Halloween Costume ideas 2015
Latest Post

CAB
नागरिकता संशोधन विधेयकाने भारताच्या मूळ विचारधारेलाच छेद दिला आहे. देशाची ’गंगा-जमनी संस्कृती’ तर या बिलामुळे धुळीस मिळालीच. शिवाय, सहिष्णू भारतीयांच्या प्रतिमेला व धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या घटनेला धूळीस मिळविण्याचे कृष्णकृत्य हे सरकार नागरिकता संशोधन बिलाच्या माध्यमातून करीत असल्याचा सूर उमटत आहे. 9 डिसेंबरच्या मध्यरात्री बहुमताच्या जोरावर व्हीप काढून समस्त भारतीयांना न पटणारे बिल 311 विरुद्ध 80 अशा फरकाने लोकसभेत मंजूर करून घेण्यात आले.
    कमकुवत विरोधक जरी सत्य बोलत असले तरी सत्ताधुंद जातीयवादी विचारसरणीचे सत्ताधारी त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. न पटणारा विचार देशाच्या माथी मारला गेला. ज्या मुद्यांवर निवडणूक लढविली गेली त्याला अमलात आणण्याऐवजी देशाच्या माथी बदनामीचा डाग लावण्याचे काम सत्ताधारी सध्या करीत आहेत. जे की समस्त सहिष्णू भारतीयांना व बुद्धिजीवींना हे पटले नाही. त्यामुळेच सर्व स्तरातून याचा विरोध होत आहे. देशातील 727 प्रसिद्ध व्यक्तींनी नागरिकत्व सुधारणा बिलाचा विरोध पत्र लिहून सरकारकडे केला आहे. यामध्ये माजी न्यायाधीश, वकील, लेखक, अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यात जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह, अ‍ॅडमिरल रामदास यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे.
    पत्रात म्हटले आहे, नागरिकत्व सुधारणा विधेयक भारताच्या सर्वसमावेशक आणि सर्वांगीण दृष्टीकोनाचा भंग करीत आहे.     -(उर्वरित लेख पान 7 वर)
ज्याद्वारे भारताला स्वातंत्र्यलढ्यात मार्गदर्शन मिळाले. आम्ही हे विधेयक सांस्कृतिक आणि शैक्षणिक समुदायांचे विभाजनशील, भेदभाव करणारे आणि असंवैधानिक असल्याचे मानतो आणि यामुळे भारताच्या लोकशाहीला नुकसान पोहोचले आहे. याचबरोबर, नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे संविधानाला धोका आहे. यासाठी आम्ही सरकारला हे विधेयक मागे घेण्याची मागणी करत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. याशिवाय, प्रस्तावित कायदा भारतीय प्रजासत्ताकाच्या मुख्य स्वरूपामध्ये मूलत: बदल करेल आणि यामुळे संविधानाद्वारे सादर केलेल्या सांघिक संरचनेला धोका निर्माण होईल, असेही म्हटले आहे.
या पत्रात लेखक जावेद अख्तर, अभिनेता नसीरुद्दीन शाह आणि अ‍ॅडमिरल रामदास यांच्याशिवाय इतिहासकार रोमिला थापर, अभिनेत्री नंदिता दास, अपर्णा सेन, सामाजित कार्यकर्ते योगेंद्र यादव, तिस्ता सेटलवाड, अरुणा राय आणि दिल्ली हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश ए.पी. शाह आदींचा समावेश आहे.
    ”लोकसभेत पारित झालेल्या नागरिकता संशोधन बिलाचा आम्ही कठोर निंदा करत आहोत. आम्हाला वाटते की हे विधायक एक सांप्रदायिक मानसिकतेचा परिणाम आहे. हे पक्षपाती आणि भेदभावपूर्ण आहे.” - सय्यद सआदतुल्लाह हुसैनी, अध्यक्ष जमाअत-ए- इस्लामी हिंद.
    लोकसभेत बिलासंबंधी बोलताना एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी म्हणाले की, ”मी या विधेयकाच्या विरोधात आहे. महोदया मी आपणांस सांगू इच्छितो की, जेव्हा घटना तयार होत होती तिच्या प्रस्ताविकेमध्ये काय लिहिण्यात यावं याबद्दल बौद्धिक, नैतिक, सांस्कृतिक आणि मानसिक दृष्ट्या खूप विचारमंथन झालंय. 17 ऑक्टोबर 1949 रोजी के.एम. कामत (सदस्य संविधान सभा) यांनी प्रस्ताव मांडला होता की, प्रस्ताविकेची सुरूवात देवाच्या नावाने करण्यात यावी. आपल्याला आश्‍चर्य वाटेल तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी याचा विरोध केला होता. त्यामुळे या विषयावर मतदान घेण्यात आले. त्यात के.एम. कामत यांचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तेव्हाची ती उंची आणि आजचे हे पतन पहा, कि एक कायदा असा तयार केला जात आहे ज्याचा आधार धर्म आहे. माझी तक्रार याबाबतीत नाही की असा कायदा होतोय. दु:ख या गोष्टीचे आहे की, या कायद्यात तुम्ही मुस्लिमांना सामील केलेले नाही. तुम्ही पाकिस्तान, अफगानिस्तान किंवा बांग्लादेश मधील कुठल्याही मुस्लिमाला आपल्या देशात घेऊ नका, मला त्यांच्याशी काही देणेघेणे नाही. मात्र माझ्या पूर्वजानी ज्यांनी मोहम्मद अली जीना यांच्या प्रस्तावाला ठोकर मारून मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या म्हणण्यावर विश्‍वास ठेवला की, इस्लामचा या देशाशी संबंध एक हजार वर्ष जुना आहे. हिंदू धर्माचा संबंध 4 हजार वर्ष जुना आहे, असे असतांना हे सरकार मुसलमानांशी एवढी घृणा का करते? आम्हीही माणसं आहोत. या देशाचे सन्माननीय नागरिक आहोत, मग का आमच्याशी भेदभाव केला जातोय. माझ्या मते या विधेयकाला एनआरसीच्या दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. आसाममध्ये एनआरसीच्या बाबतीत जे घडले आहे ते पहा 19 लाख लोक एनआरसीच्या यादीच्या बाहेर आहेत. स्वत: तेथील मंत्र्यांनी सांगितले की, या यादीत 5 लाख 40 हजार बांग्लादेशी हिंदू आहेत. मी गृहमंत्री महोदयांकडून जाणू इच्छितो की, या विधेयकाच्या कलम 6 ए अंतर्गत जेवढे बंगाली हिंदू आहेत व त्यांच्यावर घुसखोरीचे जे खटले चालू आहेत ते या कायद्यामुळे आपोआप खारीज होतील. खटले कोणावर चालतील फक्त मुसलमानांवर. कारण त्यांना या कायद्यांतर्गत मान्यता मिळालेली नाही. गृहमंत्री महोदय हा भेदभाव नाहीतर काय आहे. घटनेच्या अनुच्छेद 14 चा हा पराभव आहे. तुम्ही आसामच्या 5 लाख 40 हजार हिंदूंसाठी कायदा बनवा. मात्र तेव्हा जेव्हा एनआरसी लागू होईल गृहित धरा अमित शाह साहेबाचे नाव त्याच्यात आले. पण त्यांच्याच पक्षाच्या एका मुस्लिम सदस्याचे नाव त्यात आले नाही. तर या कायद्याप्रमाणे अमित शहाचे नाव यादीत समाविष्ट केले जाईल आणि त्या मुस्लिम सदस्याचे नाही. हे एक षडयंत्र आहे मुस्लिमांना देश विहीन करण्याचे. मी याचा निषेध करतो. तुम्ही आमची अवस्था अशी करून टाकलेली आहे की, उफाळत्या समुद्रामध्ये पक्षपात आणि सांप्रदायिकतेच्या नावेमध्ये आम्हाला बसवून बिना खलाश्याचे सोडून दिले आहे. व समुद्रकिनार्‍यावर उभे राहून तमाशा पाहत आहात. मात्र लक्षात ठेवा तमाशा बघणार्‍यांनो ही नाव इनशाअल्लाहुतआला किनार्‍याला लागेल. आम्ही कश्ती जाळून लोकशाही पद्धतीने आपले अधिकार प्राप्त करू. हीच गोष्ट या सदनाला समजून घेणे गरजेचे आहे. महोदया तीसरा मुद्दा जो आपल्या समक्ष ठेवू इच्छितो तो पीओकेचा आहे. गृहमंत्री साहेब आपण हे का विसरून गेलात की कश्मीरचा एक तृतीयांश भाग चीनमध्ये आहे. स्वत: गृहमंत्र्यांनी सांगितले होते की, अक्साई चीनवरील अधिकार आम्ही सोडणार नाही पण इथे तर सोडून दिलेला दिसताय. आपण का भीत आहात? उद्या दलाईलामा निवर्तले जातील, नवीन दलाईलामा येईल त्यासाठी आपण वाट पाहत आहात का? तिबेटमध्ये मुस्लिम नाहीत का?
    गृहमंत्र्यांना माहित आहे का की टायगर सिद्दीकी कौन होता? टायगर सिद्दीकी ती व्यक्ती होती ज्याला भारताने आश्रय दिला होता व त्याच्या मदतीने मुक्ती वाहिनी बनविली होती. ज्या कारणाने बांग्लादेश बनला. जर त्यावेळी हे लोक सरकारमध्ये राहिलेले असते तर टायगर सिद्दीकी ने कधीच मुक्ती वाहिनी बनविली नसती. महोदया पुढचा मुद्दा असा की, हे लोक अफगानिस्तान संबंधी बोलत आहेत. आपण जाणून आहात निश्‍चितपणे तालीबान अफगानिस्तानमध्ये सत्तेवर येतील. तेव्हा त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी हजारा, ताजीक नागरिकांची आपल्याला गरज भासेल. ज्यांचा उपयोग करून आपण अफगानिस्तानमध्ये भारताच्या हिताचे रक्षण करू शकतो. परंतु, या कायद्यामुळे तुम्ही त्या सर्व ताजीक आणि उजबेक यांना प्रतिबंध करीत आहात. अफगानिस्तानमध्ये तालीबानची जेव्हा सत्ता सगळे काही संपेल, असा आपला दृष्टीकोण आहे. मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती की तुम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून एवढी मोठी घोडचूक कराल.
    अफगानिस्तानमध्ये शीख समाजाचे लोक आहेत. याची मलाही कल्पना आहे. तालीबानांची जेव्हा सत्ता तेथे होती तेव्हा गृहमंत्री महोदय मी आपल्याला सांगू इच्छितो त्या देशातील चलनासंबंधीचे सर्व व्यवहार शिखांच्या हातात होते आणि आजही आहेत. पाकिस्तानला भारतातील हिंदूंशी काही देणेघेणे आहे ना पाकिस्तानमधील हिंदूंशी. जेव्हा तो घुसखोरी करायला लावेल तेव्हा तुम्ही त्यांना कसे रोखाल. महोदया सरकार किती लोकांना नागरिकत्व देणार आहे. त्यांची संख्या राज्यनिहाय सांगावी.
    माझा आरोप आहे, हा कायदा दुसर्‍यांदा भारताची फाळणी करण्यासाठी आणला जात आहे. हा कायदा तर हिटलरच्या कायद्यापेक्षाही वाईट आहे. कुठे आणि सोडले तुम्ही भारताला. आम्हा मुस्लिमांचा गुन्हा काय आहे? मुस्लिमांच्या संबंधी या सभागृहाला विचार करावा लागेल की, आपण जो संदेश देत आहात तो चुकीचा आहे. तुमच्यामुळे राजकीय स्थित्यंतर होईल. तुम्ही मुस्लिमांना दाबू इच्छिता. त्यांच्या छातीवर पाय रोवून तुम्ही त्यांना म्हणत आहात की तुम्ही या देशाचे सन्माननीय नागरिक नाहीत. मुस्लिमांना तर देशविहीन बनविले जाईल. म्हणून मी म्हणतोय की, पुन्हा एक फाळणी होवू पाहत आहे. महोदया मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, दोज हू डू नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री ऑर कन्टेट टू बी रिपिटेड’ (जे इतिहासापासून काही धडा घेत नाहीत त्यांच्यासाठी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.). श्रीलंकेचे 10 लाख तामीळ लोक चेन्नईमध्ये आहेत ते हिंदू नाहीत काय? त्यांना संपवायचे आहेत काय? नेपाळमधील मधेसी हिंदू नाहीत काय? त्यांना संपवायचंय काय? म्यानमारमध्ये, चीनमध्ये अगदी परवापर्यंत त्यांची रेडिओसेवा चालत होती ते लोक ख्रिश्‍चन आहेत. म्यानमारबद्दल तुमचे काय धोरण आहे. कशाची वाट पाहत आहात? सर्व बाजूंनी अपयशी आहात, हे सिद्ध होईल. हे विधेयक घटनाविरोधी आहे आणि स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारा आहे. म्हणून मी याचा विरोध करतो. महात्मा गांधी महात्मा कसे बनले माहित आहे का? त्यांनी दक्षिण आफ्रिमेमध्ये नॅशनल रजिस्टर्ड कार्ड फाडलेला होता. मी त्यांचेच अनुसरण करून हे घटना विरोधी विधेयक फाडत आहे.”
    राज्यसभेत बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, कधी लव्ह जिहाद, कधी घर वापसी, कधी ट्रिपल तलाक, कधी सिटीजन अमेंडमेंट बिल तर कधी एनआरसी आणि पुन्हा आता सिटीजन अमेंडमेंट बिल तर कधी 370 आम्हाल माहित आहे, तुमचा अजेंडा काय आहे ते. 2014 पासून आम्ही पाहतोय तुम्ही काही लोकांना त्यांच्या नावामुळे वेगळे करू पाहत आहे. हे काय चालविले आहे तुम्ही. संविधानाबरोबर ही कसली चेष्टा करताय. तुम्ही असे म्हणताय की मुसलमानांना या कायद्यामुळे भिण्याची गरज नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की मुसलमान तुम्हाला भीतात. या देशाचा कोणताच मुसलमान तुम्हाला भीत नाही”
    एकंदर लोकसभेत व राज्यसभेत झालेल्या चर्चेत अनेक वक्त्यांनी आपली मते मांडली. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, या बिलाचा देशातील मुस्लिमांना काही धोका नाही. मात्र भाजपा सरकारची भूमिका गत 6 वर्षात मुस्लिमविरोधी राहिलेली आहे. त्यांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारी ठरलेली आहे. एका समाजाला टार्गेट केले जात आहे, जे की देशासाठी घातक आहे असा सूर एकूणच मान्यवरांच्या भाषेतून उमटतो. मूळात या कायद्याची भीती एनआरसीसी जोडली गेल्यामुळे आहे. नसता या कायद्याला कोणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. (हा लेख लिहिपर्यंत राज्यसभेत बिल सादर झाले नव्हते. दि.11/12/2019, सायंकाळी वेळ :7.12 पर्यंत)

- बशीर शेख 

वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी देताच सोमवार, 9 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेत सादर करण्यात आले. उशीरा रात्री 311 विरूद्ध 80 मताने मान्य करण्यात आले. या विधेयकाला लोकसभेमध्ये अभूतपूर्व असा विरोध झाला. तरी परंतु, देशाच्या फाळणीसाठी काँग्रेसने धर्माचा आधार घेतला. म्हणून आज हे विधेयक आणावे लागत असे, अजब तर्कट मांडून गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक रेटून नेले. सकृतदर्शनी हे विधेयक अतिशय छोटे विधेयक आहे. ज्यात अफगानिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेशांमधून मुस्लिमांव्यतिरिक्त इतर नागरिकांना भारताचे नागरीकत्व दिले जाईल. यात मुस्लिमांचे नाव सामील न करणेचा अर्थ असा आहे की या देशात मुस्लिम जर आले तर त्यांना नागरिकत्व मिळणार नाही. वरवर पाहता याच्यात चुकीचे काहीच वाटत नाही. कारण कोणताही भारतीय मुसलमान असे कधीच म्हणणार नाही की या तिन्ही देशांमधून आलेला मुसलमानांना भारतीय नागरिकत्व द्या. मग गदारोळ माजण्याचे कारण काय? गदारोळ माजण्याचे मुख्य कारण या विधेयकामध्ये जी गोष्ट नमूद नाही ती आहे. या विधेयकाचा रास्त संबंध एनआरसी रजिस्टरशी आहे. एनआरसी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स. ही योजना गेल्या तीन वर्षांपासून द्राविडी प्राणायाम करून आसाममध्ये राबविली जात आहे. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा एनआरसीची शेवटची यादी जाहीर झाली तेव्हा 19 लाखांपेक्षा जास्त नागरिकांची त्या यादीमध्ये आढळून आले नाही. मुळात एनआरसी योजनेचा उद्देश बांग्लादेशी मुस्लिमांना शोधून काढून त्यांना घुसखोर घोषित करून त्यांचे सर्व नागरी अधिकार काढून घेणे हा होता. मात्र या यादीमध्ये अंदाजे 9 लाख हिंदू नागरिकच आल्यामुळे त्यांना तर घुसखोर घोषित करता येत नाही. म्हणून त्यांना या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या तरतुदींखाली नागरिकत्व बहाल करण्यात येईल. म्हणजे यादी बाहेर राहिलेल्या बाकी मुस्लिम लोकांना आपोआपच घुसखोर घोषित करता येईल. यांच्यासाठी आसाममध्ये युद्ध पातळीवर डिटेन्शन सेंटर बांधण्याचे काम सुरू आहे. सर्वात मोठे डिटेन्शन सेंटर आसामच्या गोलियापाडा जिल्ह्यातील मटियाआला भागातील डोमणी दलगुमा या गावात सुरू असून, 30 डिसेंबर 2019 पर्यंत त्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश आहेत. या ठिकाणी 13 हजार लोकांना ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे. या डिटेन्शन सेंटरवर 5 कोटी 46 लाख रूपयांच्या खर्चाला केंद्र सरकारने मंजूरी दिलेली आहे. देशाला माहित नसेल मात्र आसाममध्ये वेगवेगळ्या तुरूंगामध्ये तात्पुरते डिटेन्शन सेंटर सुरू करण्यात आलेले असून, त्यात हजारो लोकांना ठेवण्यात आलेले आहे. आता पावेतो 27 लोकांचा मृत्यू या डिटेन्शन सेंटरमध्ये मुलभूत सुविधा नसल्यामुळे आजारी पडून झालेला आहे. अनेक लोकांनी कागदपत्रे दाखविल्यावरसुद्धा अशी कागदपत्रे तर पानपट्टीवर मिळतात, असे म्हणून पोलिसांनी अनेकांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठविले होते. ज्यांच्या कागदपत्रांना ग्राह्य धरून आसामच्या उच्च न्यायालयाने त्यांनी सुटका केलेली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे जीवंतपणी ज्यांना घुसखोर म्हणून भारताचे नागरिकत्व नाकारण्यात आलेले आहे त्या 27 लोकांना मृत्यूनंतर मात्र याच देशाच्या जमिनीत पुरण्याची परवानगी देवून प्रत्यक्षात ते याच देशाचे नागरिक होते हे स्वीकारले जात आहे. (संदर्भ ः सा. दावत, अंक नं. 40, दि. 27/11/2019)
    एनआरसीची ही योजना फक्त आसामपुरतीच किंवा पूर्वोत्तर राज्यापुरतीच मर्यादित राहणार नसून तिला संपूर्ण देशांमध्ये लागू करण्याचा निश्‍चय गृहमंत्री अमित शाह यांनी अगोदरच जाहीर केलेला आहे. महाराष्ट्रासारख्या मध्य भारतातील पुरोगामी राज्यात सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पहिले डिटेन्शन सेंटर नवी मुंबई येथे तयार करण्यात येईल, अशी घोषणा नुकतीच केलेली होती. देशभरात सर्वात मागासलेला दारिद्रय रेषेखालील सामाजिक समुह मुसलमान होय. ज्यांच्याकडे अज्ञानामुळे जन्मतारखांची सुद्धा व्यवस्थित नोंद केलेली नसते त्यांच्याकडे 50 वर्षापूर्वीची रहिवाशी प्रमाणपत्र मागितल्याने कोठून मिळणार? म्हणजे शेवटी कागदपत्री पुरावा नाही म्हणून मोठ्या संख्येने देशभरातील मुस्लिमांना घुसखोर ठरवून त्यांची रवानगी डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात येईल, अशी सार्थ भीती वाटत असल्यामुळे प्राथमिक स्तरावरच नागरिकता संशोधन विधेयकाचा प्रचंड विरोध होत आहे. दुर्दैवाने काँग्रेसने बांग्लादेशी नागरिकांना देशात 1972 साली बोलावून त्यांना आसाम आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये सामावून घेतले व त्यांची मतं मिळविली. त्याच नागरिकांची आता दोन भागात विभागणी करून मुस्लिमांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवून हिंदूंना नागरिकत्व देऊन त्यांची मते आपल्याकडे वळविण्याची राजकीय खेळी भाजपा या दोन प्रस्तावित कायद्यांच्या माध्यमातून खेळत आहे, असे जाणकारांचे मत आहे. भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द इंदिरा गांधी यांनी प्रिअ‍ॅम्बलमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जरी दाखल केला असला तरी भारतीय राज्यघटनेचे मूळ चरित्र सुरूवातीपासूनच धर्मनिरपेक्ष होते, हे सत्य कोणालाही नाकारता येण्यासारखे नाही. परंतु, नागरिकत्व सुधारणा बिल जरी मंजूर झाले तर त्या देशाच्या घटनेच्या आत्म्याच्या विरूद्ध होईल, यात मात्र शंका नाही.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘नागरिकत्व संशोधन विधेयक २०१९’ गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांत मांडले आणि ते पारितही झाले. या विधयेकामुळे पाकिस्तान,  अफगाणिस्तान, बांग्लादेश या देशातील मुस्लिम वगळता हिंदू, बौद्ध, जैन, खिश्चन, शीख, पारसी नागरिकांचा भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा कायदा  मुस्लिमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम १४चे उल्लंघन करतो. यात शेजारील देशातील केवळ मुस्लिम वगळता अन्य  नागरिकांना नागरिकत्व देण्यात येणार असल्याने ते धर्माधर्मांत भेदभाव करणारा ठरतो. सध्याच्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला किमान ११ वर्षे भारतीय नागरिकत्व घेणे  बंधनकारक आहे. या विधेयकात शेजारच्या देशांच्या अल्पसंख्याकांसाठी ही मुदत ११वरून सहा वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यासाठी नागरिकत्व कायदा १९५५मध्ये काही   दुरुस्त्या केल्या आहेत. जेणेकरून लोकांना नागरिकत्व देण्याचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामध्ये आतापर्यंत १९८६, १९९२, २००३, २००५ आणि २०१५ अशा पाच वेळा दुरुस्ती करण्यात  आली आहे. २०१६मध्ये ते लोकसभेत मंजूर झाले, परंतु राज्यसभेत मंजूर होण्यापूर्वी लोकसभेची मुदत संपल्याने ते रद्द झाले होते. मात्र भारतीय घटनेच्या अनुच्छेद १४मध्ये म्हटले आहे  की, धर्माच्या आधारे कोणत्याही नागरिकात भेदभाव केला जाणार नाही. या विधेयकाद्वारे भाजपला हिंदू धर्माचा अजेंडा बळकट करायचा आहे. हिंदू राष्ट्र घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  देशात आसामच्या नागरिकत्वाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार त्यांना नागरिकत्व न देता धर्माच्या आधारावर भेदाभेद करत असल्याने या विधेयकाला विरोध होत आहे. या  विधेयकाला आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांत जो विरोध आहे, बंगाल आणि ईशान्येकडील इतर राज्यांमधील बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंची संख्यासुद्धा कमी नाही. या  विधेयकाच्या माध्यमातून भाजप या सर्व राज्यांमध्ये आपली मतपेढी तयार करू इच्छितो अशी या राज्यांतील प्रादेशिक पक्षांची भीती आहे. भारतीयांच्या मनात ‘मुस्लिमांना’ आम्ही  भारतात येण्यापासून कसे रोखले, असे बिंबवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. ईशान्येकडील परिस्थिती या विधेयकामुळे अधिकाधिक स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले तर भारतीयत्वाच्या मूळ संकल्पनेलाच मुरड बसणार आहे. त्यामुळे खरे तर या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सदनांसह, संसदेच्या संयुक्त समितीत आणि  देशभरात विविध माध्यमांतून साधकबाधक चर्चा व्हायला हवी होती. भारताचे नागरिकत्व हे कोणत्याही धर्माशी संबंधित नाही आणि राज्यघटना कुणासही धार्मिक पाश्र्वभूमीवरून  नागरिकत्व नाकारत नाही. राज्यघटनेतील या मूळ तत्त्वाशी प्रस्तावित विधेयकात प्रताडना करण्यात आली आहे. जगातील बहुतांशी लोकशाही-धर्मनिरपेक्षवादी देशांमध्ये नागरिकत्वाचा  मुद्दा धर्माशी जोडलेला नाही. आपल्या देशांत बहुसंख्याक असलेल्या पण शेजारी किव्हा शत्रू देशांत अल्पसंख्याक असलेल्या समुदायातील व्यक्तींना प्राधान्याने नागरिकत्व प्रदान  करण्याची पद्धत तर इस्त्राईल वगळता कुणीही स्वीकारलेली नाही. मोदी सरकारने मात्र इस्त्राईल या यहुदी धर्मावर आधारीत राष्ट्राचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत भारतीय नागरिकत्व प्रदान  करण्याच्या तत्त्वांमध्ये बदल करण्याचा घाट घातला आहे. या तिन्ही देशांतील हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांचे भारतात स्थलांतर घडण्याची प्रक्रिया प्रचंड क्लेशदायक आणि हिंसकसुद्धा ठरू  शकते. महत्त्वाचे म्हणजे, भारताने या प्रकारची घटनादुरुस्ती अंमलात आणली तर या तिन्ही देशांतील अल्पसंख्याकांभोवती संशयाचे प्रचंड वादळ घोंघावू लागेल. प्रस्तावित विधेयकाच्या  माध्यमातून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला बांगलादेशातून आलेल्या मुस्लिमांना आणि ज्यांची भारतीयत्वाची ओळख राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीपत्राच्या प्रक्रियेत फेटाळण्यात आली  आहे, अशा मुस्लिमांना (ते बांगला देशातून आलेले नसतीलही) राष्ट्र-राज्य विहीन करायचे आहे. इस्त्राईलने जे फिलीस्तीनी मुस्लिमांसोबत केले, म्यांमारने जे रोहिंग्या मुस्लिमांसोबत केले तशीच प्रक्रिया भाजपाला आसाम, बंगाल व ईशान्येकडील मुस्लिमांसोबत (त्यात बांगलादेशातून आलेले व न आलेले या दोन्ही प्रकारचे मुस्लिम असतील) करायची आहे, हे स्पष्ट  होते आहे. भाजप सरकारच्या प्रस्तावित नागरिकत्व (संशोधन) विधेयकाला असलेला विरोध सामान्य लोकांच्या गळी उतरणारा नाही. ही बाब भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे, ज्याचा  फायदा घेत येत्या काळात नागरिकत्व (संशोधन) विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीपत्राच्या मुद्द्यांवरून आसाम व ईशान्येकडील राज्यांसह देशभर धार्मिक धृवीकरण घडवले जाईल. सलग दुसऱ्या वेळी मतदारांनी लोकसभेत बहुमत देऊ केलेल्या मोदी सरकारने भारतीय लोकशाही पुढे उभे केलेले हे सर्वांत मोठे आव्हान आहे. आता या देशातील प्रत्येक  नागरिकाला त्याचे भारतीय नागरिकत्व पुन्हा सिद्ध करावे लागणार आहे. असे सिद्ध केल्याने ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्याची कागदपत्रे नसतील ते साहजिकच या देशात  निर्विासत किंवा घुसखोर ठरवले जातील व त्यांना देशाबाहेर काढले जाईल.
- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

हैद्राबादमधील एका डॉक्टर महिलेवर सामूाहक बलात्कार करून तिची हत्या तर रांची येथील विधी कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात आक्रोशाचे  वातावरण आहे तर संसदेत अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबत असलेल्या कायद्यात दुरुस्ती करून तो कडक करण्याची मागणी करण्यात आली. अजूनही आपण कोणत्या समाजात राहत  आहोत, हा प्रश्न चिंतातुर व अस्वस्थ करतो. आपल्या सभोवताल माणसाच्या रूपात असलेले अनेक लोक अत्यंत हिंस्त्र प्राणीपातळीवर वावरत आहेत, हेच अशा घटनांमधून सिद्ध होते!  पोलीस आणि मीडियाच्या बेजबाबदारपणाचा कळस म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सन २०१८ मध्ये जारी केलेली गाइडलाइन केराच्या टोपलीत टाकून बलात्कारपीडित महिलेचे नाव,  तिच्या मृतदेहाच्या फोटोंसह इतर छायाचित्र सार्वजनिक करून टाकली. असे करणे म्हणजे जणू एक ट्रेंड बनला आहे. काही असामाजिक तत्त्वांनी बलात्काऱ्यांची शहानिशा होताच  त्यांच्यापैकी एका अल्पसंख्यकाला मुख्य आरोपी ठरवून या संपूर्ण घटनेला एका सांप्रस्रfयक रंग देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर भारतात प्रसारित होणाऱ्या पॉर्न  वेबसाइट्सवरदेखील हत्या करण्यात आलेल्या महिलाच्या नावाचा सर्रास वापर सुरू झाला. अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचारांविरूद्ध आवाज उठविणाऱ्या समाजामधीलच जवळपास ८० लाख  लोक या बलात्काराचा व्हिडिओ पॉर्न वेबसाइट्सवर शोधत होते असे म्हटले जाते, याला काय म्हणावे? समाजातील लोकांची लोकांची नैतिकता किती खालावलेली आहे हेच यावरून स्पष्ट  होते.
निर्भया खटल्यानंतर अशा प्रकारच्या बलात्कार प्रकरणात पीडित महिलेचा मृत्यू वा हत्या करण्यात आली तर त्यात मृत्युदंडाची शिक्षा अनिवार्य करण्यात आली. तसेच कठुआ  खटल्यानंतर या कायद्यात अशी दुरुस्ती करण्यात आली की १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात यावी. वयस्कांवर करण्यात   आलेल्या बलात्काराबाबत मृत्युदंडाची शिक्षा फक्त ‘रेयरेस्ट ऑफ रेयर’ केसमध्येच होऊ शकते. भारतात दररोज सुमारे १०६ बलात्कार होतात. यात १० पैकी ४ पीडित अल्पवयीन  असतात. माध्यमक्रांतीच्या या युगात लैंगिक अत्याचाराला खतपाणी घालण्याची भूमिका ४जी उत्तम प्रकारे पार पाडताना दिसत आहे. समाजातील जवळपास सर्वच स्तरांतील लोकांकडे  सध्या स्मार्ट फोन आहे आणि यावर अश्लील व्हिडिओ सहजतेने उपलब्ध होतात. या व्हिडिओ क्लिप्स आणि मादक पदार्थांची उपलब्धता यांचेदेखील विकृत मानसिकतेला विकसित  करण्यात मोठे योगदान आहे. इंटरनेटवर अश्लील सामग्री उपलब्ध करवून देणाऱ्या या वेबसाइट्सवर बंदी घालण्याचे एक प्रकरण आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही  काही वेबसाइट्सवर सरकारने बंदी घातली आहे. गेल्या सोमवारी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तर तासांत अनेक राज्यांनी त्यांना महिला सुरक्षिततेसाठी मिळालेला निर्भया फंड पुरेसा खर्च केला  नसल्याची माहिती उघड झाली आहे. तर काही राज्यांनी एक रुपयाही खर्च न केल्याचे दिसून आले आहे. ज्या राज्यांनी निर्भया फंडामधील रक्कम वापरलेली नाही त्यामध्ये महाराष्ट्र,   मणिपूर, मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा, दमण व दीव इत्यादींची नावे आहेत. २०१२मध्ये दिल्लीमध्ये निर्भया बलात्कार प्रकरण घडल्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेखाली केंद्र सरकारने एक  विशेष आर्थिक फंड तयार केला होता. या फंडची रक्कम केंद्राकडून राज्याला वाटली जाते. या फंडातून महिला हेल्पलाईन, वन स्टॉप सेंटर अशा योजना राबवल्या जातात. स्त्रियांवर  होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सक्रियपणे आवाज उठवणाऱ्यांत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा आदराने उल्लेख केला जातो. शाहू-फुले-आंबेडकर या शाब्दिक मिथकाआड पुरोगामी म्हणून  स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेणाऱ्या महाराष्ट्राने या निधीतील खर्च केलेली रक्कम आहे ‘शून्य’ रुपये. या निधीचा उल्लेख हा केवळ उदाहरणादाखल आहे. सर्वच पातळीवर आपण  उदासीन आणि असंवेदनशील आहोत. नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्ट २०१७ या ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार २०१६ च्या तुलनेत महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये ६  टक्क्यांची वाढ झाली होती. यातल्या अनेक घटना या नवरा किंवा त्याच्या नातेवाइकांकडून झाल्याची (२७.२ टक्के) नोंद होती तर त्यापाठोपाठ महिलेवर तिचा विनयभंग करण्याच्या  हेतूने हल्ला (२१.७ टक्के), महिलेचे अपहरण किंवा त्यांना ताब्यात ठेवणे (२०.५ टक्के) आणि बलात्कार (७ टक्के) अशा प्रकारच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. यातल्या सर्वाधिक  घटना उत्तर प्रदेशात ५६०११ घटना, त्यानंतर महाराष्ट्र (३१,९७९) आणि पश्चिम बंगाल (३०,००२ घटना) या पुरोगामी आणि स्त्री चळवळींशी संबंधित राज्यांमध्ये नोंदवल्या गेल्या. या  वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या ३,५९,८४९ घटना नोंदवण्यात आल्या. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमागची सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय कारणे लक्षात  घेतली नाहीत, तर कायदे आणि शिक्षा निश्चितच तोकड्या पडतील. सरकार आणि लोकप्रतिनिधी, बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि हत्या करणे अशा पाशवी गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठी कायद्यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद करतील आणि त्याचबरोबर याच्या दुसऱ्या पैलूवरदेखील विचार करतील अशी आशा करू या.

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Corporate World
भांडवलशाही साम्राज्याच्या अत्याचाराला आणि अन्यायाला सर्व जगातील दुबळे लोकच बळी पडतात. आपल्या फायद्यासाठी दुबळ्या लोकांचे शोषण करणे हाच साम्राज्यवादाचा पाया आहे. भांडवलवादी साम्राज्य हे शोषण आर्थिक लाभ धन-दौलतीसाठी करीत असते. गरीब देश, सर्व जगातील गरीब जनता, आदिवासी, मागासवर्ग, खेडूत इत्यादींबरोबर भांडवलशाही शोषणाचा बळी एक महत्त्वाचा दुर्बळा वर्ग, सर्व जगातील स्त्रियांचा वर्ग आहे. आर्थिक लाभ आणि धनदौलतीच्या हव्यासाप्रित्यर्थ भांडवलशाही साम्राज्य स्त्रियांना तर्‍हे-तर्‍हेच्या जुलूमाला बळी पाडते. त्यांच्यावर दुप्पट तिप्पट कामाचा बोजा टाकला जातो. त्यांच्या शारीरिक आणि भावनात्मक गरजा लक्षात घेतल्याशिवाय त्यांच्याकडून यंत्राप्रमाणे काम करून घेतले जाते. त्यांचे शरीर आणि सौंदर्य विक्रीयोग्य बनविले जाते आणि बाजारात त्याची बोली लावली जाते. त्यांच्या तारूण्यावर अन्याय केला जातो. आपल्या उत्पादनाची विक्री व्हावी म्हणून स्त्रियांचे आर्थिक, भावनात्मक आणि शारीरिक शोषण केले जाते.
    प्राचीन परंपरागत समाजामध्ये स्त्रिया जितक्या पीडित आणि शोषित होत्या त्याहीपेक्षा अधिक अत्याचार आणि शोषणाच्या नव्या भांडवलशाही समाजात बळी पडल्या आहेत. तेथेही त्यांच्या आयुष्याचा कालावधी संकुचित होता. तेथेसुद्धा प्राचीन सामाजिक रीति-रिवाजांमुळे त्या लाचार होत्या आणि निमूटपणे अत्याचाराच्या जात्यात भरडल्या जात होत्या आणि येथेही आधुनिक सुसंस्कृत मापदंडापुढे त्या लाचार आहेत आणि जुलूमांच्या जात्यात भरडल्या जात आहेत.
    समाजाचा दुसरा पीडित आणि शोषित वर्ग खेडूत लोक, गरीब जनता, आदिवासी इत्यादींच्या मदतीसाठी सोशालिस्ट आणि इतर संघटना काम करीत आहेत. परंतु स्त्रियांचा खरा हितचिंतक कोणीही नाही. स्त्रियांचे शोषण करण्यात भांडवलदार आणि समाजवादी दोन्ही सारखेच आहेत. ज्या महिला संघटना त्यांच्या सहानुभूतीचा दावा करतात त्या सर्वात जास्त या अत्याचाराकरिता मार्ग अनुकूल करतात. स्त्रियांना शांती आणि समाधान केवळ इस्लामच्या शीतल छायेत मिळत होते हे सत्य आहे आणि भविष्यातसुद्धा इस्लामच त्यांच्या संकटातून आणि त्रासातून त्यांना मुक्त करू शकतो.

    व्यवसाय, कामाचे ओझे आणि शोषण
    नव्या भांडवलशाही व्यवस्थेस आपल्या सेवेसाठी स्वस्त मजूर आणि कर्मचार्‍यांच्या मोठ्या फौजेची आवश्यकता होती. त्या व्यवस्थेने प्रसारमाध्यमांर्फत व्यवसायी स्त्रिया म्हणजे कामकरी महिलांचा विचार सादर केला. कुटुंब आणि कौटुंबिक जीवनाचे महत्त्व कमी केले. विवाहसंस्थेला सुद्धा निरर्थक ठरवून टाकले. विवाहाशिवाय सहवास (कॅज्युअल सेक्स) विवाहबाह्य लैंगिक जीवन किंवा सहजीवन (लिव्ह इन रिलेशनशिप) सारख्या प्रथांना प्रोत्साहन दिले. महिलांनी कुटुंब आणि मुलांच्या जंजाळात न अडकून पडता त्यांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहावे हा त्यामागे हेतू होता.
    आय.टी. कंपन्या, कॉल सेंटर्स, बी.पी.ओ.ज् इंडस्ट्री वगैरेमध्ये खालच्या स्तरावरील नोकर्‍यांकरिता स्त्रियांना प्राथमिकता द्यावी अशी ठरलेली नीती अस्तित्वात आहे. स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत जास्त वेळेपर्यंत ठिय्या मारून बसून काम करू शकतात असे त्याचे कारण या इंडस्ट्रीज सांगतात. स्त्रिया जास्त आज्ञाधारक असतात आणि त्या कमी वेतनावर काम करण्यास तयार होतात. शिवाय त्या सुट्यासुद्धा कमी घेतात. आय.टी.ई.एस. कंपन्यांमध्ये कनिष्ठ पातळीवर एकूण कर्मचार्‍यांच्या निम्म्यापेक्षा जास्त स्त्रिया असण्याची कारणे आहेत, कॉल सेंटरमध्ये तर त्यांची संख्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जागतिकीकरणाच्या काळात या कंपन्या स्त्रियांच्या कोणत्याही गरजांची दखल घेत नाहीत. पहिल्यापासूनच कॉल सेंटरमध्ये स्त्रिया रात्रपाळीमध्ये रात्र-रात्र काम करीत होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या सन 2007 च्या निर्णयानंतर आणि फॅक्टरीज अ‍ॅक्टमध्ये केल्या गेलेल्या दुरूस्तीनंतर तर उरलासुरला अडथळासुद्धा संपला. आता तर त्यांच्या विशिष्ट गरजांवर लक्षही दिले जात नाही. गर्भवती असलेल्या काळात त्यांना द्यावयाच्या सुटीसंबंधीचे नियम पाळले जात नाहीत आणि त्यांच्या एकांत वगैरेची व्यवस्थाही केली जात नाही. रात्र-रात्रभर काम केल्यामुळे आरोग्याच्या निरनिराळ्या समस्या उद्भवतात. त्यांच्या मासिक धर्मचक्राची व्यवस्था बिघडते. डब्ल्यूएचओ (जागतिक आरोग्य संघटन)च्या  अहवालानुसार रात्रपाळीमध्ये काम करणार्‍या स्त्रियांच्या स्तनाच्या कॅन्सर (कर्करोग) ची शक्यता वाढते.
    पुरूषांच्या तुलनेत रात्रपाळीमध्ये काम करणार्‍या स्त्रियांमध्ये निद्रानाश, तारूण्यक्षमता कमी होणे, थकणे, हृदयरोग, रासायनिक असंतुलनासंंबंधीचे रोग (मेटाबॉलिक डिसऑर्डर्स) इत्यादीची शक्यता जास्त असते. रात्र-रात्रभर त्या (स्त्रिया) पुरूषांमध्ये राहतात, तर्‍हेतर्‍हेच्या त्रासाच्या बळी पडतात. त्यांना एकाच वेळी आपल्या कामातील उच्चदर्जा सिद्ध करावयाचा असतो आणि पुरूष अधिकार्‍यांना खूश करावयाचे असते. टाईम्स ऑफ इंडियाने यावर भाष्य करताना अगदी बरोबर लिहिले आहे की कंपन्यांमध्ये एका स्त्री-कर्मचार्‍यांकडून अपेक्षा केली जाते की ती अशी एकाच वेळी स्त्रीने मूर्तीमंत सौंदर्यवती व्हावे, प्रसन्न स्त्रीसारखे वागावे, पुरूषासारखा विचार करावा आणि कुत्र्यासारखे काम करावे. - ( Look Like a woman, behave like a
lady, think like a man and work like a dog.)
    जुलूम, पीडितावर अत्याचार म्हणजे या पीडित आणि शोषित महिलांच्या समस्यांच्या निराकरणासाठी आणि अत्याचाराविरूद्ध आवाज उठविण्याची संधी दिली जात नाही. जरी भारतातील मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये त्या काम करीत असल्या तरी भारत देशाच्या कायद्यानुसार त्यांना युनियन स्थापन करण्याची आणि सामुदायिक स्वरूपात त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची संधी त्यांना दिली जात नाही. फॅक्टरीज अ‍ॅक्ट आणि शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट मधील बर्‍याचशा तरतुदींपासून त्यांना दूर ठेवले जाते.
    ज्या मल्टी नॅशनल कंपन्या दिवसा काम करतात त्यासुद्धा रात्री अकरा-अकरा, बारा-बारा वाजेपर्यंत काम करण्यास विवश करतात. त्यांना असे लक्ष्य दिले जाते, जे आठ तासांच्या कायद्याच्या वेळेत पूर्ण करणे शक्य होत नाही. प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिवसात तर त्यांना कधी-कधी संपूर्ण रात्र ऑफिसमध्ये राहावे लागते. ज्या कंपन्यांमध्ये कायदेशीररित्या रात्रपाळी असते, तेथे स्त्रियांच्या सुरक्षेची किमान व्यवस्था तरी असते. परंतु दिवसा काम करणार्‍या कंपन्यांमध्ये या सवलती नसतात. कधी एकाच मुलीला कित्येक पुरूषांबरोबर ऑफिसमध्ये रात्र-रात्रभर काम करावे लागते. शासन त्या कंपन्यांवर देशाचे कायदे (लेबर लॉ) लागू करत नाही. त्या कंपन्यामध्ये स्त्रियांना अनेकदा आपल्या उच्च अधिकारी आणि सहकार्‍यांकडून होणार्‍या लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागते. मागील काही वर्षांमध्ये बी.पी. ओ. सेंटर्स आणि कॉल सेंटर्समध्ये कित्येक काम करणार्‍या स्त्रियांवर बलात्कार आणि हत्यांच्या घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. सकाळच्या पहिल्या प्रहरी त्याच ऑफिसमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांकडून तानिया बॅनर्जीचा बलात्कार आणि हत्या, एच.पी. कंपनीत काम करणारी प्रतिभा मूर्तीची तिच्या कार ड्रायव्हरने केलेली हत्या आणि दिल्लीमध्ये एकानंतर एक घडलेल्या कित्येक घटनांमुळे जगजाहीर झालेले आहे की वास्तवात परिस्थिती किती वाईट आहे. बलात्कार आणि हत्यांच्या टोकाच्या कृत्यामुळे काही घटना वर्तमानपत्रात येतात, एरवी शांतपणे केले जाणारे लैंगिक अत्याचार आणि शोषण हे अनेक ठिकाणांचे नियमित दुष्कर्म आहेत.
    कॉल सेंटर्स आणि बी.पी.ओ. सेंटर्समध्ये कॉलेजमधून बाहेर पडणार्‍या अगदी तरूण मुलांना आणि मुलींना नोकर्‍या दिल्या जातात. ती तरूण मुले रात्र-रात्रभर शृंगार केलेल्या आणि बहुधा अर्धनग्न असलेल्या मुलींबरोबर बसवलेली असतात. त्या मुलींना कॉल सेंटर्समध्ये सुश्राव्य आवाज आणि मनमोहक शैली आणि हावभाव यांचे खासकरून प्रशिक्षण दिले जाते. काही कॉल सेंटर्समध्ये अमेरिकन ग्राहकांच्या मनोरंजनासाठी त्या मुलींना अश्‍लील संभाषण करण्याचे प्रशिक्षणसुद्धा दिले जाते. नंतर रात्रभर अमेरिकेच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या चौकशांची उत्तरे देण्यासाठी फारच तणावग्रस्त कामात अडकून पडावे लागते. या परिस्थितीत लैंगिक भावना निरंकुश होणे (नियंत्रण ठेवणे कठीण होणे) ही मामूली गोष्ट आहे म्हणून फेब्रुवारी 2006 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार नोएडाच्या एका कॉल सेंटरमध्ये 11 टक्के महिलांनी सांगितले होते की, पाचपेक्षा अधिक पुरूषांशी त्यांचे शारीरिक संबंध कायम झाले होते.
    रानटी लोकसमूहांच्या वागणुकीचा आणि वर्तनाचा पगडा सेंटर्सच्या कर्मचार्‍यांमध्ये दिसून आला आहे. त्या लोकांच्या सामुदायिक पार्ट्यामध्ये एका रात्रीत मुले आणि मुली कित्येक मुलींबरोबर किंवा मुलांबरोबर सामुदायिक स्वरूपात अनेक प्रकारच्या लैंगिक क्रियेत लिप्त होतात. याचसाठी मुंबईतील कॉल सेंटर्सच्या कर्मचार्‍यांमध्ये केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार 89 टक्के कर्मचारी या प्रकारच्या सामुदायिक पार्ट्यांना नियमित हजेरी लावत असतात. मोठ्या कंपन्यातील सफाई कर्मचारी सांगतात की त्यांना बाथरूमच्या सफाईसाठी वारंवार बोलाविले जाते, कारण बाथरूम कंडोममुळे तुंबलेली असतात.
    कॉल सेंटर्स आणि बी.पी.ओ. सेंटर्स हे एड्स आणि दूसरे घातक रोग पसरविण्याचे माध्यम बनू शकतात, असे वॉल स्ट्रीट जर्नलने सावध केले आहे. या सर्व अश्‍लीलता या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि साम्राज्यवाद आपला स्वार्थ साधण्यासाठी हे सर्व पसरवित आहे. ही सर्व संकटे सोसून स्त्रिया जी कमाई करतात त्यावर बहुतेक सर्व ठिकाणी आणि विशेषकरून आपल्या देशामध्ये त्यांचा काही हक्क नसतो. डॉक्टर प्रमिला कपूर यांच्या सर्व्हेक्षणानुसार मध्यम आणि उच्चमध्यम वर्गामध्ये काम करणार्‍या स्त्रियांच्या आपल्या उत्पन्नावर कोणताही अधिकार नसतो. त्यांना आपली सर्व कमाई आपला नवरा किंवा सासुरवाडीच्या नातेवाईकांच्या हवाली करावी लागते. त्यांना कार्यालयातील समस्या झेलाव्या लागतातच शिवाय घरातील समस्यावी झेलाव्या लागतात. असे असूनसुद्धा बहुधा त्यांच्या चारित्र्याच्या बाबतीत शंका आणि भ्रम त्यांच्या डोक्यावर नाचत असतात.     प्रमिला कपूरने एका लेडी डॉक्टरची हकीगत सांगितली आहे. त्या लेडी डॉक्टरला तिचा पति सर्व उत्पन्न घेऊन त्यातून फक्त दोन रूपये तिच्या खर्चासाठी देत असे.
    कामाचा हा भार आणि चारही बाजूच्या लढाईमुळे शहरी स्त्रिया मानसिक रोगांना बळी पडत आहेत. सन 2009 मध्ये महिला दिवसाची संधी साधून असोचम -  'Associated Chambers of commerce and Industry of india' (जी आपल्या देशाची व्यापारी आणि औद्योगिक संघटनांमधील एक मोठी संघटना आहे.) ने एक खास अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालानुसार शहरातील कार्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणार्‍या स्त्रियांपैकी दोन तृतीयांश (2/3) पेक्षा अधिक स्त्रिया जीवनशैली संबंधित ( Life Style related diseases) रोगांना बळी पडल्या आहेत. या अभ्यासानुसार ज्या कंपन्यांमध्ये कामााठी मानसिक तणाव, काम करण्याचा दीर्घ कालावधी, लक्ष्य (Target) आणि कालमर्यादा ( Target and Deadlines) इ. अस्तित्वात असते, तेथील 75 टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रिया डिप्रेशनला बळी पडलेल्या दिसून आल्या. मीडिया आणि के.पी. ओ. ( K.P.O.) इत्यादींमध्ये काम करणार्‍या स्त्रियांना आजारपणात सहज सुट्या मिळत नाहीत, असे अहवालात म्हटले होते. कामाचा दबाव आणि लक्ष्य (Target) गाठण्याच्या प्रयत्नात 53 टक्के स्त्रियांना दुपारचे भोजनही करता येत नाही.
    या महिला रोग्यांपैकी 77 टक्के महिला डॉक्टरकडेही जाऊ शकत नाहीत. ’असोचम’ च्या अहवालात स्पष्ट शब्दांत पुढीलप्रमाणे टिप्पणी करण्यात आली आहे - ( Corporate female employee's hectic shedule of balancing work place and home along with balancing between.) ‘कॉर्पोरेटमधील महिला कर्मचार्‍यांमध्ये घर आणि काम यांच्या अपेक्षांमधील संतुलनाच्या प्रयत्नांच्या परिणामामुळे खूप मग्न असतात आणि वैयक्तिक आणि सामाजिक गरजांच्या संतुलनाच्या प्रयत्नात त्यांना (स्त्रियांना) आरोग्याकडे दुर्लक्ष करणे भाग पडते.’
    मानसशास्त्रज्ञ शीला दत्ता राय यांच्या एका सर्व्हेक्षणानुसार स्त्रियांमध्ये निद्रानाशाचा रोग वेगात वाढत आहे. आय.टी., कस्टमर केअर, एच.आर. इत्यादीसारख्या तणावग्रस्त व्यवसायांमधील नोकर्‍यांत वाढ झाल्यामुळे पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये निद्रानाशाचा रोग दिडपट अधिक आहेत. या सर्वेक्षणानुसार कलकत्तामध्ये काम करणार्‍या स्त्रियांमध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये या रोगात पाचपट वाढ झाली आहे.
    ’टाईम्स ऑफ इंडिया’ ने त्या स्त्रियांच्या अत्यंत दयनीय स्थितीचे वर्णन केलेले आहे.
    दीर्घकाळ आणि थकविणार्‍या कामाच्या दिवसानंतर जेव्हा त्या बिछान्यावर पडतात, तासन्तास छताकडे टक लावून बघत असतात. घड्याळाची टिक-टिक आणि एअरकंडिशनचा हळू आवाजसुद्धा त्यांना खूप त्रासदायक होतो. अर्ध्या रात्रीनंतर नाइलाजाने उठतात आणि झोपेच्या गोळ्या खातात. त्या गोळ्यांमुळे झोप येण्याची जाणीव होऊ लागते तोच अलार्म वाजू लागतो. नंतर तणावाने भरलेल्या आणि थकविणार्‍या दिवसाचा आणि त्यानंतर झोप उडालेल्या रात्रीचा न संपणारा क्रम सुरू होतो.
    या सद्यःस्थितीत मानसिक रोगाशिवाय त्या स्त्रियांना गुंगी आणणारी औषधे घेण्यास भाग पडत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या एका सर्व्हेक्षणानुसार भारताच्या शहरी क्षेत्रातील स्त्रियांमध्ये गुंगी आणणारी औषधे (ड्रग्स) घेण्यात वृद्धी होत आहे. 20 ते 30 वर्षांच्या वयामध्ये या स्त्रियांना गुंगी आणणारी औषधे घेण्याचे व्यसन लागत आहे आणि अल्कोहोलशिवाय ट्रॅन्क्विलायझर्स हीरोईन आणि प्रॉपोक्सीफॉन सारख्या धोकादायक मादक पदार्थ घेण्याचीसुद्धा सवय लागत आहे. या अहवालात हे सुद्धा सांगितले आहे की स्त्रियांमध्ये नवी दिल्लीत हीरोईनचा वापर सर्वांत जास्त आहे आणि चेन्नईसारख्या परंपरावादी शहरातसुद्धा स्त्रिया या ड्रग्जकडे आकर्षित होत आहेत. अहवालानुसार येथील स्त्रियांमधील ड्रग्जचा वापर विशेषकरून उच्च, आर्थिक आणि सामाजिक स्तरामध्ये आहे. उपरोल्लेखित गुंगी आणणार्‍या पदार्थाशिवाय डायजाफॉम आणि अल्प्रोजोलाम सारख्या औषधांचासुद्धा उच्चशिक्षण घेतलेल्या आणि आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उच्चवर्गातील स्त्रिया गुंगीसाठी वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.
    (सदर लेख भांडवलशाही साम्राज्यवाद आणि स्त्रिया या पुस्तकातील असून, लेखकाने पुस्तकातील प्रत्येक पानावर संदर्भ दिले आहेत. सदरच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद हुसैनखान चांदखान पठाण यांनी केला आहे. सदर पुस्तक 2014 साली प्रकाशित झाले आहे.)

- सय्यद सआदतुल्ला हुसैनी

Terrorism
दहशतवाद एखादे धार्मिक प्रकरण नाही. दहशतवाद, राजकीय आर्थिक आणि सामाजिक कारणांनी जन्मास येतो. लिब्रेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम, आयरिश रिपब्लिकन आर्मी, उल्फा, साध्वी प्रज्ञा, दयानंद पांडे आणि त्यांचे सहकारी या सर्वांवरून हे सिद्ध होते की दहशतवादी सर्वच धर्मातून येतात. ज्याअर्थी मागील काही वर्षात मीडियाचा एक विशिष्ट वर्ग याचा संबंध इस्लाम धर्माशी जोडत राहिला, म्हणून दहशतवादाला मुसलमानांशी जोडणे एक फॅशन बनली आहे. वस्तुतः इस्लाम या कारवायांचे स्त्रोत असण्याची सुतराम शक्यता नाही.
    जेव्हा अन्याय आणि लोकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते. दडपशाहीचे वर्चस्व वाढते, तेव्हा हिंसाचाराचा उद्रेक होतो, जो नेहमी दहशतवादीचे रूप धारण करतो आणि जर याचा संबंध दुर्दैवाने एखाद्या विशिष्ट धर्माशी असेल तर जेथपर्यंत प्रेरणांच्या स्त्रोतांचा संबंध आहे, त्यांच्या अंगी धर्माचा रंग चढविण्याची प्रवृत्ती असते. हे पूर्णतः स्पष्ट आहे की लिब्रेशन टायगर्स ऑफ तमिल ईलमचे कार्यकर्ते व बंडखोर सर्वच्या सर्व हिंदू होते, परंतु, मीडियाने त्यांना कधीही अशा प्रकारे सादर केले नाही, जहालमतवादी संघटना अभिनव भारतने बॉम्ब स्फोट केले, ज्याचा संबंध स्पष्टतः हिंदुत्वाशी होता. परतु, मीडियात फार कमी पत्रकार असे दिसून येतात, ज्यांना अशा घटनांमध्ये भगवा रंग दिसतो.
    कट्टरपंथी लोकांद्वारे जिहादचा चुकीचा वापर करण्यामुळे समस्या आणखी जास्त बिकट झाली आहे. भरकटलेल्या तत्त्वांनी केलेल्या एकट्या दुकट्या हिंसक घटनादेखील जिहाद म्हणविल्या जात आहेत आणि काही लोक या घटनांना याच स्वरूपात प्रस्तुत करीत आहेत. एकीकडे अल कायदा आणि त्यासारख्या संघटना आहेत, ज्या जिहादच्या नावाने दहशत पसरवित आहेत. जिहादच्या नावाने होणारी ही कृत्ये संपूर्ण मुस्लिम समुदायाचे सर्वात मोठे वैरी आहेत. कधी-कधी असे जाणवते की जेव्हा काही दहशतवादी असल्या कृत्यांमध्ये सामील होऊन मुसलमान होण्याचा दावा करतात तेव्हा मुसलमानांना इतर शत्रूंची गरजच नाही. ही असामाजिक तत्वे शत्रूंचे काम सर्वोत्तम पद्धतीने करीत आहेत, ज्यामुळे घडणार्‍या प्रत्येक अप्रिय घटनेनंतर संपूर्ण मुस्लिम समुदायाची प्रतिमा डागाळली जात आहे. हे नादान व विवेकहीन लोक आपल्या कारवायांनी  इस्लामची जी प्रतिमा सादर करीत आहेत, इस्लामचे कट्टर वैरीदेखील त्याहून अधिक चांगले काम करू शकत नाहीत. आपल्या आततायी कृत्यांनी ते दुसर्‍यांच्या मनात मुस्लिम समुदायाविरूद्ध घृणा निर्माण करीत आहेत आणि प्रत्येक अशा कृत्यानंतर मुसलमानांची व इस्लामची प्रतिमा डागाळली जाण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होत आहे.
    इस्लाम धर्माच्या ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितले गेले आहे की जिहाद कोणत्याही माध्यमान्वये घडू शकतो, उदा. लेखणीच्याद्वारे, आपल्या स्वार्थाविरूद्ध संघर्षाद्वारे अथवा एखाद्या पवित्र शब्दाने किंवा पवित्र कर्माद्वारे होऊ शकतो. परंतु, मीडियाला यापैकी कोणताही भावार्थ माहीत नाही. जेव्हा मामला मुसलमानांचा येतो, तेव्हा काही तत्त्वांनी केलेल्या हिंसाचाराला जिहादचे लेबल लावले जाते.
    सामान्यतः हे अवलोकनात येते की काही मुस्लिम देशांमध्ये छळवाद व दडपशाहीविरूद्ध अशासकीय गट उभे राहिले आहेत. निःसंशय मध्यपूर्वेकडील देशांचे समाज अनेक पैलूंनी कमी प्रमाणात विकसित आहेत. काही तेल निर्यात करणारे देश आणि खाडी देशातील लहानशा श्रीमंत लोकसंख्येला वगळता बहुसंख्य नागरिकांना शिक्षणस्तर, जीवनस्तर आणि नोकरी व्यवसायाच्या संधी कमी आहेत. भावी काळाकरिता संभावनांची अपेक्षा मर्यादित समजली जात आहे.
    अनेक मुस्लिम देश जे राजांच्या, हुकूमशहांच्या आणि निरंकुश शासकांच्या अधीन आहेत. लोकशाहीसाठी उठणार्‍या चळवळींचा तिथे कठोरपणे बिमोड केला जातो. नागरिक जीवन नर्कतुल्य बनविण्याकरिता मुलभूत हक्क हिरावून घेतले जातात आणि नागरी स्वातंत्र्य दिले जात नाही. सत्तारूढ पक्षांमध्ये पारदर्शिता नाही. भ्रष्टाचार पसरलेला आहे. हे हुकूमशाहा आपल्या शासन सत्तेकरिता आपल्या नैसर्गिक साधनांवर उदा. तेल आणि नैसर्गिक गॅस वगैरेवर स्वायतत्ता प्राप्तीच्या बदल्यात पाश्‍चिमात्य शक्तींकडून वैधता मिळवितात तेव्हा आश्‍चर्य करण्यासारखी गोष्ट नाही की काही प्रतिकारात्मक आंदोलने या वातारणातून उत्पन्न झाली असावीत. ही आपल्या देशाच्या शासकांविरूद्ध प्रतिक्रिया आहे. हे लोक शस्त्रांचा वापर करू शकतात परंतु या असे करण्यात ते पाश्‍चिमात्यांच्या दुटप्पी नीतींचे पितळही उघडे करतात.
    एक विख्यात अमेरिकन राजनीतिक तत्त्वज्ञानी आणि लोकप्रिय विचारवंत, बुद्धिजीवी मीकाईल वाल्जर ही समस्या खूप सामंजस्याने संक्षिप्तपणे सादर करतो, ”प्रथम छळवाद, दडपशाहीला दहशतवादासाठी निमित्त बनविले जाते, मग दहशतवादाला दडपशाहीकरिता निमित्त बनविले जाते. पहिले निमित्त अतिवामपंथी लोकांसाठी आहे आणि दुसरे निमित्त उजव्या नव पुराणमतवादी लोकांसाठी आहे.”
    प्रत्येक जण या गोष्टीशी सहमत होईल की कोणत्याही समाजात राजकीय हिंसाचार अप्रिय आहे. दहशतवाद राजकीय हिंसाचाराचेच एक रूप आहे. परंतु, जगातील अधिकांश देशांमध्ये राजनीतिक हिंसेचा वापर, छळवादी शासक स्वतः आपल्या जनतेविरूद्ध आणि आपल्या घरगुती विरोधकांविरूद्ध नियमितपणे करीत असतात. अवैध शासकांना खचितच राजकीय हिंसाचाराला तोंड द्यावे लागेल.
    पॅलेस्टीयन लोकांनी दीर्घकाळापर्यंत इस्त्रायली रॉकेटांचा आणि क्षेपणास्त्रांचा मुकाबला केवळ दगडांनी आणि गोफणांनी केला. परंतु, आता असे नाही. इस्त्रायली शासनातर्फे सतत वाढत्या हिंसेने हमास आणि हिज्बुल्लाहला अधिक सहयोगपूर्ण आणि सशक्त प्रतिक्रियेसाठी विवश केले. इराक आणि अफगानिस्तान यांच्यात एक दशकांपासून चालत राहणार्‍या युद्धांनीही शंका दृढ केली आहे की पाश्‍चिमात्य, पॅलेस्टीनची समस्या सोडविण्याऐवजी आपल्या नविन शस्त्रांच्या परीक्षणासाठी युद्ध क्षेत्रांचा विस्तार करीत आहेत आणि नव्या रणभूमींचा शोध घेत आहेत. सद्दाम हुसैनच्या इराक मधील विध्वंसक हत्यारांच्या संदर्भात पाश्‍चिमात्यांचा खोटेपणा उघडकीस आल्याने या विश्‍वासाला अधिक मजबूत केले आहे की पाश्‍चिमात्यांच्या युद्ध, हिंसा, रक्तपात आणि अमर्याद राष्ट्रीय गर्वाच्या लालसेची कोणतीही सीमा नाही. नैराश्य आणि निरूत्साहाचे हेच वातावरण होय, ज्याने काही लोकांना पाश्‍चिमात्यांविरूद्ध संघटित प्रयत्न सुरू करण्यास बाध्य केले आहे. या सर्वांच्या शेवटी पाश्‍चिमात्य त्याच तालिबानांसमोर गुडघे टेकताना दिसत आहे. ज्यावर त्याने दहशतवादाचा आरोप लावला होता.
    घटनांच्या परिणामस्वरूपी आलेल्या शहाणपणानंतर इस्लाम किंवा मुसलमानांच्या शब्दात दहशतवादाचा प्रत्यय लावणे या मागच्या खर्‍या हेतू किंवा इराद्याला अनावृत्त करतो.
    जगात सध्या जे काही होत आहे, त्याच्या प्रकाशात इस्लाम किंवा मुसलमानांविषयी त्वरित एखादा निर्णय घेणे. न्यायसंगत ठरणार नाही. संयोगवश याला बळी पडणारे मुसलमान आहेत. तथापित त्यांचा क्रोध, दमन आणि प्रतिकार अपेक्षेला अनुसरून आहे. कारण आम्ही श्रीलंका, उत्तर आयर्लेंड किंवा कांगोमध्ये पाहतो की छळ, दडपशाहीला बळी पडलेले लोक याचा प्रतिकार करीत आहेत. इस्लाम जगात शांती, सहअस्तित्व आणि जीवन, स्वातंत्र्य, संपत्ती आणि सर्व मानवांच्या आदर-सन्मानचे रक्षण इच्छितो. या संदर्भात पवित्र कुरआन घोषणा करतो ः ” ज्याने एखाद्या माणसाला, एखाद्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी किंवा जमिनीवर उत्पात पसरविण्याव्यतिरिक्त अन्य एखाद्या कारणाने ठार मारले तर समजा त्याने सर्व मानवांची हत्या केली आणि ज्याने एकाही माणसाचा जीव वाचविला, समजा त्याने समस्त मानवजातीला जीवनदान दिले.” (कुरआन - 5 ः 32).
    ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता ही गोष्ट मान्य करणे चुकीचे ठरेल की दहशतवाद एक इस्लामी दृश्य घटना आहे. निराकरण, काही धर्मांना बदनाम करण्यात दडलेले नाही, किंबहुना ते मानवतेतून अन्याय आणि छळवादाचा समूळ नाश करण्यात दडलेले आहे.

- सय्यद हामीद मोहसीन

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget