Halloween Costume ideas 2015
Latest Post

CAA Protest
नागरिकत्व संशोधन कायदा आणि एनआरसीच्या विरोधात देश मोर्चे, आंदोलनांनी धुमसत आहे. केंद्र शासनाच्या या मनमानी धोरणांच्या विरोधात सबंध देशातील जनता रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करीत आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, संवैधानिक मुल्यांची गळचेपी कुठल्या न कुठल्या मार्गाने भाजप सरकारकडून होत असल्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या सहनशिलतेचा बांध फुटत आहे. एका-एका गोष्टींना टार्गेट करून ’फोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजांची नीती भाजप सरकार राबवित असल्याची जाणीव आता देशातील नागरिकांना  होत आहे. नागरिकांची शाब्दिक दिशाभूल करण्यात सरकार आतापर्यंत यशस्वी झाल होतं. मात्र देशातील नागरिकांची सहिष्णूवृत्ती, धर्मनिरपेक्षता, एकात्मता, बंधूता या विचारांवरच टाच येत असल्यामुळे सरकारविरोधात जनआक्रोश वाढत चालला आहे. त्याची परिणीती या दोन मुद्यांवरून संघर्षात होताना दिसत आहे. गेली सहा वर्षे प्रगती होईल,  देश पुढे जाईल त्यामुळे शासन घेत असलेली कठोर धोरणे चांगली असतील असं वाटत होतं. मात्र भाजप सरकारचे मनसुबे भारतीय जनतेला औरच दिसत असल्याचे या दोन कायद्यामुळे लोकांच्या लक्षात आले आणि त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. म्हणूनच सर्वसमावेशक मोर्चे, आंदोलने देशात प्रचंड प्रमाणात निघत आहेत. कासवगतीने का होईना भाजपच्या ध्येयधोरणांचा, त्यांच्या कडवट विचारांचा विरोध जनता मतदानातून करत असल्याचेही  आधी महाराष्ट्र आणि आता झारखंड मध्ये झालेला दिसत आहे. हे सत्तापरिवर्तन भाजपला आपल्या चुकीच्या विचारांवर फेरविचार करण्यास भाग पडणारा आहे, यात संशय नाही. 
    12 डिसेंबरपासून देशभरात होत असलेला विरोध तीव्र झाला आहे. आतापर्यंत 21 लोकांचा यात बळी गेला असून, त्यातील तब्बल 19 नागरिक उत्तर प्रदेशात असलेल्या जंगलराजमध्ये बळी पडलेले आहेत. शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. तहसील, जिल्हा आणि राज्य व देश पातळीवर सध्या आंदोलने सुरू आहेत. मात्र येणार्‍या काही दिवसांत ग्रामीणभागातूनही याचा विरोध होईल, असे एकंदरित चित्र आहे. यातच भाजपा सरकारने कायदा मागे घेण्याचे सोडून अकलेचे तारे तोडत प्रतीमोर्चे काढून स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्याचं कार्य सुरू केले आहे. त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समर्थन मोर्चातून दिसून येत आहे. युवा, महिला, विद्यार्थी, बुद्धीजीवी, सिनेसृष्टी सगळीकडूनच सीएए आणि एनआरसीचा विरोध होत आहे. येणार्‍या काळात सरकार कुठली भूमिका घेतंय यावर पुढील चित्र अवलंबून असेल, असे जानकारांचे म्हणणे आहे.
खोटं कोण बोलतंय?
पंतप्रधान मोदी यांनी मागच्याच आठवड्यात दिल्लीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये स्पष्ट शब्दात असे सांगितले की, एनआरसीबद्दल कुठेच चर्चा झालेली नाही. असे असतानाही केवळ विरोधी पक्षाच्या अपप्रचाला बळी पडून देशभरात विरोध होत आहे. जनतेनी कावळा कान घेऊन गेला असे कोणी सांगितले तर कावळ्याच्या मागे न पळता अगोदर स्वतःचा कान जागेवर आहे का नाही हे तपासून पहावे, या शब्दात एनआरसीबद्दल आपले विचार व्यक्त केले. लगेचच याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून उठल्या. अमित शहा यांचे पहिले कॅब आयेगा, फिर एनआरसी आयेगा और जब एनआरसी आयेगा तो केवळ बंगाल और आसाम में ही नहीं आयेगा बल्के पूरे देश में लागू किया जाएगा. हे प्रतिपादन व्हायरल केले. दोघांच्या भाषणाच्या क्लिप्स परस्पर विरोधी असल्यामुळे प्रचंड व्हायरल झाल्या. खरे काय व खोटे काय यावरून दोघेही उघडे पडले.
    ही सारवासारव जरी केली गेली असली तरी व्हायचे ते नुकसान झालेच. जनतेचा मोदी आणि अमित शहाच्या जोडीवरचा विश्‍वास उडाला. अनेक विचारवंतांचा असा अंदाज होता की, भारतीय जनतेमध्ये या जोडीविषयी असलेली विश्‍वासाची भावना संपलेली असून, हे दोघे देशाला आर्थिक गर्तेकडे नेत आहेत. असा जनतेचा ठाम समज झाला. त्यातच पुन्हा मागच्या आठवड्यात मोदी यांचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी,’भारतीय अर्थव्यवस्था कोमामध्ये गेली आहे’ असे विधान केल्यामुळे देशभरात त्यांच्या या विधानाला गांभीर्याने घेण्यात आले. या जोडीला आता थांबविले नाही तर देश खरोखर आर्थिकदृष्ट्या खड्डयात जाईल, याची खात्री पटल्यामुळे सीएए आणि एनआरसीच्या निमित्तानेही देशभरातील लोकच नव्हे तर 36 विद्यापीठातील विद्यार्थी पोलिसांच्या लाठ्या- काठ्यांची तमा न बाळगता रस्त्यावर उतरलेले आहेत. हा विरोध सरकारला नसून संवैधानिक मुल्यांच्या रक्षणासाठी आहे. एवढेच नाही तर एनआरसी लागू करण्यासाठी साडेतीन कोटी जनसंख्या असलेल्या आसामसारख्या राज्यात 1600 कोटी खर्च झाला असून, या जोडीने जर देशभरात एनआरसी लागू केली तर किती मोठा खर्च होईल आणि त्याचे किती महाभयंकर नुकसान देशाच्या अर्थव्यवस्थेला सहन करावे लागतील, याचा अंदाज आल्यानेच लोकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चाललेला आहे. या परिस्थितीत एनआरसी देशात लागू केला जाणार नाही, अशी निसिंग्ध गवाही जोपर्यंत पंतप्रधान देशाला देत नाहीत तोपर्यंत हा जनक्षोभ थांबणार नाही, असे एकंदरित चित्र आहे. 

समाज माध्यमांत जनक्षोभ
    व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक आदी समाज माध्यमांत एनआरसी आणि सीएए विरूद्ध जनक्षोभ आहे. शिवाय, पंतप्रधानांच्या कपड्याच्या विधानावरून देशाच्या प्रतिमेची त्यांनी जगभरात नाचक्की केल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. 

उत्तर प्रदेशात अनन्वीत अत्याचार
    एनआरसी आणि सीएए कायद्याविरूद्ध उत्तर प्रदेशात विरोध करणार्‍या मुस्लिम जनतेविरूद्ध तेथील काही हिंदू संघटना तसेच सरकारकडून अनन्वीत अत्याचार होत असल्याचे समोर येत आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष घालून जनतेवरचा अत्याचार थांबवावा, अशी मागणी होत आहे. 

- बशीर शेख

Madarasa Book
इस्लामोफोबियाच्या लाटेमुळे भारतातील मदरसे मुख्य प्रवाहापासून बाजूला फेकले जात आहेत. मदराशांमुळे दहशतवाद वाढतो आहे, हा शिक्का पुसण्याची नितांत गरज आहे.  ‘इस्लामोफोबियाच्या काळातील मदरसे’ (Madrasas in the Age of Islamophobia) या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक झिया उस सलाम आणि डॉ. एम अस्लम परवेझ या  लेखकद्वयींनी या पुस्तकात, भारतात इस्लामिक शिक्षणाचे धडे देणारे मदरसे कशा आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणात सुधारणा आणि  आधुनिकीकारणाची कशी गरज आहे, या अत्यंत विवादास्पद मुद्द्याला हात घातला आहे.
इस्लामोफोबियाच्या लाटेमुळे एकतर भारतातील मदरसे मुख्य प्रवाहापासून बाजूला फेकले जात आहेत. त्यात मदरशातून शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थांवर दहशतवादाचा आरोप होत  असल्याने या संस्था जास्तच दुरावल्या जात आहेत. मदराशांमुळे दहशतवाद वाढतो आहे, हा शिक्का पुसण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन नुकत्याच प्रकाशित झालेल्या एक   पुस्तकाद्वारे करण्यात आले आहे. अशा प्रकारचा शिक्का देशातील मुस्लिम शाळांना अडचणीत आणत असल्याबाबतही या पुस्तकातून ताशेरे ओढण्यात आले आहेत. उदाहरणादाखल,  आपण अब्दुल वाहिद याचीच गोष्ट घेऊ, ज्याच्यावर मुंबईतील रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप होता. पण, तब्बल नऊ वर्षानंतर त्याची या आरोपातून  निर्दोष मुक्तता करण्यात आली. किंवा त्याआधीच्या सलमान फारसीचे उदाहरण घ्या. ज्याचा कथित मालेगांव स्फोटामध्ये हात असल्याचे म्हंटले जात होते. पण, तब्बल आठ वर्षानंतर  जेंव्हा तो निर्दोष सुटला तेंव्हा त्याला कसलाच आधार उरला नव्हता. एक उच्चविद्याविभूषित डॉक्टर पण, आपल्या गरजा भागवण्यासाठी त्याच्यावर शेळ्या पाळण्याची वेळ आली. अशा  प्रकारचे परिणाम आपण सहज पणे टाळू शकलो असतो.
आपल्या देशातील प्रसारमाध्यमांवर, प्रत्येक आरोपीला दहशतवादी संबोधण्याऐवजी किमान त्याच्यावरील गुन्हा सिद्ध होईपर्यंत तरी, त्याला आरोपी म्हणूनच संबोधण्याची सक्ती केली  पाहिजे. ज्यामुळे ते कोणीतरी गुन्हा सिद्ध झालेले आरोपीच आहेत, अशा पद्धतीने त्यांच्या प्रतिमांवर शिंतोडे उडवण्यापासून त्यांना परावृत्त केले पाहिजे. अर्थात, अनेक उपायांपैकी हा देखील एक उपायच झाला. संपूर्ण वस्तुस्थिती तपासण्यासाठी प्रसारमाध्यमातील व्यक्तींनी स्वत:च निवड करून एखाद्या इस्लामिक विद्यालयाला भेट द्यावी, म्हणजे त्यांच्या हे लक्षात  येईल की, मदरसे हे शस्त्रास्त्र किंवा दारुगोळा साठवण्याची केंद्रे नाहीत आणि तिथे विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, अशी सूचना सहलेखक झिया उस सलाम  यांनी केली आहे. मदरशांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची सखोल तपासणी केल्यानंतर, लेखक म्हणतात की, फिक (इस्लामिक न्यायशास्त्र) सारख्या पुस्तकावर अवलंबून राहिल्याने त्यांची  शैली, भाषा आणि त्यातील उदाहरणे देखील काळाच्या ओघात मागे पडली आहेत. ‘हा अभ्यासक्रम चर्चा आणि वादविवादाऐवजी शत्रुत्वाच्या भावनेवर जास्त भर देतो. यामुळे माहितीपूर्ण वादविवादाऐवजी असंतोष वाढतो. यातील बऱ्याच टीका ज्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात, त्या खऱ्या तर टिकेवरील टीका आहेत! ज्या विद्यार्थ्यांमधील उत्सुकतेला खतपाणी  घालण्यासाठी, नक्कीच फारशा उपयुक्त नाहीत,’ असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. परंतु, दक्षिण भारतात आणि त्यातही विशेषत: केरळ आणि पूर्व बंगालमध्ये काही सन्माननीय  अपवाद आहेत जिथे गणित, इंग्लिश आणि विज्ञान हे विषय देखील मदरशांमधून शिकवले जातात.
देशभरातील हजारो मदरशांचा सखोल  अभ्यास केल्यानंतर झिया आणि परवेझ यांनी अशी खंत व्यक्त केली आहे की, मदरशांतून बाहेर पडणारे विद्यार्थी हे बाहेरच्या जगाबद्दल अगदीच  अनभिज्ञ असतात. ‘विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणारा हा समाज आज अंधानुकरण आणि परंपरेला चिकटून राहिलेला आहे,’ असा निष्कर्ष त्यांनी या पुस्तकांतून मांडला आहे.
अनेक मदरशांमध्ये शाफई, मालिकी किंवा हंबाली सारख्या इतर महत्त्वपूर्ण विद्याशाखांनी इस्लामचा जो अर्थ लावला आहे, तो शिकवण्याऐवजी फक्त हनफीची शिकवण शिकवली जाते.  ‘जवळपास सगळ्याच सुन्नी मदरशांमध्ये सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या दर्स-एनिझामीचे अनुसरण केले जाते. अगदी मोजक्या ठिकाणी आधुनिक काळाशी सुसंगत असे बदल केलेले दिसून   येतात.’ लेखकांची ही मते, हेच दर्शवतात की कशाप्रकारे काही मदरशांमधून तरुणांना इस्लामचे शिक्षण न देता इस्लामच्या विवेचानाची शिकवण दिली जाते. ‘भारतासारख्या देशातील  अल्पसंख्य समुदायातील एखाद्या व्यक्तीला या सगळ्या बाकीच्या पंथांचे ज्ञान घेण्याची काहीही आवश्यकता नाही, असे ग्राह्य धरण्यात आलेले आहे. किंवा हे म्हणजे असे आहे की,  इस्लामचा फक्त त्यांनीच लावलेला अर्थ बरोबर असून इतरांनी लावलेले अर्थ हे दिशाभूल करणारे आहेत.’ झिया आणि परवेझ यांच्या मते हे कुरआनच्या मार्गदर्शनाच्या अगदी उलटे  आहे जे, इतर धर्मातील श्रद्धांना गौण लेखण्यास नकार देते. काही अभ्यासकांच्या हे लक्षात आले आहे की, अनेक मदरशांतील २०१९ किंवा २०२० मधील अभ्यासक्रम हा अगदी सहजरित्या १९२० किंवा १८७० च्या काळातील मदरशांच्या अभ्यासक्रमाद्वारे बदलला जाऊ शकतो. ‘या सगळ्या घडामोडीत एक सातत्य राहिले आहे जे कुरआनच्या संदेशाचा अनादर  करते. हा पवित्रग्रंथ मानवजातीला विचार करण्याचे, संशोधन करण्याचे आणि आत्मचिंतन करण्याची शिकवण देतो. परंतु, मदरसे मात्र विद्यार्थ्यांना कुरआनवरच लक्ष केंद्रित करून ते  मुखोद्गत करण्याची शिकवण देतात आणि त्याबाबत कोणताही प्रश्न विचारण्याची अनुमती मात्र देत नाहीत. जरी कोणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला बंडखोरी मानली  जाते; विद्यार्थ्याने फक्त त्यांच्या नियमांशी बांधील राहण्याची अपेक्षा केली जाते.’
आपल्या समजुतीप्रमाणे शिक्षण ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. परंतु, भारतीय मदरशे अजूनही काळासोबत पुढे आलेले नाहीत. अनेक मदरशांमध्ये कुरआनवरील टीका पाहात असताना  १४ व्या शतकातील इब्ने कथीर यांच्या ग्रंथांचाच आधार घेतला जातो. ‘भारतीय मदरशांच्या निश्चल जगतात विद्यार्थ्यांनी ओळींवर बोट ठेऊन, डोक्यावर टोपी घालून कुरआन वाचावे  आणि त्याचे पाठांतर करावे एवढीच अपेक्षा केली जाते, ज्यामुळे त्यातील थोडासा अर्थ आतपर्यंत पोचतो, इथे कुरआनमधील एकाही सूरहचा नीट अर्थ देखील माहीत नसलेल्या हाफिज-ए- कुरआनचे पठण केले जाते, यात कसलेच आश्चर्य नाही,’ यावरही लेखकांनी प्रकाशझोत टाकला आहे. लेखकांच्या मते, १२व्या शतकापर्यंत अनेक मुस्लिम समाजाने वैज्ञानिक शिक्षण,  संशोधन आणि शोध यात अग्रभागी राहून अनेक तत्वज्ञ, गणितज्ञ, वैद्य आणि इतिहासतज्ज्ञ निर्माण केले, ज्यांचे ज्ञान प्रायोगिक पद्धतीवर आधारलेले होते आणि आजही आधुनिक  विज्ञानाचा तो एक अविभाज्य भाग आहे. याउलट, आज भारतातील बहुसंख्य मदरसे मात्र विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर आणि इंटरनेटची सुविधा देखील पुरवत नाहीत. भारतातील बहुसंख्य  मदरशांना भेडसावणारी आणखी एक प्रमुख समस्या म्हणजे निधी. अनेक इस्लामिक शाळा या देणगीतून जमा होणाऱ्या पैशावर अवलंबून आहेत. अगदी कडक उन्हाळा आणि कडाक्याच्या थंडीच्या दिवसांतही अनेक निवासीशाळांतील विद्यार्थी हे जमिनीवरच झोपतात.
अनेक शाळातून, जिथे ४० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असते तिथे ४० पेक्षा जास्त विद्यार्थी हे समोर पवित्र ग्रंथ ठेवून त्यावर ओणवे होऊन वाचत बसलेले असतात आणि  उन्हाच्या गरम झळांपासून थोडासा दिलासा म्हणून फक्त दोन पातीचे दोन पंखे त्यांच्या डोक्यावर गरगरत असतात. थंडीच्या दिवासांत एक फाटकी रग विद्यार्थ्यांना दिली जाते, जी  स्वच्छ धुवून जमिनीवर अंथरण्यास सांगितली जाते. रात्रीदेखील विद्यार्थी याच रगवर एकामागे एक असे एका ओळीत झोपी जातात. या निवासीशाळांमधून खाजगी किंवा वैयक्तिक आयुष्य या संकल्पनेची जाणीव देखील या विद्यार्थ्यांना होत नाही. मदरशांमधून शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे गरीब कुटुंबातून आलेले असतात.
अनेक मदरशे अधिकृतरित्या नोंदणी न करताच चालवले जातात, अगदी ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत आणि ज्यांचा इतिहास देखील अगदी हेवा करण्याजोगा आहे, असे मदरसे देखील  एका विशिष्ट वळणावर पोचले आहेत. झिया आणि परवेझ यांच्या मते, सध्या मदरशांतून शिक्षण घेतलेल्या मुस्लिमांची संख्या ही फक्त एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या चार टक्के इतकी आहे.
याबाबत सरकारची भूमिका आणि हस्तक्षेप अधिक निर्णायक ठरणारा आहे, कारण मदरशांतून शिकून बाहेर पडलेल्या पदवीधर तरुणांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे मदरशांतून बाहेर  पडून पुन्हा मदरसा सुरु करणे किंवा कुठल्यातरी मशिदीत इमाम किंवा मोअज्जन (दिवसातून पाचवेळा श्रद्धेने नमाझ पढणारी व्यक्ती) म्हणून काम करण्यापलीकडे त्यांना दुसरा पर्याय  उपलब्ध नसतो. मदरशांना देखील प्रशिक्षित शिक्षक, पुस्तके, इंटरनेट आणि कम्प्युटर उपलब्ध करून दिल्यास ते देखील आधुनिक बनतील आणि मुख्यप्रवाहात सामील होतील.

(सौजन्य : ओआरएफ)

- रशीद किडवाई

अल्बेरुनी हा मध्ययुगीन मुस्लिम दार्शनिक. भारतीय सभ्यतेचा, समाजाचा इतिहास त्याने ‘किताबुल हिंद’ या ग्रंथातून मांडला आहे. जगातल्या अनेक देशांत हा ग्रंथ भारतीय सभ्यतांच्या  अभ्यासासाठीचे महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. हा अल्बेरुनी जेव्हा भारतात आला त्या वेळी त्याने भारतातल्या अनेक धर्मांना व त्याच्या संस्कृतींना पाहिले. त्यातला परस्परसंवाद पाहून  तो भारतावर प्रेम करायला लागला. त्याने भारतीय समाजाला भिन्न संस्कृतींचा एकात्मिक संघ ठरवले. जातींच्या उतरंडीत होणाऱ्या शोषणाला अधोरेखित करत त्याला भारतीयांच्या  जीवनाचे वैशिष्ट्य संबोधून त्यातली सौंदर्यस्थळे त्याने टिपली. भारतीयांच्या चालीरीती, लोकव्यवहार, भाषा, परंपरा, अवघ्या काही मैलांवर आढळणारा त्यातला बदल त्याला महत्त्वाचा  वाटला. म्हणून अल्बेरुनीला भारत हा देश निरनिराळ्या संस्कृतीचा आश्रयदाता वाटला. भारताला ‘संस्कृतींची माता’ ठरवण्याच्या जवळपर्यंत तो पोहोचला.
अनेकेश्वरवाद आणि एकेश्वरवाद, ईश्वरवाद आणि निरिश्वरवाद, निसर्गपूजन आणि ईश्वराच्या परलौकिक कल्पना, प्रेषितांचा सेमेटिक व जीवनव्यवहारातून जन्मलेला नॉनसेमेटिक धर्म  अशा परस्परविरोधी धर्मांची, पंथांची भारत ही जन्मभूमी... आश्रयभूमी. भारतात मानवी जीवनाच्या सभ्यतांमधल्या संघर्षाचा इतिहास खूप छोटा आहे. त्यामुळेच अल्बेरुनी हा दार्शनिक  भारतात सुखावला, स्थिरावला. त्याने इथे राहून ‘किताबुल हिंद’सारखे अजरामर ग्रंथ लिहीले. भारतीय संस्कृतीची सौंदर्यस्थळे त्याने आपल्या साहित्यातून जगासमोर आणली. पण त्याला  त्याकाळी धर्मावरून या देशात पुढे संघर्ष उद्भवतील, माणसांच्या झुंडी निर्माण होतील, धर्मभिन्नतेवरून माणसे माणसांनाच ठेचतील याची कल्पना कुणी दिली असती तर... तो भारतात  थांबला असता? भारताच्या सांस्कृतिक सौंदर्याने तो मोहित झाला असता? कुणास ठाऊक कस्रfचत त्याने भारतातील वास्तव्यही नाकारले असते. कस्रfचत त्याने भारतीय संस्कृतीची  सौंदर्यस्थळे आपल्या ग्रंथातून मांडलीच नसती.
पण हा अल्बेरुनी भारतात राहिला, भारतीय संस्कृतीचे गौरव आपल्या लिखाणातून करत राहिला. अखेरीस त्याने भारतीय उपखंडातच चिरनिद्रा घेतली. काळाने पुढे पावलं टाकली. पुढे भारताला काळाच्या प्रवासात मैलाचा दगड नव्हे तर एक माणूस सापडला. इतिहासातला ‘सच्चा माणूस’ म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल तो अमीर खुसरो. या खुसरोलाही भारताने वेड  लावले. भारताच्या सांस्कृतिक सुगंधाने खुसरो मोहित झाला. त्याच्यावर भारताची मोहिनी इतकी पडली की त्याने या देशाला ‘बहिश्त ए बर जमीन’ म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले. हा  देश माझा आहे, असे तो गौरवाने सांगू लागला. (हस्त मेरा मौलीद व मावा वतन) त्याने भारतावर प्रेम करणं हे माझं धार्मिक कर्तव्य आहे, असं सांगताना लिहिलं- ‘दींज रसूल आमदाहे  कोई ज मरा दिन’. पण या देशात धर्मावरून भेद केला जातोय, हे त्याला बोचू लागलं. हा देश इतका सुंदर असताना तिथं असं काही घडणं योग्य नाही. त्याच्या या वेदना, हा विचार  त्याने आपल्या कवितेतून मांडल्या.
‘बरुं शुद दुई अज सरे तुर्क व हिन्दू,
के हिन्दोस्थान बा खुरासा यके खुद’
त्याने भारताला माणसांचा देश म्हटले. इथे तुर्क व हिंदू या भेदाच्या भिंती गळून पडतात. भारताबाहेरून भारतात परतल्यानंतर शेकडो वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या प्रियकरांना जितका  आनंद होतो तितकाच आनंद आपल्याला होत असल्याचे त्याने सांगितले.
‘गर वतन अज हिंद हासिल-ए-ऊ
बाज ब फिरदौस शुदी मंजिल-ए-ऊ’

हा देश माणसांचा राहावा, अखेरपर्यंत टिकावा अशी त्याची मनोकामना. यासाठी तो इश्काचा काफीर व्हायला निघाला. ‘काफिरे इश्क मन मुसलमानी मन दरकार निश्त’ म्हणत त्याने मी  इश्काचा काफीर आहे मला मुसलमानीची गरज नाही. माणसांवर प्रेम करणं ही माझी ईश्वरनिष्ठा असल्याचे नमूद केले. या खुसरोने ज्या देशासाठी शब्दांची, गीतांची, संगीताची पिरी,  फकिरी केली अशा खुसरोला या देशाने धर्मभिन्नतेवरून आपल्या सांस्कृतिक वारशातून तिलांजली दिली तर? हा देश माणसांचा देश राहील... हा देश खुसरोच्या कल्पनेतील ‘पृथ्वीवरील  स्वर्ग’ ठरेल? कस्रfचत याचंही उत्तर नाही असंच असेल. ज्या दिल्लीत त्याच्या नव्या शहांकडून आज भारतीयत्वाचा बाजार मांडला जातोय त्याच दिल्लीत खुसरोची कबर आहे.  माणसांच्या  शोषणाविरोधात आवाज बुलंद करणारा सुफी अवलिया हजरत निजामुद्दीन यांच्या मजारसमोर खुसरो विसावलाय. याच खुसरोचे पाय धुऊन त्याचे अमृत पिणारा, काव्यातून  इश्क वाटणारा गालीबदेखील इथून जवळच चिरनिद्रा घेतोय.
‘गालीब तिरे कलाम में क्योंकर मजा न हो?
पिता हूं धोकर खुसरवी शिरी सुखन के पांव’

अल्बेरुनी, निजामुद्दीन, खुसरो, गालिब यांच्या प्रेमाची, त्यागाची, समन्वयाची, परंपरा भारतातील मुस्लिमांच्या सांस्कृतिक इतिहासात प्रत्येक ठिकाणी आढळते. ज्या रामजन्मभूमीवरून  आज हिंदू-मुसलमान समोरासमोर आले, ती अयोध्या जितकी हिंदूच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाची, तितकेच मुस्लिमांच्या धार्मिक इतिहासात त्या शहराला महत्त्व आहे. हिंदू  संस्कृतीच्या ग्रंथात अयोध्यानगरी महाप्रलयानंतर मनूने वसवल्याचा दावा केला जातो, तर मुस्लिम, मुहम्मद (स.) यांच्यापूर्वीचे प्रेषित नुह यांनी महाप्रलयानंतर हे शहर स्थापल्याचे  मानतात. काही अभ्यासकांनी नुह हेच मनू असल्याचे म्हटले आहे. नुह यांच्याशिवाय अन्य काही इस्लामी प्रेषितांचे या शहराशी घनिष्ठ नाते आहे. इस्लामी प्रेषित परंपरेत हजरत आदम  हे पहिले तर हजरत शिस दुसरे प्रेषित मानले जातात. या हजरत शिस यांची अयोध्येत दर्गाह आहे. त्यांची तेथे कबर असल्याचे सांगितले जाते. इस्लाम धर्माप्रमाणे, सुफी अध्यात्माच्या इतिहासातदेखील अयोध्येला तीर्थस्थान मानलं गेलंय. १०० हून आधिक सुफींनी या शहरात वास्तव्य केल्याचा इतिहास आहे. त्यापैकी अनेकांच्या कबरी या शहरात आहेत. त्यामुळे अनेक  मुस्लिम कवी, विचारवंत आणि इतिहासकारांनी अयोध्येचा ‘मक्का खुर्द’ म्हणून उल्लेख केला आहे. पवित्र मक्का शहरानंतरचे महत्त्वाचे धार्मिक शहर म्हणून अयोध्येला भारतीय  इस्लामच्या इतिहासात सन्मान दिला जातो.
या अयोध्येच्या विकासासाठी अनेक मुस्लिम बादशहांनी मदत केली. अकबरपासून सुरू झालेला सहिष्णुतेचा हा वारसा अनेक मोगल बादशाहांनी पुढे चालवला. अयोध्या आणि अकबर हा  विषय विस्तृत मांडता येईल इतकी त्याची व्याप्ती आहे. आधुनिक भारतीय धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना मध्ययुगात याच अकबराने मांडली. ‘सुलह कुल’च्या माध्यमातून धार्मिक  समन्वयाचा संघ त्याने स्थापन केला होता. त्याने अनेक धर्मांच्या प्रतिनिधींना त्यात स्थान दिले. त्यांच्याशी चर्चा करून भारतातल्या मानवी समाजाची व्यवच्छेदकता त्याने अबाधित  राखली. हिंदूसाठी त्याने वेगवेगळे कायदे केले. काही जुने कायदे संपवून त्यांच्या अधिकारांची घोषणाही केली. या अकबराने आपल्या दरबारात निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना नवरत्न  म्हणून स्थान दिले. बिरबल, तानसेनसारखे हिंदू या नवरत्न समूहाचे भूषण होते. या नवरत्नातील अबुल फजल याने ‘आईन ए अकबरी’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला  अनेकांनी  मानवतेचा ‘आईन’ (संविधान) म्हटले. हा अकबर, त्याचे नवरत्न, अबुल फजल ते शंभर सुफी, इस्लामचे प्रेषित व त्यांचे अयोध्येशी असलेले नाते वर्तमान मुस्लिम समाजाच्या कोणत्या  भारतीयत्वाला अधोरेखित करतात. सावरकर भारतीय असण्यासाठी या भूमीला पुण्यभू मानणं महत्त्वाचं आहे, असे निक्षून सांगतात. अयोध्या आणि मुसलमान, खुसरो, निजामुद्दीन यांचा  हा इतिहास या देशाला कोणते धार्मिक पावित्र्य प्रदान करतोय, त्याला पुण्यभू ठरवतोय? मग मुस्लिमांना त्यांच्या या पुण्यभूपासून पारखे करणे योग्य आहे का? याचा विचार  सावरकरांचा गौरव करणाऱ्या वर्तमान शहांकडून केला जाणार आहे की नाही?
अकबराप्रमाणे दक्षिणेतही भारताच्या गंगा जमनी संस्कृतीचे अनेक शिलेदार जन्मले. सरस्वतीची आरती लिहिणारा इब्राहिम आदिलशहा हा तर हिंदूच्या श्रध्देचा विषय ठरला. हिंदूंनी  त्याला ‘जगद्गुरू’ ही पदवी दिली. भारतीय संगीतांच्या सुरांवर आधारित इमारती त्याने बांधल्या. ‘नवरसपूर’ ही कलानगरी त्याने वसवली. हिंदूच्या साप्ताहिक प्रार्थनेचा दिवस म्हणून  त्याने शुक्रवारची साप्ताहिक सुटी रद्द करून गुरुवारी दिली. इब्राहिमचे हे आदिलशाही राजघराणे ज्या बहामनींच्या अस्तानंतर स्थापन झाले त्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी होता.  हसन हा साधा नोकर भारतात आश्रयाला आला. काही काळ तो गंगू ब्राह्मणाकडे चाकरीला होता. पुढे तो राजपदावर पोहोचला त्या वेळी त्याने या गंगू ब्राह्मणाची स्मृती जपत आपल्या  नावापुढे त्याचे नाव लावले. हा हसन असो किंवा आदिलशाहीचा संस्थापक युसूफशहा अथवा निजामशाहीचा काही काळ प्रमुख राहिलेला मलिक अंबर यापैकी कुणी गुलाम म्हणून तर   कुणी आश्रित म्हणून भारतात आले. या आश्रितांना भारताने राजपदाचा मान दिला. गुलामांना राजा करणारी, आश्रितांना सन्मान देणारी ही भारतीय संस्कृती व त्या संस्कृतीवर निष्ठा  ठेवणारे, बहामनी, आदिलशहा, अंबर आपण भारतीय इतिहासातून वगळू शकतो काय? त्यांनी घडवलेलं मुस्लिमांचं भारतीयत्व आपण दुर्लक्षित करू शकतो?
दक्षिणेत हैदर अली टिपू सुलतान यांच्या राजवटीलाही गंगा जमनी इतिहासात महत्त्व आहे. हैदरअली याने नायरांच्या अन्यायातून दलितांना मुक्ती दिली. त्याने अस्पृश्यांच्या सामाजिक  हक्क, अधिकारांसाठी अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा केला. त्याच्यानंतर टिपू सत्तेत आला. इंग्रजांच्या भांडवली वसाहतवादाला त्याने प्रखर विरोध केला. चौथ्या म्हैसूर युध्दात त्याला  वीरमरण आले. त्याच्या मृत्यूची बातमी श्रीरंगपट्टणमच्या सामान्य घरातील एका ब्राह्मण मुलीला समजली. त्या वेळी ती युध्दाचा कोणताही अनुभव नसताना आपल्या राजाच्या मृत्यूचा  बदला घेण्यासाठी, घरातली तलवार घेऊन तडक रणांगणात उतरली. लढता–लढता तिलाही वीरमरण आले. टिपूच्या मृतदेहाजवळ तिचाही मृतदेह आढळून आला. हे हैदरअली, टिपू आणि  त्यांच्यासाठी लढणारी ब्राह्मण मुलगी हे भारताच्या गंगा जमनी संस्कृतीचे शिलेदार आहेत. या तिघांनाही वगळून त्यांच्या आदर्शातून घडत गेलेल्या मुस्लिम समाजावर भारतीयत्वाची  वर्तमान परिमाणं लादणं कितपत योग्य असेल?
या गंगा जमनी संस्कृतीची सारी पाळेमुळे खणून काढण्याचा चंग आपण बांधलाय. मागच्या काही दिवसांत भारतातल्या अनेक मध्ययुगीन इमारती आपण उद्ध्वस्त केल्या. वली गुजराती   हा गुजराती अस्मितेचा प्रतीक ठरलेला कवी. या मुस्लिम कवीची कबर रस्त्याच्या विस्तारीकरणाचे कारण देऊन उद्ध्वस्त करण्यात आली. त्याने लिहिलेल्या गुजरातच्या गीतांकडे दुर्लक्ष  करण्यात आले.
‘गुजरात के फिराख से है खार खार दिल,
बेताब है सिने में अतिश बहार दिल,
मरहम नहीं इसके जख्म का जहां में,
शम्शीर ए हिङ्का से जो हुआ है फिगर दिलां’

वरीलप्रमाणेच दखनी काव्याचा, आद्यकवी मोहंमद कुली कुतुबशाहच्या गोवळकोंड्याच्या मागच्या काही भिंती पाडण्यात आल्या. कुतुबशाही वास्तू चारमिनारला खेटून आपण आपला  धर्मवाद उभा केलाय. मलिक अंबरने स्थापन केलेल्या औरंगाबादेत मागच्या पाच – दहा वर्षांत अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक शहरांची नावे बदलण्यात आली. भारतीय  संस्कृतीच्या बहुसंख्यकीकरणाच्या अजेंड्यातून जगद्गुरू इब्राहिम आदिलशाहचा बिजापूर, हसन गंगू बहामनीची गुलबर्गा ही राजधानीदेखील सुटू शकली नाही. भारताचे ऐतिहासिक चारित्र्य  हिंदू आणि मुस्लिमांच्या समान योगदानातून घडलंय. पण आता आपण यातून मुस्लिमांना वगळण्याचं ठरवलंय. त्यांच्या संस्कृतीची पाळेमुळे खणून भारतीय मुस्लिमांची भारतीय  संस्कृतीतील प्रतीकं आपण नष्ट करत चाललोय. मुस्लिमांच्या संस्कृतीला, त्यांना उपरे ठरवण्याचा, त्यांच्या भारतीयत्वाच्या खुणा नष्ट करण्याचा हा राजकीय डाव मुस्लिमांच्या विरोधात  नसून तो भारताच्या विरोधात आहे.
भारताच्या मानवी चारित्र्याला या राजकीय कुरापती कलंकित करत आहेत. त्यातही दुर्दैव हा आहे की, हा भारत जेव्हा घडत होता, पारतंत्र्याच्या काळ्याकभिन्न अंधारातून उदयाला येत  होता, त्या वेळी कोणतीही भूमिका न घेणारे आज भारतीयत्वाची व्याख्या करत आहेत. त्या समाजाला भारतीयत्व सिध्द करायला सांगत आहेत, ज्या समाजाने बहादूरशहा जफरसारखा  १८५७ च्या उद्रेकाचा नेता जन्माला घातला, ज्याने भारतासाठी आपले राजपुत्र कुर्बान केले, त्याला स्वत:ला राजवैभव त्यागून रंगूनमध्ये वैफल्यात मरण पत्करावे लागले. त्याच्या मुली  अन्नान दशा होऊन मेल्या. आज भारतीयत्वासाठी सजवलेला हा बाजार बहादूरशहाच्या त्यागाची विटंबना करत नाही का? सांप्रदायिकता कोणत्याही स्वरूपात येवो ती वाईटच. त्याला  देशभक्तीचे वेष्टन लावले तरीही सांप्रदायिकतेला नैतिकता प्रदान करता येत नाही. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर बॅ. जिन्ना म्हणाले होते, ‘हर एक हिंदुस्थानी मुसलमान को अपनी  सारी उम्र अपने हिंदुस्थानी होने का सबुत देते हुए गुजारनी पडेगी.’ दुर्दैवाने फाळणीचे एक नायक ठरलेल्या बॅ. जिना यांचे उद्गार खरे ठरवण्याची एकही संधी आजचे राज्यकर्ते सोडत  नाहीत. हिंदूमध्ये मुस्लिमांच्या भारतीयत्वाची गफलत पसरवून भाजप, संघ आणि संभ्रमित काँग्रेस भारताच्या भारतत्वावर आघात करत आहेत.

- सरफराज अहमद
सदस्य गाजीउद्दीन रिसर्च सेंटर सोलापूर.
मो.: ९५०३४२९०७६

‘एनआरसी’ व ‘सीएए’च्या विरोधात देशभर आक्रमक आंदोलने सुरू असतानाच मोदी सरकारने देशात अखेर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) केली जाईल अशी गेल्या मंगळवारी  घोषणा केली. एनपीआर अंतर्गत नागरिकांची सर्व माहिती गोळा केली जाईल. यात प्रत्येक व्यक्ती नाव, त्याच्या पालकांची जन्मतारीख व ठिकाण यांची नोंद घेतली जाईल. पण यासाठी  कोणतेही कागदपत्र वा बायोमेट्रिक पुरावे देण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:ची जी माहिती देईल ती ग्राह्य धरली जाईल व त्यावरच विश्वास ठेवला जाईल. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे काम पुढील वर्षी एप्रिलपासून सुरू होईल व ते सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. एकूणच सरकार एनआरसी आणिसीएए बद्दलचे अनेक मुद्दे  जाणूनबुजून स्पष्ट करीत नसल्याचे दिसते. हे कायदे एकत्र लागू झाले तर भारतीय मुस्लिमांना अधिक छळवादी कायदेशीर प्रक्रियांना सामोरे जावे लागेल. परदेशी मुस्लिम आणि इतर  नागरिक जे भारतात आले आहेत त्यांना कोणत्या पद्धतीने बाहेर घालवले जाईल याचे स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही. त्याचप्रमाणे इतर राजकीयदृष्ट्या नको असलेले समाज,  माणसे, संघटना ते अनेक इतर जातीधर्माचे लोकांना भविष्यात निश्चितच झळ बसेल. कारण कायद्यात तसा काहीही उल्लेख नाही. या निर्णयामुळे मुस्लिमांना दुय्यम नागरिक  ठरविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होईल. म्हणूनच संविधानाच्या कलम १४ च्या आणि इतर मूलभूत अधिकारांच्या बाबतीत जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यांची पायमल्ली  झाल्याशिवाय राहाणार नाही. एकापाठोपाठ एक बदलाचे वादग्रस्त निर्णय घेऊन त्रस्त असलेल्या जनतेला आर्थिक आणीबाणीमध्ये लोटणाऱ्याया काळात सरकार भीती आणि  असुरक्षिततेचा धुरळा देशभरात उडवू पाहात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘बेकायदेशीर नागरिकांना डिटेंशन सेंटरमध्ये डांबणार असल्याच्या  अफवा काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी पसरवताहेत. मात्र देशात एकही डिटेंशन सेंटर उघडलं गेलेलं नाही,’ असा दावा केला होता. तरी प्रत्यक्षात देशभरात ४ राज्यांमध्ये डिटेंशन सेंटरर्सचे  बांधकाम सुरु झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना नोटीस बजावल्या होत्या. बंगळुरु आणि गुवाहाटी शहरात डिटेंशन सेंटरचे बांधकाम पूर्ण झाले असून बंगळुरुचे  सेंटर बेकायदेशीर नागरिकांना डांबण्यासाठी सज्ज आहे. कोलकात्याजवळ डिटेंशन वॅâम्पसाठी जागा शोधल्याची माहिती पश्चिम बंगालचे मंत्री उन्मल बिसारा यांनी पीटीआयशी बोलतांना   दिली आहे. महाराष्ट्रात नवी मुंबईतल्या नेरुळ इथे डिटेंशन सेंटरसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश सिडकोला देण्यात आले होते. प्रधान गृह सचिव अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती  दिली आहे. या भाषणाने नोटबंदीच्या काळात मोदींनी केलेल्या भाषणांची आठवण झाली. त्या वेळी त्यांनी ज्या पोटतिडकीने आणि आक्रमकपणे भाषणे केली, तसेच त्यांचे हेही भाषण  झाले. नोटबंदीच्या काळात देशभर अत्यंत अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले होते. बँकांपुढे पैशांसाठी पहाटेपासून लोकांच्या रांगा लागायच्या. या रांगांमुळे अनेकांना आपले प्राणही  गमवावे लागले होते. लोकांच्या संयमाची परिसीमा झाली होती. त्यावेळी मोदींनी जो भरवसा दिला होता किंवा जे जे दावे केले होते, ते तद्दन बोगस होते हे नंतर प्रत्येकाने अनुभवले.  नोटबंदीच्या काळातील त्यांच्या भाषणाचा फोलपणा सिद्ध व्हायला काही महिन्यांचा अवधी जावा लागला. पण रामलीला मैदानावरील त्यांच्या भाषणातील खोटेपणा जागच्याजागी आणि  लगोलग लक्षात आला आहे. त्यामुळे एनआरसी व नागरिकत्व विधेयकाविषयीचा लोकांच्या मनातील संशय दूर होण्याऐवजी तो आणखीनच बळावला आहे. मोदींचे दावे त्याच दिवशी काँग्रेस व अन्य कार्यकत्र्यांनी मोदी-शहांच्याच पूर्वीच्या भाषणांच्या व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर टाकून खोटे असल्याचे दाखवून दिले. अक्षरश: डझनाहून जास्त वेळा अमित शहा  यांनी संसदेसह विविध ठिकाणी देशभर एनआरसी लागू केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या प्रत्येक भाषणात एनआरसीचा मुद्दा आहेच. सुधारित  नागरिकत्व कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन या दोन मुद्द्यांवरून देशात सुरू असलेला गोंधळ अजूनही शमलेला नाही. दोन्हींच्या विरोधात मोर्चे, जाळपोळ, हिंसाचार होत  असतानाच दुसऱ्या बाजूने समर्थन मोर्चे सुरू झाले आहेत. दोन्ही घटक समोरासमोर आल्यास त्यास आणखी गंभीर वळण लागू शकते. विशेषत: पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश,  आसाममध्ये ती शक्यता अधिक दिसते. हिंसाचाराने २० पेक्षा जास्त बळी घेतले. ते न वाढण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची आहे. हिंसाचाराला प्रारंभ झाल्यानंतर भारतातील  लोकशाहीची परंपरा व भवितव्य याबद्दल परदेशातही बोलले जाते. देशात आजही उमटणारी मत-मतांतरे गंभीर आणि महत्त्वाची आहेत की, ज्याचा विचार सरकारने भविष्यात असे  महत्त्वाचे निर्णय घेताना केलाच पाहिजे.

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या मनुष्याने तुम्हाला विश्वासू समजून आपली ठेव तुमच्याजवळ ठेवली आहे ती त्याला परत  करा. जर एखाद्या तुमच्याशी विश्वासघात केला तर तुम्ही त्याच्याशी विश्वासघात न करता आपली वस्तू किंवा ठेव वसूल करण्यासाठी दुसऱ्या वैध पद्धतीचा अवलंब करा.’’ (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यवसायाचे दोन भागीदार एकमेकांशी विश्वासघात करीत  नाहीत तोपर्यंत मी त्यांच्याबरोबर राहतो, परंतु जेव्हा एक भागीदार दुसऱ्या भागीदाराशी विश्वासघात करतो तेव्हा मी त्या दोघांमधून निघून येतो आणि शैतान त्या ठिकाणी जातो.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण

व्यवसायात भागीदार लोक जोपर्यंत एकमेकांशी विश्वासघात करीत नाहीत तोपर्यंत मी त्यांची मदत करतो, त्यांच्यावर कृपा करतो आणि त्यांच्या व्यवसायात समृद्धी देतो व आपसांतील  संबंध दृढ करतो; परंतु जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याची वृत्ती बिघडते आणि विश्वासघात करू लागतो तेव्हा मी आपल्या मदतीचा व कृपेचा हात आखडता घेतो आणि मग शैतान तेथे  येतो. तो त्यांना आणि त्यांच्या व्यवसायाला विनाशाच्या मार्गावर नेतो.

शेती आणि बागकाम
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मुस्लिम शेतकरी आहे अथवा बागकाम करतो आणि त्यातून चिमणीने किंवा एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या प्राण्याने खाल्ले तर ते त्याच्याकरिता दानधर्म (सदका) ठरते.’’ (हदीस : मुस्लिम)

अतिरिक्त पाणी साठविणे
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तीन प्रकारचे लोक आहेत ज्यांच्याशी अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे पाहणार नाही. पहिला प्रकार त्या  लोकांचा आहे ज्यांनी आपले व्यापारी सामान विकताना खोटी शपथ घेतली होती की त्या सामानाची जेवढी किंमत सांगितली गेली आहे त्यापेक्षा अधिक किंमतीला मी ते खरेदी केले  आहे. दुसऱ्या प्रकारच्या लोकांनी अस्रनंतर खोटी शपथ घेऊन आणि त्याद्वारे एखाद्या मुस्लिम व्यक्तीचे सामान घेतले. तिसऱ्या प्रकारच्या लोकांनी अतिरिक्त पाणी साठवून ठेवले.  अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी म्हणेल, मी तुझ्यासाठी माझी कृपा रोखून धरीन जसे तू ते अतिरिक्त पाणी साठवून ठेवले जे तू निर्माण केलेले नव्हते. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

मजुराची मजुरी
माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मजुराचा घाम वाळण्यापूर्वी त्याची मजुरी द्या.’’ (हदीस : इब्ने माजा)

स्पष्टीकरण
कारण मजूर त्याच मनुष्यास म्हणतात ज्याला आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी रोज कष्ट करावे लागते. जर एखाद्याने त्याची मजुरी देण्याचे टाळून दुसऱ्या दिवशी दिली  अथवा दिलीच नाही तर तो संध्याकाळी आपले पोट कशाने भरेल आणि आपल्या मुलाबाळांना काय खायला घालील?

(६७) हे पैगंबर (स.), जे काही तुमच्या पालनकत्र्याकडून तुमच्यावर अवतरले आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही असे केले नाही तर पैगंबरत्वाचे कर्तव्य पार पाडले नाही. अल्लाह  तुम्हाला लोकांच्या दुष्टतेपासून वाचविणारा आहे. खात्री बाळगा की तो काफिरांना (विरोधक) (तुमच्या विरोधात) यशाचा मार्ग मुळीच दाखविणार नाही.
(६८) स्पष्ट सांगून टाका, ‘‘हे ग्रंथधारकांनो, तुम्ही कदापि कोणत्याच मुलाधारावर नाही जोपर्यंत तौरात व इंजिल आणि त्या इतर ग्रंथांवर तुम्ही दृढ राहात नाही जे तुमच्याकडे तुमच्या पालनकत्र्याकडून अवतरित  केले गेले आहेत.’’९७ खचितच हा आदेश जो तुमच्यावर तुमच्या पालनकत्र्याकडून. अवतरित केला गेला आहे तो यांच्यापैकी बहुतेकांची प्रतारणा व इन्कार अधिक वाढवेल.९८ पण  नाकारणाऱ्यांच्या स्थितीबद्दल काही खेद करू नका.
(६९) (खात्री बाळगा की येथे कुणाचीही मक्तेदारी नाही) मुस्लिम असोत अथवा यहुदी, साबी असोत अथवा खिस्ती, जो कोणी अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा ठेवील आणि प्रामाणिक आचरण करील नि:संशय त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भयाला स्थान नाही, आणि तो दु:खी होणार नाही.९९
(७०,७१) आम्ही बनीइस्राईलकडून दृढवचन घेतले आणि त्यांच्याकडे  अनेक पैगंबर पाठविले परंतु जेव्हा कधी एखादा पैगंबर त्यांच्या मनोवासनेविरूद्ध काही घेऊन आला तेव्हा त्यांनी काहींना खोटे ठरविले आणि काहींना ठार केले. आणि आपल्याठायी अशी  समजूत करून घेतली की कोणताही उपद्रव उद्भवणार नाही, म्हणून आंधळे आणि बहिरे बनले. तरीही अल्लाहने त्यांना माफ केले तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक लोक अधिकच आंधळे आणि  बहिरे बनत गेले. अल्लाह त्यांची ही सर्व कृत्ये पाहात राहिलेला आहे.
(७२) खचितच कुफ्र (इन्कार) त्या लोकांनी केला ज्यांनी म्हटले, अल्लाह मरयमपुत्र-मसीह (येशू) च आहे. वास्तविक पाहता मसीह (अ.) ने सांगितले होते, ‘‘हे बनीइस्राईल अल्लाहची  बंदगी (भक्ती) करा जो माझा व तुमचासुद्धा पालनकर्ता आहे.’’ ज्याने एखाद्याला अल्लाहसमवेत सहभागी ठरविले त्याच्यावर अल्लाहने स्वर्ग प्रतिबंधित केले आणि त्याचे स्थान नरक   आहे व अशा अत्याचाऱ्यांचा कोणीच सहाय्यक नाही.
(७३) खचितच द्रोह (कुफ्र) केला त्या लोकांनी, ज्यांनी म्हटले की, अल्लाह तिन्हींपैकी एक आहे. खरे पाहाता एकमेव अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही. जर हे लोक आपल्या या गोष्टीपासून परावृत्त झाले नाहीत तर यांच्यापैकी ज्याने द्रोह (कुफ्र) केला आहे त्याला कठोर शिक्षा दिली जाईल.
(७४) मग काय हे लोक अल्लाहपाशी पश्चात्ताप व्यक्त करणार नाहीत आणि त्याच्याजवळ माफी मागणार नाहीत? अल्लाह फार क्षमाशील व दया करणारा आहे. (७५) मरयमपुत्र येशू  याशिवाय काही नाही की तो फक्त एक पैगंबर होता. त्याच्यापूर्वीदेखील अनेक पैगंबर होऊन गेले होते. त्याची आई एक सत्यवादी स्त्री होती आणि ते दोघे (इतर माणसांप्रमाणेच) अन्न  भक्षण करीत होते. पाहा, आम्ही कशाप्रकारे त्यांच्यासमोर सत्यवचने स्पष्ट करतो, शेवटी पाहा ते कुठे उलट परतून जातात.?१००




९७) तौरात आणि इंजिल (बायबल) यांना कायम करणे म्हणजे सत्यानिशी त्यांचे पालन करणे आणि त्यांना आपले जीवनविधान बनविणे. येथे ध्यानात चांगल्याप्रकारे ठेवले पाहिजे की  बायबलच्या पवित्र पुस्तकाच्या संग्रहात एक प्रकारचे लेख ते आहेत जे यहुदी आणि खिस्ती लोकांनी आपल्या मनाप्रमाणे लिहिले आहेत आणि दुसऱ्या प्रकारचे लेख ते आहेत जे  अल्लाहचे आदेश तसेच आदरणीय पैगंबर मूसा, इसा (अ.) आणि इतर पैगंबरांचे कथनाच्या स्वरुपात वर्णित आहेत. त्यात असे म्हटले गेले आहे की अल्लाह सांगतो किंवा अमुक अमुक  पैगंबर सांगतो. यापैकी पहिल्या प्रकारच्या लेखांना वेगळे करून फक्त दुसऱ्या प्रकारच्या लेखांना अभ्यासिले तर स्पष्ट होते की कुरआन आणि त्यांच्या शिकवणीत काहीच अंतर नाही. हे  दुसऱ्या प्रकारचे लेख, अनुवादकांमुळे, निरस्तकांमुळे व टीकाकारांमुळेसुद्धा आज सुरक्षित राहिलेले नाहीत. परंतु तरीही मनुष्याला खात्री पटते की यात विशुद्ध एकेश्वरत्वाचीच शिकवण दिली आहे ज्याकडे कुरआन बोलवित आहे. ती श्रद्धा आहे जी कुरआन सांगत आहे आणि तीच जीवनपद्धती सांगितली गेली आहे जी कुरआन सांगत आहे. वास्तविकता आहे की यहुदी  आणि खिश्चन त्याच शिकवणीवर कायम राहिले असते जिला या बायबलमध्ये अल्लाह आणि पैगंबरांद्वारा सांगितले गेले आहे. अशा स्थितीत ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या  पैगंबरत्वाच्या वेळी सत्यमार्गी आणि एकेश्वरवादी बनलेला लोकसमुदाय असता. त्यांना कुरआन मध्ये तोच प्रकाश दिसला असता जो प्रकाश पूर्वीच्या ईशग्रंथात होता. यास्थितीत  त्यांच्यासाठी (यहुदी आणि खिश्चन) पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुकरण करण्यासाठी धर्मपरिवर्तनाचा प्रश्न उद्भवला नसता. त्यांना तर पूर्वीचाच मार्ग चालण्यासाठी मोकळा झाला असता.
९८) हे ऐकून शांत मनाने विचार करण्याऐवजी आणि वास्तविकतेला समजण्याऐवजी जिद्दीने आणखीन कडक विरोध सुरु करतील.
९९) पाहा, सूरह २ (अल्बकरा) आयत ६२, टीप ८०.
१००) या काही शब्दांत इसा (अ.) यांच्याविषयीच्या ईशत्वाच्या धारणेचे असे स्पष्ट खंडन केले आहे की यापेक्षा अधिक स्पष्ट खंडन आणि स्पष्टीकरण दुसरे असू शकतच नाही. इसा  (अ.) यांच्याविषयी कोणालाही माहिती हवी असेल की वास्तवात ते कोण होते तर या लक्षणांनी स्पष्ट होते की ते फक्त आणि फक्त एक मानव होते. अगदी स्पष्ट आहे की जो एक  स्त्रीपासून जन्माला आला आणि ज्याची वंशावळ आहे; ते मानवी शरीर धारण करून होते तसेच मानवी बंधनात आणि सीमेत सीमित होते. इसा (अ.) हे मानवी गुणांनीसुद्धा परिपूर्ण  होते. ते झोपत, खातपीत, थंडी आणि उष्णता त्यांना जाणवत होती. त्यांना शैतानद्वारा अजमावलेसुद्धा गेले. त्यांना कदापि बुद्धिवादी मनुष्य ईशत्व बहाल करणार नाही किंवा ईशत्वात   भागीदार ठरवणार नाही. परंतु मानवी बुद्धीची भ्रष्टता पाहा की तो इसा (अ.) यांना ईश्वर (खुदा) मान्य करण्यास अडून बसला आहे. मानवी बुद्धीच्या भ्रष्टतेचा हा अनोखा चमत्कार आहे की खिश्चन स्वत: आपल्या धर्मग्रंथात इसा (अ.) यांच्या जीवनाला स्पष्ट रूपाने एक मनुष्याचे जीवन म्हणून प्राप्त् करतात. परंतु तरीही इसा मसीह (अ.) यांना ईशत्वाच्या गुणांनी   परिपूर्ण करण्यासाठी दृढ संकल्प आहेत आणि हट्ट करून बसले आहेत. खरे तर हे लोक त्या ऐतिहासिक महापुरुषाला आणि पैगंबराला (इसा (अ.)) मानतच नाहीत जो अस्तित्वात आला  होता. परंतु त्यांनी स्वत: आपल्या मनोकामना आणि युक्तीने एक काल्पनिक इसा मसीह निर्माण करून त्याला ईश्वर (खुदा) बनवून टाकला आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget