Halloween Costume ideas 2015
Latest Post


सरकारने लक्षात ठेवले पाहिजे की शेतकरी आपल्या हक्कासाठी लढत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची भिक नको त्यांना फक्त त्यांचा हक्क पाहिजे आहे आणि तो सरकारने द्यायलाच पाहिजे. सरकारच्या धोरणावरून असे वाटते की हे चालत तरी काय! सरकार शेतकऱ्यांना केव्हा न्याय देणार? किसान दिवसांच्या निमित्ताने अन्नदाता शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघायला पाहिजे. आज अन्नदाता शेतकरी हा भारताचा कना आहे तर १३० कोटी जनतेचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दु:ख म्हणजे १३० कोटी जनतेचे दु:ख आहे.

भारताचे पाचवे प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय किसान दिवस साजरा करण्यात येतो. त्यामुळे भारत सरकारने २००१ पासून दर वर्षी २३ डिसेंबरला किसान दिवस साजरा करण्याची सुरुवात केली आहे. परंतु हा किसान दिवस राजकीय पुढाऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी यांचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पक्ष-विपक्ष भ्रमित करण्याचे काम करीत आहे. सरकार स्वामिनाथन आयोग लागू केल्याची भाषा करीत आहे. स्वामिनाथन आयोगमध्ये २०१ शिफारशी आहेत त्यातील १७५ शिफारशी लागू करण्यात आल्या त्यातल्याही ज्या अती महत्वाच्या २६ शिफारशी आहेत त्या अजूनपर्यंत लागू करण्यात आलेल्या नाहीत. याचाच अर्थ असा की "स्वामिनाथन आयोग"पूर्णपणे लागू केलेला नाही.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की एमएसपी वर कायद्याचे प्रावधान असावे. तेही सरकार करायला तयार नाही. कारण पंजाबमध्ये मागील वर्षी कापसाचा एमएसपी रेट ७८०० होता परंतु काही शेतकऱ्यांना २७०० रूपये भाव देण्यात आला. यावरून स्पष्ट होते की एमएसपी वर शेतकऱ्यांचा विश्वास नाही. नवीन कायद्याच्या तहत शेतकऱ्यांना भीती आहे की खाजगी कंपन्या या कायद्यावर कब्जाकरून आपली पकड मजबूत करेल व शेतकरी हवालदीन होईल. अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. कारण अनेक सरकारी क्षेत्र खाजगी कंपन्यांच्या हवाली करण्यात आले आहे व अनेक क्षेत्र खाजगीकरणाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना भीती आहे की नवीन कृषी कायद्यात खाजगी क्षेत्र प्रवेश करून शेतकऱ्यांचे वाटोळे करते की काय असे वाटत आहे.

भारताच्या इतिहासातील ही पहिली कृषिक्रांती आहे. सरकारने कायदा बनवीण्याच्या अगोदर जर शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती. परंतु या कृषी क्रांतीला भ्रमित करण्याचे काम पक्ष-विपक्ष करीत आहे हे स्पष्ट होते. भारतात ६० टक्के शेतकरी आहेत ही बाब सरकारलासुध्दा माहिती आहे. मग आपण ज्याच्या हिताची गोष्ट करतो त्यांना विचारात न घेता कोणताही कायदा बनवीने योग्य आहे काय? याचा विचार सरकारने गांभीर्याने केलाच नाही. सरकार प्रत्येक गोष्टीत देशहिताची जपणूक करते यात तिळमात्र शंका नाही. परंतु १३० कोटी जनतेच्या पोटाची खळगी भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जो कोणता कायदा किंवा कायदा बनवील्या जातो तेव्हा त्यांना एका शब्दाने न विचारता कायदा बनविणे हा सरकारचा गुन्हा नाही काय? भारतात २०० हुन अधिक शेतकरी संघटना आहेत. यात काही भाजप, कॉंग्रेस किंवा इतर राजकीय पक्षांशी निगडित सुध्दा आहे. परंतु जास्त तर संघटना राजकारणापासून कोसो दूर आहे. त्यामुळे सरकारने सर्वोतोपरी प्राधान्य शेतकऱ्यांना देवुन त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याची नितांत गरज आहे.

शेतकऱ्याचे भविष्य उज्ज्वल तर देशाचे भविष्य उज्ज्वल ही बाब सरकारने लक्षात ठेवली पाहिजे. सरकाने राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे. परंतु शेतकरी २६ नोव्हेंबरपासून थंडीत कुडकुडत रस्त्यावर बसले आहे ते का रस्त्यावर बसले यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. या आंदोलनाला २५ दिवस होवून गेले व यात अनेकांना आपले प्राणसुध्दा गमवावे लागले तरीही सरकार शेतकऱ्यांसोबत व शेतकरी संघटनांसोबत "तारीख पे तारीख" अशी भूमिका करून अन्नदात्याच्या जिवाशी व त्यांच्या परिवाराशी खिलवाड करीत असल्याचे स्पष्ट दिसून येते. याला कृषिप्रधान देशाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. कृषी कायदा बनवितांना भाजपाशी संबंधित असलेली शेतकरी संघटना यांनासुध्दा सरकारने कायदा बनवीण्याच्या आधी विचारले नाही. याला काय म्हणावे!

शेतकरी संघटनांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सूचना केलेल्या आहेत की सध्याच्या परिस्थितीत कृषी विधेयक स्थगितीचा विचार करावा. "शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या आंदोलनावर कोणताही आदेश देणार नाही" अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. परंतु सरकारने कृषी कायदा बनवितांना शेतकऱ्यांना डावलून "कृषी विधेयक" अमलात आणले हा सरकारचा सर्वात मोठा गुन्हा असल्याचे स्पष्ट दिसून येते. सरकारच्या नीती आणि नियतीमध्ये खोट दिसून येते. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करून तोडगा निघेपर्यंत तीनही कृषी कायदे प्रलंबित ठेवण्याचा विचार करावा अशी सूचना १७ डिसेंबर २०२० ला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. तरीही केंद्र सरकार कृषी कायदा मागे घेण्याच्या तयारीत नाही.

शेतकरी आंदोलकांना सत्ताधारी पक्ष व विपक्ष भ्रमीत करून आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम करीत आहे.परंतु भारतीय शेतकरी व शेतकरी संघटना तीनही कृषी कायदे हटवीण्याकरिता अडून आहे. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळू नका व राजकारण करू नका. फक्त शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे. किसान दिवसांच्या निमित्ताने सरकारने शेतकऱ्यांच्या प्रती मोठा निर्णय घेण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. कारण तब्बल २५ दिवसांपासून शेतकरी थंडीत रस्त्यावर कुडकुडत बसला आहे ही कृषी प्रधान देशाची विटंबना व शोकांतिका म्हणावी लागेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उच्च न्यायालयाचा आदेशानुसार कृषी विधेयकाबद्दलचा तोडगा काढावा. जय जवान जय किसान या घोषवाक्याची जोपासना सरकारने ताबडतोब करावी. कारण शेतकरी मोठ्या शांततेने आणि संयमाने आपल्या हक्कासाठी सरकारचे दरवाजे ठोठावत आहे. त्याची दखल सरकारने घेतलीच पाहिजे.

सरकारला निर्णय घेण्यास उशीर झाला तरी काही हरकत नाही. संपूर्ण राजकारण बाजूला सारून शेतकऱ्यांच्या समस्येचा तोडगा कोणत्याही परिस्थितीत ताबडतोब सरकारने काढावा. यातच सरकारने हीत आहे. कारण शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे आणि देशाचे करोडो रुपयांचे रोजचे नुकसान होत आहे याचाही विचार सरकारने करण्याची गरज आहे.

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो.नं.९३२५१०५७७९



आजच्या डिजिटल युगात जिथे बहुतेक कामे ऑनलाईन केली जातात, प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल, संगणक, संसाधने आहेत. एका क्षणात आपण जगाच्या कोणत्याही भागात संपर्क साधू शकतो, व्यवहार करू शकतो, यामुळे जीवन सोपे झाले आहे. आता ई-कॉमर्सच्या रूपात प्रत्येक प्रकारचा व्यवसायचा वस्तु आपल्यासाठी उपलब्ध आहेत, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ऑनलाईन खरेदी करू शकतो. परंतु त्याच्या फायद्यांसह, काही खबरदारी लक्षात ठेवणे देखील आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे या भागातही फसवणुकीचा व्यवसाय वाढत चालला आहे.  सुशिक्षित ग्राहकांची देखील ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. हा फसवणुकीचा व्यवसाय दरवर्षी वेगाने वाढत आहे, काहीचे 500-800, काहीचे 2-4 हजार, आणि काहीचे 15-20 हजार हुन जास्त पैशाने फसवणूक होत आहे परंतु बहुतेक लोक यावर कारवाई करीत नाहीत आणि गप्प बसतात. या फसवणूकीवर कारवाई करण्यासाठी शंभरातुन एकाद पुढे येतो.

फर्जी वेबसाइटचे जाळे सर्वत्र पसरले :- आज, आम्हाला इंटरनेट द्वारे एका क्लिकवर जगभरातील माहिती मिळते. परंतु यापैकी बर्‍याच वेबसाइट्स केवळ आर्कषण, देखावा आणि फसवणूकीसाठी आहेत जे फक्त चांगल्या पणाचा आव आणून खोटा देखावा करतात, जेव्हा की वास्तविक तसे काहीच घडत नसते. आजकाल, कोणीही बनावट वेबसाइट बनवून त्यावर अतीआर्कषक उत्पादनाच्या विक्रीचे आमिष दाखवतात. ते मोठे-मोठे दावे करतात. दहा-दहा हजार रुपयांची नामवंत कंपनीच्या वस्तु फक्त पाचशे रुपयात विक्रीचे सांगतात. 95% पर्यंत सवलतीच्या ऑफर दाखवितात, पण त्याच ब्रांडची ओरिजिनल वस्तु प्रत्यक्षात 500 रुपयांमध्ये मिळते का? या आठवड्यात मी अश्याच 8-10 ई-कॉमर्स वेबसाइट सर्च केल्यात जे घरगुती वस्तू विकतात, त्या वस्तूंच्या किंमतीही अगदी कमी असल्याचे दर्शविल्यास गेले. पण जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल केला तर त्या सगळ्या वेबसाइट वर दाखविण्यात आलेले संपर्क क्रमांक बंद होते आणि त्यानी मी केलेल्या ई-मेल ला सुद्धा प्रतिसाद दिला नाही, तर त्यातील काही ईमेल आयडी चुकीचे दिले होते. आता यावरून समजून येते की सत्य परिस्थिती काय असणार. तरीही हजारो ग्राहक दररोज अशा वेबसाईटवर खरेदी करतात आणि त्यांची फसवणूक होते. मागील महिन्यात, माझ्या एका मित्राने अशाच एका बनावट वेबसाइट वरून नामांकित कंपनीचे घड्याळ अगदी स्वस्त किंमतीत विकत घेतले पण जेव्हा ती वस्तू घरी आली तेव्हा त्या घड्याळाऐवजी वॉचबॉक्स मध्ये कचरा सापडला, बर्‍याचदा अनेक ग्राहकांसोबत असेच घडते परंतु लोक या फसवणूकी विरूद्ध कारवाईच करत नाहीत म्हणूनच हा फसवणुकीचा व्यवसाय इतका चालला आहे.

विचार करा, समजून घ्या आणि मग खरेदी करा :- हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या चुकीचा परिणामच आपल्यावर फसवणूक आहे, म्हणून ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा, नेहमी शॉपिंगकरीता नामांकित ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच खरेदी करा, दिशाभूल करणार्‍या जाहिराती पासून दूर रहा, विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, विशेषतः ते लिंक जे सोशल मीडियावर व्हायरल होतात. एखादे उत्पाद खूपच सूट किंवा खूपच स्वस्त असण्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा कारण कोणतीही कंपनी कमवायला बसली आहे, तेव्हा ती स्वतःचे नुकसान करून वस्तू कशाला विकेल. कोणालाही वैयक्तिक बँकिंग माहिती सामायिक करू नका, सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती सामायिक करणे टाळा, ऑनलाईन वस्तू खरेदी करताना धोरण अटी आणि शर्ती जाणून घ्या, त्यांचा ईमेल आयडी, संपर्क क्रमांक तपासा सोबतच ऑनलाईन मैपद्वारे दिलेला पत्ता सत्यापित करून बघा आणि नवीन अज्ञात वेबसाइटवरील उत्पादने खरेदी करणे शक्यतो टाळावे.

      दिलेला वेब पत्ता यूआरएल काळजीपूर्वक पहा, सुरक्षित इंटरनेट कनेक्शन तपासा, पेमेंट करण्याचे सर्व पर्याय बघून घ्या. आजकाल नामांकित कंपनी, बँक किंवा सरकारी वेबसाइटची कॉपी करुन हुबेहूब बनावट वेबसाइट बनवून ग्राहकांची फसवणूक केली जाते, नवनवीन स्किम अंतर्गत पैसे, प्रचंड सूट किंवा बक्षीस देण्याचे लोभ दाखवून बनावट वेबसाइट द्वारे लिंक, ईमेल किंवा संदेश पाठविला जातो. लोभ ही एक वाईट गोष्ट आहे, ऑनलाइन खरेदी करताना विशेष काळजी घ्या. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा बँकिंग मोबाइल अ‍ॅपचाच वापर करावा, इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी एक सुरक्षित माध्यम वापरा, उत्कृष्ट सुरक्षित गुणवत्तापुर्ण ब्राउझरचा वापर करावा. अशा प्रकारच्या सावधगिरी नंतरही आपली फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार नोंदवा.

जबाबदार बना आणि जागरूक रहा :- जेव्हा कधी आपण ऑनलाइन फसवणुकीचा सामना करता तर लक्षात ठेवा की प्रशासन आणि बर्‍याच समर्थक संस्था आपल्या न्यायासाठी सज्ज आहेत, प्रथम, आपल्या देशाच्या गृह मंत्रालयाचे नेशनल सायबर क्राइम रिपोर्टींग पोर्टल https://cybercrime.gov.in/ हेल्पलाइन नंबर 155260 ला भेट द्या, दिलेल्या सूचनांनुसार आपली तक्रार ऑनलाईन दाखल करा. येथे प्रत्येक राज्याचे नोडल सायबर सेल अधिकारी आणि तक्रार अधिकारी यांचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी दिले आहेत याव्यतिरिक्त, प्रत्येक शहरात पोलिस विभागांतर्गत सायबर सेल असतात जिथे आपल्याला मदत मिळू शकेल. प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती असणे महत्वाचे आहे.

ग्राहकांनी त्यांचे हक्क मिळवण्यासाठी तक्रार नोंदविण्याकरीता संपर्क साधावा :- देशातील कोणत्याही नागरिकांची कोणत्याही प्रकारच्या ग्राहकांच्या स्वरूपात फसवणूक होते, तर कृपया न्यायासाठी संपर्क साधावे. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग, केंद्र सरकारची वेबसाइट :- http://www.ncdrc.nic.in/   ईमेल आईडी :- ncdrc@nic.in संपर्क क्रमांक :- 01124608801. देशातील सर्व जिल्हास्तरीय ग्राहक फोरमची लिस्ट:- http://www.ncdrc.nic.in/districtlist.html या लिंकवर मिळते आणि आपण आपल्या जिल्हाच्या फोरमशी संपर्क साधू शकतो.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय अंतर्गत) वेबसाईट:- http://nationalconsumerhelpline.in/  टोल फ्री क्रमांक:- 1800114000 किंवा 14404 वर संपर्क करावा याचा व्यतिरिक्त शासनाचे मोबाईल अॅप सुद्धा आहे किंवा मैसेज द्वारे सुद्धा सेवा पुरविली जाते. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र वेबसाईटः-https://grahak.maharashtra.gov.in हेल्पलाईन नंबर:- 022 40293000   ई-मेल आयडी:-  mah-sforum@nic.in यावर ग्राहक संपर्क करू शकतात. जागो ग्राहक जागो वेबसाईटः-http://www.jagograhakjago.com/ टोल फ्री क्रमांक:- 1800114424 आणि ईमेल आयडी:-jagograhakjagohelpline@gmail.com आहे.  कॉन्फोनेट (देशातील ग्राहक मंचचे संगणकीकरण आणि नेटवर्किंग):- www.cms.nic.in ऑनलाईन साईटवर ग्राहक संबंधित सर्व केसेसची अपडेट माहिती मिळते.

आपण ग्राहक म्हणून जागरूक असणे खूपच गरजेचे आहे आणि ह्यासाठीच शासनाने ग्राहकांचा हक्क संरक्षणा करीता कायदे तयार केले आहेत सोबतच अनेक संस्था, परिषद, मंच/फोरम सुद्धा स्थानिक ते आंतरराष्ट्रिय स्तरावर ग्राहकांचा हक्कांसाठी काम करतात. ग्राहक संरक्षण कायदा, 1986, ग्राहक संरक्षण नियम, 1987, राज्य शासनाचे महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 1987, भारतीय मानक नियम ब्यूरो, 1991, ग्राहक कल्याण निधी नियम, 1992, राज्य शासनाचे महाराष्ट्र ग्राहक संरक्षण नियम 2000, ग्राहक संरक्षण विनिमय, 2005, ग्राहक संरक्षण विनिमय, 2018, ग्राहक संरक्षण कायदा, 2019 हे आहेत. वस्तु घेतांना किंमत, वस्तु निर्मितीची व समाप्तीची तारीख, अटी व नियम, वस्तु निर्मिती तील सामग्री, वजन व इतर गोष्टी काळजीपुर्वक निरखुन बघावे. प्रत्येक वस्तु स्वस्त असेल म्हणून ती निकृष्ट दर्जाचे असेल असे नसते आणि महाग असेल म्हणजे चांगलेच असेल असेही नसते याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे जेनेरीक औषधी आहे म्हणून फक्त पैशाचा किमती वरूनच वस्तुचा दर्जा ओळखू नये. फक्त जागरूक व्हा आणि एक जबाबदार ग्राहक बना.

-डॉ. प्रितम भि. गेडाम

भ्रमणध्वनी क्र. 08237417041


कोरोना व्हायरसने म्हणजेच कोविडने 2020 गाजवले. वुहान येथून सुरु झालेल्या या रोगाने स्वतःला तथाकथित ‘होमो सॅपियन्स’ संबोधणार्‍या 1.6 दशलक्षाहून अधिक माणसांना खल्लास केले! प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लादण्यात आले आणि जग ठप्प झाले. शाळा बंद, गाड्या बंद, उड्डाणे बंद, थिएटर बंद, स्टेडियम बंद, मक्का बंद, व्हॅटिकन बंद, मंदिरे बंद, गुरुद्वारा बंद अन् मस्जिदीही बंद. पण हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये जग फारसे बदलले नाही. 

भारतात 30 जानेवारी 2020 रोजी पहिल्यांदाच कोविडचा रूग्ण आढळून आल्याचे नमूद आहे. तद्नंतर त्याला रोखण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली.  एका संपूर्ण इमारतीस ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ म्हणून नियुक्त केले, तर रुग्णालयाची उर्वरित इमारत देखील कोविड नसलेल्या रूग्णांसाठी सेवा देणारी केली. औषधे आणि उपकरणे साठवली गेली, नवीन ऑक्सिजन प्लांट उभारले  आणि अधिक आरोग्य कर्मचारी बोलावले गेले. 

जेवणाच्या टेबलावरील वर्तमानपत्रांमध्ये इटलीमधील स्थिती वाचायचो. श्रीमंत युरोपीयन देशांची आरोग्य व्यवस्था पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळल्याचे जेव्हा पाहिले तेव्हा येथे असलेल्या परिस्थितीची कल्पना करणे देखील कठीण होते. एखाद्याने माहिती दिली की यूकेची आरोग्य यंत्रणा इतकी कुजली आहे की जर रुग्ण ऑक्सिजनची पातळी राखत नसेल तरच ते रुग्णांना प्रवेश देत होते. या सर्व बातम्यांमुळे भीती, अविश्‍वास, चिंता वाढली होती. परंतु आशा आणि आशावाद यांचे विचित्र मिश्रित वातावरण तयार झाले. मग अशी वेळ आली जेव्हा कोविड रोगाने संपूर्ण देशात वेग धरला. 

ते ऑगस्ट आणि सप्टेंबरचे महिने होते. रुग्णालये सामान्य रुग्णांनी भरलेली नव्हती तर गंभीर रूग्णांनी ती भरलेली होती. दाखल झालेल्यांपैकी 90% रुग्ण ऑक्सिजनवर होते. प्रतीक्षा करणार्‍या रूग्णांच्या निरंतर यादीसह (ुरळींळपस श्रळीीं) आयसीयू नेहमीच भरलेले असत. बाहेरील रूग्ण आयसीयूमधील एखाद्याचा मृत्य होण्याची वाट पाहत, जेणेकरून त्यांना आयसीयूमध्ये बेड मिळेल आणि मग नंतर दुसरा एखादा त्यांची जागा घेई. हे पाहणे वेदनादायक होते. आम्ही डॉक्टरांनी मृत्यू पाहिले आहेत. बरेच मृत्यू. पण यावेळी दृश्य खूपच भयानक होते आणि त्याचा आमच्यावर परिणाम झाला. 

आता कॅन्टीनच्या चर्चेत हास्य फारच कमी उरले होते. कोविड आयसीयू ड्यूटीमधून परत येणार्‍या डॉक्टरांच्या मौनाचा अर्थ स्पष्ट लक्षात येत होता. तो / ती कधीही आयसीयू वॉर्डला कसे विसरू शकेल, जिथे 2 मृतदेह बेडवर पडलेल्या शवगृहात हलविण्याच्या प्रतीक्षेत आहेत, आयसीयूच्या बाहेर स्ट्रेचरवर थांबलेले दोन रुग्ण, रुग्णवाहिकेत एक रुग्ण आणि आणखी दोन रुग्ण वॉर्डात बिघडले. पाच रुग्ण आणि फक्त दोन संभाव्य बेड रिक्त आहेत. काय करावे? 

भारताची आरोग्य सेवा क्षमता ओलांडली जाईल आणि साथीच्या आजारांच्या मागण्या पूर्ण करू शकणार नाहीत, असा अंदाज यापूर्वी आला होता. परंतु कुणालाही वाटले नाही की ते इतके कोसळेल की इतर रूग्णाच्या चांगल्या हितासाठी कोणाला मरु देणार हे डॉक्टरांना ठरवावे लागले.  आपल्याला वाटेल की डॉक्टर नेहमीच असे निर्णय घेतात. पण ते खरे नाही. येथील उपलब्ध यंत्रणेवर ते आधारित होते. आयसीयूमध्ये कोणत्या रूग्णांवर उपचार करावेत हा खरोखर एक कठीण निर्णय होता. व्हेंटिलेटरमधून एका अतिगंभीर रुग्णाला काढून टाकणे जेणेकरून जगण्याची संभाव्य शक्यता जास्त असलेल्या इतर व्यक्तीस त्या व्हेंटिलेटरवर ठेवता येईल हे नैतिकदृष्ट्या स्वीकार्य असेल का? याचा अधिकार डॉक्टरांना आहे का? किंवा हे लोकांच्या हितासाठी केले जाऊ शकते का? कोविडच्या उपचारांविषयी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे होती, या परिस्थितीत नीतिशास्त्र आणि नैतिकतेबद्दल कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे / सल्ले नव्हते. कधी-कधी हे सांगणे कठीण होते की डोक का तापत आहे, या निर्णयामुळे की गरम पीपीई मुळे. 

कोविड हा एक निर्दयी रोग आहे. जेव्हा रुग्णांना नातेवाईकांची सर्वात जास्त आवश्यकता असते तेव्हा ते त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून वेगळे करते. कोविडमुळे चिंताग्रस्त मुलाला बापाचा अंतिम निरोप घेण्यासदेखील परवानगी नव्हती. अंत्यसंस्कार रूढींनाही प्रतिबंधित केले गेले होते. या सर्वांमुळे समाजाच्या मनात अशी भीती निर्माण झाली की लोकं कोविडची लक्षणे लपवू लागली. कोविड आता एड्ससारख्या वर्जित बनला आहे. आपल्या शेजार्‍यांना त्यांच्या घरात एक ‘पॉजिटिव्ह’ रुग्ण आहे हे जाणून घ्यावे अशी लोकांची इच्छा नव्हती. अशा वेळी, आरोग्य सेवा कामगारांनी पुरविलेल्या सेवा अधिक महत्त्वपूर्ण असतात.

उर्वरित जग घरी राहून घराबाहेर काम करत असताना आरोग्य सेवा कर्मचारी सतत प्राणघातक संसर्गाचा धोका असतांना अस्वस्थ पीपीईमध्ये काम करत होते. लॉकडाउन सुनिश्‍चित करण्यासाठी पोलिस विभाग मे महिन्याच्या उष्णतेमध्ये उभा होता. स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते गरजूंना आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी दिवस आणि रात्र काम करत होते. कोविड संशोधनात गुंतलेल्यांनी केलेले प्रयत्न ही आपण विसरू शकत नाही. जर आपल्याला अद्याप या भयंकर रोगाचे कारण माहित झाले नसते आणि ते कसे पसरते याची कल्पना आली नसती तर काय झाले असते?! अकल्पनीय ना!. यासाठी आपण आभारी असायला पाहिजे. आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनाच्या या सर्व सामूहिक प्रयत्नांमुळे आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचण्यास मदत झाली आहे.

  कोविडने शिकवलेल्या बर्‍याच गोष्टींपैकी एक म्हणजे आपण मानव म्हणून किती असहाय आहोत की, एक विचित्र आकार असलेल्या एका अदृश्य जीवाने जगाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आणि दयाळूपणा आणि करुणा मनुष्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे हे ही कोविडने शिकवले. लाखो लोक एकमेकांना मदत करतात आणि मानवजातीमध्ये ज्या प्रकारे शक्य असेल त्या मार्गाने गरजूंना सेवा देतात.

ज्या लोकांसह आम्ही यावर्षाची  सुरुवात केली ते आज आपल्या आसपास नाहीत. म्हणून जर आपण जिवंत असाल आणि आज हे वाचत असाल तर आपण आपल्या जीवनाबद्दल अल्लाहचे आभार मानू आणि यापुढे एकमेकांशी अधिक दयाळूपणे वागू या. 

Whenever there is a human in need, there is an opportunity to be kind and make a difference.
-Kevin Heath


- डॉ. आसिफ पटेल

एमबीबीएस (मुंबई), 

एम.डी. मेडिसीन (नागपूर)

8850877548 


 


(९६) जर वस्त्यांतील लोकांनी श्रद्धा ठेवली असती व त्यांनी ईशपरायणतेचे वर्तन अंगीकारले असते तर आम्ही त्यांच्यावर आकाश व पृथ्वीतील समृद्धीची दारे उघडली असती, पण त्यांनी तर हे खोटे लेखले, म्हणून आम्ही त्यांच्या त्या वाईट कमाईच्या हिशेबात त्यांना धरले, जी ते गोळा करीत होते. 

(९७) मग काय वस्त्यातील लोक आता यापासून निर्भय झाले आहेत की आमची धाड कधी अचानक त्यांच्यावर रात्रीच्या वेळी पडणार नाही जेव्हा ते झोपलेले असतील? अथवा 

(९८) काय ते निश्चिंत झाले आहेत की आमचा जबरदस्त हात कधी आकस्मिक त्यांच्यावर दिवसा पडणार नाही जेव्हा ते खेळत असतील? काय हे लोक अल्लाहच्या गुप्तउपायपासून निर्भय आहेत? 

(९९) खरे पाहता अल्लाहच्या गुप्तउपाय७८ पासून तोच जनसमुदाय निर्भय बनतो ज्याचा विनाश होणार असेल. 

(१००) आणि काय त्या लोकांना जे पूर्वीच्या भूवासियानंतर पृथ्वीचे वारस बनतात, या वस्तुस्थितीने त्यांना कोणताही धडा दिलेला नाही की जर आम्ही इच्छिले तर त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडू शकतो?७९ (पण ते उद्बोधक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात). आम्ही त्यांच्या हृदयाला मोहरबंद करून टाकतो, ते काहीच ऐकू शकत नाही.८० 

(१०१) हे जनसमूह ज्यांच्या हकीगती आम्ही तुम्हाला ऐकवीत आहोत (तुमच्यासमोर उदाहरणस्वरूप उपस्थित आहेत) त्यांचे पैगंबर त्यांच्याजवळ स्पष्ट संकेतचिन्हे घेऊन आले. पण ज्या गोष्टीला त्यांनी एकदा खोटे लेखले होते परत त्यांना ते मानणारे नव्हते. पाहा अशाप्रकारे आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्या लोकांची हृदये मोहरबंद करून टाकतो.८१ 

(१०२) आम्हाला त्यांच्यापैकी बहुतेकांमध्ये करारपालनाची आस्था आढळली नाही बहुतेकजण अवज्ञाकारीच आढळले.८२ 

(१०३) मग त्या लोकसमुदायानंतर (ज्यांचा उल्लेख वर करण्यात आला आहे) आम्ही मूसा (अ.) ला आपल्या संकेतवचनांसह फिरऔन८३ आणि त्याच्या जनसमुदायाच्या सरदाराकडे पाठविले परंतु त्यांनीदेखील आमच्या संकेत वचनांशी अन्याय केला,८४ मग पाहा, त्या उपद्रव माजविणाऱ्यांचा काय शेवट झाला. 

(१०४) मूसा (अ.) ने सांगितले, ``हे फिरऔन!८५ मी सृष्टीच्या स्वामीकडून पाठविला गेलो आहे. 

(१०५) माझा पदाधिकार हाच आहे की अल्लाहचे नाव घेऊन कोणतीही गोष्ट सत्याशिवाय मी सांगू नये, मी तुम्हा लोकांपाशी तुमच्या पालनकर्त्याकडून नियुक्तीचे स्पष्ट प्रमाण घेऊन आलो आहे, म्हणून तू बनीइस्राईलना माझ्याबरोबर पाठव.''८६ 

(१०६) फिरऔनने सांगितले, ``जर तू एकतरी संकेत आणला असशील आणि तू आपल्या दाव्यात खरा असशील तर तो सादर कर.'' 

(१०७) मूसा (अ.) ने आपली काठी खाली फेकताक्षणीच तो एक साक्षात अजगर होता. 

(१०८) त्याने आपल्या खिशातून हात बाहेर काढला तर सर्व पाहणाऱ्यांसमोर तो चकाकत होता.८७ 



७८) येथे अरबी ``मक्र'' हा शब्दप्रयोग झाला आहे. याचा अर्थ `गुप्त् उपाय' असा होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध अशी चाल खेळणे की जोरपर्यंत निर्णायक टोला त्याच्यावर पडत नाही तोपर्यंत त्याला माहीत होऊ नये की त्याच्यावर काही बेतणार आहे. त्याला असेच वाटत राहावे की आता सर्व ठीकठाक आहे.

७९) म्हणजे एक कोसळणाऱ्या राष्ट्राच्या जागी दुसरे राष्ट्र उभे राहाते. त्याच्यासाठी पूर्वीच्या राष्ट्रपतनात पर्याप्त् मार्गदर्शन असते. त्याने बुद्धीने काम घेतले तर कळून येते की काही वर्षांपूर्वी जे लोक येथे थाटमाटात होते, त्यांच्या महानतेचा झेंडा या भूमीत फडकत होता, त्या राष्ट्राला त्यांच्या चुकीच्या विचारसरणीने आणि जीवनपद्धतीने बरबाद करून टाकले. निर्माणकर्त्या अल्लाहने सरतेशेवटी त्यांना पकडले आणि हे वैभव त्यांच्या हातातून हिसकावून घेतले. तोच अल्लाह आज कुठे गेलेला नाही किंवा त्याच्यापासून कोणी हे सामर्थ्यसुद्धा हिसकावून घेतले नाही. आज जे लोक या वैभवशाली पदावर आरूढ आहेत, त्यांनी पूर्वीच्या लोकांप्रमाणेच चुकीची जीवनपद्धती स्वीकारली तर यांच्याकडूनसुद्धा अल्लाह ते वैभवशाली पद हिसकावून घेईल.

८०) म्हणजे इतिहासापासून आणि बोधप्रद निशाण्यांपासूनसुद्धा ते बोध ग्रहण करत नाहीत आणि स्वत:ला संभ्रमात टाकतात तेव्हा अल्लाहसुद्धा त्यांना चिंतन मनन करण्याची आणि उपदेश देणाऱ्याचा उपदेश ऐकण्याची संमती देत नाही. अल्लाहचा नैसर्गिक नियम आहे की जो आपले डोळे बंद ठेवतो, त्याला प्रकाशमान सूर्यसुद्धा दिसू शकत नाही आणि जो स्वत: ऐकू शकत नाही त्याला कोणीही ऐकवू शकत नाही.

८१) मागील आयतमध्ये सांगितले गेले होते, `आम्ही यांच्या मनावर मोहर लावतो तेव्हा ते काही ऐकत नाही' याचा खुलासा अल्लाहने स्वत: या आयतमध्ये केला आहे. या तपशीलाने स्पष्ट होते की मनावर मोहर लावणे म्हणजे मानवाच्या मानसिकतेला मनोवैज्ञानिक नियमांच्या पकडीत घेणे आहे. यानुसार एकदा अज्ञानतापूर्ण दुराग्रह आणि मनोकामनांच्या आधारावर सत्यापासून तोंड लपविण्याने मनुष्य आपल्या जिद्दीत आणि अधर्मीपणात जखडला जातो तेव्हा फक्त तर्क, एखादे निरीक्षण आणि एखाद्या अनुभवाने त्याच्या मनाचे द्वार सत्य स्वीकारण्यास उघडत नाही.

८२) ``करारपालनाची आस्था आढळली नाही'' म्हणजे कोणत्याच प्रकारच्या प्रतिज्ञेचा निर्वाह होताना दिसला नाही. त्या नैसर्गिक प्रतिज्ञेचा निर्वाह ज्यात मनुष्य जन्मताच अल्लाहचा दास आहे व अल्लाह मनुष्याचा पालनकर्ता आहे. त्याच्या सामूहिक प्रतिज्ञेचे निर्वाह ज्यात प्रत्येकजण मानव समाजाचा सदस्य असल्याने बांधलेला आहे आणि वैयक्तिक प्रतिज्ञेचे निर्वाह जो माणूस आपल्या अडचणी आणि संकटसमयी किंवा एखाद्या सद्भावनेप्रसंगी अल्लाहशी स्वयम बांधला गेला आहे. या तिन्ही प्रतिज्ञा (साक्षी) भंग करण्यास येथे `अवज्ञा' (फिस्क) म्हटले आहे.

८३) वर ज्या घटनेचा उल्लेख आला आहे त्याने ही गोष्ट मनावर ठसविणे उद्देश होता की जे राष्ट्र अल्लाहच्या संदेशप्राप्तीनंतरसुद्धा त्यास रद्द करते, अशा राष्ट्राला (लोकसमूहाला) अल्लाह नष्ट करून टाकतो. यानंतर आता मूसा (अ.) आणि फिरऔन तसेच बनीइस्राईलींच्या घटनांचा उल्लेख होत राहातो. त्यामध्ये या विषयाव्यतिरिक्त आणखी विशेष शिकवण अनेकेश्वरवादी कुरैश, यहुदी आणि ईमानधारकांना दिली आहे. अनेकेश्वरवादी कुरैश लोकांना येथे समजाविण्याचा प्रयत्न केला की सत्य संदेश पोहचविण्याच्या आरंभिक काळात सत्य व असत्य शक्तींचा अनुपात दिसतो त्यापासून धोका खाता कामा नये. सत्यासाठी पूर्ण इतिहास साक्षी आहे की सत्याची चळवळ प्रथमत: राष्ट्रात आणि जगात अल्प प्रमाणात सुरु होते आणि साधनसामुग्रीविना असत्याविरुद्ध लढाई सुरु करते. या असत्याच्या बाजूने जगातील मोठे राष्ट्र आणि शासनसत्ता असते, तरीसुद्धा शेवटी सत्याचाच विजय होतो. येथे त्यांना हेसुद्धा दाखविण्यात आले आहे की सत्यसंदेश देणाऱ्याच्या विरोधात ज्या चाली खेळल्या जातात आणि सत्यसंदेश दाबून टाकण्याचा जो प्रयत्न केला जातो, ते सर्व अयशस्वी ठरतात. अल्लाह सत्याचा अस्वीकारणाऱ्यांना सवलत देत राहातो की ते सरळमार्गावर यावेत आणि सत्याचा स्वीकार करावा. परंतु जेव्हा या संधीचा, चेतावणीचा, स्पष्ट निशाणीचा आणि बोधप्रद घटनांचा ते लोक बोध घेत नाहीत तेव्हा तो त्यांना शिक्षा देऊन दुसऱ्यासाठी त्यास बोधप्रध सिद्ध करतो. ज्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान आणले होते त्यांना या घटनेद्वारा दुहेरी शिकवण दिली गेली. पहिली शिकवण ही की आपली अल्पसंख्या आणि कमजोरीला तसेच सत्य विरोधकांच्या बहुसंख्येला आणि प्रभावाला पाहून हिंमत सोडू नका. तसेच अल्लाहची मदत येण्यास विलंब होतांना पाहून हताश होऊ नका. दुसरी शिकवण म्हणजे ईमान धारण केल्यानंतर जो लोकसमूह यहुदी लोकांचे वर्तन अवलंबितो तर तो यहुदी लोकांप्रमाणेच अल्लाहच्या धिक्कारास योग्य बनतो. बनीइस्राईलींच्या समोर त्यांच्या स्वत:चा बोधप्रद इतिहास ठेवून त्यांना असत्यवादाच्या दुष्परिणांमापासून सचेत केले आहे. त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान आणण्याचे आवाहन करण्यात आले. यापूर्वीच्या पैगंबरांनी आणलेल्या जीवनधर्मातील (दीन) सर्व भेसळींना दूर करून आदर्श जीवनधर्म (मूळ रूपात) लोकांसमोर ठेवत आहे. 

८४) निशाण्यांबरोबर अन्याय केला म्हणजे त्यांना मान्य केले नाही आणि त्यांना जादू समजून टाळले. एखादी कविता जी उत्तम काव्यांचा नमूना असेल, तिला शब्दांचा खेळ समजून चेष्टा करणे फक्त त्या कवितेचाच नव्हे तर संपूर्ण काव्याचा आणि काव्य अभिरूचीवर अन्याय आहे. अल्लाहकडून असलेल्या निशाण्यांची स्पष्ट साक्ष देण्यात येत आहे तसेच एक बुद्धीमंत व्यक्ती ही जादू आहे असा विचारसुद्धा करू शकत नाही. जादूगारांनी याविषयी साक्ष दिली आहे की ही जादू असूच शकत नाही कारण ही जादूकलेच्या बाहेरची गोष्ट आहे. अशा स्थितीत अल्लाहच्या निशाण्यांना जादू ठरविणे केवळ निशाण्यांविरुद्धच नव्हेतर सद्विवेकबुद्धी आणि सत्यतेवर केलेला घोर अन्याय आहे.

८५) फिरऔन या शब्दाचा अर्थ `सूर्यदेवतेची संतान' (सूर्यवंशी) असा होतो. इजिप्त्चे प्राचीन काळातील लोक सूर्याला महादेव समजत होते आणि फिरऔन सूर्याशी आपला संबंध जोडून होता. इजिप्शियन लोकांच्या विश्वासानुसार एखाद्या शासकाच्या प्रभुत्वासाठी याशिवाय दुसरा आधार नव्हता की तो `रअ' (सूर्य) चा शारीरिक प्रतीक आणि त्याचा जमिनीवरील प्रतिनिधी म्हणून स्वत:ला घोषित करतो. म्हणून प्रत्येक इजिप्त्चा शासकवंश स्वत:ला सूर्यवंशी घोषित करीत असे आणि प्रत्येक शासक जो सिंहासनावर आरूढ होत असे तो `फिरऔन'ची पदवी धारणकरून प्रजेला विश्वासात घेऊन पटवून देत असे की तुमचा `महादेव' (रब्बे आला) मी आहे. येथे हे जाणून घेतले पाहिजे की कुरआनमध्ये पैगंबर मूसा (अ.) यांच्या घटनेसंबंधी दोन फिरऔनांचा उल्लेख आला आहे. एक म्हणजे तो ज्याच्यावेळी मूसा (अ.) यांचा जन्म झाला होता आणि ज्याच्या घरात त्यांचे संगोपन झाले आणि दुसरा फिरऔन ज्याच्याकडे पैगंबर मूसा (अ.) यांनी इस्लामचे आवाहन केले होते आणि बनीइस्राईलच्या सुटकेची विनंती त्याच्यासमोर केली होती आणि जो सरतेशेवटी समुद्रात बुडाला होता. आधुनिक काळातील अन्वेषकांचा विचार आहे की पहिला फिरऔन रामसेस द्वितीय होता. त्याचा शासनकाळ इ. स. पूर्व १२९२ ते १२२५ असा होता. दुसरा फिरऔन ज्याचा उल्लेख येथे आला आहे त्याचे नाव `मिनीफताह' होते तो आपले वडील रामसेस द्वितीयच्या काळातच शासनात भागीदार बनला होता आणि पित्याच्या मृत्यूनंतर राज्याचा स्वामी बनून बसला. हा अनुमान (निष्कर्ष) संदिग्ध वाटतो कारण इस्राईली इतिहासानुसार पैगंबर मूसा (अ.) यांच्या मृत्यूचे वर्ष इ. स. पूर्व १२७२ आहे. परंतु हे ऐतिहासिक अनुमान आहेत. इजिप्शियन कालगणना, इस्राईली कालगणना आणि इसवी कालगणना विचारात घेऊन अचूक तिथीचा अचूक हिशेब लावणे कठीण आहे.

८६) पैगंबर मूसा (अ.) दोन गोष्टींचा संदेश घेऊन फिरऔनकडे पाठविले गेले होते. एक म्हणजे अल्लाहची भक्ती (इस्लाम) स्वीकारावी.  दुसरे  म्हणजे  इस्राईली  जे  प्रथमपासून  मुस्लिम होते  त्यांना  अत्याचारापासून  स्वतंत्र केले जावे. कुरआनमध्ये या दोन्ही संदेशांचा कुठे एकत्र उल्लेख आला आहे तर कुठे परिस्थितीनुरूप केवळ एका संदेशाचा उल्लेख करणे पर्याप्त् समजले गेले.

८७) या दोन निशाण्या पैगंबर मूसा (अ.) यांना यासाठी देण्यात आल्या होत्या की ते त्या अल्लाहचे प्रतिनिधी आहेत जो सृष्टी निर्माणकर्ता आहे आणि सृष्टीचा शासकसुद्धा आहे. यापूर्वीसुद्धा संकेत केला आहे की पैगंबरांनी जेव्हा स्वत:ला सृष्टीनिर्मात्याचा पैगंबर म्हणून प्रस्तुत केले होते तेव्हा लोकांनी त्यांच्याशी चमत्कार करण्याची मागणी केली होती. जर तुम्ही खरोखर अल्लाहचे पैगंबर आहात तर तुमच्या हातून असा चमत्कार जो अनैसर्गिक आहे, घडला पाहिजे आणि ज्यामुळे स्पष्ट जाहीर व्हावे की अल्लाहने तुमचे पैगंबरत्व सत्य ठरविण्यासाठी हा चमत्कार अल्लाहकडून प्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे झाल्याने लोक त्या चमत्काराला पैगंबरत्वाची निशाणी म्हणून प्रत्यक्ष अल्लाहने प्रकट केली असे मानतील. याच मागण्यांच्या उत्तरांत पैगंबरांनी निशाण्या दाखविल्या होत्या ज्यांना कुरआनच्या परिभाषेत `आयती' म्हणतात आणि (संबोधकाच्या भाषेत) चमत्कार (मोजिजा) म्हणतात. अशा निशाण्यांस (मोजिजे) जे लोक नैसर्गिक सामान्य गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ते खरे तर ईशग्रंथाला मान्य करणे आणि अमान्य करणे यामध्ये एक वेगळा मार्ग काढतात, ज्याला उचित ठरविले जाऊ शकतच नाही. कारण कुरआन यास स्पष्टपणे अनैसर्गिक घटना घोषित करीत आहे. जे लोक ईशग्रंथांवर श्रद्धा ठेवित नाही ते लोक अशा घटनांना संदर्भाच्या अगदी विपरीत अनैसर्गिक घटना सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. असे प्रयत्न फक्त तेच लोक करतात जे ईशग्रंथावर ईमान आणत नाही. ज्या ग्रंथात अनैसर्गिक तथ्य आणि प्रसंगाचा उल्लेख होतो त्यावर ते ईमान ठेवत नाहीत. आणि दुसरीकडे पूर्वजांच्या धर्मावर जन्मजात श्रद्धा असल्याने त्या ईशग्रंथाला नाकारू शकत नाही ज्यात अनैसर्गिक घटनांचा उल्लेख आहे. चमत्कारच्या (मोजिजा) विषयी मूळ निर्णायक प्रश्न आहे की काय अल्लाह सृष्टीव्यवस्थेला एका नियमावर चालविल्यानंतर निष्क्रिय बनला आहे? आणि आता या सृष्टीव्यवस्थेत कसल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही? किंवा व्यावहारिक रूपात आपल्या राज्याचा प्रबंध आणि व्यवस्था आपल्या हातात ठेवतो आणि क्षणोक्षणी त्याचे आदेश सृष्टीव्यवस्थेत लागू आहेत. त्याला अधिकार आहे की वस्तूरूपात आणि घटनांपैकी नैसर्गिक गतीमध्ये अंशत: किंवा पूर्णत: बदल वाटेल तेव्हा करावा? जे लोक या प्रश्नांच्या उत्तरात पहिल्या प्रश्नाचे समर्थक आहेत त्यांच्यासाठी चमत्कार मान्य करणे असंभव आहे. कारण हे त्यांच्या ईशधारणेशी मेळ खात नाही की सृष्टीसंबंधी त्यांच्या कल्पनांशी! परंतु अशा लोकांसाठी उचित आहे की ते कुरआनच्या स्पष्टीकरणात व तपशीलात जाण्याऐवजी त्याचा स्पष्ट इन्कार करून टाकातात. कारण कुरआनने आपली वर्णनशक्ती अल्लाहविषयी वरील पहिल्या धारणेचे (प्रश्न) खंडन करण्यात आणि नंतरचा उल्लेख (प्रश्न) सिद्ध करण्यात लावली आहे. याविरुद्ध जो  कोणी  कुरआनच्या  तर्क  आणि  प्रमाणांशी  संतुष्ट  होऊन  दुसऱ्या  धारणा  आणि  कल्पना  तर स्वीकारतो, त्याच्यासाठी चमत्कार (मोजिजे) समजून घेणे आणि मान्य करणे अशक्य नाही. स्पष्टत: जेव्हा एखाद्याचा विश्वास असेल की साप ज्याप्रकारे जन्मतात त्याचप्रकारे ते जन्माला येऊ शकतातच, त्याव्यतिरिक्त दुसऱ्या पद्धतीने सापाला जन्म देणे अल्लाहच्या सामर्थ्यापलिकडची गोष्ट आहे. असे म्हणणाऱ्याला तुम्ही सरळ खोटे ठरविता की जो म्हणतो एक लाठी साप बनली आणि नंतर सापाची लाठी बनली. परंतु याविरुद्ध आपला विश्वास आहे की निर्जीव पदार्थात अल्लाहच्या आदेशाने जीव निर्माण होतो आणि अल्लाह एखाद्या वस्तूला जीवन बहाल करू शकतो. अशा माणसासाठी अल्लाहच्या आदेशाने लाठीचा साप बनणे तितकीच शक्य गोष्ट आहे जितकी निर्जीव अंड्यातून साप जन्माला येणे. फरक केवळ हाच आहे की एक घटना सतत होत राहाते आणि दुसरी घटना केवळ तीनदा घडली. हे एकाला विचित्र आणि दुसऱ्याला अविचित्र बनवू शकत नाही.



अपार प्रिय, पहाट स्मरणीय, आदरणीय दादासाहेब बारामतीकर  यांच्या --------कमली 'बारामतीकर (धाकटे) नमः' हा मंत्र अपार प्रेमाने अर्पण करतो. तुम्ही कधीतरी परत 'कमळा'वर कृपादृष्टी टाकाल या आशेने तुमच्याशी 'कमळ' हा शब्द जोडला आहे. रुजू करून घ्यावा. यंदाचे दोन दिवसांचे प्रदीर्घ हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आपल्याकडून फोन नाही, पत्र नाही. म्हटलं आपल्याला राग तर आला नाही ना? राज्याच्या राजकारणात बारामतीकरांना दुखावून कसं चालेल? आमचे (आणि तुमचेही बरं का!) देवा नाना नागपूरकर  तुमच्या नावाने गायत्री मंत्र तयार करीत आहेत. हल्ली ते ज्याही गोष्टीसाठी प्रयत्न करतात, ती सारखीसारखी लांबणीवरच पडत जाते. नुसतीच तारीख पे तारीख, तारीख पे तारीख!  तुमच्या वरचा गायत्री मंत्र ही असाच लांबणीवर पडत चालला आहे. तयार झाला की 'मी परत येईन' तुमच्या ----------कमली अर्पण करायला. असो.

तर काय सांगत होतो, की मी तुम्हाला पत्र लिहितोय हे कळल्याबरोबर आमच्या (आणि तुमच्याही बरं का!) देवा नानांनी सांगितले, की दादांनी सभागृहात चुकून झाला असं दाखवून, पण मुद्दामच माझा उल्लेख 'मुख्यमंत्री' म्हणून करून उधोजीराजे मातोश्रीकरांना चिडविल्याबद्दल माझ्यातर्फे त्यांचे अपार आभार माना. ( हो, हल्ली आमचं तुमच्यावर अपार प्रेम आहे, म्हणून आभारही अपारच मानावे लागतील ना?) हल्ली उधोजीराजेंना चिडवणे हा आमचा एकमेव आणि सयुक्तिक (म्हणजे पक्षातर्फेही आणि वैयक्तिक पातळीवरही) कार्यक्रम आहे. आम्ही ठरवलंय आता डिवचायचं नाही (कशाला उगाच परत विषाची परीक्षा?) आता चिडवायचं. आमच्या चंद्रपूरच्या गल्लीत एक भाडेकरू घरच खाली करत नव्हता. मालकाने वाट पाहिली. आज करेल रिकामं, उद्या करेल रिकामं, सहा महिन्यांत करेल, वर्षभरात करेल, पण कसचं काय? बाप तर राहतच होता रुबाबात, पण आता त्याचा मुलगाही मालकीहक्काने त्याच घरात कायमचा राहतो की काय असं वाटू लागलं. शेवटी मालकाने त्याला येताजाता चिडवायला सुरुवात केली; आणि त्या चिडवण्याला वैतागून त्या भाडेकरूने घर सोडले! प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. अहिंसक आहे म्हणून करून पहायला काय हरकत आहे असे आमच्या (आणि तुमच्याही बरं का!) देवा नानांच मत आहे. तुमचं काय मत आहे ते कळवावं. (गुप्तता पाळू. 'त्या पहाटे'सारखी.) हेही असो.

तर काय सांगत होतो, की माझ्या भाषणात अडथळा आणणारा पुढच्या वेळी निवडून येत नाही हे माझं परवाचं सभागृहातलं बोलणं तुम्ही असं अंगावर घ्यायला नको होतं आणि त्यासाठी मला आव्हान दयायला नको होतं. दादा, आमचं तुमच्यावर अपार प्रेम आहे. ('वरून' तसा आदेशच आहे!) कोणाचे कणभर जरी उपकार असले तरी त्याचे मणभर आभार मानावेत, अशी आमच्या पक्षाची संस्कृती आहे. आपले तर आमच्यावर ८० तासापुरते का होईना पण मणभर उपकार आहेत. त्यामुळे आम्ही आपले टनभर आभारी आहोत. यात कणभरही शंका ठेवू नका. (मागच्या उपकराबद्दल आभार मानतांना पुढच्या उपकारासाठी बीज पेरणी करून ठेवावी, ही आमची पद्धत आहे.) खरं तर आपण आजच्या राजकारणातले श्रीकृष्णच आहात. श्रीकृष्ण ज्यांच्या बाजूने असतो ते संख्येने कमी असले तरी जिंकतात. महाभारतात श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने उभा राहिला होता. पांडव जिंकले होते. आता  कालियुगातला श्रीकृष्ण कौरवांच्या बाजूने उभा राहिला. आता कौरव जिंकलेत! तुम्ही जरी तुमच्या आमदारांचा विश्वास ८० तासांपेक्षा जास्त टिकवून ठेवू शकला नाही, तरी आमचा तुमच्यावर अपार विश्वास आहे. देव कोणाला कोणत्या रुपात दर्शन देईल काही सांगता येतं का? आम्हाला 'रणछोडदास' भेटला. पुन्हा हेही असो.

तर काय सांगत होतो, की जेमतेम दोन दिवसांचं अधिवेशन आणि त्यातही आपण एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढत बसलो. हे काही योग्य झालं नाही. पुढचे अधिवेशन आपण (म्हणजे तुम्ही आणि आम्ही मिळून बरं का!) चांगले महिनाभराचे घेऊ. घ्यायचं ना? तुमचं मत कळवा. फार घाई नका करू. आमचे (आणि तुमचेही बरं का!) देवा नाना दिल्लीला शिफ्ट होईपर्यंत थांबलात तर बरं होईल. कसं? पुन्हा हे ही असोच असो.

आपला

               सुधीरभाऊ चंद्रपूरकर

सुधीर भाऊ,

तुमचे 'बटर टोस्ट के साथ चाय' छाप पत्र मिळाले. वऱ्हाडी माणसं बोलण्यात आणि खाण्यात अघळपघळ असतात हे नुसते ऐकूनच नाही तर पाहूनही माहीत होते, (आता नावं सांगायला नका लावू त्या ठिकाणी.) पण त्या ठिकाणी ती पत्र लिहिण्यातही अघळपघळ असतात हे तुमचं पत्र वाचून कळलं. कशाला उगीच म्हागं पडता? आरं आपलं वय काय? आपण करतो काय? थोडा तर त्या ठिकाणी विचार करायचा. अशी पत्रं लिहून सत्ता मिळते का कुठं? उगाच आपलं कायतरी करायचं. तुम्हचा, काय तो गायत्री मंत्रही तिकडंच ऱ्हावू द्या म्हणावं तुमच्या (आणि तुमच्याच बरं का!) देवा नानांना. मी ज्या गोष्टी कम्प्लिट विसरलो आहे त्या गोष्टींची परत परत आठवण का म्हणून देता, त्या ठिकाणी?

मी पत्र संपवतो, तुम्ही विषय संपवा.

दादा बारामतीकर


- मुकुंद परदेशी

मुक्त लेखक, 

संपर्क-७८७५०७७७२८

पाश्चात्य राष्ट्रांना आपण मानवाधिकार त्याचबरोबर पशुप्रेमीही असल्याचा मोठा अभिमान आहे. जगभर इतर राष्ट्रांमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन झाले तर त्याची दखल घेणं स्वतःवर अनिवार्य समजतात. यात वाईटदेखील काही नाही. त्यांचे कौतुक करणे उचितच ठरेल. पण त्यांनी स्वतःवर ओढावून घेतलेल्या जबाबदारीमागे खरेच मानवजातीचे प्रेम आहे. जगातील तमाम मानवजातीचे की त्यांचे हे प्रेम विशिष्ट मानवजाती प्रती आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतेच बेल्जियमने एक कायदा पारित केला. हा कायदा त्याच्यातल्या पशुप्रेमाच्या भावनांशी ओतप्रोत असल्याचे ते सांगत आहेत. या कायद्याद्वारे त्यांनी जगातील दोन धर्मसमुदायांना जे बेल्जियममधील रहिवाशी आणि नागरिक आहेत त्यांना लक्ष्य केले आहे. धार्मिक कारणांनी बळी-पशुबळी देताना त्या पशुंना आधी स्तब्ध (Stunn) करावे आणि नंतरच त्यांना कापले जावे. अशा या कायद्याच्या तरतुदी आहेत. ज्यू आणि मुस्लिम धर्मानुयायांना हा कायदा मान्य नाही. कारण पशुबळी देत असतानाच्या वेळी तो पशू निरोगी असून त्याच्यात कोणताही दोष नासावा, अशी या धर्मियांची धार्मिक शिकवण आहे. म्हणून ते नाराज आहेत. या कायद्याचे उद्दिष्ट विषद करताना तिथल्या पशुपालन मंत्र्यानी म्हटले आहे की पशुकल्याण आणि धार्मिक स्वातंत्र्यात संतुलन निर्माण करण्याचा हा सरकारचा हेतू आहे. जवळजवळ सर्वच पाश्चात्य देशांमध्ये पशु कापण्यापूर्वी एका लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर जोरदार आघात केला जातो. त्या पशूचा मेंदू बेशुद्ध झाल्यावरच पुन्हा त्याला कापले जाते. पण या पद्धतीपासून ज्यू आणि मुस्लिमांना धार्मिक कारणाने पशुबळी देण्यासाठी वगळण्यात आले होते. आता ही सवलत संपुष्टात आणली गेली असून सर्वांनीच आता या नवीन पद्धतीनुसारच पशूंना कापले पाहिजे. याचा अर्थ ज्यू लोकांनी कोश्‌र आणि मुस्लिम लोकांना हलाल पद्धती सोडून द्याव्या लागतील. ज्यू आणि मुस्लिम हलाल मांसाचाच भोजनात उपयोग करतात. या दोन्ही समुदायांतील लोक एकमेकांच्या धार्मिक पद्धतीनुसार कापलेल्याच जनावराचे मांस सेवन करू शकतात. त्यांच्यासमोर आता हलाल मांस उपलब्ध होण्याची समस्या उद्भवणार आहे. युरोपियन देशांमध्ये स्वीडन, नॉर्वे, आइसलँड, डेन्मार्क आणि स्लोवेनियामध्ये आधीपासूनच हलाल मांस उपलब्ध नाही. हा कायदा पारित केल्यानंतर युरोपीय समुदायांच्या सर्वच देशांनी त्याचे स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ते आता मध्ययुगीन काळात राहात नाहीत. याचा अर्थ इतर युरोपीय देशांमध्ये लवकरच असा कायदा केला जाणार आहे. प्रश्न असा आहे की जर पशुप्रेमाखातर केलेला कायदा असेल तर असाच एखादा कायदा तुम्ही माणसांच्या प्रेमासाठी त्यांची सर्रास हत्या करण्यापूर्वी त्यांना अगोदर स्तब्ध (Stunn) करण्यासाठी का आजवर केला नाही? पशुप्रेमींनी जगभर ज्या पाशवी लत्याकांडाची मालिका सुरू ठेवलेली आहे त्या वेळी पाश्चात्यांना माणसेही पशूसारखेच प्राणी आहेत, पशुंचे जसे जीव आहेत तसेच माणसांनाही जीव आहे. पशुंना कापतेवेळी जसा त्रास सहन करावा लागत असेल तसाच माणसांची सर्रास कत्तल करताना त्यांना त्रास होत असेल, असे विचार तुमच्या मनात का आले नाहीत? आखाती देशांतील तेल उपसण्यासाठी इराकवर जैविक अस्त्रे बाळगण्याचा खोटा आरोप करून तेथील लक्षावधींची लत्या करणारे हेच तर पशुप्रेमी होते. सीरियामधील पशुप्रेमी हेच आहेत. सऊदीअरेबियाच्या पाठीमागून येमेनची नासधूस करणारे, लीबियाची राजवट संपुष्टात आणणारे हेच पशुप्रेमी होते. फरक एवढाच की त्यांनी आपल्या पाशवी वृत्तीला पशुप्रेम असे नाव दिलेले आहे. याच पाशवी वृत्तीमुळे ६० लाख ज्यू धर्मियांना गॅस चेंबरमध्ये टाकून त्यांची हत्या करणाऱ्यांना आधी त्यांना बेशुद्ध करण्याची युक्ती का सुचली नाही? शेवटी ज्यू धर्मियांनी असा कोणता भयंकर अपराध केला होता ज्यासाठी त्यांच्या एका पिढीची भयंकररित्या हत्या करण्यात आली? युरोपीय देशांनी याचे उत्तर द्यायचे बाकी आहे. ते म्हणतात की त्यांना अजूनही मध्ययुगीन काळात जगायचे नाही. याचा अर्थ मध्युयुगीन काळ अन्याय-अत्याचार, माणसांची हत्या, कत्तली घडवण्याचा काळ होता. पण इतिहासात जितके भयंकर गुन्हे माणसांनी माणसांविरूद्ध सद्यकाळात केलेले आहेत आणि करत आहेत तेवढे अत्याचार कोणत्याही राष्ट्र-समुदायांनी केलेले नाहीत. हाच त्यांचा मानवाधिकार आहे. माणसांशी प्रेम की पशुंशी प्रेम! पशूदेखील आपल्या जातीवर इतके अत्याचार करत नाहीत. आपल्या पोटासाठी फक्त शिकार करतात. नुसतेच एकमेकांना ठार करण्यासाठी शिकार करत नसतात. तेवढे गुण तरी यांच्या अंगात असते तर बरे झाले असते. विशेष म्हणजे त्यांनी हा कायदा पारित केल्यावर तिथले मंत्री बेनवोयेट्रस यांनी ट्वीटरवर असे जाहीर केले की मला राष्ट्रवादी असल्याचा अभिमान आहे. त्याचबरोबर पशुप्रेमी असल्याचाही अभिमान वाटतो. पशुप्रेमाची गोष्ट तर त्यांनी आपला हेतू लपवण्यासाठी केली, त्यांना तर आपण किती राष्ट्रप्रेमी आहोत हे सांगायचे होते. म्हणजे त्यांनी पशुप्रेमापोटी हा कायदा पारित केला नाही तर इतर धर्मियांच्या विरोधात हा कायदा बनवला आहे हे स्पष्ट होते. या मंत्रीमहोदयांचे नाते नाझींशी असल्याचेही आता उघड झाले आहे. आपल्या देशातील नाझींनीही असाच एक पशुहत्या प्रतिबंध कायदा सध्या एका राज्यात लागू केला आहे. भविष्यात तो सबंध देशावर लागू होणार आहे. हा कायदादेखील पशुप्रेमापेक्षा इतर गोरगरीब जनतेच्या पोटावर लात मारण्यासाठीच असणार आहे. 

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक

मो.: ९८२०१२१२०७


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget