Halloween Costume ideas 2015
Latest Post


(९४) सरतेशेवटी जेव्हा आमच्या निर्णयाची घटका आली तर आम्ही आमच्या कृपेने शुऐब (अ.) ला आणि त्याचे साथी श्रद्धावंतांना वाचविले, आणि ज्या लोकांनी अत्याचार केला होता त्यांना एका - भयंकर स्फोटाने असे गाठले की ते आपल्या वस्त्यांमध्ये जे निपचित पडले ते पडूनच राहिले, (९५) जणूकाय  ते  कधी  तेथे  राहिले,  वसलेच  नव्हते. ऐका! मदयनवालेसुद्धा दूर फेकले गेले ज्याप्रमाणे समूदवाले फेकले गेले होते. 

(९६,९७) आणि मूसा (अ.) ला आम्ही आपल्या वचने व (पैगंबरत्वाच्या)स्पष्ट नेमणूक प्रमाणासह, फिरऔन आणि त्याच्या राज्याच्या सरदारांकडे पाठविले पण त्यांनी फिरऔनच्या हुकूमाचे अनुसरण केले. वस्तुत: फिरऔनचा हुकूम सत्याधिष्ठित नव्हता. 

(९८) पुनरुत्थानाच्या दिवशी तो आपल्या लोकांच्या पुढे पुढे असेल आणि आपल्या नेतृत्वात त्यांना नरकाग्नीकडे नेईल.१०४ किती वाईट आगमनस्थान आहे हे ज्यावर एखादा पोहचतो! 

(९९) आणि त्या लोकांचा जगातदेखील धिक्कार केला  गेला  व  पुनरुत्थानाच्या  दिवशीही  केला  जाईल.  किती  हे  वाईट  फळ  आहे  जे  एखाद्याला  मिळेल. 

(१००) हा काही वस्त्यांचा वृत्तान्त आहे जो आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत. काही अद्यापही उभ्या आहेत व काहींचे वस्तीरूप पीक कापले गेले आहे. 

(१०१) आम्ही त्यांच्यावर अत्याचार केला नाही त्यांनी आपण होऊन स्वत:वर अत्याचार केला. आणि जेव्हा अल्लाहची आज्ञा आली तेव्हा त्यांचे ते उपास्य ज्यांचा ते अल्लाहला सोडून धावा करीत असत, त्यांच्या काही उपयोगी पडले नाहीत आणि त्यांनी विनाश व विध्वंसाव्यतिरिक्त अन्य कोणताच फायदा त्यांना दिला नाही. 

(१०२) आणि तुझा पालनकर्ता जेव्हा एखाद्या अत्याचारी वस्तीला पकडतो तेव्हा त्याची पकड अशीच असते, खरोखरच त्याची पकड अत्यंत कठोर आणि दु:खदायक असते. 

(१०३) वस्तुस्थिती अशी आहे की यात एक संकेत आहे त्या प्रत्येक माणसासाठी ज्याने परलोकातील यातनांचे भय बाळगले.१०५ तो एक दिवस असेल जेव्हा सर्व लोक जमा होतील आणि मग जे काही त्या दिवशी घडेल ते सर्वांच्या डोळ्यांदेखत घडेल.



१०४) या आयतने आणि कुरआनच्या दुसऱ्या स्पष्टीकरणांनी माहीत होते की जे लोक जगात एखाद्या राष्ट्राचे नेतेपद भूषवितात तेच कयामतच्या दिवशी त्यांचे नेते असतील. जगात ते नेकी आणि भलाई आणि सत्याकडे मार्गदर्शन करीत आहेत आणि ज्यांनी ज्यांनी जगात त्यांचे अनुसरण केले, ते कयामतच्या दिवशीसुद्धा त्यांच्याच झेंड्याखाली जमा होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जन्नतमध्ये दाखल होतील. जे  जगात मार्गभ्रष्टतेचा व दुष्टतेचा मार्ग जो सत्यतेचा मार्ग नाही, त्याच्याकडे लोकांना बोलावितात आणि लोक त्यांच्या मागे चालतात तर कयामतच्या दिवशीसुद्धा हे लोक त्यांच्याच मागे असतील आणि त्यांच्याच नेतृत्वात नरकाचा मार्ग धरतील. याच विषयाची अभिव्यक्ती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या या कथनाने होते. त्यांचे कथन आहे, "कयामतच्या दिवशी अज्ञानकाळातील काव्याचा झेंडा इमरूल कैसच्या हातात असेल आणि अरब अज्ञानकाळातील सर्व कवी त्याच्याच नेतृत्वात नरकाची वाट धरतील." आता हे दृष्य प्रत्येक व्यक्ती  आपल्या  कल्पनेने  डोळ्यासमोर  आणून  समजू  शकतो  की  हे दोन्ही  प्रकारच्या मिरवणुकींनी लोक कशाप्रकारे आपापल्या ठिकाणी जातील. स्पष्ट आहे, ज्यांनी जगात  लोकांना मार्गभ्रष्ट केले आणि असत्य मार्गावर चालवले अशा मार्गभ्रष्ट नेत्यांचे अनुकरण करणारे, तिथे पाहून घेतील की या अत्याचारींनी त्यांना कोणत्या ठिकाणी आणले आहे. तेव्हा हे लोक आपल्या सर्व संकटांचे मूळ कारण या नेत्यांनाच समजून घेतील. अशा मार्गभ्रष्टांची मिरवणूक त्या वेळी अशा थाटात निघेल की पुढे पुढे हे नेतेगण असतील आणि त्यांचे अनुयायी मागे धिक्कार करत जातील. याविरुद्ध ज्या नेतृत्वामुळे लोक जगात सत्यमार्गी बनून राहतील त्यांना स्वर्गाचे हकदार बनविले जाईल. त्यांचे अनुयायी तिथे त्यांच्यासाठी प्रार्थना करतील आणि मिरवणुकीत स्वर्गाकडे जाताना आपल्या नेते मंडळीची ते प्रशंसा करीत जातील. 

१०५) म्हणजे इतिहासाच्या या घटनांमध्ये एक अशी निशाणी आहे ज्यावर विचार केल्याने मनुष्याला विश्वास होतो की परलोकातील शिक्षा निश्चित आहे आणि त्याविषयी पैगंबरांनी दिलेली खबर सत्य आहे. याच निशाणीद्वारा हेसुद्धा माहीत होते की परलोकातील शिक्षा कशी कठोर असेल आणि हा विचार त्याच्या मनात ईशभय निर्माण करून त्या माणसाला सत्यमार्गी बनविल. इतिहासात ती कोणती निशाणी आहे ज्याला परलोक आणि त्याच्या शिक्षेची निशाणी म्हटले जाते. तो मनुष्य सहज जाणू शकतो जो इतिहासाला फक्त एक घटनाचक्रच समजत नाही तर त्या घटनांच्या तर्कांवरसुद्धा विचार करतो आणि त्यापासून निर्णयाप्रत येतो. हजारो वर्षाच्या मानवी इतिहासात राष्ट्रघडण व राष्ट्रपतन हे नियमित होत राहिले आहे आणि या घडणीत आणि पतनामागे जी नैतिक कारणे आहेत, राष्ट्राचे पतन ज्या ज्या दंड-शिक्षेमुळे झाले, हे सर्व त्या सत्याकडे स्पष्ट संकेत आहेत की मनुष्य अशा शासनाचा शासित आहे, जे आंधळ्या भौतिक नियमांवर शासन करत नाही. ते शासन स्वत:च्या एका नैतिक नियमावर आधारित आहे. 

या नैतिकतेच्या सीमेवर राहणाऱ्यांना पुरस्कृत केले जाते. तसेच या विशिष्ट नैतिक सीमेखाली राहणाऱ्यांना काही काळापर्यंत ढील दिली जाते आणि  जेव्हा  त्या  सीमेच्या  फार  खाली ते जातात, तेव्हा त्या लोकांना फेकून दिले जाते की ते   एकबोधप्रद  निशाणी बनून राहतात. मानवी इतिहासात या घटनांचे एका क्रमात घटीत होत राहाणे याविषयी संदेह (शंका) घेण्यापलीकडचे असते की दंड देणे आणि पुरुस्कृत करणे, सृष्टीच्या शासनव्यवस्थेचा एक स्थायी नियम आहे. 

जे प्रकोप जगात वेगवेगळ्या राष्ट्रांवर कोसळले आहेत, त्यांच्यावर अधिक विचार केल्यावर कळून येते की ही न्यायाधिष्ठित दंड-शिक्षा आणि पुरस्काराची नैतिक निकड काही सीमेपर्यंत या शिक्षेने पूर्ण होतात. परंतु मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत, कारण जगात जो प्रकोप झाला त्यामुळे त्या विद्यमान मानववंशाची पकड केली, परंतु ज्यांनी दुष्टतेचे बी पेरले होते आणि दुष्टता व अत्याचारांची पिके जोपासून सुगीच्या हंगामापूर्वीच जग सोडून गेले, ज्यांच्या कुकर्मांची फळे नंतरच्या पिढीला भोगावी लागली, परंतु मूळ गुन्हेगार मात्र दंड प्रकि्रयेपासून सुरक्षित राहिले. मानवी इतिहासाच्या अध्यायनाने सृष्टी शासन-स्वभावाला जाणून घेतले तर अध्ययांती स्पष्ट होते की बुद्धी आणि न्यायाने दंडविधानाची नैतिक निकड या जगात अपूर्ण राहिली आहे. या अपूर्णतेला पूर्ण करण्यासाठी हे न्यायीशासन निश्चितपणे दुसरे जीवन निर्माण करील आणि तिथे या सर्व अत्याचारींना कठोर शिक्षा दिली जाईल. जगातील प्रकोपांपेक्षा ते प्रकोप अधिक भयंकर असेल. (पाहा सूरह 7, टीप 20 आणि सूरह 10, टीप 10)



१६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे नुकतेच पार पडले. प्रथमच एक मुस्लिम महिला या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवडली गेलीय. प्राप्त राजकीय, सामाजिक परिस्थितीत एका मुस्लिम महिलेच्या नेतृत्वात होणारे हे संमेलन ऐतिहासिक असे होते. त्या स्वागताध्यक्ष म्हणून करणार असलेले भाषण देखील भूमिकांच्या बाबतीत खूप धाडसी आहे.

१६ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी आलेल्या तमाम रसिक, वाचक, श्रोते आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचे उदगीरच्या ऐतिहासिक भूमीत मी स्वागत करते. माणसाच्या विकासाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या उदयगिरी महाराज आणि सुफी हजरत शाह मोहम्मद कादरी यांची ही कर्मभूमी आहे. अनेक संस्कृतींना आणि मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या विचारांना उदगीरने आपल्यात सामावून घेतले आहे. त्यामुळे उदगीरमध्ये सांस्कृतिक बहुलता आढळते. या सांस्कृतिक बहुलता असणाऱ्या शहरात बहुसांस्कृतिकतेच्या संकल्पनेवर आधारित हे संमेलन होत आहे. उदगीर जशी मराठी बोलणाऱ्यांची माउली तशी ती कानडी, उर्दू, दखनी बोलणाऱ्यांची आश्रयभूमी आहे.  उदगीरपासून अवघ्या काही मैलांच्या अंतरावर समताशिरोमणी बसवण्णांची कल्याण नगरी आहे. त्यांनी दयेवर आधारित धर्माची संकल्पना मांडली. दयेशिवाय, प्रेमाशिवाय धर्म असू शकत नाही हे सांगताना ते म्हणतात,

‘दये इल्लद धर्म याउदय्या

दयेवे बेकु सकल प्राणीगळेरल्ली

दये वे धर्मद मुलवय्या’

हाच बसवण्णांचा दयाभाव दखनीतही अवतरला.  दखनीचा गालिब असणाऱ्या मुल्ला गवासीने जिथे चिरनिद्रा घेतली ते निलंगा शहर बसवकल्याणप्रमाणेच उदगीरची सांस्कृतिक पाठराखण करत आले आहे. मराठी प्रागतिक विचारांच्या चळवळीचे नेतृत्व करणारे ना. य. डोळे आणि सुफी तत्वज्ञानाला नवी दिशा देणारे कुतूब ए दखन मौलाना अ. गफूर कुरैशी यांच्यासारखे सुपूत्र या उदगीरनगरीने घडवले आहेत. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनीही याच उदगीर परिसरात आपल्या कर्तृत्वाची मुहूर्तमेढ रोवली. मराठी माउलीसारखेच प्रेम कानडी आणि उर्दू या आमच्या मावश्यांनीही उदगीरवर केले आहे. उदगीरची मराठीतील साहित्यनिर्मिती पुरोगामी विचारांना अधोरेखित करणारी आहे. तर उर्दू साहित्यानेही मानवी जाणिवांना पुन्हा बळ दिले आहे. उदगीरच्या भुगोलात वसलेल्या लोकसंस्कृतीतूनच  उर्दूची आई असणाऱ्या दखनीचा जन्म झाला आहे. दखनी अस्मितेचा आग्रह धरत हसन गंगू बहामनी यांनी उत्तरेच्या आक्रमणाला रोखले. आणि उदगीरच्या नजीक बिदरला आपली राजधानी स्थापन केली. या राजधानीतच महमूद गवान यांनी जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठातूनच कालांतराने दखनीला समृध्द करणाऱ्या मुल्ला शजी, वजालती, अहमद बगदादी, शाज नुरी सारखे साहित्यीक जन्मले. आणि दखनभूमीला त्यांनी समृध्द केले. दखनी राष्ट्रवादाला जन्म दिला. मुल्ला वजही सारखा शायर दखनीत दखनभूमीविषयी म्हणतो– 

‘‘दखन सा नई ठार संसार में

पंज फजीला का है ठार में

दखन है नगीना, अंगुठी है जग, अंगुठी कूं हरमत नगीना है लग।

के सब मुल्क सर, होर दखन ताज है।’’

अशी बहुसांस्कृतिकता असलेल्या दखनेने कधीही धार्मिक भेदभावाला थारा दिला नाही. इथे तुकाराम महाराजांचे गुरु शेख चांद बोधले होते. तर लाडले मशायख यांना चैतन्यस्वामी म्हणून हिंदूनी आपलेसे केले आहे. बंदानवाज यांचा ‘चक्कीनामा’ असो वा त्यांचे वडील राजू खत्ताल यांचा ‘ सुहागननामा’ हे सारे ग्रंथ दखनी अस्मितेसह हिंदू- मुस्लिम एकतेची साक्ष देतात. 

‘शेख महंमद अविंध त्याच्या हृदयी गोविंद’ म्हणणारे शेख मंहंमद असो वा जंगली महाराज म्हणून नावारुपाला आलेले जंगलशाह कादरी हे सारेच दखनी समाजाने मानवी समाजाला दिलेले हिरे आहेत. शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी असणारे बाबा याकुत आणि शाहू महाराजांच्या दरबारातील लहरी हैदर हे दखनी भिमा-कृष्णा प्रेम संस्कृतीतील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक आहेत.

त्यामुळेच दखनेत निर्माण झालेल्या मुस्लिम सत्तादेखील सहिष्णू होत्या. आदिलशाहीसारखी प्रमुख राजवट बिदरच्या आश्रयाला आलेल्या युसुफ शाहनेच स्थापन केली होती. उदगीरला तो अनेक दिवस वास्तव्याला होता. म्हणूनच त्याच्या आदिलशाही राजघराण्यात मल्लू आदिलशाह, पार्वती आदिलशाह, किशोर आदिलशाह अशी हिंदू संस्कृतीशी समन्वयाची भूमिका घेणारी नावे आढळतात. बिदरमधूनच कुतूबशाहीची मुहुर्तमेढ रोवली गेली. कुतूबशाही हीच खऱ्या अर्थाने दखनी भाषेची आश्रयदाती राजवट होती. पण कालांतराने उत्तरेच्या आक्रमणापुढे दखनी राजवटी कोसळल्या पण दखनेतला सद्‌भाव संपला नाही. दखन ही खऱ्या अर्थाने माणूसकीची, माणसांची भूमी आहे. आणि उदगीर हे दखनेच्या सर्व सांस्कृतिक राजकीय घडामोडींचे केंद्र राहिले आहे. 

त्यामुळे इथे होणारे हे संमेलन ऐतिहासिक ठरले आहे. त्यासोबतच या संमेलनाला वर्तमानातील अतिशय गंभीर अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली आहे. केंद्रातील सत्ता मानवी समाजाला काळीमा फासत आहे. अमीर खुसरोंच्या स्वप्नातील माणसाचा हा देश या सत्तेने झुंडीच्या हवाली केला आहे. आसिफासारख्या कोवळ्या लेकरावर बलात्कार करणाऱ्यांच्या समर्थनार्थ देशात तिरंगा रॅली काढली जात आहे. तर झुंडहत्येतील आरोपीच्या प्रेतावर तिरंगा पांघरला जात आहे. ज्या तिरंग्याला लाल किल्ल्यावरील युनियन जॅकच्या ठिकाणी फडकवण्यासाठी मुस्लिम समाजातील हजारो सुपुत्रांनी प्राण दिले. त्याच समाजाला आज सामाजिक न्यायापासून वंचित ठेवले जात आहे. ही भूमी जशी गांधीची तशी ती मौलाना आझादांची आहे. जशी शिवाजी महाराजांची तशी टिपू सुलतानची आहे. जशी भगतसिंगची तशी ती हुतात्मा कुर्बान हुसैन यांचीही आहे. पण आता मुस्लिमद्वेषापोटी या सर्व इतिहासातून एका विशिष्ट समाजाला वगळले जात आहे. 

मुस्लिमद्वेष हा मुख्य सामाजिक आणि राजकीय विचार बनत चालला आहे. मागे नागरिकत्व सुधारणा कायद्यातून अशाच पध्दतीने मुस्लिमांना नागरिकत्वापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. राजकीय निर्णय प्रक्रियेतून मुस्लिम समाजाला बाद ठरवण्यात आले आहे. इतक्या टोकाच्या राजकीय विचारांच्या काळात आपण जगत आहोत. तेंव्हा पुरोगामी, डावे आणि मानवतावादी म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. उदगीर शहराने सातत्याने या झुंडशाहीचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक समतेच्या चळवळींची पाठराखण केली आहे. याच शहरात शाहीनबागच्या धरतीवर माझ्या नेतृत्वाखाली गांधीबाग आंदोलन आम्ही यशस्वी करुन दाखवले आहे. देशभरातील विद्यार्थी नेते, क्रांतिकारी शाहीर, कवींनी सत्तर दिवस चाललेल्या या आंदोलनाला भेटी दिल्या आहेत. 

या आंदोलनातून उभ्या राहिलेल्या माझ्यासारख्या प्रासंगिक मुस्लिम महिला नेतृत्वाला विद्रोही सांस्कृतिक चळवळीने सांस्कृतिक नेतृत्व दिले आहे. ही खरी तर माझ्यासाठी भारावून टाकणारी अतिशय भावूक घटना आहे. पुरुषी वर्चस्ववादाने ग्रासलेल्या समाजासमोर महिलेचे नेतृत्व पुढे केले जातेय ही परिवर्तनवादी घटना आहे. भारतीय महिलांसाठी ती एकादृष्टीने सामाजिक न्यायाची आहे. तर दुसऱ्या बाजुने राजकीय - सामाजिक अस्पृश्यता लादल्या जात असलेल्या मुस्लिम समाजासाठी ही सन्मानाची बाब आहे. उदगीर हे पूर्वी हैदराबाद संस्थानातील एक महत्त्वाचे शहर होते. बिस्मिल्ला बिलग्रामी नावाच्या आमच्या माउलीने १८३० मध्ये स्त्री शिक्षणासाठी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली. तिच्या बंडाचा आवाज उदगीरपर्यंत ऐकू आला होता. आणि त्याच बंडाची परिणीती आज मुस्लिम महिलेला सांस्कृतिक नेतृत्व प्रदान करण्यात झाली आहे, असे मी मानते. हा माझा एकटीचा सन्मान नसून बिस्मिल्ला बिलग्रामी, सावित्रीमाई, बेगम हजरत महल, मुक्ता साळवे, रमाईचा सन्मान असल्याचे मी मानते. 

विद्रोही सांस्कृतिक चळवळीने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. सांस्कृतिक न्यायासाठी विद्रोही चळवळीने लढा दिला आहे. एक मुसलमान महिला म्हणून मी माझ्या समाजाच्या सांस्कृतिक प्रतिनिधित्वाची मागणी येथे करत आहे. हे सांस्कृतिक प्रतिनिधित्व शहरांच्या नामकरणातून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. औरंगाबादचे नामांतर हे त्याचाच एक भाग आहे. मी या संमेलनाची स्वागताध्यक्ष म्हणून त्या नामकरणाला विरोध करते. कारण औरंगाबाद शहर हे खऱ्या अर्थाने दखनी मुस्लिमांचे सांस्कृतिक केंद्र आहे. त्या शहरातूनच दखनी मुस्लिम समाजाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेथे दखनी मुस्लिम संस्कृतीच्या समतेचे प्रतिक असणाऱ्या मलिक अंबर यांची समाधी आहे. सातशे सुफी संतांनी या भूमीतूनच आपल्या कार्याला सुरुवात केली होती. हे शहर वसवण्यासाठी मुस्लिम समाजाने प्रचंड योगदान दिले आहे. किंबहुना हे शहर दखनी मुस्लिम संस्कृतीची ओळख आणि अस्मिता आहे. त्यामुळे त्याचे नामकरण करणे याचा अर्थ दखनी मुस्लिम समाजाशी सांस्कृतिक विषमतेचा व्यवहार करण्यासारखे होईल. जर औरंगाबादचे नाव बदलायचेच असेल तर त्याला ज्येष्ठ विचारवंत शरद पाटील यांच्या सुचनेप्रमाणे मलिक अंबरची स्मृती म्हणून अंबराबाद हे नाव देणे संयुक्तिक ठरेल. त्यासोबतच मी या विचारपीठावरुन कर्नाटकातील कलबुर्गी आणि विजयपुरा या शहरांना त्यांचे जुने नाव बहाल करण्याची मागणी करत आहे. 

उदगीर शहर पूर्वी हैदराबाद प्रांतात होते. ऑपरेशन पोलोद्वारे त्याचे विलीनीकरण करण्यात आले. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात दखनी मुस्लिम समाजावर मोठे अत्याचार झाले. त्या अत्याचाराचा अभ्यास करण्यासाठी सुंदरलाल कमिटीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने प्रचंड कागदपत्रे गोळा करुन, सखोल संशोधनाद्वारे अहवाल सादर केला होता. हा अहवाल आजही जाहीर केलेला नाही. विलीनीकरणाचे रौप्यमहोत्सव पुढील वर्षी सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर दखनी मुस्लिम समाजासोबत न्यायाची भूमिका भारत सरकारने घ्यायला हवी. 

विलीनीकरणापासून आजपर्यंत मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढलेला नाही. उदगीर शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल अथवा नागरी सुविधांचा मागील ७५ वर्षात तो सुटलेला नाही. उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. रोजगार नसल्याने येथील युवकांना पुणे – मुंबई सारख्या शहरात स्थलांतरीत व्हावे लागत आहे. रोजगाराच्या संधी येथे उपलब्ध झाल्या नाहीत तर स्थलांतरीतांचे लोंढे वाढतील. आणि मराठवाडा आधिकाधीक बकाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने या मुद्यांकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाच्या नव्या संधी येथे निर्माण झाल्या पाहिजेत. मराठवाड्याची संस्कृती जपण्यासाठी बसव-सुफी संस्कृती विद्यापीठाची स्थापना उदगीर येथे व्हावी अशी मागणी मी या संमेलनाची स्वागताध्यक्ष या नात्याने करत आहे. 

सरतेशेवटी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आभार मानते. विशेषतः संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते, प्रतिमा परदेशी, यशवंत मकरंद, किशोर ढमाले, नितीन सांगवे, कॉ. राजू पाटील यांचे आभार मानते.

धन्यवाद. 

जय भारत, जय संविधान!


१०  एप्रिलची घटना गोव्यात घडणे ही लज्जास्पद बातमी आहे. गोवा जे एक शांतीप्रिय राज्य मानले जाते त्यात असे प्रसंग घडणे हे त्याच्या शांतीला भंग करते. राम नवामीची मिरवणूक वास्को, इस्लामपूर इथे चालली होती. अचानक खबर पसरली की कोणीतरी दगडफेक केली. मिरवणूक तिथे असलेल्या मस्जिदीकडे वळली. मस्जिदमध्ये लोक इफ्तार म्हणजे रोजा सोडण्याच्या तयारीत होते. तिथे जाऊन मिरवणुकीत सलभागी असलेल्या समाजकंटकांनी मारहाण सुरु केली. ह्या प्रसंगात खूपशा गोष्टी चिंतन करण्यालायक आहेत. खरंच दगडफेक झाली का? की ही फक्त अफवा होती? मस्जिद रस्त्यावरून  १०० ते २०० मीटरच्या अंतरावर असून तिची दिशा ही वेगळी असताना तिथून मिरवणुकीवर दगडफेक करणे संभव आहे का? मिरवणुकीत सहभागी असलेल्यांनी मस्जिदमध्ये सरळ जाऊन दंगल करणे कितपत वैध आहे? का ह्याची सूचना पोलीस कर्मींना नाही दिली? का कायदा आपल्या हातामध्ये घेतला? 

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधली तर जवळपास हेच समजण्यात येते की ह्या हिंसाचारामध्ये काहीतरी पूर्वनियोजित होते. एका संघटनेचा आणि उत्सवाचा आधार घेऊन शांततामय गोव्याची शांती भंग करण्याचा हा एक मोटा प्रयत्न होता. २०१४ नंतर देशात असे प्रसंग खूप उमटले आणि आजही देशभरात चालू आहेत. ह्याच दिवशी भारताच्या अनेक ठिकाणी राम नवमीच्या मिरवणुकीत ह्याच्याहून जास्त भयानक घटना घडल्या. कोठे मस्जिदच्या मिनारावर भगवे झेंडे लावले गेले तर कोठे गरीबांच्या घरांवर बुलडोझर चालवले गेले.

असे करून काय साबित करायचं असते ह्यांना? हे फक्त मुस्लिम समुदायावरच होणारे अत्याचार नाहीत तर ख्रिश्चन, शीख, दलित, आदिवासी यांसारख्या दुसऱ्या अल्पसंख्याक व मागास समुदायांवर पण हे चालू आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की लोकसुद्धा ह्या अत्याचारांचा निषेध करत नाहीत तर सत्य समजून घेण्याऐवजी आपले एक मन पहिल्यापासूनच एका विशिष्ट समुदायाविरुद्ध बनवून घेतात आणि ज्या समुदायाविरुद्ध त्यांना जे शिकवले गेले आहे त्याचीच हामी भरतात.  काय लोकांची ही जबाबदारी नाही की पूर्णसत्य दोन्ही बाजूंनी जाणून घ्यावी? बऱ्याच वेळा हेच बघायला मिळते की जी बातमी पूर्वी ऐकायला मिळाली त्यात फक्त अर्धसत्यच होते.

होळीच्या दिवशीसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा दोन गटांदरम्यान हाणामारी झाली तेव्हा अगोदर हीच अफवा पसरली की हिंदू आणि मुस्लिम यांच्यात हाणामारी झाली आणि एका समुदायाने दुसऱ्या समुदायावर खूप आरोप केले. नंतर हे दिसून आले की ते दोन्ही गट एकाच समुदायाचे होते आणि विवादही भलत्याच प्रकारचा होता. आम्ही सुशिक्षित असताना अशा प्रकारचे अज्ञानतेचे वर्तन आम्हाला शोभते का?

स्पष्ट दिसून येते की असे प्रसंग ह्याचसाठी घडवून आणले जातात की लोकांमध्ये द्वेष, घृणा आणि तिरस्कार वाढावा आणि लोक आपापसात लढून झगडून देशाच्या हिताचे जे वास्तविक, मुख्य मुद्दे आहेत त्यांना विसरून जावे.  असे केल्यामुळे लोकांवर राज्य करणे सोपे होते आणि सत्ता हटविणाऱ्यांना आपले खिशे भरण्यासाठी कसलेही प्रयास करता येतात, ज्याला लोकांचा काहीच अडथळा नसतो. ही योजना सध्या जगाच्या दिग्गज पुढाऱ्यांनी घेतली होती. लोक आपापसात लढतात, आपले नुकसान करून घेतात आणि देशालाही डुबवतात. फायदा फक्त त्या पुढाऱ्यांनाच होतो ज्यांनी लोकांना खोटी आश्वासने दिली आणि धर्माच्या नावावर त्यांना भुलाव्यात ठेवले.

श्रीलंकेचेच उदाहरण आपल्या समोर आहे. श्रीलंकामध्ये सुद्धा असाच प्रकार चालू होता, लोक धर्माच्या जाळ्यात गुंतून राहिले आणि इथे महागाई इतपर्यंत वाढली की आज श्रीलंकेत आणीबाणी घोषित करावी लागली आहे आणि देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे. एका विशिष्ट समुदायाला दुसऱ्या समुदायापासून धोका आहे हे दाखवून त्यांच्यामध्ये निर्माण केलेली शंका हीच ह्यासाठी जबाबदार आहे. ज्यामुळे हे सर्व घडहूनही आणले जाते आणि लोकांनाही कोणावर झालेल्या अत्याचाराबद्दल काही आपुलकी वाटत नाही, तर त्या शंकेला जास्त बळ मिळते.

इतिहासाचे अर्धसत्य किंवा पूर्ण खोट्या गोष्टींचे उदाहरण देऊन लोकांना असल्या भ्रमामध्ये ठेवले जाते की जे पूर्वी घडले ते आताही घडेल आणि म्हणून तुम्हाला धोका आहे. म्हणूनच का तुम्हीच कायदा हातात घेऊन ते करणार ज्याची शंका दुसऱ्यांकडून होण्याची शक्यता तुम्हाला वाटते?

एक समुदाय आतंकवादी आहे म्हणून तो देशात एक दिवस आंतक करणार ही मान्यता पाळून का तोच आतंक दुसरा समुदाय आज करून आजच देश आणि जनतेला त्रासात लोटणार? देशाचा सर्वनाश करणार? शांती आणि बंधुभावाने राहणारे देशवासी, शेजारी, मित्र काय तुम्हाला दिसत नाहीत? त्यांच्यापैकी कोणी कोणावर ह्यापूर्वी हत्यार उचलले होते का? बॉम्ब टाकला होता का? काय सर्व एक दुसऱ्याच्या उत्सवांत सहभागी नाही होत होते? एक दुसऱ्याच्या वेळप्रसंगाला कामी नाही पडत होते का? जे देशात पूर्वी दंगे झाले ते अशाच भ्रामिक सत्तेच्या आणि संपत्तीच्या लोभी माणसांच्या कर्तृत्वामुळे होते ज्यांना लोकांच्या सुख, शांती आणि एकतेमुळे धोका होता, ज्यामुळे त्यांना लोकांवर राज्य करणे कठीण होत होते व त्यांना हीच शंका लोकांमध्ये निर्माण करायची होती की वेगवेगळे समुदाय एका देशात राहू शकत नाहीत. जबरदस्ती धर्मांतर भीती सध्या घातली जाते आणि लोकांना ह्या भीतीमध्ये ठेवले जाते की त्यांना ह्याचा सामना एक दिवस करावा लागेल. जबरदस्ती धर्मांतराची किती प्रकरणे गेल्या १००-२०० वर्षांत झाली आहेत ह्याचा कोणी ठोस पुरावा देईल का? जी धर्मांतरने झाली आहेत ती लोकांच्या स्वतःच्या मर्जीने झाली आहेत आणि कुठली श्रद्धा बाळगावी हा लोकांचा वैयक्तिक निर्णय असतो आणि असलाच पाहिजे. त्यात कसलीच जबरदस्ती होऊ शकत नाही कारण श्रद्धा मनाच्या स्वभावावर अवलंबून असते आणि कृतीद्वारे जी व्यक्त केली जाते.

फक्त नाव बदलून श्रद्धा किंवा धर्म बदलत नसतो आणि असे कित्येकशे लोक असतात ज्यांची नावे वेगळी, श्रद्धा वेगळी आणि कृत्य वेगळे असते. पण इथे पण आम्हाला हेच दिसून येते की एक समुदाय धर्मांतर करणार ह्या भीतीने जो समुदाय ह्याच्या विरोधात आहे तोच हे करताना दिसतो. जबरदस्ती दुसऱ्या समुदायाच्या लोकांना पकडून आपल्या श्रद्धेचे गुणगान करण्यास भाग पडतो आणि त्यांना जिवंतसुद्धा सोडत नाही. असे कित्येक मॉब लिंचिंगचे प्रसंग देशात सुरु आहेत. आता सांगा कोणत्या समुदायाला कोणापासून धोका आहे? जे आरोप एक समुदाय दुसऱ्यावर लावतो तोच ते करताना सापडत आहे. हे कसले देशहित आणि लोकहित आहे? हा आतंकवादाला रोखण्याचा प्रयत्न आहे की त्याला वाढवण्याचा? कोण आहे मग खरा आतंकवादी?

कुरआन म्हणतो, धर्माबद्दल जबरदस्ती नाही. (२:२५६)  सर्व लोक एकाच जोडप्यापासून जन्माला आलेत (कुरआन ४९:१३) आणि म्हणूनच आपण सर्व जण एक दुसऱ्याचे नात्याने भाऊ बंधू आहोत. जिहाद आतंकवादाचा नाश करण्यासाठी आणि शांती स्थापन करण्यासाठी केला जातो ज्यामुळे वाईट शक्तीचा प्रभाव लोकांवर पडता कामा नये.

ह्या कुरआनच्या श्लोकांचा अर्थ इतका स्पष्ट आहे तर लोकांमध्ये ही शंका राहिलीच नाही पाहिजे की भारताची शांतीप्रिय जनतेला मुस्लिम समुदायामुळे कशा प्रकारचा धोका आहे. मुस्लिम समुदायाने सुद्धा ह्याची नोंद घेऊन त्याचप्रमाणे शांती आणि सहनशीलतेने काम करायला हवे. जनतेला विनंती आहे की देशात शांती आणि सौहार्द कायम ठेवावा, तथाकथित गोष्टींना बळी न पडता आपसात प्रेमभाव आणि माणुसकीच्या नात्याने आपले संबंध चांगले ठेवावे आणि जो ह्या शांतीला भंग करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरुद्ध एकजूट होऊन त्याचा विरोध करावा. असे नाही झाले तर ही आग एक दिवस सर्वानाच जाळून टाकील.

"जलते घर को देखनेवालों, फूस पे छप्पर आपका है. आपके पिछे तेज हवा है, अगला घर आपका है।

उसकी कत्तल पे मैं भी चूप था, अब मेरा नंबर आया है, अब मेरे कत्तल पे तुम भी चूप हो, अब अगला नंबर आपका है।"

- नजराना दरवेश

गोवा



सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून एकात्मता, भाईचारा या भूमिकेतून त्यानिमित्ताने गावात विविध ठिकाणी सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भिवंडी परिमंडळ 2 अंतर्गत कोनगाव पोलीस स्टेशन व कोनतरी मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मुस्लिम बांधवांसाठी ‘दावत-ए-इफ्तार’ चे रविवार दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील मान्यवरांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोनगाव (भिवंडी) 

 गावच्या सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी आपल्या भाषणात रोजाचे महत्त्व व रमजानच्या शुभेच्छा दिल्या तर क्राईम पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र पवार यांनी मुस्लिम बांधवांनी आतापर्यंत केलेल्या सहकार्याची स्तुती केली आणि यापुढेही कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले.

या इफ्तार कार्यक्रमासाठी आठगाव शिक्षण मंडळाचे सेक्रेटरी बाळाराम कराळे, उपसरपंच मधू चंद्रकांत म्हात्रे, माजी उपसरपंच तजीन करेल, कृतिका प्रमोद पाटील, अशोक बळीराम म्हात्रे, कमलाकर रवींद्र नाईक, दर्शन रमाकांत म्हात्रे, सुनील बळीराम म्हात्रे, जयंत टावरे सर, कृषी बाजार समितीचे संचालक बाळू पाटील, भाजपाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा भिवंडी विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, भाजपा कोनगाव अध्यक्ष चारुदत्त पाटील, भाजपा कोन शहर अध्यक्ष हनुमान म्हात्रे, आरपीआय भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव, भाजपा कल्याण अझहर काझी, भाजपा वाहतुक आघाडी भिवंडी तालुका अध्यक्ष संतोश पाटील, रेखा हनुमान म्हात्रे, कोन ग्रा.पं. सदस्या, उज्वला कराळे कोन ग्रा.पं. सदस्या, बेटी बचाव-बेटी पढाव महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. अमोल कराळे, शिवसेना अल्पसंख्याक कल्याण तालुका अध्यक्ष असलम खांडे, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.प्रा. विनोद पाटील, जमाअत ए इस्लामी हिंद कोन युनिटचे अध्यक्ष इंतेखाब आलम, शोधन साप्ताहिकचे कार्यकारी संपादक शाहजहान मगदूम, कोनगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक, पोलीस बंधू, मुस्लिम बांधव, मुस्लिमेतर बंधू आदी शेकडो लोकांनी सहभाग घेतला, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फरदीन मो. अली करेल यांनी विशेष परिश्रम घेतले व सूत्रसंचालन अफसर खान यांनी केले.

दुसऱ्या अशाच ‘दावत-ए-इफ्तार’चे आयोजन सुनील म्हात्रे -माजी उपसरपंच कोनगाव व मीना सुनील म्हात्रे यांनी ड्रीम कॉम्प्लेक्समध्ये केले. त्याही कार्यक्रमात असंख्य लोकांनी सहभाग घेतला.

शिवाय जमील शेख, तोराब, इम्तियाज, सलीम, अली, आदींनी फाळके कॉलनीमध्ये अशाच प्रकारचे दावत-ए-इफतारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वरील दोन्हीही कार्यक्रमात कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी मार्गदर्शन केले व उपस्थितांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी ठाणे जिल्हा अल्संख्यांक उपाध्यक्ष सोहेल गांग्रेकरही उपस्थित होते.

गावात हिंदू-मुस्लिम एकत्र गुण्यागोविंदाने सण साजरे करतात व एकमेकांच्या सणात सहभागी होतात. संपूर्ण भिवंडी तालुक्यात राष्ट्रीय एकात्मतेचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कोनगाव, असे अनुउद्गार सरपंच डॉ. रुपाली अमोल कराळे यांनी आपल्या भाषणात केले.


 १ मे : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खास लेख

महाराष्ट्र राज्याने य‌‌शस्वीपणे हीरकमहोत्सवी वाटचाल पूर्ण करून अमृतमहोत्सवाकडे झेप घेतली आहे. महाराष्ट्र राज्याने या बासष्ठ वर्षांत केलेल्या गौरवशाली वाटचालीचा निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला आनंद व अभिमान वाटतो आहे.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीहून पंडित नेहरूंच्या गळी उतरवून आणला, त्या वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते, तथापि आपले राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा वापरून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीचे ध्येय साध्य केले, त्यासाठी प्रसंगी स्वकीयांचा रोष ओढवून घेतला. मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीने प्रचंड रान उठविले असतांनाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी सदैव कार्यरत राहण्यासाठी त्यांनी जो संस्कार मराठी माणसाच्या मनामनात पेरला आहे, तो निश्चितच अढळ आणि चैतन्यदायी आहे, याची प्रचिती गेल्या साठ-बासष्ठ वर्षांत अनेक वेळा आली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या नंतर सर्वच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी हिरीरीने काम केले आहे.

'राज्य' म्हणून ६२ वर्षांचा काळ अल्प वाटत असला तरी, मानवी आयुष्यातील तीन पिढ्या या काळात झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र स्थापनेच्या काळातील पिढी आणि आत्ताची पिढी पाहिली की, महाराष्ट्राने केलेल्या गौरवशाली प्रगतीचा आलेख चटकन् डोळ्यासमोर उभा राहतो. रयतेचा, जाणता राजा कसा असावा या आदर्शाची शिकवण राष्ट्राला देणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, देशात स्त्रियांसाठी शिक्षणाची बंद असलेली कवाडे उघडून अविद्येने केलेले अनर्थ नष्ट करणारे महामानव महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, जातीपातीच्या भिंती तोडून दीनदलितांसाठी आपल्या राज्यात आरक्षणाचा क्रांतिकारी निर्णय घेऊन समतेचा कृतीशील संदेश देणारे राजर्षी शाहू छत्रपती महाराज, अष्टपैलू, न्यायशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, राजनीतिज्ञ, आणि समाजसुधारक, दलितांना त्यांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचून त्यांना आत्मसन्मान मिळवून देणारे थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..." असं ब्रिटीशांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, देशाला सत्य आणि अहिंसा या विचाराने स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी यांनी चले जाव चळवळीचा शंख याच महाराष्ट्राच्या सेवाग्राम आश्रमाच्या कुटीतून पुकारला, कर्ते समाजसुधारक आणि दलितांना समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी अखंड आयुष्य वेचणारे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, बहुजनांना ज्ञानाची गंगोत्री त्यांच्या घरादारात पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या अनेक महामानवांनी हा महाराष्ट्र अत्यंत उदात्त आणि उन्नत विचारांने आणि कृतीने भक्कमपणे उभा केला आहे. विविध विचारप्रवाहाने महाराष्ट्र भूमी फुलली असली तरी सर्वसमावेशकता महाराष्ट्रातील मराठी माणसाने नेहमीच जपला आहे. 

शाहू-फुले-आंबेडकर यांच्या या महाराष्ट्राच्या भूमीत ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, कला, क्रीडा, संगीत आणि संस्कृती आदी विविध क्षेत्रात अनेक दिग्गज कर्मयोगी निर्माण झाले आहेत. सुधारक आणि सुधारणांची महाराष्ट्र ही जननी आहे. महाराष्ट्राच्या अठरा पगड जातीतील संतांचा वारकरी संप्रदाय देशभरात व्यापून राहिला आहे. आनंदवन, एक गाव एक पाणवठा, अंधश्रद्धा निर्मूलन, माहितीचा अधिकार, अशा विविध सामाजिक चळवळी सर्वप्रथम याच भूमीत जन्माला आल्या. समाजाला अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या जोखडातून मुक्त करणारे परिवर्तनवादी दलित व ग्रामीण साहित्य देखील पहिल्यांदा महाराष्ट्र भूमीतच प्रवाहित झाले. संगीत रंगभूमीचे शिल्पकार आण्णासाहेब किर्लोस्कर यांनी पारशी आणि मराठी नाट्यसंस्कृतीच्या एकत्रिकरणाची किमया १८ व्या शतकात केली, ती या महाराष्ट्राच्या भूमीतूनच.

‌कला, विज्ञान, अर्थकारण असो की राजकारण, तथा २१व्या शतकातील माहिती व तंत्रज्ञान असो, या क्षेत्रात महाराष्ट्राने  एक वेगळा ठसा उमटवला आहे, हे निर्विवाद सत्य सर्वजण मान्य करीत आहेत. अर्थात विविध क्षेत्रातील प्रगतीमुळे महाराष्ट्राची उज्वल व उन्नत विकासाची कमान उत्तरोत्तर चढतीच राहिली आहे.

गेल्या साठ बासष्ठ वर्षात महाराष्ट्र राज्याने अनेक नवनव्या  विकासाच्या वाटा शोधत प्रगतीचा पुढचा टप्पा गाठला आहे. इतकेच नव्हे तर देशालाही अनेक बाबतीत नवी दिशा दाखविली आहे. ग्रामीण भागांचा कायापालट करणारी सहकार चळवळ आणि विविध सहकारी संस्था ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देण आहे. लोकशाही समाजव्यवस्था तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असणारी पंचायतराज व्यवस्था सर्वप्रथम महाराष्ट्राने साकार केली. आज देशभरात राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेची सुरुवात सर्वात आधी सुरू केली ती महाराष्ट्राने. उद्योग क्षेत्रात ही महाराष्ट्र राज्याने देशात नेहमीच आघाडी घेतली आहे.आजही इतर राज्यांतील कष्टकरी कामगार आपल्या रोजीरोटीसाठी महाराष्ट्रात येण्यास अग्रक्रम देत आहे.

विकासाच्या वाटेवर चालत असताना महाराष्ट्राला अजूनही मोठ्या आव्हानांशी सामना करावा लागतो आहे.शालेय आणि उच्च शिक्षण या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, शिवाय तेथून बाहेर पडल्यावर रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही, तसेच शिकल्यामुळे या मुलांना शेती करणे कमीपणाचे वाटते, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे लोंढे शहराकडे धाव घेतात, शहरातील या वाढत्या घूसखोरीमुळे शहरांत मोठ्या प्रमाणात बकालपणा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महात्मा गांधींच्या "खेड्याकडे चला" या विचारधारेचा पूर्ण फज्जा उडाला आहे. त्याचे दुष्परिणामही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालयात निम्म्या जागांसाठी विद्यार्थी मिळत नाहीत,अशी वस्तुस्थिती आहे. जे उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत, त्यांना योग्य रोजगार मिळत नाही, या पीढीचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. साखर कारखान्यांच्या मळी व रासायनिक वायूमुळे प्रचंड प्रमाणात जलप्रदूषण व वायूप्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. थेट नदीपात्रात ही मळी व रासायनिक द्रव्ये सोडल्यामुळे झुळझुळ वाहणाऱ्या नद्या प्रदूषित होत आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांना पुरेशा सेवा देण्यासाठी ही अधिक व जलद काम होणे गरजेचे आहे. साखर कारखान्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे ऊसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, त्यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेली आहे. धरणे आणि कालवे यांचे पाणी बहुतेक ऊसासाठी वळविण्यात आले आहे, त्यामुळे नदी खोऱ्यातील खालच्या पट्ट्यात असणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील बागायती शेती ओसाड होत आहे, शिवाय नदीच्या काठावर वसलेल्या गावांना व वाड्यावस्त्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आजही अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांची आणि संकटांची मालिकाच राज्यासमोर उभी आहे. अर्थात संकटसमयी महाराष्ट्र कधीच मागे हटलेला नाही. कोरोना सारख्या अस्मानी संकटात ही महाराष्ट्र राज्य डगमगले नाही. कोरोनापासून प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी राज्यातील प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, राखीव सुरक्षा दल, पारिचारिका, अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्वच घटकांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत.तरीही अशा आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्राने अधिक सक्षम,व सावध असणे आवश्यक आहे, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून उपाययोजना तयार ठेवणे गरजेचे आहे.

अलीकडे हिजाब, मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा पठण यांसारख्या धार्मिक व सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या  घटनांमुळे यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जातीयवादी विचाराने भरडला जातो आहे की काय, अशी भीतीही वाटते आहे, मात्र राज्याने अशा बाबतीत ठोस निर्णय घेऊन ही जातीयवादी विषवल्ली मुळासकट उपटून टाकली पाहिजे. 

एकूणच भविष्याविषयी वाटणारी असुरक्षितता, अनिश्चितता व अस्वस्थ वर्तमान बदलण्यासाठी संयमाने तोंड देऊन आपण सारे मिळून अशा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांना नेस्तनाबूत करू या...! सुरक्षित आणि निरामय जीवन जगण्यासाठी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संकल्प करून कवी गोविंदाग्रज यांच्या महाराष्ट्र गीतांने आपल्या महाराष्ट्राला मुजरा करूया....!

"मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा...

प्रणाम घ्यावा माझा हा, महाराष्ट्र देशा..!!"

- सुनीलकुमार सरनाईक

कोल्हापूर, भ्रमणध्वनी: ९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)



एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एक निकाल देताना या प्रकरणातील आरोपी फिरोज याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे प्रकरण गेले तेव्हा तेथे त्या गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा रद्द करून त्याला २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. न्यायालयाचे असे म्हणणे आहे. एका मराठी दैनिकात प्रकाशित झालेल्या बातमीनुसार या खटल्यातील न्यायमूर्तींनी असे मत व्यक्त केले आहे की ‘‘घटनेचे गांभीर्य पाहता दोषीला जन्मठेपेची शिक्षा देणे योग्य ठरले असते, परंतु न्यायिक सिद्धान्ताद्वारे एक गोष्ट शिकविली जाते की गुन्हेगारास सुधरण्याची संधी दिसून आल्यास त्यास सुधरण्याची संधी दिली जावी, असे हा सिद्धान्त सांगतो. कारण कठोर शिक्षा नेहमीच उयोगी नसते.’’ त्यामुळेच न्यायालयाने या सिद्धान्ताचे पालन करून दोषीला २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्याया निरीक्षणामुळे एक गंभीर प्रश्न उभा राहतो तो असा की न्यायालयाने दोषीच्या सुधरण्याचा विचार करावा की ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्याचा विचार करावा? ज्या चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला, तो अत्याचार किती घृणास्पद आहे? चार वर्षांच्या निरागस मुलीवर आधी अत्याचार आणि नंतर तिची हत्या. दोषीने केवळ तिची अब्रू लुटली नाही तर तिच्या जगण्याचा हक्कच नष्ट करून टाकला आणि अशा अत्याचारी दोषीला सुधरण्याची संधी दिली जाते तर मग त्या मुलीला जगण्याची संधी या जगात कोणीतरी देऊ शकेल काय? न्यायालयाच्या न्यायाने दोषीला दिलासा मिळाला असेल, पण त्या अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांना कोणता दिलासा या निकालामुळे मिळणार? दोषीला जीवनदार तर मिळालेच त्याचबरोब जन्मठेपेतूनही त्याला सुटका मिळाली. पण ज्या मुलीवर दोन दोन अत्याचार झाले, तिची अब्रू लुटण्यात आली आणि तिच्या आयुष्यच संपवण्यात आले त्याचे काय? सरासरी ६०-७० वर्षे ती या जगात जगली असती. तिचं लग्न झाले असते, तिला वैवाहिक जीवनाचा आनंद घेता आला असता, तिला संततीसुख लाभले असते. आणखीन तिने आपल्या आयुष्यात एखादा मोठा पराक्रम केला असता. त्या पाशवी वृत्तीच्या दोषीने कोणते अधिकार, कोणकोणती स्वप्ने त्या लहान वयातील मुलीची या नराधमाने धुळीस मिळविली असतील, याचा विचार न्यायाचा कोणता सिद्धान्त सांगू शकेल का? एका सामान्य माणसाची न्यायाच्या बाबतीत अशी समज असते आणि ती वास्तवदेखील आहे की न्यायालयाने आणि न्यदानाच्या प्रक्रियेने नेहमी पीडिताशी सहानुभूती करावी, अपराधी, दोषीशी सहानुभूती करू नये. या खटल्यातील निकालामुळे न्यायालयाचा सिद्धान्तच सामान्यांच्या नजरेतून बदलून गेला की काय? जर न्यायालयीन प्रक्रियेने दोषीची बाजू घेतली तर पीडिताला न्याय कोण देणार, हा खरा प्रश्न आहे. जर तो गुन्हेगार ज्याने हे पाशवी कृत्य केलेले आहे तो वीस वर्षांनंतर सुधरून तुरुंगातून बाहेर पडला तर त्या मुलीचे गेलेले आयुष्य परत आणू शकेल काय आणि दुसरी बाब अशी की तो गुन्हेगार तुरुंगातून बाहेर आल्यावर सुधरण्याऐवजी अणखीनच बिघडून गेला तर अशाच प्रकारचे अपराध तो करणार नाही हे कशावरून? तर मग त्याला दिलेल्या संधीचे काय?

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget