Halloween Costume ideas 2015
Latest Post

इंग्रजांना देशातून हुसकावून लावण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून स्वातंत्र्याचा जो लढा उभा केला होता व त्यात जो एकोपा त्यावेळी या दोन्ही समाजांमध्ये होता तो स्वातंत्र्यानंतर राहिला नाही. स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येत असल्याचे पाहून अनेक हिंदू-मुस्लिम संघटनांनी स्वातंत्र्याचा लाभ आपल्यालाच कसा होईल, यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. याच मानसिकतेतून देशाची फाळणी झाली होती.
    फाळणीनंतर जरी पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आले तरी गेल्या 73 वर्षात तेथे इस्लामी म्हणावे असे फारसे काही झालेले नाही. उलट भारत धर्मनिरपेक्ष राहिल्यामुळे भारताची चौफेर प्रगती झाली. आज आपल्या देशाकडे उगवती महासत्ता म्हणून अवघे जग पाहत आहे. काँग्रेसच्या साठएक वर्षाच्या सत्तेमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही प्रमुख समाजामधील जातीय तणाव बर्‍याचपैकी नियंत्रणात होता. लोकांच्या मनातील जातीय भावनेचा उपयोग कम्युनिस्ट वगळता देशातील प्रत्येक राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांनी वेळोवेळी करून घेतलेला आहे.
    मागच्या काही वर्षांपासून तर मुद्दामहून मतांचे ध्रुवीकरण व्हावे यासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव वाढेल, यासाठीचे प्रयत्न विशिष्ट पक्ष आणि त्यांच्या समर्थकांकडून केले जात आहेत. मीडियानेही या प्रकरणात आगीत तेल ओतण्याचे काम केलेले आहे. सोशल मीडियावर मात्र अलिकडे या तणावाला निर्माण करणार्‍या कारणांच्या पलिकडे जावून विचार करण्याचा ट्रेंड सुरू झालेला दिसून येत आहे. मुस्लिमच नव्हे तर हिंदू बांधवांमध्येसुद्धा एवढी राजकीय प्रगल्भता नक्कीच निर्माण झालेली आहे की, आता ते जातीय राजकारणाच्या पलिकडे जावून विचार करू लागलेले आहेत. त्यांना हिंदू-मुस्लिम प्रश्‍नांपेक्षा जास्त बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, स्त्री अत्याचार, शैक्षणिक व आरोग्य सुविधांची दुरवस्था इत्यादी प्रश्‍नांमध्ये रस निर्माण झालेला आहे. राजकीय पक्ष जातीय भावना भडकावून स्वतःचा फायदा कसा करून घेत आहेत, हे ही त्यांच्या लक्षात आलेले आहे.      हिंदू-मुस्लिम संबंधांना जातीय रंग देऊन प्राईम टाईममध्ये पुन्हा-पुन्हा लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या वाहिन्यांकडे सुद्धा लोकांनी पाठ फिरवायला सुरूवात केलेली आहे. हे चांगले लक्षण आहे. आपल्या लोकशाहीला प्रगल्भ करायचे असेल आणि देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर अशा जातीयवादी लोक, संघटना आणि पक्षांना जनतेनी त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय हे काम शक्य होणार नाही.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

नवी दिल्ली (शोधन सेवा)
जमाअत-ए-इस्लामीचे उपाध्यक्ष मोहम्मद सलीम इंजिनिअर यांनी 5 नोव्हेंबरला जमाअतच्या मुख्य कार्यालयात मासिक प्रेस कॉन्फ्रन्समध्ये बोलताना सांगितले की, लवकरच अयोध्येसंबंधी सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. देशाच्या सर्व नागरिकांनी या निर्णयाचा शांतपणे स्वीकार करावा आणि कुठल्याही प्रकारची उत्तेजना आणि हिंसेचे प्रदर्शन करू नये. ते पुढे म्हणाले की, जमाअते इस्लामी हिंदच्या केंद्रीय सल्लागार परिषदेने या संबंधी काही प्रस्ताव पारित केले असून, त्यात या विवादासंबंधी आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेसंबधीं तसेच एनआरसीवर आपली चिंता व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले की, आमची अशी धारणा आहे की, बाबरी मस्जिदीच्या पक्षामध्ये वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च कोटीचे तर्क देऊन पैरवी केलेली आहे. संपूर्ण शक्ती पणाला लावून साक्ष कोर्टासमोर ठेवलेली आहे. निश्‍चितच सगळ्या जगाचे लक्ष या संवेदनशील आणि महत्वपूर्ण निकालाकडे लागलेले आहे. या निर्णयानंतर सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये सरकारचे सहकार्य करावे.
    शिवाय, देशाची आर्थिक परिस्थिती बरोबर नसून, सकल घरेलू उत्पाद कमी होत असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे सर्वच लोक व्यथित झालेले आहेत. शासनकर्ते जरी अर्थव्यवस्थेच्या बिगडलेल्या परिस्थितीचा स्वीकार करण्यामध्ये कचरत असले तरी अर्थव्यवस्थेमधील मंदी ही सत्य घटना आहे. सरकार नाकारत जरी असले तरी आर्थिक स्थिती बिगडत असल्याचे सर्वच चिन्ह उघडपणे दिसून येत आहे. विकासदर कमी होत आहे. बाजारामध्ये वस्तूंना मागणी नाही. म्हणून उद्योजक उत्पादन कमी करत आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. आसाममधील एनआरसीची अंतिम सूची जाहीर झाल्यानंतर 19 लाखापेक्षा जास्त लोक एनआरसीच्या बाहेर आहेत. ही चिंताजनक बाब आहे. अशात गृहमंत्र्यांनी पूर्ण देशात लागू करण्याचा सुतोवाच करून लोकांच्या अडचणींमध्ये भर टाकलेली आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रदुषण वाढत असून, जमाअत या संबंधी चिंतीत आहे. वेगवान औद्योगिककरण, असंतुलित विकास आणि बेलगाम गाड्यांनी वाहतुकीच्या अनेक समस्या उभ्या राहत आहेत. ज्याचा सर्वात वाईट परिणाम वातावरणावर होत असून, वायू मंडलीय प्रदुषण वाढत आहे. भूमंडलीकरण, निजीकरण आणि उदारवादाने जगामध्ये उपभोगी संस्कृतीला जन्म दिलेला आहे. या कारणामुळे अनेक देशांच्या आर्थिक गरजा आणि उत्पादन यांच्यामध्ये गल्लत झालेली आहे. पुरेसे कायदे नसल्यामुळे प्रदुषणावर अंकुशही लावता येत नाहीये. यावर उपाय इस्लामची अर्थव्यवस्था हाच आहे. ज्यामध्ये उत्पादनात संतुलन राखले जाते आणि बाजारात उत्पादन एवढेही वाढत नाही की ज्यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होईल. पत्रकार परिषदेस मुज्तबा फारूक, अर्शद शेख यांची उपस्थिती होती.

Shahadate Haq
जमाअते इस्लामीच्या अध्यक्षपदी कोणाला नेमले जावे, यासबंधानेही आम्ही कोणतीही आततायी कृती केलेली नाही. आमची ही संघटना कुठल्या व्यक्तीविशेषवर अवलंबून नाही, ज्यामुळे की  कुठल्या एका खास पदासाठी, कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीने आपला दावा दाखल करावा. ज्यांच्या चमत्कारांची, दिव्य वाणीची आणि पवित्रतेच्या गोष्टींची जाहिरात केली जाते व त्याकडे लोकांना बोलाविले जाते, स्वप्नातील गोष्टी, चमत्कार, गुप्त ज्ञान अशा व्यक्तीगत पावित्र्याच्या गोष्टींकडे बोलाविण्याचा या संघटनेमध्ये प्रश्‍नच उद्भवत नाही. येथे व्यक्तीविशेषकडे लोकांना बोलाविणे हा उद्देश नाही तर त्या उद्देशाकडे बोलाविणे या संघटनेचा उद्देश आहे, जो उद्देश कुरआनने सर्व मुस्लिमांच्या जीवनाचा उद्देश ठरवलेला आहे. आम्ही लोकांना त्या तत्वांकडे बोलावितो ज्यांच्या समुच्चयाचे नाव इस्लाम आहे. जे लोक या उद्देशाच्या प्राप्तीसाठी कुरआनने दिलेल्या तत्वांवर आमच्या सोबत मिळून काम करू इच्छितात तेच बरोबरीच्या दर्जा ने या संघटनेचे सदस्य बनू शकतात. सर्व सदस्य मिळून आपल्यामधील त्या व्यक्तीला अध्यक्ष नेमतात जो त्यांना योग्य वाटतो. म्हणून या संघटनेच्या अध्यक्षपदावर कोणाचा खाजगी अधिकार नाही. उलट संघटित रूपाने काम करण्यासाठी एक जबाबदार व्यक्तीची गरज असल्यामुळे अध्यक्ष नेमल्या जातो व तो योग्यपणे काम करत नसेल तर त्याला या पदावरून काढलेही जावू शकते, त्याच्या ठिकाणी दूसरा अध्यक्ष नेमल्या जावू शकतो. जी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती ही की, या अध्यक्षाला जरी अमीर म्हटले जात असले तरी तो फक्त या संघटनेचा अमीर आहे, संपूर्ण मुस्लिम समाजाचा नाही. त्याचे आज्ञापालन फक्त त्या लोकांसाठीच जरूरी आहे, जे या संघटनेचे सदस्य आहेत. आमच्या मनामध्ये असला विचार सुद्धा नाही की अमीरला एवढे महत्व द्यावे ज्यामुळे लोकांमध्ये असा संदेश जाईल की जे लोक त्याची आज्ञापालन करणार नाही ते अज्ञानी अवस्थेत मरतील.
    आता ईश्‍वराखातर मला सांगा की, जेव्हा आम्ही या पद्धतीने काम करत आहोत तर मग या जमाअतला ’उम्मत में एक नया फिरका’ कसे बरे म्हटले जाईल? तो फिरका कसा बनेल? आश्‍चर्य म्हणजे आमच्यावर या पंथीयतेचा आरोप तेच लोक लावत आहेत जे स्वतः चुका करत आहेत. ज्यांच्यामुळे समाजामध्ये फिरकाबंदी होत आहे. ज्यांच्या स्वप्नांची आणि चमत्कारांची चर्चा होत असते, ज्यांच्याकडे सर्व काम ’हजरत’वरील व्यक्तीगत श्रद्धेपोटी चालत राहते. ज्यांच्याकडे खास पदासाठी खास व्यक्तीचा दावा केला जातो. ज्यांच्याकडे गौण गोष्टींवर आपसात भांडणे आणि तर्कवितर्क केले जातात. जे प्रश्‍न आपसात बसून विचार विमर्श करून सोडविले गेले पाहिजेत, ते सोडविण्यामध्ये गटबाजी केली जाते. हेच लोक आमच्यावर पंथीयतेचा आरोप करण्यामध्ये पुढे-पुढे आहेत. जर कोणाला वाईट वाटणार नसेल तर मी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो की, आमच्या त्या गुन्ह्यावर हे लोक नाराज आहेत तो गुन्हा तो नाही जो की हे त्यांच्या तोंडाने म्हणत आहेत, उलट तो गुन्हा हा आहे की, आम्ही धर्माच्या त्या मूळ कामाकडे लोकांना बोलाविलेले आहे जे त्यांना आवडत नाही आणि या कामासाठी आम्ही तो खरा मार्ग अवलंबविलेला आहे ज्यामुळे त्यांच्या चुका स्पष्टपणे समोर येतांना दिसत आहेत.
    आम्हाला सांगितले जाते, की जर तुम्हाला हेच काम करावयाचे होते तर त्यासाठी वेगळी जमाअत विशिष्ट अशा नावाने का बनविली? अशामुळे     समाजामध्ये फूट पडते. वास्तविक पाहता हा विचित्र आरोप आहे. मला आश्‍चर्य या गोष्टीचे आहे की, जेव्हा निधर्मी, धर्माविरूद्ध राजकारणासाठी, गैरइस्लामी शिक्षणासाठी, धार्मिक गटबाजी केवळ भौतिक फायद्यासाठी केली जाते, पाश्‍चात्य लोकशाहीच्या फॉसिस्ट पद्धतींवर मुस्लिमांच्या संघटना विशिष्ट अशा नावाने बनविल्या जातात, तेव्हा त्यांना शांतपणे सहन केले जाते. परंतु इस्लामचे मूळ काम करण्यासाठी, शुद्ध इस्लामी तत्वांवर जर एक संघटना बनत असेल तर त्यामुळे समाजामध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण होते आणि अशी जमात सहन करण्यापलिकडची होवून जाते. यामुळे मला शंका वाटते की, या लोकांचा आक्षेप मुळात जमाअत बनविण्यावर नाही तर या गोष्टीवर आहे की, एखादी जमात शुद्ध धर्माच्या मूळ कामासाठी बनावी, त्यांना हे सहन होत नाहीये. तरीपण मी अशा लोकांना नम्रपणे सांगू इच्छितो की, नवीन जमाअत बनविण्याचा गुन्हा आम्ही नाईलाजास्तव केलेला आहे, आनंदाने नव्हे.
    देशातील सर्व मुसलमानांना माहित आहे की, जमाअते इस्लामीची स्थापना करण्यापूर्वी मी कित्येक वर्षे एकटा ओरडत होतो की, ’मुस्लिमांनों तुम्ही या कोणत्या मार्गावर जात आहात? आपली शक्ती आणि प्रयत्न पणाला लावत आहात? खरे पाहता तुमचे करावयाचे काम तर हे आहे, या कामासाठी आपली पूर्ण शक्ती लावा. माझे हे म्हणणे सर्व मुस्लिमांनी स्वीकार केले असते तर फारच छान झाले असते. मग मुस्लिमांमध्ये एक जमाअत बनविण्याऐवजी सर्व मुस्लिमांची एक जमाअत बनली असती आणि किमान भारतापूर्ती तरी तिला ’अल-जमाअत’ म्हणता आले असते. म्हणजे ती एक अशी विशिष्ट जमाअत तयार झाली असती जिच्यामध्ये सर्व स्तरातील मुसलमान एकत्र आले असते आणि जे या जमाअतमध्ये आले नसते त्यांना इस्लामच्या बाहेरचे मानले गेले असते.’
    एवढेच नव्हे तर भारतात मुस्लिमांच्या ज्या संघटना काम करत होत्या त्यातली एखाद्या संघटनेने सुद्धा माझे म्हणणे ऐकले असते तरी आम्ही त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आनंदाने तयार झालो असतो. मात्र जेव्हा ओरडून-ओरडून आम्ही थकलो आणि आमचे म्हणणे कोणीही ऐकले नाही तेव्हा नाविलाजाने हा निर्णय करावा लागला.  व म्हणावे लागले की जे लोक आमच्या संघटनेच्या उद्देशाला आणि कामाच्या पद्धतीला योग्य समजतात व हे काम करणे आपले कर्तव्य समजतात, त्यांनी स्वतःच या जमाअतमध्ये यावे व जमाअतच्या उद्देशप्राप्तीसाठी सामुहिक प्रयत्न करावेत.

ख्वाब टूटे मगर हौंसले तो जिंदा है
हम वो कौम हैं जहां मुश्किलें शर्मिंदा हैं
प्रेषितपूर्व काळात अरबी लोक इतके वाईट होते की कोणी त्यांच्यावर राज्य सुद्धा करू इच्छित नव्हते. मूर्ती पूजा करणारा, टोळ्या करून राहणारा, उंट आणि बकर्‍या पाळणारा, त्यांच्या चार्‍यासाठी वणवण भटकणारा, खजूर खाणारा, उंट आणि बकरीचे दूध पिणारा, काटक आणि राकट अरबी समाजामध्ये अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात व्यापलेली होती. दारू, जुगार आणि व्याभिचार हे त्या काळी प्रचलित असलेले सर्वच अवगुण त्यांच्यात होते. गुलामगिरीची पद्धत अस्तित्वात होती. गुलाम आणि स्त्रीया या दोन समाज घटकांवर जे अत्याचार होत होते त्याचे वर्णन एका लेखात करणे केवळ अशक्य.
    वाचकांच्या लक्षात यावे यासाठी सांगतो की, स्त्रीयांना त्या काळात काडीची किमत नव्हती. कोणी किती स्त्रीयांशी विवाह करावेत याला सीमा नव्हती, वडिलांच्या मृत्यूनंतर सख्खी आई वगळता मोठ्या मुलाच्या ताब्यात वारसा हक्काने बापाच्या सर्व बायका येत होत्या एवढा अनैतिक हा समाज होता. मुलींचा जन्म ही तिरस्करणीय बाब होती, म्हणून मुलगी झाली तर तात्काळ जीवंत गाढून मृत बालिका जन्माला आली असा संदेश देण्यासाठी सुईनींना मोठमोठे नजराने अगोदरच देऊन ठेवले जात. व्यापारी काफिल्यांना लुटण्याचा प्रकार त्यांच्या इतका अंगवळणी पडला होता की, इस्लाम स्विकारल्यानंतर अनेक बेदुईन (भटक्या) अरबांना हेच कळत नव्हते की, दुसर्‍यांच्या काफिल्याला लुटण्यामध्ये वाईट ते काय?
    मात्र त्यांच्या या सर्व दुर्गुुणांसह अनेक सद्गुणही त्यांच्यात होते.          - (उर्वरित पान 2 वर)
त्यासंदर्भात शोधनचे माजी संपादक सय्यद इफ्तेखार अहेमद यांनी लिहिले आहे की,  ”बेदुईन (भटक्या) अरबाला जगात कुणाचीही भीती वाटत नसे. मानवाची नाही की संकटाची नाही. एक भय मात्र त्याला लागून होतं ते म्हणजे मरणोत्तर आपलं काय होणार? या जगी ते सदैव आनंदी जीवन जगायचे. भुकेवर त्यांचं नियंत्रण होतं. अधिकाची त्यांना इच्छा नव्हती. ते सुखी-समाधानी असायचे. उद्याचा विचार ते करीत नसत. या जगातल्या धनसंपत्तीनं वंचित असण्याचं त्यांना काहीच वाटत नसे. ते फार संयमी होते. प्रत्येक अरब आपल्या कबिल्याच्या शिष्टाचारांचं पालन करीत, परंपरा, चालीरीतींचा आदर करीत. सोपवलेली जबाबदारी आनंदानं पार पाडीत. मुक्त जीवन त्यांच्या अत्यंत आवडीचं. तसेच ते व्यावहारिक जीवनदेखील जगत. आपल्या बेदुईन जगण्यावर त्यांना कमालीचा गर्व, आनंद आणि समाधान वाटायचं. अशा प्रत्येक शक्तीशी ते संघर्ष करीत असत जी त्यांना गुलाम बनवून त्यांचा अपमान करू पाहत असे. (प्रेषित मुहम्मद सल्ल. नवयुवगाचे प्रणेते पान क्र. 3)
    त्यांच्या याच अंगभुत गुणांचा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी भरपूर उपयोग करून घेतला. त्यांनी सांगितले की, ” जो जहालत (अज्ञान काळात) मध्ये चांगला तोच इस्लाममध्येही चांगला ठरेल.” आणि नेमकं तसच झालं. बघता-बघता अरबांचा मेकओव्हर झाला. ते जेवढे असभ्य होते तेवढे सभ्य झाले. इतके की शंभर वर्षाच्या आत पृथ्वीच्या एक तृतीयांश पृष्ठभागावर त्यांनी कल्याणकारी इस्लामी राज्यव्यवस्था कायम केली. अज्ञानता, अंधश्रद्धा, मूर्तीपूजा, विषमता, अन्याय आणि अत्याचाराला कंटाळलेल्या जनतेने ज्या-ज्या ठिकाणी मुस्लिम गेले त्या-त्या ठिकाणी त्यांचे स्वागत केले.
    आपल्याकडेच पाहना! मुस्लिम आक्रमकांमुळे भारतात इस्लाम पसरला असा व्यापक गैरसमज आज 21 व्या शतकातही बहुसंख्य लोकांमध्ये पसरलेला आहे. वास्तविक पाहता दक्षिण भारतात इस्लाम मलबारच्या मार्गे मुस्लिम व्यापार्‍यांसोबत आला, तर उत्तर भारतात सुफी संतांसोबत आला. या दोघांच्याही समता मुलक वागण्याने वर्णव्यवस्थेचे चटके सहण करणारा समाज त्यांच्याकडे आकर्षित झाला. मध्ययुगीन काळात मुस्लिम आक्रमकांच्या तलवारीच्या जोरावर भारतात इस्लामचा प्रसार झाला, हे गृहितक मुदलातच चूक आहे, कारण तलवार असो का एके 47, शक्तीच्या बळावर कोणीही कोणाचे विचार बदलू शकत नाही, श्रद्धा बदलणे तर लांबच राहिले. असे करणे शक्य असते तर आज प्रत्येक देशात आधुनिक हत्यार आहेत, त्या बळावर लोकांच्या श्रद्धा सहज बदलता आल्या असत्या. त्या बदलता येत नाहीत यातच सर्व काही आले.
    प्रेषित सल्ल. यांनी 23 वर्षाच्या आपल्या प्रेषितत्वाच्या काळात जे युद्ध केले ते बहुतांशी रक्षात्मक होते. ज्या ठिकाणी आक्रमण केले असेल तेही स्वरक्षणार्थ घेतलेल्या पुढाकाराचे युद्ध होते. आणि आश्‍चर्य म्हणजे या 23 वर्षात झालेल्या युद्धांमध्ये फक्त 1 हजार 18 लोक मारले गेले. त्यात 250 मुस्लिम तर 750 विरोधक होते. यात बनू कुरैजा नावाच्या एका कबिल्याच्या 400 लोकांना जो मृत्यूदंड दिलेला होता त्यांचाही या आकडेवारीत समावेश आहे. म्हणजे ती आकडेवारी जर सोडली तर या सर्व युद्धात विरोधी पक्षांचे फक्त 350 लोकच मारले गेले. कल्याणकारी इस्लामी व्यवस्था स्थापन करण्यासाठी ही युद्धे मानवी इतिहासावर उपकारकच म्हणावे लागले. कारण एवढे लोक तर आपल्या देशात एका आठवड्यात रस्ते अपघातात मरण पावतात.
    इस्लामच्या प्रचार आणि प्रसारामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी खरी समता, खरा न्याय आणि खर्‍या करूणेची अमलबजावणी समाजामध्ये करून दाखविली. त्यांनी जमीन नव्हे मने जिंकली. लोकांना असभ्यतेकडून सभ्यतेकडे बोलाविले, प्रेमाने बोलाविले, त्यांच्यावर करूणेचा वर्षाव केला, त्यांना सोबत घेऊन जेवण केले, त्यांच्यावर विश्‍वास ठेवला, त्यांच्यामध्ये खरी-खुरी समता प्रस्थापित केली.
    फतेह मक्कानंतर जेव्हा काबागृहावर चढून अजान देण्याची वेळ आली तेव्हा शिडी नसल्यामुळे कधीकाळी गुलाम राहिलेल्या काळ्याकुट्ट हबशी आदिवासी व्यक्ती ज्यांचे नाव हजरत बिलाल रजि. होते. प्रेषित सल्ल. यांनी आपल्या पवित्र खांद्यावर त्यांना पाय ठेवून काबागृहावर चढविले. हे दृश्य पाहणार्‍या हजारो लोकांच्या किंचाळ्या निघाल्या. या दृश्याने भारावून जावून कित्येक लोक रडू लागले. या दर्जाच्या समतेचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता. जे मुस्लिम लोक प्रेषित सल्ल. यांच्या पवित्र हाताला स्पर्श करण्यासाठी आसूसलेले असत त्या पवित्र प्रेषितांच्या पवित्र खांद्यावर पाय ठेऊन पवित्र काबागृहावर चढण्याचा मान कुठल्या कुलीन अरबी सरदाराला न मिळता हजरत बिलाल रजि. यांच्यासारख्या आदिवाशाला मिळाला. हे दृश्य पाहून लोकांना बिलाल रजि. यांच्या नशीबाचा हेवा वाटू लागला.
    प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीचा सार संक्षिप्तरित्या सांगायचा झाल्यास तो त्यांनी हज्जतुल विदाच्या दिवशी अराफातच्या मैदानात जे भाषण दिले होते तो होय. हा एका प्रकारचा मानवी हक्काचा पहिला जाहीरनामाच म्हणायला हवा.
    सय्यद इफ्तेखार अहेमद यांनी प्रेषित सल्ल. यांचे भाषण त्यांच्या भाषेत खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे. ते लिहितात, प्रेषित सल्ल. म्हणाले की, ”अल्लाहशिवाय कोणी ईश्‍वर नाही, तो एकमेव असून त्याचा कोणी भागीदार नाही. अल्लाहनं आपलं वचन पूर्ण केलं. त्यानं आपल्या भक्तास मदत केली आणि एकट्यानं एकत्रित आलेल्या सगळ्या खोट्या शक्तींना पराभूत केलं.
    हे लोकहोे ! मी सांगतो ते ऐका. मला नाही वाटत आपण पुन्हा एकत्रित येऊ. मला एक वर्ष लाभेल असेही मला वाटत नाही.
    आजचा हा दिवस, हा महिना, हे ठिकाण पवित्र आहे. तसचं लोकहो! सर्वांचं जीवन (रक्त) आणि मालमत्तेचा आदर करा, ते पवित्र आहेत. लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना अल्लाह समोर एक दिवस हजर व्हायचंय. तुमच्या कर्मांची मग तिथं विचारपूस होईल. कुणाचं नाहक रक्त सांडू नका. घरादारांचा नाश करू नका. तिथं सर्व कर्माची झडती द्यावी लागेल.
    अज्ञानकाळात झालेल्या खुनांचा सूड घेणं आता रद्द होतंय. सर्वप्रथम मी आपल्या परिवाराच्या खुनाचा बदला माफ करून टाकतो. हारिसचा मुलगा रबीआच्या खुनाचा सूड घेतला जाणार नाही.
    हे लोकहो ! अल्लाहनं तुम्हाला एकच स्त्री-पुरूषा पासून जन्म दिलाय. तुमच्या जमाती आणि टोळ्या बनवल्या त्या एकमेकांच्या ओळखीसाठी. पण अल्लाहपाशी तुमच्यापैकी तोच प्रतिष्ठित आहे जो सदाचारी असेल.
    सारे मानव आदमची संतती आहे. आदम यांना चिखलमातीपासून निर्माण केलंय. कुणा अरबास अरबेतरावर प्रतिष्ठा नाही की अरबेत्तरांना अरबांवर प्रतिष्ठा नाही. तसंच काळ्या माणसाला गोर्‍या माणसावर आणि गोर्‍या माणसाला काळ्या माणसावर प्रतिष्ठा नाही. अज्ञानकाळातल्या सगळ्या प्रतिष्ठा मी माझ्या पायाखाली तुडवित आहे. कुरैशच्या लोकांनो! अल्लाहनं तुमच्या छोट्या अहंकारास नष्ट करून टाकलं. तुमच्या बापजाद्यांच्या पराक्रमांवर घमेंड करण्याला काही अर्थ नाही.
    सावकारी निषिद्ध झाली. व्याजबट्टयाचा व्यवहार निषिद्ध झाला. सर्वप्रथम मी माझे चुलते अब्बास यांचं व्याज रद्द करतो.
    लोकहो ! तुमच्या पत्नींचे तुमच्यावर काही अधिकार आहेत, तसेच तुमचे त्यांच्यावर अधिकार आहेत. आपल्या पत्नीबाबत अल्लाहचं भय बाळगा. अल्लाहस वचन देऊन तुम्ही त्यांना आपल्या भार्या (पत्नी) म्हणून स्वीकारल्या आहेत. त्यांच्याशी सहानुभूतीनं, नरमाई आणि दयेनं वागा.
    कुणा स्त्रीनं आपल्या पतीच्या संपत्तीतून त्याच्या अनुमतीशिवाय काही देणं हे वैध नाही. तुमच्या पत्नीवर तुमचा हा अधिकार आहे की त्यांनी अशा कुणा व्यक्तीस घरी बोलवू नये ज्यास तुम्ही पसंत करीत नाही. त्यांनी आपल्या शीलाचं रक्षण करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर तुम्ही त्यांना शिक्षा करू शकता; पण सौम्य प्रकारची. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करा.
    पाहा ! माझ्यानंतर तुम्ही परत भरकटू नका. आपसांत रक्त सांडू नका. कुरैशच्या लोकांनो! तुमच्या मनांवर या जगाचं ओझं घेऊन तुम्ही अल्लाहसमक्ष उभं राहावं आणि दुसर्‍यांनी सत्कर्म घेऊन यावं असं होऊ नये. तसं झालं तर मी तुमच्या काही कामी येणार नाही.
    कोणी विश्‍वास करून तुमच्याकडे अमानत ठेवली तर विश्‍वासघात करू नका. दिलेलं वचन पाळा. सारे मुस्लिम एकमेकांचे भाऊ आहेत. दुसर्‍यानं तुम्हाला काही राजीखुशीनं दिलं तर ते घ्या. त्याच्या मर्जीशिवाय त्याच्या मालाला हात लावू नका. अन्याय करू नका.
    अल्लाहनं ज्याचे त्याला हक्क दिलेत. आता कोणी कुणाच्या बाबतीत मृत्यूपत्र करू नये.
    ज्याच्या बिछान्यावर बाळानं जन्म घेतला असेल ते बाळ त्याचंच. ज्यानं व्याभिचार केला त्यास दगडानं ठेचून मृत्यूदंड दिला जाईल. त्यांचा हिशेब अल्लाहपाशी होईल.
    कोणी आपलं कुळ बदलू नये, दुसर्‍यास आपला पिता मानू नये. कोणी असं केल्यास त्याचा अल्लाह धिक्कार करील. कर्ज घेतल्यात ते परत करा. कोणी भेटवस्तू दिल्यास तुम्हीही द्या.
    मी तुमच्या दरम्यान एक वस्तू सोडून जातोय. तिला घट्ट धरल्यास तुम्ही कधी मार्गभ्रष्ट होणार नाही. ती ’कुरआन’ आहे ! धर्माच्या बाबतीत अतिरेक करू नका. तुमच्या पूर्वीच्या लोकांचा यामुळेच विनाश झाला, हे लक्षात ठेवा.
    लोकहो ऐका ! आकाश आणि पृथ्वीची निर्मिती झाली त्याला बराच काळ लोटून गेलाय. अल्लाहनं ज्या वेळी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याचवेळी वर्षाचे बारा महिने ठरवले आहेत. यात चार महिने आदरणीय आहेत. हा (इस्लाम) धर्म कायमस्वरूपी आहे. लक्षात ठेवा माझ्यानंतर नाकारणारे होऊ नका. एकमेकांचं रक्त सांडू नका. सैतान आता निराश झालाय. प्रार्थना करणारे (नमाज अदा करणारे) त्याची पूजा करणार नाहीत; पण तो तुम्हाला एकमेकांविरूद्ध उभं करील.
    तुमचे जे गुलाम, सेवक आहेत त्यांच्याशी चांगलं वागा. तुम्ही खाता तेच त्यांना द्या. तुम्ही घालता तसेच कपडे त्यांना द्या. त्यांनी चूक केल्यास माफ करा.
    ऐका ! तुमच्यावर जर एखाद्या काळ्या अ‍ॅबिसीनियन (निग्रो)  गुलामाला जरी प्रमुख नेमलं गेलं तर त्याच्या आदेशाचं पालन करा. जर तो अल्लाहच्या ग्रंथानुसार निर्णय घेत असेल तर !
    लोकहो ! आपल्या विधात्याची उपासना करा. पाच वेळा नमाज अदा करा. महिनाभर रोजे ठेवा. आपल्या संपत्तीतून जकात अदा करा, खूश दिलानं. अल्लाहच्या घराची हजयात्रा करा. आपल्या प्रमुखाचं पालन करा. तुम्ही जन्नतमध्ये प्रवेश कराल. आणि पाहा, एकाने केलेल्या गुन्ह्यासाठी दुसर्‍याला जबाबदार धरलं जाणार नाही. बापानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला की मुलानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या बापाला दिली जाणार नाही. लोकहो ! माझ्याविषयी तुम्हाला विचारलं जाईल (अल्लाहपाशी) तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल?”
    लोक म्हणाले, ”तुम्ही अल्लाहचा धर्म आम्हास पोचता केला याची आम्ही साक्ष देऊ. आपण प्रेषित्वाची जबाबदारी पार पाडली, आमचं भलं केलं.”
    लोकांचं हे बोलणं ऐकूण प्रेषितांनी आपलं बोट आकाशाकडे उंच केलं आणि तीन वेळा उच्चारलं, ” अल्लाह! तू साक्षी आहेस. अल्लाह तू साक्षी आहेस. अल्लाह तू साक्षी आहेस.”
    येणेप्रमाणे एका उम्मी (निरक्षर) प्रेषित सल्ल. यांच्या तर्फे अल्लाहने आपला धर्म पृथ्वीतलावरील सर्व लोकांसाठी पोहोचवला. आता जे या शिकवणीच्या विरूद्ध जगण्याचा प्रयत्न करतील ते अपयशी ठरतील आणि जे प्रेषित सल्ल. यांच्या या शिकवणीनुसार जगतील ते यशस्वी होतील. हाच प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीचा सार आहे.

- एम.आय.शेख

शिर्षकावरूनच आठवण झाली असेल 2014 च्या विधानसभा निवडणूक प्रचाराची. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जोखडातून महाराष्ट्राला सोडविण्यासाठी भाजप-शिवसेनेने त्यांना प्रश्‍न विचारला की, ’कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’. या टॅगलाईनमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आणि खरोखरच सत्तापालट झाले. भाजप-शिवसेनेचे सरकार आले. पाच वर्षे उलटली युतीच्या सरकारला. या दरम्यान महाराष्ट्र कर्जाच्या खाईत लोटला गेला. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, अलेक उद्योगधंदे बंद पडले, भावनिक राजकारणाला भरती आली, गरीबीच्या उत्थानाला खीळ बसली. 2019 उजाडले. निवडणुका लागल्या. भाजपाने मेगा भरती सुरू केली. त्यामुळे विरोधक पुरते हैरान झाले. मात्र शरद पवारांनी पावसात भीजत भाषण करून निवडणुकीचं एकतर्फी गणित पालटलं. ’मी पुन्हा येईल’चा नारा मुख्यमंत्र्यांनी दिला. याच काळात पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भात हाहाकार सुरू होता. मात्र प्रचाराची रणधुमाळी सुरूच होती.निवडणुका झाल्या. महाराष्ट्राच्या जनतेने युतीला पुन्हा एकदा -(उर्वरित लेख पान 7 वर)
सत्तास्थापनेच्या जवळ जाण्याची संधी दिली. त्यांना काठावरचे बहुमत मिळाले. वाटले आता दुसर्‍या दिवशी सरकार स्थापन होईल. मात्र एकमेकांचे जमत नसल्याने पंधरा दिवस उलटले तरी सरकारचे सत्तास्थापन झाले नाही. इकडे मराठवाड्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. हातातोंडाशी आलेले पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. इकडे शेतकरी ललाटी हात लावून बसला. तिकडे सरकार सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी करीत फिरू लागले. एकीकडे शेतकरी परेशान तर दूसरीकडे सर्वसामान्य जनता डेंग्यूसारख्या आजारांनी त्रस्त. अशा परिस्थितीत राजधर्म पाळण्याऐवजी युतीसरकार मुख्यमंत्री पदावरून सोंगट्याचा खेळ खेळीत आहे. अन् विरोधकांनाही सत्तेची स्वप्न पडत आहेत. अशा स्थितीत 15 दिवसाचा काळ उलटला अन् महाराष्ट्र आसमानी, सुलतानी आणि राजकीय संकटात भाजत आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकर्‍यांना एकरी 25 हजाराची मदत द्यावी, अशी मागणी जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने भाजप सरकारकडे केली आहे.
    राज्यात प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 60 लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. 27 लाख 63 हजार शेतकर्‍यांना या आपत्तीचा गंभीर फटका बसला आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, इतकी मदत सरकारने करावी, असा सूर शेतकर्‍यांतून उमटत आहे. अवकाळी पावसाने शेती क्षेत्रात काय ‘उद्ध्वस्त’ केलंय, याचा अजूनही अंदाज न आल्यानेच अशा ‘कफल्लक’ बाता केल्या जात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार पिकांचे 17 हजार 700 कोटीं रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. परिस्थिती पाहता ते वाढून 20 हजार कोटींच्या वर जाणार आहे. पिके वाया गेल्याने ग्रामीण भागातला संपूर्ण रोजगार कोलमडून पडला आहे. चारा बरबाद झाल्याने दूध व्यवसाय संकटात आला आहे. कच्चा माल सडून गेल्याने प्रक्रिया उद्योगाच्या अडचणी वाढल्या आहेत. संकट गहिरे आहे. हेक्टरी 25 हजार रुपये म्हणजे गुंठ्याला 250 रुपये मदत ही शेतकर्‍यांची निव्वळ चेष्टा आहे. प्रश्‍न केवळ उत्पादन खर्च भरून देण्याचा नाही. तयार झालेला सोन्यासारख्या शेतीमालाच्या बाजारातील किमतीइतकी मदत शेतकर्‍यांना मिळणे आवश्यक आहे.
    सरकारने जाहीर केलेल्या 10 हजार कोटींच्या घोषणेबद्दलही मोठी संदिग्धता आहे. घोषणा होतात, प्रत्यक्ष मदत मात्र शेतकर्‍यांना मिळत नाही हा अनुभव आहे. मागील गारपिटीचे, दुष्काळाचे, कर्जमाफीचे, बोंडआळीच्या नुकसानभरपाईचे पैसे अनेक शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेले नाहीत. परवा परवा आलेल्या महापुराच्या नुकसानभरपाईचे 6,800 कोटी रुपयेही बाधितांना अद्याप मिळालेले नाहीत. राज्य सरकारची कर्जबाजारी आर्थिक परिस्थिती पाहता, जाहीर केलेले 10 हजार कोटी रुपयेसुद्धा सरकार कोठून आणणार हाही प्रश्‍नच आहे. अशा परिस्थितीत घोषणा ‘जुमला’ ठरू नये, यासाठी केंद्र सरकारने स्वतःहून मदतीसाठी पुढे यावे.
    केंद्र सरकार आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता निधी (एनडीआरएफ) अंतर्गत राज्यांना मदत करत असते. अर्थात, जाचक निकष, अटी, शर्तींचे अडथळे तेथेही असतातच. राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता निधी अंतर्गत मदतीच्या निकषात ‘अवेळी पाऊस’ व ‘ढगफुटी’ मदतीसाठी पात्र नसल्याची आठवण केंद्र सरकारने राज्य सरकारला अगोदरच करून दिली आहे. प्रस्ताव जाण्यापूर्वीच हात वर करण्याचा हा प्रकार निराशा वाढविणारा आहे. शेतकर्‍यांवरील संकट पाहता निकषांचे हे अडथळे बाजूला ठेवण्याची, निकषांमध्ये योग्य ते बदलही करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आपत्ती सहाय्यता निधी अंतर्गत कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी 6,800 रुपये, बागायती क्षेत्रासाठी 13,500 रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी 18,000 रुपये मदत देय असते. आपत्ती पाहता, तुटपुंज्या मदतीने शेतकर्‍यांना दिलासा मिळणार नाही. केंद्र व राज्याने यासाठी विशेष तरतूद करणे आवश्यक आहे.
    मात्र लेख लिहिपर्यंत म्हणजेच 11 नोव्हेंबरपर्यंत तरी सरकार स्थापन झाले नव्हते. शेतीचे पंचनामे करायचे काम जरी सुरू असले तरी शासकीय अटींमुळे लवकरच मदत मिळणे फारच कठीण आहे. यामुळे राजकीय पक्षांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करून जनतेची फरपट थांबवावी. शेतीसोबतच उद्योग, व्यापार अडचणीत आहेत. पावसामुळे राज्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. असं कुठलंच शहर बाकी नाही राहिलं ज्या ठिकाणचे मुख्य रस्तेही खड्डेयुक्त नाहीत. ग्रामीण भागाचे हाल तर फारच भयानक आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी गावोगावी जावून नुकसानीचा आढावा घ्यावा. ज्यांचं अतीव नुकसान झालं आहे, अशांना तात्काळ लोकवर्गणीकरून का होईना मदत द्यावी. माणुसकीचा धर्म पाळावा. शासकीय मदत मिळवून देण्याची आश्‍वासनं देण्यापरिस खारीएवढी का होईना जाग्यावरच मदत द्यावी. गावकर्‍यांना एकत्रित करून आधार द्यावा. ज्या गावांत घरानी पाणी शिरून जीवनावश्यक वस्तूंची नासधूस झाली. तेथील नागरिकांसाठी अन्नधान्य उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. मुलांच्या शालेय साहित्याचं जिथे नुकसान झाले आहेत तेथे तात्काळ शालेय साहित्य पोहोचवावेत. ज्या गावात अतिवृष्टी झाली आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून त्याचा फायदा तेथील शेतकरी, नागरिकांना पोहोचवावा. दैनिक वर्तमानपत्रामध्ये खासकरून लोकमतमध्ये बांधावर जावून लाईव्ह रिपोर्टींग करण्यात आली. यावेळी शेतकर्‍यांनी मांडलेल्या व्यथा पाहून हृदय पिळवटून जातं. त्यामुळे निरपेक्ष भावनेने सगळ्यांनी पुढे येवून उपाययोजना केल्या तर निश्‍चितच पुरोगामी महाराष्ट्राला शोभून दिसेल.

- बशीर शेख 

माननीय इब्ने अब्बास यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने अल्लाहकडे बोलविणाऱ्या (मुअ़िज़्जन) चा आवाज ऐकला आणि त्याला त्या आवाजाकडे   जाण्यापासून रोखणारा त्याच्याकडे बहाणाही नसेल तर त्याने एकट्याने अदा केलेली ती नमाज (अंतिम निवाड्याच्या दिवशी) मान्य केली जाणार नाही.’’
लोकांनी त्यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘बहाण्याचा अर्थ काय? आणि कोणकोणत्या बाबी बहाणा बनू शकतात?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘भय आणि आजारपण.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
प्राण जाण्याचे ‘भय’. एखाद्या शत्रूमुळे अथवा एखादे श्वापद आणि सापामुळे आणि मस्जिदपर्यंत जाता येणे शक्य नाही असे ‘आजारपण’. वादळी वारा, पाऊस आणि नेहमीपेक्षा अधिक  थंडीदेखील बहाणा बनू शकते. परंतु थंड हवेच्या ठिकाणी थंडीचा बहाणा केला जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे उष्ण विभागांत कधी कधी अधिक थंडी पडते आणि ती त्यांच्या जीवावर  उठण्याची शक्यता असते, अशी थंडी बहाणा बनू शकते. अशाप्रकारे त्या वेळी मनुष्याला कमी-अधिक प्रमाणातील शौच अथवा लघुशंकेची आवश्यकता भासल्यास तेदेखील बहाणा ठरू शकते.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार, (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात) आमची स्थिती अशी होती की आजारी व्यक्ती आणि धर्मद्रोही व्यक्तीव्यतिरिक्त  आमच्यापैकी कोणी सामूहिक नमाज चुकवित नव्हता आणि त्या धर्मद्रोही व्यक्तीचे वैमनस्य माहीत होते. तसेच (त्या काळात लोकांची स्थिती अशी होती की) आजारी असूनही काहीजण  दोन माणसांचा आधार घेऊन मस्जिदमध्ये पोहचत होते आणि सामुस्रfयक नमाज अदा करीत होते. अब्दुल्लाह इब्ने मसऊद यांनी याबाबतीत सांगितले की, अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आम्हाला ‘सुन्नतुल-हुदा’ शिकविल्या. (‘सुन्नतुलहुदा’ म्हणजे मुस्लिम जनसमुदायाला अनुसरण्यास सांगण्यात आलेल्या आणि कायद्यात्मक दर्जा प्राप्त असलेल्या पैगंबराचरण  पद्धती. या पद्धतींपैकी एक पद्धत म्हणजे ज्या मस्जिदीतून अजान दिली जाते त्या मस्जिदीत नमाज अदा करणे होय.) अशीही एक ‘रिवायत’ (पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून  ऐकलेली गोष्ट त्यांच्याच शब्दांत इतरांना सांगणे) आहे की त्यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याला ही गोष्ट पसंत असेल की त्याची आज्ञापालन करणाऱ्या भक्ताच्या स्वरूपात भविष्यात  अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहशी भेट होईल तेव्हा त्याने त्या पाच नमाजींची देखरेख केली पाहिजे आणि त्या नमाजी मस्जिदमध्ये सामूहिकरीत्या अदा केल्या पाहिजेत कारण  अल्लाहने तुमच्या पैगंबरांना (मुहम्मद (स.) यांना) ‘सुन्नते हुदा’चे प्रशिक्षण दिले आहे आणि या नमाजी ‘सुन्नते हुदा’पैकी आहेत आणि जर तुम्ही तुमच्या घरात नमाज अदा कराल,  जसे- हे धर्मद्रोही लोक आपल्या घरांमध्ये नमाज अदा करतात, तर तुम्ही आपल्या पैगंबरांच्या (मुहम्मद (स.) यांच्या) आचरण पद्धती सोडून द्याल आणि जर तुम्ही आपल्या  पैगंबरांच्या आचरण पद्धती सोडल्या तर सरळमार्ग विसरून जाल.’’ (हदीस : मुस्लिम)

(२९) मी इच्छितो की माझा आणि तुझा गुन्हा तूच संचित करशील५० आणि नरकवासी बनून राहशील. अत्याचारींच्या अत्याचाराचा हाच खरा योग्य मोबदला आहे.’’
(३०) सरतेशेवटी त्याच्या मोहाने आपल्या भावाची हत्या करणे त्याच्यासाठी सोपे केले आणि तो त्याला ठार मारून त्या लोकांत सामील झाला जे नुकसान सोसणारे आहेत.
(३१) मग अल्लाहने एक कावळा पाठविला जो जमीन खणू लागला जेणेकरून त्याला दाखवावे की आपल्या भावाचे प्रेत कसे लपवावे. हे पाहून तो उद्गारला, ‘‘खेद आहे मजवर! मी या  कावळ्यासारखासुद्धा बनू शकलो नाही की आपल्या भावाचे प्रेत लपविण्याची युक्ती काढली असती.’’५१ यानंतर त्याने आपल्या कृत्यावर फार पश्चात्ताप केला.५२
(३२) याच कारणास्तव बनीइस्राईलकरिता आम्ही हे फर्मान लिहिले होते५३ की, ‘‘ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने  ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.’’५४ परंतु त्यांची अवस्था अशी   आहे की आमचे पैगंबर वरचेवर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात मोठ्या संख्येने पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत.
(३३) जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि भूमीवर याकरिता धावपळ करतात की हिंसाचार माजवावा,५५ त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील   अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्परविरूद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापले जातील, अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल.५६ हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्याकरिता याहून मोठी शिक्षा आहे.


५०) म्हणजे याऐवजी की एकदुसऱ्याला ठार करण्याच्या गुन्ह्यात आम्ही पडावे, मी हे उत्तम समजतो की दोघांचे गुन्हे तुझ्या एकट्याच्याच डोक्यावर यावे. तुझा ठार करण्याचा गुन्हा   आणि त्या क्षतीचा गुन्हा जो मी तुला केली, जेव्हा मी स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होतो.
५१) अशाप्रकारे अल्लाहने एका कावळ्याच्या द्वारा आदम (अ.) यांच्या त्या दुराचारी पुत्राला त्याच्या मुर्खपणावर व अज्ञानतेवर  सचेत केले. त्याला आपल्या मनात डोकावण्याचा अवधी  मिळाला तेव्हा तो अतिलज्जित झाला. कारण भावाचे प्रेत कसे लपवावे हेसुद्धा त्याला माहीत नव्हते. तो याविषयी कावळयापेक्षासुद्धा निर्बुद्ध निघाला. त्याला आता कळून चुकले की  आपल्या भावाला ठार करणे हे अतिमूर्खतापूर्ण आणि अज्ञानतापूर्ण कृत्य होते. नंतरचे वाक्य ``तो आपल्या करनीवर पश्चात्ताप करू लागला.'' याच अर्थाला प्रमाणित करीत आहे.
५२) येथे या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करण्याचा मूळ उद्देश यहुदींच्या त्या कटकारस्थानांवर सूक्ष्म दृष्टीने निंदा करणे आहे. जे त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या प्रतिष्ठित  सहाबा यांना ठार मारण्यासाठी केले होते. (पाहा या सूरहची टीप क्रं. ३०) दोन्ही घटनांमध्ये स्पष्ट समानता दिसून येते. त्यांनी आपल्या या अपमानित स्थितीच्या कारणांवर विचार केला  असता आणि आपल्या उणिवा दूर करण्यास तयार झाले असते ज्या कारणांनी त्यांना अल्लाहने रद्द केले होते. त्या लोकांवर (ग्रंथधारकांवर) अज्ञानतेचा तोच प्रभाव पडला होता ज्यात  आदम (अ.) यांचा दुसरा दुराचारी मुलगा ग्रस्त अल्लाहने अरबांच्या या (उम्मी) अशिक्षितांना स्वीकृत करून सन्मानित केले आणि त्या जुन्या ग्रंथाधारकांना रद्द केले. एकीकडे   धर्मपरायणता होती आणि दुसरीकडे धर्मपरायणता नव्हती. परंतु तरीही ज्यांना रद्द केले होते (ग्रंथधारक) झाला होता. त्याच्याचप्रमाणे द्वेष आणि तिरस्काराच्या अग्नीत होरपळून अल्लाहच्या पार्टीच्या लोकांना ठार करण्यास तयार झाले होते. अशा व्रूâर व अज्ञानतापूर्ण कारवायांनी ते अल्लाहचे प्रिय तर होणारच नव्हते. या घृणित कारवाया त्यांना अधिकच धिक्कारित करणार होत्या याची त्यांना चांगली कल्पना होती.
५३) म्हणजे बनीइस्राईल त्या दुर्गुणांचे बळी पडले होते ज्या दुर्गुणांचे प्रदर्शन आदम (अ.) यांच्या त्या दुष्ट पुत्राने केले होते. म्हणून कुणालाही ठार करू नये असा कडक आदेश अल्लाहने  दिला होता आणि आपल्या फर्मानात हे शब्द लिहिले होते. खेदाने म्हणावे लागते की आजच्या बायबलमध्ये या ईशआदेशाच्या अनमोल शब्दांना स्थान नाही. तलमुदमध्ये असा आदेश  मिळतो, ``ज्याने एका इस्राईलीची हत्या केली, अल्लाहच्या ग्रंथानुसार त्याने जणुकाही जगातील सर्वमानवांची हत्या केली. ज्याने एका इस्राईलीचा जीव वाचवला तर जणूकाही त्याने  संपूर्ण मानवांचे रक्षण केले.'' त्याचप्रकारे तलमुदमध्ये उल्लेख आहे की हत्या करण्याच्या दाव्यात बनीइस्राईली न्यायाधीश साक्षीदारांना सांगत, ``ज्याने एखाद्याची हत्या केली तर त्याची  अशा प्रकारे चौकशी केली जाईल जणूकाही त्याने जगभराच्या लोकांची हत्या केली आहे.''
५४) म्हणजे जगात मानव-वंश टिकून राहाण्यासाठी एकदुसऱ्याच्या प्राणाचा आदर प्रत्येकाच्या मनात असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने एकदुसऱ्याचे जीवनरक्षण करण्याची भावना बाळगणे  आवश्यक आहे. जो कोणी अकारण एखाद्याची हत्या करतो तेव्हा तो फक्त एकावरच अत्याचार करीत नाही. तो खुनी दुसऱ्याची हत्या करून सिद्ध करतो की मानवी जीवनाच्या आदर  सन्मानांने त्याचे मन खाली आहे. त्याला मानवी सहानुभूती नाही म्हणून तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. अशा व्यक्तीमध्ये तो दुर्गुण सापडतो जो इतर सर्व मानवात असेल तर पूर्ण   मानवजातच नष्ट होऊन जाईल. याविरुद्ध जो मनुष्य मानवी जीवनाचे रक्षण व आदर करतो तो खरेतर मानवतेचा आदर करणारा आहे आणि समर्थक आहे कारण त्यात ते वैशिष्ट्य  सापडते ज्यावर मानवता टिकून आहे.
५५) धरतीने (भूमी) अपेक्षित तो देश किंवा प्रदेश आहे ज्यामध्ये शांती व्यवस्था स्थापित करण्याची जबाबदारी इस्लामी राज्याची आहे. अल्लाह आणि अल्लाहच्या पैगंबरांशी लढण्याचा  अर्थ त्या कल्याणकारी व्यवस्थेविरुद्ध लढणे जी इस्लामी राज्याने स्थापित केली आहे. इस्लामी धर्मशास्त्रींच्या मतानुसार याने अभिप्रेत ते लोक आहेत जे सशस्त्र आणि सुसज्ज बनून डाका टाकतात.
५६) या वेगवेगळया शिक्षा संक्षिप्त् रूपात सांगितल्या आहेत. याच्या आधाराने न्यायाधीश (काझी) किंवा शासनाध्यक्ष आपल्या विवेकबुद्धीने अपराधीला त्याच्या अपराधानुसार योग्य शिक्षा  देतील. मुख्य उद्देश आहे की एखाद्या माणसाने इस्लामी राज्यात राहून इस्लामी व्यवस्थेला उलटण्याचा कट करणे जघन्य अपराध आहे आणि त्याला या कडक शिक्षांपैकी एखादी कडक  शिक्षा दिली जाऊ शकते

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget