Halloween Costume ideas 2015
Latest Post


आजवरच्या आयुष्याकडे मागं वळून पाहतांना आपल्या जीवनात किती किती वळणवाटा आल्या, त्यामध्ये आपल्यात किती बदल झाला, किती वैविध्यता दिसून आली, दुनियेचा बाजार किती स्वार्थी, अप्पलपोटा आणि आपमतलबी भेटला, याचे सिंहावलोकन केले की, मनापासून आश्चर्य नवल आणि वैषम्य ही वाटते.

       खर तर लहानपणापासून अतिशय खूजा, कुजक्या आणि क्षूद्र विचारांच्या लोकांमध्ये आपण वावरलो, हे लक्षात येते. अर्थात हे ज्या त्या वेळी समजले नाही, समजण्याचे वय नव्हते म्हणा किंवा बुद्घीची प्रगल्भता ही तेवढी नव्हती म्हणा, मात्र हल्ली हे सर्व प्रकर्षाने जाणवू लागले आहे. अगदी लहानपणापासून काहीतरी  हटके पण विधायक करून दाखवायचे आणि कौतुकाची बक्षीसी पदरात पाडून घ्यायची ही सवय, पण याच काहीतरी हटके करून दाखवण्याच्या कर्तृत्ववान विचारांमुळे घरीदारी, आत-बाहेर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, कैक शत्रू झाले. आपल्या अंगी परीश्रमपूर्वक मिळविलेल्या क्षमता वेळोवेळी सिद्ध करीत आलो, पण याच क्षमतांवर शंका घेणारे वळवणारे किडे क्षमतांच्या पंचामृतात डुंबतांना पाहणे नशिबी आले, हे दबा धरून बसलेले हीतशत्रू तोंडावर साखरपाकातून काढलेल्या गुलाबजामसारखे वाटायचे, अर्थात मी सुद्धा त्यांच्या या छद्मी छबीवर मनापासून विश्वास ठेवायचो, मात्र माघारी कागाळी करून कडू कारल्यासारखे येथेच्छ निंदा करून मला बाद करण्याचा त्यांचा अफलातून डाव असायचा. कुजबुजयंत्रणा काय, व किती परिणामाकारक असते, याची पुसटशीही कल्पना नसणार्‍या माझ्यासारख्या सरळमार्गी माणसाला एकामागून एक धक्के बसायचे. ते इतके वर्मी असायचे की काही वेळा मी कोळमडून पडायचो, गलितगात्र व्हायचो, पण यावर कोणताही उपाय मला सापडायचा नाही, हे असे का होते हा प्रश्न अनुत्तरित रहायचा. आज ही परिस्थिती तशीच आहे.  पण म्हणतात ना काळ हेच सर्व मानसिक रोगावर अणि परिस्थितीवर जालीम औषध आहे. याचा प्रत्यय आताशा येऊ लागला आहे, कारण आपोआपच  काही काळ गेल्यानंतर या षडयंत्राचा पडदापाश व्हायचा, पण काही काळ त्रास हा व्हायचाच. अलिकडे मी सर्व षडयंत्राकडे दुर्लक्ष करत आहे. आत्मविश्वासाने कामाला सुरुवात करायची आणि ते झाले की,पुढचे काम हाती घ्यायचो. बर्‍याचदा संकल्पीत कामात यश ही मिळायचे, पण यशच पुन्हा या हितशत्रूच्या कारवायाचे कारण व्हायचे. माझे यशच त्यांना मनोमन खूपायचे.

       आपण अतिशय प्रामाणिकपणे, जीव लावून मनापासून काम करतोय, मनात कुणाबद्दल असूया नाही की आकस नाही, मत्सर नाही की हेवा नाही, दुसऱ्याचं वाईट व्हावे ही भावना तर नाहीच नाही. कुणाशी फुकटची इर्षा सुद्धा नाही, फक्त "आपले काम भले आणि आपण भले". कामात इतका गढून जायचो की इतरांकडे पाहण्यासाठी क्षणभर वेळ ही मिळायचा नाही, त्यामुळे इतर लोकांच्या आयुष्यात कधीच उगाच नाक खुपसलो नाही, चौकशा करण्यात तर मला पहिल्यापासूनच अजिबातच रस ही नसतो, मग इतरांनी माझ्या अंगीकृत कामात उगाच नाक का खुपसावे? त्यांना माझ्याबाबतीत एवढा कमालीचा मत्सर पराकोटीचा द्वेष का बरे असावा? याचे उत्तर मला गतकाळात कधी मिळालेच नाही, उलट या प्रश्नांंच्या घोंगावणार्‍या वादळाने माझे कैक दिवसातील अनमोल क्षण आणि रात्रीच्या शांत साखर झोपेच उगाचच खोबरे झाले, मात्र अलिकडे या गुढ, रहस्यमय दुनियादारीचे उत्तर मला या 'काळ ' नावाच्या महायंत्राने दिले आणि दाखविलेही, आप सही ट्रॅकपर हो, आपका प्रवास सुखकर हो, आप यशस्वी हो रहे है, सफलता के शिखर पार कर रहे हो. 

     इतरांना माझ्याबाबतीत असणारा अवास्तव इंटरेस्ट का? याचं हे मिळालेलं उत्तर समर्पकच.

कुणीतरी म्हटलं आहेच की, किती तरी माणसं स्वत:ला मिळालेल्या सुखाने आनंदी होण्याऐवजी दुसर्‍याला मिळालेल्या सुखामुळे दुःखी होत असतात. आजच्या स्पर्धात्मक जगात तर पाऊलोपावली मत्सर, द्वेष, राक्षसी स्पर्धा याची चलती दिसून येते. अशावेळी संवेदनशील माणूस हतबल होतो, त्याच्या वाटेत ठीकठीकाणी पेरलेले काटे त्याला रक्तबंबाळ करतात. तुमची कामगिरी जर उल्लेखनीय व समाजोपयोगी असेल आणि तुम्हाला समाजाकडून वाहवा मिळत असेल तर ही काटेरी वाट अधिकच ठळक होते, अर्थात हे पुर्वपरंपरेने चालत आले आहे. ज्ञानेश्वर,तुकाराम या संंतांपासून ते फुले-शाहू या अनेक महामानवांना अशीच किंबहुना याच्यापेक्षा जास्त वेदना देणारी काटेरी वाट चालावयास लागली आहे, तिथे तुमची माझी काय पत्रास? असो... 

बऱ्याचदा मनाला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी संवेदनशील मनाला या गोष्टीचं वाईट हे वाटतच. मात्र ज्यांनी आपल्या अथक प्रयत्नांतून विरोध अपमान- षडयंत्र- अनुल्लेख- दुजाभाव पचवत, पचवतच प्रतिकुल परिस्थितीतही भव्य दिव्य काम उभं करून ठेवलंय, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर घ्यायचा आणि चालत रहायचं. परकोटीची संवेदनशील व हळव्या मनाच्या  या माणसांची महान काम करण्याची उमेद निश्चितच आपणाला ही प्रेरणा देते, अनेक खाचखळग्यांनी, काट्याकुट्यांनी भरलेली ही वाट भावी आयुष्यात निश्चितच गुलाबपाकळ्यांचा सडा घातलेली आपल्या नजरेस येईल, तेव्हा आजुबाजुची, नात्यातली, गोत्यातली, घरची-बाहेरची कुणीही कपाळ करंटे आपले यश पाहून जळत असतील, आपला द्वेष-मत्सर करीत असतील तर डगमगायचं नाही.

आपण अत्यंत आत्मविश्वासानं एवढच समजून रहायचं की आप सही रस्तेपर हो, आपका ट्रॅक बिल्कुल सही है. कारण या चांगल्या मार्गावर तुम्ही चालत आहात, यश, ऐश्वर्य, मानमरातब मिळवत आहात, हे या खूजा, खुरट्या आणि क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांना बघवत नाही, अर्थात शत्रुपक्षाला एखादी गोष्ट खटकणे, म्हणजे आपला एकप्रकारे विजयच आहे, हे लक्षात ठेवा, अशा कपाळकरंट्या शत्रुंना विसरायला शिका, हत्ती रस्त्यावरून आपल्याच डौलात चालत असतो, तेव्हा रस्त्यावरची भटकी कुत्री हत्तीवर भुंकत असतात, पण हत्ती त्यांच्याकडे ढुंकूंनही पाहत नाही, दैनंदिन जीवनात सुद्धा अशा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा अती त्रास होतो, तेव्हा शांत बसा, मनन करा, चिंतन करा, नक्कीच उद्याचा दिवस तुमचा असेल,..

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर 'दर्पण' पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)



हैद्राबाद शहरात एका विशिष्ट समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. याद्वारे अशी माहिती उघडकीस आली की या संप्रदायातील ६३ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. जरी ही माहिती फक्त हैद्राबादपुरती मर्यादित असली तरी कमीअधिक साऱ्या देशाचे ५०-७० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत.

इतर व्यवसायात कामकाजात जे लोक काम करत आहेत त्यांना वगळता आपण जर बांधकाम मजुरांची कमाई, त्यांचा खर्च आणि त्यांच्या समस्याांचा अभ्यास केला तर जी परिस्थिती समोर येते ती चिंताजनक आहे. दारिद्र्यरेषेखालील जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबे विविध प्रकारच्या कर्जाच्या व्याजव्यवहारात असे गुंतलेले आहेत की या विळख्यातून बाहेर पडण्याचा त्यांना कोणताच मार्ग सापडत नाही. एका कामगाराला दिवसागणिक ३०० ते ५०० रुपये रोजगार मिळतो. आठवड्यातील सगळ्याच दिवशी काम मिळेल याची शाश्वती नसते. फार तर आठवड्यातून पाच दिवस तर कधी चार दिवस काम मिळते. म्हणजे त्यांचे आठवड्याचे उत्पन्न केवळ १५०० ते २५०० रुपये इतके होते. घरात कमवणारा एकच इसम असेल तर एखाद्या आठवड्यात कुटुंबाचा खाण्यापिण्याचा खर्चही भागत नाही. इतर कोणती गरज पडली तर इकडून तिकडून कर्ज मागणे सुरू होते. त्यांना श्रीमंत लो कर्ज देणार नाहीत. त्यांच्यासारख्या कुणाकडून कर्ज मिळाले तर त्यांचे नशीब. घरात दुसरा आणखी एक कमवणारा व्यक्ती असेल तर चालून जाते.

कोणत्या सोयी-सुविधा मिळणे म्हणजे त्यांचे स्वप्नच आणि अशी स्वप्नं उराशी बाळगून ते आपले जीवन जगतात. त्याच स्वप्नांची शिदोरी घेऊन एक दिवस परलोकात जातात. त्यांचं उभं आयुष्य कर्जबाजारीचं. दुदैंबानं घरी कोणी आजारी पडला आणि दवाखान्याची पायरी चढावी लागली तर कमीतकमी २० हजारांचा फटका बसतो. कशीबशी याची तजवीज करतात आणि मग ज्यांच्याकडून कर्ज घेऊन दवाखान्याचं बिल भरले होते त्याची परतफेड करण्यासाठी व्याजावर कर्ज काढण्याची वाट धरतात. महिला बचत गट प्रथम पर्याय. आपल्या आईच्या नावानं कर्ज घेऊन ज्याचे कर्ज घेतले होते त्याला परत देण्याचा प्रयत्न करत असतानाच एखादी नवीन आर्थिक समस्या निर्माण होते. बचत गटातून घेतलेले कर्जाचे हफ्ते वेळेवर भरता येत नसल्यास ते कर्ज फेडण्यासाठी मग इतर कोणत्यातरी ओळखीच्या महिलेच्या नावानं दुसरं कर्ज घेण्यात येते. ती महिला प्रामाणिक असेलच असे नाही. ती अगोदरच बोलणी करून ठेवते. कर्ज मिळाल्यावर समजा २५००० चे कर्ज असेल तर त्यातले ५००० मी घेणार. म्हणजे एक तर त्या बचत गटाच्या कर्जावरील व्याज आणि जे कर्ज परत करण्यासाठी दुसरे कर्ज घेतले होते त्यातले ५००० रुपये तर फुकटच द्यावे लागतील आणि त्यावर पुन्हा ५००० रुपयांवरील व्याज भरावे लागणार. दोन प्रकारचे दोन कर्जे आणि त्यांच्यावरील व्याज. साहजिकच त्या कर्जदाराला इतकी परतफेड करणं मुळीच जमत नाही. आता पुढची वाट सावकारी कर्ज उचलण्याची. आधी दोन कर्जे घेतलेली, आता हे तिसरे नवीन कर्ज. आणि अवाढव्य व्याजाचे. या तिन्ही कर्जांची परतफेड त्याने आठवड्याला मिळणाऱ्या जेमतेन दोन-अडीच हजारांतून करायची आहे. कर्ज किती फेडायचे आणि घरखर्च कसा चालवायचा हा पेच प्रसंग. सुदैवाने पत्नी घरकाम करत असेल तर कसेबसे घर चालवायला मदत मिळते. पतीचा रोजगार कर्ज आणि दामदुप्पट व्याजाच्या हवाली. राहायला घर नाही. सुदैवाने मोकळी जागा कुठे आढळली शहर किंवा गावाच्या बाहेर तर पत्र्याच्या दोन खोल्या. एवढाच त्यांचा संसार. कर्ज फेडताफेडता थकवा आल्याने मग काही मजूर मटक्याची कास धरतात आणि मग दारू आलीच. सगळा खेळ समाप्त. अख्खं आयुष्य धोक्यात.

यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की एवढे सगळं घडत असताना जीवनाची स्वप्न उद्ध्वस्त होताना नव्हे तर कधी कधी जगण्याची आसच सोडून देण्याचा विचार करताना देखील हे लोक वर वर का असे ना नेहमी खूश दिसतात. कुणावर आरोप ठेवत नाहीत. आपल्या नशिबातच हे सगळं होतं म्हणून समाधान व्यक्त करतात. अल्लाह-ईश्वर कुणालाच दोष देत नाहीत की आपल्या सग्यासोयऱ्यांशी नाराजी व्यक्त करत नाहीत. कुणाजवळच आपली तक्रार मांडत नाहीत. नशिबाचं रडणं रडत बसत नाहीत. हसत खेळत जगतात. ही सगळी परिस्थिती कुठे संशोधकाने अभ्यास केलेल्या अहवालातील नाही. हा सगळा प्रकार माझ्या डोळ्यांदेखत दररोज घडत आहे. मी त्यांना पाहतो, ऐकतो, त्यांना अनुभवतो आहे. ही सत्य परिस्थिती आहे.

जी दशा मजूवर्गाची तीच दशा शेतकऱ्यांची. मजुराने कधी आत्महत्या केलेली नाही. शेतकरी मात्र कर्जबाजारी जगण्याला कंटाळून आत्महत्या करतात. मजुरवर्ग हजारो रुपयांच्या कर्जबाजारीत गुरफटून जातो. शेतकऱ्यांचा लाखांच्या घरात कर्जाचा डोंगर. आकार वेगवेगळा असला तरी दोन्हींच्या समस्या सारख्याच. शेतकऱ्याला याउपर असमानी संकटाला सामोरे जावे लागते. पाऊस नाही पडला तर कोरडा दुष्काळ. जास्त पडला तर ओला दुष्काळ. पिकं हातात येण्यासारखे वातावरण दसले की लगेच ढगफुटी. आलेले पीक वाहून जाणार. इतर समस्या मजूर असो की शेतकरी दोन्ही कष्टकऱ्यांच्या समस्या सारख्याच. आणि आता जरा आपल्या राज्यकर्त्यांचे शासनकर्त्यांचे पाहा. त्यांना या समस्यांशी जणू काही देणेघेणेच नाही. ते आपापल्या काचेच्या घरात (महालात) राहातात आणि वेळ पडल्यास बघा कसे हातात दगड घेऊन समोरासमोर उभे आहेत. पण फक्त देखाव्यापुरतेच शेवटी दोन्ही एकमेकांना सावरून घेतात. कारण दोघांची काचेची घरे शेवटी आपसात जपायची आहेत. शासकीय अधिकारी आहेतच त्यांचा बचाव करण्यासाठी. वकीलमंडळी आहे, न्यायालये आहेत. हे अधिकारी लाखो रुपयांची वस्त्रे, मोबाईल वापरतात, महागड्या गाड्यांमधून फिरतात. हे सर्व यांना त्याच काचेच्या घरवाल्यांनी उपलब्ध करून देलेले असते.

मात्र व्यापारीवर्गासमोर अशी हलाखीची परिस्थिती उभी राहात नाही. लहान असो की मोठा व्यापारी. ते कमीच कर्जबाजारी होतात. मोठा व्यापारी-उद्योगपती असला की त्याच्या कर्जाची परतफेड करायला शासन-प्रशासन नेहमीच तत्पर. ते लाख – दहा लाख कोटींचे असो की त्याहूनही अधिक, उद्योगपतींना ते परत करण्याची कधीच चिंता नसते. हे राज्यकर्ते शासनकर्ते त्यांचे मायबाप असतात. मजूर, कष्टकरी शेतकरीवर्गाचा कुणी मायबाप नसतो. म्हणून कधी कधी असे वाटते की मोदीजींनी पकोडे विकायचा जो उपाय सुचवला होता तोच चांगला.

मजुरवर्गाच्या खऱ्या आर्थिक अडचणी काय आहेत आणि त्या कशा दूर करता येतील याकडे देशामध्ये कोणत्याही धर्मियाचे, राज्यकर्त्याचे, राजकारणीचे अजिबात लक्ष नाही. स्वयंसेवी संघटना काही ठराविक सामाजिक समस्यांकडे लक्ष देतात पण त्यांची कार्यपद्धती ठराविक असते. इतर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संघटना नेहमी मॅक्रो स्तरावर काम करतात. समाजाच्या खालच्या स्तराच्या वस्तुस्थितीशी त्यांचे देणेघेणे नसते. खालच्या स्तरावरील गोरगरीब लोक कसे जीवन जगतात, त्यांच्या खऱ्या समस्या कोणत्या, कोणत्या आर्थिक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते? हे एकतर शहरी भागात वावरणाऱ्या आणि त्यातही एक प्रोफेशन म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अशा संस्था समाजातील ग्रामीण भागात राहाणाऱ्या लोकांशी त्यांचा संबंधच येत नाही. ते स्वतःचे एक प्रोफेशन म्हणून एखादी संस्था उभारून लोकांना स्वप्ने दाखवतात की स्वतःची स्वप्ने साकारत असतात, ते त्यांचे त्यांनाच माहीत.

धार्मिक संस्था प्रत्येक समस्येला धर्माच्याच परिघात बघत असतात. धार्मिक शिकवणींद्वारे समाजसुधार करणे यापलीकडे त्या दुसरे काही करत नाहीत. दारूविरोधी मोहीम हाती घेतली जाते आणि पिणे कसे पाप आहे, त्याचा आपल्या आरोग्यावर, कुटुंबावर काय परिणाम होतो याबाबत ते प्रवचन देतात. यात चुकीचेही काही नाही.                                       (पान  ४  वर)

कारण त्यांचा दृष्टिकोन फक्त धार्मिक असतो. लोकांना प्रवचन देताना ते नैतिकता, चारित्र्य वगैरे चांगल्या गोष्टी समजावून सांगतात, पण अशाने दारू पिण्यामागची खरी कारणे काय आहेत, लोक दारू पिण्याकडे का आकर्षित होतात, याचा विचार त्यांच्या प्रवचनातून कधी ऐकायला मिळत नाही. परिणामतः त्यांना मोठे यश संपादित होताना दिसत नाही.

शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण येथेही तीच समस्या. अशा संस्था उच्चस्तरीय व्यावसायिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करतात. त्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ते आर्थिक मदतही करतात. ही समाधानाची गोष्ट आहे. मुलांनी इंजीनियर, डॉक्टर बनावे ही सर्वांची इच्छा असते. अशा लोकांच्या सहायतेला बऱ्याच संस्था पहिल्यापेक्षा आज जास्त कार्यरत आहेत. पण त्या गरीबीत गुरफटणाऱ्या मजूरवर्गाच्या मुलामुलींचे काय, ज्यांना त्यांचे आईवडील शाळेतसुद्धा दाखल करत नाहीत? जर कुणी आपल्या मुलांना शाळेत पाठवले तरी १५-१६ वर्षांच्या मुलांना शाळेतून काढून आपल्याबरोबर मजुरी करायला घेऊन जातात. कारण तेवढेच रोजचे १००-१५० रुपये जास्त घरात येतील. १८-२५ वर्षांचे तरुण रोज सकाळी घरून शाळा-कॉलेजची वाट धरत नाहीत तर कमवण्यासाठी जातात. हे दृष्य पाहिल्यावर गोरगरीब समाज किती दुर्बल आहे, किती हतबल आहे, त्याला शिकूनसवरून चांगले जीवन जगण्याची आशाच उरलेली नाही, हे कळते. त्यांचे जीवन शून्यातून सुरू होते आणि शून्यातच संपून जाते.

अशा परिस्थितीवर कोणता उपाय करावा आणि कुणी करावा हा सर्वांचा मोठा प्रश्न आहे. हे जरी खरे असले तरी माणूस फक्त आर्थिक अस्तित्व नाही, तरीदेखील अर्थकारणाशिवाय माणूस जगू शकत नाही. हेदेखील तेवढेच सत्य आहे. समाजाला कर्जबाजारीतून उत्पन्न होणाऱ्या या समस्यांतून बाहेर काढायचे असेल तकर मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. असे केल्यानेच ते व्याजाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडतील. त्यासाठी शून्याभोवती फिरणाऱ्या समाजाचे हित जपण्यासाठी, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची गरज आहे. लहान स्वरूपाचे बिनव्याजी कर्ज देण्यासाठी खास मजूरवर्गातील कामगारांना अशा संस्था स्थापन केल्यास हा वर्ग समाजाच्या इतर घटकांबरोबर स्वतःचा विकास करू शकतो. त्यांची मुलेदेखील शिक्षण प्राप्त करू शकतील. खालच्या स्तरापासून जर शिक्षणाच्या सोयी उभारल्या नाहीत, गरज पडल्यास नवीन शाळा उभारल्या नाहीत आणि त्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्यांना पुरवला गेला नाही तर उच्चस्तरीय व्यावसायिक शिक्षणापर्यंत ही मुलं कशी पोहोचणार!

या परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजाच्या भल्यासाठी वाहून घेणाऱ्या संवेदनशील व्यक्तींची सध्या समाजाला गरज आहे. शहरी आणि मध्यमवर्गीय समाजाच्या सीमा ओलांडून शहरी भागातील झोपडपट्टी आणि ग्रामीण भागातील आजवर टाकून दिेलेल्या शून्याभोवती जीवन जगणाऱ्यासाठी संस्था स्थापन करून श्रीमंत आणि सुशिक्षित आणि गरीब निरक्षर समाजातील तफावत दूर केल्याशिवाय सबंध समाज प्रगती करणार नाही.

व्याजाच्या विळख्यात अडललेय्यांना बाहेर काढण्यात आले नाही तर याचा परिणाम ज्यांनी भोगला तो भोगला, अजनही भोगत आहेत, पण भविष्यात हा अत्याचार होताना दुरून पाहाणारे आणि काहीच करण्याच्या बेतात नसणारेदेखील त्यांच्या यातनांना बळी पडणार आहेत. व्याजावर आधारित अर्थकारण हजारो वर्षे मानवजातीचा ऱ्हास करत आले आहे. किती किती सभ्यता – समाजसमूह या धरतीवरून नष्ट झाले, किती सभ्यता नामशेष झाल्या हा संशोधनाचा विषय कुणीतरी हाताळायला हवा.


- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७



गेल्या पाच वर्षांत देशाच्या साऱ्या नागरिकांना अतोनात यातना, समस्याांच्या आहारी जावे लागले. साहजिकच यामध्ये उच्चमध्यमवर्ग आणि श्रीमंतवर्गाला वगळावे लागेल. कारण त्यांच्या समस्या वेगळ्या असतात. किती अब्ज रु. त्यांच्याकडे आहेत, आणखीन किती अब्ज कमवायला किती बँकांना लुटावे लागेल या विचाराने ते बिचारे ग्रस्त असतात. त्यांना इतर नागरिकांच्या अस्तित्वाशी काय देणेघेणे? आजपासून पाच वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या. त्यावेळेस ते म्हणाले होते की आतापासून चार तासांनी म्हणजे रात्री बारा वाजल्यापासून या नोटांचे मूल्य संपलेले असेल, म्हणजे एका कागदाच्या तुकड्यासारखे होईल. आणि त्याच वेळेस देशाची अर्थव्यवस्था त्याच कागदाच्या तुकड्यासारखी झाली. त्याची लक्तरे उडाली. देशभर कोट्यवधी लोकांनी बँकांमध्ये रांगा लावल्या. स्वतःचे पैसे बँकेतून काढण्यासाठी कित्येक लोकांचे घरगुती खर्च संकटात आले. असे म्हटले जाते की ६०० लोक (खरे किती माहीत नाही) या रांगेत आपल्या पैशांची वाट पाहात मरण पावले. शासनाने याची काडीमात्र दखल घेतली नाही. कारण सामान्य नागरिकांचं जगणं त्यांच्यासाठी कवडीमोल असते. लाखो लहान उद्योगधंदे बंद झाले. लाखो लोक बेरोजगार झाले. त्यांची नुसती दखलदेखील आजवर शासनातर्फे एखादे सर्वेक्षण करून घेतली गेली नाही. सांगण्यात आले की काळा पैसा बाहेर आणण्यासाठी हे गरजेचे होते. शिवाय दहशतवाद्यांना आवरण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे होते. काळा पैसा ज्यांच्याकडे होता त्यांनी त्याला पांढरा करण्याची तजवीज आधीच करून घेतली होती. कारण असे काही होणार याची एकतर त्यांना चाहूल लागली असावी किंवा त्यांना कुणीतरी याची पूर्वकल्पना दिलेली असावी. किती काळा पैसा बाहेर आला आणि किती दहशतवाद्यांचा पुरवठा खंडित झाला याची माहिती आजवर शासनदरबारी कुणी दिली नाही. हे एक प्रकारचे यज्ञ होते देशाच्या ८० टक्के असंघटित अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचे. देशाच्या नागरिकांनी ती घटना विसरून टाकली ज्यांच्या जिवावर, धंद्यावर बेतले ते बेतले, त्यांची काळजी कुणाला असणार? दुसरी आणि याहून भयंकर घटना दि. ३० मार्च २०२० रोजीची. वेळ तीच रात्री आठ वाजतानाची. नोटबंदीसारखीच. नुसत्या चार तास अगोदर देशातील १३५ कोटी नागरिकांना सांगण्यात आले की रात्री १२ वाजल्यापासून सबंध देशात लॉकडाऊन झालेला असेल. कुणी घराबाहेर पडता कामा नये. कोट्यवधी लोक आपल्या गावाबाहेर, शहराबाहेर म्हणजेच आपल्या घराबाहेर हजारो किमी अंतरावर होते. त्यांचा कसलाच विचार लॉकडाऊनची घोषणा करण्याआधी केला गेला नाही. कोट्यवधी मजूरवर्ग दिल्ली मुंबईसह इतर शहरांमध्ये कामावर होते. त्यांचे काम बंद, राहायला जागा नाही, अन्नपाण्याची सोय नाही, शासनाकडून कोणतीही उपाययोजना नाही. ज्या रोजंदारी कामगारांकडे राहायला ठिकाण नव्हते, खाण्यापिण्याचा खर्च नव्हता त्यांच्याकडे एकच उपाय हजारो किमीचे अंतर पायदळी तुडवित आपापल्या गावांकडे निघणे. पाच रुपयांचे पार्ले बिस्किट एवढ्यावरच पोटाची सोय. रस्त्यात उन्हात शेकडो लोक मरण पावले. त्यांच्या सहानुभूतीसाठी एक शब्ददेखील शासनाच्या तोंडातून फुटला नाही. गोरगरीब जनतेला कसेबसे खाऊनपिऊन सन्मानाचे जीवन जगणाऱ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा योजनेद्वारे भिकारी करून टाकले. सोनू सूद सारख्यांनी त्यांच्यासाठी बसेसची सोय केल्यानंतर त्याच्याविरूद्ध कारवाई झाली. कारण ज्यांना मरायला सोडून दिले होते त्यांना वाचवायचा त्यांना कोणता अधिकार? बरे वाईट दिवस गेले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागरिकांचे काय हाल झाले हे वेगळे सांगायला नको. सर्वांना ते माहीत आहे. कारण सर्वांच्या जिवांबर ते बेतलेले आहे. यानंतर तिसरी घटना कोरोना काळात लॉकडाऊन असताना अचानक कुठे कायदेशीर सविस्तर चर्चा न करता कृषिविषयक तीन कायदे पारित करण्यात आले. शेतकरीवर्गाला धक्काच बसला. या कायद्यांद्वारे त्यांच्या पूर्वजांपासून मालकीत असलेय्या शेतजमिनी त्यांच्या ताब्यातून काढून उद्योगपतींना देण्याची सोय तर या कायद्यांद्वारे केली नसेल? या चिंतेने ग्रस्त हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. गेल्या वर्षभरापासून ते आंदोलन करत आहेत. त्यांच्या पायाखालची जमीनच निघून गेली. कुणी त्यांचे उत्तर देत नाही. जशी नोटबंदीची पूर्वकल्पना काही मोजक्यांनाच मिळाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो तशीच हे कायदे सरकार करणार याची सूचना उद्योगपतींना मिळाली असणार? किंवा त्यांच्या संमतीनेच की संगनमतानेच हे कायदे करण्यात आहे आहेत, माहीत नाही. पण हे कायदे पारित होण्याआधीपासूनच इथले उद्योगपती अडाणींनी शेतकऱ्यांकडून हस्तगत करण्यात येणाऱ्या पिकासाठी आधी गोडाऊन तयार करन ठेवले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात जवळपास हजारांवर शेतकरी मरण पावले. एका मंत्र्याच्या पुत्राने तर त्यांना आपल्या वाहनाखाली चिरडले. जशी नोटबंदीच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात पायी जाणाऱ्या कामगारांचे प्राण गेलेल्यांची दखल शासनाने आजवर घेतली नाही तशीच शेतकऱ्यांच्या आंदोलनात मरण पावलेल्यांबद्दल एक शब्दही कुणी सहानुभूतीदाखल बोलत नाही. एवढ्या तीन प्रकरणांवरूनत थांबले तर बस्स. पुढे काही होऊ नये म्हणजे झाले!

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



दिल्लीच्या इंडिया गेटवर लावलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या 95 हजार 300 नावांपैकी 69 हजार 945 नावे मुस्लिम स्वातंत्र्य सेनानींची आहेत. म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये बलिदान दिलेल्या मुस्लिमांची टक्केवारी 65 आहे.

सद्याच्या केंद्रीय सरकारबद्दल अशी सर्रास धारणा आहे की तिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोट कंट्रोलद्वारे चालविले जात आहे. याचबरोबर असा देखील विचार आहे की, संघाच्या अजेंड्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तत्परतेने काम करत आहेत पण हे सत्य असेल असे वाटत नाही. कारण संबंध देशामध्ये योगी आणि मोदी यांचे वर्चस्व आहे. याचे कारण असे की, भाजपा आता खरेच आत्मनिर्भर झालेले आहे. तिला दुसऱ्यांच्या, संघाच्या कुबड्यांची गरज नाही. जर हे खरे असेल तर ते मान्य करण्यात भाजपचेच नुकसान आहे. कारण त्याला विरोधकांच्या टिकेला सामोरे जावे लागते, काही राजकीय विश्लेषकांच्या मते मोदींनी भाजपचे तेच केले जे दिवगंत इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षाबरोबर केले होते. या दोन्ही नेत्यांनी पक्षाची राजकीय, सामाजिक विचारधारा आणि त्याचबरोबर आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारले होते. त्यांचे महत्व कमी करून त्यांना स्वतःच्या व्यक्तीमत्वाच्या आधीन केले होते. म्हणून त्या काळी, ’’ इंदिरा इज इंडिया’’ असा नारा दिला गेला होता. तसाच तो मोदींच्या काळातही दिला जातो. परिणामी, जी अवस्था सध्या काँग्रेसची झालेली आहे. तशाच परिस्थितीला भाजपलाही तोंड द्यावे लागणार.

संघाला 95 वर्षे पूर्ण होत आले आहेत. तरी निवडणुकीचा त्यांचा मोह तसाच आहे. ज्या-ज्या राज्यात निवडणुका जवळ येत असतात त्या-त्या राज्यात संघाची वर्दळ वाढत जाते. सध्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये याचा प्रत्येय येत आहे. पंजाबमध्ये जाण्यास संघाला भीती वाटते. तसेच गोवा आणि मणिपूर लहान राज्य असल्याने त्यांच्यात संघाला रस नसल्याचे दिसून येते. 12 ऑक्टोबरला उत्तराखंडमध्ये ’हिंदू जागे तो पुरी दुनिया जागे’ या महोत्सवाचे आयोजन केले गेले होते. या समारंभात बोलताना मोहन भागवत आपल्या भाषणात म्हणाले की, आपण आपल्या मुलांना हिंदू धर्म आणि त्याच्या विधी पूजा, अर्चा वगैरेंचा आदर करण्यास शिकवायला हवे. ज्यामुळे ते दुसऱ्या धर्माकडे आकर्षित होणार नाहीत. लहान, सहान लग्न वगैरे सारख्या गोष्टीसाठी लोक धर्मांतर करत आहेत. ज्या राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदा केलेला आहे. बळजबरीने पैशांचे आमिष दाखवून लोकांचे धर्मांतर केले जाते. या गोष्टीचा त्यांनी इन्कार केला. भागवतांनी बाहेरील शक्तींवर आरोप करण्यापेक्षा आंतरिक सुधारणा करण्यास सांगितले. जर माता- पित्यांनीच स्वधर्माचा आदर केला नाही तर मुलां-मुलींकडून तशी अपेक्षा करणे स्वभाविक आहे. धर्मांतरावर चिंता व्यक्त करताना सरसंघचालक यांनी या गोष्टीचा स्विकार केला की जे काही धर्माच्या बाबतीत चालले आहे त्यासाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत. कारण आपलच आपल्या मुलां-मुलींचे संगोपन करीत आहोत. म्हणून त्यांना धार्मिक मुल्य देखील घरातूनच मिळायला हवी. त्यांचे हे म्हणणे खरे आहे. पण कोणास एखाद्या धर्मामध्ये काही गोष्टी पसंत नसतील तर मग यावर उपाय कोणता? संघाच्या साहित्यामध्ये ज्या शिरजोरीने हिटलरची प्रशंसा केली जाते आणि मुसोलिनी सारख्या क्रूर शासनकर्त्याला आदर्श समजले जाते तेव्हा तरूण वर्गाला संघाच्या विचारधारेशी सहमत होणे कठीण आहे. तसेच स्वातंत्र्य चळवळीमध्ये सावरकरांना सामावून घेणे आणि त्यांचा माफीनामा या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे तरूण वर्ग संघाजवळ जाण्यापेक्षा त्यापासून दूर राहतो. त्याचबरोबर आनंद गिरी, आसाराम बापू आणि राम रहीम यांची प्रकरणे तसेच भाजपचे माजी मंत्री चिन्मयानंद सारख्या व्यक्तींवर जेव्हा बलात्काराचे आरोप होतात तेव्हा लोक आपल्या धर्माला कंटाळतात. नुकतेच कैलास विजयवर्गीय यांना देखील महिलांवरील अत्याचाराच्या एका प्रकरणात जामीन घ्यावे लागले आहे. अशा परिस्थितीत हिंदू धर्मियांना आपल्या मुलांवर संस्कार करणे कसे शक्य होईल? कानून कायदे करून बळजबरीने लोकांना धर्मांतर करण्यापासून रोखता येत नाही. एकीकडे सरसंघचालक म्हणतात के जे लोक स्वतःला भारतीय समजतात आणि त्यावर विश्वास ठेवतात ते सारे भारतीय असून, त्यांचे पूर्वज एकच आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती धर्मियांच्या उपासना विधी, परंपरा वेगळ्या असतील, त्यांची भाषा वेगळी असू शकते. पण सारे भारतीय आहेत. कोणी मुस्लिम असतील तर त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे. मूलतत्ववादी विचार करू नयेत. पण त्याचवेळेस दुसरीकडे मोहन भागवत लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याची गोष्ट करतात. ते म्हणतात लोकसंख्येचे संतुलन बिघडत आहे. सीमालगत भागामधील लोकांचा जन्मदर आणि भारतात परकीयांच्या घुसखोरीमुळे हे संतुलन अधिकच बिकट होत आहे. त्यांनी देशात 1951 आणि 1911 दरम्यानच्या मुस्लिम लोकसंख्येचाही उल्लेख केला. मुस्लिमांना खलनायक बनवून स्वधर्मियांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. हा गैरसमज दूर करण्यासाठी माजी निवडणूक आयुक्त वाय.एस. कुरेशी यांनी आकडेवारीवर आधारित एक पुस्तक ’द पाप्युलेशन मिथ : इस्लाम, फॅमिली प्लानिंग अ‍ॅण्ड पॉलिटिक्स’ या नावाने प्रकाशित केले आहे. त्यात ते म्हणतात मुस्लिमांनी आपली लोकसंख्या वाढविण्यासाठी कुठलीही योजना आखलेली नाही. त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येविरूद्ध कोणतेही आव्हान उभे करू शकत नाही. त्यांनी आपल्या पुस्तकात असाही दावा केला आहे की, कुटुंब नियोजनाच्या बाबतीत हिंदू आणि मुस्लिम यांचा बरोबरीचा वाटा आहे. मुस्लिमांमधील जन्मदरासाठी कुरेशी हे मुस्लिमांमधील निरक्षरता, धार्मिक मागासलेपण इत्यादी घटकांना जबाबदार धरतात. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये हे तथ्य देखील मांडले आहे की, एकापेक्षा अधिक विवाह करण्याची पद्धत मुस्लिमांमध्ये इतर भारतीय समुदायांच्या तुलनेत कमी आहे. यासाठी त्यांनी 1931 पासून ते 1960 पर्यंतची या संबंधीची आकडेवारी दिलेली आहे. 

सरसंघचालक म्हणाले की, 1951 ते 2011 दरम्यान हिंदू धर्मियांची लोकसंख्या 88 टक्क्यांवरून 83 टक्क्यांवर आली. त्याचवेळी मुस्लिमांची लोकसंख्या 9 ट्नक्यावरून 14.25 ट्नक्यापर्यंत गेली. पण कुरेशी यांच्या मते असे असले तरी काही फरक पडत नाही. कारण मुख्यत्वे करून 1000 वर्षापर्यंतही मुस्लिमांची लोकसंख्या हिंदू लोकसंख्येपेक्षा अधिक होणार नाही. यावर्षी दसऱ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी सरसंघचालक यांनी पहिल्यांदा काही प्रमुख मुस्लिम व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांनी भारताच्या इतिहास व संस्कृतीत हसन खान, हकीम खान सुरी, खुदा बक्ष, गौस खान आणि अशफाकउल्लाह खान यांच्या योगदानाचा गौरव केला. भले ही सरसंघचालकांनी काही मोजक्या मुस्लिम स्वातंत्र्य सेनानींची नावे घेतली असतील पण वास्तविकता अशी आहे की, दिल्लीच्या इंडिया गेटवर लावलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या 95 हजार 300 नावांपैकी 69 हजार 945 नावे मुस्लिम स्वातंत्र्य सेनानींची आहेत. म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये बलिदान दिलेल्या मुस्लिमांची टक्केवारी 65 असून, उरलेल्या 35 टक्क्यांमध्येही एकाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याचे नाव नाही. 

- डॉ. सलीम खान



बेटी के लिए वक्त-ए-बधाई है

माँ के लिए वक्त-ए-जुदाई है

रस्मे तआम जबसे निकाह में आयी है

इस रस्म ने बडी तबाही मचाई है

ये जो बिर्याणी आपने दबाके खाई है

दुल्हन के वालीद की उम्रभर की कमाई है. 

लॉकडाऊन संपताच इतर समाजा बरोबर मुस्लिम समाजाचेही लग्नसोहळे सुरू झालेले आहेत. ऐपतीपेक्षा जास्त केला जाणारा खर्च माणसाला कंगाल बनवितो. तसाच खर्च विकृत निकाह व्यवस्थेत होत असल्याने मुस्लिम समाजाचा प्रवास कंगालीकडे सुरू आहे. ज्या समाजाच्या वस्त्यांमध्ये दर्जेदार शाळा कमी आणि दर्जेदार शादीखाने जास्त असतील त्यांच्या भविष्याविषयी काय बोलावे? हा लाख मोलाचा सवाल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे चिकन, मटन, बिर्याणी, गोड पदार्थांची रेलचेल सध्या निकाहच्या सोहळ्यामध्ये प्रचूर मात्रेत दिसत आहेत. निकाह सोहळ्यामध्ये डीजे आणि व्हिडीओ ग्राफीला जेवढा तीव्र विरोध धर्मगुरूंकडून केला जातो तेवढा निकाहच्या वेळेस दिल्या जाणाऱ्या महागड्या जेवणावळ्यांचा केला जात नाही. काहीतरी तांत्रिक कारण देऊन या ’दावतीं’ना योग्य ठरवून प्रचंड अनुत्पादक खर्च केला जात आहे. त्यामुळे समाजात मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. लॉकडाऊन नंतर निकाह सोहळ्यांचा थाट बघून श्रद्धावान मुस्लिमांचे हृदय पिळवटून निघत आहेत म्हणूनच या आठवड्यात इस्लामी निकाह बद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.

इस्लाममध्ये निकाहची संकल्पना

रोज-रोज दावतें आती हैं पर जाने का नई

गए भी तो निकाह की बिर्याणी खाने का नई

 प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी 1443 वर्षापूर्वीच सावधान केलेले आहे की, ’’औरतों से उनकी खूबसूरती की वजह से शादी न करो, हो सकता है के उनकी खूबसूरती उनको तबाही के रास्ते पर डाल दे. माल दौलत (उर्वरित पान 7 वर)

की वजह से भी उनसे शादी न करो, हो सकता है के उनका माल उनको गुनाह और सरकशी (अवज्ञाकारी) में डाल दे. बल्के तुम दीन की बुनियाद पर उनसे शादी करो. एक नकटी या कानकटी हुई काली मगर दीनदार औरत उनके मुकाबले में ज्यादा अच्छी है.’’ (इब्ने माजा).

आजकाल सौंदर्य आणि संपत्ती याकडेच लक्ष देऊन मुलींची निवड करण्यात येते. मात्र लग्न झाल्यावर ती फेसबुकवरच तासन्तास असते, सतत व्हॉटस्अ‍ॅप करत असते, सारखी मोबाईल फोनला चिटकून राहते, अशा तक्रारी सुरू राहतात. म्हणजे अगोदर, ’सुरत’ पाहून लग्न केले जाते आणि लग्नानंतर तिच्या ’सीरत’ म्हणजे चारित्र्याची चौकशी सुरू होते. वर नमूद हदीसचे पालन न केल्यामुळे पहा अनेक जोडप्यांचे लग्न नरकासमान झालेले आहेत. 

विवाह सोपा करा

ताख़ीर का मौक़ा ना तज़बज़ुब का अमल है

ये वक्ते अमल, वक्ते अमल, वक्ते अमल है

विज्ञानाची जसजशी प्रगती होत जाते तसा-तसा धर्माचा प्रभाव कमी होत जातो. या आणि याचसम अनेक कारणांमुळे भारतीय मुस्लिम समाजावर सुद्धा अलिकडे लग्न करण्यासाठी अनेक विघ्न पार करण्याची पाळी आलेली दिसत आहे. भारतीय मुस्लिम समाज हा धर्मांतरीत मुस्लिम असल्याने व सातत्याने बहुसंख्य हिंदू बांधवांसोबत राहत असल्याने त्यांच्या चालीरितींचा नाही म्हटलं तरी नकळत मुस्लिम जनमानसावर परिणाम होत असतो. हा परिणाम इतका सुक्ष्म असतो की तो लवकर जाणवत नाही. निकाहाच्या बाबतीतही वर्षानुवर्षे होत असलेले सूक्ष्म बदल आता इतके ठळक झालेले आहेत की, त्यांनी एका विक्राळ समस्येचे स्वरूप धारण केलेले आहे. ’जोडे की रकम’ च्या नावाखालील अनेकजण हुंडा आणि हजरत फातेमा रजि. यांच्या नावाखाली, ’दहेज-ए-फातमी’ च्या नावाने दहेजमध्ये फ्लॅट, उंची फर्निचर पासून ते कार वगैरे देण्याचे प्रकार, तसेच सम्राट अकबरच्या नावाखाली हलदी, मेहंदी, जुलवा इत्यादी रीतिरिवाज हे मुस्लिमांच्या निकाहमध्ये एव्हाना प्रस्थापित झालेल्या चालीरीति आहेत आणि यामुळेच ’निकाह को आसान करो’ या प्रेषित सल्ल. यांच्या फर्मानाला उघडपणे हरताळ फासण्याचे काम मोठ्या प्रमाणात मुस्लिमांकडून होत आहे.

         मुस्लिमांचे निकाह ही आता सोहळे बनत चाललेले आहेत. एकदा प्रेषित सल्लम. यांचे एक जवळचे सहकारी ह. अब्दुर रहमान बिन औफ रजि. यांच्या सदऱ्यावर अत्तराचा डाग पाहून प्रेषित सल्ल. यांनी त्याबद्दल चौकशी केली असता ते लाजून म्हणाले, ’’या रसुलल्लाह (सल्ल.) कल मेरा निकाह हुआ है’’ याचा अर्थ पहा! ... प्रेषित सल्ल. गावात हजर आहेत मात्र त्यांच्या एका विश्वासू साथीदाराला (रजि.) त्यांना स्वतःच्या निकाह समारंभात बोलावण्याची आवश्यकता वाटली नाही. मुस्लिमांचा निकाह इतका सोपा असतो. इस्लाममध्ये लग्न संस्कार आहे ना सोहळा ती फक्त एक इबादत आहे. प्रेषित सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. एक सामाजिक करार आहे, यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही. इतर धर्मांमध्ये अध्यात्मिकतेची उंच पातळी गाठण्यासाठी संसाराचा त्याग करावा लागतो. साधू बनावे लागते, नन् किंवा फादर बनावे लागते. मात्र संसारी जीवन जगून सुद्धा अध्यात्मिकतेची अत्युच्च पातळी गाठता येते, जगाला याचे प्रात्यक्षिक मुहम्मद सल्ल. यांनी दाखवून दिले. 

     भारतीय मुस्लिमांमध्ये अगोदरच गरीबांची संख्या जास्त आहे. निकाह महाग झाल्यामुळे लाखो मुली लग्नाची वाट पाहत आहेत, माझ्या दृष्टीने आतंकवादाच्या खोट्या आरोपाखाली मुस्लिम मुलांच्या अटकेनंतरची हीच सर्वात मोठी सामाजिक समस्या आहे. मोठ्या लग्नांमध्ये साहजीकच बडेजावपणा असतो. आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याची तीव्र इच्छा असते. त्यासाठी उंची वस्त्रे आणि दाग दागिने घालून मिरविण्याची स्त्री-पुरूषांना नैसर्गिकरित्या इच्छा निर्माण होते. त्यातून स्त्री-पुरूषांना एकत्रित वावरण्याची संधी मिळते. त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. मस्जिदीमध्ये सहज होऊ शकणाऱ्या साध्या शरई निकाहचे सोहळ्यात रूपांतरण करून आपण वरील सर्व वाईट गोष्टींची जोखीम स्विकारलेली आहे.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’बरकतवाला निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’ आपण नेमके याच्या उलट करीत आहोत व तसे करून आपल्याला काही चुकीचे केले आहे असेही वाटत नाही, ही शरमेची बाब आहे.  ज्या ठिकाणी प्रेषित सल्ल. यांच्या आदेशाचे उघड उल्लंघन होते त्या ठिकाणी बिर्याणी खाणे तर लांबच राहिले अशा सोहळ्यामध्ये हजर राहणे सुद्धा अवज्ञा आहे. प्रेषित सल्ल. यांनी कधीच कोणाच्या निकाहमध्ये जेवण केलेले नाही मग आम्ही कसे करू शकतो? याचे उत्तर कोणाला देता येत असेल तर त्यांनी द्यावे. 

अल-मारूफ वल-मशरूत

         एकदा का एखाद्या समाजामध्ये एखादी वाईट परंपरा रूजली की तिला संपविणे सोपे नसते. सुभाषितवजा सल्ला दिल्याने ती संपत नाही. अरबी भाषेमध्ये याचे एका ओळीत नित्तांत सुंदर असे वर्णन केलेले आहे ते म्हणजे, ’अल -मारूफ वल-मशरूत’ म्हणजे एखादी रीत एखाद्या समाजामध्ये ’मारूफ’ म्हणजे लोकप्रिय झाली की लवकरच तिचे रूपांतरण ’अल मशरूत’ म्हणजे अनिवार्य रीतीमध्ये होऊन जाते. आपल्या समाजात सुद्धा हेच झालेले आहे. अनेक कुरितींची सुरूवात मारूफ पद्धतीने झाली होती आता तिचे रूपांतर मशरूतमध्ये झालेले आहे.

निकाह सोपा करा 

       इस्लाममध्ये निकाह इच्छुक मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांकडून निकाहचा प्रस्ताव म्हणजेच ’इजाब’, निकाह इच्छुक मुलगी आणि तिच्या नातेवाईकांकडून त्या प्रस्तावाचा स्वीकार म्हणजे (कुबूल), दोन साक्षीदार, एक वकील, एक काझी, माफक महेर काही छूआरे (खजूर) एवढे झाले के निकाह होऊन जातो. एवढी साधी ही प्रक्रिया आहे. मात्र आजच्या मुस्लिम समाजातील निकाह अनेक रितीरिवाजांनी नटलेले म्हणूनच क्लिष्ट झालेले आहेत. अनेक चुकीच्या गोष्टी मारूफ झालेल्या आहेत. 

इस्लामपूर्व काळामध्ये या सर्व कुरीती तत्कालीन अरबी समाजामध्ये प्रचलित होत्या. त्या सर्व प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी आपल्या बुटाच्या टाचेखाली रगडून नष्ट केल्या. परंतु कालौघात त्या पुनर्जिवीत होवून आजमितीला नव्याने समाजाला आव्हान देत आहेत. लाखो रूपये हुंड्यात, लाखोंचा खर्च जेवणात, लाखो रूपये मंगल कार्यालयात, लाखो रूपयांची उंची वस्त्रे आणि दागदागिन्यात खर्च केले जात आहेत. 

      काही ठिकाणी लोक लाजेखातर या सर्व गोष्टी तोंडाने मागत नाहीत मात्र मुशास्ता (मध्यस्थ) च्या माध्यमातून त्या न मागता मिळतील अशाच ठिकाणची स्थळे शोधली जात आहेत. अलिकडे गरीब व मध्यमवर्गीय लोकांच्या अपेक्षांना सुद्धा धुमारे फुटलेले आहेत. त्यामुळे निकाहमध्ये अनाठायी खर्च अनिवार्य झालेला आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की -  

         एखाद्याला पहिली मुलगी झाली तर तो कशीबशी आपली समजूत घालून घेतो. योगायोगाने दूसरीही झाली तर त्याचे काळीज धस्स करते. तीसरी झाली तर त्याच्या पोटात भितीचा गोळा उठतो आणि चौथीही झाली तर मात्र तो हसणे विसरून जातो. खाली मान घालून पाठीचा कना मोडेपर्यंत काम करतो, कारण चारही मुलींच्या निकाहासाठी भविष्यात लागणारी प्रचंड रक्कम त्याच्या ऐपतीबाहेरची असते. काहीही करून ती गोळा करणे हेच त्याच्या आयुष्याचे एकमेव ध्येय बनते. त्याची तरतूद करण्यासाठी तो स्वतः व कुटुंबावरील आवश्यक खर्चाला सुद्धा कात्री लावतो. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पौष्टीक अन्न, मनोरंजन, पर्यटन इत्यादी गोष्टींचा तर विचारच करत नाही. आपल्या मुलींचे निकाह योग्य ठिकाणी लावण्यासाठी योग्य त्या खर्चाची तरतूद करण्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. एक पोलीस अधिकारी या नात्याने मला आलेल्या अनुभवातून मी हे विदारक सत्य वाचकांसमोर ठामपणे मांडू शकतो की, मुस्लिम समाजातील दोन पेक्षा जास्त मुली असणारा प्रत्येक बाप आपल्या मुलींचे निकाह व्यवस्थीत व्हावेत, यासाठीच जगत आहे. याचा पुरावा हा आहे की, मुस्लिमेत्तर वस्त्यांकडे एक दृष्टीक्षेप टाकला तरी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या वस्त्यांमध्ये मोठमोठी महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस, मुला-मुलींचे आलीशान हॉस्टेल यांची संख्या वाढत आहे तर मुस्लिम वस्त्यांमध्ये आलीशान शादीखान्यांची संख्या वाढत आहे. कोणत्याही शहरातले हेच चित्र आहे.

 एक अनाहुत संकट  

         ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना महेफूज उमरैन रहेमानी यांनी उर्दूमध्ये एक लेख लिहून समाजाचे लक्ष एका वेगळ्याच समस्येकडे वेधलेले आहे. मौलाना म्हणतात 2016-17 या एका वर्षामध्ये एकट्या पुण्यामध्ये 44 मुस्लिम मुलींनी इतर धर्मीय मुलांशी नोंदणी पद्धतीने विवाह केलेले आहेत. एकट्या पुण्याची ही आकडेवारी आहे. यावरून संपूर्ण महाराष्ट्राची किंबहुना देशाची काय परिस्थिती असेल, याचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. निःसंशयपणे दिवसेंदिवस महाग होणारे निकाह हे सुद्धा या पलायनामागचे एक प्रबळ कारण असल्याच्या मौलानांच्या मताचा प्रतिवाद करणे शक्य नाही. 

केवळ निकाह प्रसंगी देण्यात येणारे भारी जेवण जरी बंद केले तरी निकाह समारंभामध्ये होणारा अर्ध्यापेक्षा अधिक वायफळ खर्च वाचू शकतो, असे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे करणे सहज शक्य आहे. ज्या प्रेषित सल्ल. यांचे गोडवे गाताना आपली जीभ थकत नाही त्याच प्रेषित सल्ल. यांच्या 11 निकाह पैकी एकाही निकाह प्रसंगी उपस्थितांना जेवण देण्यात आलेले नव्हते, हे एकच कारण लाखोंचे महागडे जेवण देण्याच्या पद्धतीला रोखण्यासाठी पुरेसे आहे. 

        एका मध्यमवर्गीय मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या निकाहला होणाऱ्या शेकडो लोकांच्या गर्दीमधील मोठी संख्या त्या व्यक्तीसाठी, त्या सोहळ्यासाठी नव्हे तर निकाहनंतर मिळणाऱ्या बिर्याणीसाठी गोळा झालेली असते हे वास्तव आहे. निकाहमध्ये मुस्लिमांनी जेवणाची ही पद्धत बंद पाडली तर 5-50 पेक्षा जास्त लोक मोठ्या लग्नाला सुद्धा येणार नाहीत, याची मला खात्री वाटते. असे झाले तर निकाह मस्जिदीमध्ये सहज करता येतील व मुलीच्या बापाचे शादीखान्याच्या भाड्याचे लाखभर रूपये व जेवणाचे चार-दोन लाख रूपये सहज वाचतील. 

         आज ऐपत नसतांनासुद्धा प्लॉट किंवा घरदार, शेती विकून प्रसंगी व्याजी कर्ज काढून अनेक लोक या खर्चिक निकाहचा खर्च भागवित आहेत. त्यांच्या या हलाकीच्या परिस्थितीवर दया दाखवून आपण एका वेळेसच्या बिर्याणीचा त्याग करू शकत नसू तर मात्र समाजाच्या सांस्कृतिक ऱ्हासाचे चित्र ’याची देही याची डोळा’ आपल्या सर्वांनाच पहावे लागेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.  

काही लोकांचा माझ्या या म्हणण्याला विरोध असू शकतो. अनेकजण ही पळवाट शोधू शकतात की जर मुलींच्या वडिलांची परिस्थिती चांगली असेल व ते स्वेच्छेने जेवण देत असतील तर जेवण्यात काय हरकत आहे? हे म्हणणे जरी वरकरनी बरोबर वाटत असले तरी अशा प्रकारातून ऐपत नसलेल्यांवर सुद्धा सामाजिक दबाव आपोआप येतो व त्यातून ते लोक जेवण देण्यास बाध्य होवून जातात. कारण की ऐपत ही एक नित्तांत खाजगी बाब असते. वरकनी कोणाकडे पाहून त्याच्या ऐपतीचा अंदाज करता येत नाही. वरून ऐपतदार दिसणारे अनेक लोक आतून पोकळ असतात. लोकलाजेखातर ऐपत नसतांनाही वायफळ खर्च करत असतात. मी अशा काही लोकांना ओळखतो की, जे सकृतदर्शनी ऐपतदार दिसत होते व ज्यांनी आपल्या खोट्या ऐपतीप्रमाणे आपल्या मुलींचे शानदार निकाह करून दिले आणि नंतर कळाले की, घरदार विकून मुंबई, पुणे, हैद्राबादला जावून मजूरी करत आहेत. ज्या समाजातील श्रीमंत लोक आपल्या समाजातील गरीब लोकांवर दया दाखवत नाहीत तो समाज फार काळ एकसंघ राहू शकत नाही. लग्न हा कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. तो सहज सुंदर आणि टिकाऊ असेल तर समाज सुद्धा सहज सुंदर आणि टिकाऊ होतो. तो जर क्लिष्ट, कुरूप असेल आणि टिकाऊ नसेल तर तो समाज दुभंगल्याशिवाय राहू शकत नाही.

        मुस्लिम मॅरेज सिस्टम इज द मोस्ट मॅथेमॅटिकल सिस्टम इन द वर्ल्ड असे शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर येथे बोलताना एकदा म्हटले होते. त्यांचे म्हणणे खरेच आहे. फक्त आपण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षांना निकाहमध्ये घुसडून निकाहचे गणितच बिघडवून टाकलेले आहे. ते पूर्ववत शुद्ध स्वरूपात आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यासाठी निकाहला सोपे करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही.

           लक्षात ठेवा मित्रानों ! महागड्या निकाहचे खालील सामाजिक दुष्परिणाम नक्कीच होतील. एक - वर्गकलह वाढेल. दोन- कन्या भ्रुणहत्या सुरू होतील. (कोण जाणो सुरूही झाल्या असतील). हे दुष्परिणाम टाळायचे असल्यास ’निकाह को आसान बनाओ’ हे सुत्र आज या क्षणापासूनच आपण सर्वांनी मिळून स्वतःवर लागू करावे लागेल. प्रेषित सल्ल. यांच्या याच वचनाची बूज राखावी लागेल. मला विश्वास आहे आपण सर्व निकाहला सोपे करण्यासाठी आपापल्या ठिकाणी प्रयत्नशील रहाल. 

शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की,  ’’ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना तुझ्या आणि तुझ्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीप्रमाणे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करण्याची समज दे.’’ (आमीन.) 


- एम. आय. शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget