Halloween Costume ideas 2015
Latest Post

–सुनीलकुमार सरनाईक
शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम  सैनिकांनी शिवरायांना प्रामाणिकपणे मदत केली. त्यामध्ये स्वकीय मुस्लिम होते. तसेच शत्रूकडील मुास्लिम देखील होते. त्यांनी शिवरायांना युद्धात मदत केली. सुख-दु:खात मदत केली. शिवरायांचे नेतृत्व त्यांनी आनंदाने आणि निरपेक्ष भावनेने मानले. `शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरुद्ध होते.' `ते हिंदू धर्मरक्षक होते.' `हिंदू पदपातशहा होते.', `गोब्राह्मण प्रतिपालक होते'' अशी प्रतिमा रंगवून छत्रपती शिवरायांना एका ठराविक चौकटीत बसविण्याचा आजवर अनेकांनी प्रयत्न केला आहे. पण शिवरायांच्या पदरी असणारे निष्ठावंत व नेक दिलाचे इमानदार मुस्लिममावळे पाहिल्यावर तसेच तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केल्यावर उपरोक्त प्रतिमेचे खंडन होते.
१) सिद्दी अंबर वहाब : हे हवालदार असून १६४७ साली कोंडाणा किल्ला जकिंण्यास सिद्दी अंबरने राजास मदत केली.
२) नूरखान बेग : हे शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनोबत होते. त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी शत्रूबरोबर प्राणपणानेला दिला.
३) सिद्दी इब्राहीम : हे शिवरायांचे अंगरक्षक होते. अंगरक्षक हे सर्वात महत्त्वाचे पद आहे. अशी महत्त्वाची जबाबदारी ज्या अंगरक्षकांकडे होती त्यामध्ये सिद्दी इब्राहीम एक होते. अफजल खान भेटीच्या प्रसंगी सिद्धी इब्राहीम यांनी राजांचे अंगरक्षण केले, तर कृष्णाजी कुलकर्णींने शिवरायांच्या कपाळावर तलवारीचा वार केला. १६७५ च्या एप्रिलात सिद्दी इब्राहीम यांनी सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला जकिंला. तेव्हा राजांनी सिद्धी इब्राहीमचा सत्कार केला व त्यांची फोंड्याच्या किल्लेदारपदी नेमणूक केली.
४) सिद्दी हिलाल : हे शिवरायांच्या घोडदलात सेनापती होते. शिवाजीराजे पन्हाळा येथे अडकले असताना राजांच्या सुटकेसाठी सिद्धी हिलालने सिद्दी जौहर बरोबर लढा दिला. उमराणीजवळ प्रतापरावांच्या सोबत बेहलोलखानाशी लढा दिला.
५) सिद्दी वाहवाह : हे सिद्दी हिलालचे पुत्र असून वडिलांच्यासोबत ते शिवरायांच्या सैन्यात होते. सिद्दी जौहरशी लढताना ते जखमी झाले, त्यांना कैद करण्यात आले. शिवरायांची सुटका व्हावी, यासाठी या युवकाने प्राण गमावले, पण सिद्दी जौहरला शरण गेला नाही.
६) रुस्तुमेजमान : रुस्तुमेजमान हे शहाजीराजांचे जिवलग मित्र रनदुल्लाखान यांचे पुत्र होते. तसेच ते शिवाजीराजांचे आदिलशाही दरबारातील जिवलग मित्र होते. अफ जलखान ठार मारण्याच्या इराद्याने निघालेला आहे. ही खात्रीलायक बातमी राजांना प्रथम रुस्तुमेजमानने सांगितली. रुस्तुमेजमानने राजांना हुबळीच्या ल्यात मदत केली. तसेच सिद्दी मसऊदच्या संकटाची बातमी राजांना प्रथम रुस्तुमे जमाननेच सांगितली. रुस्तुमे जमानने राजांना प्रामाणिक मदत केली व स्वराज्य उभारणीस हातभार लावला.
७) मदारी मेहत्तर : मदारी मेहत्तर हे राजांचे विश्वासू मित्र होते. १७ ऑगस्ट १६६३ रोजी आग्राच्या सुटकेप्रसंगी मदारीने प्राण धोक्यात घालून राजांना मदत केली. त्यात मदारी पकडले गेले. औरंगजेबाच्या सैनिकांनी मदारीला पाट फुटेपर्यंत मारले पण मदारीने राजे कोठे गेले सांगितले नाही. अशा निष्ठावान मित्राला राजांनी स्वराज्यातील उच्चपद घेण्याचा आग्रह केला. तेव्हा मदारीने विनम्रपणे नकार दिला आणि सिंहासनावरची चादर बदलण्याचे काम घेतले.
८) काझी हैदर : हे शिवरायांचे १६७० ते ७३ पर्यंत वकील होते. त्यानंतर राजांचे खाजगी सचिव झाले. फारसी पत्रलेखनाची जबाबदारी राजांनी त्यांचेवर सोपविली. वकील, सचिव, पत्रलेखक इत्यादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे काझी हैदर राजांचे किती विश्वासू मित्र असतील, याचा वाचकांनीच विचार करावा.
९) शखा खान : हे शिवरायांचे सरदार होते. मोगलांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी शखाखानने प्राणाची बाजी मारली.
१०) दौलतखान : हे शिवरायांच्या आरमारदलाचे प्रमुख होते. यांनी १६८० साली उंदेरीवर हल्ला केला. पराक्रम गाजविला. १६७४ साली सिद्धी संबुलचा पराभव केला.
११) दर्यासारंग : हे शिवरायांच्या आरमाराचे सुभेदार होते. यांनी खांदेरीवर विजय मिळविला. बसनूर जकिंण्यास मदत केली.
१२) हुसेनखा मियाना : हे शिवरायांच्या लष्करातील अधिकारी होते. यांनी मसौदखानाच्या अदोनी प्रांतावर हल्ला केला व १६७१ साली बिळगी, जमिंखड आणि धारवाड जिंकले.
१३) इब्राहीम खान : हे आरमारातील अधिकारी होते. दर्यासारंग यांच्याबरोबर शत्रूशी लढा दिला.
१४) सिद्धी मिस्त्री : हेदेखील शिवरायांच्या आरमारातील अधिकारी होते.
१५) सुलतान खान : हे आरमारात अधिकारी होते. तर १६८१ साली सुभेदार झाले.
१६) दाऊत खान : हेदेखील आरमारात सुलतान खानानंतर सुभेदार झाले. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळविला.
१७) इब्राहीम खान : हे राजांचे तोफखानाप्रमुख होते. अनेक लायात तोफांचा वापर करुन शत्रूला पराभूत करण्यात इब्राहीम खानाचा मोठा वाटा आहे.
१८) चित्रकार मीर महंमद : हे शिवकालीन चित्रकार असून शिवाजीराजांचे जगातील पहिले आणि प्रत्यक्ष चित्र मीर महंमद यांनीच रेखाटले. मीर महंमद यांनी शिवाजीराजांचे चित्र नसते रेखाटले तर आज आपणाला राजांचे खरे चित्र उपलब्ध झाले नसते.
१९) मौनीबाबा आणि बाबा याकूत : पाटगावचे मौनीबाबा आणि केळशीचे बाबा याकूत हे मुस्लिमसंत शिवरायांचे हितिंचतक होते. त्यांच्या भेटीसाठी शिवाजीराजे पाटगावला आणि केळशीला अनेकवेळा गेले. त्यांनी शिवरायांना मोलाचे मार्गदर्शन केले होते.
    या सर्वांहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरुन मुस्लिमधर्मीय शिपायांबद्दलचे शिवाजी महाराजांचे  धोरणच स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या `शककर्ता शिवाजी' या पुस्तकातील हा उतारा पाहा,
    ``....सन १६४८ च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले पाचसातशे पठाण शिवाजींकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला, तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला,
    ``तुमचा लौकिक ऐकू न हे लोक आले आहेत त्यास विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूचाच संग्रह करु, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरिली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने अठरा जाती, चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे त्यांचा संग्रह करुन ठेवावे.'' १६४८ मध्ये अजून शिवाजीचं संपूर्ण राज्य स्थापन व्हावयाचं होतं. स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील स्पष्ट आधारावरुन व्यक्त होतं.
    ग्रँड डफ नेसुद्धा त्यांच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात पृष्ठ १२९ वर गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करुन म्हटले आहे की....
    ''शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिमधर्मीयांचासुद्धा भरणा होता. हे यावरुन स्पष्ट व्हावे. शिवाजी हा मुस्लिमधर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असता तर हे मुस्लिमशिवाजीच्या पदरी राहिले नसते. शिवाजी मुस्लिमराज्यकत्र्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता. म्हणून मुास्लिमसुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले होते.’’
    धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता. राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता. राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती. राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठा मुख्य होती. ज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिमसरदार व मावळे होते, तसेच मुस्लिमराजवटीत शहेनशहांच्या पदरी अगणित मराठे, हिंदू सरदार व सैन्य होते.
    प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे किंवा धर्मासाठी लाया होत नव्हत्या, राज्य मिळविणे व ते टिकविणे हेच मुख्य कारण होते, अर्थात त्याकाळी `धर्मबुडवे', `धर्मकेष्टे' किंवा `मुास्लिमधार्जिणे' असे कुणी म्हणत नव्हते, धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला फारच महत्त्व व मान्यता होती.
(लेखक भारत सरकारतर्फे  स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून  लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)

-शाहजहान मगदुम
९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच बडोदे येथे पार पडले. विचारांचे आणि मनामनाचे मिलन म्हणजेच साहित्य होय. कसदार साहित्यिक जेव्हा आपल्या वक्तव्याद्वारे किंवा लेखणीद्वारे व्यवस्थेवर शब्दप्रहार करतो तेव्हा निश्चितच राजकारणी व सत्ताधारी मंडळी त्याला काळ्या यादीत टाकून देतात किंवा त्याला एखाद्या मंडळाचे अध्यक्षपद देऊन त्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात. अशा या गळचेपीला न घाबरता सरकारच्या उत्तरदायित्वाची परखडपणे जाणीव करून देणारे विद्यमान संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख निश्चिच कौतुकास पात्र ठरतात. शोषण करणारी व्यवस्था बदलली पाहिजे, असे सांगण्याचा अधिकार लेखकाला भारतीय संविधानाने दिलेला आहे. देशाचा पोशिंदा बळीराजा शेतकऱ्याच्या वाढत्या आत्महत्या ही आपल्या बाजारकेंद्रित विकासाचे कुरूप फळ आहे. एकेक शेतकऱ्याचे जगणे आणि एकेक शेतकरी आत्महत्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे की, तुमची धोरणे व विकासनीती आमच्यासाठी कामाची नाही. आपल्या भारतीय संविधानानं अस्पृश्यतेचे उच्चाटन केले आहे पण ७० वर्षे झाली तरी तथाकथित वरिष्ठ जातिजमातीची मानसिकता फारशी बदललेली नाहीय. दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१८ च्या प्रथम दिवशी कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे जमा झालेल्या लाखो दलित बांधवांच्या अभिवादन समारंभाच्या निमित्ताने झालेली दंगल पाहता उच्चवर्णीय हिंदू समाजास संविधानाच्या शस्त्राने व शिक्षणामुळे आलेल्या आत्मभानातून जागी झालेली दलित अस्मिता सहन होत नाही. ही का केवळ त्या समाजाची शोकांतिका आहे? नव्हे, ती सर्व भारताची शोकांतिका आहे. जे भारतीय संविधानानं त्यांना दिलेले अधिकार मागत आहेत. त्यासाठी संघर्ष व्हावा, हे भारतीय समाजाला एकविसाव्या शतकात शोभत नाही. त्यामुळे सरकार, राजकीय पक्ष व व्यवस्था आणि आपण साऱ्या सुशिक्षित विचारी माणसांनी यावर बोललं पाहिजे. सामूहिक आवाज बुलंद केला पाहिजे. भारताच्या लोकसंख्येच्या १८ टक्के असणऱ्या मुस्लिम समाजाच्या प्रश्नाकडेही त्यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले. आपण मराठवाड्याचे असल्यामुळे हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या ‘मिलीजुली’ संस्कृतीचा पुरस्कर्ता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. भारत ही आपली भूमी मानून इथे राहणाऱ्या मुस्लिमांकडे आपल्या हिंदू समाजातील काही तथाकथित कट्टर लोक शंका व विद्वेषाने आजही का पाहत आहेत? संविधानाने त्यांनाही समान नागरिकत्व व सर्व मूलभूत अधिकार दिले आहेत, पुन्हा त्यांना आपली भाषा व संस्कृती व धर्म जपण्याचे पण अधिकार दिले आहेत. पण एका बाजूला त्यांचा मतासाठी अनुनय करणारे पक्ष तर दुसरीकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे - त्यांना प्रतिनिधित्व नाकारणारे पक्ष, या दोन्हींनी मुस्लिम समाजावर फार मोठा अन्याय केला आहे. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यांना असुरक्षित केले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या ‘आयडेंटिटी’चा प्रश्न जीवन मरणाचा बनला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य व सर्वधर्मसद्भावाचे वागण्या-बोलण्यातून आपल्यापुरते तरी आचरण करण्याचे आवाहन करताना ते म्हणतात, भारतीयांनी आपल्याच मुस्लिम बांधवांना आरोपीच्या पजिंऱ्यात उभे न करता ते याच भूमीत आपल्यासारखेच जन्मलेले व मरणारे भारतीय आहेत, असे मनापासून मानायला पाहिजे. देशातील असहिष्णुतेविरोधात आवाज उठवला आणि ‘राजा तू चुकत आहेस! तू सुधारलं पाहिजे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या भूमीवरच सरकारचे कान टोचायचे काम केले. देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाचा निषेध म्हणून काही काळापूर्वी लेखकांनी पुरस्कार परत करण्याचा मार्ग स्वीकारला होता. त्यामागील त्यांची भूमिका शासनानं समजून घ्यायला हवी होती. आधुनिक-सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असतं, असायला हवे. भारतात ही सुसंस्कृतता आज दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. खरे तर देशमुख फक्त साहित्यिक नाहीत तर माजी सनदी अधिकारी आहेत. म्हणूनच त्यांनी व्यक्त केलेले हे विचार जास्त महत्वाचे आहेत. एवढ्या थेटपणे सरकारला समज देण्याचे काम यापूर्वी पु. ल. देशपांडे (१९७४, इचलकरंजी संमेलन), दुर्गा भागवत (१९७५ चे कऱ्हाड संमेलन), वसंत बापट (१९९९ चे मुंबई संमेलन) आणि डॉ. श्रीपाल सबनीस (२०१६ पुणे संमेलन) यांनीच केले होते. त्यामुळे हे चौघेही सरकारच्या काळ्या यादीत गेले होते. देशमुख यांनी तो धोका पत्करून आपले मत मांडले. अर्थात, सरकारनेही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्षांनी मांडलेले विचार गांभीर्याने घ्यायला हवेत. साहित्यिकांनी आता भूमिका घ्यायला हवी आणि सरकारनेही या भूमिकेचा सन्मान करायला हवा. ङ्खचुकणाऱ्या राजा’ला त्याच्या चुकांची जाणीव करून देणारे साहित्यिक जेवढे जास्त वाढतील तेवढ्याच राजाच्या चुकांचे प्रमाण कमी होत जाईल, हाच संदेश देशमुखांनी आपल्या भाषणातून दिला आहे.

-निरंजन टकले
न्या. लोयांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये हृदय घाताने मृत्यू असे कारण दिलेले आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट जो जास्त अचुक असायला पाहिजे त्यात अचानक मृत्यू (सडन डेथ) असे म्हटलेले आहे. म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट पूर्णपणे असंबद्ध आहे, जो की नेमका असायला पाहिजे होता. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये बॉडीचे तीन व्हिसेरा सँपल काढले असे नमूद आहे. तर हिस्टोपॅथिक रिपोर्टमध्ये तब्बल 32 व्हिसेरा सँपल तपासल्याचे नमूद आहे, हे सगळं संशयास्पद होतं. अशा विशेष परिस्थितीमध्ये मृत्यू झालेल्यांची पोस्टमार्टमची व्हिडीओग्राफी करण्याची महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे. असे असतांना सीबीआय स्पेशल कोर्टाचे न्यायाधीश असणाऱ्या लोयांच्या पोस्टमार्टमची व्हिडीओग्राफी करण्यात आली नाही. वेळेमधील फरक, रायगर मॉर्टिसमधील फरक आणि सँपलमधील फरक कसा आला? याबाबतीत कोणीच काही बोलत नाही. माझ्या स्टोरीमध्ये मी हे सर्व प्रश्‍न उपस्थित केले.
    स्टोरीमध्ये जे दोन न्यायाधीश मोडक आणि कुलकर्णी त्यांना मुंबईहून घेवून गेले होते व त्यांच्या सोबत नागपूरच्या रविभवन विश्रामगृहामध्ये थांबले होते. त्यांनी सांगितलेली माहिती अशी की, रात्री 12.30 वाजता त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. माझी स्टोरी प्रकाशित झाल्यानंतर सात दिवसांनी दोन न्यायाधीश इंडियन एक्सप्रेस व एनडीटीव्ही इंग्लिशशी बोलले. की आम्ही गाडी घेऊन त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. स्टोरी 20 तारखेला आली होती. मग हा खुलासा 21 ला का नाही केला? हा 27 ला का बरं? दुसरी गोष्ट मला मिळालेल्या माहितीप्रमाणे रिक्षाने नेलं. तुमच्या सांगण्यानुसार कारने नेलं. रविभवन हे व्हीव्हीआयपी विश्रामगृह आहे. जिथे फक्त अति महत्वाचे लोक राहतात. जिथे 7 डिसेंबरला महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार होतं. अशा परिस्थितीत ही घटना 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरच्या रात्री घडते. मुंबईतलं अख्ख मंत्रालय महिना पंधरा दिवस अगोदर तिथे शिफ्ट केलेल असतं. सगळे अधिकारी तिथे राहत असतात. तिथे 10-15 लाल दिव्यांच्या गाड्या कायमस्वरूपी असतात. तुम्ही गाडीने नेलं म्हणता माझी स्टोरी रिक्षाने नेलं म्हणते. मग सीसीटीव्ही फुटेज दाखवा ना. त्यात जे काय असेल ते दिसेल. मग रिक्षा असेल की गाडी जे असेल ते दिसेल. याबद्दल कोणीच बोलत नाही. या स्टोरीमधील महत्वाचे लोक मग ते न्या. मोडक असो की न्या. कुलकर्णी, न्या. मोहित शहा असो बाहेती असो कोणीच काही बोलत नाही आणि ज्यांचा स्टोरीमध्ये कुठेच उल्लेख नाही तेच सगळेजण बोलतात.
    इसीजी रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसने छापला. त्यात हार्ट अटॅक स्पष्टपणे दिसतोय. असे जर असेल तर मृत्यूच कारण स्पष्ट आहे. मग पोस्ट मार्टम का केलं? कपड्यावर पोस्ट मार्टम करताना रक्त लागलं असावं अस उत्तर दिले गेले. वास्तविक पाहता पोस्ट मार्टम पूर्वी कपडे काढून सील केले जातात. पोस्ट मार्टम झाल्यावर बॉडी बॅगमध्ये ठेवली जाते. बॉडीला पुन्हा कपडे घालत नाहीत. मग कपड्याला रक्त लागलं कसं? टाक्यामधून निघालेल रक्त बॉडी बॅगला लागेल. सील केलेल्या कपड्यांना कसे लागेल. खोटं बोलण्याच्या नादात हे लोग अनेक प्रश्‍न नव्यान उपस्थित करण्याची संधी देत आहेत.
    12 जानेवारीला पुढे येवून सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी जे प्रश्‍न उपस्थित केले त्यात न्या. लोयांच्या मृत्यू संबंधीचाही प्रश्‍न होता. अचानक देशभर गदारोळ सुरू झाला की, या न्यायाधीशांनी न्यायपालिकेची प्रतिष्ठा धोक्यात आणली. न्याय पालिकेला कलंक लावला. त्यांनी हे बोलण्याच्या दीड महिना अगोदर नागपूरमधील दोन न्यायाधीश इंडियन एक्सप्रेसशी बोलले ते स्वागतार्ह होते? कदाचित ते सोयीचं होतं आणि त्यानंतर दीड महिन्यांनी सुप्रिम कोर्टाचे चार न्यायाधिश बोलतात. तर लगेच न्यायापालिकेला कलंक! मुंबईमध्ये असे विशेष वकील बघितलेले आहेत की जे आमुक-आमुक आरोपीला बिऱ्याणी खाऊ घातले म्हणून सांगतात. दोन वर्षानंतर मी कसं खोटं बोललो होतो म्हणून सांगतात आणि मग त्यात न्यायपालिकेला काय होत नाही. ते हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईच्या खटल्यातून पत्र देऊन माघार घेतात आणि बलात्काराच्या केसेसमध्ये हिरीरीने सहभाग घेतात. माणसाला फाशी झाली की अबतक 50 म्हणतात. कोणाचाही मृत्यू हा विजय कसा काय वाटू शकतो? आपण अशा थराला येवून पोहोचलेलो आहोत की, आपण एखाद्याच्या मृत्यूचा आदेश साजरा करतो! वर्तमान पत्रामध्ये बातमी आली की आमुक- आमुक माणसांना फाशीची शिक्षा सुनावली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. समाज म्हणून, माणूस म्हणून इथक्या खालच्या थराला येवून पोहोचलेलो आहोत, की आपणाला एखाद्याचा मृत्यू साजरा करावासा वाटतो. अशा मृत्युमधून होणाऱ्या एकाही प्रश्‍नाच उत्तर मिळत नसतं. 26 जानेवारीला मी एक फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यात लिहिलं, दांडे हॉस्पिटलमधून त्यांना ज्या मेडेट्रीना हॉस्पिटलमध्ये नेलं त्यातही मृत अवस्थेत आणण्यात आले, असे नमूद आहे. मात्र मेडेट्रीना हॉस्पिटलच्या बिलामध्ये लिहिलेलं आहे की, डॉ. पंकज हारकुट यांनी ब्रिजगोपाल लोया यांच्यावर न्युरो सर्जरी केली. म्हणजे हार्टचा पेशंट अगोदर दांडे हॉस्पिटलला नेलं जे की आर्थोपेडिक हॉस्पिटल होतं आणि कार्डियाक हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं काय केल तर न्युरोसर्जरी. ती का केली? डोक्याला काय जखम होती काय? कोणी मारलं होत काय? म्हणून न्युरोसर्जरी केली. मात्र या जखमीची नोंद इन्क्वेस्ट पंचनाम्यापासून ते फॉरेन्सिक रिपोर्ट कशातच कशी नाही? मग ह्या जखमेचं रक्त होतं का शर्टवर? म्हणजे परवापर्यंत प्रश्‍नच उभे राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा कोर्टाने महाराष्ट्र सरकारला सांगितले की या प्रकरणातील सर्व मेडिकल रेकॉर्ड सादर करा. महाराष्ट्र सरकारने लोयांची पत्नी, मुलगा, बहिण आणि दोन न्यायाधीश यांचे जबाब आणि मेडिकल रिपोर्ट असा दस्तावेज सादर केला. चौकशी करा असे सांगितलेलेच नव्हते, जबाब कोर्टाने मागितलेलेच नव्हते. या केसमध्ये महाराष्ट्र सरकार पक्षकार सुद्धा नाही. मग मेडिकल रिपोर्ट सोबत कुटुंबियांचे जबाब पाठविण्याची आवश्यकता नव्हती. वकील देण्याची आवश्यकता नव्हती पण महाराष्ट्र शासनाने वकील सुद्धा दिलाय. अनुज लोयांनी मुख्य न्यायाधिशांना पत्र लिहून सांगितलं की, सुरूवातीला अने लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आम्हाला संशय आला होता पण आता संशय नाही. पण प्रश्‍न उपस्थित होतात. कारण माझी स्टोरी प्रसिद्ध झाली 20 नोव्हेंबर 2017 ला. 17 नोव्हेंबरला लोयांच्या बहिणीचा आणि वडिलांचा इंटरव्युव्ह औरंगाबादमध्ये त्यांच्या राहत्या घरी रेकॉर्ड केला. त्याच इंग्रजी भाषांतर करून प्रसिद्ध होईपर्यंत 20 तारीख उजाडली व जगाला कळाले. ही स्टोरी 10 ते 12 कोटी लोकांनी वाचली. 20 नोव्हेंबरपर्यंत कुटुंबियांच्या मनामध्ये शंका होती. 29 नोव्हेंबर 2017 ला जेव्हा अनुजनी मुख्य न्यायाधिशांना पत्र दिलं तेव्हा संशय संपलेला होता. संशय संपला असेल तर उत्तम. 20 ते 29 या 9 दिवसांमध्ये तुमच्या मनातला संशय कोणी दूर केला? किती जणांनी दूर केला? कसा दूर केला? असं काय दाखवलं की ज्यामुळे तुमचा संशय दूर झाला? हे पण कळायला हवं. कारण सगळ्या शंका उपस्थित करतांना तुम्ही माझे खांदे वापरले. आता तो कसा दूर झाला हे तुम्ही सांगायला पाहिजे ना. खुलाश्यामुळे सुद्धा नवीन प्रश्‍न उपस्थित झालेले आहेत.  एक न्यायाधिश आहेत त्यांचे नाव राठी असे आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून दिले आहे की, त्या दिवशी मी दांडे हॉस्पिटलमध्ये होतो. हॉस्पिटलचे इसीजी मशीन बंद पडलेले होते. त्यांनी दुरूस्त करण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र शेवटपर्यंत ते बंदच होते. आता पुन्हा प्रश्‍न इसीजी मशीन जर बंद पडलेलं होतं तर छापून आणलेला ईसीजी रिपोर्ट कोणी दिला? बंद पडलेल्या मशीनमधून इसीजी निघाला का? आणि तो रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसपर्यंत कोणी पोहोचविला? इसीजी जर निघालाच नाही तर असं का म्हणता की मृत्यू हृदय घाताने झाला आणि तिकडे न्युरोसर्जरी. ’आग सोमेश्‍वरी बंब रामेश्‍वरी’ असा हा प्रकार. आजार हार्टचा आणि उपचार मेंदूवर! म्हणून हे प्रश्‍न उपस्थित होतात. म्हणून या प्रश्‍नांची उत्तरे हवीत.
    नातेवाईकांनी हे सांगितलं की निरंजन टकले नावाचा एक पत्रकार आला होता आणि आम्ही त्याच्याशी बोललो पण त्याने हे सगळं रेकॉर्ड करून घेतलं हे आम्हाला माहितच नाही. मी तुमच्या समोर बसलेलो आहे, स्टँडवरती कॅमेरा लावलेला आहे, तो ऑन केल्यानंतर अगोदर मी तुमची परवानगी घेतली, तुम्ही हो रेकॉर्ड करा, असं म्हटल्यानंतर हा इंटरव्यूव्ह मी रेकॉर्ड केला. मी उघड-उघड कॅमेरा लावून हा इंटरव्यूव्ह रेकॉर्ड करतो आहे, हे दुसऱ्या कॅमेऱ्यावरसुद्धा रेकॉर्ड केलं. मनात आलं आणि हौसेने मी पत्रकार झालो असा प्रकार नाही. मी सर्वतोपरी काळजी घेतली. मला माहित होत या स्टोरीनंतर बोट कुठे दाखविल जाणार. सर्व प्रकारची दक्षता घेवून हा इंटरव्यूव्ह रेकॉर्ड केला. असे असतांना नुसत्या शंका दूर झाल्या असं म्हणणं कितपत योग्य आहे? या प्रश्‍नांची उत्तर द्याना.
    परवा पुण्यामध्ये एका कार्यक्रमात परिचय करून देतांना माझा उल्लेख निर्भय पत्रकार असा करण्यात आला. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की असा माझा परिचय का करून देण्यात आला? म्हणजे मी भयग्रस्त असायला हवं का? मी निर्भयपण नाही आणि भयग्रस्तपण नाही. मी नॉर्मल आहे. ज्यांच्याकडे या स्टोरीमुळे अंगुलीनिर्देश होतो त्यांच्याबद्दल त्यांचे समर्थक म्हणतात, ते फार न्यायप्रीय आहेत. त्यांचा घटनेवरती, कायद्यावरती, अहिंसेवरती भरपूर विश्‍वास आहे. ते जर इतके चांगले आहेत तर मी भय बाळगायचं काय कारण आहे? मी भ्यायला हवं असं वाटत असेल तर कारण मला सांगाना. का पत्रकारांनी घाबरायला हवं? का विरोधकांनी घाबरायला हवं? का न्यायाधिशांनी घाबरायला हवं? का पक्षातील सहकाऱ्यांनी घाबरायला हवं? सुषमा स्वराज अशा विदेशमंत्री की त्या भुटान आणि नेपाळ सोडून कुठल्याच देशात गेल्या नाहीत. हे दोन्ही देश असे आहेत जिथे जायला पासपोर्ट लागत नाही. त्या का गप्प आहेत? पूर्वी त्या खूप बोलायच्या. पक्षातील बाकीचे लोक का गप्प आहेत? कोणी विरोध केला की तो देशद्रोही. असे एकंदर देशाचे वातावरण आहे.
    (सोलापूर येथील रंगभवन मध्ये 30 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 7 वाजता  ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निरंजन टकले यांच भाषण झालं. ते भाषण आणि मुलाखत आम्ही अंक नं. 8 मध्ये प्रकाशित केली. त्याचा हा शेवटचा दूसरा भाग.)

सीमा देशपांडे
7798981535
लील बोधकथा ही एका विचारवंताने लिहिलेली आहे त्यांचे नाव डॉ. विन डायर आहे. ही कथा अतिशय मनोरंजक व आपल्या अप्रत्यक्ष व सर्जनशील दृष्टिकोणातील विचारांना  उत्तेजीत करणारी आहे व आपल्या नैसर्गिक अंतरंग भावनांचा बोध करुन देणारी आहे. ही कथा प्रत्येकासाठी एक आश्‍चर्यकारक बोध आहे. खासकरुन त्या लोकांसाठी जे एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवतात आणि त्या लोकांसाठी पण जे एका ईश्‍वरावर विश्‍वास ठेवत नाहीत. डॉ. विन डायर ह्यांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे जे मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाला सादर करते.
उदाहरण- एका मातेच्या पोटात दोन जुळे मुले असतात
पहिल्याने विचारले: काय तुझा प्रसवनंतरच्या जीवनावर विश्‍वास आहे का?
दुसरा म्हणाला: असे का विचारतोस? मला वाटते,प्रसवनंतर नक्कीच काहीतरी असावे. कदाचीत आपला जन्म एक परिक्षा देण्यासाठी तयार झाला असावा व त्यासाठी आपण इथे आलो असू.
पहिला म्हणाला:  तुझे बोल तर मला अगदी मुर्खपणाचे व व्हाय्यात वाटतात.
दुसरा म्हणाला: मला माहित नाही परंतु माझे अंतर्मन मला वारंवार हिच जाणिव करुन देत आहे कि, आपल्या पुढील जन्मात इथल्यापेक्षा जास्त प्रकाश असेल. कदाचित आपण आपल्या हाताने जेवू, स्वत:च्या पायावर चालू. याविषयी आपल्याला इथे काही संवेदना असतील ज्या आपल्याला आत्ता कळत नसाव्यात किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करत असू.
पहिला म्हणाला: तुझे हे विचार अगदी अर्थहीन आहेत. पायावर चालणे अशक्य आहे आणि मुखाने खाणे तर अगदी हास्यास्पद आहे! एकिकडे पाहिल्यास गर्भाशयात आपणास नाभीद्वारे पोषण पुरविले जाते आणि दुसरीकडून पाहिल्यास नाभीची लांबी लहान असते. म्हणजेच डिलिवरी नंतरचे आयुष्य तार्किकद्रष्ट्या वगळलेले बरे आणि ते अशक्यच आहे.
दुसरा फार आग्रहाने म्हणाला: मला वाटते, काहितरी जरुर आहे. पुढचे आयुष्य आपण जे अनुभवतोय त्यापेक्षा खूप-खूप वेगऴे असावे आणि त्यावेळेस आपल्याला आईच्या नाभीची आवश्यकता पण नसावी.
पहिला हसत म्हणाला : मुर्खपणा! डिलिवरीनंतर जर पुन्हा आयुष्य असेल तर आजपर्यंत जे मृत्यु पावले ते पुन्हा का या धरतीवर परत नाही आले? डिलिवरी नंतरचे आयुष्य हे आपले अंतिम जीवन आहे. उलट, डिलिवरी नंतर काही नसतं, फक्त काळोख व शांतता असते आणि त्यानंतर जीवन शुन्य होवुन जाते. अशा रितीने आपण कुठेही जात नाही.
दुसरा म्हणाला: - मला माहित नाही पण निश्‍चितपणे ईश्‍वर आपली व आपल्या आईची काळजी घेईल आणि अखेरिस आपल्याला त्याच्याकडेच परत जायचे आहे.
पहिला म्हणाला: आई? काय तू वास्तविकपणे विश्‍वास ठेवतोस कि तू पुन्हा आईला भेटशील? तो हसत म्हणाला जर आईचे अस्तित्व असेन तर ती कुठे आहे ? त्याचप्रमाणे ईश्‍वर कुठे आहे? जेणेकरुन तो आपणा सर्वांची पुन्हा भेट घालेन.
दुसरा म्हणाला: ईश्‍वर आपल्यामध्ये नाही तर आपल्याभोवती सर्वत्र आहे. त्याचा घेरा आपल्या चोहिकडे आहे. त्याच्याशिवाय आपले व या अथांग विश्‍वाचे अस्तित्व शुन्य आहे.
पहिला म्हणाला:  मला तर असे कधीच दिसले नाही म्हणून हे तर्कसंगत आहे व त्याचे अस्तित्व कुठेही नाही.
दुसरा म्हणाला:  कधीकधी जेव्हा तु एकांतात असशील तेव्हा एकदा तुझ्या सभोवतालच्या निसर्गाकडे व खुद स्वत:कडे नजर टाक आणि पहा. रात्र-दिवस याचे प्रबोधन, असंख्य ताऱ्यांनी भरलेले सुंदर आकाश, सूर्य ,चंद्र  यांचे कार्य, विशिष्ट प्रमाणात पावसाची निर्मिती, झाडे, प्राणी, पशु, कृमी-किटक याची निर्मिती आणि मानवाची निर्मिती अजुन बरेच काही. काय हे मनुष्य सर्व निर्माण करु शकतो का? हे सूर्य ,चंद्र, तारे व सर्व निसर्ग ईश्‍वराच्या आज्ञेप्रमाणे स्वत:चे काम शांतपणे पार पाडतात? मग काय मनुष्य ईश्‍वराच्या आज्ञेचे पालन करत आहे का? कारण जर  हि सृष्टी असली असती व मनुष्य नसला असता तरिही या सृष्टीला काहिही फरक पडला नसता पण जर मनुष्य धरतीवर असला असता आणि हि सृष्टीही नसली असती तर तो जगु शकला असता का? जसे, हवा नसली असती तर तो श्‍वास घेवु शकला असता? तहानलेला मनुष्याला पाणी मिळाले नाही तर त्याचा जीव कासाविस होतो मग पाऊस पडला नसता तर त्याची तहान भागली असती का?, ही झाडे, प्राणी निर्माण केले नसते तर मनुष्य त्याच्या पोटाची भूक स्वत: भागवू शकला असता का? नाही ना ! कारण ईश्‍वराने ही सृष्टि मनुष्याच्या उपभोगण्यासाठी निर्माण केली आहे. मग मनुष्य त्याच्या निर्मात्याचा आज्ञाधारक बनला पाहिजे का त्याच्या निर्मितीचा? कदाचित मनुष्य सत्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण ते अदृश्य आहे आणि असत्याकडे लक्ष केंद्रित करत आहे कारण ते दृष्टीत आहे.
    जसे एकदा पाच मित्र सहलीला अगदी उत्साहाने निघतात मात्र अचानकपणे टिव्हीवरुन एक बातमी ऐकायला मिळते की त्यांच्या सहलीला जाणाऱ्या मार्गाने लागणारा पुल कोसळण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्या रस्त्यावरुन जाणे घातक आहे. ही बातमी ऐकताच त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा बेत रद्द करतात. मात्र त्यातील काही मित्र सहलीला जाण्याचा निर्णय घेतात कारण त्यांचे मत असते कि ही बातमी बनावट असू शकते आणि तसेपण पुलाची स्थिती  आपण डोळ्याने थोडीना पाहीली आहे जेणेकरुन त्याच्यावर आपण विश्‍वास ठेवू. अश्या दृष्टीहीन बातमीवर विश्‍वास ठेवने मुर्खपणाचे लक्षण आहे. असे म्हणून त्यातील काही मित्र त्या मार्गाने जाण्याचे धाडस करतात. अचानकपणे दोन तासांनी एक बातमी कानावर पडते की त्या पुलावरुन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात दोन तरुण मुले जखमी झाले व ते मृत्यूशी झुंज देत आहेत आणि त्यांचे नातेवाईक त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे. ते दुसरे-तिसरे कोणी नसून तीच मुले होती ज्याना या बातमीची पुर्वसुचना त्यांना  मिळाली असतानाही त्यावर विश्‍वास न ठेवता स्वत:चा शहानपणा केल्याची ही शिक्षा ते भोगत आहेत. आज त्या मुलांचे शरीर पुर्ववत होवु शकते का? किवा कोणते अवतार त्याला पुर्ववत करण्याचे धाडस करु शकते का?..जर आपण हिच बातमी माकडाला दिली असती वा नाही दिली असती तरी त्याने त्या पुलाच्या मार्गाने जाण्याचे धाडस केलेच असते पण आपण ह्याचे कारण सहजपणे समजू शकतो ईश्‍वराने त्याला हे समजण्याची क्षमता दिलीच नाही आहे कि काय चुक व काय बरोबर आहे.  मात्र हि क्षमता मनुष्याला नक्कीच बहाल केली आहे. पण.
    आज माणसाची स्थिती माकडासारखीच झालेली आहे त्याला म्हंटले की, तुम्हा-आम्हा सर्वांचा निर्माता एकच आहे. त्याच्याच मार्गाने जीवन व्यतित करा, कारण हे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगुर आहे. खरे जीवन मृत्युनंतर आहे जे अथांग आहे. तेथे एकिकडे  ह्या ऐहिक जीवनापेक्षा सुंदर जीवन आहे आणि दुसरीकडे अत्यंत ज्वालामुखीने भरलेले यातनामय ठिकाण आहे. स्वत:ला नरकाग्नीपासुन वाचव. अशी अदृश्य सत्याची पुर्वसुचना दिल्यास असंख्य लोक तुझ्यासारखे (पहिल्या मुलासारखे)  विचार करतात !, जोपर्यंत आम्ही आमच्या डोळ्याने शारिरिकदृष्ट्या ईश्‍वराला पाहत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बनावट बातमीवर विश्‍वास का  ठेवायचा? आम्ही काय मुर्ख आहोत का? ह्यांची स्थिती त्या मुलासारखी होवू नये जे अदृश्य सत्याला बनावट मानत होते व त्यांना कायमची शिक्षा भोगावी लागेन जिथुन त्यांना पुर्ववत होणे अशक्य असेन. तसेच काही लोक या संभ्रमात आहेत कि ईश्‍वर आपल्यामधेच आहे ..असे असले असते तर मनुष्याचा जन्म-मृत्यु त्याच्या हातात का नाही? असा विचार केला असता हा संभ्रम अर्थहीन वाटतो. तसेच, आजही काही तुरळक लोक अदृश्य सत्य मान्य करतात कारण ते ईश्‍वराने त्यांना प्रदान कलेल्या विवेकबुद्धिचा वापर करतात. जागरुक बुद्धी व संवेदनशील अंत:करण ज्या मनुष्यात असेल ते ह्या सृष्टीचे चिन्ह व मनुष्याचा जन्म व मृत्युचा खरा हेतू या अदृश्य सत्येवर सडेतोर उत्तर देते की आपणा सर्वांचा ईश्‍वर/निर्माता एकच आहे व त्याच्या आज्ञेचे पालन करुन कर्म करायचे आहे. शेवटी आपल्याला त्याच्याकडे परत जायचे आहे आणि स्वत:ला नरकाग्नीपासून वाचवायचे आहे. जे लोक या सत्याचा स्विकार करत नाहित ते स्वत:हून त्यांचे पुढील आयुष्य नरकात जाण्यास आमंत्रण देत आहेत. शेवटी पहिले मुल निरुत्तर झाले. कदाचित त्याच्या अहंकाराने त्याला निरुत्तर केले असावे पन त्याचे अंत:करणाने त्याला नक्कीच विचार करायला भाग पाडले असावे.
    मित्रांनो! जरी ही एक बोधकथा असली तरी ती आपल्याला खऱ्या अदृश्य सत्याची आठवण करुन देत आहे. माझी तुम्हाला कळकऴीची विनंती आहे, आजही वेळ गेली नाही कृपा करुन सत्याचा स्विकार करा व स्वत: ला नरकापासून वाचवा. ईश्‍वर आपल्या सर्वांना हे सत्य स्विकारण्याची सदबुद्धी देवो! आमीन.

मुंबई (नाजीम खान) : गुणवत्ता आणि सेवा यांचा ज्यावेळी योग्य मिलाफ होतो त्यावेळी व्यवसाय वाढीस बळ मिळते. गुंतवणुकदार मार्केट पाहून त्याबाबतची गुंतवणूक करतो तर छोटा व्यापारी आपल्या गुणवत्तापूर्ण माल व विक्री पश्चात सेवेने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. बाजारात अनेक लोक एकच माल विकतात परंतु, एखाद्याकडेच लोकांची अधिक गर्दी असते. त्याचे कारण हेच की त्याची सेवा, संवाद आणि मालाची गुणवत्ता उत्कृष्ट असते. त्यामुळे तो मोठ्या स्पर्धेतही टिकतो, असे मत अहेमदाबाद विद्यापीठ व इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)चे प्रा. अबरार अली सय्यद यांनी सांगितले.
    मुंबई येथे नुकतीच रिफा चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे सिद्दीकी कॉलेज भायखळा येथील अल्लामा लतीफी हॉल मध्ये आयोजित एकदिवस व्यावसाय कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर रिफाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलाउद्दीन अहमद, मोनिस खान, इम्तियाज शेख उपस्थित होते. यावेळी अबरार अली यांनी उपस्थित व्यावसायिकांना केस स्टडी द्वारे सखोल मार्गदर्शन केले. डिजीटल एक्स्पर्ट मार्केटिंग आणि ई-कॉमर्सचे तज्ज्ञ मोनिस खान म्हणाले, व्यापार्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास जास्तीस्त जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, असे सांगितले. त्यांनी कशा पद्धतीने इंटरनेट व अन्य ई-कॉमर्सबद्दल सखोल मार्गदर्शन केले. इम्तीयाज शेख यांनी टीम वर्क आणि व्यावसायिकतेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच काही प्रात्यक्षिकेही करून घेतली. रहेबर फायनान्शियल कन्सलटिंगचे संचालक एम.एच. खटखटे यांनी बिनव्याजी फायनान्स देणे आणि घेणे याबद्दल माहिती सांगितली. प्रास्ताविक रिफाचे कार्यकारी अधिकारी सलाहउद्दीन अहमद यांनी केले. त्यांनी रिफा द्वारा 2015 पासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यशाळेस मुंबई, पुणे, अहमदनगर, धुळे, लातूर, अकोला येथील व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला होता.

मुस्लिम पर्सनल लॉ  बोर्डाने बाबरी मस्जिद संदर्भात जी भूमिका घेतली आहे ती योग्य असल्याची प्रतिक्रिया जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी बुधवारी दिली. ते लातूर येथे आले असता त्यांच्याशी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि मौलाना सलमान नदवी यांच्यामध्ये सुरू असलेल्या मतभेदांसंबंधी शोधनचे उपसंपादक बशीर शेख आणि स्तंभलेखक एम.आय. शेख यांनी संवाद साधला.
    या विषयी बोलताना ते म्हणाले, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे धोरण स्पष्ट आहे. बोर्डाने अगदी सुरूवातीपासून या विषयावर बोलणी करण्यासाठी बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटी गठित केली होती. त्यांच्यात आणि विविध गटांमध्ये अनेकवेळा बोलणी झाली सुद्धा. मात्र प्रत्येक वेळेस मंदीर समर्थकांकडून एकच मुद्दा रेटला गेला की, हा आमच्या आस्थेचा प्रश्‍न आहे म्हणून मुस्लिमांनी ही जागा आम्हाला द्यावी. चर्चा याच्यापुढे जातच नव्हती. अनेक वर्ष लोटल्यानंतर देखील चर्चेतून काही निष्पन्न होत नसल्याची खात्री झाल्यावर शेवटी बोर्डाने असा निर्णय घेतला की, आता हे प्रकरण न्यायालयाच्या मार्फतच सोडविले गेले पाहिजे. कोर्ट जो निकाल देईल त्याला आम्ही मान्य करू. मात्र उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाचा या संबंधात निकाल विचित्र आला. त्यांनी जागा तीन विभागामध्ये विभागून दिली. हा निर्णय कोणालाच पटला नाही म्हणून प्रकरण  सर्वोच्च न्यायालयात गेले. वर्षानुवर्षे चर्चा करून सुद्धा चर्चेला काहीच फळ आले नाही. म्हणून प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीपर्यंत आले. आता बोलणी करण्याचे काही औचित्यच राहिलेले नाही. मौलाना सलमान नदवी साहेबांची पहिली चूक आहे की, ते बोर्डाचे सन्माननीय सदस्य असल्या कारणाने बोर्डाच्या भुमिकेपासून वेगळे होवून त्यांनी कोणाशीही बोलणी करायलाच नको पाहिजे होती. कारण मुस्लिम समाजातील सर्व गटांची ही संयुक्त भुमिका होती की, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल तोच मान्य केला जाईल.
    दुसरी चूक नदवी साहेबांनी अशी केली की त्यांनी सांगितले की, बोर्डाचं वय आता संपलेल आहे. आता मी एक वेगळा बोर्ड तयार करणार आहे. जेव्हा त्यांनी बोर्डापेक्षा वेगळी भूमिका मांडली आणि बोर्डाच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले तेव्हा बोर्ड त्यांना आता आपल्यामध्ये कसा ठेवू शकतो? म्हणून बोर्डने जाहीर केले की मौलाना सलमान नदवी यांचा यापुढे बोर्डाशी काहीही संबंध राहणार नाही. पर्सनल लॉ बोर्डची भूमिका स्पष्ट आणि बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो आम्हा सगळ्यांना मान्य असेल”.
    मुळात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा यांनी बाबरी मस्जिदीचे प्रकरण एक जमीनीचा विवाद म्हणूनच ऐकूण निकाल देण्यात येईल, असे जाहीर करताच केंद्र सरकार आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात येवून चुकले की, आता हा निकाल आपल्याविरूद्ध लागणार आहे. म्हणून त्यांनी श्री श्री श्री रविशंकर यांच्या मार्फतीने बोर्डातील कमजोर कडी मौलाना सलमान नदवी यांना आपल्या गळाला लावले आणि त्यांच्या मार्फतीने वेगळी भूमिका मांडून बोर्डात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुस्लिमांच्या सर्व गटांकडून होत आहे.

एम.आर.शेख
पद्मावत चित्रपटामुळे अल्लाउद्दीन खिल्जीचे नाव नव्याने प्रकाश झोतात आलेले आहे. अभिनेता रणवीरसिंहने रंगवलेला खिल्जी इतिहासाच्या मूळ खिल्जीसारखा नव्हता, असे चित्रपट पाहणाऱ्यांचे मत आहे. काहींचे मत याच्या उलट आहे. अशा या उलट-सुलट मतांमध्ये अल्लाउद्दीन खिल्जी प्रत्यक्षात कसा होता हे पाहणे उद्बोधक ठरेल, त्यासाठी हा लेखप्रपंच.
    अल्लाउद्दीन खिल्जी, खिल्जी वंशाचा दूसरा सम्राट होता. मात्र तो तसा नव्हता जसा संजय लीला भन्साळी ने आपल्या चित्रपटात दाखविलेला आहे. तो विदेशी हल्लेखोर नव्हता किंवा समलैंगिकही नव्हता, असे त्याच्या इतिहासावरून नजर टाकल्यास लक्षात येते. त्याचा जन्म अखंड भारताच्या बंगाल प्रांताच्या बीर भूम जिल्ह्यात (आजचा बांग्लादेश) 1250 मध्ये झाला. त्याचे मूळ नाव जुना उर्फ जान मुहम्मद खिल्जी होते. त्याच्या वडिलांचे नाव शहाबुद्दीन मसूद असे होते. त्याने एकूण तीन लग्ने केली होती. त्याच्या एका पत्नीचे नाव कमलादेवी होते. जी राजा कर्नसिंगची पूर्व पत्नी होती. शिवाय, मलिका-ए-जहाँ (ही जलालुद्दीन खिल्जीची मुलगी), महेरू (दिल्लीच्या एका सरदाराची मुलगी) ही त्याच्या इतर दोन पत्नींची नावे होत.
    मलिक काफूर नावाचा एक किन्नर त्याचा सर-सेनापती होता. त्याच्याशी खिल्जीचे समलैंगिक संबंध होते, असा काही इतिहासकारांनी आरोप केला असला व तसे पद्मावत मध्ये सुद्धा दाखवले असले तरी तो खरा वाटत नाही. कारण की, मलिक काफूर हा अत्यंत धाडसी आणि युद्धनिपुण व खिल्जी एवढाच तुल्यबळ व्यक्ती होता. गुलामापासून सर-सेनापती पर्यंतचा प्रवास त्याने लिलया सर केला होता. त्याने पहिल्यांदा दक्षीण भारतातील देवगिरी (सध्याचे दौलताबाद) व वरंगल (सध्याचा तेलंगना) हे प्रांत जिंकून दिल्लीच्या सत्तेत जोडले होते. शिवाय, अल्लाउद्दीनची हत्या विषप्रयोग करून त्यानेच केली होती.
    अल्लाउद्दीनला एकूण चार मुले होती. कुतूबोद्दीन, शहाबुद्दीन, खिजरखान व शादीखान अशी त्यांची नावे होत. अल्लाउद्दीन खिल्जी निरक्षर मात्र शरिराने धिप्पाड व युद्ध कौशल्य निपुण होता. तो प्रचंड ताकदवान व महत्त्वाकांक्षी होता. तो एक कुशल संघटक होता. म्हणून खिल्जी घराण्याचा पहिला सम्राट जलालुद्दीन याने त्याला आपली मुलगी देऊन कडा व अवध या दोन प्रांतांचा राज्यपाल नियुक्त केला होता. मात्र त्याची महत्वाकांक्षा या दोन प्रांतात मावत नव्हती म्हणून त्याने जलालुद्दीनची परवानगी न घेता दक्षीणेवर स्वारी केली होती व प्रचंड लूट करून दिल्लीला परतला होता.
    जलालुद्दीन खिल्जी ने लहानपणापासूनच स्वतःच्या मुलासारखा अल्लाउद्दीन खिल्जीचा सांभाळ केला होता. जलालुद्दीन खिल्जी हा अल्लाउद्दीन खिल्जीचा चुलता होता. एक दिवस संध्याकाळी असरच्या नमाजनंतर जलालुद्दीन खिल्जी नौकानयन करत कुरआन   पठण करीत होता. तेव्हा अल्लाउद्दीन खिल्जी  त्याला भेटायला गेला. अल्लाउद्दीनला पाहून जलालुद्दीनने नौका किनाऱ्यावर घेतली व तो चालत अल्लाउद्दीन जवळ आला. दोघांनी गळाभेट घेतली. तेवढ्यात अल्लाउद्दीनने इशारा केला आणि महेमूद बिन सालीम आणि इख्तीयारूद्दीन या दोन शिपायांनी ठरल्याप्रमाणे जलालुद्दीनवर तलवारीने हल्ला केला व जलालुद्दीनचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर लगेच 12 आक्टोबर 1296 रोजी दिल्लीमध्ये तीन दिवसीय राज्य रोहन सोहळा आयोजित करण्यात आला. त्या सोहळ्यात त्याने रितसर भारताचा सम्राट म्हणून सत्ता ग्रहण केली. त्याच्या अखत्यारित पश्चिमेस पंजाब व सिंध, मध्य भारतात गुजरात व उत्तरप्रदेश तर पूर्व भारतात बिहार, माळवा व राजपुताना एवढे प्रांत होते. 1298 मध्ये त्याने गुजरात काबिज केले होते. 1299 मध्ये जेसलमेर, 1301 मध्ये रणथंबोर, 1304 मध्ये जालोर व 1305 मध्ये माळवा या प्रांतांना त्याने ताब्यात घेऊन दिल्लीच्या तख्ताशी जोडले होते. अलाउद्दीन खिल्जी पहिला असा सम्राट आहे ज्याने भारतात सुसंघटित थलसेना (ऑर्गनाईज्ड आर्मी) उभी केली होती. तो जेथे जाई विजयी होवून परत येई. अल्लाउद्दीन आणि विजय असे समीकरणच त्या काळात रूढ झाले होते. म्हणून जनतेचा आणि त्याचा दोघांचा असा समज झाला होता की, अल्लाउद्दीन खिल्जी यास दैवी मदत प्राप्त आहे. असे असले तरी त्याला कश्मीर, नेपाळ आणि आसाम जिंकता आला नाही. त्याच्या काळात मंगोलांनी अनेक वेळेस दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतावर हल्ले केले होते. मात्र प्रत्येकवेळी त्यांना मात खावी लागली होती. शेवटी 1307 मध्ये अलाउद्दीन खिल्जीने मंगोलांचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर मंगोलांचे भारतावरील हल्ले बंद झाले. अल्लाउद्दीन खिल्जीने 1296 ते 1316 असे एकूण 20 वर्षे शासन केले.
    दक्षीणेतील त्याच्या पहिल्या स्वारीनंतर त्याचा सेनापती मलिक काफूर याने 1306 मध्ये दूसरी स्वारी केली. ज्याची सुरूवात देवगिरी (दौलताबाद महाराष्ट्र) येथून सुरू झाली. त्यात दौलताबादचा राजा रामचंद्र याने मलिक काफूर समोर आत्मसमर्पण केले. 1310 मध्ये मलिक काफूर याने वरंगलकडे मोर्चा वळविला. तेव्हाचा वरंगलचा राजा रूद्रदेव याने स्वतःची सोन्याची मूर्ती तयार करून शंभर हत्ती, 700 घोडे व जड जवाहीरसह मलिक काफूर समोर शरणागती पत्करली व दिल्लीचे मांडलीकत्व स्विकारले. इतिहासकार एकीकडे मलिक काफूरचे शौर्याचे वर्णन करतात तर दूसरीकडे तो किन्नर होता असे लिहितात. असे जरी असले तरी मलिक काफूर हा गुलाम होता एवढे मात्र नक्की. गुजरातच्या मोहिमेमध्ये नुसरतखान नावाच्या सरदारने 1000 दिनारमध्ये खरेदी करून त्याला अलाद्दीन खिल्जीला भेट म्हणून दिले होते. अल्पावधीतच मलिक काफूर आपल्या अंगभूत गुणांच्या व शौर्याच्या बळावर खिल्जीचा सर्वाधिक विश्‍वासपात्र बनला होता. मात्र याच महत्वकांक्षी मलिक काफूरने शेवटच्या काळात विषप्रयोग करून अल्लाउद्दीन खिल्जीची हत्या केली. त्याच्या दोन मुलांचे डोळे काढले व तीन वर्ष वयाचा राजपूत्र शहाबुद्दीन याला गादीवर बसवून शासनाची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली होती. मात्र काही आठवड्यातच अल्लाउद्दीन खिल्जीच्या विश्‍वासपात्र सैनिकांनी मलिक काफूरची हत्या केली. अल्पवयीन शहाबुद्दीनला त्याचाच भाऊ मुबारक शहा ने गादीवरून उतरवून स्वतः राज्य प्राप्त केले. 1316 ते 1320 पर्यंत तो दिल्लीच्या तख्ताचा सम्राट होता. 1320 मध्ये त्याचीही हत्या झाली व खिल्जी वंश समाप्त झाला व तुघलक वंशाची सुरूवात झाली.
अल्लाउद्दीन खिल्जीचे गुण-दोष
    मध्ययुगीन अनेक मुस्लिम सम्राटाप्रमाणे अल्लाउद्दीन खिल्जीही ही एक नाममात्र मुस्लिम सम्राट होता. त्याचा इस्लामशी फारसा संबंध नव्हता. किंबहुना इस्लामच्या विरोधी त्याचे आचरण होते. त्या काळी प्रत्येक राजा युद्ध हे सत्ता, संपत्ती, जमीन यासाठीच करत होता. तसेच अल्लाउद्दीनने जेवढे युद्ध केले ते फक्त जमीन बळकावण्यासाठी व इतर राजांची संपत्ती हडपण्यासाठी केले. सतत मिळत गेलेल्या विजयामुळे त्याची महत्वकांक्षा एवढी वाढली होती की, दिल्लीचे तख्त एखाद्या विश्‍वासपात्र सरदाराच्या स्वाधीन करून मध्यपूर्व, युरोप आणि तुर्कस्तान सुद्धा जिंकण्याचा त्याचा मन्सुबा होता. म्हणूनच तो स्वतःला सिकेंदरे सानी (अ‍ॅलेक्झांडर द्वितीय) म्हणून घेत असे.
    त्याच्या धार्मिक विचारांसबंधी देवबंदचे इतिहासकार मुहम्मद कासीम फरिश्ता हे म्हणतात की, ’तमाम कामियाबीयों के बाद अल्लाउद्दीन के दिल में अजीब-अजीब खयालात आने लगे. उन खयालात में से एक खयाल ये भी था के जिस तरह (अस्तगफिरूल्लाह) हुजूर मुहम्मद सल्ल. ने अपनी कुव्वत से शरियत कायम की और उनके चारों खुलफा (रजि.) ने उस शरियत को मजबूत बनाया ठीक उसी तरह अगर मैं भी अपने उमरा (सरदार) अलमास बेग, अलग खान, मलिक हजबरूद्दीन जफरखान, मलिक नुसरत खान और संजर अलप खान की कुव्वत और सहारे के बलपर एक नया मजहब जारी करूं तो फिर यकीनन रोजे कयामत तक मेरा नाम दुनिया में बाकी रहेगा. अलाउद्दीन महेफिले शराब में अक्सर व बेशतर अपने इसी खयाल का जिक्र करता था और अपने सरदारों से मश्‍वरा किया करता था. अल्लाउद्दीन जाहील महेज था. उसकी सारी जिंदगी जाहील खिल्जीयों में गुजरी. सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी कभी-कभी इस खयाल का भी इजहार करता था के, मुल्क की हुक्मरानी और बादशाहीयत के निजाम को सिर्फ बादशाह की राय और उसकी मस्लेहतों से ताल्लुक होता है. उन सियासी कामों से खुदावंते ताला की (अस्तगफिरूल्लाह) शरियत का कोई वास्ता नहीं है. मजहबी उलेमाओं का काम सिर्फ इतनाही है के, वो मुख्तलिफ किस्म के मुकद्दमों का फैसला करें, खानदानी झगडों को खत्म करें और खुदावंदे ताला की इबादत के बेहतरीन तरीके बयान करे.’ (संदर्भ ः ’तारीख-ए-फरिश्ता’ पान क्र. 245  )
विकास हेच अल्लाउद्दीनच्या विजयाचे रहस्य होते.
    अलाउद्दीन जरी दारूचा शौकीन होता तरी लवकरच त्याला दारूच्या नुकसाना संबंधींची उपरती झाली व त्याने दिल्ली शहरामध्ये दारूबंदी नुसती केलीच नाही तर ती अमलात सुद्धा आणली. अल्लाउद्दीन खिल्जी भारतीय इतिहासातील पहिला राजा होता ज्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर निश्चित केले होते. त्यापेक्षा जास्त दरावर व्यापाऱ्यांना वस्तू विकण्यास प्रतिबंध केला होता.  शेतकऱ्यांचा माल त्यांच्या बांधावर जावून खरेदी करण्याची व्यवस्था त्यांनी विकसित केली होती. शासकीय कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जावून त्याच्या गरजेपुरता माल सोडून बाकी मालाचे मुल्य चुकवून शेतातूनच माल उचलून घेवून जात होते. रोजच्या रोज बाजारांमधील मालांच्या मुल्यांचे उतार चढाव बादशाहपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे कृत्रिम भाव वाढविण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. कपड्यांच्या किमतीसुद्धा ठरविण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना नव्हता. त्या किमती शासकीय स्तरावरून ठरविल्या जात होत्या. त्यामुळे कपड्यामध्ये सुद्धा लूट करण्याची व्यापाऱ्यांना संधी नव्हती. घोड्यांच्या वेगवेगळ्या जातींच्या किमती शासकीय स्तरावरून ठरविल्या जात होत्या. इतर पशु जसे गाय, बैल, म्हैस, बकरी यांचेही दर त्यांच्या दर्जाप्रमाणे शासकीय स्तरावर ठरविले जात. अल्लाउद्दीनच्या काळात चांदी, सोन्याचे वेगवेगळे तंगे (नाणे) होते तसेच सोने आणि चांदी यांच्या मिश्रणातून तयार केलेलीही नाणे बाजारात उपलब्ध होती. सोन्याच्या नाण्याला तंगातलाई आणि चांदीच्या नाण्याला तंगा नखराह म्हटले जात होते. या जनहित सुधारणांमुळे जनता सुखात होती. त्यामुळे सैनिक प्रत्येक युद्धात जीवाची बाजी लावून लढत होते. त्यामुळे विजय मिळत होता. अल्लाउद्दीन खिल्जीच्या सातत्यपूर्ण विजयी श्रृंखलेचे हेच रहस्य होते.
बॉलीवुड आणि मुस्लिम
    गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटांमध्ये ठरवून मुस्लिमांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खलनायक आणि आतंकवाद्यांचे पात्र मुस्लिम रंगविण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पीके हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा त्या चित्रपटासाठी आमीर खान या नटाची केवळ तो नावाने मुस्लिम आहे म्हणून आलोचना केली गेली. वास्तविक पाहता त्या चित्रपटाची कथा, पटकथा तथा दिग्दर्शन हे करणारे सर्व बहुसंख्य समाजातील होते. त्यांना कोणी दोष दिलेला नाही. केवळ निर्देशकाने दिलेल्या निर्देशनाप्रमाणे अभिनय केला म्हणून आमीर खानला टार्गेट करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याची पत्नी किरण राव हिचे वाक्य आमीरनेच म्हटले, अशी हाकाटी पिटण्यात आली. मूळ वाक्य (सद्याच्या वातावरणात मला माझ्या मुलांच्या भविष्यासाठी भारतात राहण्याची भीती वाटते.) बोलणारी किरण राव हिला कोणी दोष दिला नाही. एकंदरच बॉलीवुडमध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटात मुस्लिम व्यक्तीरेखांची निवड करून त्यांना क्रूर, कृतज्ञ, देशद्रोही दाखविण्याची जणू चढाओढच लागलेली आहे. पद्मावत न पाहताच करणी सेनेने जो अभूतपूर्व विरोध केला. तसा विरोध अनेक मुस्लिमांनी चित्रपट पाहूनसुद्धा केलेला नाही. यातच कोणाला राष्ट्रीय संपत्तीची काळजी आहे हे स्पष्ट होते. मुस्लिमांनी सॅटॅनिक व्हर्सेसपासून ते तस्लीमा नसरीन पर्यंतच्या विरोधातून मिळालेल्या अनुभवातून एक धडा नक्कीच शिकलेला आहे. तो म्हणजे असा की, विरोध कधीच उपयोगी पडत नाही. उलट त्यात आपलेच नुकसान होते. म्हणून असे चित्रपट, पुस्तके आणि व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे कधीही चांगले. राहता राहिला प्रश्‍न अल्लाउद्दीन खिल्जीचा तर तो जरी धर्माने मुस्लिम होता तरी त्याचे वर्तन किंवा शासन इस्लामी नव्हते, यात वाद नाही. त्यामुळे त्याचे विकृत चित्रकरण म्हणजे भारतीय मुस्लिमांचा अपमान वगैरे आहे, असे काही नाही. भारतीय मुस्लिमांनी त्याच्या विषयी सहानुभूती बाळगावी, असे काही नाही.
    करनी सेनेने गुरू ग्राममध्ये शाळेच्या बसवर हल्ला करून ज्या पद्धतीने त्या हल्ल्यात मुस्लिमांना गोवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला तो निषेधार्ह आहे. गुरू ग्राम पोलिसांनी वेळीच स्पष्ट केले की, मुलांनी खचाखच भरलेल्या शाळेच्या बसवर हल्ला करणाऱ्या अटक आरोपितांपैकी एकही मुस्लिम नाही. ही संतोषजनक बाब आहे.
    मुळात देशाचे एकंदरित वातावरणच पावणेचार वर्षात मुद्दामहून बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अल्लाहच्या कृपेने हिंदू बांधवांमधूनच काही बांधव मुस्लिमांच्या बाजूने सत्याची लढाई लढत आहेत. म्हणून भारत महान आहे. भारत आपला देश आहे. विविधतेने नटलेला आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सामिल होण्याची गंगा-जमनी परंपरा या देशाला आहे. जोपर्यंत हिंदू बांधव मुस्लिमांच्या हक्काची लढाई लढत आहेत तोपर्यंत मुस्लिमांना भय बाळगण्याचं कारण नाही. जय हिंद !

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget