Halloween Costume ideas 2015
Latest Post



‘सबका साथ सबका विकास’ चा बोजवारा

लातूर (सालार शेख)- अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव  व तसेच त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी असलेल्या योजांची माहिती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सूचनेप्रमाणे दरवर्षी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री पंधरा कलमी कार्यक्रम आखण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी ” सबका साथ विकास” ची जी घोषणा केली आहे त्याचा मात्र पुरता बोजवारा उडला आहे. जरी हा दिवस प्रशासन साजरा करीत असले तरी तो नाममात्रच. कारण जरवर्षी योजना राबवू असा निर्धार करतात मात्र अल्पसंख्यांक विकासावर आलेला निधीही खर्च होत नाही. त्यामुळे शासकीय अधिकार्‍यांची मानसिकताच मुळात संशयास्पद असल्याचे समाजातून बोलले जात आहे.
       महाराष्ट्रात अल्पसंख्यांक योजनावर अंमलबजावणी होत नसल्याची बाब माहिती अधिकारद्वारा प्राप्त माहिती वरून समोर आली आहे. याचा एम.पी.जे. लातूरच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच सदर प्रकरणी एमपीजेच्या वतीने दोन जनहित याचिका केंद्र व राज्य शासनाच्या विरूद्ध मा. उच्च न्यायालयात दाखल केल्याची माहिती याचिकाकर्ते रजाउल्ला खान यांनी दिली आहे.
       गेल्या अनेक वर्षाचा अनुभव पाहता यंदा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पसंख्यांक दिनाच्या कार्यक्रमावर मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसने बहिष्कार टाकत निषेध व्यक्त केला. कारण लातूर अल्पसंख्यांक बहूल शहर असतानादेखील अल्पसंख्यांकांसाठी आलेला निधी खर्च करण्यात प्रशासन असमर्थ राहिले आहे.
      लातूर जिल्ह्यातील लातूर शहर व उदगीर येथे 2010 साली अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी वसतिगृह मंजूर करण्यात आले. लातूर येथे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मात्र उदगीर शहरात अद्यापही जागा निश्‍चित नसल्याने वसतिगृहाचे काम प्रलंबित आहे. 31 मार्च 2016 रोजी शासनाने लातूर शहरात मुलांच्या वसतिगृहासाठी 3 कोटी 10 लाख व उदगीर शहरात मुलांचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी तब्बल 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. वर्षभरापासून जवळपास 10 कोटींचा निधी धूळ खात पडला आहे. लातूर महानगरपालिका व उदगीरसाठी प्रत्येकी 10 कोटींचा निधी होता. मात्र लातूर महापालिकेने केवळ मुलांच्या वसतिगृहाचा प्रस्ताव (त्रुटीत) दिल्याने पेच निर्माण झाला आहे. इतर कामे प्रस्तावात नसल्यामुळे केवळ 3 कोटी 10 लाख रुपये शासनाकडून देण्यात आले आहेत. अन्य 7 कोटींचे प्रस्ताव मनपा कधी पाठविणार, याकडे लक्ष लागले आहे. अल्पसंख्यांक बहुल शहर म्हणून शासन योजना देत असले तरी अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेची अनास्था असल्याने कामाच्या नावाने ओरड आहे.
उदगीरला जागा मिळेना...
      2010 साली मंजूर झालेल्या मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी उदगीर नगरपालिकेला सात वर्षे लोटले तरी जागा मिळाली नाही. लातूर शहरात दोन वर्षांपासून सुरू असलेले बांधकाम अद्यापही संथगतीने आहे. उदगीरचे काम होईल की नाही, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 12 व्या पंचवार्षिक योजनेत बहुक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत लातूर, उदगीरसाठी प्रत्येकी 10 कोटींची तरतूद होती. त्यात प्रस्तावित कामे लातूरच्या मनपाने अपूर्ण दिली. त्यामुळे मुलांच्या वसतिगृहासाठी केवळ 3 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 28 ऑक्टोबर रोजी खोरी गल्लीतील मनपा शाळा क्र. 6 वसतिगृहासाठी जागा निश्‍चित झाली. या कामाचा निधी जिल्हा प्रशासनाकडे दीड वर्षांपासून पडून आहे. शिवाय, 2008 पासून सुरू करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजनेपासून लाखो विद्यार्थी वंचित आहेत. 2017-18 ची रक्कम अद्याप विद्यार्थ्यांना मिळाली नसल्याचा आरोप मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅण्ड जस्टीस फॉर वेल्फेअरचे जिल्हा सचिव रजाउल्लाह खान यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.
प्रस्ताव प्रलंबित...
लातूर तालुक्यातील वाडी-वाघोली, मुरुड, चांडेश्‍वर, कव्हा, सारसा, बोरी, धनेगाव, शिवणी (खु.) ही आठ गावे अल्पसंख्यांक बहुल आहेत. या ग्रामपंचायतींना क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विकास कामांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार सारसा येथे शादीखाना बांधकामासाठी ग्रामपंचायतीने 15 ऑगस्ट 2016 रोजी ठराव घेऊन रितसर प्रस्तावही दाखल केला. मात्र अद्याप सदरील कामाला मुहूर्त लागलेला नाही. केवळ योजनांची चर्चा होते. प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्याने सदरील योजनेचा बोजवारा उडाला आहे.
एम.पी.जे.चा न्याय व हक्कासाठी सतत संघर्षाचा संकल्प व कोर्टात धाव
पंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रमांवर, एम.एस.डी.पी. योजनांवर, सच्चर समितीच्या शिफारशीवर व शिष्यवृत्ती योजनेवर अंमलबजावणी होत नसल्याची बाब माहिती अधिकाराद्वारे प्राप्त माहिती वरून उघड झाली. अल्पसंख्यांकाच्या प्रती शासनाच्या उदासीन धोरणामुळे अल्पंसंख्यांक समाजाचा विकास खुंटला आहे. म्हणून एम.पी.जे.द्वारा जनहित याचिका क्र. 50/2016 मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, मुंबई व जनहित याचिका क्र. 51/2018 मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद येथे दाद मागण्यात आली आहे. सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनास नोटीस पाठविले आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. अशी माहिती याचिकाकर्ते रजाउल्लाह खान यांनी दिली. एम.पी.जे. या सामाजिक संगघटनद्वारा शासनाचा अल्पसंख्यांक विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करत अल्पसंख्यांक योजनेवर अंमलबजावणीसाठी सतत संघर्ष करण्याचा निर्धार एम.पी.जे. चे जिल्हाध्यक्ष वसी हाश्मी, सचिव रजाउल्लाह खान, जियाभाई खोरीवाले, अ‍ॅड. रब्बानी बागवान, साबेर काजी, डॉ. खालेद काजी, सय्यद मुस्तफा अली, कमरोद्दीन बार्शीकर, बशीर शेख,खिजर काजी, गौसोद्दीन शेख, इनाम शेख, शौकत सय्यद, जुल्फेकार पटेल व अ‍ॅड. मुहम्मद आमेर यांनी व्यक्त केले.

_ मुहम्मद मुस्तफा लांडगे
अहमदनगर
कोणत्याही प्रकारचा देखावा न करता, पारंपारिक व्यवस्थेला फाटा देत, वायफळ खर्च न करता, भारदस्त पत्रिका न छापता, सर्वत्र पसरलेल्या नातेवाईकांना गोळा व त्यांचा गदारोळ न करता, विजेचा लखलखाट, ध्वनिक्षेपाचा कर्कश आवाज न करता, दिमाखी मंडप न उभारता, गाजावाजा नसलेला व नव्या वस्त्रांचे, डिझाईनचे, शिलाईचे भडक व रूबाबदार पोशाखांचे प्रदर्शन न करता, अनेक दिवसांच्या पूर्व तयारीला फाटा देऊन, दुचाकी, चारचाकी वाहनाची उधळण न करता, विवाह खरेदीच्या बस्त्याला डावलून, दिखाऊ पंचपक्वान्नाची, स्नेह भोजनाची लयलूट न करता, आहेर-सप्रेम भेटीचा मागमूस नसलेला, परंपरागत रूढींना चालना न देता, गरीब समाजाला दिलासा देणारा, मानसिक, शारिरीक ताण न देणारा, छुपा छळ न करणारा, एक सुंदर, साधा आणि इस्लामी पद्धतीचा विवाह अहेमदनगरमध्ये नुकताच संपन्न झाला.
      इस्लामी आदेशाची पूर्तता करणारा, दोन कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध स्थापित करणारा, साधेपणाने साजरा झालेला हा विवाह 17 डिसेंबर 2017 रोजी संध्याकाळी मगरीबच्या नमाज नंतर, राजनगर, अहमदनगर येथे वधु पित्याच्या घरी पार पडला. वधू वरांना भविष्यात मंगलमय जीवनाची दुवा देण्यासाठी आप्तेष्ट, समाज बांधव, मित्रवर्ग आणि अनेक हिंदू बांधव ही उपस्थित होते. वधूपिता समााजिक कार्यकर्ते असून ते विद्यावाचस्पती आहेत.आर्किटेक्ट व अन्य विद्याशाखेच्या पदव्यांनी अलंकृत शेख अर्शद महेबूब यांच्या घरी हा साधेपणाचा सोहळा संपन्न झाला. निव्वळ बोलणी करण्यासाठी आलेली वरमंडळींनी कुठलीही पूर्वतयारी न करता निकाह लावून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
      वधू - शाईस्ता अर्शद शेख ही बी.ए. जर्नालिझम आहे. तर वर दानिश शकील शेख हे बी.ई. मेकॅनिकल असून मल्टीनॅशनल कंपनी पुणे येथे कार्यरत आहेत.
      विधिवत एक वकील, दोन साक्षीदारांनी वधूची संमती विचारली, संंमती घेतल्यानतर काझी समोर, जमलेल्या सन्माननीय उपस्थितांसमोर वर दानिश ने अकरा हजार रोख महेर नग्द देत तीन वेळा विवाहास संमती दिली. इस्लाममध्ये लग्नाप्रसंगी वराने वधूस वधुहक्क धन देणे व त्यास संमती देणे अनिवार्य आहे ते दिले. खुत्बा-ए- निकाह मध्ये विशिष्ट अशा कुरआनच्या आयातींचे पठण झाले. मौलाना इर्शाद कास्मी यांनी त्या अरबी आयातींचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण सांगितले. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेल्या विवाहसंबंधी वचनांचे दाखले दिले. विवाह विषयक सद्यःपरिस्थितीच सडेतोड पडताळणी केली. अशा प्रसंगी समाज प्रबोधन झाले. कलंकित हुंडा, दहेज हा प्रकार नव्हता. लग्नाची वेळ तिथी, शुभ-अशुभ गोष्टी नव्हत्या.
      मौलाना इर्शाद कास्मी प्रवचनात म्हणाले, उभयंतांनी ईश्‍वरभय जीवनात बाळगावे जेणेकरून दुश्कर्म होणार नाही. अखिल विश्‍व एक माता पित्यापासून निर्माण होत गेले. ईश्‍वराने दांपत्यजीवन दिले. दोहोंनी परस्पर जीवन व्यतीत करतांना कर्तव्याची जाण ठेवावी. सद्गुण बाळगणारे, सत्कर्म करणारे, ईश्‍वराचे आज्ञाकारी आहेत. यश प्राप्त होण्याची ही गुरूकिल्ली आहे.
      विवाह करणे ही प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची सुन्नत (अनुकरण) आहे. सद्यःस्थितीत मुस्लिम समाजाने ” विवाहास” अतिशय कठीण करून टाकलेले आहे. रूढी, परंपरा, इच्छा, आकांक्षा, मनोकामनांच्या आहारी जाऊन दिवसें-दिवस हा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. यामुळेच कुकर्माचे, व्याभिचाराचे मार्ग मोकळे झाले आहेत. व्याभिचारावर इस्लामने कडक निर्बंध टाकले व जबर शिक्षेची कठोर तरतूद केली. प्रेषित मुहम्मद सल्ल. म्हणाले, ” जो विवाह सोपा आणि साधारण क्षमतेने होतो त्यात बरकत आहे”. विवाह स्थळ पाहताना श्रीमंती, सौंदर्य, उच्चनिचता न पाहता, चारित्र्य, संपन्नता व धर्मपरायणता पाहा. विवाहास समारंभाचे स्वरूप देणे, वरात काढणे, वाद्यवृंद वाजवणे, पुष्पहारांचा अतिरेक करणे, मद्यधुंद नृत्य, रोषणाई, फटाके ह्या शरियतच्या (धर्म कायदा) विरूद्ध गोष्टी आहेत. व्हिडीओ चित्रणात पडदानशीन स्त्रियांच्या हक्कांची पायमल्ली होते. त्यात दृष्टी विकारांचे घातक परिणाम समोर येण्याची शक्यता असते. खेद आहे लोक यास दोष मानत नाहीत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे जवळचे सहकार्‍यांचे लग्न झाल्याची कैफियत प्रेषितांना नंतर कळत असे. वधू पक्षांनी विवाह सम्मिलीतांना जेवण देण्याची गरज नाही. हुंडा-दहेज अवैध आहेत. पुरूष हे स्त्रीयांचे विश्‍वस्त आहेत. आहेर दुष्प्रथा आहे. लग्नाविधीनंतर मिलापनंतर वलीमा (स्नेहभोजन) ऐपतीप्रमाणे देणे. मशीदीमध्ये विवाह लावण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. जेणेकरून अनेक वायफळ खर्च टाळला जाईल. अनेक प्रथेस आळा बसेल. अचानक ठरलेल्या या विवाहात वधूची रूख्सती (पतीच्या घराकडे स्थलांतर) नंतर होईल याची मुभा आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी, साधेपणाने विवाह होत राहो, ही सदिच्छा. उपस्थितांनी वर-वधूसाठी अल्लाहकडे समृद्धीची व ऐहिक, पारलौकिक जीवनात भलाई मिळो, अशी दुआ केली. आमीन.


आपला भारत देश जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा देश आहे. आपली लोकशाही चार स्तंभावर उभी आहे. विधीमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि माध्यमे. परंतु या चौथ्या माध्यमरूपी स्तंभाला खिळखिळा करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न 2014 पासून सुरू आहेत. यासंदर्भात नुकतीच एक काळजी वाढविणारी घटना घडलेली आहे. ’रिपोर्टस् विदाऊट बॉर्डर्स’ या संस्थेद्वारे नुकतीच जारी झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रिडम इंडेक्स या 180 देशाच्या सूचीमध्ये भारताचे स्थान 136 वे आहे. गुन्हे, भ्रष्टाचार, घोटाळे, कार्पोरेट गुन्हे व बाहुबली नेत्यांचे उद्योग उजेडात आणणार्‍या पत्रकारांना आपल्या जीवाचे मुल्य देवून आपले कर्तव्य पार पाडावे लागत असल्यामुळे इंडेक्समध्ये आपला दर्जा इतका घसरलेला आहे.
      राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो दिल्ली तर्फे जाहीर आकडेवारीप्रमाणे गेल्या दोन वर्षात पत्रकारांवर एकूण 142 हल्ले झालेले आहेत. त्यातील सर्वात जास्त 64 हल्ले उत्तर प्रदेशमध्ये, 26 मध्यप्रदेशात आणि 22 बिहारमध्ये झालेले आहेत. शिवाय अलिकडे एक नवीन पद्धत रूढ झालेली आहे. ज्यात वैचारिक मतभेद ठेवणार्‍यांना भिती घातली जात आहे. त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना ठार सुद्धा मारले जात आहे. आरडब्ल्यूबी च्या रिपोर्टमध्ये असे म्हटलेले आहे की, भारतात कंटरपंथी लोकांद्वारे चालविणार्‍या जाणार्‍या ऑनलाईन अभियानांचे शिकारसुद्धा पत्रकारच होत आहेत. येथे त्यांना फक्त शिव्याच दिल्या जात नाहीत तर शारीरिक हिंसेच्या धमक्यासुद्धा दिल्या जातात. मागच्याच काही महिन्यापूर्वी गौरी लंकेश या महिला पत्रकाराची बेंगलुरू सारख्या सभ्य शहरामध्ये त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर दक्षीणपंथी लोकांनी समाज माध्यमांवर त्यांच्या हत्येला उचित ठरवून जल्लोषही केला आहे. हे सर्व खरोखरच भितीदायक आहे. पत्रकारांसाठी हा काळ अतिशय कठिण काळ आहे. लंकेश यांच्या हत्येनंतर मुखरपणे बोलणारे लोक आपल्या कोषात गेलेले आहेत. बोलण्यापूर्वी प्रत्येक पत्रकार विचार करीत आहे.
      भारत एक बहुलतावादी देश आहे. ज्या ठिकाणी अनेक विचार एकाच वेळेस हातात हात घालून नांदत आलेले आहेत. अनेकतेतील एकता ही आपली ओळख राहिलेली आहे. किंबहुना हीच आपली सामाजिक शक्ती राहिलेली आहे. मात्र अलिकडे केंद्र सरकारवर टिका करणे सुद्धा लोकांना सहन होत नाहीये. टिका करणार्‍याला लगेच देशद्रोही घोषित केले जात आहे. माध्यम जगतामध्ये अंधाधुंद माजलेली आहे. प्रत्येकजण एकमेकाला संशयाने पाहत आहे. आपसातील संवाद हरवलेला आहे. वाहिन्यासुद्धा हिंदू विरूद्ध मुसलमान, राष्ट्रवादी विरूद्ध देशद्रोही अशा प्रकारच्या चर्चा घडवून आणत आहेत. सोशल मीडियाने तर कहर केलेला आहे. संपूर्ण देशात एका विशिष्ट अशा विचार सरणीला लागू करण्यासाठी नियमित अभियान चालविले जात आहे. समाज माध्यमांचेही धु्रवीकरण झालेले आहे. समाजमाध्यमातील विभाजन ठळकपणे दिसून येत आहे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे.
      अशा अडचणीच्या वेळेत माध्यमांनी स्वतंत्र रहायला हवे होते. तोच त्यांचा व्यावसायिक धर्म होता. मात्र आज बहुतांशी माध्यमे शासनाची बाजू घेवून चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींमध्ये सरकारची री ओढत आहेत. एक विशिष्ट अजेंडा नजरेसमोर ठेवून माध्यमातील बहुतेक लोक वागत आहेत. कुठल्याही स्वतंत्र लोकतांत्रिक समाजासाठी ही स्थिती धोकादायक आहे. फ्रेंच तत्वज्ञानी वॉल्टेअरने म्हटले होते, ” मला माहित आहे जे तुम्ही म्हणत आहात ते खरे नाही. परंतु, तुम्ही ते म्हणू शकता. तुमच्या या म्हणण्याच्या अधिकाराच्या लढाईत मी आपला जीवही देवू शकतो”.

 माणूस सध्या माणसांचा होत नाही तर तो आम्हा पक्षांचा कसा काय होईल? आमची निर्मिती तर अल्लाहने माणसांच्या फायद्यासाठीच केली आहे. मात्र माणूस आमच्या जीवावरच उठला आहे. निसर्गाला त्याने दुषित करण्याचा चंगच बांधलेला आहे. त्याने नदी प्रदुषित केली, हवा प्रदुषित केली, ध्वनी प्रदुषित करतोय, दुरध्वनींच्या घातक लहरी व विविध रसायनांच्या माध्यमातून त्याने पूर्ण आसमंत प्रदुषित केलाय. आमचे जगणे तर तो हराम करतोयच मात्र तो आपल्यांचे सुद्धा जगणे हराम करतोय. त्याने जाती- पाती आणि धर्माच्या नावावर रक्तपात सुरू केलाय. पूर्वेपासून-पश्‍चिमेपर्यंत, दक्षिणेपासून - उत्तरेपर्यंतच्या लोकांच्या मनात भेदभाव निर्माण करून ठेवलाय. त्यांची मने दुभंगलीत. हे अल्लाह सांग ! तू या मानवाला सर्व काही दिलेस तरी तो नाफरमान झालाय. आम्ही तर तू ज्या स्थितीत ठेवतो त्या स्थितीत राहत आहोत. मी तर आता माणसांच्या जवळ सुद्धा फटकत नाही, मला त्याची व त्याच्या विचाराची कीव येतेय, त्याच्या आचरणाची घृणा येतेय. आजपर्यंत मी तो जसा सांगेल तसा बोलत होतो. ऐ अल्लाह ! तू सांग येणार्‍या काळात याचं भविष्य कसं असेल? मी तर आता निःशब्दच झालोय! नांदेडच्या गोदातीरी शांतपणे बसून हा पोपट अल्लाहकडे अशी विनवनी तर करीत नसेल ना!                                     - (बशीर शेख)

एस.आय.ओ.ची आमदारांकडे मागणी
औरंगाबाद (सलीम खान यांजकडून)- विधानसभेच्या अगामी हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया दक्षिण महाराष्ट्र (एस आय ओ) च्या वतीने अनेक आमदारांच्या भेटी घेवून सदर अधिवेशनात काही महत्त्वपूर्ण शैक्षणिक मुद्यांवर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे.
      या संदर्भात एस आय ओ च्या वतिने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात सांगण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पाठ्यपुस्तक निर्मित्ती मंडळ पुण्याच्या वतिने इयत्ता अकरावी व बारावीची पाठ्यपूस्तके इंग्रजी आणि मराठी भाषेतून उपलब्ध करून दिली जातात परंतु उर्दू माध्यमातील पुस्तक निर्मितीचे  कार्य हे खाजगी संस्थांकडे सोपविले जाते. विश्‍वस्नीय आणि दर्जेदार पाठ्यपूस्तकांच्या आभावामूळे राज्यातील 562 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सामाजिकशास्त्र व अर्थशास्त्रासारख्या विषयांच्या अभ्यासक्रमात अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या या थंड धोरणामूळे एसआयओ ने या संदर्भात न्यायालयाकडे धाव घेतली होती. सदरच्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने सरकारला या बाबतीत आपल्या धोरणाचा लवकरात लवकर खुलासा सादर करण्याचे आदेश देखील दिले आहेत.   पत्रकात पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या वतीने देशात महाराष्ट्रासह पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठांतर्गत केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इतर सर्व केंद्रे तर स्थापन झाली आहेत परंतु औरंगाबाद परिसरात स्थापन केल्या जाणार्‍या केंद्राच्या बाबतीत सरकारकडून कसलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. या बाबतीत कुलगूरूंच्या वतिने राज्य सरकारला पत्र पाठवून सदर आदेशाला अनुसरून आवश्यक इमारतीच्या बांधकामाची देखील मागणी केली होती.
      महेमूदूर्रहमान समितीचा हवाला देऊन पत्रकात असे सांगण्यात आले आहे की राज्यातील मुस्लिम समुदाय हा शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. या समितीने शिक्षण व रोजगाराच्या मैदानात मुस्लिम समाजासाठी दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी केली होती. राज्यसरकारने 2014 मध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के आणि मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, ज्याला राज्यपालांनी मान्यता देखील दिली. मुंबई उच्च न्यायालयाने या धोरणावर स्थगिती आणली परंतु मुस्लिम समाजाच्या बाबतीतील आरक्षणाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर राज्यसभेमध्ये यावर चर्चा न झाल्याने हा प्रस्ताव पडून आहे. या संदर्भात एस.आय.ओ.च्या एका प्रतिनिधी मंडळाने औरंगाबादचे आमदार इम्तीयाज जलील, सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख व प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. सदर मान्यवरांनी एस आय ओ ला हे आश्‍वासन दिल की ते नक्कीच आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे मांडून त्यावर योग्य ती चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतील.                                                          

      अस्थवस्थ करणार्‍या वर्तमानात समाजमनावर प्रत्याघात करण्यासाठी प्रतिगामी शक्ती जेंव्हा सरसावतात तेंव्हा समाजातील काही समाजधुरीण त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहतात. समाजाचं वर्तमान विकृत होऊ नये, भविष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ते लढण्यासाठी पुढे येतात. कधी-कधी तर समाजाच्या भविष्यासाठी स्वतःचं वर्तमानदेखील ते उद्ध्वस्त करुन घेतात. काळाच्या पुढे पाहतात आणि काळाशी भिडतात देखील. काळाचा हात हातात घेऊन कालचक्राला आपल्या गतीने पुढे ओढत नेतात. काळ बदलवतात आणि स्वतःला कालपरिवर्तक ठरवतात. इतिहास घडवतात आणि स्वतः इतिहासजमा होतात. अशा इतिहासात जमा झालेल्या अनेक व्यक्तींचे बोट धरुन समाज कित्येक वर्षे पुढे चालत राहतो. इतिहास अशा अनेक व्यक्तींना आपल्या उदरात सामावून घेऊन समृध्द झाला आहे. आजही काळाची पावलं पुढे पडताहेत तशी काळाला दिशा देऊ शकणारी माणसं काळाच्या अक्राळ विक्राळ जबड्यात आपला देह ठेवताहेत. ज्यांच बोट धरुन चालावं अशी माणसं एकापाठोपाठ एक समाजातून कमी होताहेत.
      मागील आठवड्यात मोहम्मद अली गार्ड ह्या काळाला आव्हान देत संघर्षशील जीवन जगलेल्या एका समर्पित कार्यकर्त्याने आपला इहलोकीचा प्रवास संपवला. मोहम्मद अली गार्ड यांच्या जाण्याने समाजात पोकळी निर्माण व्हावी इतकी जागा त्यांनी स्वतःच्या अस्तीत्वाने व्यापून टाकली होती. अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता आणि इतके करुनही दुनियेत आलोच नाही असे ते माघारी फिरले देखील. त्यांनी कधी आत्मस्तुती, आत्मगौरवाच्या सिमेजवळही स्वतःला उभे केले नाही. स्वतः समर्पण आणि संयमाशी आजन्म नाळ जोडून ठेवली.
      गार्डसाहेबांचा जन्म तसा अतिसामान्य परिवारातला. जन्मानेच थोरलेपण विधात्याने दिलेले. सामाजिक स्थित्यंतराचे काळातला म्हणजे स्वातंत्र्यपुर्वकाळातला त्यांचा जन्म. सहा भाऊ आणि सहा बहीणी असा विशाल परिवार. जगात पहिला श्‍वास घेतला तेंव्हापासून त्यांनी कुटुंबासमवेत जगण्यासाठीचा संघर्ष आरंभला. जस-जसे कळत्या सवरत्या वयात आले तस-तसे त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी वाढली. सुदैवाने रेल्वेत गार्डची नोकरी मिळाली. क्लासवन झाले. पण या नोकरीचे सुख त्यांना काही मिळाले नाही. सहा बहीणींची लग्ने, भावंडांचे बस्तान बसवण्यापासून सार्‍याच गोष्टी त्यांनी केल्या. त्यातही फाळणीनंतर एका भावाने पाकीस्तानात स्थलांतर केले. कमवत्या वयात त्यांना भावा बहीणींसाठी आयुष्याची पुंजी समर्पित करावी लागली. तरी ते कधी कुरकुरले नाहीत. कधी त्यांनी कसली तक्रार केली नाही. जगत राहिले, लढत राहिले. संघर्ष हाच जणू त्यांचा स्थायीभाव होता. विवाहानंतर देखील हा संघर्ष सुरुच होता. गार्ड साहेबांना एकुण आपत्य दहा. प्रत्येकाच्या आयुष्याला आधार देण्याची जबाबदारी गार्ड साहेबांनी पेलली. कधी त्यांनी माघार घेतली नाही किंवा ते कधी हताश झाल्याचे कुणी पाहिले नाही. स्वतःच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांना तिलांजली देत ते जगले. क्लासवनची नोकरी लागल्यानंतर त्यांनी एक लुना मोटारसायकल खरेदी केली होती. हात-पाय सोबतीला होते तोपर्यंत त्यांनी तेच वाहन वापरले. आयुष्य इतरांना आधार देण्यातच खर्ची घालायचे हा जणू निर्धारच त्यांनी केला असावा.
      सोलापूरच्या जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या स्थापनेपासूनचे ते सदस्य होते. जमाअतच्या विचारांवर, मुल्यांवर त्यांची अढळ निष्ठा होती. मरहूम सरफराज हुसैन काझी, मुस्तफा खान आणि अ. हकीम खान यांच्या समवेत त्यांनी सोलापूरच्या जमाअतची धुरा खांद्यावर वाहिली. 1992 च्या जमाअतवरील बंदीच्या वेळी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. पण त्यामुळे त्यांचे निष्ठांतर झाले नाही. संकटातून त्यांचे विचार आणि निष्ठा अधिक दृढ होत गेल्या. इस्लामी जीवनमुल्यांच्या प्रसारासाठी ते झटत राहिले. कोणत्याही चळवळीला तात्वीक आधार प्रदान करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी लागते. गार्डसाहेब हे जमाअतचे त्या फळीतले कार्यकर्ते. गार्डसाहेब प्रचंड व्यासंगी विद्वान. गार्डसाहेबांचे ग्रंथप्रेम विख्यात होते. 2011 साली पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांना पुण्याला मुलाकडे स्थलांतरीत होण्याची वेळ आली. ज्या शहराची जडण-घडण डोळ्यांनी पाहिली. ज्या शहरातून सारी हयात घालवली ते शहर जड पावलांनी त्यांना सोडावे लागले. जाताना तब्बल एक छोट्या रिक्षाट्रॉली भरून पुस्तकं त्यांनी सोलापूरातल्या अल्लामा इक्बाल अवामी लायब्ररीला दिली. आयुष्यभर त्यांनी एक कटाक्ष पाळला होता. वेतनातील 25 टक्के रक्कम पुस्तक खरेदी करण्यात, साहित्यसेवेत खर्ची घालणे. तो त्यांनी आयुष्यभर पाळला. त्याचे फलित म्हणजे मोठ - मोठ्या विद्वानांना लाजवणारे त्यांचे प्रचंड मोठे ग्रंथालय.
      गार्डसाहेब नुसते वाचत बसले नाहीत. जे वाचलं त्यावर त्यांनी चिंतन केले. जे चिंतन केलं ते प्रत्यक्षात यावं म्हणून ते झटत राहिले. गार्डसाहेबांप्रमाणेच एडव्होकेट सय्यद शाह गाजीउद्दीन हे सोलापूरतील मोठे समाजचिंतक. फकीरीला वैभव मानून जगलेल्या या दोन समाजधुरीणात मैत्री झाली नसती तरच नवल. दोघे एकमेकांचे जीवलग मित्र. मुफ्ती मोहम्मद युसुफ, गार्डसाहेब आणि गाजीउद्दीन साहेब ज्यावेळी एकत्र बसत त्यावेळी त्यांच्यात विद्वेत्तेची जुगलबंदी पहायला मिळत असे. अवघ्या तासाभरात एकमेकांच्या मुद्यांच्या पुष्ठ्यर्थ शेकडो संदर्भ सांगितले जायचे. हास्यविनोदातूनही विद्वत्तेचा प्रवाह अखंडीत वाहत राहायचा. गालीब हजरजबाबी शायर होता असे म्हटले जाते. त्याने जीवनाच्या अनेक अंगावर भाष्य केले. गार्डसाहेब गालीबच्या तुलनेत हजरजबाबी रसिक होते. जीवनाच्या कोणत्या प्रसंगावर कोणत्या शायरने कोणती शायरी लिहली आहे, हे ते सहज सांगत असत. गार्डसाहेबांनी स्वतः शायरी देखील केली. अनेक उर्दु काव्यमैफली त्यांनी गाजवल्या. लेख लिहिले. जमाअत इस्लामी च्या ‘दावत ’ या मुखपत्रात त्यांचे अनेक लेख प्रकाशीत झाले होते.
      गाजीउद्दीन साहेब आणि मोहम्मद गार्ड साहेबांनी मिळून ‘आईना-ए-अय्याम’ नावाचे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले होते. गाजीउद्दीन साहेब त्याचे संपादक आणि गार्डसाहेब त्याचे सबकुछ. अशा विद्वजनांनी आईना-ए-अय्याम मोठ्या यशस्वीतेने चालवले. गार्डसाहेब त्याचे अनेक मनोरंजक किस्से आपल्या बहारदार शैलीत सांगत असत. गार्डसाहेबांची कथनशैली अप्रतीम होती. उर्दूवरील त्यांचे प्रभुत्त्व शब्दातीत होते. गाजीउद्दीन साहेबांनी लिहिलेल्या प्रत्येक ग्रंथाचे प्रुफ रिडींग गार्डसाहेबांनी हक्काने केले. गाजीउद्दीन साहेबांच्या पुस्तक प्रकाशनात ते स्वतःच्या अस्तीत्वाने कार्यक्रमाला व्यापून टाकत. सूत्रसंचालन असो की प्रास्ताविक कधी त्यांनी कोणतीही जबाबदारी लहान मोठी मानली नाही.
      गार्डसाहेब जिथे गेले तिथे संघर्षाचा बाणा त्यांचा कायम राहिला. रेल्वेतून निवृत्ती पत्करल्यानंतर ते पेन्शनर्सच्या हक्कासाठी लढत राहिले. अखेरीस 2011 मध्ये पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर ते जायबंदी झाले. पुण्यात सिमेंटच्या जंगलात त्यांना फ्लॅटसंस्कृतीत त्यांना रहावे लागले. देहाला घेउन उभ्या असलेल्या पायातही अशक्तपणा प्रचंड वाढला होता. अनेक  व्याधी शरीरात घर करुन होत्या. सहचरणीच्या जाण्याने एकाकीपण बोचणारे होते. आयुष्यभर दुसर्‍यांसाठी झटणार्‍या या समर्पित कार्यकर्त्याला अखेरीस निसर्गाने एकाठिकाणी जखडून टाकले. स्वतःच्या शहरापासून दुरु नेले. एका समर्पित कार्यकर्त्याची अखेर जीवनाला शोभेल अशी झाली. गार्ड साहेबांच्या जाण्याने सोलापूरकरांनी एक हरहुन्नरी आणि अभ्यासू, मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरुन निघणार नाही. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, अल्लाह त्यांना जन्नत नशीब करो आणि त्यांच्या परिवाराला मोठे धैर्य देओ. (आमीन)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget