Halloween Costume ideas 2015
Latest Post


मुजफ्फरनगर येथील एका शिक्षिकेने वर्गातील एका विद्यार्थ्याला त्याच वर्गातील इतर विद्यार्थ्यांकरवी त्याच्या चेहऱ्यावर, चेहरा लाल झाल्यावर त्याच्या कमरेवर, शरीराच्या इतर भागांवर मारायला लावले एकानंतर एक सगळ्या विद्यार्थ्यांकडून. हा गुन्हा गंभीर आहे. तो मुलगा कोण? कुठल्या धर्माचा? श्रीमंत की गरीब? अमुक जातीचा की तमुक जातीचा? हे सगळे प्रश्न नंतरचे. पहिल्यांदा त्या विद्यार्थ्याला वर्गातीलच इतर विद्यार्थ्यांना मारायला लावणे हा गुन्हा केवळ गंभीरच नाही तर अशा शिक्षिकेला शिक्षण क्षेत्रातूनच हद्दपार करायला हवं. तिला कोणत्याही परिस्थितीत कुठेही शिक्षक म्हणून नेमायला नको. कारण ती विकृत मानसितेने ग्रासलेली आहे. ती साधारण व्यक्ती नाही. मानसिक आजाराने ती ग्रस्त आहे. ती शिक्षिका राहिलीच तर दुसऱ्यांदा ती असे क्रूर कृत्य करणार नाही याची खात्री नाही. 

आता यापुढचा प्रश्न- त्या शिक्षिकेने तो विद्यार्थी मुस्लिम आहे म्हणून मुहम्मडन म्हणत त्यास हिणवले. मुहम्मडन लोकांना हीच शिक्षा द्यावी, असे तिला बोलायचे आहे का? म्हणे मी आजारी आहे, उठता बसता येत नाही आणि त्या मुलाने अभ्यास केला नव्हता, त्यास पाढे येत नव्हते म्हणून मी त्याला मामरायला लावले. ह्या बनवाबनवीच्या गोष्टी आहेत. तो मुहम्मडन आहे म्हणून त्याला मारा असे ती म्हणत होती. आणि त्याच्या आईवडिलांनाही नावे ठेवायला सुरुवात केली. ते आपल्या मुलांना चांगले संस्कार देत नाहीत, असे तिला म्हणायचे होते. इथं प्रश्न असा उपस्थित होतो की तुमच्यावर कुणी संस्कार केले होते, ज्यांचे दर्शन तुम्ही घडवले? एक संस्कारी संस्था जे वर्षानुवर्षे कार्यान्वित आहे त्याचे तर हे संस्कार नाहीत?

हा प्रश्न इथेच थांबवू. जरा त्या मुलाचे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे त्या शिक्षिकेकडे आहेत काय? मी तर शाळेत शिकायला आलो होतो, संस्कार म्हणता ते मला शाळेत मिळेल काय? ज्या मुलांनी मला मारले त्यांच्यासमोर मी आजीवन मान खाली घालत राहीन, याचे उत्तर कुणाकडे आहे का? तुम्ही माझ्या वर्गमित्रांना माझ्याविरुद्ध करून माझा आत्मसन्मान हिरावून घेतला. मीही एक मानव आहे. याचे मला भान आता राहिले नाही. कारण त्या मुलांनी माझ्यावर पशूसारखे अत्याचार केले. मला माझी मानवता तुम्ही परत करणार का? माझ्या सभ्यतेला लोकांमध्ये, माझ्या मित्रांमध्ये तुम्ही माझा सन्मान काढून घेतला याची भरपाई कोण करणार? मी शिकायला आलो होते, तुम्ही मला काय शिकवले- आजन्म मी लोकांपासून आपलं तोंड लपवत राहू? ही जी माझी एक मानव म्हणून हानी झाली आहे ती कोण भरून काढणार? 

असे अनेक प्रश्न तो मुलगा विचारत आहे त्यांची उत्तरे कोण देणार, शिक्षिका? शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक संस्था, शासन, कोण जबाबदार? आज मुस्लिम विद्यार्थी आहे उद्या कोणत्या जातीचा असेल, परवा गरीब असेल, कुणाकुणाची उत्तरे तुम्ही देत राहणार?

संस्कृती, सभ्यता जोपासण्याची पहिली जबाबदारी ज्या शिक्षण व्यवस्थेची शिक्षकांची असते त्यांचीच अशी दशा झाली असेल तर पुढचा टप्पा नक्कीच संस्कृतीच्या अधःपतनाचा, नंतरचा टप्पा सभ्यतेच्या नासाडीचा आणि त्याच्या पुढचा टप्पा समाजाच्या विघटनाचा. वेळ गेलेली आहे. ही एक घटना नाही. एका माहितीनुसार ८० टक्के मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये शिवीगाळ केली जाते. त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात. त्यांना वाटेल ते बोलले जाते. हे एक प्रकरण उघडकीस आले, अशी हजारो प्रकरणे असतील जी समोर आलेली नाहीत. तरुणांमध्ये विषाची पेरणी पूर्ण झाली, आता आगामी पिढीला लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यामध्ये विषाची पेरणी जोरात सुरू आहे.

दलितांवर होणाऱ्या अत्याचारांना तर सीमाच नाही. गेल्या आठवड्यातच कितीतरी घटना त्यांच्यावरील अत्याचाराच्या, मारहाणीच्या, झुंडबळीच्या आल्या. त्यातील दोन घटनांमध्ये चार दलित युवकांना ज्यामध्ये एक लहान मुलगा होता. त्यांना उलटे टांगून मारहाण करण्यात आली. एक वयस्कर दलित व्यक्ती आपल्या बाइकवर रस्त्याने जात होता. त्याला काही लोकांनी अडवले. त्याच्यावर बाइक चोरीचा आरोप लावत तो मरेपर्यंत त्यास मारहाण केली. ह्या सर्वांचा हिशेब कुठे न कुठे कधी न कधी द्यावाच लागणार आहे. हे घडले पुरोगामी महाराष्ट्र राज्यात. कारण येथे कुणाचे सरकार आहे हे सर्वांना माहीत. तसेच कोण त्यांची गुलामी करत आहेत हेही सर्वांना माहीत आहे. जे लोक आपल्यासारख्या माणसावर लघुशंका करतात त्यांच्या संस्कृतीविषयी बोलायचे तरी काय!

शेवटी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की लहान मुले स्वर्गातील फुलांसमान असतात. त्या फुलांसमान मुलांना तुम्ही कोणती वागणूक देता?

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक

मो. 9820121207



कॅग (CAG) अर्थात कॉम्पट्रोलर अँड ऑडिटर जनरल ही एक स्वायत्त संस्था असून, सरकारी कामकाजाचे ऑडिट करण्याचे काम करते. कॅगचा रिपोर्ट सरकार किंवा कुठल्याही इतर सरकारी संस्थेकडे सादर न होता सरळ संसदेत सादर केला जातो. म्हणून या अहवालाला अनन्यसाधारण महत्व असते. यावर्षीर् देखील नुकत्याच संपलेल्या संसदेच्या मान्सून सत्रामध्ये कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. ज्यात सरकारी कामकाजामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॅगने केला आहे. उदा. प्रधानमंत्री हेल्थ इन्शुरन्स स्कीम म्हणजेच आयुष्यमान भारत योजना जी की पंतप्रधानांच्या नावाशी थेट जोडलेली आहे. यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या निदर्शनास आलेले आहे. 

कॅगचा असा आरोप आहे की, या योजनेचा वित्तीय लाभ बोगस नावे दाखवून उचलण्यात आला आहे. 9999999999 या मोबाईल क्रमांकावर 7.5 लक्ष लोकांनी तर 8888888888 वर 1.3 लक्ष याशिवाय 9000000000 वर ही अनेक बोगस लाभार्थी रजिस्टर्ड आहेत. केवळ 7 आधार कार्डवर 4 हजार 741 बोगस लाभार्थी रजिस्टर्ड आहेत. विशेष म्हणजे ही आकडेवारी नोव्हेंबर 2022 पर्यंतचीच आहे. वाचकांना आश्चर्य वाटेल की या सरकारी योजनेचा लाभ 24 कोटी लोकांना झालेला आहे. कोट्यावधी रूपयांचा खर्च यातील बोगस लाभार्थ्यांवर झालेला आहे. असा बोगस खर्च सर्वाधिक 22.4 कोटी तामिळनाडूमध्ये, 4.65 कोटी कर्नाटकात तर महाराष्ट्रामध्ये 1.47 कोटी झालेला आहे. रिपोर्टमध्ये असे सुद्धा म्हटलेले आहे की, यात अनेक लाभार्थी असे आहेत जे कित्येक दिवसांपुर्वीच मरण पावलेले आहेत. जवळ-जवळ 88760 मृत लोकांच्या नावावर 2.15 लाख दावे दाखल करण्यात आलेले आहेत. अशात आधारकार्ड ही योजना कुचकामी ठरली की काय? असा रास्त सवाल केला जावू शकतो. 

शिवाय, एस.बी.आय. ला न मागताच 8 हजार 800 कोटी रूपये वित्तीय सेवा विभागाने दिले असल्याचा ठपका कॅगने ठेवलेला आहे. याशिवाय नवीन विमानाचे मार्ग सुरू करण्याच्या योजनेमध्येही घोटाळा झाला असून, सर्वात मोठा घोटाळा राष्ट्रीय महामार्ग बांधण्यामध्ये झाला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. रस्ते बांधणीमध्ये चढ्या दराने ठेकेदारांना रकमा दिल्या गेल्याचा ठपका रिपोर्टमध्ये करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अल्पसंख्यांकांच्या शिष्यवृत्तीमध्येही घोटाळा झाला असून, 1572 संस्थांमध्ये केलेल्या चौकशीत 830 संस्था म्हणजे 53 टक्के संस्था ज्या बंद होत्या त्यांनाही नियमित शिष्यवृत्ती देण्यात आली होती, असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. 

थोडक्यात 7 प्रकारचे मोठे घोटाळे कॅगने उघडकीस आणलेले आहेत. 

या घोटाळ्यांचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतरही मीडियामध्ये त्या प्रकारचे रिपोर्टिंग झालेले नाही जसे टू जी घोटाळ्याच्या वेळेस झालेले होते. त्यावेळेस एवढा गहजब माजविण्यात आला होता की, काँग्रेसचे सरकार पडले होते. विशेष म्हणजे एवढा मोठा घोटाळा संसदेच्या पटलावर मांडलेला असतानादेखील अण्णा हजारे गप्प आहेत. संघाच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघालेले भाजपचे मंत्रीमंडळ आणि त्यातील मंत्री एवढा मोठा भ्रष्टाचार करूच कसे शकतात ही आश्चर्यजनक बाब आहे. परंतु याचे आश्चर्य कोणालाच झाले नसल्याचे दिसून येते. एकंदरित स्वतःला डिफ्रन्ट पार्टी म्हणून संबोधून घेण्यामध्ये आनंद माणणाऱ्या भाजपच्या दिव्याखाली सुद्धा तेवढाच अंधार आहे. जेव्हा काँग्रेसच्या दिव्याखाली होता. थोडक्यात नेहरूंच्या पहिल्या वहिल्या मंत्रीमंडळात संरक्षण विभागात झालेल्या जीप घोटाळ्यापासून ते आज अस्तित्वात असलेल्या व स्वतःला राष्ट्रहितवादी म्हणवून घेणाऱ्या भाजप सरकारच्या आयुष्यमान योजनेच्या घोटाळ्यापर्यंत सर्वच मंत्रीमंडळं भ्रष्ट निघालेली आहेत. कोणत्याही सरकारची कोणतीही टर्म भ्रष्टाचाराच्या आरोपाशिवाय पूर्ण झालेली नाही. कॅगच्या अहवालामध्ये राफेल घोटाळ्यासंबंधी काय लिहिलेले आहे याबद्दल कुठलीच माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही. त्यामुळे त्या संदर्भात भाष्य करणे शक्य नाही.

भ्रष्टाचार का केला जातो?

माणूस स्वार्थी असतो. त्याला स्वतःच्या स्वार्थी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केवळ ’भ्रष्टाचार करू नका’ असा सुभाषितवजा सल्ला देऊन भागत नाही. त्याच्या आंतरमनाला झोंबेल तेव्हाच तो या प्रवृत्तीवर विजय मिळवू शकतो. या प्रवृत्तीवर विजय मिळविण्याचे सर्वोत्कृष्ट मेकॅनिझम इस्लाममध्ये दिलेले आहे. इस्लामी इबादती या माणसाला स्वार्थी बनविण्यापासून फक्त वाचवितच नाहीत तर मानवतेच्या हितासाठी त्याग करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतात. इस्लामी इबादतींमुळे माणसाच्या मनामध्ये ईश्वराची भीती निर्माण होते व तो संधी उपलब्ध असली तरी भ्रष्टाचार करत नाही. याची सुरूवात रमजानच्या रोजांपासून होते. 8 ते 10 वर्षांची कोवळी मुलं जेव्हा रोजा ठेवतात तेव्हा प्रचंड तहाण लागलेली असतांना  व पाणी उपलब्ध असतांना तसेच कोणीही पाहत नसताना सुद्धा पाण्याचा एक घोट पीत नाहीत. जीव कासाविस होत असतो. पाणी उपलब्ध असतं. तरीपण मुलं पाणी पीत नाहीत, याचे कारण रोज्यांमुळे त्यांच्या मनामध्ये एवढी अध्यात्मिक उर्जा निर्माण होते की ते आपल्या भूक आणि तहान या दोन्हीवर विजय प्राप्त करतात. ज्या पद्धतीने रोजा हा माणसामध्ये ईशभय वृद्धींगत करतो त्याचप्रमाणे पाचवेळेसची नमाज ही सुद्धा माणसाला भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवण्यास मोलाची मदत करते. फजरची नमाज अदा करून आपल्या कार्यालयात किंवा व्यवसायात आलेल्या मुस्लिम व्यक्तीसमोर भ्रष्टाचार करण्याची संधी मिळाली तरी त्याने अदा केलेली फजरची नमाज त्याला त्या भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यास मदत करते. लगेच दुपारी जोहोरची नमाज येते, मगर असर, मगरीब आणि इशा या पाचही  नमाजांच्या दरम्यान काळात मिळालेल्या भ्रष्टाचाराच्या संधी एक नमाजी व्यक्ती स्वेच्छेने सोडतो. त्यातून मिळत असणारा अनुचित लाभ स्वेच्छेने सोडतो. या संदर्भात कुरआनमधील खालील आयातीचे विश्लेषण करताना जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी म्हणतात, ’’ ’’ऐ पैग़म्बर...! इनसे कहे दो कि पाक और नापाक बरहाल बराबर नहीं है, चाहे नापाक की बहुतायत तुम्हें कितनी ही लुभाने वाली हो.’’ (सूरे माईदा आ नं 100)

इन्सान की नज़र में 5 रुपये के मुक़ाबले में 100 रुपये यक़ीनी तौर पर ज्यादा क़ीमती हैं, क्योकि और वे 100, लेकिन ये आयत कहती है कि 100 रुपये अगर ख़ुदा की नाफरमानी करके हासिल किए गए हों तो वे नापाक हैं और 5 रुपये अगर ख़ुदा की फरमाँबरदारी करते हुए कमाए गए हैं तो वे पाक हैं और नापाक चाहे मिक़दार में कितना ही ज्यादा क्यों न हो बहरहाल वह पाक के बराबर किसी तरह नहीं हो सकता. गन्दगी के एक ढेर से इत्र की एक बूँद ज्यादा क़ीमत रखती है. पेशाब से भरी हुई एक नाँद के मुक़ाबले में पाक पानी का एक चुल्लू ज्यादा वज़नी है. इसलिए एक सच्चे अक्लमन्द इनसान को लाज़िमी तौर पर हलाल ही से काम चलाना चाहिए, चाहे वह ज़ाहिर में कितना ही मामूली और थोड़ा हो और हराम की तरफ किसी हाल में भी हाथ नहीं बढ़ाना चाहिए, चाहे वह देखने में कितना ही ज़्यादा और शानदार हो.

(तफहिमुल कुरआन हिंदी खंड 1 पेज नं हाशिया नं 115)

भ्रष्टाचार ही एक विश्वव्यापी समस्या जरी असली तरी ज्या ठिकाणी इस्लामी आस्थेचे कठोर पालन केले जाते. त्या ठिकाणी भ्रष्टाचार असत नाही. मी स्वतः दोन वेळेस म्नका आणि मदीना या शहरांमध्ये जाऊन आलो आहे. त्या ठिकाणी अनेक सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांना भेटी दिलेल्या आहेत. मला कुठेच भ्रष्टाचार आढळून आला नाही. मदीना येथील बिन दाऊद मॉलची एक घटना मला आजही स्मरते. एका मसाल्याच्या दुकानदाराशी हिंदीमध्ये बोलणे झाले. तो बांग्लादेशी व्यापारी होता. त्याच्या दुकानातील मसाले अत्यंत उच्चप्रतीचे होते. मसाल्यांचा मंद-मंद सुगंध दुकानात दरवळत होता. मी त्याला या उच्च दर्जाच्या मसाले ठेवण्याचे कारण विचारले. त्यावर तो उत्तरला, ’’ साहेब, हा सऊदी अरब आहे. याच ठिकाणी मसाल्यांमध्ये भेसळ केली तर मृत्यूदंडाची शिक्षा होते. हे तर खरेच आहे पण प्रेषित सल्ल. यांची नगरी असलेल्या या पवित्र प्रेमाच्या शहरामध्ये व्यवसाय करतांना खोटे बोलून माल विकणे किंवा कमी प्रतीचा माल चढ्या दराने विकणे मला हे कसे बरे शोभेल?’’ थोडक्यात त्या व्यापाऱ्याच्या अंतःकरणात असलेल्या इस्लामी श्रद्धेने त्याला भ्रष्टाचारापासून रोखले होते. दुसरी घटना म्हणजे माझ्या पत्नीला सतत एसीत राहिल्यामुळे सर्दी झाली होती. तेव्हा मी तेथील सरकारी रूग्णालयात तिच्यावर औषधोपचार केले. विशेष म्हणजे डॉ्नटरने फीस घेतली नाही आणि केमिस्टने औषधांचे पैसे घेतले नाहीत. 

हा चकीत करणारा अनुभव इस्लामी श्रद्धेचा चमत्कार होता. याशिवाय, एक घटना मला चांगली आठवते, 1988 साली मी पुण्याला कमांडो ट्रेनिंगमध्ये असतांना भल्यापहाटे डेक्कन्नवीनने मुंबईला जात होतो. मी खडकीजवळ बसलो असतांना एक हिंदू इसम आपल्या तरूण मुलीला ट्रेनमध्ये बसविण्यासाठी आला होता. त्या तरूणीला माझ्या समोरील खिडकी जवळील सीट मिळाली. ट्रेन निघण्यापूर्वी तो व्यक्ती खाली उतरला आणि खिडकीजवळ येवून मुलीला म्हणाला, ’’बाळा! तु पहिल्यांदा एकटीच मुंबईला जात आहेस. दादरला उतरल्यावर रेल्वेस्टेशनच्या पुढे अनेक टॅक्सी उभ्या असतात. त्यातील कोणत्याही टॅक्सीत बसू नको. ज्या टॅक्सीचा ड्रायव्हर दाढी ठेवलेला व डोक्यावर नमाजची टोपी असलेला असेल त्याच्याच टॅक्सीत बस. तो तुला सुखरूप पणे पोहोचविल. 

यावरून एक गोष्ट लक्षात येते की, बहुसंख्य बांधवांच्या मनामध्ये सुद्धा या गोष्टीचा विश्वास आहे की, श्रद्धावान मुस्लिम हा भ्रष्ट नसतो किंवा त्याच्यापासून कुठलाही धोका होण्याची शक्यता नसते. 

या सर्व घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या देशाची स्थिती पाहिली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला असून, भ्रष्टाचाराला समाजमान्यता मिळालेली आहे. नेते सर्वाधिक भ्रष्ट आहेत. हे माहित असतांनासुद्धा समाज त्यांचा तिरस्कार न करता त्यांची हांजीहांजी करतो. समाजात ज्या वाईट गोष्टी प्रचलित होऊन जातात काही काळानंतर त्या वाईट वाटेनाशा होतात. मोगले आझमच्या निर्मितीच्या वेळेस नसीम बानो नावाची एका सुंदर मुलीची अनारकलीच्या भूमीकेसाठी दिलीपकुमारने दिग्दर्शकाकडे शिफारस केली होती. ती मुलगी भूमिका करण्यासाठी तयारही होती. परंतु त्या काळात चांगल्या घरच्या मुली सीनेमात काम करत नाहीत ही गोष्ट समाजमनावर एवढी बिंबली होती की नसीम बानोला इच्छा असूनसुद्धा केवळ सामाजिक दबावामुळे ती भूमिका करता आली नाही. या पार्श्वभूमीवर आज आपण पाहतो की, चांगल्या घरच्या मुली सोज्वळ चित्रपट तर सोडा अश्लील चित्रपटांमध्येसुद्धा काम करण्यासाठी एका पायावर तयार असतात. नैतिकतेच्या सामाजिक स्तराची घसरण केवढी मोठी झालेली आहे, हे या एका उदाहरणावरून लक्षात येईल. भ्रष्टाचार केवळ आर्थिक भ्रष्टाचारच नाही तर सर्व प्रकारचे भ्रष्ट आचरण म्हणजेच भ्रष्टाचार. मात्र आर्थिक भ्रष्टाचाराचा फटका इतर भ्रष्ट आचरणाच्या तुलनेत जास्त लोकांना बसतो. थोडक्यात भ्रष्टाचारापासून केवळ इस्लामी आस्थाच माणसाला रोखू शकते. हेच सत्य आहे. मग कोणाला हे पटो की न पटो. म्हणून भारतीय मुस्लिमांची ही राष्ट्रीय तसेच धार्मिक जबाबदारी आहे की त्यांनी दैनंदिन व्यवहारात भ्रष्टाचार मुक्त व्यवहार करून बहुसंख्य बांधवांपुढे इस्लामी संस्कारांचे प्रत्यक्ष दर्शन घडवावे. जेणेकरून इबादतींचे मेकॅनिझम खरोखरच माणसाला भ्रष्ट आचरणापासून रोखण्यात यशस्वी ठरते, याची त्यांना खात्री होईल.


- एम. आय. शेख



देशात कांद्याचा तुटवडा भासू नये आणि कांद्याचे दर वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 31 डिसेंबर 2023 पर्यंत 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. पण त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. या निर्यातकर आकारणीविरोधात नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचा बेमुदत बंदचा निर्णय जाहीर झालाय. व्यापाऱ्यांच्या या घोषणेमुळे गेल्या सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश एपीएमसीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला होता. यामध्ये आशियातील सर्वात मोठी घाऊक कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावचा समावेश आहे.

नाशवंत पिकाचे मार्केट बेमुदत बंद ठेवणं नेमकं कुणाच्या हिताचं आहे? एकाच वेळी सरकार, दुष्काळ आणि आता व्यापारी असोसिएशन यांनी मिळून कांदा उत्पादकांची जी कोंडी करायची ठरवलीय, त्याला तोड नाही! शेतमालाचा बाजार बेमुदत बंद ठेवणं हे शेतकरी आंदोलनाच्या तत्त्वात बसत नाही. कांदाप्रश्नी राज्य शासनाच्या प्रयत्नानं कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ वाढविण्यात येणार आहेत. राज्यातील 2 लक्ष मेट्रिक टन कांदा 2410 रुपये क्विंटल दरानं नाफेड खरेदी करणार आहे. यावरून सरकार शेतकऱ्यांपुढं झुकलं असं म्हटलं जात असलं तरी निर्यातकराबाबत अजूनही शेतकरी आणि व्यापारीवर्ग यांचं समाधान झालेलं नाही.

ज्याप्रमाणे कांद्याची साल अश्रू आणते, त्याचप्रमाणे कांद्याचे वाढते दर भारतीय राजकारण्यांना अश्रू आणतात. तेही निवडणुकीच्या वर्षात महागाई झाली तर हे अश्रू आणखीनच तीव्र होतात. कदाचित म्हणूनच कांद्याला भारतीय राजकारणातील ‘निवडणूक पीक’ असेही म्हटले जाते. येत्या वर्षभरात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान,  तेलंगणा आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत कांदा हा सर्वसामान्यांचे खिसे कमकुवत करण्याबरोबरच निवडणुकीचा मोठा मुद्दा बनू शकतो.

कांद्याचे राजकीय महत्त्व गेल्या 45 वर्षांच्या निवडणूक निकालावरून समजू शकते. 1980 च्या दशकात इंदिरा गांधी यांनी भारतीय राजकारणात कांद्याचे दर हा पहिल्यांदा निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. त्या कांद्याचा हार घालून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. आणि त्यांचा डाव क्लिक झाला. सार्वत्रिक निवडणुकीत जनता पक्षाचं सरकार पराभूत झालं. काँग्रेसच्या विजयाचं महत्त्वाचं कारण म्हणून कांदा नमूद करण्यात आला. 

त्याचप्रमाणे 1998 मध्ये कांदा हे भाजपला दिल्लीतील सत्ता गमावण्याचं महत्त्वाचं कारण ठरलं. त्याच वर्षी राजस्थानमध्ये सत्ता गेल्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांनी कांदा आमच्या मागे लागल्याचं वक्तव्य केलं होतं.  तर 2013 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी कांद्याचे दर वाढले होते. त्या वेळी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. आठवडाभरानंतर मी भेंडीबरोबर कांदा खाल्ला आहे. मात्र, त्यांचा डाव चालला नाही आणि 15 वर्षांनंतर काँग्रेस सत्तेबाहेर गेली.  1998 मध्ये महाराष्ट्रात कांद्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि त्याचे भाव वाढले. त्यावर टीका करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मिठाईच्या डब्यात कांदा पाठवला होता. याची लाज वाटून मनोहर जोशी यांनी  रेशनकार्डधारकांना 15 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध  करून दिला होता. केंद्र आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी शेतकरी आणि व्यापारी यांची मुख्य मागणीच लक्षात घेतलेली नाही. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी केली आहे. मुख्य प्रश्न काय आणि त्यावरील निर्णय काय याचा कोठेही ताळमेळ नाही. प्रत्येक प्रश्नाचे राजकारण करण्याची सध्या जी घाई सुरू आहे त्याचाच हा परिपाक आहे. हा निर्णय घेताना शेतकरी हिताचा कोणताही विचार केला गेला नाही. आधीच कांद्याचे उत्पादन कमी आहे, त्यात जरा चार जादाचे पैसे मिळण्याची आशा वाटू लागलेल्या शेतकऱ्यांचा केंद्राने निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेऊन हिरमोड केला आहे. निर्यातीवर नियंत्रण आणले की देशांतर्गत भाव कमी होतात हे व्यवहारी गणित असले तरी ते शेतकऱ्यांच्या मुळावर येणारे आहे, हे सरकारने का लक्षात घेतले नाही, हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांची सध्या चारही बाजूने पिळवणूक सुरू आहे. शेतकरी मेला तरी चालेल; पण आपले राजकीय दुकान चालले पाहिजे असाच हा खाक्या आहे, अशीही टीका सरकारवर झाली आहे. पण हे सरकार कोणतीच टीका मनावर घेत नाही. ते ज्यात आपले राजकीय हित आहे, तोच निर्णय घेतात. कांद्याच्या बाबतीत हेच दिसून आले आहे. एकीकडे हे राजकारण होत असताना मंत्र्यांच्या विक्षिप्त स्वरूपाच्या प्रतिक्रियाही सुरू झाल्या आहेत.

राज्यातील एक मंत्री दादा भुसे जाहीरपणे म्हणाले आहेत की, दोन-चार महिने कांदा खाल्ला नाही तर कोणाचे फार काही बिघडत नाही. सामान्य माणसाला कांदा आणि भाकरी खायची आहे. कांदा हे गरिबांचं खाणं आहे, हे श्रीमंतांचं खाणं नाहीय. पण सरकार म्हणत असेल की एखादी गोष्टी मिळत नसेल तर खाऊ नका, तर मग सरकार कशाकरता आहे? हे दीडशहाणे मंत्री कालपर्यंत कृषीमंत्री होते या महाराष्ट्राचे. त्यांना या राज्याची स्थिती माहितेय का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. उद्या हे तेल महाग झालं तर तेल घेऊ नका, साखर महाग झाली तर साखर खाऊ नका म्हणतील. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पोटभर खावं, आणि जो गरीब, मध्यम वर्गीय आहे यांनी मात्र, महाग झालेलं खाणे बंद करावं आणि उपाशी मरावं का, असा सवाल विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सरकारला ग्राहकांच्या हिताची एवढीच काळजी असेल तर त्यांनी शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात कांदा खरेदी करून रास्त दुकानांमध्ये दोन रुपये ते दहा रुपये किलो दरानं कांदा उपलब्ध करून द्यावा, पण शेतकऱ्यांच्या पोटावर मारू नये, अशी विनवणी शेतकऱ्यांनी केलीय. निर्यातीवर नियंत्रण आणण्यापेक्षा हा रास्त मार्ग होता. एखाद्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले, तर बाजार हस्तक्षेप योजना राबवण्याचाही केंद्राला पर्याय उपलब्ध होता. त्यासाठी उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचा विचार करून सुवर्णमध्य साधावा लागतो. शेतकऱ्यांकडे आजमितीला 40 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. निर्यात कर रद्द करून कांद्याला सरकारने योग्य भाव देणे, हाच कांदा प्रश्नावर योग्य मार्ग आहे. गेली तीन वर्षे कांद्याला भाव नाही, अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी घोषित अनुदानाचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाहीत. या परिस्थितीत आता कुठे शेतकऱ्याला चांगला भाव मिळू लागताच, केंद्र सरकारने निर्यात कर लावला. यामागे सरकारची शेतकरीविरोधी असलेली भूमिका पुन्हा पुढे आली असल्याची टीका,’ डॉ.अजित नवले यांनी केली आहे. दोन वर्षे होऊनही सरकारने एमएसपी (मॅक्सिमम सेलिंग पॉइंट) का नाही जाहीर केली. सरकार एकाच बाजूने विचार करीत आहे. सरकार फक्त ग्राहकांचे हित साधत आहे. उत्पादकांचे काय? शेतकऱ्यांची जबाबदारी आहे का सर्वांना फुकट खाऊ घालायची. किंमती कमी होतात तेव्हा दिल्ली मुंबईहून मीडिया येतो, मग भाव कोसळल्यावर हा मीडिया कुठे असतो. सरकार सध्या फक्त दर नियंत्रणाची भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांचा विचार कोठेही होताना दिसत नाही. व्यापाऱ्यांकडे किती कांदा शिल्लक आहे याची नोंद घेऊन दबावतंत्राचा वापर केला जात आहे. दरवर्षी किती कांदा तयार होतो, याची नोंद घ्यावी. किती कांदा लागतो आणि टंचाई कधी होते, याचा विचार करून नियोजन करावे. अधिक उत्पादन होणाऱ्या काळात निर्यात किती वाढवता येईल याचा विचारही करणे गरजेचे आहे. आज शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याला दोन पैसे मिळू लागल्यावर सरकार कांदा आयातीचा निर्णय घेते. भाव घसरतात तेव्हा कांदा निर्यात वाढविण्याचा किंवा निर्यातमूल्य शून्य करण्याचा तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार का धडपड करीत नाही.  शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या राजकारणाचं कांदेपुराण संपवून हे सरकार कांद्याला खूश करते की या सरकारला कांद्याची खप्पामर्जीला सामोरे जावे लागणार याकडे देशाचे लक्ष आहे.


मौलाना इलियास खान फलाही, अध्यक्ष जेआयएच महाराष्ट्र


मुंबई

गुलजार आझमी यांच्याबद्दल उशीरा लिहिताना काळीज तोंडाला येत आहे; पण या जगात जो कोणी आला आहे त्याला एक दिवस इथून जायचेच आहे. हे विश्वाचे जिवंत वास्तव आहे आणि त्यापासून कोणाची सुटका नाही. 

गुलजार आझमी यांच्या निधनाने आपण सर्व दु:खी आहोत. अल्लाह दिवंगत गुलजार आझमी यांना स्वर्गात स्थान देवो आणि त्यांच्या चांगल्या कार्याच्या मोबदल्यात त्यांना उच्च दर्जा प्रदान करो. जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी आपल्या शोकसंदेशात ही माहिती दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, दिवंगत गुलजार आझमी हे या खटल्यांच्या काळात शोषितांसाठी ढाल होते, ज्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक निरपराधांची सुटका झाली आणि त्यांना न्याय मिळाला. त्यांच्या जाण्याने देशाने आपला सर्वोत्कृष्ट संरक्षक गमावला आहे. गुलजार आझमी हे केवळ त्यांचे आश्रयदाते आणि प्रिय व्यक्ती नव्हते, तर ते भारतातील शोषित मुस्लिमांचे खरे सहानुभूतीदार होते. दिवंगत गुलजार आझमी यांच्या निधनाने अनेक कुटुंबांनी आपला पालक गमावला आहे. आम्ही दिवंगत गुलजार आझमी यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि प्रार्थना करतो की अल्लाह त्यांच्या कुटुंबाला धीर आणि संयम बाळगण्याची शक्ती प्रदान करो अशी प्रार्थना करो. आमीन.



हिंदुत्ववाद्यांचा इतिहासातील संपूर्ण प्रवास हा असत्याचा आणि हिंसेचा आहे. गांधींची शस्त्रे ‘सत्याग्रह’ आणि‘अहिंसा’ ही होती. हिंदुत्ववाद्यांची शस्त्रे ‘असत्याग्रह’ आणि ‘हिंसा’ ही आहेत. खोटेपणा, लबाड्या, षड्यंत्र, विश्वासघात हे त्यांचे मार्ग आहेत. या सर्वांना त्यांनी धर्म आणि संस्कृती यांच्या कोंदणात बेमालूमपणे बसवले आहे. ‘सत्यमेव जयते’ हा धर्म म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला धर्मासाठी केलेले असत्य वर्तन हे धर्ममान्य असल्याचे सांगायचे. ‘अहिंसा परमोधर्म:’ म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला धर्मासाठी हिंसा हा धर्मच असल्याचे मांडायचे. यामुळे धर्मावर श्रद्धा ठेवणारा सामान्य समाज हा असत्य आणि हिंसा यांना सहज स्विकारतो. हिंसेचा वणवा पेटल्यावर त्याच्यात सर्वच जळू शकतात हे विसरून चालत नाही. 

एक बी पेरले तर एक झाड उगवते. हिंसा पेरली तर ती अनेकपटींनी उगवते. असे असूनही हिंदुत्ववादी हिंसेचे घातक प्रयोग करीत बेदरकारपणे पुढे जात आले आहेत. हे आजच घडत नाहीये. हजारो वर्षे सवर्णांनी स्त्री शूद्रातिशूद्रांवर केलेली हिंसा हा हिंदुत्वाच्या व्यापक हिंसक प्रवृत्तीचा भाग आहे. वैदिकांनी वेदांना आव्हान देणाऱ्या, कर्मकांडे, अंधश्रद्धा नाकारणाऱ्या स्वजातीयांवर केलेली हिंसा ही तीच आहे. बुद्ध आणि जैन धर्म या भूमीवरून हटवण्यासाठी केलेली हिंसा हा याचाच भाग आहे. पण इस्लामी राज्यकर्ते आणि ख्रिश्चन राज्यकर्त्यांच्या विरुद्ध हिंदुत्ववाद्यांची ही शस्त्रे तब्बल एक हजार वर्षे म्यान झाली होती. कारण त्यांनी या शक्तिशाली राज्यकर्त्यांशी ‘आमची धार्मिक आणि सामाजिक सत्ता अबाधित ठेवा, आम्ही तुमची राजकीय सत्ता अबाधित ठेवू’ असा अलिखित करार केला होता की काय असे वाटावे असेच त्यांचे इतिहासातील वर्तन आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी म्हणूनच विरोध केला. या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व धर्म, जाती, पंथ एक होऊन उतरल्यावर त्यांना हे दिसू लागले की हा देश स्वतंत्र होईल पण ब्राह्मण्यवाद्यांच्या टाचेखाली राहणार नाही, मनुस्मृतीवर चालणार नाही. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध करूनही शेवटी देश स्वतंत्र झालाच आणि एकधर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक बनला. 

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच अत्यंत पद्धतशीरपणे हिंदुत्ववाद्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडून देशाच्या फाळणीचा पाया मात्र घालून ठेवला होता. लबाड ब्रिटिश आणि महत्त्वाकांक्षी जिना यांनी तो उचलून धरला. देश स्वतंत्र झाला पण फाळणी होऊन आणि हिंदू-मुस्लिमांची मने दुभंगून. भारतीय समाजाची छकले करणारी हजारो वर्षांची वर्णव्यवस्था आणि फाळणीने दिलेल्या जखमा घेऊन भारतीय समाज स्वातंत्र्योत्तर काळात आत्मविश्वासाने प्रगतीच्या आणि समतेच्या दिशेने वाटचाल करीत राहिला. हिंदुत्ववाद्यांची तीन दुखणी आता होती. पहिले दुखणे होते भारतीय संविधान, जे एका ‘अस्पृश्या’ने दिले होते. दुसरे दुखणे होते संविधानाने नष्ट केलेली  जातिव्यवस्था आणि दलितांसाठी दिलेले आरक्षण. आणि तिसरे दुखणे होते, धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाची भाषा. ‘ज्या धर्माचा उगम या भूमीत झालेला नाही त्या धर्माचे लोक आमचे नाहीत’ अशी त्यांची  धारणा होती. म्हणजे मुस्लीम, ख्रिचन, पारशी, यहुदी इ. यातील पारशी आणि यहुदी संख्येने अत्यंत नगण्य असल्याने खरा प्रश्न मुस्लीम आणि ख्रिश्चन यांचा होता. पण त्यांच्यातील अनेकांच्या मांडणीनुसार; जो-जो धर्म अवैदिक आहे तेही आमचे नाहीत, म्हणजे बौद्ध, जैन आणि शीखही आले. थोडक्यात हा देश फक्त आणि फक्त हिंदूंचाच आहे. म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करायचे, पण हिंदू समाजाला पुन्हा वर्णव्यवस्थेच्या पायावर आणि ब्राह्मण्यत्वाच्या टाचेखाली उभे क रायचे. प्रजासत्ताक बनलेल्या भारतात हे घडवायचे तर मतपेटी काबीज करायला हवी आणि ती काबीज करायची असेल तर भक्कम ‘हिंदू मतपेटी’ निर्माण व्हायला हवी. त्यासाठी जातिअंताची भाषा न वापरता हिंदू समाज एक व्हायला हवा. यासाठी एकच मार्ग आणि तो म्हणजे इतर धर्माबद्दल द्वेष आणि हिंसेचे हत्यार. यात देशातील मुस्लीम धर्मीयांचा पहिला क्रमांक लागणे स्वाभाविक होते. मुस्लिमांमधील धर्मांध आणि कर्मठप्रवृत्तींनी या वाटचालीला आपल्या वर्तनाने बळच दिले, हे ही सत्य आहे. मुस्लीम धर्मीयानंतर पुढचा क्रमही ठरलेला होता. या क्रमवारीत हिंदू दलितांचाही क्रमांक होता याची आठवण हिंदुत्ववाद्यांच्या वळचणीला गेलेल्या दलितांना देणे आवश्यक आहे. यासाठी सातत्याने देशातील मुस्लीम राजवटीच्या काळातील सर्व खुणा या गुलामीच्या खुणा आहेत, असे म्हणून त्या पुसण्याला जनसमर्थन मिळवायचे हा मार्ग अवलंबण्यात आला. दुसरीकडे देशातील प्रत्येक मुस्लीम हा धर्मांध, आतंकवादी, पाकिस्तान धार्जिणा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि राष्ट्रद्रोही असतो असा संशय जनसामान्यांच्या मनात रुजवायचा हा मार्ग वापरण्यात आला. मुस्लिमधर्मीय म्हणजे दानव असे त्यांच्या नेत्यांनी लिहूनच ठेवले होते. काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीच्या काळात हिंदुत्ववादी देशात सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करीत होते, थंड डोक्याने दंगली घडवत होते. धर्मांध मुस्लीम याला बळी पडत होते वा हातभार लावत होते. याचा सर्वात मोठा यशस्वी प्रयोग गोध्रा हत्याकांडानंतर ‘क्रिया-प्रतिक्रिया’ या नावाखाली गुजरातमध्ये करण्यात आला. गोध्रा हत्याकांडही ‘क्रिया’, त्यानंतर झालेली दंगल ही ‘प्रतिक्रिया’. ही दंगल हिंदू-मुस्लीम होती. गुजरातमध्ये हिंदू आहेत सुमारे 88% आणि मुस्लीम सुमारे 10%. या दंगलीत माणुसकीला लाजवणारे अनन्वित अत्याचार झाले. स्त्रियांवर सामूहिक बलात्कार झाले. अनेक स्त्रियांच्या बलात्कारानंतर भोसकून हत्या करण्यात आल्या. बालके ठेचून मारण्यात आली. शेकडोंना जाळण्यात आले. सरकारी आकड्यांनुसार या दंगलीत एकूण 1044 लोकांच्या हत्या झाल्या, यांत 790 मुस्लीम आणि 254 हिंदू होते. गोध्रा हत्याकांडात 59 कारसेवक मृत्यू पावले. त्यांचा बदला घेण्यासाठी झालेल्या दंगलीत 254 हिंदू मेले. बहुसंख्य दंगलींमध्ये गरीबच मरत असतात हे लक्षात ठेवावे लागेल. पण तरीही गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये घडलेली दंगल आणि नरसंहार हा देशभरातील हिंदूंना न्याय वाटला. गोध्रा हत्याकांडातील आरोपींना देशाची तपास यंत्रणा शोधून काढेल आणि न्यायव्यवस्था कठोर शिक्षा करेल असे जनतेला वाटले नाही. मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींचे या काळातील वर्तन ‘राजधर्म’ धुळीला मिळवणारे होते. पण त्यांचे राजकीय गणित चुकले नाही. खरे ‘गुजरात मॉडेल’ ते हेच, जे प्रभावी ठरले. मुख्यमंत्री पदाची खुर्ची गमावणे तर सोडाच त्यांनी पंतप्रधानपदाचे सिंहासन मिळवले. पुढच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांच्या मदतीला पुलवामा आले. या घटनेच्या वेळचे त्यांच्या सरकारचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आणि संशय निर्माण करणारे होते, असा घरचाच आहेर त्यांना सत्यपाल मलिक यांनी दिला. 

या सर्व वाटचालीत देशातील हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील विश्वास संपवण्याचे काम हिंदुत्ववादी संघटना जोमाने करीत होत्या. गो-रक्षणाच्या नावाखाली किमान दीड-दोनशे झुंड बळी झाले. यांत बहुतांश मुस्लीम आणि उरलेले दलित होते. देशाच्या सामाजिक एकात्मतेच्या वस्त्राची लेक्तरे करण्यात येत होती. अशात एन.आर.सी.च्या विरोधात देश पेटला. दिल्लीच्या शाहीनबाग येथे मुस्लीम आणि अल्पसंख्याकांनी 15 डिसेंबर 2019 पासून अत्यंत जिद्दीने शांततापूर्ण प्रदीर्घ आंदोलन छेडले. फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत दंगल पेटली. या दंगलीत 36 मुस्लीम आणि 15 हिंदू गेले. या दंगलीची कारणे विवाद्य ठरली. अनेकांनी या दंगलीचे खापर ‘शहरी नक्षलवादी’ आणि ‘जिहादी’ घटकांवर फोडले. हिंदुत्ववादी आणि भाजपा नेत्यांची अत्यंत भडकावू भाषणे दुर्लक्षित करण्यात आली. ही दंगल शमते न शमते तोच कोव्हीडची महासाथ सुरू झाली आणि मार्च महिन्याच्या शेवटी शाहीनबाग आंदोलन गुंडाळण्यात सरकारला यश मिळाले.  कोव्हीडच्या महासाथीचा मुकाबला करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले. या काळात मोदींनी कृषी कायद्यांचा घाट घातला, ज्यात त्यांना शेवटी शेतकऱ्यांपुढे नमते घ्यावे लागले. दुसऱ्या बाजूला देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात होती. बेकारी आणि महागाई आकाशाला भिडत होत्या. आपल्या नऊ वर्षाच्या राजवटीत मोदींनी सत्तर वर्षामध्ये नव्हता एवढा कर्जाचा डोंगर देशाच्या डोक्यावर उभा केला.

कर्नाटकात भाजपाचा दारुण पराभव झाला. राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रे’मुळे जननायक म्हणून उदयाला आले. मोदी आणि अदानी यांच्या संबंधाबद्दल अत्यंत निर्भीड प्रश्न विचारणारे ते एकमेव नेते होते. या सर्व घटनांनी मोदींची लोकप्रियता घटू लागली. आता प्रश्न होता की पुन्हा पुलवामा घडणार का हिंदू मुस्लीम दंगली पेटणार? तशात अनपेक्षितपणे देशाच्या ईशान्य कोपऱ्यातील एक निसर्ग संपन्न, रत्नभूमी म्हटले जाणारे संपूर्ण राज्य मणिपूर अचानक पेटले. हा वणवा हिंदू आणि ख्रिश्चन किंवा मैतेई आणि कुकी या दोन जमातींमध्ये पेटला. मणिपूर राज्याच्या उच्च न्यायालयाने राज्यातील मैतेई जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू करावी असा आदेश राज्य सरकारला दिल्याचे निमित्त झाले. या संघर्षाने हैवानी यादवीचे रूप धारण केले. मैतेई हे मणिपूर राज्यातील बहुसंख्य, मुख्यत्वे वैष्णव हिंदू आणि इंफाळ खोऱ्यातील रहिवासी. थोडे मैतेई हे ख्रिश्चन आणि मुस्लीमही आहेत. कुकी हे अल्पसंख्य, मुख्यत्वे ख्रिश्चन आणि डोंगरवासी. थोडे कुकीही ख्रिश्चन आहेत. मैतेई तुलनेने सधन आणि सत्तेचे मुख्य भागीदार. कुकी गरीब आणि सत्तेतील दुय्यम हिस्सेदार. पण खरा मुद्दा होता तो डोंगराळ मणिपूर भागात जमिनीखाली सापडलेली प्रचंड खनिजे, त्या खनिजांवर असलेला अदानीसारख्या उद्योगपतींचा डोळा आणि घटनेतील 371 कलम. केंद्र सरकारच्या खाण आणि खनिज मंत्रालयाने मणिपूरच्या केलेल्या सर्वेक्षणात चुनखडी, क्रोमाईट, निकेल, तांबे, अझुराईट, मॅग्नेेटाईट आणि मुख्य म्हणजे प्लॅटीनम. सारखी अमूल्य खनिजे मणिपूर च्या डोंगराळ भागात लाखो मेट्रिक टनांच्या हिशेबात असल्याचा अहवाल दिला होता. 

इंडियन ब्यूरो ऑफ माईन्स आणि केंद्रीय खाण खाते यांनी ही खनिजे काढण्यासाठी खाजगी कंपन्यांबरोबर करार करण्याची तरतूद केली. यात खाजगी कंपन्यांना प्रचंड जमिनी आणि खनिजे काढण्याचे अधिकार देण्याची तरतूद होती. इंफाळ मध्ये21-22 नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या ईशान्य भारत व्यापार परिषदेत विविध खाजगी कंपन्यांबरोबर असे एकूण 39 करार करण्यात आले. या कंपन्यांचे अनेक प्रकल्प पर्यावरण खात्याच्या परवानगी शिवाय मंजूर करण्यात आले. हे प्रकल्प मंजूर करताना स्थानिक जनतेची परवानगी तर घेण्यात आली नाहीच, त्यांच्या विस्थापित होण्याचा विचारही करण्यात आला नाही. 

(उर्वरित लेख पुढील अंकात) 

- डॉ. अभिजित वैद्य

puja.monthly@gmail.com

(लेखक  पुरोगामी जनगर्जनाचे संपादक आहेत. )



प्रेषित मुहम्मद (स.) यांची ताकीद आहे की जेव्हा तुम्ही तघेजण एखादा प्रवास करीत असाल तर आपल्यापैकी एकाला आपला प्रमुख (अमीर) बनवा. (ह. अबू सईद खुदरी, अबू दाऊद)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, मला जी गोष्ट माहीत आहे ती जर लोकांना माहीत झाली तर, कुणीही व्यक्ती रात्रीचा प्रवास एकटा करणार नाही. (ह. इब्ने उमर (र.), बुखारी)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, प्रवास एक प्रकारची शिक्षा आहे, जी तुम्हाला खाण्यापिण्यापासून आणि झोप घेण्यापासून वंचित करते. जेव्हा तुम्ही आपले आवश्यक कार्य पूर्ण कराल तेव्हा त्याने आपल्या मुलाबाळांकडे लवकर परतण्याची काळजी घ्यावी. (ह. अबू हुरैरा, बुखारी)

हजरत वासिला बिन खत्ताब म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) मस्जिदमध्ये बसले होते. एक व्यक्ती त्यांच्याकडे आल्यावर ते आपल्या जागेवरून थोडे सरकले आणि त्यांना बसण्याची जागा दिली. त्या व्यक्तीने सांगितले, जागा भरपूर आहे. तेव्हा प्रेषित (स.) म्हणाले की एका मुस्लिमाचा हा अधिकार आहे की जर त्याचा एखादा मित्र त्याच्याकडे येत असेल तर त्याच्यासाठी आपण आपल्या जागेवरुन थोडेसे बाजूला होऊन त्याला बसण्याची सोय करून द्यावी. त्याला आपल्या जवळ बसवून घ्यावे. (अल-बैहकी)

ह. अब्दुल्लाह बिन अमरो (र.) म्हणतात की एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, कोणता इस्लाम सर्वश्रेष्ठ आहे? प्रेषित (स.) म्हणाले, लोकांना जेऊ घालणे आणि ओळखीतील तसेच अनोळखी लोकांना सलाम करणे. (बुखारी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की एखाद्या स्वारीवर जाणाऱ्या माणसाने चालत जाणाऱ्याला सलाम करावा. आणि कमू संख्येतील माणसांनी जास्त संख्येतील लोकांना सलाम करावा. (बुखारी, मुस्लिम)

ह. उसामा बिन जैद म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स.) एकदा एका अशा लोकांजवळून जात होते ज्यांमध्ये मुस्लिम होते, मूर्तिपूजक होते तसचे ज्यू लोकही होते. प्रेषितांनी त्या सर्वांना संबोधून सलाम केला. (बुखारी, मुस्लिम)

ज्या कुणाला एखादी भेटवस्तू दिली जाईल तर अशा व्यक्तीने आपल्याकडे असलेली एखादी वस्तू त्याला भेट म्हणून द्यावी. जर कुणापशी द्यायला काहीच नसेल तर त्याने त्या भेट देणाऱ्याची स्तुती करावी. त्यामुळे त्याला धन्यवाद दिल्यासारखे होईल. जर कुणी असे केले नाही तर त्याने कृतघ्नता केली. (ह. जाबिर (र.), तिर्मिजी, अबू दाऊद)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, एकमेकांना भेटवस्तू देत जा, यामुळे तुमची मनं स्वच्छ राहतील. (ह. आयेशा (र.), तिर्मिजी)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जर दोन व्यक्ती एकाच वेळी तुम्हाला आमंत्रण देत असतील तर या दोन्हींमध्ये ज्याचे घर तुमच्या घरापासून अधिक जवळ असेल त्याचे आमंत्रण स्वीकारा. किंवा दोन्हींपैकी कुणा एकाने अगोदर आमंत्रण दिले असेल त्याच्या घरी जा. (हुमैद बिन अब्दुर्रहमान, अबू दाऊद)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget