Halloween Costume ideas 2015
Latest Post

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो मनुष्य ज्याला अल्लाहने मोठे आयुष्य प्रदान केले, इतकेच काय तो ६० वर्षांच्या वयापर्यंत पोहोचला (आणि तरीही तो सदाचारी बनू शकला नाही) तेव्हा अल्लाहपाशी त्या मनुष्याकडे काही बोलायला बाकी उरणार नाही.’’ (हदीस : बुखारी)
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले, ‘‘अल्लाहपासून पूर्णत: लज्जित व्हा.’’ आम्ही विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अल्लाहची कृपा आहे की आम्ही अल्लाहपासून लज्जित होतो.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहशी लज्जित होण्याचा अर्थ एवढाच नसून अल्लाहपासून पूर्णत: लज्जित होण्याचा अर्थ आहे की तू आपले मष्तिष्क आणि मष्तिष्कात येणाऱ्या विचारांवर देखरेख ठेवावी आणि पोटात जाणाऱ्या अन्नाची देखरेख करीत राहावे आणि मृत्यूच्या परिणामस्वरूप सडण्याची व नष्ट होण्याची आठवण ठेवावी.’’ (त्यानंतर पैगंबर म्हणाले,) ‘‘आणि जो मनुष्य परलोकाला पसंत करणारा असेल तो जगातील सजावट व शृंगार सोडून देतो आणि प्रत्येक क्षणी परलोकाला जगाऐवजी प्राधान्य देतो, तोच मनुष्य खऱ्या अर्थाने अल्लाहपासून लज्जित होतो.’’ (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! मला अत्यल्प व परिपूर्ण उपदेश करावा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जेव्हा तुम्ही आपली नमाज अदा करण्यासाठी उभे राहाल तेव्हा त्या मनुष्यासारखी नमाज अदा करा जो जग सोडून जाणार आहे आणि आपल्या तोंडाने असे शब्द बोला जर अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याचा हिशोब घेण्यात आला तर तुमच्यापाशी काही सांगण्यास उरणार नाही आणि लोकांजवळ जी काही संपत्ती व मालमत्ता आहे त्यापासून तुम्ही पूर्णत: बेपर्वा राहा.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जो मनुष्य या जगातून जात असेल आणि तो जीवंत राहू शकणार नाही याची त्याला खात्री पटली असेल तो मनुष्य अतिशय नम्रपणे नमाज अदा करील. त्याचे लक्ष पूर्णत: अल्लाहकडे असेल आणि नमाज अदा करताना जगाच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये त्याचे मन भटकत राहणार नाही.
मनुष्याचे बोलणे जर सत्याविरूद्ध असेल आणि मनुष्याने आपल्या या जगातील जीवनात त्याबद्दल क्षमा मागितली नाही तर हिशोबाच्या वेळी त्याच्याजवळ काही बोलण्यास आणि विवशता सादर करण्यास काहीही उरणार नाही हे उघड आहे. शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की लोकांची धनसंपत्तीच्या आधिक्क्यावर ईष्र्या करू नका कारण ती संपुष्टात येणार आहे. जोपर्यंत जगाबद्दल मनुष्यामध्ये निस्पृहता निर्माण होत नाही तोपर्यंत परलोकाच्या शिखरांपर्यंत त्याची दृष्टी जाऊ शकत नाही.
माननीय अबू बऱजा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी मनुष्याकडून जोपर्यंत पाच गोष्टीचा हिशोब घेतला जात नाही तोपर्यंत तो अल्लाहच्या न्यायालयातून बाहेर पडू शकणार नाही. त्याला विचारले जाईल की आयुष्य कोणत्या गोष्टींमध्ये व्यतीत केले? ‘दीन’चे ज्ञान प्राप्त केले असेल तर त्याचे किती प्रमाणात अनुसरण केले? धन कोठून कमविले? आणि कोठे खर्च केले? शरीराला कोणत्या कामात झिजविले? (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या प्रवाशाला आपण वाटेतच राहू आणि निश्चितस्थळी वेळेवर पोहोचू शकणार नाही याचे भय वाटत असेल, तो रात्री न झोपता रात्रीच्या सुरूवातीलाच आपला प्रवास सुरू करतो. असे करणारा निश्चितस्थळी वेळेवर सुखरूप पोहोचतो. ऐका! अल्लाहची संपत्ती मोठ्या प्रमाणात लाभेल. ऐका! अल्लाहचा माल नंदनवन (जन्नत) आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : आपल्या मूळ हकीगतीच्या दृष्टिकोनातून मानव प्रवासी आहे आणि परलोक त्याची खरी मातृभूमी आहे, येथे तो कमाई करण्यासाठी आला आहे. आता ज्यांना आपली खरी मातृभूमी आठवते, ते जर सुखरूपपणे आपल्या मातृभूमीस पोहोचू इच्छित असतील आणि मार्गातील अडथळे पार करून पोहोचले तर त्यांनी बेपर्वा न राहता आपला प्रवास सुरू करावा अन्यथा जर ते झोपत राहिले तर त्यांना पश्चात्ताप होईल. मग ज्याने अल्लाहची प्रसन्नता व बक्षिसाचे घर ‘जन्नत’ प्राप्त करण्याचे निश्चित केले असेल तर त्याला ज्ञात असावे की तो व्यापाऱ्याने फेकून दिलेला माल जो क्षुल्लक किमतीला विकला असावा आणि एखाद्याने तो घ्यावा. अल्लाहचा माल प्राप्त करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागेल. तो माल प्राप्त करण्यासाठी आपल्या काळ व मालाचे, शरीर व प्राणाचे बलिदान द्यावे लागेल. तेव्हाच ती गोष्ट प्राप्त होईल जी मिळाल्यामुळे मनुष्य आपला सर्व प्रकारचा त्रास विसरून जाईल.

(२०) आता हे पैगंबर (स.)! हे लोक जर तुमच्याशी भांडण करतील तर त्यांना सांगा, ‘‘मी आणि माझ्या अनुयायांनी तर अल्लाहसमोर मान तुकविली आहे.’’ मग ग्रंथधारक व बिगर ग्रंथधारी दोघांना विचारा, ‘‘काय तुम्हीही त्याची आज्ञाधारकता व दास्यत्व स्वीकारले?’’१८ जर त्यांनी स्वीकारले तर त्यांना सरळमार्ग प्राप्त झाला. जर त्यापासून पराङ्मुख झाले तर, तुमच्यावर फक्त संदेश पोहचविण्याची जबाबदारी होती. पुढे तर अल्लाह स्वत:च आपल्या सर्व दासांचे व्यवहार पाहणारा आहे. 
(२१) जे लोक अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचना मान्य करण्यास नकार देतात आणि त्याच्या पैगंबरांना हकनाक ठार करतात आणि अशा लोकांच्या जीवावर उठतात जे मानवमात्रापैकी न्यायनीती व रास्तपणाचा आदेश देण्याकरिता पुढे येतात, त्यांना दु:खदायक शिक्षेची शुभवार्ता ऐकवा.१९/
(२२) हेच ते लोक होत ज्यांची कर्मे इहलोकात व परलोकात, दोहोंमध्ये वाया गेली२० आणि त्यांचा साहाय्यक कोणी नाही.२१
(२३) तुम्ही पाहिले नाही की, ज्या लोकांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग मिळाला आहे, त्यांची अवस्था काय आहे? जेव्हा त्यांना अल्लाहच्या ग्रंथाकडे बोलाविले जाते, याकरिता की त्याने त्यांच्या दरम्यान निर्णय द्यावा,२२ तेव्हा त्यांच्यापैकी एक गट त्याला बगल देतो व त्या निर्णयाकडे येण्यापासून विमुख होतो.
(२४) त्यांची ही वर्तणूक या कारणास्तव आहे की, ते म्हणतात नरकाग्नी तर आम्हाला स्पर्शदेखील करणार नाही. आणि नरकाची शिक्षा मिळालीच, तर फक्त काही दिवस.२३ त्यांच्या मनघडत श्रद्धांनी त्यांना त्यांच्या धर्माच्या बाबतीत भयंकर चुकीच्या समजुतीत गुंतविले आहे.
(२५) मग काय ओढवेल त्यांच्यावर, जेव्हा आम्ही त्यांना त्या दिवशी एकत्र करू, ज्या दिवसाचे आगमन निश्चित आहे? त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला तिच्या कमाईचा बदला पुरेपूर दिला जाईल व कोणावरही अत्याचार होणार नाही.


१८) दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास ``मी आणि माझे अनुयायांनी तर अल्लाहसमोर मान तुकविली आहे.'' म्हणजे इस्लामला मान्य केले आहे जो अल्लाहचा मूळ धर्म ईशप्रदत्त आहे. आता तुम्ही दाखवून द्या की तुम्ही आपल्या स्वत:च्या आणि पूर्वजांच्या मनगढंत विचारसरणी आणि आस्थांवर चालण्याऐवजी या सत्य आणि मूळ जीवनप्रणाली (इस्लाम) कडे येणार आहात का?
१९) ही व्यंगपूर्ण वर्णनशैली आहे. ते आज आपल्या कर्मावर अतिप्रसन्न आहेत आणि समजून आहेत की स्वत: फार चांगले काम करत आहेत. त्यांना दाखवा की तुमच्या कर्माचे हे फलित आहे.
२०) म्हणजे त्यांनी आपले प्रयत्न आणि सामथ्र्य अशा मार्गात खर्च केले ज्याचे फळ याजगात आणि पारलौकिक दोन्ही जीवनात वाईटच आहे.
२१) म्हणजेच कोणतीच शक्ती अशी नाही जी यांच्या चुकीच्या आणि वाईट प्रयत्नांना सफल बनवू शकेल. किंवा कमीतकमी वाईट परिणामांपासून त्यांना वाचवू शकेल. ज्या ज्या शक्तींवर हे लोक विश्वास व श्रद्धा ठेवतात की ते सर्व या जगात आणि परलोकात अथवा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मदतीला येतील, खरे त्यांच्यापैकी कोणीच यांची मदत करू शकणार नाही.
२२) म्हणजे त्यांना सांगितले जात आहे की अल्लाहच्या ग्रंथाला अंतिम प्रमाण मान्य करा. त्याच्या निर्णयापुढे नतमस्तक व्हा. जे काही त्यानुसार सत्य आहे ते सत्य माना आणि त्यानुसार जे असत्य आहे त्यास असत्य माना. स्पष्ट आहे की येथे अल्लाहचे ग्रंथ म्हणजे तौरात आणि इंजिल आहेत. `ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग प्राप्त् करणारे' म्हणजे खिश्चन आणि यहुदी धार्मिक विद्वान लोक आहेत.
२३) म्हणजे हे लोक स्वत:ला अल्लाहचे प्रिय लोक (प्रियजन) समजतात. ते या भ्रमात आहेत की आम्ही काहीही केले व कसेही वागलो तरी स्वर्ग आमच्याचसाठी आहे. आम्ही ईमानवंत आहोत, अमक्याचे वंशज, अमक्याला मानणारे आणि आमक्याचे मुरीद (भक्त) आहोत. अमक्या अमक्याचे आश्रित आम्ही असल्यामुळे नरकाची काय हिंमत की आम्हाला स्पर्श करून दाखवावा. मान्य केले की नरकात टाकले जावू तरी अगदी थोड्या दिवसांसाठी तिथे ठेवले जाऊ जेणेकरून पापांच्या घाणीपासून स्वच्छ होऊन सरळ स्वर्गात जाऊ. या प्रकारच्या विचारसरणीमुळे ते अगदी उद्दाम आणि निडर बनले होते. परिणामत: ते लोक मोठमोठे अपराध सहज करीत आणि अत्यंत हीन पाप करीत होते. उघडपणे सत्याला सार्वजनिकरीत्या फेटाळीत असत. अल्लाहचे भय काडीमात्रसुद्धा त्यांच्या मनात नव्हते.

माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी तुला अगोदर कब्रस्तानात येण्यापासून रोखले  होते (जेणेकरून एकेश्वरत्वाची धर्मनिष्ठा पूर्णत: हृदयात सामावली जावी.) आता तू दृढत्वाचा अवलंब कर.’’ मुस्लिमच्या दुसऱ्या हदीसमध्ये म्हटले आहे, ‘‘आता तू हवे तर जा कारण कबरी पारलौकिक जीवनाच्या स्मृती जागृत करतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, जे लोक कब्रस्तानात जातात त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘तेथे पोहोचून  म्हणा की ‘अस्सलामु अलैकुम...’ (अर्थात) तुम्हाला शांतता लाभो, हे वस्तीतील ईशपरायण आज्ञाधारकांनो! आम्हीदेखील अल्लाहने  इच्छिले तर तुम्हाला भेटणार आहोत, आम्ही स्वत:साठी आणि तुमच्यासाठी अल्लाहच्या शिक्षा व क्रोधापासून वाचण्याची प्रार्थना  करीत आहोत.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा त्यांना यमनचे न्यायाधीश अथवा गव्हर्नर  बनवून पाठविले तेव्हा म्हणाले, ‘‘हे मुआ़ज! स्वत:ला विलासीपणापासून अलिप्त ठेवा कारण अल्लाहचे दास विलासी नसतात.’’  (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : तुम्ही एका मोठ्या पदावर जात आहात. तेथे जीवनाच्या स्वादापासून लाभ घेण्याची आणि हात साफ करण्याची खूप  संधी मिळू शकते. परंतु तुम्ही जगाच्या प्रेमात अडकू नका आणि जगाला पसंत करणाऱ्या शासकांसारखा स्वत:चा स्वभाव  बनवू नका कारण तो अल्लाहच्या दासत्वाशी मेळ खात नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना सांगितले, ‘‘माझ्या  जनसमुदायावर ती वेळ येणार आहे जेव्हा दुसरे जनसमुदाय त्याच्यावर अशाप्रकारे तुटून पडतील जसे खाणारे लोक वाढलेल्या  अन्नावर तुटून पडतात.’’ मग एका विचारणाऱ्याने म्हटले, ‘‘ज्या कालखंडाचे आपण वक्तव्य करीत आहात त्या काळात आम्ही  मुस्लिम लोक इतक्या कमी संख्येत असू की आम्हाला गिळंकृत करण्यासाठी इतर जनसमुदाय एकत्रितपणे तुटून पडतील?’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘नाही, त्या काळात तुमची संख्या कमी असणार नाही तर तुमची संख्या मोठी असेल, परंतु तुम्ही महापुरातील लाटेसारखे  व्हाल आणि तुमच्या शत्रूंच्या उरातील तुमची भीती नष्ट होईल आणि तुमच्या हृदयात भित्रेपणा घर करील.’’ मग एका मनुष्याने  विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हा भित्रेपणा कोणत्या कारणामुळे येईल?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याचे कारण असे असेल की तुम्ही (परलोकावर प्रेम करण्याऐवजी) जगावर प्रेम करू लागाल आणि (अल्लाहच्या मार्गात प्राण देण्याच्या इच्छेऐवजी) मृत्यूपासून पळ  काढू आणि द्वेष करू लागाल.’’ (हदीस : अबू दाऊद) 
माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगावर प्रेम करणारा मनुष्य आपले  पारलौकिक जीवन उद्ध्वस्त करील आणि पारलौकिक जीवनावर प्रेम करणारा मनुष्य या जगातील आपल्या जीवनाचे नुकसान करून  घेईल. हे लोकहो! तुम्ही मागे उरणाऱ्या जीवनाला नष्ट होणाऱ्या जीवनावर प्राधान्य द्या.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : हे जग आणि परलोक यापैकी एकाची निवड करणे आवश्यक आहे. एकतर जगाला आपले ध्येय बनवा अथवा  परलोकाला. जर जगाला आपला आपले ध्येय निश्चित करीत असाल तर पारलौकिक सुख व खुशी लाभणार नाही आणि परलोकाला 
आपले ध्येय बनविले तर त्याच्या परिणामस्वरूप कदाचित तुमचे जग नष्ट होऊ शकते, परंतु त्याच्या बदल्यात पारलौकिक बक्षीस  मिळेल जे निरंतर राहणारे आहे. जी गोष्ट परलोकाच्या मार्गावर चालण्याने नष्ट होईल ती समाप्त होणारी आहे आणि जीवनदेखील  नष्ट होणारे आहे. या नष्ट होणाऱ्या गोष्टीचे बलिदान देण्याने जर निरंतर राहणारे बक्षीस मिळाले तर हा तोट्याचा सौदा नाही,  पुरेपूर नफ्याचा सौदा आहे. माननीय शद्दाद बिन औस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘खरा  विद्वान तो आहे ज्याने आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवले आणि मृत्यूनंतर येणारे जीवन अलंकृत करू लागला. मूर्ख तो आहे ज्याने  स्वत:ला वासनेच्या अवैध इच्छांच्या मागे लावले आणि अल्लाहकडून चुकीची अपेक्षा बाळगली.’’ (हदीस : तिर्मिजी) 
स्पष्टीकरण : म्हणजे सत्याला सोडून आपल्या मनाचे म्हणणे ऐकतो आणि अपेक्षा करतो की अल्लाह त्याला नंदनवनात  (जन्नतमध्ये) स्थान देईल. अशाप्रकारच्या चुकीच्या आकांक्षांमध्ये कुरआन अवतरणकाळातील ज्यू आणि खिस्ती पडलेले होते आणि  आज आमचे अनेक मुस्लिम बंधुदेखील अशाच चुकीच्या आकांक्षांवर जीवन व्यतीत करीत आहेत. 

-शाहजहान मगदुम
देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात  बेरोजगारीने अगदी कळस गाठला आहे. साधारणत: १०० शिपाईपदासाठी दोन लाखांहून अधिक अर्ज येतात. त्यात डॉक्टर्स, इंजिनीयर्स  यासारखे उच्चशिक्षितांचाही समावेश असल्याचे पाहता बेरोजगारीची दाहकता किती भयानक आहे याची प्रचिती येते. गेल्या  लोकसभा  निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन दिले होते, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभा निवडणुकीपूर्वी २० लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचे दिवास्वप्न तरुणांना दाखविले होते. मात्र सत्ता हाती येऊन चार  वर्षे पूर्ण होता आली तरी या आश्वासनाची कसलीच पूर्तता झाल्याचे दिसून येत नाही आणि बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण  भटकत आहे. दुसरीकडे अकुशल व अल्पशिक्षित युवकांना रोजगारासाठी आटापिटा करावा लागत आहे. हे बेरोजगारीचे भीषण वास्तव आहे. गेल्या ५०-६० वर्षांत शिक्षणानुसार रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळेल अशी व्यवस्थाच निर्माण झाली नाही. सुशिक्षित  तरुणांच्या तुलनेत रोजगारनिर्मिती हा तर आपल्याकडे न सुटणाराच प्रश्न आहे. देशात दरमहा दहा लाख तरुण नोकरीच्या रांगेत उभे  असतात. त्या तुलनेत रोजगारनिर्मितीचा दर मात्र वर्षाला २० लाख असा आहे. रोजगाराची गरज आणि निर्मिती यात एवढी प्रचंड दरी वाढताना दिसत आहे. लेबर ब्यूरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे मोदी सरकारच्या मोठमोठ्या आश्वासनांचे पितळ उघडे  पाडले आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता स्पष्ट केली आहे. विकास दरात भारत जगात साठाव्या  स्थानावर असताना ‘भारत हा जगातील सर्वाधिक बेरोजगार असलेला देश’ असा बहुमान प्राप्त झाला आहे. या आकडेवारीनुसार  देशातील रोजगारांमध्ये एकसारखी घट होत आहे तर स्वयंरोजगारांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक-आर्थिक असमानतेत एकसारखी वाढ होत आहे. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेला जगातील सर्वांत वेगवान असल्याचे म्हटले जात आहे. देशातील श्रीमंत व  गरिबांमधील दरी वाढत आहे. एकूण लोकसंख्येचा एकतृतियांश भाग आजही दारिद्र्यरेषेखालील जीवन व्यतीत करीत आहे. सन  २०१७ च्या उपासमारीच्या निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर घसरला आहे (२०१६ मध्ये आपण ९७व्या स्थानावर होतो).  बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आणि अनेक आप्रिâकन देशदेखील या बाबतीत भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. ‘वाढती दरी :  भारत असमानतेचा अहवाल २०१८’ या ‘ऑक्सफेम’च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर फक्त एक टक्का लोकांच्या हातात  जगातील एकूण संपत्तीपैकी ५० टक्के संपत्ती आहे तर भारतात एक टक्का लोकांच्या हातात देशातील ५८ टक्के संपत्ती आहे (काही  अहवालांनुसार यापेक्षाही अधिक आकडेवारी उपलब्ध होते.) आणि केवळ ५७ अब्जाधीशांकडे देशातील ७० टक्के लोकसंख्येच्या एकूण  संपत्तीएवढी मालमत्ता आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जगातील दुसरा सर्वांत मोठा देश असलेल्या भारतातील ६५ टक्के  लोकसंख्येचे सरासरी वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. कोणत्याही देशासाठी एवढी मोठी तरुण लोकसंख्या फार मोठी शक्ती असते. परंतु  भारतातील या लोकसंख्येचा फार मोठा भाग बेरोजगार आहे. आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या आकडेवारीनुसार देशातील  रोजगारांपासून वंचित तरुणांची संख्या फार मोठी असल्यामुळे समाजात असंतोष वाढत आहे. मागील काही वर्षांपासून स्किल इंडिया,  मेक इन इंडिया, पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना, पंतप्रधान कौशल विकास योजना  यासारख्या वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या. परंतु या योजनांचे कार्यालय व प्रचारयंत्रणा पाहणाऱ्या लोकांना रोजगार  देण्याव्यतिरिक्त देशात बेरोजगारीवर मात करण्याच्या दिशेने कसलीही प्रगती झालेली नाही. अधिकांश योजना फक्त निवडणुकीतील  घोषणांप्रमाणे कसल्याही पूर्वतयारीशिवाय सुरू करण्यात आल्या आहेत. उद्योगांच्या गरजा आणि तरुणांना देण्यात येणारे शिक्षणाच्या दरम्यान कसलाही ताळमेळ आढळून येत नाही. हे प्रशिक्षण इतके कनिष्ठ पातळीचे आहे की त्याद्वारे कसलाही  रोजगार मिळू शकत नाही. ज्या उद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध होत होते त्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. ‘लाइव मिंट’  या वृत्तपत्रानुसार या वंâपन्यांची निर्यातीची स्थिती फक्त बिकटच नसून श्रमकेंद्रित औद्योगिक उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात  घट झाली आहे. इतकेच नव्हे तर श्रमकेंद्रित उत्पादकांच्या आयातीत वाढ होत आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीची स्थिती आणखीनच  वाईट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर ही स्थिती आणखीन खालावली आहे.  त्याअगोदर नोटाबंदीच्या काळात अनेक कामागारांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. निरव मोदी आणि मेहुल चौकसी यासारख्या महारथींच्या कर्तुत्वानंतर श्रमकेंद्रित उद्योगांना बँकांमधून कर्ज मिळणे बंद होण्याची शक्यता आहे, याचा वाईट परिणाम  रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. 

 (मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@gmail.com)

- एम.आय. शेख
9764000737
खष्त-ए-अव्वल चूं रेवद मेअमार-ए-कज
ता सुरैय्या मी रवद दीवार-ए-कज
वर उल्लेखित फारसी भाषेतील या ओळींचा अर्थ असा आहे की, समजा एखाद्या गवंड्याने बांधकाम करतांना पहिलीच वीट जर का वाकडी लावली तर मग त्याने त्यावर ता-सुरैय्या म्हणजे तारांगणा पर्यंत जरी उंच भिंत बांधली, तरी ती वाकडीच जाणार. बलात्काराच्या बाबतीत आपल्या देशात ही म्हण तंतोतंत लागू पडते. ती कशी यावर या आठवड्यात चर्चा करूया. 
जागतिक पातळीवरील सर्व व्यवस्थांमध्ये स्त्रीचे समाजातील स्थान निश्चित करतानाच वीट वाकडी लागलेली आहे. आपल्या देशातही जेव्हा स्त्रीला तिच्या परंपरागत भूमिकेतून काढून पाश्चिमात्यांनी प्रदान केलेल्या भूमिकेत ठेवण्याचा जेव्हा निर्णय घेतला गेला तेव्हापासूनच देशात व्याभिचार आणि बलात्कार दोन्ही वाढलेले आहेत. व्याभिचार आणि बलात्कार दोघांना वेगवेगळे करून विचार करण्याची जी पद्धत आधुनिक लोकशाहीमध्ये रूढ झालेली आहे. तीच मुदलात चुकीची आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज देशात अल्पवयीन मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक लोक बलात्कार सारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अडकतांना दिसत आहेत. या लिंगपिसाटांच्या तावडीतून सहा महिन्याच्या मुलीपासून ते स्वत:ला जन्म दिलेल्या आईपर्यंतच्या महिला सुद्धा सुटलेल्या नाहीत. 
बलात्काराचे बिजारोपन अगदी बाल्याअवस्थेतच मुलांमध्ये होते. सहशिक्षणातून मुलं-मुली नको तितक्या जवळ येतात. नोट्सच्या देवाणघेवाणीपासून सुरू झालेली ओळख वार्षिक स्नेहसंमेलातून भिकार चित्रपट गीतांच्या  तालावर केल्या जाणाऱ्या तथाकथित ’परफॉर्मन्स’ पर्यंत येता-येता त्यांच्यामध्ये परस्परांविषयी नको तेवढी जवळीक झालेली असते. पुण्यातील यशदामध्ये मागे महाराष्ट्राच्या निवडक मुख्याध्यापकांचे एक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या दरम्यान, अनेक मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिकांनी तक्रार केली होती की, त्यांच्या शाळेतील आठव्या, नववी वर्गातील मुलं-मुली मोबाईल फोनवर अश्लिल क्लिप्स पाहतात. 
पूर्वी योग्य वयात लग्न होत होती. आता उच्च शिक्षण आणि करिअरच्या नावाखाली लग्नाचे वय 30 ते 35 वर्षांपर्यंत पुढे ढकलले गेले आहे. त्यात उच्च शिक्षणाच्या सोयी शहरांमध्ये जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील तरूण-तरूणी शहराकडे वळतात. तेथे त्यांना निरंकुश स्वातंत्र्य मिळते. निरंकुश स्वातंत्र्याचा दुरूपयोग करण्याकडे बहुतेक माणसांचा कल असतो. त्यातूनच महाविद्यालय व विद्यापीठे हे स्वैराचाराच्या केंद्रस्थानी आल्याचे जरा डोळसपणे पाहिल्यास लक्षात येते. मग यातून प्रेम, ब्रेकअप, तणाव, चिडचिड, राग, द्वेष, मत्सर, वैफल्यासारखे मनोविकार वाढिस लागतात. एकतर्फी प्रेमातून मुलींवर ऍसिड अटॅक, ब्लेड अटॅक आणि खुनासारखे प्रकार वाढतात. 
तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी
ही प्रवृत्ती वाढीस लागते. अगदी अलिकडेच औरंगाबादसारख्या सभ्य शहरात, अजय तिडके व संकेत कुलकर्णी नावाच्या दोन तरूण विद्यार्थ्यांच्या हत्या एकाच मुलीवर दोघांनी प्रेम केल्यावरून करण्यात आल्या. झाड जसे मुळापासून दूर झाले तर सुकून जाते तसेच तरूण मुलं-मुली परिवारापासून दूर झाले की (अपवाद खेरीज करून) स्वैराचारी बनत जातात. याच प्रक्रियेतून काही तरूण बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त होतात. आश्चर्य तर या गोष्टीचे आहे की, जवळ-जवळ प्रत्येक शहरात वेश्या उपलब्ध आहेत. तसेच संमत्तीने संबंध करण्यासाठी हॉटेल/ लॉजेस उपलब्ध आहेत तर ही परिस्थिती आहे. कल्पना करा वेश्या व्यवसाय आणि व्याभिचारावर बंदी असती तर आपल्या देशातील महिलांची काय अवस्था झाली असती? 
महिलांना पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित करून व पुन्हा-पुन्हा आई होणे किती मागासलेपणाचे व अन्यायकारक आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवून पाश्चात्य पुरूषांनी महिलांना प्रगतीच्या नावावर अनावश्यकरित्या घराबाहेर काढलेले आहे. तसेच त्यांची निकड कार्पोरेट कंपन्यांमध्ये, मालिका, सिनेमा, संगीत, नृत्य, फॅशन, पॉर्न, लष्कर, उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये किती गरजेची आहे हे त्यांना पटवून देण्यात पाश्चिमात्य पुरूषप्रधान व्यवस्थेला यश आलेले आहे. त्यातूनच मग जागतिक स्तरावर अनेक अनुत्पादक उद्योगांमध्ये महिलांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्यात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. जगातील सर्व महिला फक्त गृहिणी बनून राहिल्या तर या सर्व गुंतवणुकीचे काय होणार? या विचाराणेच अशा उद्योगपतींच्या पोटात भितीचा गोळा उत्पन्न होतो व आपली गुंतवणूक बुडू नये म्हणून ते महिलांना सातत्याने गृहिणी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून मुक्त बाजारपेठेत आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. 
याच भितीतून ते इस्लामसारख्या नीति अधिष्ठीत धर्माची बदनामी करतात. इस्लाममध्ये महिलांना कसे डांबून ठेवले जाते, याचे कपोलकल्पीत किस्से जनतेच्या मनावर बिंबविले जातात. कारण की त्यांना माहित आहे की, इस्लामच त्यांच्या या ढोंगीपणाचा पर्दाफाश करू शकतो. इस्लाममध्ये महिलेचे कार्यक्षेत्र मुख्यत्वेकरून घरापर्यंत सीमित केलेले आहे. इस्लामच्या मते गृहिणी हीच तिची प्रमुख भूमिका आहे. देशासाठी उत्कृष्ट संस्कारी नागरिक घडविणे ही तिची प्रमुख जबाबदारी आहे व ही जबाबदारी सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. एकाग्र चित्ताने ही जबाबदारी पार पडण्यासाठी तिला अर्थप्राप्तीच्या संकटातून मुक्त करून घरातील सुरक्षित वातावरण प्रदान करण्यात आलेले आहे. असे असतांनाही प्रत्येक काळामध्ये समाजातील काही महिलांना काम करणे गरजेचे असते. त्याची व्यवस्था त्यांच्या स्त्रीत्त्वाच्या आदर राखला जाईल अशा पद्धतीने करण्याचे निर्देष इस्लाम शासनाला देतो.
बलात्कार होण्याच्या मोठ्या कारणांपैकी एक कारण पॉर्न (अश्लिल चित्रफिती) आहे. इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर पॉर्न साईट्स सर्च करण्यासाठी केला जातो. इंटरनेटरची सर्वाधिक कमाई ही याच वेबसाईटच्या माध्यमातून होते. लाखो स्त्री-पुरूष या व्यवसायात गुंतलेले आहेत. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक यात केलेली आहे. कोट्यावधी लोक नियमितपणे ह्या क्लिप्स पाहतात. भूकेनंतर सर्वाधिक प्रबळ गरज ही लैंगिक गरज असते. याची कल्पना या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आहे. म्हणून तर याचा प्रचार जास्तीत जास्त व्हावा यासाठी सर्वजन प्रयत्नशील आहेत, असा माझा दावा आहे. यास पुरावा असा की, प्रत्येक वस्तू महाग होत असतांना, ” डेटा” कसा काय स्वस्त होत आहे? याचे उत्तर अश्लिलता सार्वजनिक करणे हे आहे. 
जेव्हा कोणतीही वस्तू आपल्याला मोफत मिळते तेव्हा त्याचा अर्थ विकणारे लोक आपली खरेदी करीत असतात एवढे निश्चित. मोफत/स्वस्त डेटाच्या मोबदल्यात जनतेचा बहुमुल्य वेळ व नैतिकतेची खरेदी या कंपन्या करीत आहेत. मोबाईल फोनच्या स्क्रीनवर एक क्लिक करण्याचा उशीर, अश्लिल चित्रफितींची गटार तात्काळ वहायला लागते व त्यात भले-भले लोक वाहून जातात. मग ते सरकारी कार्यालयात काम करणारे असोत, कार्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे असोत, महिला असोत, पुरूष असोत किंवा कोणतेही क्षेत्र असो. विधानसभेमध्ये सुद्धा पॉर्न पाहिल्या गेल्याचा इतिहास ताजा आहे. काही लोक तर स्मार्ट फोनचा उपयोग फक्त अश्लिल क्लिप्स पाहण्यासाठी करतात, बाकी ऑप्शनन्स त्यांना वापरताच येत नाहीत. अशा क्लिप्स सतत पाहिल्याने त्याचे त्यांना व्यसन जडते. माणूस ज्या गोष्टीत रमतो त्याची मानसिकता त्याच गोष्टीसारखी होत जाते. पॉर्न ऍडिक्ट व्यक्तिंची मानसिकता विकृत व्हायला वेळ लागत नाही. अशा लोकांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोण पार बदलून जातो. पॉर्नमधील महिला जशा लैंगिक संबंधासाठी सहज तयार होतात तशा समाजातील महिलाही तयार होतील, असा त्यांच्यापैकी काहींचा समज होवून जातो. यातूनसुद्धा बलात्कार होतात. घर विस्कटून जाते, समाज नासून जातो, स्त्रीया आणि मुली असुरक्षित होऊन जातात, पुरूषांकडून विकृत लैंगिक संबंधांची मागणी वाढते, नैतिकदृष्ट्या समाज दिवाळखोर होवून जातो, इतका की जवळच्या रक्ताच्या नात्याच्या संबंधानांही बऱ्याच वेळेस काळीमा फासली जाते. गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रात पंधरा हजारहून अधिक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडले. (संदर्भ : लोकसत्ता 28 एप्रिल 2018 पान क्र. 1) महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी हे भूषणावह नाही. आश्चर्य म्हणजे यापैकी बहुतेक अपराध करणारे लोक ओळखीचे/जवळचे होते. 
इंदौरचे एक वकील कमलेश वासवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पॉर्न साईटवर बंधी घालावी म्हणून एक जनहित याचिका दाखल केली होती. मात्र केंद्र सरकारने शपथपत्र देवून सर्वोच्च न्यायालयाला सदरच्या वेबसाईटवर बंदी घालण्यास आपण असमर्थ असल्याचे कळविले आहे. यावरून या व्यवसायातील लोकांच्या ताकदीचा अंदाज येतो. सतत पॉर्न पाहिल्यामुळे भावनात्मक विकृती येते. विशेषकरून मुलांच्या मनोविज्ञानावर याचा अतिशय वाईट परिणाम होतो. 
एकंदरित या वातावरणातूनच लोक अनेकवेळा बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त होतात. यात खरे तर पुरूष सुद्धा पीडित आहेत. कारण की, बलात्कार करणारे सर्वसाधारण लोक असतात. ते काही व्यावसायिक अपराधी नसतात. मालिका, चित्रपट, पॉर्न सातत्याने पाहून त्यातून आलेल्या उत्तेजनेला आवर न घालता आल्यामुळे असे लोक बलात्कार करून, एक तर फाशीला जात आहेत किंवा जन्मठेप भोगत आहेत. 2012 साली निर्भयाची घटना झाल्यानंतर 2013 मध्ये या संदर्भात कायद्यात सुधारणा करून बलात्काऱ्यांना फाशीची तरतूद करण्यात आलेली आहे. 
कठुआच्या घटनेनंतर राज ठाकरेंनी परत शरई कायद्यासारख्या कठोर कायद्याची मागणी केलेली आहे. देशभर प्रदर्शन झालेले आहे. शेकडो टन कागद या विषयावर लिहून व शेकडो तास या विषयावर चर्चा करून वाहिन्यांनी खर्ची घातलेली आहेत. अनेकांनी डिपीचा रंग काळा केला, मात्र पंधरा दिवसांनी सर्वकाही सुरळीत झाले. डीप्या पुन्हा बहरल्या, भंपक शायरी आणि एकमेकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा कृत्रीम वर्षाव समाजमाध्यमांवर पुन्हा सुरू झाला. 
जगातील प्रत्येक व्यवस्था लोकांना कायद्यात पकडते मात्र इस्लाम नैतिकतेत पकडतो. म्हणून अनैतिक गोष्टींसाठी प्रवृत्त करणाऱ्या तसेच पती आणि पत्नी यांच्यातील नात्याला कमकुवत करणाऱ्या प्रत्येक लहान-सहान गोष्टी उदा. संगीत, दारू, नाच, गाणे, अश्लिल मालिका, चित्रपट, स्त्री-पुरूषांचा संयुक्त वावर, सहशिक्षा या सर्व गोष्टी तो प्रतिबंधित करतो. परद्याची व्यवस्था लागू करतो. एवढेच नव्हे तर पाच वेळेसच्या नमाज व वर्षाला 30 दिवसांच्या रोजाच्या माध्यमातून घरा-घरात व समाजात पवित्र वातावरण तयार करतो. अशा वातावरणात बलात्कार तर दूर विनयभंगाचा सुद्धा विचार नागरिकांच्या मनामध्ये उत्पन्न होणार नाही, याची अगोदर पक्की व्यवस्था करतो. एवढी प्रतिबंधक उपाययोजना करूनही एखादा दुराचारी जेव्हा बलात्कार करतो तेव्हा त्याचे ते कृत्य ज्या महिलेच्या विरूद्ध झाले असे गृहित न धरता त्या कृत्याला व्यवस्थेविरूद्ध बंड मानतो आणि मग मात्र त्याच्या चुकीला माफी नाही. त्याला भर चौकात असा मृत्यू दंड देण्यात येतो की, पाहणाऱ्यांच्या जीवाचा थरकाप उडावा. आपल्याकडे अशी कुठलीही प्रतिबंधक उपाययोजना न करता फक्त फाशीची मागणी केली जाते, जी की, बलात्काऱ्यांना कधीही रोखू शकत नाही. 
आपल्याकडे बलात्कार/ व्याभिचाऱ्याकडे नेणाऱ्या सर्व गोष्टी नुसत्या खुल्याच नाहीत तर त्यांना सरकारी संरक्षणसुद्धा प्राप्त आहे. एकीकडे वाम मार्गाची दारे सताड उघडी ठेवायची, लोकांना वाम मार्गाकडे जाण्यासाठी पोषक असे वातावरण तयार करायचे व पुन्हा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची की त्यांनी बलात्कार करू नये, ही अशक्य बाब आहे. सरकारने अगोदर या सर्व वाईट गोष्टींवर प्रतिबंध लावावा मग फाशीची तरतूद करावी. केवळ फाशी दिल्याने बलात्कार थांबणार नाहीत त्यासाठी व्यवस्था बदलावी लागेल. 
सरकारवर नमूद बाबी बंद करणार नाही, कारण तेच तर सरकारच्या प्रमुख उत्पादनाचे स्त्रोत आहेत. म्हणून आपल्या व्यवस्थेमध्ये बलात्कार होत राहतील व लोक फाशीवर जात राहतील हे असेच सुरू राहणार आहे. आशेची एकमेव किरण शऊरी मुस्लिम आहेत. मात्र मुस्लिमांमधील हा गट फार छोटा आहे. दुर्देवाने काही मुस्लिमसुद्धा वाम मार्गाला लागलेले आहेत. याचा पुरावा रमजानमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांची कमी होते व रमजाननंतर ती पूर्ववत होते हा गुगलच्या मागच्याच वर्षाचा अहवाल आहे. दर्शकांमधील हा उतार-चढाव कोणाचा आहे, हे सुजान वाचकांना समजून सांगण्याची गरज नाही. 
ज्याप्रमाणे काट्यांमध्ये राहून सुद्धा गुलाब फुलतो त्याच प्रमाणे वाईट वातावरणात राहूनसुद्धा शरिया आधारित जीवन जगून नैतिकतेचे गुलाब फुलविता येते. हे प्रत्यक्षात दाखवून देण्याचे मोठे आवाहन प्रत्येक सुजान हिंदू-मुस्लिम नागरिकांवर आहे. विशेषत: ही जबाबदारी कुरआनने मुस्लिमांवर टाकलेली आहे. आता कोणीही प्रेषित येणार नाहीत. समाजाच्या सुधारणेचे काम आपल्यालाच करावे लागणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तरूणांनी एस.आय.ओ. तर स्त्री-पुरूषांनी जमाअते इस्लामीच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून तणावरहित स्वच्छ व नैतिक जीवन जगण्याचा मूलमंत्र प्राप्त करावा. स्वत:ला व आपल्या पुढच्या पीढिला बलात्कारासारख्या कलंकापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की आपल्या सर्वांना सद्बुद्धी मिळो. आमीन.

परभणी (शोधन सेवा) - सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्मान चाँदसाब शेख यांना 1 मे 2018 रोजी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह प्रदान करण्यात आले. उस्मान शेख हे सध्या परभणी येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून सेवारत आहेत. ते 2005 च्या बॅच क्रमांक 96 चे पोलीस उपनिरिक्षक असून, प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना गडचिरोली येथे पहिली नेमणूक मिळाली. तेथे त्यांनी सव्वा तीन वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. दरम्यान, अनेक नक्षलविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला. त्यांच्या धैर्याची आणि कार्याची दखल घेऊन त्यांना खडतर सेवा पदक आणि आंतरिक सेवा सुरक्षा पदक अशा दोन पदकांनी शासनाने त्यांचा गौरव केला. उस्मान शेख यांचे प्रथमिक शिक्षण जि.प. हायस्कूल व गणपतराव मोरे हायस्कूल कंधार येथून झाले. त्यांनी शिवाजी कॉलेज कंधार येथून बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी प्राप्त केली. गडचिरोली व्यतिरिक्त त्यांनी अकलूज, सोलापूर तालुका पोलीस ठाणे तसेच परभणी येथील बोरी आणि जिंतूर, तसेच लातूर येथील भादा आणि कासारशिरसी येथे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून उत्कृष्ट से काम केलेले आहे. एक अभ्यासू, सभ्य, कुशल संधटक आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ते परिचित आहेत.

- अबरार मोहसीन 
शहराध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद, लातूर

वेळेचे व्यवस्थापन म्हणजे जीवनाचे व्यवस्थापन. ज्याला हे जमले तो यशस्वी आणि ज्याला हे जमले नाही तो अयशस्वी! प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी अनेकवेळेस मार्गदर्शन केलेले आहे. 
प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टींपूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा. (तिर्मिजी)
या पाचही निर्देशांमध्ये वेळेचे महत्व अधोरेखित केलेले आहे. साधारणपणे तारूण्य हे मनोरंजनासारख्या निरूपयोगी गोष्टींमध्ये तरूण वाया घालवतात. वास्तविकपणे तारूण्यामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचा उपयोग वेळेवर केल्यास अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात. ज्या की, प्रयत्न करूनही वृद्ध झाल्यानंतर करता येत नाहीत. व्यस्त होण्यापूर्वी जो रिकामा वेळ माणसाकडे असतो त्या वेळेच्या एकेका क्षणाचा उपयोग करण्याकडे माणसाचा कल असायला हवा. याची जाणीव ज्यांना असते तेच मोठमोठे कार्य करू शकतात. ज्यांना याची जाणीव नसते ते लोक आयुष्यात फार काही करू शकत नाहीत. 
एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले आहे की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे -1.जीवन कुठे व्यतीत केले? 2. तारूण्य कुठे खर्चि घातले? 3. संपत्ती कोठून मिळविली? 4. संपत्ती कोठे खर्च केली? 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला? 
यात पहिले दोन प्रश्न वेळेच्या व्यवस्थापनासंबंधीचेच आहेत. जीवन कुठे व्यतीत केले? त्यातही तारूण कुठे खर्ची घातले? हे दोन प्रश्न असे आहेत की, वेळेचे कुशल व्यवस्थापन करू शकणाऱ्या इसमालाच या प्रश्नाची नीट उत्तरे देता येतील. अन्यथा या प्रश्नाची उत्तरे देणेच शक्य नाही. खरे तर ही हदीस आय ओपनिंग (डोळे उघडणारी) हदीस आहे. या हदीसला नीट समजून घेतल्यानंतर कोणताही सश्रद्ध मुस्लिम वेळेचा अपव्यय करण्याचे धाडस करणार नाही. 
प्रेषित सल्ल. यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श आहे. त्यांचे प्रेषित्वाच्या आधीचे जीवन असो का प्रेषित्व मिळाल्यानंतरचे जीवन असो. दोन्हीमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना मिळालेल्या वेळेच्या एकेका क्षणाचा सदुपयोग केलेला आहे. म्हणूनच कमी अवधीमध्ये इस्लामची सत्यता ते लाखो लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यामध्ये यशस्वी झाले.
आजच्या आधुनिक जगामध्ये वेळेला प्रोडक्टीव्ह (उत्पादक) करण्याकडे सर्वांचा कल असतो. मुस्लिमांनी तर जगातच नव्हे तर मृत्यूनंतरचे जीवन सुद्धा सुखमय व्हावे, याचा विचार करायला हवा. त्यांच्या लेखी तर वेळेचे दुहेरी महत्व आहे. म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेचे उत्पादक मुल्य कसे वाढविता येईल, याकडे लक्ष देण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक मुस्लिमावर आहे. 
अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर पाच वेळेसची नमाज त्या-त्या नमाजच्या वेळेच्या बंधनात अदा करण्याची सक्ती केलेली आहे. जरा डोळसपणे पाहिल्यास, आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी नमाजच्या माध्यमातून उत्कृष्ट असे वेळेचे व्यवस्थापन करण्याची संधी अल्लाहने आपल्याला दिलेली आहे. रमजानच्या रोजांची अनिवार्यता सहर आणि इफ्तारीच्या वेळेसह प्रत्येक मुस्लिमांवर अनिवार्य करण्यात आलेली आहे. यातूनसुद्धा आपल्याला वेळेचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येईल. अनेक मुस्लिम स्वत:ला स्वतंत्र समजतात. कुठलेही वेळेचे बंधन पाळणे त्यांना जमत नाही. मनात आले तर नमाज अदा करतात, नाही आले तर करत नाहीत. मात्र त्यांना कळत नाही की, आखिरतच्या दिवशी प्रत्येक व्यक्तिला त्याला प्रदान करण्यात आलेल्या वेळेचा कसा उपयोग केला, याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. त्यातून कोणालाच सूट नाही. म्हणून आपल्याला वेळेचे महत्व ओळखायला हवे. 
सैतान माणसांच्या पाठिमागे लागलेला आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या मनावर ताबा मिळवून त्याला अल्लाहच्या निर्देशाविरूद्ध चालण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. जो व्यक्ती सैतानाच्या कचाट्यात सापडून अनुशासनहीन जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो, हे आपण सर्व जाणून आहोत. माणसांनी वेळेवर दिलेले काम पूर्ण केले तर त्याच्यावर तणाव येत नाही. नमाजी माणसाला वेळेत दिलेले काम पूर्ण करण्याची सवय जडते. त्याच्यामुळे त्याचे जीवन तणावविरहित होते. 
आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा दिलेले काम (टार्गेट) वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. नमाजचेच उदाहरण घ्या. अजान झाल्याबरोबर माणूस जर नमाजच्या तयारीला लागला तर वेळेवर नमाज अदा करू शकतो. तेच अजान झाल्यावरसुद्धा तो इकडे-तिकडे रमत राहिला आणि शेवटच्या दोन मिनिटात नमाज अदा करण्याचा प्रयत्न करू लागला तर ती अदा करण्यासाठी त्याला किती धावपळ करावी लागते व त्यातून कसा स्ट्रेस निर्माण होतो, याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना आलेलाच असावा. वेळेत काम करण्याची सवय नसेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे माणसाचे आरोग्यसुद्धा प्रभावित होते. 
रिकाम्या वेळाची कुठलीच संकल्पना इस्लाममध्ये नाही. उदा. फन (एन्जॉयमेंट), रिकामटेकडेपणा याला इस्लाममध्ये थारा नाही. सुरे अलमनशराहमध्ये प्रेषित सल्ल. यांना निर्देश देण्यात आले आहे की, ’फ-इजा फरगता-फअनसब व-इला रब्बिका फऱगब’ (जेव्हा तुमच्याकडे फारीग म्हणजे मोकळा वेळ असेल तेव्हा अल्लाहच्या इबादतीमध्ये व्यस्त होवून जा.) प्रेषित सल्ल. यांना जेव्हा एवढी सक्त ताकीद देण्यात आली तेव्हा आपली काय बिशात? म्हणून फावल्या वेळी फालताड मालिका, क्रिकेट वगैरे पाहण्याचा व वेळ वाया घालवण्याचा एक श्रद्धावंत मुस्लिम विचार सुद्धा करू शकत नाही. माणसाकडे जस-जसे नवीन उपकरण येत आहेत तसा-तसा तो अधिक व्यस्त होत आहे. म्हणून प्रत्येक श्रद्धावंत माणसाला आपल्या वेळेची समिक्षा करावी लागेल. त्याला विचार करावा लागेल की आपला वेळ कुठे जास्त चाललाय? झोपेत जास्त चाललाये? की टी.व्ही. पाहण्यामध्ये जास्त चाललाय? की सोशल मीडियावर जास्त चाललाय? 
एखाद्या माणसाचे पंचाहत्तर वर्षे आयुष्य गृहित धरले आणि तो सरासरी दररोज सात तास झोपत असेल असे गृहित धरले तर 22 वर्षे नुसती झोपण्यात जातात. जर कोणी सात तासापेक्षा जास्त झोपेत असेल तर त्याचे दोन नुकसान आहेत. एक तर त्या अतिरिक्त झोपेचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूसरा बहुमुल्य वेळ झोपण्यामध्ये जातो. कामाचे दहा तास जरी गृहित धरले तर तो 32 वर्षे सतत काम करत राहतो. तयार होण्यासाठी रोज 45 मिनिट जरी गृहित धरली तरी यात सव्वा दोन वर्षे निघून जातात. दैनंदिन जेवण वगैरे करण्यासाठी दीड तास गृहित धरला तरी तो साडे चार वर्षे व परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर 75 वर्षात तीन वर्षे तो वेळ खर्ची घालतो. मित्र परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर त्यातही तीन वर्षे निघून जातात. 
याशिवाय, उरलेला अन डिफाईन्ड जो वेळ असतो तो साधारणत: रोज तीन ते चार तास असतो. तर ह्या मोकळ्या वेळेचे योग्य नियोजन केले व त्याला उत्पादक मुल्य कसे मिळवून देता येईल याचा विचार केला तर वेळेचे व्यवस्थापन केले असे म्हणता येईल. जर हे व्यवस्थापन करता आले नाही तर त्या वेळेचा सदुपयोग करता येणार नाही व त्या काळात माणसाची उत्पादकता कमी होईल, हाच वेळ वाचवून जर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला तर तो माणूस समाजासाठी हिताचा होवून जाईल, त्याच्या हातून मोठ-मोठी चांगली कामे होतील. 
अल्लाहने आपल्यावर फर्ज (अनिवार्य)  काय-काय केले आहे, याला केंद्रस्थानी ठेवून आपण वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. याउलट आपण पाहतो की, अनेक लोक आपल्या इतर कामांना केंद्रस्थानी ठेवून वेळ मिळाल्यास फर्ज गोष्टींकडे लक्ष देत असतात. हेच ते लोक आहेत ज्यांना अल्लाहच्या आदेशांची व वेळेच्या व्यवस्थापनाची पर्वा नाही. 
वेळेच्या बाबतीत चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट वेळ वाया घालविणे. दूसरी वेळ खर्ची घालणे, तीसरी वेळ वाचविणे, चौथी वेळेची गुंतवणूक करणे. वेळ वाया घालविण्याचे सगळयात मोठे मार्ग टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहेत. आज अनेक व्यक्ति रिमोट हातात घेवून सारखे चैनल बदलत असतात. त्यांना कोणत्याच चॅनलवर समाधान मिळत नाही. अनेक लोक मोबाईल फोनवर अनावश्यक सामुग्री खात्री न करता इकडची तिकडे पाठवित असतात. त्यांची बोटं सारखी स्क्रीनवर चालत असतात. त्यांनाही कोणत्याच समाज माध्यमांवर समाधान मिळत नाही. अशा लोकांचा वेळ वाया जातो, मोठी कामे तर सोडा कधी-कधी स्वत:च्या घरगुती गरजांसुद्धा पूर्ण करण्यासाठी अशी माणसे कमी पडतात. 
दूसरी गोष्ट वेळ खर्ची घालणे, म्हणजे प्रत्येक माणसाला दरदिवशी चोवीस तास मिळत असतात. ते तास प्रत्येक माणूस कसा खर्ची घालतो, यावर प्रत्येक माणसाचे भविष्य अवलंबून असते. कोणतीही गोष्ट खर्च केल्याने संपून जाते. वेळ अमूल्य आहे. त्याला खर्च करतांना कोणत्या कारणासाठी आपण खर्च करीत आहोत, याची जाणीव जोपर्यंत प्रत्येकाला होणार नाही, तोपर्यंत रूपया जसा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो तसाच वेळ सुद्धा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो. वेळेला भांडवल समजून त्याची जर गुंतवणूक केली तर भविष्यात त्या गुंतवणुकीचा चांगला परतावा आपल्याला मिळू शकतो. याची जाणीव प्रत्येक श्रद्धावंत मुस्लिमांने ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर कोणी कुरआन समजून वाचण्यात वेळ खर्च करीत असेल तर नक्कीच त्याचा परतावा त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या रूपाने मिळेल. या उलट जर कोणी आपला वेळ हॉटेलमध्ये बेकारच्या गप्पा मारण्यात खर्च करत असेल तर त्याचा परतावा त्याला नकारात्मक रूपात मिळेल. रूपयांच्या गुंतवणुकीतून कधी-कधी नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, वेळेच्या गुंतवणुकीतून कधीच नुकसान होत नाही. 
शेवटची गोष्ट म्हणजे वेळ कसा वाचविता येईल, याचाही विचार करणे. म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे होय. याचे उदाहरण असे की, समजा आपल्याला कोणाला भेटणे आवश्यक आहे, तर अगोदर दूरध्वनी करून त्यांची वेळ मागून घेणे व नंतर वेळेवर त्यांना जाऊन भेटणे म्हणजे वेळ वाचविणे. या उलट भेटीची वेळ न मागता, ते आहेत का नाहीत याचीसुद्धा  खात्री न करता गेल्यास इच्छित व्यक्ति हजर नसल्यास अगर इतर कामात व्यस्त असल्यास आपला जो वेळ वाट पाहण्यात जातो तो व्यर्थ जातो. तसेच रात्री तासन्तास गप्पा मारण्यात काही लोकांना मोठा आनंद होतो. वास्तविक पाहता इशाच्या नमाजनंतर अत्यावश्यक असल्याशिवाय जागरण करण्याची परवानगी नाही. दहाच्या आसपास झोपल्यास फजरच्या नमाजला बरोबर जाग येते. परंतु, आपण पाहतो की अनेक लोक विनाकारण रात्री उशिरापर्यंत जागत असतात. विज्ञानाने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की, लवकर झोपणारे आणि लवकर उठणारे लोकच स्वस्थ असतात. आजकाल रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. रात्रीतून जागरण केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. सुरूवातीच्या काही तासाची झोप शरिरासाठी अत्यंत पोषक असते. प्रेषित सल्ल. लवकर झोपून तिसऱ्या प्रहरी उठत होते.  
अनेक लोक आपल्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये तासनतास रमतात. आपण कसे होतो आणि कसे झालो. याचा विचार करीत राहतात. त्यात किती वेळ खर्ची जातो याचा त्यांना अंदाजच येत नाही. म्हणून आपण भूतकाळात जास्त रमू नये याची जाणीव निर्माण होणे व त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापनच होय.
शेवटी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी जीवनामध्ये शिस्त असणे आवश्यक आहे. अनावश्यक सुस्ती आणि निष्काळजीपणामुळे माणसाचा वेळ वाया जातो. याशिवाय, वेळेचे व्यवस्थापन करण्यामध्ये योजनेचे फार महत्त्व आहे. कोणत्याही कामाची अगोदर योजना तयार करून नंतर ते काम करणे गरजेचे असते. कुठलीही योजना नसतांना काम सुरू केल्यास वेळ अनावश्यकरित्या खर्ची होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येक माणसाने भौतिक तसेच आखिरतचे जीवन सफल व्हावे,  असे वाटत असेल तर त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget