीत्ताने महत्वाचे ठरेल.

 - हर्षवर्धन घाटे 

नांदेड. मो.: ९८२३१४६६४८

(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)


farmer

न्याय मिळविण्यासाठीसुद्धा शक्तीशाली असणे गरजेचे असते. भारतामध्ये शेतकरी आणि मुसलमान असे दोन समाजघटक आहेत की जे शक्तीशाली नाहीत म्हणून सातत्याने त्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे. 

काँग्रेसच्या काळात केलेल्या फुड सेक्युरिटी अ‍ॅक्ट 2013 अन्वये सरकार अल्प दरात गहू, तांदूळ वगैरे रेशन दुकानाच्या मार्फतीने गरीब जनतेला पुरविते. यात दरवर्षी केंद्र सरकारला एक हजार कोटीची हानी होते. ही हानी सहन करावी लागू नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या जूनमध्ये तीन अध्यादेश आणून गत लोकसभेच्या सत्रामध्ये त्यांचे कायद्यात रूपांतरण केले. 

ज्याअर्थी हे तिन्ही कायदे देशाच्या संसदेने मंजूर केलेले आहेत त्या अर्थी ते शेतकर्‍यांच्या हिताचेच असतील असे गृहित धरायला काहीच हरकत नसावी. शिवाय याच संदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”मेरा इरादा गंगा के पानी की तरह पवित्र है. कृषी संबंधी बनाए गए तीनों कानून किसानों के हित मे हैं. मगर किसानों को कोई वरगला रहा है”.

एकीकडे पंतप्रधान यांचा हा दावा तर दुसरीकडे लाखो शेतकर्‍यांचा कायद्यास विरोध अन् त्यामुळेच दिल्लीची झालेली कोंडी या पार्श्‍वभूमीवर या प्रश्‍नाचा नव्याने मागोवा घेणे अप्रस्तुत होणार नाही. चला तर याचा वेध घेऊया. 

सर्वप्रथम वाचकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, सरकार भलेही उद्योगपतींची लाखो कोटींची तूट भरून काढत असेल, बुडीत बँकांना बेलआऊट पॅकेज देत असेल तरी सरकारला त्याचे फारसे वाईट वाटत नाही. परंतु शेतकर्‍यांना कर्जमाफ करताना व रेशन दुकानावरून स्वस्त दरात दिल्या जाणार्‍या धान्यामुळे जे नुकसान होते त्याचे मात्र सरकारला खूप वाईट वाटते. म्हणून कसेही करून या जबाबदारीतून सरकार बाहेर पडू पाहते. म्हणून सरकारने एक नामी शक्कल काढली की कृषी क्षेत्र खाजगी क्षेत्राच्या हवाली करावे, म्हणजे सरकारवरील बोजा आपोआप कमी होईल. परंतु स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कायम तोट्यात -(उर्वरित पान 2वर)श

असणार्‍या कृषी क्षेत्रात कोणताही समजूतदार भांडवलदार गुंतवणूक करणार नाही, हे माहित असल्यामुळे सरकारने हे तीन कायदे करून खाजगी कंपन्या तोट्यात जाणार नाहीत, याची तरतूद केली. कुठलीही निकड नसताना ऐन कोविडच्या काळात जूनमध्ये हे तिन्ही अध्यादेश लागू करण्यात आले. कारण सरकारला माहित होते की कोरोनामुळे शेतकर्‍यांचा विरोध होणार नाही आणि तसेच झाले. मात्र कोरोना संपल्या-संपल्या शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. पंतप्रधान आणि शेतकरी यांच्या परस्पर विरोधी दाव्याच्या पार्श्‍वभूमीवरून या तिन्ही कायद्यांची चिकित्सा खालीलप्रमाणे - 

भंडारण (साठवणूक)

पहिला कायदा इसेन्शियल कमोडेटिज अ‍ॅक्ट 1955, अमेंडमेंट (स्टोअर). म्हणजे भंडारण संबंधीचा असून, यात पंतप्रधानांचेे म्हणणे आहे की, युद्ध आणि आणिबाणी वगळता एरव्ही कोणीही कितीही अन्नधान्याचे भंडारण करू शकते. सकृत दर्शनी हा कायदा सर्वांसाठी समान असला तरी शेतकरी आणि भांडवलदारांची भंडारन क्षमता यांची तुलनाच होऊ शकत नाही, हे माननीय पंतप्रधान सोयीस्कररित्या विसरतात. शेतकरी आपल्या झोपडीवजा घरामध्ये साठवून-साठवून किती अन्नधान्य साठवू शकेल? या उलट भांडवलदारांची भंडारण क्षमता किती मोठी असू शकते याची चुनूक अडाणी ग्रुपच्या नवीन झालेल्या आणि होऊ घातलेल्या आधुनिक गोदामांच्या आकार आणि साठवणूक क्षमतेवर एक ओझरती नजर टाकली तरी लक्षात येते. अडाणी यांच्या आधुनिक गोदामांची श्रृंखला पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पश्‍चिम बंगालमध्ये मोक्याच्या ठिकाणी तयार असून, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये त्यांचा विस्तार सुरू आहे. हे गोदाम एफसीआय (फुड कार्पोरेशन ऑफ इंडिया) च्या पत्र्याच्या शेडचे गोदाम नाहीत, ज्यात धान्य सडून जाते. अडाणींच्या गोदामामध्ये पोत्यांमध्ये धान्य भरून ठेवण्याची आवश्यकता नाही तर वरच्या बाजूला असलेल्या नोजलमधून धान्य टाकायचे व जेव्हा काढायचे तेव्हा खालच्या बाजूचा स्लॉट ओढायचा म्हणजे धान्य बाहेर पडते. दरम्यानच्या काळात गोदामाची रचना अशा वैज्ञानिक पद्धतीने केलेली आहे की, धान्य सडणे तर दूर त्याच्यातील आर्द्रता सुद्धा कमी होत नाही. 

मध्यप्रदेश सरकार एमएसपी अंतर्गत जे धान्य खरेदी करते ते 100 टक्के धान्य अडाणींच्या गोदामांमध्ये भाडे देऊन साठवते. या एका उदाहरणावरूनच भविष्यात भंडारणाची एकाधिकारशाही निर्माण होईल, हे स्पष्ट होते. आता यात शेतकर्‍यांचे हित ते कोणते? 

रिटेलमध्ये अंबानी, होलसेलमध्ये अडानी व अन्य

30 ऑगस्ट रोजी किशोर बियाणी यांच्या मालकीच्या बिग बाजार नाममुद्रा असलेली रिटेल धान्य विक्रीची श्रृंखला 22 हजार 713 कोटी रूपयांमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने खरेदी केली. रिलायन्स फ्रेश आणि जीओ मार्टच्या माध्यमाने अंबानींनी अगोदरपासूनच या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला होता. त्यात बिग बाझारची श्रृंखला खरेदी केल्याने भारतभर रिटेल अन्नधान्य आणि इतर खाद्य वस्तूमध्ये रिलायन्सची मक्तेदारी अवघ्या काही वर्षातच निर्माण होईल आणि ज्या गतीने अडानी गोडाऊन तयार करीत आहेत त्यावरून भंडारणामध्ये त्यांची मक्तेदारी निर्माण होईल, यात शंका नाही. म्हणजे रिटेलमध्ये अंबानी आणि होलसेलमध्ये अडाणी आणि तत्सम कार्पोरेट देशी, विदेशी कंपन्या अशी एकंदरित स्थिती निर्माण होईल. यामुळे शेतकरीच नव्हे तर 130 कोटी लोकांची अडचण होईल. कारण बोलून चालून हे भांडवलदार. हे शेतकर्‍यांकडून कवडीमोलात धान्य खरेदी करतील, त्याची प्रतवारी करतील आणि आधुनिक गोदामांमध्ये अमर्याद साठवणूक करतील आणि बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करतील. जेव्हा बाजारात अन्नधान्याची मागणी वाढेल त्यावेळेस हेच भांडवलदार आपल्याला हव्या त्या भावात माल बाजारात ओततील. त्यावेळेस नाविलाजाने सर्वांना ते म्हणतील त्या भावात अन्नधान्य घ्यावे लागेल. त्यामुळे हा प्रश्‍न केवळ शेतकर्‍यांचा नाही तर 130 कोटी जनतेचा आहे. हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल. त्यामुळे भंडारणाची अमर्याद सवलत देणारा हा कायदा शेतकर्‍यांच्या हिताचा नसून भांडवलदारांच्या हिताचा आहे, हा शेतकर्‍यांचा युक्तीवाद खरा आहे, असे मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही. 

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग 

दूसरा कायदा म्हणजे फार्मर्स एम्पावरमेंट फार्मिंग अँड प्रोडक्शन अ‍ॅग्रीमेंट ऑन प्राईस इन्शुरन्स अँड फार्म सर्व्हीस अ‍ॅक्ट 2020. अर्थात (मुल्य आश्‍वासन बंदोबस्त सुरक्षा करार).   

या कायद्याअंतर्गत शेतकर्‍यांना आपले कृषीउत्पादन व्यापार्‍यांशी पेरणीपूर्व करार करून विकण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सकृत दर्शनी हा कायदाही शेतकर्‍यांच्या हिताचाच वाटतो. परंतु शेवटी हा कायदाही शेतकर्‍यांच्या नव्हे तर भांडवलदारांचेच हित पाहणारा आहे, असा शेतकर्‍यांचा आरोप आहे. या संबंधी शेतकर्‍यांच्या मनात जी भीती आहे ती खालील उदाहरणावरून वाचकांच्या लक्षात येईल - कल्पना करा गोल्डन नावाची बिस्कीट तयारी करणारी एक कंपनी आहे आणि तिला एक हजार टन गहू हवा आहे. स्पष्ट आहे एवढा गहू एका शेतातून मिळणार नाही. तेव्हा गोल्डन बिस्कीट कंपनीचा मालक गहू उत्पादन करणार्‍या एका गावात जाईल, सर्व शेतकर्‍यांना बोलावून त्यांच्याशी व्यक्तीगत करार करील. दोघांच्या रजामंदीने समजा 25 रूपये प्रती किलो गव्हाचा भाव निश्‍चित केला जाईल. त्याप्रमाणे कागदपत्र तयार होतील. यात दोन्ही पक्ष खुश होतील. गोल्डन कंपनीच्या मालकाची चिंता मिटली की त्याला गव्हासाठी वनवन भटकावे लागणार नाही. शेतकर्‍यांची चिंता मिटली की मागच्या वर्षी 20 रूपये किलोने गहू विकला होता. यावर्षी आपल्याला 25 रूपये घरबसल्या भाव मिळत आहे. 

मात्र यात धोका असा की, शेतकर्‍यांनी शेतात मशागत करावी, बी भरण आणावे, खतं घालावीत, मेहनत करून गहू पिकवावा आणि जेव्हा गहू तयार होईल तेव्हा करार केलेला गोल्डन बिस्कीट कंपनीचा मालक येईल आणि काही हरकती घेईल. उदा. गव्हाचा आकार बारीक आहे किंवा अचानक आलेल्या पावसाने अर्धा गहू खराब झालेला आहे वगैरे वगैर आणि तो 25 रूपये न देता कमी देण्याचा प्रयत्न करील. खरी गोम इथेच आहे. हा वाद शेतकर्‍याला कोर्टात नेता येणार नाही. हा वाद शेतकर्‍याला प्रांतअधिकार्‍याकडे (एसडीएम) कडे घेऊन जावा लागेल. स्पष्ट आहे प्रांत अधिकारी गरीब शेतकर्‍यांपेक्षा गोल्डन बिस्कीट कंपनीच्याच मालकाचे जास्त ऐकेल आणि शेतकर्‍याला या ठिकाणी असहाय्य स्थितीत येवून व्यापारी म्हणेल त्या किमतीत मजबूरीने माल विकावा लागेल. म्हणजे येथेही शेवटी नुकसान शेतकर्‍याचेच. 

एमआरपी आणि एमएसपी

तीसरा कायदा फार्म प्रोड्यूस ट्रेड कॉमर्स प्रमोशन अँड फॅसेलिटीज अ‍ॅक्ट 2020 अर्थात (कृषी उत्पादन वाणिज्य आणि व्यापार अधिनियम). 

या कायद्याअंतर्गत सरकारचा असा दावा आहे की, शेतकर्‍यांना आपला माल भारतात कुठेही नेऊन विकता येईल व नफा कमावता येईल. शिवाय एमएसपीची व्यवस्था चालू राहील आणि कृषी उत्पन्न बाजार समित्याही बरखास्त करणार नाहीत, असा सरकारतर्फे खुलासा करण्यात आलेला आहे. पण यात गोम अशी आहे की, आजही शेतकरी भारतभर कुठेही आपला माल विकू शकतो. उदा. सफरचंद काश्मीर आणि हिमालच प्रदेशमधून भारतभर आणले जातात. शिवाय, सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ हे कुठेही नेल्या जातात. मग या कायद्याने नवीन काय देणार? 

मुळात अडचण अशी आहे की, पंतप्रधान एक बोलतात आणि त्यांच्या हाताखालचे मंत्री दुसरीच भाषा बोलतात. आता हेच पहा पंतप्रधानांनी या कायद्याद्वारे शेतकर्‍यांना कुठेही माल नेवून विकण्याची सवलत दिली, असे म्हटले आहे तर हरियाणा आणि मध्यप्रदेश या दोन भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पररराज्यातून शेतकर्‍यांनी माल त्यांच्या राज्यात विकायला आणला तर त्यांचा माल जप्त करून त्यांना अटक करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे जिच्याबद्दल वाचक जाणून आहेत. म्हणजे - किसपर यकीन किजिए किसपर न किजिए, आए हैं उनकी बज्म से पैगाम अलग-अलग. अशी स्थिती आहे. 

शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये विश्‍वासर्हतेची प्रचंड तूट आहे. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकी 15 लाख मिळणार, नोटबंदीने 50 दिवसात देश भ्रष्टाचार, आतंकवाद मुक्त होणार व अर्थव्यवस्था वेगाने धावणार. एवढेच नव्हे तर जीएसटीमुळे देशातील सर्व आर्थिक समस्या सुटणार, असे दस्तुरखुद्द पंतप्रधानांकडून सांगण्यात आले. पण यातील काहीएक त्यांना साध्य करता आलेले नाही. त्यामुळे ते या कायद्यासंदर्भात देत असलेल्या आश्‍वासनावरही शेतकर्‍यांचा विश्‍वास राहिलेला नाही. 

एकंदरित वरील तिन्ही कायदे रद्द केले तर सरकार समर्थक भांडवलदार नाराज होणार आणि कायदे रद्द नाही केले तर शेतकरी दिल्लीची कोंडी करणार, असा विचित्र गतिरोध केंद्र सरकारने स्वतःच्या अहंकारामुळे निर्माण केलेला आहे. पाहुया यातून ते कसा मार्ग काढतात ते.

- एम.आय. शेख


human rights

दुसर्‍या विश्‍वयुद्धानंतर 60 दशलक्षारपेक्षा जास्त शवांची समस्या जेव्हा पुढे आली तेव्हा मानवाधिकार व त्याच्या व्यवहारावर चर्चा आणि विचार विमर्श प्रकषार्र्ने जोर धरू लागला. यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेनंतर एक समिती स्थापन करण्यात आली यातून मानव अधिकारांचा वैश्‍विक आराखडा तयार केला. मानवाधिकारावर आधारित या ‘वैश्‍विक आराखड्या’पुढे भविष्यासाठी मानवाधिकाराची रुपरेषा तयार व्हावी असा दृष्टिकोनही होता. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्य, त्याचा सन्मान, स्वतंत्रता, न्याय, शांतीच्या स्थापनेसाठी संयुक्त राष्ट्र संघ महासभेने 10 डिसेंबर 1948 रोजी एका समान उद्देशासाठी या वैश्‍विक आराखड्याची घोषणा केली होती. या आराखड्यानुसार कोणीही इतरांवर अत्याचार करू नये, कोणीही गरीब किंवा अत्याचाराने पिडित राहू नये, सर्वांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळावे, लोकांनी दहशतीऐवजी शांततापूर्ण वातावरणात आपले जीवन जगावे असा उद्देश होता.

या विशेषतेमुळे या आराखड्याला वैश्‍विक दर्जा प्राप्त आहे. या आराखड्यानुसार प्रत्येक व्यक्ती त्याच्या मुलभूत अधिकारांसोबत जन्म घेतो व मुलभूत अधिकारासोबत या जगातून जातो. कोणताही देश किंवा राज्य माणसाच्या या मुलभूत अधिकारांवर प्रतिबंध घालू शकत नाही. या अधिकारांचा संबंध समाजातील प्रत्येक व्यक्तीशी असून अधिकाराच्या संदर्भाने प्रत्येक व्यक्ती सन्माननीय आहे. या मानवाधिकारांचे वैशिष्ट्य हे आहे की ते व्यवहारिक दर्जा सांभाळून ठेवतात व समानतेवर विश्‍वास ठेवतात. या अधिकारानुसार सर्व समान असून कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह अनुचित आहे. हा आराखडा संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे. आरखड्यानुसार सर्व नागरिकांना याची माहिती व्हावी म्हणून याला सार्वजनिक करणे व याच्या प्रचारासाठी यात सहभागी होण्याचा आग्रह करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आराखडा सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये वाचून दाखविला जातो व त्याची व्याख्या समजवून सांगण्यात येते. यासोबत कुठल्याही देशात किंवा राजकीय प्रतिष्ठेअंतर्गत कुठलाच भेदभाव करण्यात येऊ नये. समाजातील प्रत्येक नागरिक व संस्थेला याचा सन्मान करायला हवा. मात्र या वैश्‍विक आराखड्याचा आत्मा व अभिलाशा यांची उपेक्षा केली जात असल्याचे दिसते. जणू असे करण्यासाठी एक शक्ती कामाला लागली आहे. हा आराखडा नागरिक व देशांसाठी अर्थहिन बाब होतांना दिसत आहे. शक्तीशाली देश जे स्वत:ला अधिकारांचे संरक्षक व नेते समजतात ते पीडितांच्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचे माध्यम बनले आहेत.

आपण बघतो की 10 डिसेंबरला जगात सर्वत्र ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस’ साजरा केला जातो. या दिवशी मानवाधिकाराच्या बॅनरखाली विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. असे वाटते जणू मानवाधिकाराच्या सुरक्षेसाठी संपूर्ण जग जागृत आणि संवेदनशील आहे. मात्र वास्तविकतेत स्वत:ला मानवाधिकार कार्यकर्ता म्हणवून घेणारेच मानवाधिकाराचे सर्वाधिक उल्लंघन करतांना दिसतात. त्यांच्या अंधकारमय इतिहासातून लक्षात येते की त्यांनी कशाप्रकारे मानवाधिकाराचे उल्लंघन केले आहे. आता जेव्हा या उल्लंघन करणार्‍यांचे चेहरे व पाखंड जगासमोर स्पष्ट झाले आहेत, तेव्हा वर्तमान संदर्भात सर्वात महत्वाचा प्रश्‍न व मागणी ही असायला हवी की, या उप्तिडित मानवतेसाठी न्याय कुठून प्राप्त करावा. मानवाधिकाराच्या सुरक्षेसाठी कोणाला जबाबदारी द्यावी जेणेकरून जगात शांतता प्रस्थापित होईल.

मानव सर्व प्राणिमात्रात सर्वश्रेष्ठ आहे. मानवाला सर्वांमध्ये मिळून मिसळून राहायला आवडते. त्याची नश्‍वर प्रवृृत्ती त्यास आपल्या सहकार्‍यांसोबत राहण्यास विवश करते. त्याला जन्मापासूनच अनेकांची सेवा, सहकार्य आणि समर्थनाची गरज असते. त्याला आपले पालन पोषण, आवास, शिक्षण, प्रशिक्षणाची आवश्यकता भासते. आपली नैसर्गिक क्षमता आणि त्यांना व्यक्त करण्यासाठी मानवाचे जीवन सामाजिक व सामुहिक रुपाने बांधिल असते. परिवार, समाज, शहर, देश आणि संपूर्ण जगात मानव जातीपर्यंत पसरलेल्या सर्व लहान मोठ्या क्षेत्रात मानवाच्या अधिकार आणि कर्तव्याचे निर्धारण केले जाते. सर्व काही मानवाधिकाराच्या अंतर्गत येते. यावर आपल्या देशातील संविधानाने विस्तृत प्रकाश टाकला आहे. ‘युनिव्हर्सल चार्टर’सोबत आपण आपल्या देशाच्या संविधानावर बोललो नाही तर ते योग्य ठरणार नाही.

आपण जेव्हा भारताच्या संविधानाविषयी बोलतो तेव्हा संविधान हे देशातील सर्वोच्च विधान आहे. याला संविधान सभेद्वारा 26 नोव्हेंबर 1949 ला पारित करण्यात आले व संविधान 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आले. 26  नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून घोषीत करण्यात आला. तर 26 जानेवारी हा दिवस देशात ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताच्या संविधानाची ही विशेषता आहे की ते संघात्मक आहे आणि एकात्मकही आहे. संविधानात संघात्मक संविधानाच्या सर्व बाबींचा समावेश आहे. तसेच संविधानाची ही विशेषता सुद्धा आहे की यात आपातकालीन स्थितीत एकात्मक संविधानानुसार केंद्राला शक्तीशाली बनविण्याचे अधिकार सुद्धा आहेत. तिसरी विशेषता ही आहे की, केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार करिता एकाच संविधानाने (आतील पान 2 वर)

व्यवस्था प्रदान केली आहे. संविधानात काही बाबी इतर देशातील संविधानातून सुद्धा संकलित करण्यात आल्या आहेत. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द संविधानात 1976 मध्ये करण्यात आलेल्या 42 व्या संशोधनातून प्रास्ताविकेत जोडण्यात आले. याआधी ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दाऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ हा शब्द होता. हा अधिकार आपल्या सर्व नागरिकांना जात, धर्म, रंग, रूप, लिंग व भाषा या आधारावर कसलाही भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार व दर्जा प्राप्त करून देतो. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 अनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अनुच्छेद 20 मध्ये गुन्ह्यासंबंधात दोषसिद्ध संदर्भात संरक्षण, 21 मध्ये जीव आणि शारीरिक स्वतंत्रतेचे संरक्षण, 22 मध्ये काही स्थितीत अटक व शोषणाविरोधात संरक्षण, अनुच्छेद 25 मध्ये धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार आहे. यात धर्माचे आचरण, पालन व प्रचार करण्याचे स्वातंत्र प्रदान करण्यात आले आहेत. अनुच्छेद 26 मध्ये धार्मिक कार्याच्या व्यवस्थापणाचे अधिकार, 27 मध्ये विशिष्ट धर्माच्या अभिवृद्धीसाठी करासंदर्भात स्वातंत्र्यता, 28 मध्ये सर्व शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण व धार्मिक उपासनेत सहभागी होण्यासंदर्भात स्वतंत्रता, संस्कृती व शिक्षणासंदर्भात अधिकार देण्यात आले आहेत. अनुच्छेद 29 मध्ये अल्पसंख्यांक वर्गाचे हितसंरक्षण, 30 मध्ये शिक्षण संस्थांची स्थापना करणे, व्यवस्थापन करण्याचा अल्पसंख्यांक वर्गांना अधिकार देण्यात आला आहे. 

अशी आशा आहे की, जगात ज्या देशात लोकांचे नरसंहार व उत्पीडन होत आहे, संयुक्त राष्ट्र संघाने ‘युनिव्हर्सल चार्टर’नुसार आपल्या कर्तव्याचे पालन करीत अत्याचार व नरसंहारावर प्रतिबंध लावण्यासाठी कठोर पावले उचलावेत.


- डॉ. एम.ए. रशीद 

नागपूर


social media

गेल्या आठवड्यात आपण खाण्याच्या सवयी आणि आरोग्याबद्दल बोललो. आपण सर्वानी आपल्यासाठी एक आदर्श जेवणाची योजना केली असेल. (नसल्यास आज ते तयार करा). आज आपण जरा वेगळ्या विषयाबद्दल बोलू. आधुनिक व्यसनाबद्दल- सोशल मीडिया.

सोशल मीडिया व्यसन एक वर्तनात्मक व्यसन आहे ज्यात सोशल मीडियाबद्दल जास्त चिंता असते. सोशल मीडियावर लॉग इन करण्यासाठी किंवा वापरण्याची अनियंत्रित इच्छा असते आणि त्यात आपल्याला सोशल मीडियासाठी इतका वेळ आणि मेहनत खर्च होतेे की यामुळे जीवनाच्या इतर महत्त्वाच्या गोष्टींची हानी होते. मानसशास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की, सुमारे 5 ते 10% अमेरिकन लोक आज सोशल मीडिया व्यसनाचे निकष पूर्ण करतात. बर्‍याच जणांना व्यसन नाही, परंतु सोशल मीडियावर लक्षणीय तास घालवतात. तसेच सोशल मीडियावरील दिग्गज लोक एका खोलीत बसून आपण सोशल मीडियावर घालवलेला वेळ वाढविण्याच्या मार्गांवर विचार करतात. आपण जेवढे  जास्त तास सोशल मीडियावर घालणार तेवढाच अधिक महसूल सोशल मीडियाला जाणार. म्हणून हे जाणून घ्या की ही सोशल मीडिया आपले मनोरंजन करण्यासाठी  त्यांचे खिसे भरण्यासाठी आहे.

सोशल मीडिया व्यसन अमली पदर्थांच्या व्यसनासारखे आहे. ते कसं 

1. मूड बदल ः सोशल मीडिया सर्फिंग करत आहेत तो पर्यंत मूड चांगला राहतो.

2. बाकीच्या महत्वाच्या कामांपेक्षा, आपला वेळ सोशल मीडिआवर खर्च करणे.

3. सोशल मीडियावर घालवलेला वेळ सतत वाढत राहतो.

4. सोशल मीडिया डोस न घेतल्यावर : जेव्हा सोशल मीडियाचा वापर प्रतिबंधित किंवा थांबविला जातो तेव्हा अप्रिय शारीरिक आणि भावनिक लक्षणांचा अनुभव घेणे

5. जास्त सोशल मीडिया वापरामुळे उद्भवणारी कौटुम्बिक समस्या.

फेसबुक, स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये समान न्यूरल सर्किटरी तयार केली जाते जी जुगार आणि मनोरंजक औषधांमुळे होते. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की रिट्वीटचा सतत प्रवाह आणि शेअर्स आणि सोशल मीडिया साइट्सचा कधीही न संपणारा स्क्रोल मेंदूत डोपामाइन तयार करतो जो एक आनंद संप्रेरक आहे. आणि त्यात व्यसन निर्माण करण्याची क्षमता आहे.

आपण राहात असलेल्या समाजात सोशल मीडियाचा कसा परिणाम होत आहे.

सोशल मीडियाने आणलेल्या बर्‍याच चांगल्या गोष्टी आहेत. संप्रेषण सोपे, स्वस्त आणि अधिक विस्तृत झाले आहे. परंतु येथे आपण आपल्या समाजावर कसा विपरित परिणाम झाला याबद्दल बोलत आहोत.

1. आम्ही ‘माहिती युग’ वरून ‘चुकीची माहिती युग’ पर्यंत गेलो आहोत. बनावट बातम्या आणि फसवणूकींचा प्रचंड भार तयार केल्यामुळे, आम्हाला सामाजविरोधी घटकांच्या निहित स्वारस्यांसाठी खोटे विकले गेले आहे. आपण कोण आहोत आणि आपल्या भावना काय यावर आता आपले नियंत्रण कमी आहे.

2. बर्‍याच, विशेषत: किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर याचा लक्षणीय परिणाम झाला आहे: किशोरांमधील चिंता आणि कमी आत्म-सन्मान या अग्रगण्य कारणांपैकी मटेरियलस्क सौंदर्याच्या अवास्तव ऑनलाइन फिल्टर केलेल्या मानकांशी स्वत: ची तुलना करणे. लोकांनी तणाव, एकटेपणा आणि नैराश्यातून मुक्त होण्यासाठी एक यंत्रणा म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरवात केली आहे, ज्यामुळे यात आणखी वाढ होत आहे. एखाद्या कार्यक्रमात काही कारणासाठी तुम्ही जाऊ शकले नाही, पण त्या कार्यक्रमाचे छायाचित्र सोशल मीडिया वर बघुन उगाच नैराश्य येते.

अत्याधिक सोशल मीडिया वापराचा मेंदूवरही विपरीत परिणाम होतो.

सोशल मीडियाचा जास्त वापर करणार्‍यांच्या लक्षात राहण्याची क्षमता कमी होते. कामावर किंवा शाळेत त्यांची कामगिरी कमी होते. ते वर्तमानामध्ये जग्ण्याऐवजी त्यांचे  दुसरीकड़े लक्ष जाते. त्यांना प्रत्येक क्षणी उपस्थित राहण्याची भावना नसते. जेव्हा ते सोशल मीडिया वापरत नाहीत तेव्हा त्यांच्या अंत: करणात काहीतरी गमावण्याची सतत भीती असते.

सोशल मीडिया कसे कार्य करते आणि ती पैसा कसा कमविते?

सोशल मीडिया कमी-अधिक प्रमाणात जाहिरात आधारित उद्योग आहे. हे वापरकर्त्यांच्या प्रत्येक क्रियेचा मागोवा ठेवते आणि रेकॉर्ड करते. वापरकर्त्यांच्या या माहितीस डेटा म्हणतात. यात आपण कोण आहात? आपण काय करता? आपण कोणत्या महाविद्यालयात गेलात? तुमचे जवळचे मित्र कोण आहेत? आपण कोणाबरोबर रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाता? आपल्याला कोणत्या प्रकारची पोस्ट / प्रतिमा / व्हिडिओ आवडतात? आपल्याला कोणता ब्रँड आवडतो? आपण सध्या काय शोधत आहात हे काय आहे?आणि बरेच काही. आणि त्यांच्या साइटवर आपण अधिक वेळ घालविण्यासाठी हा डेटाचा उपयोग करतात.

हे सर्व सोशल मीडिया मुळात आपल्या वेळेसाठी स्पर्धा करीत आहेत. आणि त्यांचे सोशल मीडिया अधिक उत्तेजन कसे करावे यासाठी ते विशेष वर्ग आणि विचारमंथन सत्रे घेतात.

आपण स्क्रोलिंग चालू ठेवावे अशी त्यांची इच्छा असते. आपण पेज चालू ठेवावे, पेज रीफ्रेश करावे. 

हे सर्व वाईट का आहे?

जग अशा ठिकाणी आले आहे जिथे आपण ऑनलाइन करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या मध्यभागी फसवणूक आहे. आम्हाला वाटते की जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा आम्ही सक्रियपणे निवडत असतो. परंतु कदाचित सोशल मीडिया अल्गोरिदमला आधीच समजले असेल की आपण एखादी विशिष्ट वस्तू शोधत आहात आणि नंतर एखाद्या विशिष्ट ब्रँडच्या जाहिरातींनी आपल्यावर प्रभाव टाकल्यामुळे आपण तो ब्रँड निवडला. अल्गोरिदम दररोज हुशार आणि हुशार होत आहे. म्हणूनच फक्त आपण सुपरमार्केटमध्ये एक विशिष्ट ब्रँड निवडला. पुढे जाऊन तो आपल्या राजकीय आणि सामाजिक विचारांना देखील पटवून/बदलून देऊ शकतो. 

फेसबुकवर एक संशोधन झाले. ते असे की,  त्यावर्षी झालेल्या निवडणुकांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे पाहण्यासाठी फेसबुक वर त्यांनी काही सूक्ष्म संकेत वापरले. मतदानासाठी येणार्‍या मतदारांच्या संख्येवर त्यांनी लक्षणीय परिणाम केला असा निष्कर्ष काढला गेला. यामुळे त्यांना हे समजले की ते मानवांच्या वास्तविक जीवनातील निर्णयावर प्रभाव टाकू शकतात. 2016 च्या अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांवर फेसबुकचा प्रभाव सर्वश्रुत आहे. हे सिद्ध झाले की प्रत्यक्षात सीमा भंग न करता एक देश दुसर्‍या देशात फेरफार करू शकतो.

मी फेसबुक कमेंट सेक्शनला ’सामाजिक असंतोषाचा सतत वाहणारा धबधबा’ का म्हणतो?

कोणत्याही कमेंट सेक्शनचा लढा पहा. 

दोन भिन्न विचार असलेले लोक एका विशिष्ट विषयावर / घटनेवर आपली मते अग्रेसीवपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे याचे लवकरच एका तंट्यात रूपांतर होते. इतर लोक सामील होतील आणि हे सुरूच राहतील. याचा निष्कर्ष कधीही शांतता आणि समजूतदारपणा आणि इतरांच्या भावनांचा विचार असे होणार नाही. हे फक्त अंतर वाढवणार आणि द्वेष वाढवणार. 

तर आता विचार करा लाखो आणि कोट्यावधी कमेंट सेक्शनमधे जगभरात प्रत्येक क्षणी हा द्वेष वाढत आहे. आपण माणूस म्हणून एकमेकांपसुन दूर जात आहोत, आणि सतत इतरांचा द्वेष वाढत आहे. यापुढे एकमेकांना ऐकायलासुद्धा तयार नाहीत अशा दोन बाजू तयार होतात. हे वास्तविक जगात भेदभाव, दंगली आणि हिंसा म्हणून दिसून येतात. आणि अप्रत्यक्षपणे निवडणुकांमध्ये ते विजयी होतील जे लोकांच्या मतांच्या भिन्नतेवर राजकारण करतात. ते या फरकास पुन्हा प्रोत्साहित करतील.

डोपामाइन डिटॉक्स:

डोपामाइन ही सोशल मीडिया व्यसनाची प्रेरणाशक्ती आहे. हेच एक आहे ज्याने आणखी एक पोस्ट, आणखी एक पृष्ठ, आणखी एक मिम, आणखी एक भाग अशी इच्छा निर्माण करतो. तर सोशल मीडियाच्या तावडीतून बाहेर येण्यासाठी डोपामाइन डिटॉक्सची योजना करा:

आपल्याला 24 तास डोपामाइन देणार्‍या या सर्व क्रियाकलापांपासून स्वत: ला दूर ठेवा. सोशल मीडिया, टेलिव्हिजन, मालिका, चित्रपट, गाणी, यूट्यूब, जंक फूड / फास्ट फूड / शुगर फूड, व्हिडिओ गेम्स इ.  या ऐवजी आपण पुस्तके वाचू शकता, व्यायाम करू शकता चांगले आणि साधे अन्न खाण्यात वेळ घालवू शकता. सोशल मीडियात अडकून राहिला तर फक्त कंटाळवाणे अनुभव येतात. त्याऐवजी वरील बाबीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. माझ्यावर विश्‍वास ठेवा सोशल मीडियाच्या व्यसनापासून मुक्त होण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

प्रॅक्टिकल उपाय:

1. आपल्या फोनवरील सर्व नोटिफीकेशन बंद करा. आपण सेटिंग्जमध्ये हे सहजपणे करू शकता.

2. आपला फोन आपल्या बेडरूममध्ये / वाचन कक्षात / कामाच्या ठिकाणी घेऊ नका.

3. आपला किती वेळ सोशल मीडियावर खर्च होतो याचे मूल्यांकन करण्यासाठी ’रलींळेपऊरीह’ हा ऐप्प वापरून पहा आणि वेळ कमी करण्याचे मार्ग योजना करा

4. विविध सोशल मेडियाचे बरेच सीईओ त्यांच्या मुलांना वयाच्या 16 व्या वर्षाआधी स्मार्टफोन वापरण्याची परवानगी देत नाहीत. त्यांनी काय तयार केले हे त्यांना चांगले ठाऊक आहे.

5. महिन्यातून एकदा डोपामाइन डिटॉक्सची योजना करा.

पुढच्या आठवड्यात आम्ही कोरोनाबद्दल बोलू. तोपर्यंत आपल्या डोपामाइन डिटॉक्सची योजना करा!


- डॉ. आसिफ पटेल

एमबीबीएस (मुंबई), एम.डी. मेडिसीन (नागपूर)

8850877548 



'साधू संत येति घरा । तोचि दिवाळी दसरा ।।' हे कोणाचं वचन असेल ते असो, पण या वचनाने आम्हाला लहानपणापासून फार म्हणजे फारच छळलं आहे आणि आताही छळतंच आहे. वचनांचं आणि आमचं काय वैर आहे ते आम्हाला माहीत नाही, ( कदाचित वचनं नागपूरकर असतील ! हो, असूही शकतात !) पण वचन मग ते एखाद्या संताचं असू देत की कोणातरी असंताने आम्हाला बंद दाराआड दिलेलं असू देत, त्याने कायमच आम्हाला छळलं आहे. तुम्हाला सांगतो, शाळेत गुरुजींनी हे वचन कोणाचं म्हणून विचारल्यावर आम्ही शिवाजी महाराजांपासून ते थेट जवाहरलाल नेहरूंपर्यंत आम्हाला माहीत असलेली कमीतकमी पंचवीस तरी नावं सांगितली, पण गुरुजींचं समाधान काही होईना. प्रत्येक चुकीच्या नावावर एक छडी मारून बहुतेक गुरुजींचेच हात दुखून आले असावेत, कारण शेवटी जेव्हा आम्ही 'आईन्स्टाईन !' असं उत्तर दिलं तेव्हा गुरुजींनी हातातली वेताची छडी फेकून आमच्या पाठीत जोरदार धपाटा हाणला. तेव्हापासून या वचनाचा आम्ही भयंकर म्हणजे भयंकरच धसका घेतला होता, ( आमच्या त्या गुरुजींनीही त्या प्रसंगानंतर आमच्या अगाध ज्ञानाचा इतका भयंकर धसका घेतला की नंतर त्यांनी आम्हाला कधीच कोणताच प्रश्न विचारला नाही. अगदी शाळेत जायला उशीर झाला तरी उशीर का झाला म्हणूनही विचारलं नाही !) इतका भयंकर की, नंतर आम्ही आयुष्यात कधी दिवाळी साजरी केली नाही, की कधी कोणा साधूच्या दर्शनालाही गेलो नाही. असो.

तर हे सर्व आठवण्याचं कारण असं की, मागच्याच आठवड्यात कानी एक वार्ता आली, की उत्तरप्रदेशातून एक साधू आमच्या मुंबापुरीत येतोयं. आम्ही हादरलो. शाळेतला तो मार आठवला. साधूला आमच्या मुंबापुरीत येण्यापासून थांबवणं गरजेचं होतं. आम्हाला आमच्या दारात साधू संतही नको होते, दिवाळीही नको होती आणि त्या शाळेतल्या आठवणीही नको होत्या ! नंतर आमच्या गुप्तचर यंत्रणेने वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून आणि पाहून सांगितले की तो साधू नाही तर संधीसाधू आहे आणि दिवाळी विसरा, तो तर आपलं दिवाळं काढायला येतोयं ! आम्ही सावध झालो. (हल्ली आम्ही फार लवकर सावध व्हायला लागलो आहोत. याचे सर्व श्रेय आमच्या नागपूरकर मित्राला जाते. राजकारण असो की आयुष्य, गाफील राहून चालत नाही, हे त्यानेच आम्हाला शिकविले ! अजूनही एक नाव आहे, पण ते नंतर कधीतरी सांगीन.) आम्ही ताबडतोब आमच्या चिरंजीवांना पाचारण केलं. येणाऱ्या संकटाची त्यांना कल्पना दिली. बॉलीवूड गेलं तर आपल्या 'नाईट लाईफ'च काय, या विचाराने चिरंजीव हादरले.मागे एकदा एका मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांचा जीव गुदमरला होता, तसाच आता गुदमरतोय असं त्यांच्याकडे पाहून वाटू लागलं. त्यांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून त्यांची रवानगी ताबडतोब एका 'नाईट क्लब'मध्ये केली. संपादकांना बोलवून या साधुच्या येण्यावर ताबडतोब एक 'रोखठोक' अग्रलेख लिहिण्याची आज्ञा केली. यदाकदाचित तो साधू न बोलावताही आपल्याला भेटण्यासाठी आलाच तर आपले भगवे कपडे त्याच्या भगव्या कफनीपेक्षा मळके वाटू नयेत म्हणून नवे कोरे भगवे कपडे मागवून घेतले. तो बाहेरगावाहून आला आहे म्हणून त्याला होम क्वारंटाईन करता येईल का याचा अंदाज घेतला , पण असं करण्याच्या नुसत्या कल्पनेनेच अंगाला कापरं भरल्यामुळे तो विचार मनातून कापरासारखा उडून गेला. कोणीतरी मजुरांचे लोंढेच्या लोंढे ट्रकांमध्ये भरून माझ्या मुंबापुरीत आणून सोडतोयं आणि विमानात बसवून सर्व फिल्मी सिताऱ्यांना दूर कुठेतरी घेऊन चाललायं असं दृश्य डोळ्यांंसमोर येऊ लागलं. माझ्या मुंबापुरीची अवस्था आता ' नाव सोनुबाई ----' अशी होणार या कल्पनेने जीव 'त्या' पहाटे झाला होता तसा घाबराघुबरा होऊ लागला.  शेवटी जे व्हायचे ते होवो असा विचार करून झोपी गेलो. सकाळी उठलो.वर्तमानपत्रात बातमी होती, ' बॉलीवूड म्हणजे काय पर्स आहे का की उचलून नेईन - योगी आदित्यनाथ ' पट्टदिशी खिडकीपाशी गेलो. उगवत्या सूर्याला नमस्कार करून एकशे आठ वेळा 'ओम आदित्याय नमः'चा जप केला. डोक्यात नवीनच वचन घोळत होतं, 

'साधू संत परतति त्यांच्या घरा। तोचि दिवाळी दसरा ।।'

-मुकुंद परदेशी

मुक्त लेखक,  संपर्क-७८७५०७७७२८



जगभरातल्या सर्व वाईट गोष्टी, दुराचार, अत्याचार व सर्व मानवी समस्यांचा जो अंधार पसरलेला आहे तो सदाचाराच्या प्रकाशानेच दूर होऊ शकतो. पण सदाचारामागील आपला भाव कोणता आहे, तेही महत्वाचं आहे. उदात्त भावनेने केलेल्या एका सदाचाराच्या प्रकाशानेच मानवाच्या समस्यांचा अंधार कायमचा मिटू शकतो. जसं आजपासून चौदाशे वर्षांपूर्वी प्रेषित मुहम्मद (त्यांना शांती लाभो) यांनी प्रबोधनाचा प्रकाश पसरवून जगाचा अंधार दूर केला होता. तौहिद (सर्वांचा सृष्टीकर्ता एकच आहे) आणि आखिरत (सृष्टीकर्त्याकडे एक दिवस केल्या सवरल्याचा जाब द्यायची जाणीव) या तत्वांची शिकवण देणारा अंतिम ईश्‍वरी ग्रंथ कुरआनाचं अवतरण अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद (त्यांना शांती लाभो) यांच्यावर सृष्टीकर्त्याकडून झाले अन् याच ग्रंथाचा क्रांतीकारी प्रकाश पैगंबर (त्यांना शांती लाभो) व त्यांच्या अनुयायींनी घराघरात देऊन एका आदर्श समाजाची उभारणी केली होती. तीच क्रांती आजही जगात शक्य आहे. आजही तीच शिकवण प्रत्येकाच्या अंधारलेल्या जीवनात पुन्हा प्रकाश आणू शकते. याच उदात्त हेतूने जमाअत ए इस्लामी हिंदच्या संदेश विभागाद्वारे ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ या शिर्षकाने दि. 15 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 दरम्यान राज्यभरात एक अभियान राबविले जाणार आहे.  

याच अंतर्गत साप्ताहिक शोधन तर्फे अभियानाच्या शिर्षकानेच इन्शा अल्लाह एक विशेषांक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यासाठी कृपया लेखकांनी आपण आपले साहित्य दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत खालील ई-मेलवर पाठवावे.

   -Email - 

shodhan.weekly@yahoo.co.in

magdumshah@gmail.com

bashirshaikh12@gmail.com

- संपादक 

अधिक माहिसाठी संपर्क 

9820121207, 8976533404, 9923715373.


शेतीप्रश्नाकडे केलेलं दुर्लक्ष, भांडवलाची कमतरता, बदलत्या हवामानात तगून धरणाऱ्या संशोधनाचा अभाव या सर्व निष्क्रिय राजकारणानं शेती संकटाच्या गर्तेत गेलीच पण सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारनं शेतकरी रसातळाला जाण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचं ठरवलं आहे असे दिसते. शेतीसंदर्भातील ३ कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल हे या विधानाची साक्षच आहेत. दिल्लीतील केंद्र सरकारनं आपल्याला विरोध करणारा प्रत्येक जण हा राजकीय विरोधकांच्या सोबत मिळालेला आहे आणि म्हणून त्याला शक्य तितकं बदनाम केलं पाहिजे, येन केन प्रकारेण निष्प्रभ केलं पाहिजे ही या सरकारची सुरुवातीपासूनची भूमिका राहिलेली आहे. शेतकरी आंदोलनातही दिल्लीतील सरकारच्या आणि त्यांच्या मीडिया, सोशल मीडिया समर्थकांच्या सगळ्या भूमिका ह्याच दिशेनं जात आहेत. पण या वेळी आपल्या सत्तेच्या कैफात त्यांनी दोन अत्यंत गंभीर चुका केल्यात ज्याचे परिणाम भारताला भविष्यात अत्यंत गंभीरपणे भोगावे लागणार आहेत. या कायद्यांमध्ये करण्यात आलेले बदल हे शेती आणि शेतकऱ्यांच्या जिवावर उठणारे तर आहेतच पण असंविधानिक पद्धतीनं अंमलात आणले गेले आहेत. शेतीमाल, शेतजमीन आणि पर्यायानं शेतकऱ्यांच्या हातात असणारं तुटपुंजे भांडवल यांना सध्या असणारं स्वातंत्र्य हिरावून त्याची मक्तेदारी केवळ मूठभर लोकांच्या हातात जाईल याची सरळ सरळ केलेली सोय आहे. सरकारनं ज्या पद्धतीनं हे आंदोलन हाताळलं आहे, त्यामध्येदेखील सरकारची कोती बुद्धी दिसून येते. सरकारचं म्हणणं आहे की, हे बदल शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मग शेतकरी विरोध का करताहेत? बहुसंख्य  शेतकरी, शेतकरी संघटना, शेतीविषयक तज्ज्ञ यांचं म्हणणं आहे की, कायद्यांमध्ये केलेले हे बदल शेतकऱ्यांचं नुकसान करणारे आहेत एवढेच नाही तर पर्यायानं अन्न सुरक्षेवरदेखील विपरीत परिणाम करणारे आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाही ही एक जिवंत प्रणाली आहे, ज्यात प्रत्येकाला त्यांच्या स्वतःच्या श्रद्धांनुसार जगण्याचे समान स्वातंत्र्य आहे. लोकशाहीचा पाया लोकांच्या मतावर अवलंबून असतो. संसदेच्या व्यवस्थेवर आधारीत तिची मजबूत राज्यघटना आहे, जे नागरिकांच्या आकांक्षानुसार प्रशासन करते. परंतु सध्या लोकशाही मूल्ये कोसळताना दिसत आहेत. सर्वत्र विषमता दिसून येते. मतांच्या कॉरिडॉरमध्ये सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्याची शर्यत आणि येन-केन-प्रकारच्या मतांच्या भावनेनं या प्रगत शासन व्यवस्था कमकुवत केल्या आहेत. सर्वत्र संभ्रम आणि संभ्रमाचे वातावरण आहे. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपाखाली आणि विविध प्रकारच्या आरोपांमधून देश आपली नैतिक व चारित्र्य प्रतिष्ठा गमावून बसला आहे. अशोभनीय टिप्पण्यांनी मुद्दे बदलले आहेत. वैयक्तिकरित्या बिघडत आहे. कोण सामाजिक ऐक्याची चर्चा करतो, आज कोणत्याही भारतीयांना देशात पाहिले जात नाही, कारण उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, महाराष्ट्रीयन, पंजाबी, तमिळ यांची ओळख भारतीयतेवरच राहिली आहे. व्होट बँकेच्या राजकारणानं सामाजिक व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. ज्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या लिखाण, बोलण्याच्या आणि स्वातंत्र्याचे उल्लंघन केलं आहे त्यांनी या कारभाराची अस्पष्टता दाखविली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी अधिकाधिक लोकांच्या सहभागानं आणि योग्य रितीनं चालणारं सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. विधानसभा आणि लोकसभेत गुन्हेगारांची वाढती संख्याही चिंतेचा विषय आहे. हे काम फक्त जागरूक नागरिकच करू शकतात, म्हणून ते उठून आपली कर्तव्ये पार पाडतात. आमचे राजकारणी आणि सरकार अपेक्षेनुसार त्यांचे कार्यक्रम आणि धोरणे प्रत्यक्षात बदलण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ही यंत्रणा सदोष असून नेते आपली आश्वासने पाळत नाहीत असा विश्वास सर्वसामान्यांना वाटू लागला आहे. शेती आधीच तोट्यात आहे. देशभरातला शेतकरी पिचलेला आहे. त्याला ताकद देण्याऐवजी त्याची नाकेबंदी करण्याचेच प्रकार मागच्या सहा वर्षांत सुरू आहेत. अश्यावेळी जेव्हा तुम्ही शेतकरी आंदोलनाला सामोरे जाता तेव्हा सरकार म्हणून किमान सहानुभूती दाखवणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीनं हे आंदोलन सरकानं हाताळलं ते बघून या देशातला ६५ टक्के माणसे जी शेतीशी जोडलेला आहे ती काय विचार करतील? सरकारनं आपल्या कृतीपूर्वी ही काळजी घ्यायला हवी होती. समोर संविधानिक लोकशाही मार्गानं आंदोलन करणारे शेतकरी, तुमची – आमची, सगळ्या देशाची भूक भागवणारे पोशिंदे आहेत, आणि त्यांचं काहीही ऐकून न घेता सरकार नावाची आपण निवडून दिलेली व्यवस्था शेतकरी जे म्हणताहेत ते खोटं ठरवू पहाते, या शेतकऱ्यांवर गार पाण्याचा मारा करते, रस्ते खोदून ठेवते, लाठीमार करते हे वास्तव आपल्याला अस्वस्थ करत नाही का? या सर्व अन्यायकारक बदलांच्या निषेधार्थ आज भारतातला शेतकरी जागा झाला आहे आणि त्याने दिल्लीकडे कूच केले आहे. या सर्व भूमिपुत्रांचं एकच म्हणणं आहे, या तिन्ही कायद्यांमध्ये केलेले बदल रद्द करावेत.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

मो. : ८९७६५३३४०४


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget