Halloween Costume ideas 2015
Latest Post

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे युवकांनो! तुमच्यापैकी जो निकाहची (विवाहाची) जबाबदारी उचलू शकतो त्याने  निकाह करून घेतला पाहिजे कारण तो दृष्टी खाली ठेवतो आणि लज्जास्थानांचे रक्षण करतो. (म्हणजे नजरेला इकडे-तिकडे भटकण्यापासून आणि वासनाविषयक शक्तीला अनियंत्रित  होण्यापासून वाचवितो.) आणि जो निकाहची जबाबदारी उचलण्यात सक्षम नाही त्याने कामवासनेचा जोर शमविण्यासाठी कधी कधी रोजा धारण करावा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्त्रीशी चार गोष्टींच्या आधारावर विवाह केला जातो, तिच्या संपत्तीच्या आधारावर, तिच्या घराण्याच्या प्रामाणिकपणाच्या आधारावर, तिच्या सौंदर्याच्या आधारावर आणि तिच्या ‘दीन’च्या (धर्माच्या) आधारावर. तर तुम्ही ‘दीनदार’ (धर्मनिष्ठ) स्त्रीशी विवाह करा, तुमचे भले   होईल.’’(हदीस : मुत्तफक अलैहि)

स्पष्टीकरण
स्त्रीमध्ये या चार गोष्टी पाहिल्या जातात. कोणी संपत्ती पाहतो, कोणी घराण्याची प्रतिष्ठा पाहतो आणि कोणी तिच्या रूप व सौंदर्यामुळे तिच्याशी विवाह करतो आणि कोणी तिच्या धर्मपरायणतेला पाहतो. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मुस्लिमांना उपदेश दिला आहे की खरी गोष्ट जी पाहण्याची आहे ती तिची (दीनदारी) धर्मनिष्ठा आणि (तकवा) संयम आहे.  त्याचबरोबर जर आणखीन सर्व गुणवैशिष्ट्येदेखील त्यात सामील झाले तर खूपच चांगली गोष्ट आहे. परंतु धर्मश्रद्धा विसरणे आणि फक्त संपत्ती आणि सौंदर्याच्या आधारावर विवाह  करणे मुस्लिमांचे काम नाही.

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्त्रियांशी त्यांच्या रूप व सौंदर्यामुळे विवाह करू नका, कदाचित त्यांचे सौंदर्य त्यांना  नष्ट करील आणि त्यांच्या श्रीमंतीकडे पाहून त्यांच्याशी विवाह करू नका, कदाचित त्यांची संपत्ती त्यांना अवज्ञा व उद्धटपणात परिवर्तीत करील, म्हणूनच ‘दीन’च्या आधारावर विवाह  करा आणि काळ्या वर्णाची ‘दीनदार’ (धर्मनिष्ठ) सेविका अल्लाहच्या दृष्टीने गौरवर्णी चांगल्या घराण्याची स्त्रीपेक्षा उत्तम आहे.’’ (हदीस : मुन्तका)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जर तुमच्याकडे विवाहाचा संदेश घेऊन आलेल्या व्यक्तीचा ‘दीन’ व स्वभाव तुम्हाला पसंत असेल तर तुम्ही तिच्याशी विवाह करा. जर तुम्ही असे  केले नाही तर पृथ्वीवर मोठा उपद्रव निर्माण होईल.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
ही हदीस अगोदरच्या हदीसकथनाचे समर्थन करणारी आहे. पैगंबर मुहम्मद (स.) सांगण्याचा अर्थ असा की विवाहाच्या बाबतीत पाहण्याची गोष्ट म्हणजे ‘दीन’ व स्वभाव आहे. जर हे न   पाहता धनसंपत्ती व घराण्याची प्रतिष्ठा पाहिली गेली तर मुस्लिमांमध्ये त्यामुळे मोठा उपद्रव निर्माण होईल. जे लोक इतके भौतिकवादी बनतील की ‘दीन’ त्यांच्या नजरेतून उतरेल  आणि धनसंपत्तीच त्यांच्यासाठी पाहण्याची गोष्ट बनली तर असे लोक ‘दीन’ची शेती सिंचित करण्याचा विचारच कसा करतील? या स्थितीला पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उपद्रव म्हटले  आहे.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्हाला पैगंबर मुहम्मद (स.) यांनी नमाजचा महामंत्र (तशह्हुद) देखील शिकविला आणि निकाहचा महामंत्रदेखील. इब्ने   मसऊद यांनी नमाजचा महामंत्र सांगितल्यानंतर म्हटले की आणि निकाहचा महामंत्र असा आहे की ‘‘कृतज्ञता व स्तुती फक्त अल्लाहसाठीच आहे, आम्ही त्याचीच मदत मागतो, आम्ही   त्याच्याकडूनच मुक्तीची अपेक्षा करतो आणि आपल्या अस्तित्वाच्या दुष्टव्याच्याकरिता अल्लाहचा आश्रयात स्वत:ला झोकून देतो, ज्याला अल्लाहचे मार्गदर्शन लाभले (आणि मार्गदर्शन  इच्छिणाऱ्यालाच तो मार्गदर्शन देतो) त्याला कोणीही मार्गभ्रष्ट करू शकत नाही आणि ज्याला त्याने मार्गभ्रष्ट केले (आणि मार्गभ्रष्ट फक्त त्यालाच करतो जो मार्गभ्रष्ट होऊ इच्छितो)  त्याला कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही, आणि मी साक्ष देतो की अल्लाहव्यतिरिक्त कोणीही उपास्य नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे दास व पैगंबर आहेत.’’

(८७) ...आणि मर्यादांचे उल्लंघन करू नका.१०५ अल्लाहला अतिरेक करणारे अत्यंत अप्रिय आहेत.
(८८) जे काही वैध व विशुद्ध अन्न अल्लाहने दिले आहे ते खा व प्या आणि अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहा ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे.
(८९) तुम्ही लोक ज्या निरर्थक शपथा घेता त्याबद्दल अल्लाह तुम्हाला परत शिक्षा करणार नाही पण ज्या शपथा तुम्ही जाणूनबुजून घेता, त्यांच्यासाठी तो जरूर तुम्हाला पकडील. (अशी  शपथ मोडण्याचे) प्रायश्चित्त हे होय की दहा गरिबांना त्या सर्वसाधारण प्रकारचे जेवण तुम्ही द्यावे, जे तुम्ही आपल्या मुलाबाळांना देता, अथवा त्यांना वस्त्रे द्यावीत किंवा एका गुलामाला मुक्त करावे आणि ज्याची अशी ऐपत नसेल त्याने तीन दिवसाचे उपवास करावेत. हे तुमच्या शपथांचे प्रायश्चित्त आहे की जेव्हा तुम्ही शपथ घेऊन ती मोडली असेल,१०६  आपल्या शपथांचे रक्षण करीत जा.१०७ अशाप्रकारे अल्लाह आपल्या आज्ञा तुमच्यासाठी स्पष्ट करीत आहे कदाचित तुम्ही कृतज्ञता दर्शवाल.
(९०) हे श्रद्धावंतांनो, ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून१०८ ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.१०९


१०५) ``मर्यादांचे उल्लंघन करणे'' म्हणजे हलालला हराम ठरविणे आणि अल्लाहने पवित्र ठरविलेल्या वस्तूंपासून असे दूर राहाणे जसे त्या अपवित्र आहेत. हा एक अतिरेक आहे. पवित्र  वस्तूंचा वापरात गरजेपेक्षा जास्त खर्च करणेसुद्धा अतिरेक आहे. हलाल (वैध) सीमेपलीकडे जाऊन हराम (अवैध) सीमेत प्रवेश करणेसुद्धा अतिरेक आहे. अल्लाहला या तिन्ही गोष्टी  नापसंत आहेत.
१०६) कारण काही लोकांनी हलाल वस्तूंना आपल्यावर हराम करण्याची शपथ खाल्ली होती. म्हणून अल्लाहने येथे शपथ घेण्याविषयीच्या आदेशाचे वर्णन केले आहे. एखाद्याने अनायासे  शपथ घेतली तर त्याला पूर्ण करणे आवश्यक नाही. कारण अशा शपथ घेण्यावर विचारणा होणार नाही. परंतु एखाद्याने हेतूसह शपथ घेतली आणि ती तोडली तर त्याचे प्रायश्चित  त्याला द्यावे लागेल. एखाद्याने पाप करण्याची शपथ खाल्ली तर त्याने आपली शपथ पूर्ण करू नये. (पाहा सूरह २ (अल्बकरा टीप २४३-४४ कफ्फारासाठी पाहा सूरह - ४ (निसा) टीप. १२५)
१०७) शपथांचे रक्षण करा म्हणजे शपथेला योग्य वापरात आणणे. व्यर्थ आणि गुन्हेगारीच्या कामात उपयोग करू नये. दुसरा अर्थ जर मनुष्य एखाद्या गोष्टींवर शपथ खातो तेव्हा  त्याला आठवणीत ठेवावे. आपल्या निष्काळजीपणाने ती शपथ विसरून जाऊ नये आणि त्याविरुद्ध कार्य करू नये. तिसरा अर्थ म्हणजे एखाद्या चांगल्यासाठी हेतूपुरस्सर शपथ खाल्ली  तर त्याला पूर्ण केले जावे आणि शपथ तुटली तर तिचा प्रायश्चित दिला पाहिजे.
१०८) वेदी आणि स्थान तसेच आस्ताने, फास आणि जुगार यांच्या तपशीलासाठी पाहा सूरह ५, टीप. १२ व १४ फासे टाकणे जुगाराप्रमाणे असले तरी या दोघांत अंतर आहे. अरबी भाषेत  फास्याला `अज़लाम' म्हणतात. फालगीरी (भविष्य पाहाणे) आणि चिठ्ठया टाकून भविष्य पाहाणे हे सर्व अनेकेश्वरवादी (शिर्क) आणि अंधविश्वासाच्या आधाराने चालते. यांना संयोगाच्या  कामासाठी आणि भविष्य काढण्यासाठी तसेच कसोटी आणि संपत्ती वाटपासाठी उपयोगात आणले जाते.
१०९) या आयत द्वारा चार वस्तूंना हराम (अवैध) केले आहे. एक दारू, दुसरे जुगार, तिसरे ती स्थानं व वेदी (आस्ताने) जिथे अल्लाहशिवाय दुसऱ्याच्या नावाने भक्ती करण्यासाठी  तसेच दुसऱ्याच्या नावाने भेट व बळी चढविण्यासाठी (कंदोरी) खास केले असेल. चौथी वस्तू फासे, नंतर उल्लेखित तिन्ही वस्तूंविषयी तपशील मागे आला आहे. दारूविषयी आदेशाचा  तपशील खालीलप्रमाणे आहे.
दारू हराम करण्याविषयी या अगोदर दोन आदेश आलेले होते. सूरह २ (अल्बकरा) आयत नं. २१९ आणि सूरह ४ (निसा) आयत ४३ मध्ये हे आदेश आले आहेत. आता या अंतिम  आदेशापूर्वी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका भाषणात लोकांना सचेत केले की अल्लाहला दारू अत्यंत अप्रिय आहे. असंभव नाही की दारूला पूर्ण रूपाने हराम करण्याचा आदेश लवकरच  येईल. म्हणून ज्यांच्याकडे दारू उपलब्ध आहे त्यांनी ती विकून टाकावी. यानंतर काही कालावधीनंतर ही आयत अवतरित झाली. त्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जाहीर केले की  आता ज्यांच्याकडे दारू शिल्लक असेल ते त्यास विकू शकणार नाही की पिऊ शकणारही नाही तर त्यांनी आपल्याकडील दारूला नष्ट करून टाकावे. म्हणून त्याच क्षणी मदीनेच्या  रस्त्यावर दारू फेकून देण्यात आली. काही लोकांनी विचारले, ``आम्ही यहुदी लोकांना भेट म्हणून देऊ शकतो का?'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``ज्याने ही वस्तू हराम  (अवैध) केली त्याने त्यास भेट म्हणून देण्यासही मनाई केली आहे.'' काहींनी विचारले, ``आम्ही दारूला शिरक्यात बदलून टाकतो.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी यापासूनसुध्दा मनाई केली  आणि आदेश दिला की, ``दारूला फेकून द्या.'' एकाने आग्रह करून विचारले, ``औषधासाठी म्हणून वापरात आणली तर परवानगी आहे?'' सांगितले ``नाही, ती औषध नाही तर आजार   आहे.''
एकाने आणखी विचारले,`` हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) आम्ही `फार थंड' क्षेत्रातील राहणारे आहोत आणि आम्हाला मेहनतसुद्धा जास्त करावी लागते. आम्ही दारू पिऊन श्रम  परिहार करून घेतो आणि सर्दी होण्यापासून आमचा बचाव करतो. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विचारले, ``जे काही तुम्ही पिता त्याने नशा चढते का? त्यांनी होकारर्थी उत्तर दिले.  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला, ``त्यापासून दूर राहा.'' त्यांनी सांगितले, ``आमच्या क्षेत्रातील लोक तर ऐकणार नाहीत.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``त्यांनी जर   ऐकले नाही तर त्यांच्याशी युद्ध करा.'' हदीसकथन आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दारू सेवन करणाऱ्यांबरोबर जेवण घेण्यास मनाई केली आहे. प्रारंभी त्या भांड्यांना ज्यात दारू  बनविली जात आणि प्यायली जात असे त्या भांड्यांचा वापर करण्यास पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मनाई केली होती. जेव्हा दारू हराम करण्याचा आदेश पूर्णत: लागू झाला तेव्हा या  भांड्यांवरची मनाई त्यांनी उठविली. `खम्र' म्हणजे द्राक्षाची दारू आहे. परंतु लाक्षणिक रूपात हा शब्द अरबीत गहु, ज्वारी, किसमिस, खजुर आणि मधाच्या दारूसाठी वापरला जात असे.  परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हराम त्या सर्व वस्तूंना ठरविले ज्यामुळे नशा उत्पन्न होते. हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट आदेश आहेत, ``प्रत्येक नशा निर्माण करणारी   वस्तू `खम्र' आहे आणि प्रत्येक वस्तू जी नशा निर्माण करते हराम आहे. प्रत्येक ते पेय जे नशा निर्माण करते हराम आहे आणि मी प्रत्येक नशा देणाऱ्या वस्तूंपासून मनाई करतो.''   माननीय उमर (रजि.) यांनी जुमाचा खुतबा देताना (प्रवचन) सांगितले, ```खम्र' म्हणजे प्रत्येक ती वस्तू जी बुद्धीला झाकून टाकते.''

इराणच्या सत्तावर्तुळातील दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली व्यक्तिमत्व आणि उच्च लष्करी अधिकारी मेजर जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने हवाई हल्ल्यात ठार केले आणि   अनेक वर्षांपासून खदखदत असलेला अमेरिका-इराण दरम्यानच्या संघर्ष सरतेशेवटी नव्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. ‘राष्ट्रीय सुरक्षा पथका’चा सल्ला न जुमानता ट्रम्प यांनी  इराणसोबतच्या अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे बेफिकिरीचे होते. त्यानंतर इराणवर दबावाचा ट्रम्प यांचा प्रयत्नही निष्फळ ठरला. उलट सीरिया, येमेन आणि लेबनॉनमध्ये  इराणच्या अस्थिरतेच्या कारवाया वाढीस लागल्या. ट्रम्प प्रशासनाचे कोणतेही उद्देश तिथे साध्य झालेले नाहीत. इराकसह आखातातील अन्य भागांतील अमेरिकी नागरिकांवरील संभाव्य  हल्ले हाणून पाडण्यासाठी सुलेमानीला ठार करण्यात आल्याचे ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ट्रम्प प्रशासनावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अमेरिकी काँग्रेस (संसद)  नेत्यांशी सल्लामसलतही करण्यात आलेली नाही. एकूणच परिस्थिती पाहता अमेरिकेचे परराष्ट्र धोरण कोलमडले आहे. ट्रम्प यांनी या हल्ल्याचा आदेश दिला. त्याआधी जॉर्ज बुश आणि  बराक ओबामा यांच्या काळातही सुलेमानी यांच्यावर हल्ल्याबाबत विचार झाला होता. मात्र इराणसोबत अकारण युद्ध आणि तणावाची परिस्थिती ओढवू शकेल, या भीतीमुळे असा निर्णय  घेण्यात आला नाही. राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्यानिर्णयाची योग्य प्रक्रिया या प्रकरणात पार पाडलेली आढळून येत नाही. स्वत:पुढील राजकीय संकट दूर करण्यासाठी ट्रम्प यांनी ही कारवाई  केली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण जागतिक राजकीय पटलावर अशी अनेक उदाहरणे आपणास पाहावयास मिळतील. अखेर अमेरिकेने ते साध्य केलेच. तेलाने समृद्ध  असलेल्या आखातात पुन्हा एकदा सुडाग्नीचा वणवा भडकला आहे. अमेरिका आणि आखात यांच्यातील संघर्ष अनेक दशके जुना आहे. याला कारण आखातातील तेलाचे भांडार. या  तेलाच्या राजकारणावर आपले वर्चस्व राहावे, ही महासत्तेची नेहमीच इच्छा राहिली आहे आणि त्यानुसारच अमेरिकेचे वर्तन सुरू आहे. ताज्या हल्ल्याचे कारणही यातच जडलेले आहे.  अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि इराण यांच्यात अण्वस्त्र करार झाला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. अमेरिकेत सत्तापालट झाला. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष   झाले. इराण बरोबरच्या करारातून ट्रम्प यांनी माघार घेण्याची घोषणा केली. येथेच दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध आणले. भारतासह मित्र देशांना  इराणकडून तेल खरेदी करायला बंदी घातली. इराणने अमेरिकेत मानवरहित ड्रोन पाडले, त्या वेळीच खरेतर अमेरिकेने हल्ल्याची तयारी केली होती. इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांच्या निकटवर्तींपैकी एक असलेले सुलेमानी यांच्या ‘ब्रेन'मुळेच इराणला एवढी ताकद मिळत असल्याचे अमेरिकेचे मत बनले होते. त्यामुळे थेट या अव्वल कमांडरवरच हल्ला करुन अमेरिकेने  आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ट्रम्प यांच्यावर महाभियोग सुरू आहे. शिवाय, अध्यक्षपदाची निवडणूकही तोंडावर आहे. त्या पाश्र्वभूमीवर आपण सक्षम व धाडसी नेता आहोत, हा संदेश  देण्यासाठी ट्रम्प यांनी हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. या हल्ल्याचा पहिला परिणाम लगेच दिसला. कच्च्या तेलाच्या किमती सुमारे चार टक्क्यांनी वाढल्या. युद्ध पेटल्यास पश्चिम आशियात वास्तव्यास असलेल्या सुमारे ८० लाख भारतीयांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल. इराणमध्ये भारताने उभ्या केलेल्या चाबहार बंदर प्रकल्पावरही  परिणाम होणार आहे. तसे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर नवे संकट येऊ शकते. इराण-इराक युद्ध, कुवेतचा संघर्ष आणि सद्दामचे उच्चाटन, १९९१ चे आखाती युद्ध, इस्रायल-  अमेरिका- आखाती देश संबंध, तेल साठ्यावरील वर्चस्वाची लढाई यांमुळे हे वाळवंट सतत धगधगते आहे. वर्चस्वाच्या संघर्षाच्या या उकळत्या तेलाचा सुडाग्नी जगाला परवडणारा नाही. या हल्ल्याद्वारे अमेरिकेने संपूर्ण पश्चिम आशियाला असुरक्षित केले आहे. धार्मिक, वांशिक वर्चस्ववादाच्या संघर्षामुळे, तेलसंपन्न प्रदेशांवर नियंत्रण मिळविण्याच्या अमेरिकेच्या  धोरणामुळे आधीच अशांत असलेल्या या टापूत आता युद्धाचा भडका उडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुलेमानी हे केवळ लष्करी अधिकारी नव्हते. ते इराणचे प्रमुख रणनीतिकार  होते; इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर या समांतर सैन्यदलाच्या (आयआरजीसी) कुद्स दलाचे ते प्रमुख होते. या दलाच्या जोरावरच इराणने इराकसह पश्चिम आशियातील अन्य देशांत  आपले वर्चस्व निर्माण केले होते. लेबेनान, सीरिया, येमेन आणि इराक या पश्चिम आशियातील अन्य देशांत इराणचे वर्चस्व वाढविण्याच्या धोरणाचे ते शिल्पकार होते. आपल्या बड्या  नेत्याची अमेरिकेने केलेली हत्या इराण विसरणे शक्यच नाही. वास्तविक इराणबाबत ट्रम्प यांनी अनेकदा कोलांटउड्या मारल्या आहेत. बराक ओबामा अध्यक्ष असताना ट्रम्प यांनी  युद्धविरोधी भूमिका घेतली होती. महाभियोगाच्या पाश्र्वभूमीवर ट्रम्प ‘इराण कार्ड' खेळत आहेत. गेल्या चार दशकांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध सतत बिघडत गेले  आहेत. तेलसंपन्न आखातातील संघर्षाचे आर्थिक परिणाम जगासह भारताला जाणवणार आहेत.

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

gairsamajanche nirakaran book
आजच्या काळात सर्वाधिक दुर्दैवी घटनांपैकी एक ही की ज्या स्त्रिया स्वत:ला, गृहस्थ जीवनासाठी तद्नुषंगे मुलाबाळांच्या संगोपनासाठी समर्पित करतात, त्यांच्याशी मोठा अवमानकारक व तुच्छ व्यवहार होतो. नेहमी जेव्हा एखादी स्त्री एखाद्या सामाजिक समारंभात सहभागी होण्यास घराबाहेर पडते, जिथे इतर काही स्त्रिया मोठ्या अभिमानाने आपल्या करीअरचे गुणगान करतात. तिथे अधिकतर तुच्छतापूर्वक काही स्त्रियांचे हे कथन असते की मी फक्त गृहिणी आहे. तेव्हापासूनच नव्या पीढीची तयारी आणि तिच्या पालनपोषणाबद्दल समर्पण लज्जा आणि तुच्छ भावनेचे कारण बनते. हीच ती वस्तुस्थिती होय की जिच्यामुळे अनेक बालकांचे आज अनोळखी लोक पालनपोषण करत आहेत, उदा. क्रेशे, नेनी आणि बेबी सिस्टर्स वगैरे. वास्तविक, माता-पिता आपल्या कार्पोरेट आणि बौद्धिक इच्छा-आकांक्षांच्या मागे धावत असतात. तर काय अशा परिस्थितीत कुटुंबाचा सांगाडा विस्कळीत होणे आणि अल्पवयात गर्भ धारणा (आमच्या नव तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात अत्याधिक लैंगिक स्वैराचाराचा भयंकर परिणाम) काही नवल करण्यायोग्य गोष्टी नाहीत. वस्तुत: आम्ही आजच्या भौतिकवादी समाजात ’आई’चे महत्त्व नजरेआड केले आहे.
    तरीही इस्लाम धर्मात, जो आदर-सन्मान मातेशी आणि मातृत्वाशी जोडलेला आहे तो खरोखर अद्वितीय व अनुपम आहे. कुरआनात, आपल्या माता-पित्यासंबंधीचे कर्तव्य आणि त्यांच्याशी प्रेम व दया-अनुकंपापूर्ण वर्तनाला अल्लाहच्या उपासनेच्या त्वरित नंतर सांगितले गेले आहे.
”तुमच्या पालनकर्त्याने निर्णय दिला आहे की तुम्ही त्याच्याखेरीज अन्य कोणाचीही उपासना करू नये आणि माता-पित्याशी चांगले वर्तन करा. जर तुमच्याजवळ त्यांच्यापैकी कोणी एक किंवा दोघे वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ’अरे’ शब्ददेखील काढू नका व त्यांना झिडकारून उलट उत्तरदेखील देऊ नका, त्यांच्याशी आदराने बोला आणि नरमीने व दयाद्रतेने त्यांच्यासमोर नमून राहा आणि प्रार्थना करीत जा की, हे पालनकर्त्या ! यांच्यावर दया कर ज्याप्रकारे यांनी दया-वात्सल्याने बालपणी माझे संगोपन केले.” (कुरआन - 17:23,24)
    अल्लाहचे पैगंबर (स.) जेव्हा आपल्या साथीदारांशी व अनुयायींशी वार्तालाप करीत, तेव्हा माता-पित्याशी आदर-सन्मानाची वागणू राखण्याची ताकीद अधिकतर त्यांच्या शुमभुखातून निघत असे, या संदर्भात पैगंबर (स.) यांनी फर्माविले, ”नि:संशय जन्नत (स्वर्ग) आमच्या मातेच्या चरणांखाली आहे.” पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या साथीदारांना सांगितले की, त्यांनी आपल्या माता-पित्याशी दयापूर्ण व्यवहार करावा, मग त्यांचा धर्म कोणताही असो.
    त्यांची सहाबिया (निकटवर्ती अनुयायी) हजरत अस्मार (रजि.) म्हणतात, ” माझी आई, जी ईमान राखणारी नाही, ती मला भेटण्यासाठी मक्केहून मदीना येथे आली आणि ती माझ्याजवळ काही मागत आहे, तर काय मी तिची मागणी पूर्ण करावी?” त्यावर पैगंबर (स.) यांनी फर्माविले, ” होय, आपल्या मातेशी दयापूर्ण वर्तन करा.” जेव्हा एका माणसाने पैगंबर मुहम्मद (स). यांना विचारले तेव्हा पैगंबर (स.) यांनी अतिशय सुंदर शैलीत सांगितले की एका स्त्रीची कशी विशेष मान-प्रतिष्ठा आहे.
    प्रश्‍नकर्त्याने त्यांना विचारले, ” हे अल्लाहचे पैगंबर ! माझ्याकडून सर्वाधिक सद्वर्तन केले जाण्यास आणि सोबत राहण्यास पात्र कोण आहे? पैगंबर (स.) यांनी फर्माविले, ” तुमची माता” त्या व्यक्तींनी विचारले, ” तिच्यानंतर कोण?” पैगंबर (स.) यांनी पुन्हा फर्माविले, ” तुमची माता,” त्याने पुन्हा विचारले, ” तिच्यानंतर कोण?” पैगंबर (स.) म्हणाले, ” तुमची माता” मग त्याने चौथ्यांदा विचारले, ” तिच्यानंतर कोण?” यावर पैगंबर (स.) यांनी फर्माविले, ”तिच्यानंतर तुमचा पिता.” याहून विशेष हे की पैगंबर (स.) अशा वेळी आपल्या फर्ज नमाजांना संक्षिप्त करीत. जेव्हा ते आपल्या अनुयायींसह नमाज पढत असत कारण मातांकडून बालकांच्या पालनपोषणाची आठवण मातांना नमाजच्या अवस्थेतही येते.
    पैगंबर (स.) म्हणत, ” जेव्हा मी नमाज पढण्यासाठी उभा राहतो तेव्हा माझा इरादा असतो की दीर्घ नमाज पढावी. परंतु, एखाद्या लहान बाळाच्या रडण्याचा स्वर कानावर येताच मी नमाज अल्पशी करतो, कारण त्या बाळाच्या मातेला मी कोणताही त्रास देणे पसंत करीत नाही.”    

- सय्यद हामीद मोहसीन.

शिवसेना तुमच्या पाठीशी : देशभक्ती एका जातीची किंवा पक्षाची मक्तेदारी नाही - संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी)
नागरिकत्व संशोधन कायदा, नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) चा फटका केवळ मुस्लिम समाजालाच नाही तर सर्वांनाच बसणार आहे. कित्येक लोकांकडे जुने पुरावे नाहीत. देशातील 30 टक्के हिंदूंचे यामुळे नुकसान होईल. देशभक्ती कोणत्या एका जातीची किंवा एका पक्षाची मक्तेदारी नाही. आम्ही सर्व देशभक्त आहोत. आमची देशभक्ती तुमच्यापेक्षा अधिक आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
    सीएए, एनसीआर, एनपीआर विरोधात जमात-ए- इस्लामी हिंदच्या वतीने चर्चासत्रात मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, एपीसीआरचे अध्यक्ष युसूफ मुछला आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी राऊत म्हणाले की, देशात भीती पसरवली जात आहे, परंतु कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही. घाबरविणारे येतात आणि जातात. हा देशाचा इतिहास आहे. महाराष्ट्राने भीती संपविण्याचे काम केले आहे, देशाला दिशा देण्याचे काम केले आहे, ते पुढे म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांवर बंदूक रोखली जात आहे, हल्ले होत आहेत, असे असताना पंतप्रधान विद्यार्थ्यांना केवळ शिकण्याचे काम करावे असे सांगत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असून, याचा अर्थ लोकशाही धोक्यात आहे. तसेच स्वातंत्र्य लढ्यात विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्याच्यामुळे परिवर्तन घडले, असेही ते म्हणाले. आपल्याला सर्वांना मिळून देश वाचवायचा आहे. सर्वांनी याविरोधात एकत्र उभे राहिले पाहिजे, असे सांगितले. केंद्र सरकारच्या या जाचक कायद्याविरूद्ध सर्वांनी एकत्र येण्याचा सूरही यावेळी निघाला. यावेळी जमाअतचे पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदू-मुस्लिमांचे रक्त एकच
कोणताही कायदा आणताना सहजतेने त्याची अंमलबजावणी होईल, असा कायदा असायला हवा. ज्या कायद्याची अंमलबजावणी शक्य नाही ते आपल्यावर लादले जात आहेत. हे 2024 च्या निवडणुकीसाठी सरकारचे षडयंत्र आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोघांचेही रक्त एकच असून सर्वांनी याविरोधात रस्त्यावर उतरा, असे आवाहन माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी केले. तर सीएए, एनआरसी, एनपीआर हे कायदे गरीबांच्या विरोधात आहेत. धर्मावर आधारित नागरिकत्व देऊन सरकार मतपेटीचे राजकारण करत आहे, असे मिहीर देसाई म्हणाले.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget