Halloween Costume ideas 2015
Latest Post


ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. गेल्या ७३ वर्षाच्या काळात भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या  प्रगतीचा आलेख पाहून प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने अचंबित झाले आहे. १९४७ पूर्वी या देशात टाचणी देखील तयार होत नव्हती. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७३ वर्षांत भारताने औद्योगिक तसेच माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रगत असलेल्या जगातल्या दहा राष्ट्रांमध्ये भारताचा उल्लेख गौरवाने केला जातो.औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच भारताने कृषी क्षेत्रातील केलेली भरीव प्रगती निश्चितच गौरवास्पद आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या सारख्या कृषिप्रधान राष्ट्राला दरवर्षी लाखो टन गहू अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशांतून आयात करावा लागत होता.आज भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.नव्हे नव्हे अन्नधान्याच्या निर्यातीच्या बाबतीत भारताचा नंबर पहिल्या दहा राष्ट्रांमध्ये लागतो. १९७०नंतर अन्नधान्याच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली असून ही देशाची नेत्रदीपक प्रगती पाहून अनेक शेजारची राष्ट्रे आश्र्चर्यचकित झाली आहेत.कारण अन्नधान्याच्या उत्पादनात जवळपास चौपटीने वाढ झाली आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात केलेली प्रगती देखील अभिमानास्पद आहे. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांने १९७४ साली राजस्थानातील वाळवंटात ॲटमबॉम्बचा स्फोट करून संपूर्ण जगाला आश्र्चर्यचकित केले होते. त्यावेळी ऑटमबाॅम्ब तयार करणारे जगात भारत हे ६ वे राष्ट्र होते. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेली काही वर्षे भारतीय अभियंत्यांनी मोठा नावलौकिक मिळविला आहे.या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगतीप्रमाणे भारताने काही उदात्त मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे.अनेक अडचणींना तोंड देत भारताने इथली लोकशाही कणखर आणि मजबूत करण्यासाठी दमदार पाऊले उचलली आहेत. तसेच सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांच्या आधारे वाटचाल केली आहे.जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहीले जाते.आपली राज्यघटना ही जगातल्या इतर कोणत्याही चांगल्या राज्यघटनेशी तुलना करावी,इतकी उत्तम प्रकारची आहे, असे अनेक विचारवंतांनी मत मांडले आहे.आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याच्या तत्वावर आधारित आहे, याचे कारण आपल्या राष्ट्रीय नेत्यांची सर्वधर्मसमभावाच्या तत्वावर अभंग निष्ठा होती. 

     आपल्या देशातील लोकशाही कणखर आणि खंबीर आहे. याचे एक कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वामध्ये सापडेल. पंडित नेहरू यांचा पिंड पूर्णपणे लोकशाहीवादी होता.त्यांनी आपल्या १७ वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या काळात येथील लोकशाहीचा पाया अनेक  दृष्टींनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेमध्ये व देशामध्ये लोकशाहीला पोषक अशा परंपरा आणि प्रथा निर्माण केल्या. त्यांनी विरोधी पक्षांना सुध्दा प्रतिष्ठा मिळवून दिली. विरोधी पक्ष देखील राष्ट्र उभारणीच्या कार्यातील आपला भागीदार आहे,अशा दृष्टीने त्यांनी विरोधी पक्षांना वागविले. आपल्या हातातल्या सत्तेचा वापर त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचा सूड घेण्यासाठी वापरली नाही, तर ती सत्ता राष्ट्राच्या विकासासाठी वापरली.त्यांची ही भूमिका आजच्या काळात ही अतिशय महत्त्वाची असून उठसूट पंडितजींना बदनाम करणाऱ्या लाचखोर प्रवृत्तींनी व तथाकथित अंधभक्तांनी लक्षात घेण्यासारखी आहे.

     वास्तविक जगातल्या इतर कोणत्याही देशासमोर नसतील अशी गुंतागुंतीची अनेक आव्हाने या देशातील लोकशाही समोर आहेत, येथे जगातील अनेक धर्माचे लोक अनेक शतके राहत आहेत, जगात कोठेही नसलेली आणि केवळ याच देशात असलेली अस्पृश्यता, जातीव्यवस्था आपल्या समाजात खोलवर रूजलेली आहे, शिवाय सामाजिक व आर्थिक विषमता हा ज्वलंत प्रश्न नेहमीच ऐरणीवर आहे, अशा या देशामध्ये सर्वांच्या मध्ये एकात्मकतेची भावना निर्माण करून राष्ट्राच्या विकासासाठीची धोरणे अंमलात आणणे हे खरे तर फार मोठे आव्हान होते, मात्र या देशाच्या सुदैवाने पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सारख्या लोकशाहीप्रवण पुरोगामी विचारांचे नेतृत्व या देशाला लाभले आणि म्हणूनच या देशातील लोकशाही हळूहळू पण निश्चितपणे बळकट होत गेलेली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र अलिकडच्या काळात सत्तेचा गैरवापर करून या देशातील राष्ट्रपुरूषांचे राष्ट्रासाठीचे भरीव योगदान व प्राणार्पण यांना अनुल्लेखाने मारले जात असून उठसूट त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे सर्वाथांने चुकीचे व निषेधार्ह आहे, हे अनेकांनी मान्य केले आहे.

     भारताने गेल्या ७३ वर्षात राजकीय क्षेत्राप्रमाणेच आर्थिक क्षेत्रात ही प्रगतीचा मोठा टप्पा पार केला आहे.देशात नियोजनबध्द आर्थिक विकासाचा   वेग वाढता राहील यासाठी पंचवार्षिक योजना सुरू केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रयत्नांमुळे १९५६साली भारताने संमिश्र अर्थव्यवस्थेचे तत्व स्विकारले.पंडित नेहरूंनी एका दृष्टीने देशाला समाजवादी विचारसरणीचे धडे दिले,तर दुसऱ्या बाजूला खाजगी क्षेत्र व सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिले.त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक पायाभूत उद्योगधंद्यांच्या पायाभरणीचे कार्य झाले. त्यांनी पोलादाचे ५-६ मोठमोठे कारखाने देशात सुरू केले. वीज निर्मितीला चालना मिळावी म्हणून अनेक मोठमोठी धरणे बांधली.देशातील अंतर्गत दळणवळण व वाहतूक व्यवस्था यांनाही उत्तेजन दिले. इंदिरा गांधी यांनी तर बॅंकांचे राष्ट्रीयीकरण केले आणि समाजवादी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले.आपल्या देशाने १९९२नंतर मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली आणि लवचिकतेचा एक सुंदर आविष्कार आपण जगाला दाखवून दिला. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण ही नवी तत्वे स्विकारल्यामुळे पंडित नेहरू यांच्या पूर्वीच्या समाजवादी विचारसरणीचे धोरण चुकीचे होते की काय अशी शंका अनेकांनी व्यक्त केली, मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील वाढ आवश्यकच होती. पोलादासारखे अनेक कारखाने आपण सुरू केले.त्यामुळे खाजगी उद्योगधंद्यांना चालना मिळाली. १९६५ च्या पाकिस्तानच्या युध्दात याच पोलादाची शस्त्रे तयार करून ती आपण युध्दभूमीवर पाठवू शकलो.१९६५ चे युध्द आपण अवघ्या दहा दिवसांत जिंकू शकलो याचे कारण आधीच्या काळात आपण केलेल्या पोलादासारख्या पायाभूत उद्योगधंद्यांची वाढ हे होय.नंतरच्या काळात या राष्ट्रीयीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांमुळे कोट्यावधी रुपयांचा तोटा होऊ लागला.अशा उद्योगधंद्यांचा आपल्याला वाईट अनुभव आला, त्यामुळे खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी आपले लक्ष वेधून घेतले.अर्थात असाच अनुभव जगातल्या कम्युनिस्ट राष्ट्रांनाही आला, चीनसारख्या कम्युनिस्ट देशानेही खाजगीकरण अवलंबिले. खाजगीकरण ही आज काळाची गरज आहे, तर राष्ट्रीयीकरण व सार्वजनिक क्षेत्रातील विस्तार ही सुरुवातीला आपली निकड होती, दोन्ही अर्थव्यवस्था पुरक ठरल्या आणि विकासाच्या गतीने वेध घेतला,हे वास्तव नाकारता येणार नाही.          

     भारताने गेल्या ७३ वर्षात विविध क्षेत्रांत पुष्कळ उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी केली आहे. मात्र दुर्देवाने गेल्या काही वर्षांपासून  दहशतवादी कारवाया वाढत आहेत, त्याचबरोबर देशाला नैसर्गिक आपत्तींशीही सामना करावा लागतो आहे, त्यातच यंदा कोरोनाच्या जागतिक संकटामुळे देशाला आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसला आहे, या महामारीमुळे देश महामंदीत जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत असतानाच एकीकडे विविध क्षेत्रांत केलेल्या विकासकामांचा आनंद आहे, तर दुसरीकडे नोटाबंदीचा फसलेला निर्णय, प्रचंड महागाई, वाढती बेकारी आणि बेरोजगारी, तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, देशातील ढासळणारी अर्थव्यवस्था यासारख्या अनेक नैसर्गिक व मानवी संकटांमुळे अस्मानी दु:ख पचवावे लागत आहे, कधी नव्हे ते आज देशात अत्यंत जीवघेण्या भयभीत वातावरणात देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागतो आहे, भविष्यात काय वाढून ठेवले आहे, या प्रश्नाचे उत्तर आज तरी कोणापाशी दिसत नाही, ही खंत, खेद आणि मनस्वी दु:ख आहे.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

( लेखक भारत सरकारच्या ग्राहक संरक्षण विषयक स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)


 


राष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये जेव्हा अनियमित आणि अनपेक्षित घटना घडत असतात त्या वेळी सामान्य नागरिक किंवा विचारवंत त्या घटनांची नोंद घेत नसतात. तेव्हा या घटना राजकीय सामाजिक व्यवस्थेमध्ये दुर्घनांचे रूप घेत असतात. वर्तमानात इतक्या गंभीर परिस्थितींना संपूर्ण राष्ट्राला तोंड द्यावे लागत असते की त्या घटनांमुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांची दखल घ्यायला त्यांना वेळ मिळत नाही. कारण प्रचलित राज्यव्यवस्था त्यांना गंभीर आणि अविरत समस्यांमध्ये अडकवून ठेवते. पण या घटना वर्तमानातून भूतकाळात आपला ठसा उमटवित असतात. त्यांची नोंद होत असते आणि राष्ट्रांचा प्रवास आपण ठरवलेल्या ध्येय-उद्दिष्टांचा मार्ग सोडून इतरत्र वळण घेत असतो तेव्हा त्यांना पूर्वपदावर आणणे कोणत्याही राष्ट्राला अत्यंत कठीण असते. काही देश भरकटलेल्या राज्य-सामाजिक प्रवालाहा पूर्वपदावर आणण्यात यशस्वी होत असतात, पण यासाठी त्यांना मोठे बलिदान द्यावे लागते. ही तर शक्तिशाली राष्ट्राची गोष्ट. पण जी राष्ट्रे शारीरिक शक्तीने, बुद्धिमत्तेने दुर्बल असतात, सोयी-सुविधांच्या अभावाने ग्रासलेल्या असतात किंवा एका मोठ्या समाजाची दिशाभूल करून त्यांना खोटी स्वप्ने दाखवून त्यांना सत्तेचे श्रीमंतीचे स्वप्न दाखवून आपल्या प्रभावाखाली आणि बौद्धिक नियंत्रणाखाली आणलेले असते तेव्हा अशा राष्ट्राची वाटचाल भविष्याकडे नव्हे तर भूतकाळातील अराजकतेकडे होत असते. राष्ट्राच्या एका समुदायाने जर अशा शक्तीविरूद्ध अभे ठाकण्याचा प्रयत्न केला तर शासन प्रशासन सर्वशक्तिनिशी त्यांना दाबून ठेवते. त्यांच्यावर अनन्य अत्याचार करत असते. अशा राज्यव्यवस्थेची पुढची वाटचाल विध्वंसाकडे होत असते.याची जाणीव उशिराने का होईना विचारवंत बुद्धिजीवींना होत असते, परंतु तोपर्यंत परिस्थिती त्यांच्या आवाक्याबाहेर निघून जाते. परिणामी गेल्या कित्येक दशकांपासून जे राष्ट्र विकासाकडे लोककल्याणाला वाहून गेलेल्या उद्दिष्टांकडे वाटचाल करत असते, तेच राष्ट्र झपाट्याने विध्वंसाकडे पूर्ण शक्तीने उलट प्रवास करते. अशा राष्ट्राचा हा प्रवाह देशाच्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल असतो, मात्र राष्ट्रासाठी प्रतिकूल असतो. सत्ताधारीवर्ग आपल्या अल्पशा काळाच्या उद्दिष्टांसाठी याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच राष्ट्राची अधोगतीला बळ प्राप्त करून देतो. या दुष्टचक्रात जगातील बरीच राष्ट्रे विध्वंसाला बळी पडलेले आहेत. जगभरातील विविध राष्ट्रांच्या इतिहासाचे अध्ययन केले तर अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला मिळतील.

महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राष्ट्रातील काही घटक सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली का येत असतात? या सत्ताधारीवर्गाद्वारे कोणती आकर्षणे त्यांना दाखवली जातात? याचे सोपे उत्तर असे की प्रत्येक सत्ताधारीवर्ग आपल्या नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी आणि भवितव्याशी त्यांचे नाते तोडण्यासाठी त्यांच्यासमोर गत सभ्यता आणि संस्कृतीची स्वप्ने दाखवत असतो. सत्ताधारीवर्गाला गतवैभवाची पुनरावृत्ती करण्यात काही एक रस नसतो. जरी त्यांचे उद्दिष्ट प्रमाणिक असले तरी भूतकाळाचे वर्तमानात रुपांतर करणे त्यांच्या आवाक्यात नसते. कारण सृष्टीचा प्रवास नेहमी भविष्याकडे मार्गक्रमण करत असतो. उलट दिशेने कोणताही पुढचा प्रवास करता येत नाही. जर कुणी करायचा प्रयत्न केला तर त्यांना यश मिळणार नाही. खरे तर ते आपल्या अशा भूतकाळाकडे निघालेले असतात ज्याला स्वतः त्यांनीच नाकारले होते आणि राष्ट्रबांधणी, न्यायव्यवस्था आणि मानवी जीवनमूल्यांसाठी त्यांनी स्वतःच्या भूतकाळाला तिलांजली दिलेली असते.

ही एक वास्तविकता आहे आणि बऱ्याच लोकांना मान्य नसणार तरीदेखील हे मानवी जीवनाचे असे कटु सत्य आहे की ज्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर कोणतेही राष्ट्र किंवा लोकसमूह स्वतःचाच विनाश पत्करत आहे. काय ते? गतवैभव आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे कोणत्याही लोकसमूहाचे स्वप्न. त्याचबरोबर संस्कृतीला अधिकाधिक समृद्ध करणे हे आहे. एखाद्या जनसमूहाची संस्कृती कोणत्याही राज्यव्यवस्थेतील साऱ्या सह-लोकसमूहांची संस्कृती असू शकत नाही. म्हणून एखादा समूह जितक्या प्रमाणात आपली विशिष्ट संस्कृती समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेवढीच ती संस्कृती फॅसिस्टबादाकडे प्रस्थान करत असते आणि असे करताना राष्ट्रीय जनमाणसांत एक दोन नव्हे तर जितके लोकसमूह आहेत त्या सर्वांना आपल्या संस्कृतीला धोका वाटू लागल्याने राष्ट्रीय कलहात याचे रूपांतर होते. मग या कलहाचा धोका साऱ्या नागरिकांना, सर्व लोकसमूलांना पत्करावा लागतो.

ही वस्तुस्थिती टाळण्यासाठी कोणत्याही भौगोलिक सीमांतर्गत राहणाऱ्या विविध जाती-संप्रदाय, धार्मिक समूह आपले वैयक्तिक हितसंबंधांना बाजूला सारून स्वतःसाठी एका न्याय्य समाजाची स्थापना करतात. म्हणजे एका सर्वसमावेशक राज्यव्यवस्थेची स्थापना करतात. या राज्यव्यवस्थेतील घटक-समूहांना काही अंशी आपल्या वैयक्तिक आणि सांप्रदायिक उद्दिष्टांना तिलांजली द्यावी लागत आहे, पण राज्यव्यवस्था आणि स्वतःचे राष्ट्रहित जपण्यासाठी ते आपल्या काही हक्कांचा त्याग करतात. या बदल्यात त्यांना काही मूलभूत अधिकार, न्यायिक हक्काधिकार, कायदे-नियम आणि संविधानाचे राज्य निर्माण करायचे असते. हा प्रवास कोणत्याही राष्ट्रासाठी संस्कृतीसाठी खडतर असतो, पण एवढा खडतर प्रवास केल्यानंतर एक सर्वसंपन्न भवितव्याच्या उंबरठ्यावर पोचल्यानंतर जर त्या राष्ट्राला, जनसमूहांना ‘पेगासस’सारख्या महाकाय आपत्तीशी झुंज द्यावी लागत असते तेव्हा त्यांचे ऐहिकच नव्हे तर आत्मिक अस्तित्वदेखील संपून जाते. नागरिक हेरगिरीला बळी पडतात तेव्हा जी बलिदाने देऊन एका सभ्य मानवी समाजाची उभारणीसाठी त्यांनी दीर्घकाळ आणि सर्वंकष प्रयत्न केले होते ते सर्व धुळीस मिळतात. नागरिकांचे अस्तित्व शून्यात परिवर्तित होते.

- सय्यद इफ्तिखार अहमद

मो.: ९८२०१२१२०७



ग्रीक पौराणिक कथांमधील झ्यूसचा सेवक पेगासस हा एक पांढरा, पंख असलेला घोडा चमत्कारिक पराक्रम करण्यास सक्षम असतो आणि आता तो सर्जनशील प्रेरणेचे प्रतीक बनला आहे. सायबर भाषेत, असुरक्षितता ही एक दुबळेपणा आहे ज्याचा वापर हॅकर्स संगणक किंवा स्मार्टफोनमध्ये घुसण्यासाठी करू शकतात.

राजकारणी, न्यायाधीश, पत्रकार, वकील, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, नोकरशहा आणि घटनात्मक अधिकारी अशा सुमारे ३००० हून अधिक प्रसिद्ध भारतीयांच्या स्मार्टफोनला लक्ष्य करून ते संक्रमित करणाऱ्या पेगासस स्पायवेअरचे प्रकरण सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय लोकशाही, राजकारण, व्यवसाय आणि भवितव्यासाठी याचा अर्थ काय आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

सत्ताधारी पक्ष आणि त्याच्या सरकारच्या प्रतिक्रियांची क्रोनॉलॉजी पाहणे मनोरंजक वाटते. पहिली प्रतिक्रिया इस्रायलच्या पेगासस आणि एनएसओचे अज्ञान होती, ती पेगासस सॉफ्टवेअरच्या 'अनधिकृत वापरा'पर्यंत जाते (जे प्रत्यक्षात केवळ सरकारांना विकले जाते आणि त्याद्वारे हॅक केलेल्या प्रत्येक स्मार्टफोनसाठी अंदाजे 1 कोटी रुपये खर्च आकारला जातो). मग ही चर्चा प्रमाणित ऑपरेटिंग प्रक्रियेसह राष्ट्रीय हितासाठी 'अधिकृत वापरा'कडे गेली. मग प्रश्न उपस्थित होतो की, इतर राष्ट्रीय सरकारेही त्याचा वापर करतात, मग एकट्या भारताला का लक्ष्य केले जात आहे (भारतीयांना साहजिकच आधी त्यांच्या सरकारची चिंता असेल).

काँग्रेस काळात फोन टॅपिंगच्या प्रसिद्ध प्रकरणांकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही लोकशाही प्रथा कधीच नव्हती. गुगल आणि फेसबुकने सर्व वैयक्तिक डेटा कॅप्चर केला तेव्हा भारतीयांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता, मग आता गोंधळ का माजवण्यात येत आहे, असे युक्तिवाद उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून सोशल मीडियावर झाले होते. वैयक्तिक संवाद, चॅट, ईमेल, निवडक लोकांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांचा कॅमेरा काय दाखवतो हे पाहण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यासाठी परदेशी टेक कंपनीचा हा सरकारी अनुदानित प्रकल्प आहे, या वस्तुस्थितीकडे ते स्पष्टपणे दुर्लक्ष करतात. कॉंग्रेसच्या काळात फोन टॅपिंगच्या कथा खोदण्यासाठी आणि सामायिक करण्यासाठी भाजप आयटी सेलला आक्रमकपणे ठेवण्यात आले आहे. दुसरे म्हणजे फेसबुक, गुगलसारख्या 'वसाहतवादी पाश्चिमात्य कॉर्पोरेट पॉवर्स'ना कोणत्याही प्रकारे सर्व नागरिकांचा वैयक्तिक डेटा मिळत आहे आणि आधार तपशील बऱ्याच एजन्सीद्वारे वापरला जातो. पेगासस प्रकल्पाविरूद्ध जनतेचा राग बोथट करण्याचे हे प्रयत्न आहेत. पेगासस स्पायवेअर घोटाळा हा केवळ गोपनीयतेचे उल्लंघन किंवा सुरक्षा एजन्सींनी बेकायदेशीर पाळत ठेवणे किंवा हेरगिरीचे प्रकरण नाही, हे सर्व बरेच काही आहे. पेगासस लष्करी ग्रेड स्पायवेअर आहे जो हेरगिरी आणि हॅकिंगला पूर्णपणे नवीन पातळीवर नेतो. पेगासस वापर हा गेल्या सात वर्षांत तयार झालेल्या मोठ्या हुकूमशाही वास्तुकलेचा एक भाग आहे. संदेश असा आहे की हुकूमशाही हिंदुत्व व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी कोणतेही मार्ग स्वीकारले जाऊ शकतात. यूएपीएप्रमाणेच भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपीचे संगणक हॅक करून पुरावा म्हणून मालवेअर लावणे, अंमलबजावणी संचालनालय आणि इतर केंद्रीय एजन्सींचा धमकावण्यासाठी आणि तुरुंगात डांबण्यासाठी वापर करणे, पेगासस हे संभाव्य विरोधक आणि धोक्यांविरूद्ध सायबर शस्त्र आहे.

भाजप राजवटीत घटनात्मक संस्था कमी होत असल्याची चर्चा सतत सुरू असते. मोदींच्या बाजूने असलेल्या आयोगाच्या काही निर्णयांवर असहमत निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांना लक्ष्य करण्यासाठी स्पायवेअरचा वापर केला गेल्याचे आणि गरज पडल्यास घटनात्मक संस्थांच्या कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचे म्हटले जाते. सरकारची बदनामी करण्याचा आणि "आपल्या लोकशाहीला बदनाम" करण्याचा कट असल्याचे सांगून मोदी सरकारने पेगासस खुलासे फेटाळून लावले आहेत. सरकार एनएसओकडून स्पायवेअरच्या वापराचे कोणतेही तंत्रज्ञान नाकारत आहे. खरे तर, २०१९ मध्येही असा नकार देण्यात आला होता, जेव्हा व्हॉट्सअॅपने सूचित केले होते की पेगाससचा वापर करून भारतात १२१ व्यक्तींचे फोन हॅक करण्यात आले आहेत, ज्यात भीमा कोरेगाव प्रकरणातील काही आरोपींचा समावेश होता.  मेक्सिकोमध्ये, जिथे मोठ्या संख्येने फोन लक्ष्य केले गेले (एकूणच १५,०००), सध्याचे अध्यक्ष मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांच्या जवळचे ५० लोक संभाव्य लक्ष्यांच्या यादीत होते, ज्यात त्यांची पत्नी, मुले, मदतनीस आणि डॉक्टर यांचा समावेश होता. परंतु २०१७ मध्ये ते मुख्य विरोधी पक्षनेते असताना हे केले गेले. मेक्सिकन सरकारने पुष्टी केली आहे की पेगासस स्पायवेअर प्रथम संरक्षण मंत्रालयाने आणि नंतर राष्ट्रीय सुरक्षा गुप्तचर सेवा आणि इतर राज्य सुरक्षा दलांनी २०११ मध्ये विकत घेतले होते.  मेक्सिकोने पेगासस स्पायवेअर विकत घेतल्याची कबुली दिली आहे असे दिसते परंतु भारत सरकारने तसे करण्यास नकार दिला आहे. पेगासस या ग्रीक दंतकथेचा पंख असलेला घोडा पुन्हा एकदा मोदी सरकारला सतावत आहे. द वायर, वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन सह दोन स्वयंसेवी संस्थांच्या - अॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि १७ वृत्तसंस्थांनी ४५-५० देशांमधील ५०,००० फोन नंबरची संभाव्य यादी तपासण्यात अनेक महिने घालवले आहेत. या देशांमध्ये सायबर हल्ल्यांचे संभाव्य लक्ष्य कोण असू शकते हे त्यांना कळले आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फोनची चाचणी घेण्यास तयार असलेल्या काही लोकांच्या लक्ष्य यादीतील फोनची फॉरेन्सिक तपासणी केली. ८५ टक्के फोन पेगासस स्पायवेअरने हॅक होण्याची चिन्हे दर्शवितात, असे या अहवालावरून दिसून आले आहे. त्यापैकी ३०० क्रमांकांची पडताळणी करण्यात आली आहे. ही यादी उघड होत आहे: त्यात राहुल गांधी आणि टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यासारख्या विरोधी पक्षनेत्यांचा समावेश आहे, कर्नाटकातील काँग्रेस-जद (एस) सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यांची संख्या आहे; सध्याच्या केंद्र सरकारमधील दोन मंत्री, त्यापैकी एक २०१७ मध्ये त्या वेळी खासदारही नव्हते; त्यात ४० पत्रकारांचा समावेश आहे; निवडणूक आयोगाचा एक सदस्य आणि उमर खालिद, रेल्वे कामगार संघटनेचा नेता इत्यादी विद्यार्थी कार्यकर्त्यांचे नंबर आहेत. स्पायवेअरच्या वापरातील उद्देश स्पष्ट आहे. हे सत्तेत असलेल्यांचे संरक्षण करण्यासाठी, विरोधकांना अस्थिर करण्यासाठी आणि माध्यमांमधील शोधपत्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.

संभाव्य लक्ष्यांमध्ये केवळ पत्रकार आणि कार्यकर्तेच नव्हे, तर सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर मर्यादा घालत त्यात चौदा राष्ट्रप्रमुख आणि सरकारांचा समावेश आहे: फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन, इराकचे बरहम सालिह आणि दक्षिण आफ्रिकेचे सिरिल रामाफोसा, तीन विद्यमान आणि सात माजी पंतप्रधान आणि एक राजा, मोरोक्कोचे मोहम्मद सहावे. पाकिस्तानचे इम्रान खान, इजिप्तचे मुस्तफा मद्बूली आणि मोरोक्कोचे साद-उद्दीन एल उस्मानी हे तीन विद्यमान पंतप्रधान आहेत. लेबनॉनचे साद हरीरी, फ्रान्सचे एडोअर्ड फिलिप, अल्जेरियाचे नॉरेद्दीन बेडोई आणि बेल्जियमचे चार्ल्स मिशेल हे सात माजी पंतप्रधान आहेत. काही माध्यमांनी असे नमूद केले आहे की नरेंद्र मोदी जुलै 2017 मध्ये इस्रायलला भेट दिली होती, असे करणारे पहिले भारतीय पंतप्रधान होते आणि त्या सुमारास - जुलैमध्ये स्पायवेअर भारतात वापरात असल्याचे वृत्त आहे. पण मोदींच्या दौऱ्यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मार्चमध्ये मोदींच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी इस्रायलला गेले होते. कालमापनानुसार "सुरक्षा" सहकार्यासाठी नवीन पावले उचलण्यावर चर्चा करण्यात आली, जसे की प्रसारमाध्यमांमध्ये उपस्थित असलेल्या अधिकृत ब्रीफिंगमध्ये म्हटले आहे की, या भेटीने "दहशतवाद आणि सुरक्षा क्षेत्रात अधिक मजबूत संबंधांचा पाया तयार केला गेला". 

यापूर्वीही हेरगिरी केली जात होती, नेताजी सुभाष चंद्र यांच्या कुटुंबाची करण्यात आली होती आणि बऱ्याच काळानंतर इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळातही. आता फरक इतकाच की, परकीय कंपनीने तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे घटनात्मक अधिकारी, राजकीय आणि माध्यमांच्या दिग्गजांच्या हेरगिरीला सरकार निधी देत आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा एक मोठा धोका आहे. राजकीय किंवा व्यावसायिक विरोधकांविरूद्ध अशा स्पायवेअर वापराचा अवलंब करण्याची प्रवृत्ती भविष्यातही कायम राहील. त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे अशा हॅकर्सनी हॅक केलेल्या स्मार्टफोनला मालवेअर आणि राष्ट्रविरोधी सामग्रीचा प्रादुर्भाव होऊ शकतो ज्यामुळे स्मार्टफोनच्या मालकांवर दहशतवादी आरोप होऊ शकतात. परंतु त्याचा अवलंब करण्याची वारंवारता आणि प्रमाण यावेळी विरोधी पक्ष आणि लोक कसा निषेध करतात आणि यामुळे काय होते यावर अवलंबून असेल. एडिटर्स गिल्डने आधीच मागणी केल्याप्रमाणे हे प्रकरण लवकरच न्यायालयात जाईल. त्याचप्रमाणे काही व्यक्ती आणि राज्य सरकारे न्यायालयात दाद मागत आहेत. कायदेशीर दिग्गजांचीही हेरगिरी करण्यात आली होती, त्यामुळे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्यासारख्या न्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालय यावर कसे काम करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पेगासस केवळ आपले संवाद ऐकत नाही किंवा निरीक्षण करत नाही.  एकदा का त्याने आपल्या स्मार्टफोनला संक्रमित केले, की ते फोनच्या सॉफ्टवेअरमध्ये "बदल" करते आणि त्याच्या सर्व कार्यांमध्ये प्रभावीपणे प्रवेश करते. आता तो आपल्या फोनचा मालक आहे आणि आपण करत असलेल्या कोणत्याही संभाषणावर देखरेख करू शकतो; केवळ टेलिफोनिकच नाही तर फोनवरील कॅमेरा "पाहू शकतो" असे कोणतेही चित्र काढू शकतो आणि ते सर्व फोनवर रेकॉर्ड करू शकतो. त्यानंतर या रेकॉर्ड केलेल्या फायली पेगासस सर्व्हरवर पाठवल्या जातात, जिथून पेगासस परवान्याचा खरेदीदार त्या परत मिळवू शकतो. जेव्हा आपण ईमेल/एसएमएसद्वारे आपल्याला पाठविलेल्या लिंकवर क्लिक करतो तेव्हा आपल्या डिव्हाइसचे बहुतेक संसर्ग होतात. पेगाससने व्हॉट्सअॅपच्या सुरक्षा समस्येचा गैरफायदा घेतला आणि केवळ मिस्ड कॉलद्वारे फोनला संक्रमित करण्यात सक्षम झाला. पेगासस वापरकर्ता एकाच लिंकवर क्लिक न करताही त्याच्या फोनशी जोडू करू शकतो. सायबर समुदायात या कृतीला शून्य क्लिक कारनामे म्हणतात. बरेच लोक आयफोन सुरक्षित आहेत या विश्वासाने वापरतात. दु:खद सत्य हे आहे की आयफोन वेगवेगळ्या मार्गांनी असला तरी अँड्रॉइड फोनइतकाच पेगासस हल्ल्यांसाठी असुरक्षित आहे. नुकत्याच झालेल्या  सायबर हल्ल्यांचा ओघ - दिवसाला हजारो असण्याचा अंदाज आहे – जो आपल्या संपूर्ण सायबर पायाभूत सुविधांसाठी एक धोका आहे ज्यावर आपल्या सर्व संस्था अवलंबून आहेत. एनएसए आणि सीआयएची सायबर शस्त्रे लीक झाल्यानंतर आणि आता एनएसओने पेगाससचा अंदाधुंद वापर केल्यावर अशी शस्त्रे विकसित करणाऱ्या राष्ट्रांवर खरोखरच विश्वास ठेवता येईल का? असा प्रश्न उपस्थित होतो. मायक्रोसॉफ्ट, ड्युश टेलिकॉम आणि इतर उद्योगातील काही आघाडीच्या कंपन्यांनी 2017 मध्ये सायबर शस्त्रांवर बंदी घालणाऱ्या नवीन जिनिव्हा कन्व्हेन्शनची मागणी केली होती. रशिया आणि चीनचा हा खूप जुना फोन आहे. सायबर स्पेसमध्ये लष्करी फायदा आहे, ज्याची उधळपट्टी करू नये, असा विश्वास बाळगून अमेरिकेने ते नाकारले.

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या बर्लिनस्थित सिक्युरिटी लॅबचे प्रमुख क्लॉडिओ गुअरनिएरी यांनी केलेल्या प्रगत संशोधनाशी एनएसओ अनभिज्ञ होता. तोपर्यंत एनएसओच्या ग्राहकांचा असा समज होता की, कोणत्याही फॉरेन्सिक चौकशीमुळे त्यांच्या हेरगिरीच्या कारवाया उघडकीस येऊ शकत नाहीत. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, सत्तेत असलेल्या लोकांना प्रत्येक इच्छेचे समर्थन करण्यास मदत करणारे कायदे असतील, तर त्यांनी बदलले पाहिजे. दिवंगत इंटरनेट आणि हॅकिस्ट अॅरॉन स्वार्ट्झ यांनी म्हटल्याप्रमाणे, "अन्याय्य कायद्यांचे पालन करण्यात कोणताही न्याय नसतो." नफा कमावणाऱ्या मालवेअरची निर्मिती करणाऱ्यांच्या मते, "एक उद्योग असे केले जे अस्तित्वात नसावे... जर तुम्ही या तंत्रज्ञानाची विक्री थांबवण्यासाठी काहीही केले नाही, तर ते केवळ ५०,००० लक्ष्य असणार नाही. हे ५० दशलक्ष लक्ष्य असणार आहे आणि आपल्यापैकी कोणाच्याही अपेक्षेपेक्षा हे खूप लवकर घडणार आहे." आंतरराष्ट्रीय स्पायवेअर व्यापारावर त्वरित जागतिक स्थगिती आणण्याची सध्या गरज आहे.

लोकशाही व्यवस्थेचे जतन करणे आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक आहे की ज्यांनी कायद्यांचे उल्लंघन केले त्यांच्यासाठी उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे. मोदी सरकार नाकारत असल्याने आणि दोषींचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत असल्याने उच्चस्तरीय चौकशी करणे अत्यंत अत्यावश्यक आहे.  सर्वोच्च न्यायालयाने अशा चौकशीची सुरुवात आणि देखरेख करण्याची गरज आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

भ्रमणध्वनी : ८९७६५३३४०४


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर काही जण ब्रिटीशांच्या अत्याचाराला बळी पडले व आयुष्यभर शारीरिक अपंगत्व येऊन जायबंदी झाले. अनेकांच्या पराक्रमाने आणि बलीदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांनी महत्वाची कामगिरी पार पाडली, यामध्ये चिकोडी तालुक्यातील खडकलाटचे निजामुद्दीन ऐनुद्दीन काझी यांनी मोठं योगदान दिलं आहे. खडकलाटसह २८ गांवचे"काझी" असणा-या ऐनुद्दीन इब्राहिम काझी हे त्यांचे वडील. स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे स्थायिक झालेल्या काझी कुटूंबाने २१ डिसेंबर रोजी क्रांतीवीर निजामुद्दीन काझी यांची जन्मशताब्दी साजरी केली.... २१ डिसेंबर १९१८ रोजी खडकलाट येथे निजामुद्दीन काझी यांचा जन्म झाला. खडकलाट येथे त्यांचे शिक्षण झाले.  ते महात्मा गांधींच्या भाषणामुळे प्रभावित झाले. त्यांच्या प्रेरणेतून ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. १९४२च्या चले जाव आंदोलनात सहभागी असतांनाच कोल्हापूर जिल्ह्यातील सेनापती कापशी चे करवीरय्या स्वामी यांचा परिचय झाला. क्रांतीवीर माधवराव बागल, देशभक्त रत्नाप्पांण्णा कुंभार आणि करवीरय्या स्वामी हे कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करत होते. रत्नाप्पा कुंभार यांच्या आदेशानुसार करवीरय्या स्वामी यांच्या नेतृत्वाखाली गारगोटी कचेरीवर सशस्त्र हल्ला करून कचेरीतील राजबंदींची मुक्तता करण्यात करण्याचं ठरलं.६० ते ६५ क्रांतीवीरांनी पाल येथील घनदाट जंगलात असलेल्या गुहेत याबाबत आखणी केली.१३डिसेंबर१९४२ ला गारगोटी कचेरीवर सशस्त्र हल्ला करण्याचा बेत आखला. दरम्यान ११ डिसेंबर १९४२ला कूर येथील वेदगंगा नदीवरील पूल डायनामाईटने उडवण्याचा कट रचला गेला.यात निजामुद्दीन काझी, लक्ष्मण सुतार यांचा प्रामुख्याने सहभाग होता. त्यानंतर गारगोटी कचेरीवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी इंग्रज पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात हुतात्मे झाले. या सात हुताम्‍यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या हुतात्म्यांच्या बलिदानास तब्बल ७७ वर्षे लोटली असली तरी या आठवणी आजही भुदरगड तहसीलदार कार्यालयासमोर उभा असलेल्या क्रांतीज्योतीच्या रूपाने ताज्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रजांना 'चले जाव' चा नारा दिला. गांधींच्या या नार्‍याने देशभर ब्रिटीश सरकाराविरोधात संतापाची लाट निर्माण झाली. सर्वत्र क्रांतीच्या मशाली पेटून उठल्या. यामध्ये कोल्हापूर जिल्हाही अग्रेसर राहिला. देशभक्त रत्नापाण्णा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली भुदरगडमध्येही क्रांतीकारकांची एक तुकडी काम करत होती. या तुकडीने गारगोटी कचेरी लुटण्याचा एक धाडसी बेत आखला होता.  गारगोटीतील सरकारी कचेरीवर ताबा मिळवून तिरंगी निशाण फडकविणे, कचेरीत स्थानबद्ध केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना मुक्त करणे व सरकारी खजिन्यावर हल्ला करून तो पैसा स्वातंत्र्यासाठी मिळविणे. कोल्हापूरवरून पोलिसांची कुमक गारगोटीपर्यंत पोहचू नये म्हणून कोल्हापूर गारगोटी मार्गावरील कूर येथे वेदगंगा नदीवरील पूल उडविण्याची धाडसी योजना स्वामी वारके यांनी योजली होती. १३ डिसेंबर १९४२ रोजी खजिना लुटण्याचा बेत पक्का झाला. वेगवेगळे गट पाडण्यात आले. यामधीळ एक गट खजिन्याची कुलपे तोडत असताना मॅजिस्ट्रेटचा संरक्षक बाबू जाधव याने केलेल्या हल्ल्यात अंधारात गोळ्या कोठून येतात हे न समजल्यामुळे शूरवीर करवीरय्या स्वामी, नारायण वारके, शंकरराव इंगळे, तुकाराम भारमल, पैलवान मल्लाप्पा चौगुले, बळवंत जबडे, परशुराम साळुंखे हे सात क्रांतीवीर धारातीर्थ झाले. निजामुद्दीन काझी यांचा पाय अधू झाला.त्यांच्या पायाला गोळी लागली.ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी निजामुद्दीन काझी यांना जखमी अवस्थेत अटक केली. माफीचा साक्षीदार होण्यासाठी पोलिसांनी त्यांचा अमानुष छळ केला. मात्र प्रखर देशभक्ती पुढे पोलिसांना माघार घ्यावी लागली.पुढे त्यांना ब्रिटिश सरकारने ३ एप्रिल १९४४रोजी ११ वर्षें ९ महिने सश्रम कारावास व ७०रुपये दंडाची शिक्षा सुनावली.पुढे निजामुद्दीन काझी यांना देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर कारावासातून मुक्त करण्यात आले. १५ ऑगस्ट १९७२ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निजामुद्दीन काझी यांना देशातर्फे ताम्रपट देऊन गौरविण्यात आले. इंदिरा गांधी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना एका भाषणात निजामुद्दीन काझी यांच्याकडे इशारा करत "जिंदा शहीद देखना है, तो निझाम काझी को देखो" अशा शब्दांत गौरव केला. या थोर क्रांतीवीराचे २० जानेवारी १९८९ रोजी वयाच्या ७१व्या वर्षी कबनूर येथे निधन झाले. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वत:च्या प्राणाची पर्वा न करणा-या क्रांतीवीर निजामुद्दीन काझी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...

- सुनीलकुमार सरनाईक

कोल्हापूर, 

भ्रमणध्वनी: ७०२८१५१३५२



देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी असे जाहीर केले की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला नाही. खोटे बोलायला कधीच कसलीही सीमा नसते. माणूस आपल्या गरजेनुसार, एपतीनुसार, परिस्थितीनुरूप खोटे बोलत असतो आणि खोटे बोलायचेच झाले तर त्याला मर्यादा का? कुणी एका कथित खोट्या घटनेचे वर्णन केले की एकापेक्षा अधिक यात फरक काय? खोटे बोलायला कमी-अधिकाची मर्यादाच कशाला? जी आकडेवारी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली ती ६००-७०० च्या घरात आहे. म्हणजे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ज्यांचे प्राण गेले अशांची आणि असंख्य असे दुर्दैवी लोक आहेत ज्यांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नव्हते, अशांनी ऑक्सिजनच्या प्रतिक्षेत रांगेत बसून आपले प्राण गमावले, तर असंख्य लोक असे होते ज्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते आणि जेव्हा त्यांना ऑक्सिजनची गरज पडली तेव्हा त्यांना हॉस्पिटलसुद्धा गाठता आले नाही. कसेबसे काहींनी जरी हॉस्पिटल गाठले तरी ऑक्सिजनसाठीच्या लांब रांगा पाहून त्यांनी तिथेच आपले प्राण सोडले असते. वास्तव असे आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माणसांचे जीवन कवडीमोल केले होते. शासकीय रुग्णालयात बेड नाही, बेड असेल तर ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन असेल तर व्हेंटिलेटर नाही. या महामारीत नागरिकांची कशी दुर्दशा झाली होती ते पाहायला राज्यकर्त्यांना आपल्या बंगल्यातून बाहेर पडायला वेळ कुठे होता! शिवाय बाहेर महामारी चालू असताना हे लोक आपल्या जीवाला धोका कसा पत्करणार, यांना तर राज्य आणि त्याबरोबरच सुखसोयींचा लाभ घ्यायचा होता. काँग्रेसच्या गेल्या सत्तर वर्षांच्या शासनाने बरेच काही उपाय सध्याच्या सरकारच्या मदतीसाठी आधीच करून ठेवलेले आहेत, ज्यांचा पुरेपूर फायदा सध्याचे सरकार घेत आहे. राजद्रोहाचा कायदा भले ब्रिटीश शासनाने केलेला असेल, पण काँग्रेस सरकारने तो जसाच्या तसा चालू ठेवला, यूएपीएचा कायदा खुद्द काँग्रेस सरकारने आपल्या शासनकाळात केला होता, त्याच कायद्याची अंमलबजावणी आपल्याला हवी तशी सध्याचे सरकार करत आहे. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारतात भूकमरीच्या समस्येवर चिंता व्यक्त केली होती, म्हणून काँग्रेस शासनाने फूड सेक्युरिटी अॅक्ट केला आणि प्रशासनाला अशी ताकीद दिली होती की यापुढे देशात उपासमारीची एकही घटना घडता कामा नये. ब्रूरोक्रॅसीसारखा चतुर दुसरा प्राणी कोण असू शकतो बरे! त्यांनी एक शक्कल लढवली. कुणी कोणत्याही आजाराने किंवा उपासमारीने मरण पावला तर मृत्यूचे कारण अमुक अवयवाच्या निकामी होण्याने झाले असे देऊ लागले. त्याच कायद्याचा वारसा आपल्या नेत्यांनी पुढे चालू ठेवला आहे. कुणी ऑक्सिजन कमी पडल्याने मरण पावल्यास तसे न दाखवता त्याचे फुप्फुस निकामी झाले किंवा हार्ट अटॅक आला असे देऊ लागले. म्हणूनच मंत्री महोदयांचे म्हणणे आहे की कुणाचा ऑक्सिजनच्या कमतरतेने मृत्यू झालेला नाही, त्याला दुसरा आजार होता आणि त्याचा अमुक अवयव निकामी झाल्याने तो मरण पावला. यवतमाळच्या भागातून दरवर्षी कुपोषणाने लहान मुलांचे प्राण जात आहेत, अशा बातम्या काही वर्षांपूर्वी माध्यमांमध्ये नेहमीच येत होत्या. आता तशा बातम्या येत नाहीत, कारण आता तेथील कुपोषणग्रस्त मुले कुपोषणाने मरत नाहीत तर त्यांचा एखादा अवयव निकामी झाल्याने मरत असतील. म्हणून कुपोषणग्रस्तांच्या बातम्या आता माध्यमांमध्ये दिसत नाहीत. ही गोष्ट जगजाहीर आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनचा भयंकर तुटवडा होता. जगभरातून ऑक्सिजन पाठवण्यात येत होते. त्याचबरोबर ऑक्सिजनसाठीची इतर उपकरणे, जसे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरदेखील काही देशांनी पाठवले होते. जर आपल्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता तर या देशांना काय झाले होते. जसा देशभर ऑक्सिजनचा तुटवडा होता तसाच तो हॉस्पिटलमध्येही होता आणि या तुटवड्यामुळेच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळाले नाही, म्हणून त्यांचे जीव गेले. पण जर शहाण्या माणसाला मूर्ख लोक यशस्वीपणे मूर्ख बनवत असतील तर यात दोष कुणाचा, शहाण्यांचा की मूर्खांचा?

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक

मो.: ९८२०१२१२०७


 


(१०९) मग तुमची काय कल्पना आहे की उत्तम मनुष्य तो आहे ज्याने आपल्या इमारतीचा पाया अल्लाहचे भय व त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यावर ठेवला आहे अथवा तो ज्याने आपली इमारत नदीच्या किनाऱ्यावर एका दरीच्या पोकळ व निराधार कड्यावर१०३ उभारली आणि ती त्याला घेऊन सरळ नरकाच्या आगीत जाऊन कोसळली? असल्या अत्याचारी लोकांना अल्लाह कधीही सरळमार्ग दाखवीत नसतो.१०४ 

(११०) ही इमारत जी त्यांनी बनविली आहे सदैव त्यांच्या हृदयांत अविश्वासाचे मूळ बनून राहील. (ज्याच्या उच्चाटनाची आता कोणतीच शक्यता नाही) याशिवाय की त्यांच्या हृदयांची शकले होतील.१०५ अल्लाह अत्यंत जाणकार व बुद्धिमान आहे. (१११) वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहने श्रद्धावंतांकडून स्वत: त्यांना व त्यांच्या मालमत्तेला स्वर्गाच्या मोबदल्यात खरीदिले आहे.१०६ ते अल्लाहच्या मार्गात लढतात आणि मारतात व मरतात. त्यांच्याशी (स्वर्गाचे अभिवचन) अल्लाहच्या पाशी एक पक्के अभिवचन आहे. तौरात, इंजिल आणि कुरआनमध्ये.१०७ आणि कोण आहे जो अल्लाहपेक्षा अधिक आपली प्रतिज्ञा पूर्ण करणारा असेल? तर आनंद साजरा करा आपल्या या सौद्यावर जो तुम्ही अल्लाहशी पूर्ण केला आहे, हेच सर्वात महान यश आहे. 

(११२) अल्लाहकडे पुन्हा पुन्हा वळणारे,१०८ त्याची भक्ती करणारे, त्याचे महिमागान करणारे, त्याच्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करणारे,१०९ त्याच्यासमोर झुकणारे व नतमस्तक होणारे सत्कर्माचा हुकूम देणारे व दुष्कर्मापासून रोखणारे आणि अल्लाहच्या मर्यादांचे रक्षण करणारे,११० (अशी शान असते त्या श्रद्धावंतांची जे अल्लाहशी खरेदी-विक्रीचा हा सौदा चुकता करतात) आणि हे पैगंबर (स.)! या श्रद्धावंतांना शुभवार्ता द्या. (११३) नबी आणि त्या लोकांसाठी ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, हे उचित नाही की अनेकेश्वरवादींसाठी क्षमेची प्रार्थना करावी; मग ते त्यांचे नातेवाईक का असेनात, ज्याअर्थी ही गोष्ट त्यांच्यावर उघड झालेली आहे की ते नरकाचे हक्कदार आहेत.१११



१०३) अरबी शब्द `जुरुफ' आहे. याचा अर्थ नदीचा तो किनारा ज्याच्या खालील मातीला पाण्याने वाहून नेले आहे आणि पाण्यावर एक भाग उभा असतो. जे लोक आपल्या कर्माचा आधार अल्लाहच्या प्रती निर्भयता आणि त्याच्या प्रसन्नतेपासून विमुखतेवर ठेवतात. त्यांच्या जीवनाला ही उपमा दिली आहे की ती इमारत जी नदीच्या अस्थिर किनाऱ्यावर बांधली आहे.

१०४) `सरळमार्ग' म्हणजे तो मार्ग ज्याच्यामुळे मनुष्याचे मनोरथ पूर्ण होते. हा मार्ग वास्तविक सफलतेच्या ठिकाणी मनुष्याला पोहचवितो.

१०५) म्हणजे त्यांनी विद्रोह आणि धोकाधडीचा इतका मोठा अपराध करून आपल्या मनाला नेहमीसाठी ईमानच्या क्षमतेपासून वंचित ठेवले आहे. बेईमानीचा रोग त्यांच्या नसानसांत भिणला आहे की जोपर्यंत त्यांची मने शिल्लक राहतील हा रोगसुद्धा राहील.

१०६) येथे ईमानच्या त्या मामल्यास जो अल्लाह आणि दासांमध्ये निश्चित होतो त्यास `क्रय-विक्रय' म्हटले आहे. याचा अर्थ असा आहे की ईमान एक करार आहे ज्यानुसार दास आपले तन, मन, धन अल्लाहच्या हाती विकतो आणि त्याच्या मोबदल्यात अल्लाहशी वचन घेतो की त्याला मृत्यूपश्चात स्वर्ग बहाल करील. या महत्त्वपूर्ण विषयाच्या विहित अर्थाला समजण्यासाठी सर्वप्रथम `क्रय-विक्रय'च्या वास्तवतेला चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. जोवर मूळ वास्तविकतेचा प्रश्न आहे, त्यानुसार मनुष्याच्या जीव व वित्ताचा स्वामी अल्लाह आहे. म्हणून हा क्रय-विक्रय या अर्थाने नाही की जे काही मनुष्याचे आहे त्याला अल्लाह खरेदी करू इच्छितो. याचे खरे स्वरुप म्हणजे जे अल्लाहचे आहे, त्याला ठेवीच्या (अमानत) स्वरुपात अल्लाहने मनुष्याकडे सुपूर्द केले आहे. यात ईमानदारी दाखविणे (अमानतदारी) किंवा धोका देणे (खयानत) सर्वस्वी मनुष्याच्या अधिकारात आहे. याविषयी अल्लाह मनुष्याशी मागणी करतो की त्याने स्वखुशीने माझ्या वस्तूला माझीच वस्तू मान्य करून जीवनभर त्याच्या स्वामीच्या रूपात नव्हे तर अमानतदार होण्याच्या स्वरुपात वापरण्यास स्वीकारावे. क्रय-विक्रयाच्या या वास्तविकतेला समजून घेतल्यानंतर त्यांच्या अंतरनिहित अर्थाला समजून घेऊ या. १) याविषयी अल्लाहने मनुष्याला दोन मोठ्या परीक्षेत टाकले आहे. पहिली परीक्षा म्हणजे स्वातंत्र्य बहाल केल्यानंतर मनुष्य आपल्या स्वामीच्या स्वामीत्वाच्या अधिकाराला स्वीकारतो किंवा नाही? दुसरी परीक्षा म्हणजे मनुष्य अल्लाहवर भरोसा ठेवून आहे किंवा नाही? अल्लाहने दिलेल्या वचनानुसार उद्याच्या स्वर्गात दाखल होण्यासाठी मनुष्याने आजची स्वत:ची स्वतंत्रता आणि आनंद (आराम) विक्रीसाठी स्वखुशीने तयार व्हावे. २) अल्लाहजवळ जे ईमान विश्वसनीय आहे त्याची वास्तविकता ही आहे की दास आचार आणि विचारस्वातंत्र्याला अल्लाहच्या हाती विकतो आणि त्याच्यासाठी आपल्या मिळकतीच्या दाव्यापासून पूर्णता वेगळे व्हावे. ३) ईमानची ही वास्तविकता इस्लामी जीवनपद्धतीला आणि अनेकेश्वरवादी जीवनपद्धतीला आदि ते अंतापर्यंत पूर्णत: एक-दुसऱ्यापासून वेगळे करते. मुस्लिम व्यक्ती आणि मुस्लिम समाज आपल्या जीवनव्यवहारात अल्लाहच्या अधिन राहून काम करतो. अल्लाहच्या मर्जीपासून स्वतंत्र होऊन जीवनव्यवहार पार पाडणे आणि मन मानेल तसे वागणे अधर्म व अनेकेश्वरवादी जीवनपद्धती आहे. ४) या क्रय-विक्रयाच्या प्रकाशात अल्लाहच्या मर्जीचे पालन मनुष्यासाठी अनिवार्य आहे. ती मर्जी मनुष्य प्रस्तावित नव्हे तर ती मर्जी ज्यास अल्लाह स्वयम् दाखवित आहे.

हा त्या खरेदी-विक्रीत अंतरनिहित विषय आहे. विषयाला समजून घेतल्यानंतर हे आपोआप समजते की या खरेदी-विक्रीत मूल्य (म्हणजे स्वर्ग) वर्तमान ऐहिक जीवनाच्या अंतापर्यंत स्थगित का करण्यात आले? स्पष्ट आहे की स्वर्ग फक्त हे तोंडी मान्य करण्याची गोष्ट नाही की ``विकणाऱ्याने आपले जीव व वित्त अल्लाहच्या हाती विकले आहे.'' ते तर या कर्माचा मोबदला आहे की विकणारा आपल्या ऐहिक जीवनात या विकलेल्या वस्तूचा मनमानी उपयोग करणे सोडून अल्लाहचा विश्वासू (अमानतदार) बनून अल्लाहच्या मर्जीनुसार त्याचा उपयोग करतो. म्हणून ही विक्री तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा विकणाऱ्याचे ऐहिक जीवन समाप्त् होईल. जीवनात हे सिद्ध व्हावे की विक्रीकरार केल्यानंतर आपल्या ऐहिक जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्याने विक्रीकराराच्या अटीपूर्ण केल्या आहेत. यापूर्वी मनुष्य ऐहिक जीवनात न्यायाच्या दृष्टीने मूल्य (स्वर्ग) प्राप्त् करण्याचा हकदार बनू शकत नाही.

१०७) इंजिल (बायबल) मध्ये येशू मसीह (अ.) यांची अनेक कथनं आहेत जी या आयतच्या समानार्थी आहेत. उदा. ``धन्य आहेत ते जे सत्यासाठी सताविले गेले. कारण आकाशाचे राज्य त्यांचेच आहे.'' (मत्ती ५ :१० मत्ती १० :३९ मत्ती १९ : २९) सध्या स्थितीच्या तौरातमध्ये हा विषय सापडत नाही. मृत्यूपश्चात जीवन, हिशोबाचा दिवस, परलोकातील मोबदला इ.पासून तौरात रिक्त आहे. ही विचारसरणी तर प्रथमपासून सत्य धर्माचा अभिन्न अंग राहिली आहे. परंतु सध्यास्थितीतील तौरातमध्ये हा विषय नसल्यामुळे आपण असा निर्णय काढणे अयोग्य आहे की तौरात या विषयापासून खाली होता. खरे तर यहुदी आपल्या पतनकाळात अशाप्रकारे अतिभौतिकवादी आणि ऐहिक समृद्धी आणि लाभासाठी इतके भुकेले बनले होते की त्यांच्याजवळ ईनाम आणि मोबदल्याचा अर्थ म्हणजे या जगातील सुखसमृद्धी बनून राहिला. याशिवाय दुसरा अर्थ त्यांच्याजवळ नव्हता आणि आताही नाही.

१०८) अरबीत ``अत्ताईबून''चा शाब्दिक अर्थ मराठीत पश्चात्ताप करणारे असा आहे. परंतु ज्या शैलीत हा शब्द वापरला गेला त्याने स्पष्ट होते की पश्चात्ताप व्यक्त करणे ईमानधारकांच्या स्थायी गुणांपैकी एक आहे. म्हणून याचा खरा अर्थ म्हणजे ते एकदाच पश्चात्ताप व्यक्त करीत नाही तर सतत तौबा (पश्चात्ताप) करतात. तौबाचा मूळ अर्थ अल्लाहकडे रूजू होणे आणि वळणे आहे. म्हणून या शब्दाचा वास्तविक भाव व्यक्त करण्यासाठी त्याचा अनुवाद ``ते अल्लाहकडे पुन्हा पुन्हा वळणारे'' असा केला आहे. ईमानधारक विचारांति अल्लाहशी आपले जीवन वित्त खरेदी-विक्री करण्याचा व्यवहार करतो. परंतु पुन्हा पुन्हा अशा घटना घडतात की मनुष्याच्या स्वभावानुसार अस्थायी रूपात तो हा व्यवहार विसरतो. जेव्हा त्याला याची जाण येते तो आपल्या गफलतीने भयभीत होतो. त्याला लाज वाटू लागते. तेव्हा तो अल्लाहकडे वळतो आणि आपली प्रतिज्ञा ताजी करतो. 

१०९) अरबी शब्द `साइहून' चे स्पष्टीकरण काही भाष्यकारांनी `अस्साइमून' (रोजा ठेवणारे) असे केले आहे. परंतु `सियाहत' चा अर्थ रोजा लाक्षणिक अर्थाने आहे. शब्दकोशात हा अर्थ नाही आणि सही हदीसनुसारसुद्धा हा अर्थ प्रमाणित होत नाही. म्हणून आम्ही या शब्दाला मूळ अर्थानेच प्रयुक्त करणे योग्य समजतो. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी `इनफाक' शब्द आला आहे आणि त्याचा अर्थ होतो खर्च करणे. याच्याशी तात्पर्य अल्लाहच्या मार्गात खर्च करणे आहे. याचप्रमाणे येथे `सियाहत' म्हणजे सैरसपाटा मारणे नव्हे तर अशासाठी पृथ्वीवर फिरणे ज्यात अल्लाहची प्रसन्नता, इस्लामी जीवनपद्धतीचा प्रचार-प्रसार, मानवसुधार, ज्ञानासाठी तसेच अल्लाहच्या निशाण्यांचे अवलोकन आणि हलाल (वैध) उपजीविका शोधण्यासाठी असावे.

११०) म्हणजे अल्लाहने आस्था, उपासना, नैतिकता, सामाजिकता, सभ्यता, अर्थव्यवस्था, राजनीती, न्याय आणि करार तसेच युद्धाविषयी ज्या मर्यादा घालून दिल्यात त्यांना पूर्णत: डोळयांसमोर ठेवून जगात त्यांना स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे रक्षण करतात आणि आपल्यातर्फे पूर्ण प्रयत्नशील राहातात की या मर्यादांचे उल्लंघन होऊ नये.

१११) एखाद्या व्यक्तीसाठी क्षमेसाठी विनंती म्हणजे आम्ही त्याच्याशी प्रेम आणि बंधुभाव ठेवून आहोत आणि दुसरे म्हणजे त्याच्या चुकांना क्षमा करण्यायोग्य समजले जाते. या दोन्ही गोष्टी त्या माणसासाठी योग्य आहेत जो निष्ठावानात सामील आहे आणि फक्त अपराधी आहे. परंतु जो मनुष्य स्पष्ट द्रोही आहे त्याच्याशी प्रेम आणि बंधुत्वाचे संबंध ठेवणे आणि त्याच्या अपराधांना क्षमा करण्यायोग्य समजणे तत्वत: चुकीचे आहे व त्या ईमानविरुद्धसुद्धा आहे ज्याची निकड आहे की अल्लाह आणि इस्लामी जीवनपद्धतीवर (दीन) असीम प्रेम असावे. अल्लाहचा दोस्त आपला दोस्त आणि त्याचा शत्रू आपला शत्रू आहे म्हणूनच अल्लाहने असे सांगितले नाही, ``अनेकेश्वरवादीसाठी क्षमेची प्रार्थना करू नका'' तर असे म्हटले आहे, ``तुम्हाला हे शोभनिय नाही की तुम्ही त्यांच्यासाठी (अनेकेश्वरवादी) क्षमेची प्रार्थना करावी.'' म्हणजे आमच्या मनाईमुळे तुम्ही असे केले नाही तर ठीक आहे. तुमच्यात निष्ठेची अनुभूति इतकी तीव्र असली पाहिजे की जो अल्लाहचा द्रोही आहे त्याच्याशी प्रेम आणि सहानुभूतीपूर्ण संबंध ठेवावे तसेच त्यांच्यासाठी क्षमेची प्रार्थना करावी, हे तुम्हा स्वत:ला अशोभनीय कृत्य वाटावे.

येथे हे समजून घेतले पाहिजे की अल्लाहच्या विद्रोहीप्रती ज्या सहानुभूतीपासून मनाई केली आहे ती सहानुभूती म्हणजे जी इस्लामी जीवनपद्धतीत हस्तक्षेप करण्याचे कारण बनते. मानवी सहानुभूती आणि जगातील नातेसंबंध स्थापित करण्यासाठी मनाई केली गेली नाही. हे तर एक प्रिय काम आहे. नातेवाईक ईशद्रोही असो की ईमानधारक, त्याचे ऐहिक अधिकार आणि हक्क अवश्य दिले गेले पाहिजे.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget