Halloween Costume ideas 2015
Latest Post

Olive

'वनस्पती संसाधनांचा वापर' या विषयाचा अभ्यास केल्यावर प्रत्येक वनस्पतीचे एक एक रहस्य उलगडते. अशाच एका बहुगुणी वनस्पतीचा उल्लेख कुरआनमध्ये ठिकठिकाणी आलेला आहे ती म्हणजे जैतून किंवा ऑलिव्ह. अत्यंत उपयुक्त असलेल्या ऑलिव्हची संपूर्ण जगात मागणी आहे. इ.स.पू. ३००० वर्षांपासून पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशात हा लागवडीत असल्याचे संदर्भ सापडतात. इतर फळझाडांच्या तुलनेत ऑलिव्ह वृक्ष दीर्घकाळ जगतात. मराठी विश्वकोशात जैतूनच्या आयुष्यासंबंधी नमूद आहे की पॅलेस्टाइनमध्ये २००० वर्षांहून अधिक वर्षे जगलेले वृक्ष आढळले आहेत.

हजारो, लाखो वनस्पतींपैकी मोजक्याच झाडांचा उल्लेख कुरआनमध्ये आढळतो, त्यापैकी जैतून ही एक अशी वनस्पती आहे जिचा उल्लेख करताना त्याचा उपयोगही उल्लेखित आहे. जसे की अध्याय 'अल्-मुअमिनून'च्या आयत २० मध्ये आले आहे,

"तसेच आम्ही त्या वृक्षाला उगवले, जो सिनाई पर्वताच्या परिसरात तेलासह उगवतो आणि खाणाऱ्यांसाठी कालवण सुध्दा आहे."

या आयतीमध्ये जैतूनचा वृक्ष अभिप्रेत आहे. येथे 'जैतून'चा स्पष्ट उल्लेख नसला तरी कुरआनच्या सर्व भाष्यकारांनी आपल्या लेखनात तो वृक्ष जैतूनच असल्याची खात्री दिली आहे. मौलाना मौदुदी आपल्या तफहीमूल-कुरआन या ग्रंथामध्ये लिहितात,

"या वृक्षाशी अभिप्रेत 'जैतून' म्हणजे 'आलिव्ह' आहे. हे रोम समुद्राच्या सभोवताली प्रदेशातील उत्पन्नांपैकी सर्वांत जास्त महत्त्वाची वस्तू आहे. सिनाई पर्वताशी याला संबंधित करण्याचे कारण बहुधा असे आहे की ज्या प्रदेशातील प्रसिद्ध ठिकाण सिनाई पर्वत आहे, तोच या वृक्षाचे मूळ उगमस्थान आहे."

तसेच मौलाना अब्दुर्रहमान क़ीलानी आपल्या तैसीरूल कुरआन या ग्रंथात म्हणतात,

"या आयातीमध्ये उल्लेखित वृक्ष ऑलिव्ह असल्याचे अभिप्रेत आहे. सीरिया आणि पॅलेस्टाईन ही या झाडाची मूळ जन्मभूमी आहे आणि 'सिनाई'चा उल्लेख यासाठी केला गेला कारण ते या भागातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या झाडाचे आयुष्य, उंची आणि प्रसार खूप जास्त असतो, जसे आपल्याकडे वटवृक्ष आहे. जास्त पसरल्यामुळे त्याच्या अनेक फांद्या जमिनीवर येऊन आधार देतात. ऑलिव्हच्या झाडापासून तेल मुबलक प्रमाणात मिळते. वैद्यकीयदृष्ट्या हे तेल अतिशय उपयुक्त आहे. तसेच बरेच लोक त्याच्या फळांचे लोणचे करतात. त्याचे तेल खाण्यासाठीही वापरले जाते आणि कालवणामध्ये तुपाऐवजीही वापरले जाते. यांबरोबरच हृदयविकार, मधुमेह आणि जुनाट आजारांवर उपचार म्हणून जैतूनच्या तेलाचा उपयोग होतो. अल्लाहने या आयतीव्यतिरिक्त अध्याय 'अत्-तीन'मध्येही ऑलिव्हचा उल्लेख केला आहे."

यूरोपीय ऑलिव्ह हा मूळचा पश्चिम आशियातील असला तरीही मोठ्या प्रमाणात स्पेन,  इटली,  ग्रीस,  पोर्तुगाल इ. भूमध्यसामुद्रिक प्रदेशांत तसेच उत्तर अमेरिकेतील काही भागांत याची लागवड केली जाते.

यावरून हे लक्षात येते की या वनस्पतीची ऐतिहासिक, वैद्यकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक भूमिका वनस्पतीशास्त्रात संशोधनाचा विषय ठरू शकते.

(क्रमशः)


डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६



जागतिक ज्ञान, आंतरिक शांती, सक्षम मार्गदर्शन, वेळेचा सदुपयोग, प्रेरणा, प्रोत्साहन, मदतनीस, समस्यांचे निराकरण, नवीन चेतना, नावीन्य, जागरूकता, अद्यावतता, उत्तम साथीदार, यश, गुरू, सल्लागार अशा अनेक मौल्यवान गुणांचे सार म्हणजे पुस्तके. आजच्या आधुनिक युगात, यांत्रिक संसाधनांमुळे आपल्याला जगभराशी जुळणे सोपे झाले आहे. सर्वत्र माहितीचा महापूर आला आहे. पुस्तके हे ज्ञानाचे मुख्य स्त्रोत आहेत असे म्हणतात, जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तकांचा सहवास आवश्यक आहे. पुस्तके मानवी जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत निःस्वार्थ साथीदार बनून यशाचा मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. पुस्तकांशी मैत्री करणारा माणूस नेहमी आनंदी आणि ज्ञानी बनून राहतो, ज्यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात. इंटरनेटच्या माध्यमातून, पुस्तकं फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहेत, आपल्याला पाहिजे तेव्हा आणि कुठेही आपण ई-पुस्तके वाचू आणि संग्रहित करू शकतो.

पुस्तकांचे महत्त्व समजून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २३ एप्रिल रोजी जगभरात “जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन” साजरा केला जातो. या वर्षी २०२४ ची थीम आहे “रीड योर वे”, जी वाचनाची आवड वाढवण्यासाठी निवड आणि आनंदाच्या महत्त्वावर भर देते. आयुष्यात पुस्तकांचे स्थान अतुलनीय आहे, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते. ज्याला पुस्तकांचे महत्त्व कळले आहे तो आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही. पुस्तकांच्या मदतीने आपण जगाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम स्थान प्राप्त करू शकतो.

सतत पुस्तके वाचण्याची सवय माणसाच्या जीवनाचा विकास करते. वाचनाने मेंदू तल्लख होऊन स्वविचार करत काही नवीन ज्ञान शोधण्याची शक्ती आपल्याला मिळते. वाचन सुरू ठेवल्याने आपण हुशार बनतो. लेखन कौशल्य, भाषा कौशल्ये सुधारतात, लक्ष केंद्रित आणि एकाग्रता वाढते, आपण जीवनात अंधारातून प्रकाशाकडे जातो, आपण आपल्या वेळेचा योग्य वापर करू शकतो, नवीन माहिती आणि ज्ञान मिळवू शकतो, वाचनामुळे तणाव कमी होतो, आपण नेहमी सजग आणि सतर्क राहतो आणि वाचनामुळे आपल्याला चांगली झोप लागते. स्मृतिभ्रंशापासून बऱ्याच प्रमाणात आपण दूर राहतो. 

डिजिटलायझेशनमुळे, प्रत्येकजण त्यांच्या मागणीनुसार आणि सोयीनुसार पुस्तके ऑनलाइन वाचू शकतो, ऑनलाइनद्वारे आपण जगाशी नेहमीच जोडलेले राहतो. वाचकांच्या आवडीनुसार जगभरातील विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. अनेक प्रकाशक, कंपन्या, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक, ईबुक विक्रेते, सरकारी पोर्टल व इतर त्यांच्या वेबसाइटवर डिजिटल स्वरूपात पुस्तके अपलोड करतात, जेणेकरून ई-पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचू शकतील. आता तर वाचनाचा वेळ वाचवण्यासाठी सुद्धा डिजिटल मार्केटमध्ये ऑडिओ बुक्सही उपलब्ध आहेत. 

ई-पुस्तके अगदी सहज उपलब्ध आहेत, पण ती छापील कागदी पुस्तकांची जागा घेऊ शकत नाहीत. बरेच लोक ऑनलाइन पुस्तके डाउनलोड करतात, परंतु फार कमी लोक ती पूर्णपणे वाचतात. ही ई-पुस्तके आपल्याला कागदी पुस्तकांप्रमाणे वाचण्यास प्रवृत्त करत नाहीत, जेव्हाकी ह्या बऱ्याचदा त्रासदायक वाटतात. कागदी पुस्तकांच्या विपरीत, ई-पुस्तकांमध्ये आसक्ती किंवा प्रेरणा नसलेली दिसते, आपण स्वतःला त्यांच्याशी भावनिकरित्या जोडू शकत नाही. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी कागदी पुस्तके मुख्य सहायक असतात. ई-पुस्तकांमध्ये, आपण बहुतेक मर्यादित माहिती वाचतो आणि नंतर पुष्कळदा ती विसरतो. तर कागदी पुस्तकात वाचताना आपण विषयाच्या खोलात जाऊन समस्येवर उपाय शोधतो, संपूर्ण पुस्तक वाचतो, त्यामुळे पुस्तकातील संपूर्ण ज्ञान आपल्या नेहमी लक्षात राहते आणि पुस्तकाचा देखील उद्देश हाच आहे की त्याच्या ज्ञानाचा संपूर्ण लाभ वाचकांपर्यंत पोहोचावा.   तर बहुतेक वाचक ई-पुस्तकांमध्ये केवळ उपयुक्त माहिती शोधतात, तांत्रिक बिघाड ही देखील एक समस्या आहे आणि त्याही मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप यातून ई-कचरा पर्यावरणासाठी धोकादायक पातळी पर्यंत पोहोचला आहे.

ज्याला वाचाता येत, तो गरीब असला तरी तो कुठेही पुस्तके वाचू शकतो, सार्वजनिक ग्रंथालयात जाऊन तिथली पुस्तके वाचू शकतो. परंतु ई-पुस्तके वाचण्यासाठी विशेष यांत्रिक संसाधने आणि कौशल्ये आवश्यक आहेत, ज्यासाठी आर्थिक खर्च आणि थोडेफार प्रशिक्षण आवश्यक आहे, जसे:- संगणक, लॅपटॉप, मोबाईल, वीज, इंटरनेट आणि तांत्रिक प्रशिक्षण. तर कागदी पुस्तकांमध्ये या गोष्टी आवश्यक नाहीत. वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना पेपर बुकच्या माध्यमातून शिकवणे सोपे जाते, तर ई-बुक्स द्वारे शिकवण्यासाठी प्रोजेक्टरचा खर्च उचलावा लागतो. 

पुस्तकांचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन करताना लक्ष, मन आणि डोळे पुस्तकावर केंद्रित करावे लागतात. परंतु इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या स्क्रीनवर सतत लक्ष केंद्रित केल्याने काही काळानंतर तणाव, डोकेदुखी, दृष्टीदोष सारख्या समस्या जाणवू लागतात, कारण संगणकाची स्क्रीन दृष्टीवर परिणाम करते. ई-पुस्तकांची सहज उपलब्धता, वेळेची बचत आणि सहज साठवणूक असूनही, पुस्तकांमध्ये असलेले संपूर्ण ज्ञान वाचकांनी आत्मसात करणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश कागदी पुस्तकांच्या तुलनेत ई-पुस्तकांमध्ये पूर्णता दिसून येत नाही. ई-पुस्तक वाचन हे गंभीर काळात किंवा अल्प कालावधीसाठी वरदान आहे, परंतु दीर्घकाळापर्यंत ते शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण करू शकतात. यांत्रिक उपकरणांच्या सतत वाढत्या वापरामुळे आपण त्या साधनांवर अवलंबित झालेले आहोत, आता आपल्याला आपल्या प्रियजनांचे मोबाईल नंबरही आठवत नाहीत. ह्या मुळे आपली विचारशक्ती- स्मरणशक्ती क्षीण होत आहे, आधुनिकतेचा हा खूप मोठा दोष आहे. आजपर्यंत, कोणत्याही संशोधनात किंवा सर्वेक्षणात छापील पुस्तके वाचल्यामुळे कोणत्याही समस्या किंवा हानी झाल्याचे दिसले नाही, परंतु कोरोनाच्या काळात ऑनलाइन अभ्यासामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या समोर आल्या आहेत.

ई-पुस्तके आणि छापील पुस्तके यातील निवड हा शेवटी आपला वैयक्तिक निर्णय आहे. परंतु जेव्हा आपण जागतिक स्तरावर वाचकांची पसंती पाहतो, तेव्हा जगभरातील वाचकांच्या हृदयात छापील पुस्तकांसाठी विशेष स्थान दिसून येते, जेव्हा की ई-पुस्तकांचे वेगळे फायदे आहेत. आता वाचकांनी या दोघांच्या संभाव्य गुण-दोषांची जाणीव ठेवावी आणि आपल्या मागणीनुसार समतोल साधावा, जे आपल्या वैयक्तिक गरजा आणि वाचनाच्या आवडीनिवडींसाठी उत्तम आहे.


-डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041



बेगम हजरत महल, १८५७ च्या बंडातील एक प्रमुख महिला नायक, यांचा जन्म १८३० मध्ये उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे झाला. तिचे नाव मुहम्मदी खानम आहे. तिचे वडील फैजाबादचे गुलाम हुसेन. तिच्या कोवळ्या वयातच तिने साहित्यात चांगली प्रतिभा दाखवली. तिचा विवाह अवधचा नवाब वाजिद अली शाह यांच्याशी झाला होता. त्यांना मिर्झा बिर्जीस कदीर बहादूर हा मुलगा झाला.

१३ फेब्रुवारी १८५६ रोजी ब्रिटिश सैन्याने वाजिद अली शाह यांना कैद केले. त्यांनी त्यांना १३ मार्च रोजी कलकत्त्याला पाठवले आणि अवधवर बेकायदेशीरपणे कब्जा केला. यामुळे लोक आणि स्थानिक राज्यकर्ते नाराज झाले. त्यांनी बेगम हजरत महल यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध उठाव केला. दि. ३१ मे १८५७ रोजी अवधची राजधानी लखनौच्या चवनी भागात स्थानिक राज्यकर्ते आणि लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वातंत्र्य घोषित केले. त्यांनी ब्रिटिश सैन्याला धडा शिकवला आणि लखनौमधील त्यांची सत्ता नष्ट केली.

नंतर बेगम हजरत महल यांनी ७ जुलै, १८५७ रोजी त्यांचा मुलगा बिरजीस कदीर याला अवधचा नवाब म्हणून घोषित केले. राजाची आई म्हणून, त्यांनी १,८०,००० सैन्य एकत्र केले आणि प्रचंड पैसा खर्च करून लखनौ किल्ल्याचे नूतनीकरण केले. बेगम हजरत महल यांनी राज्याच्या सुशासनासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली ज्यामध्ये मुम्मू खान, महाराजा बालकृष्ण, बाबू पूर्ण चंद, मुन्शी गुलाम हजरत, मोहम्मद इब्राहिम खान, राजा मानसिंग, यांसारख्या सदस्यांची नियुक्ती केली. राजा देसीबक्ष सिंह, राजा बेनी प्रसाद आणि इतर. शराफ उद-दौला यांची मुख्यमंत्री म्हणून आणि राजा जेल लाल सिंग यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बेगम हजरत महल यांनी आपल्या मुलाच्या वतीने सुमारे दहा महिने राज्य केले आणि लोकांमध्ये आणि स्थानिक राज्यकर्त्यांमध्ये देशभक्तीची प्रेरणा देऊन ब्रिटिश सैन्याला आव्हान दिले. हजरत महल यांनी ३१ डिसेंबर, १८५८ रोजी एक ऐतिहासिक विधान जारी केले आणि १ नोव्हेंबर १८५८ रोजी राणी व्हिक्टोरियाने जारी केलेल्या घोषणेला आव्हान दिले.

परंतु, जेव्हा पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे मुख्य केंद्र असलेली दिल्ली ताब्यात घेण्यात आली, तेव्हा ब्रिटिश सैन्याने मार्च १८५९ मध्ये लखनौला वेढा घातला आणि हल्ला केला. कंपनीचे सैन्य आणि बेगमच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. जेव्हा पराभव अपरिहार्य झाला तेव्हा बेगम हजरत महल नानासाहेब पेशवे आणि इतरांसारख्या सह-क्रांतिकारक नेत्यांसह नेपाळच्या जंगलात आश्रय घेतला.

बेगम यांना लखनौला परत आणण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्यांना प्रचंड पैसा आणि विलासी सुविधा देऊ केल्या. परंतु बेगम हजरत महल यांनी त्यांना नकार दिला आणि स्वतंत्र अवध राज्याशिवाय दुसरे काहीही त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले. बेगम हजरत महल आपल्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडत होत्या. ७ एप्रिल १८७९ रोजी तिचे नेपाळमधील काटमांडू येथे निधन झाले. १९८४ मध्ये भारत सरकारने तिच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम



- नजराना दर्वेश (गोवा)

जमाअत-ए-इस्लामी हिंद, गोवा तर्फे अनुक्रमे १८, १९, २० आणि २४ एप्रिल २०२४ रोजी सांवोर्डेम, मडगाव, पणजी आणि म्हापुसा यासह राज्यातील विविध ठिकाणी ईद मिलन कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या कार्यक्रमांना हजेरी लावत त्यांच्या अंतर्दृष्टी आणि अमूल्य विचारांनी उपस्थितांना समृद्ध केले.

आदरणीय वक्त्यांमध्ये डॉ. प्रज्ञा काकोडकर, प्रदीप काकोडकर (चार्टर्ड अकाउंटंट), बिलाल अहमद शेख (प्रोप्रायटर, बिल कोचिंग कर्चोरम), फादर अॅशलिफ कोरिया (साहाय्यक पॅरीश पाद्री, गार्डियन एंजल चर्च, सांवोर्डेम), चिन्मय मिशनच्या स्वामिनी गोपिका नंदा सरस्वती, रोझरी चर्च नावेलिमचे फादर गॅब्रिएल कौटिन्हो, जेआयएचचे संचालक मौलाना इक्बाल मुल्ला, रेव्ह. संदेश प्रभुदेसाई, पत्रकार व लेखक आसिफ हुसेन, जेआयएच गोवा प्रदेशाध्यक्ष, पिलर सेमिनरीचे फादर पीटर मेलो फर्नांडिस आणि जेआयएचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सलीम इंजिनीअर उपस्थित होते.

सचिव समीउल्ला बेलवाडी, अब्दुल रहमान खान आणि मीनाज बानो यांनी प्रास्ताविकात जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या गेल्या ७७ वर्षांतील स्तुत्य कार्यांवर प्रकाश टाकला. विशेषत: मणिपूर हिंसाचार आणि कोविड-१९ महामारीसारख्या संकटाच्या काळात सामाजिक उन्नतीसाठी संघटनेच्या सक्रिय भूमिकेवर त्यांनी भर दिला. याशिवाय, फोरम फॉर डेमोक्रेसी अँड कम्युनिटी एलोसिटी आणि सद्भावना मंच यासारख्या विविध उपक्रमांद्वारे सामाजिक न्याय, मानवी हक्कांचे समर्थन आणि सांप्रदायिक सलोखा वाढविण्यासाठी जेआयएचची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली.

संदेश प्रभुदेसाई यांनी ‘द्वेष’साठी कोंकणी शब्द नसल्याची आठवण करून दिली, तर ‘मोग’ आणि ‘माया’सारखे ‘प्रेम’ या शब्दासाठी अनेक शब्द असल्याचे सांगितले. ‘द्वेष’ या शब्दाची अनुपस्थिती गोव्यातील लोकांमध्ये अंतर्निहित ऐक्य आणि द्वेषाचा अभाव दर्शविते. हे ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम सामायिक समस्या सोडविण्यासाठी एकत्र आल्याच्या ऐतिहासिक उदाहरणांवरून दिसून येते, असे त्यांनी सुचवले. प्रभुदेसाई यांनी आजच्या विभाजनकारी काळात एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि ‘गोकर्पण’ (गोव्याची अस्मिता) जपण्याची गरज अधोरेखित केली आणि समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी गोव्याच्या नागरिकांना ऐतिहासिक ऐक्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

आसिफ हुसेन यांनी मानवाची एकता ही एकमेव ईश्वराची निर्मिती आहे, यावर भर दिला आणि फुटीरतावादी आख्यानांचे अनुसरण करण्याऐवजी शांतता, सौहार्द आणि बंधुतेसाठी सर्व पैगंबरांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचे आवाहन केले. प्रज्ञा काकोडकर यांनी सामुदायिक परस्परावलंबित्वाची उदाहरणे सादर करून इतरांचे जीवन समृद्ध करण्यात प्रत्येक समाजाची अविभाज्य भूमिका असल्याचे सांगितले. प्रदीप काकोडकर यांनी भारताची अस्मिता समृद्ध करण्यासाठी ‘ईद मिलन’सारख्या कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि एकता जपण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. फादर अॅशलिफ कोरिया यांनी बायबलच्या प्रेरणेने सर्व समुदायांमध्ये एकतेवर भर दिला आणि अधिक सर्वसमावेशक समाजासाठी बंधुभाव वाढविण्याचे आवाहन केले. फादर गॅब्रिएल कौटिन्हो यांनी शिक्षणात प्रगती होऊनही गुन्हेगारी वाढत असल्याची खंत व्यक्त केली आणि शिक्षण आणि अध्यात्म यांच्यातील संबंध अधोरेखित केले. स्वामिनी गोपिका नंदा सरस्वती यांनी धर्माच्या एकात्मतेवर भर दिला. फादर व्हिक्टर फेरराव यांनी सामूहिक संवाद आणि ज्ञानप्रसाराच्या माध्यमातून विभाजनवादी शक्तींचा प्रतिकार करण्याचे आवाहन केले. फादर पीटर यांनी प्रार्थना, उपवास आणि दान यावर लक्ष केंद्रित करून आध्यात्मिक उन्नती जोपासण्यासाठी धार्मिक परंपरांमधून शिकण्यावर भर दिला. 

सलीम इंजिनिअर यांनी करुणेच्या सार्वत्रिक संदेशावर भर देत आजच्या जगात प्रेमाने आणि सामंजस्याने जगण्याची प्रासंगिकता विशद केली. मौलाना इक्बाल मुल्ला यांनी ईद उत्सव आणि सहजीवनाविषयी इस्लामी दृष्टिकोनाची माहिती दिली. बिलाल शेख यांनी ईश्वरभान बळकट करण्यासाठी आणि मुस्लिम जीवन सुधारण्यासाठी रमजानचे महत्त्व अधोरेखित केले.

मान्यवर वक्त्यांनी सर्वसमावेशकता, परस्पर आदर आणि विविधतेचा उत्सव साजरा करण्याचा संदेश आपल्या भाषणातून दिला, ज्यात ईद मिलन सोहळ्याची व्याख्या करणारी एकता आणि परस्पर सन्मानाची भावना दर्शविली गेली. असे आंतरधर्मीय संवाद आपल्या वैविध्यपूर्ण समाजात समजूतदारपणा, सौहार्द आणि सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण मंच म्हणून काम करत असल्याचे मनोगत त्यांनी या वेळी व्यक्त केले.



महाराष्ट्रात महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार उभा केलेला नाही. यामुळे काँग्रेस आणि सपासह आघाडीत सहभागी असलेल्या विविध पक्षांचे मुस्लिम नेते नाराज झाले आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचा समावेश आहे. सत्ताधारी महायुती किंवा विरोधी महाविकास आघाडीकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. राज्यात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे १.३० कोटी आहे, जी राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ११.५६% आहे. ४८ जागांपैकी किमान १४ जागा अशा आहेत, जिथे मुस्लिम मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. मुंबईतील सहाही जागांबरोबरच धुळे, नांदेड, परभणी, लातूर, औरंगाबाद, भिवंडी, अकोला आणि ठाण्यातील निवडणुकांमध्ये या समाजाची महत्त्वाची भूमिका आहे.

६० च्या दशकात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत राज्यातून एकूण ५६७ खासदार (लोकसभा खासदार) निवडून आले आहेत. ज्या राज्यात प्रत्येक दहावा माणूस मुस्लिम आहे, त्या राज्यात या ५६७ खासदारांपैकी केवळ १५ म्हणजे अडीच टक्क्यांपेक्षा कमी खासदार मुस्लिम होते. गेल्या काही वर्षांत राज्याच्या निवडणुकीच्या राजकारणात मुस्लिम अधिकाधिक उपेक्षित झाले आहेत. त्यांना तिकीट देण्यास राजकीय पक्ष कचरत आहेत. महाराष्ट्रात गेल्या चार सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी केवळ पाच मुस्लिम उमेदवार उभे केले होते. २००९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एक, तर २०१४ मध्ये काँग्रेसने एक उमेदवार उभा केला होता. तर २०१९ मध्ये काँग्रेसने अकोल्यात हिदायत पटेल हा एकच मुस्लिम उमेदवार उभा केला होता. या वेळी विरोधी आघाडीने मुस्लिमांना एकही तिकीट दिलेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिमांचे प्रतिनिधित्व ९ वरून १० वर गेले असून मुस्लिम मतांचे विभाजन झाले नसते तर हे प्रमाण अधिक झाले असते.

सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातून एकच मुस्लिम नेता लोकसभेत पोहोचला, तोही एमआयएमच्या तिकिटावर. मुस्लिम मतदारांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ही स्वाभाविक पसंती असली तरी वंचित बहुजन आघाडीच्या उदयानंतर राजकीय आघाडी मुस्लिमांना मतांची विभागणी करण्याचा नवा पर्याय महाराष्ट्रात मिळाला आहे. प्रतिनिधित्व नाकारल्यामुळे हा समाज काँग्रेस-राष्ट्रवादीकडून एमआयएमसारख्या मुस्लिमकेंद्रित पक्षाकडे ढकलला गेला आहे.

भारतातील मुस्लिमांचे राजकीय सक्षमीकरण तेव्हाच शक्य आहे जेव्हा ते आपल्या क्षमतेने राजकारणाचा खेळ खेळतील. महाराष्ट्रातील मुस्लिमांना आपली आंतरिक ताकद शोधावी लागेल आणि त्यांच्याकडे असलेल्या पर्यायांपैकी विजयी उमेदवारांना मतदान करावे लागेल. मुस्लिमांच्या विखुरलेल्या राजकीय शक्ती पाहून भाजपने २०१४ नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार डावलून निवडणुका लढवल्या त्याला यशही प्राप्त झाले. मुस्लिम उमेदवार मुक्त निवडणूक जिंकून भाजपने केलेला प्रयोग इतर पक्षांकडून मुस्लिम समाजाला भय दाखविण्यासाठी फायद्याचे ठरले. आज मुस्लिम उमेदवार देणे तर दूरच “मुस्लिम मतांची पण आवश्यकता नाही” किंवा “मुस्लिमांना आमच्याशिवाय पर्याय नाही” असे बोलण्याइतपत मजल राजकीय पुढाऱ्यांची गेली आहे.

महाविकास आघाडी/इंडिया आघाडीने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही पण त्यांच्या अजेंडा/घोषणापञात महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काय भूमिका घेतली हे पण स्पष्ट केलेले नाही. मुस्लिम मतदारांनी शिक्षण-आरक्षण-संरक्षण-रोजगार-हक्क या मुद्द्यांचा विचार करणाऱ्या उमेदवाराचा विचार करायला हवा. सर्वच राजकीय पक्षांनी देशपातळीवरच नव्हे तर आता राज्य पातळीवर देखील मुस्लिमांना संभ्रमावस्थेत टाकून अर्थात राजकीय नेतृत्वापासून वंचित केले आहे. या सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून मुस्लिम समाजाने यापुढील रणनीती आखायला हवी, तरच सध्या फक्त बोटाला शाई लावण्यापुरता राहिलेला समाज आगामी काळात ती शाईदेखील मिळणे कठीण होऊन बसेल. मुस्लिमांसाठी ही निवडणूक अनेक अर्थांनी आव्हानात्मक आहे. मात्र, मुस्लिमांच्या प्रश्नांमध्ये पूर्वी कोणत्याही पक्षाला स्वारस्य नव्हते आणि आताही नाही. यासंदर्भात अनेक मुस्लिम नेत्यांनी अशा प्रसंगी विविध रणनीती सुचवून त्याचे पालन करण्यास प्रोत्साहन दिले. पण असे सर्व प्रयत्न तात्पुरते आणि घाईगडबडीचे ठरत आहेत. मुस्लिम मतदारांची ही अपरिहार्य भूमिका मुस्लिमांच्या बाजूने पुरेसा फायदा देऊ शकली नाही. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष मुस्लिम नेत्यांचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी करतात आणि खुद्द मुस्लिम नेत्यांचाही नकळत त्यांच्यासाठी मोहरा म्हणून वापर केला जात आहे.

जवळपास सर्वच प्रसंगी मुस्लिम नेत्यांनी समस्यांमध्ये रस दाखवला, पण या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्यावर कोणती जबाबदारी आहे, याकडे गांभीर्याने पावले उचलली गेली नाहीत. मुस्लिम नेत्यांची वृत्ती अनेक प्रसंगी उत्साह आणि भावनेचा उत्कृष्ट नमुना ठरली, पण वास्तवाचा स्वीकार आणि आपल्या कर्तव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात फारसा फरक नव्हता. अशा प्रकारे मुस्लिम समाज शोषणाच्या चक्कीत पुरता अडकला आहे. निवडणुकीपूर्वी आपल्या मतांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आणि कोणता उमेदवार त्यांना प्रामाणिक आणि पाठिंबा देईल आणि शत्रू आणि दुष्ट कोण असतील हे जाणून घेण्यासाठी मुस्लिम लोकांमध्ये राजकीय जागृती का केली जात नाही जेणेकरून ते संघटित होऊन मतदानाचा हक्क बजावू शकतील आणि अनेक गोष्टी टाळू शकतील? या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून ते कृतीत आणण्याची गरज आहे.

मागील सर्व संसदीय निवडणुकांपेक्षा ही संसदीय निवडणूक अधिक असामान्य आहे, कारण या वेळी खुद्द राजकीय पक्षांनाही राजकीय अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. मुस्लिमांच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे समाजाचे फार मोठे नुकसान होऊ शकते. आपल्या मतांचा अर्थ, महत्त्व आणि उपयुक्तता स्पष्टपणे समोर यावी यासाठी मुस्लिमांनी एकत्रितपणे विचार करून कृतीची दिशा ठरवावी लागेल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संलग्नता, पाठिंबा किंवा विरोधाचे वेगवेगळे परिणाम आणि पैलू तपासावे लागतील. तरच रणनीती आखण्याचा टप्पा परिणामकारक आणि उपयुक्त ठरेल.


- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.: ८९७६५३३४०४



भारतातील एकूण संपत्तीच्या ४०.१ टक्के संपत्तीवर इथल्या १ टक्का श्रीमंत उद्योगपतींनी कब्जा करून ठेवला आहे. उर्वरित ६० टक्के संपत्तीत बाकीच्या ९९ टक्के भारतीय जनतेची भागीदारी आहे. म्हणजे एक रुपयामधील ४० पैसे केवळ एक टक्का म्हणजेच एका नागरिकाच्या ताब्यात तर ९० टक्के उर्वरित नागरिकांच्या ताब्यात. ९९ पैसे (६० टक्के) चा अर्थ एका माणसाला ४० पैसे तर बाकीच्या लोकांनी ४० पैशांतून वाटून घ्यावेत. म्हणजे एका नागरिकाला एक पैसासुद्धा नाही. ही परिस्थिती अनाकलनीय आहे. जर अशा परिस्थितीत कुणी म्हणत असेल की ज्या देशाची ही अवस्था आहे तिथे सर्व काही सर्व नागरिकांना उपलब्ध आहे. ज्या एक पैशात माणसाचे पोट सुद्धा भरत नसेल त्या आर्थिक भागिदारीमध्ये सर्वांना शिक्षणाच्या संधी प्राप्त आहेत, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत, नागरिक अधिकार आहेत. लोकशाही आहे, असे जर लोक म्हणत असतील तर नक्कीच दोन्हींपैकी कुणीतरी एक खोटे बोलत आहे. ही आकडेवारी आणखीन गंभीर आहे. देशात जी २०१७ साली जी संपत्ती होती त्यातील ६ टक्के संपत्ती अतिश्रीमंत लोकांनी काबिज केली आणि उर्वरित लोकाना एक टक्क्यावर समाधान मानावे लागले होते. अशा अवस्थेत प्रथमच सध्याच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपला जो जाहीरनामा काढला आहे त्यामध्ये संपत्तीच्या पुनर्विभागणीची योजना मांडली आहे. या पुनर्विभागणीची गोष्ट वाचता-ऐकताच भाजपला बराच राग आला. त्या संकल्पनेशी कुणाकुणाशी आणि कशाकशाशी जोडू लागले याची कल्पनाही करवत नाही. म्हणजे याचाच अर्थ असा की हा राग सत्ताधारी भाजपचा नसून त्या पक्षाच्या सत्तेच्या आश्रयात देशातील ३ उद्योगपतींनी देशातल्या संपत्तीची जी लूट चालू ठेवली आहे ते कळू शकते. 

जरा मागे इतिहासात गेल्यावर असे दिसून येईल की विनोबा भावे यांनी १९५१ साली भूदान चळवळ सुरु केली होती, त्या वेळी जरी काँग्रेसची सत्ता देशात होती तरी या चळवळीमागे तेच लोक होते जे आज या काँग्रेसच्या संपत्तीच्या पुनर्विभागणीचा विरोध करत आहेत. याचे कारण असे की आज जशी भांडवलदारी-सत्ताधारी वर्गांची हातमिळवणी झाली आहे तशी त्या वेळी झालेली नव्हती. कारण भांडवलदार आणि विरोधी पक्षाचे सत्ता समीकरण यांनी अजून जन्म घेतलेला नव्हता. या भूदान चळवळीचे महाराष्ट्रातील रुपांतर म्हणजे कुळ कायदा. ज्या भूधारक शेतकऱ्याकडे त्या वेळच्या सरकारने किती जमीन असावी हे ठरवले होते आणि बाकीची जमीन सरकार आपल्या ताब्यात घेऊन त्या जमिनीचे वाटप गोरगरीब शेतकरी ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना इनाम म्हणून देत होते. या कुळ कायद्याच्या वादात कितीतरी शेतकरी उद्ध्वस्त झाले, त्याची कारणे कोणती तो विषय वेगळा आहे. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की काँग्रेसच्या सध्याच्या ज्या जाहीरनाम्यात संपत्तीच्या पुनर्विभागणीची गोष्ट केली गेली आहे तो खऱ्या अर्थाने सुधारित कुळ कायदा आहे. त्या वेळी भाजप विचारसरणीचा उदय झाला नव्हता म्हणून आणि जे वैयक्तिकपणे भाजप विचारसरणीचे लोक होते त्यांचा हेतू त्या वेळी काही और होता. आणि आता काही निराळाच आहे. कारण भाजपच्या विचारसरणीत नर्धन, दुर्बल, गोरगरीब यांना कोणतीच जागा नाही. म्हणून त्याच्याकडे अशा लोकांविषयी कोणतीही विचारसरणी नाही. 

जगातले काही अतिबुद्धिवादी वर्ग संपत्तीचे समान विभाग असावेत अशी गोष्ट करत आहेत, समानता प्रत्येक बाबीत होत नसते. आर्थिक समानतेचा प्रश्नच उद्भवत नाही. काही लोकांना काही इतर लोकांपेक्षा विशेष प्रकारची कुशलता प्रकृतीने दिलेली आहे, ती प्रत्येक मणसाला निर्गानेच समान दिलेली नाही. अशात माणसामाणसांना सर्वाना समान संपत्ती कशी देता येईल. जर सर्वाना समान संपत्ती दिलीच तर कुणाला काही मोलमजुरी करायची गरज पडणार नाही. अशा परिस्थितीत मानवी जीवन ठप्प होऊन संपून नष्ट होईल. म्हणून निसर्गाने न्याय्य विभागणीची संकल्पना दिलेली आहे. मन्हणजे सर्व मानवजातीला जगातील / देशातील संपत्तीत न्याय्य वाटा मिळावा. (Distributive Justice) जर तसे झाले तर जगातल्या प्रत्येक माणसाचे जीवन सुखद व सुंदर होईल. पण हीच गोष्ट आपल्या भांडवलदार - सत्ताधाऱ्यांना पटत नाही. गोरगरीब लोकांचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांना ईश्वरानेच ही देणगी दिलेली आहे की ते आपल्या गरीबीच्या व्यथा कधी कुणासमोर मांडत नाहीत. ईश्वराकडेदेखील ते आपली तक्रार मांडत नाहीत. जे त्यांच्याकडे आहे, खरे पाहता जे काही त्यांच्याकडे नाही त्या बाबतीत त्यांना दुःख नाही, आहे त्याचे समाधान! कधी त्यांनी आपल्या गरीबीच्या व्यथा मांडण्यासाठी कुणाकडे याचना केली नाही, मोर्चे काढले नाहीत, आंदोलने झेडली नाहीत. आणि म्हणूनच ते समाधानी आहेत त्याचा आनंद, जे नाही त्याचे दुःख नाही.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.:

9820121207

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget