Halloween Costume ideas 2015
Latest Post

-कलिम अजीम, अंबाजोगाई
‘‘मेरा बेटा गया कोई बात नहीं, दूसरे को तकलीफ़ मत होने दो, इस्लाम का पैगाम अमन का पैगाम है. इस्लाम ये कहता है कि खुद तकलीफ उठा लो लेकिन दूसरे को तकलीफ ना होने दो. हमारे आसनसोल में हम लोग अमन चैन से रहना चाहते हैं और मैं इस्लाम का पैगाम देना चाहता हूं, बेटा मरने के बाद भी मुझे जो इसे सहने की ताक़त मिली है वो अल्लाह की दी हुई है. अपने मुल्क में शांति रहे, दंगा-फसाद ना हो और हमारे किसी भाई को तकलीफ़ ना हो.’’
ही वाक्यं आहेत पश्चिम बंगालच्या इमाम इमदादुल रशीदी यांची. पश्चिम बंगालच्या दंगलीत इमदादुल यांचा तरूण मुलगा हाफीज सब्कातुल्ला याला दंगलीत हल्लेखोरांनी ठार मारलं. त्यानंतर इमदादुल यांनी बीबीसीला दिलेली ही प्रतिक्रिया आहे. इमदादुल यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मुलाच्या मृत्युनंतर इमदादुल यांनी दिलेली प्रतिक्रिया अश्वासक व बोलकी आहे.
बीबीसीसारख्या काही माध्यमांनी बिहार आणि पश्चिम बंगाल दंगलीचं नि:पक्षपाती व ग्राउंड रिपोर्टिंग केलं. पण इतर मीडिया हाऊसनं दंगलीआड सांप्रदायिक वातावरण तयार करण्याचं ‘राजकारण’ सुरू ठेवलं. कधी नव्हे ते या वेळी प्रसारमाध्यमांनी दंगलीची भयान लाईव्ह दृष्ये टीव्ही स्क्रीनवर दाखवली. ही दृष्ये विनासेन्सॉर दाखवून ‘गोदी मीडिया’ वातावरण भडकावण्याचे कंत्राट पूर्ण करण्याचं काम करत होता. भडक बातम्या देऊन आगीत तेल ओतण्याचं काम दंगलकाळात मीडियानं यथोचित पार पाडलं. टीव्हीवरून दंगलीची एकांगी दृष्ये वारंवार दाखवली जात होती. ही दृष्ये पाहून देशभरातील आर्थिक घुसमट व बेरोजगारीच्या दरीत कोसळलेल्या शोषित तरूणांची मानसिकता दंगली घडविण्यासाठी तयार होणं साहजिकच आहे. गोदी मीडिया व सांप्रदायिक भाजपचा दंगली घडविण्याचा हा घातकी चेहरा ‘कोबरा पोस्ट’नं मार्चमध्ये उघडकीस आणला. दंगलीच्या काळात हे स्टिंग ऑपरेशन प्रसारित होणे निव्वळ योगायोग होता. पण अनेक धक्कादायक खुलासे कोबरा पोस्टच्या स्टिंगमधून बाहरे आले आहेत. या स्टिंगमुळे मीडिया बाजारात ‘फेक’ व ‘पेड न्यूज’चा जीवघेण्या राक्षसाची सामान्य नागरिकांना ओळख झाली.
आर्थिक आणि विकासाचं राजकारण बाजूला सारत भाजपकडून धार्मिक ध्रूवीकरणाला खतपाणी घालणं सुरू आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीनं देशात अराजक माजवलं आहे. विकासाचे मुद्दे बाजूला पडत राम मंदिराचा मुद्दा पुढं केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून रामनवमीच्या मिरवणुकीच्या निमित्तानं देशात दंगली घडविण्याचा राजकारण करण्यात आलं. राजस्थानच्या जोधपूरला मुस्लिम मजूर अफराजुलचा खुनी शंभू रेगरचं महिमामंडन करून शोभायात्रा काढली गेली. लोकशाही देशात कथित लव्ह जिहादला संपवणारा वीर म्हणून विकृत शंभूला प्रचारित करण्यात आलं. यावर पोलीस व गृहयंत्रणेची दर्शकाची भूमिका पार पाडली. काही ठिकाणी रामनवमी शोभायात्रेत सरकारी वर्दीत बंदोबस्ताला असलेले पोलीस राम-नामाचा गजर करत नाचताना दिसले. काही ठिकाणी नंग्या तलवारी घेऊन मुस्लिम व अल्सपंख्याकांना पोलीस भीती दाखवत होते.  
बिहारमध्ये राजदला तिलांजली देऊन समाजवादी म्हणवणाऱ्या नीतीशकुमार यांनी भाजपशी सूत जुळवलं आणि राज्यात हिंदू धर्मवाद्यांचा उत्पात सुरू झाला. तीन वर्षात न घडलेलं मॉब लिंचिंग भाजप सरकार स्थापनेच्या काहीच दिवसांत घडलं. राजदपासून फारखत घेतल्यापासून राज्यात आत्तापर्यंत २०० सांप्रदायिक दंगली बिहारमध्ये घडल्या आहेत. गेल्या मार्च महिन्यात तब्बल ३० धार्मिक दंगली बिहारमध्ये घडल्या आहेत. बहुतेक घटना अशा वेळी घडल्या ज्या वेळी हिंदूंची धार्मिक शोभायात्रा मुस्लिमांच्या मोहल्ल्यातून गेली. दंगली आता तर सरकारचे मंत्री थेट दंगलीचं नियोजन करत आहेत. पण नीतीशकुमार सरकारनं त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालणं सुरू केलं आहे. ‘सुशासन बाबू’ म्हणून प्रतिमा असलेले नीतीशकुमार दंगलीवर गप्प आहेत. दंगेखोर दिवसाढवळ्या मुस्लिमांवर हल्ले करत होते, त्यांच्या धार्मिक स्थळांची विटंबना करत होते. पण सुशासन बाबू कुठलीच कारवाई न करता ‘नागपूर हेडक्वॉटर’चे आदेश पाळताना दिसले. भाजपनं आपले मंत्री पदाधिकारी दंगलीघडविण्यासाठी मोकाट सोडलेत. केंद्रातील भाजप सरकारनं पश्चिम बंगालला दंगलीचा अहवाल मागितला, पण बिहारच्या सुशासन बाबूला पाठीशी घातलं. नीतीशकुमार यांना दंगलीचा जाब न विचारता ममता दिदींनं नोटीस पाठवलीय, याचं कारण स्पष्ट आहे, बिहार दंगली भाजपच्या पदाधिकाऱ्यानं घडविल्याचा आरोप आहे. तर बंगालमध्ये गैरभाजप सरकार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ममता दिदीनं ‘थर्ड फ्रंट’ची बांधणी करत भाजपला २०१९ साठी मोठ्या अडचणीत टाकलं आहे. परिणामी भाजपनं सूडाची भूमिका घेतली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राज्यात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी भाजपविरोधात ‘थर्ड फ्रंट’ उभं करण्याची मोट बांधत आहेत. तसं पाहिलं तर ममता बॅनर्जीचं काम कौतुकास्पद आहे, पण त्यांनी साधलेली वेळ चुकीची आहे.
पश्चिमबंगालमध्ये संचारबंदी लागू असताना भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो रॉकेल ओतण्यासाठी असनसोलला पोहचले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला तर बाबुल सुप्रियो यांनी अधिकाऱ्यांना हाणामारी केली, त्यांच्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मारहाणीचा खटला भरला आहे. दोन्ही दंगलींवरून भाजपनं देशात राजकारण तापवलंय. राजरोसपणे दोन्ही राज्यांत दंगेखोर नासधूस करत फिरत आहेत, पण भाजपनं त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मुस्लिमांवरोधात मोकाट सोडलं आहे. रामनवमीच्या दंगलीवर राजद नेते तेजस्वी यादव यांनी सरसंघचालक मोहन भागवतांना जबाबदार ठरवलं आहे. दंगली कशा भडकवायच्या त्याचे प्रशिक्षण भागवतांनी दिलं असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.
बिहार व पश्चिम बंगालची दंगल पाहून देशात २०१९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं कळतंय. भगवान रामाच्या नावानं देशात हिंदू-मुस्लिम दूही पसरवण्याचं काम भाजपकडून जारी आहे. दोन्ही राज्यात मुस्लिमांची घरे व व्यावसायिक प्रतिष्ठानं लक्ष्य करण्यात येत आहेत. आठएक जिल्हे दंगलीत धुमसत आहेत. रोजगार मागणारे हात हातात लाठ्याकाठ्या-दगडं-विटा घेऊन आपल्याच बंधू-भावांवर उगारत आहेत. आपल्याच शेजाऱ्याला त्रिशूळ दाखवून रक्तपात घडवत आहे. घर-कुटुंब-नोकरी-शिक्षणाचे प्रश्न विसरून संधीसाधू राजकारण्यांचं इंधन बनत आहेत. चार वर्षापूर्वी भ्रष्टाचार व लोकपालसाठी रस्त्यावर उतरणारा तरूणवर्ग आज सांप्रदायिक फेसबुक पोस्ट टाकून सत्ताधारी पक्षाला रसद पुरवत आहे. 
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या सत्तेला एक वर्षं पूर्ण झालं. या वर्षभरात ‘अब तक एक हजार’ लोकं एन्काऊंटरच्या नावाखाली भाजप सरकारने संपवले आहेत. ठार केलेल्यांमध्ये दलित, आदिवासी आणि मुस्लिम तरुणांचा समावेश आहे. या संदर्भात २ एप्रिलला ‘द हिंदू’नं सविस्तर बातमी दिली होती. वर्षभरात य़ोगी सरकारने तब्बल एक हजार जणांचे घरे आणि कुटुंबे उद्ध्वस्त केल्याचं ‘द हिंदू’नं म्हटलं आहे. योगी सरकारने मार्च २०१७ मध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर एन्काऊंटरमध्ये ४९ लोक मारले गेले. ३७० जखमी झाले तर ३ हज़ार पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. या ‘उपलब्धी’वर सरकारचे मंत्री कौतुकानं बोलत आहेत. ‘राज्यातला क्राईम संपवण्यासाठी आम्ही पाहिजे ते करू’ अशा जाहीर घोषणा सरकार व त्यांचे मंत्री करत आहेत. ‘रिहाई मंच’ने तर दावा केलाय की सरकार फेक एन्काऊंटर करून दलित आणि मुस्लिम तरूणांना संपवत आहे. तर विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी भाजप आणि योगी सरकार यूपीत एन्काऊंटरचं गुजरात मॉडल लागू करत आहे, असा आरोप केला आहे. बढतीसाठी सामान्य तरुणांना मारलं जातंय असंही अखिलेश यांनी म्हटलं आहे.
विषेश म्हणजे गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये सहारणपूरला दलितांचे हत्याकांड झालं. गौवंश हत्येच्या नावाखाली अनेक दलित आदिवासींवर हल्ले झाले. गेल्या वर्षभरात मॉब लिंचिंग व गौरक्षकांचा उच्छाद यूपीत वाढला आहे. राज्यात सांप्रदायिक दंगली, वर्णभेदी हल्ले भाजपकृपेनं सुरू आहेत. नुकतेच राज्य सरकारने डॉ. आंबेडकरांचे नाव बदलून वेगळा विषय चर्चेत आणला आहे. तर केंद्रानं दलित समाजाच्या संरक्षणासाठी असलेला अट्रॉसिटी कायदा कमकुवत करुन तो संपवण्याचा घाट घातला आहे. यावरून देशभरात रणकंदन माजलं आहे. या दोन्ही घटना (फेक) एन्काऊंटरशी जोडून पाहिल्यास अनेक गोष्टी क्लिक होऊ शकतात. सोमवारी २ एप्रिलला दलित संघटनांकडून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर भारत बंदची हाक देण्यात आली होती. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी दलित संघटना व नेते करत आहेत. या मागणीसाठी देशभरात मोर्चे काढण्यात आले. मोर्चांना हिंसक वळण लागल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी बजरंग दल व दलित कार्यकत्र्यांमध्ये हाणामारी झाली. राजस्थानमध्ये भारत बंद दरम्यान झालेल्या हिसेंचे पर्यवसान दंगलीत झाले. मंगळवारी ३ एप्रिलला राजस्थानमध्ये तब्बल एक हजार जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात निमलष्करी दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. काही शहरात कफ्र्यू लावण्यात आला होता.
मीडियाला हाताशी धरून सांप्रदायिकतेची बीजं पेरली जात आहेत. कोबरा पोस्टचे स्टिंग पाहिल्यास याचा अंदाज येऊ शकतो. नुकतंच जेएनयूचा बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमदच्या आईनं दोन न्यूज चॅनलवर ‘फेक न्यूज’ चालवत मुलाची बदनामी केल्याचा खटला भरला आहे. नजीब आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा खोटा बनाव या न्यूज चॅनलनं रचला होता. मुलाला बदनाम केल्याप्रकरणी २ कोटीचा दावा नजीबच्या आईनं न्यूज चॅनलवर ठोकलाय. दुसरीकडे मंगळवारी ३ एप्रिलला केंद्र सरकारनं फेक न्यूजवर कारवाईची घोषणा मागे घेतली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं फेक न्यूज पब्लिश करणाऱ्या पत्रकाराची मान्यता काढून घेण्याची घोषणा केली होती. पण प्रधानसेवकांच्या हस्तक्षेपानंतर ही घोषणा मागे घेण्यात आली आहे. काही तासांत घोषणा मागे घेणं इतकं सहज घडलेलं नाहीये. विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी फेक न्यूज पब्लिश करून सांप्रदायिक वातावरण तयार केल्याच्या आरोपावरुन कर्नाटक पोलिसांनी ‘पोस्ट कार्ड’च्या संपादकाला बेड्या ठोकल्या आहेत. हा संपादक भाजप समर्थक मानला जातो. मीडिया रिपोट्र्सच्या बातम्या पाहिल्या तर अनेक वेबसाईट भाजपपुरस्कृत आहेत, अशा वेबसाईटला संरक्षण देऊन धर्मद्वेषी अजेंडा रेटण्यासाठी भाजपनं हा निर्णय मागे घेतल्याचं स्पष्ट आहे. थोडक्यात काय तर धर्मवादी हिंदू संघटनांनी सांप्रदायिक वातावरण तयार करण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे एक सजग नागरिक म्हणून आता आपली जबाबदारी आणखीन वाढली आहे. फक्त इमदादुल यांनी दंगेखोरांविरोधात भूमिका घेणे इथपर्यंत थांबता कामा नये, आपणही मोठ्या संख्येनं दंगलखोरांविरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.

‘शरियत हमारी जान है, ट्रीपल तलाक बिल वापस लो’, असे फलक घेऊन हजारो मुस्लिम महिलांचा मोर्चा तिहेरी तलाक विधेयक आणि समान नागरी कायद्याविरूद्ध गेल्या सोमवारी ठाण्यातील रस्त्यावर उतरला. रखरखत्या उन्हामध्ये राबोडी ते जांभळीनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे शिस्तीत आलेल्या या महिलांच्या वतीने ठाण्याच्या उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांना याबाबतचे निवेदन दिले.
ठाणे शहरातील समस्त मुस्लिम धर्मीयांच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक संस्था तसेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (महिला विंग) च्या वतीने सोमवारी राबोडी येथून दुपारी २.३० वाजताच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. राबोडी येथून सुरुवात झालेल्या या मोर्चामध्ये माजिवडा, कासारवडवली, महागिरी, कळवा, वागळे इस्टेट, इंदिरानगर, हाजुरीगाव येथील सुमारे दोन ते तीन हजार महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या मार्गावर महिला आणि पुरुषांच्या १५० ते २०० स्वयंसेवकांचाही समावेश होता. हे स्वयंसेवक शिवाजी मैदान ते मोर्चाच्या शेवटच्या टोकावरील महिलांना मार्गक्रमणासाठी मदत करत होते. तसेच वाहतुकीला अडथळा येऊ नये, म्हणून वाहतूकनियमनाचेही काम करत होते. राबोडी, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे टेंभीनाक्यावरून बाजारपेठेतून आलेल्या या मोर्चाचे शिवाजी मैदान येथे सभेत रूपांतर झाले.  
मोर्चाला संबोधन करताना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ महिला आघाडीच्या सदस्य तथा समाजसेविका सोमय्या नोमानी म्हणाल्या, गेल्या १४०० वर्षांपासून इस्लाम धर्माच्या शरियतने मुस्लिम महिलांना सुरक्षेचे अधिकार दिले आहेत. तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करून महिलांचे अधिकार हिसकावण्याचा प्रकार वेंâद्र सरकार करत असल्याचा आरोप करून लोकशाही मार्गाने शांततेने मोर्चा काढून तमाम मुस्लिम महिलांचा विरोध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हा कायदा राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यामध्ये रूपांतर होईल. या कायद्याने अशा प्रकारे तिहेरी तलाक देणाऱ्याला तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे. तीन वर्षांनंतरही त्याला तलाक अर्थात घटस्फोट घेता येणार नाही. त्या काळात त्याच्यावर अवलंबून असलेली त्याची आई, बहीण आणि मुलगी यांचे काय? शिवाय, शिक्षेच्या काळात तो आपल्या पत्नीचाही सांभाळ कशा प्रकारे करणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यामुळे या कायद्याने सुरक्षा मिळण्याऐवजी सुरक्षा हिरावली जात असून महिलांच्या घटनात्मक अधिकारालाच त्यामुळे धक्का बसणार असल्याचाही त्यांनी आरोप केला. सरकारकडून मुस्लिम महिलांवर लादण्यात येत असलेला हा कायदा काळ्या पाण्यासारखा आहे. त्यामुळे तो महिलांना भीक मागण्यासाठी आणि पुरुषांना तुरूंगात सडवण्यासाठी कारणीभूत ठरेल.
या विधेयकाविरोधात देशभरातील महिलांनी स्वाक्षरी मोहीम उघडली असून पाच कोटी महिलांची स्वाक्षरी असलेले निवेदन महिला आयोगासह राष्टढ्ढपती आणि पंतप्रधानांनाही दिले आहे. यात दोन कोटी ८० लाख मुस्लिम महिलांचा समावेश असल्याचेही नोमानी यांनी सांगितले.
तलाक तो एक बहाना है, शरियत असल निशाणा है, असे सांगून वेंâद्र सरकारचा शरियत अर्थात इस्लामने आखून दिलेल्या नियमावलीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न असल्याचाही त्यांनी आरोप केला. १९७२-७३ पासून असलेल्या भारतामध्ये मुस्लिम धर्मीयांसाठी बनवण्यात आलेल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ चे महत्त्व आहे. इस्लाम धर्मात शरियतचे मोठे स्थान आहे. मुस्लिम महिलांना स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली त्यांचे स्वातंत्र्यच या तिहेरी तलाक विधेयकामुळे हिसकावले जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला. या कायद्याला तुमचा विरोध आहे ना? असा आवाज त्यांनी देताच सर्व महिलांनी हात उंचावून विरोध दर्शवला.
अखेरचा निर्णय अल्लाहचा...
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरेन मेहपूâज रेहमानी यावेळी म्हणाले, अखेरचा निर्णय हा अल्लाहचा आहे. त्यामुळे त्याचाच कायदा निर्णायक ठरणार आहे. इस्लाम धर्माने महिलांना सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांना शरियाव्यतिरिक्त कोणत्याही इतर कायद्याच्या आधाराची गरज नाही. एखादी महिला विधवा झाली, तर तिच्या मर्जीने पुनर्विवाह करण्याचा अधिकारही इस्लाम धर्माने दिला आहे. महिलांचा सन्मान करणे हे इस्लामचे आद्यकर्तव्य आहे. तिहेरी तलाकने मुस्लिम महिला असुरक्षित आहेत, हे चुकीचे आहे. त्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरुद्धचे विधेयक तातडीने मागे घ्यावे, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
दरम्यान, शरियतमध्ये ढवळाढवळ करणे म्हणजे न्याय नाही. देशात दीड मिनिटांमागे एका महिलेस जाळले जाते, अनेकींवर अत्याचार होतो. हुंड्यासाठी छळ होतो. त्या महिलांना खरी न्यायाची गरज आहे. मुस्लिम महिलांच्या घटस्फोटाची टक्केवारी ०.३ टक्के असून इतर धर्मीयांची संख्या दरवर्षी १९ लाख इतकी आहे. तलाकच्या कारणावरून तुरुंगात गेल्यानंतर संबंधित पुरुषाची नोकरी जाईल, मुलांना मजुरी करावी लागेल, असे अनेक धोके त्यांनी व्यक्त केले. आपला जीव गेला तरी बेहत्तर पण शरियतमध्ये ढवळाढवळ मुस्लिम सहन करणार नाही, असा इशाराही राबोडीतील जुमा मशिदीचे मुफ्ती अझीम यांनी दिला.

-अर्शिया शकील खान, नालासोपारा

प्राचीन काळापासून आजपर्यंत स्त्रियांचे स्थान, मर्यादा, हक्क मानसन्मान या बाबतीत नियमित चर्चा घडत आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीला पापाची जजनी, नरकाचे घर आणि सर्व मानवी संकटांचे उगमस्थान मानले जाते. ग्रीसमध्ये तर बऱ्याच काळापर्यंत या विषयावर चर्चा होती की स्त्रियांच्या शरीरात आत्मा आहे की नाही. अरबस्थानात मुलगी जन्माला आली की तिला जिवंत गाडले जायचे. भारतामध्ये मृत पतीच्या चितेवर सतीच्या नावावर तिला जाळण्यात यायचे. प्रत्येक राष्ट्रात व प्रदेशात स्त्रियांची फार वाईट अवस्था होती.
अल्लाहने आपले अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यामार्फत स्त्रियांना त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त केले. अल्लाहने स्त्री व पुरुष यांना एका जीवापासून निर्माण केले गेले. दोघांना समान स्थान दिले. व्यावहारिक व सामाजिक घटनांमध्ये स्त्रियांच्या हक्कांना स्थान दिले जेणेकरून स्त्रियांचे शोषण होऊ नये. मालमत्तेत वारसाहक्क प्रदान करून आर्थिक सुरक्षा प्रदान केली.
‘‘स्त्रियांना त्याचप्रमाणे हक्काधिकार आहेत जसे पुरुषांचे हक्क त्यांच्यावर आहेत.’’ (सूरह अल बकरा – २२८)
अल्लाहने कुरआनमधील या आयतीद्वारे स्त्रियांच्या पूर्ण हक्कांची पूर्तता केली. तिला शिक्षण, प्रशिक्षणाचा अधिकार दिला. आपल्या पसंतीने लग्न करणे, पती व पत्नीमध्ये तणाव निर्माण होत असेल तर आणि एकत्र राहणे शक्य नसेल तर विभक्त होऊन दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली. विधवा स्त्रियांच्या दुसऱ्या विवाहाला अनुमती दिली गेली.
महान कवी अल्लामा इक्बाल म्हणतात की, ‘‘कदाचित जर मी मुस्लिम नसतो आणि हे मान्य केले नसते की कुरआन हा ईशग्रंथ आहे, तर मग माझे मत असे असते की हा ग्रंथ कोणा बुद्धिवान स्त्रीकडून लिहिला गेला असावा. कारण कुरआनात स्त्रियांना इतके अधिकार दिले गेले आहेत की जे जगातील कुठल्याही धर्मात आढळत नाहीत.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या शिकवणींना प्रोत्साहन देताना ई. उरम्हगंम म्हणतो, ‘‘इस्लामच्या आधी स्त्रियांना खरा अभिमान व दर्जा प्राप्त नव्हता. चो मुहम्मद (स.) याच्या शिकवणींनंतर त्यांना मिळाला.’’
तसेच डी. बलॉडनने आपले पुस्तक ‘सुन्नत नबवी व जदीद सायन्स’मध्ये नमूद केले की ‘‘इस्लामने स्त्रियांना जे हक्क प्रदान केले ते इतिहासात कुठेही आढळत नाहीत.’’
सध्या ‘तलाक’चा मुद्दा खूप चर्चिला जात आहे. तलाक स्त्रियांवर अत्याचार आहे. वगैरे!
‘तलाक’ म्हणजे विवाहबंधनातून मुक्त होणे. तलाक हे विवाहबंधनातून मुक्त होण्याचे पहिले पाऊल नव्हे तर अंतिम पाऊल आहे. हा हक्क पती व पत्नी दोघांना देण्यात आला आहे. स्त्रीने घेतलेल्या तलाकला ‘खुलअ’ म्हणतात. वैवाहिक जीवनात पती-पत्नींमध्ये स्वाभाविक भिन्नता, दुराचार, संकुचितपणा, एकत्र कुटुंब व्यवस्था अशा बऱ्याच कारणांमुळे विवाद झाले आणि मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे एकत्र राहणे अवघड होऊन बसले. इस्लामने तलाकची परवानगी दिली. थोडक्यात जखम असह्य झाली तर तो अवयव कापून टाकणे क्रमप्राप्त ठरते. इस्लाम ताबडतोब कारवाई करण्याचा आदेश देत नाही. कोणत्या वाईट प्रथेला नीट करण्याचे उपाय सुचवितो. नंतर नाइलाज झाला तरच ही अंतिम कारवाई विंâवा शिक्षेचा आदेश देतो.
उदा. तलाकचा अगोदर वाद मिटविण्यासाठी असा उपाय सुचविण्यात आला आहे की पत्नीची समजूत घालावी. जर प्रतिसाद मिळाला नाही तर पती व पत्नीच्या नातेवाईकांकडून एक एक सदस्य नियुक्त करून मतभेदांची चौकशी करण्यात यावी आणि उपाय सुचविण्यास सांगावे. अर्थात अल्लाहने आपल्या कायद्यानुसार मानसाच्या चांगल्या जीवनाचा प्रारंभ केला आहे. आपल्याला त्याची जाणीव ठेवली पाहिजे. इस्लामी शिकवणींवर विचारमंथन केल्याने नक्कीच इस्लाम हा स्त्रियांचा रक्षक असल्याची आपली खात्री पटेल.

एम.आय.शेख

आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामां है सौ बरसका पल की खबर नहीं

प्रथम मी आपले अभिनंदन करतो की आपण हा लेख वाचण्याचा निर्णय केला. मला खात्री होती की, या लेखाचे शिर्षक वाचूनच अनेक वाचक हा लेख वाचणार नाहीत. मृत्यू अटळ आहे मात्र आपण सर्वजण अशा अभिनिवेशात जगत आहोत जणू कधी आपण मरणारच नाही. अनेक लोक तर ’मृत्यू’ संबंधी बोलणे टाळतात. त्यासंबंधी बोलणे अशुभ समजतात. इस्लामने मात्र मृत्यूला नजरेसमोर ठेवून आचरण करण्याची ताकीद केलेली आहे. 
गम्मत पहा जगातील बहुतेक व्यवस्था मृत्यूवर बोलने टाळतात तर इस्लाम मृत्यूला नेहमी डोळ्यांसमोर ठेवण्याची ताकीद करतो. अशा वेळी इस्लाममध्ये मृत्यू संबंधी नेमकी काय संकल्पना आहे? हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. तर चला या संबंधी पाहूया. मृत्यूची भीती यासाठी वाटते की, तो माणसाचा जीव घेतो, पत्नीला विधवा करतो, मुलांना अनाथ करतो, अवलंबिताना निराधार करतो, आप्तांना रडवितो, वस्त्यांना उध्वस्त करतो, संस्थांचा नाश करतो, चविला नष्ट करतो, आशेला निराशेमध्ये बदलतो. गरीबांनाही मृत्यू येतो, श्रीमंतांना ही मृत्यू येतो, आस्तिकही मरतात, नास्तिकही मरतात. 
मृत्यू म्हणजे काय?
शरिरापासून आत्मा विलग होणे म्हणजे मृत्यू. मग प्र्रश्न उरतो की आत्मा काय आहे? कुरआन त्याचे उत्तर देतो की, आत्मा अल्लाहचा, शरिराला जिवंत राहण्याचा आदेश आहे. तो एका ठरावीक मुदतीसाठी दिलेला आहे. ती मुदत संपताच आदेश परत घेतला जातो आणि शरीर निपचित पडते. आत्मा ’आलमे बरजक’(मृत्यूलोक) मध्ये रवाना होतो. तो तेथे ’डे ऑफ जजमेंट’ (प्रलयाचा दिवस) पर्यंत वास्तव्यास राहतो. तद्नंतर त्याला पुन्हा शरीर प्राप्त करून दिल्या जाईल व त्याच्या जीवनाचा हिशोब घेण्यात येईल. ही आहे इस्लाममध्ये मृत्यूसंबंधीची संकल्पना.
न्यायासाठी मृत्यूनंतरच्या जीवनाची आवश्यकता
जगाच्या रचनेकडे डोळसपणे पाहिले असता एक गोष्ट चटकन लक्षात येते ही की, हे जग अपूर्ण आहे. याला पूर्णत्व प्रदान करण्यासाठी मृत्यूनंतरच्या जीवनाची आवश्यकता आहे. उदा. कल्पना करा की एका सुनेला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मारून टाकले. तेंव्हा प्रश्न हा निर्माण होतो की, ऐन तारूण्यात तीला जीव द्यावा लागला त्याची भरपाई कोण करणार? कुणी म्हणेल सासरच्यांना ’लॉ ऑफ द लँण्ड’ ने शिक्षा दिली आहे. ठीक आहे! पण त्यामुळे तिचे अकाली संपलेले जीवन तिला परत थोडेच मिळणार? तीला सर्वंकश न्याय मिळण्यासाठी ’आखिरत’ची दुनिया असणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने ज्या शक्तीशाली लोकांनी दुर्बलांवर अत्याचार केले, दंगे केले, लोकांची घरे जाळली, निरपराध लोकांच्या हत्या केल्या, अबलांवर बलात्कार केले, त्यांना न्याय तेंव्हाच मिळेल जेंव्हा शक्तीशाली व दुर्बल पुन्हा आमने-सामने उभे केले जातील व दुर्बलांना सर्व शक्तीमान अल्लाहकडून न्याय दिला जाईल. तेव्हाच हे जग पूर्णत्वाला आले असे म्हणता येईल. 
जगात बलवानांनी दुर्बलांवर केलेल्या अत्याचाराचा बदला देण्यासाठी एक सर्वशक्तीमान अशी शक्ती आणि ’द डे ऑफ जजमेंट’ची आवश्यकता यासाठीच आहे. म्हणून आखिरत आवश्यक आहे. याची कल्पना जगाला स्पष्ट शब्दात कुरआनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रत्येकाला मरण अटळ आहे. या गोष्टीची जाणीव सतत डोळ्यापुढे राहिली व मृत्यूनंतर येणार्या अनिवार्य अकांउन्टीब्लिटी (जबाबदारी)ची सतत आठवण राहिली तर माणसं जगामध्ये जबाबदारीने वागतील. म्हणून इस्लाममध्ये मृत्यूची सतत आठवण ठेवण्याची वारंवार ताकीद दिली गेली आहे. या संबंधी कुरआन स्पष्ट निर्देष देतो की, ’प्रत्येक जीवीतास मृत्यूची चव चाखावयाची आहे. आणि आम्ही चांगल्या व वाईट स्थितीत आणून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच रूजू व्हायचे आहे.’ (सुरे अंबिया आ.नं.35).
मृत्यूची वैशिष्ट्ये 
मृत्यूचे एक वैशिष्ट्ये म्हणजे तो कोणाला, कुठे आणि केव्हा येईल हे कुणालाच माहित नाही. याच्यात तर खरी मजा आहे. कल्पना करा मृत्यूची जर का माणसाला पूर्व कल्पना असती तर किती गजहब झाला असता? एक-एक दिवस जड गेला असता. जीवन निरस झाले असते. ही अल्लाहची एक प्रकारची कृपाच आहे की त्या असीम दयावंताने आपल्याला मृत्यूची तिथी कळणार नाही याची व्यवस्था करून ठेवली आहे. खरे पाहता ही एक सवलत आहे. मात्र या सवलतीचा दुरूपयोग करण्याकडेच आपल्या सर्वांचा कल असतो. आपण असे वागतो जणू कधी मरणारच नाही. म्हणून कुरआन आपल्याला सावधानतेचा इशारा देतो की, ”त्या घटकेचे ज्ञान अल्लाहपाशीच आहे, तोच पर्जन्यवृष्टी करतो, तोच जाणतो की आईच्या उदरात काय वाढत आहे, कोणतीही व्यक्ती जाणत नाही की उद्या तो काय कमाई करणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला हे माहीत नाही की उद्या त्याला कोणत्या भूमीवर मृत्यू येणार आहे, अल्लाहच सर्वकाही जाणणारा व माहितगार आहे.”(सुरे लुकमान, आयत नं. 34).
मृत्यूचे आणखीन एक वैशिष्ट्ये म्हणजे तो कोणाला ? कोणत्या वयात? येईल हे कोणालाच सांगता येत नाही. अगदी तज्ञ डॉक्टर सुद्धा याबाबतीत ठामपणे काही सांगू शकत नाहीत. या तरतुदीचा सुद्धा आपण गैरफायदा घेत असतो. प्रत्येकाला वाटत असते की ”अजून आपले वय तर काय?” आपल्याला भरपूर जगायचे आहे. रोज रस्त्यावर होणारे अनेक अपघात व त्यात मरणारी अनेक माणसे आपल्याला रोज खोटं सिद्ध करत असतात. तरी माणूस आपल्या धुंदीत जगत असतो. त्याचा विचार असतो की आपण खूप जगणार आहोत. त्याचा हाच विचार त्याला दुसर्यावर अन्याय करून स्वतःचे स्वार्थ साध्य करण्यासाठी प्रेरित करीत असतो. म्हणून इस्लामची ताकीद आहे की, जगाच्या झगमगाटात मृत्यूला विसरू नका. 
आपल्याला कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो. अपघातच नव्हे तर जगात अनेक कारणांनी, अनेक लोक मरत असतात, काही ना आईच्या गर्भातच मृत्यू येतो तर काही बाल्यावस्थेत मृत्यू पावतात. काहीना ऐन तारूण्यात मृत्यू येतो तर काही दरम्यानी वयात मरतात. साधारणपणे वृद्ध झाल्यातर मृत्यू येतो हा समज सतत खोटा सिद्ध होत असतो. तरी प्रत्येक माणूस स्वतःला पूर्ण आयुष्य मिळणार याच विश्वासाने जगत असतो. हाच विश्वास माणसाला बेजबाबदार जीवन जगण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. म्हणून इस्लाम ताकीद करतो की लक्षात ठेवा तुम्हाला कधीही मृत्यू येऊ शकतो. म्हणून जबाबदारीने वागा, अल्लाहचे भय बाळगा.
अनेक जणांना आपल्या आरोग्यावर मोठा विश्वास असतो. पण अनेक ’सुपर फिट’ अंतरराष्ट्रीय खेळाडूंना सुद्धा अचानक मृत्यू येतो. तर अनेक व्यक्ति आपले रोगट शरीर घेऊन वर्षोनवर्ष जगत असतात. म्हणून चांगले आरोग्य जीवंत राहण्याची हमी होऊ शकत नाही. म्हणून सतत मृत्यूची आठवण डोळ्यासमोर ठेऊन जगण्यातच शहाणपण आहे. याचे कारण असे की, समजा कोणाला पूर्ण आयुष्य जरी लाभले तरी ते साधारणपणे 60-70 वर्षाचे असते. त्यातही 15-20 वर्ष बालपण व शेवटची 15-20 वर्षे वृद्धत्वात व्यतीत होतात. मग उरलेल्या तारूण्याच्या 30-40 वर्षात कुणावर अन्याय करून नेहमीसाठीच्या मृत्यूनंतरचे जीवन धोक्यात घालणे किती धोक्याचे आहे, याची चेतावणी कुरआन खालील शब्दात देतो.” लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी, स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशू आणि शेतजमिनी-अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत, पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे. (सुरे आलेइम्रान, आयत नं. 14).
आखिरत संबंधी एक सुंदर तर्क असा देता येईल की, आज आपले अस्तित्व आहे. म्हणून यापूर्वीही (म्हणजे जन्मापूर्वी) ते होते व या नंतरही (म्हणजे मृत्यूनंतरही) ते राहील एवढे निश्चित. ज्याअर्थी आपल्या जन्मापूर्वीच्या जीवनावर आपला काही अधिकार नव्हता व मृत्यूनंतरच्या जीवनावर ही काही अधिकार नसणार आहे तर मग या दोहोंमधील 60-70 वर्षांच्या आयुष्यातच आपल्याला अमर्यादित अधिकार कसा काय मिळू शकतो की आपण मनाला वाटेल तसे जगू, मनाला वाटेल तसे वागू?
वास्तविक पाहता जग हे एक परीक्षा केंद्र आहे. उदा. विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करण्यासाठी कोणतेही पुस्तक / गाईड वापरण्यासाठी स्वतंत्र असतो पण परीक्षा केंद्रात प्रवेश करताच त्याचे सर्व स्वातंत्र्य संपते व वर्षभर त्याने केलेल्या अभ्यासावर त्याचे पुढील भविष्य अवलंबून असते. ठीक असेच या 60-70 वर्षाच्या जीवन काळात माणसं कसेही वागण्यासाठी स्वतंत्र आहेत. मात्र मृत्यू येता क्षणी आपले स्वातंत्र्य संपते. 60-70 वर्षात जगतांना केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांवरच आपले पुढील भविष्य अवलंबून असते. या संबंधी एक सुंदर हदीस आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छीतो ती अशी की - प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टी पूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा.
एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नाची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे. 
1.जीवन कुठे व्यतीत केले 2. तारूण्य कुठे खर्चि घातले 3. संपत्ती कोठून मिळविली. 4. कोठे खर्च केली. 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला.
मृत्यूची सतत आठवण कशी ठेवता येईल?
आधून-मधून कब्रस्तान मध्ये जावे. त्यावेळी आपल्याला जाणीव होईल की या ठिकाणी अशी अनेक माणसं शांतपणे पडलेली आहेत ज्यांना जीवंतपणी वाटत होतं की त्यांच्या शिवाय त्यांचे घर, व्यापार, देश चालूच शकत नाहीत. मृत व्यक्तीच्या गुस्लच्या वेळी हजर राहणे आणि पाहणे तो स्वतः अंघोळ करण्याच्या सुद्धा लायक नाही. तेव्हा त्याची असाह्यता लक्षात येते व आपली औकात आपल्याला कळते. अशा प्रकारे मृत्यूची सतत आठवण ठेवता येईल.
मृत्यू आणि नमाज
माणूस दर दिवशी जीवनापासून दूर तर मृत्यूच्या जवळ जात असतो, मग शहाणा माणूस जवळ येणार्या अडचणीवर मात करण्याच्या तयारीला लागतो. मूर्ख मात्र दर वाढदिवसाला नवीन केक कापत कशाचीच पर्वा न करता जगत राहतो. जरा गंभीरपणे विचार केला तर लक्षात येईल की, मृत्यू आणि नमाज दोन्हीमध्ये एक समानता अशी आहे की, दोन्हीमध्ये माणसाला अल्लाहशी भेटण्याची समान संधी आहे. नमाज मध्येही माणूस अल्लाहची भेट घेतो. मृत्यूनंतरही माणूस अल्लाहची भेट घेतो. नमाज पढतांना ज्याला जेवढा आनंद येत असेल तेवढाच मृत्यू येताना त्याला आनंद येईल. नमाजला जाण्यासाठी ज्याला भिती वाटते त्याला मृत्यूचीही भिती वाटणार, एवढे नक्की. म्हणून मन लावून नमाज अदा करणे अत्यंत आवश्यक आहे. 
जगात मोठ्या प्रमाणात अनैतिकता बोकाळलेली आहे. त्यामुळे नातेसंबंध उध्वस्त होत आहेत. कोणावर कोणाचा विश्वास राहिलेला नाही, अशा परिस्थितीत मुस्लिमांसमोर नैतिक जीवन जगण्याचे एक मोठे आव्हान आहे. यातून मुस्लिमांवरील इतर समाजाचा विश्वास वृद्धींगत होत जाईल, अन्यथा गैरविश्वासाचे जे वातावरण सध्या जगात सर्वत्र व्याप्त आहे त्यात आणखीन भर पडेल. शेवटी कोणीतरी असायलाच हवा ना! ज्याच्यावर विश्वास ठेवून लोक आपले व्यवहार करू शकतील. तर मित्रांनों! सज्ज व्हा, नमाजच्या माध्यमातून नीतिमत्ता हस्तगत करा. कुरआनच्या आदेशांना समजून घ्या म्हणजे त्यांच्यावर अंमलबजावणी करण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होईल. त्यासाठी कायम मृत्यूला डोळ्यासमोर ठेवा. नैतिकतेवर चलण्याचा तो एक खात्रीशीर मार्ग आहे. अल्लाह आपल्या सर्वांचे रक्षण करो. आमीन.

वेश्या बनण्यासाठी विवश होणे यापेक्षा मोठा अपमान एका स्त्रीचा असूच शकत नाही. गरज जेव्हा आपल्या शेवटच्या टप्प्यावर जाते तेव्हा पायात घुंगरू बांधून घेते. याची पुढची पायरी वेश्यावृत्ती असते. तीव्र गरीबीमध्ये माणसाच्या इमानाला धोका निर्माण होतो. 1947 साली इस्लामच्या नावावर पाकिस्तान नावाचा देश तयार झाला. तर 1972 साली बंगाली अस्मितेच्या नावावर बांग्लादेश नावाचा देश निर्माण झाला. तांत्रिकरित्या बांग्लादेश आपल्या देशासारखाच एक धर्मनिरपेक्ष देश असला तरी प्रत्यक्ष रूपात तो एक मुस्लिम बहुल देश आहे. असे असतांना सुद्धा आशियातील सर्वात मोठा वेश्याव्यवसाय याच देशात चालतो. याची त्या देशातील शेख हसीना सरकारला लाज वाटत नाही आणि वेश्याव्यवसाय संपविण्यासाठी ते फारसे गंभीर नाहीत. ही बाब त्यांच्या इमानचा दर्जा दाखविण्यासाठी पुरेशी आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बीबीसीने एक मोहिम घेऊन एक रिपोर्ट प्रकाशित केली आहे. त्यात म्हटलेले आहे की, लुटल्या-पिटल्या अवस्थेत कसे-बसे जीव वाचवून म्यानमारमधून पळून आलेले रोहिंग्या मुस्लिमांच्या 13 ते 20 वर्षीय वयोगटातील अनेक मुलींना फूस लावून काही मुस्लिम महिला ढाक्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये वेश्याव्यवसाय करण्यासाठी बाध्य करीत आहेत. घोर गरीबीत असल्यामुळे या मुलींना हे सर्व निमुटपणे करावे लागत आहे. बीबीसीच्या टीमने खोटे ग्राहक बणून दोन मुली आणि त्यांना पुरविणारा एजंट यांना पकडून पोलीस ठाण्यात हजर केले. मुली मुस्लिम, एजंट मुस्लिम, त्यांचा उपभोग घेणारे मुस्लिम, पकडून देणारे मात्र बीबीसीचे ख्रिश्चन बांधव. बांग्लादेशातील काही मुस्लिमांच्या नैतिक अधःपतनाचा हा एक अंतरराष्ट्रीय पुरावा आहे. 
सध्या उन्हाळ्याचा मोसम सुरू आहे. दोन महिन्यात पाऊस सुरू होईल. त्यावेळेस 7 लाखाच्या कॉक्स बाजार येथील शरणार्थ्यांच्या वस्तीमध्ये साथीच्या रोगांचा जो हाहाकार माजेल त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपल्या देशात पाहूणे म्हणून आलेल्या या दुर्देवी रोहिंग्यांच्या कोवळ्या मुलींचा आपली वासना शमविण्यासाठी बांग्लादेशातील उच्चभ्रू लोक दुरूपयोग करीत आहेत, ही बाब अतिशय वेदनादायक आहे. 
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याबद्दल कुरआनने म्हटलेले आहे की, ” निःसंशयरित्या तुम्ही नैतिकतेच्या सर्वोच्च स्तरावर आहात.” (सुरे अलकलम आयत नं.4). अशा जबरदस्त प्रेषितांच्या बांग्लादेशातील उम्मतीचे हे नैतिक अधःपतन आलमे इस्लामसाठी शरमेची बाब आहे. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना प्रतिबंध करत होते व त्या मार्गाला वक्र करू इच्छित होते आणि परलोक नाकारणारे होते”. (सुरे एराफ आयत नं. 45).या आयातीत म्हटल्याप्रमाणे अल्लाहने कुरआनमध्ये जो सरळ मार्ग दाखविलेला आहे त्याप्रमाणे जीवन जगणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. मात्र समाजामध्ये असेही काही लोक आहेत जे अल्लाहने दिलेल्या सद्मार्गापासून विचलित होवून वक्र मार्ग अवलंबू इच्छितात. बांग्लादेशातील रोहिंग्या मुलींना वाममार्गाना लावणारे लोक याच वर्गात मोडणारे आहेत व आपल्या या नीच कृत्याने त्यांनी अल्लाहच्या गजबला आव्हान दिलेले आहे. 
बांग्लादेशामधील ही परिस्थिती पाहता भारतीयांना ही एक धडा असा घेता येईल की आपल्या देशातील गरीब दलित, मुस्लिम, आदिवासी, सवर्ण सर्वच स्तरातील मुलींच्या भाग्यात असा क्षण येवू नये. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असावे. भांडवलशाही व्यवस्थेच्या नादी लागून पैसा कमाविण्याच्या नादात वेश्याव्यवसाय हत्यार व्यवसायानंतरचा दूसरा मोठा आंतरराष्ट्रीय व्यवसाय झालेला आहे. गरीबांच्या अनेक कोवळ्या मुलींना आमिष दाखवून, मोठी-मोठी स्वप्ने दाखवून शहरात नेवून या धंद्यात अडकविले जाते. यासाठी प्रत्येक स्तरावर आपण सर्वांनी दक्ष राहून कोणाचीच मुलगी अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, यासाठी सर्वांनी दक्ष रहावे.

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 
8624050403
ज्या राज्यात एखादी व्यक्तीसुध्दा अन्याय करत असेल ते राज्य न्यायकारी असू शकत नाही (भाग 2)

जियाउद्दीन बरनीने त्याच्या ग्रंथात सत्यावलोकन आणि सल्लागार मंडळाच्या महत्वाविषयी विस्ताराने लिखाण केले आहे. बरनी एकचालकानुवर्ती, लहरी, हुकुमशाही राजवटीचे स्वरुप बदलण्याची आकांक्षा बाळगून होता. हे त्याच्या लिखाणातील काही मुद्यांवरुन स्पष्ट होते.  ज्या राज्यात एखादी व्यक्तीसुध्दा अन्याय करत असेल ते राज्य न्यायकारी असू शकत नाही. 
         “अभिमान बाळगणे आणि इतरांपासून स्वतंत्र राहणे, दहशतीचे प्रदर्शन करणे, दासतेच्या (इश्वराचा दास) गुणाविरुध्द आहेत. उपर्युक्त गोष्टींचा अधिकार अल्लाहला आहे. काही विद्वानांनी मुसलमान बादशहांसाठी उपर्युक्त गुण योग्य ठरवले आहेत. कारण तो न्याय करतो आणि वैभवातून न्याय उच्चशिखराला प्राप्त करतो. कोणताही अवज्ञाकारी व्यक्ती सुध्दा दीनदुबळ्यांवर अन्याय करु शकत नाही.” ह्यानंतर बरनीने न्याय हे कोणत्याही राजवटीचे मुख्य स्तंभ असल्याचे म्हटलेले आहे. बरनीने राज्य  काही स्तंभावर उभे असल्याचे मत मांडले आहे. त्यातील न्यायसंस्था हे एक स्तंभ असल्याची संकल्पना त्याने मांडली आहे. न्यायकारी बादशहाची राजवट यशस्वी राजवट असते असे त्याचे मत आहे. “बादशहाचा अनिवार्य गुण न्याय आहे. जर बादशहात स्वाभाविक रुपात न्यायाचे गुण विद्यमान असतील. तर प्रेषितांच्या गुणांशिवाय कोणतेच गुण त्याच्याव्यतिरिक्त श्रेष्ठ नाही. बादशाहमध्ये जर न्यायाचे गुण विद्यमान असतील तर इतर सर्व गुणांमध्ये त्याला प्रधान्य देणे गरजेचे आहे. ”  
अत्याचाराचे समुळोच्छेदन  करण्यासाठी बादशाहने सतर्क असावे. बादशाही आपल्या कुटुंबाकडे आहे म्हणून राजपरिवारातील व्यक्तींनी देखील अत्याचार करु नयेत हे सांगताना बरनी म्हणतो,“(अत्याचाराचे समुळोच्छेदन) हे गुण बादशाहची संतती, स्नेही, दास, मित्र, वली (प्रांताचे आधिकारी), काजी तथा आमिल (कर्मचारी) यांच्यात असणे अनिवार्य आहे. ह्यामुळे शासनप्रबंधात सहाय्यता होते. जोपर्यंत बादशाहचे सर्व वली,काजी, आमिल तथा आज्ञा प्रदान करणारे न्यायकारी असणार नाहीत. तोपर्यंत सर्वसाधारण व्यक्तींच्या व्यवहारात न्यायाची प्रस्थापना होत नाही तथा अत्याचाराचे अंत होत नाही. बादशाह त्याचवेळी न्यायकारी असू शकतो. ज्यावेळी त्याच्या राज्यातील अत्याचार संपेल आणि अत्याचारींचा विनाश होईल. जर बादशहाच्या राज्यात एक जरी व्यक्ती अत्याचार करत असेल तर न्याय त्याच्या राज्यात स्थापित होऊ शकत नाही.”  
न्यायाचा प्रसार
न्यायाचा  प्रसारासंबधी बरनी म्हणतो,“बादशाहचे वली,काजी,अमीर तथा अमील ह्यांच्यामध्ये न्यायाचे प्रसार ह्याप्रकारे व्हावे की, त्याच्या राज्यात कष्ट तथा उपद्रव कमी व्हावेत आणि आकाशातून आशिर्वादाची निरंतर वर्षा होत रहावी. बादशहामध्ये स्वाभाविक रुपात न्याय विद्यमान रहावे. तो स्वाभाविक रुपात अत्याधिक न्याय करत असावा. त्याच्या राज्यातील खास आणि आम (व्यक्तींवर) अत्याचार होऊ नये.” न्यायाच्या प्रसाराचे महत्त्व विषद केल्यानंतर जियाउद्दीन बरनी ने अॅरिस्टॉटल आणि सिकंदर चे संवाद नोंदवले आहेत. सिकंदरला अरस्तू (रिस्टॉटल) म्हटले की, “न्याय तथा अत्याचार विरोधाभासी गुण आहेत. जे एका स्थानावर एकाच ठिकाणी एकत्र राहू शकत नाहीत.काही बादशहा आणि शासकांच्या ठिकाणी दोन्ही गुण एकत्र पाहायला मिळतात. ह्याचे कारण काय आहे?  अरस्तूने उत्तर दिले, ‘जर कोण्या बादशाहमध्ये स्वाभाविक रुपात न्याय दिसत असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत अत्याचार करत नाही”.  न्याय आणि समानता, जनतेप्रती कटिबध्दता ह्याविषयी बरनीचे विचार, त्याच्यातील निरपेक्षतेला अधोरेखीत करतात. त्यामुळे धार्मिक भेदाभेद, वांशिक दुराभिमानाविषयीचे त्याच्या नावावर खपवले जाणारे उतारे त्याचेच आहेत का? हा प्रश्न पुन्हा- पुन्हा समोर येतो. एस. के. पारुथी हे देखील प्रक्षेपाचा मुद्दा मांडताना “बरनीच्या लुप्त अंशाचे जिर्णोध्दार करताना एक परिच्छेद लिहिले गेले.” असल्याचे मत मांडतात.
बादशहाच्या कार्यात संतुलन असणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्याने मांडलेल्या मताच्या मुळाशी देखील समतेची मुल्यं दडलेली आहेत. बादशाही कार्यात संतुलनाचा मुद्दा मांडताना तो म्हणतो, “ तुम्हाला ज्ञात असावे की, राज्य-व्यवस्था संबधी उत्तम कार्य दोन प्रकारचे आहेत. सर्वसाधारणांचे (लोकांचे) हक्क अदा करणे, प्रजेच्या प्रती कृपा करणे, दया, न्याय तथा त्यांची सहाय्यता करणे.” दुसर्या प्रकारचे कार्य स्पष्ट करताना त्याने राज्यासाठी ज्या - ज्या व्यक्तींचे योगदान राहिले आहे. त्या - त्या व्यक्तींना योग्य मोबदला दिला जावा.” 
प्रशासन, सैन्य, राजकारभार
बरनीच्या सिध्दातांत काही ठिकाणी त्याच्या वर झालेल्या अन्यायाचे पडसाद उमटले आहेत. बरनीला आयुष्यभर राजकीय लाभांपासून दूर रहावे लागले. मोहम्मद तुघलकाने काही काळ त्याला राजाश्रय प्रदान केला. त्याविषयी स्वतः बरनीने त्याच्या ग्रंथात माहिती दिली आहे. त्यामूळे बरनी अन्यायाच्या विरोधात मोठ्या रोषाने बोलत राहतो. न्यायाचे तत्व मांडताना बरनीने समान न्यायाची संकल्पना मोठ्या आवेषात पुढे रेटली आहे. प्रशसनासंबंधी त्याने अनेक ठिकाणी कर्मचार्यांच्या कर्तव्यावर भाष्य केले आहे. अधिकारी योग्य नसले की प्रशासनावर विघातक परिणाम होतात. त्यामुळे अधिकार्यांची योग्यता तपासून त्यांना प्रशासनात नियुक्ती दिली पाहिजे, बरनीचे हे मत समर्थनीय आहे. बादशहा व अधिकार्यांना रयेतेच्या संदर्भात निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी हे सांगताना तो म्हणतो, “जर एखादी गोष्ट सर्वसंमतीने निश्चित करण्यात आली असेल, ती वासनेच्या विरोधात नसेल आणि त्यातून अभिमान (वृथा अंहकार किंवा गर्वभावना) उत्पन्न होत असेल तर त्यापासून दूर राहिले पाहिजे. वासनेच्या अधिन राहून कार्य केल्याने हानी होते.”  बरनीच्या प्रशासकीय कर्मचार्यांच्या नियुक्ती संदर्भातील विचार समजण्यासाठी उदाहरणादाखल बरीदांच्या नियुक्तीसंदर्भात त्याने केलेले नियम पाहता येतील. मध्ययुगीन डाक व्यवस्थेला अत्यंत महत्त्व होते. अर्थव्यवस्था,लष्कर, महसूली कर गोळा करणे यानंतर डाक व्यवस्थेला महत्त्व दिले जायचे. या खात्यात काम करणार्या कर्मचार्यास बरीद म्हटले जायचे.  बरीद दोन प्रकारचे असायचे, राज्यात त्याच्या नियुक्ती संदर्भात बरनी म्हणतो, “ जनतेची स्थितीगती, त्यांच्यावरील संकटे, त्यांच्यातील रोषभावना ह्यांची माहिती बादशाहला असणे अत्यंत गरजेचे आहे. ” बरीदांच्या नियुक्ती संदर्भात धार्मिक आधारावरुन बरीदांच्या नियुक्तीसंदर्भात कुणी रोखत असेल तर त्याविषयी काय करावे यासंदर्भात म्हणतो, “ जर कुणी मुर्ख तुम्हाला हे सांगत असेल, कुरआनमध्ये हे लिहले आहे की, लोकांनी एक दुसर्यांच्या प्रकरणात लक्ष देऊ नये तर तुम्ही त्याला हे उत्तर दिले पाहिजे की, हा नियम,  लोकांनी एकदुसर्याच्या प्रकरणात लक्ष न घालण्यासंदर्भात आहे. मात्र बादशाहला प्रजेची चांगली, वाईट स्थिती, आज्ञाकारीता तथा अवज्ञाकारीता यांसदर्भात चौकशी करत राहिले पाहिजे.” बरीदांच्या नियुक्तीचे महत्त्व विदीत करुन बरीदांच्या नियुक्तीच्या वेळी लक्षात घ्यावयाच्या अटींसंदर्भात तो म्हणतो, “सर्वात आवश्यक अट बरीदचे गुण आहेत. बरीद खरं बोलणारा असावा. इमानदार, शुध्दवंशीय, विश्वास योग्य तथा आदर सन्मान करणारा असावा. त्याच्या सत्यतेमुळे बादशाह असे कार्य करु शकेल की ज्यातून प्रजेचे हित साधले जाईल.”  बरिदांच्या नियुक्तीबद्दल बरनीने ज्या पुर्वअटी सांगितल्या त्याच पुर्वअटी त्याने अन्य कर्मचार्यांच्या नियुक्तीबद्दल मांडल्या आहेत. 
बरनीच्या ग्रंथातून मध्ययुगीन 
अर्थव्यवस्थेचे आकलन
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात राज्यकर्त्यांच्या अर्थव्यवस्थेला खूप महत्त्व होते. जवळपास सर्व राजकीय घडामोडी अर्थकारणाशी निगडीत होत्या. राजस्व प्रदेशावरील आधिकाराचे तंटे देखील अर्थकारणाशी निगडीत होते. सुलतानांच्या काळात प्रभावी अर्थकारणासाठी महसूली व्यवस्थेत अनेक बदल घडवण्यात आले. अल्लाउद्दीन  खिलजीकृत मुल्यनिर्धारणा असेल कींवा मोहम्मद तुघलक कृत निश्चलनीकरणाचा निर्णय ह्या बाबी एका परिवर्तनाला अधोरेखीत करणार्या होत्या. मात्र डी.डी.कोसाम्बी यांनी सरसकट निष्कर्ष काढून भारतीय सामंतशाहीत सुलतानांमुळे कोणतेच बदल झाले नसल्याचा आरोप केला आहे.  महान इतिससंशोधक मोहम्मद हबीब यांनी मात्र सल्तनकाळातील अर्थव्यवस्थेला एका परिवर्तनाच्या रुपात अधोरेखीत केले आहे. त्यांनी अनेक महत्त्वपुर्ण बदल शोधले आहेत.  अल्लाउद्दीन खिलजीच्या मुल्यनिर्धारणाच्या कृतीला मध्ययुगीन आर्थिक इतिहासात वेगळे महत्त्व प्राप्त आहे. दुष्काळ पडल्यानंतर अन्नधान्याची टंचाई निर्माण होणे स्वाभाविक असते. अशा काळात अन्नधान्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ होते. पण अल्लाउद्दीन खिलजीने बाजारातील मुल्यं नियंत्रीत रहावीत यासाठी शासकीय गोदामातील धान्य बाजारात आणले होते.  बाजारातील मूल्य नियंत्रीत राहिल्याशिवाय प्रजा सुखात जगू शकत नाही. हि त्याची धारणा होती. त्यामूळेच त्याने न्यायावर आधारीत समान मूल्य असणारी बाजार प्रणाली अस्तीत्वात आणली होती. ह्या बाजार प्रणालीला “दारुल अद्ल” म्हटले जायचे. (यासंदर्भात अधिक विश्लेषण मी माझ्या “अल्लाउद्दीन खिलजी - प्रचलित दृष्टीकोन आणि इतिहासातील संदर्भ” या पुस्तकात केले आहे.) (क्रमशः)

मुंबईच्या आझाद मैदानावर तिहेरी तलाकविरूद्ध महिलांचा ऐतिहासिक यल्गार

शरियतसाठी जीव देऊ पण शरियतच्या विरोधात काहीही होवू देणार नाही : आसमा जोहरा

मुंबई (नाजीम खान) - सरकार जगासमोर मुस्लिम महिलांना लाचार आणि मुस्लिम पुरूषांना अत्याचारी असल्यासारखी चुकीची प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे जी की चुकीची आहे. एकंदरित असे वातावरण तयार करण्यात आलेले आहे की, प्रत्येकजण दररोजच तलाक देतो आणि प्रत्येक पुरूष चार बायकांबरोबर लग्न करतो. शरिया कायद्याचा अभ्यास न करताच सरकारने हा कायदा लोकसभेत रेटून नेलेला आहे. तिहेरी तलाक सरकारचा बहाना असून, त्या नावाखाली सरकार शरई कायद्यावर निशाना साधत आहे. मोठ्या हुशारीने या बिलाला द मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ऑफ राईटस् ऑन मॅरेज बिल 2016 असे नाव देण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता हा कायदा मुस्लिम पुरूषांना तुरूंगात पाठविणे आणि मुस्लिम महिलांना भीक मागण्यासाठी वार्यावर सोडून देणे यासाठी तयार करण्यात आलेला आहे. आम्ही महिला या कायद्याचा निषेध करतो. वास्तविक पाहता इस्लाममध्ये जे अधिकार आम्हा महिलांना प्राप्त आहेत, त्यापासून इतर धर्मातील महिला वंचित आहेत. सरकारला जर खरोखरच मुस्लिम महिलांविषयी इतकी कळकळ असेल तर त्यांनी बेरोजगार मुस्लिम तरूणांना रोजगार द्यावा. आमची खरी समस्या बेरोजगारी आहे. तिहेरी तलाक नाही.’ असे व्यक्तिगत मंडळाच्या महिला शाखेच्या अध्यक्ष आसमा जोहरा म्हणाल्या.
अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आवाहनानुसार कुल जमाती तंजिम मुंबईच्या वतीने 31 मार्च 2018 रोजी तिहेरी तलाकविरोधात मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. केंद्र सरकारने तयार केलेल्या व लोकसभेत पास झालेल्या तिहेरी तलाकमधील तरतुदी उदाहरणार्थ एकाच वेळेस तीन तलाक देणार्या व्यक्तीस तीन वर्षाच्या तुरूंगवासाची तरतूद, सदरचा गुन्हा अजामीनपात्र असणे या तरतुदींना अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तीगत कायदा मंडळाने विरोध दर्शविला असून, हा विरोध मूर्त स्वरूपात दिसावा यासाठी बोर्डाच्या निर्देशानुसार लाखो महिलांनी मुंबई येथे पहिल्यांदा एवढा मोठा मोर्चा काढला होता.
या सभेत मुंबईच्या प्रत्येक भागातून मोर्चाच्या स्वरूपात लाखो महिला सामिल झाल्या. या मोर्चाचे वैशिष्ट्ये म्हणजे याची सुरूवात ऐन दुपारी रखरखत्या उन्हात 2 वाजता झाली. याचे दूसरे वैशिष्ट्ये म्हणजे यात फक्त महिलाच होत्या. एकाही पुरूषाला मोर्चामध्ये किंवा व्यासपीठावर स्थान देण्यात आलेले नव्हते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. मैदानाच्या बाहेरच्या बाजूस मात्र काही पुरूष पोलीस प्रवेश द्वारावर तैनात होते. 
यावेळी प्रा. मुनिशा बुशरा आबेदिना म्हणाल्या, ’ तिहेरी तलाक आमची समस्या मुळीच नाही. जर सरकारला आमची काळजी असेल तर सरकारने आम्हाला गरीबीतून बाहेर काढावे. आम्हाला मोफत शिक्षण द्यावे. मॉब लिंचिंग सारख्या घटना घडू देऊ नयेत. मुस्लिम पुरूषांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण द्यावे, इशरत जहाँ आणि जकीया जाफरी सारख्या महिलांना व त्यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा.’ 
जमाअते इस्लामी तर्फे नालासोपारा येथून आलेल्या महिला कार्यकर्ता अर्शिया शकील यांनी यावेळेस बोलताना सांगितले की, ’ इस्लामचे जे शरई कायदे आहेत ते आम्हाला मान्य आहेत. त्यानुसार आम्हाला तलाक जरी झाला असला तरी दूसरे लग्न करता येते. आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जीवन जगू शकतो. तिहेरी तलाक बिल राज्यसभेत पास झाले तर तो आम्हा स्त्रियांवर कोसळलेली एक आपत्ती ठरेल. आज भारतात अशा 24 लाख मुस्लिमेत्तर स्त्रिया आहेत ज्यांना नवर्यांनी सोडून दिलेले आहे. त्यांना तलाकही दिलेली नाही. सरकारने त्यांच्या भविष्याचा विचार करावा. त्यांची मदत करावी. एकंदरित सरकारने पास केलेला कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अन् शरियतमध्ये हस्तक्षेप करणे सोडावे, अशी मागणीही मोर्चेकर्यांनी केली.
यावेळी आईन रजा सलीम अख्तर, अॅड. मुनव्वार अलवारे, जाहेदा अबु आसीम आजमी, झकिया फरीद शेख, तब्बसुम रिजवी, सुफिया शेख, सुमय्या पटेल, आजरा अन्सारी आदींसह मुंबईच्या विविध भागातून आलेल्या महिलांनीही कार्यक्रमास संबोधित केले. सभेनंतर 9 स्त्रियांची एक टीमने प्रशासकीय सचिवांना मेमोरेंडम दिले. त्यानंतर मौलाना महेमूद दरयाबादी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खलीलउर रहेमान, सज्जाद नोमानी यांनी दुआ केली.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget