Halloween Costume ideas 2015
Latest Post


स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी इस्लाम मध्ये जे मार्गदर्शन केले गेले आहे, ते असे की, कोणीही विवाह योग्य असलेली स्त्री किंवा पुरूष जोडीदाराशिवाय राहता कामा नये. स्त्री असो की पुरुष विवाहयोग्य वय होताच, त्याचा विवाह केला जावा. विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांच्या विवाहाला प्राधान्य दिले जावे. विवाहाद्वारे त्यांचे पुनर्वसन केले जावे. पैगंबर मुहम्मद ( स.) यांनी स्वतः या तत्त्वांचा अंगीकार केला आणि पहिला विवाह एका विधवा स्त्रीशी केला. सुमारे पंचवीस वर्षे त्यांच्याबरोबर सुखी संसार केला. एवढेच नव्हे तर पहिल्या पत्नीच्या हयातीत त्यांनी दुसरा विवाहसुद्धा केला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने देहविक्री हा वैध व्यवसाय असल्याचे मान्य करीत, पोलिसांनी सज्ञान आणि परस्पर संमतीने देहविक्री करणाऱ्या महिलांची अडवणूक किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा आदेश दिला. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सहा मार्गदर्शक तत्त्वेही माननीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केली आहेत. मला न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करायचे नाही. माझा मुद्दा हा आहे की खरोखरच सर्वच स्त्रिया आनंदाने, राजीखुशीने, आपण होऊन हा व्यवसाय निवडतात का?

जसे इतर अनेक व्यवसाय आपल्या मर्जीने निवडले जातात, तसाच हा व्यवसाय निवडला जातो का? इतरही काही व्यवसाय असतील की, स्त्रिया पोटाची खळगी भरण्यासाठी मजबुरीने करत असतील परंतु; इतर व्यवसायाप्रमाणेच या व्यवसायाकडे व ते करत असलेल्या महिलांकडे समाज सन्मानाने पाहतो का? त्यांच्या मुलाबाळांना सन्मानाची वागणूक मिळते का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. पण मुख्य मुद्दा हा आहे की, समाजात मान्यता असलेले व सन्मानजनक वागणूक दिली जाणारे इतर अनेक व्यवसाय असताना स्त्रिया या व्यवसायात का पडतात? आपल्या मर्जीने हा व्यवसाय निवडणाऱ्या स्त्रिया असतीलही. परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. वास्तविक पाहता या व्यवसायात पडणाऱ्या अधिकतर महिला अशा असतात ज्यांचे लैंगिक शोषण झालेले असते. हे एक कटू सत्य आहे.

माणसाच्या इतर गरजांप्रमाणे शारीरिक सुख मिळणे ही गरजेचे आहे. शिक्षणाच्या नावाखाली किंवा मुलींना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने विवाहकडे दुर्लक्ष केले जाते. मुलींना शिक्षण देऊ नये असे नाही परंतु; तिशी ओलांडेपर्यंत विवाहाचा विचारच करू नये, असा नियम तर नाही ना. विवाहानंतरही शिक्षण घेता येते. या काळात मुली कोणाच्या प्रेमात तरी पडतात किंवा लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या भावनांशी व शरीराशी खेळले तरी जाते. अनेक महाविद्यालयीन मुलींची फसवणूक झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आपण वाचत असतो. यातून अलीकडे कुमारी मातेचा गंभीर प्रश्न रौद्ररूप धारण करत चालला आहे.

एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडून घर सोडून पळून गेलेल्या अनेक मुलींचा नंतर पत्ता सापडत नाही. कुठे जातात या मुली? खरोखरच कुठेतरी आपल्या जोडीदारासह सुखी जीवन जगत असतात का? असे असेल तर ठीक आहे. पण अशा मुली बोटावर मोजण्या इतक्याच असतात. कित्येक मुलींची फसवणूक करून त्यांची कुंटनखाण्यामध्ये विक्री केली जाते. आई-वडिलांच्या मर्जीचा विचार न करता पळून गेल्याने, परत आई-वडिलांना तोंड दाखवण्याची इच्छा नसते. नातेवाईक शेजारीपाजारी सगळीकडे बदनामी झालेली असते. त्यामुळे घराकडे परतण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. दुसरीकडे ज्याच्यावर विश्वास ठेऊन घर सोडलं, जन्मदात्या आईबापाला सोडलं, त्यांनीही हात झटकलेले असतात. त्यांना वाममार्गाला लावून बेपत्ता झालेले असतात. ’घर का ना घाट का’ अशी त्यांची अवस्था झालेली असते. अशा परिस्थितीत नशिबाला दोष देत, कन्हत पिचत पडलेल्या असतात. अलिकडेच आलेला चित्रपट ’गंगूबाई’मध्ये शरीरविक्रीसाठी महिलांना कशाप्रकारे आणले जाते याचे हृदयद्रावक चित्रण केलेले आहे.

अनेक विधवा, घटस्फोटित व सोडून दिलेल्या निराधार स्त्रियांच्या बाबतीतही असेच घडत असते. विधवा, निराधार तसेच घटस्फोटित महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जातात. विधवा व निराधार महिलांची आश्रमामध्ये राहण्याची सोय केली जाते. परंतु अनेक वेळा या ठिकाणीही त्यांचे शारीरिक शोषण झाल्याच्या बातम्या कानावर येतात. घरातही अनेक वेळा जवळचे नातेवाईक त्यांच्या निराधारपणाचा गैरफायदा घेत असतात. जवळील नातेवाईकांकडूनच त्यांचा लैंगिक छळ झालेला पाहावयास मिळतो. अशा विधवा निराधार घटस्फोटित महिलांच्या सर्व समस्या सोडवण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे त्यांचा पुनर्विवाह! या अशा प्रकारच्या सर्व महिलांचे सर्व प्रश्न या मार्गाने सुटू शकतात. पुनर्विवाह झाला तर त्यांच्या सर्व समस्या चुटकीसरशी सुटतील. स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी इस्लाम मध्ये जे मार्गदर्शन केले गेले आहे, ते असे की, कोणीही विवाह योग्य असलेली स्त्री किंवा पुरूष जोडीदाराशिवाय राहता कामा नये. स्त्री असो की पुरुष विवाहयोग्य वय होताच, त्याचा विवाह केला जावा. विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांच्या विवाहाला प्राधान्य दिले जावे. विवाहाद्वारे त्यांचे पुनर्वसन केले जावे. पैगंबर मुहम्मद ( स.) यांनी स्वतः या तत्त्वांचा अंगीकार केला आणि पहिला विवाह एका विधवा स्त्रीशी केला. सुमारे पंचवीस वर्षे त्यांच्याबरोबर सुखी संसार केला. एवढेच नव्हे तर पहिल्या पत्नीच्या हयातीत त्यांनी दुसरा विवाहसुद्धा केला नाही.

खऱ्या अर्थाने महिलांच्या समस्या सोडवावयाच्या असतील तर योग्य वेळी विवाह करणे, विधवा घटस्फोटित व निराधार महिलांचे पुनर्विवाहाद्वारे पुनर्वसन करणे तसेच विवाह सोपा आणि कमी खर्चाचा करणे हेच खरे उपाय आहेत.

- सय्यद जाकेर अली, परभणी

9028065881



भारतात प्रादेशिक भाषांचा एकूण व्यवहार फार मोठा नसतो. मराठी भाषेचंही आपलं साहित्यिक व्यवहाराचं जे जग आहे. तेही लहानसं आहे. तिथले बहुतेक व्यवहार ओळखी-पाळखींवर चाललेले असतात. मोठ्या कळीच्या प्रश्नांवर सहसा इथं मौन पाळलं जातं. १९९२, २००२, २००७ सारख्या घटना घडतात. त्यावर फारसे तरंग मराठी साहित्यात उमटत नाहीत. तिकडं हिंदी जगतात याच विषयावरच्या कवितांचे मलयश्री हाशमी दोन खंड प्रकाशित करतात. मिया कवितेचं आंदोलन होतं. असमी-बंगाली भाषेतले कवी-कलावंत-चित्रपट-नाट्य कलावंत त्यावर आपापल्या माध्यमातून अभिव्यक्त होतात. 'कागज़ नहीं दिखाएंगे' अशी घोषणा त्यांच्या व्यक्त होण्यातून दिसते. मराठीत थंडगार शांतता असते. लेखकांच्या तीन-चार पिढ्या एकाचवेळी मराठीत असतांना फारसे आवाज न उठता मौन अबाधित राहातं. मुक्तिबोध म्हणतात तसं,

सब चुप, साहित्यिक चुप और कविजन निर्वाक् 

चिंतक, शिल्पकार और नर्तक चुप हैं

याच कवितेत मुक्तिबोध मध्यम वर्गाचं-- जो तथाकथित बौद्धिक वर्ग आहे त्याचं वर्णन क्रीतदास असं करतात. क्रीतदास म्हणजे विकला गेलेला गुलाम. जो ७० वर्षांतल्या कल्याणकारी राज्यातल्या फायद्यांची फळं चाखून स्थिरस्थावर होऊन आता वर डोळे लावून खालच्या वर्गातल्या लोकांचा द्वेष करीत आणि सर्वंकषवादी सत्तेचा आंधळा, विखारी विद्वेष पसरवण्यात अतिशय सक्रीय आहे. यांना ब्राह्मणेतरांतील वर्ग आणि दलितांमधीलदेखील काही वर्ग सामील आहेत. यांच्याच खांद्यावर बंदुका ठेऊन प्रस्थापित व्यवस्थेला त्यांची दुष्कृत्यं करवून घेता येत असतात. 

त्याचबरोबर जे कोणी सत्तेशी सलगी करत राहिलेले विद्वान, विचारवंत, कवी, समीक्षक अशा लोकांनाच उद्देशून बहुधा मुक्तिबोधांनी लिहून ठेवलेलं आहेः 

अब तक क्या किया, जीवन क्या जिया,

ज़्यादा लिया और दिया बहुत-बहुत कम 

मर गया देश, अरे, जीवित रह गए तुम।"  

बैंड के लोगों के चेहरे  मिलते हैं मेरे देखे हुओं से 

लगता है उनमें कई प्रतिष्ठित पत्रकार  इसी नगर के !!

बड़े- बड़े नाम अरे, कैसे शामिल हो गए !!

उनके पीछे चल रहा  संगीन नोकों का चमकता जंगल,

चेहरे वे मेरे जाने बूझे से लगते 

उनके चित्र समाचार पत्रों में छपे थे, उनके लेख देखे थे,

यहाँ तक कि कविताएँ पढ़ी थीं  भई वाह !

उनमें कई प्रकांड आलोचक, विचारक, जगमगाते कविगण 

मंत्री भी, उद्योगपति और विद्वान 

यहाँ तक कि शहर का हत्यारा 

डोमाजी उस्ताद। 

(मुक्तिबोध रचनावली-२, पृ. ३२८-३०)

अशा प्रकारचे मौन पाळत राहाणारे आणि पाळतखोर सत्तेला भिऊन असणारे जे लोक आहेत ते वास्तवाला केवळ कॅमेऱ्याच्या निर्ढावलेल्या भिंगासारखे आहेत. वास्तवाचं पृथःकरण न करताच आहे तसं प्रतिबिंबित करणारे आहेत. 

मला इथं मला अरुण कोलटकरांची 'क्यामेरा' ही कविता आठवते. त्यात ते कॅमेऱ्याला भिंग घाश्या संबोधत म्हणतात,

तुझ्यात दोन गोष्टी नाहीत। स्मृती।आदल्या चौकटीची। आणि अश्रुग्रंथी।कितीही दुःख पाहिलं तरी तुझं भिंग पाणावत नाही। दुःख पाहून तू द्रवत नाहीस। पण दुसऱ्याच्या डोळ्यातला अश्रू कसा टिपावा । तो न पुसता न खाली पडू देता। हे तुला चांगलं माहीत आहे। 

कोलटकरांची ही कविता वेगळ्या व्यथेची आणि वेदनेची कविता असली तरी ती प्रतिमांच्या सृष्टीतले आपण कॅमेऱ्यासारखे निर्जीव अलिप्त असे झालेल्या बघ्यांनाही लागू होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला फ्रान्समध्ये सैन्यातल्या देफ्रस नावाच्या ज्यू अधिकाऱ्याला न केलेल्याही गुन्ह्यासाठी राष्ट्रद्रोही, धर्मद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून टाकून, तसा गुप्तपणे खटला चालवून त्याला गुन्हेगार जाहीर केलं गेलं होतं. तिथले लेखक, कवी, शिक्षक, पत्रकार वगैरेंनी एका सूरात त्याचा निषेध केला. सैन्याचा आणि सरकारचा धि:कार केला. न्याय, समता या गोष्टी धर्मनिरपेक्षतेनं सर्वांना मिळायला हव्यात हा त्यांचा आग्रह होता. एमिल झोलानं तेव्हाच ती प्रसिद्ध पुस्तिका लिहिली-ज्यक्यूज़ (मी आरोप करतो की-). या रेट्यामुळे देफ्रसची मुक्तता झाली. कारण तेव्हाचे लेखक डोळस, बोलू शकणारे आणि एकूणेक आवाज ऐकता येतील एवढ्या तीक्ष्ण कानांचे होते. कारण ते मौन बाळगणारे नव्हते. त्याचसाठी मीर तक़ी मीर कवींना उद्देशून जो एक इशारा देतो, 

शायर हो, मत चुपके रहो, अब चुप में जानें जाती हैं.

आणि हा इशारा समजून त्याला प्रतिसाद देणारेही काही लोक आहेत. बरेच असे लोक आहेत जे अजुन मुके झालेले नाही. बरेच असे लोक आहेत जे बोलत आहेत. सकारात्मक उन्मेषांची कितीतरी उदाहरणं आहेत जी या परिस्थितीतही हिंमत देत आहेत. महामारीच्या काळात पंजाबमधल्या शीख-स्त्री-पुरुष शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर उन्हा-पावसात-कडाक्याच्या गारठ्यात जे आंदोलन केलं ते इतिहासातलं इतका काळ लांबलेलं लोकशाही अहिंसक आंदोलनाचं विलक्षण उदाहरण होतं. उत्तर भारतात विद्यार्थांनी बेरोजगारी आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या अव्यवस्थेविरुद्ध जो संघर्ष उभा केला होता तो प्रश्न पडू पाहाणाऱ्यांसाठी उत्साहवर्धक होता. सीएए-एनआरसी विरोधात दिल्लीतल्या शाहीनबागमधला  निकराचा लढा भारतभर प्रेरणा देणारा ठरला. असंख्य ठिकाणी शाहीनबाग आंदोलनाला पाठिंबा देणारी त्याच धर्तीची आंदोलनं झालेली दिसून आली. देशभर त्यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या प्रचंड होती जी माध्यमांमधून दिसत नव्हती. अहिंसेनं, ठामपणे, संविधानाला सर्वोपरी मानून हा जो संघर्ष होता तो संवेदनशील नागरीकांच्या आदराला पात्र ठरला होता. त्यानं विवेक, सत्यावरची निष्ठा आणि विद्रोहातलं सौंदर्यही दाखवलं. त्या दरम्यान लोककलेचे, दृककलेचे कितीतरी प्रकार सार्वजनिक पातळीवर राबवले गेले होते. अशी कला आपल्या काळाशी जोडलेली आणि भिडलेली असते. ग्राफिटी, घोषणा, पोस्टर, गाणी आंदोलनाच्या जागी केलेली वैविध्यपूर्ण सजावट, चित्रं, कविता ह्यातून अनेकानेक प्रकारे समाजानं सत्तेला प्रश्न विचारले. पण ते प्रश्न कायम लोकशाहीवादी मार्गांनी विचारले. हजारो लोक एकत्र असताना तिरंगा, राष्ट्रगीत आणि एकत्र पंगतीत जेवणे असे नवेच प्रकार आपण गेल्या दोन वर्षात पहिले. असंख्य तरुणांची अस्वस्थता दिसत नाही, पण ती आहे. कारण विरोधाचा कोणताही स्वर ऐकू-दिसू द्यायचा नाही अशा व्यवस्थेत या तरुणांना भविष्य दिसतंय, जे अनिश्चित, बेभरवशी आहे. ते आपापल्या पातळीवर आणि आपापल्या प्रकारे व्यक्त होत आहेत आणि व्यक्त होत राहाणार आहेत. 

समकाळ अतिशय क्रूर आहे. पण तरीही मला एक स्वप्नलोक खुणावत असतो. मी आणि किंवा कोणताही भानावर असलेला कवी हा सत्तेच्या समोरचा अस्वस्थ नागरिक असतो. सतत विरोधातल्या पहिल्या रांगेत असतो. कारण मला दुर्लक्षित राहिलेले, अन्याय झालेले स्त्री पुरुष दिसत असतात. काळ असा आहे की सामान्य नागरिकाचं अस्तित्व प्रश्नांकित झालं आहे. कुणीही कधीही झुंडीनं येईल याचं संकट वाटत राहण्याचा काळ आहे. कशातही तुम्हाला अडकवलं-फसवलं जाईल  अशी परिस्थिती आहे. विवेक हरवलेला, नागरीकांच्याच मुळावर उठलेला हा काळ आहे. तो पुस्तकांचा शत्रू आहे, ज्ञानाचा शत्रू आहे. समता, स्वातंत्र्य, इतिहास, सत्य यांचा वैरी आहे. आपण हातोहात लुबाडले गेलो आहोत असं वाटतं. आजची सत्ता वंचितांच्या, वर्जितांच्या, दलितांच्या, बुद्धिवंतांच्या विरुद्ध असलेली सत्ता आहे. तिला भाषा, साहित्य, तत्वज्ञान, कला, परंपरेतलं धवल सौंदर्य यांचं वावडं आहे. त्यामुळे जागं राहणं गरजेचं वाटतं. कारण माणुसकीची पुन्हा पुन्हा स्मरण करून देणं हेच कवीचं आणि कोणत्याही कलावंतांचं आणि भान असलेल्या नागरिकाचं कर्तंव्य असतं. ते आपण केलं पाहिजे. कवी जे बोलू पाहातो ते शांत, दुखऱ्या स्वरात. ते सांगतो की अमानुष हुकूमशहांच्या सावल्या मोठ्या होत होत जिवंतपणाच्या, स्वातंत्र्याच्या, भलेपणाच्या अस्तित्वाला झाकोळून टाकताहेत. सत्य हाच द्रोह मानला जात असेल तर कवी आणखीनच ठामपणे सत्य की जय म्हणणार आहे. त्याच्या स्वरात आपले सगळे लोक, आपला देश वाचवण्याची काळजी आहे. कविता लिहिणं हे सत्याचा उच्चार करणंच आहे. 

अखेरीला माझे मित्र उदय प्रकाश यांची एक लहानशी कविता वाचतो आणि माझं हे भाषण संपवतो. आपल्याला आज आपली संस्कृती, आपलं संविधान आणि मानवी सभ्यतेतली मौलिक अशी मूल्यं टिकवायची असतील तर आपल्याला माणूस म्हणून आपण जिवंत आहोत हे सिद्ध करावं लागेल. माणूस म्हणून प्रिय असलेलं स्वातंत्र्य, समता, करूणा, न्याय यांच्यासाठी मौन सोडून बोलावं लागेल. फैज़ म्हणतो तसं ये थोड़ा वक़्त बहुत है। बोल, बोल के लब आज़ाद है तेरे।

उदय प्रकाशसुद्धा आपल्या जिवंतपणाची आठवण करून देण्यासाठी म्हणतातः 

आदमी

मरने के बाद

कुछ नहीं सोचता.

आदमी

मरने के बाद

कुछ नहीं बोलता.

कुछ नहीं सोचने

और कुछ नहीं बोलने पर

आदमी

मर जाता है.

हे आपण लक्षात ठेऊ. आणि तसं वागण्याचा कसोशीनं प्रयत्न करू. धन्यवाद.

 (समाप्त)



अन्न सुरक्षा हे आरोग्याचे प्रमुख निर्धारक आहे. त्याचा परिणाम व्यक्ती आणि अखेरीस समाजाच्या जगण्यावर, कल्याणावर, उपजीविकेवर आणि उत्पादकतेवर होतो. पुरेशा प्रमाणात सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणे ही जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगले आरोग्य वाढवण्याची गुरुकिल्ली आहे. उत्पादन ते कापणी, प्रक्रिया, साठवणूक, वितरण, तयारी आणि वापरापर्यंत अर्थात अन्न साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर अन्न सुरक्षित राहावें याची खातरजमा करण्यात अन्न सुरक्षेची महत्त्वाची भूमिका आहे. हानिकारक जीवाणू, विषाणू, परजीवी किंवा रासायनिक पदार्थ असलेल्या असुरक्षित अन्नामुळे अतिसारापासून कर्करोगापर्यंत २०० हून अधिक रोग होतात. हे रोग आणि कुपोषणाचे दुष्टचक्र देखील तयार करते, विशेषत: लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना प्रभावित करते. दूषित अन्न आणि पाण्याच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे जागतिक लक्ष वेधण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ७ जून रोजी “जागतिक अन्न सुरक्षा दिवस” हा विशेष दिवस घोषित केला आहे. २०२२ या वर्षीची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' ही आहे. 

जगातील अविकसित देशांप्रमाणे भारतातही अशा लोकांची संख्या मोठी आहे ज्यांना जगण्यासाठी पुरेसे अन्न मिळत नाही. एवढेच नाही तर त्यांना मिळणाऱ्या अन्नातही पोषक तत्वांचा अभाव असतो. अन्नाची ही समस्या देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या गंभीर संकटाचे कारण बनलेली आहे. आजही लहान मुलांपासून वयोवृद्ध पर्यंत लोक भुकेने जीव गमावतांना आढळतात, अशी बातमी नेहमीच येत असते. अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) अहवालानुसार, भारतातील सुमारे १४.८ टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. प्यू रिसर्च सेंटरने अहवाल दिला होता की, गेल्या एका वर्षात भारतात दिवसाला १५० रुपये (खरेदी शक्तीवर आधारित उत्पन्न) मिळवू न शकणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. वर्षभरात अशा लोकांच्या संख्येत सहा कोटींनी वाढ झाली असून त्यामुळे गरिबांची एकूण संख्या आता १३.४ कोटींवर पोहोचली आहे. १९७४ नंतर प्रथमच देशातील गरिबांची संख्या तर वाढलीच पण ४५ वर्षांनंतर भारत पुन्हा मोठ्या प्रमाणात दारिद्र्य असलेला देश बनला आहे. नीति आयोगाने अलीकडेच बहु-आयामी गरीबी निर्देशांक (एमपीआई) जारी केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक चार भारतीयांपैकी एक बहुआयामी गरीब आहे.

जागतिक स्वास्थ संगठन च्या मते, अन्न सुरक्षा, पोषण आणि अन्न बचाव यांचा अतूट संबंध आहे. अंदाजे ६०० दशलक्ष अर्थात जगातील १० पैकी जवळजवळ १ माणूस दूषित अन्न खाल्ल्यानंतर आजारी होवून ४,२०,००० लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात, परिणामी ३३ दशलक्ष निरोगी जीवन वर्षे गमावतात. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये असुरक्षित अन्नामुळे उत्पादकता आणि वैद्यकीय खर्चामध्ये दरवर्षी ११० अब्ज गमावले जातात. ५ वर्षांखालील मुलांना अन्नजन्य रोगाचा ४०% भार सहन करावा लागतो, त्यामुळे दरवर्षी १,२५,००० मुलांचे जीव दगावतात. अन्नजन्य रोग आरोग्य सेवा प्रणालींवर ताण आणून आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था, पर्यटन आणि व्यापाराला हानी पोहोचवून सामाजिक-आर्थिक विकासात अडथळा आणतात. 

११६ देशांमधील ग्लोबल हंगर इंडेक्स २०२१ मध्ये, भारत २०२० च्या ९४ व्या स्थानावरून आता १०१ व्या स्थानावर घसरला आहे. भारत बहुतेक शेजारी देशांच्या मागे आहे. पाकिस्तान ९२, नेपाळ ७७, बांगलादेश ७६ आणि श्रीलंका ६५ व्या क्रमांकावर आहे. निर्देशांकानुसार, भारतापेक्षा फक्त १५ देश वाईट स्थितीत आहेत. २०१४ च्या क्रमवारीत भारत ५५ व्या स्थानावर होता. द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड २०१९ नुसार, अनेक दशकांच्या सतत घसरणीनंतर, २०१५ पासून जागतिक उपासमारी हळूहळू वाढत आहे. २०१८ मध्ये जगातील अंदाजे ८२१ दशलक्ष लोक उपासमारीने ग्रस्त होते. ऑक्सफॅम या गरिबी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे की, जगभरात भुकेने दर मिनिटाला ११ लोकांचा मृत्यू होतो. गेल्या एका वर्षात संपूर्ण जगात दुष्काळासारख्या परिस्थितीचा सामना करणाऱ्यांची संख्या सहा पटीने वाढली आहे. अहवालात म्हटले आहे की जगातील सुमारे १५५ दशलक्ष लोक अन्न असुरक्षिततेच्या तीव्र संकटाचा सामना करत आहेत आणि हा आकडा मागील वर्षाच्या आकडेवारीपेक्षा २० दशलक्ष अधिक आहे.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम च्या अन्न कचरा निर्देशांक अहवाल २०२१ प्रमाणे भारतात, घरगुती अन्न कचऱ्याचा अंदाज दरवर्षी ५० किलो आहे, किंवा देशभरातील वर्षाला एकूण ६८,७६०,१६३ टन इतका आहे. यूएनईपी च्या अहवालानुसार, २०१९ मध्ये अंदाजे ९३१ दशलक्ष टन अन्न वाया गेले. अहवालात नमूद केले आहे की, २०१९ मध्ये, ६९० दशलक्षाहून अधिक लोक उपासमारीने प्रभावित झाले. आपल्याकडे आणखी एक चिंताजनक गोष्ट आहे म्हणजे देश कमकुवत कोल्ड चेन पायाभूत सुविधेचा अभावामुळे आपल्या शेतातील उत्पादनाचा महत्त्वपूर्ण भाग दरवर्षी १६% फळे आणि भाज्या (शीतगृह सुविधा अभावी) वाया घालवतो. भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) गोदामांमध्ये दरवर्षी धान्याचे डोंगर सडत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ३८,००० मेट्रिक टन पेक्षा जास्त अन्नधान्याचे नुकसान झाल्याचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने उघड केले आहे. भारताने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आतापर्यंत ६१०.२२ अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंची आयात केली, जी त्याच्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५४.७१ टक्क्यांनी वाढली आहे. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या अहवालात सांगितले की सर्व अकाली मृत्यूंपैकी ८० टक्के मृत्यू दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात. भारतातील अन्न भेसळ हे शेतातूनच सुरू होते जिथे खते आणि कीटकनाशकांचा अतिवापर होतो. 

आज इतक्या मोठ्या प्रमाणावर गरिबी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक असमानता वाढली असतांना प्रत्येक माणसाला पोषक आहार घेणे कितपत शक्य आहे, अन्न सुरक्षा तर दूर पण गरिबांना शुद्ध प्राणवायू किंवा शुद्ध पाणी सुध्दा मिळत नाही. मोठ्या कष्टाने दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करण्यात गरिबांचे जीवन संपून जाते, तर पोषक तत्वाने भरपूर अन्न कुठून कमविणार. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वांची गरज असते, त्यांच्या कमतरतेमुळे आपण अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकतो. कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे, खनिजे हे पोषक घटक आहेत ज्यांची शरीराला सर्वात जास्त गरज असते. 

अन्न सुरक्षेमुळे मानवांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. देशाचा विकासासाठी नागरिकांचे अन्न सुरक्षेसंबंधी नियोजन व अंमलबजावणी योग्यरीत्या हाताळणे खूप गरजेचे आहे. अन्न सुरक्षेचा दुष्परिणाम समाजाचा प्रत्येक घटकांवर होतो, समाजात असमतोलपणा वाढतो, कुपोषण, दारिद्र्यता, उपासमार, आजार, मुत्यूदर वाढतात. ह्या समस्या इतर समस्यांना जन्म देतात. देशाचा विकासात मोठा अडथळा निर्माण होतो, आर्थिक ताण वाढतो, मानवी जीवनाचा ह्रास होतो. देशाचा प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाने अन्न सुरक्षेच्या गॅरंटी सह युद्धस्तरावर कार्य करणे गरजेचे आहे. कुपोषण, गरिबी, महागाई, बेरोजगारी, आर्थिक असमानता, उपासमार, अन्नाची नासाडी सारख्या समस्यांवर नियंत्रण करणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्काचे पोषण आहार मिळू शकेल, त्यामुळे सर्वांना जीवनात विकासाचा संधी मिळतील, आयुष्यमान वाढेल, रोगराई कमी होईल, आजारावरील खर्च कमी होईल, आयात कमी होवून निर्यात वाढेल, देश आत्मनिर्भर होईल, देशाचे उत्पन्न वाढेल आणि देशाच्या सुखी समृद्धि होण्यास हातभार लागेल.


- डॉ. प्रितम भी. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041



प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की या जगात जे काही प्रेषित पूर्वी होऊन गेले आहेत त्यांच्या शिकवणीत असे म्हटले आहे की ‘‘जर तुम्हाला लाज वाटत नसेल तर मग तुम्ही वाटेल ते करा.’’

(अबु उकबा, अम्रो अन्सारी, बुखारी)

याचा अर्थ असा की ज्या माणसाला कोणतेही कृत्य करताना लाज वाटत नसेल तर तो काहीही करू शकतो. कुकर्म करताना ज्या माणसाला लाज वाटत असेल तर तो असे कृत्य करणार नाही.

दुसऱ्या एके ठिकाणी प्रेषित (स.) म्हणाले की, जेव्हा अल्लाह एखाद्या माणसाला नष्ट करू इच्छितो तेव्हा तो त्याच्याकडून लाज-लज्जा हिरावून घेतो. आणि ज्या माणसाकडून हे काढून घेतले ते तर अशा माणसाला कुणी पसंत करत नाही. इतर लोक त्याची घृणा करतात. आणि जेव्हा तो माणूस या दशेला पोहोचतो तेव्हा अल्लाह त्याच्याकडून प्रामाणिकता हिरावून घेतो. तेव्हा तो इतरांशी प्रामाणिक राहत नाही. छल-कपट करतो. जेव्हा अशी व्यक्ती या दशेपर्यंत पोहोचते तेव्हा अल्लाह त्याच्याकडून दयाभावना हिरावून घेतो. अशा अवस्थेत तो भ्रष्टाचार आणि अनैतिकतेत गुरफटून जातो. या दशेपर्यंत पोहोचल्यावर अल्लाह त्याच्याकडून श्रद्धा हिरावून घेतो. आणि या अवस्थेत तो सैतानासारखा होऊन जातो.

प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘लाज माणसाला भलाईकडे नेते. ज्या माणसामध्ये हे दोन गुण असतात त्याला अल्लाह पसंत करतो.’’

त्यांच्या अनुयायींनी विचारले, ‘ते दोन गुण कोणते?’

प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘शालीनता आणि लज्जा.’’

अनुयायींनी पुन्हा विचारले, ‘ह्या गोष्टी आधीपासूनच आहेत की आताच आहेत.’

प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, ‘‘हे पूर्वीपासूनच आहेत.’’

प्रेषित (स.) यांनी आणखी एके ठिकाणी असे म्हटले आहे, ‘‘अल्लाहशी अशा प्रकारे लज्जा बाळगा जसे तुम्ही घरातल्या वडीलधारी माणसांसमोर लज्जा बाळगता. अल्लाहपासून लाजण्याचा अर्थ असा की आपल्या डोक्यामध्ये आणि पोटात वाईट आणि निषिद्ध गोष्टी जाऊ देऊ नका. आणि सदैव मृत्यू आणि परीक्षेची आठवण ठेवत राहा.’’

एक अनुयायी प्रेषित (स.) यांच्याकडे ज्ञानाच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आले आणि त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, ‘आपण मला कोणत्या गोष्टीचे आचरण करण्याची शिकवण देता?’

प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, ‘‘नेकी करा. वाईटांपासून अलिप्त राहा आणि लोकांना तुमच्यमधील कोणत्या गोष्टी आवडतील ते पाहा आणि त्यानुसारच कार्य करत राहा. लोकांना तुमच्या काही गोष्टी आवडल्या नसतील तर त्या सोडून द्या.’’

प्रेषित मुहम्मद (स.) नेहमी अशी प्रार्थना करत होते की ‘‘हे अल्लाह, आमच्यामध्ये आपली इतकी भीती निर्माण कर जी आपत्तीपासून आम्हाला वाचवील आणि अशा प्रकारे आचरण करण्याची आम्हास क्षमता प्रदान कर जी तुझ्यावर प्रेम करण्यापर्यंत आम्हाला पोहोचविण्यात आमची मदत करील.’’

(संदर्भ- ह. अब्दुल्लाह बिन उमर (र.))

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(६)...आणि तुला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचण्याचे शिकवील. आणि तुझ्यावर व याकूब (अ.) च्या संततीवर आपली देणगी त्याचप्रकारे पूर्ण करील ज्याप्रकारे यापूर्वी त्याने तुझे वाडवडिल इब्राहीम (अ.) व इसहाक (अ.) यांच्यावर केलेली आहे. निश्चितच तुझा पालनकर्ता सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.’’ 

(७) वस्तुस्थिती अशी आहे की यूसुफ (अ.) आणि त्याच्या भावांच्या या वृत्तान्तामध्ये प्रश्न करणाऱ्यांकरिता मोठा संकेत आहे. 

(८) हा वृत्तान्त असा सुरू होतो की, त्याच्या बांधवांनी आपापसांत सांगितले, ‘‘हा यूसुफ (अ.) आणि याचा भाऊ दोघे आमच्या वडिलांना आम्हा सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहेत, वास्तविक पाहता आम्ही एक पूर्ण जथ्था आहोत, खरी गोष्ट अशी आहे की आमचे वडील पूर्णपणे बहकले आहेत.



६) मूळ अरबी भाषेत `तावीलुल अहादीस' शब्द प्रयोग झाला आहे. याचा अर्थ स्वप्नाचे फळ दाखविणे हाच अर्थ नाही तर एक अर्थ असाही होतो की अल्लाह तुला परिस्थितीचे ज्ञान आणि सत्यापर्यंत पोहचण्यासाठी मार्गदर्शन करील आणि ती वैचारिक दृढता तुला देईल ज्यामुळे प्रत्येक स्थितीत तू खोलात शिरून तळ गाठण्याची योग्यता प्राप्त् करशील.

७) बायबल आणि तलमूदचे वर्णन कुरआन वर्णनापासून वेगळे आहे. त्यांचे वर्णन असे आहे की पैगंबर याकूब (अ.) यांनी स्पष्ट ऐकून मुलाला रागवले आणि म्हणाले की तू असे स्वप्नसुद्धा पाहात आहेस, की मी आणि तुझी आई आणि सर्व मिळून तुला सजदा (नतमस्तक) करतील. परंतु विचारांती ही गोष्ट त्वरित समजते की पैगंबर याकूब (अ.) यांच्या पैगंबरत्वाच्या आचरणाने कुरआन स्पष्टीकरण अधिक जवळचे वाटते, बायबल आणि तल्मूदचे वर्णन मेळ खात नाही. पैगंबर यूसुफ (अ.) यांनी स्वप्न सांगितले होते. त्यांनी आपली इच्छा आणि आकाक्षांचे वर्णन काही केले नव्हते. स्वप्न जर खरे होते आणि पैगंबर याकूब (अ.) यांनी त्याचा जो अर्थ काढला त्यावरून स्पष्ट होते की ते एक खरे स्वप्न होते, म्हणूनच याचा स्पष्ट अर्थ होतो की पैगंबर यूसुफ (अ.) यांचीही इच्छा नव्हती तर अल्लाहचा तो निर्णय होता की उत्कर्ष प्राप्त् होईल. एक पैगंबराची तर लांबची गोष्ट आहे, एका समजूतदार माणसाचेसुद्धा हे काम होऊ शकते की अशा गोष्टीने वाईट वाटून घेऊन स्वप्न पहाणाऱ्याला रागवावे? काय एखादा सज्जन पिता असा होऊ शकतो काय जो आपल्या पुत्राच्या भावी प्रगतीची शुभसूचना ऐकून खूश होण्याऐवजी त्याचा द्वेष करू लागेल?

८) म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांचे सख्खे भाऊ बिन यामिन आहे जे यूसुफ (अ.) पासून काही वर्षानी लहान होते. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईचे निधन झाले होते. याच कारणामुळे पैगंबर याकूब (अ.) या दोन्ही विना आईच्या मुलांची जास्त काळजी घेत होते. याव्यतिरिक्त या प्रेमाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या सर्व मुलांमध्ये पैगंबर यूसुफ (अ.) हाच  समजदार आणि सौभाग्यशील असा पुत्र होता. पैगंबर यूसुफ (अ.) यांचे स्वप्न ऐकून त्यांनी जे काही सांगितले त्यावरून स्पष्ट झाले होते की ते आपल्या या पुत्राच्या असाधारण क्षमतांना चांगल्या प्रकारे जाणून होते. दुसरीकडे त्या दहा मोठ्या मुलांच्या आचरणांचा अंदाज पुढील घटनांनी होतो. मग असे आपण कसे म्हणू शकता की एक सदाचारी मनुष्य अशा दुराचारी पुत्रांशी खुश राहील? परंतु बायबलमध्ये यूसुफ (अ.) यांच्या भावांच्या द्वेषाचे एक कारण हे दाखविले गेले की ज्याने उलटा आरोप यूसुफ (अ.) यांच्यावर येतो. ही एक विटंबना आहे. बायबलमध्ये उल्लेख आहे की पैगंबर यूसुफ (अ.) भावांच्या चहाड्या वडिलांजवळ करीत होते, त्यामुळे त्यांचे भाऊ त्यांच्याशी नाराज होते.

९) या वाक्याचा भावार्थ समजण्यासाठी खेडुतांच्या भटक्या जमातीच्या जीवनाला डोळयांपुढे ठेवले पाहिजे. जेथे राज्य नसते आणि एकमेकांच्या मदतीने टोळया आपापली वसाहत करतात. तिथे एका माणसाची शक्ती त्याच्या मुलांवर, नातीपोती, भाऊ इ. वर अवलंबून असते. हे सर्व वेळेवर त्याच्या पाठीमागे उभे राहणारे `हिमायती'  असतात.  अशा  स्थितीत  स्त्रिया, मुले  यांच्यापेक्षा  माणसाला  ती  जवान मुले अधिक कामाची  वाटतात. कारण  ते वेळप्रसंगी त्याच्या पाठीशी उभे राहातात. यामुळेच या भावांनी सांगितले की आमचा बाप म्हातारपणी बावचळलेला आहे. आम्ही तरुण पुत्रांचा मजबूत गट त्यांच्या मागे वाईट प्रसंगी उभा राहू शकतो. परंतु त्याना आम्ही तरूण मुलं प्रिय नाहीत तर हे लहान दोन पुत्र प्रिय आहेत जी त्यांच्या काहीच कामी येऊ शकत नाहीत. ते तर स्वत: दुसऱ्यावर आश्रित आहेत.



२०१४ला भारतवासींयासमोर अनेक आश्वासनांची खैरात करत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आलं. नंतर या मोदी सरकारने "चुनावी जुमला" या नावाने आश्वासनाकडे पाठ फिरवून बेसुमार महागाई, प्रचंड बेरोजगारी, याशिवाय अनेक दैनंदिन समस्यांकडे पध्दतशीरपणे दूर्लक्ष करून भारतीयांना निराश केले, नोटा बंदीच्या निर्णयाने अनेकांना प्रचंड शारिरीक, मानसिक आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. अर्थव्यवस्था विस्कळीत झाली.मात्र अलीकडे मंदिर-मशीद, लाऊड स्पीकर अर्थात भोंगे, अजान विरुद्ध हनुमान चालीसा, ईडीच्या कारवाया यांसारख्या विषयांवर रान पेटविले जाते आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे महागाईसह अन्य मुद्द्यांवर जनतेचं लक्ष केंद्रित होऊच नये, म्हणून असे प्रत्यक्ष विधायक नसलेले पण समाजात दुही माजवणारे मुद्दे उपस्थित केले जात आहे. त्यामुळे महागाई बेसुमार वाढलेली असतांनाही कोणी त्याबद्दल विरोधात बोलायला सुद्धा तयार नाही.  

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या आकडेवारीनुसार आपल्या देशातील सध्याची रोजगार व बेरोजगारी यांची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत एक संस्था आहे. तिला राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय म्हणतात. या संस्थेचं काम प्रामुख्यानं देशातील रोजगार आणि बेरोजगारीची स्थिती शोधणं तसेच घरगुती ग्राहक खर्च, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा इत्यादी विषयांवर मोठ्या प्रमाणावर नमुना सर्वेक्षण करणं हे आहे. या एजन्सीचा ताजा अहवाल सामान्यांचं जगणं किती कष्टप्रद व अवघड झालं आहे, याचं प्रत्यक्ष चित्रच समोर उभे करतो.  या संस्थेनं एप्रिलसाठी जाहीर केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकातील (सीपीआय) महागाईचा दर गेल्या आठ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये महागाई ७.७९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या वर्षी मार्चमध्ये हाच महागाई दर ६.९५ टक्के होता, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हा दर ४.२३ टक्के होता. या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य गरीब माणसालाच बसत नाही, तर देशातील मोठ्या संख्येने असलेल्या मध्यमवर्गीयांनाही बसला आहे. गरीब व मध्यमवर्गीय दोन्ही घटकांचा आवाज अलिकडच्या काळात फारच क्षीण झाला आहे, दैनंदिन घरखर्च भागवतांना तो मेटाकुटीला आला आहे, त्यातूनही त्यांने महागाईच्या विरोधात आवाज उठवला तर त्यांच्या बोलण्याची दखल घेतली जात नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांत घरगुती वस्तूंच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. इंधन, मैदा, मसूर, तेल, गहू, भाजीपाला आणि गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती पाहिल्यातर,सर्वसामान्यांनी जगावे कसे,असा प्रश्न उपस्थित होतो. महागाई नियंत्रणासाठीचे सरकार बिलकुल प्रयत्न करीत नाही, हे एव्हाना सर्वांच्याच लक्षात आले आहे. या वर्षी एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाईतही जी वाढ झाली आहे. ती चिंताजनक आहे.अन्नधान्य महागाई गेल्या मार्चमध्ये ७.६८ टक्क्यांवरून आता ८.३८ टक्क्यांवर पोहोचली आहे. अर्थशास्त्राच्या जगात ही वाढत्या महागाईची सर्वात मोठी धोक्याची घंटा मानली जाते. भाजीपाल्यात सर्वाधिक महागाई वाढली आहे. मार्चमध्ये भाज्यांची महागाई ११.६४ टक्के असताना एप्रिलमध्ये ती १५.४१ टक्क्यांवर पोहोचली.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करण्याबाबत केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकून टाकत आहे, राज्य सरकार जोपर्यंत कर कमी करत नाही, तोपर्यंत आम्ही तो कुठून आणि कसा मिळवणार, अशी ओरड केली जाते. भरपाई पूर्ण करण्यास सक्षम व्हा; परंतु कोणत्याही सरकारकडं महागाई रोखण्याचं एकमेव हत्यार असते, ते म्हणजे जनतेला दिलासा देण्यासाठी कर कपात करणं. मे २०१४ पासून आतापर्यंत म्हणजेच मोदी सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कातही या काळात ५३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड म्हणजेच कच्च्या तेलाच्या किंमती अजूनही मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला होत्या तशाच आहेत. या दरम्यान सरकारनं आपली तिजोरी तेलाच्या करातील पैशानं भरली आहे. गेल्या तीन वर्षांत केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील करातून सुमारे आठ लाख दोन हजार कोटी रुपये कमावले आहेत. २०१४ मध्ये केंद्रात पहिल्यांदा मोदी सरकार स्थापन झालं, तेव्हा त्या वेळी पेट्रोलवर ९.२०रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर ३.४६ रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क होतं. सध्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर २७.९० रुपये आहे, तर डिझेलवर २१.८० रुपये प्रति लिटर आहे. सरकारनं गेल्या वर्षी दिवाळीच्या आसपास शुल्कात कपात केली होती. त्यापूर्वी ते ३२.९८ रुपये आणि ३१.८३ रुपये प्रतिलिटर होतं. सध्या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात २०३ टक्क्यांहून अधिक तर डिझेलवर सुमारे ५३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या २६ मे रोजी मोदी पंतप्रधानपदाची आठ वर्षे पूर्ण करणार आहेत. देशात कुठंतरी हनुमान चालिसाच्या पठणाचा आवाज येतो, तर कुठं मंदिर पाडून मशीद कुठं बांधली, असा वाद सुरू आहे. महागाई पुन्हा एकदा चेटकीणचं रूप घेऊन उघडपणे आपल्या खिशाला लुटत आहे. वाढत्या महागाईनं गरीब वर्ग तर चिरडला आहेच; पण मध्यमवर्गीयांनाही मोठा फटका बसत आहे. किरकोळ महागाईनं गेल्या आठ वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर आता घाऊक महागाईनंही सर्व विक्रम मोडले आहेत. सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये घाऊक महागाईचा दर १५.०८ टक्के होता, जो एक नवा विक्रम आहे. गेल्या महिन्यात मार्चमध्ये तो १४.५५ टक्के होता.

कोरोनाचा प्रभाव जवळपास संपुष्टात आल्यानंतर आणि सर्व निर्बंध हटवण्यात आल्यानंतर आता अर्थव्यवस्था पूर्वीप्रमाणं रुळावर येईल आणि महागाईवर नियंत्रण ठेवणं सोपं होईल, असा दावा सरकारनं केला होता. गेल्या पाच महिन्यांतील घाऊक महागाईचा हा उच्चांक आहे. जानेवारी २०२२मध्ये महागाई दर १२.९६टक्के होता. एका वर्षाहून अधिक काळ महागाईचा दर सतत दुहेरी आकड्यांमध्ये आहे. वर्षभरापूर्वी घाऊक महागाईचा दर १०.७४ टक्के होता. एप्रिलमध्ये घाऊक महागाईच्या दरात झालेली वाढ हे तेल आणि इंधनाच्या उच्च किमतींमुळं झाल्याचा सरकारचा युक्तिवाद आहे आणि रशिया-युक्रेन युद्ध हे त्याचं प्रमुख कारण मानलं जात आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एप्रिल महिन्यात महागाई वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळं निर्माण झालेल्या पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, खनिज तेल, मूलभूत धातूंच्या किमती वाढल्या आहेत. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवते; पण ती दुधारी तलवारीसारखी असते आणि त्यामुळं अर्थव्यवस्था मंदावण्याचा धोकाही असतो, म्हणूनच सरकारनं महागाईवर तात्काळ नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. डिझेलवर उत्पादन शुल्क थोडं कमी करावं लागेल. त्यातही आठ-दहा प्रतिलिटर कमी केलं, तर मोठा फरक पडेल. जनतेला दिलासा तर मिळेल. घाऊक आणि किरकोळ महागाईही लक्षणीयरीत्या खाली येईल. या लढ्यात सामान्य माणूस होरपळत आहे. त्याची दैनंदिन खर्च भागवतांना अक्षरशः कुतरओढ होते आहे, महागाईच्या मुद्यावर सरकार एक अवाक्षर काढत नाही, उलट महागाईच्या मुद्द्यावरूध जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी अजान विरुद्ध हनुमान चालिसा, ज्ञानवापी मशीद विरुद्ध मंदिर,यांसारखे मुद्दे सतत चर्चेत आणून जनतेची दिशाभूल केली जात आहे, अर्थात विरोधक कमजोर व हतबल झाले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना या देशात कुणीही वाली नाही, हेच स्पष्ट झाले आहे, महागाईच्या वणव्यात होरपळून जाणाऱ्या सामान्य जनतेची अवस्था "मुकी बिचारी कुणीही हाका" अशी झाली आहे.

-सुनीलकुमार सरनाईक

  भ्रमणध्वनी : ९४२०३१६३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)



इस्लामोफोबिया म्हणजे मुस्लिमांबद्दल विनाकारण किंवा पुराव्याशिवाय भीती आणि तिरस्कार. हे केवळ मुस्लिमांच्या विरोधातच नाही तर एक धर्म म्हणून इस्लामच्या विरोधातही शत्रुत्व आहे. इस्लामोफोबिया हा पूर्वग्रहदूषित स्वरूपाचा मानला जातो आणि यात धार्मिक अल्पसंख्याकांविरूद्ध मालिका आणि संघटित हिंसाचार घडवून आणण्याची क्षमता आहे. हिंदुत्वाच्या पुरस्कर्त्यांना  त्याचे संस्थात्मकीकरण करण्याची इच्छा आहे. भारताकडे जे आहे ते इस्लामोफोबिया नव्हे तर संघटित जातीयवाद आहे. उजव्या विचारसरणीला सांप्रदायिकतेचे इस्लामोफोबियात रूपांतर करण्याची इच्छा आहे. इस्लामोफोबियाच्या विरोधात जातीयवाद हा कल्पित द्वेष आणि धार्मिक अल्पसंख्याकांना वगळणे यावर आधारित नाही. इतिहास, स्मृती, सामाजिक स्थान आणि आर्थिक क्रियाकलाप या मुद्द्यांशी त्याचा संबंध आहे. उदा. भारतातील सांप्रदायिकता ही फाळणीच्या इतिहासाशी निगडित आहे. धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्धच्या सांस्कृतिक पूर्वग्रहांशी याचा संबंध आहे. कदाचित, आर्थिक शोषणाचा एक घटक देखील आहे जिथे मुस्लिमांच्या मालकीची जमीन आहे आणि श्रमशक्तीमध्ये दलित आणि खालच्या जातीतील इतर हिंदूंचा समावेश आहे. इस्लामोफोबियाच्या आख्यायिकेद्वारे पकडले जाऊ शकत नाहीत अशा समुदायांमधील हे रिअल-टाइम हितसंबंधांचे संघर्ष आणि सांस्कृतिक मतभेद आहेत जे बहुसंख्य समुदायाच्या अवाजवी आणि तर्कहीन द्वेषावर आधारित आहे. हिंदुत्ववादी बहुसंख्याकवादाला इतिहासाच्या गुंतागुंतीच्या पलीकडे जाऊन मुस्लिमांच्या अतर्क्य द्वेषाकडे जाण्याची इच्छा आहे. अशा अतर्क्य द्वेषामुळे शेवटी बहुसंख्याकांचे मनसुबे उघड होऊ शकतात आणि धार्मिक अल्पसंख्याकांना हद्दपार करण्याचे वर्चस्ववादी समर्थन मिळू शकते. यामुळे द्वेष नैसर्गिक आणि सार्वत्रिक होऊ शकतो. त्यानंतर हिंसाचार व संघटित दंगलींवर अवलंबून राहण्याची गरज नाही, परंतु ती 'नैसर्गिकरित्या' किंवा उत्स्फूर्तपणे केली जाऊ शकते. हे विविध तथ्यशोधक अहवालांतील पुराव्यांवरून स्पष्ट होते. भारतात मुस्लिमांविरूद्ध द्वेष मोठ्या प्रमाणात आणि संस्थात्मक आहे. परंतु भारतात जे काही आहे ते म्हणजे 'संदर्भात्मक सांप्रदायिकता' जी स्थानिक इतिहासाशी आणि भूतकाळातील समुदायांमधील हिंसाचाराच्या स्मृतीशी आणि समकालीन सांस्कृतिक मतभेदांशी जोडली गेली आहे. धर्मनिरपेक्ष शक्तीसुद्धा अनेकदा सांप्रदायिकतावाद आणि इस्लामोफोबिया यांच्यात फरक करण्यात अपयशी ठरतात. भारतात जे काही अस्तित्वात आहे, ते म्हणजे सांप्रदायिकता. हिंदुत्वाला जे साध्य करायचे आहे ते म्हणजे कपटी जातीयवादाचे रूपांतर मोठ्या प्रमाणात इस्लामोफोबियामध्ये करणे. केवळ मुसलमानांबद्दलच नव्हे तर इस्लामबद्दल धर्म म्हणून प्रचंड, तर्कहीन आणि निराधार द्वेष आहे. हे सत्यापासून खूप दूर आहे. धर्मांधांमधील सर्वात वाईट लोकही संदेष्ट्याचा गैरवापर करत नाहीत तर केवळ मुस्लिमांचा तिरस्कार करतात. सर्व धर्म हे सत्याचे मार्ग आहेत हे ते मान्य करतील पण मुसलमानांवर त्यांचा विश्वास नाही. कोणत्याही प्रकारच्या सहवासाची शक्यता नाकारण्यासाठी एक धर्म म्हणून इस्लामबद्दल द्वेष निर्माण करण्याची हिंदुत्वाची इच्छा आहे. ही दृष्टी मुळातच हिंसक आणि विस्तारवादी आहे आणि बहुसंख्य हिंदूंच्या रोजच्या अनुभवाला पुष्टी देत नाही. हिंदुत्वाच्या मनसुब्याबद्दल सहानुभूती बाळगणारेही बहुतेकदा असे मत मांडतात की, सगळेच मुसलमान वाईट नसतात. त्यांना चांगले आणि मदत करणारे मुस्लिम माहित आहेत. परंतु इतिहासाच्या ओघात मुसलमानांचा संबंध हिंसेशी जोडला गेला आहे, असेही ते म्हणतील. ही संघटना म्हणजे हिंदुत्ववादी परिसंस्था त्याच्या प्रकल्पाचा कायदेशीर प्रवेशबिंदू म्हणून ज्यावर अवलंबून असते. भारतातील उजव्या विचारसरणीने जातीयवादाचे इस्लामोफोबियात रूपांतर करण्यात काही प्रमाणात यश मिळवले असले, तरी ते पूर्ण एकमत होण्याच्या जवळपासही नाही, असे म्हणता येईल. इस्लामोफोबियाचा आधार घेण्याऐवजी जे इतिहास आणि संस्कृती अस्तित्वात आहे म्हणून ते नाकारत आहेत, धर्मनिरपेक्ष-लोकशाही शक्तींनी जातीयवादाच्या मुळावर पुन्हा लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि भूतकाळातील धार्मिक समुदायांमधील हिंसाचाराच्या स्मृतींना दफन करण्याची आणि वर्तमानकाळात त्याचा प्रतिकार करण्याची साधने शोधण्याची गरज आहे. त्याचा विपर्यास करण्यासाठी संघ परिवार इतिहासाला कमी लेखतो. धर्मनिरपेक्ष शक्ती त्याला कमी लेखू शकत नाहीत कारण त्यांना त्याच्या गुंतागुंतीशी वाटाघाटी करणे कठीण जाते आणि असे करताना त्यांनी जातीयवादाचे इस्लामोफोबियामध्ये रूपांतर करण्याची वैधता आधीच मान्य केली असेल. म्हणून इस्लामोफोबियारुपी विषाचे मूळ येथील जातीव्यवस्थेत आहे हे स्पष्ट होते. भारतातील हिंदुत्ववादी मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत होते, मात्र आता ते देशावर बेतले आहे. तुर्कस्तानने आमचा गहू परत केला आहे, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने आमची उत्पादने खरेदी करणे बंद केले आहे, इंडोनेशियाने आम्हाला पाम तेल विकणे बंद केले आहे. आंतरराष्ट्रीय बहिष्कारामुळे भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. कोणत्याही धार्मिक व्यक्तीची बदनामी करण्यावर पक्षाचा विश्वास नाही, असे भाजपने केलेले अत्यंत दांभिक विधान आणि त्यामुळे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून प्रवक्त्यांवर निलंबन ओढवले. मात्र इस्लामोफोबियाने ग्रासलेले वाचाळवीर हे भाजपचे टोपण नाव बनले आहे. भाजप प्रवक्त्यांनी पैगंबरांची केलेली बदनामी ही या राष्ट्रासाठी अधोगतीकडे वाटचाल असल्याचे दिसते.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget