Halloween Costume ideas 2015
Latest Post


अजानविषयी अतिशय संतुलित संवैधानिक भुमिका घेणे गरजेचं आहे. पण याविषयी दोन्ही बाजुंनी अतिशय टोकाच्या भुमिका घेतल्या जात आहेत. सगळ्याच धर्मस्थळांवरचे लाऊड स्पीकर्स बंद करून टाकायचे, फटाके, डिजे, वाजंत्री, टाळ, मृदंग यावर सरसकट बंदी आणून टाकायची, अजिबात ध्वनी नावाचा प्रकारच देशात नको, ही अतिरेकी भुमिका एकीकडे. 

दुसरीकडे सण उत्सवांच्या नावाने कानफाडू डिजे लावायचे, फटाके फोडायचे, भोंग्यांचं तोंड करून उंच मोठ्या आवाजात अजान म्हणायची ही टोकाची भुमिकाही चुकीची आहे. तर यातला मध्यम मार्ग स्वीकारला पाहिजे. कोणत्या साउंड झोनमध्ये किती डेसीबलपर्यंतच्या ध्वनी मर्यादा हव्या, सायलेन्स झोन (दवाखाने, शाळा परिसर) मध्ये किती, औद्योगिक परिसरात किती याचा सगळा चार्ट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या सेंट्रल पोलुशन कंट्रोल बोर्ड (सीपीसीबी) तर्फे पुढीलप्रमाणे निश्चित केलेला आहे -

1) औद्योगिक परिसर - दिवसा 75, रात्री 70 डेसीबल्स

2) व्यावसायिक परिसर - दिवसा 65, रात्री 55 डेसीबल्स

3) नागरी वस्तींचा परिसर - दिवसा 55, रात्री 45 डेसीबल्स

4) सायलेन्स झोन - दिवसा 50, रात्री 40 डेसीबल्स.

अशाप्रकारे या मर्यादांच्या चौकटीत राहून, इतर सर्व प्रशासकीय औपचारिकतांची पूर्तता करून प्रत्येक धर्मस्थळाच्या व्यवस्थापन समित्यांनी ध्वनिक्षेपक वापरले पाहिजे. सरकारनेही एका मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या ध्वनिक्षेपकांच्या निर्मितीवरच बंदी आणली पाहिजे. आणि हो, जनतेला काडीचाही फायदा नसणाऱ्या राजकीय सभा घेणाऱ्यांनीही न्यायालयाच्या मर्यांदांचे पालन करण्याची गरज आहे. सरकारने याबाबतीत धर्मदाय संस्थांमध्ये जनजागरण करण्यासाठी तशी पत्रके उपलब्ध करुन दिली पाहिजे. सरकार, धर्मदाय संस्था, सीव्हिल सोसायटी आणि पोलीस प्रशासन मिळून मार्ग काढू शकतात. ध्वनी प्रदुषण नकोच, ते आरोग्यासाठी घातक आहेच, पण त्यासोबतच हे वास्तव पण स्वीकारलं पाहिजे की, भारत हा संस्कृतिप्रधान देश आहे, सुरीला, स्वरमय देश आहे. येथे अजान, भजन, त्रीशरण, गुरुबानी होणारच अन् ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जोरात होणारच. वेगवेगळ्या मोहोल्ल्यातील मस्जिदींमध्ये स्थानिक लोकांच्या वेगवेगळ्या सवलतीप्रमाणे सामुदायिक नमाजच्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्यांचं वेळापत्रक ॠतुमानानुसार दर महिन्याला थोडं थोडं बदलत असतात. त्यामुळे कोणत्या मस्जिदीत सामुदायिक नमाजची कोणती वेळ आहे, ते दुसऱ्या मोहोल्यातून आलेल्या किंवा रस्त्यात जाता जाता वेळ झाल्यावर नमाज पढणाऱ्यांना माहिती असणे शक्य नाही. या अडचणही लक्षात घेतली पाहिजे. म्हणून देशाचा जातीय सलोखा क़ायम राखण्यासाठी मध्यम मार्ग काढणे आवश्यक आहे.

मस्जिदीवरच्या स्पीकर्सचं महत्व त्या मातेला विचारा, जिचं लेकरू हरवल्यावर मस्जिदिंच्या माईकवरून सुचना मिळाल्यावर तीचं लेकरू तीला सापडलं होतं. महत्वाचं म्हणजे मुस्लिमांनीही अजानचं मराठी, हिंदी व इतर भाषेत भाषांतर करून ते मुस्लिमेतर लोकांना समजाऊन सांगितले असते तर त्यांना कदाचित अजान कर्कश वाटली नसती. 



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘‘अल्लाह म्हणतो, माणूस आपल्या पुण्य कर्मांद्वारे माझ्याशी सतत जवळीक साधत असतो. आणि मग मी त्याचे डोळे, त्याचे कान आणि हात व पाय बनतो. ज्याद्वारे तो पाहतो, ऐकतो आणि धरतो व चालतो. त्याने माझ्याकडे (जे काही) मागितले तर मी ते जरूर देईन. अल्लाहचे हक्क अदा करीत राहिले आणि मर्यादांचे उल्लंघन केले नाही तर तो तुम्हाला तुमच्या समक्ष दिसेल. प्रत्येक स्थितीत तो तुमच्या जवळ असेल. तुम्हाला मदत करीहल, तसेच तुमचे रक्षण करत राहील.’’

प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘तुम्ही भरभराटीच्या दिवसांमध्ये अल्लाहशी ओळख केली तर तो बिकट परिस्थितीत तुम्हाला ओळखेल.’’

‘‘अल्लाह म्हणतो, कुणी मला साद घालणारा आहे, मी त्याला प्रतिसाद देईन. कुणी माझ्याकडे काही मागणारा आहे, मी त्याच्या मागण्या पूर्ण करीन. कुणी माझ्याकडे क्षमायाचना करणारा आहे, मी त्याला क्षमा करीन.’’

‘‘अल्लाहकडे सतत मागत राहणे, आपल्या गरजा त्याच्याकडे मांडणे हे त्याला पसंत आहे. जो व्यक्ती अल्लाहकडे मागत नाही, त्याच्यावर अल्लाह नाराज होतो. अल्लाहपाशी तमाम निर्मितीला देण्यासाठी इतके उदंड आहे की त्याने कितीही दिले तरी त्याच्याकडे कशाचीच कमतरता राहणार नाही.’’

प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘जे काही तुम्हाला फायदा पोहचवू शकते त्याची इच्छा करा, त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा. अल्लाकडे मगत मागा. उदासीनता बाळगू नका, कारण जर कुणी अल्लाहशिवाय इतर कुणाकडे मदत मागितली तर अल्लाह अशा व्यक्तीला त्याच्याच हवाली करतो. प्रत्येक गोष्टीची एक वास्तविकता असते. जे काही एखाद्याला प्राप्त झालेले आहे ते त्याला मिळणारच होते. आणि जे काही त्याला मिळाले नाही ते त्याला मिळणारच नव्हते. ही वास्तविकता जोपर्यंत माणसाला समजत नाही तोपर्यंत तो श्रद्धावंत होऊ शकत नाही.’’

प्रेषित (स.) यांचे विधान आहे की, ‘‘अल्लाह जेव्हा काही लोक समूहांना पसंत करतो तेव्हा त्यांची परीक्षा घेतो. जे लोक (अल्लाहच्या निर्णयाशी) राजी असतात अल्लाह देखील अशा लोकांशी राजी होतो. आणि जे लोक अल्लाहच्या निर्णयाशी नाराज असतात अल्लाहदेखील अशा लोकांशी नाराज होतो.’’ (ह. अनस, तिर्मिजी)

प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘अल्लाह श्रद्धावंताविषयी जो काही निर्णय घेतो त्या निर्णयामागे श्रद्धावंताची भलाई असते. त्याला अल्हाददायक प्रसंग आल्यावर जर तो अल्लाहकडे कृतज्ञता व्यक्त करतो त्याच्यामध्ये त्याचे भले असते आणि जर त्याला काही यातना पोहोचतात तरीदेखील तो संयमाने त्या सहन करत असेल तरीदेखील अल्लाह त्याचे भले करतो.’’ (गंजीन-ए-हिकमत)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(८७) ....अथवा असे की आम्हाला आमच्या मालाचा आमच्या इच्छेनुरूप विनियोग करण्याचा अधिकार नाही?९७ केवळ तूच का एक उदारवृत्ती आणि सत्यवादी मनुष्य उरला आहेस!’’

(८८) शुऐब (अ.) ने सांगितले, ‘‘बंधुंनो! तुम्ही स्वत:च विचार करा की जर मी आपल्या पालनकत्र्याकडून एका स्पष्ट साक्षीवर होतो आणि मग त्याने मला आपल्याकडून चांगली उपजीविकादेखील दिली.९८ (तर त्यानंतर मी तुमच्या पथभ्रष्टतेत आणि हरामखोरीत तुमचा सहभागी कसा होऊ शकेन?) आणि मी हे मुळीच इच्छित नाही की ज्या गोष्टींपासून मी तुम्हाला रोखतो त्या गोष्टी मी स्वत: कराव्यात.९९ मी तर सुधारणा घडवून आणू इच्छितो जितके मला शक्य आहे आणि हे जे काही मी करू इच्छितो ते सर्व अल्लाहप्रणीत सद्बुद्धीवर अवलंबून आहे, त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि प्रत्येक बाबतीत मी त्याच्याकडेच रूजू होतो.

(८९) आणि हे देशबंधुंनो, माझ्याविरूद्ध तुमच्या अट्टाहासाने एखादे वेळी अशी पाळी आणू नये की सरतेशेवटी तुमच्यावरदेखील तोच प्रकोप कोसळावा जो नूह (अ.) अथवा हूद (अ.) अथवा सॉलेह (अ.) यांच्या लोकांवर कोसळला होता. आणि लूत (अ.) चे लोक तर तुमच्यापासून काही दूरही नाहीत.१००



९७) ही इस्लामच्या मुकाबल्यात अज्ञानतेच्या दृष्टिकोनाची पूर्ण अभिव्यक्ती आहे. इस्लामचा दृष्टिकोन म्हणजे अल्लाहच्या उपासनेशिवाय ज्या इतर उपासनेच्या पद्धती आहेत, त्या सर्व चुकीच्या आहेत आणि त्यांचे अनुसरण केले जाऊ नये. कारण दुसऱ्या पद्धतींसाठी बुद्धी, ज्ञान आणि ईशग्रंथात कोणताच पुरावा नाही. अल्लाहची उपासना फक्त सीमित धामिर्क क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही तर सभ्यता, सामाजिकता, अर्थकारण, राजकारण म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होणे आवश्यक आहे, कारण जगात माणसाकडे जे काही आहे ते सर्व अल्लाहचेच आहे. मनुष्य जगातील कोणत्याच वस्तूवर अल्लाहपासून निरपेक्ष होऊन त्याचा वापर करण्याचा अधिकारी नाही. याविरुद्ध अज्ञानतेचा दृष्टिकोन असा आहे की पूर्वजांपासून जी जीवनपद्धती चालत आली आहे, तिचेच पालन मनुष्याने केले पाहिजे. या जीवनपद्धतीवर चालण्यासाठीचा एकमेव पुरावा म्हणजे ती पूर्वजांपासून चालत आली आहे. दुसरा दृष्टिकोन म्हणजे धर्माचा संबंध फक्त पूजापाठाशीच आहे आणि मनुष्य जीवनव्यवहारांशी त्याचा अजिबात संबंध येत नाही. मनुष्याने कोणत्या पद्धतीने जीवन जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाला याचे स्वातंत्र्य आहे.

९८) 'रिज्क' म्हणजे रोजी (उपजीविका) येथे दोन अर्थात आला आहे. एक अर्थ सत्यज्ञान जे अल्लाहकडून दिलेले आहे आणि दुसरा अर्थ तोच आहे जो सामान्यत: समजला जातो. म्हणजे ती साधनसामुग्री जी अल्लाह मनुष्याला जीवन जगण्यासाठी देतो. पहिल्या अर्थाच्या दृष्टीने ही आयत याच विषयाला स्पष्ट करीत आहे जो या सूरहमध्ये मुहम्मद (स.) नूह (अ.) आणि सॉलेह (अ.) यांच्या मुखाने प्रस्तुत होत आला आहे. ते म्हणजे पैगंबरत्वापूर्वीसुद्धा मी आपल्या पालनकर्ता स्वामीकडून सत्याची स्पष्ट निशाणी आपल्या स्वत:मध्ये आणि सृष्टीच्या निशाण्यात पाहात होतो. यानंतर माझ्या निर्माणर्कत्या प्रभुने प्रत्यक्ष रूपात सत्यज्ञान मला प्रदान केले आहे. आता माझ्यासाठी हे असंभव आहे की समजून उमजून तुमच्या भ्रष्टाचारात आणि दुष्टतेच्या कामात मी तुमची साथ द्यावी. दुसऱ्या अर्थाच्या दृष्टीने ही आयत त्या व्यंगाचे उत्तर आहे जे त्या लोकांनी आदरणीय शुऐब (अ) यांना केले होते की तुम्हीच एक विशालहृदयी आणि सत्यनिष्ट व्यक्ती शिल्लक आहात. या तीव्र आणि कटु आक्रमणाचे हे थंड उत्तर दिले आहे. "बंधुनो! माझ्या पालनर्कत्या प्रभुने मला सत्य ओळखण्याचे ज्ञान दिले आणि हलाल (वैध) उपजीविका (रोजी) दिली तर तुमच्या या व्यंगामुळे ही कृपा अवकृपा कशी बनेल ? शेवटी माझ्यासाठी हे वैध कसे होऊ शकते की जेव्हा अल्लाहने माझ्यावर ही कृपा केली आहे तर मी तुमच्या मार्गभ्रष्टतेला आणि हरामखोरीला सत्य आणि हलाल (वैध) सांगू आणि अल्लहशी कृतघ्न बनू ?"

९९) म्हणजे माझ्या सत्यतेचा तुम्ही याने अंदाज लावू शकता की मी जे दुसऱ्यांना सांगतो त्यावर स्वत: आचरण करतो. मी तुम्हाला अल्लाहशिवाय इतर अस्तान्यांकडे (वेदी) जाण्यास रोखतो आणि मी एखाद्या पीराच्या स्थानाचा मुजावर (पुजारी) असतो तर नि:संदेह तुम्ही आक्षेप घेतला असता की हा स्वत:ची मुजावरी चमकवण्यासाठी दुसऱ्यांच्या दुकानांना बंद करतो आहे. मी तुम्हाला हराम (अवैध) माल खाण्यापासून  व्यवसाय चमकविण्यासाठी मी ईमानदारीची टिमकी पिटत आहे. परंतु तुम्ही पाहाता की मी या दुष्टतेपासून अलिप्त आहे आणि म्हणूनच तुम्हालासुद्धा रोखत आहे. माझे स्वत:चे जीवन या दृष्टतेपासून पवित्र आहे आणि मी तुम्हा सर्वांना या दुष्टतेपासून पवित्र पाहू इच्छितो. मी स्वत:साठी तीच जीवनपद्धती निवडली आहे ज्याकडे मी तुम्हा सर्वांना बोलवित आहे. हे याच्या ग्वाहीसाठी पर्याप्त आहे की मी या आवाहनात सत्यवादी आहे. 

१००) म्हणजे लूत (अ.) यांच्या राष्ट्राची घटना आता ताजी आहे आणि तुमच्या जवळच्याच क्षेत्रात घडली आहे. त्या वेळी लूत (अ.) यांच्या राष्ट्राच्या विनाशावर सहाशे-सातशे वषेर् लोटले असतील. भौगोलिक स्थितीला पाहता शुऐब (अ.) यांचे राष्ट्र त्या क्षेत्राच्या जवळच होते जेथे लूत (अ.) यांचे राष्ट्र वसले होते.



इस्लामची उपासनेविषयी धारणा इबादत/इस्लामी उपासनेचा सर्वसाधारणपणे हाच अर्थ घेतला जातो की, पाच वेळा नमाज अदा केली जावी, वर्षातून एक महिना रोजा पाळला जावा,जकात दिले जावे, आणि आयुष्यातून एकदा हज यात्रा केली जावी. इस्लामी उपासणा विषयक श्रद्धेचा हा एक अंश मात्र आहे. कारण इस्लाम धर्मात उपासनेची व्याख्या इतकी व्यापक व विस्तृत आहे की, यात माणसाच्या सर्व जीवन व्यवहारांचा समावेश होतो. इबादत माणसाच्या त्या सर्व कार्यक्षेत्रापर्यंत व्याप्त आहे, मग त्यांचा संबंध माणसाच्या व्यक्तिगत जीवनाशी असो किंवा सामाजिक जीवनाशी जे ईश्वराला पसंत आहेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास इबादत म्हणजे अल्लाहच्या प्रसन्नते खातर त्याने दाखविलेल्या पद्धतीनुसार केले गेलेले एखाद्या व्यक्तीचे कोणतेही काम किंवा कथन.अशा प्रकारे यात श्रद्धा तत्वे,सामाजिक रीतिरिवाज आणि कोणत्याही सजीवांच्या हितासाठी त्यांनी उचललेला वाटा या सर्व गोष्टी सम्मिलित आहेत.

इस्लाम माणसाचा संपूर्ण विचार करतो. माणसाने स्वतःला सर्वतोपरी अल्लाहच्या स्वाधीन करावे,ही इस्लामची निकड आहे. कुरआन निवेदनानुसार हजरत मुहम्मद सलम यांना घोषणा करायला सांगितले गेली, हे मुहम्मद सांगा माझी नमाज, माझी कुर्बानी,माझे जगणे माझे मरणे सर्व अल्लाहला समर्पित आहे. त्याचा कोणीही सहभागी नाही आणि मला हा आदेश दिला गेला आहे की, मी त्याचा अज्ञाधारक मुस्लिम बनून राहावे. या समर्पणाचा स्वभाविक परिणाम असा होतो की, माणसाचे सर्व जीवन व्यवहार त्याच्याकरिता प्रधान ठरतात ज्यास त्याने स्वतःला वाहून घेतले आहे.

जीवन व्यवस्थेत पोषक असण्याच्या नात्याने ईस्लाम आपल्या अनुयायांकडून ही अपेक्षा बाळगतो की, त्यांनी आपले जीवन इस्लामच्या शिकवणीच्या प्रकाशात सर्व दृष्टीने आदर्श बनवावे. हा व्यक्तिगत मामला माणसाचा ईश्वराशी व्यक्तिगत संबंध स्थापित करण्याचा एक मार्ग आहे. खरे पाहता, इस्लाम कर्मकांडावर जोर देत नाही जे यंत्रवत पार पाडले जातात आणि एखाद्या माणसाच्या अंतरात त्याचा कसलाही प्रभाव पडत नाही. कुराण म्हणतो.

सदाचार हा नव्हे की तुम्ही आपले तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करावे तर सदाचार हा आहे की जे अंतिम दिवसावर इमानधारण करतात तसेच सर्व दूतांवर.

सर्व ग्रंथ आणि सर्व प्रेषितावर इमान धारण करतात. ईश्वर प्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपले नातेवाईक आणि अनाथ, गरजवंत, वाटसरू तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात तसेच दिलेल्या वचनांची पूर्तता करतात आणि अडचणी संकटे व युद्धप्रसंगी देखील संयम राखतात हेच लोक सत्यशील आणि अल्लाहच्या कोपाचे भय बाळगणारे आहेत.

उपरोक्त सर्व सत्कर्म सत्कर्मी लोकांचे कर्म होत आणि ते उपासनेचा ते एक भाग आहेत.

प्रेषित मुहम्मद सल्ल यांनी  उपासनेचा आधार असलेल्या इमाना विषयी फर्मावले आहे, की याच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी सर्वात उच्च एका ईश्वरावर इमान ठेवणे आहे. अर्थात अल्लाह खेरीज दुसरा कोणीही ईश्वर नाही आणि सर्वात खालची शाखा म्हणजे माणसाने मार्गातील अडथळे दूर करणे आहे.

प्रत्येक शालींनता पूर्णकाम इस्लाम मध्ये एक प्रकारे उपासना आहे .

प्रेषित मुहम्मद सलम् यांनी सांगितले संध्याकाळी ज्या कोणा माणसाला काम केल्यामुळे थकवा जाणवला अल्लाह त्याच्या अपराधाना माफ करील तसेच ज्ञान प्राप्त करणे ही उपासनेची सर्वाधिक उच्चतम पातळी आहे. पैगंबर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्य आहे. आणखी एका वचनात त्यांनी सांगितलं ज्ञान प्राप्त करण्यात एक तास घालवणे सत्तर वर्ष उपासना करण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. एकमेकाविषयी दया दाखवणे आणि सहयोग देणे हा उपासनेचा भाग आहे, हेतू मात्र अल्लाहाला प्रसन्न करण्याचा असला पाहिजे. प्रेषित सल्लम यांनी सांगितले मित्राचे हसतमुखाने स्वागत करणे देखील दान आहे. जनावरावर ओझे लादताना एखाद्याला हातभार लावणे हे देखील दान आहे. एखाद्या शेजाऱ्याला विहिरीमधुन पाणी काढून देणे हे सुद्धा दान आहे.

निसंशय एखाद्या व्यक्तीचे कर्तव्यपालन ही सुद्धा उपासना हे पैगंबर सल्लम यांनी येथ पावेतो सांगितले की, एखादा माणूस जो काही आपल्या कुटुंबावर खर्च करतो ते सुद्धा एक प्रकारे पुण्यकर्म आहे. त्याला त्याचा मोबदला मिळेल जर त्याने उचित मार्गाने कमाई प्राप्त केली असेल. आपल्या कुटुंबा विषयी दयाभाव दाखविणे हा देखील उपासनेचा अंश आहे. आपल्या पत्नीच्या तोंडात घास भरवणेहे सुद्धा पुण्यकर्म आहे उत्तम दान आहे. एवढेच नव्हे तर ती कामे देखील जी आम्ही अधिकाधिक आनंद घेण्यासाठी करतो जर ती पैगंबरांच्या मार्गदर्शनानुसार केली गेली तर त्यांचाही उपासनेमध्ये समावेश होतो.

प्रेषितांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, आपल्या पत्नीशी ते जो समागम करतात त्याचाही मोबदला मिळेल. सहकाऱ्यांना आश्चर्य वाटले त्यांनी विचारले आम्हाला या कामा बद्दल कशाप्रकारे इनाम मिळेल, आम्ही अधिकाधिक आनंद भोगण्या करता करतो. त्यावर प्रेषिताने सांगितले समजा जर तुम्ही आपली वासनापुर्ती अयोग्य मार्गाने केली असती तर काय तुम्हाला त्याची शिक्षा मिळाली नसती. हो निश्चितच, सहकार्याने उत्तर दिले.

तेंव्हा उचित आहे आपल्या पत्नी द्वारे गरजपूर्ती करण्याबद्दल तुम्हाला इनाम मिळाले पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टीचा उपासनेमध्ये समावेश होतो.

इस्लाम समागमाला घाणेरडी गोष्ट समजत नाही की त्यापासून अलिप्त राहावे. ते कृत्य घाणेरडे व अपराधाचे काम अशावेळी बनते जेंव्हा या गरजेची पूर्तता योग्य मार्गाने आणि वैवाहिक जीवनापासून वेगळे होऊन केली जाते.

उपरोक्त चर्चेने ही गोष्ट स्पष्ट झाली की,इस्लाम धर्मात उपासना विषयीच्या धारणेची व्याप्ती फार मोठी आहे.यात माणसाच्या सर्व स्वीकृत हालचालींचा अंतर्भाव होतो. इस्लामी जीवन जगणे ही उपासनाच आहे. तिच्याभोवती संपूर्ण मानवी जीवन व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन, आर्थिक, राजकीय आणि अध्यात्मिक जीवन फिरत राहते.

या पैलूंनी विचार केल्यास उत्साह वाढीस लागतो.

आमचे प्रत्येक कार्य अल्लाहच्या नजरेत आहे आम्ही त्याच्या मर्जीनुसार कार्य केले तर ती उपासना ठरते. अशा प्रकारे कोणत्याही मनुष्याला अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता अधिकाधिक चांगल्या शैलीत काम करण्याचा उत्साह आपल्या अंगी जाणवतो,आणि इथूनच तो स्वतःला वाम मार्गा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्नही करतो.

विधिपूर्वक उपासना अंतर्गत वा बाह्य इस्लाम मध्ये दोन्ही गोष्टीचे महत्त्व आहे खरे तर ज्या कामांना विधिपूर्वक करण्यास सांगितले गेले आहे ते केवळ एवढ्यासाठी कि जर ती मनःपूर्वक केली गेली तर त्याने मनुष्य नैतिक दृष्ट्या  उन्नत होतो आणि अशा प्रकारे योग्य तेस पोहोचतो की अल्लाहच्या प्रसन्नते पूर्ण जीवन जगु लागतो. विधिवत दर्शविलेल्या कर्तव्यामध्ये नमाजला दोन कारणांनी मौलिक महत्त्व प्राप्त आहे.

एक असे की हे इमान प्रतीक आहे दुसरे असे की नमाज आपल्या अदा करणाऱ्यांचा संबंध ईश्वराशी दिवसातून पाच वेळा जोडून त्याला प्रत्येक प्रकारच्या दुष्कर्मा पासून रोखतो जेंव्हा तो नमाज मध्ये वारंवार असे पठण करतो की, हे अल्लाह आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडूनच सरळ मार्गावर चालण्याची मदत मागतो तेंव्हा तो ईश्वराशी आपला संबंध नव्याने जोडतो निसंशय इमान चे पहिले प्राथमिक प्रात्यक्षिक नमाज आहे आणि इमान बाळगणाऱ्यांना यशासाठी गुरुकिल्ली देखील आहे. नमाज नंतर जकात इस्लामचा अति महत्त्वाचा स्तंभ आहे कुराणामध्ये सर्वसाधारणतः नमाज आणि जकातचा एकाच वेळी उल्लेख केला गेला आहे. नमाज प्रमाणेच जकात देखील या विश्वासाची अभिव्यक्ती आहे की, केवळ ईश्वरच या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा स्वामी आहे. त्याने माणसाच्या ताब्यात जे काही देऊन ठेवले आहे, ती त्याची अनामत आहे. जिचा माणसाने अल्लाहच्या आदेशानुसार उपयोग करावा.

श्रद्धा ठेवा अल्लाह आणि त्याच्या पैगंबरावर आणि खर्च करा त्या वस्तू पैकी ज्यावर त्याने तुम्हाला नायब नियुक्त केले आहे. अशा प्रकारे जकात देखील नमाज प्रमाणे अशी उपासना आहे की, इमान बाळगणाऱ्यांना अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करून देते. या खेरीज जकात संपत्तीच्या विकेंद्रीकरणाचे एक साधन आहे. जे वर्ग आणि समूहामध्ये अंतर मिटवते सामाजिक दृढता निर्माण करण्यात जकातचा महत्त्वाचा वाटा आहे. श्रीमंतांना स्वार्थीवृत्ती पासून हटवून आणि निर्धनाचे समाजविरोधी निर्माण होणाऱ्या द्वेष भावनेपासून जतन करून जकात वर्गसंघर्षाच्या उद्रेकास पायबंद घालते आणि बंधूत्व व प्रेम भावना वृद्धिंगत करते ही दृढता धनिकांच्या स्वतःच्या इच्छेवर आधारित नाही. किंबहुना जर त्यांनी इन्कार केला तर, बलपूर्वक त्यांच्याकडून वसुली केली जाते. रमजानचे रोजे देखील महत्त्वपूर्ण स्तंभ आहे. रोजाचे मूळ कार्य मुसलमानास आतून स्वच्छ शुद्ध करणे आहे. या वृत्तीने चांगल्या-वाईटातला तारतम्य भाव जागृत होतो आणि हाच आशय कुराणमध्ये पुढील आयतीतून  दिसून येतो.

“हे श्रद्धावंतानो विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यावर जेणेकरून तुम्ही इश परायान व्हाल.”

एका सही हदीस मध्ये प्रेषित सल्लम यांनी सांगितले, “हा रोजा पाळणारा माझ्याकरिता खाणे-पिणे आणि समागमेच्छेचा त्याग करतो. म्हणूनच त्याचा मोबदला माझ्या जबाबदारीवर आहे”. रोजा माणसाची चेतना शक्ती जागृत करतो आणि एकाच वेळेस संपूर्ण समाजात भलाईचे  संचलन करतो. अशाप्रकारे माणसात एक शक्ती संचारते त्यासोबतच रोजा कामाच्या ओझ्याने लादलेल्या मानव यंत्रास संपूर्ण महिनाभर पुरेपूर आराम देतो. रोजा माणसाला अशा गरजवंताकडे लक्ष देण्यास प्रवृत्त करतो जे संपूर्ण जीवन किंवा वर्षभर आपल्या गरजा भागविण्यासाठी तळमळत राहिले. रोजा मुळेच इतरांच्या दुःखाची जाणीव होते आणि माणसाच्या अंगी इतरांबद्दल सहानभुती दयाभाव उत्पन्न होतो.

शेवटी हजकडे वळू या हा देखील इस्लामच्या महत्त्वपूर्ण स्तंभा पैकी एक आहे. इस्लामचा हा स्तंभ प्रबल एकतेचे धोतक आहे. जो प्रत्येक प्रकारचा भेदभाव मीटवतो. जगातल्या कानाकोपऱ्यातून आलेले मुसलमान सारखीच वेशभूषा असलेले एका स्वरात एकाच भाषेत हजच्या हाकेला प्रत्युत्तर देताना म्हणतात लबैक अल्लाहुम्मा लबैक ,मी हजर आहे हे माझ्या अल्ल्हा मी हजर आहे.

हज मध्ये आत्मनियंत्रणावर विशेष भर दिला गेला आहे. या प्रसंगी केवळ पवित्र वस्तुंचाच आदर राखला जातो किंबहुना रोपे आणि चिमण्यांच्या जीवनाशी ही कसल्याही प्रकारे छेडछाड केली जात नाही. यासाठी की प्रत्येक वस्तू वा जीव सुरक्षित व शांतीपूर्वक जगावा. समस्त जगातील मुसलमानांच्या प्रत्येक समूहाला वर्ग संघटनांना आणि शासनांना हज या गोष्टीची संधी उपलब्ध करून देतो की, वर्षभरातून एक वेळ त्यांनी या मोठ्या संमेलनात सहभागी व्हावे या महान संमेलनाचा समय आणि कार्यक्रम अल्लाह द्वारे निश्चित केला गेला आहे. प्रत्येक मुसलमानास संपूर्ण संरक्षण व स्वातंत्र प्राप्त असते. त्या वेळे पर्यंत की त्याने स्वतः आपल्या स्वातंत्र्यास आघात पोहोचवू नये. अशाप्रकारे इस्लाम मध्ये इबादत, उपासना विधीपूर्वक असो वा नसो माणसाला अशा रीतीने प्रशिक्षित केले जाते की, त्याने आपल्या कर्तव्याशी प्रेम करावे आणि आपल्या अंगी एवढे सामर्थ्य एकवटावे की त्याने मानव समाजातील वाईट गोष्टींचा नाश करावा आणि जगात ईश्वराच्या वाणीस व शिक्षणास उन्नत करावे.

संकलक

- अब्दुल मजीद खान 

नांदेड,  9403004232



इस्लाम धर्मामध्ये रमजान व रोजा यास असाधारण महत्व प्राप्त आहे. रमजान महिन्याला  महत्व फक्त कुरआन अवतरण झाल्यामुळे प्राप्त झालेला आहे.कुरआनच्या अध्याय दोन आयत 185 मध्ये याचा उल्लेख आहे. "रमजान तो महिना आहे ज्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले जो पूर्ण मानव जातीसाठी सत्य मार्ग दाखविणारा आहे". रोजा मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला वाटते तो दिवस भर भुका राहुन अन्न व पाणी त्यागणे आहे.पण रोज्यामध्ये फक्त खाण्यापिण्यावर निर्बंध नसतात तर अनेक गोष्टी आहेत ज्या रोज यामध्ये करू शकत नाही.सहरी (सकाळचे जेवण) ते इफ्तार (उपवास सोडे) पर्यंत पती-पत्नीमधील शारीरिक संबंधवर ही निर्बंध असते.रोजा ठेवून खोट बोलण्यासंबंधी प्रेषित मोहम्मद (सल्ल.) यांनी सांगितले की "ज्याने रोजा ठेवूनही खोटं बोलणे सोडले नाही तर अल्लाहला त्याच्या रोज्याची काहीच आवश्यकता नाही त्याने रोजा ठेवणे न ठेवणे सारखेच आहे" एवढेच नव्हे तर प्रेषित प्रवचन मध्ये असे सांगण्यात आलेले आहे की रमजानमध्ये जर कोणी तुम्हाला भांडण करून शिवीगाळ करत असेल तर त्याचे उत्तर देऊ नका फक्त त्याला सांगा मी रोज्याने आहे आणि मी भांडण किंवा तुझ्याशी शिवीगाळ करू शकत नाही.

आपण जर विचार केला तर रमजान हा एक प्रशिक्षण शिबिर आहे जो दरवर्षी एका महिन्यासाठी श्रद्धावंत करिता आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी व सुकर्म करण्यासाठी तसेच दुष्कर्मवर नियंत्रण करण्यासाठी ठेवला जातो.हा एक महिना प्रशिक्षण घेऊन बाकी अकरा महिने याच पद्धतीने आपण जीवन जागाव आणि ज्या गोष्टी आपण ह्या महिन्यात ईशभय ठेवून करत होतो तोच आपण इतर महिन्यात ही करावं हा रमजान महिन्याचा मूळ उद्देश आहे.म्हणून कुरआन मध्ये रोजाचे मूळ उद्देश बदल असा उल्लेख आहे की "हे श्रद्धावंतानो आम्ही तुमच्यावर रमजानचे रोजे अनिवार्य केले आहे जेणेकरून तुमच्या मध्ये ईशभय निर्माण होईल." (अध्याय 2, आयत 183).रमजान व रोज्यामुळे ईशभय कसे निर्माण होते याची एक उदाहरण आपण समजू शकतो एखादा माणूस  रोजा ठेवत असेल आणि तो दुपारी तहान लागलेली असताना घरात एकटा असेल तरी एक थेंब पाणी आपल्या कंठा खाली जाऊ देत नाही कारण त्याला माहित आहे की मला जर कोणी पाहत नसेल तरी तो एकमेव जग निर्माता मला पाहत आहे आणि फक्त पाहत नसून तो माझ्या कर्माची नोंद घेत आहे. हाच ईशभय आपण जीवनभर पाडाव हा रमजानच्या मूळ उद्देश आहे.म्हणून रोज्या बद्दल हे प्रवचन आहे की फक्त पोटाच रोजा नव्हे तर डोळ्यांचं,जिभेनेच,हाताचा, कानाचा व पायाचा पण रोजा असते. ह्या अवयवांचा रोजा म्हणजे यांना वाईट कृती पासून दूर ठेवणे आहे.एक महिना सतत चांगल्या गोष्टी अंगीकरण केल्यामुळे व वाईट गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करण्यामुळे रमजान नंतरही अकरा महीने ईश्वरीय संदेश वर आपले जीवन जागणे श्रद्धावंत करिता सोपे जाते.रमजानमध्ये रोजा ठेवून ही वाईट गोष्टी सोडल्या नाही तर अशा रोजा धारकां बद्दल प्रेषित महंमद (सल्ल.) यांनी सांगितले की " त्यांना त्यांच्या रोजा पासून काहीच मिळत नाही." म्हणजे त्यांना रोजा पासून न पुण्य मिळते न सकारात्मक बदल.

- शेख गुलाम जावेद

वसमत जि. हिंगोली, 

मो. 9822677448


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजे.स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील असा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महु इथे झाला व संपूर्ण भारतवर्षे सुर्यासारखे लखलखायला लागले. जणू काय बाबासाहेबांच्या रूपात या पृथ्वीतलावर दैवी शक्तीच प्रकट होऊन ज्ञानज्योत प्रगटली की काय असे सर्वांनाच वाटत होते. बाबासाहेबांनी समाजाच्या हितासाठी आणि देशहितासाठी आपले प्राणपणाला लावले. त्यामुळेच त्यांच्या अथक प्रयत्नाने संविधानाच्या चौकटीत संपूर्ण भारताला बांधून ठेवले. आज प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळत असतो. आजही अनेक देशांमध्ये हुकूमशाही दिसून येते.परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच भारतीय लोकशाही टिकून आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. तेव्हाच भारतात न्यायव्यवस्था प्रस्थापीत झाली.कारण बाबासाहेबांना कल्पणा होती की काही मुठभर समाज देशातील सर्वसामान्यांना कलंकीत करण्याचे काम करीत आहे.परंतु बाबासाहेबांचे या संपूर्ण हालचालींवर लक्ष होते. याकरिता समाजात जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद यात कटुता निर्माण होऊ नये याकरिता सर्वांना एकत्र आणन्याचे काम त्यांनी केले. जगामध्ये अनेक देशात बाबासाहेबांच्या विचारांची जोपासना केली जाते. कारण बाबासाहेबांच्या विचारांमध्ये ज्ञाणाचा व बुद्धिमत्तेचा अथांग सागर  आहे. त्याची तुलना समुद्रापेक्षाही अफाट आहे. कारण त्यांच्या बुद्धिमत्तेचा व कौशल्याचा संपूर्ण जगात आजही गुणगान होतांना आपण पाहतो. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानयोगी असल्यामुळे त्यांची कला जगात कोणीही अवगत करू शकले नाही. भारतात संपूर्ण समाज आनंदाने राहतो व बागडतो ते फक्त बाबासाहेबांच्या विचारांमुळे व संविधानामुळेच.बाबासाहेबाचा जन्म गरीब घराण्यात झाला असला तरी ते मनाने व विचाराने खूप श्रीमंत होते. आज प्रत्येकाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने प्रेरित होऊन देश घडवीण्याकरीता पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण बाबासाहेबांच्या विचाराने भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला मोठी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आज जगातील प्रत्येक देशात बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर केल्या जातो. परंतु आजचा राजकीय पुढारी बाबासाहेबांचे विचार विसरुन समाजाच्या प्रगतीकडे लक्ष न देता स्वतःची प्रगती करतांना दिसत आहे. याचे दु:ख बाबासाहेबांना अवश्य होत असावे. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले इत्यादी अनेक थोर महापुरुषांनी देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले व 1947 ला भारत स्वतंत्र झाला. परंतु गेल्या काही वर्षांत मुठभर राजकीय पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून वाममार्गाने मोठ्या प्रमाणात करोडोंची चल-अचल संपत्ती कमवुन देशाच्या 135 कोटी जनतेच्या खांद्यावर महागाई, बेरोजगारी, महागडे शिक्षणाचे ओझे लादले आहे.याचे दु:ख बाबासाहेबांना अवश्य होत असेल. स्वत:ला लोकप्रतिनिधी,जनप्रतिनिधी व स्वयंघोषित समाजसेवक समजणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनो आपण वाममार्गाने कमवीलेली करोडोंची चल-अचल संपत्ती सरकारच्या तिजोरीत जमा करावी किंवा जनकल्याणासाठी उपयोगात आणावी. असे जर कार्य राजकीय पुढारी करीत असेल बाबासाहेबांना राजकीय पुढाऱ्यांची खरी आदरांजली होईल. कारण बाबासाहेबांनी समाज हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लागले याला कुठेही तडा जाणार नाही याची जाण आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवायला पाहिजे.  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो. नं.9921690779


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget