Halloween Costume ideas 2015
Latest Post

महाराष्ट्रात महिनाभर सुरू असलेले सत्तानाट्याचा समारोप सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे झाला. सत्तालंपटांनी स्वहस्तेच आपले सत्तापालट घडवून पायउतार झाले  आणि मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडली. महिनाभर जमलेले ना ना शंकांचे ढग एका आदेशाने दूर झाले. सुप्रीम कोर्टाचा हा आदेश एका अर्थाने मास्टर स्ट्रोकच  होता. या स्ट्रोकने महिनाभर सुरू असलेल्या वेगवेगळ्या ऑपरेशनचा निकाल लागला. त्यामुळे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे सरकार   स्थापन झाले. पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यावर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती  त्यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्यासह भाजपावर मोठी टीका झाली होती. त्याची दखल घेत भाजपाने विरोधात लढलेल्या आपल्या मित्रपक्ष शिवसेनेला थोडे बॅकफूटवर जात सत्तेत  सहभागी करून घेतले. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादी आणि पवारांना टार्गेट करून भाजपाने राजकारण केले. असे असताना आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यास काही तास  उरलेले असताना राज्याच्या हिताचे कारण देत थेट अजित पवार यांच्यासोबत रातोरात फडणवीसांनी शपथविधी आटोपला. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी व भाजपचे सरकार स्थापन  करण्यासाठी महाराष्ट्रात जे रात्रीचे नाट्य घडले, त्यातून भाजप सत्तेसाठी किती उतावीळ झाला होता, याचेच दर्शन साऱ्या देशाला घडले. वाट्टेल ते करू पण सत्ता आमचीच, हा भाजपचा  मंत्र आहे. केंद्रात आमचे सरकार आहे, राज्यपाल व राष्ट्रपती आमच्याच विचारधारेचे आहेत, तेव्हा दुसऱ्या कोणाला सरकार स्थापन करून देण्याची आम्ही संधी देणारच नाही, अशी  अटकळ भाजपने बांधली असावी. मात्र अपेक्षेप्रमाणे अल्पमतात आल्यामुळे अतिअल्पकाळातच हे सरकार कोसळले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार १४ दिवसांत  कोसळल्याची जितकी चर्चा आजवर झाली, त्याहूनही अधिक चर्चा फडणवीसांच्या या औट घटकेच्या सरकारची होणार आहे. एकाच महिन्यात मुख्यमंत्रिपदाचा दोन वेळा राजीनामा  देण्याचा विक्रम फडणवीस यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी आणि गुप्त मतदानाऐवजी या चाचणीचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असा निकाल दिल्यानंतर  काही तासातच फडणवीस आणि अजितदादांनी राजीनामा देत आपला पराभव उघडपणाने मान्य केला. राजीनामा देताना आणि दिल्यानंतरही भाजपातील अनेकांनी या सर्वांचे खापर  शिवसेनेच्या माथी फोडत स्वत:ची फसलेली चाल झाकण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकांच्या आधीपासूनच २०२४ पर्यंत  आपण सत्तेत आहोत अशा आविर्भावात वावरणाऱ्या  भाजप नेत्यांची अवस्था हाती धुपाटणे आले अशी झाली आहे. भाजपा हटाव या सूत्रावरून त्यांच्यातील एकीचे बळ आता वाढलेले दिसत आहे. राष्ट्रपती राजवट हटविण्यात आल्यानंतर  घटनात्मक तरतुदींचा, राज्यपालांच्या अधिकारांचा आणि विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा बराच किस पाडला गेला. अजितदादांनी टाकलेला डाव पलटवून टाकताना शरद पवारांनी  एका बाजूला राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावतानाच दुसऱ्या बाजूला सर्व कायदेशीर-घटनात्मक बाबींची माहिती घेऊन व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली होती. सर्वोच्च न्यायालयातील  युक्तिवादानंतर न्यायमूर्तींनी खुलेपणाने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यामुळे पवारांचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांना आपला डाव फसल्याची जाणीव   झाली. त्यामुळेच फडणवीसांच्या उतावीळ सरकारची मृत्यूघंटा वाजवली. या सत्तानाट्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर होणार आहेत. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव  ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणे ही बाब भारतीय जनता पक्षासाठी सणसणीत चपराक असणार आहे. भाजपच्या सत्तानाट्यामुळे घट्ट झालेले बंध पाच वर्षे कायम  टिकले तर २०२४ च्या देशपातळीवरील राजकारणावर याचे परिणाम होतील. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपासोबत असलेल्या पक्षांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे.   येणाऱ्या काळात शिवसेनेसारखीच भूमिका इतर पक्षांनी घेतल्यास भाजपासाठी ती डोकेदुखी ठरणार आहे. एकूणच राज्यातील राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांत भाजपद्वारे  घडलेल्या घटनांचे वर्णन केवळ अतक्र्य, अनाकलनीय आणि अनुचित असेच करावे लागेल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या विरुद्ध एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (इडी)ची नोटीस पाठवणे ही भाजपची सर्वांत मोठी चूक होती. ज्या अजित पवारांच्या नावे पाच वर्षे भ््राष्ट म्हणून ओरड केली, त्यांच्यापेक्षा मोठा भ््राष्टाचारी  कोणी नाही, असं म्हणत ज्यांच्या विरुद्ध तपासणी सुरू केली त्यांच्यावरच भाजपने विश्वास ठेवला आणि स्वत:वर नामुष्की ओढवून घेतली. आपापसांतील मतभेद मिटवत एकत्र येत   आपल्या विरुद्ध लढण्याची संधी भाजपने या तीन्ही पक्षांना दिली. मतभेद विसरून एकत्र येण्याखेरीज या पक्षांकडे  दुसरा पर्यायच नव्हता, कारण हा त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न होता.  महाराष्ट्रात जे काही घडले त्यासाठी फडणवीसांबरोबरच भाजपचे राष्ट्रीय नेतृत्त्वही तितकेच जबाबदार आहे, याचे परिणाम आगामी काळात त्यांना निश्चितच भोगावे लागतील.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहच्या एखाद्या भक्ताने निषिद्ध धनसंपत्तीचा उपभोग घेत असेल आणि मग त्यातून  अल्लाहच्या मार्गात दानधर्म (सदका) करीत असेल तर तो दानधर्म त्याच्याकडून स्वीकारला जाणार नाही आणि जर स्वत:वर आणि आपल्या कुटुंबियांवर खर्च करील तर तो असमृद्धीस  पात्र ठरेल, जर तो ती धनसंपत्ती सोडून मरण पावला तर ती त्याच्या नरकाच्या मार्गातील सामान बनेल. अल्लाह वाईटाला वाईटाद्वारे नष्ट करीत नाही तर सदाचाराने नष्ट करतो,  दुष्ट (खवीस) दुष्टाला नष्ट करीत नसतो.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
या हदीसद्वारे स्पष्ट होते की पुण्याचे कार्य वैध पद्धतीने करण्यात आले तर ते पुण्यकर्म समजले जाईल, उद्देशदेखील पवित्र असला पाहिजे आणि त्याचे माध्यमदेखील पवित्र असले  पाहिजे.

माननीय सईद बिन अबुलहसन (ताबई) यांच्या कथनानुसार, मी माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांच्याजवळ बसलो होतो. इतक्यात एक मनुष्य आला आणि म्हणाला, ‘‘हे इब्ने अब्बास (रजि.)! मी एक हस्तकलाकार मनुष्य आहे, दस्तकला माझ्या कमाईचे माध्यम आहे. मी जीवधारी प्राण्यांची चित्र बनवितो आणि त्यांची विक्री करतो.  (याबाबतीत आपले काय मत आहे, माझा हा व्यवसाय निषिद्ध आहे काय?)’’ इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, याबाबतीत माझे स्वत:चे काहीही मत नाही, मात्र मी तुम्हाला पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडून  ऐकलेली हदीस ऐकवितो. मी पैगंबरांना असे म्हणताना ऐकले आहे, ‘‘चित्र बनविणाऱ्या माणसास अल्लाह शिक्षा देईल, इतकेच काय तो माणूस त्या चित्रात आत्मा फुंकण्याचा प्रयत्न करील, परंतु तो तसे करू शकणार नाही.’’ हे ऐकून त्या मनुष्याचा चेहरा उतरला आणि जोराचा श्वास घेतला. इब्ने अब्बास (रजि.) त्या मनुष्यास म्हणाले, ‘‘जर तुम्हाला हेच काम  करायचे असेल तर तुम्ही झाडे आणि अशा वस्तूंची चित्रे काढा ज्यात प्राण नसेल.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण
चित्र काढणाऱ्याला आपल्या कामाच्या बाबतीत शंका आली म्हणून त्याने येऊन माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांना विचारले. हीच त्याच्या ईमानधारक असण्याची निशाणी  आहे. जर त्याच्या मनात अल्लाहचे भयन नसते, जर त्याला पवित्र व वैध कमाईची चिंता नसती तर त्यांच्याकडे गेलाच नसता. ज्यांना पारलौकिक जीवनातील उत्तरस्रfयत्वाची भीती  नसते ते वैध व निषिद्धची पर्वा करतात काय?

व्यापार
माननीय राफेअ बिन खदीज (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारण्यात आले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! सर्वांत अधिक चांगली कमाई कोणती आहे?’’ पैगंबर (स.)  म्हणाले, ‘‘मनुष्याचे स्वत:च्या हाताने काम करणे आणि तो व्यापार ज्यात व्यापारी अप्रामाणिकपणा आणि खोटारडेपणाचा आधार घेत नाही.’’ (हदीस : मिश्कात)
माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘खरेदी करताना, विक्री करताना आणि आपले कर्ज मागताना मृदुपणा व सद्वर्तन करणाऱ्या मनुष्यावर अल्लाहची कृपा असो.’’ (हदीस : बुखारी)
माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सत्यासह व्यवहार करणारा प्रामाणिक व्यापारी अंतिम निवाड्याच्या दिवशी पैगंबर,  सत्यनिष्ठ आणि हुतात्म्यांबरोबर असेल.’’ (हदीस : तिर्मिजी)

(४४) आम्ही तौरात हा ग्रंथ अवतरला ज्यात मार्गदर्शन व प्रकाश होता. सर्व नबी (पैगंबर) जे मुस्लिम होते त्याला अनुसरून या यहुदी७२ लोकांच्या सर्व बाबींचा निर्णय देत असत. आणि  याचप्रकारे रब्बानी (धर्मपंडित) आणि अह्बार (धर्मशास्त्री)७३ देखील (याआधारे निर्णया देत असत.) कारण त्यांना अल्लाहच्या ग्रंथाच्या संरक्षणाचे जबाबदार बनविण्यात आले होते व यावर ते साक्षी होते. म्हणून (हे यहुदी लोकहो!) तुम्ही लोकांना भिऊ नका तर माझे भय बाळगा आणि माझी संकेतवचने क्षुल्लक मोबदल्यात विकणे सोडून द्या. जे लोक अल्लाहच्या  अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करीत नसतील तेच अधर्मी होत.
(४५) तौरातमध्ये आम्ही यहुदी लोकांसाठी हा आदेश लिहिला होता की प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्यासाठी डोळा, नाकासाठी नाक, कानाबद्दल कान, दाताबद्दल दात आणि सर्व  जखमांबद्दल बरोबरीचा बदला.७४ मग जो किसास (मृत्युदंड) ऐवजी दान (सदका) करील तर तो त्याच्यासाठी पापक्षालन (कफ्फारा) होय.७५ आणि जे लोक अल्लाहद्वारे अवतरित  केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करत नसतील तेच अत्याचारी होत.
(४६) मग आम्ही त्या पैगंबरानंतर मरयमपुत्र इसाला पाठविले. तौरातपैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध होते, तो त्याची सत्यता प्रमाणित करणारा होता. आणि आम्ही त्याला ‘इंजिल’  (नवा करार) प्रदान केले ज्यात मार्गदर्शन व दिव्य प्रकाश होता आणि तो ग्रंथदेखील तौरातपैकी जे काही त्या काळी उपलब्ध होते त्यातील सत्य प्रमाणित करणारा होता७६ तसेच त्यात  अल्लाहचे भय बाळगणाऱ्या लोकांसाठी पुरेपूर मार्गदर्शन व उपदेश होता.
(४७) आमची आज्ञा होती की इंजिलधारकांनी या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करावा जो अल्लाहने त्यात अवतरित केला आहे, व जे लोक अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्याला  अनुसरून न्यायनिवाडा करीत नसतील तेच फासिक (अवज्ञा करणारे) होत.७७


७२) येथे संकेत त्या सत्याकडे असून सचेत केले गेले आहे की सर्व पैगंबर हे मुस्लिम (अल्लाहचे आज्ञाधारक) होते. याविरुद्ध हे यहुदी `इस्लाम' (ईशआज्ञापालन) पासून दूर होऊन आणि भेदाभेद वर्तनामध्ये गुरफटून फक्त यहुदी बनून राहिले होते.
७३) `रब्बानी' म्हणजे धार्मिक विद्वान (उलेमा) आहे. `अह्बार' म्हणजे धार्मिक विधिवेत्ता (फुकहा) आहे.
७४) तुलनेसाठी पाहा बायबल (जूनाकरार) ग्रंथ `निर्गमन' अध्यायन २१:२३-२५
७५) म्हणजे जो मनुष्य दान स्वरुपात बदला घेणे माफ करतो त्याच्यासाठी हे पुण्य त्याच्या अनेक अपराधांचे प्रायश्चित बनेल. याच अर्थाने पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कथन आहे,  ``ज्याच्या देहात काही घाव लागला आणि त्याने क्षमा केली तर ज्या श्रेणीची ती क्षमा असेल त्याचप्रमाणे त्याचे अपराध माफ केले जातील.
७६) म्हणजे इसा (अ.) नवीन धर्म घेऊन आले नाहीत तर तोच एक दीन (धर्म) जो पूर्वींच्या सर्व पैगंबरांचा धर्म होता. तोच धर्म इसा (अ.) यांचाही होता. त्याच जीवन धर्माकडे (दीन) ते   जगाला आवाहन करीत होते. तौरातच्या मौलिक शिकवणीनुसार त्यांच्या काळात जी शिकवण सुरक्षित होती, त्यांना इसा (अ.) स्वत:मानत होते आणि बायबलसुद्धा त्या शिकवणींची  पुष्टी करत होता. (पाहा, मत्ती, ५:१७-१८) कुरआन या सत्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे की, अल्लाहने जगात जिथे कोठे पैगंबर पाठविले त्यांच्यापैकी कोणीही त्यांच्या मागील पैगंबरांचे  खंडन करण्यासाठी आले नव्हते. आणि त्यांच्या कार्याला नष्ट करून आपला नवा धर्म स्थापण्यासाठीही आलेले नव्हते. प्रत्येक पैगंबर आपल्या मागील पैगंबरांची पुष्टी करीत होता आणि  त्यांच्याच कार्याला पुढे चालविण्यासाठी येत होता. या पवित्र कार्याला मागील पैगंबरांनी एक पवित्र वारसा म्हणून आपल्या मागे सोडले होते. याचप्रमाणे अल्लाहने आपला एखादा ग्रंथ  मागील ग्रंथांचे खंडन करण्यासाठी अवतरित केला नव्हता तर अल्लाहचा प्रत्येक ग्रंथ हा त्याच्या मागील ग्रंथांचे समर्थन करण्यासाठी व पुष्टी करण्यासाठी अवतरित होत होता.
७७) येथे अल्लाहने त्या लोकांसाठी जे अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसार निर्णय देत नसत, त्यांच्यासाठी तीन आदेश  दिले होते. एक म्हणजे ते काफीर (द्रोही) आहेत. दुसरे म्हणजे ते अत्याचारी आहेत. तिसरे म्हणजे ते अवज्ञाकारी आहेत. याचा स्पष्ट अर्थ होती की जो मनुष्य अल्लाहचा आदेश आणि त्याच्या अवतरित कायदेसंहिताला सोडून स्वत: किंवा  इतर मनुष्यांनी बनविलेल्या कायद्यानुसार निर्णय घेतो तो खरे तर तीन प्रकारचे मोठे अपराध करीत राहातो.
(१) प्रथम म्हणजे त्याचे हे कार्य अल्लाहच्या आदेशाला नाकारण्यासारखे आहे आणि हे सत्याला नाकारणारे आणि अधर्म (कुफ्र) आहे. (२) दुसरा म्हणजे त्याचे हे कार्य न्याय आणि  प्रतिष्ठेविरुद्ध आहे कारण ठीक ठीक न्यायसंगत जो आदेश आहे तो तर अल्लाहने दिलेला आहे. म्हणून जेव्हा अल्लाहच्या आदेशापासून दूर जाऊन त्याने निर्णय दिला तर त्याने   अत्याचार केला. (३) तिसरे म्हणजे दास असूनसुद्धा जेव्हा तो आपल्या स्वामीने निर्मित केलेल्या कायद्यांशी विमुख होऊन स्वत:चा किंवा दुसऱ्याने तयार केलेल्या कायद्याला लागू  करतो तर वास्तविकपणे तो भक्ती आणि आज्ञापालनाच्या सीमेबाहेर पडला. हीच अवज्ञा आहे (फिस्क). हे कुफ्र, जुल्म आणि फिस्क (द्रोह, अत्याचार आणि अवज्ञा) स्वभाविकपणे  अनिवार्यता ``अल्लाहच्या आदेशापासुन विमुख होणे आहे.'' हे असंभव आहे की जिथे विमुखता आहे तिथे या तिन्ही वस्तू आढळणार नाहीत. ज्याप्रकारे या विमुखतेच्या श्रेणीमध्ये फरक  असेल त्याप्रमाणे या तिन्ही श्रेणीत फरक आहे. जो कोणी अल्लाहच्या आदेशाविरुद्ध यासाठी न्याय देतो की तो अल्लाहच्या आदेशांना चुकीचे आणि स्वत:च्या किंवा इतरांच्या आदेशांना  योग्य मानतो असा मनुष्य पूर्णत: काफीर (विधर्मी) अत्याचारी आणि अवज्ञाकारी असतो. परंतु जो मनुष्य श्रद्धाशीलतेने अल्लाहच्या आदेशांना सत्य मानतो परंतु व्यावहारिकतेत  त्याच्याविरुद्ध वागतो. असा मनुष्य मुस्लिम समुदायापासून वेगळा होत नाही. परंतु आपल्या ईमानला कुफ्र (विद्रोह), जुल्म (अत्याचार) आणि फिस्क (अवज्ञा) यांच्याशी मिसळत असतो.  याचप्रमाणे ज्याने आपल्या सर्व जीवनव्यवहारात अल्लाहच्या आदेशापासून विमुखता धारण केली, तो जीवनाच्या सर्व क्षेत्रांत काफीर (विद्रोही), जालिम (अत्याचारी) आणि फासिक  (अवज्ञाकारी) आहे. जो एखाद्या जीवनक्षेत्रात अल्लाहचा आज्ञापालक आहे आणि बाकीच्या क्षेत्रांत त्यापासून विमुख आहे. अशा मनुष्याच्या जीवनात ईमान व इस्लाम आणि द्रोह आणि  अत्याचार, अवज्ञाचे मिश्रण असते. हे मिश्रण त्याच प्रमाणात असते ज्या प्रमाणात त्याने आपल्या जीवनव्यवहारात आज्ञापालन व विमुखता यांचे मिश्रण केले असेल. कुरआनच्या काही  टीकाकारांनी या आयतींना तर ग्रंथधारकासाठी खास करण्याचे प्रयत्न केले आहे. परंतु ईशवाणीच्या शब्दांमध्ये अशाप्रकारचे अर्थनिर्धारण करण्यासाठी काहीच वाव नाही. या अर्थनिर्धारणाचे  खरे उत्तर आहे जो माननीय हुजैफा (रजि.) यांनी दिला आहे. त्यांच्याशी कोणीतरी विचारले की या तिन्ही आयतीं तर बनीइस्राईलींशी संबंधीत आहेत. यावर माननीय हुजैफा (रजि.)  म्हणाले, ``किती चांगले बंधू आहेत तुमच्यासाठी हे बनीइस्राईली! की कडूकडू सर्व त्यांच्यासाठी आहे आणि गोडगोड सर्व तुमच्यासाठी आहे. कस्रfप नाही, खुदाची शपथ! तुम्ही यांच्याच  पद्धतीने चालू लागाल.''

भारतात मदरसे त्या लोकांच्या टीकेचे लक्ष्य ठरले आहेत, जे राजकीय स्वार्थ राखतात आणि मीडियाच्या एका वर्गाकडूनही, जो पक्षपाती दृष्टीकोन बाळगतो. मदरशांविषयी आपला दृष्टीकोन ते लोक व्यक करतात, ज्यांना मदरसा व्यवस्थेसंबंंंधी आणि तिथे काय शिकविले जाते, त्यासंबंधी फार थोडेच ज्ञान असते. त्यांनी फक्त हे गृहित धरले आहे की ज्याअर्थी या इस्लामी संस्था आहेत, तेव्हा निश्‍चितच या ठिकाणी जिहाद व लढण्या मारण्याचे शिक्षण दिले जात असेल. येथपर्यंत की एन.डी.ए. सत्तारूढ असताना, त्यातल्या जबाबदार मंत्र्यांनीही अशी वक्तव्ये केली होती. यास्तव उचित माहिती आणि सखोल  अभ्यासानंतरच आपला दृष्टिकोन प्रकट केला पाहिजे.
    इस्लाम आपल्या आरंभ काळापासूनच भारतात प्रविष्ट झाला होता. काही लोकांची अशी धारणा आहे की, इस्लाम धर्म, पैगंबर (सल्ल.) यांच्या जीवनकाळातच केरळ मार्गे उत्तर भारतात आला. उत्तर आणि दक्षिणेकडच्या शेकडो लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि अशा प्रकारे सुरूवातीपासूनच इथे धर्मज्ञान शिकविण्याची आणि धर्मज्ञानी (उलेमा) तयार करण्यासाठी मदरशांची गरज भासली, यासाठी की त्यांनी इतरांना शिकवावे आणि नमाज पठण करण्यात व इतर धार्मिक कर्तव्य पार पाडण्यात लोकांना मदत करावी.
    मदरश्याशी अभिप्रेत ते स्थान होय जिथे अध्ययन आणि अध्यापनाचे कार्य चालते. ’मदरसा’ -शाळा, विद्यालय, स्कूल इत्यादी शब्दांचा समानार्थी शब्द आहे. शाळा व विद्यालये प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षणस्तरापर्यंत असतात. परंतु, ’मदरसा’शी अभिप्रेत प्राथमिक शिक्षणापासून विश्‍वविद्यालयीन स्तरापर्यंत शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था होय. इस्लामी देशांमध्ये उच्च शिक्षणाच्या केंद्रांनाही मदरसा म्हटले जाते. कोलकत्ता येथे एक मदरसा ’मदरसा-ए-आलिया’ अर्थात उच्च शिक्षण-विद्यालय आहे. ज्याला आता प.बंगाल सरकारने विश्‍वविद्यालयाचा दर्जा बहाल केला आहे, ही माहिती नमूद करण्यायोग्य आहे की हे मदरसे इतर संप्रदायांच्या विद्यार्थ्यांकरिताही खुले आहेत. राजा राम मोहन राय यांनी मदरसा आलिया येथे शिक्षण घेतले होते आणि ते फारसी व अरबीचे त्याच प्रकारे विद्वान होते, ज्या प्रकारे ते संस्कृत व हिंदू धर्माचे विद्वान होते. अनेक बाबतीत हे मदरसे धार्मिक आणि भौतिक अशा दोन्ही गरजा भागवित आणि हे ऐहिक व धार्मिक दोन्ही प्रकारच्या जीवनाकरिता आवश्यक होते. आज सुमारे 20,000 मदरसे दरवर्षी 1.5 दशलक्ष विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. सच्चर कमेटीच्या रिपोर्ट (इ.स.2006) नुसार सुमारे 4 टक्के मुस्लिम मुले मदरशात जातात. ही बाब महत्वपूर्ण होय की आजदेखील मदरसा, गरीब, ग्रामीण आणि काही मर्यादेपर्यंत शहरी मुसलमानांकरतिा मोठी महत्वपूर्ण संस्था आहे. भारतात मुसलमानांची एक मोठी संख्या गरीब आणि अशिक्षित आहे. हे गरीब मुसलमान इच्छा असूनही आपल्या मुलांना धर्मनिरपेक्ष शिक्षणंसंस्थांमध्ये पाठविण्याची क्षमता राखत नाहीत.
    याव्यतिरिक्त त्यांच्या काही धार्मिक गरजा असतात आणि मदरसे केवळ धार्मिक गरजाच भागवित नाहीत, तर ते विनामूल्य शिक्षण, भोजन आणि निवासाची सुविधा विद्यार्थ्यांना प्रदान करतात आणि याहून विशेष हे अशा ठिकाणी प्रस्थापित असतात, जे मुलांकरिता सुविधाजनक असतात. सर्वच मदरसे सारखेच असतात असे आम्ही गृहित धरू नये. त्यांना वेगवेगळ्या वर्गात विभागून पाहण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, प्राथमिक स्वरूपाच्या मदरशांमध्येे, ज्यांना ’मक्तब’ म्हटले जाते. केवळ प्राथमिक स्वरूपाचे धार्मिक शिक्षणच दिले जाते, त्यानंतर माध्यमिक दर्जाचे मदरसे येतात, (उर्वरित आतील पान 7 वर)
ज्यात अरबी भाषा, कुरआन, कुरआनचे भाष्य व अनुवाद आणि हदीस वगैरे शिकविले जातात. यानंतर उच्च श्रेणीचे मदरसे येतात. ज्यांची तुलना पदवी किंवा पदव्युत्तर स्तराच्या शिक्षणाशी केली जाऊ शकते. महाविद्यालयाच्या आरंभासोबतच जामिया किंवा विश्‍वविद्यालयांचा विकास झाला. जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ मोरक्कोच्या फेज नगरमध्ये असलेले कराविईन आहे. ज्याची स्थापना इ.स.859 मध्य झाली होती. मग त्यानंतर लवकरच इजिप्तची राजधानी काहिरा (कैरो)मध्ये अल् अजहर विश्‍वविद्यालयाची स्थापना इ.सन. 970 मध्ये झाली.
विद्यापीठाचे विद्यार्थी धार्मिक ज्ञानाव्यतिरिक्त तर्कशास्त्र, अध्यात्म, तत्वज्ञान, गणित, पदार्थ विज्ञान, खगोल शास्त्र, भाषणशैली आणि औजार निर्मितीचे शिक्षण प्राप्त करीत असत.
    मदरशांच्या आधुनिकीकरणाची एक चळवळ चालत आहे आणि अनेक मदरशांनी आपल्या आधुनिकीकरणाचे काम सुरू केले आहे. शासकीय संस्था एन.सी.ई.आर.टी. (राष्ट्रीय शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) ने एक अध्ययन करविले. ज्यावरून हा निष्कर्ष निघाला की अनेक राज्यांच्या, प्रामुख्याने केरळ आणि प. बंगालच्या मदरशांमध्ये शिक्षण सामुग्रीत समतोल निर्माण करण्याची प्रक्रिया जारी आहे. या अध्ययनपूर्ण पाहणीत मदरशाच्या पाठ्यक्रमात कोणतेही राष्ट्रविरोधी तत्व आढळून आले नाही. मुसलमानांद्वारे मदरसा शिक्षणाला अधिक महत्त्व देण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.     1. मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये आधुनिक शाळा- विद्यालयांची कमतरता. 2. वेगळ्या मुलींच्या शाळांची कमी आणि सहशिक्षण असणार्‍या शाळांमध्ये महिला शिक्षिकांची कमतरता. 3. आधुनिक शिक्षणाचे खूप महाग असणे आणि सरकारी शाळांची गुणवत्ता खालच्या दर्जाची असणे. 4. सरकारी शाळांमध्ये अध्ययन- अध्यापनाची वाईट स्थिती. 5. सनातनी मुसलमानांची तक्रार ही आहे की शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू भेदभाव अस्तित्वात आहे.
मदरसा आणि मक्तब
अधिकांश मुस्लिम मुले मदरशांमध्ये जातात या गैरसमाजाचे एक कारण हे आहे की लोक ’मदरसा’आणि ’मक्तब’ यातला फरक जाणत नाहीत. वास्तविक ’मदरसा’ नियमित शिक्षण देणारी संस्था असते, तर ’मक्तब’ मोहल्ल्याच्या मस्जिदशी संलग्न असलेली पाठशाळा असते जी इतर शाळा शिकणार्‍या मुलांना धार्मिक शिक्षण देते. अशा प्रकारे मक्तब औपचारिकरित्या, संस्थांमध्ये शिकणार्‍या मुलांना धार्मिक शिक्षण देतात. अशा प्रकारे मक्तब मोठ्या मदरशांना पूरक ठरतात.
    
- सय्यद हामीद मोहसीन.

नागपूर (डॉ. एम.के. रशीद)
निसर्गाचे रक्षण करणे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. निसर्गातील प्रमुख घटक वृक्ष असून, त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. निसर्गसंवर्धनाचे तत्व प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी 1430 वर्षापूर्वी सांगितले आहे. त्यांनी  प्रत्येक व्यक्तीस वृक्ष लावण्याचा उपदेश केला असून, त्याच्या संवर्धनाचे सुत्रही सांगितल्याचा सूर सिरतुन्नबी जलसा कार्यक्रमात निघाला.
    जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या वतीने जाफर नगर, टीचर्स कॉलनीच्या मस्जिद मर्कज़ी इस्लामी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष डॉ. सबीहा खान होत्या. मंचावर प्रमुख पाहूणे अस्फीया इरफान, अफरोज अंजुम, इरफाना कुलसूम, अजरा परवीन यांची उपस्थिती होती.
    यावेळी डॉ. सबीहा खान म्हणाल्या, ग्लोबल वार्मिंग आणि देशातील पर्यावरण प्रदूषण समस्यांचे निदान पैगंबर हजरत मोहम्मद (सल्ल.) यांच्या  शिकवणीमध्ये मिळते. प्रेषित (सल्ल.) यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. तसेच छायादार आणि फळदार झाडांना कापणे आणि त्यांच्या खाली प्रात:विधी करण्यास मनाई केली आहे. तसेच युद्ध काळात शेती आणि त्यातील पिकं नष्ट करण्यास सक्त मनाई केली आहे. प्रेषित सल्ल. यांनी सांगितले कि, जर तुमच्या जवळ एखादे छोटे झाड असेल किंवा खजूराचे बीज असेल त्याला जमीनीमध्ये लावा. येथपावेतो की, या काळात भूकंपाचे झटके जरी येत असले तरी वृक्षारोपणाचे काम सोडू नका. त्यांनी निसर्गसंवर्धानाची सांगितलेली ही निकड आजच्या काळात तंतोतंत लागू होते. आज जगावर ग्लोबल वॉर्मिंगचे वादळ घोंगावत असून, त्याला थोपवायचे असेल तर वृक्ष लावणे आणि त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे शहराध्यक्षा  डॉ. सबिहा खान यांनी सांगितले.त्यांनी शिक्षणावर विचार व्यक्त करताना उमूमुल मोमीनीन हजरत आयशा ऱिज. यांच्या शैक्षणिक कार्याचे दाखले दिले. ओपन डिस्कशनमध्ये इरफ़ाना कुलसुम म्हणाल्या, आम्हाला सीरत (पैगंबर हज़रत मोहम्मद स.अ.व. यांचे जीवन चरित्र) चांगल्या प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे.  आम्ही पाहतो कि आजची युवा पीढ़ी सीरतच्या माहिती पासून पुष्कळ दूर आहे. सीरतच्या शिक्षणासाठी असे जलसे घेणे आवश्यक आहे. 
    अज़रा परवीन म्हणाल्या की, सीरतवर जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे.  प्रेषित सल्ल. यांच्या जीवनचरित्राचा विविधांगी अभ्यास करून त्यावर अनुकरण केले तर निश्‍चित आमच्यात अमुलाग्र बदल होवून आमची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. प्रारंभी सिरतुन्नबी विषयावर प्रश्‍नावली तयार करून परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नफीसा कौसर प्रथम आली. द्वितीय तहूरा अंबर आणि तृतीय क्रमांक इफ्फत अहमद यांनी पटकाविला. विजेत्यांना ट्रॉफी आणि पुस्तके पारितोषिकाच्या स्वरूपात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.  अफरोज अंजुम यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रतियोगितामध्ये भाग घेणार्‍या सर्वांना प्रमाणपत्र आणि प्रशंसा पत्र देण्यात आले. स्थानीय अध्यक्षा जेबा खान यांनी आभार व्यक्त केले. इरफाना कुलसुम यांनी पवित्र कुरआन पठन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अफरा खान यांनी नात पठण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सबाहत फ़िरदौस यांनी केले. मोठ्या संख्येने मुली, स्त्रीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा जपणार्‍या आमच्या भारत देशात शांती आणि प्रेमाचा संदेश देउन सुव्यवस्थित, शिस्तबद्ध जीवन जगता यावे यासाठी भेदभावांच्या ज्वालाला थंड करून समस्त मानवाला सद्व्यवहार व सद्वर्तनाची शिकवण द्यायची आहे. प्रत्येकजण सुखी जीवनाच्या मागे आहे. एक आदर्श जीवन प्रणाली, सफलता आणि मुक्तीचा मार्ग, सत्कर्माचा अंगीकार करावा, दुष्कर्मापासून स्वत:ला, दूर ठेवावे. कारण, विश्‍वाचा स्वामी एक जो सर्वांवर लक्ष ठेवून असतो तोच एकमेव सर्वोच्च महान आहे. तोच विश्‍वाचा संसार चालवितो. इस्लामचा मूळ सिद्धांतच स्वस्थ समाज निर्माण करणे, वाईटाचे उच्चाटन करणे आहे पण आज मानव जीवनाचा उद्देशच विसरत चालला आहे, का बरे?
    मानवी समाजात स्वातंत्र्य व समानतेच्या विकासासाठी इस्लामचे योगदान विश्‍वव्यापी आहे. त्यात स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचा जागतिक संदेश आहे. संबंध मानव जातीचा एका नात्याशी संबंध जुळलेला आहे. समस्त ब्रह्मांडाचा चराचर सृष्टीचा निर्माता अल्लाह, ईश्‍वर एकमेव आहे.
    आज मानव अनेक समस्यांनी जखडलेला आहे मग ती समस्या वैयक्तिक असो, कौटुंबिक असो, सामाजिक किंवा राजकीय असो . वर्णद्वेषामुळे माणूस माणसात वैरी बनत चालला आहे. त्या भेदभावांना मूठमाती देऊन सामाजिक ऐक्य टिकवायचे आहे.
    अखिल मानवजातीला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याची शिकवण देणारे गरीबांचे कैवारी, उपदेशाचा सागर, महान तत्वज्ञ, न्यायप्रिय, मानवाच्या कल्पणातच जीवनाचे ध्येय मानणारे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) समस्त मानवजातीला अंधारातून प्रकाशाकडे आणून, सामाजिक परिवर्तनातून उभारलेली आदर्श पैगंबरी व्यवस्थेने ’स्त्रीला’ खूप मानाचे स्थान देऊन स्त्रियांना त्यांचा नैसर्गिक दर्जा बहाल केला. सर्वप्रथम पुरूष व स्त्री मध्ये समानता असावी असा उद्घोष केला. स्त्रियांना अधिकार देऊन स्त्री-पुरूष समानता दिली. स्त्री गुलामगिरी विरूद्ध आवाज उठवला. समाजात त्यांना आदर सन्मान प्रदान केला.
    स्त्रियांचे मुक्तीदाता पैगंबर मुहम्मद (सल्ल.) म्हणतात, ”जो कोणी सत्कृत्ये करील, मग तो पुरूष असो की स्त्री, शिष्टाचारांच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे, महिलांच्या बाबत शिष्टविचार बाळगतो तोच तुमच्यात सर्वोत्तम आहे.”
    पुढे म्हणतात, ” महिलांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा, तुमचा महिलांवर आणि महिलांचा तुमच्यावर अधिकार आहे.”
    ” ज्या माणसाला मुलांद्वारे आजमावले जाईल (म्हणजे ज्याला मुली होतील) आणि त्याने त्यांच्या बरोबर चांगली वागणूक ठेवून, त्यांचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करील, तर त्या मुली त्याला नरकाच्या अग्नीपासून वाचविणार्‍या ढाली बनतील.” स्त्री पुरूष समानतेचा दावा असताना, स्त्री ला सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार असताना सुद्धा स्त्रीला फुलण्याआधीच खुडून टाकले जात आहे. समाजाचा मूलाधार स्त्री तिलाच जन्मापूर्वी संपविणे घोर अपराध, घृणास्पद बाब, स्त्री जन्म नाकारला जाणे निर्दयी, गंभीर समस्या आहे. भारतीय स्त्री सुशिक्षित होते आहे पण सुरक्षित का नाही? स्वातंत्र्याच्या नावावर पाश्‍चिमात्याचे काळे ढग तिच्यावर वावरत आहेत.
    मुलगी म्हणजे स्वर्ग प्राप्तीचे साधन पवित्र ईशग्रंथ कुरआनात म्हटले आहे.
    ” आणि आपल्या संततीला दारिद्रयाच्या भीतीने ठार मारू नका. आम्ही तुम्हाला देखील उपजीविका देतो व त्यांना देखील देतो” (कुरआन अध्याय-6, आयात 151)
प्रेषित सल्ल. म्हणतात, ” मुलींचा तिरस्कार करू नका त्या तर दु:खभंजक आणि अत्यंत मौल्यवान आहेत. ”
    ”हे सारे जग म्हणजे संपत्ती आणि जगातील सर्वोत्कृष्ट संपत्ती म्हणजे सुशील पत्नी”
    ” हे विश्‍व जीवन व्यतीत करण्याचे साधन आहे आणि त्याचे सर्वात उत्तम साधन सदाचारी पत्नी आहे. तिच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा तिचा द्वेष करू नका. चांगली वर्तणूक ठेवा.
    इस्लामने स्त्रियांचे संवैधानिक अधिकार देखील सुरक्षित केले आहेत आणि नैतिक स्वरूपात सुद्धा तिला उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे स्थान प्रदान केले आहे. मुलीच्या शिक्षणावर विशेषभर दिला आहे. प्रेषित सल्ल. यांचा आदेश आहे, ” तुमच्यापैकी उत्कृष्ट तो आहे जो आपल्या मुलां-बाळाच्या आणि पत्नीच्यासाठी उत्कृष्ट आहे. स्त्रीयांसाठी प्रेषित सल्ल. यांनी संदेश दिला आहे, ” तुम्ही जे खाल ते त्यांना खावयास द्या, जे कपडे परिधान कराल त्याच प्रकारचे कपडे त्यांना द्या त्यांना वाईट वागणूक देऊ नका आणि अपशब्द वापरू नका”
    पैगंबर सल्ल. विधवा, घटस्फोटित मुलींची काळजी घेण्यास सांगतात. विधवा मुलींचा विवाह करून नैतिकदृष्ट्या तिला अत्यंत सन्मान व आदराचे स्थान देण्यास सांगितले आहे. प्रेषित सल्ल. यांनी विधवेशी विवाह करण्याचे समर्थन केले व त्यात पुण्यकर्म म्हटले आहे.
    आईला उच्चस्थान दिले. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. महिलांचे उद्धारक प्रेषित मुहम्मद सल्ल. महिलांना वारसा हक्कात सह्योगी करण्याचे व वारसा संपत्तीत तिचा वाटा देण्याचे अधिकार स्त्रियांना आहेत. मुलींशी सद्व्यवहाराचे हे ते शिक्षण आहे याची उदाहरणे इतर कोठेही पाहावयास मिळत नाहीत.
    समस्त जगाचे नेते प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी समस्त मानवजातीला मार्गदर्शन केले. विशिष्ट काळापुरता मर्यादित नाही तर जगाचे अस्तित्व असे पर्यंत जगवासियांसाठी संदेश दिला.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पत्नी माननीय आयेशा रजि. यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा आचरणांचा आदर्श दिव्य कुरआन होते. म्हणजेच दिव्य कुरआनात ज्या, उच्चतम नैतिकतेचा आदर्श मांडण्यात आला आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. नेमक्या त्याच आदर्शाचा नमुना होते.
    स्त्रियांना पुरूषांच्या पेहरावाप्रमाणे पोशाख परिधान करण्यास सक्त विरोध केला आहे. स्त्रियांनी पातळ कपडे परिधान करू नये. परदा करण्याची आज्ञा दिली. वयात आलेल्या मुलीने/स्त्रीने पडदा केला पाहिजे. स्त्रीने आपल्या शरीराचे सर्व भाग चांगल्या प्रकारे झाकले जातील अशी चादर अंगावर घेणे आवश्यक आहे. यामुळे स्त्री शीलाचे व तिच्या सभ्यतेचे अत्यंत चांगल्या प्रकारे संरक्षण होते आणि दुराचाराला आळा बसतो. स्त्रीला सुरक्षित जीवन जगण्यासाठी आणि स्त्रीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणुकीची गरज आहे.
    प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांच्या जीवनातील अंतिम हजच्या प्रसंगी दिलेल्या भाषणात मजूर आणि स्त्रियांच्या अधिकाराबाबत सविस्तर चर्चा करताना म्हटले, ” नीट लक्षपूर्वक ऐका ! तुमच्यावर स्त्रियांचे अधिकार हे आहेत की, तुम्ही त्यांच्याशी उत्तम व्यवहार करावा, त्यांना चांगले व योग्य अन्न व उत्तम पोशाख द्यावा. ” स्त्रियांचे रक्षण आणि त्यांच्याशी उत्तम व्यवहार करण्याची ताकीद दिली आहे.
    इस्लामने स्त्रीला अन्याय व अत्याचाराच्या जाळ्यातून बाहेर काढले, तिला न्याय दिला, मानवी अधिकार दिले, प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्रदान केले, समाजात तिला मान, सन्मान दिला.
    माणसाने माणसांशी कसे वागावे हे स्पष्ट केले. ईशग्रंथात सत्याला सोडून असत्याच्या मागे धावणे म्हणजे मृगजळाच्या मागे धावणेच.
    मृत्यूची वास्तविकता कोणी नाकारू शकत नाही. पारलौकिक जीवनात यश मिळविण्यासाठी ऐहिक जीवनात काय-काय करावे लागेल याचा विचार आम्हा सर्वांना करावा लागेल. परलोकातील यश खरे यश होईल. सत्कर्माचा अंगीकार करावा लागेल.
    एक दिवस असा येणार आहे की, सूर्य, चंद्र लोप पावतील, ग्रह, तारे एकमेकांवर आदळतील व हे संपूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल.
    सदाचारी माणसाला त्याच्या सत्कर्माची व दुराचारी माणसाला त्यांच्या कुकर्माची फळे मिळणे आवश्यक आहे. जगात आमचे राहणे एखाद्या पाहुण्यासारखे आहे आणि शेवटी एक दिवस जग सोडून प्रत्येकालाच जगाचा निरोप घ्यायचा आहे. इहलोकात व परलोकात यश संपादन करणे हाच जीवनाचा उद्देश.
    आज स्त्रीयांच्या अनेक ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी स्त्रीला सुरक्षित जीवन जगण्यासाठी आणि स्त्रीचा दर्जा उंचावण्यासाठी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणुकीची नित्तांत गरज आहे. अल्लाह आम्हा सर्व भगिनींचे रक्षण कर. आमीन.

- डॉ. आयेशा पठाण, नांदेड
9665366489

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget