Halloween Costume ideas 2015
Latest Post

करोना व्हायरसविरोधी लढ्यात संपूर्ण जग होरपळून निघत आहे. या दरम्यान वृत्तवाहिन्यांना आपला टीआरपी वाढविण्याची अगदी सुवर्णसंधीच चालून आली. पत्रकारितेच्या मूल्यांमध्ये माहितीचा वा बातमीचा स्रोत तपासणे अधिक महत्त्वाचे समजले जाते. टीआरपीसाठी माहितीचा चोळागोळा करून भडक, खुसखुशीत, एक्सक्लुझिव्ह असे आवरण चढवून दाखवले जातात. वांद्रे येथे घडलेल्या घटनेनंतर ‘एबीपी माझा’पाठोपाठ हिंदी मराठी अशा अनेक वृत्तवाहिन्यांनी ‘पेâक न्यूज’चे रूपांतर ‘ब्रेकिंग पेâक न्यूज’मध्ये करून टाकले. रजत शर्मांच्या टीव्हीने तर २०००-३००० मजूर मस्जिदसमोर का जमले’ अशा मथळ्यांनी आपल्या टीव्हीचा स्क्रीन भरून ‘धार्मिक’ करून टाकला. ‘न्यूज नेशन’च्या वृत्तवाहनिीच्या अँकरलादेखील सामान्य मजुरांचा जमाव ‘धार्मिक’ वाटला आणि त्याने आपले ठरलेले प्रोपोगंडा पसरवणे चालूच ठेवले. याच करोना व्हायरस युद्धाच्या दरम्यान मुस्लिम समाजाचे ‘पेâक व्हिडिओ’ आणि बातम्या व्हायरल झाल्या. अशा प्रकारची ‘धार्मिक अशांतता’ माजविण्याचा एजेंडा चालविणाऱ्या इंडिया न्यूज, एबीपी हिंदी न्यूज, न्यूज नेशन यांच्यावर कारवाई का करायला नको? ते तर यापेक्षा अधिक मोठा गुन्हा करीत आहेत. लोकशाहीचा चौथ्या आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील अर्नब गोस्वामीसारख्या एका विशिष्ट वृत्तीद्वारे आज असंख्य माथी भडकवली जात आहेत. आक्रमकता म्हणजे आततायीपणा वा उद्धटपणा, स्पष्टवक्तेपणा म्हणजे वाचाळवीरता, स्वातंत्र्य म्हणजे उन्माद, हे या पत्रकारांचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यातून देशाच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण होत आहे. संपूर्ण देश करोनासारख्या संकटाशी सामना करत असताना काही वृत्तवाहिन्या मात्र हिंदू आणि मुस्लिमांमधील दरी वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या षड्यंत्राला यश मिळालेच तर सरकार करोनाशी लढेल की धार्मिक दंगली मिटवेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. पालघरमधील घटनेला धार्मिकतेचा मुलामा देण्याचे पद्धतशीरपणे काम या वाहिन्या करीत होत्या. सातत्याने हिंदू-मुस्लिम असा भेद करून त्यासंदर्भातील बातम्या देण्याचे आणि चर्चा घडवून आणण्याचे काम येथे सातत्याने सुरू असते. पत्रकारितेच्या नितीमूल्यांचा बळी टीआरपी मिळविण्याच्या स्पर्धेमुळे दिला जात असल्याचे जाणवू लागले आहे. सध्याच्या कोरोनाच्या संवेदनशील वातावरणात लोक भीतीने मृत्युमुखी कसे पडतील याचीच जणू तजवीज या वाहिन्या करत आहेत. आर्थिक विकास, शिक्षण सुधार, बेरोजगारी, सामाजिक-बौद्धिक विकास यासारख्या भविष्यवेधी बाबींवर पत्रकारांची बुद्धी खर्च व्हावी अशी अपेक्षा असते, पण सध्या या बुद्धिजीवी म्हणवणाऱ्यांची क्षमता अनेक उथळ, भोंगळ, धर्मवादी, अवैज्ञानिक विधानांचा आणि कृत्यांचा प्रतिवाद करण्यात खर्च पडत आहे. समाजही आपल्या समस्यांवरील उत्तरे शोधण्याऐवजी या वैचारिक भाऊगर्दीत सापडत दिशाहीन होत आहेत. त्यात राष्ट्रीय महत्त्वाचे अनेक विषय विरून जाताना दिसतात. ‘लोकशाही म्हणजे संवाद’ असे लोकशाहीचा ब्रिटनमधील भाष्यकार जॉन स्टुअर्ट मिल्स यांनी म्हटले आहे. मात्र, हा संवाद सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणाची पातळी ओलांडणारा नसावा. हे भान सुटले की मग तो संवाद राहत नाही. विसंवाद होतो. विशेषत: करोनासारख्या संकटकाळात संवेदनशील विषय अतिशय सावध आणि समंजसपणे हाताळत राष्ट्रीय एकात्मता टिकून राहाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण या मूल्याला पायदळी तुडवून जातीयवादी आणि धर्मवादी विश्लेषण आज सर्रास सुरू आहे. राजकारणाला जेव्हा समाजाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविता येत नाहीत तेव्हा समाजापुढे आभासी असे धार्मिक प्रश्न अशा कट्टरवादी विचारसरणींच्या माध्यमातून निर्माण केले जातात. निरपेक्ष वार्तांकनापेक्षा आरडाओरड, आकांडतांडव, आरोळी, किंकाळी, डरकाळी आणि हंबरडा यांच्या साहाय्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे एवढाच बहुसंख्य न्यूज चॅनल्सचा आवडता कार्यक्रम आहे. त्यातून प्रेक्षकांना विचार करण्याला प्रवृत्त करण्याऐवजी विचार कसा करायला हवा हे वारंवार ठसवून त्यांच्या विचार प्रक्रियेवरही नियंत्रण मिळवले आहे. मानवानेच वाढवून मोठा केलेला हा माहितीचा भस्मासूर आज मानवालाच भस्मसात करण्याच्या स्थितीत पोचला आहे. आज न्यूज चँनल्स द्वेषाचे पीठ दळून, धार्मिक ध्रुवीकरण करत धर्मांध राजकारण्यांचे पोषण करत आहे. सध्या न्यूज चँनल्सच्या जात्यात मुस्लिम आहेत म्हणून आनंदी होणारांना हे माहीत नाही सुपात कोण कोण आहेत. उद्या दलित, आदिवासी, दक्षिण भारतीय आणि काही दिवसांनी खिस्ती, शिख, जैन वा मारवाडी, कोणताही अल्पसंख्य समाज जात्यात असू शकतो. कारण प्रत्येकाकडे एक स्वतंत्र जाते असू शकेल. आणि एकदा नरभक्षणाची सवय लागली की, मग मांस महत्त्वाचे असते कोणाचे आहे हे नव्हे! म्हणून हा भस्मासूर रोखायला हवा! काळ माणसाला सावध होण्याच्या खूप संधी देत असतो. पण आपण सावध होणार की न्यूज चँनल्सच्या खेळात पारध होणार हे ठरविण्याची वेळ या महामारीच्या काळात आपल्या समोर आली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासारखे पत्रकारदेखील जीवावर उदार होऊन आपले कार्य करत आहेतच. काळोखात अडकलेल्या बाजारीकरण झालेल्या अशा अंधकारमय, बदनाम झालेल्या या माध्यम व्यवसायाला कदाचित केवळ ‘नैतिक पत्रकारिता’ या चिखलातून बाहेर काढेल.

- शाहजहान मगदुम

सुमारे शंभर वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या प्लेगची माहिती बालपणी ऐकताना भीती वाटत असे. कोरोना प्रत्यक्ष अनुभवताना जीवनच भेसूर होऊन बसले आहे. एका बाजूने जीवित हानी तर दुसऱ्या बाजुने वित्तहानी अशा दुहेरी संकटात सकल जग सापडले आहे. कोरोना विषाणू आहे असे मानले जात आहे. मात्र याची उत्पत्ती व त्यावरील उपाय काय याचा अद्याप तपास लागलेला नाही. अशातच तो स्थलपरत्वे कमी-अधिक होत आहे. तर काही ठिकाणी तो संपला असल्याचीही बातमी कानी पडत आहे. त्यातच हा लोक मानवनिर्मित की दैवी अशी चर्चाही ठिकठिकाणी होत आहे. अशा स्थितीत तो मानवनिर्मित नाही असे अनुमान उचित वाटते. कारण यावर अद्याप औषधच नाही.
उगवतो तो मावळण्यासाठी. तसेच येतो तो जाण्यासाठी या नियमास अनुसरून कोरोना केव्हा तरी जाणार तर आहेच. कारण तो आलेला आहे. मात्र त्याने आर्थिक संकट निर्माण केले आहे ते आम्हालाच घालवून लावावे लागणार आहे. हे संकट महाकाय असून ते महाकाळ टिकणारेही आहे. कोरोनाने कित्येक कुटुंबे बळी घेतली. अशातच अशा कुटुंबांतील निराधार, अनाथ, विधवा स्त्रिया, निराश्रित अशा सर्वांप्रती प्रत्येकाच्या मनी सहानुभूती आहेच. मात्र प्रत्येक जण या आर्थिक संकटाने चिंतातूर होऊन बसला आहे.
तूर्तास आपल्या शासनाने लोकांचे जीव कसे वाचतील इकडे लक्ष वेंâद्रित केले आहे आणि ते योग्यच आहे. याकरिता पुढील मार्गदर्शन केले आहे-
१) स्वच्छता राखा, २) शिस्त पाळा (नियम पाळा), ३) संयम राखा आणि ४) सहकार्य करा.
शासनाच्या या मार्गदर्शनाचा विचार करू लागलो तेव्हा यात काही अवघड आहे असे वाटले नाही. कारण या मार्गदर्शनाची महती इस्लामने १४५० वर्षांपूर्वीच जगाला विहीत केली आहे, ती अशी-

स्वच्छता
पाच वेळच्या नमाजच्या वेळी करावी लागणारी वुजू. लघुशंकेनंतर केला जाणारा पाण्याचा वापर तसेच लघुशंका बसून करण्याचे मार्गदर्शन जेणेकरून त्याचा एक थेंबही शरीरावर राहू नये वा कपड्यांवर पडू नये.

शिस्तपालन (नियमांचे पालन)
रोजाची सहरी आणि इफ्तारी या दोहोंची वेळ सूर्यास्तानुसार निश्चित ठरलेली असते. यात फरक केल्यास रोजा अपूर्ण किंवा निरर्थक ठरतो. तसेच सामूहिक नमाज इमामच्या सूचनांनुसार अदा न केल्यास ती अपूर्ण किंवा निरर्थक ठरते. यातून नियम पाळण्याचे मार्गदर्शन आहे.

संयम
रमजान मास उन्हाळ्यात आल्यास रोजे १६/१६ तासांचे किंवा स्थलपरत्वे अधिक तासांचे असतात. अशा वेळी भूक-तहान सहन करावी लागते आणि ती सहन करण्याकरिता मनावर ताबा केवळ संयमानेच मिळवता येतो. अशा तNहेने संकटसमयी संयम पाळता यावा म्हणून हे एक प्रकारचे प्रशिक्षण होय. हजयात्रेच्या वेळीदेखील आपल्या आप्तेष्टांपासून दूर राहण्यासाठी अशाच संयमाची गरज असते.

सहकार्य
जकात आणि सदका याद्वारे सहकार्याचे मार्गदर्शन आहे. शिवाय या दोहोंद्वारे आर्थिक नियोजनाचेही मार्गदर्शन केलेले आहे.
कोरोना जाईल, त्यानंतर मात्र यक्षप्रश्न उभा ठाकलेला असेल तो आर्थिक संकटाचा. अशा वेळी शिस्तपालन, संयम आणि सहकार्य याबाबींची नितांत गरज असेल. शिवाय स्वीकारलेला पाश्चिमात्य अमर्याद आणि बेलगाम भौतिकवाद, चंगळवाद यास तत्वर कायमस्वरूपी घालवून लावणेही खरे तर काळाची गरज आहे.याचे एखादे उदाहरण विचारात घ्यायचे म्हटले तर लग्नकार्यातील पत्रिका. लग्नाच्या या आमंत्रणपत्रिकेसाठी शेकडो रुपये खर्च केले जातात. भरीला अहमत असतोच.
कुरआनने अनाठायी व अनावश्यक खर्चास मनाई तर केलीच आहे, शिवाय अहमला इस्लाममध्ये कोठे स्थानच दिलेले नाही. कारण अहम आणि सैतान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे मानवास सजदा करण्याच्या अल्लाहच्या आदेशासमयी दिसून आले आहे.
या महाकाय आणि महाकाळ टिकणाNया आर्थिक संकटास सामोरे जायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळण्याबरोबरच निकडीच्या गरजांवर खर्च होईल हे कटाक्षाने पाहणे उपयुक्त ठरेल. तसेच काही वर्षांपूर्वी अन्नधान्याच्या दुष्काळाला सामोरे जाता यावे म्हणून शासनाकडून आलेच तर देशाचा विचार करून शासनास सहकार्य करणे मोलाचे ठरेल तेव्हाच हळूहळू का होईना या आर्थिक संकटातून पार पडणे शक्य होईल. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आहेच. तसेच पवित्र रमजानमध्ये प्राप्त असलेल्या शबे कद्रची सुवर्णसंधी साधून अल्लाहकडे या महामारीव आर्थिक संकटातून लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी दुआ करणे उपयुक्त ठरेल.
कोरोना व त्याने उभे केलेले आर्थिक संकट या दोहोंच्या कात्रीत सापडले असताना रमजान मासाचे आगमन नेहमीप्रमाणे आनंदाबरोबरच दिसाला देणारेही आहे. कारण रमजानने जगाला जे दिले आहे ते अनमोल आणि अतुलनीय आहे.
सर्वश्रुत पवित्र महिन्याभराचे रोजे दिले. याच महिन्याभराच्या रोजांमुळे आरोग्य लाभते, भूक-तहान सहन करण्यासाठी आवश्यक असलेला संयम लाभतो. हाच संयम कोणत्याही संकटसमयी उपयुक्त ठरतो. रोजाद्वारे इतरांच्या उपाशी असण्याच्या स्थितीची जाणीव होऊन मदत, सहकार्य अशा मानवतावादी भावनांना उत्तेजन मिळते. इतरांची गरिबी दूर करण्यासाठी स्वत:चे आर्थिक नियोजन याच पवित्र महिन्यातील जकात व सदका यांची मदत होत असते. रोजासाठी सहरी व इफ्तारीद्वारे जे आदानप्रदान होत असते त्याद्वारे प्रेम व बंधुभाववाढीस मदत होते. अल्लाहला प्रिय असलेले चारित्र रोजाद्वारे प्राप्त होत असते ते त्यातील तकवामुळे. (तकवा म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे आणि हजरत मुहम्मद (स.) हे त्याचे पैगंबर व रसूल आहेत. हे ईमान आणि त्याचबरोबर सकल सृष्टीचा निर्माता, पालक व चालक, नियंता अल्लाहच. तो सृष्टीतील प्रत्येक घडामोड घडवीत असतो. प्रत्येक घडामोडीची त्याला माहिती असते आणि त्यानुसार त्याचा निवाडा अंतिम निवाड्याच्या दिवशी असेल. थोडक्यात त्याच्याप्रती प्रेम व भय हाच तकवा होय.)
रमजानने कुरआन हा अल्लाहचा अंतिम धर्मग्रंथ दिला ज्याने वर उल्लेखित मौल्यवान मार्गदर्शन केले. अल्लाहबाबतच्या ज्या अयोग्य कल्पना प्रचलित होत्या त्या दूर करून त्याचे वास्तव रूप सूरह इख्लासमध्ये तर आपल्याला सन्मार्ग  मिळावा म्हणून सूरह फातिहाद्वारे दुआ मिळाली. हे सर्व कुरआनमुळेच, ज्याचे अवतरण पवित्र रमजानमध्ये झाले. कुरआन प्रस्तुत होण्यास सुरूवात झाली रमजानमध्येच. अशी सुरूवात करणारे मुहम्मद बनि अब्दुल्ला अर्थात हजरत मुहम्मद (स.) पैगंबर दिले ते रमजानने. त्यांची गणना पहिल्या १०० महान व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे हे विशेष!
इस्लामी वर्षातील सर्वोत्तम रात्र बहाल करणारा रमजान आणि लोकांनी ज्या प्रेमानने या रमजान मासाचे स्वागत केले, संयमी रोजे ठेवले त्याचा आनंदही ईदे रमजान.
अशा या महान रमजानप्रती-
‘‘सबसे अच्छा मेहमान हमारा तू ऐ माहे रमजान
तूने दिया हमें कुरआन, बनाया जिसने हमें इन्सान
कितने व वैâसे अदा, हम करे तेरे अहसान,
हो सभीं को तू मुबारक, यही एक अरमान।’’

-बशीर अमीन मोडक, रत्नागिरी, मो.: ९९३०९८६९६४

Corona
कोरोनाने जगाची फिरती चाके थांबविली आहेत. सुरूवात डिसेंबर 2019 पासून वुहान शहरातून झाली. बघता-बघता सारं जग कोरोनाच्या विळख्यात आलं.  जे लोक म्हणत होते की, ते तर चीनला आहे आपल्याला काय? परंतु दुसर्‍याचं घर जळताना पहाणं मानवी स्वभावाचा दुर्गून.  मात्र कोरोनानं जगाला दाखवून दिले की कुठलीही भूमी  त्याला परकी नाही, त्याला कोणाचेही वैर नाही. धर्म, जात, पात त्याचा विषय नसून, त्याचा विषय फक्त माणूस आहे. 

    कोरोना व्हायरस काय आहे?
डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते हा व्हायरस सेक फुडशी निगडीत आहे.  हा व्हायरस फक्त मानवांनाच बाधा करतो असे नाही तर तो प्राण्यांतही आढळून येतो. एका अभ्यासात कोरोनाची अनेक रूपे समोर येत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस निघाली तरी प्रत्येक व्यक्तीला ती लागू होईल का नाही, याची शाश्‍वती तज्ज्ञ देऊ शकणार नाहीत.  कोरोनाची लक्षणे -  तज्ज्ञांच्या मते डोकेदुखी, नाक वाहने, खोकला, घशात खवखव, ताप, शिंका येणे, धाप लागणे, निमोनिया, अस्वस्थ वाटणे आदी लक्षणे आहेत. तरी परंतु, महाराष्ट्रातील अनेक रूग्णांत सदरची लक्षणे नसली तरी तपासणीअंती रूग्णांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या कोरोनावर लस उपलब्ध नाही. तरी परंतु, जागतिक आरोग्य संघटनेने जी उपचारपद्धती आखून दिलेली आहे त्यानुसार बरेच रूग्ण कोरोनामुक्त होत आहेत. भारतामध्येही मोठ्या प्रमाणात रूग्ण बरे होत आहेत. 
उपाय
1.  हात साबणाने धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, खोकताना आणि शिंकताना तोंड झाकणे, रूमाल, मास्क अथवा टिश्यू पेपर वापरणे, ज्या व्यक्तींमध्ये सर्दी आणि फ्लूची लक्षणे आहेत त्यांच्यापासून शारीरिक अंतर ठेवणे, जंगली जनावरांचा संपर्क टाळणे आदी. स्वत:ची इम्युनिटी पावर वाढविणे. चांगला सकस आहार घेणे, योगा, हलका फुलका व्यायाम करणे आदी.
कोरोना व्हायरस होणार्‍या मृत्यूदराचे प्रमाण
1.  9 वर्षापर्यंत 0 टक्के, 2. 10 ते 39 वर्षांपर्यत 0.2 टक्के, 3. 40 ते 49 वर्षांपर्यंत 0.4 टक्के, 4. 50 ते 59 वर्षांपर्यंत 1.3 टक्के, 5. 60 ते 69 वर्षापर्यंत 3.5 टक्के, 6. 70 ते 80 वर्षे 14.8 टक्के मृत्यूचे प्रमाण आहे.
जगभरात कोरोना संक्रमणाची स्थिती
28 एप्रिलपर्यंत जगभरात 30 लाख 46 हजार 213 रूग्ण आढळले. त्यातील 2 लाख 10 हजार 379 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 9 लाख 16 हजार 374 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आत्तापर्यंत 29 हजार 450 रूग्ण आढळले.  त्यापैकी 939 रूग्णांचा मृत्यू झाला तर 7 हजार 133 रूग्ण बरे झाले. महाराष्ट्रात 9 हजार 318 रूग्ण कोरोनाबाधित आहेत तर 400 जणांचा मृत्यू झालेला आहे.
    देशभरात लॉकडाऊनची स्थिती आहे.  ही स्थिती आपल्या भल्यासाठीच आहे.  केंद्र शासन आणि राज्य शासनाने जे दिशानिर्देश दिले आहेत, त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. तरी परंतु, काही लोक नियम तोडून बाहेर फिरत आहेत आणि पोलिसांचा मार खात आहेत. पोलिसांशीच हुज्जत घालत आहेत. हे एकदम चुकीचे आहे. आज सारं जग एका कुटुंबाप्रमाणे कोरोना विषाणूशी लढा देत आहे.  त्यामुळे या कुटुंबातील सदस्य म्हणून आपण जबाबदारीने वागले पाहिजे. स्वच्छता पाळणे आणि शारीरिक अंतर ठेवणे सध्यातरी हाच उपाय आरोग्य संघटना सांगत आहे. मात्र लॉकडाऊनचा कालावधी दिवसेंदिवस वाढत असल्याने आर्थिक समस्या भेडसावत आहे.  याला सरकारने जी उपाययोजना केली आहे, ती जरी मजबूत नसली तरी सरकारच्या उत्तरदायित्वाबरोबर आपण सामाजिक भान ठेवत गरजूंपर्यंत मदतीचा हात आणि अन्नाचा घास पोहोचविला पाहिजे. यासाठी सामाजिक संस्था, संघटना पुढे येवून जी गोरगरीबांची सेवा करत आहेत, त्याचे समाधान वाटत आहे.
    लॉकडाऊनच्या काळात मानसिक हानीही मोठ्या प्रमाणात होत आहे.  यापासून वाचायचे असेल तर आपणाला पुस्तके, धर्मग्रंथ वाचून स्वत:ला सावरावे लागेल.  सध्या रमजानचा पवित्र महिना आहे.  जो माणसाला संयम, शिस्त आणि ईश्‍वरी आज्ञेचे पालन करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे वेळ काढून कुरआनचे अध्ययन करा.

रमजानमध्ये हे नियम पाळा.
    रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दृष्टीने रमजानमध्ये काय बदल करावे व काळजी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. देशभरातून उलेमा आणि डॉक्टरांनी याला मान्यता दिली आहे. 
1) कोविड-19 चे निदान झालेले, निदान होऊन बरे झालेले व निश्‍चित निदान झालेल्या रूग्णांच्या संपर्कात येऊन सध्या होम क्वारंटाईनचा सल्ला दिलेल्यांनी रोजा ठेऊ नये..
2) 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांनी तसेच 60 पेक्षा कमी वय असले तरी मधुमेह, हृदयरोग, कॅन्सरचा त्रास असलेल्यांनी शक्यतो रोजा टाळावा.
3) पवित्र कुराणमध्येही आजारी व्यक्तींना रोजा करण्यातून सूट देण्यात आली आहे. या संकेताशिवाय अजून काही गोष्टी रमजानदरम्यान पाळण्यात हरकत नाही. मधुमेह नियंत्रित असणारे काहीजण या काळात रोजा ठेवतात. अशांनी रक्तातील साखर 70 च्या खाली व 300 च्या वर जाणार नाही. याची काळजी घ्यावी. स्वस्थ व्यक्तींनी रोजा करत असताना खोकला, ताप, सर्दी असल्यास रोजा करणे थांबवावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
4)  या वर्षी रमजानदरम्यान प्रार्थना, नमाज घरीच अदा करावी.  एकत्रित इफ्तारचे कार्यक्रम टाळावे. काही कारणास्तव रोजा ठेवता आला नाही तरी कुरआनमध्ये कफ्फाराची तरतूद सांगितलेली आहे.
5) कफ्फारा म्हणजे गरजवंतांना पैसे किंवा जेवणाचे दान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक दान करून आपण रोजा न करता कफ्फाराचे पालन करू शकता.

- आदिबा रियाज शेख, उस्मानाबाद

कोई तो जुर्म था जिसमें सब मुलव्विस थे
तभी तो हर शख्स मुंह छुपाये फिरता है
जगाने आपली लय सोडली होती, अन्याय वाढला होता, विषमता वाढली होती, अमेरिका आणि त्याचे सहकारी राष्ट्र मस्तवाल हत्तींच्या झुंडीप्रमाणे एकानंतर एक राष्ट्र बेचिराख करीत सुटले होते. त्यांना रोखणे तर दूरची गोष्ट बाकींची राष्ट्रे एक तर त्यांची साथ देत होती किंवा गप्प होती. संयुक्त राष्ट्र संघही त्यांच्यासमोर निष्प्रभ झाले होते. पर्यावरणाची अपरिमित हानी होत होती. त्याची कोणाला परवा नव्हती. अनैतिकतेचा उत्कर्ष बिंदू कुठल्याही एककामध्ये मावत नव्हता. स्त्रीच्या अवहेलनेने सार्‍या मर्यादा ओलांडल्या होत्या. रोज बलात्कार होत होते. तरूण पीढि उच्छश्रृंखल झाली होती. लग्नाची गरज संपली होती. कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली होती. दारू आणि ड्रग्जनी जगातल्या जवळ-जवळ प्रत्येक शहराचा ताबा घेतला होता. मनोरंजनाच्या नावाखाली अश्‍लिलतेचा नंगानाच सुरू होता. वैद्यकीय क्षेत्रानेही अविश्‍वसनीय अशी झेप घेतली होती. श्रीमंत लोकांना सर्वप्रकारच्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होत्या तर त्या गरीबांच्या कुवतीबाहेर गेल्या होत्या. शिक्षणाचा बोजवारा उडाला होता. विद्यापीठे शिक्षणेत्तर कामाचे अड्डे झाले होते. मीडियाने चव सोडली होती. कृषी क्षेत्राची अवनती पहावत नव्हती. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे बातमीमुल्य हरवले होते. व्याजाचा विळखा गरीबांच्या गळ्याभोवती आवळला जात होता. काही मुठभर लोकांनी जगाला वेठीस धरले होते. त्यांची प्रगती डोळे दिपवणारी होती. त्यांनी जगाला एवढी गती दिली होती की, अनेक घटकं मागे पडत चालली होती याची त्यांना तमा नव्हती. जे त्या गतिशी लय मिळवू शकत नव्हते ते वृद्धाश्रमात पाठविले जात होते.
    प्रत्येकाची जणू खात्रीच झाली होती की, ”़जमाने की इस रफ्तार को रोकना मुश्किल ही नहीं नामुम्कीन भी है” पण तेवढ्यात चीनच्या एका अपरिचित अशा वुहान नावाच्या शहरामधून एक असा व्हायरस, जो डोळ्याने दिसत सुद्धा नव्हता पसरल्याची बातमी आली. सुरूवातीला वेगवान जगाला त्याची दखल घेण्याचीही गरज वाटली नाही. पण मार्च उजाडला आणि वेगवान जगाच्या रथाच्या चाकामध्ये कोणीतरी अचानक सब्बल घालावा आणि ते चाक कडाड ऽकट ऽकट ऽ असे आवाज करून वाकडे तिकडे होवून थांबावे असे झाले. अवघ्या दोन महिन्यात दोन लाखांपेक्षा जास्त माणसं मेली. 30 लाखांपेक्षा जास्त रूग्णालयात गेली. बाकी राहिलेली माणसं घरात कैद झाली. माणसं घरात कैद झालेली पाहून जनावरांना कोण आनंद झाला. मोर रस्त्यावर उतरून थुईथुई नाचू लागले. आता जगाला कोविड-19 ने आपल्या मगरमिठीत घेतले होते. आता ही मिठी कधी सैल होईल व जगाची गती पुन्हा पूर्ववत कधी होईल, हे कोणालाही सांगता येण्यासारखे नाही. जेव्हा कधी जग पूर्ववत होईल तेव्हा सर्व गोष्टी बदललेल्या असतील एवढे मात्र नक्की. आजपर्यंत जगाची मांडणी नोहा (नूह अलै.) च्या जगबुडीच्या पूर्वीचे जग व नोहाच्या नंतरचे जग अशी केली जात होती. आता जगाची नव्याने मांडणी कोविड-19 पूर्वीचे जग आणि कोविड-19 नंतरचे जग अशी होईल. कोविड-19 चे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे याचा फटका जगाचे नेतृत्व करणार्‍या राष्ट्रांना सर्वाधिक बसला. युरोप आणि अमेरिकेची अवस्था, ”साला एक व्हायरस कई देशों को भिकारी बना देता है” अशी झाली. अमेरिकेसारख्या राष्ट्रावर भारताकडे औषधांची भीक मागण्याची वेळ आली.
    एकदा का कोरोना संपला की, प्रत्येक देशाला आणि समाजाला काय गमावले याचा तटस्थपणे हिशोब करावा लागेल. तेव्हा जग दोन विभागात विभागले जाईल. काहीच्या लक्षात येईल की कोविडने त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली आहे तर काहीच्या लक्षात येईल की, ही आत्मचिंतन करावयाची वेळ आहे आणि ते चिंतन करायला सुरूवात करतील. दोन्ही गटातील बहुतेक माणसांना नैतिकता व माणुसकीचा अर्थ कळेल व त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत. मानवी मुल्यांची आणि पर्यावरणाची हानी करणार्‍यांना गतीपेक्षा मानवी मुल्यांची जोपासणा करत जगाला पुढे नेण्याची गरज भासू लागेल. पर्यावरणाकडे लक्ष देण्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण होईल आणि एका नव्या जगाची सुरूवात होईल. ज्यांची मनुष्यहानी झाली त्यांच्या वारसांच्या लक्षात येईल की, जगाच्या गतीवर त्यांचा जो विश्‍वास होता तो किती फोल होता? प्रत्येक देशाला, समाजाला भविष्यातील आपल्या वाटचालीची आखणी नव्याने करावी लागेल. व्याजाधारित भांडवलशाही अर्थव्यवस्था हीच कल्याणकारी अर्थव्यवस्था असल्याची शेखी मिरविणार्‍या राष्ट्रांना आपणच ’सर्वश्रेष्ठ‘ आहोत, या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल आणि हीच नेमकी वेळ असेल, जेव्हा जगाला नवीन दिशा देण्याची जबाबदारी प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या अनुयायांच्या खांद्यावर येऊन पडल्याची त्यांना नव्याने जाणीव होईल.
    व्याजयुक्त अर्थव्यवस्था कशी समाजघातकी आहे व व्याजमुक्त अर्थव्यवस्था कशी समाजहिताची आहे, हे जगाला समजून सांगावे लागेल.त्या दिशेने नवीन अर्थव्यवस्थेची उभारणी करण्याचे आवाहन 57 मुस्लिम राष्ट्रांना स्वीकारावे लागेल.
    जागतिक महासत्ता म्हणून मिरविणार्‍या अमेरिकेला एका सुक्ष्म व्हायरसने कसे पछाडले याच्या कथा लोक येत्या शंभर वर्षापर्यंत नवीन पीढिला सांगत राहतील. अमेरिका नावाची महासत्ता इतकी हतबल झाली होती की तिचा आर्थिक डोलारा एका महिन्यात कोसळून पडला व कोट्यावधी लोक बेरोजगार झाले. अन्नाच्या पाकीटांसाठी हजारोंच्या रांगा लागल्या. हे अजबच म्हणावे लागेल. जी गत अमेरिकेची झाली तीच सगळ्या जगाची झाली. भारताचे 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न जे फेब्रुवारीमधील अर्थसंकल्पात दाखवले गेले होते ते किती चुकीचे होते, हे अवघ्या एका महिन्यात म्हणजे मार्चमध्ये कर्मचार्‍यांच्या वेतन कपात करण्यापर्यंतची पाळी आल्याने लक्षात आले. थोडक्यात भांडवलशाही अर्थव्यवस्था ही वरून जरी भक्कम वाटत असली तरी तो फक्त देखावा असतो, आतून ती पोकळ असते हे वास्तव कोविड-19 ने जगासमोर आणले आहे.
    भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील तोटे
    या व्यवस्थेतील सर्वात मोठा तोटा विषमता आहे. या व्यवस्थेमध्ये मुठभर श्रीमंत लोकांना आपले आर्थिक साम्राज्य उभारण्याची संधी असते. बाकीच्यांना फक्त कामगार म्हणून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातही शासन किंवा श्रीमंत व्यक्ती यांच्यापैकी कोणीही त्या लोकांची जबाबदारी घेण्यास तयार नसतात जे काम करण्यासाठी लायक असतांनासुद्धा त्यांना काम मिळत नाही. कुठल्याही देशात हा वर्ग फार मोठा असतो. 23 मार्चला लॉकडाऊन घोषित होताच याची प्रचिती आपल्या देशातही आली. लाखो लोक रस्त्यावर उतरून वेड्यासारखे आपल्या मूळ गावाकडे परतण्यासाठी पायी निघाले. अंतराची ही त्यांनी तमा बाळगली नाही. कधी काळी मुहम्मद तुघलकने तुघलकी फरमान काढून दिल्लीच्या जनतेला दौलताबादला कुच करण्याचा आदेश दिला होता, असे म्हणतात व त्या आदेशाचे पालन करतांना अनेक लोक पायी चालून मृत्यूमुखी पडले होते, असेही म्हटले जाते. अगदी तीच स्थिती 23 मार्चनंतर आपल्या देशात लॉकडाऊनच्या घोषनेनंतर निर्माण झाल्याचे याची देही याची डोळा पहावे लागले.
    कोरोनानिमित्त दिशाहीन भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या मर्यादा उघड पडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर दिशाहीन समाजाचे किती वाईट परिणाम होऊ शकतात, हे ही कोविड-19 निमित्ताने जगाच्या लक्षात आलेले आहे. या दोन्ही समस्यांवर उपाय फक्त कुरआनमध्ये आहे. गरज फक्त स्वत: कुरआनमधील संदेशाला समजून घेऊन जगापर्यंत पोहोचविण्याची आहे. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी जागतिक मुस्लिम समाजावर येऊन पडलेली आहे. याची जाणीव मुस्लिम समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! ही जाणीव आमच्यामध्ये निर्माण कर आणि दिशाहीन जगाला दिशा देण्याची समज व शक्ती दे. तसेच सर्व मानव समाजाला  तुझ्या या संदेशाला समजून घेण्याची शक्ती दे. (आमीन.)

- एम.आर.शेख

मित्रानों ! कोविड-19 च्या छायेखाली रमजान सुरू झालेला आहे. मानवी सभ्यतेच्या इतिहासामध्ये कदाचित असं पहिल्यांदा घडत असेल की संपूर्ण जग एका भयंकर आजाराच्या तडाख्यात सापडलेले आहे. याला संयोगच म्हणावे लागेल की अशा या वातावरणात रमजान सुरू झालेला आहे. एरव्ही या महत्त्वाच्या पर्वाला मुसलमान पूर्व तयारीनिशी सामोरे जातात. कुरआनमध्ये या महिन्यासंबंधी असा आदेश आलेला आहे की, ’हे लोकांनों ! ज्यांनी ईमान धारण केले आम्ही तुमच्यावर रमजानचे उपवास अनिवार्य केलेले आहेत. तसे जसे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर अनिवार्य केले होते.’ आणि याचा उद्देश्य कुरआनमध्ये असा सांगितला गेला आहे की, तुमच्यामध्ये ईश्‍वराचे भय निर्माण व्हावे. आज जगात जी काही स्थिती आहे, त्यामुळे सरकारने दिलेल्या अनेक निर्देशांच्या आधीन राहून आपल्याला हा महिना साजरा करावयाचा आहे. जेव्हा एकीकडे कोविड-19 एक हानिकारक व्हायरस आहे तेव्हाच दुसरीकडे अल्लाहने याद्वारे आपल्याला एक चांगली संधी मिळवून दिलेली आहे की, इतर वर्षाच्या तुलनेत आपण आपल्या घरात राहून अधिक तन्मयतेने ईबादत करू शकू. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमधून जगाला कोणकोणते लाभ मिळतील, हे आपल्याला आज कळणार नाहीत. मात्र जो वेळ आपल्याला या स्थितीमुळे -(उर्वरित पान 2 वर)
उपलब्ध झालेला आहे त्याचा सदुपयोग आपण रोजे, नमाज, जकात, नफील इत्यादीच्या मार्गाने करू शकतो. आपला संपर्क अल्लाहशी अधिक जवळचा करू शकतो. ही खूपच चांगली संधी साधून आलेली आहे. म्हणूनच या संदर्भात आपल्यासमोर काही गोष्टी ठेऊ इच्छितो.
    पहिली गोष्ट अशी की, प्रत्येक मुस्लिम व्यक्तीची ही मनोमन इच्छा असते की, रमजानच्या संपूर्ण महिन्यातील प्रत्येक नमाज बाजमात अदा करावी. आपण पाहतो की, एरव्ही वर्षभर रिकाम्या असलेल्या मस्जिदी रमजानमध्ये भरलेल्या असतात. एरव्ही वर्षभर नमाज न अदा करणारे लोकही रमजानमध्ये नित्यनियमाने नमाज अदा करतात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शारीरिक अंतर ठेवण्यासंबंधी शासनाचे जे आदेश आहेत ते रमजानमध्येही लागू होतात म्हणून नमाज आपापल्या घरातच अदा करावी लागेल. घरातही नमाज अदा करताना घरातील सर्व सदस्यांनी जमात बनवून नमाज अदा करावी मात्र त्यातही पुरेसे अंतर राखले जावे. तरावीह संबंधानेही उलेमांनी ती घरात अदा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कोविड-19 चा उपाय हाच आहे की, प्रत्येकाने घरात रहावे. अल्लाह यातूनही काही चांगले घडवून आणील, असा मला विश्‍वास आहे. रमजानमध्ये इफ्तारच्या वेळेस इफ्तारी करण्यासाठी गर्दी करण्याची व इफ्तार झाल्यानंतर रात्री एकत्रित गोळा होऊन गप्पा मारत बसण्याची आपल्यामधील अनेकांना सवय आहे. तरावीहच्या नमाज नंतर सुद्धा गोळा होऊन महेफिली सजविण्याची आपली सवय आहे. तिला सुद्धा लगाम लावणे गरजेचे आहे. संपूर्ण रमजानमधील एक क्षण सुद्धा गफलतीमुळे वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. रमजानमध्ये अनेक लोक रात्री जागून दिवसा झोपत असतात. ही शरियत आणि शरिराच्या दृष्टीने अतिशय चुकीची बाब आहे. आम्हाला दिवस आणि रात्रीचा शेड्युल तयार करावा लागेल व आपला रमजानमधील वेळ हा सकारात्मक आणि प्रोडक्टीव्ह कसा राहील याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
    लॉकडाऊनचा उपयोग करून नवीन-नवीन गोष्टी शिकता येतील. आपल्या कुटुंबियांशी सकारात्मक संवाद वाढविता येईल. अल्लाहच्या कृपेने जमाअते इस्लामीने या लॉकडाऊनच्या काळामध्ये रमजानचा पूर्ण शेड्युल्ड तयार करून स्त्रिया, मुले आणि पुरूष यांना भरगच्च ऑनलाईन कार्यक्रम दिलेला आहे. त्याचा उपयोग करून आपण रमजान सार्थकी लावू शकतो. कुरआन शुद्ध उच्चारणासह वाचणे आणि त्याच्या निर्देशांवर चिंतन करणे हा कुरआनचा हक्क आहे. तो या काळात आपल्या व आपल्या कुटुंबियाकडून अदा केला जाईल, याकडे लक्ष द्यावे. आपल्या ऑनलाईन अ‍ॅक्टीव्हीटीज वाढवून इस्लामचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. रमजानमध्ये जे आपले नातेवाईक गरीब आहेत, शेजारी-पाजारी यांना मदत करण्याचा हा महिना आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या काळात आपण केलेल्या खर्चाचा मोबदला अल्लाह आपल्याला कित्येक पटीने वाढवून देईल, यात शंका नाही. रोजा अल्लाहसाठी आहे, त्याचा मोबदला मी स्वत: आहे, असे फरमाविलेले आहे. यावर आपला ठाम विश्‍वास असावयास हवा. तरच लॉकडाऊनमधील रमजान सार्थक लावल्यासारखे होईल.

- रिजवानुर्रहमान खान,
अध्यक्ष, जेआयएच, महाराष्ट्र

ramzan
निर्विवादपणे यावर्षीचे रमजान सर्वच ईमानधारकांसाठी एक वेगळेपण सोबत घेऊन आलेे आहे. ते वेगळेपण म्हणजे बाहेरील कामाचा दरवर्षी असणारा दबाव यावर्षी नाही. नोकरदार घरी आहेत, व्यापारी घरी आहेत, विद्यार्थी घरी आहेत. एरव्ही फक्त महिलाच घरी असायच्या आज समाजातील प्रत्येक घटक घरी आहे. नुसताच घरी नाही तर त्याच्यावर बाहेरील कामाचा दबाव नसल्यामुळे रमजानचे रोजे ठेवण्यासाठी आणि कुरआनचा खुल्या मनाने अभ्यास करण्यासाठी कधी नव्हे एवढे सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. रमजान म्हणजे कुरआन. कुरआनला समजण्यासाठी या रमजानच्या दबावमुक्त वातावरणाची संधी सोडणारे दुर्दैवी जीव     म्हणावे लागतील. पहिला आशरा (पहिले दहा दिवस) म्हणजे अल्लाहच्या आशिर्वादाचा आशरा. दूसरा आशरा मग्फिरत म्हणजे गुन्ह्यांपासून मुक्तीचा आशरा आणि तिसरा आशरा नरकाग्नीपासून सुटका मिळवून देणारा आशरा असतो. याची सर्वांनाच कल्पना आहे. या तिन्ही आशरांमध्ये सर्व रोजदारांनी कुरआनला समजण्यासाठी आपल्या दिवसाचे काही तास राखून ठेवायला हवेत. रोजा दरम्यानचा विशेषत: रात्रीचा जास्तीत जास्त वेळ नमाज आणि कुरआन समजण्यामध्येच व्यतीत करणे या वर्षी शक्य आहे. रमजान हा साधेपणाचा संदेश घेऊन येतो. यावर्षी जेवढा साधेपणा आहे तेवढा यापूर्वी कधीच नव्हता. या वर्षी कपडे खरेदीची लगबग नाही. इतर आवश्यक गोष्टींच्या खरेदीची लगबग नाही. ईदची नमाज ईदगाहवर होणारच नसल्याने घराबाहेर जाण्याचा प्रश्‍नच नाही. त्यामुळे विनाखर्चिक आणि अत्यंत साधेपणे ईद साजरी करण्याचा एक वेगळाच आनंद मिळेल, यात वाद नाही. एरव्ही रमजानच्या रात्री ज्या महेफली रंगत होत्या यावर्षी ती रंगत नाहीत. आरडा-ओरडा नाही. दुकान सजलेली नाहीत. मिष्टान्न सजवून खवय्यांना आकर्षित करण्याचा प्रश्‍नच नाही. विनाकारण चौकाचौकात उभे राहून बेकारचे जागरण ही नाही. तरावीहनंतर फजरपर्यंत तरूणांना घराबाहेर राहण्याचे कारण नाही. मौजमस्तीचा प्रश्‍न नाही. ना इफ्तार पार्ट्यांची झुंबड आहे, ना खरेदीची लगबग आहे. या सर्वांमध्ये होणारा अनाठायी खर्चही वाचणार आहे. जरी या सर्व गोष्टी नसल्या तरी एक गोष्ट मात्र आहे, ती म्हणजे भरपूर वेळ आहे. आणि तनावमुक्त मनाने कुरआनला शांतपणे समजून घेण्याची अविस्मरणीय अशी संधी अल्लाहने या लॉकडाऊनच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे.
    हा रिकामा वेळ कसा घालवावा असा यक्ष प्रश्‍न अनेकांना पडलेला आहे. परंतु हा प्रश्‍न मुस्लिमांना पडण्याचे कारणच नाही. एरव्ही कुरआनला समजण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे ज्यांना वाटत होते, त्यांच्यासाठी ही वेळ सोनेरी संधी आहे. लक्षात ठेवा बंधू भगिनीनों! जोपर्यंत मुस्लिमांमधील बहुसंख्य लोक कुरआनचा संदेश गंभीरपणे आत्मसात करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या वर्तणुकीमध्ये सकारात्मक बदल घडणार नाहीत. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, कोरोना संपल्यानंतरच्या जगामध्ये मुस्लिमांना सकारात्मक भूमिका वठविण्याची तयारी करण्याची या रमजानमध्ये आपल्याला सुवर्णसंधी चालून आलेली आहे.
    वेळ घालविता येत नसल्यामुळे कित्येक लोकांमध्ये मानसिक आजार उत्पन्न होत आहेत. नैराश्य वाढत आहे. त्यातून आत्महत्यांचा दर वाढत चाललेला आहे. रिकामे डोके सैतानाचे घर असते. म्हणून या डोक्यामध्ये कुरआनचा संदेश रूजविण्याची या लॉकडाऊनच्या काळातील रमजान ही सुवर्ण संधी आहे, असे पुन्हा-पुन्हा नमूद करूनही माझे समाधान होत नाहीये. यापुढचे जग स्वच्छ, सुंदर आणि साधे असावे, अशी अनेकांची इच्छा राहणार आहे. त्यांच्यासमोर स्वच्छ, सुंदर आणि साध्या जीवनाचे रोल मॉडेल म्हणून उभे राहण्यासाठी आपल्याला आंतरबाह्य, स्वच्छ, सुंदर आणि साधेपणाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून पुढे यावे लागेल. हे सद्गुण आपल्यात निर्माण करण्यासाठी रमजान जणूकाय लॉकडाऊनमध्ये आपल्याला मदतीला धाऊन आलेला आहे. या कालावधीमध्ये फालतू टीव्ही सिरीयल, अनैतिकतेकडे झुकणारे चित्रपट आणि मनाला मृतवत करणारे बेकारचे लाफ्टर शोज तसेच विनाकारण रक्तदाब वाढविणार्‍या टीव्ही चर्चासत्रांपासून आवर्जून दूर राहून आपले मन आणि बुद्धी कुरआनवर केंद्रित करणे, कुरआनचा संदेश आत्मसात करणे आणि तो इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज राहणे याचे एक प्रकारचे स्वयंप्रशिक्षण या रमजानमध्ये करवून घेण्याची ही संधी आहे. माणसाची प्रत्येक कृती त्याच्या अंतर्गत उर्मींचे (निय्यतचे) प्रकटन असते. म्हणून नियत कशी साफ ठेवावी, इतरांबरोबर सभ्यतेने कसे वागावे, माणुसकी कशी जपावी, लोकांच्या मदतीला कसे धावून जावे याची तयारी करण्याचा हा महीना आहे. बंधू-भगिनीनों पहा ! तबलिगी जमाअतच्या बंधू भगिनींची नियत साफ होती म्हणून ज्या मीडियाने त्यांना कोरोना जिहादी म्हणून हिनविले होते तेच जेव्हा आपला प्लाझ्मा देऊन लोकांचे प्राण वाचवू लागले तर त्यांना हाच मीडिया कोरोना वॉरियर म्हणून सलाम करत आहे. एका महिन्याच्या आत झालेला हा बदल मोलाचा आहे, एवढेच नसून विचार करणार्‍यांसाठी हा एक ईश्‍वरीय चमत्कारच आहे. यातून नियत कशी साफ ठेवावी, याचाही बोध मिळतो. कोणी निंदो, कोणी वंदो आपण मानवतेच्या सेवेसाठी सातत्याने प्रयत्नरथ राहण्याचा गुण या तबलिगी बंधूंपासून शिकण्यासारखा आहे आणि या अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठी आपली इबादत, आपली बंदगी आणि कुरआनला समजण्याची आपली तयारी हीच आयुधे आहेत आणि याच आयुधांच्या बळावर कोरोनामुक्त जगामध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय वाईट प्रवृत्तींशी लढा द्यावयाचा आहे. म्हणून पुन्हा तीच विनंती करून थांबते की, रमजाननिमित्त चालून आलेल्या संधीचा कुरआनची शिकवण आत्मसात करण्यासाठी उपयोग करून घ्या, बाकी मानवतेच्या सेवेचे काम आपल्या हातून कुरआन स्वत:च घेईल. शेवटी अल्लाह सुबहानहूतालाकडे दुआ करते की, आमच्या प्रिय भारत देशाला लवकर कोरोनामुक्त कर आणि जगामध्ये पुन्हा पुनर्लौकिक प्राप्त करून दे. आमीन.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget